
आम्ही हप्त्यावर जगतो!
आम्ही हप्त्यावर जगतो! खरंच शीर्षक वाचून गोंधळात पडलात ना? म्हणाल काय बिनधास्त आहे. उघड उघड सांगते की आम्ही हप्त्यावर जगतो. अहो सत्य हे कटू असतं. खरं ते शेवटी खरंच असतं. मग नाकारायचं कशाला? म्हणून खरंच सांगते की आम्ही हप्त्यावर जगतो. ओ... पण आता लक्षात आलं की तुम्ही का दचकलात ते! अहो तुम्हाला अभिप्रेत असलेल्या हप्त्यांवर नाही मी बोलत. हप्त्यांशी संबंधित कुठल्याही खात्यात मी नोकरी करत नाही.
आम्ही साधी सरळ, मध्यमवर्गीय माणसं. हप्ता हा शब्द मी इन्स्टॉलमेन्ट या इंग्रजी शब्दाचा अनुवाद घेतला आहे.
आपण मध्यमवर्गीय माणसं धड गरीब म्हणवून घेऊ शकत नाही वा श्रीमंतीचं सोंग आणू शकत नाही. खर्च आणि जमा यांचा ताळमेळ साधताना नाकी-नऊ येतात. आपण मध्यमवर्गीय असलो तरी स्वप्ने मध्यमवर्गीयांचीच पडतील असे नाही. आपल्या स्वप्नभरार्या उत्तुंग असतात. आवश्यक वस्तुंचा तर कधी श्रीमंती थाटाच्या राहणीची हौस आपल्यालाही असतेच. मग ही स्वप्नं वास्तवात उतरवायची म्हणजे मग आपल्याला गरज पडते ती हप्त्यांची! या हप्त्यांच्या सोयीमुळेच आपली स्वप्नं वास्तवात येण्यात मदत होते.
‘घर’ प्रत्येकाचं भावविश्व! आपलं स्वत:च्या मालकीचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रत्येकाकडे स्वत:च्या मालकीचं घर असतंच असं नाही. गरीब असो वा श्रीमंत... दोघांचंही स्वप्न! पण घर बांधायचं, घर घ्यायचं म्हणजे वास्तवात महाकठीण कर्म! म्हणूनच तर म्हणतात ना ‘घर पहावं बांधून अन् लग्न पहावं करून’ लग्नाचं काय, लग्न हे नोंदणी पद्धतीने करून खर्चाला फाटा देऊन कमी खर्चात, सुधारकी थाटात करता येतं पण घराचं असं नाही. घर बांधण्यासाठी असे शॉर्टकट नाहीत. अशावेळी घराचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी आपण आधार घेतो तो कर्जाचाच. कर्ज काढून आपण आपल्या स्वप्नातल्या सारखा बंगला नाही पण किमान स्वत:चं घर म्हणून दोन छोट्या खोल्या बांधू शकतो! छोटेखानी फ्लॅट घेऊ शकतो आणि आयुष्यभर कर्जाचे हप्ते फेडत राहतो म्हणजे आपण जगतो की नाही हप्त्यांवर?
घर तर झालं पण घराला घरपण नको का? घराला घरपण येतं ते माणुसकीनं, मायेनं. वस्तुंनी नव्हे. हे अगदी सत्य आहे; पण घरासाठी काही वस्तू आणाव्यात असं वाटतच. मिक्सर, फ्रीज, ओव्हन ह्या गोष्टी स्वयपाक घराच्या प्राण म्हटलं तरी चालेल. मग घरात त्याबरोबरच सोफा, टीव्हीही हवाच. ह्या गोष्टी एकदम रोख घ्यायला कशा जमणार? मग जिथे सुलभ हप्त्यावर वस्तू मिळतात अशा ठिकाणी जाऊन सुलभ हप्त्यावर वस्तू खरेदी करायच्या मग काही आवश्यक तर काही चैनीच्या वस्तू आणून आपली हौस भागवायची. पहिल्या वस्तूचे हप्ते फिटले की लगेच दुसरी वस्तू हप्त्यावर आणायची. अशाप्रकारे घेतला वसा टाकू नये... हप्त्याचा नेम चूकवू नये. हे व्रत आपण नेमाने चालवतो व हप्त्याचं चक्र चालू ठेवतो. पूर्वी म्हणायचे की ‘रीण काढून सण करू नये’ पण आता रीण काढणे हे गरज होऊन बसले आहे; मग काय जगतो की नाही आपण हप्त्यावर.
हप्त्याचा महिमा असा आहे. हप्त्यावर हल्ली काय मिळत नाही? फ्रीज, टिव्ही, वॉशिंगमशीन, स्कूटर, कार ह्या वस्तू तर मिळतातच पण आरोग्य तपासणी, कपडे, मुलांची ट्युशन फी हे सुद्धा हल्ली हप्त्यावर फेडता येतं. हप्त्याच्या महिमांपासून सर्व परिचीत आहेत. त्यामुळे ग्राहक व विक्रेता दोन्ही खूष! तळागाळातल्या लोकांमध्ये सर्व क्षेत्रात ही हप्ते योजना चालू आहे. परवा तर गंमतच झाली. दिवाळी अंकाची वर्गणी भरण्यासाठी मी एका वाचनालयात गेले तर तेथील संयोजक सांगत होते की आपल्याकडे एकदम वर्गणी न भरता हप्त्यांवर वर्गणी देण्याची सोय आहे. आहे की नाही सगळं वातावरण हप्तेमय...
अशाप्रकारे घराचा हप्ता, फ्रीजचा हप्ता, टीव्हीचा हप्ता, गाडीचा हप्ता, संगणकाचा हप्ता देत देत आम्ही हप्त्यांवर जगतो. ‘उतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये’ तसा आम्ही हा हप्ता वसा चालू ठेवतो आणि पहिल्या घेतलेल्या वस्तूचा हप्ता संपत आला की दुसरी वस्तू लगेच हप्त्याने घेतो आणि हप्ता वसा चालू ठेवतो.
हल्ली सगळंच मिळतं हप्त्यावर. वस्तू घ्या हप्त्या-हप्त्याने पण जगताना मात्र जगू नका हप्त्या-हप्त्याने... जगताना जगण्याचा निर्भेळ भरभरून आनंद घ्या.
साप्ताहिक 'चपराक' पुणे
-सुवर्णा जाधव, मुंबई

एक काळ असा होता की विचार प्रबोधनाचे साधन फक्त मुद्रित माध्यम हेच होते, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे, हे कळायला काहीच मार्ग नव्हता. मुद्रित माध्यमांची किल्ली ज्यांच्या करंगळीत लटकली होती, ते मांडतील तोच विचार आणि ते म्हणतील तीच पूर्वदिशा असे सगळे चालले होते. ही संख्या मूठभर असली तरी त्यांची सर्व प्रसारमाध्यमांवर एकाधिकारशाही होतीच. सर्वसामान्य माणसाला व्यक्त होण्यासाठी माध्यमच नसल्याने त्याचा आवाज दबून गेला होता पण संगणकाच्या साथीला इंटरनेट व मोबाईल तंत्रज्ञान आले आणि पाहता पाहता मोबाईल घराघरात पोचला. माध्यमांच्या जगतात आता इंटरनेटने क्रांती घडवून पार उलथापालथ करून टाकली आहे. मोघमपणे असे म्हणता येईल की, संकेतस्थळ, फेसबुक आणि व्हाट्सऍपने सर्वसामान्य माणसाला व्यक्त होण्यासाठी वैश्विक पातळीवर एक व्यासपीठ नव्हे तर व्यासपीठांचे दालनच उपलब्ध करून दिले आहे.
प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आणि संधी मिळाली तर सर्वसामान्य माणूससुद्धा अबोलतेचे व्रत सोडून कसा व्यक्त होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण यावेळी आंतरजालीय जगतात बघायला मिळत आहे. कांद्याच्या भावात जराशी तेजी आली आणि परत एकदा महागाई वाढल्याचा कांगावा करून सरकारवर दबाव आणण्यासाठी काही विशिष्ट शक्तीकडून प्रयत्न सुरू झाले. तशी ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही कांद्याच्या भावाने रणकंदन माजवलेले आहेच. क्वचित प्रसंगी तर केंद्रसरकारची कांद्याच्या भावाने गच्छंती केली आहे. कांद्याचा भाव वाढला तर जनमानस एकतर्फी विरोधात जाते या भयाने पछाडलेल्या तत्कालीन सरकारांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून देशांतर्गत कांद्याचे भाव पाडण्यासाठी कायमच प्रयत्नांची शर्थ केलेली आहे.
