Thursday, February 26, 2015

लाभले आम्हास भाग्य...!


एक पंडित होता. त्याला अनेक भाषांचे उत्तम ज्ञान होते. तो ज्या भाषेत बोले तीच त्याची मातृभाषा वाटे. प्रत्येक भाषेवरील त्याचा व्यासंग अफाट होता. एकदा तो राजाच्या दरबारी आला. राजाने त्याच्या भाषाज्ञानामुळे त्याला मोठे इनाम दिले. मात्र पंडिताचा अहंकार वाढला होता. त्याने राजाला आव्हान दिले की, त्याच्या दरबारातील किंवा प्रजेतील कुणीही विद्वान असेल तर त्याने त्याची मातृभाषा ओळखावी. अनेकांनी अनेक प्रकारे प्रयत्न करून बघितले. मात्र तो ती भाषा इतक्या सफाईदारपणे बोले की कुणालाही त्याची मातृभाषा कळली नाही. राजाने शेवटचा पर्याय म्हणून बिरबलाला निरोप धाडला. बिरबल आला. त्याने त्या पंडिताला विनम्रतेने नमस्कार केला आणि सांगितले की, ‘‘तुम्ही आमचे पाहुणे आहात. आज रात्री मुक्काम करा. उद्या आपण चर्चा करू.’’
बिरबलाने त्या पंडिताची सर्वप्रकारची व्यवस्था केली. त्याचा योग्य तो पाहुणचार केला. पंडितही त्यामुळे सुखावला. रात्री मिष्ठान्नाचे सेवन केल्यानंतर पंडित आलिशान गालिचावर झोपी गेला. तो झोपलेला असताना अचानक एक मोठा आवाज झाला. पंडित घाबरून उठला. त्याच्या निद्रेत व्यत्यय आल्याने बिरबलाने त्याची अंतःकरणपूर्वक माफी मागितली. 
दुसर्‍या दिवशी दरबारात प्रवेश करताच बिरबलाने ठामपणे सांगितले की हा पंडित कन्नड भाषक आहे. पंडितही अवाक् झाला. त्याची मातृभाषा आतापर्यंत कोणीही ओळखू शकले नव्हते. त्याने आपली मातृभाषा मान्य करत बिरबलाने ती कशी ओळखली हे विचारले. बिरबल म्हणाला, सोपे आहे. रात्री जेव्हा तुम्ही घाबरून उठलात तेव्हा तुम्ही कानडी भाषेमध्ये बोलत होतात. संकटाच्या काळी आपल्याला आपली मातृभाषाच आठवते.
भाषेविषयी जागृती करणारी, स्वाभिमान पेरणारी ही बालकथा अनेकांना माहिती असेल. मात्र आज काय परिस्थिती आहे? आपण आपल्या मातृभाषेतच बोलत नाही. मराठी बोलणे आपल्याला कमीपणाचे वाटते. खरेतर भारताला राष्ट्रभाषा नाही. लोकशाही व्यवस्था मान्य करणार्‍या बहुतेक राष्ट्रांना राष्ट्रभाषा नाही. केवळ हुकूमशाही राष्ट्रातच राष्ट्रभाषा लादली गेली आहे. 
संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा असावी असे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते. मात्र केवळ उत्तर प्रदेशपुरता संकुचित विचार करणार्‍या पंडित नेहरूंनी हिंदीसाठी आग्रह धरला. शेवटी हिंदीला ‘संपर्क भाषा’ म्हणून मान्यता मिळाली. त्या धबडग्यात राष्ट्रभाषेचा मुद्दा बाजुलाच पडला. हिंदुस्तानाच्या सर्वाधिक प्रांतात बोलली जाणारी माय मराठी आज मरणासन्न अवस्थेत आहे. 
