Saturday, October 3, 2015

वादळी जीवनाची कहाणी!

प्रकाशक : चपराक प्रकाशन, पुणे
पृष्ठे 160, मूल्य 175 रुपये
संपर्क 020-24460909/7057292092
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विविधांगी आणि विविधरंगी जीवनपट उलगडून दाखविणारा बाळासाहेब एक अंगार हा एक आगळावेगळा चरित्रग्रंथ साहित्यिक नागेश शेवाळकर यांनी नुकताच वाचकांसाठी आणला आहे. कादंबरी, ललितलेखन, नाट्य, कथालेखन आणि चरित्रलेखन इत्यादी साहित्यप्रकार सारख्याच ताकदीने हाताळणारे नागेश शेवाळकर यांनी सिद्ध केलेला बाळासाहेब एक अंगार हा तिसरा चरित्रग्रंथ. या आधी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि नामवंत साहित्यिक तथा फर्डे वक्ते आदरणीय राम शेवाळकर यांच्यावरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
चरित्रलेखन करताना लेखकाला बरीच पथ्ये पाळावी लागतात. तसेच काही नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. विशेषत: एखाद्या महान व्यक्तिसंबंधी लिहताना तर खूपच जागरूक राहावे लागते. शब्दांचा वापर करताना जसे तारतम्य बाळगावे लागते तसेच संदर्भग्रंथातील मते, घटना आपल्या पुस्तकात समाविष्ट करताना मूळ ग्रंथातला आशय न बदलता तो विषय स्वत:च्या शब्दांमध्ये मांडण्याची कसरत लेखकाला करावी लागते. त्यासाठी तशी हातोटी लेखकापाशी असावी लागते. या सर्व गोष्टींचे भान नागेश शेवाळकर यांनी पुरेपूर बाळगलेले आहे, याची प्रचिती वाचकास हे पुस्तक वाचल्यानंतर येते. इतकेच नव्हे तर लेखक या सर्व बाबतीमध्ये सजग असल्याचे वाचकास सुरुवातीलाच लेखकाचे मनोगत-ज्याला त्यांनी ’अक्षरांजली’ असा समर्पक शब्द योजला आहे-वाचताना कळते.
बाळासाहेबांसारख्या अष्टपैलू आणि हिमालयाइतक्या उंचीच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणे म्हणजे कुणासाठीही शिवधनुष्य पेलण्याइतके अवघड काम आहे. पण शेवाळकरांनी अत्यंत साध्या, सोप्या आणि ओघवत्या शैलीमध्ये लिहिलेले हे चरित्र वाचकाला खिळवून ठेवते हे मात्र नक्की.
समीर नेर्लेकर यांनी या चरित्रग्रंथाच्या विषयाला साजेसे असे सुंदर आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ रेखाटलेले आहे. तसेच पुस्तकाच्या मलपृष्ठावर सुप्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक महेश मांगले यांनी यथोचित भाष्य केलेले आहे. पुस्तकाचे बाह्यरंग जेवढे आकर्षक आहेत तेवढेच अंतरंगदेखील शेवाळकरांच्या लेखनशैलीमुळे वाचनीय आणि मननीय झाले आहे. लेखकाने या पुस्तकाची सुरुवात ठाकरे घराण्याच्या इतिहासापासून केलेली असून शेवट बाळासाहेबांच्या ’विचार संजीवनीने’ केला आहे. बाळासाहेबांची ही विचार संजीवनी तर नुसती प्रेरणादायी आहे असे नव्हे तर निडरपणे कसे जगावे याचा आपणा सर्वांना दिलेला तो कानमंत्रच आहे.
ठाकरे घराणे म्हणजे उच्च प्रतीचे देशप्रेम, समाजसेवा, निरपेक्ष भावना, त्यागवृत्ती, निर्भयता, धाडस, कणखरपणा, प्रामाणिकता इत्यादी भावनांनी ओतप्रोत असलेले घराणे आहे याची वाचकास सुरुवातीलाच ओळख होते. लेखकाने मनोगतामध्ये म्हटल्याप्रमाणे, बाळासाहेब त्यांच्या पिताश्रीसाठी बाळ होते, आईसाहेबांचा जीव तर मॉंसाहेबांचे सर्वस्व होते. ते कुटुंबाचे भाग्यविधाते, मुंबईकरांचे देवदूत, मित्रांचे मित्र तर लबाड विरोधकांचे कर्दनकाळ आणि शिवसैनिकांचे दैवत होते. इतके सारे असूनही ते गर्दीतले नेते होते आणि म्हणूनच माणूस, नव्हे देवमाणूसच होते. लोकांनी त्यांना प्रेमापोटी किती उपाध्या दिल्या याची तर गणतीही होणार नाही. हिंदुहृदयसम्राट, लोकनेता, महानायक, सेनापती, रेषाप्रभू, ढाण्या वाघ, शिवसेनाप्रमुख, सरसेनापती, युगपुरुष, युगप्रवर्तक, श्रीमंत योगी, दैवी पुरुष, क्रांतिकारक, कट्टर राष्ट्रभक्त या आणि अशा अनेक उपाध्या त्यांना लोकांनी दिल्या होत्या. पण ते वारंवार सांगत की, मी सर्वात आधी एक शिवसैनिक आहे.
