Thursday, June 9, 2016

‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’

'साहित्य चपराक' जून २०१६ 


‘ग्लोबल वॉर्मिंग’ म्हणजेच जागतिक तापमानवाढ याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. मानवी प्रगती आणि विकासाच्या अतिरेकामुळे सर्वात भयंकर अशी जी समस्या निर्माण झाली आहे, तिचे नाव आहे ‘ग्लोबल वॉर्मिंग’. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये वातावरणाचे म्हणजेच हवेचे आवरण आहे. या वातावरणामध्ये अनेक प्रकारचे वायू आहेत. यात सर्वात जास्त नायट्रोजन हा वायू आहे. एकूण वातावरणाच्या 78% नायट्रोजन आहे. त्यानंतर ऑक्सीजन, कार्बन डाय ऑक्साईड, हायड्रोजन, इथेन, मिथेन इ. अनेक प्रकारचे वायू वातावरणामध्ये आहेत. याचबरोबर ओझोन हा वायू म्हणजे ऑक्सीजनचा एकच अणू. हाही मोठ्या प्रमाणावर आहे. सूर्याकडून पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण अतिशय उष्ण असतात. ते जर तसेच पृथ्वीवर आले तर पृथ्वीवर जीवसृष्टीचे कोणतेही अस्तित्व राहणे शक्य नाही. इतकी ती किरणे उष्ण आहेत. पृथ्वी भोवतालच्या वातावरणाच्या थराने म्हणजे या विविध वायूंच्या मिश्रणांच्या थराने पृथ्वीभोवती एक संरक्षित आवरण तयार झाले आहे. सूर्याचे किरण प्रथम या आवरणामध्ये शोषले जातात. त्यांची तीव्रता या आवरणामध्ये शोषली जाते आणि तिचे प्रमाण कमी केले जाते. त्यानंतर हे सूर्यकिरण पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टीचे अस्तित्व आणि विकास शक्य झाला आहे. पृथ्वीवरील सजीव जीवसृष्टीचे अस्तित्व केवळ या वातावरणीय आवरणामुळे टिकून आहे.
मानवी प्रगतीचा आणि विकासाचा आधुनिक प्रवास साधारणपणे इ. स. 1600 पासून सुरू झाला असे म्हणता येईल. विज्ञानाचा आद्य जनक गॅलिलिओ हा होता. त्याआधीही काही शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक पद्धतीचे चिंतन आणि प्रयोग सुरू केले होते; पण गॅलिलिओ, देकार्ते, न्युटन, डार्विन आणि अगदी अलिकडे आईनस्टाईनपर्यंत हा प्रवास वरच्या दिशेने आविरत सुरू राहिला आहे. अजूनही तो विकासाची नवी नवी क्षितिजे गाठतो आहे. साधारण एकोणीसाव्या शतकाच्या सुरूवातीला इंडस्ट्रिलायजेशन म्हणजे यांत्रिक युगाची सुरूवात झाली. विज्ञानाचा मूळ उद्देश मानवाचे दैनंदिन जीवन अधिकाधिक सुखी करणे हा आहे. अगदी अचूक सांगायचे तर शारीरिक परिश्रम कमी करून यंत्रांच्या साहाय्याने अधिकाधिक उत्पादन आणि सेवा कशा निर्माण करता येतील यावर विज्ञानाचा अधिकाधिक भर आहे. मानवाचे शारीरिक कष्ट कमी व्हावेत, तो निसर्गावर, पशूंवर, पक्ष्यांवर व इतर नैसर्गिक घटकांवर कमीत कमी अवलंबून रहावा. त्याऐवजी निसर्गातीलच संसाधने वापरून त्या उर्जेवर चालणार्‍या यंत्रावर आधारित जीवनपद्धती विकसित केली गेली. स्वयंपूर्ण आणि मानवाच्या इच्छेनुसार काम करणारी यंत्रे ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनू लागली. सुरूवातीला मानवाला आवश्यक वस्तू शारीरिक श्रमांद्वारेच किंवा गाय, बैल, घोडा इ. पशूंच्या सहाय्याने चालणार्‍या यंत्रांच्या सहाय्याने बनविल्या जात होत्या. परंपरागत कौशल्ये आणि आवश्यकते इतकेच उत्पादन असे त्याचे सूत्र होते. यामुळे एकूणच मानवी जीवन संथ, निसर्गस्नेही आणि निसर्गावर अवलंबून अशा प्रकारचे होते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मानव हा निसर्गाचाच एक भाग बनून जीवन जगत होता. विज्ञानाची प्रगती सुरूवातीच्या काळात धीम्या गतीने होत होती. सुरूवातीला विज्ञानातील शोध आणि उपयोग हे स्थानिक गरजांनुसार आणि स्थानिक परिघामध्ये होते. होता होता उर्जेचा शोध लागला. यामध्ये वीज, वाफ, द्रवरूप इंधन, डिझेल, पेट्रोल, वायू इ. प्रकारचे इंधने आणि त्यांचे भूगर्भातील प्रचंड साठे मानवाला मिळाले. त्यामुळे या इंधनावर चालणारी यंत्रे बनवण्याकडे मानवाचा कल वाढू लागला. यातूनच यंत्रयुगाचा आरंभ झाला.