खरेतर महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात मराठी आहेच; मात्र कर्नाटकातही मराठी मोठ्या प्रमाणात बोलली जाते. बडोदा, झांशी, ग्वाल्हेर, तंजावर अशा प्रांतातही मराठी प्रशासक होते. त्यामुळे त्या त्या प्रांतातही मराठी भाषकांचे प्रमाण लक्ष्यवेधी होते. मध्यप्रदेश सारख्या ठिकाणी आजही मराठी वाचक मोठ्या संख्येने आहे. इतकेच काय, स्वातंत्र्यपूर्व काळात केरळमधून ‘केरळ पर्यटन’ नावाचे मराठी मासिक प्रकाशित व्हायचे आणि त्याचे त्याकाळी तब्बल 3200 सभासद होते. याचा अर्थ केरळमध्ये मराठी वाचता येणारे असंख्य लोक होते. एखाद्या मासिकाची सभासद संख्या 3200 म्हणजे वाचकसंख्या किमान त्याच्या पाचपट नक्की असणार! भारतात तर सोडाच पण इस्त्राईल सारख्या देशातही मराठी बांधवांचे प्रमाण लक्ष्यवेधी आहे. 
बुद्धिमत्तेच्या, गुणवत्तेच्या बाबतीत मराठी माणूस आघाडीवर आहे. नवीन पिढी वाचनापासून दूर जातेय, असा जावईशोध काहींनी लावला असला तरी त्यात तथ्य नाही. आजचे तरूण झपाट्याने वाचत आहेत. त्यांची वाचनाची अभिरूची बदलली असेल, मात्र सकस आणि दर्जेदार साहित्य न वाचण्याचा करंटेपणा ते कधीही करत नाहीत. इतके सगळे असूनही माय मराठीचे अस्तित्व धोक्यात का येतेय, तर खोट्या प्रतिष्ठेपायी आपण मराठी बोलणे टाळतोय. हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या दुराग्रहामुळे आपण मराठी बोलण्याबाबत आग्रही राहत नाही. सरकारही त्यादृष्टिने ठोस भूमिका घेत नाही. एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडताहेत, नवीन शाळांना परवानगी मिळत नाही, अनुदान मिळत नाही आणि दुसरीकडे गल्लीबोळात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होत आहेत. 
इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिकणारी बहुतेक मराठी मुले नालायक निघतात, असा एका विश्‍वसनीय सर्वेक्षणाचा निकाल आहे. कारण या मुलांना मातृभाषा असलेली मराठीही जमत नाही आणि परकीय भाषा असलेल्या इंग्रजीचेही धड ज्ञान घेता येत नाही. या कोंडमार्‍यात त्यांचे मोठे नुकसान होते. त्याऊलट मराठी माध्यमातून उत्तम दर्जाचे शिक्षण घेवून अनेक जागतिक कंपन्यात महत्त्वाच्या हुद्यावर समाधानाने कर्तव्य बजावणार्‍यांचे प्रमाण लक्षवेधी आहे. जिथे आई आपल्या चिमुकल्याला प्यायला दूध दिल्यानंतर तो तिला ‘थँक्स ममा’ म्हणतो तिथेच आपली संस्कृती संपतेय! 
भाषा, संस्कृती याविषयी जागृत न राहता पाश्‍चात्य राष्ट्रांची भलावण करणारे महाभाग हे खरे राष्ट्रद्रोही आहेत. आपण शेक्सपिअरचा अभ्यास जरूर करू; मात्र तो करताना आपल्याला आपल्या महाकवी कालीदासाचा विसर पडत असेल तर ते आपले दुर्दैव आहे. जागतिक मातृभाषा दिनानिमित्त प्रत्येकाने आता मराठीतच बोलण्याचा संकल्प करायला हवा. इंग्रजी नववर्षाच्या संकल्पाप्रमाणे त्याचे बुडबुडे न उडता तो अंमलातही आणायला हवा. मराठी भाषा, मराठी संस्कृती जगवण्यासाठी आपण किमान मराठीत बोलणे सुरू ठेवायला हवे. मराठी भाषेबाबत आग्रही असणारेच आजच्या काळात मराठीचे तारणहार ठरू शकतील!

