महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आणि सुप्रसिद्ध कवी, लेखक बंडा जोशी यांची 'साहित्य चपराक' दिवाळी अंकातील ही कथा अवश्य वाचा.
(पूर्व प्रसिद्धी : 'साहित्य चपराक' दिवाळी अंक २०१७)
‘‘येऊ का सरला वहिनी?’’
‘‘या या वसंतराव, अहो आम्ही सगळे तुमचीच वाट पाहत होतो.’’ वसंतराव आत आले. सोफ्यावर बसले. सरलाताईंनी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही जाऊन आलात कुलकर्ण्यांकडं? काय म्हणाले ते?’’
‘‘वहिनी इथंही तीच अडचण आली. बाकी त्यांना दीपा पसंत आहे; पण तिचं मूल पदरात घ्यायला ती मंडळी तयार नाहीत!’’
सरलाताई उदास झाल्या. दीपा त्यांची धाकटी मुलगी. तिच्या नवर्याच्या निधनानंतर तिच्या दुसर्या लग्नासाठी त्या खटपट करत होत्या. सरलाताईंचेही आता वय झाले होते. आयुष्यभर खस्ता काढून, त्यांनी प्रपंच केला होता. त्यांच्या पतीच्या घरची थोडीफार शेतीवाडी होती. त्यावर त्यांची गुजराण चालायची! त्यांचे पती शेतीची सगळी कामं जातीनं लक्ष घालून करायचे. सरलाताईंना दोन मुली थोरली प्रभा आणि धाकटी दीपा. दोघी शाळेत जात होत्या. दोघीही जात्याच हुशार होत्या. आपल्याला शिकता आले नाही, पण पोरींना खूप शिकवायचा सरलाताईंचा निर्धार होता. त्यांच्या यजमानांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारांसाठी शहरात नेण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. सरलाताईंवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातूनही त्या सावरल्या. लेकींसाठी कंबर कसून उभ्या राहिल्या. गडीमाणसांकडून शेती करून, त्यांनी प्रपंच पुढे रेटला. प्रभा आणि दीपा दोघींना शहरातल्या कॉलेजमध्ये घातलं. दोघीही पदवीधर झाल्या.
पुण्यातले चांगले स्थळ पाहून थोरल्या प्रभाचे त्यांनी लग्न लावून दिले. प्रभाचा पती संजय सरकारी नोकरीत कनिष्ठ पदावर होता. पगार बेताचाच होता; पण पुण्यात त्याचा छोटासा फ्लॅट होता. प्रभा सुखानं नांदू लागली. वर्षा-दोन वर्षात तिला मुलगा झाला. त्याचे नाव ठेवले अजय.
धाकट्या दीपासाठीही सरलाताईंनी चांगलं स्थळ पाहिलं. इकडून-तिकडून पैसे जमवून तिचे लग्न केले. दीपाचा नवरा शैलेश खाजगी नोकरीत होता. त्याचीही परिस्थिती यथातथाच होती; पण दीपा त्याचा प्रपंच टुकीने करत होती. वर्षभराने त्यांना गोंडस मुलगा झाला. मुलाचे नाव ठेवले सुमेध. सारे काही ठीक चालले होते; पण दुर्दैव आड आलं. मंदीमुळे शैलेशची कंपनी डबघाईला आली. कंपनीकडून त्याला सक्तीची रजा देण्यात आली. निराशेच्या भरात त्याला वाईट संगत लागली. सिगारेट, दारू, अंमलीपदार्थ यांच्या तो पुरता आहारी गेला. त्यातच तो आजारी पडला आणि वारला.