सुरूवातीला स्थानिक परिघामध्ये आणि अल्प प्रमाणामध्ये सुरू झालेले यांत्रिकीकरण हळूहळू वेग धारण करू लागले. छोट्या छोट्या यंत्रांच्या जागा मोठी मोठी यंत्रे घेवू लागली. उत्पादन क्षमता वाढवताना यंत्राचा आकार वाढू लागला. यंत्राला लागणारी जागा, लागणारी उर्जा, कामगार यांची संख्या वाढू लागली. याचबरोबर उत्पादनांच्या प्रकारामध्ये उभी आणि आडवी वाढ होवू लागली. नवीन नवीन उत्पादने आणि त्यातून नवीन नवीन गरजा वाढू लागल्या. स्थानिक गरजा पूर्ण करून तयार झालेली अधिक उत्पादने इतर ठिकाणी पाठवण्यासाठी वाहतुकीच्या साधनांची गरज वाढू लागली. त्यातून रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक विकसित झाली. पूर्वी मोठ्या नद्या, समुद्रामधून बोटी आणि गलबतांमधून मालाची वाहतूक आणि मानवाचा प्रवास होत होता; मात्र त्यावर एक नैसर्गिक मर्यादा होती. यांत्रिक युगाची पहाट होत असताना उर्जा आणि यंत्राची नवलाई मानवी जीवनाला व्यापून राहिली होती. नवनवीन यंत्रांचे शोध म्हणजे जणू चमत्कारच होते. यांत्रिक युगाआधी स्वयंपूर्ण खेडी अस्तित्त्वात होती. गरजे एवढे उत्पादन स्थानिक पातळीवरच केले जात होते. गावातल्या गरजा गावातच भागत होत्या. बैल, घोडे, गाढव, गाई, म्हशी, शेळी, मेंढ्या इ. पशू मानवी उर्जेची, वस्त्रांची गरज भागवत होते. निसर्गाला देव मानून, निसर्गाशी संतुलन राखून मानव मिळालेल्या जीवनाचा सर्वांगीण उपभोग घेत होता. साहित्य, कला, क्रीडा, ज्ञान, भक्ती, कर्म इ. अनेक मार्गांनी मानवी जीवन अविरतपणे सुरू होते. त्यात जीवघेणी स्पर्धा नव्हती, प्रचंड गती नव्हती; मात्र शारीरिक कष्ट होते. श्रमांशिवाय जगणे शक्य नव्हते. व्यक्ती कुटूंब, समाज, गाव, राज्य, देश अशा विविध पातळ्यांवर समन्वय साधून जीवन जगत होते. रोज सूर्योदयापूर्वी दीड तास ब्राह्मं मुहूर्तावर जागे होणे. पुरूषांनी शेतामध्ये किंवा कौशल्यपूर्ण कामाला सुरूवात करणे. महिलांनी जात्यावर धान्य दळल्यापासून सर्व प्रकारची श्रमाची कामे करणे, अशी दिनचर्या होती. ऋतुचक्र आणि दिनमानाला अनुकूल अशी जीवनपद्धती होती. दीड-दोनशे वर्षापूर्वी ना वीज होती ना दिवे. अशावेळी सूर्यप्रकाशावर आधारित आणि सूर्योदय, सूर्यास्ताशी जमवून घेणारी जीवनपद्धती होती. माणसाबरोबरच निसर्गामध्ये वाघ, सिंह, हत्ती, अनंत प्रकारचे पशू, पक्षी यांचा मुक्त वावर होता. मानवाला या सर्वांपासून भीती होती. मात्र त्यावरही आपली बुद्धी आणि कौशल्ये वापरून तो आनंदाने जगत होता. मानवी जीवन वैयक्तिक अर्थाने परावलंबी मात्र सामूहिक अर्थाने स्वावलंबी अशा प्रकारचे होते. मानवी शहाणपण, बुद्धी, अनुभव यांचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढील पिढीला समृद्ध करीत होता. माणसाला जरी शारीरिक कष्ट करावे लागत होते. तरी तो भावनिक, मानसिक, बौद्धिक स्तरावर आणि कला, साहित्य, संगीत इ. द्वारे समृद्ध जीवन जगत होता. त्यातच अध्यात्मिक आणि धार्मिक वाटांवरसुद्धा त्याची वाटचाल अखंडपणे सुरू होती. नदी, नाले अखंड वाहत होते. विहिरी, तळी, झरे भरभरून राहिले होते. आवश्यक तेवढे उत्पन्न आणि गरजा मानव आनंदाने भागवत होता. सामुहिक कुटूंबजीवन होते. गाव म्हणजेच एक कुटूंब होते. कुटूंब हे फक्त जवळच्या नातेवाईकांपुरते मर्यादित न राहता गाव, राज्य, देश म्हणजे एक कुटूंब आहे आणि त्यात सर्वांना गुण्यागोविंदाने राहायचे आहे अशी एक उदात्त भावना विकसित झाली होती. सर्वांचा सामुहिक विकास आणि त्यामध्ये प्रत्येकाला स्वत:च्या क्षमतेप्रमाणे प्रगती करायची संधी अशी उर्ध्वमुखी सामाजिक परिस्थिती होती. यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा अजिबात लोप झालेला नव्हता; मात्र व्यक्ती स्वातंत्र्यावर सामाजिक आणि नैतिक बंधने होती. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याचा बेबंद उच्छाद मांडता येत नव्हता.