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२ 

Monday, February 23, 2015

माझ्या मातीचे गायन...!

सध्या सर्वत्र मराठी भाषा सप्ताह (२१ ते २७ फेब्रुवारी) साजरा होत आहे. अनेक संस्था, संघटना, व्यक्ती, राजकीय पक्ष यानिमित्ताने विविध कार्यक्रम घेत आहेत. माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘झुळूक आणि झळा’ या अग्रलेख संग्रहातील माय मराठीचा जागर घालणारा हा लेख खास तुमच्यासाठी!!



‘‘शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात रंगत आहे. आमच्या पिढीला त्याविषयी फारसे काही माहीत नसल्याने पवार साहेबांनीच त्यावर भाष्य करणारी ‘खंजीर’ नावाची राजकीय कादंबरी लिहिल्यास ती वाचकप्रिय ठरेल आणि त्या कादंबरीला मराठीतला ‘ज्ञानपीठ’ही मिळेल,’’ असे आम्ही नुकतेच एका लेखात लिहिले होते. हाच धागा पकडत अभियांत्रिकी शाखेच्या दुसर्‍या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने आम्हाला दूरध्वनी केला. तो म्हणाला, ‘‘दादा, मला हे माहीत आहे की तुम्ही कधीही खोटे लिहित नाही. मात्र पवार साहेबांनी खरेच वसंतदादा पाटलांचा ‘मर्डर’ केलाय का हो?’’
अज्ञानापोटी झालेल्या त्याच्या गैरसमजाबद्दल हसावे की रडावे हेच आम्हाला कळत नव्हते. मराठी माणसाविषयी सातत्याने कोकलणार्‍यांना मराठी भाषा, मराठी संस्कृती या दृष्टिने इथल्या व्यवस्थेने दिलेली ही चपराकच होती. ‘खंजीर खुपसणे म्हणजे ‘मर्डर’ करणे’ हे पक्के ठाऊक असणार्‍या एका महाविद्यालयीन युवकाला मराठी भाषेचे ज्ञान देणे यासारखे आव्हानात्मक काम दुसरे कोणते असू शकते काय?
गलेलठ्ठ पगार घेऊन शाळा-महाविद्यालयातून आजची ही पिढी बरबाद केली जात आहे. भाषेचे गर्भितार्थ, उपहास, व्यंग्य, अर्थच्छटा हे सारे त्यांच्या डोक्यावरून जाते. विशेषतः ग्रामीण जीवनाचा परिचय नसल्यानेही अनेक घोटाळे होतात.  कृषी संस्कृतीशी तर या पिढीला काहीच देणेघेणे नाही. नांगरणी, पेरणी, कोळपणी, खुरपणी, बैलगाडी, कासरा, जू, रान, पिकं, धसकटं, वाफे, धार या व अशा गोष्टी तर त्यांच्या गावीही नसतात. ‘खुरप्याच्या तोंडी पिकाचं अमृत असतं’  असं मी म्हणालो तर मित्रानं लगबगीनं विचारलं, ‘हा खुरपं नावाचा प्राणी आपल्याला कसा मिळवता येईल?’ मुंबईत मध्यंतरी ‘दूध कोठून येते?’ या प्रश्‍नाचे उत्तर एका विद्यार्थ्याने ‘दुधवाल्या भैय्याकडून’ असे दिले होते. गाय, म्हैस, शेळी याविषयी ऐकून घेण्यासही तो तयार नव्हता.
परवा एका निरागस चिमुकल्याने गव्हाच्या ओंब्यासोबत आपले छायाचित्र काढून घेतले आणि ‘पोळीच्या झाडासोबत’ म्हणून  त्याच्या पालकांनी मोठ्या कौतुकाने ते फेसबुकवर टाकले. अर्थात, त्यात विनोदाचा आणि गमतीचाच भाग अधिक असल्याने सगळ्यांनी त्याचे कौतुकच केले; मात्र आजच्या मुलांना या सर्व गोष्टी कळेनाशा झाल्या आहेत, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. 
याबाबत एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो. मध्यंतरी ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या घरी गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात त्यांचा नातू नील तिथे आला. गाडगीळांनी चिमुकल्या नीलला आमच्यासमोर संस्कृत श्‍लोक म्हणून दाखवायला सांगितला. तो ऐकत नाही हे पाहून त्यांनी निवेदनाच्या शैलीत गमतीने सांगितले, ‘‘आता नील गाडगीळ सादर करतील एक संस्कृत श्‍लोक...’’ आणि त्याने खरेच एकदोन श्‍लोक म्हणून दाखवले. त्याचे पाठांतर आणि स्पष्ट शब्दोच्चार पाहून आम्हास आश्‍चर्य वाटले. त्याविषयी विचारले असता गाडगीळांनी दिलेले उत्तर मार्मिक तर आहेच पण प्रत्येकाने विचार करावा असेच आहे.
ते म्हणाले, ‘‘मूल जन्मल्यापासून आपण उगीच त्याच्याशी बोबडे बोलतो. अलेले... माझं गोड्ड बाल... असं म्हणत बसण्यापेक्षा त्याच्याशी स्पष्टपणे बोलावे. त्याच्या बालमनावर चांगल्या भाषेचे संस्कार करावेत. उगीच बाललीलेच्या नावाखाली भाषेची वाट लावण्याऐवजी त्याच्या कानावर उत्तमोत्तम आणि अर्थपूर्ण शब्द पडतील याची काळजी घ्यावी, म्हणजे तो तसाच वागेल, बोलेल!’’ 
गाडगीळांचे हे तत्त्वज्ञान खरोखरी प्रत्येकाने आचरणात आणावे असेच आहे. सध्या अनेक कुटुंबात पालकच पाल्याशी व्यवस्थित बोलत नाहीत. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि काही ठिकाणी अन्य भाषेचेही शब्द बोलण्यात सर्रासपणे वापरले जातात. त्याचे गांभिर्य कुणाच्या गावीही नसते. मग भाषाशुद्धी कशी होईल? महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे बघा. ते हिंदीत बोलताना फक्त हिंदीतच बोलतात. इंग्रजीत बोलताना अस्खलीत इंग्रजीतच बोलतात. त्यांच्या बोलण्यात भाषेची सरमिसळ नसते. भेसळ तर नसतेच नसते! म्हणूनच त्यांनी असंख्य लोकांवर मोहिनी घातली. त्यांचा आवाज, त्यांची भाषा हीच त्यांची ओळख आहे. मराठीच्या नावावर राजकारण करणार्‍यांनी त्यांचा हा एवढा एक गुण जरी आत्मसात केला तरी खूप काही साध्य होईल.
