Saturday, June 11, 2016

मी खवय्या पुणेकर !

सुप्रसिद्ध निवेदक आणि पत्रकार सुधीर गाडगीळ यांचं ‘मानाचं पान’ हे पुस्तक शुक्रवार दि. 17 जून रोजी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत ‘चपराक प्रकाशन’ कडून प्रकाशित होत आहे. वलयांकित लोक खातात काय? त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी नेमक्या कशा आहेत याबाबत गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखती लेख स्वरूपात या पुस्तकात आहेत. या पुस्तकाचे लेखक सुधीर  गाडगीळ यांचा त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडीविषयीचा एक  लेख खास ‘महानगर’च्या वाचकांसाठी देत आहोत. या पुस्तकाचे मूल्य केवळ शंभर रूपये असून त्याच किमतीत वाचकांना घरपोच मिळेल. या पुस्तकाच्या नोंदणीसाठी संपर्क : ‘चपराक प्रकाशन’, पुणे दूरध्वनी : 020 24460909/7057292092
 
खाणं, गाणं, बोलणं हे माझे वीक पॉईंट्स आहेत. खाताना कुणी बोलणारा समोर असेल तर खाण्याला चव येते आणि पदार्थांच्या चवींवर चविष्टपणे टिप्पणी करत खाल्लं तर गप्पांची मैफलही जमते नि खाण्याची रंगत वाढते.
बेसनाचा लाडू फोडता क्षणी मध्ये पांढरट कोरडेपणा असेल तर बेसन नीट भाजलेलं नाही हे क्षणात कळतं. कसदार तुपात आणि जीभेला, टाळूला चिकटलं तर तो बेसन लाडू जमल्याची पावती देता येते. दाण्याचा लाडू आणि पुरणाची पोळी गुळाच्या साथीनंच हवी. उगाच साखरेची पुरणपोळी करण्याचा प्रयत्न करू नये. हॉटेलात मी फार उशिरा म्हणजे कॉलेजच्या पहिल्या वर्षी प्रथम गेलो. तोवर नाश्त्यापासून सणावाराच्या पक्वान्नापर्यंत सारं घरीच बनवलं जायचं आणि आई, आजी, आत्या, पत्नी, कन्या, सून असा गृहिणींचा ताफाच घरी असल्याने, एकत्र कुटुंबात चवींच्या वैविध्याचा आनंद घेता आला.
पूर्वी घरी सकाळचा नाश्ता म्हणजे फोडणीचा भात की, फोडणीची पोळीच असायची. हल्ली हे शिळे पदार्थ मेन कोर्समधले ‘ऍटम’ झाले आहेत. जेवताना चटण्या, कोशिंबीरी, लोणची यांचे नाना प्रकार ताटाची डावी बाजू लढवत तर उजवीकडे एक घट्ट भाजी आणि एक मिक्स किंवा पातळ भाजी असे. तव्यावरचा गरमागरम ‘फुलका’ पानात थेट पडणं, हा आनंददायीच भाग होता.
साधं वरणभात, लिंबू, तव्यावरचा फुलका आणि बटाट्याची ‘काचर्‍या’ भाजी, डावीकडे कैरीचं बारीक फोडीचं रस राखून गोड लोणचं हा मेनू मला कित्येक वर्षे कायमस्वरूपी आवडलेला आहे. भाज्यांमध्ये बटाट्याशिवाय आवडणार्‍या भाज्या म्हणजे कच्च्या हिरव्या टोमॅटोची दाण्याचं कुट घातलेली भाजी, फरसबी, कोबी. बटाट्याचा सालासकटचा काळा मसाला घातलेला रस्सा प्रिय. कधीतरी अळूची पातळ भाजी, चाकवत पातळ भाजी, कैरीची डाळ, कोरडं वरण, मेथी किंवा अंबाडीची गोळा भाजी असल्यास भाकरी अधिक चवीनं खाल्ली जाते. मटकी, चवळी, मसूर, मूग या उसळीही अधूनमधून हव्यात. मुगाची खिचडी आणि पापड असेल तर जोडीला कढी हवीच. गोड पदार्थात गुळाची पोळी; मात्र गूळ कडेपर्यंत भरलेला हवा. पुरणाच्या पोळीपेक्षा पुरण भरलेले तळलेले बेळगावी कडबु लाजबाब. लाडवात मोतीचूर, बेसन, अळीव आणि डिंक केव्हाही खायला आवडतात. गुलाबजाम टाळतो मात्र आम्रखंड आवर्जून खातो.
घर सोडून बाहेरच्या स्टार पार्ट्या, लग्नाच्या जेवणावळी यात मी अजिबात रमत नाही. पनीर आणि कोफ्ता तर पहायला देखील आवडत नाही. भटकतो खूप. त्यामुळे प्रवासातले खाण्याचे थांबे ठरलेले आहेत. मुंबईच्या रस्त्यावर ‘दत्त स्नॅक्स’मध्ये कोथिंबीर वडीसाठी आणि कोल्हापूर रस्त्यावर ‘विरंगुळा’त थालीपीठसाठी रेंगाळणारच. नाशिक रस्त्यावर पुण्याकडून निघाल्यावर ‘कामत’च्या अलीकडे डाव्या टेकडीवरच्या धाब्यावर बडा-मसूर-चवळीसाठी थांबणार. नगर रस्त्यावर सरहदवाडीची भेळ, नारायणगावची मिसळ खाणारंच.