बाळासाहेबांचे पिताश्री केशवराव ठाकरे उपाख्य दादासाहेब यांनी सामाजिक बांधिलकी, समाज सुधारणा याविषयीचे स्वत:चे विचार मांडून समाजाचे प्रबोधन करता यावे यासाठी ’प्रबोधन’ नावाचे पाक्षिक सुरू केले. हे पाक्षिक, त्यातील सडेतोड विचार आणि अपार देशप्रेम यामुळे कमालीचे लोकप्रिय झाले. तेव्हापासून केशवराव ठाकरे हे ’प्रबोधनकार’ या नावाने सर्वांना परिचित झाले.
कणखरपणा, बाणेदारपणा आणि सडेतोड वृत्ती ही बाळासाहेबांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेली देणगी होती. प्रबोधनकारांनी स्वत:चे विचार बाळासाहेबांवर कधीच लादले नाहीत. बाळासाहेबांनी संगीतात रुची दाखवावी असे त्यांना वाटत असताना बाळासाहेबांचा व्यंग्यचित्रांकडे असलेला कल बघून त्यांनी बाळासाहेबांना व्यंग्यचित्रांसाठी प्रोत्साहन दिले. या सर्व गोष्टी लेखकाने अगदी सविस्तर या पुस्तकामध्ये वर्णिल्या आहेत.
‘मार्मिक’ या व्यंग्यचित्र साप्ताहिकाची सुरुवात असो की शिवसेनेच्या जन्माची गोष्ट असो, बाळासाहेबांचे वडील खंबीरपणे त्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहिले. मार्मिकच्या माध्यमातून मराठी माणसाला जागे करण्याचे फार मोठे काम बाळासाहेबांनी केले. मार्मिक आणि बाळासाहेब यांच्या नेतृत्त्वाखाली प्रचंड प्रमाणात एकत्र येणार्‍या तरुणांचे संघटन करण्याची योजना प्रबोधनकारांच्या मनात कशी आकार घेऊ लागली आणि त्यातूनच पुढे शिवसेनेचा जन्म कसा झाला याचे अत्यंत सुंदर वर्णन आपणास या पुस्तकामध्ये वाचायला मिळते.
पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये बाळासाहेबांनी नुसते महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले  नाही तर शिवसेनेला दिल्लीच्या तख्तापर्यंत पोचविले. त्यांचा हा सर्व प्रवास, तसेच दैनिक सामना हे वृत्तपत्र सुरू केल्यानंतर त्या वृत्तपत्राच्या अग्रलेखांमधून व्यक्त होणारे त्यांचे ज्वलंत आणि परखड विचार या सार्‍यांचा परामर्श लेखकाने अत्यंत सविस्तरपणे या पुस्तकामध्ये घेतला आहे.
बाळासाहेबांच्या राजकीय तसेच खासगी जीवनातील अनेक चढउतार या पुस्तकात वाचायला मिळतात. सार्वजनिक जीवनामध्ये वाघाचे काळीज घेऊन वावरणारे बाळासाहेब, मॉंसाहेबांच्या अंतिम श्वासाच्या वेळी किती हतबल, किती अगतिक आणि किती हळवे झाले हे वाचताना आपले डोळे पाणावल्याशिवाय राहात नाहीत आणि शेवटी बाळासाहेबांचे जाणे. ते तर आपल्या मनाला चटका लावून जाते. पण त्यांच्या जाण्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना कशी जोरदारपणे मराठी माणसाच्या आणि हिंदुंच्या हितासाठी जात आहेच याचेही छान वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते.
एकूणच, हे पुस्तक म्हणजे नुसते बाळासाहेबांचे चरित्र नसून त्यांच्या वादळी जीवनावरील एक चांगला संदर्भ ग्रंथ ठरावा.

(मासिक साहित्य चपराक, ऑक्टोबर २०१५)
- उद्धव भयवाळ
19, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी
गादिया विहार रोड, शहानूरवाडी संभाजीनगर
मोबाईल: 88889 25488

No comments:

Post a Comment