सध्या शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही बहुसंख्य पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी धडपडत असतात. त्यासाठी वाटेल तितका निधी द्यायचीही त्यांची तयारी असते. ‘इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे’ आणि ‘इंग्रजी ही जागतिक भाषा आहे’ या दोन ‘अंधश्रद्धा’तून मानसिकदृष्ट्या खचलेले लोक इंग्रजीचे स्तोम अकारण माजवतात. मातृभाषेत शिक्षण न झाल्याने या मुलांची प्रगती खुंटते. त्यांना धड इंग्रजीसारखी ‘मागास’लेली भाषा आत्मसात करणे जमते ना मराठीतला गोडवा कळतो! बरे, हे ध्यानात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आपापल्या मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या मुलांनीच यशाचे नवनवे मानदंड तयार करत विक्रम नोंदवले आहेत. मराठीतच काय अन्य कोणत्याही भाषेत ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकणार नाही.
इतर जातींचा, इतर धर्मांचा तसेच इतर भाषेचा द्वेष करू नकात! मात्र आपली मातृभाषा तरी धडपणे बोलणार की नाही? मध्यंतरी कोणीतरी सांगितले होते, ‘तुम्ही मला ‘आई’ म्हणणारा एक इंग्रज दाखवा; मी तुम्हाला ‘मम्मी’ म्हणणारे लाखो हिंदुस्थानी दाखवेन!’ ही वस्तुस्थिती आहे. विदेशी भाषा आणि संस्कृतीच्या माध्यमातून आपल्या पायातील शृंखला आणखी मजबूत झाल्या आहेत. इंग्रजांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केले, तरीही आम्ही सुधारायला तयार नाही. याला काय म्हणावे? 
मराठी भाषेला इंग्रजीपासून धोका आहेच आहे; पण त्याहून अधिक धोका हिंदीपासून आहे. आपण सहजपणे बोलतानाही हिंदीचा आधार घेतो. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी ती गोष्ट आम्ही अभिमानाने करतो. खरे तर या अर्धवट शहाण्यांना हिंदीही व्यवस्थित येत नाही. प्रशासकीय कामकाजातली हिंदी भाषा कळणारे कितीजण आहेत? चित्रपटाच्या माध्यमातून दाखवली जाणारी भाषा, हिंदी भाषा म्हणून खपवली जाते. मात्र त्या भाषेत अन्य भाषिक शब्दांचाच भरणा अधिक असतो. मध्यंतरी एकदा एका हिंदी सिनेमाचे कथानक वाचल्यानंतर एका हिंदी अभिनेत्रीने सांगितले होते की, ‘‘मी इंग्रजी सिनेमात काम करणार नाही...’’ या चित्रपटात खरेच निम्मे संवाद इंग्रजीत असतात, हिंदुस्तानातल्या विविध प्रांतातले काही शब्द घुसडले जातात आणि हिंदी या नावाखाली ते आमच्यावर लादले जातात. म्हणूनच ‘सहज बोलली अन् चव गेली’ अशी आमची अवस्था होते.
मराठी भाषेतले आशयसंपन्न असणारे विविध शब्द, त्यांच्या अर्थच्छटा आजच्या तरूणाईला कळत नाहीत. संगणक महाजाल, भ्रमणध्वनी या माध्यमांतून तर वेगळीच भाषा निर्माण होत चालली आहे. इतर भाषेतले अनेक शब्द मराठीत रूजले आहेत, आपण ते सामावूनही घेतले आहेत. तरीही भाषेबाबत कोणी आग्रही असल्याचे दिसत नाही. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातही भाषा अंथरूणाला खिळल्याचे चित्र आहे. भाषेबाबत आग्रही असणारे पुणेकर सध्या अनेकांचे चोचले पुरवता पुरवता या व्यवस्थेचाच एक भाग बनत चालले आहेत.
पुण्यातल्या एक विदुषी अनेक साहित्यिक व्यासपीठावर दिसतात. ‘अमुक लेखकाची मुलगी आणि अमुकची आई’ अशीच त्यांची सर्वत्र ओळख करून दिली जाते. प्रत्यक्षात त्या कोण आहेत, हे महत्त्वाचे असताना अशा गोष्टींचाच उहापोह केला जातो. त्यांचा परिचय करून देताना बर्‍याचवेळा ‘सुप्रसिद्ध महिला लेखिका’ असाच भाषाप्रयोग केला जातो आणि पुणेकरही निमूटपणे ऐकून घेतात. लेखिका म्हटल्यावर त्या महिला आहेत याचे तुणतुणे का वाजवावे लागते? ‘गोल सर्कल’, ‘पिवळे पितांबर’, ‘गाईचे गोमूत्र’, ‘लेडिज बायका’, ‘चुकीची मिस्टेक झाली’ असे काही शब्दप्रयोगही सर्रासपणे ऐकायला मिळत आहेत.
भाषा संपली तर संस्कृती संपेल आणि संस्कृती संपली तर राष्ट्र बेचिराख होईल, याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. भाषा शुद्धीकरणाची आणि भाषा संपन्नतेची चळवळ राबवण्याच्या दृष्टिने प्रत्येकाने आता मराठी भाषेत बोलण्याबाबत आग्रही रहायला हवे. आपल्या नाकापर्यंत पाणी आले आहे. आता हालचाल केली नाही तर स्वतःसह आपल्या मातेची हत्या केल्याचे पातक आपल्याला लागणार आहे!!

