Monday, October 5, 2015

रेघोट्यांच्या प्रदेशात

समीर सुधाकर नेर्लेकर हे नाव फारसं कुणाला परिचित असण्याचं तसं कारण नाही. इतर सर्वसामान्य लोकांप्रमाणेच मी देखील एक सर्वसामान्य नोकरदार माणूस. गर्दीत मिसळलेला एक सामान्य चेहरा. भौतिक जग मी दररोज अगदी जवळून पाहतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ‘समाज’ नावाच्या या विलक्षण प्रदेशात वावरताना अनेक विसंगती अनुभवायला मिळतात. कधी सभ्यतेच्या मुखवट्यामागचे खरे चेहरे दिसतात. तर कधी क्रूरतेच्या चेहर्‍यामागचा माणुसकीचा खळाळता झळाही दिसून येतो. मी फुटपाथवरून चालत असताना कुणी माझ्याकडे ढुंकूनही बघत नाही किंवा रस्त्यावरच्या प्रत्येक माणसाला माझे नाव माहीत असावे असेही काही माझ्या हातून घडलेले नाही. मी गेली अनेक वर्षे ज्या घरात राहतो, त्या घराला लागून असलेल्या घरातील माणसालाही मी नेमकं काय करतो, हे माहीत नाही. व्यक्तिगत आयुष्यात अनेक पातळ्यांवर अपेक्षापूर्तीच्या बाबतीत पूर्णतः वैफल्यग्रस्त असणारा मी जेव्हा पेन्सिल हातात धरतो, तेव्हा काही क्षणांकरीता खेचला जातो एका विलक्षण अशा विश्‍वात, रेघोट्यांच्या प्रदेशात.पेन्सिलीने कागदावर रेघोट्या मारण्याची सवय माझ्या बोटांना नेमकी कधीपासून लागली हे सांगता येणार नाही, पण मी अगदी लहान होतो तेव्हापासूनच माझ्या हातात पेन्सिल देण्यात आली होती. माझी आई शिवणकाम, भरतकाम, विणकाम अशी अनेक कामे करायची. ती मला तिच्या शेजारी बसवायची. मला गुंतवून ठेवण्यासाठी ती माझ्या हातात पेन्सिल देऊन कागदावर रेघोट्या मारायला सांगायची. मला फार खेळणी मिळाली नाहीत, पण हातातली पेन्सिल हेच माझं खेळणं बनून गेलं.
शाळेत असताना अभ्यासात मी अजिबात हुशार नव्हतो. कधी काठावर पास तर कधी नापास अशीच गत होती. वर्गात शिक्षक शिकवत असताना मी मात्र माझ्याच काल्पनीक विश्‍वात रमून गेलेलो असायचो. माझे वडील आर्किटेक्ट होते. इमारतींची चित्रे रेखाटणे आणि मॉडेल बनविणे हे त्यांचे रोजचे काम. त्यांच्यामुळे देखील माझं पेन्सिलशी असलेलं नात अधिक घट्ट होण्यास मदत झाली.
कलेच्या क्षेत्रात अनेक वर्षे काम केल्यानंतर आज मी अगदी ठामपणे सांगू शकतो की मी स्वतः चित्रकार नाही. स्वतःला चित्रकार म्हणवून घेण्यासाठी काय काय करावं लागतं हे मला चांगलं माहीत आहे. मी अनेक दिग्गज कलावंत पाहिलेले आहेत. त्यांचं काम पाहिलेलं आहे. ती पातळी गाठणं माझ्यासाठी अवघड आहे. मी केवळ एक तंत्रज्ञ आहे. दृश्य कला तंत्रज्ञ. एक तंत्रज्ञ म्हणून काम करताना मी आत्तापर्यंत जे काही शिकलो आहे ते सगळं ज्ञान मी चित्र रेखाटण्याच्या कामात वापरतो एवढंच!
एक अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून जेव्हा मी पेन्सिलीची निवड केली, तेव्हा सर्वात प्रथम मला या माध्यमाच्या मर्यादा लक्षात आल्या. जी घनता जलरंग किंवा शाईने साधता येते, ती घनता पेन्सिलने साधता येणे फार कठीण असते आणि माझ्या दृष्टिने हेच सर्वात मोठे आव्हान आहे. त्यासाठी मी पेन्सिल या माध्यमाचा बारकाईने अभ्यास केला. बाजारात कोणत्या विविध श्रेणीच्या पेन्सिली उपलब्ध आहेत, याचा मी सातत्याने शोध घेत असतो. पेन्सिल स्केचिंग करण्यासाठी रोज सराव करावा लागतो. कागदावर उभ्या, आडव्या आणि वळणदार रेषा काढणे, हे सारखं चालू राहिलं पाहिजे. आपण जिवंत राहण्यासाठी ज्याप्रमाणे श्‍वास घेतो, त्या प्रमाणेच आपल्यातला रेखाचित्रकार जिवंत ठेवण्यासाठी रोजचा सराव हाच श्‍वास आहे असं मला वाटतं.
पेन्सिल स्केचिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्केचिंगचा विषय. मला स्केचिंग करायला फार वेळ लागत नाही, परंतु चित्राचा विषय ठरवायला फार वेळ लागतो. लहानपणापासून अनेक गोष्टी अंतर्मनात दडून राहिल्या आहेत, शिवाय दररोज भोवतालचं जग बघत असतोच. अनेक चांगली पुस्तकं वाचायला मिळतात. इंटरनेटवरही बरंच काही बघायला मिळतं. हे सगळं कधी ना कधी चित्रांच्या रूपात कागदावर उमटवलं जातं. मी रेखाटलेल्या चित्रांची फारशी प्रदर्शने वगैरे कधी भरली नाहीत. कधीकधी मासिकांमध्ये, पुस्तकांमध्ये, मुखपृष्ठांवर माझी चित्रे छापली जातात. जाणकार आणि रसिकांकडून जेव्हा दिलखुलास दाद मिळते तेव्हा फार समाधान वाटते. सोशल मीडियावरून मी गेली अनेक वर्षे माझी चित्रे सातत्याने प्रसारित करतोय. त्यामुळे मी हजारो कलारसिकांशी जोडला जातोय. इथे एक प्रातिनिधिक अनुभव आवर्जून सांगावासा वाटतोय. सोशल मीडियावरील एका व्यक्तिने माझा मोबाईल नंबर विचारला. थोड्या वेळाने त्याच व्यक्तिने माझा बँकेचा अकाऊंट नंबर विचारला. त्या व्यक्तिचा फोन आला. राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील एक फार मोठं प्रस्थ माझ्याशी फोनवर बोलत होतं. ‘‘तुम्ही काढलेले वासुदेवाचे चित्र आज सकाळी संगणक चालू करताच मला बघायला मिळालं. आमच्या घराण्यात अशी पद्धत आहे की, दारात आलेल्या वासुदेवाला रिकाम्या हाताने परत पाठवायचं नाही, पण हल्ली वासुदेवाचं दर्शन घडणं दुर्मीळ झालं आहे. त्यामुळं तुमचं चित्र पाहून मला फार आनंद झाला. तुमच्या बँक खात्यात पंधराशे रूपये जमा केले आहेत. त्याचा स्वीकार करा आणि माझ्याकडून कसलीही मदत लागली तर अवश्य भेटा’’ एका धनिकानं केवळ माझं चित्र पाहून मला दिलेली ही दाद पाहून मी थक्क झालो.
चित्र रेखाटणे हा माझ्या पेशाचा एक भाग तर आहेच, पण तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता मी अगदी झपाटल्यासारखा चित्र रेखाटत असतो. त्यामागचं कारण काय असावं?
माझ्या दैनंदिन व्यक्तिगत आयुष्यात अशा अनेक विवंचना आहेत ज्या मी कुणापुढं व्यक्त देखील करू शकत नाही. कारण भूतकाळात माझ्याच हातून घडलेल्या काही चुकांमुळे त्या विवंचना निर्माण झाल्या आहेत. त्या निमुटपणे भोगण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा मार्ग नाही. रेघोट्यांच्या काल्पनिक प्रदेशात वावरण्याच्या निमित्ताने काही क्षणांकरीता का होईना पण मला भौतिक जगातील विवंचनांचा विसर पडतो. केवळ हौस म्हणून किंवा आनंद मिळावा म्हणून, किंवा मला दुसरे काही कामधंदे नाहीत म्हणून मी चित्र रेखाटतो असे मुळीच नाही. दिलीप कुमारचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे, ‘कौन कंबख्त बर्दास्त करने के लिए पीता है? मै तो पीता हॅूं, ताकी सॉंस ले सकू!’ त्याप्रमाणे मी माझ्या वेदनेला फुंकर घालण्यासाठी रेघोट्यांच्या प्रदेशात भटकंती करत असतो.
गुरूदत्तचं एक गाणं आहे, ‘बिछडे सभी बारी बारी...’ त्याप्रमाणे माझ्या आयुष्यातली अनेक नाती माझ्यापासून दूर होत गेली, पण पेन्सिलीशी असलेलं माझं नात अजूनही टिकून आहे. 

समीर नेर्लेकर, ९४२२५०८४७१ 
(मासिक 'चपराक' ऑक्टोबर २०१५)

Sunday, October 4, 2015

साहित्य परिषदेला अध्यक्षांकडूनच चपराक

डॉ. प्र. चिं. शेजवलकर (अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद)
महाराष्ट्र साहित्य परिषदेतील अंतर्गत राजकारण, कार्याध्यक्ष माधवी वैद्य यांचा गैरव्यवहार आणि समन्वयाचा अभाव यामुळे साहित्य परिषद म्हणजे पांढरा हत्ती झाला आहे. सातत्याने भ्रष्टाचार उघडकीस येऊनही कार्याध्यक्ष वैद्यबाई चुकीचे राजकारण करत असल्याचे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपली नाराजी व्यक्त केली. कार्याध्यक्ष कसा दबाव आणतात हेही त्यांनी स्पष्टपणे नोंदवले. तसेच म.सा.प. चे साहित्य विषयक धोरण कसे असावे याबद्दलही त्यांनी आपले विचार परखडपणे व्यक्त केले. डॉ. शेजवलकर यांचे भाषण खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी देत आहोत.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आदरणीय विश्‍वस्त आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेवर नितांत प्रेम करणारे माननीय सदस्य मित्रहो,
माझा अध्यक्षीय पदाचा कार्यकाल सुमारे सहा महिन्यांनी संपणार असल्यामुळे आणि त्याआधीची होणारी वार्षिक सभा माझ्या कार्यकाळात शेवटची असल्यामुळे मनात केलेले प्रकट चिंतन आपल्यापुढे सादर करीत आहे. हे करताना कोणत्याही व्यक्तिवर टीका करणे माझ्या स्वभावाला धरून नाही. आज मी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून तुमच्या समोर निवेदन करताना मला अतिशय दुःख होत आहे. माझ्या मनात कोणाबद्दल राग नाही. मात्र गेल्या काही दिवसात अनेक सदस्य मला भेटले आणि काहींनी मला पत्रेही पाठवली. त्यांच्याकडून कार्याध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी गेल्या चार वर्षातला त्यांनी केलेला कारभार पाहता त्यांच्यामुळे म.सा.प.ची प्रचंड बदनामी झाली आहे. त्यामुळे परिषदेच्या सत्कीर्तीस प्रचंड हानी पोहोचली आहे. त्यांचा महामंडळाच्या अध्यक्ष म्हणून  असलेला कारभारसुद्धा अत्यंत आक्रस्ताळेपणाचा आणि हटवादी आहे असे माझ्या कानावर आलेले आहे. घुमान आणि अंदमान येथे झालेल्या साहित्य संमेलनात जे गैरप्रकार झाले त्यालाही महामंडळाच्या अध्यक्षा याच जबाबदार आहेत असे मला वाटते.
गेल्या चार वर्षात अध्यक्ष म्हणून मला आलेला अनुभव हा देखील अतिशय क्लेषदायक आहे. आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सध्याच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष ही  फक्त मानाची जागा असून अंतर्गत धोरणे आणि व्यवस्थापन इतर पदाधिकार्‍यांच्या हातात आहेत असे मला माझी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर कार्याध्यक्षांनी लगेचच सांगितले. खरे म्हणजे त्यांचे सांगणे योग्य नव्हते. हे मलाही आणि इतरांनाही पटलेले नाही. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कारभाराबद्दल लक्ष घालणे हे अध्यक्षांच्या अधिकारात असते. जेव्हा जेव्हा अनेक सदस्यांकडून कार्याध्यक्षांबद्दल प्रचंड नाराजी असलेल्या तक्रारी माझ्याकडे येऊ लागल्या तेव्हा आपण स्वतः त्यात लक्ष घालावे असे मला वाटू लागले. माझ्या आधीचे अध्यक्ष प्रा. द. मा. मिरासदार यांनी एकच वर्षांनंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ‘‘विद्यमान कार्याध्यक्ष ज्या पद्धतीने वागत आहेत त्यामुळे अतिशय उबग येऊन मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला’’ असे मला मिरासदार यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मी फारसे लक्ष न घातल्यामुळे कार्याध्यक्षांनी मनमानी कारभार सुरू केला. त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात मलाही उदामपणा आणि अहंकार जाणवला. त्यातच त्यांनी जे गैरप्रकार केले त्याबद्दल काही सदस्य जे बोलले त्यांच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी केलेला कारभारसुद्धा अतिशय चुकीचा आणि धक्कादायक होता. सासवड आणि घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्यावेळी त्यांनी छोटीशी संहिता लिहिल्याबद्दल भरपूर मानधन घेतले असे माझ्या कानावर आले आणि माझ्या मते ही त्यांनी केलेली अक्षम्य अशी चूक होती. चॅरिटी कमिशनर यांच्याकडून त्यांना चारवेळा नोटीस येऊनदेखील त्यांनी कागदपत्रे दिली नाहीत. त्यामुळे त्यांना चॅरिटी कमिशनरने पाच हजार रूपयांचा दंड केला. त्यांनी आणि सुनील महाजन यांनी चेकवर सह्या करून रोख पैसे काढले आणि ते संस्थेतर्फे भरले हे कितपत योग्य आहे ते तुम्हीच ठरवावे. कोषाध्यक्ष सुनील महाजन यांनीही दोन्ही संमेलनाच्या वेळी त्यांनी सादर केलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे भरपूर पैसे घेतले असे मला सांगण्यात आले. या संबंधीचे पत्रही माझ्याकडे आले आहे. पदाधिकार्‍यांनी लाभार्थी होणे योग्य नाही. कार्याध्यक्षांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या पाच उमेदवारांपैकी डॉ. श्रीपाल सबनीस या एका उमेदवारासाठी जाहीर प्रशस्ती दिली. हेसुध्दा योग्य झाले नाही. शरणकुमार लिंबाळे अध्यक्षीय उमेदवारीकरता फॉर्म भरावयास आले तेव्हा ‘तुमचे नाव यादीतच नाही’ असे कार्याध्यक्ष म्हणाल्या. त्यांनी जेव्हा पैसे भरल्याची पावती दाखवली तेव्हा कार्याध्यक्षांनी चूक मान्य केली. अनेकांनी माझ्याकडे अशाच प्रकारच्या तक्रारी केल्या. माननीय सदस्यांची अपेक्षा मात्र अध्यक्षांनी क्रियाशील रहावे असे वाटल्यामुळे ते मला अनेक प्रकारच्या सूचना करीत असतात. त्या जशाच्या तशा अमलात आणणे माझ्या हातात नसते. महामंडळावरसुद्धा आमच्यापैकी कोणी जावे या संबधीची धोरणे आणि व्यवस्थापन इतर पदाधिकार्‍यांच्या हातात आहेत असे मला माझी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर लगेचच सांगण्यात आले होते. त्यामुळे महामंडळाच्या कार्यात अध्यक्षांना, म्हणजे मला, सहभागी होता आले नाही. महामंडळाचे स्वतंत्र अस्तित्व आवश्यक आहे का, याबाबत अनेक सदस्यांनी आपली मते व्यक्त केली आहेत. महामंडळाच्या ऐवजी त्या त्या घटक संस्थेतील सर्व पदाधिकार्‍यांनी कामकाज बघावे असे अनेक सदस्यांना वाटते. त्यात कार्यकारिणीच्या तीन सदस्यांनी आणि त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिकांपैकी दोन साहित्यिकांना स्वीकृत करून व्यापक स्थानिक समिती स्थापन करावी आणि या समितीने साहित्य संमेलने आयोजित करावीत असे अनेकांना वाटते. सध्या ज्या पद्धतीने पदाधिकारी निवडले जातात त्यामध्ये कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष यांची निवड थेट सदस्य करतात. अध्यक्षांची निवड मात्र कार्यकारिणी तर्फे केली जाते. त्यामुळे अध्यक्ष म्हणजे एक ’अडगळ’ आहे असेच कार्याध्यक्षांना वाटत आले असावे. कधी कधी तर अध्यक्ष म्हणजे ’असून अडचण आणि नसून खोळंबा’ असे वाटण्या इतपत आपण तेथे  आहोत अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली. कारण गेल्या चार वर्षात कार्याध्यक्ष आणि कोषाध्यक्ष काय व्यवहार करतात ते मला कधीही सांगण्यात आले नाही. मी शक्यतोवर परिषदेत येऊच नये असेच कार्याध्यक्षांच्या मनात असावे. परिषदेतील जाहीर कार्यक्रमांनादेखील कार्याध्यक्षाच अध्यक्ष म्हणून बसत. डॉ. सदानंद मोरे यांच्या सत्काराच्या वेळी मी आपणहून गेलो होतो तेवढेच. माझी अध्यक्षपदी नियुक्ती झाली तेव्हा आपण स्वतः कोणकोणत्या गोष्टी कराव्यात यासंबधी मी काही योजना मनात मांडल्या होत्या. मात्र त्या मला अमलात आणता आल्या नाहीत. उदा. पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक अशा मराठी शाळांची अवस्था केविलवाणी झाली आहे आणि त्यामध्ये शासनाने सुधारणा करावी म्हणून साहित्य परिषदेने जोरात प्रयत्न करावा असे मला नेहमी वाटत आले आहे. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी या दृष्टीने प्रकाशकांनी ललित वाङ्मयांखेरीज इतर विद्याशाखातील विषयांची पुस्तके मराठीत प्रसिद्ध करावीत असे माझे मत आहे. महाविद्यालयीन तरूणांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आकर्षित व्हावे यासाठी त्यांच्याकरता परिषदेने विशेष कार्यक्रम आयोजित करावेत म्हणजे नव्या पिढीचा मराठी साहित्य वाचण्याकडे ओढा राहील. अन्यथा आजच्या तरूण मुलांचे, सोशल मीडियामध्ये आणि मोबाईलचा वापर खूप वाढल्यामुळे, मराठी वाचन एकदम कमी झाले आहे. ज्या दिवशी तरूणांची हॉटेलकडे जाणारी पाऊले ग्रंथालयाकडे वळतील त्या दिवशी समाजाची योग्य दिशेने वाटचाल सुरू झाली असे म्हणता येईल. समाज काय वाचतो, त्या समाजातील विचारवंत काय बोलतात, काय लिहितात हे पाहणे सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. आजचे साहित्य अनेकदा घाईघाईत लिहिले जाते. त्यामुळे शब्दरूपी शस्त्रे गंजत चालली आहेत. त्यांची धार बोथट झाली आहे. कन्नडमधील भैरप्पांच्या कादंबर्‍यांवर मराठीत उड्या पडतात. सुधा मुर्तींची अनुवादीत पुस्तके खपतात. मात्र आपल्याकडील मराठी साहित्य त्याप्रमाणात खपत नाहीत. महाराष्ट्रात एकही प्रकाशक एकाही लेखकाच्या कादंबरीची दहा हजाराची आवृत्ती प्रकाशित करू शकत नाही याचा विचार साहित्य परिषदेने केला पाहिजे. पण याही बाबतीत कार्याध्यक्षांनी मला काहीही करू दिले नाही.

