Saturday, August 13, 2016

चेतना पेटवणारी धर्मशाळा

काव्य जीवनात आहे
जरा जवळून बघा
वाफ पाण्यामध्ये आहे
पाणी उकळून बघा

असं सांगणार्‍या लोककवी म. भा. चव्हाण यांच्या ‘धर्मशाळे’चे संपादन दस्तुरखुद्द व. पु. काळे यांनी केले आहे. वपुंचा आणि मभांचा याराना अनेकांना सुपरिचित आहे. व. पु. प्रतिभावंत लेखक म्हणून सर्वांना ठाऊक आहेत; मात्र ते उत्तम कवीही होते हे थोडक्या लोकांना माहीत असावे. त्यांचा ‘नको जन्म देऊस आई’ हा छोटेखानी काव्यसंग्रह मभांनीच त्यांच्या ‘पृथ्वीराज प्रकाशन’तर्फे प्रकाशित केला आहे. लोककवी मनमोहन नातू आणि रॉय किणीकर यांच्यात जे आणि जसं नातं होतं तसंच या जोडगोळीचं. या कलंदर कलाकारांचे माय मराठीवर ऋण आहेत.
तर मभांच्या या ‘धर्मशाळे’चे 336 प्रवासी आहेत, जीवनाचे सारे रंग त्यात आलेत. प्रत्येक कविता चार ओळींची. म्हटलं तर स्वतंत्र; म्हटलं तर अखंड. सगळ्या रचना अष्टाक्षरी. जीवनावर भाष्य करणार्‍या, नाना पैलू उलघडून दाखविणार्‍या, भविष्य वर्तविणार्‍या ओळी. या ‘धर्मशाळे’त जो कोणी विसावेल तो तिथलाच प्रवासी बनेल. नेकीने जगणार्‍या, जगू पाहणार्‍या प्रत्येकाला वाटेल की, आपल्या आयुष्याचा अर्कच मभांनी या पुस्तकात काढून दिलाय.
कधीतरी जन्मा आलो
कुण्या गावात वाढलो...?
माझ्या जीवनाची गाथा
मीच लिहाया बैसलो...!

अशी ‘धर्मशाळे’ची दमदार सुरूवात मभांनी केली आहे. मात्र लगेचच ते म्हणतात,
 तसे सांगण्यासारखे
आहे कुठे माझ्यापाशी?
माझ्या स्वत:च्या गावात
मीच आहे वनवासी!

‘हे विश्‍वची माझे घर’ अशी भावना बाळगणार्‍या मभांनी ‘धर्मशाळे’तून लाखमोलाची शिकवण दिली आहे. त्यांचे अनुभवविश्‍व समृद्ध असल्याने या सर्व ओळी त्यांच्या ह्रदयातून आल्यात. म्हणूनच वाचणार्‍याला त्या आपल्याशा वाटतात. महाकवीची उपेक्षा हा युगानुयुगे चालत आलेला विषय! मग म. भा. तरी त्याला अपवाद कसे ठरतील? या महाकवीच्या जीवनाचा आलेख बघितला तर पुन्हा लोककवी मनमोहन आठवतात. ते म्हणायचे, ‘उद्याचा कालीदास जर अनवाणी पायाने चालत असेल तर त्यात अब्रू त्याची नाही राजा भोजाची जाते.’ मभांच्या बाबतीतही तसेच आहे. कविता जगणार्‍या या कवीला मात्र त्याची फिकिर नाही.
 माझी स्वत:ची बायको
मला नवरा मानेना
तरी वडाच्या झाडाला
फेर्‍या घालणे सोडेना...

अशी आजूबाजूची विसंगती म. भा. नेमकेपणे मांडतात.
माझ्या सग्यासोयर्‍यांची
काय सांगू नवलाई
माझ्या आजारपणाची
त्यांनी वाटली मिठाई

असे सांगून म. भा. लिहितात,
माझ्या सग्यासोयर्‍यांनी
काही कमी नाही केले
माझ्या दहाव्याआधीच
गाव जेवण घातले!

अशा सोयर्‍यांविषयीच्या या ओळी पहा-
माझ्या कातड्याचे जोडे
त्यांच्या पायी मी घातले
तरी बोलतात साले
‘नाही कातडे चांगले...!’