हे आहेत दाभोलकर, पानसरेंचे मारेकरी!

साप्ताहिक 'चपराक' मधील सागर सुरवसे यांचा विशेष लेख. 
अवश्य वाचा, विचार करा! 

'संयम बाळगतो म्हणजे गांडुची औलाद समजू नका. याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. लाल सलाम!’ गोविंदराव पानसरे यांच्या मृत्युची बातमी आल्यानंतर माझ्या एका जबाबदार पत्रकारमित्राची ही पहिली प्रतिक्रिया. गोविंदरावांची हत्या कुणी केली याचा तपास भविष्यात लागेल. मात्र, गोविंदरावांच्या विचारांची, तत्त्वांची हत्या करणारा मात्र माझा मित्रच निघाला. तसा तो एकटाच आहे असे म्हणायचे कारण नाही. त्यासारखे शेकडो तथाकथित पुरोगामी कार्यकर्ते राज्यभरात आहेत. काही तर संपादक, वकील, उद्योजक व लेखकसुद्धा आहेत.
याशिवाय माझे आणखी काही पुरोगामी मित्र आहेत. त्यांच्याही प्रतिक्रिया इथे सांगणे क्रमप्राप्त ठरते.
- 'हरामखोरांनो, गोळ्या घालून विचार संपत नसतो, हे गांधी हत्येनंतरही तुमच्या लक्षात आले नाही. गांधी, दाभोलकर आणि आता पानसरे सरांची हत्या. आम्ही या विचारांचे सच्चे वारसदार आहोत. तुमच्या गोळ्यांना भीक घालत नाहीत. ही लढाई आम्ही अर्धी सोडणार नाही, कॉम्रेड!'
- 'खरा शिवाजी घराघरांत पोहचवणे गरजेचे आणि नथुरामाच्या अवलादींशी लढा देणे हाच एकमेव पर्याय!'
- 'ज्या धर्मासाठी किंवा धर्माच्या नावाखाली 82 वर्षांच्या व्यक्तिची हत्या होते, व्यक्त होण्याचा सोडा जगण्याचाच हक्क, अधिकार हिरावला जातो, तो धर्म सहनशील कसा असू शकतो? अशा धर्माचा त्याग केलाच पाहिजे.'
वरील उपटसुंभांच्या प्रतिक्रियांचा सूर असा आहे की, ही हत्या हिंदुत्त्ववादी संघटनेतील कार्यकर्त्यांनी केली आहे. प्रत्यक्षात मात्र याबाबत कोणताही पुरावा किंवा सुगावा कुणाकडेच नाही. वरील आरोपांमुळे डॉ. दाभोलकरांची हत्या कुणी केली हे कळत नाही, परंतु त्यांच्या विचारांची हत्या करणारे मात्र त्यांचे तथाकथीत अनुयायीच आहेत. कारण, डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धा त्यागण्याचा अट्टाहास धरला होता. त्यांनी अनेकांचा भोंदूपणादेखील पुराव्यानिशी उघड करून दाखवला होता. मात्र, आज त्यांचेच अनुयायी म्हणवून घेणारे उपटसुंभ कोणत्याही पुराव्याअभावी दाभोलकर आणि पानसरे यांची हत्या हिंदुत्त्ववादी संघटनेतील लोकांनी केली, अशी अंधश्रद्धा बाळगून आहेत. महापुरूषांचा किंवा विचारपुरूषांचा पराभव त्यांचे अनुयायीच करतात हे पुन्हा एकदा दिसून येत आहे.
याठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. ती म्हणजे, गांधींनंतर दाभोलकर, पानसरे यांचा क्रम लावणे. वस्तुस्थिती पाहिली तर, महात्मा गांधी हे देवाला मानत होते; दाभोलकर, पानसरे मात्र ते मानत नव्हते. त्यामुळे त्यांची हत्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी केली असे म्हणणे विरोधाभासाचे ठरते. 1999 च्या एनडीए सरकारची आघाडी ही कॉमन मिनीमम प्रोग्रॅमवर आधारित होती. त्याप्रमाणे केवळ अहिंसा या कॉमन मिनीमम विचारांवर गांधी-दाभोलकर-पानसरे यांचा वारसा आहे. राहता राहिला प्रश्‍न गांधी हत्येचा. नथुराम गोडसेने बापूंना मारले ते शेकडो कार्यकर्त्यांसमोर. मात्र दाभोलकर, पानसरे यांची हत्या करणारे मारेकरी अज्ञात आहेत. त्यांनी असा कोणताही पुरावा सोडलेला नाही की आम्ही अमुक अमुक एका विचाराचे आहोत. 
हत्या कोणाचीही असो, तिचे समर्थन कदापिही करता येत नाही! मात्र, कोणत्याही सबळ पुराव्याअभावी एखाद्यावर आरोप करणेदेखील गैर आहे. याशिवाय आणखी काही प्रतिक्रिया आहेत. त्या प्रतिक्रिया  दाभोलकरांना संकुचित करणार्‍या ठरतात, त्या अशा... 
’सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाला. आज रात्री (20 फेब्रुवारी) त्यांचे निधन झाले आहे. दीड वर्षापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना गोळ्या घालून मारण्यात आले. अजून त्यांचे मारेकरी सापडले नाहीत तोच पानसरे यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि आता त्यांचे निधन झाले. का मारले या दोघांना? तर ते लोकांना शहाणे करत होते. त्यामुळे हितसंबंधित लोकांनी त्यांची हत्या केली. गांधी मारले, दाभोलकर मारले आणि आता अण्णा. अजून अनेकजण लिस्टवर आहेत. आमचाही कधी नंबर आहे. यात विशेष काही नाही, पण मानवतेच्या शोषणमुक्तीचा लढा आम्ही असाच चालू ठेवू हीच या हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’
यावर मी त्या जबाबदार अनुयायी पत्रकार मित्राला सांगितले, 'मित्रा, माझ्या माहितीप्रमाणे डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या मारेकर्‍यांचा अजून तपास लागलेला नाही.’
त्यावर तो म्हणाला, ''आमचा माणूस मारला तरी अजून तुम्हाला काय म्हणायचे आहे?''
मी म्हणालो, ''दाभोलकर, पानसरे हे सर्व समाजाचे होते. त्यांच्यावर कोणीही हक्क प्रस्थापित करू शकत नाही मित्रा.''
तो म्हणाला, ''पुरोगामी म्हणजे आम्ही! या अर्थाने ती आमची माणसे आहेत. एवढे तुला निश्‍चित समजत असेल, असे मला वाटले होते. असो आता ही चर्चा करण्याची वेळ नाही, पण...''
पुढे संवाद संपला, मात्र वरील संवादातून लक्षात येईल की, डॉ. दाभोलकर, पानसरे यांना त्यांच्या अनुयायांनी किती संकुचित केले आहे. याउलट माझे दुसरे मित्र हर्षल लोहकरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गेल्या पाच दिवसापासून पुण्यातील ओंकारेश्‍वर मंदीराजवळील पुलावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हे उपोषणकर्ते मित्र खर्‍याअर्थी दाभोलकर, पानसरे यांच्या विचारांचा वारसा पुढे रेटत आहेत. त्यांच्या कार्यास शुभेच्छा आहेत.
दाभोलकर, पानसरे यांची हत्या करणारे कोण आहेत? ते कोणत्या संघटनेचे, विचारांचे आहेत? ते अद्याप मला माहीत नाहीत, पण त्यांच्या विचारांचे मारेकरी त्यांचे हे प्रतिक्रियावादी अनुयायीच आहेत हे मात्र नक्की.
सागर सुरवसे, पुणे
9769179823

Saturday, February 21, 2015

दाभोलकर-पानसरे यांच्या हत्येच्या तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न?

