Saturday, August 6, 2016

'स्पर्धा परीक्षा' : एक संसर्गजन्य रोग!

मासिक 'साहित्य चपराक', पुणे 
www.chaprak.com

प्रामाणिकपणे अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांचं खच्चीकरण व्हावं, असा या लेखाचा मुळीच उद्देश नाही; पण स्पर्धा परीक्षेचा बाजार मांडणार्‍या खासगी संस्था, व्यक्ती, अधिकारी आणि स्पर्धा परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना या वास्तवाची जाणीव व्हावी आणि स्पर्धा परीक्षेच्या विश्‍वात नव्याने प्रवेश करू पाहणार्‍या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची दुसरीदेखील ही एक बाजू आहे, हे लक्षात यावं याचसाठी हा लेखन अट्टाहास...


दुपारचे चार वाजले होते. जयकर ग्रंथालयातून बाहेर पडलो. तशी ही आमची चहा घेण्याचीच वेळ. समोरच असणार्‍या अनिकेत कॅटिंनचा रस्ता आम्ही चालू लागलो. माझ्यासोबत स्पर्धापरीक्षा करणारे (खरंतर दांडगा अनुभव असणारे) काही मित्र होते. चालताना गहण (हल्ली स्पर्धापरीक्षा करणार्‍या विद्यार्थ्यांच्या चर्चा म्हणजे गहण विषय असा एक गैरसमज झाला आहे) विषयाला सुरूवात झाली. तोपर्यंत टेबलावर चहा आलाच होता. चहा पिताच आमच्या या अनुभवी मित्रांना तरतरी आली. चहा पित पित नेट-सेट झालेले, सध्या पी.एच.डी चा अभ्यास करणारे आमचे एक मित्र म्हणाले, जर तुम्हाला तुमच्या शत्रूचं वाटोळं करायचं असेल तर त्याच्या महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या मुलाला विश्‍वासात घ्या. त्याला तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवरून सा. फु. पुणे विद्यापीठाच्या वाय-फाय सुविधेवरून फुकट डाऊनलोड केलेल्या... स्पर्धापरीक्षा पास झालेल्या उमेदवारंची अन् अधिकार्‍यांची प्रेरणादायी (?) व्याखानांच्या चित्रफिती दाखवा. त्यानंतर त्याला वास्तव परिस्थितीचं आकलन न समजवता त्याला फक्त स्पर्धापरीक्षेचं अवास्तव महत्त्व पटवून द्या. थोडक्यात त्याचा ब्रेन वॉश करा. एकदा का तुम्ही हे केलं तर तो स्पर्धापरीक्षेच्या नादाला लागतो; मग आपल्या आयुष्याची आठ-दहा वर्षे त्यात खर्च करतो... झाला ना... तुमचा उद्देश साध्य!’’ माझ्यासोबत चहा पिणार्‍या मित्रांनी ते हसण्यावरी घेतलं; पण मी काही क्षणासाठी गंभीर झालो. थोड्या वेळापुरतं वाटलं की, खरंच स्पर्धापरीक्षा करणार्‍या विद्यार्थ्यांची वाटचाल ही अशाश्‍वत ध्येयाच्या दिशेने चालू आहे का?
स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासक्रमाची ठरलेली पुस्तकं जेवढ्या प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणं गरजेचं आहे. तेवढ्या प्रमाणात ती पोहचत नाहीत. त्यापेक्षा जास्त प्रमाणात ग्रामीण आणि निमशहरी भागातील  विद्यार्थ्यांपर्यंत स्पर्धापरीक्षा पास झालेल्या उमेदवारांची आणि अधिकार्‍यांची प्रेरणादायी (?) व्याख्यानं आणि महत्त्वाचं म्हणजे अधिकार पदावरून लोकसेवेच्या कार्याची सुरूवातच शून्य असताना आपल्या जीवनाचा प्रवास (स्पर्धापरीक्षा पास होईपर्यंतचा) किती खडतर होता, हे रंगवून सांगणारी अर्धवट चरित्रं पुस्तकांच्या रूपानं पोहचली. खाजगी क्लासेसवाल्यांनी तर नुसती भरच घातली नाही तर त्याची सुरूवातच करून दिली. मुळात जी माणसं स्पर्धापरीक्षा पासच होऊ शकली नाहीत (त्यांच्यावेळी एवढी जीवघेणी स्पर्धा नसताना सुद्धा) त्यांनी प्रेरणादायी पुस्तकं काढण्याचा सपाटाच लावला. आपल्याबरोबर अभ्यास करताना अधिकारी झालेल्या मित्रांच्या मुलाखती घेणे. त्या पुस्तकरूपानं छापणे. त्यातून जिद्द, चिकाटी, आत्मविश्‍वास, प्रयत्न, सातत्य, कष्ट, सहनशीलता, ध्येय हे शब्द केवळ अधिकारी होण्याकरिताच लागू होतात असा बडेजावपणा आणून विद्यार्थ्यांच्या आशा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा इतक्या मोठ्या प्रमाणात फुगविल्या की, शिक्षण घेऊन सुशिक्षित बेकार होणार्‍या मुला-मुलींची लाट केवळ स्पर्धापरीक्षांकडेच वाहू लागली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांतील (गडचिरोलीपासून ते सोलापूरपर्यंत आणि धुळे-नंदुरबारपासून धाराशीव -लातूरपर्यंत) पदवी घेणार्‍या आणि पदवी शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो.
आप्तस्वकियांची व नातलगांची शुद्ध फसवणूक
 बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या अन् केवळ स्पर्धापरीक्षा करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही पुण्याच्या पेठांमध्ये हजारोंच्या घरात आहे. यामध्ये सामाजिक, राजकिय व आर्थिक सुबत्ता असणार्‍या उच्चविद्याविभूषीत  पार्श्‍वभूमी असणार्‍या घरातून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि कोणतीही सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्‍वभूमी नसणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या यांच्या प्रचंड तफावत आढळते. गावाकडून येणार्‍या मुलांनी आपल्या आप्तस्वकियांना शिक्षणाचे कारण देऊन घर सोडलेले असते. ही मुले इथं आल्यानंतर आपलं मूळ शिक्षण बाजूला करून स्पर्धापरीक्षा अभ्यास सूरू करायला लागतात. शिक्षणाची ठराविक वर्षे संपून गेली तरी हा मुलगा काय करतोय? असा प्रश्‍न पालकांना पडतो. कारण पालकांना स्पर्धापरीक्षा करतोय हे बर्‍याचदा माहिती नसतं. स्पर्धापरीक्षेत दोन वर्षे झाली... तीन वर्षे झाली... पाच वर्षे झाली... दहा वर्षे झाली, तरी आपला मुलगा कोणतं शिक्षण घेतोय? हे प्रश्‍नचिन्ह त्यांच्यासमोर कायम उभं असतं. शेवटी नाइलाज म्हणून वैतागलेल्या भाषेत पालक सांगून टाकतात की,
आपल्याच्यानं तुला पैसे पुरवणं होणार नाही.’’ त्या मुलावर घरातील सदस्यांकडून, शेजार्‍यांकडून सतत विचारलं जातं की, तुझ्या नोकरीचं वगेरे काय झालं? लागतीय की नाही कुठं?’’ असा विचारण्यामुळे, आजूबाजूची एक-दोन आपल्यासोबतची मुले  स्पर्धापरीक्षा पास झाल्यामुळे, वाढत जाणार्‍या वयामुळे आणि स्पर्धापरीक्षेच्या वयोमर्यादेमुळे सतत तणाव वाढत जातो. अशी कितीतरी  तणावग्रस्त विद्यार्थी आपल्याला पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये सापडतील.
यामध्ये काही मुले असेही आहेत की, घरून महिन्याच्यामहिन्याला  पैसे येत आहेत. त्यापैशांचा वापर चंगळवादासाठीसुद्धा ते करत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या
