मासिक 'साहित्य चपराक', पुणे
शेती हा आतबट्याचा व्यवहार असल्याची मानसिकता बळावत असताना. त्याच दरम्यान एका युवा मनाच्या ज्येष्ठाने तरूण शेतकर्यांना लाजवेल असा प्रयोग आपल्या शेतात केलाय. सुभेदार बाबूराव पेठकर असं या पर्यावरण ऋषीचं नाव आहे. पर्यावरणावर, पाण्याच्या बचतीवर बोलणारे अनेक आहेत; मात्र कृतीतून पर्यावरण जगणारे तसे नगण्यच. त्या नगण्यांपैकीच एक म्हणजे बाबूराव पेठकर. वयाची 27 वर्षे सैन्य दलाच्या आरोग्य विभागात कार्य केल्यानंतर त्यांनी सोलापूरात आपले बस्तान बसवले. त्यांच्या सैन्य दलातील सेवेच्या भरतीलाही देशसेवेचीच झालर होती. कारण 1962 साली झालेल्या चीन सोबतच्या युद्धावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तरूणांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. लातूर येथील महर्षी दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेणारे बाबूराव पेठकर वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी सैन्यदलात भरती झाले. उत्कट देशप्रेमामुळेच त्यांनी सैन्यात प्रवेश केला.
सैन्यदलात असताना बाबूराव यांची नेमणूक आरोग्य विभागात झाली. त्यामुळे 1962, 1965 साली झालेल्या युद्धात त्यांनी युद्धभूमिवरील जखमी जवानांवर उपचार केले. 1965 च्या युद्धात त्यांनी अमेरिकन बनावटीचे मोबाईल हॉस्पिटलही हाताळले. युद्धभूमिवर त्यांनी तीन आठवड्यात जवळपास एक हजार सैन्यांवर उपचार केले. त्याच दरम्यान युद्धात सैनिकांसोबतच झाडांची कत्तलही मोठ्या प्रमाणात झाल्याचं त्यांच्या नजरेस आलं. कोणतीही चूक केलेली नसताना केवळ दोन देशातील वादामुळे निष्पाप झाडे, फुले, फळे हकनाक बळी जातात. त्यामुळे झाडांविषयी त्यांना अतीव जिव्हाळा निर्माण झाला. वृक्षप्रेमाची खरी बीजे त्याच ठिकाणी रूजली. दिल्ली, बंगळुरू, पुणे, सिक्कीम आदी ठिकाणी संशोधनाच्या कामी त्यांनी सेवा केली. याशिवाय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या संशोधन टीममध्येही त्यांनी काम केलं. पुढे 27 वर्षे सैन्यदलात नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सोलापूरकडे आपला मोर्चा वळवला.
सैन्य दलात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल 1980 साली तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुभेदार पेठकर यांची राजपत्रित अधिकारी म्हणून बढती केली. याशिवाय भारत सरकार तर्फे त्यांना चरितार्थासाठी तीन एकर जमीन आणि राहण्यासाठी एक जमिनीचा तुकडा देण्यात आला. त्यांना नोकरीदेखील मिळण्याची संधी आली होती; मात्र त्यांनी ती नाकारली. सरकारने दिलेल्या जमिनीचा विनियोग आणि शेतीत काही वेगळे प्रयोग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. केवळ निर्णय घेऊन ते शांत बसले नाहीत तर त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले.
