साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य |
कोषाध्यक्ष सुनील महाजन |
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पैशाचे मोठे व्यवहार होतात आणि त्यात अनेकांचे उखळ पांढरे होते, हे वेळोवेळी दिसून आले आहे. ‘आपण ठरवू ती पूर्व’ या तोर्यात वावरणार्या महामंडळाच्या पदाधिकार्यांनी अस्सल साहित्यिकांची उपेक्षा करत नकलाकारांनाच मोठे करण्याचे उद्योेग सुरू केले आहेत. डॉ. माधवी वैद्य यांच्या गँगमध्ये योगेश सोमण, राहुल घोरपडे, सोनाली कुलकर्णी हे, तर सुनील महाजन यांच्याकडून निकिता मोघे यांचेच नाव दरवेळी पुढे का दामटले जाते, हे लपून राहिलेले नाही. ‘पायलवृंद’ संस्थेच्या माध्यमातून सुनील महाजन यांनी कलाकारासाठी म्हणून 1 लाख 45 हजार रूपये घेतल्याचे उघड झाले आहे. अनेक गैरव्यवहारात बरबटलेल्या या लोकानी महामंडळाचा राजीनामा देऊन बाहेर पडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रा. मिलिंद जोशी यांनी साहित्य परिषदेचा राजीनामा दिल्यानंतर माधवी वैद्य आणि त्यांच्या चमूंच्या कारस्थानांचा बुरखा ‘चपराक’ने फाडला होता. त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘मसाप पत्रिका’चे संपादक सु. प्र. कुलकर्णी यांनीही वैद्य बाईंच्या गैरव्यवहाराबाबत मोठा आवाज उठवून राजीनामा दिला होता. परिषदेतील काही टुकार कवड्यांच्या आणि स्वार्थी लोकांच्या मदतीने हे गैरव्यवहार वेळोवेळी दाबून ठेवल्याने सारे काही अलबेल होईल असे कुणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. सत्य हे कधीही फार काळ लपून राहत नाही. त्यामुळे साहित्य परिषद किंवा साहित्य महामंडळ आपल्या बापजाद्यांची प्रॉपर्टी आहे, अशा आविर्भावात कोणीही राहू नये.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात अनेक मान्यवरांनी साहित्य रसिकांना वेळोवेळी ज्ञानामृत पाजले आहे. व्याख्यानांच्या माध्यमातून विचार जपण्याचे मोलाचे काम या सभागृहात झाले आहे, मात्र निकिता मोघे यांच्या सोबतच्या काही कलाकारांनी पायात चाळ बांधून याच सभागृहात नाचाचा सराव केल्याचेही सांगितले जात आहे. सुनील महाजन आणि माधवी वैद्य यांनी हितसंबंध जोपासत इकडे दुर्लक्ष केले असले तरी साहित्य वर्तुळातून मात्र याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. माधवी वैद्य यांच्या आर्थिक गैरव्यवहारांची धर्मादाय आयुक्तांनी स्वतंत्र समिती नेमून तपासणी केली पाहिजे. महामंडळाचा पदाधिकारी हा आर्थिक लाभार्थी असता कामा नये, हा संकेत उराशी बाळगून गदिमा यांच्यापासून ते ग. ना. जोगळेकर यांच्यापर्यंत अनेकांनी मोठे योगदान दिले आहे. या परंपरेला हारताळ फासण्याचे काम ‘भोली सूरत दिलके खोटे’ वृत्तीच्या वैद्य-महाजनांनी केले आहे.
माधवी वैद्य यांच्या कारकिर्दीत अनेक कारस्थानांना ऊत आल्याचे दिसून येत आहे. फारशी कुवत नसलेल्या सामान्य माणसाला प्रतिष्ठा देऊन मनमानी करण्याचे उद्योग त्यांनी सुरू ठेवले आहेत. सदैव दुसर्यांच्या कविता वाचून पैसे मिळवण्यात हयात गेलेल्यांना सर्जनशील साहित्याचे मोल आणि महत्त्व काय कळणार? असा रोकडा सवाल साहित्य रसिक विचारत आहेत. यांचे कारनामे वेळोवेळी उघड झाल्याने परिषदेचे मोठे हसे होत आहे. ‘चपराक’ने सातत्याने यांचा बुरखा फाडूनही पत्रकार परिषदेचा कायम सुळसुळाट करणार्या माधवी वैद्य शांतच आहेत. त्यांनी तोंड उघडावे आणि कुणाही पदाधिकार्यावर आरोप झाल्यास राजीनामा देऊन बाहेर पडण्याची परिषदेची परंपरा जपावी. नैतिकतेची थोडीफार चाड असेल तर वैद्य आणि महाजन यांनी त्यांच्यावरील आरोप खोडून काढावेत.
पद गेल्यानंतर आपल्याला कोणीही विचारणार नाही, आपल्या मुलीची, जावयाची, नातीची आणि अंत:स्थ मित्रमैत्रिणींची वर्णी कार्यक्रमात लावता येणार नाही, त्यांना आर्थिक लाभ मिळवून देता येणार नाही, हे या जोडीला माहीत असल्याने वैद्य-महाजन यांची राजीनामा देण्याची मुळीच शक्यता नाही. या सर्व प्रकाराबाबत मान्यवर साहित्यिक आणि साहित्य रसिकातून मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
* घुमान येथील 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संहिता लेखनासाठी माधवी वैद्य यांनी तीस हजार रूपये घेतल्याचे उघड झाले आहे. प्रसारमाध्यमांनी हा प्रकार चव्हाट्यावर आणताच वैद्य यांच्या नावे धनादेश निघाला असला तरी त्यांनी तो स्वीकारला नाही, असे लंगडे समर्थन केले जात आहे. माधवी वैद्य यांची मराठी साहित्याच्या, संस्कृतिच्या अभ्यासक म्हणून काय ओळख आहे? महामंडळाच्या अध्यक्षा असूनही असे गैरव्यवहार करण्याइतके निलाजरेपण त्यांच्यात चांगलेच मुरलेले दिसते.
* माधवी वैद्य आणि सुनील महाजन या दोघांनीही साहित्य परिषदेचा वापर आपले वैयक्तिक कार्यालय म्हणून केल्याचाही आरोप केला जातोय. महाजन त्यांच्या कोणत्याही कामासाठी, कुणालाही परिषदेत बोलावतात आणि तिथेच साहित्यबाह्य विषयातील त्यांची वैयक्तिक कामे मार्गी लावतात, हे सत्य कोण नाकारणार?
* घुमानच्या साहित्य संमेलनात भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांची मुलाखत घेणार्यांना प्रत्येकी 6 आणि 8 हजार रूपये मानधन देण्यात आले. माध्यमांनी ठोकल्यानंतर देवी यांना मात्र 10 हजार रूपयांचा धनादेश जुनी तारीख टाकून देण्यात आला. तो धनादेशही त्यांना एका ओळीचे कृतज्ञता पत्र न पाठवता आणि त्यांच्याऐवजी त्यांच्या प्रकाशकाकडे देण्यात आला.
* प्रकाशक परिषदेच्यावतीने बहिष्कार टाकून संमेलन उधळून लावण्याचा प्रयत्न करणार्या ‘पद्मगंधा प्रकाशन’च्या अरूण जाखडे यांनी डॉ. गणेश देवी यांची मुलाखत संमेलनात घेतली होती, हेही लक्षात घ्यायला हवे.
सागर सुरवसे, पुणे
९७६९१७९८२३ / ९६६५८९९८२३
EMAIL: sagar.suravase@gmail.com