सन अठराशे सत्तावन्न
एका ऐतिहासिक उठावाच्या सर्व बाजू सांगणारा ग्रंथ 'साप्ताहिक चपराक', पुणे
(२८ मार्च २०१६)
अठराशे सत्तावनचा उठाव. त्याबद्दल साधारणपणे एकच मतप्रवाह आढळतो. तो स्वातंत्र्यलढा होता असं ते मत. तो उठाव मोठा होता यात शंका नाही; मात्र तो स्वातंत्र्यलढा होता का? त्याबद्दल वेगवेगळी मतं व्यक्त केली जातात. बेचाळीसचा उठाव स्वातंत्र्यलढा होता. त्यानंतर आझाद हिंद सेनेने केलेला उठावही स्वातंत्र्यलढाच. ब्रिटिशांबद्दल खूप संताप होता, म्हणूनच अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला ही गोष्ट मात्र खरी आहे. या उठावाला असंख्य बाजू आहेत. शेषराव मोरे म्हणतात त्याप्रमाणं, एक बाजू ‘जिहाद’ची देखील आहे. ना. के. बेहर्यांचा ‘सन अठराशे सत्तवन्न’ हा ग्रंथ या उठावाच्या सर्व बाजू मांडतो. 489 पानी हा ग्रंथ. यात सत्तावन्नमध्ये घडलेला भयानक रक्तपात, बंडखोर व ब्रिटिश दोघांनी आखलेले डावपेच, त्यामागचं राजकारण अशा सर्व बाबी येतात. हा उठाव दडपताना ब्रिटिशांनी दाखवलेली राक्षसी वृत्ती भयानक होती, तसंच बंडखोरांकडूनही अत्यंत अमानवी व हिंस्त्र हत्या घडल्या. त्याचा संपूर्ण लेखाजोखा ग्रंथात आला आहे.
ब्रिटिशांनी भारत जिंकून घेतला तोच मराठ्यांपासून. औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतर मराठ्यांनी सगळा भारतच ताब्यात घेतला होता. दिल्लीच्या मुघल बादशाहीचं प्राणपणानं रक्षण देखील केलं होतं. ग्रंथाच्या सुरूवातीला लेखकानं हे ऐतिहासिक सत्य सांगितलं आहे. नंतर लेखक 1857 च्या उठावाची कारणं सांगतो. लॉर्ड डलहौसीची लोभी वृत्ती यामागं होती. तो 1848 मध्ये भारताचा गव्हर्नर जनरल झाला. भारतातली अनेक संस्थानं त्याच्या डोळ्यात खुपू लागली. आधी सातार्याच्या प्रतापसिंह भोसल्यांचं राज्य इंग्रजांनी गिळलं. दि. 29 मार्च 1849 रोजी डलहौसीनं पंजाबचं राज्य खालसा केलं. तिथं राजा रणजितसिंहाचं राज्य होतं. रणजितसिंहाचा मुलगा दिलीपसिंह. त्याला तर ब्रिटिशांनी ख्रिस्तीच केलं. डलहौसीनं पुढं मराठ्यांच्या तंजावर येथील राज्याची देखील तीच गत केली. नागपूरच्या भोसल्यांचं राज्य देखील डलहौसीच्या कारस्थानांना बळी पडलं. ब्रिटिश कापडाचा व्यापार करत. त्यासाठी त्यांना मुबलक कापूस हवा असे. यासाठी त्यांनी वर्हाड व मध्य प्रांतावर कब्जा केला. दि. 2 ऑगस्ट 1854. या दिवशी डलहौसीनं झांशीचं राज्य खालसा केलं. दि. 