सोलापूरच्या कंबर अर्थात छत्रपती संभाजी तलावाच्या पाठीमागेच पेठकर यांची सरकारने दिलेली तीन एकर शेती आहे. पंधरा वर्षापूर्वी ही जमीन म्हणजे खडकाळ रान होते. कोणत्याही प्रकारचे उत्पन्न वा झाडी त्याठिकाणी नव्हती; मात्र आपल्या देशसेवेनंतर आयुष्याच्या उत्तरार्धात बाबूराव पेठकर यांनी समाजसेवेचा ध्यास घेतला. खडकाळ रानावर शेती आणि जंगल उभारण्याचा संकल्प त्यांनी सोडला. पर्यावरण ठीक असेल तरच आपले आरोग्य चांगले राहणार आहे. पर्यावरण उत्तम असेल तरच देशातच नव्हे तर जगात शांतता, सुव्यवस्था नांदू शकते. त्यामुळे या शतकातली पर्यावरणाची समस्या लक्षात घेऊन त्यांनी पर्यावरणाच्या अभ्यासास सुरूवात केली. सीमेवर केलेल्या सेवेनंतर ते पर्यावरण सैनिक म्हणून काम करू लागले. त्यासाठी त्यांनी राज्यातील 27 जिल्ह्यात दौरा केला. दरम्यानच्या काळात त्यांनी वृक्षांची लागवड सुरू केली. त्यांचे संवर्धन, विस्ताराचे कार्य केले. त्याचबरोबर त्याचा प्रचार-प्रसारही सुरूच ठेवला. विशेष म्हणजे, त्यांच्या शेतीला लागूनच असलेल्या राज्य शासनाची सामाजिक वनीकरण विभागाच्या जमिनीवरही त्यांनी शिवार फुलवायला सुरूवात केली. त्यामुळे त्यांना सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाच्या स्मृती उद्यानाचे राजदूत म्हणून नेमले. त्यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या स्मृती उद्यानासाठी जवळपास ऐंशीहून अधिक देणगीदार मिळवून दिले.
महाराष्ट्राच्या पर्यावरणीय संकटावर उत्तरे...
पर्यावरण रक्षण हा कृती करण्याचा विषय आहे. त्यामुळे कागदोपत्री घोडं नाचवल्याने ते साध्य होणार नाही. म्हणून त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी विविध उत्तरे शोधली आहेत.
जलपुनर्भरण....
यामध्ये पाण्याचे संकट मिटविण्यासाठी विहिर पुनर्भरण करण्याचे त्यांनी ठरवले. त्यात त्यांनी जलस्त्रोत शुद्धिकरण आणि जलस्त्रोत बळकटीकरण असे दोन भाग केले. शिवसेना-भाजप युती सरकारने राबविलेली ‘जलयुक्त शिवार योजना’ आज सर्व महाराष्ट्राला ज्ञात झाली; मात्र पेठकर यांनी आठ-दहा वर्षापूर्वीच जलयुक्त शिवारचा प्रयोग यशस्वी केला आहे. उतारावरून पळणारे पाणी त्यांनी रांंगते केले तर रांगते पाणी थांबते करून पाण्याचा योग्य वापर व नियोजन करून शेती हिरवीगार केली. विशेष म्हणजे पेठकर यांच्या शेतीच्या बाजूलाच बारमाही पाण्याने भरलेला छत्रपती संभाजी तलाव आहे. तरीही अद्याप त्यांनी एकदाही तलावातील पाण्याचा थेंबही शेतीसाठी वापरला नाही. शेतात व आजूबाजूला पडलेल्या पावसाचे पाणी आपल्या शेतीकडे वळवून त्यांनी आपल्या खडकाळ रानावर नंदनवन फुलवले. त्यांच्या या प्रयोगाने अनेक छोट्या शेतकर्यांना हा प्रयोग उपयुक्त ठरला आहे.
याबाबत सुभेदार बाबूराव पेठकर सांगतात की, शेतकर्यांनी आपल्याकडे जमीन किती आहे याचा विचार न करता, आहे त्याच जमिनीत सोने पिकविण्याची हिंमत ठेवली पाहिजे. पावसाचे पाणी साठवून जिरायती शेती बागायती करण्यावर भर दिला पाहिजे. जलयुक्त शिवार अभियान शासनाने आता सुरू केले असले तरी, आपण हा प्रयोग स्वकल्पनेतून यापूर्वीच सुरू केला आहे. त्यामुळे मी पाण्यासाठी कधीही अवलंबून राहिलो नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही आमच्या विहिरीला 16 ते 17 फूट पाणीसाठा होता.
वनभिंतीचा शोध...
आपल्या महाराष्ट्रात प्रदूषण उद्भवाची जवळपास पस्तीस केंद्रे आहेत. त्यात विटभट्टी, पेट्रोल पंप, स्टोन क्रशर, स्मशान भूमी, साखर कारखाना, इतर उद्योग आदी. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी पेठकर यांनी वनभिंतीचा शोध लावला. वनभिंत संकल्पना म्हणजे झाडांची भिंत. यात तीन प्रकारच्या झाडांची लागवड केली जाते. यात झुडूपवजा झाडाची पहिली रांग, मध्यम उंचीच्या झाडांची दुसरी रांग आणि सर्वात उंच वाढणार्या प्रजातीची तिसरी रांग. ती घनदाट असते. अशी वनभिंत त्यांनी आपल्या शेतात तयार केली आहे. समाजानेही हे प्रयोग आपल्या भागात करायला हवेत अशी त्यांची अपेक्षा आहे.
