Sunday, September 18, 2016

स्पर्धा परीक्षा : दुकानदारी जोमात; विद्यार्थी कोमात!

मासिक 'साहित्य चपराक', पुणे 


माझ्या ‘स्पर्धा परीक्षा एक संसर्गजन्य रोग’ या लेखावर मला अज्ञानी आणि अहंकारी ठरवणारे हेच धर्माधिकारी सर (?). यांनी 5 सप्टेंबर 2016 च्या वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचाव्यात आणि परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे अन् अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनाही ‘अज्ञानी’ ठरवण्याचं किंवा म्हणण्याचं धाडस करावं.
-अर्जुन नलवडे, पाटण

लहानपणी कोल्हापूरात असताना दिवाळीच्या सणाला मावशीसोबत कपडे खरेदी करायला जायचो. कोल्हापूरात कपडे मिळण्याचं प्रसिद्ध ठिकाण म्हणजे महाद्वार रोड. या रोडवर संध्याकाळची खूप गर्दी असते. या रोषणाईने नटलेल्या महाद्वार रोडवर कपड्यांच्या दुकानाच्या बाहेर त्या दुकान मालकाने एखाद-दुसरा मुलगा जाणीवपूर्वक उभा केलेला असायचा. अशा मुलांचं काम काय? तर रोडवरील खरेदी करायला आलेल्या प्रत्येक ग्राहकाला आपल्याच दुकानात घेऊन यायचं. अशा मुलांचा पगार ठरायचा कसा? तर त्या मुलाने किती ग्राहक दुकानात आणून दिले अन् त्या ग्राहकाने किती रूपयांचे कपडे खरेदी केले, यावर म्हणजेच ‘कमिशन’वर तो पगार ठरायचा. जास्त पगार (हजेरी) मिळवण्याच्या आशेने ही मुलं ग्राहकांना इतका आग्रह करायची की, कधी कधी ते जबरदस्तीने हाताला धरून दुकानात न्यायचे. नेमकी हीच परिस्थिती थोड्या-फार प्रमाणात आज स्पर्धापरीक्षेचे क्लासेस चालवणार्‍यांच्या बाबतीत लागू पडते. फक्त प्रभावी जाहिरात करून अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांना (आमच्या क्लासेस-ऍकॅडमीमध्ये या! तुम्हाला विविध सुविधा मिळतील.) अशा पद्धतीचा आग्रह केला जातो. आयएएस अन् आयपीएस होण्याची स्वप्ने पाहणार्‍या विद्यार्थ्यांना हे लक्षात का येत नाही की, ’खरंच पैसे खर्च करून अधिकारी होता आलं असतं तर सर्वच श्रीमंत बापाची पोरं अधिकारी झाली नसती का?’ पण ‘स्पर्धा परीक्षाग्रस्त’ झालेल्या विद्यार्थ्यांना हे कोण समजवणार?
आता पुणे शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी जेथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी असते, अशा ठिकाणी किंवा पुणे महानगरपालिकेच्या शहरी बसेस आणि बस स्थानकांवर लाखो रूपयांच्या स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती असतात. त्या इतक्या प्रभावी आणि परिणामकारक आहेत की, खेड्यातून आलेलं सामान्य कुटुंबातलं एखादं पोरगं ‘स्पर्धा परीक्षा पास होणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय’ असं मनोमन ठरवतं आणि स्वप्नांच्या दुनियेत वावरायला सुरूवात करतं. त्या स्वप्नांच्या दुनियेत ध्येयाच्या अनिश्‍चिततेचा काळाकुट्ट अंधार आहे. हे त्याच्या लक्षातच येत नाही आणि लक्षात आलंच तर तो जाणीवपूर्वक त्याच्याकडं दुर्लक्ष करतो. ऑगस्ट 2016 च्या ‘चपराक’ मासिकामध्ये ‘स्पर्धा परीक्षा एक संसर्गजन्य रोग’ या माझ्या लेखात जाणीवपूर्वक मी क्लासेसवाले आणि ऍकॅडमीवाले यांची नावे टाळली होती. परंतु आता प्रातिनिधीक पातळीवर काही क्लासेस व ऍकॅडमी यांची नावे वाचकांच्यासमोर ठेवणं हे मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं.
द् युनिक ऍकॅडमी, चाणक्य मंडल परिवार, ज्ञानदीप ऍकॅडमी, पुणे ऍडमिनिस्ट्रेटीव्ह करिअर ऍकॅडमी, सिंग क्लासेस, भगीरथ ऍकॅडमी, पंकज गांधी ऍकॅडमी, सिनर्जी ऍकॅडमी, ज्ञानप्रबोधिनी, राजपथ ऍकॅडमी, व्हिजन ऍकॅडमी, प्रविण चव्हाण क्लास, रितेश ओतारी क्लास, अग्रवाल क्लासेस, गुरूकुल ऍकॅडमी, अभिजित राठोड ऍकॅडमी, युपीएससी ऍकॅडमिया, पृथ्वी ऍकॅडमी... या प्रत्येक ऍकॅडमी-क्लासेसवाल्यांचे स्वत:चे प्रकाशन, मासिक, साप्ताहिक, अभ्यासिका आहेत.
ज्यावेळी मी द् युनिक ऍकॅडमी आणि चाणक्य मंडल परिवार यांना भेट दिली तेव्हा ऑफिसमध्ये समोरच असणार्‍या टेबलवर काही व्यक्ती (अतिशय बोलक्या असणार्‍या) अशा पद्धतीने क्लासेसची माहिती सांगण्यासाठी बसविलेल्या आहेत की, जणू काही श्रीकृष्ण अर्जुनाला स्पर्धा परीक्षेच्या रणांगणात लढायचं कसं याचाच उपदेश करतो आहे. विशेष म्हणजे त्यांच्या आवारात दहावी-बारावी करणार्‍या विद्यार्थ्यांचीसुद्धा गर्दी होती. मी जिज्ञासा म्हणून त्यांना विचारलं की, ‘तुम्ही येथे कसे काय?’ त्यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘‘आम्ही स्पर्धा परीक्षेच्या फाउंडेशन बॅचला प्रवेश घेतो आहे.’’ तेव्हा तर मी डोक्याला हात मारून घेतला. अरे बाप रे! आता तर दहावी-बारावीच्या पोरांनाही या क्लासेस-ऍकॅडमीवाल्यांनी स्पर्धा परीक्षेच्या चिखलात ओढलं. चाणक्य मंडल या संस्थेनं तर जागोजागी महानगरपालिकेच्या बसस्थानकांवर ‘आज आणि उद्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या सर्वांसाठी’ अशी भली मोठी जाहिरात केली आहे. द् युनिक ऍकॅडमीने तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अभ्यासिकेसह वसतिगृहाच्या मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या आहेत. त्याचबरोबर हे ऍकॅडमी-क्लासेसवाले खासगी बसेस, खासगी वसतिगृह, उपहारगृह, खानावळी उभे करून करोडो रूपयांची उलाढाल किंवा व्यवसाय करत आहेत.
या ऍकॅडमी व क्लासेसवाल्यांचे सर्वेसर्वा यांनी तर माझ्या ‘स्पर्धा परीक्षा एक संसर्गजन्य रोग’ या लेखावर मला सौम्य, सभ्य आणि संदिग्ध भाषेत धमकी देण्यापर्यंत मजल मारली. मी हा लेख लिहिताना यांना खलनायक म्हणून कधी पाहिलेच नव्हते. कारण स्पर्धा परीक्षेच्या अनिश्‍चित ध्येयाच्या चिखलात रूतून बसलेले माझेच मित्र आणि त्यांची अवस्था ही डोळ्यांनी पाहण्यासारखी नव्हती. म्हणून हा लेख लिहण्याचं धाडस केलं. स्पर्धा परीक्षा करणार्‍या माझ्या अनेक गरीब मित्रांची आणि त्यांच्या जीवनाची फरफट पाहण्यासारखी अजिबात नाहीये. ते सदाशिव पेठेतल्या काही धोकादायक इमारतीत (अगदी एक-दोन रिश्टर स्केलच्या भुंकपात पडण्यासारख्या) दाटीवाटीने राहतात. कोण सकाळचं दुध घालण्याचं काम करतोय... कोण रात्रपाळीत एटीएमच्या बुथवर पहारेकर्‍याची नोकरी करतोय... कोण आपल्या पोटाचा प्रश्‍न मिटावा म्हणून एखाद्या खानावळीत पार्टटाईम