Tuesday, December 1, 2015

पाऊस........आठवणीतला !!!


तो पूर्वी नियमित यायचा; कधी कल्पना देऊन तर कधी आगंतुकासारखा! पण आता लहरी झालाय तो. येत नाही; आता राहीलाय शिल्लक फक्त आठवणीत. त्याची खूप रूपे अनुभवलीत कळायला लागल्यापासून! पहिल्यांदा कधी भेटला ते नाही सांगता येत नक्की पण तो आठवणीत खोलवर रूतलाय एवढं मात्र नक्की. कधी पडायचा झिमझिम, संथ, मंद लयीत. जणू त्याच्या सहस्त्र धारांनी गोंजारायचा अंगअंग. तर कधी झोडपून काढायचा आडवा तिडवा; आई रागावली की झोडपते तसं. तो तसा पूर्ण सुखदही नव्हता आणि पूर्ण दुःखदही. कधी असा तर कधी तसा.
तो जेव्हा आगंतुकासारखा यायचा ना तेव्हा त्याचं येणं खूप आनंददायी भासायचं. आभाळात लख्ख ऊन पडलेलं असायचं. दुपारची शाळा भरायची वेळ झालेली. जेवण उरकून आमचा घोळका शाळेकडे रमत गमत निघालेला किंवा दुपारच्या मध्यांतरात आमचा मैदानावर खेळाचा डाव रंगलेला असायचा. तो यायचा; अचानक ध्यानीमनी नसताना. कोण तारांबळ उडायची, एकच गलका, त्याच्यापासून बचावासाठी पळापळ. त्या ही धांदलीत कोणीतरी ओरडायचं, ‘‘ए, चिमणीचं लगन लागायल की असला पाऊस पडतय बाळ!’’ तो जेवढ्या वेगाने आला तेवढ्याच त्वरेने थांबायचाही. तेवढ्याच वेळात चिंब भिजवून मात्र काढायचा. तो गेला की कुणाचीतरी नजर इंद्रधनुष्याच्या सुंदर कमानीवर पडायची. सोबतच एक आनंदभरीत चित्कार, ‘‘ए, ते बघ.’’ सर्वांच्या माना वळायच्या तिकडे. काही वेळ मग तो गलका चालायचा. आपसुकच मग वर्गात पोहचायला उशीर आणि छडीचा प्रसाद. तरी पण त्याचं ते येऊन जाणं इतकं सुखद असायचं की छडी लागायचीच नाही.
 जेव्हा तो आगमनाची वर्दी देऊन यायचा ना तेव्हा मात्र तो तितकासा सुखद भासायचा नाही. आभाळ झाकोळून यायचं, काळेभोर ढग आणि लकाकणार्‍या वीजा. सोबतीला ढगांचा गडगडाट. आभाळ झाकोळायला लागलं की विचीत्र कालवाकालव सुरू व्हायची मनात; उदास वाटायचं, कधी एकदा हे मळभ दूर होईल असं वाटायचं.
 बरेच दिवस कळतच नव्हतं असं का होतय. पावसानं सार्‍यांची मनं प्रफुल्लीत झालेली असायची. तेव्हा मी मात्र विमनस्कपणे पावसाकडे बघत रहायची. नकोनकोसा वाटायचा तो पाऊस अन् ते वातावरण. एक दिवस अचानकच कारणाचा उलगडा झाला. त्या दिवसापासून आभाळ झाकोळल्यानंतर होणारी माझी तगमग कायमची थांबली.
आईवडीलांचं पहिलं अपत्य मी. आईवडील खेड्यातले आणि आजोळ शहरातलं. म्हणजे तालुक्याचं ठिकाण. आजोळी इंग्रजी माध्यमाची नवीन शाळा सुरू झाली आणि माझी रवानगी वयाच्या तिसर्‍या वर्षीच इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी आजोळी झाली. दोनेक वर्ष काढली आजोळात; शाळेत कमी आणि दवाखान्याच्या चकरा करण्यात जास्त. शेवटी डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; ’लेकरू हळवं आहे, आईवडीलांपासून दूर ठेवू नका, आपोआप होईल तब्बेतीत सुधारणा.‘ झाली आमची रवानगी इंग्रजी माध्यमाच्या झकपक शाळेतून गावाकडच्या झेड. पी. च्या शाळेत.
शाळा आठवते अजूनही स्पष्ट. शाळेला दोन खोल्यांची इमारत (?) आणि समोर व्हरांडा. एका खोलीत पार्टीशन करून कार्यालय आणि एक वर्ग भरायचा दुसर्‍या खोलीत. एक वर्ग, खोल्यांसमोरच्या व्हरांड्यात दोन वर्ग; अशी चार वर्गांची सोय व्हायची. मग उरलेले तीन वर्ग; पहिली, दुसरी आणि तिसरी सेवा सोसायटीच्या गोदामात एकत्रच. थोड्या थोड्या अंतराने बसवले जायचे. अध्यापन करणारे आमचे गुरूजी आणि अध्ययन करणारे आम्ही विद्यार्थी सारेच धन्य धन्य! माझी अवस्था तर हरितगृहातील कुंडीतून उपटून उघड्या बोडक्या, खडकाळ माळरानावर एखादं रोपटं लावावं तशी.
या सार्‍या नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायचा माझा केविलवाणा प्रयत्न चालू होता. नुकताच जून महिन्यात शाळेत प्रवेश झालेला. दिवस पावसाळ्याचे. गावातलं सगळं पाणी वाहत येऊन शाळेच्या मैदानात जमायचं आणि तसंच पुढे वाहत जाऊन शाळेच्या खालच्या बाजूने वाहणार्‍या ओढ्याला जाऊन मिळायचं. त्या दिवशीही दुपारी असाच खूप मोठा पाऊस आला. गावातून वाहत आलेल्या पाण्याचा मोठा प्रवाह शाळेच्या मैदानातून ओढ्याकडे झेपावू लागला. शाळेची इमारत गावाच्या शेवटी होती. पाण्याच्या प्रवाहानं शाळा गावापासून वेगळीच केली. शेतातून परतणारी गुरं, माणसं अन् शाळा प्रवाहाच्या या कडेला अन् विरूद्ध कडेवर गाव. प्रवाहाची खोली कमी असली तरी रूंदी खूप जास्त होती. शहराच्या आखिव रेखीव परिवेशातून आलेल्या माझ्या नजरेला ते दृश्य नवीन होतं. भयचकित नजरेनं मी ते दृश्य न्याहाळत होते. बाकी सारी शाळा पावसाचा आनंद घेत होती. तितक्यात एक शेळीचं पिल्लू चुकून पाण्यात पडलं आणि वाहून जाऊ लागंल.
त्याला पकडायला त्याचा दहा बारा वर्षाचा मालक लगोलग पाण्यात शिरला. अलगद त्या शेळीच्या पिलाला पकडून त्याने छातीशी कवटाळलं आणि दुसर्‍या कडेला गेलाही. पाण्यात शिरलेला तो पोरगा, त्यानं पोटाशी कवटाळलेलं ते शेळीचं पिल्लू, त्या पोराच्या कमरेपर्यंत येणारा पाण्याचा प्रवाह! झालं, मी मोठ्यानं रडायला सुरूवात केली. माझ्या बालनजरेला तो तीनेक फुट खोल पाण्याचा प्रवाह खवळलेल्या समुद्रासारखा वाटत होता. कदाचित माझ्या पावसाविषयीच्या नावडीला या आठवणीचा संदर्भ असावा.
 दुसरी अशीच आठवण एकोणीसशे ब्याऐंशीच्या अतीवृष्टीची. आई आणि मी एक रात्र एका पाहुण्याकडे मुक्कामाला होतोत. घरापाठीमागून एक मोठा ओढा वहायचा. सायंकाळी सर्व काही ठीकठाक होतं. अर्ध्या रात्रीनंतर मात्र त्या घराची पाठभींत गायब झाली. जीव मुठीत धरून ओसरीत कुडकुडत रात्र काढलेली अस्पष्टशी आठवते.
 पुढे वाढत्या वयाबरोबर त्याचं महत्त्व पटत गेलं. उदास का वाटेना मनाला पण तो वेळच्यावेळी यायला हवा हे बुद्धीला पटायला लागलं पण तो वरचेवर कमी कमी होत गेला. या अलीकडच्या दोन तीन वर्षात तर इतका दुर्मिळ झालाय की त्याच्या जराशा डोकावून जाण्याचीही आता बातमी होते.
 पूर्वी त्याच्या आगमनाचं फारसं स्वागत वगैरे नव्हतं कुणी करत कारण तो आपलाच होता, जिव्हाळ्याचा होता. सहज, आत्मीयतेने, नियमित यायचा. नाही म्हणायला आई मिरगाचा लाल लुसलुशीत  किडा दिसला तर हळद कुंकु तेवढं वहायची. आता मात्र तो जरा कुठं डोकावला म्हटलं की त्याला उतरवून घ्यायला विमान काय, रडार काय, शास्त्रज्ञांची फौज काय! पण मानवाच्या सगळ्या प्रयत्न, विनंत्या अन् अर्जवांना भीक घालणं बंद केलंय त्यानं. तो हुलकावणी देत, चकवत रहातोय. झड, मुसळधार, धोधो हे शब्द आता शब्द कोशातच बंदिस्त होणार की काय अशी भीती वाटते.
  अत्यंत प्रगत अशा माया संस्कृतीचा विनाश त्याच्या न येण्यानं झाल्याचं कुठंतरी वाचलं होतं; ते आठवतं. मन चिंतेनं भरून येतं. हा असाच हुलकावत राहीला; आलाच नाही तर?
 कसा पोहचवावा निरोप त्याच्यापर्यंत? खूप चुकलोय रे आम्ही! करतो सगळ्या चुका दुरूस्त पण तू ये; पूर्वीसारखाच आपुलकीने, प्रेमाने; पुन्हा एकदा भीजव, चिंब चिंब होऊ दे. मानव जातीशी तुझा स्नेह कायम राहू दे, युगायुगांपर्यंत!!
भेगावलेल्या भूईतून उगवलेले
शेकडो शेकडो हात
दीनपणे तुझ्या पुढे पसरलेले
दुर्लक्षू नकोस त्यांची याचना
युगायुगांच नातं तुझ्याशी जोपासणारी धरणीमाता
लेकरांच्या चिंतेनं व्याकुळ, सैरभैर
तुझ्या सहस्त्र बाहूंनी
तिला घे कवेत अन्
संपू दे हा विरह ...........जीवघेणा !!