मुंबईत पूर्वी दादरला सेनाभवनजवळ ‘क्रिस्टल पंजाब’मध्ये रात्री हजेरी असे; तर ‘जिप्सी’शेजारी ठरल्यावेळी मिळणार्‍या ठरलेल्या भाज्या उत्साह वाढवणार्‍या. ‘प्रकाश’चा साबुदाणा वडा, ‘आस्वाद’चा कुठलाही पदार्थ, गिरगाव ठाकूरद्वारजवळ ‘विनय हेल्थहोम’ची मिसळ. पुण्यात बेडेकर, दत्त, जोशी, श्री यांची मिसळ तर थाळीसाठी ‘आशा डायनिंग’, देवधरचं ‘जनसेवा भोजनालय’, ‘कृष्णा’त जाणं पसंत करणार. पूर्वी ‘श्रेयस’ जास्त आवडे. सणसांच्या ‘गिरीजा’चा ग्रामीण मेनू (भाकरी-पिठलं-मटकी) तर अधून मधून खायलाच हवा.
घरात कधीतरी दुपारी ‘डकड’ करायची फर्माईश तर जेवणात गोळ्याचं सांबार आठवणार.
माझ्या कॉलेजच्या काळात (बीएमसीसी) ‘रूपाली’चं नाव ‘मद्रास कॅफे’ आणि ‘वैशाली’चं नाव ‘मद्रास हेल्थ होम’ होतं. इथल्या सांबाराच्या चवीत चाळीस वर्षात फरक पडलेला नाही. पुणे शहराबाहेर त्यावेळी वाटणार्‍या लॉ कॉलेजसमोर करंदीकरांची गोडी मिसळ होती तर ‘पुना गेस्ट हाऊस’च्या सरपोतदारांची ‘आमटी’ भुर्रकताना घरची आठवण येई. त्यावेळी लग्नसराईत पुण्यात बुफे पद्धत नव्हती. आचार्‍यानं लग्नसराईत बनवलेल्या जिलब्या नि लाडूच्या पैजेनं जेवणार्‍या पंक्ती उठत. गोड पदार्थाची ‘स्वीट’ नावाखाली हजेरी नव्हती. साखरेचा शिरा फक्त सत्यनारायण पुजेला असे. एरवी लालसर खमंग गुळाचा शिरा दुपारच्या खाण्यासाठी होता. रविवारची सकाळ सगळ्यांनी मिळून ‘पाटा’वर ओले वाल पसरत, बिरड्या सोलण्यात व्यतीत होत असे. ससून होस्पिटलसमोरच्या बिल्डिंगच्या गच्चीवर ‘बादशाही’इतकी चविष्ट थाळी मी अद्याप खाल्लेली नाही. टिळक रोडवरच्या ‘बादशाही’ची घरेलू शाकाहारी ‘थाळी’ खाणेही चुकलं नाही.
नारायण पेठेत सुधीर भटाची कन्याशाळेशेजारची फिशकरी, लालन सारंगची ‘मासेमारी’ किंवा ‘निसर्ग’ची सुरमयी ही मस्त्यप्रेमी मित्रांची आवडती खाद्यस्थळं. जंगली महाराज रस्त्यावरचं ‘कलकत्ता’, सोन्या मारूती चौकाजवळ ‘नेवरेकर’ ही माशांसाठी मस्ट असे. पुण्यात बाजीराव रस्त्यावरचं ‘वाडेश्‍वर’, अपॉलो टॉकीजजवळ खास साऊथ टच चटणी-सांबार देणारं हॉटेल ‘इडली’साठी जायलाच हवं असं. तर मुंबईत रूईयाजवळ  .... चव न विसरता येण्याजोगी! सोन्यामारूती चौकाजवळ किंवा आपटे रोडवर ‘शहाजी पराठा’ इतकी पराठा व्हरायटी अन्यत्र नाही.
मार्झोरीनची सँडवीच, कयानची बिस्किट, काका हलवाईचा कट समोसा, संतोष, पुना, हिंदुस्थानचे पॅटीस हे ट्रीपला निघाल्यावर घ्यायलाच हवेत. शास्त्री रोडवरच्या अभ्यंकरांच्या इडली सांबारची चव आजही स्वीट होमची आठवण देणारी. बिर्याणीसाठी ‘एसपीज्’ किंवा ‘दुर्गा’ बेस्ट. ‘शेतकरी’चं मटण आशाताईंनाही अरवडणारं! अशी खूप खाद्य केंद्रं सांगता येतील. घरचं ताट आता रस्त्यावरंच आलंय. फर्ग्युसन रोड तर खाद्यरोडच झालाय. पुण्यात बायका घरात स्वयंपाक करतात की नाही अशी शंका यावी, इतके खाद्य स्टॉल्स वाढलेत आणि सर्व ठिकाणी पुणेरी खव्वयांची रांगा लावून गर्दी कायम आहे.
खाण्याचे हॉटेल्स आणि पाट्यांचं नातं मात्र पुण्यातच टिकून आहे. ‘आपणास गरम पदार्थ हवा ना, मग उशीर होतो म्हणून काय विचारता?’ किंवा ‘आमच्याकडे सलग चार पराठे खाणार्‍यांना बिल माफ’ अशा पाट्या पुण्यातच दिसू शकतात.
पैजेनं जेवणार्‍या पंक्तींपासून ते नव्या बुफेच्या राज्यात पन्नास-साठ प्रकारच्या जातीच्या खाद्य स्टॉल्सपर्यंत खाण्याचे चोचले पुरवणं पुण्यात कायम आहे आणि एक अस्सल पुणेकर म्हणून नवनव्या चवी शोधणं, मनापासून खाणं नि खाण्यावर बोलणं हे माझ्या व्यग्र दैनंदिनीत कायम आहे.

4 comments: