Sunday, June 5, 2016

गाव हरवलं आहे!

'साहित्य चपराक' जून २०१६  

नांगरून ठेवलेल्या शेतावर जरा हलकासा पाऊस पडून गेला की, मातीची ढेकळं फुटतात आणि काळ्याभोर मातीचा मऊशार, मोहक गालिचा तयार होतो. या मातीवरून कोणी वावराच्या मध्यभागातून या बांधापासून त्या बांधापर्यंत चालत गेलं की, वावराच्या मध्यभागी एका विशिष्ट लयीत पावलांचे मोहक ठसे उमटतात. बांधावर उभं टाकून लांब जाणार्‍या या पावलांच्या ठशांकडे काही सेकंद लक्षपूर्वक पाहिलं तर मनात उगीच हलकीशी हुरहुर दाटते. हवहवसं काहीतरी लांब जातंय, सुटत चाललंय असं वाटतं.
प्रत्येकाच्या मनात खोलवर रुतून बसलेल्या बालपणीच्या आठवणींचंही काहीसं असंच असतं. मनात खोलवर या आठवणींचे लयबद्ध ठसे उमटलेले असतात. या ठशांकडे लक्ष गेलं की मनात हुरहुर दाटते, काहीतरी मौल्यवान हातातून निसटून गेल्याची सलणारी जाणीव होते. मन जुन्या आठवणीत हरवून जाते.
तारूण्यात पदार्पण करेपर्यंत खेड्यात जीवन व्यतित करून कामानिमित्त शहरात स्थिरावलेल्या चाकरमान्यांचं उर्वरित संपूर्ण आयुष्य हा हळवा, दुखरा कोपरा कुरवाळत व्यतित होतो. माळावर ऊनवारा झेलत वाढणार्‍या उन्मत्त झाडाला उपटून, कुंडीत कोंबून, हरितगृहात ठेवलं तर त्याची वाढ खुंटेल की कायम राहील? मानसिक पातळीवर कुंडीतला बोन्साय झाल्याचा असाच काहीसा घुसमटून टाकणारा अनुभव हे चाकरमाने घेत असतात. शहरात, निमशहरी भागात येऊन स्थिरावलेली ही माणसं मनाच्या कोपर्‍यात नेहमीच त्यांच्या खेड्याबद्दल, तिथे व्यतित केलेल्या बालपणाबद्दल मनात एक हळवा कोपरा बाळगून असतात. त्यांना शहरी जीवनातील सुखसुविधा हव्याहव्याशा वाटतात पण मनानं ही माणसं त्या शहराशी फारशी एकरुप होत नाहीत. मोकळ्या ढाकळ्या ग्रामीण वातावरणातून दारं आणि मनं नेहमीच बंद असणार्‍या शहरी संस्कृतीमध्ये स्वतःला चापूनचोपून बसवणं ही एक प्रकारची मानसिक कसरतच असते. एका मोठ्या समुदायात राहून ही एकटेपणाची बोच मनात कायम घर करून असते.
आज मध्यमवयात असलेल्या, मूलतः ग्रामीण परंतु नंतर शहरात स्थायिक झालेल्या मध्यमवयीन पिढीची मानसिक घुसमट मोठी आहे. गावाची ओढ वाटते म्हणून गावाकडे कधी जावं तर आठवणीतलं ते गाव आता प्रत्यक्षात शिल्लकच कुठे आहे? अलीकडच्या दहा वर्षात वेगाने झालेली संवाद क्रांती आणि दळणवळणाच्या सुविधांनी खेडी ही आता प्रचंड बदलली आहेत. त्यात ग्रामपंचायतींना विकासकामासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आर्थिक निधीने ग्रामीण राजकारणात प्रचंड चुरस निर्माण केली. छोटासा ग्रामीण समुदाय अनेक गटातटात विभागला गेला. सामाजिक एकोपा हे पूर्वीच्या ग्रामीण समुदायाचं सर्वात मोठं बलस्थान. अगदी रजाकारात हिंदू आणि मुस्लीम समुदायानं एकमेकांचं रक्षण केल्याच्या आठवणी जिथं ताज्या आहेत तोच ग्रामीण समुदाय आता विविध जातीपातींच्या नावावर एकमेकांचा विरोधक म्हणून एकमेकांसमोर उभा ठाकतोय हा आजच्या विखारी राजकीय प्रचाराचा परिणाम आहे. संवाद साधणे, दळणवळणाच्या सुविधा यामुळे ग्रामीण जीवनात घडून येत असलेले बदल सकारात्मक की नकारात्मक याबद्दल मतभेद असू शकतात; पण खेड्यांचा आत्मा हरवत चालला आहे याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं काहीच कारण नाही. गावाच्या एकूणच भौतिक, सामाजिक आणि मानसिक परिप्रेक्ष्यात इतका कमालीचा बदल या अलीकडच्या काळात झाला आहे की, खेडी आपली ओळखच गमावून बसली आहेत.