वेटरची नोकरी करतोय... तर कोण पेपर टाकण्याचे काम करतोय. खरंतर याच मुलांच्यामध्ये मला रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर, विजय भटकर दिसतात. याच मुलांच्यात मला बाबा आमटे, अभय बंग आणि रवींद्र कोल्हे दिसतात. याच मुलांच्यात मला भविष्यातले शेकडो सुवर्ण पदके मिळवून आणणारे खेळाडू दिसतात आणि याच मुलांच्यामध्ये समाजाच्या व्यथा मांडणारे साहित्यिक दिसतात; पण प्रश्‍न आहे, मला दिसून उपयोग काय? याची जाणीव मला होऊन उपयोग काय? हे सर्व स्वत:ला बुद्धिवादी, मानवतावादी आणि पुरोगामी म्हणविणार्‍या लोकांना आणि विचारवंतांना का दिसत नाही? कारण यांना संघटना उभी करणं आणि त्यासाठी तरूणांना हातशी धरणं अन् त्यांना चिथवणं इतकंच माहिती असतं. असो! पण प्रत्यक्ष राज्यव्यवस्थेची धुरा सांभाळणार्‍या आणि या होतकरू, हुशार विद्यार्थ्यांच्या कल्याणाची जबाबदारी असणार्‍या राजकीय व्यवस्थेतील माणसांनी (लोकप्रतिनिधींनी) डोळ्यावर पट्टी बांधली आहे काय? आणि ही पट्टी बांधली असेल तर... त्यांनी ती पट्टी काढावी आणि राजकीय स्वार्थासाठी चाललेले आपापसांतील दिखावू भांडणे मिटवून या मुलांच्या कल्याणासाठीचा विचार करावा.
जाहिरातीच्या आणि स्मार्टफोनच्या युगात एखाद्या विद्यार्थ्याचा बळी सहज जातो. इंटरनेटच्या माध्यमातून भरत आंधळे, विश्‍वास नांगरे-पाटील, रमेश घोलप, अविनाश धर्माधिकारी यांसारख्या अनेक अधिकारी झालेल्या व्यक्तिंच्या भाषणबाजीमुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची दिशाभूल झाली आहे. आंधळे नावाचे अधिकारी आपल्या व्याख्यानात पीएसआय होण्यासाठी पाच वर्षे आणि आयपीएस होण्यासाठी आणखी पाच वर्षे अशी दहा वर्षे अभ्यास केल्यानंतर मी स्पर्धा परीक्षा पास झालो, असे ‘डोळस’पणे सांगतात. यातून अप्रत्यक्षपणे एक चुकीचा संदेश गेला. तो म्हणजे स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी किमान आठ-दहा वर्षे लागतात. त्याचा परिणाम असा झाला की, पुणे विद्यापीठात अनधिकृतपणे (पॅरासाईट) राहणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. हेच विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीत असणार्‍या जिन्याखाली, गॅलरीमध्ये राहू लागले. त्याचा ताण वसतिगृह प्रशासन व्यवस्थेला सहन करावा लागला आणि आजही लागतो आहे. नांगरे-पाटील हे तर स्पर्धा परीक्षेच्या विश्‍वातील आदर्श व्यक्तिमत्त्व (आयकॉन) मानलं जातंय. कारण ते आपल्या शाब्दिक खेळ्यामुळे विद्यार्थ्यांवर एकप्रकारची मोहिनी घालतात. त्यांच्या व्याख्यानातून असा विद्यार्थी वास्तवतेपासून दूर जात स्वप्नांच्या दुनियेत रममाण व्हायला लागतो. ती नांगरे-पाटलांची लाल दिव्याची गाडी (शासनाची बरं का!) त्यांच्या अंगावरील शासकीय गणवेश, त्यांचा मानसन्मान, त्यांना इतरांकडून मिळणारी आदराची वागणूक या सर्वात तो विद्यार्थी स्वत:ला ठेवायला लागतो. नांगरे-पाटलांच्या भाषणाचा हा वाईट परिणाम होतो. आता रमेश घोलप हे तर वक्तृत्वाचं वेगळंच रसायन... वक्तृत्वाचं बाळकडूच त्यांनी पिलं होतं की काय? अशी शंका त्यांचं भाषण ऐकल्यावर येते. वक्तृत्व म्हणण्यापेक्षा ‘पाठांतराचा’ तो उत्कृष्ट नमुनाच म्हणायला हवा. घोलप हे अधिकारी झाल्यानंतर अनेक स्पर्धा परीक्षासंबंधीची व्यासपीठंच गाजवत सुटले.
आता धर्माधिकारी!! यांनी तर आपल्या वक्तृत्वाच्या आणि अभ्यासाच्या जोरावर ‘चाणक्य मंडल परिवारा’चा इतका मोठा व्याप वाढवलाय की, आता ते फक्त ‘संस्थानिक’च व्हायचे बाकी राहिलेत. माझ्या ‘स्पर्धा परीक्षा एक संसर्गजन्य रोग’ या लेखावर मला अज्ञानी आणि अहंकारी ठरवणारे हेच धर्माधिकारी सर (?). यांनी 5 सप्टेंबर 2016 च्या वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचाव्यात आणि परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे अन् अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनाही ‘अज्ञानी’ व ’अहंकारी’ ठरवण्याचं किंवा म्हणण्याचं धाडस करावं. असो. वरील अधिकारी हे प्रचंड हुशार आहेत; परंतु ते आपल्या बुद्धिचा वापर समाजसेवेसाठी नाही तर व्यवहारासाठी (फायदेशीर व्यवसायासाठी) व स्वत:च्या प्रसिद्धीसाठी करतात. सकारात्मकतेचा अतिरेक झाला की त्यातूनही नकारात्मक बाजू जन्म घेते हे वरील अधिकार्‍यांच्या आणि क्लासेसवाल्यांच्या उद्योगांतून स्पष्ट होते.
माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अभ्यासताना भारतीय असंतोषाचे जनक कोण? या प्रश्‍नाचे उत्तर म्हणून लोकमान्य टिळक असं अभ्यासलं अन् ते बरोबरही होतं. आता आमच्या पुढच्या पिढीसमोर ‘आमचा आजचा वर्तमान’ इतिहास म्हणून असेल तर हा प्रश्‍न नक्कीच विचारला जाईल की, ‘महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा चळवळीचे जनक कोण?’ आणि त्याचं उत्तर आमची पुढची पिढी असं देईल की, महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा चळवळीचे जनक ‘स्टडी सर्कलचे डॉ. आनंद पाटील’ होय. यातील गांभीर्य लक्षात घेण्यासारखं आहे. माझी पुढची पिढी कोणाचा इतिहास अभ्यासणार आहे? थोर समाजसुधारक म्हणून अविनाश धर्माधिकारी, तुकाराम जाधव, मनोहर भोळे, आनंद पाटील, फारूक नाईकवाडे, यजुर्वेद महाजन, रंजन कोळंबे, देवा जाधवर, महेश शिंदे यांचा इतिहास अभ्यासणार आहे काय? का गुगल, फेसबुक, ट्वीटरचे संस्थापक किंवा ऑलिंपिकमध्ये मायकेल फ्लेप्स, उसेन बोल्ट यांसारखे सुवर्णपदकांचे विश्‍वविक्रम करणार्‍या व्यक्तिंचा इतिहास अभ्यासणार आहेत? माझ्या पिढीतल्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेतील वाया गेलेल्या आठ-दहा वर्षातील उद्ध्वस्त जीवन... हा भविष्यातील इतिहास बनू शकत नाही!!! आमचं असं स्वत:चं कर्तृत्व काय? की ते कर्तृत्व भविष्यातील पिढीसमोर ‘सोनेरी इतिहास’ म्हणून उभा असेल? हा प्रश्‍न प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणार्‍या विद्यार्थ्याने स्वत:ला विचारावा.