पण या वेळेस एक वेगळा चमत्कार बघायला मिळत आहे. आता कांद्याच्या भावाचा प्रश्न व त्यावरील ओरड एकतर्फी राहिलेला नाही. कांदा म्हणजे राज्यातल्या बहुतांश भागातले पीक नाही. राज्याच्या एका भागातच कांदा पिकतो. उर्वरित महाराष्ट्रातील शेतकरी कांद्याचे उत्पादक नसून ग्राहक आहेत. कांद्याच्या वाढीव भावाचा फटका त्यांनाही बसणार आहे. तरीसुद्धा शेतकरी तितुका एक एक या जाणिवेने कांद्याच्या वाढीव भावाचे हिरीरीने व तेवढ्याच ताकदीने समर्थन करणारी शेतकरीपुत्रांची एक नवी पिढी समोर आलेली आहे. आंतरजालावर वावरणार्या या नवयुवकांचा शेतकरी संघटनेशी संबंध नाही. त्यांनी शरद जोशी वाचले नाही पण त्यांच्या लेखणीतून शरद जोशींचे विचार मात्र बेमालूमपणे व्यक्त होत आहेत. आंतरजालावर काही युवक तर असेही भेटतात की राजकीय, सामाजिक कारणामुळे अथवा जातीद्वेषी हृदयामुळे शरद जोशींबद्दल त्यांच्या मनात द्वेषाची अढी दबा धरून बसलेली आहे पण शेतीविषयक मांडणी करताना त्यांच्या मुखातून शरद जोशी यांचेच अर्थशास्त्र प्रकट होत असते. 1980 च्या दशकात शरद जोशींनी तत्कालीन सामूहिक जनमताला, शेतीच्या अर्थशास्त्राला कलाटणी देणार्या विचाराची जी बीजे ओसाड माळरानात फेकली होती ती बीजे रुजून आता त्याचा विशाल महाकाय वृक्ष तयार झाला आहे. दुसर्या शब्दात असेही म्हणता येईल की 1980 नंतर शेतीच्या अर्थशास्त्राची उत्क्रांती केवळ शरद जोशींचेच बोट धरूनच पुढे गेली आहे.
सक्तीची लेव्ही :
भारतीय शेतीच्या क्षितिजावर शरद जोशी नावाच्या सूर्याचा उदय होण्यापूर्वी सरकारांकरवी अधिकृतपणे व राजरोसपणे शेतीची क्रूरपणे लूट होत होती आणि भारतीय शेतकरी असहायपणे अंधारात चाचपडत होता. सुलतानी संकटांना टाळताही येत नव्हते आणि शासकीय धोरणाविरुद्ध लढा पुकारून मुक्ती मिळवण्याचे अंगात बळही नव्हते. शरद जोशी 1977 मध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतात आले पण त्याच्या दोनच वर्षे आधी म्हणजे 1975 मध्ये सरकारने ज्वारीवर ’सक्तीची लेव्ही’ लादली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे अन्नधान्याचा तुटवडा भासू नये व दुष्काळी परिस्थितीतही शहरातल्या मंडळींना स्वस्तात अन्नधान्य खायला मिळाले पाहिजे म्हणून ज्वारीचा खुल्या बाजारपेठेतील प्रति किलोचे भाव 1 रु 50 पैसे असताना देखील शेतकर्यांकडून सक्तीने व तेही फक्त 83 पैसे प्रति किलो भावाने ज्वारी लुटून नेली होती. दुष्काळ व नापिकीमुळे ज्या शेतकर्यांच्या शेतात ज्वारी पिकली नव्हती त्यांना घरचा इतर शेतमाल किंवा तोही नसल्यास बायकोच्या अंगावरील दागिने विकून 1 रु 50 पैसे भावाने ज्वारी बाजारातून खरेदी करून 83 पैसे प्रति किलो भावाने सरकारला देण्यास भाग पाडण्यात आले होते. आजच्या प्रत्येक मनुष्याला नवल वाटेल पण त्या वेळेस शेतकर्यांनी या जुलमी ’जिझिया करा’सारख्या क्रूर प्रकाराच्या विरोधात आवाज उठवला नव्हता, प्रतिकारही केला नव्हता; एवढेच काय, साधा निषेधही नोंदविला नव्हता. याउलट, गावातल्या आपल्या जातीच्या प्रिय नेत्याचे सरकार दरबारी वजन वाढावे म्हणून अनेक गावांतून शेतकर्यांनी लेव्हीची ज्वारी वाजत गाजत मिरवणूक काढून शासन दरबारी पोचवून दिली होती पण शरद जोशींच्या उदयानंतर पुन्हा अशी क्रूर लेव्ही आजतागायत सरकारला लावता आलेली नाही.
सक्तीची कर्जवसुली :
बँकांची सक्तीची कर्जवसुली हा प्रकार तर 1990 पर्यंत सुरू होता. सक्तीची वसुली म्हणजे एखाद्या शेतकर्यावर एखाद्या बँकेचे जर 50 हजार रुपये कर्ज असेल तर वसुली अधिकारी त्या शेतकर्याच्या घरात घुसून त्याच्या घरातली स्वयंपाकाची भांडी जप्त करायचे, झोपायचा पलंग जप्त करायचे, घरात असलेले पाचपन्नास किलो अन्नधान्य जप्त करायचे. या वस्तूंची एकूण किंमत दोन-चारशेच असायची. पण या वस्तू जप्त करून, त्याचे चावडीवर प्रदर्शन मांडून त्या शेतकर्याची पुरेपूर नाचक्की करणे, हा त्यामागचा हेतू असायचा. हे वाचताना एखाद्याला अतिशयोक्ती वाटेलही; पण सक्तीची वसुली करताना वसुली अधिकारी शेतकर्यांना ‘तुझी बायको गहाण ठेव’, ‘तुझी मुलगी रातच्याला पाठव पण आमची वसुली दे’, या भाषेत बोलायचे. शरद जोशींनी इतिहासात पहिल्यांदाच 1980 च्या दशकात कर्जवसुली अधिकार्यांविरुद्ध गावबंदी जाहीर केली आणि शेतकरीपुत्रांनी गावागावात या जुलमी वसुलीचा, प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या खाऊन व तुरुंगाची हवा खाऊन या प्रकाराचा प्रतिकार केला. त्यामुळे आता सक्तीची वसुली या प्रकाराचा देवीच्या रोगासारखाच समूळ नायनाट झालेला आहे.
रास्त भाव :
1980 च्या दशकात शेती आणि शेतीअर्थशास्त्राच्या अनेक परंपरागत संकल्पनांना फाटा देणारा विचार शरद जोशींनी मांडला. नुसताच मांडला नाही तर पिशवीत हात घालून पिशवी उलटी करून टांगावी, तसा टांगला. त्या काळी त्यांचे विचार ’बंडखोर विचार’ वाटत असले तरी आज त्या विचारास सर्वमान्यता मिळालेली आहे. त्यापूर्वी शेती तोट्याची आहे हेच कुणी मान्य करायला तयार नव्हते. शेतकरी गरीब आहे कारण तो अज्ञानी, आळशी, उधळ्या, परंपरागत शेती करणारा आहे. शेतकर्यांनी जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेती हे अत्यंत फायद्याचे कलम आहे, असा सार्वत्रिक समज होता. अशा विपरित सामूहिक मानसिकतेच्या विरोधात शरद जोशींनी पहिल्यांदाच ठामपणे विचार मांडला की, शेती हे फायद्याचं कलम नसून तोट्याचं कलम आहे आणि त्याचे एकमेव कारण शेतीत पिकणार्या मालास उत्पादनखर्चसुद्धा भरून निघणार नाही एवढे अत्यल्प भाव देण्याचे शासनाचे अधिकृत धोरण, हेच आहे. शेतीच्या तोट्याचे कारण आस्मानी संकट नसून सुलतानी संकट हेच आहे. शरद जोशी नुसतेच बोलले नाही तर पुराव्यादाखल डोंगराएवढे अधिकृत शासकीय दस्तावेज सादर केले. आपला विचारास बळकटी देण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. शरद जोशींनी मांडलेले विचार अजूनपर्यंत तरी कुणालाही खोडून काढणे शक्य झाले नाही.
शरद जोशींनी मांडलेला विचार हा अनेक चिंध्यांना एकत्र करून बांधलेलं गाठोडं नसून हा विचार म्हणजे एका धाग्याने विणलेले एकजीनसी महावस्त्र आहे. शेतकरी या देशातला बहुसंख्य घटक असल्याने शेतकर्यांच्या संघटनेने इतर संघटनांसारखा स्वत:च्या फायद्यापुरता विचार करून चालणार नाही, असा विचार शेतकर्यांसमोर बेधडकपणे मांडण्याचा कणखरपणा त्यांचेकडे असल्याने त्यांनी मांडलेला विचार बहुआयामी आहे. हा विचार म्हणजे निव्वळ शेतकर्यांना फायदा करून देणारा विचार नाही तर देश वाचविणारा आणि गरिबी हटविणारा विचार आहे. कुणाची व कशाचीही पर्वा न करताच बेधडक व्यक्त होण्याची त्यांची शैली असल्यानेच ते शासनाला, नियोजनकर्त्यांना व पगारी अर्थतज्ज्ञांना खंबीरपणे व रोखठोकपणे म्हणू शकतात की, गरिबी हटविण्यासाठी शासनाने इतर काहीही करण्याची गरज नाही. गरिबी टिकावी आणि वाढावी म्हणून तुम्ही जे जाणूनबुजून प्रयत्न करता आहात, तेवढे थांबवा म्हणजे गरिबी आपोआप हटेल.
