Sunday, December 9, 2018

मसापची 'कौतिकचालिसा!'


  • राजकारणातले बालेकिल्ले कशा पद्धतीने अभेद्य ठेवले जातात हे आपण पाहतोच! पण साहित्य संस्थांचे राजकारण कसे चालते? तिथल्या निवडणुका कशा होतात? त्याचे सभासद कसे होतात? या संस्थांचे धुरीण नेमके कसे वागतात? साहित्यासाठी काय योगदान देतात? त्यांच्या मुखपत्र असलेल्या नियतकालिकातून नवोदितांच्या दर्जेदार साहित्याला न्याय मिळतो का? पुरस्कारांची खिरापत कशी वाटली जाते? थेट मतपत्रिका हातात मिळवण्यासाठी काय काय खटपटी, लटपटी केल्या जातात? निवडणुकांचे राजकारण कसे होते? ज्यांना आपण ‘संमेलनाध्यक्ष’ म्हणून आदर देतो ते कितपत लाळघोटेपणा करतात? कशा पद्धतीने निवडून येतात? एखाद्याने या व्यवस्थेच्या विरूद्ध आवाज उठवला तर त्याचे काय होते? हे सर्व जाणून घेण्यासाठी डॉ. भास्कर बडे यांचा 'चपराक' दिवाळी अंकातील त्यांच्या अनुभवावर आधारित हा विशेष लेख.


औरंगाबादला शिक्षणासाठी गेलो. त्यामुळे मराठवाडा साहित्य परिषद माहीत झाली. डॉ. हृषिकेश कांबळे यांच्यासोबत खोलीत पार्टनर म्हणून राहत होतो. त्याचा फायदा म्हणजे साहित्यिक आणि मराठी विभागातील लेखक, प्राध्यापकांच्या माझ्या ओळखी झाल्या. कधीतरी मसापत जायचो. तेव्हा तिथे एक नामफलक होता. ‘सुधीर रसाळ.’ त्या नावाची भीती वाटायची. त्यामुळे त्यांना भेटलो नाही.
लातूरला नोकरी लागली अन् ‘कैलास पब्लिकेशन्स’चे के. एस. आतकरे यांची ओळख झाली. त्यांच्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेचा आजीव सभासद झालो. तेव्हा कौतिकराव ठालेसरांची ओळख झाली. दरम्यान मसापची निवडणूक लागली. प्राचार्य कौतिकराव ठालेंचं एक पॅनल आणि दुसरं डॉ. वासुदेव मुलाटे-सुधीर गव्हाणे यांचं. प्रा. गव्हाणे सरांचा मी विद्यार्थी. त्यांनी मला आग्रहाने पॅनलमध्ये घेतलं. लातूर-औरंगाबाद अशी धावपळ सुरु होती. तेव्हासुद्धा ‘ज्यांच्याकडे मतपत्रिका जास्त’ (म्हणजे ‘गोळा केलेल्या) तो निवडून येणार हे सिद्ध होते. मी पंधरा मतपत्रिका गोळा केल्या होत्या. ही माहिती ठालेसरांना कळाली. मी मुलाटे-गव्हाणे-नाईकवाडे-डोळस यांना विचारले, ‘‘किती मतपत्रिका गोळा केल्या?’’ ते म्हणाले, ‘‘मतपत्रिका गोळा करण्याची गरज नाही, आपलं पॅनल विजयी होणार!’’
मी मनात हसलो अन् मतपत्रिका गोळा करायचा सपाटा चालूच ठेवला.
दरम्यान मला लातूरात निरोप आला. ठाले नावाचे एक गृहस्थ माझी भेट घेऊ इच्छित आहेत. भेट झाली. त्यांनी सांगितले,
‘‘ठालेसरांनी तुम्हाला भेटायला बोलावलेय. तुमच्याकडच्या पंधरा मतपत्रिका तोपर्यंत कोणालाही देऊ नका.’’
ठरल्यानुसार मी औरंगाबाद गाठले. दोघांची बोलणी झाली. ‘‘तुमच्याकडच्या पंधरा मतपत्रिका मला द्या. माझ्याकडची जास्तीची मते तुम्हाला देतो आणि पाच वर्ष निमंत्रणे येतील.’’ 
आमच्या पॅनलचा धुव्वा उडाला. मी चाळीस मतांनी पराभूत झालो तर प्रा. सुधीर गव्हाणे एकटेच पॅनलमधून विजयी झाले.