यांत्रिक युग आणि आधुनिक विज्ञानाचा विकास होत असताना विविध उर्जांच्या मदतीने यंत्राचा आणि साधनांचा विकास होत गेला. माणसाच्या शारीरिक श्रमाची कामे यंत्रे करु लागली. माणूस निवांत होऊ लागला. नवनवे शोध लागू लागले आणि जीवनाचे सर्व आयाम त्याने व्यापून टाकले. यांत्रिक युगापूर्वी जगाची संख्या (लोकसंख्या) पशू, पक्षी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, रोगांच्या साथी, युद्धे यामुळे आपोआप नियंत्रित राहत होती. निसर्गाची स्वत:ची अशी एक स्वयंभू व्यवस्था एकूणच मानवाचे आणि सजीवसृष्टीचे नियंत्रण करीत होती. मानव त्या व्यवस्थेला अनुकूल अशा तर्‍हेने आपले जीवन जगत होता. त्याने धर्म ही संकल्पना मांडली होती. नैतिक जीवनामध्ये नियम तयार केले होते. सामाजिक आणि सामुहिक जीवनावर बंधने घातली होती. नीती नियमाच्या अदृष्य बंधनामधून सामाजिक जीवनाचे नियमन केले जात होते. विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाने व्यक्तिगत स्वातंत्र्याचा पाया घातला. व्यक्तिने लावलेला शोध, व्यक्तिने सुरु केलेला उद्योग, व्यक्तिचे असामान्यत्त्व, तिचे हक़्क, तिचे अधिकार, व्यक्तिची संपत्ती इ. व्यक्तिकेंद्रीत विचार तीव्र होवू लागले. व्यक्ती हा समाजाचा एक घटक आहे आणि तिचे स्वातंत्र्य आणि अधिकार हे समाजाच्या सर्वकष हिताचा विचार करुनच निश्चित केले पाहिजेत, हा विचार मागे पडू लागला. याउलट व्यक्ती ही स्वयंभू आहे. तिला सर्वप्रकारचे स्वातंत्र्य आणि अधिकार मिळालेच पाहिजेत हा विचार जोर धरु लागला. तिच्या स्वातंत्र्याच्या अधिकारापोटी इतर व्यक्ती आणि निसर्गातील इतर घटक यांचा नाश झाला तरी चालेल; पण तिचे स्वातंत्र्य जपले पाहिजे ही भावना वाढीस लागली. खरेतर समाजाच्या खंडनाला इथूनच सुरुवात झाली. कोणत्याही मार्गाने, एखाद्या व्यक्तिने प्रगती करणे हे भूषण मानले जावू लागले. त्यासाठी त्याने कितीही भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला तरी त्याकडे डोळेझाक करण्यात येवू लागली. विज्ञानाने धर्म आणि नीतिमत्ता यांच्या कल्पना खिळखिळ्या केल्या. नैतिकता आणि सार्वजनिक हीत धाब्यावर बसवले. वैयक्तिक विकास आणि स्वातंत्र्याच्या हितापोटी व्यक्तिला वारेमाप सवलती दिल्या. व्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करताना नैतिकतेची आणि समाजाची व्यवस्था झुगारुन दिली. नैतिकतेची कास पूर्णपणे तोडून व्यक्तिच्या हव्यासाला आणि स्वार्थाला खतपाणी घातले. या सर्वांचा परिणाम असा झाला की माणसांनी वैयक्तिक प्रगती करताना समाज, कुटूंब, निसर्ग यातील सर्व व्यवस्था नासवून टाकली. तिचा परिणाम असा झाला आहे की, गेल्या साडेतीनशे ते चारशे वर्षांत आधुनिक विज्ञानाच्या मार्गाने चाललेली विश्वाची वाटचाल आता सर्वनाशाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. लाखो करोडो वर्षे मानवी जमात निसर्गाशी संतुलन राखत निसर्गस्नेही जीवन जगत आपले अस्तित्त्व टिकवून उभी होती. विज्ञानामुळे आणि अतिरेकी विकासामुळे माणसाने पृथ्वीचेच अस्तित्व