कला’ शाखेच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विचरलं असता. ते म्हणतात फक्त नावाला एम्.ए ला प्रवेश घ्यायचा अन् एकदा का प्रवेश मिळला तर त्याचा फायदा घेऊन दोन वर्षे जयकर ग्रंथालयाचा वापर स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासासाठी करायचा. एम्.ए कडे थोडसं दूर्लक्ष झालं तरी कोण विचारतं?’’ सुरूवातीला हे बोलताना त्याच्या चेहर्‍यावर निश्‍चिय दिसतो; पण कालांतराने जयकर ग्रंथालयामध्ये अभ्यास करताना एखाद्या मैत्रिणीशी गाठ पडते. ती ही स्पर्धापरीक्षा करणारीच असते. (दूधात साखर पडल्यासारखा अवस्था) हळुहळु एम्.ए कडे यांचं दूर्लक्ष झालेलं असतं. त्याचप्रमाणे स्पर्धापरीक्षेकडेही दूर्लक्ष व्हायला लागतं. यांच्या मित्रत्वाचे संबंध प्रेमाकडे झुकायला सुरूवात होते.परिणामी आई-वडीलांनी पाठवलेले पैशाची उधळपट्टी सुरू होते. ग्रंथालयामध्ये अभ्यास करायला तो आणि ती ठरलेल्या वेळात येतात. थोड्या वेळाने चहा-पाण्याची होते. या चहा-पाण्याक अर्धा तास जातो. पुढे तास-दोन तास वृत्तपत्र वाचण्यात घालवतात. तोपर्यंत बारा वाजत आलेले असतात. जेवणाची वेळ होते. दोघे सोबतच जेवायला बाहेर पडतात.  एखाद्या झाडाखाली जेवायला बसतात. त्यात बोलत-बोलत दीड-दोन तास निघून जातो. पुन्हा अभ्यासाला ग्रंथालयात. मग स्पर्धापरीक्षेचा ढीग समोर ठेवून थोडसं वाचनात लक्ष... थोडसं मोबाईलवरील व्हॉट्सऍपवर आलेल्या गुलाबी मेसेजवर लक्ष. अशातच चार वाजतात. पुन्हा चहा-पाण्याची वेळ. पुन्हा तास-अर्धा तास. असे करत करत येणार्‍या प्रत्येक दिवसातले पाच-सहा तास अभ्यासाच्या नावाखाली टंगळ-मंगळ करण्यातच घालवतात. मग रविवार येतो. अभ्यासातून विश्रांती म्हणून यांचे हे सुट्टीचे दिवस. या सुट्टीच्या दिवशी नवीन आलेले सिनेमे पहायचे, पुण्यातील प्रेक्षणीय स्थळे पहायची. (पुन्हा-पुन्हा पहायची) पालकांनी पाठवलेल्या पैशाची अशी उधळपट्टी करायची. पुण्यातून फिरून आल्यानंतर मग एखाद्या ठिकाणी म्हणजेच सारसबाग, झेड ब्रीज यासारख्या ठिकाणी प्रेमाच्या गुलाबी गप्पा रंगवत बसायचे. यातून समाधान नाही झालं तर सा. फु. पुणे विद्यापीठाच्या घनदाट झाडीमध्ये प्रेमाचे (?) अश्‍लिल  चाळे करत बसायचे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुले आघडीवर आहेत असं अजिबात नाही तर मुलीदेखील मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढाकार घेतात. सुरूवातीला एम्.ए कडे दूर्लक्ष... मित्रत्वाचे प्रेमात रूपांतर... नंतर अभ्यासाकडे... त्यानंतर स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासाकडे... नंतर पैशाचा अपव्यय... नंतर वेळेचा अपव्यय... प्रेमाचे अश्‍लिल चाळ्यात रूपांतर... त्यानंतर मग वेळ उरलाच तर पुन्हा स्पर्धापरीक्षेचा अभ्यास... असा दुष्टचक्रात विद्यार्थ्यांचा अनिश्‍चित ध्येयाच्या दिशेने प्रवास सुरू आहे. या विद्यार्थ्यांना आपण (काही अपवाद वगळता)  आप्तस्वकीयांची आणि नातलगांची फसवणूक करत आहोत. याची जाणीव का होत नाही.
स्वप्नं विकणारी दुकानं
मी आठवीत होतो. त्यावेळा कोल्हापूरातून एक विद्यार्थी आयएएसची परीक्षा पास झाला होता. त्याचं उदाहरण आमचे शिक्षक वर्गात देत असत. या घटनेला सहा-सात वर्षे उलटून गेला असावीत. तरीसुद्धा त्याचा फोटो आजही स्पर्धापरीक्षेतील आघाडीवर असणारे क्लासेसवाले  जाहिरातीत दाखवून विद्यार्थ्यांचा दिशाभूल करत आहेत. त्यांच्या त्या जाहिरातीत स्पर्धापरीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या फोटोंचा संख्या इतकी मोठा असते की, जणू काही दरवर्षी क्लासेसमधून इतके विद्यार्थी पास होत आहेत; परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. ह्याच जाहिरातीला पाहून विद्यार्थी फसतो. हे क्लासेसवाले सुरूवातीला ’प्रवेश विनामूल्य’ या बॅनरखाली व्याख्याने भरवतात. त्यातून स्पर्धापरीक्षेच्या क्लासेसची गरज कशी आहे... आम्ही मार्गदर्शक म्हणून कशी भूमीका बजावतो... आमच्या क्लासेस-ऍकॅडमीमधून आत्तापर्यंत किती आयएएस, आयपीएस आणि आयएफएस झाली यांची रसभरीत वर्णनं सांगितली जातात. अप्रत्यक्षपणे
क्लासेस स्पर्धापरीक्षा करण्याकरता किती गरजेचे आहे.’ हे विद्यार्थ्यांच्या मनावर पुन्हा-पुन्हा बिंबवले जातं.
पुण्यात आघाडीवर असणार्‍या ऍकॅडमी-क्लासेस यांच्या प्रवेश शुल्क पाहता अन् त्यांचं गणित मांडता डोळे विस्फारले जातील. अशी स्थिती आहे. यामध्ये साधारणपणे एका विद्यार्थ्याकडून ’एमपीएससी’साठी साठ-सत्तर हजार आणि ’युपीएससी’साठी ऐंशी-पंच्च्यानव हजार वसूल केले जातात. अशी एका बॅचमध्ये किमान शंभर मुले असतात. अशा दिवसाच्या चार-पाच बॅच असतात. एमपीएससीचा विचार केला तर साठ हजार गुणीले चारशे आणि युपीएससीचा विचार केला तर ऐंशी हजार गुणीले चारशे... असं जर गणित मांडलं तर आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. या बॅचेसचा कालावधी साधारणपणे तीन महिने, सहा महिने आणि एक वर्ष असतो. हे ऍकॅडमीवाले-क्लासेसवाले फक्त क्लास घेऊन थांबत नाहीत तर स्वत:चीच ‘प्रकाशन’ संस्था निर्माण करून पुस्तके प्रकाशित करत आहेत. जो क्लास लावेल त्या विद्यार्थ्याला पन्नास टक्के सवलतीत ही स्पर्धापरीक्षेची पुस्तके दिली जातात. या क्लासेसवाल्यांच्या ऍडमिशन फिज् आर्थिक परिस्थिती नसतानाही पालक कर्ज काढून भरतात. ही वस्तुस्थिती आहे. अन् इतके पैसे भरून, क्लासेस करून स्पर्धापरीक्षा विद्यार्थी पास होतात हा निव्वळ गैरसमज आहे.
या क्लासेसवाल्यांच्या जाहिराती क्लासेसच्या वैशिष्ट्यांमध्ये एक वैशिष्ट्य ठळकपणे दिलं जातं की, ‘तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन’ पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी असते. पूर्वीच्या बॅचमधील एखादा विध्यार्थी जो स्पर्धापरीक्षा पास झालेला नाही किंवा स्पर्धापरीक्षेची तयारी करतोय अशा विद्यार्थ्यालाच किमान वेतनावरती लेक्चर घ्यायला लावतात. इतकं सगळं करूनसुद्धा विद्यार्थ्यांना सांगतात काय? ‘‘आम्ही फक्त दिशा दाखवण्याचं काम करतोय, यश मिळेलच याची शाश्‍वती देत नाही’’ हे महत्त्वाचं वाक्य वापरून, पैसे घेऊन जबाबदारी डावल्याचे स्पष्ट दिसून येते. विद्यार्थ्यांना लाल दिव्याच्या गाडीची स्वप्नं दाखवून, जाहिरातीत त्यांची दिशाभूल करून, पाठांतराचा अस्सल नमुना असणार्‍या अधिकार्‍यांची व स्पर्धापरीक्षा पास झालेल्या उमेदवारांची भाषणं (प्रेरणादायी व्याख्यानं बरं का) घडवून आणून स्पर्धापरीक्षेच्या नावाखाली कोट्यवधी रूपये ऍकॅडमीवाले-क्लासेसवाले कमावत आहेत. याकडे आपलं लक्ष जाणार आहे का?