सध्याचा जीवन कलह खूप वाढल्यामुळे आणि अनेकांची घरे यांच्या कचेर्‍यांपासून लांब असल्यामुळे ते घरी आल्यावर थकून जातात आणि मग त्यांचे वाचनच होत नाही. यावर काही उपाय सुचतात का याचा परिषदेने विचार करायला हवा. हल्ली मराठीतील अनेक मालिकांमध्ये वापरली जाणारी भाषा अशुद्ध असते. यावर देखील साहित्य परिषदेने अंकुश ठेवणे मला गरजेचे वाटते. साहित्य प्राज्ञ आणि साहित्य विशारद या परीक्षांकडे तरूणांचा ओढा कसा वाढेल यासाठी साहित्य परिषदेने महाविद्यालयात जाऊन या परीक्षा लोकप्रिय होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कार्याध्यक्षांनी याबाबतीत काहीही केले नाही. याचा विचार कार्याध्यक्षांच्या मनात का आलेला नाही याचे मला आश्‍चर्य वाटत आहे. म्हणून ज्येष्ठ साहित्यिकांचे एक सल्लागार मंडळ कार्यकारिणीनेे स्थापन करावे आणि त्यांचे मार्गदर्शन गंभीरपणे विचारात घ्यावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या हातात अधिकार आहे त्यांनी इतरांचाही सल्ला घेऊन आपले धोरण अमलात आणावे. मराठी समाजाला अंतर्गत दुहीचा एक प्रकारचा शाप मिळालेला आहे. तो कमी होण्यासाठी विविध स्तरातील लोकांना साहित्य परिषदेकडे आकर्षित केले पाहिजे. आता दलित समाजातील अनेक नवे लेखक आणि कवी नावारूपाला आले आहेत. याचप्रमाणे श्रमिक वर्गातही अनेक साहित्यिक आहेत. त्यांचा सहभाग आपण वाढवायला हवा. या बाबतीतही कार्याध्यक्षांनी माझी मते कधीही जाणून घेतली नाहीत.
माझ्या कार्यकाळात प्राध्यापक मिलिंद जोशी यांचा प्रमुख कार्यवाह पदाचा राजीनामा ही एक दुर्दैवी घटना घडली याचे मला फार वाईट वाटले. मिलिंद जोशी हे प्रसिद्ध साहित्यिक, उत्तम वक्ते आणि  प्रशासकीय जाण असलेले प्राध्यापक आहेत. त्यांचा सहभाग परिषदेला उपयोगी पडला असता. त्यांनी पुढील निवडणुकीनंतर साहित्य परिषदेत पुन्हा पदार्पण करावे असे मला मनापासून वाटते. कोणाशीही दीर्घकाळ  दुरावा ठेऊ नये, हे मी यशस्वी नेतृत्व करणार्‍या अनेकांपासून शिकलो.  स्वामी विवेकानंद, येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरूजी यांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव आहे. त्यामुळे जे काही माझ्या वाट्याला काम आले ते मानसिक ताण न ठेवता प्रसन्न मनाने जेवढे करता येईल तेवढे करावे अशीच माझी धारणा आहे. त्यामुळेच इतर सामाजिक संस्थांमध्ये आणि पुणे विद्यापीठातही बिनविरोध निवडून येऊन आणि सगळ्यांची मने जिंकून मला काम करता आले. त्या मानाने महाराष्ट्र साहित्य परिषदेत मला स्वतःला अपेक्षित असलेले माझे योगदान मला नीट करू देता आले नाही. कारण येथेही कार्याध्यक्षांनी मला जाणूनबूजून एखाद्या खड्यासारखे दूर ठेवले. सर्वांची नाराजी पत्करून कार्याध्यक्षांनी गैरकारभार करीत राहणे कितपत योग्य आहे याचा त्यांनी स्वतः विचार करावा असे मला वाटते. काहीजण डॉ. माधवी वैद्य यांच्याविरूध्द अविश्‍वासाचा ठरावही मांडणार होते; पण त्यासाठी पंधरा दिवसाची नोटीस द्यावी लागते. डॉ. माधवी वैद्य यांनीच आता सदस्यांचा आणि अध्यक्षांचा विश्‍वास बसण्यावर आपण पात्र आहोत का याचा विचार केला पाहिजे. कार्याध्यक्षपदी खरे म्हणजे नामवंत साहित्यिक असावा पण तसे झालेले नाही.
सध्याच्या कार्याध्यक्षांचे साहित्यिक योगदान नगण्य आहे हे खेदाने म्हणावेसे वाटते. मंगला गोडबोले, अच्चुत गोडबोले, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अशोक कामत, डॉ. अरूणा ढेरे ही व अशी नामवंत साहित्यिक मंडळी कार्याध्यक्षपदी शोभून दिसली असती. गेल्या वर्षभरात विश्‍वस्तांची एकही सभा बोलावण्यात आली नाही. विश्‍वस्तांची सभा  घेण्यासंबधी कोषाध्यक्षांनी मला एक पत्र लिहिले होते. मी त्यांना तारखाही दिल्या होत्या पण पुढे काय झाले हे मलाही कळले नाही. असो.
1953 मध्ये, म्हणजे 62 वर्षांपूर्वी, त्यावेळी माझे निवासस्थान साहित्य परिषदेच्या जवळ असल्यामुळे, मी नियमितपणे वृत्तपत्रे आणि मासिके वाचण्याकरता परिषदेत येत होतो आणि परिषदेच्या त्यावेळच्या सर्व  कार्यक्रमांना उपस्थित राहत होतो, तसेच 1956 मध्ये म्हणजे एकोणसाठ वर्षांपूर्वी मी कै. गं. भा. निरंतर यांच्या प्रेरणेने आणि कै. म. श्री. दीक्षित यांच्या पाठींब्यामुळे साहित्य परिषदेच्या परीक्षा दिल्या, त्याच साहित्य परिषदेमध्ये आपण सर्वांनी मला अध्यक्षपदी नियुक्त केले याची कृतज्ञतेने मला आज आठवण येत आहे. मराठी हा माझा आवडता विषय असल्यामुळे मी तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषदेला दैवत मानत आलेलो आहे. 