...आणि ठाले सरांचं पूर्ण पॅनल निवडून आलं. पाच वर्षे ठालेंनी मला पराभवाची जाणीव होऊ दिली नाही. दरम्यान सभासद वाढवले. नंतरच्या निवडणुकीत ठालेंनी पॅनलमध्येच घेतले. तेव्हा त्यांच्या काही सोयर्‍यांनी माझ्या नावाला विरोध केला. साहित्य चळवळीत काम करत होतो अन् आतून विरोधही होत होता हे जाणवत होते.
लातूर जिल्ह्यात मुरुडला आमदार विक्रम काळे यांनी मसापचे साहित्य संमेलन घेतले. त्यात खूप काम केले. स्मरणिकेचा संपादक ते कार्यक्रमपत्रिका, लेखकपत्रिका ही जबाबदारी काळेसाहेबांनी माझ्यावर टाकली. मी कामातच होतो. उद्या उद्घाटन. रात्रीचे जेवण संमेलनाध्यक्ष फ. मु. शिंदे यांच्यासोबत मुरुडला होते. त्यात मी नव्हतो. संमेलन संपल्यावर त्या जेवणावळीत एक मित्र होता. त्याने सांगितले, ‘‘अरे, ते ठाले काळेसाहेबांना म्हणाले, त्या बडेला तुम्ही भलतेच डोक्यावर घेतलेय.’’ 
‘‘सर, बडे कामाचा माणूस. आपले पत्रिकेत नाव आले अन् गायब झाले...’’ मला या दुटप्पी स्वभावाचे वाईट वाटले.
दोन वर्षापूर्वी निवडणूक झाली. त्या पॅनलमध्ये मला प्राचार्य ठालेंनी घेतले आणि मला विरोध करणार्‍यांची धार तीव्र झाली. या विरोधकात ठालेंनी ज्यांना ‘रतीब’ घातला तेच होते. एकूण हा विरोध ठालेंनीच उभा केलेला होता.
कोण होते विरोधक? पुन्हा तेच! लातूरचे योगीराज माने, प्रकाश काळे, दगडू लोमटे, सतीश साळुंके हीच मंडळी. एकीकडे गोड बोलायचे आणि दुसरीकडे विरोध करायचा. विरोध काय? तर म्हणे ‘बडे बीडचे. तिकडे उमेदवारी द्या! अन् बीडच्यांनी म्हणायचे, ‘ते लातूरचे!’ ही गंमत ठालेच रंगवत होते हे लक्षात आले.
आमदार मैदानात
यावेळी सतीश चव्हाण यांनी मसापच्या निवडणुकीत पॅनल टाकले अन् प्राचार्य कौतिकराव ठाले, मुळेअण्णा यांचे धाबे दणाणले. निरोपानिरोपी सुरु झाली. थेट मोठ्या साहेबांपर्यंत धावपळ (ठाले-मुळे) केली. (मा. शरद पवार - मोठे साहेब) प्रचाराचा साज-तन-मन-धनाने आ. चव्हाणांनी तोफ वाजवली. ग्रामीण साहित्य चळवळीचे एक प्रमुख डॉ. वासुदेव मुलाटे यांना प्रमुख करून खर्चापाणी सुरु झाला आणि ठाले-मुळेंना पळताभुई थोडी झाली.
मतदार खेचणार्‍या चेहर्‍यांच्या पाठीशी अहोरात्र उभेच ठाकले. दिवसभरात प्राचार्य ठालेंचे किमान पन्नासावर फोन असत. नावानिशी. मतपत्रिका मिळाली का? जपून ठेवा. निवडून आलो पाहिजेत. ते ज्ञानोबा मुंढे-बघा बरं!
‘‘चिंता करू नका!’’
‘‘अहो चाळीसएक मत आहेत. भाजपच्या गटाकडे मत जातील बरं!’’
‘‘नाही जात, मी बोललोय.’’
‘‘भेटायला या.’’
‘‘हो.’’
प्राचार्य ठाले माझ्या पाठीशी होते. लातूर, गंगाखेड, जालना, नगर, अकलूज, बीड, शिरुर शाखा, अंबाजोगाई, माजलगाव, उस्मानाबाद, कोपरगाव खूप फिरलो. तिथून मतपत्रिका घेऊन आलो. आम्ही मतपत्रिका गोळा करून पुढे गेलो, की आ. चव्हाणांचे कार्यकर्ते मतदारांकडे जात. भाषण देत... मतं मागितली की ‘परवाच दिली’ म्हणत.
बहुतेक मतपत्रिका गोळा झाल्या. आ. चव्हाणांनी अंदाज घेतला आणि हळूहळू माझा या पॅनलशी संबंध नाही असं जाहीर केलं.
यावेळी मी शंभरावर मतपत्रिका गोळा करून दिल्या तर दगडू लोमटे (18) शेषराव मोहिते (11) सतीश साळुंके (16) आसाराम लोमटे (20) हृषिकेश कांबळे (01) जीवन कुलकर्णी (01) अशी मला विरोध करणार्‍यांनी कामगिरी केली.
पूर्ण पॅनल निवडून आले
पदाधिकारी निवडीची बैठक झाली. त्यात माझ्या नावाला शेषराव मोहिते, दगडू मोहिते, सतीश साळुंके, आसाराम लोमटे यांनी कट्टर विरोध केला तरी प्राचार्य ठाले आणि मुळेअण्णांनी माझे नाव जाहीर केले. ‘‘बडेंनी या निवडणुकीत खूप मेहनत घेतलीय. त्यांच्यावर अन्याय होऊ नये.’’
...आणि ‘कोषाध्यक्षपद’ मला देण्यात आले.
अध्यक्षपद, पॅनलप्रमुख म्हणून प्राचार्य ठालेंना घोषित झाले. उपाध्यक्षपद प्रा. किरण सगर यांना दिले; तर कार्यवाहपद हे मुळेअण्णांच्या आशीर्वादाने डॉ. दादा गोरेंनी आदल्यारात्रीच ‘बुक’ केले होते.
‘प्रतिष्ठान’चा संपादक नामधारी
मागील वेळी श्रीधर नांदेडकर संपादक होते. त्यात मी संपादकीय मंडळात होतो. आम्हाला काहीच विचारले जात नसे. सर्व निर्णय स्वतः कौतिकराव ठालेसर घ्यायचे. अगदी आताही आसाराम लोमटे हे नामधारीच आहेत. मी एका कविच्या कविता निवडून आसारामकडे दिल्या. त्याला दोन वर्ष झाली. त्याचा निर्णय संपादक आसाराम लोमटेंना घेता आला नाही. मी त्यांना विचारले तर ते म्हणाले, ‘‘हा कवी खूपच सामान्य आहे. छापू नका.’’ वास्तविक प्राचार्य ठालेंनी माहितीवजाच लेखन केलंय. निर्मितीक्षम असं त्यांचं काहीच नाही. आसाराम लोमटे कथाकार आहेत. कविता हा या दोघांचा प्रांत नाही. मी निवडून दिल्या, छापल्या नाहीत. मात्र काही ‘लाभधारक’ कवींच्या चार कविता, पाच कविता, दहा कवितांचा रतीब ‘प्रतिष्ठान’मधून येतो. प्रतिष्ठान हे आप्तेष्टांचे व्यासपीठ आहे आणि खरे संपादक कौतिकराव ठालेच आहेत. आताही संपादक मंडळात बरेच जण घेतलेत; परंतु तेही नामधारी आहेत. या नामधार्‍यांना शुभेच्छा!
मसापचे पुरस्कार ‘वाटले’ जातात
मसापचे पुरस्कार हे गुणवत्तेवर दिले जावेत. त्यासाठी समिती असते. मात्र पुरस्कार कमिटीचे अध्यक्ष आपापली सोय अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटलांना गृहीत धरून करून घेतात. जणू ‘वानवळा’ एकमेकांना देतात. आम्ही तुम्हाला देतो तुम्ही आम्हाला द्या! हे अलीकडे खूपच सुरु झालेय. अगदी पुरस्कार समितीतील दोन सदस्य अमर हबीब, डॉ. पृथ्वीराज तौर यांनी मला सांगितले होते. ‘‘अहो, आम्ही सदस्य असून आम्हाला काहीच कल्पना नाही? कोण परीक्षक? कोणाचे ग्रंथ आले? आम्ही राजीनामा देणार? हे असेच चाललेय. ‘आले ठालेंच्या मना तिथे कोणाचे चालेना’ अशी गत मसाप पुरस्काराची आहे.’’
संमेलनाध्यक्षपद... खिरापत
काय साटेलोटे आहे ते मला तेरा वर्षात कळाले नाही. प्राचार्य ठाले ग्रेटच! त्यांनी एकदा ठरवले, याला अध्यक्ष करायचे की करणारच! संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस माझ्याकडे आले. ‘‘मला मदत करा’’ म्हणाले. मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही ठालेंना गाठा... तुमचा गुलाल पक्का.’’
तसे सबनीसांनी केले. गुलाल मिळवला. असा प्रयोग मी डॉ. किशोर सानपांसाठी केला परंतु ठालेंनी सानपांना शब्द दिला नाही. उलट पुण्याहून उमेदवार आयात केला आणि बेरजा केल्या. त्यात समीक्षक, अभ्यासू डॉ. किशोर सानपांचा पराभव प्राचार्य असलेल्या ‘ठालेंनी’ केला. सानपांच्या विरोधात कोणीही असले तरी प्रत्यक्षात लढाई ठाले विरूद्ध सानप अशीच होती.
मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदात वेगळे काही घडत नाही. ठालेंनी नाव सांगावे आणि कार्यकारणीने खाली पाहून हात वर करावेत. झाली एकमताने निवड. जुन्या पिढीतील डॉ. वासुदेव मुलाटे, प्रल्हाद लुलेकर, सोपान हाळमकर यांना डावलून थेट माझ्या पिढीतील कवी प्रा. हृषिकेश कांबळे यांना चाळीसाव्या मसाप उदगीरच्या संमेलनाचा अध्यक्ष जाहीर करून कित्येकांची बोलतीच बंद केली. डॉ. हृषिकेश कांबळे माझे वर्गमित्र, रुममेट. त्यांना अध्यक्षपद मिळाले याचा आनंद मला होणारच! असे हे ठालेचे प्रताप जवळून बघायला मिळाले.
आदरणीय प्राचार्य ठालेंना चैनच पडत नाही. प्रा. डॉ. किशोर सानपांच्या विरोधात प्राचार्य ठालेंनी सनदी अधिकारी आणि ठालेंचे प्रिय मित्र लक्ष्मीकांत देशमुख यांना पुण्यावरुन आणले. अर्ज भरून दिले. प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि मराठवाड्याच्या मतदारांना फोनवर फोन सुरु झाले. एकतर ही मतदार यादी ठालेच बनवतात. त्यामुळे त्यांना मानणार्‍यांची संख्या अधिक असते. त्यामुळे मतपत्रिकांचा प्रवास खात्रीपूर्वक औरंगाबादकडे होतो. या निवडणुकीत त्यांनी खूप हातखंडे उपयोगात आणले.
विभागवार मतदार वाटून घेतले. कार्यकारिणीचे सदस्य कामाला लावले. सनदी अधिकार्‍याचे मित्र आणि त्यांचे नातेवाईक कामाला लावले. भव्य यंत्रणा या कामासाठी स्वतः ठालेंनी उभी केली. एवढेच नाही तर-अंबाजोगाईच्या साहित्य संमेलनाचा उपयोगही या निवडणुकीत मतपत्रिका गोळा करण्यासाठी झाला. स्वतः ठाले काही मतदारांना असे बोलले -
‘‘नमस्कार...’’
‘‘नमस्कार’’
‘‘मतपत्रिका आली का?’’
‘‘हो आली सर’’
‘‘तुम्हाला अंबाजोगाईला साहित्य संमेलनाला यायचंय’’
‘‘कशाला सर?’’
‘‘तुम्ही महाराष्ट्राचे लाडके कवी, कविसंमेलनात घेतलेय. राहायची सोय, मानधन आहेच’’
‘‘येतो सर’’
‘‘हो येतोना...’’
‘‘मतपत्रिका आणतो ना सर! गोव्यावरून मराठवाड्यात तुम्ही बोलावताय? मतपत्रिकेची चिंता करू नका?’’
*
‘‘नमस्कार’’
‘‘नमस्कार सर! गरीबाची आठवण कशी काय?’’
‘‘अंबाजोगाई साहित्य संमेलनात तुम्हाला कथाकथनात घेतलेय’’
‘‘आभार सर! आभार! मला अन् मराठवाड्यात?’’
‘‘तुम्ही महत्त्वाचे कथाकार आहात. मतपत्रिका आल्या का?’’
‘‘आजच आली ना सर, कुणाला द्यायचे सांगा?’’
‘‘येताना घेऊन या.’’
‘‘हो सर नक्की.’’
*
‘‘हॅलोऽऽ ठाले बोलतोय...’’
‘‘नमस्कार...’’
‘‘नमस्कार सर फोन केलात.’’
‘‘हो. तुमच्या पुस्तकाला मसापचा पुरस्कार मीच द्यायला लावला. दुसरे परीक्षक नको म्हणाले होते तरी...’’
‘‘पण सर मला गुणवत्तेवर दिल्याचे सांगितलेय.’’
‘‘म्हणावे लागते. मीच द्यायला सांगितला. मतपत्रिका आली का?’’
‘‘आली सर. मग?’’
‘‘ती पत्रिका माझ्याकडे पाठवायची’’
‘‘पण...’’
‘‘पण-बीण काही नाही. ते सानप विदर्भातले. त्यांना नाही मतं द्यायची. तुम्हाला पुरस्कार दिला होता. हे ध्यानात ठेवा. संमेलनाला या. पत्रिका घेऊन.’’
