Sunday, May 1, 2016

रद्दीत सापडलेले 'महानाट्य'!

उपेक्षित पुस्तकांचे जग
साप्ताहिक 'चपराक', पुणे 
- भारत सासणे

'काळ्या शुक्रवारा'बद्दल मी ऐकून होतो, पण त्याबाबतचा वृत्तांत मी असाच, रद्दीतल्या दुर्लक्षित पुस्तकातून मिळवला. 19 मे 1780, वेळ सकाळ. स्थळ अमेरिकेतला ’न्यू इंग्लंड’ हा परगणा. सकाळी दहाच्या सुमारास गर्द अंधार न्यू इंग्लंडवर पसरला. हा अंधार वाढत राहिला आणि मेणबत्त्या पेटवाव्या लागल्या. शाळा, कारखाने बंद झाले. हाहाकार माजला. चर्चमध्ये जमून प्रार्थना म्हटल्या जाऊ लागल्या. ’परमेश्‍वरी कोपाचा दिवस’ म्हणून धर्मोपदेशकांनी या दिवसाबद्दल सांगितलं.
मेन प्रांत, न्यू हँपशायर, मॅसाच्युसेटस, र्‍होड आयलंड आणि कनेक्टिकर या प्रांतावरही हा अंधार पसरला. न्यूयॉर्कचा पूर्व भाग आणि पेन्सिल्व्हानियाचा ईशान्य भागसुद्धा अंधाराखाली होता. चार वाजता अंधार गडद झाला आणि हिरवट प्रकाशाची आभा अनेकांनी अनुभवली; पण हा दिलासाही नाहीसा झाला. अंधार वाढत राहिला. रात्री पौर्णिमेचा चंद्र दिसायला पाहिजे होता; पण तोही दिसला नाही. रात्री एक वाजता मात्र, तांबडा चंद्र आकाशाच्या मध्यावर दिसला. पहाटे मात्र सूर्य उगवला. चौदा तासांचं अंधाराचं साम्राज्य संपलं. जल्लोश झाला. हा ’काळा शुक्रवार’ म्हणून नोंदवला गेला आहे. विज्ञानाला न सुटलेलं कोडं किंवा सुरस विज्ञानिका म्हणून याकडे पाहिलं गेलं असेल. मी मात्र सतराव्या शतकातील मानसिकता पाहतो आहे. नक्कीच या ’महानाट्यावर’ कोणी काही कादंबरी इत्यादी लिहिली असेल. मला तरी अजून त्या घटनेवरची लिहिलेली कृती हाती लागलेली नाही; पण रद्दीत या ऐतिहासिक महानाट्याचा वृत्तांत सापडला. सैरावैरा धावणार्‍या लोकांचे जथ्थे दिसले. भय दिसलं. उपेक्षित-दुर्लक्षित पुस्तकातून हे भयनाट्य दिसलं.

पुरोहित स्वामींच्या मूळ पुस्तकाचं नाव ‘ऍन इंडियन मंक’ असं आहे. सन एकोणीसशे बत्तीसमध्ये या पुस्तकाची जुळवाजुळव झाली आहे. पुढे, मराठीत याचा अनुवाद उपलब्ध झाला आहे. या पुस्तकाला सांप्रदायिक महत्त्व असेलच. म्हणून सांप्रदायिक श्रद्धाळूंनी ते वाचलं असणार. इतरांनी ते पुस्तक आवर्जून वाचावं असं काही कारण नाही. म्हणून मूळ पुस्तक दुर्लक्षित राहिलं आहे; पण या पुस्तकाला कवी यीटस्ची प्रस्तावना आहे. ‘गीतांजली’ नंतर वीस वर्षांनी आपल्याला पुन्हा प्रस्तावना लिहिण्याचा योग आला आणि हे पुस्तक तितकंच महत्त्वाचं आणि योग्यतेचं आहे असं कवी यीटस् म्हणतात.
साधना काळात पुरोहित स्वामी भटकंती करीत माहूरला पोहचले. माहूरला दिनक्रमानुसार दत्तशयन आहे. या तरूण साधकाने मंदीरात रात्री थांबून खात्री करण्याचे ठरविले. पुजार्‍याने त्याला परवानगी दिली आणि कुलूप लावून तो निघून गेला. तरूण साधक मंदीरात, दत्तशय्येच्या बाहेर एकटाच आणि जागा. रात्री दीड वाजता सुगंध आणि पादुकांचे आवाज. जणू कोणी येत आहे. साधकाचे सर्वांगाचे केस भीतीने उभे राहिले. रात्रभर कुणी कूस बदलत आहे अशी चाहूल. पुन्हा पहाटे कुणी निघून जातंय असा पावलांचा आवाज. दुसर्‍या दिवशी साधक फुलांनी शय्या सजवतो आणि शाल ठेवतो. दुसर्‍या दिवशी, फुलं आणि शाल विस्कटलेली सापडते. साधक आणि पुजारी आनंदित होतात.
कवी यीटस् यांनी प्रस्तावनेत या प्रसंगाबद्दल लिहिताना आपण त्या अनोख्या विश्‍वात डोकावू शकलो आणि प्रत्यक्षानुभवाची आपली इच्छा-भूक भागली असं म्हटलं आहे.
स्वामींनी सांगितलेली हकीकत खरी की खोटी हा प्रश्‍न इथे महत्त्वाचा नसतो. सांगितलेली हकीकत अप्रमाणिक, असं म्हणून आपण स्वत:ची सुटका करून घेऊ शकतो; पण इथे मुद्दा अज्ञेयात, किंवा अनोख्या जगात डोकावण्याच्या संधीचा आहे. पुन्हा, मी या तरूण साधकाची मानसिकता पाहतो. एकाकी भ्रमंती करणारा साधक चिकित्सक बुद्धी जागृत ठेवतो आहे. श्रद्धेपेक्षा त्याला प्रयोग महत्त्वाचा वाटतो. त्याला जे पाहायचं आहे तेच त्याला दिसतं आहे आणि तत्कालीन समाजमानस शास्त्राबद्दलही थोडं आपल्याला समजतं आहे. अविश्‍वसनीय म्हणून मी ही हकीकत बाजूला सारत नाही. तत्पूर्वीच मी थांबतो. हे थांबणं महत्त्वाचं-कवीच्या भाषेत, 'थांबणे अघोरी कला!'

(पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक 'चपराक', पुणे)


No comments:

Post a Comment