(साप्ताहिक 'चपराक', ५ ऑक्टोबर २०१५)


Saturday, October 3, 2015

वादळी जीवनाची कहाणी!

प्रकाशक : चपराक प्रकाशन, पुणे
पृष्ठे 160, मूल्य 175 रुपये
संपर्क 020-24460909/7057292092
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विविधांगी आणि विविधरंगी जीवनपट उलगडून दाखविणारा बाळासाहेब एक अंगार हा एक आगळावेगळा चरित्रग्रंथ साहित्यिक नागेश शेवाळकर यांनी नुकताच वाचकांसाठी आणला आहे. कादंबरी, ललितलेखन, नाट्य, कथालेखन आणि चरित्रलेखन इत्यादी साहित्यप्रकार सारख्याच ताकदीने हाताळणारे नागेश शेवाळकर यांनी सिद्ध केलेला बाळासाहेब एक अंगार हा तिसरा चरित्रग्रंथ. या आधी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि नामवंत साहित्यिक तथा फर्डे वक्ते आदरणीय राम शेवाळकर यांच्यावरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
चरित्रलेखन करताना लेखकाला बरीच पथ्ये पाळावी लागतात. तसेच काही नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. विशेषत: एखाद्या महान व्यक्तिसंबंधी लिहताना तर खूपच जागरूक राहावे लागते. शब्दांचा वापर करताना जसे तारतम्य बाळगावे लागते तसेच संदर्भग्रंथातील मते, घटना आपल्या पुस्तकात समाविष्ट करताना मूळ ग्रंथातला आशय न बदलता तो विषय स्वत:च्या शब्दांमध्ये मांडण्याची कसरत लेखकाला करावी लागते. त्यासाठी तशी हातोटी लेखकापाशी असावी लागते. या सर्व गोष्टींचे भान नागेश शेवाळकर यांनी पुरेपूर बाळगलेले आहे, याची प्रचिती वाचकास हे पुस्तक वाचल्यानंतर येते. इतकेच नव्हे तर लेखक या सर्व बाबतीमध्ये सजग असल्याचे वाचकास सुरुवातीलाच लेखकाचे मनोगत-ज्याला त्यांनी ’अक्षरांजली’ असा समर्पक शब्द योजला आहे-वाचताना कळते.
बाळासाहेबांसारख्या अष्टपैलू आणि हिमालयाइतक्या उंचीच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणे म्हणजे कुणासाठीही शिवधनुष्य पेलण्याइतके अवघड काम आहे. पण शेवाळकरांनी अत्यंत साध्या, सोप्या आणि ओघवत्या शैलीमध्ये लिहिलेले हे चरित्र वाचकाला खिळवून ठेवते हे मात्र नक्की.
समीर नेर्लेकर यांनी या चरित्रग्रंथाच्या विषयाला साजेसे असे सुंदर आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ रेखाटलेले आहे. तसेच पुस्तकाच्या मलपृष्ठावर सुप्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक महेश मांगले यांनी यथोचित भाष्य केलेले आहे. पुस्तकाचे बाह्यरंग जेवढे आकर्षक आहेत तेवढेच अंतरंगदेखील शेवाळकरांच्या लेखनशैलीमुळे वाचनीय आणि मननीय झाले आहे. लेखकाने या पुस्तकाची सुरुवात ठाकरे घराण्याच्या इतिहासापासून केलेली असून शेवट बाळासाहेबांच्या ’विचार संजीवनीने’ केला आहे. बाळासाहेबांची ही विचार संजीवनी तर नुसती प्रेरणादायी आहे असे नव्हे तर निडरपणे कसे जगावे याचा आपणा सर्वांना दिलेला तो कानमंत्रच आहे.
ठाकरे घराणे म्हणजे उच्च प्रतीचे देशप्रेम, समाजसेवा, निरपेक्ष भावना, त्यागवृत्ती, निर्भयता, धाडस, कणखरपणा, प्रामाणिकता इत्यादी भावनांनी ओतप्रोत असलेले घराणे आहे याची वाचकास सुरुवातीलाच ओळख होते. लेखकाने मनोगतामध्ये म्हटल्याप्रमाणे, बाळासाहेब त्यांच्या पिताश्रीसाठी बाळ होते, आईसाहेबांचा जीव तर मॉंसाहेबांचे सर्वस्व होते. ते कुटुंबाचे भाग्यविधाते, मुंबईकरांचे देवदूत, मित्रांचे मित्र तर लबाड विरोधकांचे कर्दनकाळ आणि शिवसैनिकांचे दैवत होते. इतके सारे असूनही ते गर्दीतले नेते होते आणि म्हणूनच माणूस, नव्हे देवमाणूसच होते. लोकांनी त्यांना प्रेमापोटी किती उपाध्या दिल्या याची तर गणतीही होणार नाही. हिंदुहृदयसम्राट, लोकनेता, महानायक, सेनापती, रेषाप्रभू, ढाण्या वाघ, शिवसेनाप्रमुख, सरसेनापती, युगपुरुष, युगप्रवर्तक, श्रीमंत योगी, दैवी पुरुष, क्रांतिकारक, कट्टर राष्ट्रभक्त या आणि अशा अनेक उपाध्या त्यांना लोकांनी दिल्या होत्या. पण ते वारंवार सांगत की, मी सर्वात आधी एक शिवसैनिक आहे.
बाळासाहेबांचे पिताश्री केशवराव ठाकरे उपाख्य दादासाहेब यांनी सामाजिक बांधिलकी, समाज सुधारणा याविषयीचे स्वत:चे विचार मांडून समाजाचे प्रबोधन करता यावे यासाठी ’प्रबोधन’ नावाचे पाक्षिक सुरू केले. हे पाक्षिक, त्यातील सडेतोड विचार आणि अपार देशप्रेम यामुळे कमालीचे लोकप्रिय झाले. तेव्हापासून केशवराव ठाकरे हे ’प्रबोधनकार’ या नावाने सर्वांना परिचित झाले.
कणखरपणा, बाणेदारपणा आणि सडेतोड वृत्ती ही बाळासाहेबांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेली देणगी होती. प्रबोधनकारांनी स्वत:चे विचार बाळासाहेबांवर कधीच लादले नाहीत. बाळासाहेबांनी संगीतात रुची दाखवावी असे त्यांना वाटत असताना बाळासाहेबांचा व्यंग्यचित्रांकडे असलेला कल बघून त्यांनी बाळासाहेबांना व्यंग्यचित्रांसाठी प्रोत्साहन दिले. या सर्व गोष्टी लेखकाने अगदी सविस्तर या पुस्तकामध्ये वर्णिल्या आहेत.
‘मार्मिक’ या व्यंग्यचित्र साप्ताहिकाची सुरुवात असो की शिवसेनेच्या जन्माची गोष्ट असो, बाळासाहेबांचे वडील खंबीरपणे त्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहिले. मार्मिकच्या माध्यमातून मराठी माणसाला जागे करण्याचे फार मोठे काम बाळासाहेबांनी केले. मार्मिक आणि बाळासाहेब यांच्या नेतृत्त्वाखाली प्रचंड प्रमाणात एकत्र येणार्‍या तरुणांचे संघटन करण्याची योजना प्रबोधनकारांच्या मनात कशी आकार घेऊ लागली आणि त्यातूनच पुढे शिवसेनेचा जन्म कसा झाला याचे अत्यंत सुंदर वर्णन आपणास या पुस्तकामध्ये वाचायला मिळते.
पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये बाळासाहेबांनी नुसते महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले  नाही तर शिवसेनेला दिल्लीच्या तख्तापर्यंत पोचविले. त्यांचा हा सर्व प्रवास, तसेच दैनिक सामना हे वृत्तपत्र सुरू केल्यानंतर त्या वृत्तपत्राच्या अग्रलेखांमधून व्यक्त होणारे त्यांचे ज्वलंत आणि परखड विचार या सार्‍यांचा परामर्श लेखकाने अत्यंत सविस्तरपणे या पुस्तकामध्ये घेतला आहे.
बाळासाहेबांच्या राजकीय तसेच खासगी जीवनातील अनेक चढउतार या पुस्तकात वाचायला मिळतात. सार्वजनिक जीवनामध्ये वाघाचे काळीज घेऊन वावरणारे बाळासाहेब, मॉंसाहेबांच्या अंतिम श्वासाच्या वेळी किती हतबल, किती अगतिक आणि किती हळवे झाले हे वाचताना आपले डोळे पाणावल्याशिवाय राहात नाहीत आणि शेवटी बाळासाहेबांचे जाणे. ते तर आपल्या मनाला चटका लावून जाते. पण त्यांच्या जाण्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना कशी जोरदारपणे मराठी माणसाच्या आणि हिंदुंच्या हितासाठी जात आहेच याचेही छान वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते.
एकूणच, हे पुस्तक म्हणजे नुसते बाळासाहेबांचे चरित्र नसून त्यांच्या वादळी जीवनावरील एक चांगला संदर्भ ग्रंथ ठरावा.

(मासिक साहित्य चपराक, ऑक्टोबर २०१५)
- उद्धव भयवाळ
19, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी
गादिया विहार रोड, शहानूरवाडी संभाजीनगर
मोबाईल: 88889 25488

Friday, October 2, 2015

अशी माणसं! असे ऋणानुबंध!!

डावीकडून तुषार उथळे पाटील, कवी माधव गिर, 'चपराक'चे संपादक घनश्याम पाटील, सुप्रसिद्ध लेखक सदानंद भणगे, महादेव कोरे, महेश मांगले आणि डॉ. देवदत्त केतकर.
हात उंचच उंच करून मुंग्या आणायला मला फार आवडतं
आणि मग आपल्याच शरीरापासून दूर झालेला
आपलाच हात पाहून फार गंमत वाटते
अगदी सेन्सेशनलेस
असं डोक्याचं असतं तर फार बरं झालं असतं
फार वर काढलं असतं मी डोकं
आपल्या समाजात दारू न पिता
डोक्यात मुंग्या आणता आल्या असत्या ना
तर जग पोखरून काढण्याची ताकत आहे आमच्यात


त्या साठीतल्या जिंदादिल कवीनं या काव्यपंक्ती म्हटल्या व आम्हीही दाद देऊन मोकळे झालो. त्या कवीचं नाव सदानंद भणगे. खरंतर कवितांची त्याची ती खूप जूनी डायरी. त्याचं ते वयच कॉलेजमधलं. मग या डायरीत त्याच काळात तो कविता लिहू लागला. सुंदर कविता लिहून काढल्या. मग एका टप्प्यावर कविता थांबल्या. बँक ऑफ महाराष्ट्रमधली नोकरी व इतर गद्य व नाट्यलेखन. त्यामुळं कवितांच्या जगात पुन्हा जाता आलं नाही त्याला. मग ती डायरी? ती मात्र त्यानं जपून ठेवली. अगदी तळहाताच्या फोडासारखी. खूप काळानंतर त्यानं ती हातात घेतली परवा. मग आम्हीही उत्सुकतेनं ऐकत राहिलो व तोही ऐकवत राहिला. सौ. क्षमा भणगे होत्याच तिथं. त्यांच्या डोळ्यात अश्रू व आमच्याही मनात कालवाकालव. त्या दोघांना पहिल्यांदा पाहताक्षणी एकच वाटलं, साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा!! दुसरी उपमाच नाही. काकू शिक्षिका. नगरच्याच एका शाळेत. तरूण वयात कितीतरी देखणे दिसत असतील दोघंही. मात्र मुद्दा फक्त दिसण्याचा नसतोच. सौंदर्य दिखाऊसुद्धा असू शकतं. या दोघांचं तसं नाही. दोघांची मनं त्याहून सुंदर! लहान मुलासारखे निष्पाप दोघंही! मनाचा मोठेपणाही खूप! दोघं राहतात नगरला. थोडासा शहराबाहेर त्यांचा सुंदर बंगला!! बंगल्याचं नाव काय ठेवलंय दोघांनी? कल्पना करता येईल? ‘पसायदान’! ‘नाव सोनुबाई व हाती कथलाचा वाळा’ असला प्रकार नाही तो. त्या दोघांच्या स्वभावातच ‘पसायदान’ आहे. ते अगदी क्षणोक्षणी जाणवत राहतं. ‘‘भणगे सरांकडं जायचंय नगरला. खूप दिवसांपासून बोलवताहेत ते’’ घनश्याम पाटील कधीतरी म्हटल्याचं आठवतं. त्यादिवशी सकाळी निघालो तेव्हा खास भणगे सरांकडेच निघालो आहे याची मला कल्पना नव्हती. पाटील एखाद्या कवीसंमेलनाला घेऊन जात आहेत, असंच वाटत होतं. त्यावेळी लक्षात आलं नाही, पसायदानचा खरा अर्थच समजून घेण्यासाठी आपण जात आहोत. नगरमधलं महाराजा हॉटेल. मुख्य हमरस्त्यावरचं. तिथून डाव्याबाजूला आत कारनं वळण घेतलं आमच्या. दोन्ही बाजूला छोटेमोठे सुंदर बंगले. उजव्या बाजूला ‘पसायदान’ ही अक्षरे शोधत होतो. एक-दोन चौक ओलांडले. मग ती अक्षरे दिसली. मनातच म्हटलं, घरातली माणसं कशी असतील?

घनश्याम पाटील यांचा सत्कार करताना श्री. सदानंद भणगे आणि डॉ. देवदत्त केतकर. सोबत सौ. क्षमा सदानंद भणगे.
मात्र काही माणसं भेटताक्षणीच अंदाज येतो. स्वभावाचा अंदाज! तर त्या दिवशी गाडी ‘पसायदान’पुढे उभी राहिली व त्या सुंदर, टुमदार बंगल्याचं फाटक ओलांडून आत गेलो. समोरच सदानंद भणगे उभे. चेहर्‍यावर प्रसन्नता व आनंद! आम्ही त्यांच्या घरी आल्याचा आनंद! त्यांनी प्रेमभरानं हातात हात घेतला व जाणवलंच, माणूस अतिशय प्रेमळ आहे. हॉलमध्ये स्थानापन्न झालो. ‘‘अगदी निवांत बसा. आपलंच घर आहे’’ भणगे सर म्हणाले. त्या दिवशी सरांनी खरं तर लवकर यायला सांगितलं होतं. काकूंनी तर नाश्ता करून ठेवला होता आमच्यासाठी; मात्र आम्ही पोहचेपर्यंत दुपारचे साधारण साडेबारा वाजले असावेत. मग सर सांगत राहिले. सकाळपासूनच तुमची वाट पाहतोय म्हणून. अचानक टेबलवर लक्ष गेलं तर ‘शककर्ते शिवराय’चा पहिला खंड. नागपूरच्या विजय देशमुखांनी लिहिलेला. त्यावरून चर्चा सुरू झाली. लगेच जाणवलं, सदानंद भणगे हा माणूस अत्यंत निष्कपट, निरागस आहे. आतल्या गाठीच्या वृत्तीचा साधा अंशही नाही. काकूसुद्धा अगदी तंतोतंत तशाच. सुईच्या टोकाएवढीही बेरकी, कावेबाज वृत्ती नाही. गप्पा सुरू झाल्या. तेवढ्यात काकू स्वयंपाकघराकडे वळल्यासुद्धा. दहाव्या मिनिटाला गरमागरम उपीटाच्या डीश समोर हजर. सोबत ढोकळा, गुलाबजाम! नंतर चहा! मनसोक्त गप्पा व पाठोपाठ घरातच भरलेलं कवीसंमेलन! महादेव कोरे, माधव गिर व सरांचं काव्यवाचन!  