धोक्यात आणले आहे. त्याचाच एक परिणाम म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग हा आहे. मानवाने आणि विज्ञानाने आक्रमण केल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत असून त्यामुळे सर्व नैसर्गिक चक्र बदलून गेले आहे. सर्व प्रकारच्या नैसर्गिक संसाधनांची वारेमाप लूट माणसाने चालवली आहे. निसर्ग माझा शत्रू आहे आणि त्याच्यावर मला विजय मिळवायचा आहे आणि त्यातूनच जीवन सुखी करायचे अशी ही कल्पना आहे. या पृथ्वीवर आणि संसाधनांवर फक्त मानव या प्राण्याचा अधिकार असून सर्व संसाधने फक्त मानवासाठीच आहेत. त्यासाठी इतर सर्व पशू, पक्षी, प्राणी, वृक्ष या सर्वांचा मानवाने नाश चालवला आहे. निसर्गचक्रातील सहा ऋतू वसंत, ग्रीष्म, शिशिर, हेमंत, शरद, वर्षा आपल्याला माहीत होते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हेही ऋतू आपण पाहत होतो; पण सध्या फक्त उन्हाळा आणि पावसाळा हे दोनच ऋतू दिसतात. त्यांचेही वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. मानवाने निसर्गावर केलेले आक्रमण हेच याचे एकमेव कारण आहे. निसर्गाचे आणि नैसर्गिक साधनांचे अमानुष लचके तोडताना आपण स्वत:साठीच खड्डा खणत आहोत आणि आपल्या सर्वनाशाची तयारी करत आहोत हे बेभान झालेल्या माणसाला कळत नाही, अशी परिस्थिती आहे.
‘ग्लोबल वॉर्मिंग’ बरोबरच वाढता दहशतवाद, भ्रष्टाचार, दिवाळे काढणार्‍या विविध देशांच्या अर्थव्यवस्था, बेरोजगारी, विविध देशांतील युद्धे, दंगली, अपघात, घातपात इ. अनंत समस्यांनी संपूर्ण जगाला ग्रासून टाकले आहे. आजमितीला जगातील 193 देशांपैकी 46 हून अधिक देशांमध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या युद्धे सुरु आहेत. अशा परिस्थितीमध्ये ‘ग्लोबल वॉर्मिंग’बरोबरच ‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’ हीसुद्धा एक मोठी समस्या बनली आहे. काय आहे ‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’?
‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’ म्हणजे जागतिक भावनिक तप्तता. याचा अर्थ संपूर्ण जगातील माणसे भावनिक आणि मानसिक दृष्ट्या तप्त झालेली आहेत. त्यांच्या संवेदना, भावना, मानसिक स्वास्थ्य हे पूर्णत: तापले असून ते नष्ट झाले आहे. संवेदना कोरड्या झाल्या आहेत. ज्याप्रमाणे खतांच्या अतिवापराने जमिनी क्षारपड, नापिक आणि निरुपयोगी होतात त्याप्रमाणे माणसे पूर्णत: कोरडी, निरुपयोगी बनत चालली आहेत. केवळ मरत नाही म्हणून जगणारी करोडो माणसे दिसताना जिवंत दिसतात. मात्र त्यांच्यामध्ये कोणतेही चैतन्य आणि उत्साह नाही. अदृष्य भीतीच्या भयावह सावटाखाली खंगलेले माणसांचे समूहच्या समूह सर्वत्र आहेत. कोणाशी बोलायचे म्हणजे त्याला भीती वाटते. कुणालाही दुसर्‍यासाठी वेळ नाही. एकाकीपणाच्या भयावह जाणिवेने माणसे उद्ध्वस्त झाली आहेत. दिसायला ती बाहेरून अतिशय आकर्षक आहेत; मात्र आतून ती पूर्णपणे पोखरली गेली आहेत. बाहेरुन कितीही प्रगतीचे आणि विकासाचे अवसान आणले तरी आतून ती पूर्णत: ढासळली