-विद्या बयास /ठाकुर
शिरूर ताजबंद, ता. अहमदपुर, जि.लातुर 413514
भ्र. 7038665684


बोल कौतुकाचे

सुवर्णाक्षरे
माणसाचं मन खरंच अनाकलनीय असतं. कधी तो छोट्या गोष्टींसाठी राईचा पर्वत करून भांडत बसतो तर कधी पैशाला महत्त्व देईल आणि जिथून खरंच पैसे मिळवता येतील तिथे तो पैशावर पाणी सोडतो. कुणाच्या तरी शब्दाखातर... माणसाला यशस्वी होण्यासाठी, कर्तृत्व फुलवण्यासाठी आयुष्यात पाठीवर थाप ही फार महत्त्वाची. म्हणूनच ‘कणा’ या कुसुमाग्रजांच्या कवितेतील विद्यार्थी गुरूजींना म्हणतो.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊनि नुसते लढ म्हणा
आणि कर्तृत्व फुललं, कुठल्याही कार्यात यश मिळालं की होणारं कौतुक हे फार महत्त्वाचं. कौतुकामुळे उत्साह वाढीला लागतो आणि कौतुक केलेेलं प्रत्येकाला हवंहवंसं वाटतं.
आपल्या बालपणात डोकवा बरं जरा. आठवा आपण काही चांगलं काम केलं, आईला कामात मदत करून तिचं काम कमी केलं तर ती जरी काही बोलली नाही तरी तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारं कौतुक जाणवलं की काम केल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं. काम करण्यासाठी उत्साह यायचा. कॉलेजमध्ये गुरूवर्यांनी केलेले कौतुक, मित्रमैत्रिणींनी केलेले कौतुक यामुळे विद्यार्थी दशेत प्रगतीपथाची वाटचाल आनंददायी होते. परिवारात, संसारात घरच्यांनी केलेले कौतुक जीवन आनंददायी करतं. आपण घरच्यांसाठी आहोत आणि घरातले आपलेच आहेत ही भावना जपली जाते. घरातल्या लहानग्यांचं आपण कौतुक करतो. मुलं चुकली तरी त्यांच्या प्रयत्नांचं, धडपडीचं कौतुक करतो आणि त्या कौतुकाच्या बोलानं मुलं अपयशावर मात करत पुढं पुढं चालत राहतात. कौतुकाचे बोल त्यांना उभारी देतात.
ज्याप्रमाणे खासगी आयुष्यात, परिवारात, मित्रमैत्रिणींकडून माणसाला जशी कौतुकाची भूक असते तशीच व्यावसायिक जीवनातही असते. बॉसचे कौतुकाचे दोन बोल कर्मचार्‍याचा उत्साह द्विगुणीत करण्यास निश्‍चितच सहाय्य करतात. खरं पाहिलं तर आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो तो उदरनिर्वाहासाठी, अर्थार्जनासाठी आणि सगळ्यांनाच आपापल्या आवडीचा व्यवसाय वा नोकरी मिळेलच असे नाही. थोडेच भाग्यवान असतात की ज्यांना आयुष्यात जे करायचं होतं ते इप्सित साध्य होतं. खूपदा माणूस ठरवतो काही आणि घडतं काही. खूपदा खूपजण ठरवतात की, डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर व्हायचं. कलाप्रांतात यश मिळवायचं पण आर्थिक अडचणी, आयुष्याला कलाटणी देणार्‍या घटना घडणे, घरातल्या कर्त्या पुरूषाचे निधन, त्यामुळे अचानक येऊन पडणारी कुटुंबाची जबाबदारी, त्यामुळं अर्धवट सोडावं लागणारं शिक्षण आणि मूळ आवड सोडून जमेल ती नोकरी, व्यवसाय अर्थार्जनासाठी करावा लागतो आणि तो मग आवडीचे काम मिळाले नाही म्हणून निराश न होता मिळेल ते काम आवडीने करतो. मग असं काम चांगलं केल्यावर त्याचं कौतुक झालं तर? हे कौतुक त्याला समाधानही मिळवून देते पण असं फार कमी वेळा घडतं. नोकरी करणार्‍यांना तर हे निश्‍चितच जाणवत असेल! काही चुकलं तर बॉस रागवायला अजिबात विसरत नाही पण खूप चांगलं, व्यवस्थित काम केलं, कमी वेळात उल्लेखनीय काम केलं तर बॉस कौतुक करेलच असं नाही. चांगल्या कामाचं कौतुक केलं तर कर्मचार्‍यांचा उत्साह वाढतो. तो जोमाने काम करतो. त्याला श्रमाचं चीज झाल्यासारखं वाटतं!
कौतुक कुठल्या गोष्टीचं करावं? आवडलेल्या, भावलेल्या कुठल्याही गोष्टीच करावं! एखाद्या नृत्याचा कार्यक्रम झाला, आपण नर्तिकेचं कौतुक केलं की तिचा उत्साह वाढतो. कवितेचा कार्यक्रम झाला, आवडलेल्या कवितांचं कवींजवळ कौतुक केलं की त्यांनाही बरं वाटतं. विविध कार्यक्रम होत असतात. ते यशस्वी होण्यामध्ये सूत्रसंचालकाचा सिंहाचा वाटा असतो. सूत्रसंचालक छान चारोळ्या, शेर, चांगली वाक्यं प्रसंगावधान राखून पेरत असतो. काही प्रासंगिक, समर्पक शेर मारून, कॉमेंटस् करून कार्यक्रमाची लज्जत वाढवतो. याचं श्रेय त्याला दिलं, थोडे कौतुकाचे बोल ऐकवले की त्याच्या चेहर्‍यावर कार्यक्रमाचे सार्थक झाल्याचे स्पष्ट दिसते, जाणवते.
एकदा मी शिवनेरीने मुंबईहून पुण्याला आले. चालकाने गाडी अगदी वेळेत व छान, सुरक्षित चालवत आणली. मी गाडीतून उतरताना त्याचे कौतुक केले. ‘तुम्ही छान, सुरक्षित, वेळेवर आणलीत गाडी’. त्यावर ‘कौतुक केल्याबद्दल तुमचेही आभार’ तो म्हणाला.
अशाप्रकारे कौतुक हे उत्साहवर्धक टॉनिक आहे. आपण दुसर्‍यांसाठी कौतुकाचे बोल वापरायला हरकत नाही. चला तर आजपासून सुरूवात करूया!
- सुवर्णा जाधव 

(साप्ताहिक चपराक, पुणे)
www.chaprak.com

Wednesday, November 18, 2015

बालचित्रकर्ती ऋचा पोतदार

ऋचा पोतदार या अवघ्या नऊ वर्षाच्या चित्रकर्तीनं चित्रकला क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नामवंत चित्रकारही हरखून जातील इतकी छान चित्र तिनं साकारलीत. आजवर वेगवेगळ्या स्पर्धातही तिनं घवघवीत यश मिळवलंय. सुप्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका अंजली कुलकर्णी यांनी ‘चपराक’च्या वाचकांना करून दिलेली ऋचाची ही ओळख.
 
बालचित्रकर्ती ऋचा पुष्कराज पोतदार. वय वर्षे नऊ. प्रसिद्ध ग्रामीण कथाकार श्री. बबन पोतदार यांची नात. इव्हेंटस्चे मॅनेजमेंट बघणारे पुष्कराज आणि वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या डॉ. दिप्ती यांची एकुलती एक लाडकी कन्या. मात्र लाडकी असली तरी लाडावलेली नाही तर गुणांनी लगडलेली सुपुत्री.
घरात साहित्य संस्कृतीचा दरवळ झेलतच ऋचा वाढते आहे. त्यामुळे कलागुणांची जोपासना करण्याचं बाळकडू तिला घरातंच मिळालंय. चित्रकलेचा वारसा तिला तिच्या आजोळच्या घराण्याकडून मिळाला. सध्या ऋचा श्री श्री रविशंकर विद्यामंदिरात चौथ्या इयत्तेत शिक्षण घेत आहे; मात्र तिनं साकारलेली सुंंदर सुंदर चित्रं बघितली तर लक्षात येतं की, चित्रकलेतली तिची इयत्ता फार वरची आहे. केवळ नऊ वर्षांच्या मुलीनं चितारलेली ही चित्रं आहेत, यावर विश्‍वास बसू नये एवढी जिवंत आणि रसरशीत चित्रं ऋचानं काढली आहेत.
अवघ्या तिसर्‍या वर्षी ऋचानं बोटात कुंचला पकडला. सुंदर सुंदर रंगांच्या रेघोट्यांनी तिला मोहून टाकलं आणि तेव्हापासून ऋचा रंगांच्या दुनियेेत मनापासून रमू लागली. तिच्या आईबाबांनी तिची चित्र काढण्याची आवड ओळखली आणि चित्रकलेचं सामान तिच्यासमोर ठेवलं. बाबांनी कॅनव्हास आणून दिला. ऋचा हरखूनच गेली. ऑईल पेस्टल, वॉटर कलर, पोस्टर कलर, चारकोल, ऍक्रॅलिक अशा विविध प्रकारांमध्ये ती स्वतःची चित्रकला खुलवू लागली. तशी जात्याच ती गुणवान पण आईने आवर्जून करून घेतलेल्या सरावामुळे आणि महालक्ष्मी पवार, बापू घावरे, स्वप्ना जोशी, सुहास पंडित, आदित्य बेगमपुरे, जयंत बेगमपुरे अशा मोठ्या कलाकारांच्या मार्गदर्शनामुळे ऋचाच्या बोटांत सफाई आणि नजरेत समज निर्माण झाली. गेल्या सहा वर्षांत या एवढ्याशा चिमुरडीने चित्रकलेच्या क्षेत्रात घेतलेली झेप पाहिली तर आपण थक्क होतो.
ऋचाला नेहरू युवा केंद्र भारत सरकार कला आणि क्रीडा मंत्रालयाने ‘उत्कृष्ठ बालकलाकार’ म्हणून गौरविलं आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार मिळाला आहे. आंध्र प्रदेशच्या अ. भा. चित्रकला स्पर्धेत तिला ‘सुवर्णपदक’ प्राप्त झाले आहे, तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या ‘बालश्री पुरस्कार’ आणि सुवर्णपदकाचीही ती मानकरी ठरली आहे. गुजरात राज्यातील एका सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेतही तिला सुयश मिळाले आहे, तर दै. ‘केसरी’च्या चित्रकला स्पर्धेत तिने पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत तिला पहिला नंबर मिळाला होता तर ‘ऍरेजमेंट इव्हेंटस् मॅनेजमेंट’तर्फे झालेल्या ‘बालमनातील चित्र’ या प्रदर्शनात तिच्या चित्रांचे जाणकारांनी कौतुक केले होते. ‘आर्ट मॅजिक’ नावाच्या संस्थेनं आयोजित केलेल्या प्रदर्शनातूनही सलग दोन वर्षं तिनं उत्साहानं भाग घेतला होता. ‘भारती ऍक्सा’च्या वतीने आयोजित स्पर्धेत तब्बल पाच हजार चित्रांतून तिच्या चित्रांची सार्थ निवड झाली होती; एवढंच नाही तर अवघ्या पाचव्या वर्षी दै. ‘पुढारी’ने तिची पाच चित्रं प्रकाशित केली होती. तसंच श्री शिवाजी स्काऊट ग्राऊंडतर्फे गणेशमूर्ती बनवण्याच्या स्पर्धेत तिने पहिला क्रमांक सोडला नव्हता. त्याशिवाय चिन्मय मिशनच्या गीता पठण स्पर्धेतही तिने उज्ज्वल यश प्राप्त केलं होतं. 