गावाच्यालगत पूर्वी किमान दोन मोठी मोकळी मैदाने हमखास असायची. ही मैदाने जणू त्या गावच्या मुलांची अघोषित मालमत्ताच होती. तिथे निर्माण झालेल्या, होत असलेल्या नवीन वस्त्यांनी ही मैदाने मुलांकडून हिरावून घेतली आहेत. आता मैदानेच नष्ट झाली आहेत तर तिथे खेळलेले लगोर, कबड्डी, खोखो, विटीदांडू इत्यादी देशी खेळ कुठे शोधायचे? अगदी खेड्यातलीसुद्धा किशोरवयीन, नवतरुण मुले स्मार्टफोनमध्ये गुरफटून पडली आहेत. मधल्या काळात फोनच्या जागी टीव्ही होता. मुळातच गावातही मुलांनी एकत्र येऊन मैदानी खेळ खेळण्याची संस्कृती नष्ट होत आहे. भले कारणे काहीही असोत. ही मैदाने आज शिल्लक असती तरी ही मुले मैदानी खेळ खेळायला इथे आली असती का?
गावातला पार, मंदिराचा मोठा मंडप ही मुलामुलींची दुसरी अघोषित मालमत्ता असायची. चंपुल, सागरगोटे अशा बैठ्या खेळांबरोबरच इथं लपणापाणी पण खेळलं जायचं; पारावर चकाट्या पिटणार्‍या मोठ्यांनी गोंधळाला वैतागून ऐकवलेली बोलणीही बिनबोभाट ऐकावी लागायची. बोलणाराही लेकरु आपलं की परकं याचा फारसा विचार करत नसे. आता गावाकडची मंदिरं, त्यांचे मंडप अधिक भव्य झाले आहेत, सुंदर झालेत; ओबडधोबड दगडी फरशी जाऊन तिथे सुंदर गुळगुळीत टाईल्स आल्यात पण तिथले बाळगोपाळ, गप्पा मारणारे आबालवृद्ध कुठेतरी हरवलेत! या दोन घटकांशिवाय ही मंदिरे सुनीसुनी भासतात.
गावातल्या बांधकामांच्या पद्धतीत झालेल्या बदलांमुळे गावाचा चेहरामोहरा कमालीचा बदलला आहे. गावातली जुनी बांधकामे वैशिष्ट्यपूर्ण होती. छोट्या छोट्या कौलारू घरांबरोबरच गावातले चिरेबंदी वाडे त्या गावच्या वैभवात भर घालायचे. आता असे बहुतांश वाडे मोडून पडले आहेत. त्यांची जागा आता कॉंक्रिटच्या बांधकामांनी घेतली आहे. कौलांची जागा स्लॅब किंवा परवडत नसेल तर पत्र्यांनी घेतली आहे. गावाच्या एकंदरीत बाह्य स्वरूपावर त्याचा सरळ सरळ परिणाम झाला आहे. बहुतांश गावातील अंतर्गत रस्ते आता गुळगुळीत, सिमेंटचे झाले आहेत. गावी गेलं तरी मातीचा स्पर्श शेतात गेल्याशिवाय आता होत नाही. या रस्त्यांनी एक नवीनच समस्या जन्माला घातली आहे. गावातील जाणकार मोठी माणसे सांगतात की सिमेंटचे रस्ते झाल्यापासून गावच्या आसपासच्या पाणीसाठ्यांची पाणीपातळी कमी झाली आहे. छतांवरून पडणारे पाणी पूर्वी जिथल्या तिथे मुरायचे. आता ते सरळ वाहत जाऊन गावालगतच्या ओढ्याला जाऊन मिळते. त्याचा विपरीत परिणाम गावच्या पाणीपातळीवर झाला आहे. पाणवठे कोरडे पडत चालले आहेत.