आहेत. ‘ग्लोबल वॉर्मिंग’मध्ये वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ फक्त मॅटरचा म्हणजे जमीन, पाणी, वातावरण, हिमनद्या, समुद्र यांचाच विचार करतात. पृथ्वीच्या म्हणजे जमिनीच्या तापमानवाढीमुळे निसर्गामध्ये काय परिणाम घडत आहेत यावर संशोधन आणि चर्चा सुरु आहेत. ओझोन या वायूचे आवरण किती पातळ झाले आहे आणि त्यामुळे अतितप्त सूर्यकिरण कसे पृथ्वीचे तापमान वाढवत आहेत यावर मंथन घडत आहे. ओझोनचा थर किती फाटला आहे, त्याचा शोध सुरू आहे. उद्योग, विकास, प्रगती, शहरे, अर्थव्यवस्था यावर ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे कसे परिणाम घडतील यावर अभ्यास सुरु आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या कारणांची चर्चा करताना त्यावरील उपायांचा शोध सुरु आहे. हे सर्व करताना त्याचा मानवी मनावर आणि आरोग्यावर काय परिणाम घडतो आहे त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मनुष्य प्राणी म्हणजे यंत्र नाही. यंत्राचा एखादा भाग नादुरुस्त झाला तर तो बाजूला काढून दुरुस्त करता येतो किंवा तो बदलून त्याजागी नवीन भाग बसवून ते यंत्र पुन्हा सुरु करता येते; मात्र मनुष्याच्या बाबतीत तसे करता येत नाही. मानवाचे शरीर ही एक परिसंस्था आहे. शारीरिक अवयवांबरोबरच मन, बुद्धी, चित्त, विविध भाव भावना यांचा घनीभूत अविष्कार म्हणजे मानव आहे. त्याला विविध प्रकारचे विकार आहेत. त्याच्या शरीरावर पंचमहाभूतांबरोबरच पंचकोषांचेही नियंत्रण आहे. तो जे अन्न खातो त्या अन्नाबरोबर येणारे विचार आणि भावना त्याच्या जीवनावर परिणाम करतात. प्राणशक्ती ही माणसाची आधारभूत जीवनशक्ती आहे. नुसती नाकातून हवा ओढून घेवून फुफ्फुसांना ऑक्सिजनचा पूरवठा करणे एवढेच मर्यादित असे प्राणशक्तीचे कार्य नाही. प्राणाचे व्यान, अपान, उदान, समान आणि प्राण असे पाच भाग आहेत. हे प्राणाचे प्रकार अन्न पचनापासून ते आरोग्य सांभाळण्यापर्यंत विविध प्रकारचे कार्य करतात. मन ही तर मानवाला मिळालेली अद्भुत अशी देणगी आहे. विविध प्रकारच्या भावभावना, विचार, ज्ञान प्रकट करण्याचे साधन म्हणजे मन आहे. योग्य अयोग्य मार्गाचे मार्गदर्शन करणारी आणि शुभ अशुभाची जाणीव करुन देणारी बुद्धी मानवी जीवनाच्या संतुलनाचे कार्य करते. त्याही पलिकडे आनंद, सुख, आणि समाधान देणारी एक विशेष उपजत भावना मानवामध्ये कार्य करीत असते. विविध प्रकारचे शारीरिक श्रम सहन करण्याची आणि त्यातून पुन्हा ताजेतवाने होण्याची एक नैसर्गिक व्यवस्था मानवी शरीरामध्ये आहे. त्याचप्रकारे विविध प्रकारच्या भावभावनांचा कल्लोळ निर्माण करण्याची आणि थोपवून धरण्याचीही एक नैसर्गिक व्यवस्था मानवामध्ये आहे. ही सगळी व्यवस्था अतिशय विलक्षण आणि अद्भुत अशी असून ती व्यवस्था जितकी संतुलित तितका मनुष्य अधिक चांगले जीवन जगू शकतो. मनुष्य नैसर्गिकदृष्ट्या एक पशू आहे. शारीरिक आणि मानसिक श्रमांमुळे येणारे ताण सहन करण्याची त्याची एक मूलभूत क्षमता आहे; मात्र त्यालाही एक नैसर्गिक मर्यादा आहे. रबर जसे दोन्ही