ऋचा पोतदार या अवघ्या नऊ वर्षाच्या चित्रकर्तीनं चित्रकला क्षेत्रात आपली
वेगळी ओळख निर्माण केली आहे. नामवंत चित्रकारही हरखून जातील इतकी छान चित्र
तिनं साकारलीत. आजवर वेगवेगळ्या स्पर्धातही तिनं घवघवीत यश मिळवलंय.
सुप्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका अंजली कुलकर्णी यांनी ‘चपराक’च्या वाचकांना
करून दिलेली ऋचाची ही ओळख.
बालचित्रकर्ती ऋचा पुष्कराज पोतदार. वय वर्षे नऊ. प्रसिद्ध ग्रामीण कथाकार श्री. बबन पोतदार यांची नात. इव्हेंटस्चे मॅनेजमेंट बघणारे पुष्कराज आणि वैद्यकीय व्यवसाय करणार्या डॉ. दिप्ती यांची एकुलती एक लाडकी कन्या. मात्र लाडकी असली तरी लाडावलेली नाही तर गुणांनी लगडलेली सुपुत्री.
घरात साहित्य संस्कृतीचा दरवळ झेलतच ऋचा वाढते आहे. त्यामुळे कलागुणांची जोपासना करण्याचं बाळकडू तिला घरातंच मिळालंय. चित्रकलेचा वारसा तिला तिच्या आजोळच्या घराण्याकडून मिळाला. सध्या ऋचा श्री श्री रविशंकर विद्यामंदिरात चौथ्या इयत्तेत शिक्षण घेत आहे; मात्र तिनं साकारलेली सुंंदर सुंदर चित्रं बघितली तर लक्षात येतं की, चित्रकलेतली तिची इयत्ता फार वरची आहे. केवळ नऊ वर्षांच्या मुलीनं चितारलेली ही चित्रं आहेत, यावर विश्वास बसू नये एवढी जिवंत आणि रसरशीत चित्रं ऋचानं काढली आहेत.
अवघ्या तिसर्या वर्षी ऋचानं बोटात कुंचला पकडला. सुंदर सुंदर रंगांच्या रेघोट्यांनी तिला मोहून टाकलं आणि तेव्हापासून ऋचा रंगांच्या दुनियेेत मनापासून रमू लागली. तिच्या आईबाबांनी तिची चित्र काढण्याची आवड ओळखली आणि चित्रकलेचं सामान तिच्यासमोर ठेवलं. बाबांनी कॅनव्हास आणून दिला. ऋचा हरखूनच गेली. ऑईल पेस्टल, वॉटर कलर, पोस्टर कलर, चारकोल, ऍक्रॅलिक अशा विविध प्रकारांमध्ये ती स्वतःची चित्रकला खुलवू लागली. तशी जात्याच ती गुणवान पण आईने आवर्जून करून घेतलेल्या सरावामुळे आणि महालक्ष्मी पवार, बापू घावरे, स्वप्ना जोशी, सुहास पंडित, आदित्य बेगमपुरे, जयंत बेगमपुरे अशा मोठ्या कलाकारांच्या मार्गदर्शनामुळे ऋचाच्या बोटांत सफाई आणि नजरेत समज निर्माण झाली. गेल्या सहा वर्षांत या एवढ्याशा चिमुरडीने चित्रकलेच्या क्षेत्रात घेतलेली झेप पाहिली तर आपण थक्क होतो.