काही महिन्यापूर्वी पुण्यातील एका नावाजलेल्या ‘सीओईपी’ या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘स्वयम्’ नावाचं उपग्रह बनवलं आणि त्याचं यशस्वी उड्डाणही झालं. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यापासून अनेक मान्यवरांपर्यंत त्या विद्यार्थ्यांचं कौतुकही झालं. एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे नव्यानेच पुण्यात दाखल झालेला माझा नवीन मित्र. त्याने द् युनिक ऍकॅडमीमध्ये जवळपास ऐंशी हजार भरून युपीएससीचा क्लास लावला. तो सांगत होता, लेक्चरचा पहिला दिवस. त्या लेक्चरमध्ये मुलांच्या शैक्षणिक शाखा विचारल्या गेल्या. त्यात अभियांत्रिकी शाखेकडून आलेल्या नव्वद टक्के विद्यार्थ्यांचे हात वर झाले. राहिलेले दहा टक्के इतर शाखेतून आलेले. अशी परिस्थिती. समजा, विद्यार्थी दशेत असताना सीओईपीच्या विद्यार्थ्यांनी केलेली कर्तबगारी पहायला मिळते तर दुसरीकडे त्याच शाखेची मुले पुढे अभियांत्रिकीची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागली तर त्यांच्या शिक्षणावर पालकांनी आणि शासनाने केलेला खर्च त्याचं काय? याचं कारण फक्त एकच. स्पर्धा परीक्षेचं निर्माण केलं गेलेलं आभासी वातावरण.
आमच्या महाराष्ट्रातून दरवर्षी सुमारे बारा हजार विद्यार्थी कृषी पदवी घेऊन बाहेर पडतात. त्यातील फक्त दोन हजार विद्यार्थ्यांना नोकरी लागते अन् उरलेल्या दहा हजार विद्यार्थ्यांपैकी बहुतांशी विद्यार्थी हे पुणे, मुंबई आणि दिल्लीसारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दिसतात. ही वस्तुस्थिती आहे, हे आम्हाला नाकारता येणार नाही.
स्पर्धा परीक्षा करणार्‍या माझ्या मित्रांना इतकंच सांगायचं आहे की, स्पर्धा परीक्षा करायची आहे तर करा पण ठराविक वर्षे त्यासाठी द्या आणि त्यावर्षात आपण स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालो नाही तर निराश न होता त्यातून लवकर बाहेर पडा. ज्या कोणत्या शाखेचं तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणासंबंधीचा व्यवसाय किंवा नोकरी करा. स्पर्धा परीक्षेला दुसरा पर्याय असू द्या! तो पर्याय मात्र तुम्हाला जे काही येतंय (कौशल्य किंवा कला), ज्यामध्ये तुम्ही पारंगत आहात त्यामध्येच सर्वोत्कृष्ट बनायचा तुम्ही प्रयत्न करा. असा विचार आत्महत्या केलेल्या डॉ. विकास बोंदर या स्पर्धा परीक्षा करणार्‍या विद्यार्थ्याने केला असता तर कदाचित तो त्याच्या भागातील चांगला डॉक्टर होऊ शकला असता किंवा त्याच्याही पुढे जाऊन डॉ. आमटेंसारखं कार्य करू शकला असता. स्पर्धा परीक्षेकडे न वळता घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून नोकरी-व्यवसाय करणारे काही कमी नाहीत. वयाच्या वीशी-पंचवीशीमध्ये कथाकार, कादंबरीकार आणि कवी असणारे, साहित्यिक क्षेत्रात लेखक म्हणून स्वत:चा ठसा उमटविणारे सागर कळसाईत, हणमंत कुराडे, सागर सुरवसे, स्वप्निल कुलकर्णी, व्यंकटेश कल्याणकर यांसारखे लेखकसुद्धा आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी हा देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करण्याच्या पात्रतेचा जरूर आहे. गरज आहे ती त्यांनी स्वत:ला ओळखण्याची आणि व्यवस्थेने त्यांची दखल घेण्याची. फक्त अधिकारी होऊन समाजसेवा करता येते किंवा समाजाचे प्रश्‍न सोडवता येतात या भोळ्या आशेतून अलिप्त व्हा, हीच विनंती! 