ऋचाची चित्रं बघितली तर साधारणपणे ऋचा निसर्गचित्रांमध्ये अधिक रमते असं दिसतं. निसर्गातले सूक्ष्म तपशील ती अगदी बारकाईनं भरताना दिसते. त्यावरून तिच्या सूक्ष्म निरीक्षण क्षमतेची कल्पना येते. तिची चित्रांची जाणही उत्तम आहे. याशिवाय मानवी चेहरे आणि मानवी आकृती काढण्यातही ती वाकबगार आहे.
चित्रकलेतील ऋचाचा सफाईदारपणा, कष्ट करण्याची तयारी आणि प्रगल्भता खरोखर वाखाणण्याजोगी आहेच परंतु शाळेच्या अभ्यासातही ती बिलकूल मागे नाही. श्री श्री रविशंकर विद्या मंदिरातील शुभांगी करवीर, स्मिता राहणे, जितेंद्र मोडवे, संदीप वानखेडे, दुर्गा मेनपुरे हे शिक्षक तिचे सतत कौतुक करत असतात, तिला प्रोत्साहन देत असतात.
खरोखर अशा शांत, समंजस, हुषार, गुणवान बाल कलावतीचं कौतुक कुणाला वाटणार नाही? ऋचाची कला दिवसेंदिवस अशीच बहरत जावो हेच तिला शुभाशीर्वाद!
 
- अंजली कुलकर्णी, पुणे
99220 72158

Sunday, November 1, 2015

रद्दीवाला आणि बारवालाही संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत

सध्या संमेलनाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो तो उठतोय आणि अर्ज भरतोय. आपला साहित्याशी कसा संबंध आहे हे ठासून सांगतोय. इथून पुढे रद्दीवाले आणि बारवालेही अर्ज भरायला कमी करणार नाहीत. ते ही आपला साहित्याशी असलेला संबंध सांगतीलच. संमेलनाच्या समकालीन वास्तवावर खुशखुशीत शैलीत भाष्य करणारा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते प्रा.मिलिंद जोशी यांचा हा खमंग लेख! 
आज 'साहित्य चपराक' दिवाळी अंकाचे प्रकाशन पुण्यात होत आहे. मिलिंद जोशी हे आजच्या सोहळ्यातील प्रमुख वक्ते आहेत. त्यांचा या अंकातील लेख मुद्दाम देतोय. अवश्य वाचा. 