‘‘हूंऽऽ’’
अशाप्रकारचे फोन महाराष्ट्रभर प्राचार्य ठाले यांनी केले. अंबाजोगाईच्या साहित्य संमेलनात अनेक मतदारांनी भेटून मला सांगितले, ‘‘ठालेंना मतपत्रिका दिली बरं का!’’ किशोर सानप साहित्यातला बाप माणूस; पण नाविलाज. प्राचार्य ठालेंनी मसाप व बीड शिक्षण विभाग (जि. प.) आयोजित साहित्य संमेलनाचा उपयोग हुशारीने किशोर सानप या दिग्गज समीक्षकास पराभूत करण्यासाठी केला हे मात्र खरे!
प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांचे लक्ष्मीकांत देशमुखावरचे हे प्रेम आजचे नाही; ते फार पूर्वीचे आहे. दहा वर्षापूर्वी लक्ष्मीकांत देशमुख मराठवाड्यातून बदलीने कोल्हापूरला गेले. 
प्राचार्य ठालेंना मी पंधरा-वीस मतपत्रिका दिल्या तेव्हा ठाले मला म्हणाले होते, ‘‘माझ्याऐवजी कोल्हापूरला असलेल्या लक्ष्मीकांत देशमुख यांना मसापच्या कार्यकारीणीत स्वीकृत सदस्य घेतले.’’
नांदेड येथे संपन्न झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही श्री. देशमुखांना ठालेंनी दिले होते आणि त्यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलन बडोदा येथील अध्यक्षपदासाठी प्राचार्य ठालेंनी प्रचंड मेहनत घेतली होती. या दोघांचे नाते असे घट्ट आहे. एका सनदी अधिकार्‍याने ठालेंच्या मदतीने मराठीतील दिग्गज, दखलपात्र साहित्यिक डॉ. किशोर सानपांचा पराभव केला. डॉ. किशोर सानप हे वंजारी समाजाचे तर प्राचार्य ठाले हे ‘मराठा’ समाजाचे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मतदार यादीत मराठा-ब्राह्मण यांची नव्वद टक्के मते तर किशोर सानप यांची फक्त सात-आठ मते. एकूण काय तर एका मराठ्याने (ठाले) वंजार्‍याचा (सानप) फक्त पराभव केला.
*
शाखा तिथे वाद...
इंग्रजाने दान केलेली नीती ‘फोडा, झोडा आणि राज्य करा’ याचे तंतोतंत पालन प्राचार्य ठाले करतात. मराठवाडा साहित्य परिषद हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या चळवळीचा इतिहास असलेली. हा खरे तर ऐतिहासिक मोठेपणा आहे. त्याच्या शाखा गावोगाव असायला हव्यात पण तसे घडले नाही. प्राचार्य ठाले ‘मसाप’ कार्यालयात तीस वर्षे कार्यरत आहेत असे ठामपणे सांगतात. मग फक्त पंधरा शाखाच कशा काय? खरेतर प्राचार्य ठालेंचे ‘कौतुक’ करावे तेवढे कमीच. ‘वीस वर्षात पंधरा शाखा’ याचेही राजकारण होते आहे. त्यातही काही शाखा प्रत्यक्षात आहेत तर काही शाखा कागदावरच! तर काही वर्धापनदिन व्याख्यानमालेचा खर्च प्राचार्य ठालेंनी त्या शाखेत दिला की, त्या जिवंत होतात.
*
मसापच्या शाखा मुळातच दहापंधरा. त्याचा बोन्साय ठालेंनीच केलाय. पंधरा वर्षापूर्वी मसाप शाखेतून चौदा-पंधराजण बिनविरोध निवडून येत. उरलेल्या तीन-चार जागेसाठी निवडणूक व्हायची. त्यामुळे कमीतकमी शाखा, त्याही यांच्याच ताब्यात राहणार्‍या. उदा. धारुर, जि. बीड येथे शाखा आहे. प्राचार्य ठाले तिथे प्राध्यापक असल्यापासून ते निवृत्त झाले तरीसुद्धा शाखा आहे. एवढी जुनी शाखा, एकही मसापचा कार्यक्रम न घेणारी, कागदावरची मसाप शाखा. मतदानासाठीचीच उरली आहे. 40-50 मते हक्काची. मराठा जातीची. ती सर्व ठालेंच्या घरी येतात. आता याला ‘बोन्साय’ नाही तर काय म्हणायचे? शाखा वाढू द्यायच्या नाहीत, तो मतदारसंघ (साखर कारखाना निवडणुकीसारखेच) आपल्या ताब्यात ठेवायचा, विजयी व्हायचे. शाखांची वाढ थांबली. पर्यायाने साहित्य चळवळीला खंडित करायचे काम ठालेंनी निवडणुकीच्या राजकारणापायी केले. सध्या कागदावरच्या शाखात बीड, जालना, केज, शिरुर, लातूर, उदगीर या शाखा शेवटच्या घटका मोजत आहेत. आम्ही उत्साहाच्या भरात शिरुरकासारला शाखा स्थापन केली. खर्च करुन उद्घाटन घेतले. कार्यक्रम घेत होतो. आजपावेतो एक रुपयाची कसलीच मदत शाखेला ठरवून केली नाही. नांदेड, परभणी, उस्मानाबाद या शाखांना हजारोंनी मदत केली जाते. हा दुजाभाव ठालेंनी केलाय. शिरुरची शाखा कार्यवाह दादा गोरेंनी बरखास्त केली होती. घटनेत नसलेले नियम काढायचे आणि नको असलेल्या शाखावर कुर्‍हाड चालवायची. त्यांना आजीव सभासदांची यादी करुन दिली अन् भांडून शाखा जिवंत ठेवली. असे हे महाशय. फोडा झोडात यांना डिलीट प्रदान करायला हवी.