-अर्जुन नलवडे, 'मासिक 'चपराक', पुणे 
संपर्क : ७३८५६११३५३  


‘चपराक’च्या ऑगस्ट 2016 च्या अंकातील ‘स्पर्धा परीक्षा एक संसर्गजन्य रोग’ या लेखावर आलेल्या वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया-

फक्त क्लासवालेच
खलनायक नाहीत!

अतिशय उत्तम लेख. स्पर्धा परीक्षांचे मायाजाल फारसा अतिरेक न करता उत्तम प्रकारे उलगडले आहे. स्पर्धा परीक्षेची दुसरी बाजू सांगायचा सहसा प्रयत्न कुणी केल्याचे वाचनात आलेले नाही. स्पर्धा परीक्षा मंडळ, त्यांचे परीक्षांचे घोळ, रिझल्ट्सची अनिश्चितता, पास झालेल्यांच्या नियुक्त्यांमधील दिरंगाई, पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द होणे इत्यादी अनेक मुद्दे यातून सुटले आहेत. केवळ क्लासवालेच यात खलनायक नाहीत तर शासन व्यवस्था व यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. मंडळेसुद्धा तितकीच जबाबदार आहेत, हेही विसरून चालणार नाही.
-श्रीकांत गिरजे


स्वप्ने विकणारेही कमी नाहीत...
न झेपणारी स्वप्नं जोपर्यंत आपण विकत घेण्यासाठी हट्ट करु तोपर्यंत अशी स्वप्ने विकणारेही कमी होणार नाहीत... या विषयाला ऐरणीवर आणल्याबद्दल संपादक व टीमचे आभार.
-संतोष घोंगडे

भीषण वास्तव माहीत नव्हते
अतिशय उत्तम लेख. डोळ्यात झणझणित अंजन घालणारा. स्पर्धा परीक्षेमागील हे भीषण वास्तव खरंच माहीत नव्हते. अर्जुनच्या लिखाणाला मनापासून दाद द्यावीशी वाटते.
-अरूण कमळापूरकर


डोळे उघडल्याबद्दल धन्यवाद
लेख खुपच छान आहे. मी कालच माझ्या मुलाला, तो मेडिकलच्या पहिल्या वर्षाला आहे, त्याला ह्या परीक्षांविषयी जाणून घ्यायला सांगितले; परंतु लेख वाचल्यानंतर वाटतंय त्यापेक्षा तो कुठेतरी टेबल-खुर्ची टाकून प्रॅक्टीस करेल तरी चालेल. खरंच खूप भयानक आहे हे सगळं. तसेच लेखात पेपरफुटीबद्दल काही लिहिलं नाही, ती पण एक शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद डोळे उघडल्याबद्दल...
-अरूण वाणी

बेरोजगारी हेही एक कारण
विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षाकडे वळतात, याचे प्रमुख कारण बेरोजगारी हे आहे. या मुद्द्याचा तुम्ही कुठेच उल्लेख केला नाही.
-विशाल  डोईफोडे

व्यवसायाला प्रवृत्त करा
खरंतर आपण आणि आपली मुले व्यवसाय करायला घाबरतात. सर्वच जर नोकरीच्या मागे लागले तर कसे होईल? मुलांना व्यवसाय करायला प्रवृत्त करा. तो लहान व्यवसाय का असेना; पण सुरूवात तर करा.
-संतोष नगरे

विद्यार्थ्यांबद्दल एकांगी बाजू
विद्यार्थ्यांबद्दल एकांगी बाजू मांडलीय. 2-3% विद्यार्थी तुम्ही म्हणताय तसे सारसबाग, झेड ब्रीज, टेकडी इकडे आढळत असतीलही... परंतु हा अपवाद आहे आणि अपवाद कधीही नियम होत नसतो. उलट बाजूला Aहॉटेल्स इत्यादी ठिकाणी काम करून, एकावेळेसची मेस लावून अभ्यास करणारी कित्येक मुलं आहेत आणि पोस्ट नाही मिळाली तरी ती व्यक्ती कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात त्याचा ठसा उमटवतेच हे मागील 6-7 वर्षाचे निरीक्षण आहे. राहिला प्रश्‍न जीवघेण्या स्पर्धेचा, तर आज स्पर्धा कुठे नाही ते सांगा... बाकी क्लासेसवाल्यांबद्दलचे मत बर्‍याच अंशी सत्य आहे.
-विशाल नाईकवडे

स्पर्धा परिक्षा केंद्रांचाही बाजार
जे दिसतंय ते लेखकांनी मांडले आहे आणि वास्तव जे आहे ते स्वीकारले पाहिजे. पूर्वग्रहदुषितपणे लिहिले असते तर फक्त एक बाजू लिहिली गेली असती. उद्देश प्रामाणिक आहे. आता हे परखड वाचायची सवय ज्यांना नाही त्यांना पूर्वग्रहदुषित आहे असे वाटेलही. सत्य आहे ते त्यांनी मांडले आहे. शिक्षणाचा बाजार तर झालाच आहे पण आता स्पर्धा परिक्षाकेंद्रांचाही बाजार झाला आहे, हे शंभर टक्के मान्य करतो.
-स्वप्निल करळे