कर्जमुक्ती :
शेतकरी कर्जबाजारी झाला तर तो त्याच्या दुर्दैवामुळे नव्हे तर शेतीत जेव्हा-जेव्हा चार दाणे जास्तीचे पिकले, भरघोस उत्पादन आले तेव्हा-तेव्हा सरकारने त्याचा शेतमाल कमीत कमी दाम देऊन स्वस्तामध्ये लुटून नेला. शेतकर्यांच्या घरात संचय होणार नाही, अशी धोरणे कूटनीती करून आखली म्हणून शेतीवर कर्जाचा डोंगर उभा राहिला. पिकलं तवा लुटलं म्हणून शेतकर्यांना सरकारचे काहीही देणे लागत नाही. सरकारने शेतकर्यांना उणे सबसिडी दिल्यामुळे शेतकर्यांवर असणारी सर्व कर्जे बेकायदेशीर आणि अनैतिक आहेत. त्यामुळे या कर्जाच्या जोखडातून शेतकर्यांना मुक्ती मिळणे, हा शेतकर्यांचा निसर्गदत्त अधिकार आहे. शेतकर्यांनी कर्जाचे सर्व दस्तावेज हिंदी महासागरात नेऊन बुडवावे आणि स्वत:च स्वत:ला कर्जमुक्त घोषित करावे, अशी साद जेव्हा शरद जोशींनी घातली तेव्हा देशातले सारेच्या सारे पक्ष शरद जोशींवर टीकेची झोड उठवून गेले. कुणी म्हणाले, ‘अशाने देशाची अर्थव्यवस्था कोसळेल.’ कुणी म्हणाले, ‘शरद जोशी शेतकर्यांना नादारीच्या मार्गाने नेत आहे. त्यामुळे शेतकर्यांची बाजारातली पत संपुष्टात येईल’, कुणी म्हणाले, ‘जोशींनी देशातील बँका बुडविण्याची सुपारी घेतली आहे.‘ या सर्वावर कहर करीत कॉंग्रेसवाले तर चक्क व्यक्तिगत पातळीवर घसरले. म्हणाले, ‘या बामणाला शेतीतलं काय कळतं? याच्या नादी लागू नका.’ तरीही शरद जोशी आणि शेतकरी संघटना कर्जमुक्तीवर ठाम राहिली; एवढेच नव्हे तर कर्जमुक्तीचा लढा आणखी तीव्र केला आणि अंशत: का होईना पण अनेकदा कर्जमुक्ती पदरात पाडून घेतली. कर्जमुक्तीचा विचार आज जनमानसात इतका खोलवर रुजला आहे की आता राजकीय पक्षांच्या अग्रणी नेत्यांनाच शेतकर्यांच्या कर्जमुक्तीची मागणी करून शरद जोशींची भाषा बोलणे भाग पडायला लागले आहे.
मार्क्सवादाला कलाटणी :
कामगारांच्या शोषणातून कारखानदारीचे भांडवलवादी साम्राज्य उभे राहते, अशी मांडणी कार्ल मार्क्सने केली. केवळ एवढ्याच एका सिद्धांतावर कामगार चळवळीचा उदय झाला. याला थेट कलाटणी देत औद्योगिक विकास कामगारांच्या नव्हे तर कच्च्या मालाच्या शोषणातून केला जातो, अशी मांडणी शरद जोशी यांनी केली. 1980 च्या दशकाआधी साम्यवाद्यांच्या लेखी शेतकरी जमीनदार आणि भांडवलदार होता. त्याचीच री ओढत समाजवाद्यांनी शेतीवर सीलिंग कायदा लादला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, शेतकर्यांना मालकीहक्क देणार्या मूळ संविधानात घटनादुरुस्ती करून परिशिष्ट 9 जोडले गेले आणि मालमत्ता बाळगण्याचा शेतकर्यांचा मूलभूत हक्कच नाकारला गेला. आज साम्यवाद परास्त झाला आहे, मात्र समाजवादाचे भूत अजूनही शेतकर्यांच्या मानगुटीवर बसलेले आहे. गेल्या काही वर्षातील शरद जोशींच्या अस्वास्थ्यामुळे समाजवाद्यांचे फावले आणि त्यांच्या येरागबाळ्या तत्त्वज्ञानाला जीवदान मिळाले. एरवी आतापर्यंत समाजवादाचाही पाडाव नक्कीच झाला असता.
मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार :
डंकेल प्रस्तावाला व जागतिक व्यापार मसुद्याला जाहीर समर्थन करून शरद जोशींनी मुक्त अर्थव्यवस्थेचा जाहीरपणे पुरस्कार केला. त्यावेळी शरद जोशी विरुद्ध संपूर्ण देश असे चित्र निर्माण झाले होते. डंकेल प्रस्तावाचे दबक्या आवाजात समर्थन करणारी काही मोजकी मंडळी होती पण जाहीरपणे बोलण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. अशा परिस्थितीत मुक्त अर्थव्यवस्थेच्या बाजूने एकट्या शरद जोशींनी एकाकीपणे लढा दिला. कालांतराने भारत सरकारलाही थढज च्या करारावर सह्या करणे भाग पडले आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार करावाच लागला. मात्र दुर्दैवाने याच काळात शेतकरी संघटनेची रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शक्ती क्षीण होत गेली आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा लाभ शेतकर्यांच्या दारापर्यंत जाऊ नये म्हणून लायसन्स-परमिट-कोटासमर्थकांनी आखलेली कूटनीती सफल झाली. परिणामत: मुक्त बाजारपेठेपासून शेतीक्षेत्र वंचित राहिले.
1980 च्या सुमारास संघटना व आंदोलने यांचे पेवच फुटले होते. उदा. कामगारांच्या संघटना, हमालांच्या संघटना, शिक्षकांच्या संघटना व त्यांचा 54 दिवस चाललेला संप, गिरणी कामगारांचा 6 महिने चाललेला प्रदिर्घ संप, खलिस्तानचे आंदोलन, आसामचे आंदोलन, काश्मीरचे आंदोलन, बोडोलँडचे आंदोलन वगैरे वगैरे. 1980 मध्ये तामिळनाडूमध्ये नारायणस्वामी नायडूंनी आणि 1990 च्या सुमारास उत्तर प्रदेशात महेंद्रसिंह टिकैत यांनी शेतकरी आंदोलन उभे केले होते. टिकैताचे आंदोलन काही काळ गाजले पण अल्पायुषीच ठरले. अशा प्रकारे काळाच्या ओघात सार्याच संघटना व त्यांची आंदोलने केव्हाच संपून गेली; पण त्याच सुमारास सुरू झालेली व महाराष्ट्राकडे नेतृत्व असलेली शेतकरी चळवळ ही एकमेव चळवळ आहे जी अजूनही भक्कम पायावर उभी आहे. याचे मुख्य कारण शरद जोशींच्या रूपाने शेतकरी आंदोलनाला मिळालेली भक्कम वैचारिक बैठक आणि द्रष्टेपण असलेले नेतृत्व होय. स्वातंत्र्यचळवळीनंतरची सर्वात मोठी चळवळ म्हणजे शरद जोशींच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलन हेच आहे.
शरद जोशींनी शेतकर्यांच्या मनात स्वाभिमानाने जगण्याचे बीजारोपण केले. ताठ मानेने व मूठ आवळून जगायचा मूलमंत्र दिला. देशातील इतर नागरिकांसारखे सन्मानाने जगता यावे म्हणून रस्त्यावर उतरून लढण्याची प्रेरणा दिली. शेतकर्यांच्या मनातील राजसत्तेची व तुरुंगाची भीती घालवली. त्याचबरोबर प्रचलित अर्थवादाला कलाटणी देऊन शेतीच्या अर्थवादाच्या उत्क्रांतीची दिशा बदलण्यात शरद जोशी शतप्रतिशत यशस्वी झालेले आहेत. महामानव, महात्मा किंवा युगपुरुष ही विशेषणेही थिटी पडावीत, एवढे त्यांचे कार्य महान आणि विचार उत्तुंग आहेत. शरद जोशी यांनी शेतकर्यांचा सूर्य बनून पिढ्यानपिढ्या दारिद्र्याच्या अंधार्या खाईत चाचपडणार्या शेतकर्यांचा मुक्तीचा मार्ग प्रकाशमय करून ठेवला आहे. या प्रकाशवाटेचा फायदा घेऊन मुक्ती मिळवायची की दारिद्र्याच्या अंधार्या खाईतच चाचपडत राहायचे, याचा निर्णय आता शेतकर्यांनी घ्यायचा आहे.