सुप्त कला-कौशल्यांची हत्याच!
स्पर्धापरीक्षा करणारे विद्यार्थी हे वेगवेगळ्या शाखेतून आलेले असतात. यामध्ये ‘शास्त्र’ शाखेचे विद्यार्थी युपीएससी किंवा एमपीएससीसाठी प्रयत्न करताना दिसतात.(एमबीबीएस, बीएचएमएस, एमडी, बीई, एमई, एमटेक, बीटेक) यामधील हुशार विद्यार्थी स्पर्धापरीक्षा करण्याच्या फंदात पडतात. यांच्या या शाखीय शिक्षणाचा  समाजाला प्रत्यक्ष फायदा होणार असतो; परंतु अधिकारी पदावरून आपल्याला प्रशासकीय व्यवस्थेत जाऊन व्यापक स्वरूपाचं काम करता येईल या निर्बुद्ध आशेनं स्वत:च्या अंगभूत कला-कौशल्याची हत्याच केली जाते. ‘वाणिज्य आणि शेतकी’ शाखेतील विद्यार्थी हे बँकिंगच्या स्पर्धापरीक्षा देत असतात. वास्तविक पहाता शेतकी पदवी घेणारा विद्यार्थी शेती क्षेत्रात भरीव योगदान देईल किंवा विविध बदल घडवून आणेल अशी अपेक्षा असते; परंतु हे विद्यार्थी स्पर्धापरीक्षेच्या नादाला लागतात आणि आपल्या आयुष्याची उमेदीची वर्षे यात खर्च करतात.
त्यानंतर ‘कला’ शाखेतील विद्यार्थ्यांचा विचार केला तर ह्या स्पर्धापरीक्षा ‘पोरांचं भविष्य नष्ट करण्याच्या उद्देशानंच निर्माण झाल्यात की काय?’ अशी एक भीती वाटते. खरंतर एकाच आखाड्यात बी.ई करणारा हुशार विद्यार्थी आणि त्याच आखाड्यात बी.एची परीक्षा ‘एटीकेटी’ने पास होणारा विद्यार्थी यांची बौद्धिक कुस्ती लावली जाते. साहजिकच विजय ठरलेला असतो. कला शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये अंगभूत कला असतात. कोण उत्तम कवी असतो. कोण उत्तम गायक असतो. कोण उत्तम चित्रकार असतो. कोण उत्तम लेखक असतो. कोण उत्तम वक्ता असतो तर कोण उत्तम खेळाडू असतो. अशा विविधांगी कलांनी गच्च भरलेली मुलं आपापल्या क्षेत्रात नावारूपाला येणारी असतात; परंतु स्पर्धापरीक्षेच्या नादाला लागून या मुलांनी स्वत:च्या कलेची एक प्रकारची हत्याच केलेली असते. याला पालक देखील काही प्रमाणात कारणीभूत आहेत. स्पर्धापरीक्षेचा झालेला प्रचार अन् प्रसार यामुळे अंगभूत कलेची हत्या करून प्रत्येक विद्यार्थी (स्पर्धापरीक्षा करणाराच) हा माझ्या शेजारचा, माझ्या सोबतचा मुलगा किंवा मुलगी स्पर्धापरीक्षा करते म्हणून मीही स्पर्धापरीक्षा करते किंवा करतो. हे चारचौघात मान्य करायला कोणी तयार नसतं. हे वास्तव आहे. आणि म्हणून एकाकडे पाहून दुसरा... दुसर्‍याकडे पाहून तिसरा अन् तिसर्‍याकडे पाहून चौथा स्पर्धापरीक्षा करत सुटतो. याचा परिणाम म्हणून विद्यार्थी ‘स्पर्धापरीक्षाग्रस्त’ व्हायला लागतात. त्यातून मग स्पर्धापरीक्षा-एक संसर्गजन्य रोग आहे हे सिद्ध व्हायला लागते. हा रोग झपाट्याने वाढत आहे. या रोगावर नियंत्रण मिळवण्यापेक्षा हा रोग वाढेल कसा... या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत किंवा तशाप्रकारचं अनुकूल वातावरण निर्माण केलं गेलं आहे.