‘धर्मशाळे’तल्या कोणत्याही चार ओळी घेतल्या तरी त्या आपल्याला आपल्या आयुष्याची गाथाच वाटतील. प्रेमापेक्षा श्रमाला किंमत मिळावी असा आग्रह धरणार्‍या मभांना भुकेची जाणीव आहे. त्यांच्या कष्टमय आयुष्याचा ते कधी बागुलबुवा करीत नाहीत; मात्र ‘धर्मशाळे’तून जणू मभांचे चरित्रच वाचकांसमोर आले आहे.
पोटामध्ये भूक माझ्या
मात्र ओठात कविता
पाण्याशिवाय वाहते
माझी जीवन सरिता

असे ते म्हणतात. भुकेचे भयंकर वास्तव त्यांच्या लेखणीतून साकारले आहे. पुढच्या ओळी त्याची साक्ष पटवून देतील.
भूक तुलाही छळते
भूक मलाही छळते
भूक विश्‍वमित्रालाही
कुत्रे खायला घालते
 
भूक माय ममतेचे
पाश तोडून टाकते
भूक पोटच्या पोरीला
बाजारात बसवते

भूक लहानथोरांना
देशोधडीला लावते
गरिबाच्या घरातला
भूक दिवा विझवते

आजूबाजूचे वास्तव मभांनी इतक्या नेमकेपणे टिपलेय की त्याला तोड नाही. मुख्य म्हणजे यात त्यांनी भाषेचे कसलेही अवडंबर माजविले नाही.
त्याची आणि तिची सुद्धा
नाही ओळख पटली
जरी दोघांनी जिंदगी
एका घरात काढली

या ओळीतून त्यांनी ‘घरघरची कहाणी’ मांडली ती शंभर पानांच्या पुस्तकातून तरी मांडणे शक्य आहे का?
मभांच्या कविता तरूणाईत कायम आकर्षणाच्या केंद्रबिंदू आहेत. विविध महाविद्यालयातून होणारे त्यांचे कविता वाचनाचे कार्यक्रम अफाट तरूणाईप्रिय आहेत. 

ज्यांना कुणीच नाहीत
मुलेबाळेही नाहीत
त्यांनी त्यांच्या वंशासाठी
फक्त झाडे लावावीत

स्त्रियांचा सन्मान हे तर मभांच्या जीवनाचे मूलतत्त्वच आहे.
आई कुणाचीही असो
तिचा सन्मान करावा
तिने टाकलेला शब्द
फुलासारखा झेलावा

‘धर्मशाळा’ वाचणार्‍याला फक्त मभांच्या कवितांची भुरळच पडत नाही तर ते कवितांवर प्रेम करू लागतात. कवितेला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा हा लोककवी आहे.
कुणाच्याही संसारात
कुणी आणू नये बाधा
कुणाची जाऊ नये
कुण्या कृष्णाकडे राधा

अशी रास्त अपेक्षा त्यांची कविता व्यक्त करते. अनेकांना बागेतल्या फुलाचे महत्त्व कळतच नाही. प्रत्येक व्यक्तित, प्रत्येक कामात दोषच दिसतात. अशांना मभांनी चपराक दिलीय. ते म्हणतात,
काही लोक असतात
चालताना भुंकणारे
बागेतल्या फुलांवरी
जाताजाता थुंकणारे

एकीकडे ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष करताना दुसरीकडे खुद्द भगवंतालाच त्यांनी सवाल केलाय,
जेव्हा रावणाने तुझी
होती पळविली सीता
का रे नाही भगवंता
तेव्हा सांगितली गीता

एकंदरीत म. भा. चव्हाण हे आजच्या पिढीचे नेतृत्व करणारे, वंचित उपेक्षितांच्या वेदना प्रभावी शैलीत मांडणारे लोककवी आहेत. त्यांनी पेटवलेला कवितेचा दिवा भविष्यात समाजातील अंधार दूर करीत राहील हे मात्र नक्की!
प्रकाशक - पृथ्वीराज प्रकाशन, पुणे (9922172976)
पाने - 112, किंमत - 60

-घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२ 

No comments:

Post a Comment