Tuesday, June 7, 2016

डाव मांडियेला

राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय सांस्कृतिक विभाग प्रमुख, भारतीय स्त्री विद्या निकेतनच्या अखिल भारतीय अध्यक्षा आणि भारतातील 23 प्रतिष्ठानांच्या सल्लागार सुशीला माधव महाजन यांचे ‘डाव मांडियेला’ हे पुस्तक पुण्यातील ‘शिल्पा प्रकाशन’कडून प्रकाशित झाले आहे. या पुस्तकातील एक प्रकरण खास ‘साहित्य चपराक’च्या वाचकांसाठी...


1955 व 1956 मध्ये श्री. मधुकरराव घरी नव्हतेच. गोवा आंदोलनामुळे ते कधी सावंतवाडी, बेळगाव, बांद्रा, पुणे असे सारखे फिरत होते. मलाही नुसते मॅट्रिक असून चालणार नव्हते. राजकारणी लोकांचे जीवन अस्थिरच. तेव्हा शिक्षिकेच्या नोकरीसाठी किमान एस. टी. सी. (सेकंडरी टीचर्स कोर्स) करणे जरूर होते. माझी नणंद मनु व आम्ही दोघींनी पुण्याला रमणबाग शाळेतून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. मी वर्षभर पुण्याला राहिले, पण आमच्या सासूबाईंच्या आजारपणामुळे त्या व नाना मुंबईला माझ्या मोठ्या दिरांकडे राहायला गेले होते. विद्या वर्षाची होती. आम्ही दोघी व नवीन लग्न झालेले धाकटे दीर व जाऊबाई असे आम्ही राहत होतो. जाऊबाईंचे नुकतेच लग्न झाल्यामुळे त्यांचे सासरी-माहेरी जाणे-येणे चालू होते. त्यामुळे लहान मुलगी, घरकाम व अभ्यास ही माझी कसरत होती; मात्र मनु वन्संची मला खूप मदत होई. माझा पाठ असेल तेव्हा त्या विद्याला सांभाळत. जाऊबाई जेव्हा असत तेव्हा त्यांचीही मदत होई. काही वेळा मला असे वाटे की हे सर्व सोडून द्यावे, पण ते क्षणभरच. कारण आमच्या देशसेवेवर संसार भागणार नव्हता. त्यामुळे हे सर्व करणे अटळ होते. आमची वार्षिक परीक्षा ज्या दिवशी संपली त्याच्या तिसर्‍या दिवशी मनु वन्संचे लग्न होते. घरात खूप पाहुणे मंडळी जमली होती. स्वयंपाकाला बाई वगैरे कोणी नव्हते. सर्व घरातच करावे लागे. पुन्हा त्या काळी लाडू, चिवडा वगैरे सर्व फराळाचे घरीच करण्याची पद्धत असे. ते सर्व दुपारी, माझ्या सख्ख्या व चुलत जावा मिळून करीत. त्यामुळे परीक्षेहून आल्यावर मी एवढ्या माणसांच्या पोळ्या करीत असे. आमच्या सासूबाईंनाही आमच्या शिक्षणाचे महत्त्व असल्यामुळे त्या मला म्हणत, ‘हे पाहा, आता तुम्ही दोघी जेऊन अभ्यासाला जा.’ अशा प्रकारे आमची परीक्षा झाली व मला दुसरा वर्ग मिळाला.
आता आम्ही बनामा हॉल लेनमधल्या पोटमाळ्यावरून भुलेश्‍वरला जरा बर्‍यापैकी जागेत राहण्यास आलो होतो. जयहिंद इस्टेट म्हणून पाच मजली इमारतीत संघाची एक पाच खोल्याची सदनिका होती. त्यातले स्वयंपाकघर खूप मोठे होते. त्या स्वयंपाकघरात संघाचे एक कार्यकर्ते श्री. पेंढारकर राहात असत. ते संसारी होते. त्यांना दुसरीकडे जागा मिळाली, त्यामुळे आम्ही तेथे राहावयास गेलो. त्याचवेळी जनसंघाच्या कामाला काळबादेवीचे कार्यालय लहान पडू लागल्याने नवे कार्यालय शोधण्याचे काम सुरू होते. मुंबईभर सभा-बैठका घेणे, परगावचे दौरे व त्यातच कार्यालय शोधणे असा सारखा पायाला भिंगरी लावल्यासारखा यांचा कार्यक्रम होता. आज गावोगावी असलेली भाजपची सुसज्ज कार्यालये पाहून माझे मन अगदी भरून येते. त्यावेळी खूप शोधाशोध केल्यानंतर कथ्थकभवनमध्ये जागा मिळाली. आजही भाजपचे ते कार्यालय आहे. श्री. मारूतीराव आवटे तेथे राहत होते. त्यांचा तेथेच पुठ्ठ्याची खोकी बनवण्याचा व्यवसाय होता. तेथील जागा त्यांनी जनसंघाच्या ऑफिससाठी दिली; मात्र त्याबद्दल कधी कुरकूर किंवा प्रौढीही त्यांनी मिरवली नाही. ज्यावेळी जनसंघातून ह्यांना बाहेर पडावे लागले त्यावेळेला मात्र एकदाच हे असे म्हणाले की, ‘ती जागा मिळवताना मी काय सहन केले आहे ते मलाच माहिती; म्हणून निदान झाडू मारण्याचे काम जरी मला तिथे दिले, तरी ते मी आनंदाने करेन.’ तो एक वेगळाच अध्याय आहे. ओघाने मला तो पुढे सांगावाच लागणार आहे.
काश्मीर सत्याग्रहातून हे परत आल्यानंतर तर कामाच व्याप खूप वाढला. तेवढ्या त्या धावपळीत त्यांनी हिंदीच्या परीक्षा देणे सुरू केले. त्याला कारणही तसेच होते. काश्मीर सत्याग्रहाला जाण्यापूर्वी त्यासंबंधी गिरगाव चौपाटीवर मोठी सभा झाली. जाणार्‍या तुकडीला निरोप समारंभ होता. सर्वांची भाषणे हिंदीत झाली. पुण्याच्या लोकांना अजिबातच हिंदी येत नव्हते. ह्यांना निदान बंबई हिंदी तरी येत होते. ह्यांचे सभेत हिंदीतून भाषण झाले आणि त्यांना हे जाणवले की, अखिल भारतीय पदावरच्या कार्यकर्त्याला हिंदी यायलाच पाहिजे; पण तेव्हा परीक्षा देण्यास वेळ नव्हता. तशी तीन महिने तिकडे आग्रा जेलमध्ये त्यांना हिंदी बोलण्याची सवय झाली होती; पण तेवढ्यावर समाधान मानण्याचा ह्यांचा स्वभाव नव्हता. कोणतीही गोष्ट पूर्ण आत्मसात केल्याशिवाय खरे काम होत नाही. जे काम हाती घेतले असेल ते पूर्णत्वास न्यावयासाठी करावे लागणारे सर्व श्रम ते घेत असत. माझ्यासारखा जुजबी किंवा कामचलाऊपणा त्यांना मुळीच खपत नसे. त्यावरून आमचे अनेकदा खटके उडत.
ओघाने आले म्हणून सांगते, समितीची माझ्यावर मुंबई प्रदेशातील चार जिल्ह्यांची जबाबदारी आली तेव्हा ह्यांचे म्हणणे असे की, ह्या सर्व भागातील सर्व शाखांवर तुला एकेकदा तरी जायला हवे. तर खरे कार्यवाहिका पद; नाहीतर नुसतेच नावाला. गुजरातची मी पालक अधिकारी झाले, तेव्हाही ह्यांचे म्हणणे, आधी गुजरातची भौगोलिक, ऐतिहासिक माहिती तू गोळा कर. त्याचा अभ्यास कर. त्यासाठी सर्व गुजरात एकदा फिरून ये. गुजराथी भाषा शिक. मगच हे काम स्वीकार. माझ्यासारख्या नोकरी करणार्‍या, दोन लहान मुली असलेल्या संसारी बाईला हे कसं शक्य आहे? पण त्यांना ते मुळीच पटत नसे. मग शेवटी मी त्यांना म्हणे, ‘तुमचे संघाचे काम पुरूष करतात, त्यामुळे त्यांची पद्धत वेगळी आहे; आमची वेगळी आहे.’ असा संवाद आमचा अनेकदा होत असे. पुढे-पुढे असे काही मला सांगण्याचे त्यांनी सोडून दिले. त्यांच्या मुली मात्र अगदी तंतोतंत त्यांच्याप्रमाणे दीर्घोद्योगी झाल्या. त्याचे उदाहरण म्हणजे, चि. विद्याचे पीएचडी आणि चि. सुषमाचा उद्योगधंदा. मलाही मनातून त्यांचे ते म्हणणे पटे, पण माझा स्वभाव!
असो. आता आमचा गृहस्थाश्रम भुलेश्‍वर जयहिंदमध्ये सुरू झाला. तिथली चार-पाच वर्षे काही वेगळाच अनुभव देऊन गेले. ते दिवस झपाटलेले होते. तिथे स्वयंपाकघर सोडून उरलेल्या खोल्यांमध्ये श्री. बापूराव लेले व ‘नवभारत टाईम्स’चे श्री. मिश्रा हे कायम राहणारे होते. पण संघाचे प्रचारक, जनसंघाची नेते मंडळी येऊन जाऊन सतत असत. त्यात काही विद्यार्थी म्हणजे विश्‍वनाथ दाबके, जयंत भागवत सारखे माझ्याहून थोडेफार वयाने लहान असणारेही असत. तेथे माझा वेळ कसा जाई ते कळत नसे. जनसंघाची ती सुरूवातीची वर्षे होती. पक्ष सर्वार्थाने लहान होता. कार्यकर्ते, नेतेही यांच्याच बरोबरीचे असे तरूण होते. दीनदयाळजी, अटलजी, जगन्नाथरावजी, प्रभाकर पटवर्धन, बच्छराजजी व्यास, प्रेमजीभाई असर, सुंदरसिंग भंडारी, कुशाभाऊ ठाकरे आणि असे कितीतरी कार्यकर्ते जयहिंदवरच उतरत आणि त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था मला करावी लागे. मी जो काही आमटी-भात करीत असे तो सर्वजण प्रेमाने खात असत. बाहेर खाणे कोणालाच परवडणारे नव्हते. माझ्याकडे जेऊन ही मंडळी बैठकीसाठी चालत जात होती. टॅक्सीसुद्धा परवडत नव्हती.
जेवणाबद्दल अटलजींची एक आठवण मला नेहमी आठवते. ते आंब्याचे दिवस होते. हे सर्व सात-आठ जण जेवायला होते. मी आमरस केला होता. वाटीत रस व पानात पुर्‍या वाढल्या. अटलजींना समजेना हा खायचा कसा, कशाबरोबर? मराठी मंडळींनी त्यांना सांगितले, पुर्‍या रसाबरोबर खा. पण त्यांना काही ते जमेना. शेवटी सर्व रस त्यांनी भातात कालवून खाल्ला.
तसेच दीनदयाळजींचीही एक आठवण माझ्या चांगली स्मरणात आहे. त्यांचा मुक्काम जयहिंदवर होता. रोज सभा-बैठका चालूच होत्या. अशाच एके दिवशी हे दोघेजण सकाळी अकरा वाजता घरी आले. आधी जेवायला येणार आहेत याची मला कल्पना नसल्याने माझा कार्यक्रम सावकाश चालू होता. हे मला म्हणाले, ‘हे बघ, अर्ध्या पाऊण तासात आम्हाला जेऊन बाहेर जायचे आहे. लवकर स्वयंपाक कर.’ घरात काहीच भाजी नव्हती, टॉमेटो होते दोन-तीन. खाली पाच जिने उतरून भाजी आणणेही शक्य नव्हते. कांदा घालून टोमॅटोची कोशिंबीर, वरणभात, पोळ्या केल्या आणि त्यांची पाने वाढली. पहिलाच घास दीनदयाळजींनी घेतला आणि ते म्हणाले, ‘क्या आप बम्मन है ना? तो प्याज खाते है?’ मला इतके शरमल्यासारखे झाले. त्यानंतर ते मुकाट्याने जेवले. मात्र कोशिंबीर खाल्ली नाही. हे नंतर मला बोलले, ‘आपण दुपारच्या जेवणात कांदा कधी खातो का? मग हे काय केलेस?’ मी म्हणाले, ‘अहो तुमच्या पानावर काय वाढू? फक्त आमटी भात? मलासुद्धा लागले आहे; पण अर्ध्या तासात भाजी उत्पन्न कुठुन करू मी?’ या जेवणाखाण्यावरून आणखी एक आठवलं. श्री. बाळशास्त्री हरदास हे मुंबईला प्रवचनांना येत असत. मुंबईला आल्यावर त्यांचे एक-दोन वेळा तरी आमच्याकडे जेवण असे. त्यांचे प्रवचन आटोपल्यावर रात्री साडे अकरा-बाराला ते जेवत. त्यांना मसाले भात, भजी वगैरे चमचमीत जेवण लागे. त्यांच्याबरोबर पुष्कळ वेळा दामुअण्णा टोकेकर असत. दोघेही विदर्भातले. त्यामुळे जेवणाच्या बाबतीत त्यांचे चांगले जमत असे. रात्री चार-पाच जण तरी जेवायला असत.
अनेकजण अनेकदा जेवायला असत. मला तशी फारशी स्वयंपाकाची सवय नव्हती व आवडही नव्हती; पण सवयीने जमू लागले. विशेषत: मसालेभात छान जमत असे. त्यामुळे कोणी जेवायला येणार म्हटल्यावर त्यांचे म्हणणे असे की, मसालेभात कर. एकदा असेच हे सर्वजण दुपारी बैठकीला व नंतर जाहीर सभेला जायचे होते. अटलजींना खूप ताप भरला होता. त्यामुळे ते घरीच झोपून होते. अटलजी दुखण्याला फारच हळवे होते. तेव्हा ते मला म्हणाले, ‘सुशिलाजी निंबू जरा भूनकर (भाजून) उसमें शक्कर और नमक डालकर मुझे देना!’ मी तसे करून त्यांना दिले. नंतर ते म्हणाले, ‘असे नको, सरबत करून द्या.’ त्यानंतर ते म्हणाले, ‘नुसतेच पाणी द्या.’ एकूण काय ही मंडळी रात्री सभेहून येईपर्यंत ना अटलजींना स्वस्थता, ना मला! सारखे नाचवत होते. आता हा प्रसंग ते विसरूनही गेले असतील. याउलट ‘दीनदयाळजींचे!’ त्यांना डिसेंट्री झाली होती. पंधरा दिवस तशाच स्थितीत ते व मधुकरराव मुंबई व ठाणे जिल्ह्यात प्रवास करून आले. घरी आल्यावर मग ते म्हणाले, ‘ताईजी आज मुझे केवल खिचडी खानी है।’ मी का? म्हणून विचारले तेव्हा समजले की, त्यांना पंधरा दिवस डिसेंट्रीचा त्रास होतो आहे. हे बरोबर असून यांनासुद्धा कल्पना आली नाही. कमालीचा सहनशील व शांत माणूस. बच्छराजजी व्यास जेवायचे असले म्हणजे त्यांना वैश्‍वदेवाची सर्व तयारी करून द्यावी लागे. अगदी पहिल्यांदा जेव्हा ते आमच्याकडे जेवायला आले, तेव्हा ते मला वैश्‍वदेव करायचा आहे असे म्हणाले. हे माझ्या तोंडाकडे बघू लागले. मी मात्र चटकन त्यांना हो म्हणाले आणि एका लहानशा कढल्यात निखारे घालून दिले. एका ताटलीत भात, त्यावर तूप घालून त्यांना दिले. ते एकदम खूश झाले आणि मला म्हणाले, ‘तुला कशी ही माहिती?’ त्यावर मी त्यांना, माझ्या माहेरी रोज वैश्‍वदेव असतो हे सांगितले. माझे वडील शेवटच्या दुखण्यात आजारी पडेपर्यंत रोज वैश्‍वदेव करीत असत. तसे माझ्या माहेरी फारसे कर्मकांड नसे पण सर्व सणवार, ूुजाअर्चा व्यवस्थित होत असे. त्याचे अवडंबर किंवा सोवळेओवळेही फारसे पाळले जात नसे. मात्र आम्हाला त्या सर्वांची माहिती आहे.
या सगळ्या धबडग्यात माझी समिती शाखा कधी चुकली नाही. हे बाहेर गेले, की मी माझ्या कामाला मोकळीच असे. त्याबाबतीत या सर्वच मंडळींचे मला सहकार्य मिळत असे आणि यांनीही मला कधी असे म्हटले नाही की, ‘आधी घरातले सर्व कर आणि मग समितीकार्य कर.’ एकदा जगन्नाथराव जोशी वगैरे मंडळी मीटिंग आटोपून रात्रीपर्यंत जेवायला येणार होती. यांनी दोन-तीन जण येतील असे सांगितले की मी चार-पाच जणांचा स्वयंपाक करीत असे. मी सर्व स्वयंपाक करून यांची वाट पाहत बसले. साडे आठ झाले तरी कोणी आले नाही. माझी रात्री साडेनऊला गिरगावात एक बैठक होती. शेवटी नऊ वाजेपर्यंत या लोकांची मी वाट पाहिली. नंतर ताट, वाट्या, भांडी सर्व मांडून ठेऊन व स्वयंपाक झाकून ठेऊन विद्याला घेऊन मी बैठकीला गेले. त्यानंतर मंडळी दहा वाजता घरी येऊन जेवली, असे मला दुसर्‍या दिवशी बैठकीहून घरी आल्यावर समजले आणि विशेष म्हणजे जगन्नाथराव मला म्हणाले, ‘सुशिला, मला हे तुझे फार आवडले. आमची जेवणाची सर्व तयारी करून ठेऊन तू आपल्या कामाला गेलीस. हे फार चांगले झाले.’ इतकेच नाही तर त्यांनी हे माझे उदाहरण कामाच्या बाबतीत अडचणी सांगणार्‍यांना बैठकीत सांगितल्याचे समजले.
मला खरोखरच या सर्व लोकांची खूप मदत झाली. माझी सकाळी कामाची गडबड असली की, विद्याला बापूराव लेले अनेकदा सांभाळत. या सर्वांचा सकाळचा चहा व नाश्ता चाले, त्यावेळी मी विद्याला तेथे नेऊन सोडत असे. सर्वांना तो एक विरूंगळाच वाटे. तिला खेळविण्यात अटलजी, दीनदयाळजी वगैरे सर्वजण सहभागी असत. तीही तेथे छान रमत असे. विद्याला अटलजी अजूनही विसरले नाहीत. मुंबईत स्काऊट ग्राऊंडवर जनसंघाचे अधिवेशन होते. विद्या त्यावेळी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होती. तेव्हा अटलजींनी ह्यांना, विद्याला घेऊन येण्याबद्दल मुद्दाम सांगितले. ते म्हणाले, ‘अभी तो विद्या बहोत बडी हो गई होगी। लेकर आओ उसे एक दिन।’ आणि त्याप्रमाणे हे तिला अधिवेशनात घेऊनही गेले होते. पुढे विद्याच्या पुस्तकाचे प्रकाशनही अटलजींच्या हस्ते झाले तेव्हा अटलजींना फार कौतुक वाटले.