पुण्याची ओळख ‘स्पर्धापरीक्षे’च्या गर्तेतच
पुण्याच्या विविध पेठांमध्ये बारकाईने पाहिले असता, एक बाब जाणीवपूर्वक लक्षात येते की, ज्याप्रमाणे दर पन्नास मीटर अंतरावर एक मंदिर आहे अगदी त्याचप्रमाणे दर शंभर मीटर अंतरावर स्पर्धापरीक्षेची केंद्रं आणि अभ्यासिकासुद्धा आहेत. या अभ्यासिकांमध्ये हजारो विद्यार्थी स्पर्धापरीक्षांमध्ये आपलं नशिब अजमावत आहेत. पुण्याच्या सास्कृतिक ओळखीमध्ये पुण्यातील प्रशस्त ग्रंथालये आणि विविध प्रकारची पुस्तकं मिळणारा अप्पा बळवंत चौक (एबीसी) ही महत्त्वाची भूमिका बजावत होती; पण आज पुण्यातील ग्रंथालये आणि अप्पा बळवंत चौक हा फक्त स्पर्धापरीक्षेच्या संदर्भातच ओळखला जातोय. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पुण्यातील साहित्य विश्‍व हे नेहमीच आघाडीवर राहिलेले आहे. आणि दरवर्षी होणार्‍या अखिल भारतीय आणि अखिल विश्‍व साहित्य संमेलनामध्ये पुण्याची भूमिका ही महत्त्वाची असते. परंतु अशा प्रकारची साहित्य संमेलने ही जशी जातीची, धर्माची, विचारसरणीची सुद्धा होऊ लागली. त्यामध्ये आणखी एकाची भर पडली. ती म्हणजे ‘स्पर्धापरीक्षा साहित्य संमेलना’ची.
पूर्वी आमच्या गल्लीत लताबाई कांबळे नावाची बाई होती. तिला आम्ही माई म्हणायचो. कारण तिचा मुलगा आमच्यासोबत क्रिकेट खेळायला यायचा. ही माई ‘मटका’ खेळण्यात आणि सांगण्यात (मटक्याचा आकडा) तरबेज होती. आमच्या गल्लीतले पेंटर, गवंडी, खोद कामगार, बिगारी इतकंच काय... लॉंड्रीवाला, समोरच असणार्‍या हॉटेलमधला वेटरसुद्धा मटक्याचा आकडा विचारायला माईकडे यायचा. ही माई त्याला आकडा सांगायची. याठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की, माई पूर्ण अशिक्षित होती आणि देशी दारूच्या नशेत या लोकांना आकडा सांगायची. सायंकाळी पाचच्या दरम्यान त्याचा निकाल लागायचा. तेव्हा हे सारे लोक आपण लावलेल्या आकड्याचा निकाल पहायला गर्दी करायचे. प्रत्येकाच्या चेहर्‍यावरती ‘माझाच आकडा लागेल’ असा भाव असायचा. त्या गर्दीतल्या लोकांमध्ये एखाद-दुसर्‍याला तो आकडा लागायचा. बाकी सर्वांचा अपेक्षाभंग झालेला असायचा; पण त्या फळ्यावर लिहिलेल्या आकड्याकडे पाहून अपेक्षाभंग झालेला प्रत्येकजण चुकचुकायचा की, ‘‘जरासं चुकलं रे , एक अंक पुढं सरकला असता तर पैसा माझाच होता’’
या कथेमध्ये घटना फिरवली आणि पात्रं बदलली तर वास्तव आपल्या लक्षात येईल की, मटकाकिंगची भूमिका स्पर्धापरीक्षा घेणारं  आपलं शासन, माईची भूमिका हे क्लासेसवाले व ऍकॅडमीवाले तर आकडा लावणार्‍या माणसांची भूमिका ही स्पर्धापरीक्षेचे विद्यार्थी पार पाडत आहेत. फरक इतकाच की मटका लावणार्‍या लोकांचं मेरीटलिस्ट काळ्या फळ्यावर लिहिलेलं असायचं आणि स्पर्धापरीक्षा करणार्‍या विद्यार्थ्यांचं मेरीटलिस्ट हे इंटरनेटच्या ऑनलाईन पडद्यावर टाकलं जातंय.

