आभाळ भरून येतं आणि काही कळण्याच्या आत पाऊस सुरू होतो. कधी तो आवेगात कोसळतो, कधी अलगद उतरतो. कवितेचंही तसंच! भाव- भावनांचा कल्लोळ दाटतो, मनाचं आभाळ भरून आल्यावर शब्द कविता बनून येतात. या शब्द सरी कधी अडखळणार्या, कधी तुफान बरसणार्या. कविता म्हणजे मनाचा हुंकार, कविता म्हणजे खोल तळातून आलेली मनाची साद. कवी प्रल्हाद दुधाळ यांची कविता तीच साद आहे. ही साद एवढी जोमदार आहे की तिचे प्रतिध्वनी आपल्याही मनात उमटत राहतात. हे प्रतिध्वनी जेवढे नादावणारे तेवढेच अस्वस्थ करणारे आहेत. याचं कारण दुधाळ यांची कविता मानवी भाव-भावना, व्यवहार, माणसाचे मन याचा विशाल पट कवेत घेऊन पुढे येते.
ही कविता जशी छंदमुक्त आहे तशी बंधमुक्तदेखील आहे. डोंगर असो अथवा दरी; मुक्त वाहणार्या झर्याला त्याची पर्वा नसते. तो पुढे पुढे वाहतच राहतो. तशी दुधाळ यांची कविता सर्वस्पर्शी असून त्यामुळेच ती प्रवाही ठरली आहे. या कवितेत प्रेमभावना आहे, विरह आहे आणि जगाचे, जगाच्या शुष्क व्यवहाराचे कठोर वास्तव सुद्धा! त्यामुळे या कवितेला अनेक पैलू मिळाले अन् ती अधिक चमकदार झालेली दिसते.
कवितेचं वरदान प्रत्येकाला लाभत नाही. ज्यांना ते मिळते ते केवळ रूढार्थाने या जगाचे. याच जगात राहून वेगळे असलेले. अनोळखी वाटा तुडवत जाणारे वाटसरू. ही वाट सोपी नव्हे. खाचा-खळगे आणि जखमा हे या वाटांवरचे संचित. ते समंजसपणे स्वीकारावं लागतं. मनावर घाव करणारे अनुभव मांडताना कवितेत आक्रंदनाचा सूर लावून चालत नाही. विलक्षण अनुभवानांही शब्दांच्या माध्यमातून नेटके रूप द्यावे लागते. दुधाळ यांच्या कवितेला ते पुरेपूर भान आहे. म्हणूनच ही कविता सजवलेले शब्द नसून सर्वार्थाने सजलेले क्षण आहेत! आणि ते सजलेले असले तरी केवळ उत्सवात रमलेले नाहीत. रोजच्या जगण्याशी या कवितेचे नाते आहे आणि तेच या कवितेचे बलस्थान ठरावे.
कवितेसाठी मनाचे आभाळ भरून यावे लागते, पण आधी मनाचे आभाळ तर हवे! आभाळाएवढे मन ही पुढची गोष्ट. जिते-जागते शरीर आहे पण मन आहे का? समाजातील ढोंग आणि विरोधाभासाने ज्यांची मने कोमेजून जातात त्यांचा दोष नाही. मात्र मानवी जीवनाची मूल्य बिनदिक्कत पायदळी तुडवून पुढे जाणारे कोणत्या व्याख्येत बसवावेत? कवीकडे संवेदनशील मन असते आणि मनाचे आभाळ. जीवनातील असंख्य अनुभवांचा रंग त्या आभाळावर उतरतो आणि तिथेच न थांबता तो शब्दांवर पसरत जातो. एक-एक अनुभव शब्दांचे रूप लेऊन कागदावर उमटतो. ती कविता असते. हा प्रवास येथेच थांबत नाही. तो अखंड सुरू राहतो. कागदावर उमटलेली कविता रसिकांना शोधू लागते. त्याअर्थाने दुधाळ यांची कविता महत्त्वाचा टप्पा ओलांडत आहे. रसिकांच्या भावविश्वात स्थान मिळवण्याची ताकत शब्दांच्या या सजवलेल्या क्षणांमध्ये आहे. हा दुधाळ यांचा दुसरा काव्यसंग्रह. ‘काही असे काही तसे’ या काव्यसंग्रहानंतर सात वर्षांच्या दीर्घ कालावधीने हा काव्य संग्रह रसिक वाचकांसमोर येत आहे. अनुभवांचे वैविध्य हे ‘सजवलेले क्षण’ कविता संग्रहाचे वैशिष्ट्य ठरावे. यात मुक्त छंदातील कविता जशी भेटते तशी भुरळ पाडणारी गझलदेखील भेटते.
