Wednesday, March 29, 2017

मन की बात

साहित्य चपराक (मार्च २०१७) 

 1969 साली राजेश खन्ना यांचा आराधना’ चित्रपट आला. 1973 साली नमकहराम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन होते. त्याच वर्षी म्हणजे 1973 साली जंजीर’ चित्रपट आला, ज्याचे हिरो अमिताभ बच्चन होते. 1991 साली हम’ चित्रपट आला, ज्याचे हिरोही अमिताभ बच्चन हेच होते. हे लिहिण्याचे कारण म्हणजे 1969 साली आराधना’ हा चित्रपट आल्यानंतर राजेश खन्ना यांनी सुपरस्टारडम’ची सुरुवात केली. मोतीलाल यांच्यापासून ते दिलीपकुमार, देवआनंद यांच्यापर्यंत कुणालाही अप्राप्त असे लोकांचे प्रेम आणि आकर्षण राजेश खन्ना यांना प्राप्त झाले. 1969 ते 1973 ही चार वर्ष फक्त राजेश खन्ना यांची होती. 1973 साली जंजीर’ चित्रपटापासून अमिताभ बच्चन त्याच सुपरस्टारडम’च्या धावपट्टीवर उतरले, पण 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या दीवार’ चित्रपटाद्वारे अमिताभ यांनी सुपरस्टारडम’चा मुकुट खर्‍या अर्थाने आपल्याकडे खेचून घेतला. 1975 पासून 1991 च्या हम’ या चित्रपटापर्यंत अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार होते पण 1975 नंतरही बरीच वर्षं म्हणजे जवळपास 1987 पर्यंत राजेश खन्ना यांचं स्टारडम’ टिकून राहिलं. सुपरस्टारडम’चा हिंदी चित्रपटसृष्टीतला कालखंड एवढाच. मानधनाच्या दृष्टीने पाहिलं, तर 1969 ते 1978 पर्यंत राजेश खन्ना हेच सर्वात अधिक मानधन घेणारे स्टार’ होते (जरी त्यांचे सुपरस्टारडम’ लौकिकार्थाने संपले तरी). 1979 ते 1987 पर्यंत राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या मानधनाचा आकडा सारखाच होता. 1987 नंतर अमिताभ बच्चन मानधनाच्या आकड्याच्या बाबतीत राजेश खन्ना यांना पार करून पुढे निघून गेले. 1990 साली प्रदर्शित झालेला अग्निपथ’ हा चित्रपट अमिताभ यांच्या सुपरस्टार’ पदावर कोंदण बसवणारा ठरला, जसा 1971 चा आनंद’ हा चित्रपट राजेश खन्ना यांच्या सुपरस्टार’ पदाला कोंदण देणारा होता. अगोदर म्हटल्याप्रमाणे मोतीलाल यांच्यापासून दिलीपकुमार यांच्यापर्यंत आणि त्यानंतर तिन्ही खान (आमीर, शाहरुख, सलमान) यांच्यापासून ते हृतिक रोशनपर्यंत (अगदी त्यात कुमार गौरवचा एक चित्रपटही आला!) अनेक स्टार्स आले, त्यांनी अनेक अव्वल चित्रपटही दिले. परंतु, लोकांची मानसिकता कब्जात घेण्याची आणि आतडं पिळवटून टाकणार्‍या ऑक्टोपसी मोहिनी सामर्थ्याची जी लार्जर दॅन लाइफ’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची किमया साधली, ती राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या त्यांच्या काळात. त्यातही राजेश खन्ना यांचं सुपरस्टार’ पद हे पहिलंच होतं. त्यांनी सलग 15 हिट चित्रपट ओळीने दिले, जो विक्रम अमिताभ यांनाही मोडता आला नाही. परंतु अमिताभ बच्चन कालमान मोजता प्रचंड काळ टिकून राहिले, अगदी आजपर्यंत! पण पडदा व्यापून टाकण्याची क्षमता असलेला अमिताभ बच्चन यांचा शेवटचा चित्रपट म्हणजे हम’.
राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांची तुलना करणं शक्यच नाही, इतके ते भिन्न प्रकृतीचे नट होत. परंतु, वर उल्लेखलेल्या
सुपरस्टारडम’च्या कालखंडात त्यांनी समाजमानसाचं नेमकं काय केलं, जे अगोदर आणि नंतर कुणीही करू शकलं नाही ते आश्चर्यकारक होतं. मुख्य म्हणजे हे दोन सुपरस्टार त्यांच्या त्यांच्या कालखंडामध्ये प्रत्येक प्रेक्षकाचा स्व’ व्यापून उरायचे. राजेश खन्ना हे रोमँटिक सुपरस्टार’, तर अमिताभ बच्चन हे अँग्री यंग मॅन सुपरस्टार’ होते. रोमँटिक सुपरस्टार असल्यामुळे स्वाभाविकच राजेश खन्ना यांची लोकप्रियता स्त्रियांमध्ये हृदयाच्या रक्तातल्या धमन्यांमध्ये पोहोचणारी होती. दुसरीकडे अमिताभ बच्चन हे अँग्री यंग मॅन असल्यामुळे प्रत्येक पुरुषाला ते पुरुषार्थाचं पडद्यावरचं रुप वाटत असत. पण याचा अर्थ राजेश खन्ना पुरुषांमध्ये आणि अमिताभ बच्चन स्त्रियांमध्ये कमी लोकप्रिय झाले, असाही होत नाही. राजेश खन्ना यांच्यासारखे आपण व्हावे, असे त्यांच्या काळातल्या प्रत्येक पुरुषाला वाटत असे आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखा पुरुष आपल्याला प्राप्त व्हावा, असं प्रत्येक स्त्री प्रेक्षकाला वाटत असे. इथे पुरुष याचा अर्थ बाप, मुलगा, प्रियकर, नवरा असा काहीही असू शकत होता. हा संपूर्ण कालखंड भारतीय इतिहासातला अतिशय महत्त्वाचा कालखंड होता. लायसन्स राज, पाकिस्तानबरोबरचे युद्ध आणि बांगलादेशचा उदय, इंदिरा गांधी यांची महानायिका पदाकडे होणारी वाटचाल आणि पतन, जनता पक्षाचा उदय, जयप्रकाश नारायण यांचा संघर्ष, जनता पक्षाचे पतन, इंदिरा गांधी यांचा पुन्हा उदय, संजय गांधी यांचा कालखंड, त्यांचा अकाली अस्त, खलिस्तानी चळवळ, सुवर्णमंदिरात घुसवलेली सेना आणि त्यामुळे इंदिराजींची झालेली हत्या, त्या हत्येमुळे राजीव गांधी यांना 400 हून अधिक जागेवर मिळालेलं पाशवी बहुमत, ते बहुमत राजीव गांधी टिकवू न शकल्याने व्ही. पी. सिंग आणि जनता दलाचा झालेला उदय, राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण या दोघांच्या समाजवादी स्वप्नाचे उत्तर भारतात झालेलं यादवीकरण, इंदिरा गांधी यांनी अप्रत्यक्ष मदत केल्यामुळे उभी राहिलेली श्रीलंकन तामिळींची त्यावेळची जगातील सर्वात खतरनाक अशी एलटीटीई ही संघटना (काही वर्षांपूर्वी श्रीलंकन सेनेने या संघटनेचा प्रमुख व्ही. प्रभाकरन याच्यासहीत या संघटनेचा अस्त घडवून आणला) विरोधात गेल्यामुळे राजीव गांधींची झालेली क्रूर हत्या, त्यामुळे गांधी घराण्यापासून मुक्त होऊन कॉंग्रेसची सत्ता नरसिंहरावांकडे येणे  आणि त्या सत्तेचा कुशल वापर करून अगोदरच्या राजीव गांधींच्या शेवटच्या पर्वातील कॉंग्रेसच्या समर्थनाने पंतप्रधानपदावर असणार्‍या चंद्रशेखर यांच्या काळात सोने गहाण ठेवणार्‍या भारताला उदारीकरणाच्या नव्या धोरणाने जगातल्या एका प्रमुख अर्थव्यवस्थेकडे नरसिंहरावांनी नेण्याची सुरुवात एवढ्या सगळ्या घटना या दोन सुपरस्टार्सच्या काळात घडलेल्या आहेत. गंमत म्हणजे, या दोन्ही सुपरस्टार्सनी या कालखंडात कॉंग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. 1984 साली अमिताभ बच्चन अलाहाबादमधून विजयी झाले, तर राजेश खन्ना यांनी कॉंग्रेसच्या तिकिटावरून दिल्लीतून निवडणूक लढवताना लालकृष्ण अडवाणी यांना कडवी टक्कर देऊन त्यांच्या तोंडाला फेस आणला होता. या संपूर्ण कालखंडात मुंबईत एक मोठी घटना घडली. ती म्हणजे 1982 चा गिरणी संप. त्या काळात एकंदरीतच कामगार वर्ग अशांत होता आणि गिरणी कामगार पराकोटीचा अस्वस्थ आणि ज्वालाग्राही होता. या कामगारांनीच दत्ता सामंत नावाच्या एका महानायकाचा उदय घडवला. गिरणी संपाने दत्ता सामंत हे नाव जगभर गेले आणि गिरणी संपाच्या पतनाने गिरणी कामगार आणि दत्ता सामंत हे दोघेही कोसळले ते कायमचेच. त्यातूनच पुढे मुंबईतल्या अतिरक्तरंजित गँग्जचा आणि गँगवॉर्सचा उदय झाला, ज्याचा सर्वात मोठा खलनायक दाऊद इब्राहिम कासकर ठरला. ज्या गँग्ज आणि गँगवॉरवर आधारित अनेक चित्रपट अलीकडच्या काळात येऊन गेले.
या सार्‍या प्रचंड कॅनव्हासच्या पार्श्वभूमीवर राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोन सुपरस्टार्स उभे आहेत, ही समाजमनाशी संबंधित गोष्ट फारशा बारकाईने कोणीच अभ्यासलेली नाही. राजेश खन्ना यांच्या रुपाने सामाजिक
स्वप्नाळू रोमँटिसिझम’ शिखरावर पोहोचला आणि राजेश खन्ना यांच्या महानायक पदाच्या उतरणीवर येता येता तो अस्त पावला. त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन यांच्या रुपाने सामाजिक वास्तववादी रोमँटिसिझम’ शिखरावर गेला आणि 1991 साल होता होता तो अस्ताला गेला. त्यानंतर नव्या डिजिटल यंत्रयुगाचा मल्टिप्लेक्सचा, मल्टी स्क्रीन्सचा आणि 100 ते 300 करोड क्लबचा उदय झाला. चांगले सिनेमे आले आणि गेलेही. महाहिरोंचे ग्रुप्स तयार झाले, पण राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या सुपरस्टारडम’च्या काळातल्या लोकांच्या हृदयातील वीणा थेट छेडण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नव्हते आणि ते स्वाभाविकही होते.
सिनेमा आणि समाज यांचा एवढा टोकदार संबंध भारताच्या इतिहासात अगोदर आणि नंतर कधीही जमून आलेला नाही. वेगवेगळ्या प्रकारची जादुई संमोहिनी या दोन्हीही महानायकांनी भारतीय समाजावर घातली. हळुवारपणे फुलत जाणार्‍या एखाद्या फुलासारखे मुलायम स्वप्न भारतीय समाजाने स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या आयुष्यासंबंधी कल्पिलेले होते. ते सर्वोच्च आविष्कार म्हणून पडद्यावर राजेश खन्ना यांनी साकार केले. ते स्वप्न भंगले. स्वातंत्र्याच्या फळाची अपेक्षा समाजाला दुरापास्त आहे, याची जाणीव जनमानसाच्या काळजात घुसू लागली आणि तेव्हाच अमिताभ बच्चन यांचा उदय झाला. त्यांनी वेगळ्या प्रकारच्या रोमँटिसिझमचा सर्वोच्च आविष्कार केला, जो रोमँटिसिझम राकट, रासवट, व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा, लढणारा, साध्यसाधनशुचितेला न मानता विजयी होण्याचे स्वप्न दाखवणारा होता. 1991 नंतर तो रोमँटिसिझमही अस्ताला गेला. त्यानंतर भारतात उदारीकरणाचा प्रथमच प्रवेश झाला. पाठोपाठ डिजिटलायझेशनही. स्वातंत्र्योत्तर काळातल्या पाहिलेल्या स्वप्नांना हाक देण्याची आणि ती विफल झाली तर त्याविरुद्ध बंड करण्याची सारी शक्यता भारतीय समाज गमावत गेला. प्रेक्षक महाहिरोंच्या काळामध्ये मल्टिप्लेक्सची तिकीटे काढणार्‍या रोबोटसारखा झाला. आपली आवडनिवड ही आपण ठरवत नसून मोठमोठे कॉर्पोरेट्स ठरवतात हेही त्याला कळेनासे झाले आणि कळले तर त्याचेही त्याला काही वाटेनासे झाले.
पुष्पा, आय हेट टीयर्स’’ किंवा पीटर मैं यहॉं हूँ’’ यांसारखे संवाद राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या तोंडून ऐकताना त्या काळातल्या प्रेक्षकाने सिंगल स्क्रीनवर कसे पैसे उधळले असतील, याची कल्पना करणंसुद्धा हास्यास्पद वाटते. माझ्याही पिढीने यातले वास्तवात काहीच पाहिलेले नाही, फक्त ऐकलेले आहे. फिल्म्स तेवढ्या पाहिल्या. राजेश खन्ना यांच्या गाडीवर रक्ताने ’आय लव्ह यू’ असं मुली लिहित असत किंवा अमिताभ बच्चन यांना पडद्यावर बघून समोरच्याच्या आणि स्वत:च्या ताकदीचा अंदाज न घेता बेलबॉटममधला तरुण सरळ संघर्षाचा पवित्रा घेत असे, हे आज खरे वाटत नाही. खरे तर हे इतके जुनेही नाही. आई मरणासन्न अवस्थेत असताना देवाला उद्देशून बोललेले अमिताभ यांचे संवाद आता कुठच्या चित्रपटात टाकले, तर तद्दन हास्यास्पद वाटतील किंबहुना 1991 नंतर अमिताभ यांच्या मधल्या उतरत्या काळात असेच संवाद त्यांच्याच नास्तिक’ या चित्रपटात हास्पास्पद वाटले होते. हिरो तोच होता, पण काळ बदलला होता. राजेश खन्ना नव्या युगाशी ऍडजस्ट करू शकले नाहीत, अमिताभ बच्चन ऍडजस्ट करू शकले, पण ते महानायक नव्हते, तर एक कुशल कारागीर होते. राजेश खन्ना आपले उर्वरित आयुष्य (अलिकडेच त्यांचा मृत्यू होईपर्यंत) आपल्या महानायकपदाच्या नॉस्टॅल्जियामध्येच जगले. बोलताना ते आपण नॉस्टॅल्जिक होत नाही, असं वारंवार सांगत आणि हाच त्यांच्या नॉस्टॅल्जियाचा पुरावा होता. ते कधीच आपल्या जुन्या बुटातून आपला पाय काढू शकले नाहीत.
खरे तर हे दोन वेगवेगळ्या ताकतीचे नट. त्यांच्या मागे दिग्दर्शक, तंत्रज्ञ, संगीतकार, संवाद आणि पटकथा लेखक, निर्माता आणि प्रचंड मोठी टीम काम करत होती. त्यांच्या यशात या सार्‍यांचाच वाटा तेवढा होता. परंतु आपल्या मागच्या अजस्र टीमला लोकांच्या हृदयात थेट नेण्याचं किंवा लोकभावना पडद्यावर जोडून घेण्याचं कसब या दोघांनी दाखवलं. यांच्या योग्यतेचे इतर कुणी देशात त्या काळी नव्हते किंवा नसतीलच असे नव्हे पण नियतीने त्यांनाच ती संधी दिली, जी स्वप्नवत होती आणि स्वप्नं ही एके दिवशी तुटतातच. भारतीय समाजाचीही ती तुटली. अजून 25 वर्षांनी या दोघांच्या अद्वितीय सुपरस्टारडमच्या कारकीर्दीचे मूल्यमापन करताना 1969 ते 1991 या काळात भारत घडता घडता बिघडत गेला आणि त्याच वेळी बिघडतानाच घडत गेला, हे नमूद करावे लागेल. या तुटलेल्या स्वप्नाचे संपूर्ण सामाजिक आणि राजकीय विश्लेषण हा एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे (लेखक ते पुस्तक लिहितो आहे). परंतु एक मात्र नक्की, याच सार्‍या काळामध्ये चित्रपटाच्या पडद्याशी भारतीय प्रेक्षकाचे सर्वात जवळचे नाते जडले आणि तुटले. जसे, भारतीय समाजाचे देशातल्याच राजकीय आणि सामाजिक प्रक्रियेशी नाते तुटले. उदाहरणार्थ, आता आपल्या आयुष्याशी संबंधित काही नकारात्मक घडत असेल, तरी लोक रस्त्यावर उतरत नाहीत. हे सर्व उकलत जाताना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे स्वप्न आणि पतन आणि त्याच वेळी उभे राहता राहता लोकांचे मोडून जाणे याच्या एका प्रक्रियेचा मागोवा घ्यावा लागेल, ज्यात काळ हा किती बलवान असतो आणि तो लोकभावनांशी कसा खेळतो त्याची एक निष्ठुर जाणीव वाचणार्‍याच्या मनाशी ठसठसत आतपर्यंत जाईल; पण तोंडातून आवाज निघणार नाही!
कारण आता संवाद संपले आहेत!!

- राजू परुळेकर
सुप्रसिद्ध पत्रकार 
साहित्य चपराक (मार्च २०१७)





Monday, March 27, 2017

संभाजी महाराजांची हत्या व गुढीपाडवा?

(साप्ताहिक 'चपराक', पुणे)

प्रदीर्घ काळ महाराष्ट्र व आसपासच्या राज्यांवर राज्य करणारे महाराष्ट्रातील एकमेव घराणे म्हणजे सातवाहन. सातवाहन स्वत:ला सालाहनही म्हणवून घेत. शालिवाहन हे सालाहनचे कृत्रिम संस्कृतीकरण. आजच्या महाराष्ट्राच्या भाषा-संस्कृतीचा पाया घालणारा, तिचे वर्धन करत महाराष्ट्राची ओळख निर्माण करणारा हा तत्कालीन औंड्र या मेंढपाळ समाजामधून उदयाला आलेला राजवंश. महाराष्ट्रातील रायगड (मूळ नाव रायरी), राजमाची अशा शेकडो किल्ल्यांची मूळ उभारणी सातवाहन काळात झाली. तीनही समुद्रांचे पाणी चाखणारे अश्‍व असलेले सातवाहन अशी सार्थ बिरुदावली त्यांनी मिरवली. साडेचारशे वर्षांच्या कालावधीत शेकडो महाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख, हालाच्या गाथा ‘सप्तशती’ सारखे नितांत सुंदर काव्यसंग्रह, ‘लीलावई’सारखे महाकाव्य यातून आद्य मराठीचा पाया तर भक्कम केला गेलाच; पण वररुचीच्या ‘प्राकृतप्रकाश’ या व्याकरण ग्रंथाने महाराष्ट्रीला समृद्धी दिली. पूर्वी रठ्ठांचा समूह तो महाराष्ट्र अशी ओळख पुसून या रठ्ठसमुहाला एकाच राजकीय पटलाखाली आणले. देशी-विदेशी व्यापारातून आर्थिक समृद्धी आणली व प्रजेला खर्‍या अर्थाने सुखाचे दिवस दाखवले. हालाच्या गाथा सप्तशतीतील काव्यावरून एका आनंदी खेळकर समाजाचे दर्शन जे घडते ते त्यामुळेच.
त्यामुळे महाराष्ट्राचे संस्थापक, वर्धनकर्ते हे सातवाहन होत, असे म्हणायला काहीही प्रत्यवाय नाही. संपूर्ण महाराष्ट्र आणि सातवाहनांची सत्ता असलेल्या अन्य प्रदेशांत (राज्यांत) गुढीपाडवा हा नववर्ष दिन म्हणून साजरा होतो. गौतमीपुत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून महाराष्ट्र व आसपासचा परिसर स्वतंत्र केला तो हा स्वातंत्र्यदिन. या विजयाचे स्मरण असलेल्या शालिवाहन (सालाहन) शकाचा वर्षारंभ. आजही आपण गुढ्या उभारून हा विजयोत्सव साजरा करत असतो.
सातवाहन हा महाराष्ट्रातील पहिला ज्ञात राजवंश. महाराष्ट्र भूमीच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षिणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदीर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीसनपूर्व 230 मध्ये हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. नंतर ती पैठण येथे नेली गेली. छिमुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. त्याहीपूर्वी सातवाहन सम्राट अशोकाचे मांडलिक म्हणून महाराष्ट्रावर सत्ता गाजवत असावेत असा विद्वानांचा कयास आहे. ती सत्ता पुढे साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदीर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही. मध्य आणि दक्षिण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला.
कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर इत्यादी जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक मेंढपाळ समाज. महाभारतात औंड्रांना असुर राजा महाबळीचे पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र, पुंड्र, मल्ल इत्यादी समाज दक्षिणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे डिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत. यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार लक्षात यावा. पंढरपूर हे नावही पुंड्रपूरवरुन आलेले. मावळालाही आंदर मावळ असे म्हटले जाते. मल्ल लोकांना हरवणारा मल्हारीही आपल्याला माहीत आहे. आंदर मावळ (जुन्नरचा परिसर) आंध्रा या नदीच्या नावावरुन बनला आहे. या भागात आंद्र (औंड्र) अधिक संख्येने निवासास असल्याने नदी व परिसरास आंध्र नाव मिळणे स्वाभाविक आहे.
सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान इत्यादी देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल इत्यादी पश्‍चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुफांतील प्रदीर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षिणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हालाची गाथा ‘सप्तशती’, गुणाढ्याचे ‘कथा सरित्सागर’, वररुचीचे ‘माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण’, जैन माहाराष्ट्रीतील ‘अंगविज्जा’ अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या. हाल सातवाहनाने आपल्या बलाढ्य आरमारातून श्रीलंकेवर स्वारी करून तेथील राजकन्या लीलावती हिच्याशी कसा विवाह केला याचे कल्पनारम्य चित्रण ‘लीलावई’ या काव्यग्रंथात आले आहे.
एवढा प्रदीर्घ काळ सत्ता चालवताना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेव्हा अशीच बिकट परिस्थिती होती. ‘क्षहरात’ घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तेव्हा त्याच्या ताब्यात सातार्‍याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण-गोमंतकही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथल्या बंदरांतून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. मध्यभारत ते दक्खनची प्रजा एका अर्थाने गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.
नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्‍चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. 32 मध्ये नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वार्‍या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकून घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेव्हा सातारा-कर्‍हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता.
परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, ’गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.’ शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस.
एका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पहायचे सामर्थ्य कोणात आले नाही.
नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. इसवी सनाच्या 78 मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हणजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. ’तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन’ अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली.
आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. परंतु पुराणकारांनी मात्र प्रत्येक सणाचे वैदिकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धार्मिक स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. कधी रामाचाही संबंध गुढीपाडव्याशी जोडला जातो; पण इसवी सन 78 पासूनच शालीवाहन शकाचे पहिले वर्ष का गणले जाते यावर कोणी विचार केलेला दिसत नाही. नहपानाचा मृत्यू सन 78 मध्येच झाला याबाबत विद्वान इतिहासकारांनाही शंका नाही. या सणामागील मूळ उद्देश गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयाचा आनंदोत्सव साजरा करणे हा आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते.
हा धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राला स्वातंत्र्याचा मंगलदिवस आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. दुसरे महत्त्वाचे असे की शालिवाहन शक असा मुळात शब्दच अस्तित्वात नाही. या नावाचा कोणताही राजा होऊन गेलेला नाही. शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील ’सालाहन’ असा आहे. सातवाहन स्वत:ला अनेक लेखांत सालाहन असेच म्हणवून घेतात. मग त्याचे कृत्रिम संस्कृतीकरण शालिवाहन करायचे आणि नंतर शालिवाहन नावाचा राजाच इतिहासात सापडत नाही अशी लाडिक तक्रार करायची असे उद्योग आमचे विद्वान करत बसतात हे नवलच नाही काय?

संभाजी महाराजांची हत्या व गुढीपाडवा?
बरे या विद्वानांच्या बुद्धीवर कळस चढवणारे ब्रिगेडी कल्पनाशक्तीचे आजकाल झालेले विकृत रुप पाहिले तर थक्क व्हायला होते. संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली ती ब्राह्मणांच्या सांगण्यानुसार. वेद ऐकले म्हणून कानात उकळते शिसे ओतले. संस्कृत उच्चारिले म्हणून जीभ छाटली. हे सारे झाल्यावर भाल्यावर मस्तक टोचून त्याची मिरवणूक काढली. तीच पहिली गुढी व महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी तेव्हापासून गुढी हा एक सण केला. तेव्हा बहुजनांनी गुढी उभारू नये असा संदेश गुढीपाडव्याच्या आसपास फिरू लागतो.
गुढीपाडवा किमान दोन हजार वर्षांची परंपरा असलेला सण आहे हे आपण वर पाहिले. नंतरच्या मराठी साहित्यातही गुढीचे उल्लेख येतात. लीळाचरित्रात म्हाइंभट हा सडा-संमार्जन करुन मग गुढी कशी उभारावी याचे सविस्तर वर्णन करतो. तेराव्या शतकातीलच संतश्रेष्ठ चोखा मेळा टाळी वाजवावी : गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची म्हणतात. ज्ञानेश्वर, नामदेवांपासून ते संत एकनाथांनी गुढीचे विजय-गुढी म्हणून जसे वर्णन केले तसेच गुढीला आध्यात्मिक अर्थही दिले. म्हणजे सातवाहनांपासून सुरु झालेली गुढीची परंपरा अव्याहत सुरु होती.
मग गुढीची परंपरा ब्राह्मणांनी आपल्या मताप्रमाने संभाजी महाराजांची हत्या करवून सुरु केली या विकृत अपप्रचाराला महत्त्व देण्याची खरे तर काही गरज नाही. औरंगजेबाने शंभुराजांची हत्या करायला हिंदुंचा सण व नववर्ष दिन निवडावा यात उलट त्याची विकृती दिसून येते. त्याबाबत औरंगजेबाचा निषेध न करिता महाराष्ट्रातील ब्राह्मणांना जबाबदार धरत समाजात द्वेष पसरवावा हे कृत्य नक्कीच निषेधार्ह आहे. असे करुन आपण शंभुराजांचाही अवमान करीत आहोत याचे यांना भान नाही.
महाराष्ट्रात इतिहासाचे विकृतीकरण वैदिक विद्वानांनी जाणीवपूर्वक वा भाबडेपणाने केले. तसेच वेगळे विकृतीकरण स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेत असताना हिंदुंनी करावा हे निषेधार्ह आहे. यातून धर्म व संस्कृतीचे मुळचे स्वच्छ स्वरुप हाती लागणार नाही. उलट विद्वेष गहिरा होत जाईल याचे भान ब्रिगेडसारख्या विकृतीने पछाडलेल्या संघटनांनी ठेवले पाहिजे. इतिहास ज्याचे माप त्याच्या पदरात नक्कीच घालतो; पण हवा निकोप दृष्टिकोन!
सर्वांना गौतमीपुत्राच्या विजयदिवसाच्या व त्यानिमित्ताने सुरु झालेल्या नववर्ष दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो!
(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
- संजय सोनवणी
9860991205

Sunday, January 8, 2017

क्रांतिचा नायक मेला आहे!

आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये घडलेल्या वेगवेगळ्या घटना, भारतात घडणार्‍या जाती आणि धर्मातल्या घटना, जगभरात निघालेले मोर्चे आणि आता महाराष्ट्रात निघत असलेले मोर्चे या सगळ्यांचं खळबळजनक विश्‍लेषण आणि याचा तार्किक अंत यावर भाष्य करणारा सुप्रसिद्ध पत्रकार राजू परूळेकर यांचा हा विशेष लेख.