अर्धवट जीवनाची अर्धवट चरित्रं...
मुळात एखादं पुस्तक वाचताना (कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र) त्या पुस्तकातील नायकाच्या जागी वाचक स्वत:ला ठेवतो. आणि मग त्या नायकाच्या जीवनात घडणार्‍या घटना, त्याचा तो खडतर प्रवास याचा वाचक स्वत:च्या जीवनात घडणार्‍या घटना... स्वत:चा खडतर प्रवास यांची तुलना करायला लागतो. अशा पुस्तकांत वाचक हा नायक आणि स्वत: यामध्ये जास्तीत-जास्त साम्य शोधण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये बर्‍याच वेळेला वाचक यशस्वी होतो अन् काही वेळेला तो अयशस्वी होतो. ज्यावेळी तो अयशस्वी होतो. त्यावेळी तो जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. इथंच वाचक फसतो. अशी फसवणूक... स्पर्धापरीक्षा पास झालेल्या उमेदवारांची आणि अधिकार्‍यांची ‘अर्धवट’ चरित्रात्मक जी पुस्तकं निघाली त्यातून सर्रासपणे झालेली दिसेल.
मी अशा पुस्तकांना ‘अर्धवट जीवनाची अर्धवट चरित्रं’ असं म्हणतो. कारण अशा चरित्राचे नायक किंवा लेखक हे आपल्या कार्यकर्तृत्वाची सुरूवात ज्याठिकाणी होणार असते. त्याठिकाणापर्यंतचा आपला जीवनप्रवास त्यांनी मांडलेला असतो. सामान्य वाचक म्हणून आमची अपेक्षा अशी असते की, जिथं तुमच्या कार्यकर्तृत्वाचा आरंभ झाला तिथून पुढचा प्रवास मांडणं गरजेचं आहे. थोडक्यात अधिकार पद मिळाल्यानंतर त्या अधिकार पदाचा वापर करून समाजाच्या भल्यासाठी तुम्ही किती झगडलात आणि त्यामध्ये किती यश मिळवलंत हे सांगणं तुमच्या चरित्रात अपेक्षित असतं. ही खरी प्रेरणा असू शकते. पण दुर्दैवानं ही उणीव स्पर्धापरीक्षा पास झालेल्या उमेदवारांच्या आणि अधिकार्‍यांच्या अर्धवट चरित्रात आढळते. (याला काही अपवाद आहेत)
दुसरी बाब अशी की, हे लिखाण ‘वाचक’ डोळ्यासमोर ठेवून केलेलं लिखाण आहे. ज्यावेळी असा वाचक डोळ्यासमोर असतो. त्यावेळी आर्थिक गणितं ही मांडलेली असतात. अशावेळी एखादी घटना, प्रसंग रंगवून किंवा अतिशयोक्ती करून सांगण्याचा निश्‍चित प्रयत्न होतो. साहित्याच्या इतर प्रकारामध्ये ते शक्य आहे; परंतु चरित्र आणि आत्मचरित्र यामध्ये ते शक्य नाही. (आणि ते शक्य करण्याचा कोणी प्रयत्नही करू नये) या बोरूबहाद्दरांनी ते शक्य करून दाखवलं. या सर्वाचा परिणाम असा झाला की, स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं वाचण्यापेक्षा ही ‘अर्धवट जीवनाची अर्धवट चरित्रं’ जास्त प्रमाणात वाचली जाऊ लागली. याचा परिणाम म्हणून स्पर्धापरीक्षेचं कारण देऊन महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून स्थलांतर करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या साहजिकच वाढू लागली. हे स्पष्ट दिसणारं वास्तव आहे.
खरंतर स्पर्धापरीक्षेच्या विश्‍वात उतरल्यानंतर दोन महिन्यातच ‘मी पास होईल की नाही... हा अभ्यासक्रम मला झेपेल की नाही’ अशा प्रश्‍नांची उत्तरं प्राथमिक पातळीवर अंतर्मनात मिळतात. थोडक्यात आपली पात्रता आणि मर्यादा प्रत्येकाने ओळखलेली असते. तरीसुद्धा विद्यार्थी स्पर्धापरीक्षेच्या संसर्गजन्य रोगाला बळी पडतात आणि अशाश्‍वत ध्येयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू होते. या वाटचालीत शे-पाचशेच्या जागांसाठी लाखो अर्ज येतात. ‘जागा कमी अन् जीवघेणी स्पर्धा जास्त’ अशी स्थिती होते. सतत भासणारी आर्थिक चणचण, वाढते वय, घरची जबाबदारी, सामाजिक तणाव, यशाची अजिबात खात्री नाही, सततच्या अपयशामुळे येणारे नैराश्य, गावाकडची दुष्काळी परिस्थिती, स्वत:ची घुसमट, कमी दर्जाची कामं करण्याची नसलेली मानसिकता, मुलींच्या बाबतीत घरातून लग्नासाठी होत असलेली घाई... त्यातून मुलींचा वाढत जाणारा तणाव या सर्व ‘नकारात्मक बाजू’ ह्या स्पर्धापरीक्षेच्या क्लासेसवाल्यांनी निर्माण केलेल्या वातावरणातून जन्म घेतात. विद्यार्थी आणि पालक सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे बर्‍याचदा निराशा पदरात पडते.
स्वप्न हीच स्पर्धा
‘स्वप्ने पहा, स्वप्ने जगा’ हे ऐकायला खूप चांगलं वाटतं; पण एकच स्वप्न लाखो जणांनी पाहिलं आणि त्या स्वप्नांची वाटचाल एकाच मार्गावर सुरू झाली तर ती स्वप्न... स्वप्नच रहात नाहीत. तर ती एक स्पर्धा होते. खरंतर ती एक जीवघेणी स्पर्धा होते. त्यात काहीजणांचा जीवानीशी बळी जातो, काहीजण स्वप्न भंगली असली तरी त्या स्वप्नातून बाहेर पडत नाहीत. अशा परिस्थितीत ती मुलं स्वप्नंच जगायला लागतात, स्वप्नातच वावरायला लागतात. वास्तव परिस्थितीचं भान न ठेवता एखाद्या संमोहित झालेल्या रूग्णासारखं.
अशा स्वप्नांना (खरंतर स्पर्धापरीक्षेच्या वातावरणाला) आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या काही कमी नाही. त्याचा टक्का आज कमी वाटत असेलसुद्धा; पण भविष्यात ती वाढणार नाहीत... असंही नाही. काही वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यातील दोन विद्यार्थी ‘आपण स्पर्धापरीक्षा पास होऊन अधिकारी झालो’ असं सांगत आपल्या आप्तस्वकियांची, समाजाची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वत:ची फसवणूक करत राहिले आणि दुसर्‍याचीही. त्यातील पहिला श्रीकांत पवार आणि दुसरा हनुमंत खाडे. यांच्या या कृत्यामागे अधिकारी होण्याची स्वप्नं, मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा, तो मानसन्मान, जागोजागी होणारा सत्कार, व्याख्यानांसाठी येणारी आमंत्रणं आणि समाजात निर्माण होणारा दरारा ही कारणं होती. अशावेळी अक्षय कुमारचा ‘स्पेशल 26’ या चित्रपटाची आठवण होते. कारण ‘चोर होऊन चोर्‍या करणं तसं अवघड काम... पण अधिकारी होऊन चोर्‍या करणं तसं सोपं काम’ हे स्पष्ट आहे. असो! दोष या बोगस अधिकार्‍यांचा, स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करणार्‍या मुलांचा असेलही; परंतु त्याहूनही जास्त दोष स्पर्धापरीक्षेचं कृत्रिम वातावरण तयार करणार्‍या खाजगी क्लासेस आणि ऍकॅडमीवाल्यांचाही आहे. हे देखील आपल्याला नाकारता येणार नाही.
परवाच सा. फु. पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या आवारात असणार्‍या बाकावर बसलो होतो. त्या बाकावरून समोरच दिसणार्‍या त्या वडाच्या झाडाला एकटक पहात राहिलो. मागील वर्षी घडलेला तो प्रसंग डोळ्यासमोरून जाता जात नव्हता. मी अस्वस्थ व्हायला लागलो. काय होता तो प्रसंग? तर अर्थशास्त्रामध्ये दोन वर्षापूर्वी एमए झालेला, हुशार असलेला, स्पर्धापरीक्षेची तयारी करणारा बालाजी मुंडे नावाच्या विद्यार्थ्याने त्याच वडाच्या झाडाला फास लावून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी काही मिनिटं, काही तास, काही दिवस काय विचार केला असेल त्यानं? काय प्रश्‍न असतील त्याच्यासमोर? त्या पडणार्‍या प्रश्‍नांची उत्तरं मिळणारच नव्हती, का त्याला? इतरांच्या अपेक्षांच ओझं घेऊन तो जगत होता का? का स्वप्नंच अशक्यप्राय होती त्याला? काय झालं असेल त्या रात्री? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं मिळणारी होती, नक्कीच होती. परंतु पाहिलेलं स्वप्न आपण जगूच शकत नाही! असं वाटल्यावर! (तिथंच त्याच्या विचारशक्तीनं स्वहत्या केली होती) त्यानं आत्महत्येसारखा सोपा पर्याय निवडला. एक बालाजी स्वत:ला संपवून गेला... पण याची सुरूवात तर त्यानं करून दिली नाही... ना!!