नगरला जायचंय म्हणून मी आदल्या दिवशी डॉ. देवदत्त केतकरांनाही फोन केलेला. आता हे केतकर कोण? तर हा माणूस मराठी साहित्यातला एक उत्कृष्ट भाषांतरकार! पेशानं डॉक्टर; मात्र साहित्यात रमणारा स्वभाव. त्यांनी ‘शूट टू किल’ या पुस्तकाचं भाषांतर केलं. केवळ सुरेख भाषांतर! ‘चपराक’साठी त्याचं परीक्षण मी लिहिलं. आयर्लंडमध्ये घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारीत पुस्तक होतं ते. नंतर त्यांना एकदा फोनही केला होता. भणगे सरांशी बोलताना केतकरांचा उल्लेख केला, तर केतकर हे सरांचे मित्रच निघाले. अगदीच चांगले मित्र! एकाच शाळेत होते दोघंही. इतकी जुनी मैत्री! मात्र मधल्या काळात फारसा संपर्क नव्हता दोघांचा. भणगे सरांच्याइथून पुन्हा केतकरांना फोन केला. पंधराव्या मिनिटाला ते ‘पसायदान’मध्ये हजर! मग काव्यशास्त्रविनोदाची मैफलच जमली. बोलताना समजलं, केतकरांनी बरीच भाषांतरं केली आहेत. मग आम्ही मराठीतल्या काही उत्कृष्ट भाषांतराबद्दल बोललो. अपर्णा वेलणकरांच्या ‘शांताराम’पासून ते दोस्तोयवस्कीच्या विश्राम गुप्त्यांनी भाषांतर केलेल्या ‘हाऊस ऑफ डेड’पर्यंत. केतकर भेटतील असं जणू मला आतून कुठंतरी वाटत होतं. मी एक इंग्रजी ग्रंथ सोबत नेला होता त्यांना दाखवायला. सोव्हिएत युनियनचा हुकुमशहा जोसेफ स्टॅलिन. त्याचं हे चरित्र. लेखक एडवर्ड रॅडझिन्स्की. हा सगळा रशियाचाच इतिहास. प्रचंड उलथापालथींचा!! ‘‘अशा पुस्तकांची भाषांतरं आपल्याकडे होत नाहीत’’ केतकरांना पुस्तक दाखवत मी म्हणालो. त्याच्या भाषांतराबद्दल मग त्यांनीही उत्सुकता दाखविली. सध्या ‘मेहता प्रकाशन’साठी केतकर भाषांतरं करतात. मेहतांनी काही उत्तम ग्रंथांची भाषांतरं प्रकाशित केली आहेत; मात्र इंग्रजीतून मराठीत आणण्यासारखं खूप काही आहे. अगदी विल्यम शिररच्या ‘द राईज ऍन्ड फॉल ऑफ थर्ड राईश’चे देखील आपल्याकडे अद्याप भाषांतर झालेलं नाही. तीच तर्‍हा अल्बर्ट स्पिअरच्या ‘इन साईड द थर्ड राईश’ची. हे दोन्ही ग्रंथ हिटलरचं समग्र चरित्रच सांगणारे. जर्मनीचा तो महत्त्वाचा काळ सगळा. त्यात प्रचंड जागतिक राजकारणसुद्धा! शिवाय दुसर्‍या महायुद्धातल्या असंख्य घटना! नाझीझम किंवा फॅसिझम कसा असतो त्याची ही कहानी! हे सगळं मराठी वाचकांनी कधी वाचायचं? ते उत्कृष्ट मराठीत आलं तर ना? आपल्याकडे मात्र आजही भाषांतरकाराला लेखकासारखी लोकप्रियता मिळत नाही. त्यांचं महत्त्व लक्षात घेतलं जात नाही. स्वत: भाषांतराकारांनाही तसंच वाटतं. खरं म्हणजे चांगला भाषांतरकार हा चांगला लेखक असतोच. नाहीतर भाषांतराची वाट लागते.
तर त्यादिवशी या विषयावर आम्ही बोलत राहिलो. मग भणगे सर उठले व त्यांची कवितांची डायरी घेऊन आले. कविता वाचू लागले. सहज वहीत डोकावून पाहिलं तर मोत्यासारखं अक्षर! अत्यंत शिस्तबद्ध लेखन! ‘‘बरं, जेवणाचं कसं करायचं? बाहेर हॉटेलमध्ये जायचं का?’’ सरांनी नंतर विचारलं. हॉटेलमध्ये जाण्याचा कुणाचाच मूड नव्हता. काकूंच्या ते लक्षात आलं व त्या पुन्हा किचनकडे वळल्या. तासाभरात छान जेवण तयार! त्याआधी सरांनी त्यांचा सगळा बंगला दाखवला. केवढा मोकळेपणा हा वागण्यातला!! घरसुद्धा इतकं सुंदर की, कुणालाही हेवा वाटावा! कसलाही भपका नाही! श्रीमंतीचं प्रदर्शन नाही. नीटनेटकेपणा व स्वच्छता! कुठंही धुळीचा साधा कण नाही! फर्निचरचा फाजिल अट्टाहास? तो तर मुळीच नाही. घरात ग्रंथांना आवर्जून जागा! अगदी हॉल व बेडरूममध्येही पुस्तकांना महत्त्वाचं स्थान! नंतर किचनमध्ये डायनिंग टेबलवर आम्ही जेवायला बसलो व काकू गरमागरम पोळ्या वाढत राहिल्या. त्या दिवशीच्या त्यांच्या हातच्या खिचडी भाताची चव तर ‘अमृतातेही पैजा जिंके’ अशी! सरांची मुलगी पुण्यात. तिचं लग्न झालेलं. मुलगा अधूनमधून परदेशात. सरांना मात्र इतक्याच भौतिक गोष्टी महत्त्वाच्या नाही वाटत. त्यांना  माणसं प्रिय! जेवताना किचनमधल्या देवघराकडे लक्ष गेलं. प्रसन्न देवघर. तुपाची वात अखंड जळत असलेलं. तो देवही या कुटुंबावर आभाळागत माया करणारा व हे कुटुंब त्याचं ऋण मानणारं!! जिथं देवघर व ग्रंथ नाहीत ते घर काय घर असतं का? मनात विचार आला. जेवण करून पुन्हा गप्पा मारत बसलो व काकूंनी पुन्हा चहा ठेवलासुद्धा. शिवाय दोघं आग्रह करत राहिले. आजचा दिवस रहा म्हणून. खरंतर त्या घरातून पाय निघत नव्हता आमचा; मात्र घनश्याम पाटलांपुढे कामाचे डोंगर वाढून ठेवलेले. दिवाळी अंकाची तयारी, पुढच्या साप्ताहिक व मासिकाची छपाई. कामाचे असे अखंड व्याप. मग दोघांचे चरणस्पर्श करत आम्ही निरोप घेतला. दोघं निरोप देण्यासाठी बाहेर आले. भारावलेल्या मनानं आम्हाला निरोप दिला. महादेव कोरेंनी पुण्याच्या दिशेनं कार वळवली व आमच्या मनात व नजरेपुढं तिच अक्षरं उमटत राहिली ‘पसायदान’!