साहित्यचावडी येथे आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याची वार्ता पसरली तेव्हा सर्वांनाच आनंद झाला. या संमेलनाचे वेगळेपण म्हणजे मर्तिकाचे (मयतीचे) सामान विकणार्‍या ‘वैकुंठ साहित्य संघ’ या व्यापारी कंपनीला संमेलनाचे यजमानपद मिळाले. तेव्हा अनेकांची बोटे तोंडात गेली. यांचा आणि साहित्याचा संबंध काय? असा प्रश्‍नही विचारला गेला; तेव्हा वैकुंठ साहित्य संघाचे संचालक डॉ. यम म्हणाले, ‘‘साहित्याशी संबंध नसताना पदाधिकारी साहित्य महामंडळावर काम करू शकतात तर आमची पात्रता त्यांच्यापेक्षा जास्त आहे. कारण आम्ही अंत्यविधीचे सामान थेट विकतो. आमचा या ना त्या प्रकारे साहित्याशी संबंध आहे.’’ तेव्हा सर्वांचीच बोलती बंद झाली. महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी साधी नाराजीही व्यक्त केली नाही कारण डॉ. यम ही मालदार पार्टी असल्याने त्यांना दुखावले तर आपल्या फुकटेगिरीला चाप बसेल आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची कंत्राटे मिळणार नाहीत. तीन पानांच्या संहितेसाठी तीस हजार रूपये उकळता येणार नाहीत. म्हणून त्यांनी (फुकटचे) मूग गिळून गप्प असण्यातच धन्यता मानली. कारण समन्वयाशिवाय ‘अनन्वयाचे’ दुकान चालणार नाही, याची त्यांना खात्री होती. साहित्य संमेलनांना मिळणारी अफाट प्रसिद्धी कॅश करण्यासाठी डॉ. यम यांनी वयस्कर साहित्यिकांसाठी एक भन्नाट योजना जाहीर केली. ‘निरोपाचा क्षण जवळ आला आहे हे कळताच आम्हाला फोन करा. तुमची पुढची सगळी व्यवस्था वैकुंठ साहित्य संघातर्फे केली जाईल. तुमच्या  फोटोसह बातम्या छापून आणू. मृत्युलेख प्रसिद्ध होईल याची जबाबदारी घेऊ. श्रद्धांजली सभेचे आयोजन करू. साहित्यिक इतमामात (अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत) तुमचे अंत्यसंस्कार करू. तुमच्या नावे एक स्मृती प्रतिष्ठान काढू. दरवर्षी साहित्यिकाला पुरस्कार देऊ, वगैरे, वगैरे.... या योजनेत अंत्यसंस्काराखेरीज प्रत्येक गोष्टीसाठी रेट कार्ड होते. त्यामुळे माध्यमांनी बरीच टीका वगैरे केली. तेव्हा डॉक्टर यम यांनी ‘‘तुम्ही लेखक मानधनाशिवाय लिहिता का? एकतरी गोष्ट मोफत करता का? मग आम्ही तरी मोफत का द्यावी?’’ असा सवाल उपस्थित केल्यानंतर साहित्यिकांनी हू की चू सुद्धा केलं नाही. कारण संमेलनाच्या काळात पंचतारांकित सुविधांवर गदा येण्यापेक्षा मौन राखलेलेच बरे, असा पवित्रा अनेकांनी घेतला.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. प्रत्येकाला आपण आजवर केलेल्या अतुलनीय साहित्यसेवेचे स्मरण होऊ लागले. पहिल्याच दिवशी मनोहर रद्दीवाले यांनी अर्ज दाखल केला. पत्रकारांनी त्यांना उमेदवारीमागची भूमिका विचारली तेव्हा ते म्हणाले, ‘‘नव्या साहित्याला जागा करून देण्याचे काम गेली अनेक वर्षे मी निष्ठेने करीत आलो आहे. आम्ही रद्दीचा व्यवसाय केला नसता तर साहित्य क्षेत्रात कचर्‍याचे ढीग लागले असते. आपल्या महाराष्ट्रातील अनेक शहरांना स्मार्ट सिटी बनवण्यात त्यामुळे मोठा अडथळा निर्माण झाला असता! आजकाल पूर्वीच्या तुलनेत रद्दीचे प्रमाण कमी झाले आहे, कारण त्याकाळात लेखकांना एखादे पुस्तक किमान चारपाचवेळा तरी लिहून काढावे लागायचे. संपादकीय संस्कार करणार्‍या संपादकांच्या धाकामुळे ते करायचेही. कारण त्याशिवाय पुस्तकच प्रसिद्ध व्हायचे नाही. आज पैसे फेकले की प्रकाशक पुस्तक काढायला तयार होतात. त्यामुळे रद्दी तयार होत नाही. अर्थात ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर बातम्या आणि परीक्षणे छापून आली की लेखकाची बायको ती पुस्तके रद्दीत घालते हा भाग वेगळा; पण सृजनाच्या रद्दीची सर निर्मितीनंतरच्या रद्दीला येत नाही. गेली पन्नास वर्षे केवळ मराठी हस्तलिखिते, मराठी पुस्तके आणि मराठी वृत्तपत्रे यांच्याच रद्दीचा व्यवसाय मी करत आलो आहे. हे माझे भाषाप्रेम आपण लक्षात घेतले पाहिजे. नव्या सृजनासाठी अवकाश निर्माण करण्याचे काम रद्दीवाले करीत आहेत. समीक्षकांनीही रद्दी साहित्याकडे दुर्लक्षच केले आणि आम्हा रद्दीवाल्यांकडेही! पण त्यांनी एक लक्षात ठेवावे. त्यांच्या ग्रंथांना नेहमी आमच्याकडेच मोठी जागा मिळालेली आहे. तेव्हा साहित्य परिसर स्वच्छ करणार्‍या आणि नवतेच्या स्वागतासाठी आसुसलेल्या आम्हा सर्व रद्दीवाल्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी ही निवडणूक लढविणार आहे.’’ त्यांची भूमिका ऐकून पत्रकारही अचंबित झाले.
एक पत्रकार धीर एकवटून म्हणाला, ‘‘आपण संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर संमेलनाच्या स्वरूपात काय बदल करणार आहात?’’
मनोहर रद्दीवाले नम्रपणे म्हणाले, ‘‘रद्दीसाहित्य ः कालचे आणि आजचे’ या विषयावर परिसंवाद घ्यायला लावणार आहोत. मराठीतल्या नामवंत समीक्षकांच्या सहकार्याने ‘रद्दी ः एक अन्वयार्थ’, ‘पुनःरद्दी’ असे ग्रंथ संपादित करणार आहोत. रद्दीवाले आणि साहित्यिकांच्या पत्नी यांच्यात सुसंवाद घडवून त्यांची घरे धूळ आणि वाळवीपासून कशी सुरक्षित राहतील याची काळजी घेणार आहोत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीसाठीची मतदार यादी बदलली पाहिजे असा आग्रह आम्ही धरणार आहोत. कारण त्यात रद्दी लोकांना स्थान आहे पण रद्दीवाल्यांना नाही. हा सांस्कृतिक भेद आम्ही कधीही सहन करणार नाही. आपण नेहमी साहित्य संस्थेच्या पदाधिकार्‍यांना नावे ठेवतो. फुकटे म्हणून त्यांचा उल्लेख करतो. त्यांना इतर काही कामे नसल्यामुळे ते आपला वेळ संस्थेसाठी देतात हे खरे असले तरी वेळ देतात ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांचा सन्मान आमच्या संघटनेतर्फे केला जाईल. साहित्यिकांची आपण ग्रंथतुला करतो आणि ते ग्रंथ आपण एखाद्या ग्रंथालयाला भेट म्हणून देतो. आम्ही पदाधिकार्‍यांची रद्दीतुला करणार आहोत आणि त्यांच्या वजनाएवढी रद्दी विकून ते पैसे त्यांनाच देणार आहोत.’’
त्यावर जनमान्य जनशक्ती या वृत्तपत्राचा पत्रकार खोचकपणे म्हणाला, ‘‘अशा उपक्रमांतून संमेलन ‘अर्थपूर्ण’ करण्याचा आपला मानस आहे का?’’ त्यावर मनोहर रद्दीवाले म्हणाले, ‘‘संमेलनातून ‘अर्थ’वजा केला तर संमेलनाला पूर्णत्व येईल का? या अर्थाचा अनर्थ करण्याची सवयच तुम्हा मंडळींना लागली आहे.’’
‘‘आणखी कोणता अभिनव उपक्रम करणार आहात?’’ या पत्रकाराच्या प्रश्‍नावर क्षणाचाही विलंब न करता मनोहरपंत म्हणाले, ‘‘भाषा भवनाप्रमाणेच रद्दी भवनाच्या उभारणीसाठी मी पुढाकार घेईन. त्याशिवाय नवतेच्या प्रतिष्ठेची सद्दी निर्माण होणार नाही.’’
रद्दीवाल्यांच्या संघटनेचे मनोहर रद्दीवाले यांची वाङमयीन आणि वैचारिक बैठक पाहून पत्रकार आवाक झाले.
रद्दीवाले अर्ज भरून बाहेर पडणार एवढ्यात त्यांना निवडणूक अधिकार्‍यांनी बोलावून घेतले. अर्जात काही चूक तर राहिली नाही ना? असा प्रश्‍न रद्दीवाल्यांना पडला. तेव्हा निवडणूक अधिकारी म्हणाले, ‘‘अर्ज भरल्यानंतर मी प्रत्येक उमेदवाराला खडीसाखर देतो. ती देतानाचा फोटो मग आम्ही वृत्तपत्राकडे पाठवतो. कारण अलीकडे अर्ज स्वीकार करतानाचे वगैरे फोटो ते छापत नाहीत... त्यांना ऑफ बीट फोटो लागतात ना! आम्ही निवडणुकीच्या काळात मरमर काम करायचे, आमचा फोटो नको का छापून यायला?’’
रद्दीवाल्यांना अधिकार्‍यांची दया आली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आम्ही उमेदवार सारखे फोटोत झळकत असतो. प्रसिद्घी तर इतकी मिळते की विचारूच नका. निवडणूक लागल्यापासून ती संपेपर्यंत आलेल्या बातम्यांचा कॉलम सेंटीमिटरच्या जाहिरातीच्या स्वरूपात विचार केला तर काही कोटींची प्रसिद्धी मिळते आम्हाला. तुम्हाला तर मिळालीच पाहिजे. पण खडीसाखरेऐवजी पेढा ठेवला असता तर?’’
निवडणूक अधिकारी हताशपणे म्हणाले, ‘‘बजेटमध्ये नाही ना बसत!’’
त्यावर रद्दीवाले म्हणाले, ‘‘स्पॉन्सर बघा ना एखादा!’’