- अर्जुन नलवडे, पाटण 
७३८५६११३५३ 
मासिक 'साहित्य चपराक', पुणे 
www.chaprak.com

50 comments:

  1. अतिशय उत्तम लेख , स्पर्धा परीक्षांचे मायाजाल फारसा अतिरेक न करता उत्तम प्रकारे उलगडले आहे . स्पर्धा परीक्षेची दुसरी बाजू सांगायचा सहसा प्रयत्न कुणी केल्याचे वाचनात आलेले नाही .स्पर्धा परीक्षा मंडळ , त्यांचे परीक्षांचे घोळ , रिझल्ट्सची अनिश्चितता , पास झालेल्यांच्या नियुक्त्यान मधील दिरंगाई , पेपर फुटी मुळे परीक्षा रद्द होणे इत्यादी अनेक मुद्दे यातून सुटले आहेत , केवळ क्लासवालेच यात खलनायक नाहीत तर शासन व्यवस्था व यु.पी.एस .सी ./ एम .पी .एस .सी .मंडळे सुध्दा तितकीच जबाबदार आहेत हे हि विसरून चालणार नाही .

    ReplyDelete
  2. मनातलं बोललात.. चक्रव्युहात फसलेल्या नौका किनारी कधी परततील कोण जाणे.परतेपर्यंत वेळ तर निघून गेली नसेल ना ?

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेख सर!

    ReplyDelete
  4. अप्रतिम लेख सर!

    ReplyDelete
  5. अप्रतिम लेख सर!

    ReplyDelete
  6. अप्रतिम लेख सर!

    ReplyDelete
  7. न झेपणारी स्वप्न जोपर्यंत आपण विकत घेण्यासाठी हट्ट करु तोपर्यंत अशी स्वप्ने विकणारेही कमी होणार नाहीत... या विषयाला ऐरणीवर आणल्याबद्दल संपादक व टीमचे आभार

    ReplyDelete
  8. न झेपणारी स्वप्न जोपर्यंत आपण विकत घेण्यासाठी हट्ट करु तोपर्यंत अशी स्वप्ने विकणारेही कमी होणार नाहीत... या विषयाला ऐरणीवर आणल्याबद्दल संपादक व टीमचे आभार

    ReplyDelete
  9. Great work. I was aspirant also 15 yeras ago. My experience is that, only 10% of aspirants are serious and 85% are not that much serious.

    ReplyDelete
    Replies
    1. You r right vikas sir
      90% उमेदवार हौशे - नवशे - गवशे असतात..
      :-)

      Delete
  10. Great work. I was aspirant also 15 yeras ago. My experience is that, only 10% of aspirants are serious and 85% are not that much serious.

    ReplyDelete
  11. अतिशय उत्तम लेख . डोळ्यात झणझणित अंजन घालणारा . स्पर्धा परिक्षेमागील हे भीषण वास्तव खरंच माहीत नव्हते . अर्जुनच्या लिखाणाला मनापासून दाद द्यावीशी वाटते

    ReplyDelete
  12. अतिशय उत्तम लेख . डोळ्यात झणझणित अंजन घालणारा . स्पर्धा परिक्षेमागील हे भीषण वास्तव खरंच माहीत नव्हते . अर्जुनच्या लिखाणाला मनापासून दाद द्यावीशी वाटते

    ReplyDelete
  13. अतिशय उत्तम लेख . डोळ्यात झणझणित अंजन घालणारा . स्पर्धा परिक्षेमागील हे भीषण वास्तव खरंच माहीत नव्हते . अर्जुनच्या लिखाणाला मनापासून दाद द्यावीशी वाटते

    ReplyDelete
  14. अतिशय उत्तम लेख . डोळ्यात झणझणित अंजन घालणारा . स्पर्धा परिक्षेमागील हे भीषण वास्तव खरंच माहीत नव्हते . अर्जुनच्या लिखाणाला मनापासून दाद द्यावीशी वाटते

    ReplyDelete
  15. लेख खुपच छान आहे.मी कालच माझ्या मुलाला दो मेडिकलच्या पहिल्या वर्षाला आहे त्याला ह्या परीक्षां विषयी जाणून घ्यायला सांगितले.
    परंतू लेख वाचल्या नंतर वाटतय त्या पेक्षा तो कुठेतरी टेबल खुर्ची टाकून प्रेक्टीस करेल तरी चालेल.
    खरच खुप भयानक आहे हे सगळं.
    तसेच लेखात पेपर फुटी बद्दल काही लिहीलं नाही आहे,ती पण एक शक्यता नाकारता येत नाही.
    धन्यवाद डोळे उघडल्या बद्दल...