ऋचाला नेहरू युवा केंद्र भारत सरकार कला आणि क्रीडा मंत्रालयाने ‘उत्कृष्ठ बालकलाकार’ म्हणून गौरविलं आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार मिळाला आहे. आंध्र प्रदेशच्या अ. भा. चित्रकला स्पर्धेत तिला ‘सुवर्णपदक’ प्राप्त झाले आहे, तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या ‘बालश्री पुरस्कार’ आणि सुवर्णपदकाचीही ती मानकरी ठरली आहे. गुजरात राज्यातील एका सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेतही तिला सुयश मिळाले आहे, तर दै. ‘केसरी’च्या चित्रकला स्पर्धेत तिने पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत तिला पहिला नंबर मिळाला होता तर ‘ऍरेजमेंट इव्हेंटस् मॅनेजमेंट’तर्फे झालेल्या ‘बालमनातील चित्र’ या प्रदर्शनात तिच्या चित्रांचे जाणकारांनी कौतुक केले होते. ‘आर्ट मॅजिक’ नावाच्या संस्थेनं आयोजित केलेल्या प्रदर्शनातूनही सलग दोन वर्षं तिनं उत्साहानं भाग घेतला होता. ‘भारती ऍक्सा’च्या वतीने आयोजित स्पर्धेत तब्बल पाच हजार चित्रांतून तिच्या चित्रांची सार्थ निवड झाली होती; एवढंच नाही तर अवघ्या पाचव्या वर्षी दै. ‘पुढारी’ने तिची पाच चित्रं प्रकाशित केली होती. तसंच श्री शिवाजी स्काऊट ग्राऊंडतर्फे गणेशमूर्ती बनवण्याच्या स्पर्धेत तिने पहिला क्रमांक सोडला नव्हता. त्याशिवाय चिन्मय मिशनच्या गीता पठण स्पर्धेतही तिने उज्ज्वल यश प्राप्त केलं होतं.
ऋचाची चित्रं बघितली तर साधारणपणे ऋचा निसर्गचित्रांमध्ये अधिक रमते असं दिसतं. निसर्गातले सूक्ष्म तपशील ती अगदी बारकाईनं भरताना दिसते. त्यावरून तिच्या सूक्ष्म निरीक्षण क्षमतेची कल्पना येते. तिची चित्रांची जाणही उत्तम आहे. याशिवाय मानवी चेहरे आणि मानवी आकृती काढण्यातही ती वाकबगार आहे.
चित्रकलेतील ऋचाचा सफाईदारपणा, कष्ट करण्याची तयारी आणि प्रगल्भता खरोखर वाखाणण्याजोगी आहेच परंतु शाळेच्या अभ्यासातही ती बिलकूल मागे नाही. श्री श्री रविशंकर विद्या मंदिरातील शुभांगी करवीर, स्मिता राहणे, जितेंद्र मोडवे, संदीप वानखेडे, दुर्गा मेनपुरे हे शिक्षक तिचे सतत कौतुक करत असतात, तिला प्रोत्साहन देत असतात.
खरोखर अशा शांत, समंजस, हुषार, गुणवान बाल कलावतीचं कौतुक कुणाला वाटणार नाही? ऋचाची कला दिवसेंदिवस अशीच बहरत जावो हेच तिला शुभाशीर्वाद!
- अंजली कुलकर्णी, पुणे
99220 72158
सध्या संमेलनाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो तो उठतोय आणि अर्ज भरतोय. आपला साहित्याशी कसा संबंध आहे हे ठासून सांगतोय. इथून पुढे रद्दीवाले आणि बारवालेही अर्ज भरायला कमी करणार नाहीत. ते ही आपला साहित्याशी असलेला संबंध सांगतीलच. संमेलनाच्या समकालीन वास्तवावर खुशखुशीत शैलीत भाष्य करणारा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते प्रा.मिलिंद जोशी यांचा हा खमंग लेख!
आज 'साहित्य चपराक' दिवाळी अंकाचे प्रकाशन पुण्यात होत आहे. मिलिंद जोशी हे आजच्या सोहळ्यातील प्रमुख वक्ते आहेत. त्यांचा या अंकातील लेख मुद्दाम देतोय. अवश्य वाचा.