*
असे आहेत गटतट
* केज - ईश्वर मुंडे + गदळे, गुंड
* बीड - सतीश साळुंके + सोपान सुरवसे, विजय जावळे
* लातूर - शेषराव मोहिते, योगीराज माने + गोविंद कुलकर्णी, विनय अपसिंगेकर
* अंबाजोगाई - दगडू लोमटे, अमर हबीब + दिनकर जोशी, डॉ. नागरगोजे
* नांदेड - जगदीश कदम + सुरेश सावंत
* परभणी - देविदास कुलकर्णी + आसाराम लोमटे
* जालना - संजीवनी तडेगावकर + जयराम खेडेकर
* उस्मानाबाद - तावडे + शेख
* माजलगाव - कमलाकर कांबळे + प्रभाकर साळेगावकर
* शिरुर - अनंत कराड + विठ्ठल जाधव.
अशापद्धतीने सगळीकडे कोंबड्यांना झुंजायला लावतात. भांडणारे सर्वजण ठालेंना आळीपाळीने भेटतात. येथे वाटणी करणारे माकड या कथेतल्या माकडासारखे भांडखोरांसोबत वागून स्वार्थ साधतात. म्हणून म्हणतो, ठाले फोडा, झोडा नीतीत पारंगत झालेत.
पाचशे रूपये आजीव सभासद वर्गणी होती. ती वाढवत गेल्या तीन वर्षापूर्वी रुपये तीन हजार रूपये केली. आजीव सभासदांची संख्या ठालेंनी महाविद्यालये, शाळा आणि नातेवाईक यातल्या सग्यासोयर्‍यांचा प्रचंड भरणा करुन ठेवलाय. म्हणून तर मसापची महत्त्वाची पदं मराठा जातीला दिलीत. ठाले जातीभिमानी आहेतच. अध्यक्ष -ठाले (मराठा)
कार्यवाह - गोरे (मराठा)
पुरस्कार कमिटी - मोहिते (मराठा)
प्रतिष्ठान संपादक - लोमटे (मराठा)
*
मसाप संमेलनात सर्वाधिक वर्णी मराठा लेखकांची. 
जणू रतीबच.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही मराठा जातीच्या लेखकांची वर्णी.
हे पदाधिकारी त्यांच्या बायकांचीसुद्धा संमेलनात, कार्यक्रम पत्रिकेत वर्णी लावतात आणि त्यांचे चेले संमेलनभर सांगत सुटतात, ‘‘वहिनीचे भाषण जोरदार झाले.’’ टाळ वाजवणार्‍यांची संख्या खूप वाढलीय. प्रत्येक जिल्ह्यात यांनी बॅगा उचलणारे, सर्व सोयी करणारे अशा लेखकांची फळी तयार केलीय.