    ReplyDelete
  16. लेख खुपच छान आहे.मी कालच माझ्या मुलाला दो मेडिकलच्या पहिल्या वर्षाला आहे त्याला ह्या परीक्षां विषयी जाणून घ्यायला सांगितले.
    परंतू लेख वाचल्या नंतर वाटतय त्या पेक्षा तो कुठेतरी टेबल खुर्ची टाकून प्रेक्टीस करेल तरी चालेल.
    खरच खुप भयानक आहे हे सगळं.
    तसेच लेखात पेपर फुटी बद्दल काही लिहीलं नाही आहे,ती पण एक शक्यता नाकारता येत नाही.
    धन्यवाद डोळे उघडल्या बद्दल...

    ReplyDelete
  17. लेख अतिशय उत्तम सर ,पन तुम्ही जे last la लिहलय regarding suicide हे जरा चुकीच नाही वाटत का....
    हा लेख बरेच frustrated students also read so its too much dangerous for like that students
    I think so , if any mistake of mine so sorry

    ReplyDelete
  18. झणझणीत अंजन घातलत सर

    ReplyDelete
  19. झणझणीत अंजन घातलत सर

    ReplyDelete
  20. सर
    विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षा कडे वळतात
    याचे प्रमुख कारण unemployment हे आहे
    याचा मुद्द्याचा तुम्ही कुठेच उल्लेख केला नाही ???

    ReplyDelete
    Replies
    1. Unemployed आपण स्वतः झालोय, कोणत्याही उद्योगास आधी सुरुवात तर करा, UP, Bihar का unemployed नाही?

      Delete
    2. Unemployed आपण स्वतः झालोय, कोणत्याही उद्योगास आधी सुरुवात तर करा, UP, Bihar का unemployed नाही?

      Delete
  21. Very true. Competitive exam is good option. But only after thorough research, one should decide to pursue this. There is much more in life than only becoming an officer. How to become officer is less important, what you do for 30-35 years as officer is more important. I personally feel if there is one field which will make India superpower, it's entrepreneurship. Create jobs, create wealth. Let govt becomes only a facilitator. Good article. Congratulations to writer.

    ReplyDelete
  22. खरतर आपण आणि आपली मुले व्यवसाय करायला घाबरतात. सर्वच जर नोकरीच्या मागे लागले तर कसे होईल? मुलांना व्यवसाय करायला प्रवृत्त करा. तो लहान व्यवसाय का असेना. पण सुरवात तर करा.

    ReplyDelete
  23. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  24. छान अभिनंदन. आपल्याला दिसलं तेवढेच आपण मांडलत,पण अजुन चित्र बाकी आहे. सकारात्मक विचार करायचाच नाही हे ठरवलं असेल तर गोष्ट वेगळी पण या सगळ्यात अनेक सकारात्मक बाबी आहेत त्या मांडल्या असत्या तर अधिक योग्य झाले असते. धन्यवाद

    ReplyDelete
  25. विद्यार्थ्यांबद्दल एकांगी बाजू मांडलीय, 2-3 % विद्यार्थी तुम्ही म्हणताय तसे सारसबाग, Z ब्रिज, टेकडी इकडे आढळत असतील ही..परंतु हा अपवाद आहे आणि अपवाद कधीही नियम होत नसतो. उलट बाजूला ATM हॉटेल्स ई ठिकाणी काम करून, एकावेळेस ची मेस लावून अभ्यास करणारी कित्येक मुलं आहेत.आणि पोस्ट नाही मिळाली तरी तो व्यक्ती कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात त्याचा ठसा उमठवतोच हे मागील 6-7 वर्षाचे निरीक्षण आहे. राहिला प्रश्न जीवघेण्या स्पर्धेचा तर आज स्पर्धा कुठे नाही ते सांगा..बाकी classes वाल्यांबद्दल चे मत बऱ्याच अंशी सत्य आहे.

    ReplyDelete
  26. विद्यार्थ्यांबद्दल एकांगी बाजू मांडलीय, 2-3 % विद्यार्थी तुम्ही म्हणताय तसे सारसबाग, Z ब्रिज, टेकडी इकडे आढळत असतील ही..परंतु हा अपवाद आहे आणि अपवाद कधीही नियम होत नसतो. उलट बाजूला ATM हॉटेल्स ई ठिकाणी काम करून, एकावेळेस ची मेस लावून अभ्यास करणारी कित्येक मुलं आहेत.आणि पोस्ट नाही मिळाली तरी तो व्यक्ती कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात त्याचा ठसा उमठवतोच हे मागील 6-7 वर्षाचे निरीक्षण आहे. राहिला प्रश्न जीवघेण्या स्पर्धेचा तर आज स्पर्धा कुठे नाही ते सांगा..बाकी classes वाल्यांबद्दल चे मत बऱ्याच अंशी सत्य आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. किती जण social media पासून अलिप्त आहेत? एक वेळ बाहेर फिरलेलं बरं व्यायाम तर होतो पण social media.