4 फेब्रुवारी 1856. या दिवशी लखनौच्या संपन्न राज्याचा देखील घास घेण्यात आला. इ. स. 1714 ते 1818 हा साधारण 104 वर्षांचा पेशवाईचा काळ. 1818 साली पेशवाई नष्ट झाली व ब्रिटिशांनी मराठ्यांना सरळ चेपायला सुरूवात केली. साम, दाम, दंड, भेद! ब्रिटिशांच्या राजकारणाचं सूत्रच होतं हे. ब्रिटिशांची व विशेषः डलहौसी या महाभागाची ही वृत्ती असंतोषाला कारणीभूत ठरत गेली. ब्रिटिशांचं हे हातपाय पसरणं लेखकानं ग्रंथाच्या सुरूवातीलाच खूप तपशीलानं सांगितलं आहे. पेशवाईच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी भारतभर झेंडे रोवले होते. अटकेपर्यंत राज्य नेलं होत; मात्र नंतर इस्ट इंडिया कंपनीच्या राजकारणानं सर्वांवरच कडी केली. त्यात दुसरा बाजीराव पेशवा. तो घरबुडवा निघाला. त्यानं 1802 साली वसई येथे ब्रिटिशांशी तह केला. तो दिवस होता 31 डिसेंबर. त्या दिवसापासून मराठ्यांच्या राज्यातच भांडणं व मतभेद सुरू झाले. ब्रिटिश या सगळ्यांचा फायदा घेत गेले. राजकारण हा शेवटी बुद्धिबळाचाच पट असतो. हे बुद्धिबळाचे खेळ बेहर्यांच्या या ग्रंथात पानोपानी वाचायला मिळतात. ग्रंथ कुठेही बोजड नाही. कंटाळवाणा तर नाहीच. अभ्यासपूर्ण व वाचनीय असा तो आहे. बेहर्यांनी हा ग्रंथ लिहिला 1927 साली. त्यानंतर 11 वर्षांनी त्याची दुसरी आवृत्ती निघाली. मग थेट 2007 साली तिसरी आवृत्ती. ती काढली पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशनने. ते 1937 साल होतं. त्यासाली स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बेहर्यांच्या या ग्रंथाची स्तुती केली होती. ‘हा ग्रंथ खर्या इतिहासाला धरून आहे’ असे सावरकरांचे उद्गार होते. ग्रंथ वाचताना सावरकरांचे हे उद्गार आपल्याला आठवत राहतात.
दिल्ली, लखनौ, कानपूर व झांशी ही सत्तावनच्या उठावाची प्रमुख केंद्रे होती. यात लखनौ वगळता इतरत्र ब्रिटिश बायका व मुलांच्या कत्तली झाल्या, असा उल्लेख ग्रंथात आढळतो. त्यात सर्वात भीषण कत्तल कानपुरला झाली. त्याचा सूड म्हणून ब्रिटिशांनी कानपूर व आसपासच्या परिसरात दहा हजार भारतीयांच्या कत्तली घडवून आणल्या. वाटेल ती किंमत देऊन ब्रिटिशांना हा उठाव दडपायचा होता. त्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडलं. आपली सगळी बुद्धी, शक्ती वापरली. त्याची सगळी वर्णन बेहर्यांनी दिली आहेत. दिल्ली जिंकून घेताना ब्रिटिशांचे 61 लाख रूपये खर्च झाले व 3837 सैनिक मरण पावले; मात्र ब्रिटिशांनी ती किंमत चुकती केली. पुढं त्यांनी झांशी जिंकून घेतलं तेव्हा सूडबुद्धीनं पाच हजार जणांना ठार मारलं. झांशीतली लढाई घनघोरच होती. झांशीच्या राणीनं 17 दिवस किल्ला लढवला. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशीच स्थिती त्या काळात झांशीच्या राणीची होती. या चार शहरांमधली बंडाची आग भयंकर होती. त्याला उघड राज्यक्रांतीचं स्वरूप आलं होतं. ही आग विझवायला ब्रिटिशांना एक वर्ष लागलं.