विशेष लेख - 'साहित्य चपराक' दिवाळी विशेषांक २०१७


चार्ली चॅप्लिनच्या ‘द ग्रेट डिक्टेटर’ या चित्रपटातल्या त्याच्या शेवटच्या भाषणात एक वाक्य आहे- ‘हुकूमशहा हे नेहमीच स्वत:ला स्वतंत्र करतात नि अनुयायांना परतंत्र.’ जगातल्या छोट्यातल्या छोट्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या माणसापासून ते मोठ्या देशांच्या मोठ्या हुकूमशहापर्यंत सर्वांना ही तत्त्वरेषा लागू होते. काही वर्षांपूर्वी ट्युनिशियामध्ये जेव्हा जनतेने उठाव करून सर्वोच्च हुकूमशहाची गच्छंती करायची ठरवली; तेव्हा जनतेच्या सामूहिक मनाला या तत्त्वाची जाणीव झालेली होती, असे जगाला वाटले. बर्‍याचदा समूहमनाला जाणीव होते, ती शाश्‍वत तत्त्वांची. महागाई, भ्रष्टाचार वगैरे तपशील आहेत. केवळ त्या तपशीलांच्या बळावर देशांमागून देशांच्या सत्ता उलथवल्या जाऊ शकत नाहीत. उदाहरणच द्यायचं झालं तर लिबियाचं देता येईल. लिबिया हा देश 87 टक्के साक्षरता असलेला देश होता. शिवाय, तिथे ट्युनिशिया किंवा इजिप्तसारखी परिस्थिती नव्हती. आर्थिक सुबत्ता तिथे बर्‍यापैकी होती. राजकीय हुकूमशाही तर पोलादी होती. असं असताना जनतेचं सामूहिक मन कशाला विटलं, ही विचार करण्याजोगी गोष्ट आहे. बर्‍याचदा जनतेचं सामूहिक मन विफल होतं, हे लोकशाहीमध्येही होतं. मग त्यांना कारण असताना किंवा नसतानासुद्धा बदल हवा, असं उगाचच वाटू लागतं. याचा फायदा घेताना विकसनशील देशांविरुद्ध बर्‍याचदा विकसित असलेले देश त्यांच्या गुप्तचर यंत्रणा आणि मोठ्या प्रमाणावर एनजीओमार्फत फंडिंग एजन्सीज कार्यरत करतात. हे सारं ते नव्याने विकसित देश पुढे येऊ नयेत, शस्त्रास्त्रं निर्मितीचे कारखाने जोरात चालावेत यासाठी करतात. याव्यतिरिक्त तेल हा जगातला या गुंतागुंतीच्या प्रक्रियेतला मोठा घटक आहे; पण आत्ता तो आपल्या लेखाचा विषय नाही.
मुळात ट्युनिशियात सुरू झालेली ही ‘जस्मिन क्रांती’ (हे तिचं ट्युनिशियन नाव आहे) नि त्यातून ‘झाईन अल अबिदीन बेन अली’ यांचं झालेलं उच्चाटन हे सर्व अरब राष्ट्रांना ’प्रेरणा’ देणारं ठरलं. हे काहीतरी महान आणि उदात्त आहे, असं शेजारच्या अनेक देशांना वाटू लागलं. वास्तवात त्यामागे प्रचंड मोठ्या विदेशी गुप्तचर यंत्रणा, पैसे व शस्त्रास्त्र उद्योगधंदे (इंडस्ट्री) कार्यरत होते. अर्थात, त्यावेळेला सामान्य जनतेला आणि त्यांच्या झुंडीच्या समूह मनाला त्याचा थांगपत्ता नव्हता. त्यातूनच इजिप्त, येमेन, बहारीन, लिबिया इथल्या एकछत्री राजवटींविरुद्ध जनतेचे प्रचंड मोठे उठाव झाले होते. या उठावांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या उठावांना काही मोठी योजनाबद्ध यंत्रणा राबत आहे असे वाटले नाही. जणू काही नेतृत्वविरहीत लाखो-करोडोंच्या झुंडी सत्ता उलथवून टाकताहेत आणि हुकूमशहांना मारताहेत असे चित्र उभे राहिले. हे सारे खोटे व भासमान होते; पण ते नंतर लक्षात आले जेव्हा वेळ निघून गेली होती. ट्युनिशिया पाठोपाठ इजिप्तमधील सर्वसत्ताधीश होस्नी मुबारक यांनाही पदउतार व्हावं लागलं. लिबियातील कर्नल मुअम्मर गडाफी यांच्याविरुद्धचा संघर्ष अधिकाधिक चिघळत चाललेला होता. त्या संघर्षाचा शेवट त्यांच्या विरुद्ध झाला, याचं कारण म्हणजे गडाफी यांची लिबियावरील पकड ही अधिक क्रूर पद्धतीची होती. ते त्यांच्या इतर समकालीन हुकूमशहांपेक्षा अधिक मुरलेले आणि पाताळयंत्री व मुत्सद्दी होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्धच्या उठावाचा निकाल काय लागला यापेक्षा त्यांच्याविरुद्ध त्यांच्याच देशात एवढा तीव्र उठाव होऊ शकला, हेच मुळी धक्कादायक होतं. ज्यांना लिबिया माहीत आहे त्यांना हे सहज पटेल. पुढे मुअम्मर गडाफी यांना या झुंडीने मारून टाकले.
ही जी ‘जस्मिन क्रांती’  होती, (या नावावरच बरेच मतभेद होते अर्थात) याचं एक सर्वात मोठं नि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही मानवी इतिहासातली अशी क्रांतीची साखळी होती, जी न-नायकत्वा’कडे नेणारी होती. आतापर्यंतच्या राजकीय उत्क्रांतीच्या इतिहासात जुनी राजवट किंवा जुने राज्यशकट उलथून टाकण्याकरिता जनता एका नव्या नायकाची वाट पाहत असे. गंमत अशी की, या बंडाच्या वणव्यात होरपळत असलेल्या बर्‍याच हुकूमशहांचा राजकीय रंगमंचावर प्रवेश हाच मुळात क्रांतिकारी बंडखोर नायक म्हणून झाला होता. राजकीय उत्क्रांतीच्या इतिहासात नेपोलियन बोनापार्टपासून ते आजपर्यंत (नि याअगोदरही) जनतेला पुन्हा पुन्हा असं दिसून आलं की, कोणतीही क्रांती ही तिच्या नायकाला सिंहासनाधिष्ठीत करणार्‍या विचारवंतांचा, लेखकांचा, प्रणेत्यांचा बळी त्या नायकाच्याच इशार्‍याने घेते. नंतर मुक्या झालेल्या जनतेच्या माथी हे नायक ‘क्रांतिकारक’ भयानक जुलूम, अत्याचार आणि जुन्या राजवटीने लादलेलीच सरंजामशाही लादतात. ‘द ग्रेट डिक्टेटर’मधल्या त्या वाक्याप्रमाणे हे नव्याने नायक बनलेले हुकूमशहा स्वत:च्या अनिवार लालसेसाठी आणि ऐय्याशीसाठी मुक्त आणि स्वतंत्र होतात नि ज्या जनतेच्या हातात त्यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा दिलेला असतो तो काढून घेतला जातो. तिच्या नशिबी पुन्हा तेच ‘ये रे माझ्या मागल्या’ जीवन यायला लागते.
माणूस जसा जैविकदृष्ट्या उत्क्रांत झाला, तसा तो सामाजिकदृष्ट्याही उत्क्रांत होत गेला. राजकीयदृष्ट्यासुद्धा मानवाची उत्क्रांती हजारो, लाखो वर्षं चालू आहे. ट्युनिशिया, इजिप्त, लिबिया, येमेन, बहारीन इथे कुठेही नवा नायक न अवतरताच क्रांतिने उग्र रूप धारण केल्यामुळे माध्यमांची पंचाईत झाली. माध्यमांना क्रांतिचा चेहरा पकडता येत नव्हता. कारण, तो चेहरा लपवून ठेवून झुंडशाहीने देश अराजकतेकडे नेता येतो, हे यंत्रयुगातल्या कपटी सत्तानितीज्ज्ञांना आता माहीत झाले आहे. हे नायक पुढे येत नाहीत याचे कारण, ते खलनायक आहेत हे जनतेला माहीत असते. ते मागे राहून सूत्रे हलवतात आणि झुंडीला संसाधने पुरवतात. या संसाधनांच्या जोरावर आपण गर्दी हेच नेतृत्व आहोत अशा भ्रमात, झुंडीतला प्रत्येक माणूस हा व्यक्ती म्हणून एक प्यादं आहे हेच विसरतो. त्याच्या जिवावर आणि रक्तावर हे खलनायक मोठमोठ्या देशांचं स्थैर्य, क्षमता आणि विकास यांचा विध्वंस करतात. अंतत: ते देश, ती गर्दीतली माणसं, त्या झुंडी याही देशोधडीला लागतात. आर्थिक प्रगती व विकास शून्यावर येऊन याच गर्दीला भीक मागण्याची वेळ येते. आपण करत असलेल्या मागण्या या आपल्या मागण्या नसून त्यामागे खर्‍या मागण्यांचा एक छुपा अजेंडा आहे, तो खलनायकांचा आहे व तो आपल्याला देशोधडीला लावेल याची त्यांना सुतराम कल्पना येत नाही.
गर्दी आणि जनता हाच क्रांतिचा चेहरा आहे. एका अर्थाने क्रांतितल्या नायकवादाविरुद्धची ही क्रांती आहे. तिने आपल्या अंगारात येणार्‍या काळासाठी अनेक अर्थ लपेटून आणलेले आहेत. ते आज कुणी नीटपणे समजून घेण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही. आपण लोकशाही राष्ट्र आहोत म्हणून आपल्याकडे जनतासुद्धा उठाव करणार नाही, असं मानणंसुद्धा भ्रम आहे. कारण जनतेचे हे उठाव नायकवादाच्या सरंजामी टर्रेबाज हुकूमशाहीविरुद्ध आहेत नि भारतात अशी सरंजामी टर्रेबाज हुकूमशाही जागोजागी आहे. गडाफी, मुबारक वगैरेंच्या मुलाबाळांविरुद्ध आणि नातेवाईकांबद्दल जनमताचा रोष तेवढाच प्रचंड होता. प्रत्येक हुकूमशहा माझ्यानंतर माझा वारस कुटुंबातला असणार नाही, हे सुचवण्याकरिता धडपडतो आहे. त्याचवेळी आपलेच वारस सत्तेत कसे राहतील याची काळजीही घेतो आहे. त्यामुळे जनक्षोभ शांत होईल, अशी त्याची अटकळ आहे. भारतात याहून वेगळी स्थिती काय आहे? मुलगे, मुली, भाचे, पुतणे वगैरेंची मांदियाळी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आहेच की! मुळात भारत हे गाभ्यामध्ये लोकशाही राष्ट्र आहे का, हा प्रश्‍न ऐरणीवर येऊ घातलेला आहे. कारण आर्थिक मंदी, बेरोजगारी, गरिबांची अतिप्रचंड लोकसंख्या, मुठभर श्रीमंतांच्या हातात एकवटलेली आर्थिक आणि राजकीय सत्ता, समान संधीचा बहुतेक महत्त्वाच्या क्षेत्रातील अभाव, नोकरशहा व राजकीय नेते (सर्वपक्षीय) यांच्या हातात एकवटलेली सत्ता आणि त्यातून निर्माण होणारा अकल्पनीय भ्रष्टाचार, ब्रिटिशकालीन इंडियन पीनल कोड, टॅक्स टेररिझम व सर्व क्षेत्रातील अमर्याद घराणेशाही, सरंजामदारी उद्योगसंस्था, पायाभूत सुविधांचा अभाव, निर्णयप्रक्रियेत लोकसहभागाचा निरोगी पायंडा नसणे वगैरे वगैरे बाबी या अल्जिरीया, येमेन, लिबिया, जॉर्डन, बहारीन, ट्युनिशिया, इजिप्त आणि भारत यांच्यात अजिबात वेगळ्या नाहीत. फक्त आपल्याकडे खर्च करून, टामटूम करून निवडणुका घेतल्या जातात, हे वगळता एक वडील किंवा आई नेता आणि दोन किंवा एक मुलगा, मुलगी, भाचा, पुतण्या, भाची, पुतणी वगैरेंची सत्ता सर्वदूर देशभर पसरलेली आहे. हीच स्थिती वर उल्लेखलेल्या देशांमध्येही आहे. पुण्याजवळ मावळमध्ये त्यावेळच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने (आघाडी सरकारने), सरकारविरोधी पण अतिशय न्याय्य अशी विपरीत बाजू मांडणार्‍यांवर टर्रेबाजी करून पोलिसांकरवी गोळीबार करून त्यांना ठार करून कायमचे गप्प बसवले. तर उरलेल्या शेतकर्‍यांच्या पोलिसांकरवी रात्रीत मुसक्या आवळण्यात आल्या. हे लिबिया, जॉर्डन, इजिप्त, बहारीन, ट्युनिशिया या देशांहून वेगळं नि लोकशाहीवादी खचितच नव्हतं. मावळचंच उदाहरण घेतलं म्हणून सांगतो, इथल्या मुख्यमंत्र्यांपासून ग्रामसिंहांपर्यंत सर्व सत्ताधीश चॅम्पियन हा बाहेरच्या शक्ंितचा डाव आहे म्हणून ओरडत आहेत. नेमकं हेच गडाफीपासून ते मुबारकपर्यंत ओरडत होते. वास्तवात हेच सत्ताधीश बाहेरच्या देशांची मदत घेऊन गब्बर झालेत नि गब्बर झाल्यावरची संपत्तीरुपी आपली माया त्यांनी परत बाहेरच्याच देशात नेऊन दाबली होती! आपल्या सत्ताधीशांचं काही वेगळं आहे का? त्यामुळे भारतातील लोकशाही काही प्रमाणात फसलेली आहे. फक्त हे बोलायला कुणी नाही. ज्यांचा या व्यवस्थेत फायदा आहे ते कशाला बोलतील? तर ज्यांचा गळा या व्यवस्थेने धरलेला आहे त्यांच्यात बोलण्याचे त्राणच उरलेले नाहीत.
‘जस्मिन क्रांती’ ज्या देशांमध्ये झाली, त्या देशांमध्ये नेमकी हीच परिस्थिती होती. मुद्दा जर त्या क्रांतीच्या यशाचा असेल, तर ते समीकरण फार जपूनच तोलायला हवं. नायकप्रधान क्रांती, मग ती नेपोलियनची असो वा लेनिनची; सशस्त्र असो की जयप्रकाशांसारखी शस्त्रहीन; क्रांती या कुठल्याही प्रकारातली असली तरी विद्यमान शासनसंस्था नि तिची प्रतिकं उखडून टाकली की, ती क्रांती यशस्वी झाली असं पूर्वी म्हटलं जायचं; पण क्रांतिच्या यशाची ही व्याख्या कमालीची अशास्त्रीय होती, हे आता लक्षात येतं. कारण, क्रांतिचं यश म्हणजे जुनी सत्ता उलथवून नवीन सत्ता आणणं नसून ती जुनी सत्ता ज्या मूल्यांच्या आणि तपशिलांच्या पुर्नस्थापनेसाठी उलथवण्यात आलेली आहे त्या मूल्यांची आणि त्या तपशीलांची पुर्नस्थापना क्रांतिकडून अपेक्षित असते. बहुतांशी तसं घडत नाहीच.
मानवी इतिहासातल्या या पहिल्याच न-नायकी’ क्रांत्या यशस्वी होऊन जुन्या सत्ता उलथल्या, तरी त्यातून नव्या मूल्यांची व जनताभिमुख नव्या तपशीलांची स्थापना होईल असं काही सांगता येत नाही. त्या अर्थाने या क्रांत्यांचं यश अजूनही अनिश्‍चित आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताच्या बाबतीत काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात घेणं आवश्यक आहे. हा देश एकजिनसी संस्कृतीचा वा भाषेचा नाही. शिवाय, नायकत्वाच्या आकर्षणात आकंठ बुडालेला आहे. अशा परिस्थितीत या जनतेचं (जरी ती सार्वभौम असली तरीही) भवितव्य काय?
ट्युनिशिया, इजिप्त, बहारीन, इराण, जॉर्डन, लिबिया वगैरे देशांची लोकसंख्या एकतर भारतापेक्षा कितीतरी कमी आहे. दुसरं म्हणजे हितसंबंधांचा फायदा मिळणारा गट आणि न मिळणारी लोकसंख्या यांच्यात तेल ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. (बहुतेक देशांत, सर्व नव्हे.) सांस्कृतिकदृष्ट्या हे देश वेगवेगळ्या कारणांनी एकजिनसी आहेत. (केवळ मुस्लिम धर्मीय म्हणून नव्हे.) शिवाय, ‘नाही रे’ घटकांमध्ये शिक्षण, सांस्कृतिक एकजिनसीपणा नि तेल यामुळे किमान लढण्याचं त्राण तरी शिल्लक आहे. इथे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, शिक्षण म्हणजे आधुनिक जगाचं समकालीन ज्ञान असाच अर्थ होत नाही. उदाहरणार्थ, लिबियामध्ये फ्रेंच, इंग्रजी किंवा इतर भाषा शिकायला बंदीच आहे. म्हणजे साक्षरता 87 टक्के असली, तरी जगाकडे बघण्याच्या नजरेवर मुअम्मर गडाफीच्या सरकारने पट्टी बांधून ठेवली होती. भारताचं तसं नाही. भारतात कुणी कुणाला उत्तरदायी नाही. मुठभर कुटुंबांसाठी लोकशाही आहे. त्यांनी स्वत:ला स्वतंत्र करून घेतलेलं आहे. त्याचवेळी इतर संपूर्ण देश स्वत:च्या गुलामगिरीत लोकशाहीच्या अधिकृत लेबलद्वारे लोटलेला आहे. मानवी इतिहासातले क्रांतीच्या नायकांचे पुन्हापुन्हा येणारे विपरीत अनुभव हे जनतेला शहाणं करत गेले नि क्रांतीतून नायकाला लुप्त करण्यात जनता यशस्वी ठरली, असा जर या राजकीय क्रांतिचा नी उत्क्रांतिचा अनुभव असेल, तर भारत अशा राजकीय उत्क्रांतिच्या अलीकडच्या टप्प्यांवरच अडखळतो आहे.
आपल्याकडे प्रत्येक क्षेत्रात नायकांची जवळजवळ पूजाच बांधली जाते. शिवाय, त्या नायकांनी (मुसोलिनी किंवा गडाफीप्रमाणे) आपल्या सर्वांच्या डोळ्याला पट्ट्या बांधण्याची गरज नसते. तर आपणच आपल्या हाताने त्या पट्ट्या बांधून घेतो नि मग त्या आपल्या नायकांच्या नावाने मळवट भरतो. अशा तथाकथित महानायकांनी महाचूक केली नि पुढे चुकांची मालिकाच चालवली. तरी आपण स्वत:लाच समजावतो की, आपला ‘बिचारा’ नायक चूक नसून (किंवा चोर नसून!) त्याच्या भोवतालचे लोकच त्याच्या नावावर लोकशत्रू बनवणारी पापे करत आहेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सांस्कृतिकदृष्ट्या एकजिनसी नसलेल्या समाजात सत्तेविरुद्ध एकत्र होऊन अलोकशाहीवादी आणि लोकशत्रू असणार्‍या धोरणांविरुद्ध लढण्याकरिता आपल्याला कोणता ‘नायक’ हाक देतो, याची आपण वाट बघत राहतो. शिवाय, याउलट कुठे होणार्‍या बेछूट जुलूमाला कंटाळून लोक स्वत:चे स्वत: एकवटले तर गल्लोगल्लीचे, राज्याराज्याचे, देशातले वेगवेगळे ‘राजकीय नायक’ आपले महत्त्व कमी होते आहे की काय, या भीतीने लगेच आपल्या हितसंबंधांची छुपी झोळी घेऊन जनतेला आपले नेतृत्व बहाल करण्यासाठी धाव घेतात. लोकही ’अवतार’ संकल्पनेने ग्रस्त असल्याने निमूटपणे त्या तथाकथित नायकाच्या झोळीत जाऊन बसतात. यात घराण्याच्या नावाचा मोठा वाटा असतो.
घराण्यातल्या थोर’ (खल)नायकाच्या म्हणजे आताच्या तरुण नायकाच्या आजोबा, बाबा, आई, काका, मामा वगैरे वगैरेंच्या नावाचा नॉस्टॅल्जिया जनतेला फार असतो. ज्यामध्ये भारतीय आपलं स्वातंत्र्य बहाल करून टाकते. खरंतर ’जस्मिन क्रांती’ने काही खास गोष्टी भारतासाठी स्पष्टपणे नजरेला आणून दिलेल्या आहेत. पहिली, ज्या नायकाबाबत आपल्याला नॉस्टॅल्जिक प्रेम, आकर्षण, करिष्मा वाटतो तो नायकही त्याच्या वारसांएवढाच लोकांच्या दृष्टिने फोकनाड आणि नुसता बोलबच्चन असतो. तो त्याच्या पूर्वसूरींप्रमाणे किंवा वारसांप्रमाणे स्वत:च्या ऐय्याशीसाठी तुमचं स्वातंत्र्य स्वत:च्या ताब्यात घेतो नि तुम्हाला परतंत्र करतो. तुम्हाला ’आदेश’ देऊ लागतो. बदल्यात स्वाभाविकपणे स्वत:च्या ऐय्याशीसाठी स्वत:चं राजकीय, सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्य अमर्याद वाढवतो. दुसरी, अशा नायकांना स्वत:च्या आयुष्यातून हद्दपार करून आत्मप्रेरणेने आणि आपल्या (जनतेच्या) आत्मबलाच्या जोरावर आपण सत्ताधारी वर्गाची (सत्ताधारी नि त्यांचे राजकीय विरोधक हे एकच आहेत हे समजून घेतलं पाहिजे.) मिरास आणि मक्तेदारी रस्त्यावर अहिंसक मार्गाने धडका देऊन आपण मानवी इतिहासात पहिल्यांदा काल्पनिक सर्वात मोठ्या लोकशाही देशात खरीखुरी लोकशाही आणू शकतो. तिसरी, सत्ताधारी वर्गाचा भाग नसलेल्या विशाल मध्यम वर्गाचे नि गरीब वर्गाचे प्रश्‍न आणि मागण्या मूलत: वेगळ्या नसतात. आफ्रिकेतल्या एक प्रकारच्या मुंग्यांचा जमाव चालत निघाला की, मध्ये येणार्‍या प्रत्येक वस्तूचा (मग ती जिवंत असो वा मृत) फक्त सांगाडा रस्त्यात उरतो. तद्वत जनता (गरीब आणि मध्यम वर्ग) आपले सांस्कृतिक आणि आर्थिक भेद विसरून रस्त्यावर उतरली की, शासनसंस्था साफ खलास होते. सत्ताधारी वर्गाचा नि नव्या-जुन्या नायकांचा निकाल लागतो. त्यांच्या ऐय्याशीचा सांगाडा उरतो. मग तोही कोमात जातो; पण यासाठी सातत्य व बलिदानाची तयारी एवढंच आवश्यक आहे. शिवाय, आपले नेते आपले मालक नाही, तर गुलाम आहेत. याउलट आपण त्यांचे गुलाम आहोत हा जो भ्रम त्यांनी आपल्या मनात पसरवलेला आहे, याची जाणीव चित्ती सतत असली पाहिजे. त्या अर्थाने प्रत्येक अधिकारी पुरुष हा 24 तास नी आठवडाभर सतत जनतेच्या प्रश्‍नाला उत्तर द्यायला बांधील आहे. ही बांधिलकी देशात सत्ताधारी वर्गापैकी कुणीही मान्य करत नसल्यामुळे ते उलथवून टाकण्याच्याच लायकीचे आहेत. चौथं म्हणजे, आपल्या देशात होतात त्या निवडणुका या क्रिकेटच्या सामन्यांप्रमाणेच जनतेच्या रागाचा दाब वाफेद्वारे काढून टाकणार्‍या व्हॉल्वसारख्या आहेत. त्यात समान संधीच्या तत्त्वाचा नि:पात राजकीय घराण्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत करत आणलेला आहे. त्यामुळे सार्वत्रिक बहिष्कार, रस्त्यावरून होणारी अहिंसक क्रांती आणि गांधीजींच्या तत्त्वांना पुढे नेण्याचा व उत्क्रांत करण्याचा संपूर्ण क्रांतिचा अयशस्वी प्रयत्न (त्यातल्या समाजवादाच्या व समाजवाद्यांच्या भोंगळपणाला व खोटेपणाला वगळून) अधिक उत्क्रांत व यशस्वी, गोळीबंद प्रयोगाकडे नेण्याचा ताकत लावून जनतेने प्रयत्न केला पाहिजे. मुख्य म्हणजे, या प्रयत्नात ’अंधेरे में प्रकाश’ किंवा ’अंधेरे में चिंगारी’ म्हणून कुणी नायक घुसणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. मुख्य नि कळीचा मुद्दा हा की, हे इथे होणं शक्य आहे का? तर याचं उत्तर सोपं आहे. कोणताही प्रयोग हा मानवी इतिहासात शक्य आहे. तो यशस्वी की अयशस्वी हे सांगणं गुंतागुंतीचं नी भरपूर वेळ घेणारं आहे; पण म्हणून प्रयोगच न करणं हे आता अमानुषपणाचं आहे आणि हा अमानुषपणा राज्यकर्त्या नी सत्ताधारी वर्गाने आपल्याशी केलेला नसून आपणच आपणाशी केलेला असेल.
या पार्श्‍वभूमीवरच अण्णा हजारे आणि गँग केजरीवाल यांनी मिळून परदेशी फंडिंगच्या मदतीने भारतात अस्थैर्य माजवणारी, पण झुंडींना भुलवणार्‍या घोषणा देणारी भारतीय जस्मिन क्रांती आणून भारत देशोधडीला लावायचा प्रयत्न केला होता. देशाच्या सुदैवाने तो यशस्वी झाला नाही. योगायोगाने का म्हणा, या लेखाचा लेखक तेव्हा अण्णा हजारेंचा ब्लॉगर असल्यामुळे या तथाकथित क्रांतिचा भ्रम पहिल्यांदा फोडता झाला. त्यापुढे घडले तो सारा इतिहास आहे. भारतात खलनायकी, अलोकशाहीवादी, विदेशी संसाधनांवर उभी असलेली, अराजकाकडे नेणारी भंपक जस्मिन क्रांती आपोआप विलयाला गेली. त्यानंतर निवडणुका झाल्या, केंद्रात नवीन सरकार आलं, राज्यातही बरेच बदल झाले. सरकार लोकशाही मार्गाने लोकांनी उलथवून टाकलं त्यालाही दोनहून जास्त वर्षं होऊन गेली. ही झाली पार्श्‍वभूमी. नवीन सरकार आल्यावर जुन्या खलनायकांच्या परिवाराला आणि स्वत: खलनायकाला असुरक्षित आणि अस्वस्थ वाटू लागलं. केंद्रातून विदेशी संसाधनं मिळण्याचे मार्ग आणि त्याच्या बळावर चेहरा म्हणून काम करणार्‍या भारतातील एनजीओ यांना पायबंद बसवला गेला. भारतात अशा वेळेला जनतेला अस्वस्थ करणारी आणि भ्रामक अस्मिता देऊ पाहणारी बाब उरली ती म्हणजे जात! उत्तर भारतात जाट आणि गुर्जर, गुजरातेत पटेल यांची आश्‍चर्यकारकरित्या अवास्तव मागण्यांची जनआंदोलने सुरू झाली, ज्यात आरक्षण हा प्रमुख मुद्दा होता. वास्तविक संविधानकारांनी दुर्बल आणि मागास घटकांकरिता संविधानात आरक्षणाची तरतूद केली होती. कालावधी वाढत गेला तरीसुद्धा ती योजना कालबाह्य ठरत नाही, हे वेळोवेळी दिसून आले. सरकार अस्थैर्याकडे नेणे हे या जातींच्या ’न-नायकी’ आंदोलनाचे खरे उद्दिष्ट होते आणि आहे. त्यांच्यामागे असलेले सत्ताभ्रष्ट झालेले खलनायक हे स्वत:ची लोकप्रियता गमावून बसलेले आहेत. त्यामुळे ते पुढे येऊ शकत नाहीत; परंतु, जातीच्या आधारावर सरकारातील सर्व राजकीय पक्षांतील आणि प्रशासनातील अधिकार्‍यांना अपील करणे त्यांना सोपे आणि सोयीचे होते. जेणे करून सत्तेत असताना केलेली कृष्णकृत्ये, दाबलेला काळा पैसा आणि आपल्या परिवाराच्या नावाने केलेली अमर्याद शुचिता नसलेली संपत्ती वाचवणे ही त्यांची निकड होती.
या पार्श्‍वभूमिवर महाराष्ट्रात मराठा म्हणवणार्‍या कुणब्यांचे एक अचानक न-नायकी’ असे अतिशय नियोजनबद्ध व प्रचंड पैसा खर्च करून एक झुंडीचे आंदोलन उभे राहिले, जे थेट मागास, दुर्बल आणि दलित विरोधी होते. अशा प्रकारच्या नियोजनासाठी लागणारा पैसा आणि अशा प्रकारचे नियोजन व गर्दी ही एका रात्रीत होत नाही. जगाच्या पाठीवर हे कुठेही शक्य नाही. अगदी निश्‍चितपणे! खरे तर मराठा ही जात नव्हे.
महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांपासून ते 1818 ला पेशवाई बुडेपर्यंत प्रत्येक मराठी भाषिक मनुष्य हा मराठा म्हणूनच ओळखला जायचा. 
 
शिवाय, आजही यात काडीचाही अधिकृत बदल झालेला नाही. जे मराठा असे म्हणून स्वत:ला मराठा जातीचे मिरवतात ते जातीने ’कुणबी-मराठा’ आहेत. महाराष्ट्रातला ब्राह्मण हा जातीने ’ब्राह्मण-मराठा’ आहे. मराठा जात नसून मराठी भाषिकांची मराठी साम्राज्यानंतरची खरी आणि एकमेव ओळख आहे. जसे छत्रपती शिवराय हे फक्त कुणब्यांचे राजे नसून मराठा साम्राज्याचे संस्थापक आहेत. त्यांचा सर्व मराठी जातींवर हक्क आहे आणि सर्व मराठी जातींचा त्यांच्यावर हक्क आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल हेच सांगावे लागेल. महापुरुषांना जे जातीची मक्तेदारी बनवतात, त्यांना गुन्हेगार मानले पाहिजे. तसेच मराठा शब्दाला जात बनवणार्‍यांनाही गुन्हेगार मानायला पाहिजे. सैन्यातील मराठा रेजिमेंटमधून सर्व जातीचे मराठी जवान लढतात. देशभर मराठी बोलणार्‍या माणसांना मराठा बोलले जाते. इतिहासात त्याचे पुरावे आणि दाखले आहेत. छत्रपती शिवरायांबरोबर 18 पगड जातीचे लोक चार मुसलमानी सलतनीविरुद्ध लढायला उभे राहिले, ते मराठा म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यात ब्राह्मणांपासून त्या काळच्या महारांपर्यंत सर्व जण होते. आजही मराठी भाषिकाची जात विचारायची असेल, तर भारतभर ब्राह्मण-मराठा, सोनार-मराठा, कुणबी-मराठा अशीच ओळखली जाते. छत्रपती शिवरायानंतर छत्रपतींच्या गादीसाठी लढणारे पहिले पेशवे बाळाजी विश्‍वनाथ, त्यांचा मुलगा पहिला बाजीराव जो वीस वर्षांत 40 लढाया लढला आणि त्या सर्व लढाया त्याने जिंकल्या, जे साम्राज्य पुढे मराठ्यांनी (ज्यात सर्व जातीचे मराठी लोक होते) अफगाणिस्थानपर्यंत नेले त्याला ’मराठा एम्पायर’ म्हणून ओळखले जाते. त्यावेळच्या पेशव्यांच्या पत्रांमध्येही त्याचा थेट उल्लेख आहे. 
शिंदे, होळकर वगैरेंसारखे सर्व सरदार हे मराठेच होते. धनगर-मराठा, न्हावी-मराठा वगैरे. ही बाब जातीशी संबंधित नव्हती आणि नाही. मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर इंग्रजांनी नाव, वडिलांचे नाव, आडनाव व जात लावायला सक्ती केली तेव्हा काही शेतकरी कुणबी लावू लागले, तर काही शेतकर्‍यांनी मराठा ही जात लावली. अर्थात, खरी जात मराठा ही नसून कुणबी आहे, कारण राष्ट्रगीतातही मराठी बोलणार्‍यांसाठी ओळ आहे ती अशी - ’पंजाब, सिंध, गुजरात, मराठा’. आपण गुजराती ब्राह्मणालाही गुजराती म्हणून ओळखतो व गुजराती तेली माणसालाही गुजराती म्हणून ओळखतो तसेच, मराठी बोलणार्‍या माणसाला देशभर मराठा म्हणूनच ओळखतात.
ज्यांनी कागदोपत्री आपली जात कुणबी न लावता मराठा लावली आणि कागदपत्रांच्या आधारावर आपल्याकडे कसणार्‍या कुळांची संख्या ही श्रेष्ठत्वाची खूण मानायला सुरुवात केली व त्यातून ’96 कुळी’, ’92 कुळी’ मराठा असल्याची जाणीव पसरवली, जी एका अर्थाने अत्यंत अनधिकृत आहे. जात कुणबी असते, मग ’96 कुळी’ किंवा ’92 कुळी’ असो; पण तो मराठाच असतो. ब्राह्मण हा पूजा करणारा असो वा उद्योगपती असो; तो मराठी बोलणारा असेल तर मराठाच असतो. म्हणून भाई माधवराव बागल, क्रांतिसिंह नाना पाटील, शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे आणि खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्याला अनुकूल होते ते संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन उभे राहिले. या आंदोलनाचे मुखपत्र मानले गेलेले वृत्तपत्र, संयुक्त महाराष्ट्राचे तोफ मानले जाणारे नेते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी काढले, त्याचे नाव दै. मराठा’ ठेवले. ते वृत्तपत्र संयुक्त महाराष्ट्राची मशाल म्हणून ओळखले जाऊ लागले. अत्रे स्वत: ब्राह्मण होते. त्यामुळे ते महाराष्ट्र, ब्राह्मण, कुणबी वृत्त किंवा संयुक्त महाराष्ट्र नावाचे वृत्तपत्र काढू शकले असते; परंतु त्यात मराठा साम्राज्याची वज्रमूठ आणि सर्व मराठी भाषिक जातींची एकी दिसली नसती. ती ज्या नावात होती ती जात नसून महाराष्ट्र धर्माची तेजस्वी परंपरा आणि देशभर प्रचलित असलेले नाव होते.
1 मे 1960 ला संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर यशवंतराव चव्हाण यांनी ‘हे राज्य मराठी असेल, मराठा नसेल’ असे सूक्ष्म सूचक विधान करून पहिल्यांदा अधिकृतरित्या मराठा नावाची काहीतरी वेगळी जात आहे हे शासकीय माध्यमातून सांगितले. जे ऐतिहासिकदृष्ट्या पूर्णपणे मराठा या शब्दाशी विसंगत होते. स्व. यशवंतराव चव्हाण हे थोर व व्यासंगी नेते होते, पण जगातला कोणताही असा थोर नेता नाही ज्याची छोटी चूक पुढे मोठी होऊन महागात पडत नाही. उद्या बिहारी माणसाला आपण बिहारी म्हणून न ओळखता किंवा पंजाबी माणसाला पंजाबी न बोलता ’बिहारी जात’ किंवा ’पंजाबी जात’ म्हणू तर ते जितके अनैतिहासिक असेल तितकेच हे अनैतिहासिक आहे. ही झाली मराठा या शब्दाची परंपरा. मराठा या शब्दावर प्रत्येक मराठी भाषिकाचा 100 टक्के हक्क आहे. तो आपली जात ब्राह्मण-मराठा, कुणबी-मराठा, सोनार-मराठा लावू शकतो. हा त्याचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.
विस्तार भयास्तव थेट आज निघणार्‍या तथाकथित ’मराठा क्रांती मूक मोर्चा’कडे आपण पाहिलं, तर हा ’कुणबी-मराठा क्रांती मूक मोर्चा’ आहे. त्यांच्याकडे कोणतेही सैद्धांतिक तत्त्वज्ञान नाही. त्यांच्या मागण्यांना कोणत्याही तत्त्वज्ञानाचा आधार नाही. त्यांच्यामागे गुप्तपणे काम करणारी सत्ताभ्रष्ट खलनायकांची टोळी ही प्रशासकीय यंत्रणेपासून ते सर्व राजकीय पक्षांपर्यंत सर्वत्र राबते आहे. कारण त्यांना मराठा अस्मिता असण्याचा भासमान भ्रम झाला आहे (भ्रम हा भासमानच असतो). दिखाऊ स्वरूपाच्या त्यांच्या मागण्या काय आहेत, ते आपण पाहूच; परंतु त्या मागण्या लिहिण्याअगोदर तथाकथित मूक मोर्चे’ ज्या झुंडीने चालतात त्या झुंडीतल्या दहा माणसांना वेगळे काढले असता ते त्यांच्या मागण्या शिस्तबद्ध पद्धतीने एकसारख्या सांगतील, हे कधीही घडणं शक्य नाही. याचं कारण आपण इथे का आहोत हे झुंडीतल्या कुणालाच माहीत नाही. कुणी सांगेल, आम्ही कोपर्डीतील बलात्कारासाठी इथे जमलो आहोत. या दुर्घटनेतील पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे.’ ज्या मुलीवर बलात्कार होतो ती स्त्री असते म्हणून तिच्यावर बलात्कार होतो, ती कोणत्या जातीची आहे म्हणून बलात्कार होत नाही. ही थिअरी सत्ताधारी कुणब्यांनीच मागासवर्गीय आणि शोषित समाजाच्या स्त्रियांवर बलात्कार झाल्यावर विकसित केली होती. त्यातून मागास, शेड्यूल्ड कास्ट आणि आंबेडकरी समाज खवळला. त्यांनी संरक्षणाची मागणी केली. त्यांच्या मताधिक्क्याच्या दबावामुळे अट्रॉसिटी अ‍ॅक्ट (रलीं) निर्माण झाला. ज्यात शोषित, दलित, पीडित, भटके-विमुक्त यांना कुणब्यांसहित कोणत्याही उच्च व्यक्तिकडून अपमान, बलात्कार अशा कोणत्याही गुन्ह्याविरुद्ध संरक्षण मिळाले. खैरलांजीमध्ये दलित स्त्रियांवर बलात्कार झाला, तेव्हा स्त्रियांवर बलात्कार झाला म्हणून कुणब्यांचे मूक क्रांती मोर्चे’ निघाले नाहीत कारण, राज्यकर्तेच कुणबी होते. देशातल्या किंवा जगातल्या कोणत्याही शोषित व्यक्तिला, बलात्कार झालेल्या पीडितेला आणि दबलेल्यांना न्याय मिळावा, असे ठामपणे वाटणे हे कोणत्याही सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. बलात्कार पीडिता ही जातीने स्त्री असते म्हणून तिच्यावर विकृत पुरुष नराधम अत्याचार करतो, ही साधीसोपी व्याख्या आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत मागासवर्गीय (एससी, एसटी), स्त्रियांच्या नग्न धिंड काढलेल्या, सामूहिक बलात्कार आणि घरादाराची होळी होताना पाहिली आहे आणि त्या गुन्ह्यातील आरोपींना पब्लिक प्रॉसिक्यूटरने सहीसलामत सोडवल्याचेही पाहिले आहे!
कोपर्डीत झालेला एका पीडितेवरचा बलात्कार एका दिवसात लाखो लोकांचे नियोजनबद्ध मोर्चे उभे करायला संसाधने पुरवू शकत नाही. कोपर्डीतील बलात्कारामुळे झुंडीच्या संख्याबळाचं दहशतवादी बलप्रदर्शन आणि मागासवर्गीय व अल्पसंख्याकांचं मनोधैर्य खचवून टाकणारं नियोजन एका रात्रीत झालेलं नाही. सत्ताभ्रष्ट खलनायकांच्या टोळीने कोपर्डीतील कुणबी मुलीवर झालेल्या बलात्काराचा उपयोग जातीतील स्त्रियांच्या ध्रुवीकरणासाठी केला. त्यांची नियोजन यंत्रणा अगोदरपासून नियोजनबद्ध पद्धतीने चालू होतीच. त्याला एक भावनिक कारण मिळाले, ज्यामुळे त्या जातीतील स्त्रिया ध्रुवीकरण होऊन त्यांच्या नकळत आकृष्ट होतील. या ’कुणबी मूक मोर्चा’चे वृत्तपत्र ऑफिसच्या काचा फोडण्यापासून मुंबईत आम्ही शांतपणे मोर्चा काढूच असे नाही, असे सूक्ष्म ते दहशतवादापर्यंत रुपांतर होत गेले. खरे तर मोर्चाच्या साध्या मागण्या काय होत्या हे आपण बघू. मोर्चामागच्या खलनायकांनी ठरवलेल्या या कृतक मागण्या काय आहेत हे पाहणं आवश्यक आहे. (पुराव्यादाखल मागण्यांचा फोटो सोबत जोडलेला आहे.) 
1. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी या गावातील अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करून तिची क्रूर हत्या करणार्‍या आरोपींचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्या आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी.
2. अट्रॉसिटी कायद्याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत असल्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा.
3. सरसकट मराठा समाजाचा कुणबी (ओबीसी) प्रवर्गात उल्लेख करून त्यांना आरक्षण देण्यात यावे.
4. नंतर घुसडण्यात आलेली मागणी - आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तिला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे आणि त्या कुटुंबास शासनाकडून दहा लक्ष रुपयांची मदत करण्यात यावी.
5. पदवी-पदव्युत्तरपर्यंतचे सर्व अभ्यासक्रमातील शिक्षण मराठा समाजाला मोफत देण्यात यावे.
वरील पाचही मागण्या वाचल्यानंतर आपण हे कुणा सरंजामदाराला किंवा घटना आणि कायदे नसलेल्या देशातल्या व्यवस्थेला निवेदन देत आहोत की काय, असा धक्का बसतो.

या मागण्यांसंदर्भातील विश्‍लेषण :
मागणी 1 चे विश्‍लेषण : कोणताही नागरिक जो स्त्रीचा आदर करतो तो या मागणीला अमान्य करेल, ही शक्यताच दुरापास्त आहे. कोपर्डीतील एक संशयित आरोपी मागासवर्गीय समाजातील असल्याची गोष्ट ध्यानात आल्यानंतर आधीच ठरलेल्या नियोजनबद्ध बलप्रदर्शनात मागास, भटके आणि दुर्बल यांच्याविरुद्ध कुणबी समाजातील महिलांचे ध्रुवीकरण करण्यात यावे यासाठी ही मागणी करण्यात आलेली आहे. अन्यथा सरकारचे हे कर्तव्यच आहे की, बलात्कार करून खून करण्यात आला, तर फास्ट ट्रॅक कोर्टात सर्वोच्च सजा देण्यात यावी. या मुद्द्याशी महाराष्ट्रात कुणी असहमत होण्याची शक्यताच नाही.
मागणी 2 चे विश्‍लेषण : दुर्बल, मागासवर्गीय आणि भटके-विमुक्त यांना अट्रॉसिटी कायद्याची कवचकुंडले देण्यात आलेली आहेत. युती शासनाच्या काळात स्व. गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना हा कायदा सैल करणारे काही बदलही त्यात करण्यात आलेले आहेत. हा कायदा सरसकट रद्द करणे किंवा या कायद्याचे दात आणि नखे काढून टाकणे हे धनदांडग्या सरंजामदारांचे उद्दिष्ट आहे. याचे कारण पूर्वी मागासवर्गीय स्त्रियांची नग्न धिंड काढणे, त्यांच्यावर बलात्कार करणे, ’वाड्यावर या’ संस्कृती जोपासणे, एखाद्या मागासवर्गीय व्यक्तिचा सहजपणे ’मारुती कांबळे’ करणे! (प्रातिनिधिक संदर्भ : ’सामना’ चित्रपट) या सार्‍याला आता खलनायक बनलेल्या सत्ताधारी सरंजामदार कुणबी नेत्यांच्या टोळीला चाप बसला व मागासवर्गीय समाजाला संरक्षण प्राप्त झाले, याची उघड पोटदुखी या मागणीत आहे. कोणतेही कल्याणकारी राज्य दलित, शोषित आणि मागासवर्गीयांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असते. त्यामुळे अशा प्रकारची मागासवर्गीयांची कवचकुंडले काढून घेणे हे संविधानात्मकदृष्ट्या योग्य ठरणारच नाही आणि सरकारची कोंडी होईल. त्यामुळे सत्ताधारी असताना आपण केलेली कृष्णकृत्ये आणि जनतेला लुटून दाबलेला काळा पैसा बाहेर काढण्याचे नवीन सरकारचे उद्दिष्ट (जर असेल तर) ते पूर्ण करू शकणार नाही. शिवाय, शोषित, दलित, दुर्बल समाज व स्त्रिया सतत आपल्या धाकात राहतील हा या मागणीचा खरा अर्थ आहे.
मागणी 3 चे विश्‍लेषण : वर प्रतिपादन केल्याप्रमाणे आपली जात कुणबी असल्याने आपण ती ’कुणबी-मराठा’ असेच लावले पाहिजे. मराठा ही जात नाही, हे या मागणीने लेखातील मूळ मुद्दा पुन्हा एकदा नि:संदिग्धरित्या सिद्ध केलेला आहे. ही मागणी सरकार सहजपणे मान्य करू शकते परंतु, संविधानिकदृष्ट्या आरक्षण देण्याला एक मर्यादा आहे आणि आर्थिक दुर्बलता म्हणावी तर 95 टक्के देश आर्थिक दुर्बल आहे. त्यामुळे सरकारने कितीही लढाई केली, तरी ही मागणी कोर्टात टिकणारी नाही आणि सरकारने कितीही प्रयत्न केला तरी आर्थिक दुर्बलतेचे निकष ठरवणे किंवा सरसकट कुणबी समाजाला आरक्षण देणे हे इतर जातींचा रोष ओढवून घेणे आणि सरकारला अडचणीत आणणे असा या मागणीचा ’कु’हेतू आहे. पुन्हा या मुद्द्यासाठी पाच-पाच, दहा-दहा लाखांची गर्दी जमवून आणि करोडो रुपये खर्च करून 37-38 मोर्चे कुणी काढत नाही. निदान याअगोदरच्या सरकारांविरुद्ध कुणी काढलेले नाहीत!
मागणी 4 चे विश्‍लेषण : ही आयत्या वेळी घुसडण्यात आलेली मागणी अशासाठी आहे की, अगोदरच्या 15 वर्षं सत्तेत असणार्‍या सरकारच्या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या तेव्हा कागदावर धरणे बांधून त्यांना पाणी न मिळेल अशी व्यवस्था करून 70-80 हजार कोटींचा पाटबंधारे घोटाळा झाला. त्यातले काही पैसे वाटले (’कॅश’ने का होईना,) तरी सर्व आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना दहा लाख रुपये मिळून ही मागणी आधीच पूर्ण करता आली असती. बरे, दोन वर्षांत धरण बांधता येत नाही. मानवतावादी तत्त्वावर सरकारने ही मागणी मान्य केली, तरी जातीनिहाय आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना दहा लाख रुपये द्यावेत की फक्त कुणबी शेतकर्‍यांना दहा लाख रुपये द्यावेत हे या मागणीत स्पष्ट होत नसल्याने ही मागणी आपण शेतकर्‍यांसाठी काहीतरी करतोय हे दाखवून, शेतकर्‍यांचे ध्रुवीकरण करतोय हे दाखवण्यासाठी करण्यात आलेली भोंगळ मागणी आहे. कोणत्या जातीच्या शेतकर्‍याने आत्महत्या केल्यावर त्यांना दहा लाख रुपये द्यावेत, हे स्पष्ट होत नाही. शिवाय, कुठच्याही जातीच्या शेतकर्‍याने आत्महत्या केल्यावर त्यांना दहा लाख रुपये द्यावेत अशी मागणी असेल, तर आतापर्यंत 37 मोर्च्यांवर करण्यात आलेला खर्च जर आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांमध्ये वाटला असता तर आजपर्यंत आत्महत्या केलेल्या सर्व शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळाली असती आणि हे मोर्चेकरी घरी बसले असते; पण हेतू बलप्रदर्शन करून दहशत माजवणे हा असल्याने हे दोन्ही झालेले नाही. शेतकर्‍यांचा खरा विचार शरद जोशी आणि त्यांच्या संघटनेने केला होता. त्यांनी मृत्यूनंतर आपली सर्व संपत्ती शेतकर्‍यांमध्ये वाटून टाकली (तसे मृत्युपत्र त्यांनी केले होते). ’बारामती गँग’ शरद जोशी यांच्याएवढा शेतकर्‍यांचा अभ्यास 50 वर्षांत करू शकलेली नाही. तर शरद जोशी यांचं ’लक्ष्मीमुक्ती’ आंदोलन वगैरे तर फार दूरच. अभ्यास नाही, तर निदान शरद जोशींचा आदर्श ठेवून ’बारामती गँग’ने आपली अर्धी संपत्ती गरीब कुणबी शेतकर्‍यांमध्ये वाटून टाकली, तर दहशतवादी बलप्रदर्शन करण्यापेक्षा एक चांगला आदर्श नाही का निर्माण करता येणार? दहा एकर जमिनीमध्ये शेतीतील उत्पन्नावर टॅक्स नसल्यामुळे गेल्या दहा वर्षांत 110 कोटींचा निव्वळ नफा कमावता येतो हे आपण गुगलवर पाहू शकता. 
हे कसे करावे, याचे अभ्यासपूर्ण धडे गरीब कुणबी शेतकर्‍यांना दिले, तर हे शेतकरी एक एकर जमिनीत वर्षाला किमान एक कोटी कमवेल आणि सुखी होईल!
मागणी 5 चे विश्‍लेषण : पदवी-पदव्युत्तरपर्यंतचे सर्व अभ्यासक्रमातील शिक्षण मराठा समाजाला मोफत देण्यात यावे, ही मागणी सरकारने मान्य करावी. कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही; पण फक्त मुद्दा एवढाच उरतो की, यासाठी सर्व जातींनी आणि समाजाने असे मोर्चे काढायला सुरुवात केली, तर सरकारने काय करावे याचा खुलासा इथे करण्यात आलेला नाही. ही मागणी मान्य केल्यावर कराचा जो बोजा सरकारवर पडेल त्याचं टॅक्सपेअर्सनी काय करायचं? ही मागणी फक्त एका जातीपुरती मर्यादित का? पुन्हा या मुद्द्यासाठी पाच पाच-दहा दहा लाखांची गर्दी जमवून आणि करोडो रुपये खर्च करून 37-38 मोर्चे काढण्याची काय गरज?
हे सारे खुलासे कोणत्याही शहाण्या माणसाने वाचल्यावर या लेखाच्या सुरुवातीला झुंड जमवून त्याला संसाधने उपलब्ध करून देऊन अराजकता निर्माण करण्याची विकसित देशातील मोठ्या ताकतींची जी प्रक्रिया होती तिच प्रक्रिया इथे वापरण्यात आलेली आहे. आपण परदेशात दाबलेला काळा पैसा आणि आपण 50 वर्षांत न केलेली सामान्य माणसाची कामे यामुळे आलेले खलनायकत्व आपल्याला नायक बनू देत नाही, हे सरंजामदारांच्या टोळ्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी एका बहुसंख्य आणि भरपूर प्रमाणात कॅशमध्ये चलन असलेल्या सरंजामदारांना हाताशी धरून नियोजनबद्ध रीतीने अस्मिता, भावना, अराजकता, सूक्ष्म दहशतवाद आणि स्थूल दहशतवाद समाजामध्ये निर्माण करून संपूर्ण राज्याची विकासयंत्रणा आणि अर्थयंत्रणा खिळखिळी करण्याचे ठरवले आहे.
जात हा आधार घेतल्यामुळे प्रशासनातल्या, पोलिसातल्या, न्याययंत्रणेतल्या आणि सर्व पक्षातल्या भ्रष्टांचे सहजपणे यात जातीच्या आधारावर ध्रुवीकरण झालेले आहे. हे फार भीषण आहे. गर्दीत सामील असलेल्या लाखो तरुणांना शिक्षित आणि ज्ञानी होण्याचा मार्ग बंद करून गुंड आणि झुंड बनवणे, त्यांना वापरणे आणि तेच या ’फेक क्रांती’चा चेहरा आहेत, असे भासमान दृश्य आणि कल्पना त्यांच्या मनात रुजवणे हे या मोर्चाचे सायकोडायनेमिक्स (िीूलहेवूपळाली) आहे. या मोर्चात सामील झालेला 99 टक्के तरुण वर्ग, महिला आणि गरीब जनता यांना आपण का, कुणासाठी आणि कसे वापरले जात आहोत याचे गुंतागुंतीचे ज्ञान कधीही येणार नाही. कारण या मोर्चांची व्यवस्थाच अशी बनवलेली आहे. तशी व्यवस्था बनवल्याशिवाय खलनायकांचा विजय अशक्य आहे. या मोर्चामध्ये सामील झालेल्या 99 टक्के लोकांना कधीच कळणार नाही की, हे असेच चालू राहिले तर ते कधी देशोधडीला लागतील. त्यांनी एवढेच लक्षात ठेवले पाहिजे की, प्याद्यांचा उपयोग झाल्यावर त्यांना शेवटी डब्यात टाकण्यात येते! या ’भासमान क्रांती’ला जात आहे पण, चेहरा नाही आणि नायकही नाही. कारण सर्व नायक हे खलनायक बनल्यामुळे आधीच मेलेले आहेत. त्यांच्या हालचाली त्यांच्या सुरक्षित ’पिरॅमिड’मधून सुरू आहेत.
सरकारने या मोर्चाच्या नियोजनासाठी उपलब्ध करून दिलेला निधी आणि त्याचे स्रोत याचा सावधपणे शोध घेतला, तर मेलेल्या क्रांतीच्या खलनायकांच्या पिरॅमिडचे कोडे सरकारला उलगडू शकेल; पण हे होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण जातीच्या आधारावर भरपूर भ्रष्टाचार केलेल्या प्रशासकीय, पोलीस आणि इतर सरकारी यंत्रणांचं सहकार्य सरकारला कधीही मिळणार नाही, अशी व्यवस्था आधीच करून ठेवण्यात आलेली आहे!
हा विनाश काळाचा आरंभ आहे; परंतु कोणत्याही विनाशाचा आरंभ हाच त्याचा शेवटही असतोच. त्यामुळे सामान्य नागरिकांनी (अगदी मोर्चात सामील झालेल्यांनीसुद्धा) जर शांतपणे कोडे उलगडायचे ठरवले, सरकारमार्फत नव्हे तर लोकांकडून एका नव्या क्रांतीचा प्रारंभ असू शकतो जो एका नव्या युगाचा प्रारंभ ठरू शकेल. हा रस्ता सरळ जातीअंताकडे आणि व्यक्तिच्या विकासाकडे जाईल. कारण एक व्यक्ती हा समाजातील सर्वात छोटा अल्पसंख्याक गट आहे आणि त्याचे कल्याण करणे हे कल्याणकारी राज्याचा धर्म आहे!
हे होणे अवघड आहे, पण अशक्य नाही! रक्त, घाम आणि अश्रू मराठ्यांनी (सर्व जातीच्या) नेहमीच वाहवलेले आहेत आणि त्यातून अफगाणिस्थानपर्यंत साम्राज्यं उभी केलेली होती. फक्त पुढे ती संस्थानिकांच्या ताब्यात जाऊ नये, याची काळजी घेतली नाही. कारण छत्रपती शिवरायांच्या नंतर समता आणि समानता याचा विचार मराठ्यांनी केला नाही. छत्रपतींनी सर्व जहागिर्‍या, वतनं आणि सरंजामदार्‍या खालसा केल्या होत्या. त्यासाठी ते स्वकीयांशीही लढले. अगदी नातेवाईकांशीसुद्धा. त्यानंतर हे काम तेवढ्या तडफेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला; परंतु महाराष्ट्राच्या दुर्दैवाने दोघांचंही आयुष्य कमी पडले.
इतिहास आपल्याला चुका सुधरावयाला शिकवतो असे मानले, तर करण्यासारखे खूप आहे.

- राजू परुळेकर,  बी-1003, विनी टॉवर, ऑफ लिंक रोड, ऑफ चिंचोली रोड, इन्फंट जिजस स्कूलच्या समोर, मालाड (प.) मुंबई 400046, भ्रमणध्वनी : 9820124419
 
विशेष लेख - 'साहित्य चपराक' दिवाळी विशेषांक २०१७


 

Monday, January 2, 2017

ट्रॉय शहराचे शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करणारा आद्य पुरातत्त्वज्ञ हेन्री श्‍लीमन

रमणीय पुरातत्त्व

नव्या वर्षातील नवे सदर

साप्ताहिक ‘चपराक’च्या वाचकांना खास भेट

 

आर्किऑलॉजी’ अर्थात पुरातत्त्व म्हणजे प्राचीन काळाचा शास्त्रशुद्ध अभ्यास. पृथ्वीवरील माणूस सुमारे दहा लाख वर्षांपासून अस्तित्वात आहे. त्यापूर्वीचा काळसुद्धा या अभ्यासात येतो. एकपेशीय जीवापासून डायनोसॉरपर्यंत प्राणी यात अंतर्भूत आहेत. मानवी प्रगती कसकशी होत गेली, हे शोधून काढणे मोठ्या जिकिरीचे आणि कष्टाचे काम आहे. पुरातत्त्वामध्ये भौतिक विकास प्रामुख्याने पाहिला जातो. सन 1931 मध्ये मोहेंजोदडो आणि हराप्पा या शहरांचा शोध लागला आणि प्रगत अशी सिंधु संस्कृती उजेडात आली. भारताला प्राचीन इतिहास नाही, या पाश्‍चात्यांच्या कल्पनेला त्यामुळे मोठा धक्का बसला.
एकोणिसाव्या शतकात हेन्री श्‍लीमन (सन 1822 ते 1890) या जर्मन संशोधकाने पौराणिक ग्रीसच्या ट्रॉय शहराचे उत्खनन केले. पुरातत्त्वाच्या इतिहासातील हे पहिले शास्त्रशुद्ध उत्खनन. तोपर्यंत, मौल्यवान वस्तूंच्या शोधासाठी प्राचीन वास्तूंचा विध्वंस करणे, यालाच उत्खनन म्हणत असत. हेन्री श्‍लीमनचे चरित्र मोठे अद्भुत व रोमांचकारी आहे. सोन्याच्या हव्यासापोटी त्याने आयुष्यभर जी धडपड केली, ती ‘न भूतो न भविष्यति’ अशी आहे.
प्रसिद्ध लेखक/अनुवादक रवींद्र गुर्जर यांनी ‘पुरातत्त्व’ या विषयात उच्च शिक्षण घेतलेले आहे. प्रत्यक्ष कामही केले आहे. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीमधून हेन्री श्‍लीमनचे चरित्र दोन भागांत आपल्यापुढे येणार आहे. ‘रमणीय पुरातत्त्व’ या शीर्षकाखाली या निमित्ताने साप्ताहिक ‘चपराक’मध्ये एक नवे सदर सुरू होत आहे. ‘पुरातत्त्वा’मधील चित्रविचित्र, रमणीय गोष्टी वाचकांच्या भेटीला यामधून येत राहतील.

(पूर्वार्ध)

सन 1983. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने ‘इंडॉलॉजी’ म्हणजे ‘भारतीय विद्या’ या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला होता. फक्त रविवारी सकाळी तीन तास वर्ग असायचे. डॉ. म. के. ढवळीकर, डॉ. शां. भा. देव, डॉ. म. श्री. माटे आणि डॉ. शोभना गोखले हे नामांकित प्राध्यापक शिकवायला यायचे. मी त्यात प्रवेश घेतला. डॉक्टर, आर्किटेक्ट, प्रसिद्ध व्यावसायिक, कुरियर म्हणून काम करणारे आणि काही तरूण असे विद्यार्थी तिथे होते. रविवार हा सुटीचा दिवस असूनही कुणीही तासांना दांडी मारत नसत. विषयच तसे ज्ञानात भर टाकणारे आणि मनोरंजक होते. या अभ्यासक्रमामधून पुढे अनेक पुरातत्त्वज्ञ आणि प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक निर्माण झाले.
उत्खनन हा विषय शिकत असताना, हेन्री श्‍लीमन या जर्मन संशोधकाचे नाव समोर आले. त्याचे चरित्र मोठे विलक्षण आहे. होमर या महाकवीच्या ‘ओडिसी’ आणि ‘इलियड’ या ग्रीक महाकाव्यांचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर हेन्रीला असा विश्‍वास वाटू लागला की त्यात असलेल्या व्यक्तिरेखा आणि ट्रॉयसारखी शहरे खरी असली पाहिजेत. आपले ‘रामायण’ व ‘महाभारत’ आठवा. रामायणाचा काळ तर फार जुना; पण महाभारत हे त्यामानाने अलीकडचे, म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वी घडलेले. ही दोन्ही महाकाव्ये म्हणजे काल्पनिक रचना असाव्यात, अशी समजूत दृढ झालेली होती; परंतु महाभारतामधील गावांच्या उल्लेखांप्रमाणे उत्खनन केल्यानंतर, ती प्राचीन ठिकाणे उजेडात आली. घरे, भांडीकुंडी, अवजारे, धान्य आणि प्राण्यांचे अवशेष ‘उघड’ झाले. महाभारताचा नेमका काळ कोणता, हा अद्यापही अनुत्तरित प्रश्‍न आहे; पण ते होऊन गेले याबद्दल आता शंका राहिलेली नाही.
तर हेन्री श्‍लीमन या आपल्या मूळ विषयाकडे वळू! त्याचे जीवन खरोखर सुरस आणि अद्भुत आहे. बालपण अत्यंत गरीबीत गेले. वडील धर्मोपदेशक. पोटासाठी मिळेल ते काम करून त्याने प्रचंड हालअपेष्टा सहन केल्या. त्याला एका कानाने कमी ऐकू येत असे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही त्याची तीव्र ज्ञानलालसा आणि स्मरणशक्ती अलौकिक होती. उदा. ‘ओडिसी’ व ‘इलियड’ ही महाकाव्ये त्याने मुखोद्गत केली. तो प्राचीन समृद्ध ग्रीसच्या वातावरणाशी एकरूप झाला. त्या काळात मनाने वावरू लागला. तीच गोष्ट भाषा-शिक्षणाची. सहा महिन्यात एक, या प्रमाणे 15-16 भाषा त्याने तरूण वयातच आत्मसात केल्या. पौराणिक ‘ट्रॉय’ शहराचा शोध आपण लावलाच पाहिजे, असा त्याने ध्यास घेतला. ‘चांदोबा’ मासिकात ‘लाकडी  घोडा’ ही क्रमशः येणारी कथा किंवा ‘हेलन ऑफ ट्रॉय’ हा सुंदर चित्रपट ज्यांनी पाहिला असेल ते खरोखर भाग्यवान!
हेन्रीचे चरित्र संक्षेपाने बघणे मोठे उद्बोधक ठरेल. पोलंडच्या सरहद्दीजवळ एका लहानशा इटालियन खेड्यात 6 जानेवारी 1822 रोजी त्याचा जन्म झाला. त्याला चार बहिणी व दोन भाऊ होते. वडिलांनी आपल्या मुलांना प्राथमिक शिक्षण घरातच दिले. हेन्री पूर्वजांच्या शौर्यकथा, गूढ, रहस्यमय भुतांच्या गोष्टी ऐकताना रंगून जाई. जमिनीखालची भुयारे आणि गुप्त खजिना हे त्याच्या खास आवडीचे विषय. ट्रोजन युद्धाच्या कथा ऐकताना त्याच्या अंगावर काटा उभा  राही, अंगात वीरश्रीचा संचार होई.
तो सात वर्षांचा असताना ‘जगाचा चित्रमय इतिहास’ हे पुस्तक त्याला भेट मिळाले. अग्नीच्या वणव्यात पेटलेल्या ट्रॉय शहराचे चित्र त्यात होते. तिथे घडलेल्या युद्धाचे जिवंत देखावे त्याच्या नजरेसमोर प्रत्यक्ष दिसू लागले. त्याने मनाशी निर्णय घेतला की, ते ट्रॉय शहर आपण शोधून काढायचेच! पुढे त्याच्या आठवणीत असा एकही दिवस गेला नाही, जेव्हा त्या ध्यासाचा त्याला विसर पडला होता.
आईच्या मृत्यूनंतर त्याला लहानपणीच काकाच्या गावी पाठवण्यात आले. तिथल्या शाळेत तो चांगलाच रमला. थोड्याच अवधीत त्याने लॅटिन भाषेवर प्रभुत्व मिळवले. त्याच्या शाळेत होमरचा अर्धपुतळा होता. 1832 च्या नाताळात (दहाव्या वर्षी) त्याने ‘भेट’ म्हणून वडिलांना ट्रोजन युद्धावर एक लांबलचक निबंध लिहून पाठवला. त्यात युद्धातील महत्त्वाच्या घटना आणि वीरपुरुषांचे पराक्रम यांचे वर्णन होते. अन्य मुलांपेक्षा तो बुद्धिमत्तेत वरचढ होता, याचे ते निदर्शक होते. पुढे फी भरणे अशक्य झाल्यामुळे चांगली शाळा सोडून त्याला सामान्य शाळेत जावे लागले. काकाचीही मदत मिळेना. मग शाळेला रामराम ठोकून शेजारच्या गावी एका वाण्याच्या दुकानात त्याने काम पत्करले. दोन घास अन्न आणि अंग टाकण्याएवढी जागा मिळणे, हे त्याच्या दृष्टीने अत्यावश्यक ठरले. मीठ-मिरचीपासून दारूपर्यंतचा माल गिर्‍हाईकांना तत्परतेनं पुरवण्याच्या कामावर तो रूजू झाला.
पगार अगदीच तुटपुंजा होता. मालकाचा त्याला खूप राग येई. पहाटे पाचला उठून पडेल ती कामे त्याला करायला लागायची. दिवसभर तो इतका थकायचा की, काही अभ्यास करायला त्राणच उरत नसे. पुढची पाच वर्षे तशीच गेली. त्याची श्रीमंत आणि संशोधक होण्याची स्वप्ने मात्र जिवंत राहिली. अचानक एक अपघात झाला आणि त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. एक जड लाकडी पिंप उचलताना त्याच्या छातीमधून तोंडात रक्त आले. तो अत्यंत अशक्त झाला होता. त्यामुळे नोकरी सोडणे अपरिहार्य ठरले. हॅम्बुर्ग या किनार्‍याजवळच्या गावी जावे असे त्याने ठरवले. अमेरिकेला जाण्याची इच्छा मनात घर करून होती. जवळ फक्त सात पौंड एवढीच शिल्लक होती. त्यातूनही त्याने हिशेब लिहिण्याचे शिक्षण अल्पावधीत घेतले. अंगावरच्या कपड्यानिशी तो ‘नशीब’ कमवायला बाहेर पडला.
नव्या शहराने त्याला आकर्षित केले. ‘हॅम्बुर्गनं मला सप्तस्वर्गात नेऊन सोडलं आणि माझी स्वप्नांची दुनिया खुली झाली,’ असे त्याने आपल्या बहिणीला पत्र लिहिले. पण त्या अशक्त आणि अल्प अनुभव असलेल्या मुलाला कोण काम देणार? एक-दोन किरकोळ कामे करून त्याने त्या शहराचा निरोप घेतला.
योगायोगाने त्याच्या आईला ओळखणार्‍या एका जहाज व्यापारातील दलालाने त्याला नवी ‘दिशा’ दाखवली. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाकडे जाणार्‍या एका जहाजावरून नेण्यासाठी त्याला शिफारस-पत्र दिले. मनाने तो केव्हाच तिकडे पोहोचला होता. जुन्या बाजारातून थोडे कपडे आणि चादर विकत घेऊन तो जहाजावर दाखल झाला. 18 नोव्हेंबर 1841 रोजी जहाज निघाले. या प्रवासाची सवय नव्हती. हेन्रीला जहाज लागले. चार-पाच दिवस आजारपणातच गेले. पुढे ‘नॉर्थ सी’मध्ये चक्री वादळाचा तडाखा सुरू झाला. त्यातही तो स्पॅनिश शिकण्याची धडपड करत होता.
त्यातून हिमवर्षाव सुरू झाला. लाटा आकाशाला भिडू लागल्या. डोक्यावर समुद्रपक्ष्यांच्या घिरट्या-एक अशुभ लक्षण! थंडीचा कडाका वाढला. अखेर मध्यरात्री, एका जबरदस्त लाटेबरोबर जहाज कलंडले आणि बुडायला लागले. झोपेतून जागा झालेला हेन्री डेकवर आला. त्याचे सर्व सामान पाण्याने गिळंकृत केले होते. कॅप्टनने काही होड्या बाहेर सोडल्या. त्यांचाही टिकाव लागेना. जहाजाने जलसमाधी घेतलीच. हेन्री त्याच्याबरोबर खाली गेला पण लगेच पृष्ठभागावर आला. जवळच एक लाकडी पिंप तरंगत होते. जिवाच्या आकांताने त्याने ते घट्ट धरून ठेवले. काही वेळानंतर त्याच्या एका सोबत्याने त्याला पाण्याबाहेर ओढले. बचावलेल्या एका होडीत चौदा जणांसह तो काकडत, अंग चोरून बसला. दिशाहीन भरकटत ती होडी डच किनार्‍याजवळील ‘टेक्सेल’ बेटावर पोहोचली.
एका शेतकर्‍याने त्या सर्वांना आपल्या घरी तीन दिवस आसरा दिला. हेन्रीला दोन विजारी, गरम चादर आणि लाकडी बूट मिळाले. विशेष गोष्ट म्हणजे त्याच्या सामानाची पेटी किनार्‍यावर वाळूत येऊन पोचली होती. मुख्य म्हणजे त्याला मिळालेले शिफारसपत्र त्यात सुरक्षित राहिलेले होते. त्याने फेरी बोटीतून हॉलंडला जायचे ठरवले. ऍमस्टरडॅमला काही कटू अनुभव घेतल्यानंतर एका कंपनीत त्याला नोकरी मिळाली. बँकेच्या हुंड्यांवर शिक्के मारून त्याचे रोख पैसे घेऊन येणे, हे त्याच्या कामाचे स्वरूप होते. त्याचे दारिद्य्र संपले आणि उज्ज्वल भवितव्याची वाटचाल सुरू झाली. त्यासाठी खूप धडपड मात्र करावी लागली.
कमीतकमी खर्चात राहणे, करमणुकीवर एक पै सुद्धा न उधळणे आणि स्त्रियांच्या भानगडीत न पडणे या गोष्टी त्यानं कटाक्षानं पाळल्या. स्मरणशक्ती वाढवणे आणि अनेक भाषांचा अभ्यास, हा त्याचा ध्यास होता. परिणामी त्याचा स्वभाव कडवट बनला. ताठ वागणूक, निष्ठुरपणा, भावनाशून्यता पण स्पष्टोक्ती हा त्याचा स्थायीभाव झाला. त्यातूनही त्याला ट्रॉय शहराचा विसर पडला नव्हता. एक क्षणही तो वाया घालवत नसे. सात भाषांचे ज्ञान, हिशेब लिहिण्यावर प्रभुत्व आणि दोन वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव यांच्या जोरावर त्याला एका नव्या कंपनीत ‘हिशेबनीस’ म्हणून 150 डॉलर्स पगाराची नोकरी मिळाली. पगार वेगाने वाढतच गेला. स्वतःच्या कर्तबगारीवर तो कंपनीचा मुख्य प्रतिनिधी बनला. इंग्रजी आणि रशियन तो लवकरच शिकला. नजीकच्या काळातच त्याला रशियाला जाऊन नीळ व्यापारात प्रचंड कमाईची संधी प्राप्त होणार होती. डिसेंबर 1845 मध्ये त्याला वरिष्ठांकडून अशी विचारणा झाली की, ‘‘सेंट पीटर्सबर्गमधील व्यवसाय सांभाळणार का?’’ त्याच्यासारखा बहुमोल माणूस कंपनीला गमवायचा नव्हता. म्हणूनच रशियाच्या राजधानीत महत्त्वाच्या पदावर पाठवायला वरिष्ठ तयार झाले. अन्य पाच शहरांचा व्यवसायही त्याच्या कार्यकक्षेत येणार होता. हेन्रीने त्वरित स्वीकृती दिली. यापुढे सार्‍या जगात त्याची भ्रमंती होणार होती.
अशा रीतीनं अवघ्या पंचविसाव्या वर्षी हेन्री जगातल्या एका मोठ्या कंपनीचा मुख्य प्रतिनिधी म्हणून बाहेर पडला. 1 फेब्रुवारी 1846 रोजी मोठा जिकिरीचा प्रवास करून तो सेंट पीटर्सबर्गमध्ये दाखल झाला.
त्याच्या जीवनात अनेक सुखद स्थित्यंतरे घडणार होती. सोन्याच्या राशी त्याची वाट पाहत होत्या.
(उत्तरार्ध साप्ताहिक 'चपराक'च्या पुढील अंकात)

- रवींद्र गुर्जर, पुणे 
९८२३३२३३७०

Friday, December 30, 2016

पेच

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आणि सुप्रसिद्ध कवी, लेखक बंडा जोशी यांची 'साहित्य चपराक' दिवाळी अंकातील ही कथा अवश्य वाचा.