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला जवळपास 18 महिने पूर्ण झाले. त्यांच्या खुन्याचा तपास करण्यात तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारला आणि नंतर भाजप सरकारलाही सपशेल अपयश आले. या धक्क्यातून महाराष्ट्र सावरलेला नसतानाच डाव्या चळवळीचे पितामह अशी ओळख असलेल्या कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर त्याच पद्धतीने हल्ला करण्यात आला. महाराष्ट्रासाठी निश्‍चितच हा मोठा कलंक आहे. 
या दोन्ही प्रकरणात हल्लेखोरांनी सकाळच्या वेळी दुचाकीवरून येऊन गोळ्या घातल्या. दाभोलकरांच्या हत्येनंतर तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही मिनिटांत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की, ‘यामागे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा हात आहे.’ कोणताही पुरावा नसताना मुख्यमंत्री महोदयांनी हे जे तारे तोडले, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र विचलित झाला. पृथ्वीराज चव्हाण यांना दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाची दिशा बदलायची होती की काय? अशी शंका येण्यास मोठा वाव आहे. यामागे हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते तर आजपर्यंत त्यांना अटक का झाली नाही? पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांना पाठीशी तर घातले नाही ना? राज्याचा जबाबदार मुख्यमंत्री अशी विधाने करून तपासकामात अडथळे आणतो हे दुर्देवी आहे. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ या म्हणीप्रमाणे दाभोलकरांच्या हत्येत सहभागी असणार्‍या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची नावे चव्हाणांनी जाहीर करावीत.
गोविंदराव पानसरे यांच्या हत्येनंतरही धर्मवादाचे राजकारण करत हिंदुत्ववाद्यांनी हे कारस्थान केल्याचा आरोप सगळीकडून होत आहे. हे जर खरे असेल, तर आरोप करणार्‍यांनी तसे पुरावे देऊन संबंधितांवर कठोर कारवाई होईल याची दक्षता घ्यावी. उगीच आरोप करून किंवा निषेधाचे काळे झेंडे फडकवून काहीही साध्य होणार नाही. विचारवंतांवरील, सामाजिक कार्यकर्त्यांवरील असे हल्ले दुर्देवी आहेत. त्यामागील खरी कारणे शोधून काढण्यासाठी आणि हल्लेखोर पकडण्यासाठी यंत्रणेला सहकार्य करावे. 
वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा प्रमुख स्तंभ असतो. मात्र, काही भांडवलदार वृत्तपत्रे अशा घटनांचे भांडवल करून समाजात दुही निर्माण करण्याचे काम करत आहेत. समाज किती असंवेदनशील आहे, पोलीसयंत्रणा किती सुस्तावलेली आहे हे सिद्ध करण्यासाठी दैनिक ‘लोकमत’ने पुण्यात काल एक स्टींग ऑपरेशन केले. कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, सुप्रसिद्ध विचारवंत हरी नरके, पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ. विश्‍वंभर चौधरी, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांच्यावर पाळत ठेऊन, हल्ल्याचा प्रयत्न करून ‘लोकमत’सारख्या जबाबदार वृत्तपत्राने काय सिद्ध केले हे कळायला मार्ग नाही. आपल्या शहरात कुणालाही, कधीही, कसेही मारता येते याचे प्रात्यक्षिकच ‘लोकमत’ने दाखवून दिले आहे. विद्या बाळ यांच्यावर हल्ला करताना वापरलेल्या दुचाकीवर ‘प्रेस’ असे लिहिलेेले स्पष्टपणे दिसते, तर विश्‍वंभर चौधरी यांना गोळ्या घालणारा हल्लेखोर हसताना दिसतो. हे सारेच क्लेषकारक आहे. आपले शहर असुरक्षित असल्याने काहीही होऊ शकते अशी भीतीची भावना सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाली आहे. 
वृत्तपत्रांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी यंत्रणेला सहकार्य करायला हवे. त्यात काही त्रुटी असतील तर त्या लक्षात आणून द्यायला हव्यात. लोकाना निर्भय करायला हवे. मात्र, घडतेय ते उलटेच! प्रसारमाध्यमे लोकाच्या मनातील भीती वाढवत आहेत. यंत्रणेचे हसे करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते, तथाकथीत विचारवंत कोणतीही घटना घडल्यानंतर हिंदुत्ववाद्यांवर खापर फोडून मोकळे होत आहेत. गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, कायद्याचा धाक निर्माण व्हावा, असे कुणाला गंभीरपणे वाटते की नाही?
जवखेडा प्रकरणात ‘दलित अत्याचार’ म्हणून राज्य धुसमुसत असताना हल्लेखोर त्यांच्याच नात्यातील निघाले. ही एक दुष्ट प्रवृत्ती आहे. कोणत्याही जातीत किंवा कोणत्याही धर्मात सगळेच चांगले अथवा सगळेच वाईट असूच शकत नाहीत. जे चुकीचे आहेत, समाजद्रोही आहेत, त्यांना कठोर शासन अवश्य करावे, मात्र यानिमित्ताने कोणत्याही धर्माला बदनाम करू नये ही विनंती. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे हे सर्वांसाठी वंदनीय होते. त्यांचे कार्य खरोखरीच अफाट होते. स्वामी विवेकानंदांनीही हिंदू धर्मातील काही चुकीच्या गोष्टी ठामपणे दाखवून दिल्या होत्या. मात्र, त्यांच्यावर कुणी हल्ला केला नाही. दाभोलकर, पानसरे हेसुद्धा समाजातील कुप्रवृत्तींविरूद्ध संघर्ष करत होते. त्यांचा संघर्ष द्वेषमूलक नव्हता, हे त्यांच्या अनुयायांनी लक्षात घ्यावे. अशा घटना यापुढे घडू नयेत यासाठी समाजानेही दक्षता घ्यायला हवी. आपल्या आजूबाजूला जे काही चालले आहे, ते जागरूकपणे पहावे आणि कुप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा. विचारांची लढाई विचारानेच लढली गेली तर ती खरी अशा विचारवंतांना श्रद्धांजली ठरेल.
घनश्याम पाटील,
संपादक, प्रकाशक, ‘चपराक‘, पुणे
7057292092

Friday, February 20, 2015

ही लढाई जिंकलीच पाहिजे!

घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'

आयुष्याची बेरीज-वजाबाकी आम्हांस करता येत नसली तरी आमच्या जिंदगीत कायम सूर्योदय आहे. विविध कर्तृत्वववान माणसांच्या देदिप्यमान यशाचा आमच्यावर इतका प्रभाव पडलाय की, काळोखभिन्न समाजातही आमचे डोळे लकाकत आहेत. रस्त्यावरून चालणार्‍या ‘बुलडोझर’ ला किरकोळ काट्यांची काय तमा? म्हणूनच आम्ही मस्तवाल जीणे जगत आहोत. विधायक कार्याची धुंदी आमच्या नसानसात भिनली आहे. हा कैफ ‘इप्सित’  साध्य झाल्याशिवाय उतरेल असे वाटत नाही. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात आम्ही आमची स्वतःची आहुती देण्यास सिद्ध आहोत. ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे’ या उद्देशाने असंख्य क्रांतीविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आम्हीही प्राणाची बाजी लावणार आहोत. आम्ही आमच्या परीने एक यज्ञ आरंभिला आहे. हा यज्ञ ज्ञानाचा आहे, सेवेचा आहे. त्यात कशाकशाची ‘समीधा’ द्यावी लागेल, हे आम्हास ठाऊक नाही पण वाचकांकडून मिळणारे उदंड प्रेम पाहता हे चक्रव्यूह आम्ही निश्‍चितपणे भेदू याची मनस्वी खात्री वाटते.
एखादी नदी सराईतपणे पोहत पार करताना आम्ही बेभान होतो कारण नदीच्या दुसर्‍या काठावर जाण्याची आमची प्रचंड ओढ असते. कार्ल्याच्या एकवीरा आईच्या किंवा जेजुरीच्या खंडोबाच्या पायर्‍या चढताना आम्ही कधीही थकत नाही कारण मन प्रफुल्लीत करणार्‍या त्या गूढ शक्तीची दृढ आस मनी असते. विविध ग्रंथ वाचताना आम्ही किती पाने उलटली याचे आम्हास यत्किंचितही भान नसते कारण ज्ञानामृत प्राशन करण्याची आमची लालसा असते. यशाचे शिखर पादाक्रांत करताना काही समदुःखी लोकांनी घातलेले घाव आम्हांस इजा पोहोचवत नाहीत कारण आमच्या प्रबळ आत्मविश्‍वासाची शक्ती आम्हांस संरक्षण देत असते. मग समाजातल्या तथाकथित थोतांड प्रवृत्तीची पर्वा आम्ही का करावी? दुष्ट विचारांना, चुकीच्या प्रवृत्तींना ‘चपराक’ देण्यासाठीच आमचा जन्म आहे. यासाठी आम्हाला संघटितपणे साथ देणारे आमचे सहकारी आम्हास ‘घनश्यामा’ प्रमाणे वाटतात. शत्रूपक्षाकडून येणारे अनंत अडचणींचे बाण हृदयावर हळूवारपणे झेलत ते आमचे सारथ्य करीत आहेत. असे सहकारी असताना पराक्रमाची परंपरा कधीही खंडीत होणार नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे.
जे काम करण्याचे स्वप्न आम्ही आमच्या उरात बाळगून आहोत ते पूर्णत्वास नेण्याचा रस्ता खडतर असला तरी ती वाट आम्हांस सापडलीय. अंतिम ध्येयावर लक्ष केंद्रीत असल्याने हे अडथळे आम्ही सहजगत्या दूर करू. समाजाचे अधःपतन आता आम्हास बघवत नाही. आजच्या दुर्योधनाचे, दुःशासनाचे गडगडाटी हास्य आमच्या सहनशक्तीची परीक्षा पाहतेय. आजच्या द्रौपदीचे किंचाळणे आमच्या काळजाच्या ठिकर्‍या ठिकर्‍या करते. आज जागोजागी उगवलेल्या कौरवापुढे आजचे पांडवही निस्तेज पडलेत. चहूबाजूंनी ‘धाव धाव रे घनश्यामा’ अशीच आर्त हाक आम्हास ऐकू येतेय. मात्र आमचा खरा सवाल हा आहे की, कितीवेळा त्या ईश्‍वराला तुम्ही जन्म घ्यायला लावणार? ‘जेव्हा जेव्हा समाजाला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा माझा अवतार निश्‍चित आहे’ असे ‘तो’ सांगतो. म्हणून आपण समाजाला ‘ग्लानी’ यायची वाट पहायची? 
... हे यापुढे चालणार नाही! आम्हाला या असल्या ‘सौदेबाज’ ईश्‍वराचा अवतार नको. त्याने खुशाल स्वर्गात अमृत चापत रहावे. आम्ही पृथ्वीवर शांतीचे राज्य प्रस्थापित करू. आमच्या जीवनात साक्षात ब्रह्मदेवाची लुडबूडही आम्हास चालणार नाही. देवलोकातील गोड - गुळगुळीत अमृतापेक्षा मानवलोकांतील चटणी भाकरी बरी. आता आम्हास परमेश्‍वराचाही इन्तजार करण्याची गरज वाटत नाही.  प्राप्त परिस्थिती प्रतिकूल असली तरी ती अनुकूल करून घेण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे.
