घनश्याम पाटील, संपादक 'चपराक' |
आयुष्याची बेरीज-वजाबाकी आम्हांस करता येत नसली तरी आमच्या जिंदगीत कायम सूर्योदय आहे. विविध कर्तृत्वववान माणसांच्या देदिप्यमान यशाचा आमच्यावर इतका प्रभाव पडलाय की, काळोखभिन्न समाजातही आमचे डोळे लकाकत आहेत. रस्त्यावरून चालणार्या ‘बुलडोझर’ ला किरकोळ काट्यांची काय तमा? म्हणूनच आम्ही मस्तवाल जीणे जगत आहोत. विधायक कार्याची धुंदी आमच्या नसानसात भिनली आहे. हा कैफ ‘इप्सित’ साध्य झाल्याशिवाय उतरेल असे वाटत नाही. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात आम्ही आमची स्वतःची आहुती देण्यास सिद्ध आहोत. ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे’ या उद्देशाने असंख्य क्रांतीविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आम्हीही प्राणाची बाजी लावणार आहोत. आम्ही आमच्या परीने एक यज्ञ आरंभिला आहे. हा यज्ञ ज्ञानाचा आहे, सेवेचा आहे. त्यात कशाकशाची ‘समीधा’ द्यावी लागेल, हे आम्हास ठाऊक नाही पण वाचकांकडून मिळणारे उदंड प्रेम पाहता हे चक्रव्यूह आम्ही निश्चितपणे भेदू याची मनस्वी खात्री वाटते.
एखादी नदी सराईतपणे पोहत पार करताना आम्ही बेभान होतो कारण नदीच्या दुसर्या काठावर जाण्याची आमची प्रचंड ओढ असते. कार्ल्याच्या एकवीरा आईच्या किंवा जेजुरीच्या खंडोबाच्या पायर्या चढताना आम्ही कधीही थकत नाही कारण मन प्रफुल्लीत करणार्या त्या गूढ शक्तीची दृढ आस मनी असते. विविध ग्रंथ वाचताना आम्ही किती पाने उलटली याचे आम्हास यत्किंचितही भान नसते कारण ज्ञानामृत प्राशन करण्याची आमची लालसा असते. यशाचे शिखर पादाक्रांत करताना काही समदुःखी लोकांनी घातलेले घाव आम्हांस इजा पोहोचवत नाहीत कारण आमच्या प्रबळ आत्मविश्वासाची शक्ती आम्हांस संरक्षण देत असते. मग समाजातल्या तथाकथित थोतांड प्रवृत्तीची पर्वा आम्ही का करावी? दुष्ट विचारांना, चुकीच्या प्रवृत्तींना ‘चपराक’ देण्यासाठीच आमचा जन्म आहे. यासाठी आम्हाला संघटितपणे साथ देणारे आमचे सहकारी आम्हास ‘घनश्यामा’ प्रमाणे वाटतात. शत्रूपक्षाकडून येणारे अनंत अडचणींचे बाण हृदयावर हळूवारपणे झेलत ते आमचे सारथ्य करीत आहेत. असे सहकारी असताना पराक्रमाची परंपरा कधीही खंडीत होणार नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे.
जे काम करण्याचे स्वप्न आम्ही आमच्या उरात बाळगून आहोत ते पूर्णत्वास नेण्याचा रस्ता खडतर असला तरी ती वाट आम्हांस सापडलीय. अंतिम ध्येयावर लक्ष केंद्रीत असल्याने हे अडथळे आम्ही सहजगत्या दूर करू. समाजाचे अधःपतन आता आम्हास बघवत नाही. आजच्या दुर्योधनाचे, दुःशासनाचे गडगडाटी हास्य आमच्या सहनशक्तीची परीक्षा पाहतेय. आजच्या द्रौपदीचे किंचाळणे आमच्या काळजाच्या ठिकर्या ठिकर्या करते. आज जागोजागी उगवलेल्या कौरवापुढे आजचे पांडवही निस्तेज पडलेत. चहूबाजूंनी ‘धाव धाव रे घनश्यामा’ अशीच आर्त हाक आम्हास ऐकू येतेय. मात्र आमचा खरा सवाल हा आहे की, कितीवेळा त्या ईश्वराला तुम्ही जन्म घ्यायला लावणार? ‘जेव्हा जेव्हा समाजाला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा माझा अवतार निश्चित आहे’ असे ‘तो’ सांगतो. म्हणून आपण समाजाला ‘ग्लानी’ यायची वाट पहायची?
... हे यापुढे चालणार नाही! आम्हाला या असल्या ‘सौदेबाज’ ईश्वराचा अवतार नको. त्याने खुशाल स्वर्गात अमृत चापत रहावे. आम्ही पृथ्वीवर शांतीचे राज्य प्रस्थापित करू. आमच्या जीवनात साक्षात ब्रह्मदेवाची लुडबूडही आम्हास चालणार नाही. देवलोकातील गोड - गुळगुळीत अमृतापेक्षा मानवलोकांतील चटणी भाकरी बरी. आता आम्हास परमेश्वराचाही इन्तजार करण्याची गरज वाटत नाही. प्राप्त परिस्थिती प्रतिकूल असली तरी ती अनुकूल करून घेण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे.