सोलापूरच्या लोकमंगल उद्योग समुहाने हा प्रयोग स्वीकारला आहे. लोकमंगल साखर कारखान्याने आपल्या फळी साठवण केंद्राच्या बाजून अशी वनभिंत उभारली आहे. त्यामुळे वायूप्रदुषणास रोख लागणार आहे. शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी अशा भिंती उभारणे गरजेचे आहे. सध्या जागतिक तापमान वाढीची समस्या संपूर्ण जगाला भेडसावत आहे. त्यावर ही वनभिंत म्हणजे चपखल उत्तर आहे. भारतीय नेत्यांनी अनेकवेळा जागतिक परिषदेत अशी ग्वाही दिलीय की, आम्ही कार्बनचे प्रमाण वाढू देणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावू; मात्र ते भारतीय नागरिकांच्या जीवावर सांगितले आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करणे ही आपली जबाबदारी आहे. अनेकांच्या मनात वृक्ष लागवड करण्याचा विचार येतो; मात्र त्यांना रोपे किंवा ते वाढविण्याची माहिती नसते. ते होऊ नये यासाठी त्याचाच एक भाग म्हणून पेठकर यांनी रोपवाटिकाही तयार केली आहे.
पाण्याचे संकलन...
आपल्याकडेे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो; मात्र ते पाणी असेच वाहून जाते. ते पाणी वाया जावू नये म्हणून पेठकर यांनी बारा वर्षापूर्वी एक पुस्तक लिहिले. हे पुस्तक वाचल्यानंतर पाण्याचा नोबेल पुरस्कार मिळालेले जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी स्वतः बाबूराव पेठकर यांच्या शेताला भेट दिली. तेथील विविध प्रयोग त्यांनी पाहिले. रेनवॉटर हार्वेस्टींगची कामेदेखील त्यांनी पाहिली. विशेष म्हणजे ही कामे त्यांनी मोफत करून दिलेली आहेत. सोलापूरातील जिल्हाधिकारी कार्यालय, विवेकानंद केंद्र आदी इमारतीत त्यांनी ही कामे करून दिली आहेत.
सेंद्रीय रांगोळीचा शोध....
भारतीय संस्कृतीतील एक दैनंदिन कार्य म्हणजे रांगोळी काढणे. मात्र त्यामुळे जमिनीत रासायनिक रंग जाऊ लागलेत. ते प्रमाण कमी असले तरी त्याचा परिणाम जमिनीवर होतोच. त्यावर पर्याय म्हणून मग सेंद्रीय रांगोळीची कल्पना मला सुचली. आसपासची झाडाची पानगळ सुरू असते. त्याच्या पानांचा रंग विविध प्रकारचा असतो. ती पाने वाळवून त्याची भुकटी केली की रांगोळी तयार होते. यासोबत कोळसा पावडर, लाकडाचा भुस्सा, आपली रांगोळी किंचित प्रमाणात वापरायची. याशिवाय सूर्यफुल, गव्हाचे गोंडर, कूस असे शंभर प्रकारच्या वस्तूंचा उपयोग त्यात करता येतो. त्याबाबतचे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. समाजात ते माहिती होण्यासाठी सेंद्रीय रांगोळी बनविण्याची स्पर्धा देखील त्यांनी घेतली.
प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन यांनी दुसरी हरितक्रांती घोषीत केली आहे; मात्र तिला केवळ हरितक्रांती न म्हणता दुसरी पर्यावरणीय हरितक्रांती घोषीत करायला हवी होती. कारण हरितक्रांतीमध्ये पुन्हा लोक युरिया आणि तत्सम रासायनिक पदार्थांचा वापर करतील. मग ती हरितक्रांती होईल का? पेठकर यांची ही संकल्पना ऐकून डॉ. स्वामीनाथन अतिशय प्रभावित झाले.
खंत वाटते...