साहित्यचावडी येथे आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याची वार्ता पसरली तेव्हा सर्वांनाच आनंद झाला. या संमेलनाचे वेगळेपण म्हणजे मर्तिकाचे (मयतीचे) सामान विकणार्या ‘वैकुंठ साहित्य संघ’ या व्यापारी कंपनीला संमेलनाचे यजमानपद मिळाले. तेव्हा अनेकांची बोटे तोंडात गेली. यांचा आणि साहित्याचा संबंध काय? असा प्रश्नही विचारला गेला; तेव्हा वैकुंठ साहित्य संघाचे संचालक डॉ. यम म्हणाले, ‘‘साहित्याशी संबंध नसताना पदाधिकारी साहित्य महामंडळावर काम करू शकतात तर आमची पात्रता त्यांच्यापेक्षा जास्त आहे. कारण आम्ही अंत्यविधीचे सामान थेट विकतो. आमचा या ना त्या प्रकारे साहित्याशी संबंध आहे.’’ तेव्हा सर्वांचीच बोलती बंद झाली. महामंडळाच्या पदाधिकार्यांनी साधी नाराजीही व्यक्त केली नाही कारण डॉ. यम ही मालदार पार्टी असल्याने त्यांना दुखावले तर आपल्या फुकटेगिरीला चाप बसेल आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची कंत्राटे मिळणार नाहीत. तीन पानांच्या संहितेसाठी तीस हजार रूपये उकळता येणार नाहीत. म्हणून त्यांनी (फुकटचे) मूग गिळून गप्प असण्यातच धन्यता मानली. कारण समन्वयाशिवाय ‘अनन्वयाचे’ दुकान चालणार नाही, याची त्यांना खात्री होती. साहित्य संमेलनांना मिळणारी अफाट प्रसिद्धी कॅश करण्यासाठी डॉ. यम यांनी वयस्कर साहित्यिकांसाठी एक भन्नाट योजना जाहीर केली. ‘निरोपाचा क्षण जवळ आला आहे हे कळताच आम्हाला फोन करा. तुमची पुढची सगळी व्यवस्था वैकुंठ साहित्य संघातर्फे केली जाईल. तुमच्या फोटोसह बातम्या छापून आणू. मृत्युलेख प्रसिद्ध होईल याची जबाबदारी घेऊ. श्रद्धांजली सभेचे आयोजन करू. साहित्यिक इतमामात (अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत) तुमचे अंत्यसंस्कार करू. तुमच्या नावे एक स्मृती प्रतिष्ठान काढू. दरवर्षी साहित्यिकाला पुरस्कार देऊ, वगैरे, वगैरे.... या योजनेत अंत्यसंस्काराखेरीज प्रत्येक गोष्टीसाठी रेट कार्ड होते. त्यामुळे माध्यमांनी बरीच टीका वगैरे केली. तेव्हा डॉक्टर यम यांनी ‘‘तुम्ही लेखक मानधनाशिवाय लिहिता का? एकतरी गोष्ट मोफत करता का? मग आम्ही तरी मोफत का द्यावी?’’ असा सवाल उपस्थित केल्यानंतर साहित्यिकांनी हू की चू सुद्धा केलं नाही. कारण संमेलनाच्या काळात पंचतारांकित सुविधांवर गदा येण्यापेक्षा मौन राखलेलेच बरे, असा पवित्रा अनेकांनी घेतला.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. प्रत्येकाला आपण आजवर केलेल्या अतुलनीय साहित्यसेवेचे स्मरण होऊ लागले. पहिल्याच दिवशी मनोहर रद्दीवाले यांनी अर्ज दाखल केला. पत्रकारांनी त्यांना उमेदवारीमागची भूमिका विचारली तेव्हा ते म्हणाले, ‘‘नव्या साहित्याला जागा करून देण्याचे काम गेली अनेक वर्षे मी निष्ठेने करीत आलो आहे. आम्ही रद्दीचा व्यवसाय केला नसता तर साहित्य क्षेत्रात कचर्याचे ढीग लागले असते. आपल्या महाराष्ट्रातील अनेक शहरांना स्मार्ट सिटी बनवण्यात त्यामुळे मोठा अडथळा निर्माण झाला असता! आजकाल पूर्वीच्या तुलनेत रद्दीचे प्रमाण कमी झाले आहे, कारण त्याकाळात लेखकांना एखादे पुस्तक किमान चारपाचवेळा तरी लिहून काढावे लागायचे. संपादकीय संस्कार करणार्या संपादकांच्या धाकामुळे ते करायचेही. कारण त्याशिवाय पुस्तकच प्रसिद्ध व्हायचे नाही. आज पैसे फेकले की प्रकाशक पुस्तक काढायला तयार होतात. त्यामुळे रद्दी तयार होत नाही. अर्थात ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर बातम्या आणि परीक्षणे छापून आली की लेखकाची बायको ती पुस्तके रद्दीत घालते हा भाग वेगळा; पण सृजनाच्या रद्दीची सर निर्मितीनंतरच्या रद्दीला येत नाही. गेली पन्नास वर्षे केवळ मराठी हस्तलिखिते, मराठी पुस्तके आणि मराठी वृत्तपत्रे यांच्याच रद्दीचा व्यवसाय मी करत आलो आहे. हे माझे भाषाप्रेम आपण लक्षात घेतले पाहिजे. नव्या सृजनासाठी अवकाश निर्माण करण्याचे काम रद्दीवाले करीत आहेत. समीक्षकांनीही रद्दी साहित्याकडे दुर्लक्षच केले आणि आम्हा रद्दीवाल्यांकडेही! पण त्यांनी एक लक्षात ठेवावे. त्यांच्या ग्रंथांना नेहमी आमच्याकडेच मोठी जागा मिळालेली आहे. तेव्हा साहित्य परिसर स्वच्छ करणार्या आणि नवतेच्या स्वागतासाठी आसुसलेल्या आम्हा सर्व रद्दीवाल्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी ही निवडणूक लढविणार आहे.’’ त्यांची भूमिका ऐकून पत्रकारही अचंबित झाले.
