तुला पाहते रे तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते
जरी आंधळी मी तुला पाहते
नीताने भावेशबद्दल, आपल्या नवर्याबद्दल काढलेले हे शब्द. आयुष्यात समर्पण, अत्युच्च प्रेम ह्याचा वास्तुपाठ म्हणजे नीता. स्वत: डोळस असून एका अंध मुलावर जीवापाड प्रेम करून, घरच्यांचा विरोध पत्करून त्याच्याशी प्रेमविवाह केला.
भावेश शाळेत असताना मुलं त्याला ‘आंधळा, आंधळा’ म्हणून चिडवत. त्याची आई फार शिकलेली नसली तरी त्याला वाचून दाखवायची. तिनेच त्याला शिकवले. ती माऊली म्हणाली, ‘‘भावेश तू जग बघू शकत नसलास तरी असं काहीतरी वेगळं करून दाखव की जग तुझ्याकडे बघेल.’’ भावेशला स्वत:ला प्रकाश दिसत नव्हता तरी जगाला प्रकाश देणार्या मेणबत्त्या बनवायची इच्छा होती.
संकटं एकटी येत नसतात. ती हातात हात घालून येतात. तसंच भावेशचं झालं. त्याची नोकरी गेली, कॅन्सरने त्याची आई गेली, वडील तर आधीच गेले होते आणि त्याची दृष्टीही संपूर्ण गेली पण खचून न जाता संकटांना संधी मानून त्याने स्वत:च्या पायावर उभं रहायचं ठरवलं. मेणबत्त्या करून हातगाडीवरून तो विकू लागला. त्याला कोणी कर्ज देईना, मदत करेना. त्याचवेळी नीता त्याच्या आयुष्यात आली.
हळूहळू त्यांनी स्कूटर घेतली, मग टेम्पो घेतला. मोठ्या प्रमाणात मेणबत्त्या करून स्वत:ची कंपनी काढली. त्यात अनेक अंध मुलांना शिकवून पायावर उभं केलं. स्वावलंबी बनवलं. या यशात त्याची पत्नी नीता हिचाही मोठा वाटा आहे. अंधत्व ही कमतरता न मानता त्यावर मात करून तो खेळाडू झाला. अनेक खेळात तसेच पॅरा ऑलिंपिक्स मध्ये त्याने भरपूर पदके मिळवली. स्वत:च्या जिद्दीवर आपला व्यवसायही त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला. त्याचा वेलू गगनाला भिडला आहे. खेळाप्रमाणे व्यवसायातही अनेक रेकॉर्डस् भावेशला मोडायचे आहेत. आज तो आपल्या पत्नीबद्दल कृतज्ञतेने म्हणतो,
आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे
स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे
भावेशवरून आणखी एक गोष्ट आठवली. शाळेत मास्तरांनी विद्यार्थ्यांना कागदाचे अनेक तुकडे दिले आणि सांगितले की हे तुकडे जोडून भारताचा नकाशा बनवा. एका मुलाने पटकन नकाशा बनवला. मास्तरांनी विचारलं, ‘‘इतका लवकर कसा बनवलास?’’ विद्यार्थी म्हणाला, ‘‘या कागदांच्या तुकड्याच्या मागे माणसाचं चित्र आहे, मी माणूस जोडला. भारताचा नकाशा आपोआप तयार झाला.’’ याला राष्ट्रीय एकात्मता म्हणतात. ही एकात्मता आपल्या भारताची शान आहे. ती मला अनामप्रेमींनी महाबळेश्वरला अक्षयतृतीयेला अंधांचे राष्ट्रीय संमेलन घेतले होते त्यात बघायला मिळाली. मी पण अनामप्रेमी आहे. म्हणूनच मलाही हा सोहळा बघायचं भाग्य लाभलं.