गावातली मंदिरे हे त्या गावचं मोठं सांस्कृतिक वैभव होतं. नित्यनेमाने तिथे भजन, कीर्तन, धर्मग्रथांची पारायणे होत. अनेक पिढ्यांची मानसिक जडणघडण या धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून झालेली आहे. मागे एकदा मला गुरूस्थानी असणार्‍या अत्यंत नामवंत मराठी कविवर्यांना त्यांच्या कवितेतील विषय वैविध्याबद्दल विचारलं असता त्यांनी त्यांच्या ग्रामीण वारशाचा उल्लेख करताना सोबतच भजनी मंडळात होतो हेही हसत हसत सांगितलं होतं. गावातली ही महत्त्वपूर्ण सांस्कृतिक केंद्रे आता निव्वळ भौतिक स्वरुपात शोभेच्या वस्तूसारखी उभी आहेत. गावात मंदिरे आहेत पण तिथे होणार्‍या कार्यक्रमातील लोकांची आस्था संपुष्टात आली आहे. सांस्कृतिक केंद्र असण्यासोबतच ही मंदिरे सामाजिक एकोप्याची पण केंद्रं होती. मंदिरात होणार्‍या कार्यक्रमांच्या निमित्ताने संपूर्ण गाव एकत्र यायचा, यथाशक्ती सहभागीही व्हायचा. आज हे चित्र हरवलं आहे आणि सामाजिक एकोपाही.
दळणवळणाच्या साधनांचा कमालीचा अभाव ही गावातली खूप मोठी समस्या होती. वाहन विकत घेण्याची क्षमता शहरी माणसांकडे नसायची तर ग्रामीण माणसाकडे ती कुठून येणार? दळणवळणाची साधने उपलब्ध झाली आणि गावातून जवळच्या छोट्यामोठ्या शहरांकडे कामानिमित्त किंवा विनाकारणच जाणार्‍यांची संख्या वाढली. या संपर्काने ग्रामीण माणसाचा बाहेरच्या मोठ्या जगाशी संपर्क वाढला आणि ग्रामीण माणूस त्याच्या मनाचा साधेपणाच हरवून बसला. गावातील जुनी जाणकार पिढी तर हाही आरोप करते की, तरूण मुलांच्या मनात शहरी जीवनाच्या असणार्‍या आकर्षणामुळे ही मुले विनाकारण या गावांना चकरा मारत राहतात. त्यामुळे त्यांची उद्यमशीलता कमी होत आहे. म्हणजे जे शहरात येऊन राहिले आहेत त्यांचा ओढा गावाकडे आणि जे गावात आहेत त्यांचा ओढा शहराकडे असं काहीसं चित्र आहे.
गावच्या आधुनिक, भौतिक रूपाकडे पाहून आनंदी व्हायचं का संपत चाललेल्या सांस्कृतिक वैभवाकडे पाहून दुःखी व्हायचं हे ठरवणं सर्वांसाठीच अवघड आहे. जे त्याच समुदायाचा एक भाग आजही आहेत त्यांनी या बदलांना कालौघात होणारे बदल म्हणून स्वीकारून टाकलं असणार पण गावाचं सांस्कृतिक वैभव ज्यांच्या मनात आठवणींच्या रूपाने शिल्लक आहे त्यांना हे बदल अस्वस्थ करतात.
या पिढीच्या गावाशी निगडीत विशिष्ट आठवणी त्यांच्या मनात कायम कोरलेल्या आहेत. त्यांना गावात त्या ओळखीच्या खुणा कुठेच सापडत नसल्याने ते गावी गेले की अस्वस्थ होतात. ज्या शहरी, निमशहरी भागात ही पिढी स्थायिक झाली आहे. त्याला या पिढीने मनाने कधीच संपूर्ण स्वीकारले नाही. एक विचित्र त्रांगडं निर्माण झालंय.