एक पत्रकार धीर एकवटून म्हणाला, ‘‘आपण संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर संमेलनाच्या स्वरूपात काय बदल करणार आहात?’’
मनोहर रद्दीवाले नम्रपणे म्हणाले, ‘‘रद्दीसाहित्य ः कालचे आणि आजचे’ या विषयावर परिसंवाद घ्यायला लावणार आहोत. मराठीतल्या नामवंत समीक्षकांच्या सहकार्याने ‘रद्दी ः एक अन्वयार्थ’, ‘पुनःरद्दी’ असे ग्रंथ संपादित करणार आहोत. रद्दीवाले आणि साहित्यिकांच्या पत्नी यांच्यात सुसंवाद घडवून त्यांची घरे धूळ आणि वाळवीपासून कशी सुरक्षित राहतील याची काळजी घेणार आहोत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीसाठीची मतदार यादी बदलली पाहिजे असा आग्रह आम्ही धरणार आहोत. कारण त्यात रद्दी लोकांना स्थान आहे पण रद्दीवाल्यांना नाही. हा सांस्कृतिक भेद आम्ही कधीही सहन करणार नाही. आपण नेहमी साहित्य संस्थेच्या पदाधिकार्यांना नावे ठेवतो. फुकटे म्हणून त्यांचा उल्लेख करतो. त्यांना इतर काही कामे नसल्यामुळे ते आपला वेळ संस्थेसाठी देतात हे खरे असले तरी वेळ देतात ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांचा सन्मान आमच्या संघटनेतर्फे केला जाईल. साहित्यिकांची आपण ग्रंथतुला करतो आणि ते ग्रंथ आपण एखाद्या ग्रंथालयाला भेट म्हणून देतो. आम्ही पदाधिकार्यांची रद्दीतुला करणार आहोत आणि त्यांच्या वजनाएवढी रद्दी विकून ते पैसे त्यांनाच देणार आहोत.’’
त्यावर जनमान्य जनशक्ती या वृत्तपत्राचा पत्रकार खोचकपणे म्हणाला, ‘‘अशा उपक्रमांतून संमेलन ‘अर्थपूर्ण’ करण्याचा आपला मानस आहे का?’’ त्यावर मनोहर रद्दीवाले म्हणाले, ‘‘संमेलनातून ‘अर्थ’वजा केला तर संमेलनाला पूर्णत्व येईल का? या अर्थाचा अनर्थ करण्याची सवयच तुम्हा मंडळींना लागली आहे.’’
‘‘आणखी कोणता अभिनव उपक्रम करणार आहात?’’ या पत्रकाराच्या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता मनोहरपंत म्हणाले, ‘‘भाषा भवनाप्रमाणेच रद्दी भवनाच्या उभारणीसाठी मी पुढाकार घेईन. त्याशिवाय नवतेच्या प्रतिष्ठेची सद्दी निर्माण होणार नाही.’’
रद्दीवाल्यांच्या संघटनेचे मनोहर रद्दीवाले यांची वाङमयीन आणि वैचारिक बैठक पाहून पत्रकार आवाक झाले.