नगरहून पुण्यात आलो. घनश्याम पाटील दिवाळी अंकासाठी धावपळ करू लागले. मी काही महत्त्वाची ग्रंथपरीक्षणं लिहिण्याच्या मागं. बेळगाव दौरादेखील झाला मधे आमचा. त्यावर लेखही लिहायचा होता. दुसरीकडं सगळ्या राज्यात दुष्काळानं हाहाकार माजलेला! नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे. ही दोन माणसं! फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावत होती ती! सरकारही सरकारचं काम करत होतं; मात्र तसंही प्रत्येक वाईट गोष्टीचं खापर आपण राजकारण्यांवर फोडतो. त्यात काही अर्थ नसतो. नागरिक म्हणून आपली जबाबदारी सर्वात महत्त्वाची. महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी. त्यातली पाच पंचवीस लाख माणसं एकत्र आली तरी मोठा निधी उभा राहू शकतो. खारीचा वाटा महत्त्वाचा असतो अशावेळी  प्रत्येकाचा. अशातच संगमनेरच्या पत्रकारांनी ठरवलं, वीस हजार रूपयांचा निधी नाना पाटेकरांकडे सोपवायचा. त्यांनी त्यानिमित्त घनश्याम पाटलांचं व्याख्यान ठेवलं. ‘दुष्काळाच्या झळा व पत्रकारिता’ या विषयावर.
दि. 20 सप्टेंबर. सकाळी साडेनऊची वेळ. महादेव कोरेंची कार अप्पा बळवंत चौकात येऊन थांबली. लगबगीनं मी त्यांना तिथं गाठलं. मोरेश्‍वर ब्रह्मे काका, तुषार उथळे पाटील हेदेखील घनश्याम पाटलांबरोबर होतेच. आमची कार संगमनेरमध्ये पोहचली तेव्हा दुपारचा एक वाजला असावा. त्याच्याआधी नारायणगाव लागलं. तिथल्या एका साध्या पण प्रसिद्ध हॉटेलसमोर पाटलांनी गाडी थांबवली. तिथं पाटलांनी ‘कढीवडा’ खाऊ घातला. कढी व त्यात ताजा चविष्ट बटाटा वडा! इतकी अप्रतिम चव की विचारता सोय नाही! नंतर अप्रतिम चहा!! पाटलांना पुण्यातल्या एकूणएक खाऊगल्ल्या ठाऊक! मात्र इतर शहरातलीही दर्जेदार हॉटेलं तोंडपाठ! माझ्या आयुष्यात एक मित्र आला होता पूर्वी. धनंजय शिंदे. अगदी तोंडातला घास काढून देणारा मित्र! खिशातले असेल नसेल तेवढे सगळे पैसे काढेल व मित्रांना खाऊपिऊ घालेल. पाटीलही तसेच.
तर संगमनेरमध्ये पोहोचलो व दै. ‘सामना’चे राजाभाऊ वराट तिथं भेटले. तिथलं सरकारी विश्रामगृह. तिथं राजाभाऊंनी रूम बूक केलेली. तिथं जाऊन टेकलो. संगमनेरमधली पत्रकार मंडळी प्रचंड उत्साही! मुख्य म्हणजे सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारी. राजाभाऊ वराट अतिशय अभ्यासू माणूस! मग भरभरून बोलत राहिले ते. नगर जिल्ह्यातल्या राजकारणाबद्दल, तिथल्या पाणीप्रश्‍नाबद्दल. मग तिथं श्याम तिवारी आले. ते राजाभाऊंचे जवळचे मित्र व सहकारी. ‘सकाळ’चे नंदकुमार सुर्वे आणि ‘पुण्यनगरी’चे वसंत बंदावणेदेखील आले तेवढ्यात. बोलता बोलता वैभव पिचडांचा विषय निघाला. वैभव पिचड अकोल्याचे आमदार. अकोला संगमनेरपासून अवघ्या वीसएक किलोमिटर अंतरावर. पिचडांचा विषय निघाला व मी चमकलो. कारण काय? तर वैभव माझा वर्गमित्र. नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमधला. पाचवी ते आठवी अशी चार वर्षे एकत्र होतो आम्ही. एकाच वर्गात. हॉस्टेलमध्येही एकत्र. आता त्याची माझी काही जिगरी मैत्री वगैरे नव्हती तेव्हा; मात्र कसलाही दुस्वास वा हेवादावाही नव्हता आम्हा दोघात त्या शाळकरी वयात. वैभव माझ्या आठवणीत का राहिला? आमचं मिलिटरी स्कूल. कडक शिस्त. जरा काही झालं की शिक्षक सडकून काढायचे. वैभवनेही शिक्षकांचा मार खाल्ला त्या काळात; मात्र त्याचं एक वैशिष्ट्य होतं. मधुकरराव पिचड हे त्याचे वडील. ते अगदी आमदार व मंत्रीही असावेत त्या काळात! मात्र वैभवने कधीही त्यांच्याकडे शिक्षकांची तक्रार केली नाही किंवा शाळा सोडली नाही. मधुकर पिचडांनीही या गोष्टीचा बाऊ केला नाही. एकदा तर ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते शाळेत तेव्हा. असो.काही पत्रकार मंडळी भेटायला येत होती सरकारी विश्रामगृहात. त्यात दैनिक सकाळचे श्री. नंदकुमार सुर्वे होते. थोड्याच वेळात तिथे मुरारीभाऊ देशपांडे आले. ते संगमनेरमधील प्रसिद्ध कवी. त्यांच्या कविता ‘चपराक’मधून सतत प्रसिद्ध होतात. पाटलांना त्यांनी पाहिलं व खूप आनंदले. ‘चपराक’नं त्यांना ओळख दिली ही त्यांची भावना. ती कृतज्ञता होती. घडाघडा बोलत राहिले ते. त्यांच्या कविता ‘चपराक’मधून यायचा अवकाश, त्यांना महाराष्ट्रभरातून फोन येतात. क्वचित महाराष्ट्राबाहेरूनही येतात. अगदी इंदौर, बडोदा व हैद्राबाद येथूनसुद्धा. मुळातच अतिशय ताकतीचा हा कवी; मात्र ‘चपराक’नं पुढे आणेपर्यंत तो अंधारातच होता. त्यांची बहिणही उत्कृष्ट कविता करते. मुरारीभाऊंनीच हे सांगितलं; मात्र तिच्या कवितांकडेही अद्याप कुणाचं लक्ष नाही.