बाजूनी ताणता येते. ते ताणल्यानंतर काही काळाने पूर्वपदाला येते; मात्र तेच रबर जर सतत ताणत राहिले तर त्याची ताण सहन करण्याची क्षमता नष्ट होते आणि ते तुटून जाते. माणसाचेही तसेच आहे. एका विशिष्ट क्षमतेपर्यंत तो सर्वप्रकारचे ताण सहन करु शकतो; मात्र त्या मर्यादेपलिकडे ताण गेला की मनुष्यही तुटून पडतो. हीच गोष्ट समाज म्हणून, देश म्हणून सर्वांना लागू आहे. विकासाच्या वारेमाप घोडदौडीमुळे एकूणच मनुष्य समाज आणि संपूर्ण विश्वच कोलमडून पडायच्या स्थितीमध्ये आले आहे. याचेच नाव आहे ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग. संपूर्ण मानव जमात एका भयावह कोलाहलामध्ये गुरफटून गेली आहे. प्रचंड द्विधा मनस्थितीमध्ये सापडली आहे. दिशाहीन झाली आहे. एकीकडे विकासाचे दडपण, जीवनाचा भयावह वेग आणि पूर्णत: अनैसर्गिक जीवनपद्धती यामुळे मानवी जीवन उद्ध्वस्त झाले आहे. मानवाचे रुपांतर आर्थिक पशूमध्ये झाले आहे. मानवी जन्म फक्त पैसे मिळवण्यासाठी, संसाधने गोळा करण्यासाठी आणि मिळेल ती गोष्ट ओरबाडण्यासाठीच झालेला आहे अशी एक सार्वजनिक समजूत झाली आहे. खा, प्या, मजा करा. उद्याचा विचार करु नका. अशी ही चंगळवादी जीवनशैली बोकाळली आहे. फक्त आणि फक्त स्वत:चाच विचार अशी ही स्वार्थी जीवनशैली आहे. तिचा अध:पात इतका झाला की जन्म देणारे आईवडील, नातेवाईक, मित्र, समाज या कुणाचाही मुलाहिजा न ठेवता व्यक्ती अतिशय आत्मकेंद्रीत झाल्या आहेत. कष्ट न करता, नैतिकतेची कोणतीही चाड न ठेवता, इतर कुणाचाही विचार न करता वखवखलेल्याप्रमाणे उपभोगामध्ये लोळणारी माणसे सर्वत्र दिसू लागली आहेत. निसर्ग आणि इतर सजीव यांचा नाश करणारा माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी दुर्बल आणि वंचित माणसाचा घास घ्यायला कमी करीत नाही अशी परिस्थिती झाली आहे. एका बाजूला हजारो कोटींची माया गोळा करणारे अब्जाधीश वेगाने वाढत असताना उपाशी पोटी मरणार्‍यांची संख्या वाढत आहे. ही विषम स्थिती फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये आहे. जगावर अधिराज्य गाजवणार्‍या अमेरिका आणि युरोपीय देशांनाही या अंदाधुंद विषमतेने ग्रासले आहे. भिकारी, बेरोजगार आणि असहाय्य लोकांची संख्या तेथेही प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहे. संपूर्ण जगाचे स्वामी म्हणून मिरवणारी अमेरिकाही इतकी भयग्रस्त झाली आहे की एखादा अपघात किंवा बॉंबस्फोट झाल्याची बातमी आली तर काही तासातच सारे जनजीवन ठप्प होते. माणसे स्वत:ला सुरक्षित ठिकाणी कोंडून घेतात. इतर जगातील हजारो निरपराध माणसे अतिरेकी हल्ल्यात किंवा उपासमारीने मेली तरी त्याचे प्रगत राष्ट्रातील नागरिकांना काही सोयरसुतक नसते. मात्र त्यांच्या नागरिकांना जरा काही झाले तर ही राष्ट्रे आकाशपाताळ एक करतात. संपूर्ण जगातील एकूण नैसर्गिक संसाधनाच्या 50% हून अधिक संसाधने प्रगत राष्ट्रातील 10% नागरिक फस्त करतात आणि जगाला शांतीच्या, सहानुभूतीच्या आणि मानवी अधिकाराच्या गप्पा सांगतात. केवढा हा दांभिकपणा!