रद्दीवाले अर्ज भरून बाहेर पडणार एवढ्यात त्यांना निवडणूक अधिकार्यांनी बोलावून घेतले. अर्जात काही चूक तर राहिली नाही ना? असा प्रश्न रद्दीवाल्यांना पडला. तेव्हा निवडणूक अधिकारी म्हणाले, ‘‘अर्ज भरल्यानंतर मी प्रत्येक उमेदवाराला खडीसाखर देतो. ती देतानाचा फोटो मग आम्ही वृत्तपत्राकडे पाठवतो. कारण अलीकडे अर्ज स्वीकार करतानाचे वगैरे फोटो ते छापत नाहीत... त्यांना ऑफ बीट फोटो लागतात ना! आम्ही निवडणुकीच्या काळात मरमर काम करायचे, आमचा फोटो नको का छापून यायला?’’
रद्दीवाल्यांना अधिकार्यांची दया आली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आम्ही उमेदवार सारखे फोटोत झळकत असतो. प्रसिद्घी तर इतकी मिळते की विचारूच नका. निवडणूक लागल्यापासून ती संपेपर्यंत आलेल्या बातम्यांचा कॉलम सेंटीमिटरच्या जाहिरातीच्या स्वरूपात विचार केला तर काही कोटींची प्रसिद्धी मिळते आम्हाला. तुम्हाला तर मिळालीच पाहिजे. पण खडीसाखरेऐवजी पेढा ठेवला असता तर?’’
निवडणूक अधिकारी हताशपणे म्हणाले, ‘‘बजेटमध्ये नाही ना बसत!’’
त्यावर रद्दीवाले म्हणाले, ‘‘स्पॉन्सर बघा ना एखादा!’’
निवडणूक अधिकारी म्हणाले, ‘‘नको हो, त्यामुळे पदाधिकार्यांच्या वर्तन स्वातंत्र्यावर गदा येते. एकवेळ लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार नाही झाला तरी चालेल पण पदाधिकार्यांच्या वर्तन स्वातंत्र्यावर मात्र घाला येता कामा नये अशी आमची भूमिका आहे.’’
निवडणूक अधिकार्यांनी रद्दीवाल्यांना खडीसाखर घालताना मस्त पोज दिली. कॅमेर्यांचा लखलखाट झाला. रद्दीवाले खूश झाले. पत्रकारांनी काढता पाय घेतला. रद्दीवालेही त्यांच्या दुकानात गेले.
दुसर्या दिवशी चार वाजता पेगेन बारवाला संमेलनाध्यक्ष पदासाठी अर्ज भरतात हे समजताच एकच खळबळ उडाली. पेगेन बारवाला यांचा स्वतःच्या मालकीचा बार असला तरी ‘मद्यार्क निर्मिती-व्यवसायाच्या नव्या वाटा’, ‘मद्यालयातील आचारसंहिता’ यासारखी त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली होती. त्यांच्या ‘मद्यधुंद’ या कादंबरीला सर्व नामवंत संस्थांचे पुरस्कार मिळालेले होते. ‘मी आज मद्य प्याले’ या त्यांच्या कवितासंग्रहावर वाङमय चौर्याचा आरोप झाल्यामुळे तो बराच गाजला होता. पेगेन बारवाला यांची ख्याती होती ती त्यांच्या बारमध्ये त्यांनी साहित्यिकांसाठी केलेल्या स्वतंत्र दालनामुळे. आजवर अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि नवोदित साहित्यिकांनी त्यांच्या बारमध्ये हजेरी लावून सवलतींचा लाभ घेतला होता. त्यामुळे सर्वांनाच त्यांच्याविषयी ममत्त्व वाटत होते.
ते अर्ज भरण्यासाठी कार्यालयात आले तेव्हा त्यांचे सूचक आणि अनुमोदक त्यांच्या आदरातिथ्याचा आणि तीर्थाचा लाभ घेऊन आल्यामुळे डोलत होते. ललित साहित्याच्या भाषेत सांगायचे तर त्यांची प्रतितिविक्षांनी सुरू होती. त्यांच्या आरक्त डोळ्यात निवडणुकींचीच धुंदी होती.
पेगेन बारवालांनी आपला अर्ज अधिकार्यांकडे सुपूर्त केला. नेहमीप्रमाणे खडीसाखर खाऊ घालण्याचा कार्यक्रम झाला. फोटो निघाले. पत्रकार परिषद सुरू झाली.
‘‘आपला आणि साहित्याचा संबंध काय? आपण ही निवडणूक का लढवित आहात?’’ पत्रकारांनी विचारले.