सरलाताई, प्रभा, तिचा पती संजय या सार्यांनी दीपाला धीर दिला. शैलेशची कर्जे फेडण्यासाठी दीपाला राहता फ्लॅट विकावा लागला. मग ती आणि मुलगा सुमेध दोघांनाही संजय-प्रभाने आश्रय दिला. सरलाताईंची प्रकृतीही बरी नसे. त्यामुळे गावातले घर, शेतीवाडी विकून त्यांनी झालेली कर्जे फेडून टाकली. प्रभाने आईला आपल्या घरी ठेऊन घेतले. त्यात आता दीपा आणि तिच्या मुलाची भर पडली. त्यामुळे दीपाचे दुसरे लग्न करण्यासाठी सरलाताई धडपडत होत्या, पण यश येत नव्हतं. अनेक स्थळे पाहिली पण दीपाच्या मुलासह तिला स्वीकारायला कुणी तयार नव्हतं. या कुटुंबाचे स्नेही वसंतराव दीपासाठी कितीतरी उंबरठे झिजवत होते, पण होकार मिळत नव्हता. प्रभाची परिस्थितीही ओढग्रस्तीची होती. त्यामुळे तिच्यावर भार टाकून किती दिवस रहायचे, हाही प्रश्न दीपासमोर होता. दीपाचा मुलगा सुमेध हा अजयबरोबर शाळेत जात होता. मुलासह दीपाला स्वीकारणारे समजूतदार स्थळ मिळावं, यासाठी सरलाताई प्रयत्न करत होत्या. कारण दीपाचे लग्न ही त्यांच्या समोरची मोठी समस्या होती.
आता पुढं काय? असा त्या विचार करत होत्या. तेवढ्यात वसंतराव म्हणाले, ‘‘सरलाताई आणखी एक स्थळ आहे नागपूरचं. अनूज देशपांडे हे मुलाचं नाव. नागपूरला मोठा बिझनेस आहे त्याचा. बंगला, गाडी, नोकर-चाकर सगळं आहे.’’ पहिल्या पत्नीपासून त्याचा घटस्फोट झालेला आहे. फक्त दीपाला नागपूरला जावं लागेल!’’
’’चालेल हो वसंतराव, तुम्ही पहा तर खरं!’’ वसंतरावांनी अनूज देशपांडेला फोन केला. तो पुण्यात आला. त्याच्या नातेवाईकांच्या घरी त्याने दीपाला आणि सरलाताईंना बोलावून घेतलं. यावेळी मात्र सरलाताई दीपाच्या मुलाबाबत काही बोलल्या नाहीत. घरी आल्यावर दीपाने त्यांना विचारले तर त्या म्हणाल्या,’’त्यांची पसंती देऊ दे मग बघू!’’
अनूजची पसंती आली. दीपा म्हणाली, ‘‘आई त्यांना मुलाची जबाबदारी घेण्याविषयी सांगायला पाहिजे.’’ यावर वसंतराव म्हणाले, ‘‘हे बघ दीपा पुन्हा पुन्हा आपण त्याच मुद्यावर अपयश घेत आहोत. तुम्ही विचार करावा असे मला वाटते. दीपाच्या मुलाबाबत आपण आता काहीच बोलायला नको. इथे अजयबरोबर सुमेध शिकतो आहे. त्याची काळजी संजय, प्रभा घेतच आहेत. तू चिंता करू नको. लग्नानंतर तुम्हा दोघांचा प्रपंच मार्गी लागला, प्रेम आणि विश्वास निर्माण झाला की मग, तू अनूजला सगळी परिस्थिती समजावून सांग.’’
‘‘नाही काका, हे मला योग्य वाटत नाही. ही चक्क फसवणूक होईल.’’
‘‘अगं आपण त्यांना फसवणार नाही, खरं ते सारं सागणारचं आहोत, फक्त काही काळानंतर! एकदा तुमच्या दोघांचं नातं दृढ झालं की काही प्रश्न येणार नाही. आता अनूजला पहिल्या पत्नीपासून झालेलं मूल असतं तर तू स्वीकारलचं असतं ना!’’
‘‘हो काका!’’
‘‘मग झालं तर! आता यामध्ये थोडा धोका आहे, पण त्याला पर्याय नाही! नंतर परिस्थिती सांगितली तर अनूज समजून घेईल. मला तरी तो समजूतदार वाटतोय!’’