*
काळा दिवस
मसाप औरंगाबाद सोडून इतर साहित्य संस्था वाचक, रसिकांनी ऑनलाईन आजीव सभासद व्हावे म्हणून आवाहन करतात. पैसे भरा सभासद व्हा, अशी भूमिका घेत आहेत अन् आमच्या मसापने तीस वर्षे मसाप असलेल्या ठालेंना परस्सर आजीव सभासद करुन घेतलेले चालत नाही. मी एप्रिल-मे दरम्यान 16 आजीव सभासद केले. कोशाध्यक्ष मी होतो. सह्या करुन पावत्याही फाडल्या. पैसे मसाप खात्यावर जमा झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत मी ज्येष्ठ समीक्षक डॉ. किशोर सानप यांची बाजू जाहिरपणे घेतली. त्याचा राग ठालेंना आला. ठालेंच्या बगलेत बसलेल्या दादा गोरेंनी या रागावर जातीचे विष पेरले अन् माझे पद काढून घेण्यासाठी बायकी कारणांचा बागुलबुआ उभा केला. फिल्ंिडग जोरदार लावली. ठाले-गोरेचे चेले कामाला लागले. अंबाजोगाईच्या साहित्य संमेलनाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्याचे उग्र रुप दिसले. ठालेंच्या कारभाराची चिरफाड करणारे निनावी पत्र मराठवाडाभर आजीव सभासदांना आले होते. ते पत्र मी लिहून पाठवल्याचा आरोप दादा गोरेंनी केला. त्यावर घमासान चर्चा झाली. काही झेलीराम तर मला शिक्षा करावी अशी मूर्खपणाची मागणी करु लागले. ठालेभक्त बैठकीत माझ्यावरच बोलू लागले. त्यात अगदी होऊ घातलेल्या 40 व्या मसापच्या नियोजित संमेलनाचे अध्यक्ष डॉ. हृषिकेश कांबळेही होते. साप सोडून दोरीला बडवण्यात भक्तांमध्ये स्पर्धा लागली होती आणि तिथेच ठराव घेतला गेला, ‘‘डॉ. भास्कर बडेंनी 16 आजीव सभासद केलेत. त्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव सभागृहात मांडत आहे.’’
ठराव माझे मत सोडता मंजूर झाला. रद्द केलेल्या आजीव सभासदांच्या पावत्या रद्द केल्याचे पत्र आणि तीन हजाराचे चेक पोष्टाने कार्यवाह गोरेंनी तातडीने पाठवले. तो मसापच्या इतिहासातील काळा दिवस ठाले-गोरेमुळे घेण्यात आला तर कार्यकारीणी सदस्यांनी डोळ्यावर पट्ट्या बांधल्या होत्या. बहुमताच्या पुढे काय चालणार? तो काळा दिवस मसापच्या इतिवृतात नोंदला गेलाय.
सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा मूर्खपणा कार्यकारिणीने घेतला.
*
अपमानच वाट्याला
तीनही निवडणुकात मी आघाडीवर होतो. मतपत्रिका गोळा करण्यात हातखंडा. खूप पळायचो. बाकी कोण पळाले ते ठालेंनी छातीवर हात ठेवून सांगावे. मराठवाडाभर जुना-नवा मतदार ओळखीचा झालेला. मराठवाडाभर प्रवास केला. त्यासाठीचा खर्च ठालेंनी विचारला नाही, मी कधी मागितला नाही. मुरुड, बीडमधील दोन्ही लेखिका संमेलने, कडा येथील संमेलन यासाठी मी धावपळ केली. संयोजक तयार करणे, त्यांना मदत करणे, अगदी सोयगावच्या संयोजकाना मदत केली. खरे सांगायचे तर मी मसापमय झालो होतो...
हे कार्य करताना ठालेपुरस्कृत अपमानही वाढतच चालले. मग मात्र मसाप सोडावी वाटायची. मी शिफारस केलेली नावे न स्वीकारणे, साक्षात स्वागत कार्यक्रमात माझ्याकडच्या नावांना डावलणे, प्रतिष्ठानला कवितांची शिफारस  मी केली तरी निर्णय न घेणे, नंतर बिनलाजेपणाने हरवल्या म्हणणे या व अशा घटना आसाराम लोमटे संपादक झाल्यानंतरच्या आहेत. जालना, सोयगाव, नांदेड आदी संमेलनात मी शिफारस केलेली नावे कचराकुंडीत टाकणे, अखिल भारतीय संमेलनासाठीची एकही शिफारस स्वीकारली नाही, लिखित कळवूनही पाहिले तरी त्यांचा निगरगठ्ठपणा जाईना. मी पदावर असल्याची मला लाज वाटू लागली. आपण पदाधिकारी असून कोणालाच न्याय देऊ शकत नाही... डोकं भन्न व्हायचं. कशाला पदावर बसलोत असं पदोपदी वाटायचं. हे पद मला शेळीचे शेपूट वाटू लागले. या शेपटाने लाज राखता येईना अन् माशाही हाणता येईना. माझी चिडचिड वाढत गेली. ठालेंनी ठरवून डोळेझाक केली कारण आ. सतीश चव्हाणांनी फोडलेला घाम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने वाळला होता अन् ताज्या घोड्यावरच्या गोमाशा मिळाल्या होत्या. त्या रिंगणात ठाले अडकले होते. ठालेंना विजयाची नशा चढली होती. तीन निवडणुकांचा अनुभव सांगतो. ठालेंना गरज पडू द्या, ते लोटांगण घालू शकतात. इतका ‘नम्ब्री’ माणूस आहे. एकमात्र खरे, आ. चव्हाणच मसापतून ठाले अँड कंपनीला सहज घालवू शकतात.
