Monday, May 30, 2016

‘ताई’ नावाची गझल


‘साहित्य चपराक’, जून 2016

हैदराबादचा दौरा करून आम्ही परतलो तोच पुढचं निमंत्रण हजर होतंच. परभणी. मराठवाड्यातलं एक महत्त्वाचं शहर. दोन माणसं ‘परभणीला या’ असं अंतःकरणापासून म्हणत होती. एक श्री. संतोष धारासूरकर. ते दादाचे काकाच आहेत. त्यांचं ‘दिलासा’ नावाचं दैनिक आहे. माणूस उत्तम संपादक व पत्रकार! दुसरी व्यक्ती होती आमची ताई सौ. अर्चना डावरे. (अर्थात ती ताई नंतर झाली. परभणीला जाईपर्यंत तिची माझी ओळखही नव्हती. ‘चपराक’साठी ती लिहिते एवढेच मी पाहत होतो. उत्तम लिहिते हेही लक्षात आलं होतं.) तर काका व ताई. दोघांचे सतत फोन. प्रेमळ आग्रह. शेवटी दादा म्हणाला, ‘‘सर, निदान एक दिवस तरी जाऊन येऊ.’’ मी ‘हो’ म्हणालो. दादा व मी. आयुष्यात एक गोष्ट टाळूच शकत नाही आम्ही दोघं. आपुलकीनं आलेलं निमंत्रण. असो.
दि. 24 मे 2016. रात्रीच्या साडेनऊच्या गाडीची तिकिटं बुक केलेली. ‘प्रसन्न ट्रॅव्हल्स्’ची ती बस. रात्री आठची वेळ. दादा व तुषार उथळे पाटील माझ्याकडे आले. आम्ही जेवण घेतलं. नारायण पेठेतलं माझं ऑफिस ते शनिवारवाड्यापुढील रस्ता. कुंभारवाड्याकडे जाणारा. तिथं बस येणार होती. तिथं चालत जाईपर्यंत घामाघूम झालो दादा व मी. पुण्यातला उन्हाळा. तोही आता नागपूरच्या उन्हाळ्याशी स्पर्धा करू पाहतो आहे. तर तिथं ट्रॅव्हल्स कंपनीची छोटी बस आली. त्यातून संगमवाडी पुलापर्यंत गेलो. तिथं मोठी मुख्य बस येणार होती. ‘‘सर, आता आपली ‘चपराक’चीच एक व्हॅन घेऊया...’’ दादा म्हणाला. दुजोरा दिला मी त्याला; मात्र आता वाटतं, होईल तेव्हा होईल हे. आहे काय अन् नाही काय? मात्र आमचे हे दौरे. अक्षरशः एकेक माणूस जोडण्यासाठी करतो आम्ही ते. पैशासाठी नाहीत होत हे दौरे. माणसांसाठी होतात. त्यासाठी हक्काचं वाहन हवं. दादाला तसं वाटतं. असो. तर संगमपूलाजवळ प्रसन्न ट्रव्हल्स्चं वाहनतळ. गाडीला अजून वेळ होता; अन् दादा इकडे ‘सुरू’ झाला. सुरू झाला म्हणजे काय? तर कविता म्हणू लागला. अनेक कविता, तुकोबांचे अभंग. हे सगळं तोंडपाठ त्याला. ‘बालभारती’च्या पुस्तकातली एक कविता. ती त्यानं निवडली. रात्री सव्वा दहा वाजले असावेत. उजवीकडे आकाशात चंद्र. पौर्णिमेचा असावा इतका मोठा. बर्‍यापैकी वारं वाहत होतं.
प्रवासी मी दिगंताचा
युगे युगे माझी वाट
मज चालायचे असो
सुख-दुःख, माळ घाट
झेप गरूडाची अंगी
शस्त्र विज्ञानाचे हाती
श्रमशास्त्राच्या युतीने
पृथ्वी करीन थांबती
चंद्र सूर्य ग्रह तारे
तुडविन पायदळी
स्वर्गातूनी सुरासूर
पाठविन मी पाताळी
वारा करीन गुलाम
वर्षा बांधिन दाराशी
माझे वैभव पाहूनी
लक्ष्मी लाजेल स्वतःशी
जे जे असेल अज्ञात
घेता करूनिया ज्ञात
पाठिवरी मात्र हवा
कुण्या प्रेमळाचा हात


‘‘क्या बात है!’’ मी दाद दिली. तर गाडीत चढलो व चाटच पडलो. काय तरी गाडीचा थाटमाट! एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधील रूमसारखा. स्लीपर कोच होती ती. सातशे रूपये तिकिट. दादाला वाटलं, हैदराबादला जाताना खूप हाल झाले. आता प्रवासात ‘हाल हाल’ नको; मात्र वाटतं तसं होईलच असं नाही प्रत्येकवेळी. गाडी अप्रतिम; मात्र रात्रभर झोपेचं नाव नाही. खाली गादी. समोर टीव्ही. डोक्यावर ए. सी. सगळं काही होतं. नव्हती एकच गोष्ट. झोप. दादालाही व मलाही. त्यामुळं एक लक्षात आलंय आता. पंचतारांकित सुविधा व झोप यांचा काही आपापसात संबंध नाही. एकतर गाडी इतकी हलत होती. रस्त्यात वळणं खूप. गाडी वळली की आम्ही झोपल्या झोपल्याच वळायचो. आधीच वरचा बर्थ. मला तर खाली पडायची भीती वाटायला लागली. जेमतेम तासभर झोप मिळाली असेल. सकाळी ‘मानवत’ हे गाव लागलं. मराठवाड्यातलं. तसं दादानं मला उठवलं. माझे गुरू कै. बाबू महाराज मानवतकर (दलाल). त्यांचं हे गाव. पुसटसं दिसलं मला ते गाव. तेवढ्यावर मी समाधान मानलं. खरंतर मानवतला जायचं होतं; मात्र आमच्याकडे वेळ काढायला वाव नव्हता. परभणीत पोहोचलो तेव्हा सकाळचे आठ वाजले असावेत. धारासूरकर काकांचे पहाटेपासूनच एसएमएस व फोन येत होते. त्यांची कार घेऊन ते घ्यायला आले. बालाजी मंदीर, शिवाजी चौक परिसरातील काकांचं घर. थोडावेळ बसलो गप्पा मारत. संकष्टी चतुर्थी होती त्यादिवशी. शिवाय बुधवार. दर बुधवारी गणपतीला जायची सवय. आंघोळ केली व दादा अन् मी बाहेर पडलो. एक किलोमीटरवर गणेश मंदीर. मुख्य बाजारपेठेतला रस्ता. त्यावरून चालत गेलो. मंदिरात गर्दी. अथर्वशीर्षाचं पठण चालू होतं. दर्शन घेऊन बाहेर पडलो. रिक्षा केली. परभणीतले रिक्षावाले काका. अत्यंत प्रेमळ माणसं होती ती! अत्यंत प्रामाणिक! काकांच्या घरी आलो. जेवण केलं. काकांचे धाकटे बंधू सुहास काका. तेही सोबतीला होते. आता कुठं जायचं होतं? तर अर्चनाताईकडेच; मात्र तिच्या घराचं नेमकं नुतनीकरण चालू होतं. तशी ती मध्यमवर्गीय गृहिणी. त्यात शिक्षिका. लग्नानंतर वीस वर्षांनी घराचं नुतनीकरण होत असलेलं. त्यात तिचा किती जीव गुंतला असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्यात आदल्या दिवशी तिच्या एका मैत्रिणीच्या सासूबाई. त्या बिचार्‍या जिन्यातून पडल्या. त्यांना ऍडमिट केलेलं. त्यामुळे ताईचे फोन येत राहिले. दिलगिरीचे. दुसरीकडे चंद्रकांत जोशी काका. उदगीरला ग्रंथपाल होते ते. निवृत्त झालेत आता. त्यांचेही सकाळपासून फोन येत होते. त्यांचे परभणीतले काही तरूण मित्र. सगळे लेखक, अभ्यासक व कवी. त्यांची भेट घालून द्यायची होती त्यांना. तर जोशी काकांच्या छोटेखानी बंगल्यापर्यंत गेलो. धारासूरकर काकांच्या कारमधून. कोण कोण आलं होतं तिथं? तर राजेश रेवले, माणिक पुरी, कैलास सुरवसे, मारूती डोईफोडे, हनुमान व्हरगुळे, का. रा. चव्हाण, पी. जी. पुरी अशी सगळी मंडळी. सुंदर गप्पा रंगल्या. जोशी काकांचं खूप प्रोत्साहन असतं या मंडळींना. बहुतांशी शिक्षक होते त्यातले. त्यांनी एक साहित्य प्रतिष्ठानच काढलंय. काय नाव असावं त्याचं? कल्पना करता येणार नाही इतकं सुंदर नाव! ‘शब्दलळा!’   ही सगळीच मंडळी खूप कष्टातून वर आलेली. गरिबीशी लढलेली. असं असलं तरी आपल्या मराठवाड्याच्या मातीचा एक गुणधर्म आहे. प्रेम, आपुलकी अन् आदरातिथ्य!! मराठवाड्यासाठी जीव तुटतो तो यामुळं!! तर प्रत्येकजण भरभरून बोलला आमच्याशी त्यादिवशी. प्रत्येकाला साहित्याची उत्तम जाण. आश्‍चर्य वाटलं त्यांच्या साहित्यप्रेमाचं. दादासुद्धा त्यांना सांगत राहिला. ‘चपराक’ची वाटचाल कशी झाली ते! काही कमी सोसलेलं नाही दादानंसुद्धा!! बर्‍याचदा तो या गोष्टी मला सांगतो. त्यावर विश्‍वास बसत नाही माझा कधीकधी. तर त्यादिवशी एक तरूण माझ्यासमोर बसला होता. काळासावळा; मात्र स्मार्ट! बारीक अंगकाठीचा. त्यानं त्याची एक कविता वाचायला दिली मला. स्त्रीभ्रूण हत्येवरची. विलक्षण कविता होती. मी ताबडतोब ती दादाला दाखवली. का. रा. चव्हाण हा तो तरूण. त्याला मी आग्रह केला. म्हटलं, ‘‘दादा, म्हणा ती कविता.’’ म्हटली त्यानं ती कविता.
सुंदर म्हणे हो जग हे, मला डोळ्यांनी पाहू द्या...
आई बाबा हो मला, गडे, जन्मास येऊ द्या...

आई गर्भी या मरणे, माझ्याच का हो लेखी...?
जीव घेऊनिया माझा, का हो मिरवावी शेखी...?
पंख कापू नको गं आई, उंच भरारी गं घेऊ द्या...!
उभयता मजवरूनि, हे दिसमास जाऊ द्या...!

मी पाहिल जवळूनि, माझी कशी ती आई?
लेकी जोजवी कशी ती, अन् गाते कशी अंगाई?
कुशीची ऊब पित्याची, ते गोड सुख घेऊ द्या!
मांडीवरी बसण्याचे, ते सोनेरी दिस पाहू द्या!

अहो, मी ही सांगते ना, ओळख नवी मिळविन
चंद्र तारे ग्रह सारे, पायदळी तुडविन
आस जिजा सावित्रीची, मजही धडे गिरवू द्या!
महाराष्ट्र स्वागताला, मजही गडे येऊ द्या!

विवाह व शिक्षणाची, करू नकाच हो चिंता
अबला नसे मी नारी, घालविन पराधीनता
अन् घोर वादळांचे दिन, झळा उन्हाच्या साहू द्या!
मग येण्या बळही पायी, दूध भात घास खाऊ द्या!


सर्वांनीच कवितेला दाद दिली. ‘‘तुमच्या चारपाच कविता पाठवून द्या...’’ दादा म्हणालाच ताबडतोब चव्हाणांना. चव्हाण हे खरोखर एक प्रतिभावान कवी आहेत. स्त्रीभ्रूण हत्या हा केवढा गंभीर सामाजिक प्रश्‍न! त्यावर अनेक कविता केल्यात या तरूणानं. थोड्यावेळानं आम्ही जोशी काका-काकुंचा निरोप घेतला. मग गेलो धारासूरकर काकांच्या कार्यालयात. ‘समर्थ दिलासा’ या त्यांच्या दैनिकाचं ते कार्यालय. परभणीतील स्टेडीयम परिसर. तिथं हे कार्यालय. काका हाडाचे संपादक व पत्रकार. मोठं काम आहे पत्रकारितेत त्यांचं. दैनिक ‘सकाळ’मध्ये बरीच वर्षे पत्रकारिता केली त्यांनी. काही जिल्ह्यात जाऊन काम करावं लागलं त्यासाठी. तिथं रहावं लागलं. ‘दिलासा’ हे त्यांच्या सासर्‍यांचं वृत्तपत्र. काकांचा पत्रकारितेतला अनुभव दांडगा. त्यामुळं ‘दिलासा’ची सूत्रं आपोआपच त्यांच्याकडं आली. परभणी व हिंगोली जिल्हा. इथल्या अनेक प्रश्‍नांवर त्यांनी ‘दिलासा’त लिहिलं. विकासाचे प्रश्‍न व त्यात येणारे अडथळे. खूप अभ्यासपूर्ण व निर्भयपणे लिहिलं त्यांनी त्यावर. कार्यालयातले काही अंक आम्ही चाळले. शेती, सिंचन, शहरातल्या पायाभूत सुविधा या सगळ्यावर त्यांनी लिहिलेलं दिसलं. काका तसा मोकळाढाकळा माणूस. अनेक माणसं कार्यालयात येत होती. हक्कानं काकांशी बोलत होती. परभणीत ‘दिलासा’ घरोघर जातो. त्याचा हा परिणाम. तिथं चहा घेतला. तिथून पुन्हा काकांच्या घरी. दरम्यान अर्चनाताईचा फोन आलेला. ती तिच्या नवर्‍यासह भेटायला येणार होती.
दुपारी साधारण अडीचचा सुमार. अर्चनाताई आली. गिरीश हा तिचा नवरा. तोही बरोबर होता. ‘‘अरे वा! मला वाटलं, एकच भाऊ येणार आहे. इथं तर दोन भाऊ आलेत.’’ येताक्षणी ताई म्हणाली. आयुष्यात पहिल्यांदाच भेटलेलो तिला; मात्र तिच्या या पहिल्याच वाक्यानं तिनं जिंकून घेतलं आम्हाला. ती उत्तम लेखिका आहे. कवयित्री आहे. परभणीचं सांस्कृतिक वर्तुळ. तिथं चौफेर वावर असतो तिचा. चांगलं वाचन. चांगला अभ्यास. शिक्षिका तर आहेच ती; मात्र अहंकाराचा कुठंही मागमूस नाही. परभणीतले साहित्यिक उपक्रम. खूप सक्रिय आहे तिथं ती. घडाघडा बोलणारी आहे ती; मात्र तो बोलाचाच भात व बोलाचीच कढी असला प्रकार नाही. तिचा नवरा गिरीश. तोही अत्यंत उमद्या मनाचा! तिच्यासारखाच. बुद्धिमान! अभ्यासू! तोही प्राध्यापक आहे. दोघांना साहित्याची आवड. बायकोला सतत प्रोत्साहन देणार हा त्याबाबतीत. साहित्यावरचं प्रेम. तो या दोघांना जोडणारा दुवा. त्यामुळं त्यांचं नातं टवटवीत आहे. एकानं बोललेलं दुसर्‍याला समजतं. ‘साहित्य’ हा विषय काही फावल्या वेळात करायचा उद्योग नाही त्यांच्यासाठी. गंभीरपणे पाहतात दोघंही त्याच्याकडं. ‘चपराक’ त्यांच्याकडं नियमित जातोच. मला आश्‍चर्य कशाचं वाटलं? तर माझी दोन विस्तृत ग्रंथपरीक्षण. ‘शांताराम’ व ‘लस्ट फॉर लालबाग‘ या कादंबर्‍यांवरची. ‘चपराक’मध्ये आलेली. ती दोघांनी वाचली होती. मे चा ‘चपराक’चा अंक. त्यात अर्चनाताईचाही लेख होता. परभणी शहरावर लिहिलेला. अतिशय अभ्यासपूर्ण लेख! त्याबद्दल मीही माझी प्रतिक्रिया दिली. मला प्रतिक्रिया देणार्‍या वाचकांचं कौतुक वाटत आलं आहे. अनेकदा वाचक कसलीच प्रतिक्रिया देत नाहीत. लेखकानंसुद्धा लेखक व प्रतिक्रिया देणारा वाचक या दोन्ही भूमिका निभावल्या पाहिजेत. त्यात खूप कमी लेखकांना घरातून प्रोत्साहन असतं. पिकतं तिथं विकत नाही. अशावेळी लेखकाचे मायबाप कोण? तर वाचकच. वाचकांनी लेखकांशी संवाद साधत राहिलं पाहिजे. तर त्यादिवशी याच सगळ्या विषयांवर बोललो आम्ही. ‘चपराक’चे सभासद कसे वाढतील? परभणीत ‘चपराक’चं एखादं कार्यालय सुरू करता येईल का? मराठवाड्यातले चांगले लेखक व कवी. त्यांची पुस्तकं ‘चपराक’तर्फे काढता येतील का? हे करायचं तर आर्थिक गुंतवणूक करावी लागेल का? यावर बोललो आम्ही. आता हे भविष्यात कधी होईल? आजच नाही सांगता येणार; मात्र आम्ही सगळे गंभीर आहोत त्याबद्दल. गिरीश व अर्चनाताई.  दोघांचं एक दुःख होतं. त्यांनी बोलून दाखवलं ते. मराठवाड्यातले व विशेषतः परभणीतले लेखक व कवी. त्यांच्याकडे कुणाचंही लक्ष नाही हे त्यांचं दुःख. त्यातूनही एखादं पुस्तक काढायचं असेल तर? तर अगदी मुद्रित शोधन (प्रूफ रिडींग) ते छपाई. इथपर्यंत अडचणी असतात तिथं. प्रकाशकांची संख्या तर नसल्यासारखीच. असली तर नगण्यच. तर प्रश्‍न असा मराठी साहित्याचा आहे. प्रश्‍न महाराष्ट्रात सगळीकडे नवनवीन प्रकाशकांना उभं करण्याचाही आहे. प्रश्‍न महाराष्ट्र जोडण्याचा आहे. प्रश्‍न गुणवान, प्रामाणिक माणसं एकत्र आणण्याचा आहे. त्याकडे गंभीरपणे न पाहून कसं चालेल? बरं, हे करताना आर्थिक व्यवहारही पारदर्शी हवेत. नपेक्षा दादाला काही कमी प्रस्ताव नव्हते आले पैशांचे! पुण्यातले एकदोन राजकीय पुढारी. सांगायलाच हवं असं नाही, मात्र लाखो रूपये द्यायला तयार होते ते त्याला ‘चपराक’साठी. अगदी ऑफिस द्यायला तयार होते. हे सगळं त्यानं नाकारलं. आजही दहा हजार रूपये भाडं भरतो तो कार्यालयाचं. एक काळ तर कसा होता? तो चक्क चालत यायचा. कुठून? तर बावधनहून शुक्रवार पेठेपर्यंत. बारा-तेरा किलोमिटरची पायपीट! का? तर बसपुरतेही पैसे नसायचे. आज परिस्थिती नक्कीच तशी नाही. खूपच बरी आहे; मात्र पैसे कसे उभे करायचे हा प्रश्‍न असतोच. माणसं उभी करणं व पैसे उभे करणं. सोपं नसतंच बर्‍याचदा. तर त्यादिवशी गंभीरपणे बोललो आम्ही या विषयावर. सुरूवात तरी झाली. हे काय कमी होतं? नंतर दादानं अर्चनाताईला पुस्तकं भेट दिली. ‘चपराक’ तर्फे काढलेली. पंचवीसएक पुस्तकं होती ती. लहानमोठी; मात्र वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेली. लेख, कादंबर्‍या, काव्यसंग्रह. असं सगळं काही होतं त्यात. ताई अर्थातच सुखावली. उत्सुकतेनं पाहिली देखील काही पुस्तकं तिनं. तसाच एक संच दादानं त्यांच्या काकांनाही भेट दिला. शंभर एक पुस्तकं काढली आहेत दादानं आत्तापर्यंत. तेही साप्ताहिक व मासिकाचा व्याप सांभाळून! ‘तेथे पाहिजे जातीचे। येरा गबाळ्याचे नोहे काम॥ दुसरं काही नाही.
तर ताईनं पुढचा कार्यक्रम ठरवलेला. परभणीतलं तिचं प्राणप्रिय वाचनालय! गणेश वाचनालय. तिथं तिनं संध्याकाळी निमंत्रित केलं होतं आम्हाला. परभणीतले काही लेखक, भाषांतरकार. त्यांनाही तिनं बोलवून घेतलं होतं तिथं. तर तो दिवस होता दि. 25 मे 2016. वेळ सायंकाळी सहाची. पोहोचलो आम्ही तिथं. ताईनं आमच्या आधीच तिथं जाऊन सगळी पूर्वतयारी केलेली. आधी तिनं ग्रंथपालांशी आमची ओळख करून दिली. संदीप पेडगावकर हे ग्रंथपाल आहेत तिथं. त्याआधी त्यांचे वडील श्री. पद्माकर पेडगावकर. ते तिथं ग्रंथापाल होते. या दोघांनी सर्वस्व दिलंय या ग्रंथालयाला. खूप जुनं आहे गणेश वाचनालय. किती जुनं? तर 1901 ची स्थापना आहे ग्रंथालयाची. कोण कोण आलं होतं तिथं? विनोदी कवी व कथालेखक सर्वश्री दिवाकर खोडवे, भाषांतरकार व लेखक अनंतराव उमरीकर, पद्माकर पेडगावकर, संदीप पेडगावकर, विनोदी कथालेखक आनंद देशपांडे, कथालेखक बा. बा. कोटंबे, स्तंभलेखक कृ. ना. मातेकर, संतोष अहंकारी, नाट्यकलावंत अर्चना चिक्षे, श्री. इनामदार अशी मंडळी हजर होती. खोडवे काका विनोदी कविता करतात. कशावर? तर नवरा बायकोच्या नात्यावर. ताईने त्यांना आग्रह केला, ‘‘दा, एखादी कविता म्हणा...’’ अन् त्यांनी ऐकवली एक चारोळी.
देवा, शांत, न भांडणारी बायको देतोस का?
अरे वत्सा! अशी सापडल्यास मी केली नसती का?

माझ्या बाजूला होते उमरीकर काका. ‘मुनेरमाणुष’ ही बंगाली कादंबरी. तिचं भाषांतरही केलंय त्यांनी. ग्रंथालयात त्यांचं आणखी एक पुस्तक होतं. ते चाळत होतो. (नाव विसरलो पुस्तकाचं.) तर त्या पुस्तकातील शेर व काव्यपंक्ती. त्यांनी लक्ष वेधून घेतलं माझं. पुस्तकात त्यांनीच उद्धृत केलेल्या त्या काव्यपंक्ती. मी त्यांनाच म्हणून दाखवू लागलो. जणू काही मीच लिहिल्या होत्या त्या. आता असं लिहायला सामान्य प्रतिभा लागते का? खूप मोठा कवी असणार तो!
कोणती जागा जिथं नाही गझल
जाहल्या माझ्या दिशा दाही गझल
काळजाचे रक्त थोडे शिंपले
रंगल्या तेव्हा कुठे काही गझल

आता गझलेबद्दल एक उर्दू शायर काय म्हणतो? त्याचं नाव त्या पुस्तकात शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र ते नव्हतं त्या पानावर.
हमसे पुछो की गझल क्या है
गझल का फन क्या है
चंद लब्जों में
कोई आग छिपायी जाए

आणखी काही काव्यपंक्ती होत्या त्याच पानावर.
माझी जगण्याची न्यारीच रीत आहे
पोटात भूक माझ्या, ओठात गीत आहे

उमरीकर काकांनी लिहिलेली एकांकिका ‘मोगलाई धमाल.’ या एकपात्रीचे अनेक प्रयोग झालेत. काकांचं शिक्षण कुठं झालं? तर हैदराबादमध्ये. हैदराबाद हे मराठवाड्याला शिक्षणासाठी सोयीस्कर. काकांना हैदराबादमधील निजामाबद्दल विचारलं मी. काकांचं शिक्षण झालं ते कॉलेज. उस्मानिया विद्यापीठाच्या अंतर्गतच येतं ते. निजाम या विद्यापीठाचा संस्थापक. कसा होता हा निजाम? एवढं मोठं विद्यापीठ काढलं त्यानं; मात्र नंतर रजाकारांना का पाठिंबा दिला त्यानं? भारतापासून वेगळं व्हायचा का प्रयत्न केला? माझ्या मनात घोळत असलेले हे प्रश्‍न. विचारले मी काकांना. ‘‘निजामानं विद्यापीठ काढलं. मोठं काम केलं. सुरूवातीला तो चांगला होता; मात्र नंतर बिथरला.’’ काका म्हणाले. (हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठ. जगप्रसिद्ध आहे ते. निजामानं ते खूप आधी काढलं. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्याही खूप आधी.) तरीही माझं समाधान झालं नाही. कालपरवा ते झालं. वनखात्याची परीक्षा देत असलेला माझा एक तरूण, बुद्धिमान मित्र. गौरव पाटील. तो माझ्याकडे आला परवा. त्याला छेडलं मी या विषयावर. ‘‘निजामाचा सल्लागार होता एक. काय बरं त्याचं नाव?’’ गौरवला नाव आठवेना. ‘‘कासीम रिझवी’’ मी म्हणालो. ‘‘हां, त्यानं सल्ले दिले निजामाला’’ गौरव म्हणाला. मग डोक्यात काहीसा प्रकाश पडला. निजाम का बिथरला? उत्तर मिळालं त्याचं. कासीम रिझवी. क्रूरच होता तो. त्यानंच रझाकारांची संघटना बांधली व हैदराबाद संस्थानातील हिंदुंवर अत्याचार केले. ‘‘निजाम मात्र फाळणीनंतरही भारतातच राहिला होता’’ उमरीकर काका म्हणाले. निजामानं बदसल्ले ऐकले नसते तर? भारतातून फुटून निघण्याचा प्रयत्न केला नसता तर? तर खरोखर भारतातल्या शिक्षण क्षेत्राचा एक जनक मानला गेला असतो तो. त्याची पुण्याई मोठी होती त्याबाबतीत.
नंतर आम्ही गणेश वाचनालय पाहिलं. टुमदार इमारत! एकेक करून जमा केलेली ती अफाट ग्रंंथसंपदा! किती ग्रंथ असावेत तिथं? तब्बल ऐंशी हजार! ग्रंथ खरेदी चालूच असते. संपत्तीत भर पडत असते. कदाचित लाखभर ग्रंथ होतील काही दिवसात. संदीप पेडगावकर व आनंद देशपांडे. दोघांनी आम्हाला ग्रंथालय दाखवलं. मला तिथं दिसला ‘तिसरी क्रांती’ हा ग्रंथ. रशियन राज्यक्रांतीवरचा. दोन प्रती होत्या त्याच्या तिथं. ‘‘या ग्रंथाची पारायणं केलीत मी’’ मी देशपांड्यांना म्हणालो. एक अप्रतिम इंग्रजी चरित्रग्रंथही होता तिथं. नेताजी सुभाषचंद्र बोसांवरचा. आसुसल्यासारखा चाळला मी तो. दादालाही दाखवला. या गडबडीत मी दौर्‍याची टिपणं काढायचा कंटाळा केला. त्या इंग्रजी ग्रंथाचं नावही विसरलो त्यामुळं. आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे, दुसरं काही नाही. (आळस हा माणसाचा शत्रू आहे असं पंडित नेहरू म्हणायचे आणि गांधीजींनी सांगितलं, शत्रूवरही प्रेम करा - इति घनश्याम दादा). तर तिथं दादा व मी. दोघांचे सत्कार केले वाचनालयानं. एक अप्रतिम स्मृतिचिन्ह! ते भेट दिलं आम्हाला. त्यावर घड्याळ आहे व गणपतीची अप्रतिम प्रतिमा! नारायण पेठेतलं माझं ऑफिस. तिथं मी हे स्मृतिचिन्ह लावलंय. आल्याबरोबर पहिलं काम केलं मी ते. या सगळ्यामागं होती अर्चनाताईची आपुलकी. माणसांबद्दल तिला वाटत असणारा जिव्हाळा. दोन तास होतो आम्ही ग्रंथालयात. ताईला आता आमच्या पोटापाण्याची चिंता होती. तिनं दुपारीच ठरवलं होतं. आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन जायचं. खरंतर तिच्याही आधी हे ठरवलं होतं तिच्या नवर्‍यानं म्हणजेच गिरीशनं. मग ग्रंथालयापासून रिक्षा केली आम्ही. एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. या असल्या धावपळीच्या दिनक्रमात ताईनं काय करावं? तर मेंदी काढून घेतली होती हातावर! ‘मेंदीच्या पानावर मन अजून झुरते गं’ अशी तिची अवस्था. का? तर तिच्या लग्नाचा विसावा वाढदिवस. तो दोन दिवसांवर आलेला. तिनं तिच्या संसारात रंग भरले होते व मेंदीनं तिच्या हातावर! तर रिक्षातून हॉटेलकडे जात होतो. ‘‘तुमच्या नवर्‍याचा सगळ्यात मोठा गुण काय आहे सांगतो. तो बायकोच्या माणसांना मनापासून सांभाळतो’’ मी ताईला म्हणालो. ‘‘देवाची देणगी आहे ती मला  मिळालेली’’ ताईची प्रतिक्रिया होती. तेवढ्यात धारासूरकर काकांचा ताईला फोन आला. त्यांच्या कार्यालयाकडे यायला त्यांनी सांगितलं. त्यांची कार होतीच. तिच्यातून हॉटेलकडे निघालो. बर्‍यापैकी शहराबाहेर असलेलं हॉटेल. नाव काय? तर ‘वाटिका!’ कशी सुंदर नावं सुचतात बघा परभणीकरांना! हॉटेल होतं ते अगदी त्याच्या नावाप्रमाणंच. विस्तीर्ण हिरवळ. छोटी झाडं. शांत वातावरण. जेवणाचा दर्जा उत्तम. हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी ताई आम्हाला योगानंद सरस्वतींच्या मठात घेऊन गेली. आता योगानंद सरस्वती कोण? तर माझ्या बाबांचे (बाबू महाराज मानवतकरांचे) गुरू. माझी मठात जाण्याची इच्छा. दुपारी व्यक्त केलेली. ती तिनं बरोबर लक्षात ठेवली. धारासूरकर काकांना तिनं सांगितलं. मठाकडं गाडी घ्यायला. गुरूंपुढं नतमस्तक झाली ती आमच्यासह. तिथून हॉटेल वाटिका. तिथं ताईचा नवरा व मुलगी शरू. दोघेही आलेले. शरू आईसारखीच. अत्यंत निष्पाप! अभ्यासात अतिशय हुशार! तिनं आईचा एक अल्बम सोबत आणलेला. मोठ्या अभिमानानं तिनं हातात दिला आमच्या तो.  त्यात कौटुंबिक फोटो होतेच; मात्र प्रामुख्याने होते ताईचे फोटो. परभणीच्या प्रत्येक साहित्यित उपक्रमात तिचा पुढाकार असलेले फोटो. फोटोंमधून ती भाषणं करताना दिसत होती. सूत्रसंचालन करताना दिसत होती. थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेताना दिसत होती. त्यांचे सत्कार करताना दिसत होती. एका फोटोवर दादाची व माझी नजर खिळून राहिली. तो होता ताईचा व तिच्या लेकराचा फोटो. तिचं सगळं आईपण! ते त्या फोटोत व्यक्त झालेलं. तिचा मुलगा चारूहास. कुठं असतो तो? तर पुण्यात. मुक्तांगणला इंजिनिअरिंंग करतोय सध्या. सव्वासहा फूट उंच झालाय आता! इतका सुंदर फोटो! आई व मुलातलं नातं सांगणारा. यापूर्वी खरंच पाहिला नव्हता मी असा फोटो! तर गप्पाटप्पा करत जेवण केलं सर्वांनी. ‘‘ताई तुमच्या कादंबरीचं लेखन लवकरात लवकर पाठवा. ‘चपराक’कडून प्रकाशित करू आपण’’ दादा म्हणाला. हे सगळं लवकरात लवकर घडून यावं एवढंच आता वाटतं. ‘‘आता पुण्यात या. पुण्यात आलात की असंच कुठंतरी शांतपणे जाऊया एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला’’ मी ताई व गिरीशला म्हणालो. दोघांनी मान्य केलं ते. तसंही चारूहासला भेटायला अधूनमधून पुण्यात येतातच दोघंही.
तर रात्रीचे नऊ वाजून गेले होते. साडेनऊला बस. ताई बस स्टॅन्डपर्यंत आली नवर्‍यासह. बस सुटेपर्यंत थोडावेळ बोलत राहिलो आम्ही. बसचं बुकिंग गिरीशनंच केलेलं. ते पैसे दादानं परत केले गिरीशला. घेत नव्हते बिचारे ते दोघं हे पैसेही. हट्टानं परत दिले आम्ही. उगीचच काय! सोन्यासारखी निष्पाप माणसं ती. त्याचा गैरफायदा घ्यायचा की काय? शेवटी निरोप घेतला ताईचा. ‘‘सकाळी पोहचलात की फोन करा’’ ताई आवर्जून म्हणाली. रात्रीचे पावणेदहा वाजलेले. बस हलली एकदाची. ताई थांबून राहिली बस हलेपर्यंत. कसलं नातं म्हणायचं हे? बहिणीचं हे असं नात. ते मी माझ्या उभ्या आयुष्यात कुणाशीच जोडलं नाही. साधं कारण. माझ्याशीच कुणी ते जोडलं नाही. माझ्याशी असलेली नाती. ती तोडली काहींनी. काहींना मी तोडलं. ताईचं तसं नाही. पहिल्या भेटीतच विश्‍वास टाकून मोकळी झाली ती आमच्यावर. रात्री दादा व मी दोघांना शांत झोप लागली. पहाटे सव्वासहाची वेळ. संगम पुलावर थांबली बस. तिथून नारायण पेठेत यायचं होतं. किती पैसे सांगावेत एका रिक्षावाल्यानं? तर 180 रूपये! परभणीतले रिक्षावाले आठवले मला. एवढ्या अंतरासाठी फार तर पन्नास साठ रूपये घेतले असते त्यांनी. त्यापेक्षा एक रूपया नसता घेतला जास्त. ‘‘आम्ही पुणेकरच आहोत भाऊ’’ मी त्या रिक्षावाल्याला म्हणालो. दादा तर असा संतापला. ‘बाबा आढावांना पत्रच लिहितो’ म्हणाला. माझंही डोकं चालेना. कसलं पुरोगामित्व आणि कसलं काय? पुढारी पुरोगामी अन् अनुयायी ‘पैसागामी’!! चांगला धंदा आहे! थोड्याच अंतरावर एक रिक्षावाला मिळाला. मेहनतीच्या पैशांवर विश्‍वास असावा त्याचा. मीटरप्रमाणे पैसे द्या म्हणाला. आम्ही तेच तर म्हणत होतो की. अशांना दहा रूपये जास्त दिलेले परवडतात. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल; मात्र इतरांना कशाला द्यायची फुटकी कवडी तरी?
तर सात वाजता नारायण पेठेत आलो. दादाला म्हटलं, ‘‘चल, आधी चहा घेऊ.’’ मग माझ्या दुचाकीवर सोडलं त्याला आमच्या कार्यालयात. त्याला बिचार्‍याला पुढच्या अंकाचं टेन्शन! त्याला सोडून पुन्हा माझ्या कार्यालयात आलो. हा लेख लिहायला घेतला लगेच. लिहिताना ताईचे उल्लेख येतच होते. मला गझल आठवली. उमरीकर काकांच्या पुस्तकातली. मला वाटलं, अर्चना ताई ही सुद्धा एक गझलच आहे. आपल्या भावंडांच्या यातनांवर फुंकर मारणारी गझल! ती ताईपणाची गझल आहे! आईपणाची गझल आहे! पत्नी म्हणून तिच्या नवर्‍याचीही गझल आहे! व परभणीच्या सुसंस्कृत चेहर्‍याचीही गझल आहे! तर लेख लिहिता लिहिता डोळे अश्रूंना हाका मारू लागले. आयुष्यात जोडलेल्या नात्यांचे अर्थ लावत बसलो काही क्षण. सोबतीला होतं एक नातं. कदाचित आयुष्यभरासाठी जोडलेलं. का जोडलं असावं मीही हे नातं? कदाचित माझं असह्य एकाकीपण असेल! कदाचित मी पूर्वायुष्यात केलेल्या घोडचुका असतील! कदाचित मी त्यांचं प्रायश्‍चित घेऊ पाहत असेल! कदाचित मी पूर्वायुष्यात सोसलेल्या भीषण यातना असतील! त्यात माझ्या शरीराचे लचके तुटले असतील! माझ्या मनाचे लचके तुटले असतील! मी पूर्वायुष्यात दिलेल्या सगळ्या सत्त्वपरीक्षा. त्याच मला आठवत राहिल्या काही क्षण अन् ऐकू आलं ते एकच वाक्य, ‘सकाळी पोहचलात की फोन करा.’ मग म्हटलं करू फोन तिला. सांगू ‘पोहोचलो’ म्हणून. मग म्हटलं एसएमएस करू! सकाळी नऊ वाजता एसएमएस केला मी तिला.
ताई, पहाटे सव्वासहा वाजता सुखरूप पोहोचलो. तुझे व तुझ्या नवरोबाचे खूप खूप ऋणी आहोत. तुझ्या लेकरालाही नक्की भेटेन मी.
सद्गुरूंची कृपा आहे. ते आपल्या पाठिशी आहेत.
वाटचाल करत राहू.
तुम्हा सर्वांचा विश्‍वासू,
- महेश मांगले
थोड्या वेळानं आलंच तिचंं उत्तर. वाचू लागलो.
दा, आपण आल्याने आमचाही आनंद द्विगुणीत झाला.
नक्कीच परत एकदा निवांत भेटूच.
सदिच्छा आणि शुभेच्छा भरभरून आहेतच.
मग पुन्हा छोटं उत्तर दिलं मी तिला.
ओके. योग येईल तेव्हा नक्की भेटू.
- महेश उर्फ दा.
तर हे सगळं असं आहे. लिहावंसं वाटलं, लिहिलं. मांडावंसं वाटलं मांडलं. ताई हे वाचेल, तेव्हा कदाचित अश्रू अनावर होतील तिला. मात्र ते आनंदाचे अश्रू असतील. समाधानाचे अश्रू असतील. शिवाय कधीकधी असं होतंच की हो! लिहिणार्‍याच्या डोळ्यातही अश्रू असतात अन् वाचणार्‍याच्याही! ‘अश्रूंचं नातं’ म्हणता येईल याला! यापेक्षा अधिक काही नाही.
तर दादा मला पुन्हा परभणीला नेणारच आहे. शिवाय ताईनंही आम्हाला शब्द दिलाय, ती आम्हाला ‘गुंज’ या गावी घेऊन जाणार आहे. योगानंद सरस्वतींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. दोनदोनदा सांगितलंय मला तिनं हे. तर परभणीचा पुढचा मुक्काम शक्य असेल तर ताई तुझ्या घरी. तुझा नवरोबा व तुझ्या लेकरांच्या सानिध्यात. तसंही तुझ्या घराचं नुतनीकरण झालंच आहे अन् पाहुण्यांसाठी तुम्ही नवराबायको एक रूम राखून ठेवणार नाही, असं होणारच नाही. शिवाय परभणीकर आहात तुम्ही. पुणेकर असतात तर गोष्ट वेगळी होती.
आता गुणगुणत असतो तीच गझल अधूनमधून.
काळजाचे रक्त थोडे शिंपले
रंगल्या तेव्हा कुठे काही गझल

नाही शिंपलं काळजाचं रक्त तर गझल रंगणार कशी? अन् नाही शिंपडलं काळजाचं रक्त तर नाती तरी अर्थपूर्ण होणार कशी?
- महेश मांगले
9822070785

‘साहित्य चपराक’, जून 2016


Monday, May 23, 2016

एका लेखकाची साहित्य कहाणी !


साप्ताहिक ‘चपराक’, पुणे

एकदा द. भि. कुलकर्णी मला म्हणाले होते, ‘‘बाबा रे, आपल्या मुलांची काळजी आपणच घ्यावी लागते.’’ चर्चा पुस्तकांविषयी आणि पुस्तके वाचकांपर्यंत पोहचवण्याबद्दल चालली होती. पुस्तक म्हणजे लेखकाला स्वत:च्या मुलाप्रमाणे असते. त्याचे त्याच्यावर जिवापाड प्रेम असते. माझी त्यावेळपर्यंत दोन-तीन पुस्तके प्रकाशित झाली होती. जे पुस्तक ‘छापायच्या योग्यतेचे नाही’ असे एका मान्यवर प्रकाशकाने सांगितले होते, त्याच्या हजारो प्रती संपल्या आणि चार भाषांमध्ये भाषांतरीत झाले होते.
द. भि. यांचे बोलणे मी मनापासून ऐकले आणि त्यावर काही दिवस विचार केला. त्यादरम्यान आणखी दोन-तीन पुस्तके प्रकाशित झाली. ‘कर्दळीवन: एक अनुभूती’ हे पुस्तक मी स्वत:च नोव्हेंबर 2012 मध्ये प्रकाशित केले आणि सर्व प्रकारच्या कल्पनांचा मुक्त वापर केला. परिणामी त्या पुस्तकाच्या तीन वर्षामध्ये एक लाख प्रती संपल्या आणि ते आठ भाषांमध्ये भाषांतरीत झाले. माझे भाग्य सर्वार्थाने फळफळले. खरं तर त्या आधीच्या पुस्तकांच्या बाबतीतही मी प्रकाशकांजवळ वेगवेगळ्या कल्पना मांडल्या होत्या; पण त्या प्रत्यक्षात आल्या नाहीत. त्यात प्रकाशकाचा दोष आहे असे मी म्हणणार नाही. सख्खी आई आणि सावत्र आई यांमध्ये नैसर्गिक फरक तो राहणारच! शिवाय प्रकाशक अनेक पुस्तकांचे प्रस्ताव, प्रकाशन, वितरण आणि जमाखर्चाचा हिशोब यामध्ये व्यग्र असतात आणि त्यांनी ते व्यग्र असणे त्यांच्या अस्तित्त्वासाठी गरजेचे असते. त्यामुळे मी कितीही जीव तोडून कल्पना मांडल्या तरी त्यांना त्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अडथळ्यांची शर्यंत काही ओलांडता आली नाही. त्यामुळे चांगले पोटेन्शिअल असूनही मी काही करु शकलो नाही आणि जणू काही पूर्णत: हतबल झालो.
यादरम्यान मी प्रकाशकांबरोबर केलेल्या करारांचा सूक्ष्म अभ्यास केला. बहुतांश करार हे पूर्णत: प्रकाशकधार्जिणे असतात हे दिसून आले. वास्तविक करारामध्ये दोन्ही पक्षांनी तो नीट समजावून घेवून करणे आवश्यक असते; मात्र तितकी पारदर्शकता क्वचितच आढळते. खरं तर प्रकाशक लेखक करार हा मराठीमध्ये एका मोठ्या विनोदाचा विषय होवून बसला आहे. नुकत्याच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या  ‘मसापगप्पा’  कार्यक्रमामध्ये राजन खान यांनी लेखक प्रकाशक संबंधाची जी भंबेरी उडवली ती काही सन्माननीय अपवाद वगळता अक्षरश: खरी आहे, असे एक लेखक म्हणून मला प्रांजळपणे वाटते. ज्याप्रमाणे आई बनण्यासाठी एक अनावर उत्सुकता, कुतुहल आणि आतुरता नवविवाहितांमध्ये असते, अगदी तशीच अनावर आतुरता लेखक बनण्याची किंवा लेखक-कवी असा शिक्का बसण्याची नवीन लेखकांमध्ये दिसून येते. मला वाटते तिथेच खरी गोची आहे. लिहिणे ही एक स्वतंत्र मिरासदारी आहे. माझे लेखन झाले आहे. आता पुढचे प्रकाशक, वाचक आणि समाज पाहून घेईल. मला पुढचे उपद्व्याप आणि सव्यासप करायची काय जरुरी आहे, असा विचार काही लेखक मंडळी करतात. याचे आणखी एक कारण म्हणजे  व्यावसायिक लेखक असे स्वतंत्र करियर आपल्याकडे फारसे विकसित झाले नाही. फक्त लेखनावरच ज्यांनी आयुष्यभर गुजराण केली असे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच साहित्यिक सापडतील. पोटासाठी निरंतर उत्पन्न देणारी नोकरी किंवा व्यवसाय किंवा वडिलोपार्जित साधन संपत्ती आहे आणि मग लिखाणाकडे वळलेली बहुतांशी लेखक मंडळी आहेत. त्यामुळे एक प्रकारचे अनाहूत, अप्रत्यक्ष मिंधेपण आणि न्यूनगंड लेखकांमध्ये आढळतो. त्यातून ते भित्रे आणि हबकलेले बनले असल्याची शक्यता अधिक वाटते. प्रस्थापित प्रकाशकांकडेही नवनवीन लेखक सतत येवून प्रस्ताव देत असतात. प्रकाशकांनाही एक नैसर्गिक मर्यादा आहे. प्रकाशक म्हणून मुख्यत: व्यावसायिक आणि नफ्यातोट्याचा विचार करणे हे अजिबात गैर नाही. असो.
मी मात्र पुस्तक तयार होण्याची प्रक्रिया नीट अभ्यासली. डिटीपी म्हणजे काय? त्याला किती खर्च येतो? प्रूफ रिडींग, मुखपृष्ठ, पुस्तकाच्या आतील सजावट, चित्रकारांचा पुस्तकामधला रोल, त्याचे वितरण, त्यातील गुंतवणूक, ग्रंथ विक्रेते, वाचनालये आणि सामान्य वाचक या सर्व घटकांचा आढावा घेतला. चर्चा केली. निरिक्षणे नोंदवली. माझ्या असे लक्षात आले की डिटीपी आपण बाहेरही करुन घेवू शकतो. संगणक येत असल्यास केवळ दोन तासांच्या प्रशिक्षणानंतर आपण स्वत:च युनिकोड फॉंटमध्ये आपले लेखन टाईप करु शकतो. ते नंतर छापण्यासाठी श्रीलीपी किंवा इतर कोणत्याही फॉंटमध्ये रुपांतरीत करता येते. अनेक उत्तमोत्तम आणि दर्जेदार चित्रकार आपल्या कल्पनेप्रमाणे उत्तम दर्जाचे मुखपृष्ठ, रेखाचित्रे आणि आतील चित्रांची दर्जेदार मांडणी करुन देवू शकतात. व्यावसायिक प्रूफरिडरही उपलब्ध आहेत. त्यांचेकडून प्रूफरिडींग करुन घेता येते. तसेच डिटीपीवाल्यांकडून पेज लेआऊट लावून घेता येतो. अशा प्रकारे पुस्तक ‘रेडी टू प्रिंट’ तयार करुन घेतल्यास ते नक्कीच लवकर प्रकाशित होवू शकते. यासाठी थोडा खर्च येतो; पण मला वाटते वेळेचा हिशोब केल्यास तो खर्च क्षुल्लक आहे.
अर्थात या सर्व प्रक्रियेमध्ये बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचे फार मोठे योगदान नक्कीच आहे. छपाईचे तंत्र ‘360 ओ’ मध्ये बदलले आहे. संगणक आणि सॉफ्टवेअर्सनी अक्षरश: क्रांती केली आहे. त्यामुळे पुस्तक लिहून झाल्यावर त्याच्यावर कराव्या लागणार्‍या प्रकाशन प्रक्रियेचा कालावधी लक्षणीयरित्या कमी झाला आहे. पुस्तक तयार झाल्यानंतर त्याच्या संपादनासाठी मदत करणारे एडिटरही आता उपलब्ध आहेत. अनेक प्रकाशकांकडे असे व्यावसायिक एडिटर दिसून येतात. तंत्रज्ञानाच्या या विस्फोटामध्ये प्रकाशनाबरोबरच वितरण व्यवस्थेतही आमूलाग्र बदल झाला आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, बुकगंगा अशा ऑनलाईन वितरकांनी वाचक आणि लेखकांना अगदी जवळ आणले आहे. मला इथे नमूद करायला आनंद वाटतो की, ‘कर्दळीवन’च्या एक लाख प्रतींपैकी 60 हजाराहून अधिक प्रती डायरेक्ट माझ्याकडून वाचकांनी विकत घेतल्या आहेत. ग्रंथविक्रेत्याचे सहकार्य मोलाचे आहेच. मात्र ऑनलाईन विक्रेते आणि इंटरनेट मोबाईल बँकींगने वितरणाचे गणित पूर्णपणे बदलले आहे. आज माझ्या पुस्तकांची महिन्याकाठी 500 हून अधिक प्रतींची विक्री ऑनलाईन होत आहे.
पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवायच्या स्वरुपातही आमुलाग्र बदल झाला आहे. छापील पुस्तकांबरोबरच मोबाईल ऍप बुक, ईबुक आणि ऑडिओ बुक अशी स्पर्धा सुरू झाली आहे. भारतामध्ये वीस कोटी लोक स्मार्टफोन वापरत आहेत आणि येत्या पाच वर्षांमध्ये ही संख्या 80 कोटीपर्यंत जाईल असा अंदाज आहे. किंडल, स्मार्टफोन आणि स्मार्ट हँडी संगणकामध्ये पुस्तकांचे जतन करणे आणि ती पाहिजे तेव्हा वाचणे याकडे कल वाढत आहे. जगभरातील प्रकाशन विश्व ढवळून निघाले असून अनेक आश्चर्यकारक उलथापालथी घडत आहेत. यापुढे कोणत्याही लेखकाने आपले पुस्तक प्रकाशित करताना ते एकाचवेळी छापिल, मोबाईल ऍप बुक, ईबुक आणि ऑडिओ बुक मध्ये पुस्तक रुपांतरीत करायला जराही खर्च येत नाही. शिवाय त्याचे मानधन दरमहा पारदर्शकपणे निरंतर आपल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा होत राहते. पुस्तक आधी छापणे शक्य नसेल तर सुरुवातीला मोबाईल ऍप बुक आणि ईबुक स्वरुपामध्ये प्रसिद्ध करुन नंतर छापील स्वरुपामध्ये प्रकाशित करता येईल. प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि वाचनालये या वाचक आणि लेखकांच्यामध्ये असणार्‍या साखळीमध्ये तंत्रज्ञानाने नवनवीन अंगाची भर टाकली आहे. तिचा फायदा घेवून शहाण्या लेखकाने स्वत:ची साहित्यिक आणि व्यावसायिक जडणघडण केली पाहिजे. प्रत्येक लेखकाला स्वत:चे पुस्तक स्वत: प्रकाशित करता येणे शक्य नाही, हे मला माहिती आहे; पण जर त्यांने प्रकाशन प्रक्रिया करुन म्हणजे डिटीपी, प्रुफरिडींग, मुखपृष्ठ, लेआउट एडिटींग करुन मग प्रकाशकाबरोबर संपर्क साधला तर पुस्तक प्रकाशित होण्याचा कालावधी कमी होईल. प्रकाशकाचा खर्च आणि ताण कमी होईल. तो लवकर निर्णय देवू शकेल. तसेच लेखकालाही अधिक मानधनासाठी आग्रह धरता येईल. चित्रपट क्षेत्रामध्ये जसे तंत्रज्ञानामुळे रौप्य महोत्सवी, सुवर्ण महोत्सवी चित्रपटांचे युग संपून गेले तसेच ते पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रातही होईल आणि लेखकाला मानधनाची नवीन दालने उघडून देईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नवीन लेखकांची निर्मिती व्हायला मदत होईल अशी खात्री वाटते. 
या सगळ्या प्रवासामध्ये मी एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोडणारी अभिनव चळवळ म्हणून  ‘साहित्य सेतू’  (www.sahityasetu.org) हा उपक्रम सुरु केला. त्यालाही भरभरुन प्रतिसाद मिळाला. सजग लेखक, सक्षम लेखक या कार्यशाळेला लेखकांनी गर्दी केली.
आज माझे 11 वे पुस्तक प्रसिद्ध होत असताना मी एक नवीन प्रयोग केला आहे. आतापर्यंतच्या दहा पुस्तकांपैकी एक पुस्तक 8 भाषांमध्ये, एक चार भाषांमध्ये, दोन पुस्तके तीन भाषांमध्ये प्रकाशित झाली आहेत. एक पुस्तक ब्रेल लिपीमध्ये झाले आहे. सर्व पुस्तकांच्या मिळून पावनेदोन लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. ईमेल, फेसबुक, व्हॉट्सऍप इ. सोशल मीडियाच्या माध्यमातून 5 लाखांहून अधिक व्यक्तिंचे नेटवर्क तयार झाले आहे. ‘स्वर्गारोहिणी: स्वर्गावर स्वारी’ या 11 व्या पुस्तकाच्या वेळी मी पुस्तकाचा एक व्हिडीओ ट्रेलर तयार केला. तो ट्रेलर प्रकाशनाआधी गेल्या 15 दिवसांमध्ये 1 लाखांहून अधिक व्यक्तींनी पाहिला आहे. पुस्तक प्रकाशित होताना एकाच वेळी छापिल पुस्तक, मोबाईल ऍप बुक, ई बुक आणि ऑडिओ बुक म्हणून प्रकाशित होत आहे. मराठी भाषेतील हा एक अनोखा प्रयोग आहे असे मला विनम्रपणे नमूद करावेसे वाटते. लेखक हे एक स्वतंत्र करिअर बनावे आणि हजारो तरुणांना या करिअरमध्ये उतरावे असे माझे स्वप्न आहे. ज्यांच्या लिखाणामध्ये दम आहे, त्याने तंत्रज्ञानाचा अचूक वापर करुन थोडीशी साहसी वृत्ती अंगिकारुन यामध्ये यशस्वी व्हावे असे मला मनोमन वाटते. प्रस्थापित, नामांकित, नावाजलेल्या साहित्यिकांनी आणि प्रकाशकांनी या बदलांकडे अभ्यासूपणे पहावे आणि अगत्याने मार्गदर्शन करावे. अशी ही माझी एका लेखकाची साठा उत्तराची साहित्य कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण.

-प्रा. क्षितिज पाटुकले
9822846918

(पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक ‘चपराक’, पुणे)

Saturday, May 14, 2016

महाराष्ट्राचे 'अमर' लेणे!

साहित्य चपराक, मे २०१६  

महाराष्ट्र शाहीर अमर शेख यांचा जन्म 20 आक्टोबर 1916 चा. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीचा. माता मुन्नेरबी यांच्या पोटी जन्मलेल्या ह्या कलावंताला सोबत मिळाल्या त्या दोन गोष्टी. एक दारिद्य्र आणि दुसरे म्हणजे काव्य. दारिद्य्राने जगण्याचे शिक्षण दिले तर काव्याने जीवनदृष्टि दिली. हे दोन्ही पंख पसरूनच त्याने जीवनभर भरारी घेतली. दारिद्य्रात पिचणारी आई मराठी संस्कृतीची, मराठी परंपरेची, मराठी चालीरितींची अभिमानी होती. त्या अभिमानाचे बाळकडू मेहमूदला प्राप्त झाले होते. तिचा, मातेचा संस्कार होता तो वारकरी पंथाचा. म्हणजेच तिच्या मनाचा मूळ धर्म होता तोच मुळी वैष्णवाचा धर्म. याच धर्माची जागती जोत तिच्या अंतरंगात तेवत होती. ती सांगत होती...
‘टाळ मृदंगाचा आवाज येतो माझ्या कानी
या गं या सयांनो, दिंडी आली गावरानी’

हाच धर्म, हीच उत्कट भावना रक्तातून पाझरत गेली ती अमरच्या, मेहमूदच्या हृदयात, मेहमूदच्या रक्तात. म्हणूनच त्यानेही बार्शीच्या पुष्पावतीच्या पाण्याशी जन्मापासून इमान राखले होते. ते राखताना तोही बालेघाटीच्या काळ्या आईचे गीत मनातून, आतून गात होता. या पुष्पावतीच्या काठी होते ते माळरान पण हे माळरान विशालतेची, भव्यतेची जाणीव देत होते. मनाची कक्षा रूंदावत होते. तिच भावना काव्यातूनही पाझरून आली. बार्शीच्या पुष्पावतीबद्दलची भावना प्रकटताना अमरनेच म्हटले आहे...
‘‘रूक्ष या माळावरती, महाराष्ट्र धर्माच्या ज्योती
थोर पंढरीची भागवती, धो धो जवळूनी वाहत होती’’

माळरान रूक्ष होते, उजाड होते तरीही त्याच्या अंगाखांद्यावर सुगंधाचे लेणे चढलेले होते. अमर सांगतो,
‘‘जाईजुई, शेवंती, केतकी यांचे ठायीठायी दिसे वन
नाव मात्र पुष्पावती, काठी कुसळ, सराटे यांची लावण’’

हा तसा विरोधाभासच होता, तरीही त्याने अमरचे जीवन अंकुरले होते, बहरास आणले होते. कारण अशाच माळावर नैसर्गिक अशा प्राप्त झालेल्या स्वरांचे इंद्रधनुष्य फुलत होते. याच रूक्ष माळावर अमर बेभानपणे गात होता. सुगंधीत झालेल्या मनाला आणि स्वराला नवा आकार देत होता. तारस्वरात गाणे आणि आसमंतात तीव्र स्वर भरून टाकणे हा छंद त्याच्या जीवाला वेडापिसा करत होता. तो करत असताना काव्याचा अभ्यासही सुरू होता. विशेषतः आपल्या पहाडी स्वराला साजेसेच काव्य तो कंठात रूळवित होता. पुरूषार्थाची धार त्या स्वराला जात्याच प्राप्त झाली होती. पराक्रमाची, ध्येयत्वाची भूकच त्यात एकवटून गेली होती. म्हणूनच त्या काळी कुसुमाग्रजांचे ‘गर्जा जयजयकार’ हे गीत ओठात रूळून घेतले होते. हे गीत बेभानपणे बालेघाटीच्या काळ्या आईला साक्षीला ठेऊन अमर त्या रूक्ष माळावर बेभानपणे गात होता. या पुरूषार्थ निर्माण करणार्‍या गीतानेच त्याच्या मनाला प्रसन्नता आली होती. तिच त्याच्या शब्दातून महाराष्ट्र धर्माची महती सांगत होती.
वयाच्या अठराव्या वर्षीच त्याने मजुरांची संघटना बांधली ती सोलापुरात आणि गिरणी कामगारांचा संपच त्याने घडवून आणला. त्यामुळे तो पकडला गेला. अमरच्या स्वरावर लोकांचे केवढे प्रेम आहे हे ब्रिटिश काळातल्या पोलिसांनाही समजले होते. त्यामुळे त्याला भरदिवसा तुरूंगात नेणे कठीण होणार आहे हे त्यांनी ओळखले आणि वेळ रात्रीची ठरवली. बंद पिंजर्‍याच्या गाडीत अमरला बसवले आणि गाडी सुरू झाली; तोच झंकारलेल्या मनातून ‘गर्जा जयजयकार’ हे गीत उसळून वर आले. तो गाडीतून या गीताच्या ओळी एकामागून एक म्हणू लागताच रात्र असूनही लोक जागे झाले आणि गाडीच्या मागून चालू लागले. हा हा म्हणता हजारोंचा जमाव जमला आणि पोलिसांची पंचाईत झाली. गाणे अनेकजण गातात पण अमर ज्या तडफेने गात होता त्याने सारे जनमत हेलावून जात होते. पोलिसांना नेमके हेच दृश्य डोळे भरून बघावे लागले. इतकेच काय, जेलमध्ये अशा राष्ट्रगीत गाण्याला बंदी असतानाही खुद्द जेलरच अमरकडून हे गीत पुन्हा पुन्हा गाऊन घेत होता आणि आपल्या गोंधळलेल्या मनाला शांती देत होता. कुसुमाग्रजांच्या या गीताला अमरने स्वतःची अशी दिलेली चाल जनसामान्यांच्या हृदयाला पार भिडून गेली होती.
नाशिकला आम्ही कुसुमाग्रजांची-तात्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांना प्रश्‍न केला की, ‘‘टीव्हीवर तुमचे हे अमरगीत म्हटले जाते. या गीताला खरंच न्याय मिळाला असे वाटते का?’’ तेव्हा तात्या म्हणाले, ‘‘माझ्या या गीताचा न्याय दिला व खरा अर्थ आणला तो शाहीर अमर शेखनेच.’’
चित्रपटातल्या मायावी जगात अमर गेला पण थोड्याच दिवसात तो तेथून निघाला. तेथे त्याचा जीव गुदमरून गेला. तिथले जीवन, त्याच्यातल्या कलावंताची तडफड सुरू करताच या जगापासून त्याने दूर जाण्याचा निश्‍चय केला आणि तसा तो निघालाही. 1941 ला विसापूर जेलमधून सुटून अमरने कोल्हापूर गाठले होते. मास्टर विनायक यांनी त्याच्या कलेची कदर केली होती पण तिथले जीवन थोड्याच काळात त्याला असह्य झाले. त्याबाबतची नोंेद त्याने आपल्या दैनंदिनीत करून ठेवली ती 2 ऑक्टोबर 1941 रोजी. त्याने लिहिले आहे,
‘मला कुणी विचारील, आज काय होतंय तुमच्या स्टुडिओत? मी चटकन् म्हणेन, ‘दारू’ समाजाला पाजण्यासाठी. याला जर कला म्हणायचे असेल तर ती एका विशिष्ट वर्गापुरती. बहुजन समाजाची खास नाही.‘ अमरचे मन झेपावले होते ते बहुजन समाजाच्या सेवेसाठी आणि ही सेवा कलेतून, स्वरातून, अभिनयातून आणि काव्यातून त्याला साधायची होती. म्हणूनच त्याने 1942 मध्ये पुणे गाठले.
ब्रिटिशांची पाशवी सत्ता बेगुमानपणे वागत होती. ती चळवळ चिरडीत होती. स्वातंत्र्याची भावना मारत होती. त्यासाठी गोळीबार करत होती. दहा ऑगस्टलाच पुण्यात गोळीबार झाला होता. एसपी कॉलेज, ससून हॉस्पिटलवर गोळीबार झाला होता. ही सरकारी कृती चीड आणणारी होती. अमर या दडपशाहीमुळेच पेटून उठला. प्रत्यक्ष लढ्यात उतरण्याचा त्याने संकल्पही केला. आपली कला चार भिंतीत अडकून ठेवण्यापेक्षा उघड्या मैदानावर तिला न्यायचे आणि लोकमत जागवायचे हा त्याने त्याचवेळी निश्‍चय केला आणि तो जन्मभर त्याने पाळला.
आपला गळा, गाता गळा घेऊनच आणि उरात काव्य साठवून घेऊनच अमर 1945 ला मुंबईत आला. तसा आसरा कुठेच नव्हता पण श्रीपाद अमृत डांगे या नेत्याने हे रत्न अचूक हाती घेतले आणि त्याची घरीच राहण्याची व्यवस्था केली. उषाताईंनी प्रेमाची पाखर त्या भटकत्या जीवावर घातली ती याचवेळी. योग असा की दत्ता गव्हाणकर, अण्णा भाऊ हे साथी नेमके याचवेळी मिळाले आणि अमर शेख, गव्हाणकर, अण्णा भाऊ साठे या त्रिकुटाचे ‘लालबावटा’ पथक जन्माला आले.
अमरचे मन त्या अगोदरच निश्‍चयाने भारून गेलेले होते. बहुजनांची सेवा याच धर्मासाठी ते मन आतुरले होते. आपल्या गाण्याचा, कलेचा, काव्याचा या सर्वांचा उपयोग बहुजनांसाठीच करायचा असा तो निश्‍चय होता. त्याची नोंद 1 डिसेंबर 1944लाच अमरने दैनंदिनीत केली होती. ती अशी -
‘सन 1948 किंवा 1949 पर्यंत आपण खूप खपायचे. किसान संघटना करायची अन् एवढी प्रचंड करायची की 1949 साली तरी ऑल इंडिया किसान सभा महाराष्ट्रात भरवली जाईल. त्या सभेत एक लाख किसान आपण जमवूया हा आजचा निश्‍चय.’
कॉम्रेड गोदूताई परूळेकर ठाणे जिल्ह्यात वारली समाजात जाग आणत होती. त्यांच्यातला माणूस जागा करत होती. आपण गुलाम नाही, स्वतंत्र आहोत ही गोष्ट मनात भरवत होती. त्यातूनच 7 जानेवारी 1945 ला किसान सभेचे अधिवेशन भरले आणि अमरच्या गीताला, काव्याला, स्वराला भरते आले. अमरने पुढे अमरत्वाला पोहोचलेले जे गीत गायले तेच ‘माझ्या राजा कुणबी हरेराम.’ लोममनाला अभंगाचे वेड असते. वारकरी पंथाने संतांचा अभंग, हा अ-भंग केला होता. जो जनमनापर्यंत पोहचला होता.  कीर्तन माध्यमातूनच त्याला उधाण आले होते. हे ओळखूनच त्या अधिवेशनात अमरने आपला अभंग गायला. रूपकात्मक काव्य कसे लिहावे व तेच कंठातून जनसामान्यांपर्यंत कसे पोहचवावे याचा उत्तुंग आदर्श याच दिवशी अमरने या महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रस्थापित केला. दत्ता गव्हाणकर, अण्णा भाऊ साठे यांचे हृदय तर हा अभंग ऐकताना दुथडी भरून वाहत होते. दोघेही अमरच्या जीवनकाव्याने, दर्दभरी स्वराने आणि अभिनयुक्त सादरीकरणाने भारावून गेले. मित्रांची ही स्थिती. उपस्थित जनतेचे काय? ती तर नुसते वेडीच झाली. तो अभंग, ते गीत असे होते,
‘जय जय रामकृष्ण हरी, राम राम राधेकृष्ण हरी
राम राम राधेकृष्ण राधे, शेतकरी भोळेकृष्ण माझे
भोळा राजा कुणबी हरेराम....

काळ्या आईचा सखा पुत्र तू, तूच खरा घनश्याम
ब्रह्मा होऊनि तूच निर्मिले, निर्मियले जग सारे
दरी डोंगरी फोडुनि सगळे, विश्‍व सजविले न्यारे
गाळुनिया तू घाम, राजा कुणबी हरेराम

विष्णु होऊन तूच पोशिले, पोशियले जग सारे
तू रे माळ ओसाड या इथे, उभी धान्य कोठारे
नामानिराळा राम... राजा कुणबी हरेराम

महादेव तू पार्वती शंकर, रूप कधी तव महाभयंकर
त्रिभुवन जाळुनि, भस्म लावुनि
पुन्हा तू भोळा सांब... राजा कुणबी हरे राम

नाही तुला टिचभर निवारा, तोच ब्रह्म तू का?
नाही तुला कुटकाही खावया, विष्णु उपाशी उभा
नाही तुझ्या हाती मृत्यू, राहिला रे भोळ्या सांबा
घालू लागले नीच दैत्य, या जगामध्ये थैमान
ऊठ रे राजा, कुणबी हरेराम

घे हाती या सार्‍या जमिनी, घे ब्रह्माचा अवतार
पहिले खा तू विष्णु होऊनि, जगून जगाला तार
उघड नेत्र तो तिसरा भयंकर, लालेलाल अंगार
ऐतखाऊंचे कर निर्दालन, घेई रूद्र अवतार
ऊठ हे सर्वव्यापी भगवान, माझ्या राजा कुणबी हरेराम

गदाचक्र अन् त्रिशुळ हाती, जुनी तुझी अवजारे
शंख डमरूचा आवाज ये ना, ठेव तुर्त ते सारे
पद्मपोथीची गळली पाने, नको सर्प निष्प्राण
घेई आता ही एकजुटीची मशाल, उचल निशाण
माझ्या राजा कुणबी हरेराम...’

कष्टकर्‍यांच्या जीवनाचे असे रूपकात्मक पण मर्मभेदी चित्रण आजवर कोणत्याही मराठी कवीने केलेले आम्हाला तरी पहायला मिळाले नाही. अमरने हा अभंग ज्या दिवशी गायला त्या दिवसापासूनच त्याची गायकी जनताजनार्दनाला खरीखुरी समर्पित झाली. कष्टकर्‍यांच्या जीवनाशी त्याची प्रतिभा शेवटपर्यंत रंगून गेली आणि तिने त्या जीवनातील कारूण्य काव्यातून प्रकट केले आणि ते कंठातूल लिलया बाहेरही आले. अमर जन्मभर गात राहिला ती जनगीतेच होती. शब्दाला स्वरांची साथ देऊन त्याने काव्यगायनाचा नवा चमत्कारच केला होता. त्याने जे स्वतःचे कलापथक उभे केले ते कष्टकर्‍यांसाठी, त्यांच्या भावना बोलक्या करण्यासाठीच, त्यांच्याच वेदना मांडण्यासाठी. आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या पलीकडे जाऊन तो परचिंतन करीत होता. लोकांची कळ कळकळीने मांडत होता. म्हणूनच लोकांचा प्रतिसादही तितकाच मिळत होता.
14 ऑगस्ट 1947 ला सात-आठ साथीदारांसह अमर शेख नभोवाणीवर मुंबई केंद्रावर गेला. स्टेशन डायरेक्टर होते प्रसिद्ध कवी बा. सी. मर्ढेकर. मर्ढेकरांच्या ऑफिसात अमर शेख गात होते...
‘हिंदी संघराज्याच्या विजयी आत्म्या घेई प्रणाम
खुलवू जीवनबाग, लाऊ जुन्याला आग
नव्या जगापुढती, नवा आळवू राग’

गाणं संपलं. मर्ढेकर पुढे आले आणि त्यांनी अमर शेखांना कडकडून मिठीच मारली. दोघांच्याही डोळ्यातून त्यावेळी गंगायमुनेचे प्रवाह वाहत होते.
1949 चे वर्ष. कलकत्ता शहरात अखिल भारतीय शांती परिषद भरली होती. शेवटच्या दिवशी मुशाहिर्‍याचा कार्यक्रम होता. हजारो लोक उपस्थित होते, भारतीय कीर्तिचे कवी उपस्थित होते. मधूनच पोवाडा, लावणीही सुरू होती. इतक्यात मंडपालाच आग लागली. एकच गोंधळ माजला. आग कशीबशी विझवली गेली पण लोक मात्र शांत नव्हते. ध्वनिक्षेपकावरून शांततेचे आवाहन केले जात होते पण गोंगाट थांबत नव्हता. तोच अमरने सुर फेकला...
‘आऽऽवो, ऽऽ आऽऽ वोऽऽऽ नया तराना गायेऽऽ’
एकदम जादूची कांडी फिरली. त्या स्वराने, त्या स्वरांच्या दिव्यतेने लोक क्षणात भारून गेले आणि भारावलेही. श्रोत्यांतून ‘गायिए’ असा गलका सुरू झाला. लोक आपण होऊनच गप्प झाले. अमरने म्हटले, ‘पहले शांती से बैठ लो। बादमें गाऊंगा। नही तो नही।’ सगळे बसले. टाचणी पडावी अशी शांतता निर्माण झाली. अमर तेच गीत पुढे गाऊ लागला आणि जनता जनार्दन अक्षरशः डोलू लागला. भावभरी असा आवाज, दर्दभरी स्वर ते प्रथमच ऐकत होते. असा गायक जन्मात कधी ऐकला नव्हता. असे दिव्य स्वर कधीही कानात स्पर्शुन गेले नव्हते. गाणे संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. अमरने भारतीय पातळीवरचा तो विजय संपादला होता.
सचिन तेंडुलकर याचे वडील व आमचे मित्र प्रा. रमेश तेंडुलकर यांनीही म्हटले आहे की, ‘अमर शेखांचा दुर्लभ असा आवाज ऐकून आमची पिढी खरोखरच श्रीमंत झाली. त्यांच्या रूपाने मुक्त झालेला कलावंत कसा असतो याचेच खरे दर्शन घडले’ तर बबन डिसोझा यांनीही आपली भावना व्यक्त करताना म्हटले आहे की,‘शाहीर अमर शेख हे कम्युनिस्ट चळवळीतून पुढे आले असले तरी त्यांची बांधिलकी व्यक्तिगत स्वरूपाची होती. शिवाय ती पददलित, कामगार यांच्याशी होती. पक्ष, पंथ, जात यांच्याशी त्यांनी आपली बांधिलकी मुळीच ठेवलेली नव्हती. अमर शेखांचा आवाज हा अद्वितीय होता. जसा महाराष्ट्रात दुसरा बालगंधर्व झाला नाही, तसाच दुसरा अमर शेखही झालेला नाही किंवा होणेही शक्य नाही.’
लाखो लोकांवर मोहिनी टाकणारा असा अमरचा आवाज होता, असे त्यांचाच जीवलग स्नेही शाहीर दत्ता गव्हाणकरही म्हणत होता. अमर शेख हा बहुजनांचा बालगंधर्व होता. त्याची गायकी, त्याचा स्वर, त्याची शब्दफेक ही त्याचीच स्वतःची होती. त्यात कुणाचेही अनुकरण नव्हते की कुणाचीही बांधिलकी नव्हती. म्हणूनच त्याच्या गायनाचा ठसा स्वतंत्र असल्यामुळे लोकमनावर कायमचा उमटून राहत होता.
पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातल्या कोयनाड या गावी अमरच्या कलापथकाला निमंत्रित केले होते. 1948-49चा हा काळ होता. एका उत्सवात भजनी मंडळही बोलावले होते. रात्रभर त्याच भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार होता. फक्त दोनच तास या कला पथकासाठी राखून ठेवले होते. रात्रीचे दहा वाजले. भजनकर्‍यांनी म्हटले, ‘‘दोन तासात कलापथक कार्यक्रम संपवणार आहे तर त्यांना प्रथम संधी देऊया! बारानंतर आमचे मंडळ गायला बसेल.’’
अमर शेखांचा स्वर निनादला आणि त्याने लोकमनाचा जो कब्जा घेतला तो इतका की, कलापथकाचाच कार्यक्रम त्या रात्री पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहिला. आश्‍चर्य हे की ते भजनी मंडळही त्यात रंगून गेले व त्या मंडळाचाच मुळी आपल्या नियोजित कार्यक्रमाचा विसर पडला. ही हकीकत ‘कृषीवल’मध्ये प्रभाकर पाटील यांनी आपल्या अग्रलेखात नमूद करून ठेवली होती.
अमर शेखला जीवनाची विलक्षण अशी ओढ होती. जीवनात क्लेश, संकटे, संघर्ष सर्वकाही असूनही जीवनात सौंदर्यही आहे हे तो कधीही विसरला नव्हता. माणसाचे जीवन हे जगण्यासाठी आहे याचे त्याला चांगले भान होते. अशा या माणसाला जी शक्ती इतर प्राणीमात्रांपेक्षा लाभली आहे ती आहे वाणीची शक्ती. या वाणीतून निघणारा शब्द हे जीवन व्यवहाराचे साधन आहे. ते आहे म्हणूनच माणसाचे जिवंतपणही आहे. अशा या जीवनात जो माणसानेच माणसासाठी निर्माण केला आहे तो शब्दही तितकाच महत्त्वाचा आहे. किंबहुना शब्द आहे म्हणूनच माणूस आहे, त्याचे जीवन आहे, ते प्रवाही आहे, गतिमान आहे. म्हणून या शब्दाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असते. म्हणूनच अमर शेख सवाल करतो,
‘जीवना वगळुनि शब्द कोणता सांगा?’ माणसाच्या जीवनात जे चैतन्य खेळते ते या शब्दांमुळेच. म्हणूनच त्या शब्दावर त्याची भक्तीही अतूट आहे. कारण शब्द हे जीवनाचे अंगभूत असे मर्मग्राही साधन आहे. म्हणूनच आपण कवी आहोत याचे भान त्याने मनात कायमचे ठेवले होते. त्या शब्दाची म्हणूनच त्याने आळवणीही केली होती आणि म्हटलेही होते...
‘सत्य जगा सांगायला, शब्दा चल ये गायाला’ शब्दातूनच झरणारे वा ओसंडून बाहेर पडणारे गीतच माणसाला जगवायला, फुलवायला, उमेद द्यायला बाहेर येते. तो स्वतः गायक असल्यामुळेच शब्दमाध्यमातून तो जीवनसत्य सांगण्यासाठी आवाहन करत होता. किंबहुना परिस्थितीला तो जे आव्हान देत होता तेही शब्दातूनच. याच शब्दातून तो आत्मविश्‍वासाने जीवनाचे तत्त्वज्ञानही ऐकवत होता. जनसामान्यांपर्यंत तो ते पोहचवत होता तेही शब्दातूनच. त्याने सांगितले आहे....
‘जीवनावरी माझी श्रद्धा, सत्यावरती असीम भक्ती’ प्रत्येक शब्दाला स्वतःचा नाद असतो, त्याची स्वतःची लय असते आणि हीच लय लयकारी ठरते. माणसाला चुंबकासारखी ओढून घेते आणि भावभावनांचे नतृनही घडवते. शब्द मृदू असतात तर ते प्रसंगी कठोरही बनतात. परिस्थितीवर त्यांची ताकत प्रत्ययकारी ठरत असते. अमर शेखांचा गळा हा गाता होता म्हणूनच त्याला शब्दही नादवाहक वाटतात. लयकारी वाटतात. तो त्यांना आवाहन करताना म्हणतो, त्यांची आळवणी करतो...
‘नादवाहकांनो! या रे, या ना नटवुनि न्यारे
कामगार अन् शेतकरी, तसे तुम्ही जीवनांतरी
शब्द स्वरांना या माझ्या, जीवनात आहे दर्जा’

अमर शेख यांचे वैशिष्ट्य हे होते की तो जगून सांगत होता, तो गाऊन जनजीवनाचा राग आळवित होता. कष्टकर्‍यात, श्रमिकांत, कामगारांत, शेतकर्‍यांत तो आपले जीवन समर्पित करत होता. म्हणूनच आपल्या जीवनात शब्दांना विशेष महत्त्व आहे हे पटवत होता. गाण्याचे, सांगण्याचे, कळवळ्याचे, भाव दर्शनाचे, आवाहनाचे, पेटवण्याचे, उठवण्याचे, चेतवण्याचे त्याचे माध्यम होते ते शब्दच! या शब्दांनाच त्याने संगीताची साथ दिली होती. म्हणून तेच त्याचे कायमचे जीवनसाथी बनले होते.
अमर शेख उत्तम कवी तर होताच पण लोक मनाला जाग आणणारा चांगला शाहीरही होता. शाहीर प्रेतांनाही उठवतो, उभे करतो आणि लढायला, संघर्षासाठी प्रवृत्त करतो. त्यासाठी तो उघड्यावर येतो, मैदानात येतो, चार भिंती सोडतो आणि मुक्तपणाने गाऊन सांगतो. अमर शेखांनी जन्मभर हे एकच व्रत केले म्हणून ज्या ज्या वेळी मायभूमी संकटात सापडली, माणसाने माणसाचा घास घेतला, कुटील नीतिने माणसाचे जीवन बर्बाद केले, धनिक बनून ज्यावेळी दुबळ्यांचे शोषण केले वा रक्त प्याले त्या त्या वेळी हा कवी उघड्यावर आला, मैदानात आला आणि त्याने लोकमनाला साद घातली, जाग आणली आणि लढण्यास हाक दिली. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, चीनचे आक्रमण या सर्वांमाग जी हीन प्रवृत्ती होती आणि गुलामी करण्याची जी विकृती होती तिला ठोकरीने उडवून लावण्यासाठी माणसाला हाक देऊन त्याची संघशक्ती निर्माण केली, प्रत्येक मनाला जाग आणली आणि युद्धभूमिवर प्रत्येक गुलामाला येणे भाग पडले ते एवढ्यासाठी, माणूस मुक्त व्हावा व त्याचे जीवन सुखदायी व्हावे. आनंदाने, समाधानाने त्याला जगायला मिळावे हे कृत्य करणारा महाराष्ट्रातला हा एकमेव कवी होता आणि काव्य गाणारा, भावना ओथंबून जीवन सुखी करण्यास आतुरला होता. इतर कवी चार भिंतीत दडून लोकांना सांगण्याचा आव आणत होते. त्यात त्यांची देशभक्ती होती तशी देवभक्तीही होती. अमर शेखांची भक्ती होती माणसावरती. तो देव पाहत होता तोही माणसात. मानवता हाच त्याचा एकमेव धर्म होता व त्यासाठीच त्याचे जगणे आणि मरणेही होते.
क्रांतीची, परिवर्तनाची त्याला विलक्षण अशी भूक होती. माणसाची विकृती गेली पाहिजे आणि संस्कृती टिकली पाहिजे ही जीवनातली ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून विकृतीला तो आग लावायला सदैव तयार होता आणि लोकांनाच सांगत होता...
‘परिस्थितीचे दही घुसळा रे, कृतार्थ व्हा, साधा मोका
आता सत्यासत्या लावुनिया आग, विचाराला जाग येऊ दे रे’

अमर शेखाचे संस्कृतीवर, भारतीय संस्कृतीवर, महाराष्ट्र संस्कृतीवर प्रेम होते पण ती छीन्नभिन्न होत आहे हे दिसताच तो पेटून उठत होता आणि सांगतही होता...
‘विकास मम संस्कृतीचा व्हावा, मानव्याचा वेलू चढावा
फुले फळे ती यावी गोड, हीच अंतरी लागे ओढ’

सारे जीवन याच ओढीने तो जगत होता पण अशा या सुंदर संस्कृतीला कुरूप करणारे हात पुढे सरसावताच तो त्याची जाणीव देऊन ही विकृती नष्ट करण्यास सजग राहिला होता. तो म्हणत होता,
‘होय, तोच आहे मी अंगार, आग ओकणे मजला प्यार
बाग आगीची फुलवावी, सर्व चांगले ठेवावे, सगळे वाईट जाळावे’

यासाठीच उद्याच्या भविष्यकालीन सुखदायी जीवन जगण्यासाठीच...
‘जीवन अमृत ओतून, नव कमळांची फुलवू बाग
कळ्याकळ्यावर गाऊ राग, अमरत्वाचे गाऊ गीत
तिन्ही काळ संचार करू, अवघे जीवन साकारू
जुन्या सुंदरा प्रत जाऊ, त्याचेही गाणे गाऊ’

विध्वंसतेपेक्षा विधायकता महत्त्वाची. जे जाळायला हवे तेच जाळायचे पण संस्कृतीत जे चांगले ते मात्र ठेवायचे. जीवनाचा हा समतोल साधला जावा ही तर अमरची खरी भूक होती. आमच्या मराठी कवितेत अशी भावना, असा विचार क्वचितच कुठे आला असावा असे वाटते. अमरचे वेगळेपण त्याच्या जीवनाच्या ओढीत होते. संस्कृती प्रेमात होते आणि सौंदर्यसंपन्न अशा उद्याच्या आकारात होते.
अमर शेखला स्वराची, स्वरभक्तीची, जीवनाच्या आसक्तीची, माणुसकीची जशी ओढ होती तशीच त्याच्या जवळ आणखी एक शक्ती होती ती अभिनयाची. शब्दातून अभिनय साकारणारा असा हा श्रेष्ठ प्रतिचा कलावंत होता. त्याच्या शब्दोच्चारात अभिनयाची विशेष ताकत होती. मानवी भावनांचे इंद्रधनुष्य त्याच्या अभिनयातून मराठी जनतेने सतत 25 ते 30 वर्षे तरी अनुभवले होते. म्हणून तो गात असताना रडतही होता. रडू येई ते आतून. त्याचे अश्रू बोलके होत होते. त्या अश्रुतून खराखुरा अभिनय साकारला जात होता. ‘ही आग भुकेची जळते आमुच्या पोटी’ म्हणून गरिबांची भावना तो व्यक्त करत होता. त्यावेळी जो अभिनय प्रकट होत होता त्याने लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत होते. दुसर्‍याच्या डोळ्यात अश्रू उभे करणे ही सामान्य गोष्ट नाही. हृदयाला भावना भिडल्याखेरीज अश्रू बाहेर येत नसतात. अमर अभिनयुक्त गाताना लोकांच्या हृदयावरच हात घालीत होता आणि ते हृदय गदगदून टाकत होता. अंगार व्यक्त करणारे शब्द जेव्हा त्याच्या ओठातून बाहेर येत होते त्यावेळी त्याच्या डोळ्यात अक्षरशः अंगार फुलत होता आणि तो अंगार हा अभिनययुक्त होता. तोच जनमाणसाला भिडत होता त्यामुळे लोक चेतून, पेटून उठत होते. चीनने आक्रमण केले त्यावेळी  त्याने अभिनययुक्त असे गीत गायले होते. ते शब्द होते...
‘बर्फ पेटला हिमालयावर, विझवायाला चला चला
फक्त रक्त द्या, वृद्ध तरूण या, द्या रे साद हाकेला’

हे सांगताना देशभक्तीचा लाव्हारस त्याच्या पोटात उकळत होता आणि तोच आगीचे रूप घेऊन डोळ्यातून बाहेर पडत होता. अभिनय म्हणजे काय याचा तो मुर्तिमंत साक्षात्कार होता. बर्फ थंडगार असतो पण देशभक्तीने पेटलेल्या अमर शेखाला झालेले आक्रमण हे भयंकर दोषास्पद वाटते. म्हणून त्याने ‘बर्फ पेटला’ ही प्रतिमा लोकांपुढे उभी केली आणि त्यामुळे लोकही पेटून उठले.
‘स्वातंत्र्याच्या भाजी भाकरीत सापडती रे अजून खडे
वेचुनि काढा मत्त पोर्तुगिज मुळासकट अन् चला पुढे’

गोवा मुक्ती संग्रामात आघाडीवर राहिलेला हा शाहीर जुलमी सत्तेविरूद्ध हाक देत होता. लोक संघटित करीत होता. सत्याग्रहासाठी लोक जमवत होता. त्यासाठी तो गात होता पण त्याबरोबर त्याचा जो प्रत्यक्षात अभिनय प्रत्ययाला येत होता त्यानेच लोक बेभान होत होते आणि गुलामीविरूद्ध कंबर कसून सत्याग्रहात सहभागी होत होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतही हा शाहीर, महाकवी ‘जनतेच्या सत्तेची ज्योत जागती आहे’ हे तारस्वरात सांगताना जो अभिनययुक्त आवेश दाखवत होता त्याने जनता भारावून जात होती. म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीची ताकत वाढली होती. गाण्याला, शब्दांना अभिनयाची अशी काही जोड दिली जात होती आणि पहाडी स्वरात जनसमुदायाला जी चेतना दिली जात होती त्यावेळचा अभिनय लोकांचे लक्ष वेधून घेत होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात दिल्लीला जाग आणण्यासाठी छाती फोडून हा कलावंत साभिनय गात होता. त्याचे ते विलोभनीय दर्शन दिल्लीकरांनीही थक्क करत होते कारण तो एक संगिताभिनयाचा एक चमत्कारच होता. अमर शेख जेव्हा ‘मऊ मऊ कापूस’ हे शब्द गात उच्चारित असे त्यावेळी शब्दातून प्रकटणारा त्याचा अभिनय पाहून जनता अक्षरश: हवालदिल होत होती. त्याच्या गाण्यात, काव्यात जशी ताकत होती तशी ती अभिनयातही होती. म्हणूनच प्रत्येक गीत, प्रत्येक कविता ही विलोभनीयच वाटत होती.
चित्रपटसृष्टीत एखादे वर्ष त्याने घालवले होते पण त्या मायावी जगात हा अभिनयसम्राट रमला नाही. त्याचे जगणे आणि जीवनध्येय हे लोकांसाठी होते, ते लोकसेवेचे होते तरीही जीवलग मित्र आचार्य अत्रे यांच्यासाठी त्याने चित्रपटात शाहिराची भूमिका साकारली. हा चित्रपट होता ‘महात्मा फुले’. त्यातील पोवाडा गाणारा शाहीर लोकांनी नुसता पाहिला नाही तर तो अभिनयाने भारलेला पाहिला. नेमका याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता.
अमर शेखांना अभिनयाचे राष्ट्रीय पदक मिळाले. ते त्यांचे ‘प्रपंच’ या चित्रपटातील कुंभाराच्या भूमिकेला. त्याने जे अभिनयाचे उत्तुंग असे दर्शन घडवले त्याने लोक अक्षरश: थक्क झाले. निवड समितीने अभिनयाचे पहिले राष्ट्रीय पदक अमरलाच जाहीर केला. तो जिवंत अभिनय ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांना त्यांना कसदार अभिनयाचा एक चमत्कृतीपूर्ण असा ‘सामना’च अनुभवास मिळाला.
अमर शेखांचे स्वत:चे कलापथक होते. यातून वगनाट्ये सादर केली जात होती. त्यात प्रत्यक्ष अमर शेखही भूमिका करत असत. ‘जाऊ तिथे खाऊ’ हे वि. वा. बुवा लिखित मुक्तनाट्य महाराष्ट्रभर अमर शेखांनी गाजवले होते. द. का. हसबनीस यांनी ‘वा रे न्याय’ या लोकनाट्याचे लेखन केले होते.
या लोकनाट्याचे साभिनय वाचन अमरने त्यांच्या घरी केले. त्या दिवशी त्याचा जो अभिनय प्रकटला तसा क्वचितच कुणी पाहिला असेल. वाचन अभिनययुक्त करण्याचा जणू मानदंडच त्याने त्यादिवशी प्रत्ययाला आणून दिला होता.
गाणे, जगणे आणि अभिनयाचा साक्षात्कार घडवणे यातच अमरच्या व्यक्तित्वाचे खरे मोठेपण होते. ते त्याने जवळजवळ तीस वर्ष महाराष्ट्र कलेला अर्पण केलेले होते. असा शाहीर, असा कवी, असा अभिनयपटू पुन्हा लोकांना कधीच दिसले नाही हे एक ढळढळीत सत्य आहे.  

- डॉ. माधव पोतदार, पुणे 
020- 24375454
९८२३५१६२०४ 
साहित्य चपराक, मे २०१६ 

नांदेड : ऐतिहासिक, सांस्कृतिक, वाङमयीन लेखाजोखा


 मासिक 'साहित्य चपराक' पुणे  

नांदेड गोदावरीच्या काठावर वसलेलं इतिहासकालीन नगर. नंदीतट, नंदिग्राम या नावांनी ओळखलं गेलेलं समृद्ध परंपरेचं एक गाव. हिंदू, शीख, मुस्लिम, बौद्ध, जैन या विविध धर्मियांच्या तीर्थक्षेत्रांना आपल्या कुशीत सांभाळणारं पवित्र शहर. इ. स. पूर्व पाचव्या आणि चौथ्या शतकात या भूप्रदेशात नंद राजाचे राज्य होते. पुढील काही काळ हा भाग मौर्य साम्राज्याचा हिस्सा होता. नंतर सातवाहन राजांनी इथली राज्यव्यवस्था पाहिली. राष्ट्रकुट राजांनी नांदेड जवळील कंधारला आपली राजधानी बनवले होते. इसवीसनाच्या दहाव्या शतकात राष्ट्रकुटांनी कंधार येथे बांधलेला जगत्तुंग सागर आणि किल्ला या परिसराच्या समृद्धीची साक्ष देतो. चालुक्यकालीन स्थापत्याचा उत्तम नमुना पहायचा असेल तर देगलूर जवळील होट्टलच्या मंदिर संकुलांचा उल्लेख करावा लागेल. या मंदिरांवरील कोरीव काम आणि मूर्तीकाम हे सौंदर्याचे अजोड लेणे आहे. माहूर येथे असणारे ‘रेणूकादेवीचे मंदिर’ हे नऊशे वर्ष जुने आहे. देवगिरीच्या यादवांनी हे मंदिर उभारले. माहूरची रेणूकादेवी एक संपूर्ण शक्तिपीठ म्हणून ओळखली जाते. माहूरच्या पट्ट्यातच उनकेश्वर येथे गरम पाण्याचे कुंड आहेत. या कुंडातील पाण्याच्या ठायी औषधीय गुणधर्म आहेत असे सांगितले जाते. अगदी सुरुवातीच्या काळातील एक मराठी शिलालेख या कुंडांजवळ आहे. निसर्गाच्या समृद्धीने वेढलेला हा परिसर. हाच अनुभव सहस्रकुंड येथेही येतो. पैनगंगा नदी आपल्या सहस्रधारांनी या ठिकाणी प्रपाताचे रुप धारण करत कोसळत राहते. त्या ठिकाणी हे कुंड तयार झाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या धबधब्याचे रुप हे विलक्षण मनोहर आणि स्तिमीत करणारे असते. मराठीतील सुप्रसिद्ध लेखक मारुती चित्तमपल्ली यांनी आपल्या लेखनाने या प्रदेशाला जिवंत केले आहे. जंगल खात्याचे अधिकारी म्हणून मारुती चित्तमपल्ली यांचे या भागात वास्तव्य होते. गोदावरी नदीच्या किनार्‍यावरती ‘शंखतीर्थ’ हे एक महत्त्वाचे स्थान आहे. ‘गोदावरी महात्म्य’ या पोथीमध्ये या स्थानाचा उल्लेख आहे. नांदेड शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावरती असणारे हे ठिकाण गोदावरी नदीचे नाभीस्थान म्हणून ओळखले जाते. माळेगाव हे नांदेड - लातूर राज्य महामार्गावरती वसलेले एक छोटेसे गाव. या गावात खंडोबाचे मंदिर आहे. दक्षिण भारतात प्रसिद्ध अशी खंडोबाची यात्रा या गावात प्रतिवर्षी भरते. उंट, घोडे, खेचर यांची या जत्रेत मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते. विविध भटक्या जमाती जत्रेच्या निमित्ताने एकत्र येतात. भटक्यांच्या जात पंचायतीचे हे महत्त्वाचे ठाणे आहे. या जातपंचायतींचा अभ्यास करण्यासाठी देशभरातील अभ्यासक जत्रेत येतात. ही जत्रा म्हणजे विविध उद्देशांनी एकत्र आलेल्या लोकांचा जनमेळाच असतो. कंधार येथील ‘सैयद मगदूम दर्गा’ आणि येथे भरणारा उरुस देखील असाच आनंददायी असतो. हा दर्गा सातशे वर्षे जुना आहे. उरुसात कव्वाल्यांचे फड ऐकणे, पाहणे विलोभनीय असते. ‘लीळाचरित्र’ या मराठीतील आद्य गद्यग्रंथात नांदेडचा उल्लेख सापडतो. ‘नंदीतट’ या शब्दाने हा उल्लेख केला गेला आहे. मोगल बादशहा औरंगजेब यांच्या काळात नांदेडला महत्त्वाचे स्थान होते. तेलंगण प्रांताचा कारभार नांदेडमधूनच पाहिला जाई. नंतरच्या काळात मात्र हा परिसर हैदराबादच्या निजामाच्या अधिपत्याखाली गेला. इ.स. 1725 ते इ.स. 1948 या दीर्घ कालखंडात या प्रदेशावरती हैदराबादच्या निजामाने राज्य केले. हैदराबाद संस्थानच्या शेवटच्या काळात नांदेड हे शहर स्वातंत्र्य चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र राहिले. या शहराने अनेक लढे दिले, आंदोलने पाहिली आणि स्वतःला वेळोवेळी सिद्ध केले. नांदेड सर्वदूर ओळखले जाते ते शीख धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून. शिखांचे दहावे गुरु ‘श्री गुरु गोविंदसिंगजी महाराज’ यांनी या भूमीत काही काळ वास्तव्य केले. याच भूमीत ‘श्री गुरुग्रंथसाहिबजीं’ची गुरु म्हणून घोषणा करण्यात आली. तख्त सचखंड ‘श्री हुजुर साहिबजी गुरुद्वारा’ येथे माथा टेकवण्यासाठी जगभरातून दररोज हजारो भाविक येत असतात. पंजाबचे महाराजा रणजीतसिंगजी यांनी इ.स. 1835 मध्ये हा गुरुद्वारा निर्माण केला. नगिना घाट, मालटेकडी, मातासाहिबजी, बंदाघाट, शिकारघाट, संगतसाहेबजी, हिराघाट येथील गुरुद्वारे हे इतर पवित्र गुरुद्वारे होत. शीख धर्मियांच्या सण व उत्सवाच्यावेळी शहरामध्ये चैतन्य निर्माण होत असते. सत्याचा प्रदेश आणि पृथ्वीच्या जलप्रलयातही अविचल राहाणारी, न बुडणारी जागा असे सांगणार्‍या धर्मश्रद्धा या भूमीशी जोडलेल्या आहेत. नांदेड शहरातील नंदगिरीचा किल्ला, माहूरचा किल्ला, विष्णुपुरी येथील काळेश्‍वराचे हेमाडपंथी मंदिर, शंकरसागर जलाशय, दाभड येथील बौद्ध विहार, विष्णुकवींचा मठ, गोरठा येथील संत दासगणू महाराजांचा मठ यांनी या परिसरातील जनमानसाला संपन्न असा सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा दिला आहे. हा वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य अनेक मान्यवरांनी केले आहे. पं. अण्णासाहेब गुंजकर यांनी संगीत क्षेत्राला दिलेले योगदान अतुलनीय आहे. पंडित गुंजकरांनी शास्त्रीय संगीतामध्ये इथे एक पिढी घडवली. पंडित नाथराव नेरळकर, पंडित श्याम गुंजकर, पंडित रमेश कानोले, सीताभाभी राममोहन राव, रंगनाथबुआ देगलूरकर, मनोहरराव कांडलीकर या सगळ्याच दिग्गजांनी नंतर स्वरांना साज चढवला. लोकसंगीताच्या संदर्भात नरसिंग कव्वाल यांचे स्थानही अव्वल होते. गझल गायकीमध्ये नरसिंग कव्वाल यांचा हातखंडा होता. निजामाच्या दरबारात त्यांना मानाचे स्थान होते. नांदेडमध्ये वर्षभर संगीत मैफिलींचे आयोजन होत असते. शंकररराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘संगीत शंकर दरबार’ आयोजित केला जातो. या दरबारात देशविदेशातील थोर गायक, वादक, संगीतकार आपली हजेरी लावत असतात. आषाढी महोत्सव हा आ. हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित केला जाणारा कार्यक्रम. भर पावसात रसिक या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. दिवाळी पहाट, भीम पहाट, पाडवा पहाट अशा पहाटेच्या संगीत मैफिली गोदावरीच्या प्रसन्न काठावरती आयोजित केल्या जातात. सुनील नेरलकर हेही संगीत महोत्सवाचे नियमित आयोजन करत असतात. व्यावसायिक गायक वादकांची संख्या इथे मोठी आहे. त्यांनी आपापले ऑर्केस्ट्रा तयार केले आहेत. दि. 15 ऑगस्ट, दि. 26 जानेवारी, दि. 17 सप्टेंबर आणि एखाद्या प्रसिद्ध गायकाला आदरांजली वाहण्यासाठी हे ऑर्केस्ट्रा दर्जेदार आणि विनामूल्यही कार्यक्रम साजरे करतात. धनश्री देव, ठावरे, आनंदी विकास, रमाकांत चाटी असे नव्या जुन्या पिढीतील अनेक गायक संगीतकार आज राज्यभर नांदेडचा लौकिक वाढवत आहेत. देवदत्त साने यांचे आटोपशीर निवेदन अशा कार्यक्रमांना असते. रंगरेषांविषयीच्या उत्कट प्रीतीतून त्र्यंबक वसेकर यांनी नांदेडमध्ये ‘अभिनव चित्रकला महाविद्यालया’ची पायाभरणी केली. नंतरच्या काळात सुभाष वसेकर यांनी या महाविद्यालयाचा लौकिक वाढवला. लक्ष्मण कांबळे, त्र्यंबक पांडे, जी. एस. जगनार, नयन बारहाते, कविता जोशी, दामोदर दरक, जिचकार, संतोष घोंगडे, चंद्रकांत पोतदार ही चित्रकार मंडळी नांदेडशी संबंधित आहेत. दरम्यानच्या काळात शहरात अखिल भारतीय पातळीवरील ‘व्यंग्यचित्रकारांचे संमेलन’ही आयोजित करण्यात आले होते. सुजाता जोशी पाटोदेकर या नांदेड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्या व्यंग्यचित्रकार म्हणूनही परिचित आहेत. बहुतेक इतर मंडळी ही नव्याने विस्तारलेल्या पुस्तक प्रकाशन व्यवहाराला मांडणी आणि मुखपृष्ठ देऊन सहकार्य करत असतात. नाट्यक्षेत्रात नांदेडचे महत्त्वाचे योगदान अगदी सुरुवातीपासूनच राहिले आहे. दोन वेळा ‘अखिल भारतीय नाट्य संमेलना’चे आयोजन या शहराने केले. 1965 साली पहिल्यांदा ‘नाट्य संमेलन’ आयोजित केले गेले. तेव्हापासून नाट्य परिषदेची शाखा शहरात कार्यरत आहे. त्याही अगोदर प्राचार्य सुरेंद्र बारलिंगे यांनी इथे ‘नाट्यमहासंघ’ ही संस्था स्थापन केली होती. अलीकडे प्रा. दत्ता भगत यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. ‘दलित नाट्य संमेलना’चेही या शहरात आयोजन करण्यात आले होते. दलित रंगभूमीला सौष्ठव देण्यात नांदेडचे योगदान राहिले आहे. इतर अनेक संस्था आणि छोटे मोठे ग्रुप नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. काही दशकांपूर्वी ‘कलामंदीर’ हे शहरातील विविध सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र होते. दहा बारा वर्षांपूर्वी ‘कुसुम नाट्यगृह’ आणि महापालिकेचे ‘शंकरराव चव्हाण नाट्यगृह’ नांदेडकरांच्या सेवेत रुजू झाले. या दोन नाट्यगृहांमुळे कार्यक्रमांची रेलचेल शहरात सतत सुरु असते. मध्येमध्ये आयोजित केला जाणारा ‘नांदेड लोकोत्सव’. यशवंत, पीपल्स, सायन्स, प्रतिभा निकेतन या महाविद्यालयांचे नाट्यविभाग, स्वाराती मराठवाडा विद्यापीठाचा नाट्यविभाग यांनी उपक्रमशीलता टिकवून ठेवली आहे. डॉ. स. रा. गाडगीळ, पद्माकर लाठकर, ग. ना. अंबेकर, आनंदी लव्हेकर, कुसुमावती रसाळ, सुरेश पुरी, जीवन पिंपळवाडकर, संजय जोशी, वसंत मैय्या, नाथा चितळे, गोविंद जोशी, दिलीप पाध्ये, लक्ष्मण संगेवार, राधिका वाळवेकर अशा जुन्या नव्यांनी शहरातील नाट्य चळवळ पुढे नेली आहे. साहित्य आणि संशोधनाच्या क्षेत्रातही नांदेडचा पूर्वापार लौकिक आहे. मध्ययुगीन काळात रघुनाथ शेष, विष्णुपंत शेष हे संस्कृत कवी नांदेडमध्ये होऊन गेले. मराठीतील महत्त्वाचे पंडित कवी वामन पंडित हे याच शेष घराण्यातील. त्यांनी ‘यथार्थदीपिका’ लिहून आपले नाव मराठी शारदेच्या दरबारात कोरुन ठेवले आहे. इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात तात्यासाहेब कानोले यांचे नाव आदराने घेतले जाते. पुरातत्त्व शास्त्रांच्या संदर्भात डॉ. गो. ब. देगलूरकरांची ख्याती देश विदेशात पोहचलेली आहे. हैदराबाद संस्थानचा मौखिक इतिहास डॉ. प्रभाकर देव यांनी महत्प्रयासाने साकारला आहे. संस्कृत वेदांचे अभ्यासक, संशोधक म्हणून महामहोपाध्याय यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांचे नाव देशभर माहिती आहे. अलीकडे खगोलाच्या संशोधनात श्रीनिवास औंधकर यांचे नाव पुढे येत आहे. एल. के. कुलकर्णी यांनी आपल्या अथक अभ्यासातून ‘भूगोलकोश’ तयार केला आहे. गंगा नदीचे त्यांनी केलेले संशोधन ग्रंथरुपाने प्रकाशित झाले आहे. प्रा. शेषराव मोरे यांना सावरकरवादी म्हणून ओळखले जाते. आपल्या विशिष्ट वैचारिक बैठकीतून त्यांनी विपुल वैचारिक ग्रंथांची निर्मिती केली. अलीकडेच अंदमान येथे झालेल्या ‘विश्व मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपदही त्यांनी भुषविले आहे. हिंदू- मुस्लिम प्रश्न, भारताची फाळणी, काश्मिर प्रश्न यासंदर्भाने सावरकरवादी दृष्टिकोनातून मोरे यांनी मांडणी केली आहे. विजय पाडळकर यांनी जागतिक चित्रपटांचा अभ्यास आणि त्यावर संशोधन केले आहे. शहरामध्ये चित्रपट अभ्यासकांची मॅजिक लॅन्टर्न सोसायटी पाडळकरांनी सुरु केली होती. जुन्या गाण्यांचा अभ्यास असणारी काही मंडळी विशिष्ट दिवशी एकत्र येऊन आपल्या अनुभवाची देवाणघेवाण करतात. मधुकर धर्मापुरीकर हे व्यंग्यचित्रांचे एक महत्त्वाचे अभ्यासक आहेत. त्यांच्या संग्रही हजारो व्यंग्यचित्रे आहेत. व्यंग्यचित्रांच्या संदर्भाने त्यांचे संशोधनही प्रसिद्ध होत असते. नरहर कुरुंदकर हे केवळ नांदेडचेच नव्हे तर मराठी माणसांसाठीही आदरणीय नाव आहे. समीक्षक, विचारवंत म्हणून त्यांची सर्वदूर ओळख आहे. कुरुंदकर हे शहरातील पीपल्स कॉलेजमध्ये प्राचार्य होते. त्यांनी अनेकांना लिहीते केले. प्रोत्साहन दिले. 1980 च्या मागेपुढे त्यांच्या प्रस्तावना वा पाठराखणीशिवाय मराठवाड्यातील लेखकांची पुस्तकेच प्रकाशित होत नसत. दे. ल. महाजन, वा. रा. कांत, हरिहरराव सोनुले, पार्थिव, यादवसूत, राजा मुकुंद, भुजंग मेश्राम या नांदेडच्या कविंनी मराठी कविता समृद्ध केली आहे. अलोन यांची कविता अतिशय निराळी होती. तथापि एकही संग्रह प्रकाशित नसल्यामुळे चांगला कवी विस्मरणात गेला आहे. फ. मुं शिंदे यांचे आणि नांदेडचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या शहरातील यशवंत महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. आजही त्यांचा एक पाय नांदेडमध्ये असतो. लक्ष्मीकांत तांबोळी, श्रीकांत देशमुख, केशव देशमुख, मनोज बोरगावकर, शिवाजी आंबुलगेकर, पी. विठ्ठल, व्यंकटेश चौधरी, वृषाली किन्हाळकर, सुचिता खल्लाळ, योगिनी सातारकर, रविचंद्र हडसनकर, देविदास फुलारी, बापू दासरी, प्रफुल्ल कुलकर्णी, राजेंद्र गोणारकर, विनायक येवले, विनायक पवार, भगवंत क्षीरसागर, ज्योती कदम, संध्या रंगारी, आदिनाथ इंगोले, महेश मोरे, जगदीश कदम, निर्मलकुमार सूर्यवंशी, ललिता शिंदे हे सगळे कवी नांदेडशी संबंधित आहेत. विनायक येवले या तरुण कवीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ‘ठसे बदललेल्या मुक्कामावरुन’ हा विनायकचा संग्रह मागील दोन वर्षांपासून चर्चेत आहे. ग्रामीण कवितेच्या नव्या टप्यावरची कविता या कवीकडे आहे. श्रीकांत देशमुख यांनी सतत स्वतःचा आवाज जपला आहे. मराठी कवितेत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केलेला हा प्रतिभावंत कवी आहे. कथा आणि कादंबरीच्या क्षेत्रात सुधाकरराव डोईफोडे, तु. शं. कुलकर्णी, बाबू बिरादार, प्रकाश मेदककर, मधुकर धर्मापुरीकर, रावजी राठोड, मथू सावंत, नागनाथ पाटील, भगवान अंजनीकर, जगदीश कदम, दत्ता डांगे, प्र. श्री. जाधव, अनंत राऊत, करुणा जमदाडे, शंकर विभूते ही नावे महत्त्वाची आहेत. शैलजा वाडीकर यांची अलीकडेच ‘मराठा मुलगी’ आणि ‘एकटी असण्याची गोष्ट’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आत्मचरित्रात्मक कादंबरीचा बाज असणारी ही दोन्ही पुस्तके वाङमयीन आणि समाजशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाची आहेत. वाडिकर यांच्याकडून आगामी काळात मोठ्या शक्यता आहेत. शची शैलजा ही युवा लेखिकाही आपले स्वतंत्र स्थान मागेपुढे नक्की तयार करील असा विश्वास तिच्या लेखनाने दिला आहे. ‘आनंदी’ हा तिचा कथासंग्रह ती सातवीत शिकत असताना प्रकाशित झाला होता. ‘एका तळ्यात होती’ ही तिची कादंबरी येऊ घातली आहे. डॉ. जे. जी. वाडेकर यांचे ‘सर्जननामा’ हे आत्मचरित्र विशेष महत्त्वाचे आहे. मराठवाड्याच्या वैद्यकीय सेवेचा इतिहास आणि डॉक्टर्सची संघर्षगाथा हे आत्मचरित्र वाचकांपुढे ठेवते. तेजस्विनी वाडेकर, अनुराधा शेवाळे, सुजाता जोशी, वृषाली किन्हाळकर, अच्चुत बन, मापारी, व्यंकटेश काब्दे, हंसराज वैद्य, करुणा जमदाडे ही नांदेड शहरातील वैद्यक क्षेत्रात कार्यरत असणारी नामांकित मंडळी. यांनी कविता, अनुभवकथन, आत्मचरित्र, प्रवासवर्णने लिहून महत्त्वाची भर घातली आहे. कविता महाजन हेही नांदेडशी संबंधित नाव आहे. मराठी साहित्यातील महत्त्वाची कवयित्री, कादंबरीकार, संपादक, अनुवादक अशी त्यांची ओळख आहे. ‘साहित्य अकादमी’च्या अनुवाद पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य अकादमीचा भाषा सन्मान आणि बालसाहित्य पुरस्कारही या लेखिकेला मागेपुढे नक्की मिळेल एवढी प्रचंड ताकत कविता महाजन यांच्याकडे आहे. श्रीकांत देशमुख, विनायक येवले, मधुकर धर्मापुरीकर, विजय पाडळकर ही साहित्य अकादमी पुरस्काराच्या योग्यतेची नावे आहेत. हे सगळेच लिहिते लेखक आहेत. त्यामुळे या पुरस्कारावरती ते आपली मोहोर नक्की उमटवतील. स्वाती काटे यांनी मुलांसाठी केलेले संपादन महत्त्वाचे आहे. ‘सृजनपंख’ या संपादनातून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या कवितांना आणि चित्रांना व्यासपीठ मिळवून दिले. माझ्यासोबत त्यांनी ‘शाळेतील कविता’ हे संपादनही तयार केले आहे. पाठ्यपुस्तकात असणार्‍या कवितांची शालेय विद्यार्थ्यांनी केलेली 26 बोलींमधील साडेतीनशे भाषांतरे ‘शाळेतील कविता’ मध्ये आहेत. मुलांच्या प्रतिभेला वाव मिळावा यासाठी दत्ता डांगे, व्यंकटेश चौधरी, शिवाजी आंबुलगेकर ही मंडळी सतत उपक्रमांचे आयोजन करत असतात. मुलांसाठी लिहिणारे दासू वैद्य हेही नांदेडचेच. एल. एस. देशपांडे यांनी साहित्य अकादमीसाठी नरहर कुरुंदकर यांचे चरित्र लिहिले आहे. त्यांचा कवितासंग्रहही येऊ घातला आहे. तरी त्यांची ओळख आहे ती अनुवादक म्हणून. मराठीतून इंग्रजीमध्ये त्यांनी अनेक लेखकांचे अनुवाद केले आहेत. भाषांतर मीमांसेच्या संदर्भातील त्यांचे काम दिशादर्शक स्वरुपाचे आहे. विजय पाडळकर, धर्मापुरीकर, राजेंद्र गोणारकर, दिलीप चव्हाण, शिवाजी आंबुलगेकर, भगवंत क्षीरसागर, शारदा तुंगार ही भाषांतराच्या क्षेत्रात कार्यरत असणारी काही नावे. जागतिक दर्जाच्या अनेक उत्तमोत्तम साहित्यकृतींचे अनुवाद त्यांनी केले आहेत. कोणत्याही ठिकाणी असते तशी सुमारांची प्रचंड मोठी संख्या याही गावात आहेच. आजूबाजूला हे लोक सतत मिरवत असतात. अर्थात त्यांची धाव कुंपणापर्यंतच असते, हेही खरे. पुस्तक प्रकाशित करण्याएवढी सुबत्ता आल्यामुळे पैशाची थैली घेऊन प्रकाशकाकडे जाणारे कवी, कवीला शक्य तेवढे जास्तीत जास्त लुबाडणारे प्रकाशक, स्थानिक वर्तमानपत्रातून पुस्तकांची ओळख लिहिणारे ‘थोर’ समीक्षक आणि ‘माझा पुरस्कार तुला देतो, तुझ्या गावातील पुरस्कार मला दे’ असे साटेलोटे करणारे ‘सुप्रसिद्ध’ लेखक यांचा सुकाळ याही शहरात आहे. प्रकाशन सोहळ्यात तास तास चालणारे कवी-लेखकांचे सत्कार आणि आहेर वैताग आणतात. एपीआयमुळे लिहिते झालेले महाविद्यालयीन प्राध्यापक आणि त्यांच्याकडून हजार पाचशे घेऊन निबंध छापणारी ‘संशोधन’ नियतकालिके यांनी चांगल्या चांगल्यांची माती केली आहे. कवी इतके स्वस्त झाले आहेत की फक्त आवाज दिला की धावत येतात आणि कविता वाचायला लागतात. टिंगल करण्यासारखे वातावरण भरपूर आहे. मात्र यांच्याकडे लक्ष देण्याचे कारण नाही. काळ आपल्या हातांनी फोलपटांना दूर सारणार आहे. ज्यांनी खरोखर योगदान दिले ते उद्याही टिकून राहणार आहेत. 
- डॉ. पृथ्वीराज तौर, नांदेड
संपर्क 75884 12153

(लेखक नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठीचे अध्यापन करतात.) 
 मासिक 'साहित्य चपराक' पुणे 

Monday, May 9, 2016

कामगार चळवळीतला मनस्वी वाटसरू

'साहित्य चपराक' मे २०१६
रघुदादाकडे पाहिलं तर हा एक लढवय्या शिवसैनिक व कामगार नेता असेल यावर पटकन विश्‍वास बसत नाही. टिपीकल उच्चमध्यमवर्गीय डॉक्टरच वाटतो तो. अर्थात तो आहे डॉक्टरच. त्यानं ‘मेडिकल रेडिओ डायग्नॉस्टिक टेक्नॉलॉजी’चा डिप्लोमा केलाय मुंबईतून. गेली चोवीस वर्षे तो पुण्याच्या ‘रूबी हॉल क्लिनिक’मध्ये नोकरी करतोय. काय म्हणून? तर ‘चीफ कार्डियो व्हस्क्यूलर रेडिओ डायग्नॉस्टिक टेक्नॉलॉजिस्ट’ म्हणून. अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीसाठी लागणारी वैद्यकीय सेवा. ती तो रूग्णांना पुरवतो. गेली कित्येक वर्षे! अन् अशा या भल्या माणसाकडे नेतृत्व कुणाचं आहे? तर सर्वच क्षेत्रातल्या लक्षावधी कामगारांचं! हे काय गौडबंगाल आहे? तर आयुष्य हे असंच असतं असं म्हणता येईल. रघुदादा भारतीय कामगार सेनेचा सरचिटणीस आहे सध्या. ही शिवसेनेची कामगार संघटना. एकेकाळी असलेलं कम्युनिस्टांचं वर्चस्व. ते संपवून शिवसेनेचे झेंडे अवघ्या कामगार क्षेत्रात रोवणारी ही संघटना. बाळासाहेब ठाकरे यांनी खतपाणी घालून जोपासलेली. लक्षावधी कामगार या संघटनेचे सभासद. त्यांचं नेतृत्व रघुनाथ कुचिक नावाचा हा माणूस करतो. महाराष्ट्रभर ही कामगार संघटना पसरलेली व नोकरी सांभाळून रघुदादा हा कामगारांचे जगण्यामरण्याचे प्रश्‍न सोडविण्यात सदा व्यग्र असलेला. एरवी तो भेटतो रूबी हॉल क्लिनिकमध्ये. त्याच्या छोट्याशा केबीनमध्ये. मग तिथं कोणीतरी गरजू मुलगा येतो. ‘ये रे राजा’ म्हणत रघुदादा त्याचं स्वागत करतो. तो मुलगा नोकरीची गरज सांगतो. जवळची प्रमाणपत्रं दाखवतो. दुसर्‍याक्षणी रघुदादाची फोनाफोनी चालू होते. त्या ‘राजा’ला नोकरी मिळालीय की नाही हेही नंतर काही दिवस पडताळून पाहत राहतो तो! हे तो करू शकतो; कारण भारतीय कामगार सेनेचा पसारा मोठा आहे. बहुतांश ‘सर्व्हिस इंडस्ट्रिज’मध्ये कामगार सेना आहे. एअरलाईन्स, ऑटोमोबॉईल्स, फार्मा, पंचतारांकित हॉटेल्स ते अगदी मोठमोठी हॉस्पिटल्स. कामगार सेनेचा दबदबा आहे सगळीकडे. अगदी विद्यापीठांमध्येही कामगार सेना आहे. अगदी पुणे विद्यापीठातही. या सगळ्या ठिकाणी सगळं काही अलबेल चालू असतंच असं नाही. कामगारांचे अनेक प्रश्‍न असतात. व्यवस्थापनाच्याही अडचणी असू शकतात. रघुदादाची भूमिका एक कामगार नेता म्हणून कशी असते? तर संवाद व चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न असतो त्याचा. शिवसेना स्टाईलनंही अनेक आंदोलनं केली आहेत त्यानं; मात्र फक्त आक्रमक राहून कामगारांचे प्रश्‍न सुटत नाहीत. त्याची जाणीव त्याला आहे. रघुदादाचं वागणं, बोलणं सुसंस्कृत! सगळं व्यक्तिमत्त्वच एकदम सुसंस्कृत! याचा उपयोग त्याला होतो. कुठं? तर संवादाचा पूल बांधण्यासाठी. कामगार व व्यवस्थापन. या दोघांत यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी. हे सगळं त्याला मुत्सद्देगिरीनं करावं लागतं. कामगारांच्या विश्‍वासाला तडा जाऊ न देता करावं लागतं. व्यवस्थापनाचा विश्‍वासही सांभाळावा लागतो. ही तारेवरची कसरत. ती तो अनेक वर्षे करतोच आहे. आताच घडलेलं एक उदाहरण देता येईल. ‘फोर्स मोटर्स लि.’ ही वाहन उत्पादन करणारी कंपनी. इथं वेतनवाढीची मागणी कामगार करत होते. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं. भारतीय कामगार सेना हीच कंपनीतील अधिकृत कामगार संघटना आहे याचा निर्वाळा दिला. तरीही सहजासहजी वेतनवाढ करेल ते कंपनी व्यवस्थापन कसलं? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. त्यांना शेवटी मध्यस्थी करावी लागली. ‘फोर्स मोटर्स’चे अभय फिरोदिया. त्यांच्याशी उद्धवजींनी संवाद साधला. फिरोदियांनी समंजस भूमिका घेतली. सकारात्मक पाऊल उचललं. त्यामुळं कामगारांच्या वेतनात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष वाढ झाली. किती? तर चौदा हजार रूपयांची भरघोस वाढ! या कंपनीत 410 कामगार आहेत. हे कायमस्वरूपी आहेत. त्यांचा वेतनवाढीचा तिढा सुटला. त्यांचं कमीतकमी वेतन पस्तीस हजार रूपये झालं. जास्तीत जास्त वेतन चाळीस हजार रूपये झालं. हजेरी पटावरील सर्व कामगार. त्यांनाही वेतनवाढ लागू झाली. वैद्यकिय विमा, मृत्युफंड योजना असे कामगारांचे प्रश्‍नही मार्गी लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते अगदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार. दोघांनी या प्रकरणात लक्ष घातलं. या सगळ्या प्रक्रियेत रघुदादा खूप सक्रिय होता. ‘मास फ्लॅज इंडिया प्रा. लि.’ या कंपनीतही कामगारांचा वेतनवाढ करार झाला. तो घडवून आणण्यात रघुदादानं पुढाकार घेतला. तिथं कामगारांच्या पगारात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वाढ झाली. किती? तर तब्बल सोळा हजार रूपयांची. ही एकदोन उदाहरणं झाली. खरंतर जवळपास रोजच तो अशा अनेक प्रश्‍नांनी घेरलेला असतो.
 
रघुदादाचं मूळ गाव खोडं. शिवनेरी किल्ल्यापासून पुढं काही आदिवासी भाग लागतो. त्याच्या पूर्वेकडे वडिलोपार्जित शेती होती. रघुदादाचे वडील मात्र ‘मुंबई डॉकयार्ड’मध्ये ‘असिस्टंट सिव्हिल इंजिनिअर’ होते. आईदेखील प्रचंड कष्टाळू. दहा-बारा एकर शेती होती. त्याच दरम्यान परिसरात कुकडी धरणाचं काम चालू होतं. कष्टाचे संस्कार. ते त्याच्यावर झालेे. या सगळ्या वातावरणाचा तो परिणाम होता. त्याचं प्राथमिक शिक्षण झालं खोड्यातच. नंतर मुंबईत शिकला. ‘न्यू सायन म्युनिसिपल माध्यमिक शाळा’. इथं माध्यमिक शिक्षण झालं त्याचं. परळचं आर. एन. भट कॉलेज. तिथून त्यानं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं.
रघुदादा पुण्यात आला तो नोकरीसाठीच. ते 1988 साल होतं. त्या दरम्यान त्याचं लग्न झालं. प्रेमविवाह! लव्हमॅरेज! मात्र घरून विरोध. का? तर तो घाटी (म्हणजे घाटावरचा) व ती कोकणी म्हणून. गंमत अशी, दोघं मराठा समाजातले; मात्र विरोध झाला. कशावरून? तर घाटी-कोकणीवरून; मात्र ‘मियॉं-बिवी राजी तो क्या करेगा काझी?’ दोघं प्रेमात होते. रघुदादासाठी ही सत्वपरीक्षाच होती. याचं कारण, तो एक जबाबदार प्रियकर होता. नंतरच्या काळातला एक जबाबदार नवरासुद्धा. अशी माणसं मग एक जबाबदार ‘पिता’ होतातच. ते वेगळं सांगण्याची गरज उरत नाही.
पुण्यात येईपर्यंत रघुदादाचा राजकारणाशी संबंध नव्हता. मुंबईत मात्र तो एकदा दसरा मेळाव्याला गेला होता. साल असावं 84-85. बाळासाहेब ठाकरेंना ऐकून खूप प्रभावित झाला तो; मात्र राजकारणात लगेचच सक्रिय होणं शक्य नव्हतं. तो रूबीत नोकरी करत होता तेव्हा. तेव्हा तर त्याचा कल समाजवादी विचारसरणीकडेच होता. रूबीमध्ये कम्युनिस्टांची युनियनदेखील होती; मात्र सुर्यकांत लोणकर हे अचानक रूबीत ऍडमिट झाले. ते शिवसेनेत सक्रिय होते व तेव्हा ‘कल्याणी फोर्ज’मध्ये नोकरी करत होते. त्यांची सेवा सुश्रुषा करता करता हासुद्धा शिवसेनेकडे ओढला गेला. मग त्याच्याकडे राजन शिरोडकरांचं लक्ष गेलं. त्यांनी त्याला भारतीय कामगार सेनेचं चिटणीस पद घ्यायला भाग पाडलं. त्या दरम्यान भोरमधल्या ‘अरलॅम्स’ कंपनीत कामगारांचे काही प्रश्‍न निर्माण झाले होते. रघुदादानं ते मार्गी लावले. त्यानं ‘सिरम’ नावाच्या कंपनीतही यशस्वी मध्यस्थी केली. त्यावेळी तर त्या कंपनीत भारतीय कामगार सेना नव्हती हे विशेष! त्याच दरम्यान ‘टेल्को’तला राजन नायरचा संप फसला होता. कामगार क्षेत्रातल्या या घडामोडी. रघुदादा त्याकडं बारकाईनं पाहत होता. त्यातून तो खूप काही शिकत गेला. ‘‘कायद्याची बाजू समजून घेणं व कामगारांना विश्‍वासात घेणं या दोन गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटतात’’ तो म्हणतो. ‘‘प्रत्येक वेळी आंदोलनं करून उपयोग नाही. सामाजिक दबाव व चर्चेतून प्रश्‍न सोडवता येतात’’ तो पुढं म्हणतो. त्याच्या मते कामगार कायद्यातही बदल करण्याची गरज आहे. इंग्लंडसारखे देश. तिथं कामगार कायदे कडक आहेत. त्याच्या मते अमेरिका व ऑस्ट्रेलियातले कामगार कायदे अभ्यासले गेले पाहिजेत. ‘‘काम मागण्याचा अधिकार शेतकर्‍यांना व शेतमजुरांनाही असला पाहिजे. टॅक्सी ड्रायव्हरपासून ते हॉटेलमधील कामगारांपर्यंत सर्वांना आर्थिक बाबतीत सुरक्षितता वाटली पाहिजे’’ तो पुस्ती जोडतो. ‘‘कामगार व शेतकरी हे महत्त्वाचे घटक आहेत. कितीही आधुनिकीकरण झालं  तरी शेती व कंपन्या माणसंच चालवणार आहेत’’ तो महत्त्वाचा मुद्दा मांडतो. रघुदादानं वेळप्रसंगी पाच-दहा कामगारांचे प्रश्‍न सोडवले, तसे त्यानं प्रसंगी पाच हजार कामगारांचे प्रश्‍नही हाताळले. वर्मा आयोगाचा अहवाल. तो कामगारविरोधी आहे म्हणून त्यानं रस्त्यावरच्या लढायाही लढल्या. अशा प्रसंगांच्या वेळी तो रांगडा व आक्रमक होतो व फटकळसुद्धा. कामगारांच्या प्रश्‍नांच्या निमित्तानं तो कोर्टकचेर्‍याही करत राहिला. सातव्या वेतन आयोगाला त्याचा व्यक्तिश: विरोध आहे. हे त्याच्यातल्या  अस्सल कामगार नेत्याचं लक्षण किंवा समाजवादी विचारांचा त्याच्यावर टिकून राहिलेला थोडाफार प्रभावही म्हणता येईल.
‘अवांतर काय वाचतोस?’ असं विचारल्यावर रघुदादा उत्तर देतो, ‘‘औद्योगिक व राजकीय विषयांवरची पुस्तकं.’’ आत्मचरित्रं तो फारशी वाचत नाही. त्याचा तिकडं कल नाही. मित्रांचं वेड हे त्याचं वैशिष्ट्य! कै. दत्ताजी साळवी व जॉर्ज फर्नांडिस. या दोन कामगार नेत्यांबद्दल त्याला कमालीचा आदर वाटतो. बाळासाहेब ठाकरे हे तर त्याचे गॉडफादरच व उद्धव ठाकर्‍यांचाही त्याच्यावर खूप विश्‍वास!
रघुदादानं दोनदा अमेरिकेचा दौरा केला. तिथल्या वैद्यकिय सुविधा. त्या त्याला पहायच्या होत्या. ‘‘नवीन वैद्यकिय तंत्रज्ञान त्वरीत आत्मसात व्हावं यासाठी आम्हाला जागरूक असावंच लागतं’’ तो म्हणतो.
रघुदादाची ओळख इथंच संपत नाही. त्याची ‘प्रबोधन’ नावाची समाजिक संस्था आहे. तो कामगार विषयक कायदे समितीचाही सभासद आहे. त्यानं ‘पीएचडी’ही मिळवलीय. नागपूरची ‘महात्मा फुले संशोधन संस्था’. त्या संस्थेनं ती त्याला बहाल केलीय. त्याला कामगार क्षेत्राशी संबंधित मिळालेले पुरस्कारही खूप. 2013 साल. यावर्षी त्याला पुण्याच्या ‘साई फाऊंडेशन’नं पुरस्कार दिला. ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्र गौरव ऍवॉर्ड’ हा तो पुरस्कार. 2009 साल. यावर्षी त्याला ‘सर्वोत्तम कामगार’ पुरस्कार मिळाला. सातार्‍याला ‘ह्युमन रिसोर्स मीट’ ही परिषद झाली. त्यात त्यानं शोधप्रबंधही सादर केला. त्याच्या प्रबंधाचं शीर्षक होतं, ‘हिस्टरी ऑन ट्रेड युनिअन मूव्हमेंट’. याशिवाय ‘नॅशनल इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजी ऍन्यूअल कॉन्फरन्स’ (2013)-कोलाम- केरळा, ‘नॅशनल मीट ऑफ कार्डिओव्हस्क्यूलर टेक्नॉलॉजी’ 2008 (पुणे), 2009 (गोवा), 2010 (बेंगलोर), 2011 (कोलकत्ता) अशा परिषदांनाही तो उपस्थित राहिलाय.
रघुदादा हा स्वत: उत्तम संपादक आहे हे सांगितलं तर आश्‍चर्य वाटेल. ‘कामगार विश्‍व- वाटचाल संघर्षाची...’ हे अप्रतिम पुस्तक. सगळ्या कामगार चळवळीवरचं. ते त्यानं संपादित केलंय. यात अगदी दगडखाण कामगारांचे प्रश्‍न आहेत. साखरकामगारांचे प्रश्‍न आहेत. अंगणवाडी कामगारांचे प्रश्‍न आहेत. कचरा वेचणार्‍यांचे प्रश्‍न आहेत. मोलकरणींचे प्रश्‍न आहेत. असंघटित ग्रामीण मजुरांचे प्रश्‍न आहेत. परिचारिकांचे प्रश्‍न आहेत. बालकामगारांचे प्रश्‍न आहेत. औद्योगिक कामगारांचे प्रश्‍न आहेत. कंत्राटी कामगारांचे प्रश्‍न आहेत. अशा सगळ्या विषयांवर त्यानं अभ्यासक मंडळींना लिहितं केलंय. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवर एक नजर टाकली तर एक लक्षात येतं. हे पुस्तक कामगार चळवळीचा चालता-बोलता कोषच आहे. ‘कामगार लढे : काल, आज, उद्या’, ‘असंघटित कामगारांचे लढे’, ‘असंघटित क्षेत्र आणि महिला कामगार’, ‘कामगार कायदे’, ‘संघटित कामगारांचे लढे’ अशी ही अनुक्रमणिका. यावर अधिक भाष्य करायची गरज नाही.
रघुदादा भारतीय कामगार सेनेचं प्रतिनिधित्व करतो. त्या कामगार सेनेचे सभासद आहेत फक्त (?) सोळा लाख कामगार!!
रघुनाथ कुचिक! एक माणूस एका आयुष्यात इतकं काही करू शकतो यावर बसत नाही; मात्र डोकं ताळ्यावर असलेली व पाय जमिनीवर असलेली माणसं! ती खूप काही करत असतात. रघुदादा रूबी क्लिनिकमध्ये नोकरी करत असतो. पंचतारांकित हॉटेल्समध्ये वावरत असतो. सगळीकडे त्याचे पाय जमिनीवर असतात. तो भेटतो तेव्हा त्याचा एक आग्रह असतो, ‘बाहेर हॉटेलमध्ये एकदा निवांत जेवायला जाऊया’; मात्र त्यानं अद्याप आम्हाला एकदाही हॉटेलमध्ये जेवायला घातलेलं नाही. अगदी महाराष्ट्रातल्या सगळ्या पंचतारांकित हॉटेल्सची सूत्रं त्याच्या हाती असूनसुद्धा! रघुदादा, ऐकतोयस ना?
- महेश मांगले 

९८२२०७०७८५ 
'साहित्य चपराक' मे २०१६

Sunday, May 8, 2016

परिघाबाहेरची पुस्तकं

उपेक्षित पुस्तकांचे जग
साप्ताहिक ‘चपराक’ 
वाचणार्‍याची वाचनाची तहान कमी होत जाते किंवा त्याचं वाचन क्रमश: निवडक, ‘सिलेक्टिव्ह’ व्हायला लागतं तसं विविध पुस्तकांशी वाचकाचा संपर्क तुटायला लागतो. पुस्तकं उपेक्षित-दुर्लक्षित राहतात त्याचं हे एक कारण आहे. लेखक म्हणून मला अशा उपेक्षित पुस्तकांच्या दुनियेबद्दल कुतुहल आहे. विविध तर्‍हेचं जगणं समजावून घेण्यासाठी मी कोपर्‍या कोपर्‍यातल्या पुस्तकांकडे वळतो. बरचसं आश्चर्यकारक, विलक्षण असं हाती लागतं. सांगणार्‍याच्या सांगण्यामागच्या ऊर्जेचा मी मान राखतो, कथनाचा आदर करतो. सिलेक्टिव्ह वाचणार्‍यासारखी झापडं डोळ्याला मग लागत नसतात. ’बहुरत्ना वसुंधरा’ हे सत्य त्यामुळे समजतं. तुमचं कुतुहल जिवंत राहतं आणि तेच महत्त्वाचं.
योगानंदांचं ’ऍन ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी’ हे पुस्तक आता उपेक्षित म्हणता येणार नाही. या पुस्तकाचा मराठी अनुवाद आता उपलब्ध व्हायला लागलेला आहे. परंतु मूळ इंग्रजी पुस्तक, तेही सुरूवातीच्या आवृत्तीतलं मला असंच दिल्लीला फूटपाथवर उपलब्ध झालं. तत्पूर्वी या पुस्तकाबद्दल मी क्वचित ऐकून होतो. हे पुस्तक हाती पडल्यानंतर एक विलक्षण थरार मला अनुभवाला मिळाला. यातील मजकूर तुम्हाला एका विलक्षण अशा पातळीवर घेऊन जातो. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या पुस्तकातील अनेक मजकूराबाबत अविश्‍वास दाखविण्याचा मोह होतो पण रूढ आणि चाकोरीबद्ध जगण्याच्या पलीकडे जे काही असेल त्याकडे बघण्याची संधी या पुस्तकाने दिलेली असते हे विसरता येत नाही. इथे आपण अद्भुताला स्पर्श करतो. इथे आपण अविश्‍वसनीयतेला स्पर्श करतो. लौकिक जीवनाचा जो परीघ आहे त्या परीघाच्या बाहेर असणार्‍या द्रव्याला आपण स्पर्श करतो आणि एका वेगळ्या विश्‍वाचा आपल्याला थोडा परिचय होतो. हे पुस्तक आता दुर्मिळ राहिलेलं नाही, पण रद्दीत सापडलेली पहिली आवृत्ती मला थरारून टाकणारी होती.
स्वामी कृष्णानंद यांचं ’ट्रू एक्सपिरिंयन्सेस’ हे आठशे पानी इंग्रजी पुस्तक मात्र निश्‍चितच उपेक्षित मानता येईल. एकोणीसशे त्रेसष्ठ साली याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. स्वामी कृष्णानंद यांनी भारतभर साधना काळात प्रवास केला. त्यांना आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकात ग्रंथित केलेले आहेत. मनुष्यजीवनाचा छेद घेऊन त्या अन्वये माणसाचं अनोखं दर्शन हे पुस्तक आपल्याला घडवतं. हे पुस्तक असंच, उपेक्षित पुस्तकांच्या शोधयात्रेत हाती लागलेलं आहे. सर्वसामान्य वाचक आणि मानवजीवन शास्त्राचे अभ्यासक या पुस्तकाच्या वाटेला जाणार नाहीत. काहीएक सांप्रदायिक श्रद्धेने हे पुस्तक जवळ बाळगतील पण कितपत वाचतील याबद्दल शंका आहे. लेखक या नात्याने मला, अशा पुस्तकांचं मोठं कुतूहल वाटू लागतं. माणूस समजून घ्यायचा असेल तर असं परीघाच्या बाहेरचं देखील वाचलं पाहिजे. या पुस्तकाने मनुष्य जीवनाचे अनोखे दर्शन घडविले आहे. उपरोल्लिखित योगानंदांचे पुस्तक आणि त्या पाठोपाठ हे कृष्णानंदांचे पुस्तक, ही दोन्ही पुस्तके विलक्षण म्हणावी लागतील. तर्कदुष्टता बाजूला ठेवून निखळ कुतुहलाने या पुस्तकांकडे बघत राहणं श्रेयस्कर असतं. सत्य म्हणून जे काही आहे त्या पलीकडे देखील सत्य असलंच पाहिजे इतका शोध जरी आपल्याला लागला तरी ती आपल्यासाठी उपलब्धीच मानावी लागेल.
- भारत सासणे, पुणे
9422073833
साप्ताहिक ‘चपराक’, पुणे

सैराटलेले जातीय...

(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
 सैराटच्या निमित्ताने प्रदर्शनपूर्व जो काही गदारोळ झाला आणि नंतरही चालूच राहिला तो विस्मयकारक नव्हे तर चिंताजनक आहे. एका चित्रपटाच्या निमित्ताने एवढे जातीकारण, जातीद्वेष, व्यक्तीपूजन ते व्यक्तीद्वेष हिरीरीने दाखवले जातील याची कोणी कल्पनाही केली नसेल. बरे एखाद्या ताकतीच्या, खरोखर समूळ हादरवणार्‍या कलात्मक चित्रपटाबद्दल असे झाले असते तर बाब वेगळी होती; पण हे घडले एका सामान्य चित्रपटामुळे हे मात्र विस्मयकारक व चिंताजनक आहे असे नमूद करणे भाग आहे.
काय आहे हा चित्रपट? खरे तर समीक्षा करण्यासाठी चित्रपटाने तुम्हाला भले-बुरे मुद्दे दिले पाहिजेत. त्यात एकसंघ आशय (भला वा बुरा) असला पाहिजे. आपल्याला नेमके काय सांगायचेय याचे भान कथाकार-पटकथाकार ते दिग्दर्शकालाही असले पाहिजे. आपल्या अभिनेत्यांच्या मार्फत दिग्दर्शक पटकथेला कलात्मक पद्धतीने पेश करत जात असतो. फँड्रीमध्ये नागराज मंजुळे यांना ते चांगले जमले. गल्ला किती आणि किती नाही हा मुद्दा नाही. मुद्दा कलात्मकतेचा आणि मुल्यात्मकतेचा आहे.
सैराटची प्रदर्शनपूर्व हवा नकारात्मक झाली. हा चित्रपट मराठ्यांविरुद्ध आहे ही ती पहिली ओरड. अनेक विचारी पुरोगामी म्हणवणारे मराठेही हे काय प्रेम करायचे वय असते का? आधी स्वत:ला जीवनात स्थिर-स्थावर करा असे उपदेश देऊ लागले तर नागराज मंजुळे, एक वडार समाजातून आलेला दिग्दर्शक मराठ्याच्या मुलीला खालच्या जातीच्या मुलाच्या प्रेमात पाडतो याचा अतीव राग येत काहींनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शेरेबाजी केली.  किंबहुना मराठा विरुद्ध दलित असा संघर्ष पेटला. तोवर तर चित्रपट कोणी पाहिलाही नव्हता. प्रोमो आणि गाणी तेवढी माहिती होती. नंतर चित्रपट रीलिज झाला. तुफान प्रतिसाद मिळाला की बुकिंग मिळणे अवघड व्हावे. मराठी चित्रपटासाठी अशा वेळा दुर्मिळ, पण अभिमानास्पद.
मी चित्रपट पाहिला. मला हा चित्रपट आवडला नाही. मी ते फेसबुकवरही लिहिले. त्यावरही वादळ झाले. मला पार जातीयवादी म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली. असो. त्यांना ते स्वातंत्र्य आहे. पण मला हा चित्रपट का आवडला नाही त्याची काही कारणे मात्र मी देतो.
1) या चित्रपटाचा मुख्य दोष ही त्याची अस्ताव्यस्त पटकथा आहे. त्यात कसलीही सुसुत्रता नाही. 80% प्रसंग एकमेकांशी धागाच जोडत नाहीत. त्यामुळे सलग परिणामच येत नाही.
2) पात्रांचे व्यक्तीचित्रण करता आलेले नाही. खरे तर कोणतेही पात्र व्यक्तिमत्त्व म्हणून ठसत नाही. नायिका तेवढी बाजी मारते; पण बाजूची पात्रे ढिसाळ असली तर ठसठशीत पात्रेही कृत्रीम बाहुले बनून जातात तसेच नायिकेचे झाले आहे.
3) हा चित्रपट जात वास्तवावर आहे हे कसे पसरले हे मला माहित नाही. नायिका पाटील आहे आणि नायक कोळी. म्हणून हा या दोन जातींतील किंवा उच्च जातीय विरूद्ध निम्नजातीय अस संघर्ष आहे काय? नाही. कारण तसा तो असता तर नायिका पटवण्यासाठी चिठ्ठीचपाटीपासून ते पार ती पोहोत असलेल्या विहिरीत बिनधास्त उडी ठोकणारा नायक, आपण जिच्यावर प्रेम करत आहोत ती वरच्या जातीची आहे असा विचार करत असल्याचे कोठेही दिसत नाही. त्याचे जीवलग मित्रही तसा विचार करत नाहीत. एवढेच काय कॉलेजात तिच्यासाठी मारामारी होते, ती अवघ्या वर्गाच्या साक्षीने त्याच्याकडे एकटक पाहते तरीही वर्गात जातीय बोभाटा होत नाही. गावात तर दुरच.
4) नायिका या चित्रपटात धाडसी आहे; पण अशा धाडसी नायिका चित्रपटसृष्टीला नव्या नाहीत. भावाचा वाढदिवस. ती नायकाला तेव्हा किस देणार हे वचन देते. झींगाट गाणे होते. नंतर नायिका केळीच्या बनात एका कारमध्ये नायकाला दिलेले वचन पाळते. छतावरून हात धुवायला आलेल्या बापाच्या काहीतरी गडबड आहे हे लक्षात येते. तो माणसे पाठवतो. हे रंगेहाथ पकडले जातात. नायकाचा वाच ठेवणारा मित्र आणि नायक बेदम मार खातात. मामला नायकाच्या घरापर्यंत जातो. तेथेही नायक नायिकेच्या भावाचा मार खातो तसाच बापाचाही. येथेही नायकाने जातीमुळे मार खाल्ला असे नाही. कोणीही असता तरी मार खाल्लाच असता. कोणीही घराच्या आवारात पोरीशी चुम्माचाटी करतोय म्हटल्यावर मार दिलाच असता. हे वास्तव आहे पण जातीमुळे नायकाने मार खाल्लाय काय? तर नाही.
5) शहरी पार्श्‍वभूमी न वापरता खेडेवजा शहराची पार्श्‍वभूमी असलेली ही एक सामान्य प्रेमकथा आहे. प्रेमाच्या तर्‍हा वेगळ्या असल्या तरी त्या तद्दन फिल्मी आहेत. बरे, तसेही असायला हरकत नाही, पण प्रेम करावे तर आर्ची-परश्यासारखे असे वाटायला लावतील अशी भावनिक दृष्ये तरी आहेत काय? तर तेही नाही. प्रेक्षकाला उच्चजातीय मुलीबरोबर निम्न जातीय मुलगा प्रेम करतोय हे आधीच प्रदर्शनपूर्व ठसवले गेल्याने बाकी विचार करायच्या कोणी भानगडीतच पडत नाही आणि मुळात त्या दोघांचे एकमेकांवरचे प्रेमही नीट ठसत नसल्याने उत्तरार्धातील संघर्ष टोकदार व परिणामकारक ठरत नाही. मुळात या चित्रपटात नायक-नायिका प्रेमात पडतातच का? या प्रश्नाचे धड उत्तर नाही. तारुण्यावस्थेचा उंबरठा ओलांडणार्‍या मुला-मुलींचे प्रेम, जे बव्हंशी शारीरिक आकर्षणातून आलेले असते तसेच हे प्रेम आहे. त्यातही उत्कटता म्हणावी असे एकही दृष्य नाही.
6) खरे तर आधी साहसी वाटणारा प्रेमवीर नायक नंतर दुय्यम बनतो. सगळे डेरिंग करते ती नायिका. अगदी पळून जायचे, पोलीस स्टेशनमध्ये बापाला आणि पोलिसांनाही आव्हान देण्याचे, प्रियकराला मारणार्‍या गुंडांवर पिस्तूल झाडण्याचे डेरिंग नायिकाच दाखवते; पण या प्रसंगांतही विश्वसनीयता नाही एवढे ते नाटकी आहेत. मुळात तिचा बाप जर एवढा समर्थ आहे, पाटील आणि राजकीय नेता आहे तर पोलिसांत माझ्या मुलीवर बलात्कार केला, अपहरण केले अशी तक्रार करत बसण्यात व इज्जतीचा फालुदा करुन घेण्यात वेळ दवडण्याऐवजी त्याने, नंतरची मारहाण करत न बसता सरळ नायकाला वर पाठवले असते. चित्रपट संपेपर्यंत थांबायची गरज नव्हती. बरे या सर्व प्रसंगांतही नायक निम्न जातीचा आहे म्हणून हे सारे केले जातेय याचे सुचनतरी आहे काय? तर तेही नाही. म्हणजे असे दिसतेय की चित्रपट पहाताना कोणत्या दृष्टीने पाहायचा याची अप्रत्यक्ष जाहिरात तर केली गेली, लोक कोळी परश्या आणि पाटील अर्ची अशाच पद्धतीने चित्रपट पाहतात... पण चित्रपट, जी एक कलाकृती असते, त्या कलाकृतीत या छुप्या पूर्वप्रसिद्धित, प्रत्यक्षात काही आहे काय? नाही. म्हणजे एक तर दिग्दर्शक तरी घाबरलाय किंवा पटकथाकार तरी. सुचक पद्धतीनेही हे जातीय संदर्भ (जर चित्रपट जात वास्तवाबाबत असता तर) देता आले असते; पण मुळात हा चित्रपट जातीबाबत नाहीच आहे. पुर्वप्रसिद्धी आणि नंतच्या चर्चा मात्र जातीय आहेत.
7) उत्तरार्ध पुर्वार्धापेक्षा जरा बरा आहे. फिल्मीपणाने तोही भरला असला तरी विपरित स्थितीत पळून जाऊन लग्न करणार्‍याना जे काही अनुभव येतात ते येथे स्युडो-रिअलिस्टिक पद्धतीने येतात. पटकथा येथेही फसलेली आहे. खरे म्हणजे स्वप्नाळू जगाकडून भिषण वास्तवाकडे होणारा प्रवास व त्याची सांध जुळवत जगण्याशी सांधलेली नाळ असा जो प्रवास आहे तो पटकथाच (व दिग्दर्शनही) फसल्यामुळे मुळात प्रत्ययकारी होतंच नाही. नायक-नायिकेशी प्रेक्षक म्हणून रिलेट होताच येत नाही. चित्रपटातील अनेक घटना प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही प्रमाणात होऊनच गेलेल्या असतात. तेवढ्या स्मरणरंजनापुरते काही प्रसंग कामी येत असले तरी चित्रपटात ते एकुणातील परिणाम साधत नाहीत. बरे त्यांना तुकड्यातुकड्याने सामोरे येणारे प्रत्ययकारी सत्य म्हणावे तर तेही नाही. उदा. चित्रपटात अचानक कोळी जातपंचायतीचा कसलाही संदर्भ नसणारे अचानक दृष्य येते... तेही अनिर्णित... कसलेही वास्तव न मांडणारे, मागचा पुढचा संदर्भ न देणारे आणि तेही अस्थानी. असायलाच हवे होते तर ते आधीच.
8) उत्तरार्धात बालीश बाबी अनेक आहेत. त्या खर्‍या जीवनातही घडू शकतात हेही आपण मान्य करू. झोपडपट्टीतून चाळीकडे व चाळीकडून फ्लॅटकडे होणारा प्रवास नायक नायिका करतात. त्यांना मुलही होते. मुल तिनेक वर्षाचे झाल्यावर नायिकेचा भाऊ व काही नातेवाईक तिला भेटायला येतात. येथून पुढचा शेवटचा भाग जवळपास मूक अहे. एका सुरुवतेचा दुर्दैवी शेवट आहे.
पण खरेच सुन्न व्हायला होते का?
मला तरी झाले नाही. वृत्तपत्रातील ओनर किलिंगच्या बातम्या वाचून मी सुन्न झालेलो आहे; पण येथे दृश्य मनावर काहीच परिणाम करत नाही. चित्रपटात नायक-नायिकेला प्रत्यक्ष मारताना दाखवलेले नाही; पण गळे चिरुन मारले गेल्यानंतर व त्याआधीचा जीवन-मरणाशीचा संघर्ष त्या खोलीत दिसत नाही. शिस्तीत निपचित गळे चिरलेली प्रेते आहेत. सारे बाकी जेथल्या तेथे आहे. जणू काही त्यांनी अत्यंत शांततेने मरण स्वीकारले आहे.
राहिले आकाशचे... त्यांच्या मुलाचे. हा शेवटचा प्रसंगच बालिश वाटतो कारण आकाशची शिक्षिका (वा बालवाडीतील मॅडम) या प्रसंगाआधीच त्याला घेऊन जातात तेव्हा नायिका, बाळ व बाई संवाद साधतात. ती मुलाला परत सोडायला येते. घराचे दार बंद आहे. ती आकाशला बंद दारासमोर सोडून देते. निघून जाते. असे होते का? जे पाहयचेय ते इवला आकाश पाहतो. त्याची रक्ताळलेली पावले काळजावर ओरखडा उमतवत नाहीत कारण मुळात सारेच कृत्रीम वाटते.
मला हा चित्रपट आवडला नाही. मी तसे लिहिले तर काही मंडळीने मलाच जातीयवादी ठरवले. मला समीक्षण करायचीही इच्छा नव्हती, कारण त्या योग्यतेचा हा चित्रपट आहे असे मला वाटलेच नाही. जातवास्तव सोडून द्या... ते असतेच तर हैद्राबादमध्येही नवपरिणत जोडप्याला जातीचे फटके बसलेच असते... ते नाहीत. त्यांना मारले... का? केवळ दिग्दर्शकाला अथवा पटकथाकाराला चित्रपटाचा काहीतरी शोकांतिक शेवट असावा असे वाटले म्हणून. त्यात दिग्दर्शकीय नैसर्गिकपणा कोठे आहे? तोच अपरिहार्य शेवट असावा असे निर्देशनही कोठे आहे?
पण जातीय चष्मे घालून बव्हंशी हा चित्रपट पाहिला जातो आहे. आता तर नायिकेची जातही शोधली गेली आहे. नायकाची जातही लवकरच घोषीत होईल असे दिसतेय. भविष्यकाळात अभिनेते, दिग्दर्शक ते पार चित्रपटाचे स्पॉटबॉय यांची जात कोणती याचे शोध लावले जातील... त्यावर हिरीरीने चर्चा होतील...
चांगले आहे! पण आक्षेप हा राहतो की कलाकृतीत जे नाहीच ते आहे असे समजून जातीय वाद करावेत काय? हा चित्रपट प्रत्यक्ष सोडा, अप्रत्यक्षही जातवास्तवाबाबत बोलत नाही की सुचितही करत नाही. मुलगी पाटील आहे आणि मुलगा कोळी अशा विरोधाभासी जातीय जीवनाचेही चित्रण या चित्रपटात नाही. मुलगी राजकारणी बापाची आहे आणि ती एका मुलाबरोबर पळून गेली म्हणून बापाचे राजकीय जीवन धोक्यात आले आहे असे संकेत मिळतात, पण मुलगी खालच्या जातीतील मुलाबरोबर पळून गेली म्हणून तसे झाले असेही सुचन नाही. समजा तो अंडरकरंट आहे व दिग्दर्शक ते स्पष्ट दाखवू इच्छित नाही, प्रेक्षकांच्याच विचारशक्तीवरच सोडतोय... तर मग यातून अनेक अन्वयार्थ काढता येतील... ते जातीयच असतील असे नाही. हा संघर्ष सरळ सरळ अमीर-गरीब स्टाईलचा वाटेल किंवा बापालाच जगजाहीर अपमानित करुन पळालेल्या मुलीचा आणि ज्याच्यासाठी हे घडले त्या मुलाचा मुलीच्या बापाने  (तापट मुलाच्या माध्यमातून) घेतलेला सूड असेही वाटू शकेल...
पण जातीय खदखद प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षही या चित्रपटात नाही. हा चित्रपट एका जातीच्या (म्हणजे मराठ्यांच्या) विरोधात व कोळी (किंवा निम्नजातीय) बाजूने आहे असेही नाही. असे एकही दृष्य नाही, संवाद नाही किंवा सुचनही नाही. आंबेडकरवादी सध्या नायकाच्या शोधात आहेत. कधी त्यांना कन्हैयात नायक दिसतो तर आता नागराजमध्ये. या चित्रपटाने तर नायिकाही दिली आहे. उद्या कोणात नायक-नायिका दिसेल हे माहीत नाही. हे नायकबदलुपण घातक आहे हे आंबेडकरवाद्यांना समजायला हवे. कारण या चित्रपटाचे कडवे समर्थक आंबेडकरवादी आहेत हे वास्तव नाकारता येत नाही.
आपला समाज जातीयवादी आहे हे जातवादावर दुरान्वयानेही भाष्य न करणार्‍या चित्रपटाने सिद्ध करावे हे दुर्दैवी आहे. मराठा समाजही यात मागे राहिला नाही. त्यानेही आपल्या वर्चस्वतावादी विकृत दुगाण्या झाडल्याच... कोणत्या ना कोणत्या बहाण्याने. आपल्या समाजात जात वास्तव आहे व जातीय अत्याचारही आहेत हे वास्तव मान्यच करायला हवे; पण हे जातीय अत्याचार आता तथाकथित उच्चजातीयच करतात असे आता राहिलेले नाही. काही शारीरिक जातीय अत्याचार करतात तर काही मानसिक... एवढाच सध्या तरी फरक आहे... उद्या उलटेही होऊ शकते.
सैराट एक फसलेली साधी शोकांतिक प्रेमकहानी आहे, तीही दिग्दर्शकीय फसलेली. ओनर किलिंगचा त्याला टच दिलाय पण तो कृत्रीम आहे. काहीतरी शेवट हवा म्हणून लांबलेल्या चित्रपटाला अचानक थांबवण्यापुरतीची ती क्लृप्ती आहे. एवढेच!
- संजय सोनवणी 

९८६०९९१२०५ 
(साप्ताहिक 'चपराक', पुणे)