या सगळ्या बाबी समजून घेताना एक गोष्ट प्रामाणिकपणे लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे निसर्गाकडे देखील स्वत:ची अशी एक परिपूर्ण संतुलन व्यवस्था आहे. मानव निसर्गातील सर्व घटकांचे लचके तोडत असताना, मानव सोडून सर्वांचा नाश करीत असताना निसर्गही शांत बसलेला नाही. भूकंप, त्सुनामी, दुष्काळ ही त्याची नैसर्गिक प्रकोप रुपे आहेत. त्याचबरोबर दहशतवाद, भ्रष्टाचार, युद्धे हा सुद्धा निसर्गाच्या संतुलन योजनेचा भाग आहे. माणूस जसा निसर्गाला पोखरुन काढत आहे तसा निसर्गसुद्धा माणसाला आतून पोखरुन काढत आहे. मानव निसर्गावर बाहेरुन हल्ला चढवत आहे. निसर्ग माणसाला आतून उद्ध्वस्त करीत आहे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकातून जन्माला आलेल्या दुष्ट प्रवृत्ती माणसाला आतून नष्ट करीत आहेत. याचे खरे कारण आपण निसर्गत: एक पशू असून आपल्याला मर्यादा आहेत हे आधुनिक विज्ञानवादी मनुष्य विसरला आहे. मला कोणीही काहीही करु शकणार नाही आणि मी सगळ्यावर विजय मिळवू शकतो ही उद्दाम आणि आसुरी विचारसरणी मानवी सर्वनाशाच्या मुळाशी आहे. प्रत्येक प्राण्याची किमान गरज सहज भागू शकेल अशी निसर्गामध्ये व्यवस्था आहे; मात्र हव्यास आणि अधाशीपणा यांचे समाधान करु शकेल अशी कोणतीही व्यवस्था ब्रह्मांडामध्ये कोठेही नाही. मानव स्वत:च्या हव्यासापोटी पृथ्वीचा सर्वनाश करीत आहे; पण पृथ्वी सहजा सहजी ते होऊ देणार नाही. एक तुंबळ युद्ध मानव आणि पृथ्वी यांच्यामध्ये सध्या सुरु आहे.
यावर काही उपाय आहे का? आणि असल्यास तो कोणता? यावर विचार करण्याआधी एक प्रश्न असा विचारला जाईल तो म्हणजे गेली चारशे वर्षे जो विज्ञानवादी विकास केला तो चुकीचा होता का? आता पुन्हा आपण अश्मयुगात परत जायचे का? पुन्हा पशू होऊन जंगलामध्ये राहायचे का? याचे जर खरे आणि प्रामाणिक उत्तर हवे असेल तर ते बहुधा होय असेच आहे. गेल्या चारशे वर्षांचा विकास तपासून पाहावाच लागेल. विकासाचे परिणाम समजून उमजून घ्यावे लागतील. जर एखादी गोष्ट चुकत असेल तर ती चूक स्वीकारुन सुधारणा करावी लागेल. काय व्हायचे ते होऊ द्या, जे जगाचे होईल तेच माझे होईल असा विचार कामाचा नाही. ‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’चा विचार करताना माणसाला पुन्हा एकदा स्वत:ला कुटुंबाशी, समाजाशी आणि निसर्गाबरोबर जुळवून घ्यावे लागेल. व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकावर नियंत्रण घालून उपभोग आणि विकासाला संयमाचे बांध घालावे लागतील. स्वत:मधील माणूस जगवावा लागेल. हे करताना त्याला निसर्गातील सर्व घटकांबरोबरचे संबंध पुन:र्स्थापित करावे लागतील.
एका बाजूला विज्ञान आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांचा उदो उदो करीत असताना जग धार्मिक आणि आध्यात्मिक विश्वाचा आधार घेत आहे ही वस्तुस्थिती आहे. अत्यंत भांबावलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेतील माणसाचा विज्ञानावरील विश्वास डळमळीत होत आहे आणि तो धार्मिक विचारांकडे ओढला जात आहे. माणसाला कुठल्यातरी मानसिक आणि भावनिक आधाराची सतत गरज असते. तो यंत्रासारखा फक्त उत्पादन करणारा परंतु पूर्णत: भावनाशून्य असा राहू शकत नाही. तो आधार त्याला कुटुंब देते, नातेवाईक, समाज देतो. आज माणसाकडे सर्वकाही आहे; मात्र समाधान नाही असे दिसून येते. याचे कारण समाधानाची जी साधने विज्ञानाने उपलब्ध करुन दिली आहेत ती एकतर पूर्णत: कुचकामी आहेत किंवा त्यांची उपयुक्तता मर्यादित आहे. ती साधने सार्वकालिक सुख आणि आनंद देवू शकत नाहीत. तसेच सर्वांना एकत्रितरित्या सुख देवू शकत नाहीत. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. तो सर्वांबरोबर राहणारा कुटुंबवत्सल प्राणी आहे. त्याला त्याची सुख-दु:खे वाटण्यासाठी इतर माणसांची आणि निसर्गातील घटकांची गरज आहे, आजचा माणूस इतका असंवेदनशील झाला आहे की, इराक युद्ध चालू असताना प्रगत राष्ट्रातील लोक बिफ खात टीव्हीवर माणसे मरताना एन्जॉय करत होती असे सांगितले जाते. आपले आई बाप भारतात मरण पावले तर त्यांची उत्तरक्रिया करायला येण्यासाठी परदेशातील मुलांकडे वेळ नाही, अशी परिस्थिती झाली आहे. कारण त्यामुळे नोकरी जाण्याची भीती आहे. प्रत्येक गोष्ट स्वार्थामध्ये आणि पैशामध्ये अशी गुंडाळून टाकली गेली आहे आणि त्याचे निर्लज्ज समर्थन करताना कुणाला काहीही वाटत नाही. उत्तरदायित्त्व, कृतज्ञता या गुणांना तिलांजली दिलेल्या माणसाला आता जागे होण्याशिवाय गत्यंतर नाही. माणसाने आपल्या भावभावना, नैतिक मूल्ये चिरडून टाकली आहेत. त्याचाच परिणाम सर्व प्रकारच्या विनाशाकडे माणसाला घेवून जात आहे. ‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’चा सामना करताना माणसाला निसर्गाबरोबरचे भावनिक आणि मानसिक बंध पुन्हा निर्माण करावे लागतील. फक्त विकास आणि आर्थिक गोष्टी यांना प्राधान्य न देता भावना, नाती आणि जीवनमूल्ये यांना प्रथम प्राधान्य द्यावे लागेल. जीवनाची गती कमी करून जीवनशैलीची लय संथ करणे हे सर्वात आवश्यक आहे. मनाचे स्थिरीकरण आणि संतुलन हे यावरचे उपाय आहेत. स्वत:च्या आतल्या आवाजाबरोबर संवाद साधून मला नक्की किती गरज आहे, माझ्या शरीराच्या क्षमतांच्या मर्यादा किती आहेत आणि माझ्या आनंदाचे नक्की विषय कोणते आहेत याचा शोध घेतला पाहिजे. मी बाह्य वस्तूंवर, यंत्रांवर आणि यंत्रणांवर किती अवलंबून आहे आणि हे बाह्य अवलंबित्व कसे कमी करता येईल याचा आढावा घेतला पाहिजे. सर्वांगिण विकास म्हणजे नक्की काय आणि तो किती करायचा आहे याची व्यक्तिगत योजना आखली पाहिजे. यासाठी व्यक्तिने, समाजाने, देशाने अंतर्मुख होवून स्वत:चीच परीक्षा केली पाहिजे. आपली जीवनदृष्टी बाह्य जगताकडून वळवून ती आतल्या दिशेला वळवली पाहिजे. आपल्या बुद्धीबरोबरच इतरांच्याही  हृदय आणि मन यांचा सन्मान केला पाहिजे. स्वत:चे आणि समाजाचे भावनिक आणि मानसिक पोषण केले पाहिजे. अनिर्बंध स्वातंत्र्याला लगाम घालून जीवनमूल्ये आणि आदर्शांच्या प्रतिष्ठापनेला स्वत:हून सहकार्य केले पाहिजे. हे वाटते तितके सोपे नाही. ही एक तुंबळ लढाई आहे परंतु मानवाच्या अस्तित्वासाठी ती अतिशय आवश्यक आहे.  कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र, शेजारी, समाजातील इतर घटक यांच्याशी सतत संवाद करीत राहिले पाहिजे. मनातील गोष्टी, विचार आणि भावना इतरांबरोबर सतत बोलत राहणे आणि इतरांच्या संवादातही मनापासून सहभागी होत राहणे गरजेचे आहे. खरंतर ‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’बरोबर सामना करायचे तेच एक उत्तम शस्त्र आहे. इतरांबरोबर कोणत्याही प्रकारची तुलना न करता, हव्यास, पळापळ थांबवून भोगवादी जीवनशैलीचा त्याग करून हे साध्य करता येईल. जीवनाचे, जीवनशैलीचे आणि मनाचे सुयोग्य कंडिशनिंग करणे हा ‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’वरचा उपाय आहे. निसर्गामध्ये सतत अनंत घडामोडी घडत असतात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती तरी प्रकारचे आनंद दडलेले असतात. त्यांचा शोध घेणे, त्यांचा आस्वाद घेणे आणि जीवनाचा शांतपणे संथ लयीमध्ये उपभोग घेणे ही कला साध्य करावी लागेल. बाहेरचे अवलंबित्व कमी करणे यानेच हे साध्य होईल. हे अवघड आहे; पण अशक्य नाही. थंड करून खावे अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणे जीवन थंड करून, शांत करून, संथ करून त्याचा आनंद घ्यायला हवा. ज्यांना हे कळते त्यांनी ते आचरणामध्ये आणले पाहिजे. ‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’बरोबर लढण्याची ती पहिली पायरी आहे. अन्यथा ‘ग्लोबल वॉर्मिंग’बरोबर ‘ग्लोबल इमोशनल वॉर्मिंग’मध्ये सारी मानव जात होरपळून जाण्याचा धोका आता अगदी समोर उभा ठाकला आहे, हे नक्की.        

-प्रा. क्षितिज पाटुकले 
९८२२८४६९१८ 
'साहित्य चपराक' जून २०१६

No comments:

Post a Comment