काही असे काही तसे,
जगलो असे जमले जसे...
हे दुधाळ यांची कविता थेट सांगून टाकते. जगलो असे जमले जसे.. या शब्दांमध्ये प्रांजळपणा आहे. तिथे लपवाछपवी नाही, मुखवटा नाही, हा सरळपणा हाच दुधाळ यांच्या कवितेचा स्थायीभाव. तत्त्वज्ञान मांडण्याचा या कवितेचा आविर्भाव नाही, मात्र सहजपणे ती कालातीत गोष्टी सांगून जाते.
काळच असतो जालीम औषध,
जीवनातील बहुसंख्य घावांवर... असे दुधाळ लिहितात. ते सत्य कोणाला तरी नाकारता येईल का? अखंड प्रवाही काळाची स्पंदने त्यांची कविता अलगद टिपून घेते.
येतो आणि जातो
कायम न राहतो
समजून घे
काळ हा...
हे सत्य त्यांची कविता अधोरेखित करते.
लोढणे गळ्यात कुणाच्या, मी कदापि होणार नाही... असे त्यांची कविता समंजसपणे सांगते.
कधी दुष्काळाची झळ
कधी ओला धुमाकूळ
झोडपते कधी गार
बारोमास पडे मार...
हे त्यांच्या कवितेतून समोर येणारे दाहक वास्तव मनाला भिडते.
किती भगवंता
अंत हा पाहता
धाडा पर्जन्याला
भक्तासाठी...
अशी आर्त विनवणी त्यांची कविता करते.
नको धरणीशी अबोला
माणसांच्या सार्या चुका
हे पावसाला सांगताना अंकुराचा काय गुन्हा? हा त्यांच्या कवितेने केलेला सवाल अंत:र्मुख करून जातो.
गढूळलेले समाजजीवन विषाद देते. त्याचे अस्सल प्रतिबिंब प्रल्हाद दुधाळ यांच्या अनेक कवितांमधून उमटले आहे. त्यांच्या कवितेने लख्ख आरसा समोर धरला आहे आणि त्यात पाहणार्यांना तो आरसा अपार अस्वस्थता देतो, मनाला बोच लावतो.
गेलोे पालिकेत, सरकारी बाबूकडं
राशन दुकान आणि कुठं कुठं
जिथं तिथं उद्धट माणसं जोरात
मुकाट रहा नाही तर मिळे धमकी
... उगाच नाद करायचा नाय!
हे कुरूप वास्तव ही कविता मांडते. गल्ली गल्लीत, नाक्या-नाक्यावर पिसाटांचे अड्डे आकारले आहेत, हे जळजळीत सत्य त्यांची कविता सांगते.
बियाणं पेरले तयांनी अशा भेदांचे
कसे पिकणार तेथे एकतेचे मळे?
हा दुधाळ यांच्या ‘कांगावा’ कवितेतील सवाल निरूत्तर करतो. ‘कोणी’, ‘करार’ या कविताही कटू वस्तुस्थिती मांडतात.
घोटाळ्यांचा देश हीच
झाली देशाची ओळख
सूर्य असून आभाळी
झाला गच्च हा काळोख
हे भयाण वास्तव दुधाळ यांनी रोखठोक मांडले आहे. कविता म्हणजे शब्दांचा डोलारा नव्हे. त्याबद्दल लिहिताना दुधाळ म्हणतात,
उद्गार तो भावनांचा
शब्दांपलीकडच्या..
नकळत व्यक्त झालेला
शब्दांमध्येच!
कविता म्हणजे खरोखरीच शब्दांपलीकडचा उद्गार. तो उद्गार नकळत शब्दांमध्ये व्यक्त होतो हे सुद्धा तेवढेच खरे! याचे भान असल्याने दुधाळ यांच्या कवितेला कृत्रिमतेचा स्पर्श नाही. निसर्गात जशी सहजपणे फुलं उमलतात तशी ही कविता आहे. तिला स्वत:चा गंध आहे.