सरलाताईंनी वसंतरावांच्या सुरात सूर मिसळला. ’’अगं पोरी इकडे आड तिकडे विहीर, असं झालयं बघ. खरं सांगावं तरी धोका, खोटं बोलावं तरी संकट! तूच ठरव काय ते! परत परत त्याच दगडावर डोकं आपटत रहायचं का? प्रभाची-संजयरावांची परिस्थिती ही अशी. तू बघतेच आहेस. वर मी त्याच्या आश्रयाला. माझं सगळं ते करतायत. शिवाय वर्ष दोन वर्ष सुमेधचीही जबाबदारी सांभाळायला ते तयार आहेत. एवढं ते करतायत हेच खूप आहे. आता त्यांच्यावरचं तुझं ओझं थोडं तरी उतरवणं तुझ्याच हातात आहे. बघ बाई!’’
दीपाला हे पटत नव्हतं, पण सगळीकडून तिची कोंडी झाली होती. अखेर तिने हा जुगार खेळायचे ठरवले.
ती लग्नाला तयार झाली. लग्नाआधी अनूज तिला भेटायला पुण्याला आला. एका हॉटेलमध्ये ते भेटले. अनूजने तिला पहिल्या पत्नीशी घटस्फोट का झाला हे सविस्तर सांगितले, ‘‘अगं पदोपदी ती खोटं बोलायची. त्याला काही कारणही असायचं नाही. शिवाय कमालीचा उद्धटपणा, आईबाबांना विनाकारण उलट बोलायची, त्यांचा अपमान करायची. सतत लपवाछपवी, दिशाभूल घरात रोज भांडणं! मी कंटाळलो. अखेर घटस्फोटाशिवाय पर्यायच राहिला नाही! मला खोटेपणा आणि फसवाफसवीची विलक्षण चीड आहे!’’
दीपा चपापली, पण तिने चेहर्यावर काही दाखवले नाही. म्हणाली, ‘‘तसंच काही कारण असेल तर व्यवहारात थोडं खोटं बोलायला लागतं. कारण परिस्थितीच तशी असते.’’
‘‘मला नाही पटत. प्रामाणिकपणासाठी वाटेल ती किंमत मोजायची तयारी हवी. खोट्यातून आणखी खोटं अशी मालिका तयार होते. तिला अंत नसतो.’’
दीपाला काही सुचेना मुलाबाबत आपण बोलावे की नाही, हे तिला कळेना. हे लग्न मोडले तर घरच्यांना आणखी त्रास सहन करावा लागणार आणि खोटे बोलणे अनूजला आवडणार नाही.
तिची मनस्थिती द्विधा झाली; पण अनूजच्या एकूण व्यक्तिमत्त्वावरून तो आपल्याला कधीतरी समजावून घेईल, एवढा विश्वास मात्र तिला वाटला. तेवढ्यात तो म्हणाला, ‘‘तुला काही सांगायचं असेल तर स्पष्टपणे सांग हं!’’
दीपाने तिची कर्मकहाणी सांगितली. फक्त मुलाचा उल्लेख सोडून! ‘‘आईची तब्येत बरी नसते. लग्नानंतर अधूनमधून पंधरा-वीस दिवसांनी तिला भेटून जायची इच्छा आहे.’’
‘‘अगं साहजिक आहे. तुला असं वाटणं! ती व्यवस्था करता येईल. नाहीतर आपण त्यांना नागपूरला रहायला बोलावू’’ अनूज म्हणाला.
‘‘सध्या तसं काही नको. काही दिवसांनी बघू.’’
‘‘ठीक आहे. प्लेननं येऊन एक-दोन दिवस आईला भेटून परत येत जा!’’ अनूज म्हणाला. आईच्या निमित्ताने अधूनमधून पुण्याला येऊन सुमेधला भेटता येईल, असा विचार दीपानं केला होता.