निवडणूक अधिकारी म्हणाले, ‘‘नको हो, त्यामुळे पदाधिकार्‍यांच्या वर्तन स्वातंत्र्यावर गदा येते. एकवेळ लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार नाही झाला तरी चालेल पण पदाधिकार्‍यांच्या वर्तन स्वातंत्र्यावर मात्र घाला येता कामा नये अशी आमची भूमिका आहे.’’
निवडणूक अधिकार्‍यांनी रद्दीवाल्यांना खडीसाखर घालताना मस्त पोज दिली. कॅमेर्‍यांचा लखलखाट झाला. रद्दीवाले खूश झाले. पत्रकारांनी काढता पाय घेतला. रद्दीवालेही त्यांच्या दुकानात गेले.
दुसर्‍या दिवशी चार वाजता पेगेन बारवाला संमेलनाध्यक्ष पदासाठी अर्ज भरतात हे समजताच एकच खळबळ उडाली. पेगेन बारवाला यांचा स्वतःच्या मालकीचा बार असला तरी ‘मद्यार्क निर्मिती-व्यवसायाच्या नव्या वाटा’, ‘मद्यालयातील आचारसंहिता’ यासारखी  त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली होती. त्यांच्या ‘मद्यधुंद’ या कादंबरीला सर्व नामवंत संस्थांचे पुरस्कार मिळालेले होते. ‘मी आज मद्य प्याले’ या त्यांच्या कवितासंग्रहावर वाङमय चौर्याचा आरोप झाल्यामुळे तो बराच गाजला होता. पेगेन बारवाला यांची ख्याती होती ती त्यांच्या बारमध्ये त्यांनी साहित्यिकांसाठी केलेल्या स्वतंत्र दालनामुळे. आजवर अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि नवोदित साहित्यिकांनी त्यांच्या बारमध्ये हजेरी लावून सवलतींचा लाभ घेतला होता. त्यामुळे सर्वांनाच त्यांच्याविषयी ममत्त्व वाटत होते.
ते अर्ज भरण्यासाठी कार्यालयात आले तेव्हा त्यांचे सूचक आणि अनुमोदक त्यांच्या आदरातिथ्याचा आणि तीर्थाचा लाभ घेऊन आल्यामुळे डोलत होते. ललित साहित्याच्या भाषेत सांगायचे तर त्यांची प्रतितिविक्षांनी सुरू होती. त्यांच्या आरक्त डोळ्यात निवडणुकींचीच धुंदी होती.
पेगेन बारवालांनी आपला अर्ज अधिकार्‍यांकडे सुपूर्त केला. नेहमीप्रमाणे खडीसाखर खाऊ घालण्याचा कार्यक्रम झाला. फोटो निघाले. पत्रकार परिषद सुरू झाली.
‘‘आपला आणि साहित्याचा संबंध काय? आपण ही निवडणूक का लढवित आहात?’’ पत्रकारांनी विचारले.
पेगेन बारवाला म्हणाले, ‘‘केवळ ललित साहित्यालाच साहित्य म्हणण्याची जी चुकीची प्रथा पडली आहे ती बदलण्याची गरज आहे. मद्य साहित्य हेही एक प्रकारचे साहित्यच आहे. तेच आद्य साहित्य आहे. हेच मी संमेलनाच्या व्यासपीठावरून सांगणार आहे. मद्य हे केवळ आद्य साहित्य नाही तर सद्य साहित्य आहे. एकाअर्थाने ते समकालीन आहे. स्फूर्तिची अभिव्यक्ती हेच साहित्याचे प्रयोजन आहे. त्या साहित्यिकाची मती गुंुग करून त्याच्या निर्मितीची गती वाढविण्याची स्थिती निर्माण करणे हे काम मद्य साहित्याने आदीम काळापासून केलेले आहे. साहित्य निर्मितीत दोन प्रेरणा महत्त्वाच्या असतात. एक आतली आणि दुसरी बाहेरची. आतल्या प्रेरणेला बाहेर आणण्यासाठी बाहेरून एका प्रेरणेचे अंतर्गमन आवश्यक आहे. माझ्या ‘प्रेरणेचा सिद्धांत’ या ग्रंथात त्याचे मी साधार विवेचन केलेले आहे. ‘अंतःप्रेरणा आणि बाह्यप्रेरणा ः मद्याच्या साक्षीने - एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर माझ्या मार्गदर्शनाखाली एक विद्यार्थी पीएचडीही करीत आहे. साधे कथेचे उदाहरण घ्या. आम्ही नेहमी सांगतो, कथेत ‘कलाद्रव्य’ आणि ‘कथाद्रव्य’ असले पाहिजे. तरच ती कथा ताकतीची होते. या दोन्ही शब्दप्रयोगात आस्वादक समीक्षकांनी ‘द्रव्य’ या गोष्टीला तितकेच महत्त्व दिले आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. एखाद्या साहित्य प्रकारामागची तात्त्विक भूमिका समजाऊन न घेता त्या साहित्य प्रकाराला निकालात काढणे हा वाङमयीन दहशतवादच आहे. तो आम्ही कधीही सहन करणार नाही.’’
पेगेन बारवालांच्या सूचक आणि अनुमोदकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांनी काहीही बरळू नये यासाठी त्यांनी त्यांना वाईनची चॉकलेट दिली. ती खाताच ‘ग्लानी येणे’ या वाक्प्रचाराची अनुभूती त्यांनी घेतली.
पत्रकारांना पेगेन बारवालाची भूमिका पटत नव्हती. एक पत्रकार त्यांना म्हणाला, ‘‘आपण एकदम मोठ्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच उभे राहता आहात! विभागीय संमेलनातून सर्वांची एकप्रकारची मनोभूमिका तयार करून मगच आपण या निवडणुकीत उतरायला हवे होते असे वाटत नाही का?’’
त्यावर बारवाला म्हणाले, ‘‘मद्य आणि साहित्य यात हाच मूलभूत फरक आहे. मद्य प्राशन करताना सतत आपल्या मर्यादांचे भान ठेवावे लागते. साहित्यात ते ठेवण्याची गरज नसते. बेभान झाल्याशिवाय साहित्यनिर्मिती करता येत नाही. आजच्या काळात प्रत्येक लेखकाने आपल्या मर्यादेचे भान ठेवायचे ठरवले तर संमेलने अध्यक्षांशिवायच पार पाडावी लागतील. आपली मर्यादा माहीत असूनही लोक या निवडणुकीत उतरतात. म्हणूनच गंमत आहे.’’
तात्त्विक विवेचनात पेगेन बारवाला कुठेच कमी पडत नाहीत हे पत्रकारांच्या लक्षात आले.
‘‘आपल्या अध्यक्षीय भाषणात आपण कोणता मुद्दा मांडणार आहात?’’
‘‘मित्रहो, जागतिकीकरणाने आपल्या जगण्याचे वैराण वाळवंट करून टाकले आहे. आपल्या मुळांपासून आपण तुटत चाललो आहोत. रूटस् नष्ट होणं म्हणजे संस्कृतीच्या मुळावरच घाव आहे असं मी मानतो. माझ्या अध्यक्षीय भाषणात या ‘मुळांविषयी’ मी मूलभूत विचार मांडणार आहे.’’
‘‘आपल्याकडे साहित्यिकाचे साहित्यिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात कारण नसताना गल्लत केली जाते. वैयक्तिकांकडून विश्‍वात्मकाकडे  पाहता आले पाहिजे. मी या संमेनाध्यक्षपदासाठी उभा आहे तो साहित्यिक आणि साहित्यिक कार्यकर्ता म्हणून. मी निर्माण केलेली ‘मद्यसाहित्य’संपदा आपण वाचलीच आहे. मराठी साहित्यात हा नवा प्रवाह आणण्याचे श्रेय मलाच आहे.
साहित्यिक कार्यकर्ता या नात्याने सर्जनाच्या मुळाशी माझा जवळचा संबंध आहे. माझा स्वतःच्या मालकीचा बार आहे, हे आपण जाणताच. लोक जाहीरपणे त्याचा उल्लेख टाळतात पण बरेच विचारवंत, लेखक जाहीर कार्यक्रम संपला की आमच्याच बारमध्ये येतात. त्यांची सार्वजनिक कुचंबना होऊ नये म्हणून मी त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केलेला आहे. थोडेसे रसपान झाले की या प्रतिभावंतांना भन्नाट कल्पना सूचतात. त्या कल्पना सूचण्याची प्रक्रिया इथेच घडते. सर्जनाचा कोंब इथेच फुटतो. अनेक थोर साहित्यिकांना त्यांच्या कादंबर्‍यांची, कथांची, नाटकांची बीजं इथंच सूचलेली आहेत. त्या सर्जनाच्या मुळाशी आमच्या बारचा जवळचा संबंध आहे. प्रसिद्ध समीक्षक वा. ह. भरकटू यांनी ‘मद्यस्थान माहात्म्य’ या ग्रंथात त्यासंबंधीचे अर्थपूर्ण विवेचन केलेले आहे. मी एका अर्थाने साहित्यिक आहे. बारच्या माध्यमातून मी साहित्य आणि साहित्यिकांची सेवा करीत आहे. त्यामुळे मी साहित्यिक कार्यकर्ता आहे आणि मुख्य म्हणजे साहित्यनिर्मितीच्या उगमाशी माझा थेट संबंध आहे. हा त्रिविध अन्योन्य संबंध विचारात घेऊन मतदार मला निवडूण देतील याची मला खात्री आहे.’’
पेगेन बारवालांचे चिरेबंदी विवेचन ऐकून सर्वांचीच बोलती बंद झाली. साहित्य आणि साहित्य निर्मितीच्या प्रेरणा, सर्जनाची उगमस्थानं याविषयीचं इतकं साधार व्याख्यान यापूर्वी कोणीच ऐकलं नव्हतं.
तेवढ्यात कार्यालयातला फोन वाजला. सेवकाने तो उचलला.
‘‘कोण बोलताय?’’ सेवकाने विचारले.
‘‘मी हॉटेल एकांतचा मालक बोलतोय. प्रा. सतत प्रकरणे.’’
‘‘काय काम आहे आपलं?’’
‘‘मी संमेलनाध्यक्ष पदाचा अर्ज भरण्यासाठी उद्या येतोय. उद्या किती वाजेपर्यंत मुदत आहे?’’
‘‘पाच वाजेपर्यंत’’ सेवकाने त्याला सांगितले.
कार्यालयातील सेवकाने ही वार्ता सर्व पत्रकारांना सांगितली तेव्हा सर्वांना चक्कर यायचीच बाकी होती. ‘हॉटेल आणि साहित्यिक’, ‘हॉटेल आणि साहित्य निर्मिती’ यासंदर्भातले कोणते विवेचन ऐकायला मिळणार आहे, या विचारांचा भोंगा सर्वांचीच डोकी पोखरत होता. एका नवोदित पत्रकाराला चक्कर आली. सर्वांनी त्याच्या नाकाला कांदा लावला. शुद्धीवर आल्यानंतर अधिकार्‍यांनी त्याच्या तोंडात खडीसाखर घातली. साखर गोड असूनही संमेलनाचे समकालीन वास्तव पाहून त्याने तोंड कच्चे कारले खाल्ल्याप्रमाणे कडू केले.         