पर्यावरणाच्या र्हासाबाबत खंत व्यक्त करताना बाबूराव पेठकर म्हणतात, पर्यावरणाबाबत आपल्या समाजात अनास्था आहे. मुळात ती शालेय स्तरावरूनच दिसून येते. जे समाज घडवतात त्या शिक्षकांनाही याचे भान नाही. त्यामुळे सर्वप्रथम त्यांना याचे शिक्षण देणे गरजेेचे आहे. पर्यावरणाला मूलभूत शिक्षणाचा दर्जा द्यायला हवा. त्यामुळे काही प्रमाणात त्याबाबत सजगता येईल. मुळात भारतीय संस्कृती ही पर्यावरणीय संस्कृती आहे; मात्र आपण पंचमहाभूतांना महत्त्व न दिल्याने ही पश्चातापाची वेळ आपल्यावर आली आहे. माझ्या मते प्रत्येकाला तीन माता असतात. त्यापैकी एक जीवनदाती माता, दुसरी भूमाता आणि तिसरी गोमाता. यातील जीवनदाती मातेखेरीज दोन मातांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.
सुभेदार पेठकर यांनी त्यांच्यापरीने पर्यावरणाचे काही सिद्धांत मांडले आहेत.
1) किमान गरजेवर आधारित जीवनपद्घती
2) जीव जीवश्य जीवनम्
3) रसायन निर्मिती आणि त्याचा वापर मर्यादित
4) ऊर्जा निर्मिती आणि त्याचा मर्यादित वापर
सुभेदार बाबूराव पेठकर यांनी फुलवलेल्या शेतीत आज जैवविविधता आहे. त्यांच्या शेतात मोर, ससे, साप, फुलपाखरे, मुंगूस, सरडा, विविध परदेशी पक्षी आदींचा वावर असतो. विशेष म्हणजे त्यांची शेती पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने पिकवलेली आहे. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केलेला नाही. विहिरीत अनेक प्रकारचे मासे, कासव, साप आदींचा वावर असतो. पेठकर यांच्या शेतात जल आणि पक्षीतीर्थ आहे. म्हणजेच, मळ्यामध्ये कायमस्वरूपी नैसर्गिक पाण्याने भरलेली विहीर असून त्याला जलमंदिर असे नामकरण केले. परिसर वृक्षांनी व्यापून गेला असल्यामुळे वृक्षमंदिर तर मळ्यामध्ये पक्षांचा सतत किलबिलाट असल्याने त्याचे पक्षीतीर्थ असे नामकरण त्यांनी केले आहे.
भविष्यात सरकार आणि समाजाने वनमहोत्सव कृतिशीलपणे साजरा केला जावा. शहरी वनीकरण करणे गरजेचे आहे. शिक्षण संस्था, शासकीय कार्यालये आदींनी किमान एक तृतीयांश जमिनीवर वनीकरण करावे. केवळ शेतकर्यानेच झाडे लावावीत असा काही नियम नाही. कारण ऑक्सीजन सर्वांनाच हवा आहे. बायोडायव्हर्सिटी, कृषी पर्यटन आदी जास्तीत जास्त निर्माण व्हावेत. याशिवाय वनयुक्तशिवार उपक्रम राबविणे गरजेचे आहे. समाजात पर्यावरणाचे तीर्थक्षेत्र निर्माण करणे गरजेचे आहे.
सुभेदार बाबूराव पेठकर यांना प्राप्त झालेले विविध पुरस्कार
* 1980 साली सैन्यातील उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवपत्र देऊन नायब सुभेदार पद.
* 1997 साली वृक्ष लागवड प्रचार-प्रसार कार्याकरिता महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र वनश्री पुरस्कार.
* 1999 साली भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार.
* 2000 साली प्रदुषण विरोधी कार्यासाठी शौर्य पुरस्कार.
* महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण मंत्रालय विभागाचा विशेष गौरव पुरस्कार.
* किसान शक्ती राज्यस्तरीय पुरस्कार.
* 2011 साली दूरदर्शन वाहिनीचा सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार.
पर्यावरण पूरक संशोधन प्रकल्प सादर
* छतावरच्या पाण्याचे संकलन
* महामार्गावर पडणारे पावसाचे पाणी संकलन
* सेंद्रीय रांगोळी
सागर सुरवसे
आयबीएन लोकमत, सोलापूर
मो. 97691 79823
मासिक 'साहित्य चपराक', पुणे
पर्यावरण जागृतीवर महत्वपूर्ण लेख
ReplyDeleteबाबूराव पेठेना लाखो सलाम!
पर्यावरण जागृतीवर महत्वपूर्ण लेख
ReplyDeleteबाबूराव पेठेना लाखो सलाम!