नागपूरला अनूजच्या घरच्यांनी लग्नाची सगळी जबाबदारी घेतली. छोट्याशा हॉलमध्ये साध्या समारंभात अनूज-दीपाचं लग्न झालं. अनूज, त्याचे आईवडील, ते सारे कुटुंब अतिशय प्रेमळ आणि समजूतदार होते. काही दिवसातच दीपा त्या घरात रमली. देशपांडे कुटुंब नागपूरमधल्या प्रतिष्ठीत सधन कुटुंबापैकी एक होते. त्यामुळे पै-पाहूणे, आला गेला, सार्यांचा पाहूणचार दीपाला करावा लागे. ती हौसेने सगळे करी. त्या आघाडीवर दीपाने चांगला जम बसवला. तिच्या सासूबाईंची जबाबदारीही हलकी झाली. दीपाच्या मनमिळावू स्वभावामुळं तिने सार्यांना आपलेसे केले.
अनूजला साहित्य, संगीत, नाट्य अशा कलांची खूप आवड होती. त्यामुळं नाटकं, चित्रपट, संगीताचे कार्यक्रम यांना तो दीपासह हजेरी लावत असे. दीपालाही या सार्यात रस होताच. त्यानिमित्ताने मोठमोठे साहित्यिक, कलावंत यांच्याशी परिचय होई. अनूज त्यांना आपल्या बंगल्यावर खास गप्पांसाठी बोलवत असे. दीपाही त्यांच्या गप्पांमध्ये सहभाग घेई.
सारे काही दृष्ट लागण्यासारखे सुरू होते; मात्र दीपाच्या मनात एकच भीती होती, खंत होती. ‘आपल्या पोराबद्दल, सुमेधबद्दल अनूजला कधी सांगायचं? सांगितलं तर त्याची प्रतिक्रिया काय होईल?’ त्याला खोटेपणा, फसवाफसवी अजिबात खपत नाही, असं तो म्हणाला होता, याची तिला पुन्हा पुन्हा आठवण होत होती. अधूनमधून ती विमानानं पुण्याला यायची. एक-दोन दिवस प्रभाकडे राहून सुमेधला भेटून जायची. आई नोकरीसाठी नागपूरला जाते, असे त्याला सगळ्यांनी सांगितले होते. प्रत्येक वेळी तो ’आई मला नागपूरला केव्हा नेणार?’ विचारायचा. दीपाला भरून यायचं. ‘‘थोडे दिवस थांब राजा! मी तुला नक्की नेईल,’’ अशी ती त्याची समजूत काढायची.
त्यानंतर दीपाला दिवस गेले. सासूसासर्यांनी दीपाचे भरपूर कोडकौतुक केले. यथावकाश दिवस भरल्यावर दीपाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. देशपांडे कुटुंबियांमध्ये आनंदीआनंद झाला. मुलीचे थाटामाटात बारसे केले. तिचे नाव ठेवले स्नेहा. बारशाला दीपाची आई सरलाताई आवर्जून आल्या होत्या. आता तरी अनूजला सुमेधबद्दल सांगावं का, याविषयी मायलेकींमध्ये चर्चा झाली. ‘‘मला भीती वाटते बाई. सारा डाव फिस्कटायला नको. अजून एखादं वर्ष जाऊ दे!’’
दीपा म्हणाली, ’’आई मला घुसमटल्यासारखं वाटतं गं! काय करू? एकदा वाटतं अनूज सगळं समजावून घेईल, तर दुसरीकडे तू हे आधीच का सांगितलं नाहीस म्हणून टोकाला जाईल असं वाटतं. कारण त्याला खोटेपणाची भयंकर चीड आहे. काय करू गं?’’