- प्रा. मिलिंद जोशी 
९८५०२७०८२३ 

Monday, October 5, 2015

रेघोट्यांच्या प्रदेशात

समीर सुधाकर नेर्लेकर हे नाव फारसं कुणाला परिचित असण्याचं तसं कारण नाही. इतर सर्वसामान्य लोकांप्रमाणेच मी देखील एक सर्वसामान्य नोकरदार माणूस. गर्दीत मिसळलेला एक सामान्य चेहरा. भौतिक जग मी दररोज अगदी जवळून पाहतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ‘समाज’ नावाच्या या विलक्षण प्रदेशात वावरताना अनेक विसंगती अनुभवायला मिळतात. कधी सभ्यतेच्या मुखवट्यामागचे खरे चेहरे दिसतात. तर कधी क्रूरतेच्या चेहर्‍यामागचा माणुसकीचा खळाळता झळाही दिसून येतो. मी फुटपाथवरून चालत असताना कुणी माझ्याकडे ढुंकूनही बघत नाही किंवा रस्त्यावरच्या प्रत्येक माणसाला माझे नाव माहीत असावे असेही काही माझ्या हातून घडलेले नाही. मी गेली अनेक वर्षे ज्या घरात राहतो, त्या घराला लागून असलेल्या घरातील माणसालाही मी नेमकं काय करतो, हे माहीत नाही. व्यक्तिगत आयुष्यात अनेक पातळ्यांवर अपेक्षापूर्तीच्या बाबतीत पूर्णतः वैफल्यग्रस्त असणारा मी जेव्हा पेन्सिल हातात धरतो, तेव्हा काही क्षणांकरीता खेचला जातो एका विलक्षण अशा विश्‍वात, रेघोट्यांच्या प्रदेशात.पेन्सिलीने कागदावर रेघोट्या मारण्याची सवय माझ्या बोटांना नेमकी कधीपासून लागली हे सांगता येणार नाही, पण मी अगदी लहान होतो तेव्हापासूनच माझ्या हातात पेन्सिल देण्यात आली होती. माझी आई शिवणकाम, भरतकाम, विणकाम अशी अनेक कामे करायची. ती मला तिच्या शेजारी बसवायची. मला गुंतवून ठेवण्यासाठी ती माझ्या हातात पेन्सिल देऊन कागदावर रेघोट्या मारायला सांगायची. मला फार खेळणी मिळाली नाहीत, पण हातातली पेन्सिल हेच माझं खेळणं बनून गेलं.
शाळेत असताना अभ्यासात मी अजिबात हुशार नव्हतो. कधी काठावर पास तर कधी नापास अशीच गत होती. वर्गात शिक्षक शिकवत असताना मी मात्र माझ्याच काल्पनीक विश्‍वात रमून गेलेलो असायचो. माझे वडील आर्किटेक्ट होते. इमारतींची चित्रे रेखाटणे आणि मॉडेल बनविणे हे त्यांचे रोजचे काम. त्यांच्यामुळे देखील माझं पेन्सिलशी असलेलं नात अधिक घट्ट होण्यास मदत झाली.
कलेच्या क्षेत्रात अनेक वर्षे काम केल्यानंतर आज मी अगदी ठामपणे सांगू शकतो की मी स्वतः चित्रकार नाही. स्वतःला चित्रकार म्हणवून घेण्यासाठी काय काय करावं लागतं हे मला चांगलं माहीत आहे. मी अनेक दिग्गज कलावंत पाहिलेले आहेत. त्यांचं काम पाहिलेलं आहे. ती पातळी गाठणं माझ्यासाठी अवघड आहे. मी केवळ एक तंत्रज्ञ आहे. दृश्य कला तंत्रज्ञ. एक तंत्रज्ञ म्हणून काम करताना मी आत्तापर्यंत जे काही शिकलो आहे ते सगळं ज्ञान मी चित्र रेखाटण्याच्या कामात वापरतो एवढंच!
एक अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून जेव्हा मी पेन्सिलीची निवड केली, तेव्हा सर्वात प्रथम मला या माध्यमाच्या मर्यादा लक्षात आल्या. जी घनता जलरंग किंवा शाईने साधता येते, ती घनता पेन्सिलने साधता येणे फार कठीण असते आणि माझ्या दृष्टिने हेच सर्वात मोठे आव्हान आहे. त्यासाठी मी पेन्सिल या माध्यमाचा बारकाईने अभ्यास केला. बाजारात कोणत्या विविध श्रेणीच्या पेन्सिली उपलब्ध आहेत, याचा मी सातत्याने शोध घेत असतो. पेन्सिल स्केचिंग करण्यासाठी रोज सराव करावा लागतो. कागदावर उभ्या, आडव्या आणि वळणदार रेषा काढणे, हे सारखं चालू राहिलं पाहिजे. आपण जिवंत राहण्यासाठी ज्याप्रमाणे श्‍वास घेतो, त्या प्रमाणेच आपल्यातला रेखाचित्रकार जिवंत ठेवण्यासाठी रोजचा सराव हाच श्‍वास आहे असं मला वाटतं.
पेन्सिल स्केचिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्केचिंगचा विषय. मला स्केचिंग करायला फार वेळ लागत नाही, परंतु चित्राचा विषय ठरवायला फार वेळ लागतो. लहानपणापासून अनेक गोष्टी अंतर्मनात दडून राहिल्या आहेत, शिवाय दररोज भोवतालचं जग बघत असतोच. अनेक चांगली पुस्तकं वाचायला मिळतात. इंटरनेटवरही बरंच काही बघायला मिळतं. हे सगळं कधी ना कधी चित्रांच्या रूपात कागदावर उमटवलं जातं. मी रेखाटलेल्या चित्रांची फारशी प्रदर्शने वगैरे कधी भरली नाहीत. कधीकधी मासिकांमध्ये, पुस्तकांमध्ये, मुखपृष्ठांवर माझी चित्रे छापली जातात. जाणकार आणि रसिकांकडून जेव्हा दिलखुलास दाद मिळते तेव्हा फार समाधान वाटते. सोशल मीडियावरून मी गेली अनेक वर्षे माझी चित्रे सातत्याने प्रसारित करतोय. त्यामुळे मी हजारो कलारसिकांशी जोडला जातोय. इथे एक प्रातिनिधिक अनुभव आवर्जून सांगावासा वाटतोय. सोशल मीडियावरील एका व्यक्तिने माझा मोबाईल नंबर विचारला. थोड्या वेळाने त्याच व्यक्तिने माझा बँकेचा अकाऊंट नंबर विचारला. त्या व्यक्तिचा फोन आला. राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील एक फार मोठं प्रस्थ माझ्याशी फोनवर बोलत होतं. ‘‘तुम्ही काढलेले वासुदेवाचे चित्र आज सकाळी संगणक चालू करताच मला बघायला मिळालं. आमच्या घराण्यात अशी पद्धत आहे की, दारात आलेल्या वासुदेवाला रिकाम्या हाताने परत पाठवायचं नाही, पण हल्ली वासुदेवाचं दर्शन घडणं दुर्मीळ झालं आहे. त्यामुळं तुमचं चित्र पाहून मला फार आनंद झाला. तुमच्या बँक खात्यात पंधराशे रूपये जमा केले आहेत. त्याचा स्वीकार करा आणि माझ्याकडून कसलीही मदत लागली तर अवश्य भेटा’’ एका धनिकानं केवळ माझं चित्र पाहून मला दिलेली ही दाद पाहून मी थक्क झालो.
चित्र रेखाटणे हा माझ्या पेशाचा एक भाग तर आहेच, पण तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता मी अगदी झपाटल्यासारखा चित्र रेखाटत असतो. त्यामागचं कारण काय असावं?
माझ्या दैनंदिन व्यक्तिगत आयुष्यात अशा अनेक विवंचना आहेत ज्या मी कुणापुढं व्यक्त देखील करू शकत नाही. कारण भूतकाळात माझ्याच हातून घडलेल्या काही चुकांमुळे त्या विवंचना निर्माण झाल्या आहेत. त्या निमुटपणे भोगण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा मार्ग नाही. रेघोट्यांच्या काल्पनिक प्रदेशात वावरण्याच्या निमित्ताने काही क्षणांकरीता का होईना पण मला भौतिक जगातील विवंचनांचा विसर पडतो. केवळ हौस म्हणून किंवा आनंद मिळावा म्हणून, किंवा मला दुसरे काही कामधंदे नाहीत म्हणून मी चित्र रेखाटतो असे मुळीच नाही. दिलीप कुमारचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे, ‘कौन कंबख्त बर्दास्त करने के लिए पीता है? मै तो पीता हॅूं, ताकी सॉंस ले सकू!’ त्याप्रमाणे मी माझ्या वेदनेला फुंकर घालण्यासाठी रेघोट्यांच्या प्रदेशात भटकंती करत असतो.
गुरूदत्तचं एक गाणं आहे, ‘बिछडे सभी बारी बारी...’ त्याप्रमाणे माझ्या आयुष्यातली अनेक नाती माझ्यापासून दूर होत गेली, पण पेन्सिलीशी असलेलं माझं नात अजूनही टिकून आहे. 

समीर नेर्लेकर, ९४२२५०८४७१ 
(मासिक 'चपराक' ऑक्टोबर २०१५)