(साप्ताहिक 'चपराक' पुणे)
- गंगाधर मुटे 9730582004
निवले तुफान आता
ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही
निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही
देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही
संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही
तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे
पैकीच माळरानी रुजले तुफान काही
कमतोल पाइकांचे सेनापती जरी ते
चेतून आत्मशक्ती तपले तुफान काही
तापून षड-रिपुंनी पेटून पाहिले पण;
भट्टीतही जरा ना जळले तुफान काही
घेरून मध्यभागी केलाय कोंडमारा
नाहीच डोंगरांना नमले तुफान काही
उत्थानना बळीच्या लढले जरी ’अभय’ ते
नियतीसमोर अंती हरले तुफान आता
काळासमोर हतबल झाले तुफान अंती
हळुवारशा हवेने विझले तुफान आता
बेफाम झुंजणारे, निवले तुफान आता
निवले तुफान आता, निवले तुफान आता
- गंगाधर मुटे

पूर्वी रूपयाचा बंदा आकाराने थोडा थोराड, वजनदार असायचा. त्याला त्याच्या अगदी अरूंद कडेवर प्रयत्नपूर्वक उभं करायचं आणि पडू द्यायचं नाही असा एक खेळ आम्ही लहानपणी खेळत असू. दुसर्याचा बंदा पडला की खूप आनंद व्हायचा, मजा वाटायची, हसू यायचं; स्वतःचा पडला की मात्र मन हिरमुसलं, खट्टू व्हायचं. पुढे वय वाढलं तरी हा खेळ काही सुटला नाही; सुटत नाही. मोठेपणी हा खेळ सगळेचजण खेळत असतात. फक्त या बंद्याचं रूप तेवढं बदललेलं असतं. लहानपणीच्या धातुच्या, गोल बंद्याची जागा मोठेपणी त्याच्या स्वप्नांनी, मुल्यांनी आणि नातेसंबंधांनी घेतलेली असते. स्वप्नांचा, मुल्यांचा आणि नातेसंबंधांचा हा बंदा रूपया त्याच्या काही मी. मी. च्या अरूंद कडेवर उभा करून प्रत्येकाच्या तळहातावर अदृश्य रूपात ठेवलेला असतो. त्याला पडू न देता तोल सांभाळत चालणं म्हणजेच आयुष्य! जरा पावलं डळमळली की हा बंदा धप्पकन पडलाच म्हणून समजा. उभा असतो तोवर हलका असतो तो पण पडला की कोण जड होतो; पावलं डळमळीतच होतात चालणार्याची! वेळीच त्याला सावरून परत सरळ उभं केलं तर बरं नाही तर मग पुढे कायम भेलकांडतच राहतं जीवनाचं गाडं.
अगदी अजाणत्या वयापासूनच माणसाला स्वप्न पडायला सुरू होतात आणि आयुष्यभर ती पडतच रहातात. फक्त मोठेपणी स्वप्ने पाहण्यासाठी प्रत्येकच वेळेस झोप लागायची गरज मात्र नसते. ही स्वप्नच तर आपला चालण्याचा वेग आणि दिशा नियंत्रीत करत असतात. स्वप्ने मनात आहेत म्हणून तर जीवनाला अर्थ आहे; मनात जगण्याची ऊर्मी आहे. स्वप्ने संपली की आयुष्यातला रामही संपला. जोवर ही स्वप्ने बंद्या रूपयासारखी त्याच्या अरूंद काठावर तोल सांभाळत उभी आहेत तोवर जीवन आहे, जीवनाला अर्थ आहे. हा रूपया पडला की जीवन डळमळीत. ही स्वप्नं काहीही असू शकतात; भौतिक सुखसुविधा स्वतःसाठी, कुटुंबासाठी मिळवण्याचं स्वप्न, प्रतिष्ठा, मानमरातब मिळवायचं स्वप्न, ऊत्तुंग, भव्यदिव्य काही घडवायचं स्वप्न इत्यादी.
व्यक्तिमत्वाची ऊंची त्या व्यक्तिच्या स्वप्नांच्या ऊंचीवरून तर ठरत असते. जगण्याची, चांगलं जगण्याची ऊर्मी ही स्वप्नेच तर देत असतात. कधीतरी चालताना हा स्वप्नांचा बंदा रूपया धप्पकन खाली पडतो आणि मग सगळच डळमळीत होतं.
स्वप्नं योग्य चाकोरीतली पडताहेत, योग्य दिशेने पडताहेत तोवर जीवनही योग्य दिशेनं चालत राहतं. चुकीची स्वप्नं मनात जन्मली, त्यांचा तोल ढासळला की मग त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आटापिटा चालू होतो, पावलांचा प्रवास चुकीच्या दिशेने सुरू होतो आणि मग कडेलोट निश्चीत!
कधी हा स्वप्नांचा बंदा रूपया धप्पकन कोसळला की जगण्याचा दर्जा खालावतो; माणुस समाजासाठी आणि स्वतःसाठीही हानीकारक पद्धतीने जगायला लागतो. तर कधी जगण्यातली ऊर्मीच घालवून बसतो.
माणसाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर स्वप्नाइतकीच महत्त्वपूर्ण भूमिका त्याने जाणता अजाणता मनात जोपासलेल्या मुल्यांची पण असते. अगदी अजाणत्या वयापासून आपल्या आत कुटूंब, आपण वावरत असलेला परिवेश, वाचन अशा अनेक माध्यमातून वेगवेगळ्या मुल्यांची बीजे पेरली जात असतात. पुढे या मुल्यांची बाग आपल्या व्यक्तिमत्वात, जीवनात माणुस जोपासत रहातो. जीवनाचा सुक्ष्मपणे विचार केल्यास माणसाचं जीवन म्हणजे त्याने नकळतपणे मनात जपलेल्या सकारात्मक किंवा नकारात्मक मुल्यांची त्याने जीवनात केलेली अंमलबजावणीच तर असते. बंद्या रुपयासारखी खणखणीत, अरूंद काठावर रूबाबदारपणे, ठाम रोवून उभी असलेली मूल्ये असली की माणूस सकारात्मक, प्रशंसनीय जीवन जगतो. परंतु मनात नकारात्मक मुल्यांची साठवणूक झालेली असेल तर त्याचा प्रभाव जीवन जगण्याच्या पद्धतीवर, वर्तनावर निश्चीतच पडतो. बीजच शुद्ध नसेल तर मिळणार्या फळांचा दर्जा कसा चांगला राहील? हा मूल्यांचा बंदा कोसळला की जीवन भेलकांडतच राहतं.
माणसाची स्वप्ने, त्याने जोपासलेली मूल्ये याबरोबरच त्याचे नातेसंबंधही जीवनावर परिणाम करतात. चांगले जोपासलेले सकारात्मक नातेसंबंध ऊर्जा प्रदान करतात तर तोल ढासळलेले नातेसंबंध त्याला नामोहरमही करतात. माणसाच्या भावविश्वाशी त्याच्या नातेसंबंधांचा अगदी थेट संबंध असतो. आनंद आणि दुःख दोन्ही प्रसंगात आपली माणसे सोबत हवीत; ती नसतील तर जीवन निरस, कंटाळवाणे होऊन जाते. माणसाच्या मानसिक गरजांची पूर्तता करण्यासाठी चांगले नातेसंबंध ही मुलभूत गरज असते.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तर हा नातेसंबंधांचा बंदा रुपया तळहातावर उभा ठेवून, पडू न देता जपणे हे महाकठीण! माणूस एकतर हातातोंडाची मिळवणी करण्यात त्रस्त किंवा ‘आणखी हवे’ची हाव त्याला स्वस्थ बसू देईना. कधी नव्हे इतका माणूस आज नातेसंबंधांच्या बाबतीत बेफिकीर झालाय. त्यातून नातेसंबंधांचा मामला जरा जास्तच नाजूक. जरा कुठे तिळमात्र इकडे तिकडे झाले की हा बंदा धप्पकन कोसळलाच म्हणून समजा. लगेच सावरून उभा केला तर ठीक नाहीतर पुन्हा तो उभा टाकणे दुरापास्तच. कितीही यशोशिखरे सर केली तरी अशा दुरावल्या नातेसंबंधांच्या स्मृति मात्र काटा बनून सलतच राहतात.