अनाम म्हणजे ज्याला कोणत्याही प्रसिद्धीची गरज वाटत नाही, आपले नाव कुठेतरी यावे असे मनात वाटत नाही ते अनाम आणि प्रेमाने कोणतीही परिस्थिती, म्हणजे जग जिंकता येते म्हणून अनामप्रेम. अंधांच्या सहवासात तीन दिवस राहिले. त्यांच्याशी बोलले, त्यांच्याबरोबर सहभोजन केले. त्यांच्या कोंडलेल्या भावनांना, हृदयातील वेदनांना वाट करून दिली, साद घातली. तेव्हा जाणवलं दुदर्म्य इच्छाशक्ती असली की त्यापुढे काहीही अशक्य नसत. गांधीजींनी सत्याचे प्रयोग केले. आम्ही प्रेमाचे प्रयोग करतो. प्रेमाचे प्रयोग करताना वाटलं खरं म्हणजे आपण डोळे असलेले लोक अंध आहोत. कोणी सत्तेने, कोणी धर्माने, कोणी पैशानी, कोणी व्यवहारातील तात्कालिक लाभांनी. जे डोळस आंधळ्यांसारखे वागतात त्यांच्यासाठी ओशो म्हणतात, ‘‘मै अंधोंकी बस्ती मे रोशनी लेके घूम रहा हूँ!’’
अंधांना फक्त चर्मचक्षू नाहीत पण त्यांचे अंत:चक्षू उघडले आहेत. त्यांना तुमच्यातील आत्मा दिसतो, सहसंवेदना जाणवते. म्हणून आपण थोडा काळ आपलं अंधत्व विसरून या खर्या अंधांवर प्रेमाचं सिंचन करू या. अंध केवळ वासानी, स्पर्शानी, ऐकण्यानी कितीतरी गोष्टी आपल्यापेक्षा सरस करू शकतात.
‘‘डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे’’
असं म्हणणार्या या अंधमुलांच्या राष्ट्रीय मेळाव्यातून मी त्यांचे अदृष्य प्रेम समजून घेऊ शकेल.
इतके वर्ष फक्त अन्यायाच्या रॅली (कामगारांचे प्रश्न, त्यांच्या मागण्या, पगारवाढ इ.) पाहील्या होत्या, पण महाबळेश्वरला या अंधांची प्रेमाची रॅली आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली. प्रेम ओसंडून वहात होते. त्या बिचार्या मुलांच्या काही मागण्या, प्रश्न नव्हतेच. उलट गोड आवाजात आपापल्या भाषेत सर्व मुलं छान हसून गाणी म्हणत होती. या रॅलीचं अवर्णनीय दृष्य बघून डोळ्याचं पारणं फिटलं. अंतर्मुख व्हायला झालं. भारतातल्या दहा राज्यांमधून एकोणीस शांळाचे सर्व वयोगटातील चारशे विद्यार्थी जमले होते. हिंदुस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच अंधांचा राष्ट्रीय मेळावा झाला आहे. सगळ्यांनी जगावेगळं समृद्ध जग पाहिलं.
अंध मुलांचं वागणं, बोलणं, त्यांचं पाठांतर, त्यांचे कडूगोड अनुभव, त्यांना पावलोपावली येणार्या समस्या, तरीही आनंदी वृत्ती, जिद्द आणि कष्टाची तयारी पाहिली. त्यांची स्थिरता, एकाग्र चित्त आणि एकाग्र मनानी कोणतीही गोष्ट करणं, प्रवाहाविरूद्ध जावे लागूनही जगण्याची जिगर, मोठं मन पाहिलं. आमच्या अडचणी, आमचे प्रश्न कुठल्याकुठे विरून गेले. तेव्हा वाटलं आपलं दुखलेलं कळतं तसं दुसर्याचं दुखलेलंही आपल्याला कळलं पाहिजे. आपण कृतज्ञतापूर्वक समाजाचं जे देणं लागतो. ते दिलं पाहिजे, कोणत्याही सबबी न सांगता. म्हणतात ना ‘जिथे इच्छा आहे तिथे मार्ग निघतो‘, ‘ज्याला आवड आहे त्याला सवड मिळते.’ या अंध मुलांनी आपण अंध आहोत याचा बाऊ न करता, सहानुभूती न मागता उलट त्याचा स्वीकार केला आहे. म्हणूनच त्यांची सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती होते आहे.
खरं तर आपण डोळस लोक भाग्यवान आहोत. आपल्याला निसर्गाची सर्व रूपं बघता येतात. चंद्र, सूर्य, पक्षी, प्राणी, झाड, फुल, फळ, समुद्र, नद्या, डोंगर. पण आपण तो निसर्ग अनुभवत नाही. उपभोगतच नाही कारण आपण स्वत:शीच एकरूप नाही. तर इतरांशी एकरूप कसे होणार? माणसाच्या सुखासाठी निसर्ग सिंहाचा वाटा उचलतोय. आपण निदान खारीचा तरी उचलूया. परिवर्तन हृदयापासून केलं तर यशस्वी होतं. म्हणून आपण स्वयंप्रकाशित होऊ आणि इतरांना प्रकाश देऊ. मनामनात क्रांती झाली की समाजातील उपेक्षितांना आपोआप मदतीचे हात दिले जातील. त्यांच्यावर असं प्रेम करूया की ज्या प्रेमात कसलीही अपेक्षा नाही, स्वार्थ नाही, फक्त समर्पण आहे. खरं म्हणजे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे.