Sunday, October 4, 2015

साहित्य परिषदेला अध्यक्षांकडूनच चपराक

डॉ. प्र. चिं. शेजवलकर (अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद)
महाराष्ट्र साहित्य परिषदेतील अंतर्गत राजकारण, कार्याध्यक्ष माधवी वैद्य यांचा गैरव्यवहार आणि समन्वयाचा अभाव यामुळे साहित्य परिषद म्हणजे पांढरा हत्ती झाला आहे. सातत्याने भ्रष्टाचार उघडकीस येऊनही कार्याध्यक्ष वैद्यबाई चुकीचे राजकारण करत असल्याचे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपली नाराजी व्यक्त केली. कार्याध्यक्ष कसा दबाव आणतात हेही त्यांनी स्पष्टपणे नोंदवले. तसेच म.सा.प. चे साहित्य विषयक धोरण कसे असावे याबद्दलही त्यांनी आपले विचार परखडपणे व्यक्त केले. डॉ. शेजवलकर यांचे भाषण खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी देत आहोत.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आदरणीय विश्‍वस्त आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेवर नितांत प्रेम करणारे माननीय सदस्य मित्रहो,
माझा अध्यक्षीय पदाचा कार्यकाल सुमारे सहा महिन्यांनी संपणार असल्यामुळे आणि त्याआधीची होणारी वार्षिक सभा माझ्या कार्यकाळात शेवटची असल्यामुळे मनात केलेले प्रकट चिंतन आपल्यापुढे सादर करीत आहे. हे करताना कोणत्याही व्यक्तिवर टीका करणे माझ्या स्वभावाला धरून नाही. आज मी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून तुमच्या समोर निवेदन करताना मला अतिशय दुःख होत आहे. माझ्या मनात कोणाबद्दल राग नाही. मात्र गेल्या काही दिवसात अनेक सदस्य मला भेटले आणि काहींनी मला पत्रेही पाठवली. त्यांच्याकडून कार्याध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी गेल्या चार वर्षातला त्यांनी केलेला कारभार पाहता त्यांच्यामुळे म.सा.प.ची प्रचंड बदनामी झाली आहे. त्यामुळे परिषदेच्या सत्कीर्तीस प्रचंड हानी पोहोचली आहे. त्यांचा महामंडळाच्या अध्यक्ष म्हणून  असलेला कारभारसुद्धा अत्यंत आक्रस्ताळेपणाचा आणि हटवादी आहे असे माझ्या कानावर आलेले आहे. घुमान आणि अंदमान येथे झालेल्या साहित्य संमेलनात जे गैरप्रकार झाले त्यालाही महामंडळाच्या अध्यक्षा याच जबाबदार आहेत असे मला वाटते.
गेल्या चार वर्षात अध्यक्ष म्हणून मला आलेला अनुभव हा देखील अतिशय क्लेषदायक आहे. आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सध्याच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष ही  फक्त मानाची जागा असून अंतर्गत धोरणे आणि व्यवस्थापन इतर पदाधिकार्‍यांच्या हातात आहेत असे मला माझी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर कार्याध्यक्षांनी लगेचच सांगितले. खरे म्हणजे त्यांचे सांगणे योग्य नव्हते. हे मलाही आणि इतरांनाही पटलेले नाही. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कारभाराबद्दल लक्ष घालणे हे अध्यक्षांच्या अधिकारात असते. जेव्हा जेव्हा अनेक सदस्यांकडून कार्याध्यक्षांबद्दल प्रचंड नाराजी असलेल्या तक्रारी माझ्याकडे येऊ लागल्या तेव्हा आपण स्वतः त्यात लक्ष घालावे असे मला वाटू लागले. माझ्या आधीचे अध्यक्ष प्रा. द. मा. मिरासदार यांनी एकच वर्षांनंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ‘‘विद्यमान कार्याध्यक्ष ज्या पद्धतीने वागत आहेत त्यामुळे अतिशय उबग येऊन मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला’’ असे मला मिरासदार यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मी फारसे लक्ष न घातल्यामुळे कार्याध्यक्षांनी मनमानी कारभार सुरू केला. त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात मलाही उदामपणा आणि अहंकार जाणवला. त्यातच त्यांनी जे गैरप्रकार केले त्याबद्दल काही सदस्य जे बोलले त्यांच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी केलेला कारभारसुद्धा अतिशय चुकीचा आणि धक्कादायक होता. सासवड आणि घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्यावेळी त्यांनी छोटीशी संहिता लिहिल्याबद्दल भरपूर मानधन घेतले असे माझ्या कानावर आले आणि माझ्या मते ही त्यांनी केलेली अक्षम्य अशी चूक होती. चॅरिटी कमिशनर यांच्याकडून त्यांना चारवेळा नोटीस येऊनदेखील त्यांनी कागदपत्रे दिली नाहीत. त्यामुळे त्यांना चॅरिटी कमिशनरने पाच हजार रूपयांचा दंड केला. त्यांनी आणि सुनील महाजन यांनी चेकवर सह्या करून रोख पैसे काढले आणि ते संस्थेतर्फे भरले हे कितपत योग्य आहे ते तुम्हीच ठरवावे. कोषाध्यक्ष सुनील महाजन यांनीही दोन्ही संमेलनाच्या वेळी त्यांनी सादर केलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे भरपूर पैसे घेतले असे मला सांगण्यात आले. या संबंधीचे पत्रही माझ्याकडे आले आहे. पदाधिकार्‍यांनी लाभार्थी होणे योग्य नाही. कार्याध्यक्षांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या पाच उमेदवारांपैकी डॉ. श्रीपाल सबनीस या एका उमेदवारासाठी जाहीर प्रशस्ती दिली. हेसुध्दा योग्य झाले नाही. शरणकुमार लिंबाळे अध्यक्षीय उमेदवारीकरता फॉर्म भरावयास आले तेव्हा ‘तुमचे नाव यादीतच नाही’ असे कार्याध्यक्ष म्हणाल्या. त्यांनी जेव्हा पैसे भरल्याची पावती दाखवली तेव्हा कार्याध्यक्षांनी चूक मान्य केली. अनेकांनी माझ्याकडे अशाच प्रकारच्या तक्रारी केल्या. माननीय सदस्यांची अपेक्षा मात्र अध्यक्षांनी क्रियाशील रहावे असे वाटल्यामुळे ते मला अनेक प्रकारच्या सूचना करीत असतात. त्या जशाच्या तशा अमलात आणणे माझ्या हातात नसते. महामंडळावरसुद्धा आमच्यापैकी कोणी जावे या संबधीची धोरणे आणि व्यवस्थापन इतर पदाधिकार्‍यांच्या हातात आहेत असे मला माझी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर लगेचच सांगण्यात आले होते. त्यामुळे महामंडळाच्या कार्यात अध्यक्षांना, म्हणजे मला, सहभागी होता आले नाही. महामंडळाचे स्वतंत्र अस्तित्व आवश्यक आहे का, याबाबत अनेक सदस्यांनी आपली मते व्यक्त केली आहेत. महामंडळाच्या ऐवजी त्या त्या घटक संस्थेतील सर्व पदाधिकार्‍यांनी कामकाज बघावे असे अनेक सदस्यांना वाटते. त्यात कार्यकारिणीच्या तीन सदस्यांनी आणि त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिकांपैकी दोन साहित्यिकांना स्वीकृत करून व्यापक स्थानिक समिती स्थापन करावी आणि या समितीने साहित्य संमेलने आयोजित करावीत असे अनेकांना वाटते. सध्या ज्या पद्धतीने पदाधिकारी निवडले जातात त्यामध्ये कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष यांची निवड थेट सदस्य करतात. अध्यक्षांची निवड मात्र कार्यकारिणी तर्फे केली जाते. त्यामुळे अध्यक्ष म्हणजे एक ’अडगळ’ आहे असेच कार्याध्यक्षांना वाटत आले असावे. कधी कधी तर अध्यक्ष म्हणजे ’असून अडचण आणि नसून खोळंबा’ असे वाटण्या इतपत आपण तेथे  आहोत अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली. कारण गेल्या चार वर्षात कार्याध्यक्ष आणि कोषाध्यक्ष काय व्यवहार करतात ते मला कधीही सांगण्यात आले नाही. मी शक्यतोवर परिषदेत येऊच नये असेच कार्याध्यक्षांच्या मनात असावे. परिषदेतील जाहीर कार्यक्रमांनादेखील कार्याध्यक्षाच अध्यक्ष म्हणून बसत. डॉ. सदानंद मोरे यांच्या सत्काराच्या वेळी मी आपणहून गेलो होतो तेवढेच. माझी अध्यक्षपदी नियुक्ती झाली तेव्हा आपण स्वतः कोणकोणत्या गोष्टी कराव्यात यासंबधी मी काही योजना मनात मांडल्या होत्या. मात्र त्या मला अमलात आणता आल्या नाहीत. उदा. पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक अशा मराठी शाळांची अवस्था केविलवाणी झाली आहे आणि त्यामध्ये शासनाने सुधारणा करावी म्हणून साहित्य परिषदेने जोरात प्रयत्न करावा असे मला नेहमी वाटत आले आहे. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी या दृष्टीने प्रकाशकांनी ललित वाङ्मयांखेरीज इतर विद्याशाखातील विषयांची पुस्तके मराठीत प्रसिद्ध करावीत असे माझे मत आहे. महाविद्यालयीन तरूणांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आकर्षित व्हावे यासाठी त्यांच्याकरता परिषदेने विशेष कार्यक्रम आयोजित करावेत म्हणजे नव्या पिढीचा मराठी साहित्य वाचण्याकडे ओढा राहील. अन्यथा आजच्या तरूण मुलांचे, सोशल मीडियामध्ये आणि मोबाईलचा वापर खूप वाढल्यामुळे, मराठी वाचन एकदम कमी झाले आहे. ज्या दिवशी तरूणांची हॉटेलकडे जाणारी पाऊले ग्रंथालयाकडे वळतील त्या दिवशी समाजाची योग्य दिशेने वाटचाल सुरू झाली असे म्हणता येईल. समाज काय वाचतो, त्या समाजातील विचारवंत काय बोलतात, काय लिहितात हे पाहणे सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. आजचे साहित्य अनेकदा घाईघाईत लिहिले जाते. त्यामुळे शब्दरूपी शस्त्रे गंजत चालली आहेत. त्यांची धार बोथट झाली आहे. कन्नडमधील भैरप्पांच्या कादंबर्‍यांवर मराठीत उड्या पडतात. सुधा मुर्तींची अनुवादीत पुस्तके खपतात. मात्र आपल्याकडील मराठी साहित्य त्याप्रमाणात खपत नाहीत. महाराष्ट्रात एकही प्रकाशक एकाही लेखकाच्या कादंबरीची दहा हजाराची आवृत्ती प्रकाशित करू शकत नाही याचा विचार साहित्य परिषदेने केला पाहिजे. पण याही बाबतीत कार्याध्यक्षांनी मला काहीही करू दिले नाही.

सध्याचा जीवन कलह खूप वाढल्यामुळे आणि अनेकांची घरे यांच्या कचेर्‍यांपासून लांब असल्यामुळे ते घरी आल्यावर थकून जातात आणि मग त्यांचे वाचनच होत नाही. यावर काही उपाय सुचतात का याचा परिषदेने विचार करायला हवा. हल्ली मराठीतील अनेक मालिकांमध्ये वापरली जाणारी भाषा अशुद्ध असते. यावर देखील साहित्य परिषदेने अंकुश ठेवणे मला गरजेचे वाटते. साहित्य प्राज्ञ आणि साहित्य विशारद या परीक्षांकडे तरूणांचा ओढा कसा वाढेल यासाठी साहित्य परिषदेने महाविद्यालयात जाऊन या परीक्षा लोकप्रिय होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कार्याध्यक्षांनी याबाबतीत काहीही केले नाही. याचा विचार कार्याध्यक्षांच्या मनात का आलेला नाही याचे मला आश्‍चर्य वाटत आहे. म्हणून ज्येष्ठ साहित्यिकांचे एक सल्लागार मंडळ कार्यकारिणीनेे स्थापन करावे आणि त्यांचे मार्गदर्शन गंभीरपणे विचारात घ्यावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या हातात अधिकार आहे त्यांनी इतरांचाही सल्ला घेऊन आपले धोरण अमलात आणावे. मराठी समाजाला अंतर्गत दुहीचा एक प्रकारचा शाप मिळालेला आहे. तो कमी होण्यासाठी विविध स्तरातील लोकांना साहित्य परिषदेकडे आकर्षित केले पाहिजे. आता दलित समाजातील अनेक नवे लेखक आणि कवी नावारूपाला आले आहेत. याचप्रमाणे श्रमिक वर्गातही अनेक साहित्यिक आहेत. त्यांचा सहभाग आपण वाढवायला हवा. या बाबतीतही कार्याध्यक्षांनी माझी मते कधीही जाणून घेतली नाहीत.
माझ्या कार्यकाळात प्राध्यापक मिलिंद जोशी यांचा प्रमुख कार्यवाह पदाचा राजीनामा ही एक दुर्दैवी घटना घडली याचे मला फार वाईट वाटले. मिलिंद जोशी हे प्रसिद्ध साहित्यिक, उत्तम वक्ते आणि  प्रशासकीय जाण असलेले प्राध्यापक आहेत. त्यांचा सहभाग परिषदेला उपयोगी पडला असता. त्यांनी पुढील निवडणुकीनंतर साहित्य परिषदेत पुन्हा पदार्पण करावे असे मला मनापासून वाटते. कोणाशीही दीर्घकाळ  दुरावा ठेऊ नये, हे मी यशस्वी नेतृत्व करणार्‍या अनेकांपासून शिकलो.  स्वामी विवेकानंद, येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरूजी यांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव आहे. त्यामुळे जे काही माझ्या वाट्याला काम आले ते मानसिक ताण न ठेवता प्रसन्न मनाने जेवढे करता येईल तेवढे करावे अशीच माझी धारणा आहे. त्यामुळेच इतर सामाजिक संस्थांमध्ये आणि पुणे विद्यापीठातही बिनविरोध निवडून येऊन आणि सगळ्यांची मने जिंकून मला काम करता आले. त्या मानाने महाराष्ट्र साहित्य परिषदेत मला स्वतःला अपेक्षित असलेले माझे योगदान मला नीट करू देता आले नाही. कारण येथेही कार्याध्यक्षांनी मला जाणूनबूजून एखाद्या खड्यासारखे दूर ठेवले. सर्वांची नाराजी पत्करून कार्याध्यक्षांनी गैरकारभार करीत राहणे कितपत योग्य आहे याचा त्यांनी स्वतः विचार करावा असे मला वाटते. काहीजण डॉ. माधवी वैद्य यांच्याविरूध्द अविश्‍वासाचा ठरावही मांडणार होते; पण त्यासाठी पंधरा दिवसाची नोटीस द्यावी लागते. डॉ. माधवी वैद्य यांनीच आता सदस्यांचा आणि अध्यक्षांचा विश्‍वास बसण्यावर आपण पात्र आहोत का याचा विचार केला पाहिजे. कार्याध्यक्षपदी खरे म्हणजे नामवंत साहित्यिक असावा पण तसे झालेले नाही.
सध्याच्या कार्याध्यक्षांचे साहित्यिक योगदान नगण्य आहे हे खेदाने म्हणावेसे वाटते. मंगला गोडबोले, अच्चुत गोडबोले, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अशोक कामत, डॉ. अरूणा ढेरे ही व अशी नामवंत साहित्यिक मंडळी कार्याध्यक्षपदी शोभून दिसली असती. गेल्या वर्षभरात विश्‍वस्तांची एकही सभा बोलावण्यात आली नाही. विश्‍वस्तांची सभा  घेण्यासंबधी कोषाध्यक्षांनी मला एक पत्र लिहिले होते. मी त्यांना तारखाही दिल्या होत्या पण पुढे काय झाले हे मलाही कळले नाही. असो.
1953 मध्ये, म्हणजे 62 वर्षांपूर्वी, त्यावेळी माझे निवासस्थान साहित्य परिषदेच्या जवळ असल्यामुळे, मी नियमितपणे वृत्तपत्रे आणि मासिके वाचण्याकरता परिषदेत येत होतो आणि परिषदेच्या त्यावेळच्या सर्व  कार्यक्रमांना उपस्थित राहत होतो, तसेच 1956 मध्ये म्हणजे एकोणसाठ वर्षांपूर्वी मी कै. गं. भा. निरंतर यांच्या प्रेरणेने आणि कै. म. श्री. दीक्षित यांच्या पाठींब्यामुळे साहित्य परिषदेच्या परीक्षा दिल्या, त्याच साहित्य परिषदेमध्ये आपण सर्वांनी मला अध्यक्षपदी नियुक्त केले याची कृतज्ञतेने मला आज आठवण येत आहे. मराठी हा माझा आवडता विषय असल्यामुळे मी तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषदेला दैवत मानत आलेलो आहे. 

