Sunday, May 8, 2016

सैराटलेले जातीय...

(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
 सैराटच्या निमित्ताने प्रदर्शनपूर्व जो काही गदारोळ झाला आणि नंतरही चालूच राहिला तो विस्मयकारक नव्हे तर चिंताजनक आहे. एका चित्रपटाच्या निमित्ताने एवढे जातीकारण, जातीद्वेष, व्यक्तीपूजन ते व्यक्तीद्वेष हिरीरीने दाखवले जातील याची कोणी कल्पनाही केली नसेल. बरे एखाद्या ताकतीच्या, खरोखर समूळ हादरवणार्‍या कलात्मक चित्रपटाबद्दल असे झाले असते तर बाब वेगळी होती; पण हे घडले एका सामान्य चित्रपटामुळे हे मात्र विस्मयकारक व चिंताजनक आहे असे नमूद करणे भाग आहे.
काय आहे हा चित्रपट? खरे तर समीक्षा करण्यासाठी चित्रपटाने तुम्हाला भले-बुरे मुद्दे दिले पाहिजेत. त्यात एकसंघ आशय (भला वा बुरा) असला पाहिजे. आपल्याला नेमके काय सांगायचेय याचे भान कथाकार-पटकथाकार ते दिग्दर्शकालाही असले पाहिजे. आपल्या अभिनेत्यांच्या मार्फत दिग्दर्शक पटकथेला कलात्मक पद्धतीने पेश करत जात असतो. फँड्रीमध्ये नागराज मंजुळे यांना ते चांगले जमले. गल्ला किती आणि किती नाही हा मुद्दा नाही. मुद्दा कलात्मकतेचा आणि मुल्यात्मकतेचा आहे.
सैराटची प्रदर्शनपूर्व हवा नकारात्मक झाली. हा चित्रपट मराठ्यांविरुद्ध आहे ही ती पहिली ओरड. अनेक विचारी पुरोगामी म्हणवणारे मराठेही हे काय प्रेम करायचे वय असते का? आधी स्वत:ला जीवनात स्थिर-स्थावर करा असे उपदेश देऊ लागले तर नागराज मंजुळे, एक वडार समाजातून आलेला दिग्दर्शक मराठ्याच्या मुलीला खालच्या जातीच्या मुलाच्या प्रेमात पाडतो याचा अतीव राग येत काहींनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शेरेबाजी केली.  किंबहुना मराठा विरुद्ध दलित असा संघर्ष पेटला. तोवर तर चित्रपट कोणी पाहिलाही नव्हता. प्रोमो आणि गाणी तेवढी माहिती होती. नंतर चित्रपट रीलिज झाला. तुफान प्रतिसाद मिळाला की बुकिंग मिळणे अवघड व्हावे. मराठी चित्रपटासाठी अशा वेळा दुर्मिळ, पण अभिमानास्पद.
मी चित्रपट पाहिला. मला हा चित्रपट आवडला नाही. मी ते फेसबुकवरही लिहिले. त्यावरही वादळ झाले. मला पार जातीयवादी म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली. असो. त्यांना ते स्वातंत्र्य आहे. पण मला हा चित्रपट का आवडला नाही त्याची काही कारणे मात्र मी देतो.
1) या चित्रपटाचा मुख्य दोष ही त्याची अस्ताव्यस्त पटकथा आहे. त्यात कसलीही सुसुत्रता नाही. 80% प्रसंग एकमेकांशी धागाच जोडत नाहीत. त्यामुळे सलग परिणामच येत नाही.
2) पात्रांचे व्यक्तीचित्रण करता आलेले नाही. खरे तर कोणतेही पात्र व्यक्तिमत्त्व म्हणून ठसत नाही. नायिका तेवढी बाजी मारते; पण बाजूची पात्रे ढिसाळ असली तर ठसठशीत पात्रेही कृत्रीम बाहुले बनून जातात तसेच नायिकेचे झाले आहे.
3) हा चित्रपट जात वास्तवावर आहे हे कसे पसरले हे मला माहित नाही. नायिका पाटील आहे आणि नायक कोळी. म्हणून हा या दोन जातींतील किंवा उच्च जातीय विरूद्ध निम्नजातीय अस संघर्ष आहे काय? नाही. कारण तसा तो असता तर नायिका पटवण्यासाठी चिठ्ठीचपाटीपासून ते पार ती पोहोत असलेल्या विहिरीत बिनधास्त उडी ठोकणारा नायक, आपण जिच्यावर प्रेम करत आहोत ती वरच्या जातीची आहे असा विचार करत असल्याचे कोठेही दिसत नाही. त्याचे जीवलग मित्रही तसा विचार करत नाहीत. एवढेच काय कॉलेजात तिच्यासाठी मारामारी होते, ती अवघ्या वर्गाच्या साक्षीने त्याच्याकडे एकटक पाहते तरीही वर्गात जातीय बोभाटा होत नाही. गावात तर दुरच.
4) नायिका या चित्रपटात धाडसी आहे; पण अशा धाडसी नायिका चित्रपटसृष्टीला नव्या नाहीत. भावाचा वाढदिवस. ती नायकाला तेव्हा किस देणार हे वचन देते. झींगाट गाणे होते. नंतर नायिका केळीच्या बनात एका कारमध्ये नायकाला दिलेले वचन पाळते. छतावरून हात धुवायला आलेल्या बापाच्या काहीतरी गडबड आहे हे लक्षात येते. तो माणसे पाठवतो. हे रंगेहाथ पकडले जातात. नायकाचा वाच ठेवणारा मित्र आणि नायक बेदम मार खातात. मामला नायकाच्या घरापर्यंत जातो. तेथेही नायक नायिकेच्या भावाचा मार खातो तसाच बापाचाही. येथेही नायकाने जातीमुळे मार खाल्ला असे नाही. कोणीही असता तरी मार खाल्लाच असता. कोणीही घराच्या आवारात पोरीशी चुम्माचाटी करतोय म्हटल्यावर मार दिलाच असता. हे वास्तव आहे पण जातीमुळे नायकाने मार खाल्लाय काय? तर नाही.
5) शहरी पार्श्‍वभूमी न वापरता खेडेवजा शहराची पार्श्‍वभूमी असलेली ही एक सामान्य प्रेमकथा आहे. प्रेमाच्या तर्‍हा वेगळ्या असल्या तरी त्या तद्दन फिल्मी आहेत. बरे, तसेही असायला हरकत नाही, पण प्रेम करावे तर आर्ची-परश्यासारखे असे वाटायला लावतील अशी भावनिक दृष्ये तरी आहेत काय? तर तेही नाही. प्रेक्षकाला उच्चजातीय मुलीबरोबर निम्न जातीय मुलगा प्रेम करतोय हे आधीच प्रदर्शनपूर्व ठसवले गेल्याने बाकी विचार करायच्या कोणी भानगडीतच पडत नाही आणि मुळात त्या दोघांचे एकमेकांवरचे प्रेमही नीट ठसत नसल्याने उत्तरार्धातील संघर्ष टोकदार व परिणामकारक ठरत नाही. मुळात या चित्रपटात नायक-नायिका प्रेमात पडतातच का? या प्रश्नाचे धड उत्तर नाही. तारुण्यावस्थेचा उंबरठा ओलांडणार्‍या मुला-मुलींचे प्रेम, जे बव्हंशी शारीरिक आकर्षणातून आलेले असते तसेच हे प्रेम आहे. त्यातही उत्कटता म्हणावी असे एकही दृष्य नाही.
6) खरे तर आधी साहसी वाटणारा प्रेमवीर नायक नंतर दुय्यम बनतो. सगळे डेरिंग करते ती नायिका. अगदी पळून जायचे, पोलीस स्टेशनमध्ये बापाला आणि पोलिसांनाही आव्हान देण्याचे, प्रियकराला मारणार्‍या गुंडांवर पिस्तूल झाडण्याचे डेरिंग नायिकाच दाखवते; पण या प्रसंगांतही विश्वसनीयता नाही एवढे ते नाटकी आहेत. मुळात तिचा बाप जर एवढा समर्थ आहे, पाटील आणि राजकीय नेता आहे तर पोलिसांत माझ्या मुलीवर बलात्कार केला, अपहरण केले अशी तक्रार करत बसण्यात व इज्जतीचा फालुदा करुन घेण्यात वेळ दवडण्याऐवजी त्याने, नंतरची मारहाण करत न बसता सरळ नायकाला वर पाठवले असते. चित्रपट संपेपर्यंत थांबायची गरज नव्हती. बरे या सर्व प्रसंगांतही नायक निम्न जातीचा आहे म्हणून हे सारे केले जातेय याचे सुचनतरी आहे काय? तर तेही नाही. म्हणजे असे दिसतेय की चित्रपट पहाताना कोणत्या दृष्टीने पाहायचा याची अप्रत्यक्ष जाहिरात तर केली गेली, लोक कोळी परश्या आणि पाटील अर्ची अशाच पद्धतीने चित्रपट पाहतात... पण चित्रपट, जी एक कलाकृती असते, त्या कलाकृतीत या छुप्या पूर्वप्रसिद्धित, प्रत्यक्षात काही आहे काय? नाही. म्हणजे एक तर दिग्दर्शक तरी घाबरलाय किंवा पटकथाकार तरी. सुचक पद्धतीनेही हे जातीय संदर्भ (जर चित्रपट जात वास्तवाबाबत असता तर) देता आले असते; पण मुळात हा चित्रपट जातीबाबत नाहीच आहे. पुर्वप्रसिद्धी आणि नंतच्या चर्चा मात्र जातीय आहेत.
7) उत्तरार्ध पुर्वार्धापेक्षा जरा बरा आहे. फिल्मीपणाने तोही भरला असला तरी विपरित स्थितीत पळून जाऊन लग्न करणार्‍याना जे काही अनुभव येतात ते येथे स्युडो-रिअलिस्टिक पद्धतीने येतात. पटकथा येथेही फसलेली आहे. खरे म्हणजे स्वप्नाळू जगाकडून भिषण वास्तवाकडे होणारा प्रवास व त्याची सांध जुळवत जगण्याशी सांधलेली नाळ असा जो प्रवास आहे तो पटकथाच (व दिग्दर्शनही) फसल्यामुळे मुळात प्रत्ययकारी होतंच नाही. नायक-नायिकेशी प्रेक्षक म्हणून रिलेट होताच येत नाही. चित्रपटातील अनेक घटना प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही प्रमाणात होऊनच गेलेल्या असतात. तेवढ्या स्मरणरंजनापुरते काही प्रसंग कामी येत असले तरी चित्रपटात ते एकुणातील परिणाम साधत नाहीत. बरे त्यांना तुकड्यातुकड्याने सामोरे येणारे प्रत्ययकारी सत्य म्हणावे तर तेही नाही. उदा. चित्रपटात अचानक कोळी जातपंचायतीचा कसलाही संदर्भ नसणारे अचानक दृष्य येते... तेही अनिर्णित... कसलेही वास्तव न मांडणारे, मागचा पुढचा संदर्भ न देणारे आणि तेही अस्थानी. असायलाच हवे होते तर ते आधीच.
8) उत्तरार्धात बालीश बाबी अनेक आहेत. त्या खर्‍या जीवनातही घडू शकतात हेही आपण मान्य करू. झोपडपट्टीतून चाळीकडे व चाळीकडून फ्लॅटकडे होणारा प्रवास नायक नायिका करतात. त्यांना मुलही होते. मुल तिनेक वर्षाचे झाल्यावर नायिकेचा भाऊ व काही नातेवाईक तिला भेटायला येतात. येथून पुढचा शेवटचा भाग जवळपास मूक अहे. एका सुरुवतेचा दुर्दैवी शेवट आहे.
पण खरेच सुन्न व्हायला होते का?
मला तरी झाले नाही. वृत्तपत्रातील ओनर किलिंगच्या बातम्या वाचून मी सुन्न झालेलो आहे; पण येथे दृश्य मनावर काहीच परिणाम करत नाही. चित्रपटात नायक-नायिकेला प्रत्यक्ष मारताना दाखवलेले नाही; पण गळे चिरुन मारले गेल्यानंतर व त्याआधीचा जीवन-मरणाशीचा संघर्ष त्या खोलीत दिसत नाही. शिस्तीत निपचित गळे चिरलेली प्रेते आहेत. सारे बाकी जेथल्या तेथे आहे. जणू काही त्यांनी अत्यंत शांततेने मरण स्वीकारले आहे.
राहिले आकाशचे... त्यांच्या मुलाचे. हा शेवटचा प्रसंगच बालिश वाटतो कारण आकाशची शिक्षिका (वा बालवाडीतील मॅडम) या प्रसंगाआधीच त्याला घेऊन जातात तेव्हा नायिका, बाळ व बाई संवाद साधतात. ती मुलाला परत सोडायला येते. घराचे दार बंद आहे. ती आकाशला बंद दारासमोर सोडून देते. निघून जाते. असे होते का? जे पाहयचेय ते इवला आकाश पाहतो. त्याची रक्ताळलेली पावले काळजावर ओरखडा उमतवत नाहीत कारण मुळात सारेच कृत्रीम वाटते.
मला हा चित्रपट आवडला नाही. मी तसे लिहिले तर काही मंडळीने मलाच जातीयवादी ठरवले. मला समीक्षण करायचीही इच्छा नव्हती, कारण त्या योग्यतेचा हा चित्रपट आहे असे मला वाटलेच नाही. जातवास्तव सोडून द्या... ते असतेच तर हैद्राबादमध्येही नवपरिणत जोडप्याला जातीचे फटके बसलेच असते... ते नाहीत. त्यांना मारले... का? केवळ दिग्दर्शकाला अथवा पटकथाकाराला चित्रपटाचा काहीतरी शोकांतिक शेवट असावा असे वाटले म्हणून. त्यात दिग्दर्शकीय नैसर्गिकपणा कोठे आहे? तोच अपरिहार्य शेवट असावा असे निर्देशनही कोठे आहे?