तर असा हा स्वप्नांचा, मुल्यांचा आणि नातेसंबंधांचा बंदा रुपया तळहातावर वागवतच संपूर्ण जीवन वाटचाल करायची असते. कधी हा बंदा पडला की थांबायचं जरासं; करायचं त्याला सरळ उभं आणि मग पुढचा प्रवास सुरू!!
पुढच्या काही ओळी लक्षात ठेवल्या ना की हा बंदा रूपया सतत तळहातावर उभा ठेवणे सोपे जाते-
प्रत्येकाला काट्यांसोबत
काही फुले देतोच ईश्वर
उधळून द्यावा गंध थोडासा
येता जाता जीवन वाटेवर
मृत्यू तर अटळच असतो
काहीच नसते मृत्युला उत्तर
नेता नेता मृत्यूनेही
हताशपणे थांबावे क्षणभर!
(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
- विद्या बयास/ठाकुर
शिरूर ताजबंद, ता. अहमदपुर, जि.लातुर
भ्र. 9637146156
सुवर्णाक्षरे

पळवाट
उपसरपंच साहेबांची शेतीच्या कामामुळे चांगलीच ओळख झाली आणि ओळखीचं पर्यावसान मैत्रीत कधी झालं ते कळलंच नाही. एक दिवस ते म्हणाले, ‘’आता तुम्हाला माझ्या घरी यायलाच हवं. बघा तरी आम्ही किती डेव्हलपमेंट केली आहे ते!’’ त्यांच्या आग्रहाखातर आम्ही त्यांच्या घरी गेलो.
सारं प्रसन्न करणारं. घराकडे जो रस्ता जातो त्याच्या दुतर्फा छान नारळाची झाडं लावली होती. आंबा, चिक्कू, पपई सगळी फळझाडं होती पण विशेष म्हणजे डाळींबाची बाग केली होती. त्याला अर्धा-अर्धा किलोचं एक अशी पंधरा-वीस डाळींब लगडलेली. शेतात सार्या आधुनिक सोयी केलेल्या. सर्वत्र ठिबक सिंचनाने सर्व झाडांना पाणी देण्याची व्यवस्था केलेली.
कलींगड, ढोबळी मिरची यांना मल्चींग पेपर लावून घेतलेला. सगळ्या पिकांना वेळच्यावेळी खत, पाणी... पाणी कमी पडू नये यासाठी मोठी विहिर होतीच. शिवाय दोन बोर सुद्धा घेतलेल्या. त्यामुळे एकदम छान, आधुनिक शेती. सारं सारं हिरवंगार. मन खरंच खूप प्रसन्न झालं आणि इतकी शेती सांभाळायची म्हणजे गडी हवेच! पण त्यांच्या घरातली माणसेच सर्व शेतात आवडीने काम करत असल्याने गडी एकच! सिझन आला... खूप काम वाढले की प्रसंगानुसार कामावर गडी बोलवायचे. खरंच पाहून खूप समाधान झालं.
आणि केवळ शेती दाखवली असे नाही तर जेवणही अगदी झक्कास केलं. त्यांनी सांगितलं, ‘‘शेतातल्यासारखं जेवण करा.’’ रानातली ताजी भेंडी तोडून आली. भरली वांगी, मिरचीचा ठेचा, भाकरी, कांदा, सोबत रानमेवाही दिला. मनाबरोबर पोटही तृप्त झालं. सारं झाल्यावर ‘वानावळा’ म्हणून घरच्या भाज्या भेंडी, गवार, मिरची, वांगी, लिंबू, मेथीही सोबत भरभरून दिले...
निघताना उपसरपंचाच्या बायकोला, उमा वहिनींना मी सवयीनं विचारलं, ‘‘वॉशरूम कुठं आहे?’’ त्यांनी प्रश्नार्थक चेहरा केला. मी समजले आणि विचारले की, ‘‘शौचालय कुठं आहे?’’ त्या एक मिनिट माझ्याकडं पाहतच राहिल्या. मग म्हणाल्या, ‘‘त्या तिकडं, लांब आहे.’’ मी म्हटलं, ‘‘चालेल, जाऊया.’’ त्या तिकडे न्यायला अजिबात उत्सुक नव्हत्या पण मी पुन्हा म्हटले की, ‘’जाऊ या, चला...’’ तेव्हा त्या नाईलाजास्तव मला तिकडे घेऊन गेल्या. बाहेरून तर शौचालय चांगले बांधलेले दिसत होते पण त्याला कुलूप होते. शेत ह्यांचं, माणसंही इथं घरातलीच राहणारी, गडी केवळ एक, मग कुलूप का लावलं मला कळेना... तोवर उमा वहिनींनी शौचालयाचं दार उघडून दिलं... तर प्रथमदर्शनी नजरेत भरल्या त्या आधुनिक टाइल्स लावलेल्या. तोपर्यंत उमा वहिनी म्हणाल्या, ‘’थांबा जरा...’’ आणि त्यांनी बोरजवळून एक बादली भरून आणली. मी उत्सुकतेनं विचारलं, ‘‘आत पाण्याची सोय नाही? टाकीही दिसत नाही. मग तुम्ही?’’
त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही कोणीच वापरत नाही.’’ मग मी म्हणाले, ‘‘अहो, मग बांधला कशाला?’’ त्यांचे उत्तर ऐकून मला काय बोलावे तेच कळेना. त्या म्हणाल्या, ‘‘अहो, आम्ही सारे वावरात जातो पण सरकारचा फतवा निघाला ना शौचालय नसले तर फॉर्म भरता येणार नाही, म्हणून बांधून ठेवला. तेवढ्यासाठी तिकिट नको जायला.’’ म्हणजे एकप्रकारची पळवाटच वाटली मला.
यासंदर्भात टीव्हीवर विद्या बालन एक जाहिरात करते. ती खूपच बोलकी आहे. सून पाणी प्यायला घुंघट बाजूला करते तर लगेच सासरा सूचवतो, ‘आपल्याकडे असं चालत नाही.’ त्यावर विद्या बालन छान, मार्मिक प्रश्न विचारते, ‘‘घुंघटही काढलेलं चालत नाही मग सून अशी उघड्यावर शौचाला जाते तेव्हा तुम्हाला काहीच वाटत नाही...?’’ अशा आशयाची बोलकी, झणझणीत अंजन घालणारी जाहिरात...
इथं तर केवळ नियम आहे म्हणून, केवळ दाखवण्यासाठी शौचालय बांधले. याला काय म्हणावे? सारी आधुनिकता मग मला फिकी वाटू लागली.
नियम काढतात... पण पळवाटाही शोधतात. मूळ उद्देश साध्य होत नाही, हेच यावरून दिसते. यासाठी मानसिकता बदलायला हवी...
(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
- सुवर्णा जाधव, मुंबई
मुलुखमैदानी तोफ असलेल्या ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांची 12 डिसेंबर ही जयंती. या महानेत्याच्या आठवणी जागवल्या आहेत साखर क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ‘इंडियाना सुक्रोटेक पुणे प्रा. लि.’चे संचालक प्रमोदकुमार बेलसरे यांनी. साप्ताहिक ‘चपराक’मधील हा लेख अवश्य वाचा.
आम्हा साखर उद्योगात सक्रिय असलेल्यांना सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी सातत्याने संपर्क होत असतो. महाराष्ट्रात तर ‘सहकार’ गावागावात, खेडोपाडी रूजलेला. सहकाराच्या माध्यमातूनच साखर कारखाने, सुत गिरण्या, दूध संघ, सहकारी संस्था असे भव्यदिव्य प्रकल्प उभे राहिलेले. याच सहकाराच्या माध्यमातून एक साखर तज्ज्ञ म्हणून, साखर कारखान्यांचे मशिनरी उत्पादक म्हणून अनेक दिग्गजांशी गेली अनेक वर्षे मी सतत संपर्कात असतो. महाराष्ट्रातील साखर कारखानदारी आपल्या राजकीय नेत्यांच्या अधिकारात असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंगे्रस, भारतीय जनता पक्षातील अनेक नेते, मंत्री, ज्येष्ठ समाजसेवक यांच्याशी माझा परिचय आहे आणि म्हणूनच त्यांना जवळून पाहण्याची संधी देखील मला अनेकवेळा मिळाली आहे. त्याचमुळे या राजकीय नेत्यांच्या ठिकाणी असेलेले मोठेपण, कसब, त्यांची विलक्षण बुद्धिमत्ता आणि लोकसंचयाचं रहस्य माझ्या लक्षात आलंय.