अंबाजोगाई साहित्य संमेलनातील माझ्या सहभागाला विरोध केला. गोरेंनी माझ्या नावाला विरोध करुन स्वतःच्या पत्नीचे नाव घेतले. माझ्या जिल्ह्यात माझ्या नावाला विरोध; तेही मी कोशाध्यक्ष असताना. कशासाठी पदावर रहायचे? हा प्रश्न मनाला बोचत होता. अंबाजोगाई संमेलनातच्या उद्घाटनात दोघांनी स्वतःचे सत्कार घेतले तर उपाध्यक्ष किरण सगर आणि माझा सत्कार कार्यकर्त्यांसोबत टाकला. ठराव वाचनातले नाव गाळून टाकले. एकूण अपमानाचा रतीब माझ्या वाट्याला येतच होता. पुढे बदल होईल या आशेवर अपमान पचवत होतो.
*
माजी आमदार उषाताई दराडेंना गळ घालून लेखिका संमेलन घ्यायला लावले. महिनाभर संमेलनासाठी धावपळ केली. स्वखर्चाने, उत्तमरित्या संमेलन पार पडले. उद्घाटनाच्या सत्रात अध्यक्ष ठालेंनी एका सदस्याचे पोटभर कौतुक केले, मात्र माझ्या नावाचा पदाधिकारी असूनही उल्लेख केला नाही. या वागण्याला बेरकी नाही म्हणावे तर काय म्हणावे? सोयगाव संमेलनात माझे नावच गाळून टाकले. चौकशीअंती कळाले, ठालेंनी गाळायला सांगितले. ठालेंच्या या फालताड पराक्रमाचा राग येत होता.
*
अपमानच...
माझी कोषाध्यक्षपदी निवड झाली आणि लगेच एक ठराव घेऊन माझे पंख छाटले. यापूर्वी चारही पदाधिकारी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य असायचे. तो ठराव कार्यकारिणीचे सदस्य आसाराम लोमटे यांना मंडळावर पाठविण्यात येत आहे, कोशाध्यक्षाचा पत्ता, माझा पत्ता कट केला. अशा चालबाजांनी मी वैतागलो होतो. अध्यक्ष ठाले, कार्यवाह गोरेंनी दोघांसाठी एसीसह महागडे फर्निचर करुन घेतले. मला वाटले उपाध्यक्ष-कोशाध्यक्षासाठीही फर्निचर मागवतील. तयार करुन घेतील! पण छे! वर्षभर पाठलाग केला तरी फर्निचर सोडा साधी खुर्ची, टेबल, कपाटसुद्धा नाही. इतर पदाधिकारी आपल्यापेक्षा मोठे होऊ नयेत, त्यांना सभासदांनी आपुलकी देऊ नये अशा स्वभावाचे ठालेसर आहेत. आजही उपाध्यक्ष-कोशाध्यक्षाला स्वतंत्र खुर्ची, टेबल, कपाट नाही. ही दोन्ही पदं स्टँम्पसारखी पूर्वी वापरली. मी विरोध केला. मला पदावरुन हटवले अन् पूर्वीचे देवीदास कुलकर्णी यांनाच कोशाध्यक्ष केले. कुलकर्णीचा तो स्वभाव आहे. असो! कोणी कसे वागावे तो ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. मला हा अपमान नाही सहन झाला. म्हणून दोन हात केलेत. मसापत फारच रामराज्य चालल्याचा आव ठालेसर आणत आहेत. पूर्वी ठाले सर्वसमावेशक वागायचे परंतु दादा गोरेसारखा विषारी माणूस सोबतीला घेतल्यापासून ठाले बिघडले... जात, जात असं बरळू लागले.
कोर्‍या चेकवर सह्या करण्याशिवाय मला पर्याय नव्हता. सहनशीलता संपली आणि चेकवर खर्चाचा आकडा टाका, तरच सही करणार अशी ठाम भूमिका घेतली. ही भूमिका त्याच्या जिव्हारी लागली अन् राक्षसी मताने मला कोशाध्यक्ष पदावरुन मी बैठकीत नसताना हटवले. असे छानछान मसापात सुरु आहे. कौतुकरावाचे कौतुक काय करावे? सांगावे तेवढे वाढतच जाते! त्यांच्या कार्यावर ‘कौतुकचालिसा’ ग्रंथ होऊ शकतो.
चपराक दिवाळी महाविशेषांक २०१८ 

No comments:

Post a Comment