पण जातीय चष्मे घालून बव्हंशी हा चित्रपट पाहिला जातो आहे. आता तर नायिकेची जातही शोधली गेली आहे. नायकाची जातही लवकरच घोषीत होईल असे दिसतेय. भविष्यकाळात अभिनेते, दिग्दर्शक ते पार चित्रपटाचे स्पॉटबॉय यांची जात कोणती याचे शोध लावले जातील... त्यावर हिरीरीने चर्चा होतील...
चांगले आहे! पण आक्षेप हा राहतो की कलाकृतीत जे नाहीच ते आहे असे समजून जातीय वाद करावेत काय? हा चित्रपट प्रत्यक्ष सोडा, अप्रत्यक्षही जातवास्तवाबाबत बोलत नाही की सुचितही करत नाही. मुलगी पाटील आहे आणि मुलगा कोळी अशा विरोधाभासी जातीय जीवनाचेही चित्रण या चित्रपटात नाही. मुलगी राजकारणी बापाची आहे आणि ती एका मुलाबरोबर पळून गेली म्हणून बापाचे राजकीय जीवन धोक्यात आले आहे असे संकेत मिळतात, पण मुलगी खालच्या जातीतील मुलाबरोबर पळून गेली म्हणून तसे झाले असेही सुचन नाही. समजा तो अंडरकरंट आहे व दिग्दर्शक ते स्पष्ट दाखवू इच्छित नाही, प्रेक्षकांच्याच विचारशक्तीवरच सोडतोय... तर मग यातून अनेक अन्वयार्थ काढता येतील... ते जातीयच असतील असे नाही. हा संघर्ष सरळ सरळ अमीर-गरीब स्टाईलचा वाटेल किंवा बापालाच जगजाहीर अपमानित करुन पळालेल्या मुलीचा आणि ज्याच्यासाठी हे घडले त्या मुलाचा मुलीच्या बापाने  (तापट मुलाच्या माध्यमातून) घेतलेला सूड असेही वाटू शकेल...
पण जातीय खदखद प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षही या चित्रपटात नाही. हा चित्रपट एका जातीच्या (म्हणजे मराठ्यांच्या) विरोधात व कोळी (किंवा निम्नजातीय) बाजूने आहे असेही नाही. असे एकही दृष्य नाही, संवाद नाही किंवा सुचनही नाही. आंबेडकरवादी सध्या नायकाच्या शोधात आहेत. कधी त्यांना कन्हैयात नायक दिसतो तर आता नागराजमध्ये. या चित्रपटाने तर नायिकाही दिली आहे. उद्या कोणात नायक-नायिका दिसेल हे माहीत नाही. हे नायकबदलुपण घातक आहे हे आंबेडकरवाद्यांना समजायला हवे. कारण या चित्रपटाचे कडवे समर्थक आंबेडकरवादी आहेत हे वास्तव नाकारता येत नाही.
आपला समाज जातीयवादी आहे हे जातवादावर दुरान्वयानेही भाष्य न करणार्‍या चित्रपटाने सिद्ध करावे हे दुर्दैवी आहे. मराठा समाजही यात मागे राहिला नाही. त्यानेही आपल्या वर्चस्वतावादी विकृत दुगाण्या झाडल्याच... कोणत्या ना कोणत्या बहाण्याने. आपल्या समाजात जात वास्तव आहे व जातीय अत्याचारही आहेत हे वास्तव मान्यच करायला हवे; पण हे जातीय अत्याचार आता तथाकथित उच्चजातीयच करतात असे आता राहिलेले नाही. काही शारीरिक जातीय अत्याचार करतात तर काही मानसिक... एवढाच सध्या तरी फरक आहे... उद्या उलटेही होऊ शकते.
सैराट एक फसलेली साधी शोकांतिक प्रेमकहानी आहे, तीही दिग्दर्शकीय फसलेली. ओनर किलिंगचा त्याला टच दिलाय पण तो कृत्रीम आहे. काहीतरी शेवट हवा म्हणून लांबलेल्या चित्रपटाला अचानक थांबवण्यापुरतीची ती क्लृप्ती आहे. एवढेच!
- संजय सोनवणी 

९८६०९९१२०५ 
(साप्ताहिक 'चपराक', पुणे)

No comments:

Post a Comment