बघता-बघता दीपाच्या लेकीचा स्नेहाचा पहिला वाढदिवस जवळ आला. अनूजनं तो थाटामाटात साजरा करायचं ठरवलं. नागपूरमधल्या उच्चभ्रू हॉटेलमधल्या प्रशस्त हॉलमध्ये वाढदिवसाचे आयोजन केले होते. हॉलला लागून पाहूण्यांसाठी खोल्या होत्या. नागपूरमधली अनूजची नातेवाईक, स्नेही मंडळी, लेखक, कलावंत, पत्रकार सगळी मंडळी वाढदिवसाला आवर्जून उपस्थित होती. दीपाची मोठी बहीण प्रभा, संजय आणि सरलाताई तिघंही वाढदिवसासाठी नागपूरला आले ते थेट हॉलवरच.
‘‘आई तू आलीस?’’ दीपा धावतच गेली. सरलाताईंना भेटली. सगळ्यांना एका खोलीत घेऊन गेली. दीपानं सरलाताईंना विचारलं, ‘‘आई सुमेध कसा आहे? कुठं ठेवलंय त्याला?’’ सरलाताईंचा गळा दाटून आला. तरी सावरून त्या म्हणाल्या, ‘‘अग छान मजेत आहे तो. तो आणि अजय दोघं संजयरावांच्या भावाकडं रहायला गेलेत. त्यांचा मुलगा हृषिकेश या दोघांच्या बरोबरचा आहे. मस्त रूळलाय तो तिथं! तू नको काळजी करू!’’ दीपाचे डोळे भरून आले. एवढ्यात बाहेरून कुणीतरी दीपाला हाक मारली. ती डोळे पुसून लगबगीनं बाहेर गेली. वाढदिवसाची पार्टी अगदी रंगात आली होती. हास्यविनोद, गप्पागोष्टींनी हॉल निनादून गेला होता आणि अचानक दीपाची पुण्यातली जुनी मैत्रीण शैला समोरून आली.
‘‘अगं दीपा तू? तू मिसेस देशपांडे?’’
‘‘हो! अगं तू कशी नागपूरमध्ये?’’
‘‘अगं मी लग्न झाल्यापासून नागपूरमध्येच आहे. हे माझे मिस्टर शेखर गायधनी! अलीकडेच त्यांची तुझ्या नवर्याशी मिस्टर देशपांडेंशी ओळख झाली; पण मला नव्हतं माहीत की तू मिसेस देशपांडे आहेस ते!’’
दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. अनूज आणि शैलाचा नवरा शेखर हे शेजारीच पाठमोरे बोलत उभे होते. शैलाला दीपाचा पहिला नवरा, तिचा मुलगा सुमेध हे सारे माहीत होते. तरी तिने तो विषय काढला नाही. त्यामुळे दीपाला हायसे वाटले; पण अचानक शैला म्हणाली, ‘‘अगं तुझा पोरगा सुमेध कुठे आहे गं? मोठा झाला असेल ना?’’ दीपाच्या काळजात धस्स झालं. शैलाला ओढत ती बाजूला घेऊन गेली आणि ‘सुमेध मोठ्या बहिणीकडे पुण्यात शिकायला आहे’ असं तिने तिला सांगितले. पाठीमोर्या अनूजनं शैलाचं बोलणं ऐकलं असेल तर? दीपाला ब्रम्हांड आठवलं.
एवढ्यात अनूजने तिला हाक मारली, ‘‘दीपा मीट माय फ्रेंड अँड कलिग सागर! ऑफिसमधला माझा उजवा हात! सगळं ऑफिस सांभाळतो म्हणून मी तुला वेळ देऊ शकतो. त्याला थॅक्यू म्हण.’’ दीपाचा जीव भांड्यात पडला. औपचारिक बोलून ती परत आली. शैलाला तिने सारे समजावून सांगितले. ती ’सॉरी... सॉरी...’ म्हणत पार्टीत मिसळली. दीपाने जाऊन लेकीला कडेवर घेतले. पार्टीत सारे तिचे, तिच्या लेकीचे कौतुक करत होते. तिला प्रेझेंट्स देत होते. ती वरवर हसत होती, पण तिचे सारे लक्ष मात्र अनूजकडे होते. तो अगदी नेहमीप्रमाणे आनंदात मजेत वावरत होता. मित्र-मंडळींशी हास्यविनोद करीत होता. तिचा जीव भांड्यात पडला. पार्टी संपली. पुढले दोन दिवस दीपा अस्वस्थ होती; पण अनूजने तिला काही विचारले नाही किंवा त्याच्या वागण्यातही काही फरक पडला नाही. दोन दिवसांनी अनूजला कामानिमित्ताने मुंबईला जायचे होते. दीपानं विचारलं, ‘‘परत केव्हा येणार?’’