तसाच आणखी एक प्रसंग. पं. सातवळेकरांना नव्वद वर्षे पूर्ण झाली म्हणून मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होता. बहुधा संघ प्रेरणेतूनच हा कार्यक्रम आयोजित केला असावा. संघाचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. आम्ही पण गेलो होतो. विद्या लहान म्हणजे अडीच-तीन वर्षांची होती. पहिल्या रांगेत आम्ही बसलो होतो. पहिली दहा पंधरा मिनिटे ती स्वस्थ बसली आणि कार्यक्रम सुरू झाल्यावर तिची चुळबूळ, गडबड सुरू झाली. मला अगदी चोरट्यासारखे झाले, पण आबाजी थत्त्यांच्या लक्षात आले की मी नाईलाजाने, नाराजीने तिला घेऊन बाहेर जाण्यासाठी ऊठते आहे. ते चटकन पुढे आले आणि मला म्हणाले, तू बस. आम्ही सांभाळतो तिला आणि विद्यापीठाच्या लॉनवर मोरोपंत पिंगळे आणि बाबा या दोघांनी तिला उत्तम सांभाळले. मध्येच मी बाहेर डोकावले तो ते दोघेजण तिच्याबरोबर चक्क चणे खात होते.
दुसरा प्रसंग : 1954, 55 साल असेल काश्मीर सत्याग्रहानंतर पं. प्रेमनाथ डोग्रा मुंबईत आले होते. त्यांची मुंबईत मोठी मिरवणूक निघाली होती. ही मिरवणूक गिरगावातून निघणार होती. माझी खूप इच्छा होती त्या मिरवणुकीत भाग घेण्याची. त्यांना ओवाळण्यासाठी मला जायचे होते. काश्मीरसाठी झगडणार्‍या या वयोवृद्ध नेत्याला डोळे भरून पहावे, असे फार फार वाटत होते; पण जाणार कशी? विद्या अगदीच लहान, सहा-सात महिन्यांची होती. माझी मैत्रीण आणि समिती सेविका सौ. सुशीला कशेळकर हिला मी माझी अडचण सांगितली. तेव्हा ती फणसवाडीत राहत होती. ती चटकन म्हणाली, ‘हे सांभाळतील तिला.’ आणि राजाभाऊ काशेळकरांनी त्या सहा महिन्यांच्या मुलीला तीन-चार तास आनंदाने सांभाळले. खरोखरच हे लोक, अशी प्रेमाने मदत करीत म्हणूनच मी समितीचेही काम करू शकले व आल्या-गेल्याचेही दहा वर्षे माझ्याकडून झाले तेवढे काम केले. भारतीय जनसंघाची व संघाची मंडळी माझ्याकडे येत. त्यामुळे भोवतालच्या समाजातल्या व राजकीय घडामोडींचीही मला माहिती होत असे. अगदी शांतपणे विषय समजावणार्‍या दीनदयाळजींचा आवाज सहसा चढत नसे. अटलजींचा आग्रही आवाज मात्र कधी कधी खोलीबाहेर ऐकू येई. गंभीर विषय चालू असतानाही कधीकधी मध्येच जगन्नाथराव खसखस पिकवत असत. जेवणे मात्र नेहमी हसत खेळत पार पडत असत.
'साहित्य चपराक' जून २०१६ 


No comments:

Post a Comment