मृगजळाच्या मागे धावू नका
खूप मस्त लेख लिहिला आहे. खूप अभ्यासपूर्ण. विद्यार्थी, पालक, क्लासेसवाले, विद्यार्थ्यांची स्वप्नं, त्यांची होणारी घुटमळ आणि हातातून निसटून गेलेली ती उमेदीची आठ-दहा वर्षे, त्यातून आलेलं नैराश्य व नैराश्यातून घेण्यात आलेला टोकाचा निर्णय. मित्रांनो स्पर्धा परीक्षा जरूर द्या पण अशा मृगजळाला भुलू नका. शंभरपैकी मटका तिघांनाच लागतो त्याचप्रमाणे स्पर्धा परिक्षांचं. त्याच्या किती आहारी जायचं किंवा नाही हे ज्याचं त्यानं ठरवावं. अर्जुन तू वास्तवाची जाण या लेखातून करून दिली; पण सत्य नेहमी कटू असतं. त्याची जाणीव काहींना करून घ्यायचीच नसते; पण असं करत असताना आपला मौल्यवान जीव गमावू नका. आपल्या आईवडिलांचा एकदा तरी विचार करा. अर्जुनचं एक वाक्य ‘ह्यांचे मार्क आपलं भवितव्य ठरवू नाही शकत.’ तसंच स्पर्धापरीक्षांचं. तुमचं ते भवितव्य नाही ठरवू शकत. नीट विचार करा. अपयश आलं तरी नवीन जोमाने आपल्याला जे चांगल्या प्रकारे जमतंय ते शिक्षण घ्या. उगीच अट्टाहास करत बसू नका. आपली योग्य दिशा आपणच ठरवा. मृगजळाच्या मागे धावू नका...
-पवन घटकांबळे

कष्ट करा यश मिळणार
खरं आहे... पण हेही खरं आहे की योग्य मार्गदर्शन करणारे असतील अन् कष्ट करण्याची तयारी असेल तर यश मिळणारच... काहीच न करता तुम्ही यशाची अपेक्षा ठेवत असाल तर एक पंचवार्षिक काय दोन-तीन पंचवार्षिकमध्येेसुद्धा यश मिळणार नाही... मुळात आतून इच्छा असली... आवड असली की काहीही अवघड नाही... तुमच्याकडे मटेरीयल तर खूप असतं... एसी लायब्ररीसुद्धा असते पण तुमचा बहुतेक वेळ तीन-तीन वेळा चहा-नाश्त्याला जात असेल तर काय बोलावं... आणि याची कारणे तर खूप मजेशीर आणि तेवढीच राग आणणारी असतात... काय तर म्हणे ’बोअर झालं रे खूप’... अरे तुझा बाप तिकडं न थकता दिवस-रात्र कामं करुन तुला पैसा पाठवतो तो यासाठी का रे... त्या बापानं मलाही बोअर होतंय म्हणून दोन दिवस सुट्टी घेतली तर घर चालेल का... महिन्याच्या एक तारखेला पैसे आले नाही तर रागाने तिळपापड होतो या स्पर्धा परीक्षाविरांचा... दर रविवारी मेसला सुट्टी म्हणून नाही त्या जेवणाची मजा लुटणार्‍या या पोराला बाप शिळी भाकरी जेवून झोपलाय हे जोपर्यंत जाणवणार नाही तोपर्यंत हे असंच चालत राहणार...
सर तुम्ही एक बाजू मांडलीत पण हीसुद्धा स्पर्धा परीक्षेची एक बाजू आहे... कष्ट करा यश मिळणार आणि समजा काही कारणाने जमलं नाही तर हा अभ्यास इतका उपयोगी आहे की व्यक्तिमत्त्व समृद्ध होऊन जाईल...
-महेश कुंभार

लेखनप्रवास असाच सुरु राहो
अर्जुन तुझा लेख पूर्ण वाचला. वाचताना मन सुन्न झालं. कारण वास्तव मांडताना तुझ्याकडून जी उदाहरणे दिली गेली ती खरोखरच अप्रतिम आणि वास्तवतेला धरूनच आहेत. तुझा हा लेखन प्रवास बघितल्यानंतर मनाला समाधानही वाटलं आणि अभिमानही. तुझा हा लेखनप्रवास असाच सुरु राहो, ही अपेक्षा...
-तुकाराम कुंभार


मासिक 'साहित्य चपराक', पुणे