      Delete
  27. खरं आहे...पण हेही खरं आहे की योग्य मार्गदर्शन करणारे असतील अन् कष्ट करण्याची तयारी असेल तर यश मिळणारच...काहीच न करता तुम्ही यशाची अपेक्षा ठेवत असाल तर एक पंचवार्षिक काय दोन-तीन पंचवार्षिक मधे सुद्धा यश मिळणार नाही...मुळात आतुन इच्छा असली...आवड असली की काहीही अवघड नाही...तुमच्याकडे मटेरीयल तर खुप असतं...एसी लायब्ररी सुद्धा असते पण तुमचा बहुतेक वेळ तीन-तीन वेळा चहा-नाश्त्याला जात असेल तर काय बोलावं...आणि याची कारणे तर खूप मजेशीर आणि तेवढीच राग आणणारी असतात...काय तर म्हणे 'बोअर झालं रे खूप'...अरे तुझा बाप तिकडं न थकता दिवस-रात्र कामं करुन तुला पैसा पाठवतो तो यासाठी का रे...त्या बापानं मलाही बोअर होतंय म्हणून दोन दिवस सुट्टी घेतली तर घर चालेल का...महिन्याच्य एक तारखेला पैसे आले नाही तर रागाने तिळपापड होतो या स्पर्धा परीक्षा विराचा...दर रविवारी मेसला सुट्टी म्हणून नाही त्या जेवणाची मजा लुटणाऱ्या या पोराला बाप शिळी भाकरी जेवून झोपलाय हे जोपर्यंत जाणवणार नाही तोपर्यंत हे असंच चलत राहणार...
    सर तुम्ही एक बाजू मांडलीत पण हीसुद्धा स्पर्धा परीक्षेची एक बाजू आहे...कष्ट करा यश मिळणार आणि समजा काही कारणाने जमलं नाही तर हा अभ्यास इतका उपयोगी आहे की व्यक्तीमत्व ससमृद्ध होऊन जाईल...

    ReplyDelete
  28. Nice pan kahi man halaka nahi jhal.pan mahesh kumbhar yanni ji comment keli tyatum khup kahi samajma dhanyavad mahesh bhau...

    ReplyDelete
  29. Very good article, should be printed on banner & flagged in Swargate,

    I have lost my brilliant engineering colleagues preparing for this bullshit ,left with only hopes besides having great vocational career

    ReplyDelete
  30. Nice article.
    Everybody must read it
    Do analysis of ourselves.

    But answer to this article is even though somebody not get success .
    He will be master where he Or she will be

    ReplyDelete
  31. Hey thik aahe pn.kahi class cha khup fayada hoto.kahi mula jiv todun abhas karatat pn jaga khupach kami asatat tymule lavkar yash milat nhi.ya veli assit la 42 jaga(open 18)ani form 2 lakh .tumala first 18 madhe ya lagel tar post milel.aata vichar kara kiti perfect study ani mehanat lagel

    ReplyDelete
    Replies
    1. जीव तोडून अभ्यास करण्यापेक्षा कौशल्याने अभ्यास केल्यावर post मिळते, 50 पुस्तकांपेक्षा 5 पुस्तके वाचुन,
      25 तास अभ्यास करण्यापेक्षा 8 तास अभ्यासकरून post मिळालेली उदाहरणे आहेत
      Artika Shukla, Roman Saini studied only 8hrs and cracked UPSC implement only smart work

      Delete
  32. जो करेल त्याला मिळेल....नाहीतर उरलेल्यांना हा अजगर गिळेन...प्नतेकाने स्वतःची क्षमता लक्षात घ्यायला हवी...क्षमता म्हणण्यापेक्षा 'लायकीच' म्हटलेल बर..आणि मग decision घ्यावा.खरच आपण त्या लायकीचे आहोत का??? विचार करावा.मग काय तुम्हालाच कळेल(??)

    ReplyDelete
  33. फारच वास्तववादी लेखन...

    ReplyDelete
  34. फारच वास्तववादी लेखन...

    ReplyDelete
  35. आणि आता पुण्यातील एका अकॅडमी ने नवीन पिल्लू सोडलंय २१ व्या वर्षी IAS २०१५ UPSC, गरीब, परिस्थिती नाही, उपाशी राहून अभ्यास केला। पण या भूतलावरील कोणताच सजीव उपाशी राहून काम करू शकत नाही।

    ReplyDelete
  36. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  37. जर कोणाला मनापासून स्पर्धा परीक्षा करायची असेल तर, विना क्लासेस घरी अभ्यास करू शकतात, फक्त Internet आवश्यक, जगात अजून स्पर्धा परीक्षा क्लासेस चा बाजार न मांडलेले लोक आहेत अजून काही ठिकाणी माणुसकी आहे, विना पैसे मार्गदर्शन करतात।
    मला सध्या Roman Saini माहित आहे, बाकीचे समजले तर सांगेन. अजून एक , मी काही Roman Saini ची जाहिरात वगैरे करत नाही,नाहीतर तुम्हाला वाटेल कारण महाराष्ट्रात हे फ्याड आलंय कि क्लासेस वाल्याकडून पैसे घ्यायचे आणि जाहिरात करायची, पुस्तक छापायाचे।
    असो हे धंदे चालत राहणारच । सरकाराला काळ्या पैश्यासाठीच्या योजनेतून ₹ 65000 कोटी मिळतील, पण सरकारला सांगायला हवं सदाशिव पेठ आणि पुण्यातून यापेक्षा नक्कीच जास्त काळा पैसा मिळेल।

    ReplyDelete
  38. लेख आवडला सर ,, खरंच स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांनी सुरुवातीलाच आपल्या क्षमता ओळखाव्यात आणि निर्णय घ्यावा, ह्या classes घेणाऱ्यांनी धंदा टाकलाय आणि ते वारंवार विद्यार्थ्यांना नैतिकतेच्या गोळ्या देतात आणि आपला धंदा चालवतात.

    ReplyDelete
  39. Tumacha lekh vachla aani manala patla pan....tumhi je kaahi lihilye
    te kharch aajchya paristhiti var bhashya karnara likhan aahe..Mazya aajubajula khup sare ase vidyarthi aahet te fakat parikshesathi apply kartat aani parikshya yei paryanta kaahihi abhyas karat naahit...fakta gole karun yetat....palkana vatta maza mulga/mulgi kiti pariksha detoya kiti dhadpad kartoy officer honya saathi..pan te ek prakare fasvnukach karat astat..

    ReplyDelete
  40. Tumacha lekh vachla aani manala patla pan....tumhi je kaahi lihilye
    te kharch aajchya paristhiti var bhashya karnara likhan aahe..Mazya aajubajula khup sare ase vidyarthi aahet te fakat parikshesathi apply kartat aani parikshya yei paryanta kaahihi abhyas karat naahit...fakta gole karun yetat....palkana vatta maza mulga/mulgi kiti pariksha detoya kiti dhadpad kartoy officer honya saathi..pan te ek prakare fasvnukach karat astat..

    ReplyDelete
  41. Atishay khara lekh ha ek marathi lokana laglela ajaar aahe...

    ReplyDelete