‘‘अगं दोन दिवसांनी शनिवारी!... रविवारी तुझा वाढदिवस आहे. माझ्या लक्षात आहे दीपा.’’
‘‘हो पण तो घरच्या घरीच करायचा, पार्टी बिर्टी काही नको.’’
‘‘ओके डार्लिंग, ओके.’’
अनूज मुंबईला गेला. शनिवारी अनूजला दीपाचा फोन आला. ‘‘डार्लिंग, आज नाही येऊ शकत. उद्या सकाळी महत्त्वाची मिटींग आहे. ती आटोपून उद्या दुपारी नागपूरला पोहचतो.’’
रविवारी दुपारी दीपा अनूजची वाट पहात होती. तिच्या सासूसासर्यांनी वाढदिवसाची छान तयारी केली होती. एवढ्यात अनूजचा फोन आला.
‘‘दीपा, अगं प्लेन लेट आहे. संध्याकाळी सहापर्यंत घरी पोहचेन असं वाटतं.’’ सगळेजण अनूजची वाट पहात बसले. सहा वाजले विमानतळावरून अनूजला घेऊन गाडी दारात येऊन थांबली. दीपा आतल्या खोलीत छोट्या स्नेहाचे आवरत होती.
‘‘दीपा लवकर बाहेर ये. तुझ्यासाठी वाढदिवसाची खास भेट आहे लवकर ये!’’
दीपा धावतच बाहेर आली आणि समोरचं दृश्य पाहून ती थक्क झाली! तिने डोळे विस्फारले. अनूजच बोट धरून दारात तिचा पोर सुमेध उभा होता. ‘‘आई’’ असे म्हणून धावत येऊन तो दीपाला बिलगला. दीपाला काय करावं काही सुचेना. अनूज म्हणाला, ‘‘दीपा, दीपा कुल डाऊन. शांत बैस सगळं सांगतो. अगं पार्टीत शैला म्हणाली ते मी ऐकलं होतं; पण मी तुला तसं बोललो नाही. म्हटलं आधी शहनिशा करावी. म्हणून लगेच पुण्याला जाऊन तुझ्या आईला भेटलो. त्यांनी मला सगळी परिस्थिती सांगितली. ज्या परिस्थितीत तुला मनाविरूद्ध खोटं बोलावं लागलं ते माझ्या लक्षात आलं. तेव्हाच मी ठरवलं सुमेधला आपल्या घरी आणायचं. आपल्या स्नेहाला त्याच्या रूपाने मोठा भाऊ मिळेल आणि त्याला छोटी बहीण! माझ्या आईबाबांनाही मी हे सगळं आधीच सांगितलंय. त्यांनीही आनंदानं या बेताला संमती दिलीय! आता माझे आई-बाबा, मी मुलगा-सून, नातू आणि एक नात. परफेक्ट फॅमिली झालो आहोत आपण!’’
दीपा आनंदातिशयानं, अविश्वासानं बघतच राहिली. तिच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. तेवढ्यात अनूजचे बाबा म्हणाले, ‘‘दीपा चला फॅमिली फोटो काढू या. कॅमेरा ऑटो-मोडवर ठेवून समोर ठेवतो. सगळे नीट उभे रहा. ओके स्माईल प्लीज!!!’’
-बंडा जोशी
9422010200