हा उठाव का झाला? त्याची कारणं बरीच होती; मात्र ठिणगी पडली ती एका घटनेमुळं. त्यावेळी कोलकत्याहून आठ मैलांवर ‘दमदम’ ही लष्करी छावणी होती. तिथं ब्रिटिशांनी काडतुसे तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता. त्यावेळी ब्रिटिश फौजेतील शिपाई ‘ब्राऊनबेस’नावाची बंदुक वापरत असत. या बंदुकीत काडतूस भरताना ते दातांनी तोडून बंदुकीत भरावं लागे. या काडतूसाला गाईची व डुकराची चरबी चोपडली जाते अशी अफवा उठली. ब्रिटिशांनी देशी शिपायांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला; मात्र काडतूस वापरताना आपला धर्म बाटेल या विचारानं हिंदू व मुसलमान शिपाई अस्वस्थ झाले. ते आतल्या आत घुसमटू लागले व दि. 29 मार्च 1857 रोजी बराकपूर येथे सर्वप्रथम मंगल पांडे बिथरला. त्यानं एका ब्रिटिश अधिकार्यावर गोळी झाडली. तो अधिकारी बचावला; मात्र त्या गोळीनं ‘1857’चा अध्याय सुरू झाला. तो संपायला पुढं दोन वर्षे लागली. काय घडलं या दोन वर्षात? तर उत्तर भारतात अक्षरशः हलकल्लोळच माजला होता. बेहरे यांनी या सगळ्या घटना सांगितल्या आहेत. त्यात लढाया, राजकीय डावपेच सगळं काही आहे. त्यावेळी भारतात इस्ट इंडिया कंपनी राज्य करत होती. तिच्या फौजेत अयोध्या, कानपुर, अलाहाबाद, वाराणसी टापूतील पूरभैयांचा खूप भरणा होता. या पूरभैयांच्या पलटणी बिहार, मध्य प्रांत, संयुक्त प्रांत, वायव्य प्रांत, मध्य हिंदुस्थानातील संस्थानं, पंजाब अशा सर्व उत्तर हिंदुस्थानभर पसरल्या होत्या. उठावात या पलटणी सर्वात पुढं होत्या. मुसलमान शिपाई तर उठावात सामील होतेच. अशावेळी ब्रिटिशांनी आपल्या फौजेतील शीख व गुरखा पलटणींना आपल्याकडे वळवून घेतले व केवळ त्यांच्या मदतीनेच उठाव दडपला. शीख व गुरखे विरोधात गेले असते तर? तर ब्रिटिश अक्षरशः मेले असते; मात्र ते विरोधात गेले नाहीत त्याला ऐतिहासिक कारणं होती. एक तर शिखांना त्यावेळी मोगल बादशाही मान्य नव्हती. बंडखोरांनी तर मोगल बादशहालाच आपला राजा मानलं होतं. शिखांचे गुरूगोविंदसिंगांसारखे काही धर्मगुरू पूर्वी मोगल बादशहाकडून मारले गेले होते. त्यामुळे शिखांना या बादशाहीविरूद्ध आतून तिटकारा होता. आणखी एक कारण होतं. 1849 साली शीख-इंग्रज युद्ध झालं होतं. त्यावेळी पूरभैय्या व मुसलमान पलटणींनी शिखांविरूद्ध लढून इंग्रजांना विजय मिळवून दिला होता. त्याचाही राग शिखांच्या मनात होता. गुरख्यांची अवस्था अशीच होती. पूर्वी नेपाळ देखील ब्रिटिशांनी जिंकून घेतला होता तो या पूरभैय्या व मुसलमान पलटणींच्या बळावरच. आता गुरख्यांना त्या घटनेचा सूड घ्यायचा होता. यातली ब्रिटिशांची चलाखी व मुत्सद्देगिरी लक्षात घेण्यासारखी होती. ब्रिटिश भारतीय संस्थानं खालसा करत होते. दुसरीकडे या संस्थानिकांना एकमेकांविरूद्ध कोंबड्यासारखं झुंजवत होते; मात्र सगळ्यांनी एकत्र येऊन ब्रिटिशांना बुडवावं असं कुणालाही वाटलं नाही. नेपाळचा राजा जंगबहाद्दूर. तो देखील ब्रिटिशांच्या मदतीला धावला. त्याचं कारण वर आलंच आहे. प्रत्येकाला आपापले हेवेदावे साधायचे होते. या हेवेदाव्यांचा परिणाम एकमेकांचे रक्त सांडण्यात झाला. यासंदर्भात एक पत्र फार बोलकं आहे. ते लिहिलंय लॉर्ड लॉरेन्सनं सर फ्रेडरिक करी याला. लिहिलं 1858 मध्ये. तो म्हणतो, ‘‘हॅड द पंजाब गॉन, वुई मस्ट हॅव बीन रूइंड.’’ पंजाब बिथरला असता तर सर्वनाश अटळ होता असं तो म्हणतो. बंडाच्या काळात राजपुताना (राजस्थान) शांतच राहिला व महाराष्ट्रातही बंडाचं मोठं वारं शिरलं नाही. झांशीची राणी, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे हे मराठे तेव्हा लढले. ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी प्राण पणाला लावले; मात्र त्यांच्या सैन्यातली एकूण मराठ्यांची संख्या कमीच होती. रजपूत शांत राहिले ते त्यांच्या काहीशा स्थितीप्रिय वृत्तीमुळं. सत्ताधारी हे मोघल असोत, मराठे असोत वा ब्रिटिश, सत्तेपुढं लीन रहायचं ही ती स्थितीप्रियता. दुसरीकडे बंगाल व मद्रास प्रांत देखील शांतच राहिले.