(पूर्व प्रसिद्धी : 'साहित्य चपराक' दिवाळी अंक २०१७) 
‘‘येऊ का सरला वहिनी?’’
‘‘या या वसंतराव, अहो आम्ही सगळे तुमचीच वाट पाहत होतो.’’ वसंतराव आत आले. सोफ्यावर बसले. सरलाताईंनी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही जाऊन आलात कुलकर्ण्यांकडं? काय म्हणाले ते?’’
‘‘वहिनी इथंही तीच अडचण आली. बाकी त्यांना दीपा पसंत आहे; पण तिचं मूल पदरात घ्यायला ती मंडळी तयार नाहीत!’’
सरलाताई उदास झाल्या. दीपा त्यांची धाकटी मुलगी. तिच्या नवर्‍याच्या निधनानंतर तिच्या दुसर्‍या लग्नासाठी त्या खटपट करत होत्या. सरलाताईंचेही आता वय झाले होते. आयुष्यभर खस्ता काढून, त्यांनी प्रपंच केला होता. त्यांच्या पतीच्या घरची थोडीफार शेतीवाडी होती. त्यावर त्यांची गुजराण चालायची! त्यांचे पती शेतीची सगळी कामं जातीनं लक्ष घालून करायचे. सरलाताईंना दोन मुली थोरली प्रभा आणि धाकटी दीपा. दोघी शाळेत जात होत्या. दोघीही जात्याच हुशार होत्या. आपल्याला शिकता आले नाही, पण पोरींना खूप शिकवायचा सरलाताईंचा निर्धार होता. त्यांच्या यजमानांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारांसाठी शहरात नेण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. सरलाताईंवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातूनही त्या सावरल्या. लेकींसाठी कंबर कसून उभ्या राहिल्या. गडीमाणसांकडून शेती करून, त्यांनी प्रपंच पुढे रेटला. प्रभा आणि दीपा दोघींना शहरातल्या कॉलेजमध्ये घातलं. दोघीही पदवीधर झाल्या.
पुण्यातले चांगले स्थळ पाहून थोरल्या प्रभाचे त्यांनी लग्न लावून दिले. प्रभाचा पती संजय सरकारी नोकरीत कनिष्ठ पदावर होता. पगार बेताचाच होता; पण पुण्यात त्याचा छोटासा फ्लॅट होता. प्रभा सुखानं नांदू लागली. वर्षा-दोन वर्षात तिला मुलगा झाला. त्याचे नाव ठेवले अजय.
धाकट्या दीपासाठीही सरलाताईंनी चांगलं स्थळ पाहिलं. इकडून-तिकडून पैसे जमवून तिचे लग्न केले. दीपाचा नवरा शैलेश खाजगी नोकरीत होता. त्याचीही परिस्थिती यथातथाच होती; पण दीपा त्याचा प्रपंच टुकीने करत होती. वर्षभराने त्यांना गोंडस मुलगा झाला. मुलाचे नाव ठेवले सुमेध. सारे काही ठीक चालले होते; पण दुर्दैव आड आलं. मंदीमुळे शैलेशची कंपनी डबघाईला आली. कंपनीकडून त्याला सक्तीची रजा देण्यात आली. निराशेच्या भरात त्याला वाईट संगत लागली. सिगारेट, दारू, अंमलीपदार्थ यांच्या तो पुरता आहारी गेला. त्यातच तो आजारी पडला आणि वारला.
सरलाताई, प्रभा, तिचा पती संजय या सार्‍यांनी दीपाला धीर दिला. शैलेशची कर्जे फेडण्यासाठी दीपाला राहता फ्लॅट विकावा लागला. मग ती आणि मुलगा सुमेध दोघांनाही संजय-प्रभाने आश्रय दिला. सरलाताईंची प्रकृतीही बरी नसे. त्यामुळे गावातले घर, शेतीवाडी विकून त्यांनी झालेली कर्जे फेडून टाकली. प्रभाने आईला आपल्या  घरी ठेऊन घेतले. त्यात आता दीपा आणि तिच्या मुलाची भर पडली. त्यामुळे दीपाचे दुसरे लग्न करण्यासाठी सरलाताई धडपडत होत्या, पण यश येत नव्हतं. अनेक स्थळे पाहिली पण दीपाच्या मुलासह तिला स्वीकारायला कुणी तयार नव्हतं. या कुटुंबाचे स्नेही वसंतराव दीपासाठी कितीतरी उंबरठे झिजवत होते, पण होकार मिळत नव्हता. प्रभाची परिस्थितीही ओढग्रस्तीची होती. त्यामुळे तिच्यावर भार टाकून किती दिवस रहायचे, हाही प्रश्‍न दीपासमोर होता. दीपाचा मुलगा सुमेध हा अजयबरोबर शाळेत जात होता. मुलासह दीपाला स्वीकारणारे समजूतदार स्थळ मिळावं, यासाठी सरलाताई प्रयत्न करत होत्या. कारण दीपाचे लग्न ही त्यांच्या समोरची मोठी समस्या होती.
आता पुढं काय? असा त्या विचार करत होत्या. तेवढ्यात वसंतराव म्हणाले, ‘‘सरलाताई आणखी एक स्थळ आहे नागपूरचं. अनूज देशपांडे हे मुलाचं नाव. नागपूरला मोठा बिझनेस आहे त्याचा. बंगला, गाडी, नोकर-चाकर सगळं आहे.’’ पहिल्या पत्नीपासून त्याचा घटस्फोट झालेला आहे. फक्त दीपाला नागपूरला जावं लागेल!’’
’’चालेल हो वसंतराव, तुम्ही पहा तर खरं!’’ वसंतरावांनी अनूज देशपांडेला फोन केला. तो पुण्यात आला. त्याच्या नातेवाईकांच्या घरी त्याने दीपाला आणि सरलाताईंना बोलावून घेतलं. यावेळी मात्र सरलाताई दीपाच्या मुलाबाबत काही बोलल्या नाहीत. घरी आल्यावर दीपाने त्यांना विचारले तर त्या म्हणाल्या,’’त्यांची पसंती देऊ दे मग बघू!’’
अनूजची पसंती आली. दीपा म्हणाली, ‘‘आई त्यांना मुलाची जबाबदारी घेण्याविषयी सांगायला पाहिजे.’’ यावर वसंतराव म्हणाले, ‘‘हे बघ दीपा पुन्हा पुन्हा आपण त्याच मुद्यावर अपयश घेत आहोत. तुम्ही विचार करावा असे मला वाटते. दीपाच्या मुलाबाबत आपण आता काहीच बोलायला नको. इथे अजयबरोबर सुमेध शिकतो आहे. त्याची काळजी संजय, प्रभा घेतच आहेत. तू चिंता करू नको. लग्नानंतर तुम्हा दोघांचा प्रपंच मार्गी लागला, प्रेम आणि विश्‍वास निर्माण झाला की मग, तू अनूजला सगळी परिस्थिती समजावून सांग.’’
‘‘नाही काका, हे मला योग्य वाटत नाही. ही चक्क फसवणूक होईल.’’
‘‘अगं आपण त्यांना फसवणार नाही, खरं ते सारं सागणारचं आहोत, फक्त काही काळानंतर! एकदा तुमच्या दोघांचं नातं दृढ झालं की काही प्रश्‍न येणार नाही. आता अनूजला पहिल्या पत्नीपासून झालेलं मूल असतं तर तू स्वीकारलचं असतं ना!’’
‘‘हो काका!’’
‘‘मग झालं तर! आता यामध्ये थोडा धोका आहे, पण त्याला पर्याय नाही! नंतर परिस्थिती सांगितली तर अनूज समजून घेईल. मला तरी तो समजूतदार वाटतोय!’’
सरलाताईंनी वसंतरावांच्या सुरात सूर मिसळला. ’’अगं पोरी इकडे आड तिकडे विहीर, असं झालयं बघ. खरं सांगावं तरी धोका, खोटं बोलावं तरी संकट! तूच ठरव काय ते! परत परत त्याच दगडावर डोकं आपटत रहायचं का? प्रभाची-संजयरावांची परिस्थिती ही अशी. तू बघतेच आहेस. वर मी त्याच्या आश्रयाला. माझं सगळं ते करतायत. शिवाय वर्ष दोन वर्ष सुमेधचीही जबाबदारी सांभाळायला ते तयार आहेत. एवढं ते करतायत हेच खूप आहे. आता त्यांच्यावरचं तुझं ओझं थोडं तरी उतरवणं तुझ्याच हातात आहे. बघ बाई!’’
दीपाला हे पटत नव्हतं, पण सगळीकडून तिची कोंडी झाली होती. अखेर तिने हा जुगार खेळायचे ठरवले.
ती लग्नाला तयार झाली. लग्नाआधी अनूज तिला भेटायला पुण्याला आला. एका हॉटेलमध्ये ते भेटले. अनूजने तिला पहिल्या पत्नीशी घटस्फोट का झाला हे सविस्तर सांगितले, ‘‘अगं पदोपदी ती खोटं बोलायची. त्याला काही कारणही असायचं नाही. शिवाय कमालीचा उद्धटपणा, आईबाबांना विनाकारण उलट बोलायची, त्यांचा अपमान करायची. सतत लपवाछपवी, दिशाभूल घरात रोज भांडणं! मी कंटाळलो. अखेर घटस्फोटाशिवाय पर्यायच राहिला नाही! मला खोटेपणा आणि फसवाफसवीची विलक्षण चीड आहे!’’
दीपा चपापली, पण तिने चेहर्‍यावर काही दाखवले नाही. म्हणाली, ‘‘तसंच काही कारण असेल तर व्यवहारात थोडं खोटं बोलायला लागतं. कारण परिस्थितीच तशी असते.’’
‘‘मला नाही पटत. प्रामाणिकपणासाठी वाटेल ती किंमत मोजायची तयारी हवी. खोट्यातून आणखी खोटं अशी मालिका तयार होते. तिला अंत नसतो.’’
दीपाला काही सुचेना मुलाबाबत आपण बोलावे की नाही, हे तिला कळेना. हे लग्न मोडले तर घरच्यांना आणखी त्रास सहन करावा लागणार आणि खोटे बोलणे अनूजला आवडणार नाही.
तिची मनस्थिती द्विधा झाली; पण अनूजच्या एकूण व्यक्तिमत्त्वावरून तो आपल्याला कधीतरी समजावून घेईल, एवढा विश्‍वास मात्र तिला वाटला. तेवढ्यात तो म्हणाला, ‘‘तुला काही सांगायचं असेल तर स्पष्टपणे सांग हं!’’
दीपाने तिची कर्मकहाणी सांगितली. फक्त मुलाचा उल्लेख सोडून! ‘‘आईची तब्येत बरी नसते. लग्नानंतर अधूनमधून पंधरा-वीस दिवसांनी तिला भेटून जायची इच्छा आहे.’’
‘‘अगं साहजिक आहे. तुला असं वाटणं! ती व्यवस्था करता येईल. नाहीतर आपण त्यांना नागपूरला रहायला बोलावू’’ अनूज म्हणाला.
‘‘सध्या तसं काही नको. काही दिवसांनी बघू.’’
‘‘ठीक आहे. प्लेननं येऊन एक-दोन दिवस आईला भेटून परत येत जा!’’ अनूज म्हणाला. आईच्या निमित्ताने अधूनमधून पुण्याला येऊन सुमेधला भेटता येईल, असा विचार दीपानं केला होता.
नागपूरला अनूजच्या घरच्यांनी लग्नाची सगळी जबाबदारी घेतली. छोट्याशा हॉलमध्ये साध्या समारंभात अनूज-दीपाचं लग्न झालं. अनूज, त्याचे आईवडील, ते सारे कुटुंब अतिशय प्रेमळ आणि समजूतदार होते. काही दिवसातच दीपा त्या घरात रमली. देशपांडे कुटुंब नागपूरमधल्या प्रतिष्ठीत सधन कुटुंबापैकी एक होते. त्यामुळे पै-पाहूणे, आला गेला, सार्‍यांचा पाहूणचार दीपाला करावा लागे. ती हौसेने सगळे करी. त्या आघाडीवर दीपाने चांगला जम बसवला. तिच्या सासूबाईंची जबाबदारीही हलकी झाली. दीपाच्या मनमिळावू स्वभावामुळं तिने सार्‍यांना आपलेसे केले.
अनूजला साहित्य, संगीत, नाट्य अशा कलांची खूप आवड होती. त्यामुळं नाटकं, चित्रपट, संगीताचे कार्यक्रम यांना तो दीपासह हजेरी लावत असे. दीपालाही या सार्‍यात रस होताच. त्यानिमित्ताने मोठमोठे साहित्यिक, कलावंत यांच्याशी परिचय होई. अनूज त्यांना आपल्या बंगल्यावर खास गप्पांसाठी बोलवत असे. दीपाही त्यांच्या गप्पांमध्ये सहभाग घेई.
सारे काही दृष्ट लागण्यासारखे सुरू होते; मात्र दीपाच्या मनात एकच भीती होती, खंत होती. ‘आपल्या पोराबद्दल, सुमेधबद्दल अनूजला कधी सांगायचं? सांगितलं तर त्याची प्रतिक्रिया काय होईल?’ त्याला खोटेपणा, फसवाफसवी अजिबात खपत नाही, असं तो म्हणाला होता, याची तिला पुन्हा पुन्हा आठवण होत होती. अधूनमधून ती विमानानं पुण्याला यायची. एक-दोन दिवस प्रभाकडे राहून सुमेधला भेटून जायची. आई नोकरीसाठी नागपूरला जाते, असे त्याला सगळ्यांनी सांगितले होते. प्रत्येक वेळी तो ’आई मला नागपूरला केव्हा नेणार?’ विचारायचा. दीपाला भरून यायचं. ‘‘थोडे दिवस थांब राजा! मी तुला नक्की नेईल,’’ अशी ती त्याची समजूत काढायची.
त्यानंतर दीपाला दिवस गेले. सासूसासर्‍यांनी दीपाचे भरपूर कोडकौतुक केले. यथावकाश दिवस भरल्यावर दीपाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. देशपांडे कुटुंबियांमध्ये आनंदीआनंद झाला. मुलीचे थाटामाटात बारसे केले. तिचे नाव ठेवले स्नेहा. बारशाला दीपाची आई सरलाताई आवर्जून आल्या होत्या. आता तरी अनूजला सुमेधबद्दल सांगावं का, याविषयी मायलेकींमध्ये चर्चा झाली. ‘‘मला भीती वाटते बाई. सारा डाव फिस्कटायला नको. अजून एखादं वर्ष जाऊ दे!’’
दीपा म्हणाली, ’’आई मला घुसमटल्यासारखं वाटतं गं! काय करू? एकदा वाटतं अनूज सगळं समजावून घेईल, तर दुसरीकडे तू हे आधीच का सांगितलं नाहीस म्हणून टोकाला जाईल असं वाटतं. कारण त्याला खोटेपणाची भयंकर चीड आहे. काय करू गं?’’
बघता-बघता दीपाच्या लेकीचा स्नेहाचा पहिला वाढदिवस जवळ आला. अनूजनं तो थाटामाटात साजरा करायचं ठरवलं. नागपूरमधल्या उच्चभ्रू हॉटेलमधल्या प्रशस्त हॉलमध्ये वाढदिवसाचे आयोजन केले होते. हॉलला लागून पाहूण्यांसाठी खोल्या होत्या. नागपूरमधली अनूजची नातेवाईक, स्नेही मंडळी, लेखक, कलावंत, पत्रकार सगळी मंडळी वाढदिवसाला आवर्जून उपस्थित होती. दीपाची मोठी बहीण प्रभा, संजय आणि सरलाताई तिघंही वाढदिवसासाठी नागपूरला आले ते थेट हॉलवरच.
‘‘आई तू आलीस?’’ दीपा धावतच गेली. सरलाताईंना भेटली. सगळ्यांना एका खोलीत घेऊन गेली. दीपानं सरलाताईंना विचारलं, ‘‘आई सुमेध कसा आहे? कुठं ठेवलंय त्याला?’’ सरलाताईंचा गळा दाटून आला. तरी सावरून त्या म्हणाल्या, ‘‘अग छान मजेत आहे तो. तो आणि अजय दोघं संजयरावांच्या भावाकडं रहायला गेलेत. त्यांचा मुलगा हृषिकेश या दोघांच्या बरोबरचा आहे. मस्त रूळलाय तो तिथं! तू नको काळजी करू!’’ दीपाचे डोळे भरून आले. एवढ्यात बाहेरून कुणीतरी दीपाला हाक मारली. ती डोळे पुसून लगबगीनं बाहेर गेली. वाढदिवसाची पार्टी अगदी रंगात आली होती. हास्यविनोद, गप्पागोष्टींनी हॉल निनादून गेला होता आणि अचानक दीपाची पुण्यातली जुनी मैत्रीण शैला समोरून आली.
‘‘अगं दीपा तू? तू मिसेस देशपांडे?’’
‘‘हो! अगं तू कशी नागपूरमध्ये?’’
‘‘अगं मी लग्न झाल्यापासून नागपूरमध्येच आहे. हे माझे मिस्टर शेखर गायधनी! अलीकडेच त्यांची तुझ्या नवर्‍याशी मिस्टर देशपांडेंशी ओळख झाली; पण मला नव्हतं माहीत की तू मिसेस देशपांडे आहेस ते!’’
दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. अनूज आणि शैलाचा नवरा शेखर हे शेजारीच पाठमोरे बोलत उभे होते. शैलाला दीपाचा पहिला नवरा, तिचा मुलगा सुमेध हे सारे माहीत होते. तरी तिने तो विषय काढला नाही. त्यामुळे दीपाला हायसे वाटले; पण अचानक शैला म्हणाली, ‘‘अगं तुझा पोरगा सुमेध कुठे आहे गं? मोठा झाला असेल ना?’’  दीपाच्या काळजात धस्स झालं. शैलाला ओढत ती बाजूला घेऊन गेली आणि ‘सुमेध मोठ्या बहिणीकडे पुण्यात शिकायला आहे’ असं तिने तिला सांगितले. पाठीमोर्‍या अनूजनं शैलाचं बोलणं ऐकलं असेल तर? दीपाला ब्रम्हांड आठवलं.
एवढ्यात अनूजने तिला हाक मारली, ‘‘दीपा मीट माय फ्रेंड अँड कलिग सागर! ऑफिसमधला माझा उजवा हात! सगळं ऑफिस सांभाळतो म्हणून मी तुला वेळ देऊ शकतो. त्याला थॅक्यू म्हण.’’ दीपाचा जीव भांड्यात पडला. औपचारिक बोलून ती परत आली. शैलाला तिने सारे समजावून सांगितले. ती ’सॉरी... सॉरी...’ म्हणत पार्टीत मिसळली. दीपाने जाऊन लेकीला कडेवर घेतले. पार्टीत सारे तिचे, तिच्या लेकीचे कौतुक करत होते. तिला प्रेझेंट्स देत होते. ती वरवर हसत होती, पण तिचे सारे लक्ष मात्र अनूजकडे होते. तो अगदी नेहमीप्रमाणे आनंदात मजेत वावरत होता. मित्र-मंडळींशी हास्यविनोद करीत होता. तिचा जीव भांड्यात पडला. पार्टी संपली. पुढले दोन दिवस दीपा अस्वस्थ होती; पण अनूजने तिला काही विचारले नाही किंवा त्याच्या वागण्यातही काही फरक पडला नाही. दोन दिवसांनी अनूजला कामानिमित्ताने मुंबईला जायचे होते. दीपानं विचारलं, ‘‘परत केव्हा येणार?’’
‘‘अगं दोन दिवसांनी शनिवारी!... रविवारी तुझा वाढदिवस आहे. माझ्या लक्षात आहे दीपा.’’
‘‘हो पण तो घरच्या घरीच करायचा, पार्टी बिर्टी काही नको.’’
‘‘ओके डार्लिंग, ओके.’’
अनूज मुंबईला गेला. शनिवारी अनूजला दीपाचा फोन आला. ‘‘डार्लिंग, आज नाही येऊ शकत. उद्या सकाळी महत्त्वाची मिटींग आहे. ती आटोपून उद्या दुपारी नागपूरला पोहचतो.’’
रविवारी दुपारी दीपा अनूजची वाट पहात होती. तिच्या सासूसासर्‍यांनी वाढदिवसाची छान तयारी केली होती. एवढ्यात अनूजचा फोन आला.
‘‘दीपा, अगं प्लेन लेट आहे. संध्याकाळी सहापर्यंत घरी पोहचेन असं वाटतं.’’ सगळेजण अनूजची वाट पहात बसले. सहा वाजले विमानतळावरून अनूजला घेऊन गाडी दारात येऊन थांबली. दीपा आतल्या खोलीत छोट्या स्नेहाचे आवरत होती.
‘‘दीपा लवकर बाहेर ये. तुझ्यासाठी वाढदिवसाची खास भेट आहे लवकर ये!’’
दीपा धावतच बाहेर आली आणि समोरचं दृश्य पाहून ती थक्क झाली! तिने डोळे विस्फारले. अनूजच बोट धरून दारात तिचा पोर सुमेध उभा होता. ‘‘आई’’ असे म्हणून धावत येऊन तो दीपाला बिलगला. दीपाला काय करावं काही सुचेना. अनूज म्हणाला, ‘‘दीपा, दीपा कुल डाऊन. शांत बैस सगळं सांगतो. अगं पार्टीत शैला म्हणाली ते मी ऐकलं होतं; पण मी तुला तसं बोललो नाही. म्हटलं आधी शहनिशा करावी. म्हणून लगेच पुण्याला जाऊन तुझ्या आईला भेटलो. त्यांनी मला सगळी परिस्थिती सांगितली. ज्या परिस्थितीत तुला मनाविरूद्ध खोटं बोलावं लागलं ते माझ्या लक्षात आलं. तेव्हाच मी ठरवलं सुमेधला आपल्या घरी आणायचं. आपल्या स्नेहाला त्याच्या रूपाने मोठा भाऊ मिळेल आणि त्याला छोटी बहीण! माझ्या आईबाबांनाही मी हे सगळं आधीच सांगितलंय. त्यांनीही आनंदानं या बेताला संमती दिलीय! आता माझे आई-बाबा, मी मुलगा-सून, नातू आणि एक नात. परफेक्ट फॅमिली झालो आहोत आपण!’’
दीपा आनंदातिशयानं, अविश्‍वासानं बघतच राहिली. तिच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. तेवढ्यात अनूजचे बाबा म्हणाले, ‘‘दीपा चला फॅमिली फोटो काढू या. कॅमेरा ऑटो-मोडवर ठेवून समोर ठेवतो. सगळे नीट उभे रहा. ओके स्माईल प्लीज!!!’’
 -बंडा जोशी
9422010200  

(पूर्व प्रसिद्धी : 'साहित्य चपराक' दिवाळी अंक २०१७)                                  