‘जे जे भेटे भूत, ते ते जाणिजें भगवंत’ या न्यायाने आम्ही आता स्वतःतील तुझा अंश शोधायचे ठरवले आहे. त्यामुळे यापुढे आम्ही कधीही तुझ्यापुढे नतमस्तक होणार नाही. तुला श्रद्धेने पाने, फुले, फळे अर्पण करणार नाही. तुझ्या अस्तित्वाची चाहूल लागल्याने वेळोवेळी मनात आल्हाददायक तरंग उमटतात; पण तुला आता पुन्हा आम्ही ‘आमच्यात’ सामावून घेणार नाही. गुन्हेगारी, भ्रष्टाचार, महागाई, अनैतिकता या व अशा प्रकारामुळे तुझा ‘अवतार’ अटळ असल्याचे अनेकांना वाटते, पण त्यांचा हा विश्‍वास आम्ही खोटा ठरवू. समाजात चांगले देखील खूप काही चालले आहे. आम्ही निकोप दृष्टिने ते बघू. प्रभावीपणे ते इतरांपुढे आणू.
दत्तोपंत ठेंगडी यांनी एकदा सांगितले होते की, एकेकाळी चराचर सृष्टीची रचना ठरलेली होती. स्वर्गात देव, पृथ्वीवर मानव व नरकात दानव अशी ती रचना होती. ते युग सरले आणि सत्ययुग आले. या युगात या तीनही शक्ती पृथ्वीवर अवतरल्या. माणसे तर होतीच पण प्रभू श्रीरामचंद्रांच्या रूपाने देव आणि रावणाच्या रूपाने दानवही अवतरले. काळ बदलला आणि द्वापारयुग आले. या युगात पृथ्वीवरील या तीनही प्रबळ शक्ती कौरव पांडवांच्या रूपाने एकाच घरात जन्मल्या. पिढ्यानपिढ्या या अवतारी पुरूषांच्या भाकडकथा ऐकत असतानाच  कलियुगाचा जमाना आला. या ‘हायब्रिड’ जमान्यात अजब क्रांती झाली आणि या तीनही अजस्त्र शक्ती प्रत्येक माणसात एकवटल्या. त्यामुळे माणूस कधी माणसासारखा वागतो, कधी राक्षसासारखा, तर कधी देवासारखा... एकवेळ तुझे रूप आम्हास पचनी पडेल पण माणूच ओळखणे... ना रे बाबा! 
... म्हणूनच आम्ही पण केलाय की, माणसाने माणूस म्हणून जगावे, यासाठीच आम्ही कार्यरत राहणार आहोत. माणसातील वाढलेली हैवानी प्रवृत्ती आम्हास अस्वस्थ करते; आम्ही बेचैन होतो आणि तुझ्या ‘अवताराची’ वाट बघत स्वतःचाच ‘अव’तार करून घेतो. स्वतःच्या कल्याणाची फक्त प्रार्थना करण्याऐवजी आम्ही अनिष्टतेचा खात्मा करण्यासाठी लढण्याची मर्दुमकी दाखवू. ही क्रांती घडविण्याचा विडा आम्ही उचलला आहे. आम्ही पुढाकार घेऊन हे केले नाही तर कोणीच करणार नाही, हे आम्ही जाणतो. म्हणूनच आम्हाला आमच्या तोकड्या शक्तीचा कोण अभिमान वाटतो! 
दादा धर्माधिकारी म्हणायचे, ‘‘क्रांती द्वेषमूलक, मत्सरप्रेरित व स्पर्धात्मक नको; ती क्रोधमुक्त, करूणाप्रेरित आणि प्रतिकारात्मक हवी.’’ अखिल मानवजातीविषयी आमच्या मनात प्रचंड करूणा आहे. मात्र मानवात घुसलेल्या दानवाचा नाश करण्यासाठी आता युद्ध पुकारायला हवे. कोणताही माणूस जन्मजात दुष्ट आणि विकृत नसतो पण आजूबाजूची परिस्थिती, साथसंगत आणि संस्कार यावर त्याचे आचार विचार अवलंबून असतात. तरूणांचे प्रबोधन आणि बालकांवर उत्तम संस्कार यासाठी ‘साहित्य चपराक’ कटिबद्ध आहे.
अनेक व्यक्ती, संस्था आपापल्या परीने हे काम करीत आहेत. काही भांडवलदार नियतकालिके किमान तसा आव आणत आहेत पण ‘साहित्य चपराक’ संस्काराचा मानदंड ठरेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. मर्यादापुरूषोत्तम प्रभू श्रीरामचंद्राला चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला. मात्र आज बहुसंख्य सामान्य माणसे आजीवन वनवासच भोगतात. आमची लढाई त्यांच्यासाठी आहे. कुणाचाही मुलाहिजा न राखता आम्ही सामान्य वाचकांचे प्रतिनिधीत्व करतो. 
सारांश असा की, आता पुन्हा कोणत्याही ईश्‍वराला जन्म घ्यायला लावू नकात. त्याऐवजी गरज आहे ती आपल्यातील ईश्‍वराला जागे करण्याची! आपले निश्‍चयी हातच उद्याचा इतिहास घडवायला समर्थ आहेत. कवीवर्य केशवसुतांच्याच शब्दात सांगायचे झाले तर -
प्राप्त काळ हा विशाल भूवर
सुंदर लेणी तयात खोदा;
निजनामे त्यावरती नोंदा
विक्रम काही करा चला तर...!


घनश्याम पाटील,
संपादक/प्रकाशक, 'चपराक'
संपर्क - ७०५७२९२०९२