पेगेन बारवाला म्हणाले, ‘‘केवळ ललित साहित्यालाच साहित्य म्हणण्याची जी चुकीची प्रथा पडली आहे ती बदलण्याची गरज आहे. मद्य साहित्य हेही एक प्रकारचे साहित्यच आहे. तेच आद्य साहित्य आहे. हेच मी संमेलनाच्या व्यासपीठावरून सांगणार आहे. मद्य हे केवळ आद्य साहित्य नाही तर सद्य साहित्य आहे. एकाअर्थाने ते समकालीन आहे. स्फूर्तिची अभिव्यक्ती हेच साहित्याचे प्रयोजन आहे. त्या साहित्यिकाची मती गुंुग करून त्याच्या निर्मितीची गती वाढविण्याची स्थिती निर्माण करणे हे काम मद्य साहित्याने आदीम काळापासून केलेले आहे. साहित्य निर्मितीत दोन प्रेरणा महत्त्वाच्या असतात. एक आतली आणि दुसरी बाहेरची. आतल्या प्रेरणेला बाहेर आणण्यासाठी बाहेरून एका प्रेरणेचे अंतर्गमन आवश्यक आहे. माझ्या ‘प्रेरणेचा सिद्धांत’ या ग्रंथात त्याचे मी साधार विवेचन केलेले आहे. ‘अंतःप्रेरणा आणि बाह्यप्रेरणा ः मद्याच्या साक्षीने - एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर माझ्या मार्गदर्शनाखाली एक विद्यार्थी पीएचडीही करीत आहे. साधे कथेचे उदाहरण घ्या. आम्ही नेहमी सांगतो, कथेत ‘कलाद्रव्य’ आणि ‘कथाद्रव्य’ असले पाहिजे. तरच ती कथा ताकतीची होते. या दोन्ही शब्दप्रयोगात आस्वादक समीक्षकांनी ‘द्रव्य’ या गोष्टीला तितकेच महत्त्व दिले आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. एखाद्या साहित्य प्रकारामागची तात्त्विक भूमिका समजाऊन न घेता त्या साहित्य प्रकाराला निकालात काढणे हा वाङमयीन दहशतवादच आहे. तो आम्ही कधीही सहन करणार नाही.’’
पेगेन बारवालांच्या सूचक आणि अनुमोदकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांनी काहीही बरळू नये यासाठी त्यांनी त्यांना वाईनची चॉकलेट दिली. ती खाताच ‘ग्लानी येणे’ या वाक्प्रचाराची अनुभूती त्यांनी घेतली.
पत्रकारांना पेगेन बारवालाची भूमिका पटत नव्हती. एक पत्रकार त्यांना म्हणाला, ‘‘आपण एकदम मोठ्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच उभे राहता आहात! विभागीय संमेलनातून सर्वांची एकप्रकारची मनोभूमिका तयार करून मगच आपण या निवडणुकीत उतरायला हवे होते असे वाटत नाही का?’’
त्यावर बारवाला म्हणाले, ‘‘मद्य आणि साहित्य यात हाच मूलभूत फरक आहे. मद्य प्राशन करताना सतत आपल्या मर्यादांचे भान ठेवावे लागते. साहित्यात ते ठेवण्याची गरज नसते. बेभान झाल्याशिवाय साहित्यनिर्मिती करता येत नाही. आजच्या काळात प्रत्येक लेखकाने आपल्या मर्यादेचे भान ठेवायचे ठरवले तर संमेलने अध्यक्षांशिवायच पार पाडावी लागतील. आपली मर्यादा माहीत असूनही लोक या निवडणुकीत उतरतात. म्हणूनच गंमत आहे.’’
तात्त्विक विवेचनात पेगेन बारवाला कुठेच कमी पडत नाहीत हे पत्रकारांच्या लक्षात आले.
‘‘आपल्या अध्यक्षीय भाषणात आपण कोणता मुद्दा मांडणार आहात?’’
‘‘मित्रहो, जागतिकीकरणाने आपल्या जगण्याचे वैराण वाळवंट करून टाकले आहे. आपल्या मुळांपासून आपण तुटत चाललो आहोत. रूटस् नष्ट होणं म्हणजे संस्कृतीच्या मुळावरच घाव आहे असं मी मानतो. माझ्या अध्यक्षीय भाषणात या ‘मुळांविषयी’ मी मूलभूत विचार मांडणार आहे.’’
