साहित्य चपराक दिवाळी महाविशेषांक २०१८
सकाळ होते. रोजच्यासारखाच दिवस सुरू होतो. रोजच्यासारखाच तो पार पडेल असे आपल्याला वाटत असते पण अचानक काही तरी घडतं आणि त्या घडण्याचे आपण साक्षीदार होतो. नुसते साक्षीदार न होता आपल्या अंतर्मनात ती घटना कोरली जाते. ती कोरली गेलेली घटना एक विचार बनून आपल्याबरोबर रुजत राहू लागते. आपल्या अंतर्मनात तिच्यावर सखोल विचारही होऊ लागतो. आपल्या जाणीवांच्या पातळ्या रुंदावू लागतात. आकळण्याचा एक क्षण येतो, जातो. तो धरून ठेवता येत नाही. नेमका सांगताही येत नाही पण तरीही आपल्याला त्याबद्दल सांगावेसे वाटते. बोलावेसे वाटते. मध्यंतरी असेच काही घडले. सुरेश बोरामणिकर या माझ्या मावसभावाचा मृत्यू झाला. अचानक असंही खरंतर म्हणता येणार नाही कारण त्याचं वय तसं 79 पण तब्येत अजून धडधाकट म्हणावी अशीच होती. मनसोक्त आनंदी, निरामय जगलेलं तृप्त असं त्याचं व्यक्तिमत्त्व. तो असताना पेक्षा तो गेल्यानंतरच जास्त कळाला आणि त्याच्या निमित्तानं अनेक गोष्टीही. याचं कारण त्यांने केलेले देहदान.
तो देहदान करणार आहे हे माहीत होतं पण तरी आजही आपल्या देशात, धर्मात मृत्यूपश्चात धार्मिक संस्कार, तिसर्या दिवशी राख सावडणे, दहावा, बारावा, तेरावा, चौदावा या आणि अशा सगळ्या विधींना खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे व्यक्तीची देहदानाची लाख इच्छा असली तरी त्याच्या कुटुंबियांची त्यासाठी मानसिक तयारी असतेच असे नाही! पण इथे मात्र वहिनींसहित घरातल्या सर्वांनी मृत्यू आणि नंतरचे देहदान अगदी सहजतेने, समजूतदारपणाने स्वीकारलं. एवढेच नाही तर भावाच्या इच्छेनुसार कोणी डोळ्यातून टिपूसही येऊ दिला नाही.
'श्वास शिंपून उत्सवाला चालली ही लोचने
मी पुढे अन् त्या पुढे तू अमृताच्या राऊळी'
असा हा एक वेगळा संकल्प सिद्धीचा सोहळा.
मृत्युनंतर सिव्हिल हॉस्पिटलला कळवले होतेच. हॉस्पिटलची गाडी आली, देह घेऊन गेली. हे सारे इतके अचानक झाले होते की त्याच्या तीन पैकी दोन तिथेच नोकरी करणार्या मुली फक्त वेळेत येऊ शकल्या मात्र एक मुलगी आणि तिन्ही जावई कोणीच अंतरामुळे पोहोचू शकणार नव्हते. मात्र त्यांना दुसर्या दिवशी हॉस्पिटलमध्ये त्याचे दर्शन होऊ शकणार होते. हे ऐकले, त्याच क्षणी माझ्या मनात काहीतरी चमकले आणि माझा त्या बॉडी नामक देहाशी संवाद सुरू झाला. एक अनुबंध निर्माण झाला कारण या देहाला अग्निडाग दिला जाणार नव्हता. त्याची राख होणार नव्हती. तो देह अजून वीस-एक वर्षे तरी अचेतन रूपात अस्तित्वात असणार होता. त्यामुळे साहजिकच माझे मन त्या अचेतनाभोवती घुटमळू लागले. अधिकाधिक पुढच्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवू लागले, जाणून घेऊ लागले. एकीकडे मनात,गीतेच्या बाराव्या अध्यायातला 3, 4 था श्लोक आठवू लागला.