Sunday, November 6, 2016

एक वेगळंच राजकारण

लोकांची लोकांकडून लोकांसाठी ही लोकशाहीची व्याख्या बदलली असून समाजातील काही घटक मिळून एक वातावरण तयार करतात आणि हे वातावरण म्हणजेच जनमत असल्याचं भासवलं जातं. एक चौकडी निर्णय घेते. नंतर टारगेट ठरविले जाते. त्यानुसार झपाट्याने हल्ला चढविला जातो. सर्व बाजूंनी माहोल तयार केला जातो. हितसंबधी गट, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमांचा एक गट, राजकीय विश्‍लेषक, विद्यापीठातील तज्ज्ञ असे एका सुरात बोलायला लागतात.
हे वर्णन आहे चिलकॉट यांच्या अहवालातील. अमेरिकेने इराकवर केलेल्या हल्ल्यात इंग्लड सहभागी झाले होते. या युद्धात इंग्लंडचे 179 जण मृत्युमुखी पडले होते. या युद्धात अमेरिकेसोबत सहभागी होणे संयुक्तिक होते का, याचा विचार करण्यासाठी इग्लंडमध्ये सर जॉन चिलकॉट यांची समिती नेमली होती. या समितीच्या अहवालातील हे निरीक्षण आहे. गेले दोन वर्षे देशात आणि महाराष्ट्रात जे सुरू आहे ते पाहता चिलकॉट यांनी केलेल वर्णन किती चपखलपणे बसते हे लक्षात येते.
उथळ, बेछूट, बिनबुडाचे आरोप करत सुटायचं आणि प्रसारमाध्यमातील एका गटाच्या सहाय्याने आरोपांचा धुराळा उडवायचा. न्यायालयीन प्रक्रियेतून सत्य समोर आलं तरी ते सत्य नाही, तर आपण म्हणतो तेच आणि फक्त तेवढेच सत्य या भूमिकेतून सरकारवर आरोप करायचे. गोंधळाचे वातावरण तयार व्हावे यासाठी तशा चर्चा करत रहायच्या, यासाठी अनेक जणांमध्ये अहमिका लागली आहे. येनकेन प्रकारेण सरकारची बदनामी, या एकमेव हेतूने अशा आरोपांची राळ उठविण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे.
खरंतर साधारणतः दोन वर्षापूर्वी केंद्रात तीस वर्षांनंतर प्रथमच संपूर्णपणे बहुमत घेऊन भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेवर आलं आणि वर्षानुवर्षे सत्ता साम्राज्यात राहणार्‍या काही मंडळींना अकाली वैधव्याची भावना निर्माण झाली. निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा सपाटून पराभव झाला मात्र समाजवादी आणि कम्युनिस्ट यांना भाजपाचं यश पराकोटीचं बोचू लागलं आणि त्यातून सुरू झालं एक वेगळंच राजकारण.
खरंतर रा. स्व. संघाने सर्वसमावेशक हिंदुत्त्व नेहमीच मांडले; पण या हिंदुत्त्व आणि हिंदुत्त्ववादी विचारांना, राष्ट्रवादी विचाराला कायमच जाणीवपूर्वक दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न वर्षानुवर्षे सुरू आहे. या विचारधारेबद्दल लोकांमध्ये सातत्याने खोट्या प्रचाराद्वारे अविश्‍वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. स्वतःला सेक्युलर म्हणवणारी ही मंडळी सेक्युलरवादाच्या नावाखाली हिंदुत्त्ववादी विचारांबद्दल जमेल तितकी खोटी माहिती पसरवत होती आणि तरी या सर्व खोट्या प्रचाराला बळी न पडता राष्ट्रवादी विचारधारा मानणारं सरकार सत्तेवर आलं हे या मंडळींचं सगळ्यात मोठं दुखणं होतं.
मुळात लोकशाहीच्या गप्पा आणि विचारस्वातंत्र्याच्या नावाने कंठशोष करणारी ही मंडळी प्रत्यक्षात मात्र दुसरा विचार स्वीकारायला तयार नसतात. एकतर तुम्ही डावे किंवा समाजवादी असले पाहिजे नाहीतर तुम्ही हिंदुत्त्ववादी असा स्पष्ट शिक्का आणि विभागणी इथे केली जाते आणि हिंदुत्त्ववादी म्हणजे तो बुरसटलेला प्रतिगामी हा पुढचा शिक्का तयारच असतो. त्यातून आम्ही म्हणतो तेच खरं हा डाव्यांचा, समाजवाद्यांचा गंड. बाता लोकशाहीच्या; मात्र आम्ही सांगतो ती लोकशाही आणि फक्त तेच बरोबर ही प्रत्यक्षातली वागण्याची रीत होती. त्यातून दुसर्‍या विचारांचं अस्तित्वही स्वीकारायला ही मंडळी तयार होत नाहीत. परस्पर संवाद आणि सहअस्तित्व ही संकल्पना फक्त आपल्या चौकडीपुरती मर्यादित असते. आपल्या विचाराला अनुकूल अशा मंडळींचा कंपू करून रहायचा आणि थोडा वेगळा विचार आला की सर्वांनी मिळून तुटून पडायचं, झोडपून काढायचं ही प्रसिद्ध रीत होती. त्यामुळे कंपुबाहेर कुणाला मान्यता मिळणार नाही याची दक्षता ही मंडळी वर्षानुवर्षे घेत आहेत.
कॉंग्रेसचा ‘सत्ता’ हाच विचार होता. त्यामुळे त्यांना वैचारिक भूमिकेबद्दल कधी आस्था नव्हती. त्यातून 1950 दरम्यानच्या चेन्नईजवळ झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात समाजवादी समाजरचनेचा पुरस्कार केला आणि त्याचा पुरेपूर फायदा या समाजवादी-डाव्या मंडळींनी उचलला. राजाश्रय मिळाल्याने पुरोगामित्त्वाची झुल पांघरत, प्रगतीशीलतेचा मुखवटा चढवून म्हणता म्हणता महत्त्वाची क्षेत्रे काबीज केली. शैक्षणिक, प्रसारमाध्यमं, साहित्यिक क्षेत्रात कंपू निर्माण केले आणि हे कंपू एकमेकांची काळजी घेत वाढतील याची काळजी घेतली. कॉंग्रेसने दिलेल्या राजाश्रयाचा परतावा म्हणून हिंदुत्त्ववादी चळवळीला बदनाम करण्याचं, त्यावर कडाडून टीका करण्याचं काम मात्र ही मंडळी मनापासून करत होती.
पण तरीही या मंडळींच्या विखारी प्रचारानंतरही हिंदुत्त्ववादी विचार या देशात वाढत राहिला. त्यातून प्रथमच या देशात हिंदुत्त्ववादी विचारांचं पूर्ण बहुमताचं सरकार आलं आणि या मंडळींची पूर्ण पंचाईत झाली. त्यामुळे या सरकारच्या विरोधात काहीही करून वातावरण करण्याचा निर्धार काहीजणांनी केला. त्याचा परिपाक सध्या आपण पाहत आहोत. गेल्या दोन वर्षातील आपण या देशातील प्रश्‍न पाहिले तर हेच दिसून येतं.
गेल्या दोन वर्षात सर्वात चर्चेत राहिलेले प्रश्‍न कोणते? पुरस्कार वापसी, पुण्यातील एफटीआय, जेएनयूतील देशविरोधी घोषणा आणि हैद्रबाद विद्यापीठातील दुर्देवी आत्महत्येवरून झालेलं राजकारण.
पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ सबका विकास’ हे निवडणुकीतील आश्‍वासन वास्तवात आणायला सुरूवात केली होती. सरकारच्या एखाद्या योजनेबद्दल आक्षेप असतील तर त्यावरून सरकारला प्रश्‍न विचारण्याचा, टीका करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे; मात्र त्याऐवजी सरकारला विरोध, तर कधी विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली तर कधी देशभक्तीला विरोध करीत जणू या देशात फार मोठी आणिबाणी सदृश्य परिस्थिती असल्याचा भास निर्माण करण्यात आला.
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर दिल्ली निवडणुकांपूर्वी अचानक चर्चवर हल्ले होत असल्याच्या बातम्या एकामागोमाग येऊ लागल्या. पाठोपाठ दिल्लीसह ठिकठिकाणी मोर्चे सुरू झाले. त्यानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर वेगळीच वस्तुस्थिती समोर आली. महाराष्ट्रात पनवेलजवळच्या चर्चवर हल्ला झाल्याची बातमी आली. पोलिसांनी शोध घेतला तेव्हा अंतर्गत संघर्षातून हे घडल्याचे समोर आले. दिल्ली निवडणूक झाली, भाजपाचा पराभव झाला आणि चर्चवरील हल्ल्याच्या बातम्या आणि मोर्चे थांबले.
त्यानतंर अखलाखचे प्रकरण घडले. विरोधाभास म्हणजे ही सर्व मंडळी नुकतीच काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये झालेल्या दलित अत्याचारासाठी गुजरात सरकारला जबाबदार धरीत होती. तीच मंडळी दादरीच्या अखलाख प्रकरणासाठी चुकूनही उत्तरप्रदेश सरकारचं नाव काढत नव्हती कारण तिथे या सेक्युलरांचे मुकुटमणी मुलायमसिंह यांच्या पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे मुलायमसिंह यांच्या पक्षाच्या सरकारविरोधात ‘ब्र’ही न काढता देशात जणू धर्मांध शक्तिंचं भयानक असहिष्णू वातावरण सुरू झालंय अशी आरोळी ठोकण्यात आली आणि पुरस्कार वापसीची एक नियोजनपूर्वक साखळी उभी करण्यात आली. साहित्य अकादमीचे 1200 पेक्षा अधिक पुरस्कारार्थी आहेत. त्यातील पुरस्कार वापसी करणार्‍यांची संख्या ही 50 पेक्षाही कमी होती; पण प्रत्यक्षात असं भासवलं गेलं की या देशात सर्वांनी सरकारच्या विरोधात पुरस्कार वापस केले. या गदारोळात महत्त्वाची एक बातमी दुर्लक्षिली गेली ती म्हणजे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या आवाहनावरून 1 कोटी लोकांनी गॅस अनुदान सोडले. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी एकवेळ जेवण्याचे आवाहन कधीकाळी केले होते; मात्र त्यानंतर मोदींनी असे आवाहन केले आणि देशातील एक कोटी लोक त्याला प्रतिसाद देतात आणि अनुदान त्यागतात ही मोठी गोष्ट; पण त्याऐवजी पुरस्कार वापसीचा अध्याय रंगविण्यात आला आणि जसं बिहार निवडणुकीचे बिगूल वाजले, भाजपाचा पराभव झाला तसं पुरस्कार वापसीचा अध्याय अचानक बंद झाला.
जेएनयू प्रकरण तर सर्वांवर कळस होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे तितकीच जबाबदारी घेऊन येतं. घटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केलं याचा अर्थ वाट्टेल ते बरळणं होत नाही; मात्र देशविरोधी घोषणांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली दुर्लक्ष करण्यात यावं अशी भावना काही जणांनी व्यक्त केल्या. देश तोडणार्‍या घोषणा काही विशेष नाही, त्यात काय एवढं? असा निर्लज्ज विचार काहीजणांनी मांडला. देशातील नागरिकांवर अन्याय झालाय म्हणून त्यांनी वेगळेपणाची भावना जोपासली तर बिघडलं कुठं? असा प्रश्‍न विचारला जाऊ लागला; पण आपल्यात आहेत अनेक अडचणी, नाही पोहचली अनेक समाजघटकांपर्यंत विकासाची गंगा... म्हणून कोणी देश तोडण्याची भाषा करीत नाही. समाजसमुहांना दिशा देण्याऐवजी त्यांना भडकवण्यातच या मंडळीचा रस असल्याचं दिसून आले. कन्हैया हा जणू जग जिंकून आल्याच्या थाटात डोक्यावर घेत देशभर त्याला मिरवण्यात आले. कन्हैयाला जामीन देताना मात्र न्यायाधीशांनी काय शब्द वापरले होते त्याबद्दल थेट न्यायालयाच्या ‘समजे’वर या मंडळीनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.
मालेगाव बॉंम्बस्फोटातील काही मुस्लीम युवकांना कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात अटक करण्यात आली होती, ती निर्दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांची सुटका केली. या निर्दोष तरूणांना विनाकारण तुरूंगात डांबल्याबद्दल सरकारवर टीका करण्यात आली आणि ती योग्य होती; मात्र ही माणुसकी, आणि मानवी हक्क मात्र प्रज्ञासिंहला नाहीत. कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांची ही दुटप्पी भूमिका याच सदरातील होती. साध्वी प्रज्ञासिंहवरील मोका हटविला तर प्रचंड काहूर उठविले गेले; पण सर्वोच्च न्यायालयाच्या या खटल्यातील मोकावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. त्यातून वर्षानुवर्षे कॉंग्रेसच्या काळात प्रज्ञासिंह तुरूंगात आहे; पण खटला पुढे सरकावा असे प्रयत्न झाले नाहीत. कारण खटल्याच्या निकालापेक्षा हिंदुत्त्ववाद्यांच्या बदनामीत अधिक रस या मंडळीना होता.
दिल्ली निवडणुकांपूर्वी ख्रिश्‍चन, बिहार निवडणुकांपूर्वी अखलाख, वेमुलासारखे विषय तापत ठेऊन दलित, मुस्लीम आणि ख्रिश्‍चन या समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एफटीआयच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना भडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात नवे अद्यावत तंत्रज्ञान आले पाहिजे ही मागणी नव्हती, तर आम्ही म्हणू तो अध्यक्ष द्या अशी मागणी होती. एखाद्या शैक्षणिक संस्थेचा अध्यक्ष आम्ही म्हणू तोच होईल असा आविर्भाव या डाव्या मंडळींचा होता. कॉंग्रेसच्या काळात राजाश्रय अशा संस्थामध्ये मिळाला तोच आता नाहीसा झाल्याने विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा समाजातील घसरती विश्‍वासार्हता मिळवण्याचा प्रयत्न डाव्यांनी एफटीआयच्या निमित्ताने केला. आता उत्तरप्रदेश निवडणुकांपूर्वी पुन्हा दलित विरोधी सरकार रंगविण्याचा प्रयत्न या मंडळींचा सुरू आहे.
भारताच्या प्रयत्नाने सार्‍या जगाने योग स्वीकारत वर्षातला एक दिवस योगदिन म्हणून साजरा करण्याचं मान्य केलं; पण या योगदिनालाही विरोध करण्यात सर्वप्रथम पुढे होती ती हीच ढोंगी सेक्युलरवादी मंडळी. इस्लाममध्ये सूर्याला नमस्कार करण्याचं मान्य नसल्याचं काही जणांनी मांडत कडाडून विरोध केला; पण सूर्यनमस्कार टाळून इतर योग करूया अशी भूमिका घेतली नाही. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुंबईत अचानक एका मुस्लीम युवतीला घर नाकारल्याच्या घटनेची ब्रेकिंग न्यूज आणि ताबडतोब चर्चा असा रतीब सुरू झाला. जणू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: फोन करून सोसायटीला सांगितले असावे अशा थाटात काही वीर आपल्या शाब्दिक तलवारी चालवित होते; पण प्रत्यक्षात त्याही प्रकरणात त्या सोसायटीत मुस्लीम कुटुंब राहत होती हे स्पष्ट झाले. काहीही तथ्य नसलेल्या प्रकरणावरून टीव्हीवरून डाव्या समाजवादी मंडळीनी आपली सरकारविरोधातील मळमळ व्यक्त करून घेतली. महाराष्ट्रात खडसे-दाऊद फोन कॉल प्रकरण असेच तापविण्यात आले. फोन कॉल होत असल्याचा दावा करणार्‍यांना न्यायालयात काहीच सिद्ध करता आले नाही; पण याच सेक्युलर मंडळीनी पुन्हा आपली मळमळ व्यक्त केली. इतकंच काय ज्यांना आपल्या घरातल्या बेरजा-वजाबाक्या कधी जमल्या नाहीत ती मंडळी देशाच्या आर्थिक बाबींसह रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावर कॉंग्रेस कार्यकाळात नेमलेला गव्हर्नर कसा योग्य होता याची चर्चा करू लागल्याचे चित्र दिसत होते.
एफटीआय, पुरस्कार वापसी, जेएनयू या प्रकरणांवर कित्येक दिवस चर्चा होत राहिल्या; पण गेल्या दोन वर्षातील या गाजलेल्या प्रश्‍नांवरील वादांचा विचार केला तर यापैकी किती प्रश्‍न लोकांच्या दैनंदिन उपयोगाचे होते? विकासाबद्दल कुणी भूमिका मांडली का? विकासाबाबत मतमतांतरे असू शकतात; पण ते तरी कुणी व्यक्त केलं का? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे नकारात्मक आहेत. 26 किमी प्रतिदिन या विक्रमी वेगाने रस्तेनिर्मितीचे काम सुरू आहे, रेल्वेमध्ये आमूलाग्र सुधारणा होत आहेत, स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे झाली तरी वीज न पोहचलेल्या हजारो गावांमध्ये वीज पोहचवण्याचं काम विक्रमी वेळेत म्हणजे 1000 दिवसात पूर्ण होणार आहे, मुद्रा बँकेतून लाखो युवकांनी कर्ज घेतले, नवे उद्योग सुरू झाले. देशाच्या विकासाचा वेग हा जगात मंदी असताना अधिक होता. या व अशा अनेक चर्चा करताना कधी ही मंडळी पाहिली का? काश्मीरसारखे अनेक प्रश्‍न कॉंग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे जटील बनले आहेत त्यावर मार्ग काढताना वेळ जाणार आहे; पण देशासमोरील सर्व प्रश्‍नांचं खापर ही मंडळी मोदी सरकारवर फोडून मोकळी होत आहेत.
काही महिन्यांपूर्वी ’ढहश  रश्राळसहींू’ नावाची कांदबरी वाचण्यात आली होती. यातला वर्तमानपत्राचा मालक वर्तमानपत्राचा खप वाढविण्यासाठी थेट एक दहशतवादी गट तयार करतो, त्यांना पोसतो. त्यांनी कोणते दहशतवादी कृत्ये करायची हे ठरवून देतो, त्यांनी कारवाया करायच्या आणि त्याचं खास थेट एक्युक्लिव्ह वृत्त फक्त त्याच्या वर्तमानपत्रात अशी रचना असते. यात त्याच्या वर्तमानपत्राचा खप वाढत असतो; पण त्यातून जगात या दहशतवादी हल्ल्यात अनेक जण मृत्युमुखी पडतात. असंच सध्या चित्र दिसत आहे. आपल्या अस्तित्वाची लढाई ही डाव्या आणि समाजवादी मंडळीची सुरू आहे. आजपर्यंत इतर विचारांच अस्तित्वच नाकारण्याची भूमिका घेत एकप्रकारे वैचारिक दहशतवादच जपला. आजही या वैचारिक दहशतवादामध्ये ते संपूर्ण समाजाला वेठीस धरत आहेत.
या मंडळींना विकासात रस नाही, त्यांना राष्ट्रवादी विचारांचं सरकार ही पोटदुखी होती. वास्तविकता या समाजवादी आणि डाव्या मंडळीना भारतीय समाजाने कधीच स्वीकारले नाही म्हणून दिवसेंदिवस भारतीय राजकारणात या मंडळीची जागा आक्रसत राहिली आहे. आता एका अर्थाने त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे.
ही समाजवादी-डावी मंडळी अनेक प्रकारे खोट्या प्रचार मोहिमा चालवित असताना संघ-भाजपा मंडळी मात्र लोकांमध्ये आपल्या कृतीतून पोहचली. त्यातून हा विचार देशात प्रबळ होत गेला. एकीकडे संघ आणि परिवारातील संघटनातून, आपल्या कार्यक्रमातून, सेवाभावी वृत्तीतून वस्तुस्थिती मांडत स्वीकार्हता मिळवली.
समाजातील डाव्या-समाजवाद्यांचे हरवत असलेले स्थान विरूद्ध विश्‍वासार्हतेतून विस्तारत असलेले राष्ट्रवादी विचारांचे काम अशी ही लढाई सध्या सुरू आहे. संघाने कधी कुणाला अस्पर्शी न समजता काम सर्वस्पर्शी केले; मात्र स्वत:ला पुरोगामी म्हणवणारी मंडळी ही संघ आणि ते मांडत आलेले विचार हे कायम अस्पर्शी ठरवित आले.
या देशातील जनतेने प्रत्यक्ष अनुभवातून संघ विचार स्वीकारला म्हणून तर हे काम विस्तारत गेले आणि डाव्या समाजवाद्यांची ढोंगबाजी उघड होत गेली. हे सर्व उघडे पाडण्यात समाजमाध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आत्तापर्यंत ही मंडळी म्हणतील तेच खर अशी परिस्थिती होती कारण विरोधी विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध नव्हते. शोध हेच लावणार, मांडणी हीच मंडळी करणार, सत्यता यांचीच मंडळी तपासणार आणि पुरस्कारही यांनाच दिले जाणार असं छान सगळं या लोकांचं सुरू होतं. प्रसारमाध्यमांवरील पकड मजबूत होतीच; पण समाजमाध्यमांच्या सार्वत्रिकरणाने दिवसेंदिवस यांचे ढोंग उघड पडू लागले. या तथाकथित पुरोगाम्यांकडून होणार्‍या दाव्यावर लोक प्रश्‍न विचारू लागले आहेत. त्यातून अनेकांची पितळ उघडी पडू लागली आहेत. ठरलेले प्रश्‍न विचारायचे, ठरलेली उत्तरे समोर करायची अशी आजपर्यंतची भूमिका होती; पण समाजमाध्यमांतून हे ठोसपणे खोडले जाऊ लागले. संघ जातीयवादी, मनुवादी असल्याची टीका ही ढोंगी समाजवादी मंडळी करताच, त्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारी ही माहिती खोटी असल्याचे पुढे येऊ लागले. ही माहिती स्वत:च्या अनुभवातून आल्याचं सांगणारी ही मंडळी होती.
त्यामुळे आगामी काळातही ही मंडळी अशाच मोहिमा राबविणार. कारण मुळात विरोध हा मोदी या नावाला आणि ते ज्या विचारधारेचं प्रतिनिधीत्व करतात त्या विचारधारेला आहे. त्यामुळे येनकेन प्रकारेण या सरकारविरोधात गटागटाने बोलत रहायचे हा या मंडळींचा आवडता कार्यक्रम असणार आहे. सरकारच्या कार्यक्षमतेबाबत काही बोलता येत नाही त्यावेळी अशा इतर मुद्द्यांवर समाजात गोंधळ निर्माण करायचा प्रयत्न करायचा असतो हे या मंडळींनी ओळखल आहे आणि त्यातून वैचारिक दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे; पण या पराकोटीच्या विद्वेषातूनही संघाचा राष्ट्रवादाचा विचार या भूमित विस्तारत गेला, हे या मंडळीचं खरं दुखणं आहे.
लोकांचं मतपरिवर्तन करता आलं नाही की गोंधळ निर्माण करायचा, ही एक ठरलेली गोष्ट रेटण्याचा प्रयत्न डाव्या मंडळींच्या पुढाकाराने सुरू आहे. म्हणूनच चिलकॉटचं उदाहरण समर्पक इथे बसतं; पण या संघर्षातून अस्सल खर तेच टिकेल हा विश्‍वास आहे. भलेही लोकशाहीची व्याख्या बदलण्याचा प्रयत्न ही डावी समाजवादी मंडळी करो; पण शेवटी लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेली लोकशाही हीच व्याख्या सिद्ध होईल यात शंका नाही.

- केशव उपाध्ये
प्रवक्ता भाजपा महाराष्ट्र

'साहित्य चपराक' दिवाळी महाविशेषांक २०१६