संगमनेर पत्रकार मंचने आयोजित केलेल्या 'दुष्काळाच्या झळा आणि पत्रकारिता' या विषयावर व्याख्यान देताना 'चपराक'चे संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील.

सायंकाळी पाचची वेळ. रेस्टहाऊसमधून खाली आलो. जवळच्या टपरीवर चहा घेतला व कार्यक्रमाच्या नियोजित ठिकाणी गेलो. संगमनेर व्यापारी असोसिएशनची ही नवीन इमारत. संगमनेर रेस्टहाऊसपासून अगदी हाताच्या अंतरावर. ‘संगमनेर पत्रकार मंच’. कार्यक्रमाचे आयोजक होते ते. सुरूवातीला मुरारीभाऊ बोलले. ‘सव्यसाची संपादक’ असा त्यांनी घनश्याम पाटलांचा उल्लेख केला. ‘साहित्यातला अत्यंत दर्दी मनुष्य’ अशीही पावती त्यांनी पाटलांना दिली. ‘‘साहित्याची आवड माणसाला स्वस्थ बसू देत नाही व ‘चपराक’ची टीम साहित्याला वाहिलेली टीम आहे’’ मुरारीभाऊ म्हणाले. ‘‘चुका होणं हे मानवी आहे. पन्नास पन्नास वर्षे पत्रकारितेत घालवलेल्या माणसांनाही अनेक विषय नव्यानं समजून घ्यावे लागतात’’ मुरारीभाऊ पुढे म्हणाले. ‘‘संगमनेरला अनंत फंदी या शाहिराचा वारसा लाभला आहे. हे सांस्कृतिक शहर आहे व इथं सर्वधर्मसमभाव जपला जातो’’ त्यांनी संगमनेरची अशी ओळख करून दिली. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रकाश टाकळकर व श्री. प्रकाश कलंत्रीही होते. कलंत्री हे संगमनेर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष . तरूण पोरगा. उमद्या मनाचा. चांगले विचार मांडणारा. त्यांनीच संगमनेर मर्चंटस् को-ऑप. बँकेचं हे सभागृह कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलेलं. गौतम गायकवाड हे संगमनेरमधले आणखी एक पत्रकार. त्यांनी घनश्याम पाटलांची ओळख करून दिली. ‘‘पाटील हे महाराष्ट्रातले वयाने सर्वात लहान असलेले स्वतंत्र संपादक आहेत’’ ते म्हणाले. पाटलांनी दहावीत असतानाच पत्रकारिता सुरू केली होती. तेव्हा ते दै. ‘तरूण भारत’चे पत्रकार होते. गायकवाडांनी हे सांगितलं तेव्हा उपस्थितांची उत्सुकता वाढली. मग पाटील बोलले. विषय होता ‘दुष्काळाच्या झळा व पत्रकारिता’.
गेली पंधरा वर्षे सतत पत्रकारितेत वावरणारे पाटील. वय बत्तीस. त्यांना व्याख्यानासाठी सतत निमंत्रणं येतात. तीही महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून. पुण्यातल्या मोठमोठ्या शिक्षणसंस्था. त्याही त्यांना आदरानं बोलवतात. ‘‘अन्नधान्याच्या अभावी माणसं, जनावरं मरतात व संस्कारांअभावी मानवता मरते. संगमनेरच्या पत्रकारांनी ही मानवता मरू नये म्हणून छोटं का होईना पाऊल उचललं’’ पाटील म्हणाले. ‘‘मराठवाड्याला चार-चार मुख्यमंत्री मिळाले तरीही मराठवाड्यावर ही वेळ का आली?’’ पाटलांचा प्रश्‍न होता. ‘‘बिहारसाठी पंतप्रधानांनी सव्वाशे कोटींचं पॅकेज जाहीर केलं. मग विदर्भाचं काय? मराठवाड्याचं काय?’’ पाटलांचा पुढचा प्रश्‍न होता. ‘‘शेतकर्‍यांना आर्थिक मदत तात्पुरती मलमपट्टी आहे; मात्र सध्या ती गरजेची आहे’’ पाटील पुढं म्हणाले. ‘‘कर्जमाफी हाही तात्कालिक उपाय आहे. त्यापेक्षा दुष्काळी भागात रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे’’ पाटलांचं मत होतं. ‘‘दुष्काळावर मात करणार्‍या शेतकर्‍यांच्या बातम्याही समाजापुढं ठेवल्या पाहिजेत’’ पाटील म्हणाले. त्यांचं आणखी एक वाक्य तर फार महत्त्वाचं होतं ‘‘गरजेपेक्षा जास्त पाणी वापरणं हा राष्ट्रद्रोहाचाच गुन्हा ठरवला पाहिजे’’ ते म्हणाले. ‘‘नांगरणी, पेरणी, कोळपणी यासाठी शेतकर्‍याला थेट मदत केली पाहिजे’’ ते पुढं म्हणाले. ‘‘हुंडा घेण्याची प्रथा पूर्णपणे बंद केली पाहिजे’’ त्यांचा हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता. ‘‘मरण स्वस्त होणं व भाकरी महाग होणं हे चांगल्या लोकशाहीचं लक्षण नाही!’’ त्यांचं आणखी हे एक वाक्य. ते तर हादरवून टाकणारं होतं. शेतकर्‍यांच्या वारंवार होणार्‍या  आत्महत्या. त्या रोखायच्या कशा? त्यासाठी व्यवस्थेचीच नीट झाडाझडती व्हायला हवी असं पाटलांना सुचवायचं होतं.
यावेळी पाटलांनी ‘चपराक प्रकाशन’च्या वतीने दुष्काळनिधी म्हणून पाच हजार रूपये ताबडतोब जाहीर केले. ते तिथल्या तिथं राजाभाऊ वराटांकडे सोपवलेसुद्धा. घनश्याम पाटील मराठवाड्यातले. शेतकरी कुटुंबातले. शेती केलेले. शेतकर्‍यांच्या वाट्याला आलेली सगळी दु:खं भोगलेले.
कार्यक्रमस्थळाहून पुन्हा रेस्टहाऊसवर आलो. आयोजकांनी मांसाहारी जेवणाचा बेत केला होता. पाटलांना हे समजलं. ‘‘मी दुष्काळावर व्याख्यान द्यायला आलो आहे. अशावेळी मांसाहारी जेवणाची मेजवाणी झोडणं बरोबर नाही’’ पाटलांनी आयोजकांना स्वच्छ सांगितलं. ‘‘साधी पोळी भाजी चालेल. नपेक्षा तसंच परत गेलेलं बरं’’ पाटील म्हणाले तेव्हा सगळेच थक्क झाले. संगमनेरच्या पत्रकारांच्या भावना. त्या आम्ही समजू शकत होतो. त्यांचं प्रेम. ते आम्ही समजू शकत होतो; मात्र पाटलांच्या मते जे औचित्याला धरून नाही ते कधीच करायचं नाही. मग रेस्टहाऊसवर साधं का होईना जेवण आम्ही घेतलं. जेवण छान होतं व सगळ्याच पत्रकार बंधूंनी तिथं अगत्यानं काय हवं नको ते पाहिलंसुद्धा. गोरक्ष नेहे, स्थानिक चॅनलच्या एक पत्रकार निलिमा घाटगे, प्रशांत शर्मा, मनोज गाडेकर, रियाज सय्यद, रवी महाले, प्रकाश आरोटे, नगरसेवक कैलास वाकचौरे, शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी, अमोल वैद्य, शेखर पानसरे, उल्हास पाटील, सुशांत सातपुते, विकास वाव्हळ, अंकुश बुब, गंगाधर शिंदे ही सगळी मंडळी. सगळेच धडपडत होते या  कार्यक्रमाच्या नियोजनासाठी. रात्री जेवणाच्या वेळी यातले बरेचजण रेस्टहाऊसवरसुद्धा जातीनं हजर होते. निघताना सगळे गाडीजवळ जमले. माणसांमधली आपुलकी. ती लगेचच जाणवते. एका क्षणात जाणवते. त्याला वेळ लागत नाही. पत्रकार बांधवात दै. ‘लोकमत’चे रियाज सय्यदही होते. निघण्यापूर्वी आम्ही एकमेकांना प्रेमभरानं मिठीच मारली. रियाज सय्यद हा माणूसच अतिशय प्रेमळ व सज्जन! ‘‘पुढच्या वेळी भंडारदर्‍याला जाऊ. तिथं मुक्काम करू. त्यासाठी मुक्कामाच्या तयारीनंच या’’ राजाभाऊ वराट पुन्हा पुन्हा हेच सांगत होते. हा माणूसही खूपच प्रांजळ. शेवटी वराटांनी बळेबळे दोन हजार रूपये पाटलांच्या हातात ठेवले. ‘‘पेट्रोलसाठी असू दे. खर्च थोडे असतात का तुमचे?’’ ते म्हणाले.
गाडीनं पुण्याचा रस्ता धरला. डोक्यात एकाच गोष्टीनं तुफान माजलेलं. पाटलांनी मांसाहारी जेवण नाकारलं? मी केलं असतं हे? नसतं केलं! अगदी दोनशे टक्के नसतं केलं. मुळात सुचलंच नसतं असलं काही. बुद्धीच चालेना. ‘‘दादा, तू पाच हजार रूपये खिशातून काढून दिलेस. त्याबद्दल आम्हाला एका शब्दानं बोलला नाहीस. एका विशिष्ट गंभीर प्रसंगासाठी आलोय म्हणून ‘नॉनव्हेज’ खायचं नाकारलंस. या गोष्टींसाठी माझा तुला खरोखर सलाम आहे!’’ मी पाटलांना म्हणालो. यावर काहीशा संकोचाने पाटील हसले फक्त. ‘‘सर, आपल्याला महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात जायचंय’’ त्यांनी एवढीच प्रतिक्रिया दिली. विचार करत राहिलो मी.
या जगात सर्वश्रेष्ठ गोष्ट कुठली? ‘माणसांचे माणसांशी असलेले ऋणानुबंध’ याइतकी श्रेष्ठ गोष्ट या जगात दुसरी कुठलीही असू शकत नाही हेच खरं!

-महेश मांगले 
संपर्क: ९८२२०७०७८५
हे आमच्याकडे पहिल्यांदाच घडले....!
पाहुणा बोलावून एखादा कार्यक्रम करणे फारच खर्चिक झाले आहे... पाहुण्याची बडदास्त ठेवणे हाच एक कार्यक्रम होऊन बसतो... पाहुण्यांची येण्याजाण्याची व्यवस्था, दिवसभराची शाही बडदास्त आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांचे मान आणि धन यातच आयोजकांची धावपळ होते...
दुष्काळनिधी व पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील यांना बोलावले. आम्हीसुद्धा वरील प्रमाणेच तयारीत होतो... पण पाटील यांनी कोणताही बडेजाव दाखवला नाही.. खास ठेप नाही... आणि ऊलट आम्हालाच त्यांनी दुष्काळ निधीसाठी पाच हजार रूपये रोख दिले..
काय बोलणार...? काय प्रतिक्रिया देणार...?
फक्त एवढंच सांगेन, ‘‘हे आमच्याकडे पहिल्यांदाच घडले...’’

- राजा वराट
पत्रकार, दै. ‘सामना’