॥ त्वक्षर्मनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते।
सर्वत्रगमचिंत्यं च कुटस्थमचलं ध्रुवम्॥
॥ सर्वत्र समबुद्धयः।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः॥
जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्याप्रकारे ताब्यात ठेवून मन-बुद्धीच्या पलीकडे असणार्या, सर्वव्यापी, अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणार्या नित्य, अचल, निराकार, अविनाशी सच्चीदानंदघन ब्रह्माची निरंतर ऐक्यभावनेने ध्यान करीत उपासना करतात ते सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समभाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात.
मनात आलं देहदान करणारी प्रत्येकच व्यक्ती मरणोपरांत स्थूलरूपातून परोपकारच करतेय. सूक्ष्मरूपात ती ईश्वराशी ऐक्य पावते की नाही माहीत नाही पण अनेक जीवांसाठी वरदान मात्र ठरते. कोणी तरी आपल्या मृत्युनंतर आपला देह वापरतोय, खरंच देहाभिमान संपल्याशिवाय हे होणे नक्कीच नाही कारण देहदान म्हणजे मृत शरीर जसेच्या तसे दान करणे. खूप धाडसाची गोष्ट वाटते मला ही.
देहदानानंतर मेडिकल कॉलेजमधील फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे मृतदेह दिला जातो. तज्ज्ञांच्या देखरेखीत मृतदेह फॉर्मअल्डिहाईड किंवा तत्सम प्रिझर्व्हेटिव्हजमध्ये ठेवला जातो. यामुळे मृतदेह कुजत नाही. नंतर आवश्यकतेनुसार देहातील योग्य तो कार्यरत अवयव काढून त्याचे गरजू रुग्णांवर प्रत्यारोपण केले जाते किंवा मेडिकलच्या विद्यार्थ्यांना थेअरी बरोबर प्रॅक्टिकल करण्यासाठी अनॉटॉमी आणि फिजियॉलॉजी डिपार्टमेंटकडे वेळेप्रमाणे हा मृतदेह सोपवला जातो. वैद्यकीय क्षेत्रात याचे खूप महत्त्व आहे. मृतदेहाचा अभ्यास करून एखादी पिढी घडवली जाते. चांगले सर्जन निर्माण होण्यास मदत होते.
कृष्णमूर्तींना एकदा कुणीतरी विचारलं होतं, ‘‘मृत्यूचा अर्थ काय?’’
तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘मृत्यू म्हणजे सर्व सोडून जाणे! तुमच्या आसक्ती, तुमच्या भ्रामक समजुती, तुमची सुखचैनीची अभिलाषा या सर्वांपासून मृत्यू तुम्हाला अतिशय तीक्ष्ण पात्याने विलग करतो. त्याचा अर्थच पूर्ण मुक्त होणे असा आहे. आसक्ती नाही, भविष्य नाही, भूतकाळ नाही. मृत्युनंतरही शरीराची आसक्ती असतेच ती संपणे गरजेचे आहे तरच मला वाटते व्यक्तीला देहदान करणे सहज होईल.
खरे म्हणजे शरीराचा अंत म्हणजे मृत्यू. शरीर संपणे एवढीच क्रिया घडते पण आपण प्रत्येक जण मृत्युची भीतीच बाळगतो. मृत्युचे भयच माणसाला खर्या जगण्यापासून दूर नेते. मृत्युचा अर्थ जगण्यात शोधला तर शेवटच्या श्वासाच्या ओढीनं जीवनाला आपण कृतार्थ करू शकू.