या कवितेला ढोंगाची चीड आहे. मानवी जीवनाचे मोल आहे आणि नितळ, पारदर्शक जीवन प्रवाहाची ओढ आहे.
न मंदिरात गेलो ना हाताळली जपमाळ
दगडात नाही, माणसात भगवंत होता...
ही माणसातील देवत्व शोधण्याची कवीची आस आहे.
वर्षामागून गेली वर्षे, स्मृतीतून पुसटले नाव...
झाली होती भेट कुठे ती, विसरून गेले गाव...
ही आत्ममग्नता त्यांच्या कवितेत कधी दिसते तर केव्हा व्यवहारातील वास्तव.
विराण हे माळ
सुकलेली झाडे
उधळते माती
वार्यासंगे...
हे निसर्गचित्र टिपताना त्यांच्या कवितेचा भाव त्या चित्राचे शेतकर्याच्या मनात उमटलेले तरंग दाखविण्याचा आहे. असे रे कसे देवा, तुझे भास पावसाचे? हा त्यांचा रोकडा सवाल आहे. त्यांच्या काही कवितांमध्ये पाऊस प्रीतिच्या भावना व्यक्त करतो. कविता हा दुधाळ यांच्या जीवनाचा अतूट भाग आहे. हे कविते, तू माझा शब्द... असे ते लिहून जातात. या कवितेला प्रतिमांचा सोस नाही. कवितेची मोजकी शब्दकळा नाद घेवून आली आहे. अक्षराची अचूक अभिव्यक्ती करणारे त्यांच्या कवितेचे शब्द आहेत.
माथेफिरूंचे राज्य, खुळ्यांची वस्ती
जगी एकटा या शहाणा कशाला?
अशा ओळींमधून अस्सल अभिव्यक्तीचा प्रत्यय येतो. जीवनात काही अधिक असणार आणि काही उणे. जीवनाकडे पाहण्याची कवीची ही समंजस भूमिका त्यांच्या कवितेतून पदोपदी जाणवते. दुधाळ यांच्या कवितेतील आत्मप्रत्यय इतरांनाही तोच अनुभव देण्याएवढा समर्थ आहे. परिपक्व अनुभवातून फुललेली ही कविता चटकन लक्ष वेधून घेते. वास्तवाला भिडतानाही ती चटका देत नाही किंवा निराशेचे गीत गात नाही. त्यांच्या कवितेचा सूर आशावादाचा आहे. जीवनातील चिरंतन मूल्यांचा ही कविता आदर करते आणि सजवलेल्या क्षणांच्या मदतीने सजलेल्या आयुष्यासाठी सांगावा धाडते. जीवनाच्या प्रवासात अनुभवांचे ओझे होऊ नये, उलट अनुभव हे दीपस्तंभ ठरावेत, ही दुधाळ यांच्या कवितेची प्रामाणिक भावना आहे. चिंता, कटुता याचे सावट क्षणांना काळवंडून टाकते, याचे भान या कवितेला आहे. म्हणूनच या कवितेचा आग्रह फुलण्याचा आणि सजण्याचा दिसतो. हे सजणे मनातून आले आहे.
जीवन म्हणजे क्षणांचा अखंड पट. तोच पट प्रल्हाद दुधाळ यांच्या कवितेने शब्दांमधून मांडला आहे. क्षण महत्त्वाचा, तो जपला पाहिजे. तो जपता आला तर जीवन जपता येईल. उत्कटता असेल तर जीवनात रंग भरेल. उत्कटता असेल तरच प्रत्येक क्षण सजवता येईल. क्षणांना सजवणारा हा कवी इतरांनाही सजवलेल्या क्षणात रंगून जाण्यासाठी साद घालतो आहे. आजचा क्षण काही क्षणात मागे पडतो. काळाच्या प्रचंड उदरात पाहता-पाहता गडप होतो. पण हे सजवलेले क्षण निसटणारे नाहीत. ते मनात घर करतील आणि त्यांचे बोल पुन: पुन्हा ऐकू येत राहतील.
-स्वप्निल पोरे
प्रसिद्ध कवी-पत्रकार
पुणे
9404232227