Sunday, January 3, 2016

अहंगडी श्रीपाल


लातुर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर यांचा हा विशेष लेख खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी!

‘मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले नाही उचलणार’ या आविर्भावात ‘मी चुकीचे काही बोललो नाही, मी माफी मागणार नाही’ अशी राणा भीमदेवी थाटातील घोषणा पिंपरी चिंचवड येथील नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी लातूर येथील मसापच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी केली.
गेल्या दोन दिवसापासून श्रीपाल सबनीस चांगलेच चर्चेत आले आहेत. ‘दोन जोड्याने हाणा पण ........म्हणा’ अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलीत आहे. त्या म्हणीची प्रचिती श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यातून येत आहे.
श्रीपाल सबनीस यांनी पिंपरी चिंचवड येथील भाषणातून जी मुक्ताफळे उधळली आहेत, त्यावर कोणतीही मराठी भाषा समजणारी व्यक्ती असे वक्तव्य करणारा माथेफिरुच असला पाहिजे अशी सहज प्रतिक्रिया व्यक्त करेल. साहित्य संमेलनाध्यक्ष यांनी कोणत्या विषयावर बोलावे याला बंधने अर्थातच नाहीत. तशी कोणी अपेक्षाही केली नाही. पण बोलायला राज्यघटनेने अधिकार दिला म्हणून जिभेला हाड न ठेवता बोलण्याचा अधिकार वापरणे हे निश्चितच शहाणपणाचे लक्षण नाही. लातूरात भाजपा कार्यकर्त्यांनी सबनीसांच्या सत्कार समयी निषेधाच्या घोषणा दिल्या तेव्हा येशू ख्रिस्ताचा खरा अनुयायी आपण आहोत या थाटात उपदेशाचे डोस पाजले.
आपले चुकले आहे याची पूरेपूर जाणिव सबनीस यांना आहे मात्र आपण माफी मागितली तर आपली शिल्लक असलेली प्रतिष्ठा धुळीला मिळेल, या भीतीने माफी मागण्याचे ते साहस करत नाहीत. बुद्धांचे नाव उच्चारले म्हणजे बुध्दाच्या वैचारिक वारसाचे पेटंट मिळाल्याचा आनंद काही जणांना होतो. त्या आनंदापासून सबनीस यांना पारखे करण्याचे काही एक कारण नाही.
‘‘मोदी यांचा एकेरी उल्लेख आपण आत्मिय भावनेतून केला. त्यांच्याबद्दल आपल्याला काळजी वाटत होती, माझा शिवाजी, माझा तुकाराम, माझी आई या पध्दतीने एकेरी शब्द वापरला’ असे त्यांनी श्रोत्याना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने श्रोते वेडगळ नव्हते. श्रीपाल सबनीस हे शब्दांची कसरत करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत हे न समजण्याइतके श्रोते अडाणी नक्कीच नव्हते.
मोदी यांच्या विदेशवारीचा उल्लेख ‘बोंबलत फिरणे’ असा करुन उलट ही माझी मोकळी ढाकळी भाषा आहे, आत्मिय भाव आहे असे समर्थन करणे कोणालाही पटणार नाही. समोरचे श्रोते निर्बुद्ध आहेत असा समज श्रीपाल सबनीस यांनी करुन घेतला असेल तर ते मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत. त्यांनी वापरलेला शब्द हा मोठ्या व्यक्तिने लहाण्यासाठी वापरण्याची पद्धत आहे. मोदींपेक्षा ते कोणत्या अर्थांनी मोठे आहेत हे त्यांनी समजावून सांगावे.
न पेक्षा मी बोलण्याच्या ओघात बोलून गेलो, यानंतर अशी चूक होणार नाही असे ते बोलले असते तर त्यांच्या विचारांची उंची कळली असती.
‘‘मी क्रांतीकारकाचा मुलगा आहे, कोणाला घाबरणार नाही, मोदीबद्दल गौरवोद्गार काढले नसतील तर मला जाहीर फाशी द्या’’ हेही म्हणायला ते विसरले नाहीत.
सबनीस यांचे पिताश्री कै. मोहनराव पाटील यांनी रा. स्व. संघाचे तालुका संघचालक म्हणून काही काळ काम केले होते हेही त्यांनी लक्षात ठेवले असते तर बरे झाले असते. राजकारण्यांप्रमाणे आपल्या इतिहासाचा वापर सोयीसाठी सबनीस करत आहेत, यापुरताच हा दाखला आहे. सबनीसांना अध्यक्ष पदाचा प्रसिद्धीसाठी वापर करायचा आहे. त्यांचा घटनादत्त अधिकार त्यांना लखलाभ.

(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
- प्रदीप नणंदकर, लातूर 
९४२२०७१६६६