कॉलेजमध्ये असताना मला मृत्युची भयंकर ओढ होती. मृत्युला उद्देशून कविता, ललित लिहिले जायचे. मृत्युलाच आपण वरलेय, छान नटून थटून त्यालाच माळ घातली आणि त्याच्याशी एकरूप होऊन या जगातून नाहीसे झालोय अशा कल्पना सतत केल्या जायच्या. अनुनभवी, निरागस मनाचे ते चित्रण असायचे पण नंतर जेव्हा कबीर थोडा वाचण्यात आला आणि ‘जिस मरने से जग डरै, मेरो मन आनंद। कब मरिहौ कब भेटिहौ, पूरन परमानंद।’
सारे जग ज्या मृत्युला घाबरते त्याच मृत्युने माझे मन आनंदित होते, हा या दोह्याचा अर्थ. मृत्युमुळे पुलकित होणे हा अर्थ अर्थातच माझा नसायचा कारण त्या वयात येणार्या नैराश्याने असे काही मी लिहायचे हे आता लक्षात येते. मग ओशोंनीही मृत्यू शिकवला तो असा,
’जे अज्ञानी आहेत तेच मृत्युला घाबरतात, ज्यांनी मृत्यू ओळखला आहे त्यांनी जीवन जिंकले आहे. मृत्युसारखी परम सुंदर गोष्टच या जगात नाही. जर तुमची सावली नष्ट करायची असेल तर तुम्ही एका जागी स्थिर होता, सावली आपोआप नाहीशी होते. जसे प्रत्येक समस्येकडे डोळे उघडून पाहता, समस्या आपोआप संपून जाते. मृत्युचेही तसेच आहे. मृत्युपासून पळायचा प्रयत्न केलात तर तो पाठलाग करेल पण त्याकडे निर्भयपणे पहाल तर तो अमृतासमान भासेल. थांबा आणि मृत्युला सामोरे जा. मृत्यू ओळखायला शिका. तुम्हाला परमेश्वर भेटेल.’
ओशो सांगतात, ‘सम्यक जीवन सम्यक मृत्युचा आधार आहे.’ कबीरांसाठी मृत्यू ‘परम सौभाग्य’ आहे. हे सारे चिंतन सुरू असतानाच लहानपणापासून आपण सगळ्यांनीच अनेकदा ऐकलेली महर्षी दधिचिंचीही गोष्ट आठवली. तिलाही आज वेगळे आयाम येत गेले. म. दधिचिंनी असुर वृत्रासुराच्या वधासाठी लागणार्या शस्त्रासाठी आणि देवांच्या रक्षणासाठी म्हणून स्वतःच्या अस्थी देण्यासाठी जिवंतपणी देह त्याग केला. आत्ताही त्यांच्या कर्तव्यबुद्धीच्या जाणिवेने मन कृतज्ञतेने भरून आले. आज या निमित्ताने त्यांची अभिव्यक्ती जास्त समजली आणि नतमस्तक व्हावे असे वाटले. स्वतःचे मांस देणारा शिबि राजा आठवला आणि स्वतःच्या चिलया नावाच्या बाळाला मारून, त्याला कुटून, कांडून त्याचे मांस रांधून वाढणारी शिवभक्त चांगुणा पण आठवली...
आणि याच संदर्भात सोलापूरचे प्रार्थना फौंडेशनचे अनु आणि प्रसाद मोहिते हे दांपत्य देखील आठवले. या दांपत्याचे समाजकार्य तर खूप मोठे आहेच पण जेव्हा अनुला नवव्या महिन्यात डिलिव्हरीच्या अगदी काहीच दिवस आधी कळाले की तिला होणारी मुलगी वाचणार नाहीये तेव्हा दोघांनाही खूप त्रास झाला. हा काळाचा घाला किंवा हा नियतीचा खेळ खूपच जीवघेणा होता खरं तर! पण तरीही या प्रसंगाला धैर्याने तोंड देत त्यांनी या नवजात शिशूच्या देहदानाचा धाडसी निर्णय घेतला आणि ही हळवी पोकळी अर्थभारीत केली.
तर आपण कोणत्याही क्षणी शत्रूच्या गोळीचा निशाणा होऊ शकतो हे कळत असूनही आर्मीत दाखल होणारे, हसत हसत समर्पित होणारे जवान. मला वाटतं, पूर्ण मुक्त होणे किंवा समग्रतेने निसर्गाशी एकाकार होणे किंवा त्या ईश्वरीय शक्तीशी संपूर्ण शरणागती ही अवस्था मनाला प्राप्त झाल्याशिवाय हे असे कृत्य शक्यच नाही. या अवस्थेतच देहातीत मनाचा, मन ते आत्मा हा प्रवास होत होत अलौकिकात प्रवेश होत असावा.
- प्रिया धारुरकर
९८९०९२२०८९