मंगल पांडे ते तात्या टोपे असा देखील हा सगळा प्रवास आहे. मंगल पांडेला ब्रिटिशांनी फाशी दिलं. त्या फाशीची तारीख मात्र ग्रंथात दोन ठिकाणी वेगवेगळी देण्यात आली आहे. पृष्ठ क्र. 155 वर ती 6 एप्रिल 1857 आहे तर पृष्ठ क्र. 207 वर दि. 8 एप्रिल 1857. मंगल पांडे नंतर बरोब्बर दोन वर्षांनी ब्रिटिशांनी तात्या टोपेंना फाशी दिली. तो दिवस होता दि. 18 एप्रिल 1859.
बेहर्यांच्या मते उत्तर हिंदुस्थानातील या ऐतिहासिक बंडात हिंदुंपेक्षा मुसलमानांचा सहभाग जास्त होता. कारण त्यांनी ब्रिटिशांविरूद्ध तेव्हा जिहादच पुकारला होता. शेषराव मोरे यांनी नंतर हेच सांगितलं. ‘लखनौ शहर बंडखोरांनी एखाद्या किल्ल्याप्रमाणे लढवलं’ असं बेहेर्यांनी म्हटलंय. लखनौमधील बंडखोर हे सगळेच मुसलमान होते. त्यांच्या शौर्याचं जबरदस्त कौतुक सावरकरांनी देखील आपल्या ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथात केलेले आहेच.
ग्रंथात मथुरा, बरेली, आग्रा, शहाजहानपुर, वाराणसी, अलाहाबाद, ग्वाल्हैर, इंदौर, महू, लाहौर, पेशावर, नझफगड येथील उठावांची देखील माहिती देण्यात आली आहे. ‘सत्यासारखा धर्म नाही’ असं बेहेरे एकेठिकाणी म्हणतात. त्यामुळं ते हा इतिहास सांगताना सत्य घटना सांगण्यावर भर देतात. बेहेर्यांनी दोन उदाहरणे सांगितली आहेत. त्यावरून ही गोष्ट लक्षात यावी. एका ब्रिटिश अधिकार्याने या बंडाच्या धुमश्चक्रीत वीस हजार निरपराध स्त्री-पुरूषांचे प्राण वाचवले. ही घटना झांशीतली. दुसरीकडे सर जॉन के, लॉर्ड कॅनिंग, एडवर्ड थॉमसन ही ब्रिटिश मंडळी सत्यच सांगतात. ब्रिटिशांचे राक्षसी अत्याचार सांगताना ही मंडळी मागेपुढे पाहत नाहीत. त्यांची मतं बेहर्यांनी दिली आहेत.
बेहर्यांच्या मते त्याकाळी एकराष्ट्रीयत्वाची भावना भारतात नव्हती. 1885 साली कॉंग्रेसची स्थापना झाली. बेहर्यांच्या मते त्यानंतर भारतात एकराष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. ग्रंथात 1857-58च्या वेळचा भारताचा नकाशा आहे. त्यातून भुगोल तर समजतोच; पण ऐतिहासिक ग्रंथ नकाशांमुळे नीट समजायला मदत होते. काही छायाचित्रे ग्रंथात आहेत. त्यातील कुंवरसिंह, झांशीची राणी, नानासाहेब पेशवे, बहाद्दूरशहा जफर, बेगम झिनत महल, तात्या टोपे यांची छायाचित्रे आपल्याला भूतकाळात खेचून नेतात. एकूणच 1857 च्या उठावाचा समतोल अभ्यास या ग्रंथातून आला आहे.
* सन अठराशे सत्तावन
* लेखक : नारायण केशव बेहेरे
* प्रकाशक : श्रीविद्या प्रकाशन, पुणे (०२०-२४४५८४५५)
* पृष्ठे : ४८९, * मूल्य : ३००
* महेश मांगले, पुणे
९८२२०७०७८५

No comments:
Post a Comment