असाच कामाच्या निमित्ताने सन 2007 मध्ये माझा दिवंगत ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथजी मुंडे यांच्याशी संपर्क आला होता. निमित्त होते परळी वैजनाथ येथील त्यांच्या साखर कारखान्याला यंत्रसामग्री पुरवण्याबाबत. त्यावर्षी या कारखान्याला हव्या असणार्या यंत्रसामग्रीबाबत रीतसरपणे वृत्तपत्रात टेंडर प्रकाशित झाले. त्यात आम्ही करत असलेल्या यंत्रसामग्रीचा उल्लेख असल्याने आम्ही ते टेंडर घेऊन भरून पाठवले. टेंडर मुंबईला साखर संघात पास होऊन ज्या कोणा उत्पादकाची किंमत सर्वात कमी असेल त्या निकषावर ते काम देण्यात येणार होते. एकदम पारदर्शक व्यवहार होता. प्रत्येक उत्पादकाने आपापल्या उत्पादनाची आपल्याला परवडेल अशी किंमत घालून टेंडर जमा करायचे ही सर्वसाधारण पद्धत असते. ज्या दिवशी मिटींग असते त्यादिवशी सर्वांसमक्ष टेंडर खोलून वर सांगितलेल्या निकषाप्रमाणे कार्यपद्धती होते. तरीपण हे टेंडर ओपन होण्यापूर्वी मुंडेजींची एकदा तरी भेट घ्यावी असे मला वाटले. कारण यापूर्वी मी त्यांच्या कारखान्यात कधीच काम केले नव्हते. शिवाय मला माझ्या उत्पादनाचे वैशिष्ट्य त्यांना विषद करायचे होते. मी केलेल्या अथक, संशोधनात्मक कार्यातून माझे यंत्र कसे वेगळे व कारखान्यास उपयुक्त आहे मला मुंडेजींना सांगायचे होते. म्हणून मी मुंबईला वरळीस्थित त्यांच्या ‘पूर्णा’ या निवासस्थानी गेलो व काही वेळेच्या प्रतिक्षेनंतर मुंडेजींनी मला त्यांच्या कक्षात बोलावले. मी त्यांना माझ्या येण्याचे प्रयोजन सांगितले. त्यावेळी ते ‘पर्चेसर’ खरेदी करणारा व मी ‘सप्लायर’ म्हणजे माल पुरवणारा या भूमिकेत होतो.
जेव्हा मुंडेजींना मी सप्लायर आहे असे कळले तेव्हा ते म्हणाले, ‘‘ मी सप्लायरला भेटत नसतो. माझ्या अंडर सतरा कारखाने आहेत. त्यांच्या प्रत्येक सप्लायरला भेटायला लागलो तर राजकारण केव्हा करायचे?’’ त्यांचे हे वाक्य ऐकताच मी ताडकन उठून उभा राहिलो. ‘‘सॉरी साहेब, मला माहीत नव्हतं. निघतो मी. उगाच तुमचा वेळ व्यर्थ जायला नको’’ असे म्हणून मी जायला वळलो. तोच मुंडेजी म्हणाले, ‘‘आता आला आहात तर बसा बेलसरे’’ आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. साखर कारखाना, त्यातील तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने कारखान्याला होणारे फायदे अशा अनेक बाबींवर आमचा वार्तालाप झाला. मुंडेजी मंत्रमुग्ध होऊन व लक्षपूर्वक माझे बोलणे ऐकत होते. मधूनच ते आपल्या कारखान्यात आणखी काय केल्याने उत्पादन वाढेल, कारखाना सक्षम होईल, त्रुटी दूर होतील या बद्दलही आस्थेने विचारपूस करत होते. या चर्चेत दोन तास कसे निघून गेले ते कळलेच नाही. मुंडेजींशी ती भेट अपूर्व होती. कोणत्याही राजकीय नेत्याने इतका रस घेऊन नवीन तंत्रज्ञानाबद्दल इतकी सखोल माहिती यापूर्वी घेतलेली माझ्या तरी अनुभवात अथवा ऐकीवात नव्हती. राजकारणात सक्रीय असताना देखील, संघर्ष करीत असताना देखील आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गोष्टीचा तपशील ठेवणे, त्याचा बारकाईने अभ्यास करणे व विकासाच्या दृष्टिने पावले उचलने ही मुंडेजींची विचारसरणी, खासीयत मला भावली. या व्यक्तिच्या कारखान्यात काम करायची संधी मिळावी असे मला मनोमनी वाटले व मी तशी इच्छा देखील मुंडेजींना बोलून दाखवली पण आता निकाल साखर संघाकडे होता. त्यात जो सर्वात कमी किंमत घेणारा त्याचीच वर्णी लागणार होती. कारखाना पातळीवर हा व्यवहार होणारा नव्हता नाहीतर ‘लोएस्ट’च्या ऐवजी ‘क्वालीटी’चा देखील निकष लावता आला असता. म्हणून आता सर्व टेंडर ओपनींगच्या वेळीच कळणार होतं पण म्हणतात ना ‘जहॉं चाह वहॉं राह होती है’. मनापासून इच्छा होती म्हणूनच की काय आमचेच टेंडर लोएस्ट निघाले व परळी वैजनाथ या कारखान्यात काम करण्याची मला संधी मिळाली. टेंडर ओपनींगच्या वेळी मुंडेजींशी झालेली माझी दुसरी भेट. कामाच्या संदर्भातील. एरवी त्यांचा पुण्यातील सहकारी संदीप खर्डेकर याच्याकडील अनेक समारंभात मुंडेजींशी भेट व्हायची पण ती औपचारिक.
यथावकाश त्यांच्या कारखान्यातील आम्ही आमचे काम ठरलेल्या वेळात उत्कृष्टपणे पार पाडले. मशिनच्या उद्घाटनाला स्वत: मुंडेजी जातीने हजर होते. त्यांच्याच हस्ते पूजा करून यंत्र सुरू केले. आज या गोष्टीला सात वर्षे झालीत तरीही तेथील कर्मचारी वर्ग, वरीष्ठ यांच्याशी आमचे स्नेहाचे व सौहार्दाचे संबंध आहेत. त्यानंतरही अनेकवेळा मुंडेजींशी भेट व्हायची. त्यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी माझी जेव्हा प्रथम भेट झाली तेव्हा त्यांना मी माझे भेटपत्र देऊ केले होते. त्यावेळी ते म्हणाले होत, ‘‘बेलसरे आता कार्डची काही गरज नाही. ठेवा ते तुमच्याजवळच. येथून पुढे कितीही वर्षांनी भेटलात तरी मी तुम्हाला नावासकट ओळखेन’’ आणि खरोखरीच जेव्हा जेव्हा ते मला भेटायचे तेव्हा अगदी न चुकता नावाने संबोधायचे. इतका अफाट जनसंपर्क असणार्या या नेत्याला ही किमया, इतकी स्मरणशक्ती नक्कीच दैवी देणगीच असावी.
दि. 3 जून 2014 रोजी सकाळी ‘चपराक’चे संपादक श्री. घनश्याम पाटील यांचा फोन आला व त्यांनी मुंडेंजींचे अपघाती निधन झाल्याची बातमी दिली आणि धक्काच बसला. अनेक वर्षाच्या अथक संघर्षानंतर आता कुठे चांगले दिवस आले होते. महाराष्ट्राला मोदीजींच्या राज्यात चांगलेच वजन प्राप्त झाले होते. मुंडेजी ग्रामीण विकास मंत्री झाल्यामुळे बहुजनांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. ग्रामीण विकासाचे, विशेषत: शेतकरी, कष्टकरी यांना न्याय मिळणार होता. खेड्यांचा पर्यायाने देशाचा विकास साध्य होणार होता पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. तसे पाहता अपघात किरकोळ होता, त्यात जीव जाण्याची शक्यतापण कमीच होती पण म्हणतात ना ‘परमेश्वर स्वत:कडे दोष घेत नसतो’ म्हणूनच हे अपघाताचं कारण घडलं असावं. मृत्युलाही शेवटी काही कारण असावं लागतं. अनेक मोठ्या अपघातातूनही अनेकजण वाचतात पण येथे उपचाराची देखील संधी मिळाली नाही आणि हा जननायक पाहता-पाहता आपल्यातून निघून गेला. आपली विजयी सभा घेण्यासाठी, आपल्या लोकांना भेटण्यासाठी, त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, मनाशी अनेक स्वप्ने घेऊन देशाच्या भवितव्यासाठी काही ठोस निर्णय घेऊन हा नेता आपल्या ‘कुटुंबात’ परतत होता पण आज ती स्वप्ने फक्त स्वप्नेच राहिलीत. त्या ठोस निर्णयांना आता शब्दात व्यक्त होता येत नाही. खरोखरीच नियतीच्या या करणीने अंतमुर्ख व्हायला होतंय. एक उमदं, बहारदार नेतृत्व अनंतात विलीन झालंय. मराठवाड्यातील तिसरं रत्न हरपलंय. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख यांच्यानंतर सैरभैर झालेल्या मराठवाड्याला सावरणारा, जनसामान्यांचा आत्मविश्वास जागवणारा आणि शेतकरी, कष्टकर्यांना आधार वाटणारा दुवा निखळलाय. त्यांच्या अकाली जाण्यानं पालातला शेतमजूर धाय मोकलून रडलाय, पिडलेला शेतकरी हाय खाऊन बसलाय, सहकारी मित्रांना धक्का बसलाय तर बुजुर्ग नेत्यांनाही अश्रू आवरेनासे झाले. असं सर्वसामान्य कुटुंबातून स्वकर्तृत्वावर फुलेलेलं सर्वस्पशी नेर्तृत्व क्वचितच पाहायला मिळतं. येत्या 12 डिसेंबर रोजी मुंडे साहेबांची जयंती. माझ्याकडून व साप्ताहिक ‘चपराक’ परिवाराकडून त्यांना अभिवादन!