‘‘आपल्याकडे साहित्यिकाचे साहित्यिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात कारण नसताना गल्लत केली जाते. वैयक्तिकांकडून विश्वात्मकाकडे पाहता आले पाहिजे. मी या संमेनाध्यक्षपदासाठी उभा आहे तो साहित्यिक आणि साहित्यिक कार्यकर्ता म्हणून. मी निर्माण केलेली ‘मद्यसाहित्य’संपदा आपण वाचलीच आहे. मराठी साहित्यात हा नवा प्रवाह आणण्याचे श्रेय मलाच आहे.
साहित्यिक कार्यकर्ता या नात्याने सर्जनाच्या मुळाशी माझा जवळचा संबंध आहे. माझा स्वतःच्या मालकीचा बार आहे, हे आपण जाणताच. लोक जाहीरपणे त्याचा उल्लेख टाळतात पण बरेच विचारवंत, लेखक जाहीर कार्यक्रम संपला की आमच्याच बारमध्ये येतात. त्यांची सार्वजनिक कुचंबना होऊ नये म्हणून मी त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केलेला आहे. थोडेसे रसपान झाले की या प्रतिभावंतांना भन्नाट कल्पना सूचतात. त्या कल्पना सूचण्याची प्रक्रिया इथेच घडते. सर्जनाचा कोंब इथेच फुटतो. अनेक थोर साहित्यिकांना त्यांच्या कादंबर्यांची, कथांची, नाटकांची बीजं इथंच सूचलेली आहेत. त्या सर्जनाच्या मुळाशी आमच्या बारचा जवळचा संबंध आहे. प्रसिद्ध समीक्षक वा. ह. भरकटू यांनी ‘मद्यस्थान माहात्म्य’ या ग्रंथात त्यासंबंधीचे अर्थपूर्ण विवेचन केलेले आहे. मी एका अर्थाने साहित्यिक आहे. बारच्या माध्यमातून मी साहित्य आणि साहित्यिकांची सेवा करीत आहे. त्यामुळे मी साहित्यिक कार्यकर्ता आहे आणि मुख्य म्हणजे साहित्यनिर्मितीच्या उगमाशी माझा थेट संबंध आहे. हा त्रिविध अन्योन्य संबंध विचारात घेऊन मतदार मला निवडूण देतील याची मला खात्री आहे.’’
पेगेन बारवालांचे चिरेबंदी विवेचन ऐकून सर्वांचीच बोलती बंद झाली. साहित्य आणि साहित्य निर्मितीच्या प्रेरणा, सर्जनाची उगमस्थानं याविषयीचं इतकं साधार व्याख्यान यापूर्वी कोणीच ऐकलं नव्हतं.
तेवढ्यात कार्यालयातला फोन वाजला. सेवकाने तो उचलला.
‘‘कोण बोलताय?’’ सेवकाने विचारले.
‘‘मी हॉटेल एकांतचा मालक बोलतोय. प्रा. सतत प्रकरणे.’’
‘‘काय काम आहे आपलं?’’
‘‘मी संमेलनाध्यक्ष पदाचा अर्ज भरण्यासाठी उद्या येतोय. उद्या किती वाजेपर्यंत मुदत आहे?’’
‘‘पाच वाजेपर्यंत’’ सेवकाने त्याला सांगितले.
कार्यालयातील सेवकाने ही वार्ता सर्व पत्रकारांना सांगितली तेव्हा सर्वांना चक्कर यायचीच बाकी होती. ‘हॉटेल आणि साहित्यिक’, ‘हॉटेल आणि साहित्य निर्मिती’ यासंदर्भातले कोणते विवेचन ऐकायला मिळणार आहे, या विचारांचा भोंगा सर्वांचीच डोकी पोखरत होता. एका नवोदित पत्रकाराला चक्कर आली. सर्वांनी त्याच्या नाकाला कांदा लावला. शुद्धीवर आल्यानंतर अधिकार्यांनी त्याच्या तोंडात खडीसाखर घातली. साखर गोड असूनही संमेलनाचे समकालीन वास्तव पाहून त्याने तोंड कच्चे कारले खाल्ल्याप्रमाणे कडू केले.
- प्रा. मिलिंद जोशी
९८५०२७०८२३