गावात दिसणारे हे बदल निव्वळ वरवरचे आहेत. हे बदल पाहून गावांची खूप प्रगती झाली आहे असा भास होऊ शकतो; मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. अजूनही गावात अर्थार्जनाचा मुख्य स्त्रोत शेती हाच आहे. वर्षानुवर्षे पडणार्‍या दुष्काळाने शेतकर्‍याचे कंबरडे पार मोडले आहे. गावाकडे गेल्यावर ठळकपणे नजरेत भरते ते तिथले दैन्य. ज्या गावाला सिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत तिथला शिवार आणि माणसेही टवटवीत दिसतात. इतरत्र चित्र भयावह दिसते. आर्थिक विपन्नता ही गावांची जुनीच समस्या आहे. आता जोडीने मानसिक दैन्यही अवतरले आहे. खचलेपण ग्रामीण माणसाच्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवते. पूर्वीसुद्धा गावात फारशी आर्थिक सुबत्ता नसायची पण मनाची समृद्धी मात्र ओसंडून वाहायची. मनाच्या शांत, समाधानी वृत्तीने जीवनातल्या उणिवांना मनावर ताबा मिळवू दिलेला नव्हता. भौतिक सुखसुविधांच्या अभावात जगणारी ही माणसं मनानं मात्र लढाऊ बाण्याची, खंबीर असायची. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. शहरांच्या सततच्या संपर्काने ग्रामीण माणसाचा आत्मविश्वास काढून घेतला आहे. त्याच्या मनात एकप्रकारची न्यूनगंडाची भावना निर्माण झाली आहे. शेतीशिवाय उत्पन्नाची इतर साधने नाहीत, चांगल्या शैक्षणिक सुविधा नाहीत. रोजगार मिळवण्यासाठी, चांगल्या शैक्षणिक सुविधांसाठी जवळपासच्या मोठ्या गावांवर अवलंबून रहावे लागते. अवर्षणाने मोडून पडलेला शेतकरी, बेरोजगारीने त्रस्त तरूणाई, शैक्षणिक सुविधांच्या अभावात पायाच कमकुवत राहून जात असलेले बालपण असे काहीसे निराशाजनक चित्र खेड्यात पाहायला मिळते. जे संवेदनशील मनाला अस्वस्थ करते. ठिगळ कुठे आणि कसे लावायचे तेच समजत नाही. त्याचवेळेस ‘जलयुक्त शिवार’सारखी योजना मनात आशा निर्माण करते. नदीपात्रांच्या खोलीकरणाची स्वयंसेवी संस्थांमार्फत होणारी कामे मनाला गारव्याची जाणीव करून देतात. प्रचंड जिद्दीच्या बळावर विविध परीक्षांत यशस्वी होणारे एकलव्य बघून मन आनंद आणि अभिमानाने भरून येते परंतु आनंदी होण्यासाठी सापडणारी ही कारणे अगदीच तुटपुंजी, नगण्य आणि कधीतरीच हाती लागणारी आहेत.
वस्तुस्थिती कितीही विषण्ण करणारी असली तरी आम्हा चाकरमान्यांना त्याच्या उरल्यासुरल्या खुणांसह भेटणारा गाव अजूनही प्रियच वाटतो. नोकरीच्या ठिकाणावरून कधीतरी आम्ही गावी जातो तेव्हा गाव त्याच उर्वरित खुणांसह उभा असतो. आम्हाला प्रेमाने जवळ करतो. त्याचा अदृश्य, आश्वासक हात अंगाखांद्यावर फिरला की मनातली पोकळी आपसूकच भरून निघते. समाधानी, तृप्त वाटतं. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी त्याला गावचं हे निर्व्याज वात्सल्य कृत्रिमरित्या थोडंच निर्माण करता येणार आहे? कितीही पैसे कमावले तरी ते वात्सल्य, त्या गावच्या सहवासाचा तो सुगंध ही पैशाने विकत मिळणारी गोष्ट नव्हे. जगातली कुठलीही गोष्ट, कोणतंही मोठेपण त्या अनोख्या वात्सल्याची पूर्ती करू शकत नाही. म्हणूनच गावाशी असणारा तो अनोखा, दृढ भावबंध गावाकडे पुन्हापुन्हा घेऊन जातो.
- विद्या बयास 

शिरूर ताजबंद, जि. लातूर 
७०३८६६५६८४ 

'साहित्य चपराक' जून २०१६ 


1 comment: