Monday, May 9, 2016

कामगार चळवळीतला मनस्वी वाटसरू

'साहित्य चपराक' मे २०१६
रघुदादाकडे पाहिलं तर हा एक लढवय्या शिवसैनिक व कामगार नेता असेल यावर पटकन विश्‍वास बसत नाही. टिपीकल उच्चमध्यमवर्गीय डॉक्टरच वाटतो तो. अर्थात तो आहे डॉक्टरच. त्यानं ‘मेडिकल रेडिओ डायग्नॉस्टिक टेक्नॉलॉजी’चा डिप्लोमा केलाय मुंबईतून. गेली चोवीस वर्षे तो पुण्याच्या ‘रूबी हॉल क्लिनिक’मध्ये नोकरी करतोय. काय म्हणून? तर ‘चीफ कार्डियो व्हस्क्यूलर रेडिओ डायग्नॉस्टिक टेक्नॉलॉजिस्ट’ म्हणून. अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीसाठी लागणारी वैद्यकीय सेवा. ती तो रूग्णांना पुरवतो. गेली कित्येक वर्षे! अन् अशा या भल्या माणसाकडे नेतृत्व कुणाचं आहे? तर सर्वच क्षेत्रातल्या लक्षावधी कामगारांचं! हे काय गौडबंगाल आहे? तर आयुष्य हे असंच असतं असं म्हणता येईल. रघुदादा भारतीय कामगार सेनेचा सरचिटणीस आहे सध्या. ही शिवसेनेची कामगार संघटना. एकेकाळी असलेलं कम्युनिस्टांचं वर्चस्व. ते संपवून शिवसेनेचे झेंडे अवघ्या कामगार क्षेत्रात रोवणारी ही संघटना. बाळासाहेब ठाकरे यांनी खतपाणी घालून जोपासलेली. लक्षावधी कामगार या संघटनेचे सभासद. त्यांचं नेतृत्व रघुनाथ कुचिक नावाचा हा माणूस करतो. महाराष्ट्रभर ही कामगार संघटना पसरलेली व नोकरी सांभाळून रघुदादा हा कामगारांचे जगण्यामरण्याचे प्रश्‍न सोडविण्यात सदा व्यग्र असलेला. एरवी तो भेटतो रूबी हॉल क्लिनिकमध्ये. त्याच्या छोट्याशा केबीनमध्ये. मग तिथं कोणीतरी गरजू मुलगा येतो. ‘ये रे राजा’ म्हणत रघुदादा त्याचं स्वागत करतो. तो मुलगा नोकरीची गरज सांगतो. जवळची प्रमाणपत्रं दाखवतो. दुसर्‍याक्षणी रघुदादाची फोनाफोनी चालू होते. त्या ‘राजा’ला नोकरी मिळालीय की नाही हेही नंतर काही दिवस पडताळून पाहत राहतो तो! हे तो करू शकतो; कारण भारतीय कामगार सेनेचा पसारा मोठा आहे. बहुतांश ‘सर्व्हिस इंडस्ट्रिज’मध्ये कामगार सेना आहे. एअरलाईन्स, ऑटोमोबॉईल्स, फार्मा, पंचतारांकित हॉटेल्स ते अगदी मोठमोठी हॉस्पिटल्स. कामगार सेनेचा दबदबा आहे सगळीकडे. अगदी विद्यापीठांमध्येही कामगार सेना आहे. अगदी पुणे विद्यापीठातही. या सगळ्या ठिकाणी सगळं काही अलबेल चालू असतंच असं नाही. कामगारांचे अनेक प्रश्‍न असतात. व्यवस्थापनाच्याही अडचणी असू शकतात. रघुदादाची भूमिका एक कामगार नेता म्हणून कशी असते? तर संवाद व चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न असतो त्याचा. शिवसेना स्टाईलनंही अनेक आंदोलनं केली आहेत त्यानं; मात्र फक्त आक्रमक राहून कामगारांचे प्रश्‍न सुटत नाहीत. त्याची जाणीव त्याला आहे. रघुदादाचं वागणं, बोलणं सुसंस्कृत! सगळं व्यक्तिमत्त्वच एकदम सुसंस्कृत! याचा उपयोग त्याला होतो. कुठं? तर संवादाचा पूल बांधण्यासाठी. कामगार व व्यवस्थापन. या दोघांत यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी. हे सगळं त्याला मुत्सद्देगिरीनं करावं लागतं. कामगारांच्या विश्‍वासाला तडा जाऊ न देता करावं लागतं. व्यवस्थापनाचा विश्‍वासही सांभाळावा लागतो. ही तारेवरची कसरत. ती तो अनेक वर्षे करतोच आहे. आताच घडलेलं एक उदाहरण देता येईल. ‘फोर्स मोटर्स लि.’ ही वाहन उत्पादन करणारी कंपनी. इथं वेतनवाढीची मागणी कामगार करत होते. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं. भारतीय कामगार सेना हीच कंपनीतील अधिकृत कामगार संघटना आहे याचा निर्वाळा दिला. तरीही सहजासहजी वेतनवाढ करेल ते कंपनी व्यवस्थापन कसलं? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. त्यांना शेवटी मध्यस्थी करावी लागली. ‘फोर्स मोटर्स’चे अभय फिरोदिया. त्यांच्याशी उद्धवजींनी संवाद साधला. फिरोदियांनी समंजस भूमिका घेतली. सकारात्मक पाऊल उचललं. त्यामुळं कामगारांच्या वेतनात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष वाढ झाली. किती? तर चौदा हजार रूपयांची भरघोस वाढ! या कंपनीत 410 कामगार आहेत. हे कायमस्वरूपी आहेत. त्यांचा वेतनवाढीचा तिढा सुटला. त्यांचं कमीतकमी वेतन पस्तीस हजार रूपये झालं. जास्तीत जास्त वेतन चाळीस हजार रूपये झालं. हजेरी पटावरील सर्व कामगार. त्यांनाही वेतनवाढ लागू झाली. वैद्यकिय विमा, मृत्युफंड योजना असे कामगारांचे प्रश्‍नही मार्गी लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते अगदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार. दोघांनी या प्रकरणात लक्ष घातलं. या सगळ्या प्रक्रियेत रघुदादा खूप सक्रिय होता. ‘मास फ्लॅज इंडिया प्रा. लि.’ या कंपनीतही कामगारांचा वेतनवाढ करार झाला. तो घडवून आणण्यात रघुदादानं पुढाकार घेतला. तिथं कामगारांच्या पगारात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वाढ झाली. किती? तर तब्बल सोळा हजार रूपयांची. ही एकदोन उदाहरणं झाली. खरंतर जवळपास रोजच तो अशा अनेक प्रश्‍नांनी घेरलेला असतो.
 
रघुदादाचं मूळ गाव खोडं. शिवनेरी किल्ल्यापासून पुढं काही आदिवासी भाग लागतो. त्याच्या पूर्वेकडे वडिलोपार्जित शेती होती. रघुदादाचे वडील मात्र ‘मुंबई डॉकयार्ड’मध्ये ‘असिस्टंट सिव्हिल इंजिनिअर’ होते. आईदेखील प्रचंड कष्टाळू. दहा-बारा एकर शेती होती. त्याच दरम्यान परिसरात कुकडी धरणाचं काम चालू होतं. कष्टाचे संस्कार. ते त्याच्यावर झालेे. या सगळ्या वातावरणाचा तो परिणाम होता. त्याचं प्राथमिक शिक्षण झालं खोड्यातच. नंतर मुंबईत शिकला. ‘न्यू सायन म्युनिसिपल माध्यमिक शाळा’. इथं माध्यमिक शिक्षण झालं त्याचं. परळचं आर. एन. भट कॉलेज. तिथून त्यानं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं.
रघुदादा पुण्यात आला तो नोकरीसाठीच. ते 1988 साल होतं. त्या दरम्यान त्याचं लग्न झालं. प्रेमविवाह! लव्हमॅरेज! मात्र घरून विरोध. का? तर तो घाटी (म्हणजे घाटावरचा) व ती कोकणी म्हणून. गंमत अशी, दोघं मराठा समाजातले; मात्र विरोध झाला. कशावरून? तर घाटी-कोकणीवरून; मात्र ‘मियॉं-बिवी राजी तो क्या करेगा काझी?’ दोघं प्रेमात होते. रघुदादासाठी ही सत्वपरीक्षाच होती. याचं कारण, तो एक जबाबदार प्रियकर होता. नंतरच्या काळातला एक जबाबदार नवरासुद्धा. अशी माणसं मग एक जबाबदार ‘पिता’ होतातच. ते वेगळं सांगण्याची गरज उरत नाही.
पुण्यात येईपर्यंत रघुदादाचा राजकारणाशी संबंध नव्हता. मुंबईत मात्र तो एकदा दसरा मेळाव्याला गेला होता. साल असावं 84-85. बाळासाहेब ठाकरेंना ऐकून खूप प्रभावित झाला तो; मात्र राजकारणात लगेचच सक्रिय होणं शक्य नव्हतं. तो रूबीत नोकरी करत होता तेव्हा. तेव्हा तर त्याचा कल समाजवादी विचारसरणीकडेच होता. रूबीमध्ये कम्युनिस्टांची युनियनदेखील होती; मात्र सुर्यकांत लोणकर हे अचानक रूबीत ऍडमिट झाले. ते शिवसेनेत सक्रिय होते व तेव्हा ‘कल्याणी फोर्ज’मध्ये नोकरी करत होते. त्यांची सेवा सुश्रुषा करता करता हासुद्धा शिवसेनेकडे ओढला गेला. मग त्याच्याकडे राजन शिरोडकरांचं लक्ष गेलं. त्यांनी त्याला भारतीय कामगार सेनेचं चिटणीस पद घ्यायला भाग पाडलं. त्या दरम्यान भोरमधल्या ‘अरलॅम्स’ कंपनीत कामगारांचे काही प्रश्‍न निर्माण झाले होते. रघुदादानं ते मार्गी लावले. त्यानं ‘सिरम’ नावाच्या कंपनीतही यशस्वी मध्यस्थी केली. त्यावेळी तर त्या कंपनीत भारतीय कामगार सेना नव्हती हे विशेष! त्याच दरम्यान ‘टेल्को’तला राजन नायरचा संप फसला होता. कामगार क्षेत्रातल्या या घडामोडी. रघुदादा त्याकडं बारकाईनं पाहत होता. त्यातून तो खूप काही शिकत गेला. ‘‘कायद्याची बाजू समजून घेणं व कामगारांना विश्‍वासात घेणं या दोन गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटतात’’ तो म्हणतो. ‘‘प्रत्येक वेळी आंदोलनं करून उपयोग नाही. सामाजिक दबाव व चर्चेतून प्रश्‍न सोडवता येतात’’ तो पुढं म्हणतो. त्याच्या मते कामगार कायद्यातही बदल करण्याची गरज आहे. इंग्लंडसारखे देश. तिथं कामगार कायदे कडक आहेत. त्याच्या मते अमेरिका व ऑस्ट्रेलियातले कामगार कायदे अभ्यासले गेले पाहिजेत. ‘‘काम मागण्याचा अधिकार शेतकर्‍यांना व शेतमजुरांनाही असला पाहिजे. टॅक्सी ड्रायव्हरपासून ते हॉटेलमधील कामगारांपर्यंत सर्वांना आर्थिक बाबतीत सुरक्षितता वाटली पाहिजे’’ तो पुस्ती जोडतो. ‘‘कामगार व शेतकरी हे महत्त्वाचे घटक आहेत. कितीही आधुनिकीकरण झालं  तरी शेती व कंपन्या माणसंच चालवणार आहेत’’ तो महत्त्वाचा मुद्दा मांडतो. रघुदादानं वेळप्रसंगी पाच-दहा कामगारांचे प्रश्‍न सोडवले, तसे त्यानं प्रसंगी पाच हजार कामगारांचे प्रश्‍नही हाताळले. वर्मा आयोगाचा अहवाल. तो कामगारविरोधी आहे म्हणून त्यानं रस्त्यावरच्या लढायाही लढल्या. अशा प्रसंगांच्या वेळी तो रांगडा व आक्रमक होतो व फटकळसुद्धा. कामगारांच्या प्रश्‍नांच्या निमित्तानं तो कोर्टकचेर्‍याही करत राहिला. सातव्या वेतन आयोगाला त्याचा व्यक्तिश: विरोध आहे. हे त्याच्यातल्या  अस्सल कामगार नेत्याचं लक्षण किंवा समाजवादी विचारांचा त्याच्यावर टिकून राहिलेला थोडाफार प्रभावही म्हणता येईल.
‘अवांतर काय वाचतोस?’ असं विचारल्यावर रघुदादा उत्तर देतो, ‘‘औद्योगिक व राजकीय विषयांवरची पुस्तकं.’’ आत्मचरित्रं तो फारशी वाचत नाही. त्याचा तिकडं कल नाही. मित्रांचं वेड हे त्याचं वैशिष्ट्य! कै. दत्ताजी साळवी व जॉर्ज फर्नांडिस. या दोन कामगार नेत्यांबद्दल त्याला कमालीचा आदर वाटतो. बाळासाहेब ठाकरे हे तर त्याचे गॉडफादरच व उद्धव ठाकर्‍यांचाही त्याच्यावर खूप विश्‍वास!
रघुदादानं दोनदा अमेरिकेचा दौरा केला. तिथल्या वैद्यकिय सुविधा. त्या त्याला पहायच्या होत्या. ‘‘नवीन वैद्यकिय तंत्रज्ञान त्वरीत आत्मसात व्हावं यासाठी आम्हाला जागरूक असावंच लागतं’’ तो म्हणतो.
रघुदादाची ओळख इथंच संपत नाही. त्याची ‘प्रबोधन’ नावाची समाजिक संस्था आहे. तो कामगार विषयक कायदे समितीचाही सभासद आहे. त्यानं ‘पीएचडी’ही मिळवलीय. नागपूरची ‘महात्मा फुले संशोधन संस्था’. त्या संस्थेनं ती त्याला बहाल केलीय. त्याला कामगार क्षेत्राशी संबंधित मिळालेले पुरस्कारही खूप. 2013 साल. यावर्षी त्याला पुण्याच्या ‘साई फाऊंडेशन’नं पुरस्कार दिला. ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्र गौरव ऍवॉर्ड’ हा तो पुरस्कार. 2009 साल. यावर्षी त्याला ‘सर्वोत्तम कामगार’ पुरस्कार मिळाला. सातार्‍याला ‘ह्युमन रिसोर्स मीट’ ही परिषद झाली. त्यात त्यानं शोधप्रबंधही सादर केला. त्याच्या प्रबंधाचं शीर्षक होतं, ‘हिस्टरी ऑन ट्रेड युनिअन मूव्हमेंट’. याशिवाय ‘नॅशनल इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजी ऍन्यूअल कॉन्फरन्स’ (2013)-कोलाम- केरळा, ‘नॅशनल मीट ऑफ कार्डिओव्हस्क्यूलर टेक्नॉलॉजी’ 2008 (पुणे), 2009 (गोवा), 2010 (बेंगलोर), 2011 (कोलकत्ता) अशा परिषदांनाही तो उपस्थित राहिलाय.
रघुदादा हा स्वत: उत्तम संपादक आहे हे सांगितलं तर आश्‍चर्य वाटेल. ‘कामगार विश्‍व- वाटचाल संघर्षाची...’ हे अप्रतिम पुस्तक. सगळ्या कामगार चळवळीवरचं. ते त्यानं संपादित केलंय. यात अगदी दगडखाण कामगारांचे प्रश्‍न आहेत. साखरकामगारांचे प्रश्‍न आहेत. अंगणवाडी कामगारांचे प्रश्‍न आहेत. कचरा वेचणार्‍यांचे प्रश्‍न आहेत. मोलकरणींचे प्रश्‍न आहेत. असंघटित ग्रामीण मजुरांचे प्रश्‍न आहेत. परिचारिकांचे प्रश्‍न आहेत. बालकामगारांचे प्रश्‍न आहेत. औद्योगिक कामगारांचे प्रश्‍न आहेत. कंत्राटी कामगारांचे प्रश्‍न आहेत. अशा सगळ्या विषयांवर त्यानं अभ्यासक मंडळींना लिहितं केलंय. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवर एक नजर टाकली तर एक लक्षात येतं. हे पुस्तक कामगार चळवळीचा चालता-बोलता कोषच आहे. ‘कामगार लढे : काल, आज, उद्या’, ‘असंघटित कामगारांचे लढे’, ‘असंघटित क्षेत्र आणि महिला कामगार’, ‘कामगार कायदे’, ‘संघटित कामगारांचे लढे’ अशी ही अनुक्रमणिका. यावर अधिक भाष्य करायची गरज नाही.
रघुदादा भारतीय कामगार सेनेचं प्रतिनिधित्व करतो. त्या कामगार सेनेचे सभासद आहेत फक्त (?) सोळा लाख कामगार!!
रघुनाथ कुचिक! एक माणूस एका आयुष्यात इतकं काही करू शकतो यावर बसत नाही; मात्र डोकं ताळ्यावर असलेली व पाय जमिनीवर असलेली माणसं! ती खूप काही करत असतात. रघुदादा रूबी क्लिनिकमध्ये नोकरी करत असतो. पंचतारांकित हॉटेल्समध्ये वावरत असतो. सगळीकडे त्याचे पाय जमिनीवर असतात. तो भेटतो तेव्हा त्याचा एक आग्रह असतो, ‘बाहेर हॉटेलमध्ये एकदा निवांत जेवायला जाऊया’; मात्र त्यानं अद्याप आम्हाला एकदाही हॉटेलमध्ये जेवायला घातलेलं नाही. अगदी महाराष्ट्रातल्या सगळ्या पंचतारांकित हॉटेल्सची सूत्रं त्याच्या हाती असूनसुद्धा! रघुदादा, ऐकतोयस ना?
- महेश मांगले 

९८२२०७०७८५ 
'साहित्य चपराक' मे २०१६

No comments:

Post a Comment