- प्रमोदकुमार बेलसरे, पुणे
9822053371

तो पूर्वी नियमित यायचा; कधी कल्पना देऊन तर कधी आगंतुकासारखा! पण आता लहरी झालाय तो. येत नाही; आता राहीलाय शिल्लक फक्त आठवणीत. त्याची खूप रूपे अनुभवलीत कळायला लागल्यापासून! पहिल्यांदा कधी भेटला ते नाही सांगता येत नक्की पण तो आठवणीत खोलवर रूतलाय एवढं मात्र नक्की. कधी पडायचा झिमझिम, संथ, मंद लयीत. जणू त्याच्या सहस्त्र धारांनी गोंजारायचा अंगअंग. तर कधी झोडपून काढायचा आडवा तिडवा; आई रागावली की झोडपते तसं. तो तसा पूर्ण सुखदही नव्हता आणि पूर्ण दुःखदही. कधी असा तर कधी तसा.
तो जेव्हा आगंतुकासारखा यायचा ना तेव्हा त्याचं येणं खूप आनंददायी भासायचं. आभाळात लख्ख ऊन पडलेलं असायचं. दुपारची शाळा भरायची वेळ झालेली. जेवण उरकून आमचा घोळका शाळेकडे रमत गमत निघालेला किंवा दुपारच्या मध्यांतरात आमचा मैदानावर खेळाचा डाव रंगलेला असायचा. तो यायचा; अचानक ध्यानीमनी नसताना. कोण तारांबळ उडायची, एकच गलका, त्याच्यापासून बचावासाठी पळापळ. त्या ही धांदलीत कोणीतरी ओरडायचं, ‘‘ए, चिमणीचं लगन लागायल की असला पाऊस पडतय बाळ!’’ तो जेवढ्या वेगाने आला तेवढ्याच त्वरेने थांबायचाही. तेवढ्याच वेळात चिंब भिजवून मात्र काढायचा. तो गेला की कुणाचीतरी नजर इंद्रधनुष्याच्या सुंदर कमानीवर पडायची. सोबतच एक आनंदभरीत चित्कार, ‘‘ए, ते बघ.’’ सर्वांच्या माना वळायच्या तिकडे. काही वेळ मग तो गलका चालायचा. आपसुकच मग वर्गात पोहचायला उशीर आणि छडीचा प्रसाद. तरी पण त्याचं ते येऊन जाणं इतकं सुखद असायचं की छडी लागायचीच नाही.
जेव्हा तो आगमनाची वर्दी देऊन यायचा ना तेव्हा मात्र तो तितकासा सुखद भासायचा नाही. आभाळ झाकोळून यायचं, काळेभोर ढग आणि लकाकणार्या वीजा. सोबतीला ढगांचा गडगडाट. आभाळ झाकोळायला लागलं की विचीत्र कालवाकालव सुरू व्हायची मनात; उदास वाटायचं, कधी एकदा हे मळभ दूर होईल असं वाटायचं.
बरेच दिवस कळतच नव्हतं असं का होतय. पावसानं सार्यांची मनं प्रफुल्लीत झालेली असायची. तेव्हा मी मात्र विमनस्कपणे पावसाकडे बघत रहायची. नकोनकोसा वाटायचा तो पाऊस अन् ते वातावरण. एक दिवस अचानकच कारणाचा उलगडा झाला. त्या दिवसापासून आभाळ झाकोळल्यानंतर होणारी माझी तगमग कायमची थांबली.
आईवडीलांचं पहिलं अपत्य मी. आईवडील खेड्यातले आणि आजोळ शहरातलं. म्हणजे तालुक्याचं ठिकाण. आजोळी इंग्रजी माध्यमाची नवीन शाळा सुरू झाली आणि माझी रवानगी वयाच्या तिसर्या वर्षीच इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी आजोळी झाली. दोनेक वर्ष काढली आजोळात; शाळेत कमी आणि दवाखान्याच्या चकरा करण्यात जास्त. शेवटी डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; ’लेकरू हळवं आहे, आईवडीलांपासून दूर ठेवू नका, आपोआप होईल तब्बेतीत सुधारणा.‘ झाली आमची रवानगी इंग्रजी माध्यमाच्या झकपक शाळेतून गावाकडच्या झेड. पी. च्या शाळेत.
शाळा आठवते अजूनही स्पष्ट. शाळेला दोन खोल्यांची इमारत (?) आणि समोर व्हरांडा. एका खोलीत पार्टीशन करून कार्यालय आणि एक वर्ग भरायचा दुसर्या खोलीत. एक वर्ग, खोल्यांसमोरच्या व्हरांड्यात दोन वर्ग; अशी चार वर्गांची सोय व्हायची. मग उरलेले तीन वर्ग; पहिली, दुसरी आणि तिसरी सेवा सोसायटीच्या गोदामात एकत्रच. थोड्या थोड्या अंतराने बसवले जायचे. अध्यापन करणारे आमचे गुरूजी आणि अध्ययन करणारे आम्ही विद्यार्थी सारेच धन्य धन्य! माझी अवस्था तर हरितगृहातील कुंडीतून उपटून उघड्या बोडक्या, खडकाळ माळरानावर एखादं रोपटं लावावं तशी.
या सार्या नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायचा माझा केविलवाणा प्रयत्न चालू होता. नुकताच जून महिन्यात शाळेत प्रवेश झालेला. दिवस पावसाळ्याचे. गावातलं सगळं पाणी वाहत येऊन शाळेच्या मैदानात जमायचं आणि तसंच पुढे वाहत जाऊन शाळेच्या खालच्या बाजूने वाहणार्या ओढ्याला जाऊन मिळायचं. त्या दिवशीही दुपारी असाच खूप मोठा पाऊस आला. गावातून वाहत आलेल्या पाण्याचा मोठा प्रवाह शाळेच्या मैदानातून ओढ्याकडे झेपावू लागला. शाळेची इमारत गावाच्या शेवटी होती. पाण्याच्या प्रवाहानं शाळा गावापासून वेगळीच केली. शेतातून परतणारी गुरं, माणसं अन् शाळा प्रवाहाच्या या कडेला अन् विरूद्ध कडेवर गाव. प्रवाहाची खोली कमी असली तरी रूंदी खूप जास्त होती. शहराच्या आखिव रेखीव परिवेशातून आलेल्या माझ्या नजरेला ते दृश्य नवीन होतं. भयचकित नजरेनं मी ते दृश्य न्याहाळत होते. बाकी सारी शाळा पावसाचा आनंद घेत होती. तितक्यात एक शेळीचं पिल्लू चुकून पाण्यात पडलं आणि वाहून जाऊ लागंल.
त्याला पकडायला त्याचा दहा बारा वर्षाचा मालक लगोलग पाण्यात शिरला. अलगद त्या शेळीच्या पिलाला पकडून त्याने छातीशी कवटाळलं आणि दुसर्या कडेला गेलाही. पाण्यात शिरलेला तो पोरगा, त्यानं पोटाशी कवटाळलेलं ते शेळीचं पिल्लू, त्या पोराच्या कमरेपर्यंत येणारा पाण्याचा प्रवाह! झालं, मी मोठ्यानं रडायला सुरूवात केली. माझ्या बालनजरेला तो तीनेक फुट खोल पाण्याचा प्रवाह खवळलेल्या समुद्रासारखा वाटत होता. कदाचित माझ्या पावसाविषयीच्या नावडीला या आठवणीचा संदर्भ असावा.
दुसरी अशीच आठवण एकोणीसशे ब्याऐंशीच्या अतीवृष्टीची. आई आणि मी एक रात्र एका पाहुण्याकडे मुक्कामाला होतोत. घरापाठीमागून एक मोठा ओढा वहायचा. सायंकाळी सर्व काही ठीकठाक होतं. अर्ध्या रात्रीनंतर मात्र त्या घराची पाठभींत गायब झाली. जीव मुठीत धरून ओसरीत कुडकुडत रात्र काढलेली अस्पष्टशी आठवते.