इथे अंध मुलांनी रोप मल्लखांबात आंतरराष्ट्रीय रेकॉर्डस् तोडले होते. काही जणांनी अंधांसाठी असणार्या आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावले होते. ऑर्केस्ट्रामध्ये सर्वप्रकारची वाद्ये डोळसांना लाजवतील इतक्या सफाईदारपणे मुले वाजवीत होती. स्टेजवर सर्व नृत्यप्रकार एकही बीट न चुकता करत होती. त्यांची स्टेजवरची थिरकणारी पावलं बघून थक्क व्हायला होतं. आपोआप सर्व प्रेक्षकांकडून त्यांना स्टँडिंग ओव्हिशन दिले गेले. टाळ्यांचा कडकडाटात भरभरून दाद मिळाली. गाण्याचा सुंदर, सुरेल गळा, तालासुरांचं अद्भूत ज्ञान, अभिनय, कविता, साहित्य एकही क्षेत्र असं नाही की ज्यात या अंध मुलांनी प्राविण्य मिळवलं नाही. त्यांच्यात अनेक कलागुण आहेत. त्यांना फक्त अनाम प्रेमींनी व्यासपीठ दिले.
काही अंध विद्यार्थी सी. ए. झाले आहेत. काही इंजिनीअर, एम. बी. ए., कोणी मोठे व्यावसायिक, कोणी मोठ्या पदावर अधिकारी आहेत. खेळात, गिर्यारोहनात, मॅरॅथोन कशातही ही मुले मागे नाहीत. एक जण तीन डिगर्या घेऊन शाळेची मुख्याध्यापिका आहे. नेहाने हिमालयातील उंच शिखर चढून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये जागतिक विक्रम नोंदविला आहे. महाराष्ट्र राज्याच्या विशेष गिर्यारोहणाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. दिल्लीला जागतिक महिला अधिवेशनातही जगातील ज्या अंध महिलांची निवड केली गेली त्यात नेहाची निवड झाली होती. काहीजणी वॉटरफॉल रॅपलींगसारख्या साहसी गिर्यारोहणात अग्रेसर होत्या. कोणाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार मिळाला तर कोणाला ‘ऑल राऊंडर’ पुरस्कार मिळाला. कुणी नृत्यात अग्रेसर तर कोणाची अंध संस्थेचे अध्यक्ष, सचिव म्हणून निवड झाली.
फिटे अंधाराचे जाळे,
झाले मोकळे आकाश
दरी खोर्यातून वाहे
एक प्रकाश प्रकाश
महाबळेश्वर सोडताना माझी अवस्था अशीच झाली.
खूप अभिमान वाटावा अशी कामगिरी करणार्या अंध विद्यार्थ्यांकडे पाहून असे वाटले, ‘लेट्स नॉट गीव सिम्पथी बट ऑपोर्च्युनिटी टू देम.’
तसेच अनामप्रेम ही एक विचारधारा आहे, प्रवाह आहे, परिवार आहे. ‘प्रेम शिंपीत जा’ हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. समाजातील उपेक्षितांसाठी मग ते मुकबधिर, अंध, अपंग, मतीमंद, अनाथ कोणीही असोत त्यांच्यासाठी हृदयापासून वाटणार्या तळमळीने, भक्तीभावाने, निरपेक्षपणे काहीतरी समाजासाठी चांगलं काम करण्याची धडपड पाहून अनाम प्रेमींनाही सॅल्युट करावासा वाटला. हेलन केलर, आएशा यांसारख्या संस्थामधून अंधांसाठी आणि इतर सर्वांसाठी काम करणार्या माझ्या मैत्रिणी म्हणत असतील,
कधी भक्त का पाहतो ईश्वराला
नदी न्याहळी का कधी सागराला
तिच्यासारखी मी सदा वाहते
जरी आंधळी मी तुला पाहते.
(पूर्वप्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक', मार्च २०१६)
- उज्ज्वला कुलकर्णी, पुणे
९८९०९४६६८४