‘जे जे भेटे भूत, ते ते जाणिजें भगवंत’ या न्यायाने आम्ही आता स्वतःतील तुझा अंश शोधायचे ठरवले आहे. त्यामुळे यापुढे आम्ही कधीही तुझ्यापुढे नतमस्तक होणार नाही. तुला श्रद्धेने पाने, फुले, फळे अर्पण करणार नाही. तुझ्या अस्तित्वाची चाहूल लागल्याने वेळोवेळी मनात आल्हाददायक तरंग उमटतात; पण तुला आता पुन्हा आम्ही ‘आमच्यात’ सामावून घेणार नाही. गुन्हेगारी, भ्रष्टाचार, महागाई, अनैतिकता या व अशा प्रकारामुळे तुझा ‘अवतार’ अटळ असल्याचे अनेकांना वाटते, पण त्यांचा हा विश्वास आम्ही खोटा ठरवू. समाजात चांगले देखील खूप काही चालले आहे. आम्ही निकोप दृष्टिने ते बघू. प्रभावीपणे ते इतरांपुढे आणू.
दत्तोपंत ठेंगडी यांनी एकदा सांगितले होते की, एकेकाळी चराचर सृष्टीची रचना ठरलेली होती. स्वर्गात देव, पृथ्वीवर मानव व नरकात दानव अशी ती रचना होती. ते युग सरले आणि सत्ययुग आले. या युगात या तीनही शक्ती पृथ्वीवर अवतरल्या. माणसे तर होतीच पण प्रभू श्रीरामचंद्रांच्या रूपाने देव आणि रावणाच्या रूपाने दानवही अवतरले. काळ बदलला आणि द्वापारयुग आले. या युगात पृथ्वीवरील या तीनही प्रबळ शक्ती कौरव पांडवांच्या रूपाने एकाच घरात जन्मल्या. पिढ्यानपिढ्या या अवतारी पुरूषांच्या भाकडकथा ऐकत असतानाच कलियुगाचा जमाना आला. या ‘हायब्रिड’ जमान्यात अजब क्रांती झाली आणि या तीनही अजस्त्र शक्ती प्रत्येक माणसात एकवटल्या. त्यामुळे माणूस कधी माणसासारखा वागतो, कधी राक्षसासारखा, तर कधी देवासारखा... एकवेळ तुझे रूप आम्हास पचनी पडेल पण माणूच ओळखणे... ना रे बाबा!
... म्हणूनच आम्ही पण केलाय की, माणसाने माणूस म्हणून जगावे, यासाठीच आम्ही कार्यरत राहणार आहोत. माणसातील वाढलेली हैवानी प्रवृत्ती आम्हास अस्वस्थ करते; आम्ही बेचैन होतो आणि तुझ्या ‘अवताराची’ वाट बघत स्वतःचाच ‘अव’तार करून घेतो. स्वतःच्या कल्याणाची फक्त प्रार्थना करण्याऐवजी आम्ही अनिष्टतेचा खात्मा करण्यासाठी लढण्याची मर्दुमकी दाखवू. ही क्रांती घडविण्याचा विडा आम्ही उचलला आहे. आम्ही पुढाकार घेऊन हे केले नाही तर कोणीच करणार नाही, हे आम्ही जाणतो. म्हणूनच आम्हाला आमच्या तोकड्या शक्तीचा कोण अभिमान वाटतो!
दादा धर्माधिकारी म्हणायचे, ‘‘क्रांती द्वेषमूलक, मत्सरप्रेरित व स्पर्धात्मक नको; ती क्रोधमुक्त, करूणाप्रेरित आणि प्रतिकारात्मक हवी.’’ अखिल मानवजातीविषयी आमच्या मनात प्रचंड करूणा आहे. मात्र मानवात घुसलेल्या दानवाचा नाश करण्यासाठी आता युद्ध पुकारायला हवे. कोणताही माणूस जन्मजात दुष्ट आणि विकृत नसतो पण आजूबाजूची परिस्थिती, साथसंगत आणि संस्कार यावर त्याचे आचार विचार अवलंबून असतात. तरूणांचे प्रबोधन आणि बालकांवर उत्तम संस्कार यासाठी ‘साहित्य चपराक’ कटिबद्ध आहे.
अनेक व्यक्ती, संस्था आपापल्या परीने हे काम करीत आहेत. काही भांडवलदार नियतकालिके किमान तसा आव आणत आहेत पण ‘साहित्य चपराक’ संस्काराचा मानदंड ठरेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. मर्यादापुरूषोत्तम प्रभू श्रीरामचंद्राला चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला. मात्र आज बहुसंख्य सामान्य माणसे आजीवन वनवासच भोगतात. आमची लढाई त्यांच्यासाठी आहे. कुणाचाही मुलाहिजा न राखता आम्ही सामान्य वाचकांचे प्रतिनिधीत्व करतो.
सारांश असा की, आता पुन्हा कोणत्याही ईश्वराला जन्म घ्यायला लावू नकात. त्याऐवजी गरज आहे ती आपल्यातील ईश्वराला जागे करण्याची! आपले निश्चयी हातच उद्याचा इतिहास घडवायला समर्थ आहेत. कवीवर्य केशवसुतांच्याच शब्दात सांगायचे झाले तर -
प्राप्त काळ हा विशाल भूवर
सुंदर लेणी तयात खोदा;
निजनामे त्यावरती नोंदा
विक्रम काही करा चला तर...!
घनश्याम पाटील,
संपादक/प्रकाशक, 'चपराक'
संपर्क - ७०५७२९२०९२
No comments:
Post a Comment