पुढे वाढत्या वयाबरोबर त्याचं महत्त्व पटत गेलं. उदास का वाटेना मनाला पण तो वेळच्यावेळी यायला हवा हे बुद्धीला पटायला लागलं पण तो वरचेवर कमी कमी होत गेला. या अलीकडच्या दोन तीन वर्षात तर इतका दुर्मिळ झालाय की त्याच्या जराशा डोकावून जाण्याचीही आता बातमी होते.
पूर्वी त्याच्या आगमनाचं फारसं स्वागत वगैरे नव्हतं कुणी करत कारण तो आपलाच होता, जिव्हाळ्याचा होता. सहज, आत्मीयतेने, नियमित यायचा. नाही म्हणायला आई मिरगाचा लाल लुसलुशीत किडा दिसला तर हळद कुंकु तेवढं वहायची. आता मात्र तो जरा कुठं डोकावला म्हटलं की त्याला उतरवून घ्यायला विमान काय, रडार काय, शास्त्रज्ञांची फौज काय! पण मानवाच्या सगळ्या प्रयत्न, विनंत्या अन् अर्जवांना भीक घालणं बंद केलंय त्यानं. तो हुलकावणी देत, चकवत रहातोय. झड, मुसळधार, धोधो हे शब्द आता शब्द कोशातच बंदिस्त होणार की काय अशी भीती वाटते.
अत्यंत प्रगत अशा माया संस्कृतीचा विनाश त्याच्या न येण्यानं झाल्याचं कुठंतरी वाचलं होतं; ते आठवतं. मन चिंतेनं भरून येतं. हा असाच हुलकावत राहीला; आलाच नाही तर?
कसा पोहचवावा निरोप त्याच्यापर्यंत? खूप चुकलोय रे आम्ही! करतो सगळ्या चुका दुरूस्त पण तू ये; पूर्वीसारखाच आपुलकीने, प्रेमाने; पुन्हा एकदा भीजव, चिंब चिंब होऊ दे. मानव जातीशी तुझा स्नेह कायम राहू दे, युगायुगांपर्यंत!!
भेगावलेल्या भूईतून उगवलेले
शेकडो शेकडो हात
दीनपणे तुझ्या पुढे पसरलेले
दुर्लक्षू नकोस त्यांची याचना
युगायुगांच नातं तुझ्याशी जोपासणारी धरणीमाता
लेकरांच्या चिंतेनं व्याकुळ, सैरभैर
तुझ्या सहस्त्र बाहूंनी
तिला घे कवेत अन्
संपू दे हा विरह ...........जीवघेणा !!
-विद्या बयास /ठाकुर
शिरूर ताजबंद, ता. अहमदपुर, जि.लातुर 413514
भ्र. 7038665684

सुवर्णाक्षरे
माणसाचं मन खरंच अनाकलनीय असतं. कधी तो छोट्या गोष्टींसाठी राईचा पर्वत करून भांडत बसतो तर कधी पैशाला महत्त्व देईल आणि जिथून खरंच पैसे मिळवता येतील तिथे तो पैशावर पाणी सोडतो. कुणाच्या तरी शब्दाखातर... माणसाला यशस्वी होण्यासाठी, कर्तृत्व फुलवण्यासाठी आयुष्यात पाठीवर थाप ही फार महत्त्वाची. म्हणूनच ‘कणा’ या कुसुमाग्रजांच्या कवितेतील विद्यार्थी गुरूजींना म्हणतो.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊनि नुसते लढ म्हणा
आणि कर्तृत्व फुललं, कुठल्याही कार्यात यश मिळालं की होणारं कौतुक हे फार महत्त्वाचं. कौतुकामुळे उत्साह वाढीला लागतो आणि कौतुक केलेेलं प्रत्येकाला हवंहवंसं वाटतं.
आपल्या बालपणात डोकवा बरं जरा. आठवा आपण काही चांगलं काम केलं, आईला कामात मदत करून तिचं काम कमी केलं तर ती जरी काही बोलली नाही तरी तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारं कौतुक जाणवलं की काम केल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं. काम करण्यासाठी उत्साह यायचा. कॉलेजमध्ये गुरूवर्यांनी केलेले कौतुक, मित्रमैत्रिणींनी केलेले कौतुक यामुळे विद्यार्थी दशेत प्रगतीपथाची वाटचाल आनंददायी होते. परिवारात, संसारात घरच्यांनी केलेले कौतुक जीवन आनंददायी करतं. आपण घरच्यांसाठी आहोत आणि घरातले आपलेच आहेत ही भावना जपली जाते. घरातल्या लहानग्यांचं आपण कौतुक करतो. मुलं चुकली तरी त्यांच्या प्रयत्नांचं, धडपडीचं कौतुक करतो आणि त्या कौतुकाच्या बोलानं मुलं अपयशावर मात करत पुढं पुढं चालत राहतात. कौतुकाचे बोल त्यांना उभारी देतात.
ज्याप्रमाणे खासगी आयुष्यात, परिवारात, मित्रमैत्रिणींकडून माणसाला जशी कौतुकाची भूक असते तशीच व्यावसायिक जीवनातही असते. बॉसचे कौतुकाचे दोन बोल कर्मचार्याचा उत्साह द्विगुणीत करण्यास निश्चितच सहाय्य करतात. खरं पाहिलं तर आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो तो उदरनिर्वाहासाठी, अर्थार्जनासाठी आणि सगळ्यांनाच आपापल्या आवडीचा व्यवसाय वा नोकरी मिळेलच असे नाही. थोडेच भाग्यवान असतात की ज्यांना आयुष्यात जे करायचं होतं ते इप्सित साध्य होतं. खूपदा माणूस ठरवतो काही आणि घडतं काही. खूपदा खूपजण ठरवतात की, डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर व्हायचं. कलाप्रांतात यश मिळवायचं पण आर्थिक अडचणी, आयुष्याला कलाटणी देणार्या घटना घडणे, घरातल्या कर्त्या पुरूषाचे निधन, त्यामुळे अचानक येऊन पडणारी कुटुंबाची जबाबदारी, त्यामुळं अर्धवट सोडावं लागणारं शिक्षण आणि मूळ आवड सोडून जमेल ती नोकरी, व्यवसाय अर्थार्जनासाठी करावा लागतो आणि तो मग आवडीचे काम मिळाले नाही म्हणून निराश न होता मिळेल ते काम आवडीने करतो. मग असं काम चांगलं केल्यावर त्याचं कौतुक झालं तर? हे कौतुक त्याला समाधानही मिळवून देते पण असं फार कमी वेळा घडतं. नोकरी करणार्यांना तर हे निश्चितच जाणवत असेल! काही चुकलं तर बॉस रागवायला अजिबात विसरत नाही पण खूप चांगलं, व्यवस्थित काम केलं, कमी वेळात उल्लेखनीय काम केलं तर बॉस कौतुक करेलच असं नाही. चांगल्या कामाचं कौतुक केलं तर कर्मचार्यांचा उत्साह वाढतो. तो जोमाने काम करतो. त्याला श्रमाचं चीज झाल्यासारखं वाटतं!
कौतुक कुठल्या गोष्टीचं करावं? आवडलेल्या, भावलेल्या कुठल्याही गोष्टीच करावं! एखाद्या नृत्याचा कार्यक्रम झाला, आपण नर्तिकेचं कौतुक केलं की तिचा उत्साह वाढतो. कवितेचा कार्यक्रम झाला, आवडलेल्या कवितांचं कवींजवळ कौतुक केलं की त्यांनाही बरं वाटतं. विविध कार्यक्रम होत असतात. ते यशस्वी होण्यामध्ये सूत्रसंचालकाचा सिंहाचा वाटा असतो. सूत्रसंचालक छान चारोळ्या, शेर, चांगली वाक्यं प्रसंगावधान राखून पेरत असतो. काही प्रासंगिक, समर्पक शेर मारून, कॉमेंटस् करून कार्यक्रमाची लज्जत वाढवतो. याचं श्रेय त्याला दिलं, थोडे कौतुकाचे बोल ऐकवले की त्याच्या चेहर्यावर कार्यक्रमाचे सार्थक झाल्याचे स्पष्ट दिसते, जाणवते.
एकदा मी शिवनेरीने मुंबईहून पुण्याला आले. चालकाने गाडी अगदी वेळेत व छान, सुरक्षित चालवत आणली. मी गाडीतून उतरताना त्याचे कौतुक केले. ‘तुम्ही छान, सुरक्षित, वेळेवर आणलीत गाडी’. त्यावर ‘कौतुक केल्याबद्दल तुमचेही आभार’ तो म्हणाला.
अशाप्रकारे कौतुक हे उत्साहवर्धक टॉनिक आहे. आपण दुसर्यांसाठी कौतुकाचे बोल वापरायला हरकत नाही. चला तर आजपासून सुरूवात करूया!
- सुवर्णा जाधव
(साप्ताहिक चपराक, पुणे)
www.chaprak.com