(साप्ताहिक 'चपराक', ५ ऑक्टोबर २०१५)


Saturday, October 3, 2015

वादळी जीवनाची कहाणी!

प्रकाशक : चपराक प्रकाशन, पुणे
पृष्ठे 160, मूल्य 175 रुपये
संपर्क 020-24460909/7057292092
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विविधांगी आणि विविधरंगी जीवनपट उलगडून दाखविणारा बाळासाहेब एक अंगार हा एक आगळावेगळा चरित्रग्रंथ साहित्यिक नागेश शेवाळकर यांनी नुकताच वाचकांसाठी आणला आहे. कादंबरी, ललितलेखन, नाट्य, कथालेखन आणि चरित्रलेखन इत्यादी साहित्यप्रकार सारख्याच ताकदीने हाताळणारे नागेश शेवाळकर यांनी सिद्ध केलेला बाळासाहेब एक अंगार हा तिसरा चरित्रग्रंथ. या आधी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि नामवंत साहित्यिक तथा फर्डे वक्ते आदरणीय राम शेवाळकर यांच्यावरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
चरित्रलेखन करताना लेखकाला बरीच पथ्ये पाळावी लागतात. तसेच काही नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. विशेषत: एखाद्या महान व्यक्तिसंबंधी लिहताना तर खूपच जागरूक राहावे लागते. शब्दांचा वापर करताना जसे तारतम्य बाळगावे लागते तसेच संदर्भग्रंथातील मते, घटना आपल्या पुस्तकात समाविष्ट करताना मूळ ग्रंथातला आशय न बदलता तो विषय स्वत:च्या शब्दांमध्ये मांडण्याची कसरत लेखकाला करावी लागते. त्यासाठी तशी हातोटी लेखकापाशी असावी लागते. या सर्व गोष्टींचे भान नागेश शेवाळकर यांनी पुरेपूर बाळगलेले आहे, याची प्रचिती वाचकास हे पुस्तक वाचल्यानंतर येते. इतकेच नव्हे तर लेखक या सर्व बाबतीमध्ये सजग असल्याचे वाचकास सुरुवातीलाच लेखकाचे मनोगत-ज्याला त्यांनी ’अक्षरांजली’ असा समर्पक शब्द योजला आहे-वाचताना कळते.
बाळासाहेबांसारख्या अष्टपैलू आणि हिमालयाइतक्या उंचीच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणे म्हणजे कुणासाठीही शिवधनुष्य पेलण्याइतके अवघड काम आहे. पण शेवाळकरांनी अत्यंत साध्या, सोप्या आणि ओघवत्या शैलीमध्ये लिहिलेले हे चरित्र वाचकाला खिळवून ठेवते हे मात्र नक्की.
समीर नेर्लेकर यांनी या चरित्रग्रंथाच्या विषयाला साजेसे असे सुंदर आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ रेखाटलेले आहे. तसेच पुस्तकाच्या मलपृष्ठावर सुप्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक महेश मांगले यांनी यथोचित भाष्य केलेले आहे. पुस्तकाचे बाह्यरंग जेवढे आकर्षक आहेत तेवढेच अंतरंगदेखील शेवाळकरांच्या लेखनशैलीमुळे वाचनीय आणि मननीय झाले आहे. लेखकाने या पुस्तकाची सुरुवात ठाकरे घराण्याच्या इतिहासापासून केलेली असून शेवट बाळासाहेबांच्या ’विचार संजीवनीने’ केला आहे. बाळासाहेबांची ही विचार संजीवनी तर नुसती प्रेरणादायी आहे असे नव्हे तर निडरपणे कसे जगावे याचा आपणा सर्वांना दिलेला तो कानमंत्रच आहे.
ठाकरे घराणे म्हणजे उच्च प्रतीचे देशप्रेम, समाजसेवा, निरपेक्ष भावना, त्यागवृत्ती, निर्भयता, धाडस, कणखरपणा, प्रामाणिकता इत्यादी भावनांनी ओतप्रोत असलेले घराणे आहे याची वाचकास सुरुवातीलाच ओळख होते. लेखकाने मनोगतामध्ये म्हटल्याप्रमाणे, बाळासाहेब त्यांच्या पिताश्रीसाठी बाळ होते, आईसाहेबांचा जीव तर मॉंसाहेबांचे सर्वस्व होते. ते कुटुंबाचे भाग्यविधाते, मुंबईकरांचे देवदूत, मित्रांचे मित्र तर लबाड विरोधकांचे कर्दनकाळ आणि शिवसैनिकांचे दैवत होते. इतके सारे असूनही ते गर्दीतले नेते होते आणि म्हणूनच माणूस, नव्हे देवमाणूसच होते. लोकांनी त्यांना प्रेमापोटी किती उपाध्या दिल्या याची तर गणतीही होणार नाही. हिंदुहृदयसम्राट, लोकनेता, महानायक, सेनापती, रेषाप्रभू, ढाण्या वाघ, शिवसेनाप्रमुख, सरसेनापती, युगपुरुष, युगप्रवर्तक, श्रीमंत योगी, दैवी पुरुष, क्रांतिकारक, कट्टर राष्ट्रभक्त या आणि अशा अनेक उपाध्या त्यांना लोकांनी दिल्या होत्या. पण ते वारंवार सांगत की, मी सर्वात आधी एक शिवसैनिक आहे.
बाळासाहेबांचे पिताश्री केशवराव ठाकरे उपाख्य दादासाहेब यांनी सामाजिक बांधिलकी, समाज सुधारणा याविषयीचे स्वत:चे विचार मांडून समाजाचे प्रबोधन करता यावे यासाठी ’प्रबोधन’ नावाचे पाक्षिक सुरू केले. हे पाक्षिक, त्यातील सडेतोड विचार आणि अपार देशप्रेम यामुळे कमालीचे लोकप्रिय झाले. तेव्हापासून केशवराव ठाकरे हे ’प्रबोधनकार’ या नावाने सर्वांना परिचित झाले.
कणखरपणा, बाणेदारपणा आणि सडेतोड वृत्ती ही बाळासाहेबांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेली देणगी होती. प्रबोधनकारांनी स्वत:चे विचार बाळासाहेबांवर कधीच लादले नाहीत. बाळासाहेबांनी संगीतात रुची दाखवावी असे त्यांना वाटत असताना बाळासाहेबांचा व्यंग्यचित्रांकडे असलेला कल बघून त्यांनी बाळासाहेबांना व्यंग्यचित्रांसाठी प्रोत्साहन दिले. या सर्व गोष्टी लेखकाने अगदी सविस्तर या पुस्तकामध्ये वर्णिल्या आहेत.
‘मार्मिक’ या व्यंग्यचित्र साप्ताहिकाची सुरुवात असो की शिवसेनेच्या जन्माची गोष्ट असो, बाळासाहेबांचे वडील खंबीरपणे त्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहिले. मार्मिकच्या माध्यमातून मराठी माणसाला जागे करण्याचे फार मोठे काम बाळासाहेबांनी केले. मार्मिक आणि बाळासाहेब यांच्या नेतृत्त्वाखाली प्रचंड प्रमाणात एकत्र येणार्‍या तरुणांचे संघटन करण्याची योजना प्रबोधनकारांच्या मनात कशी आकार घेऊ लागली आणि त्यातूनच पुढे शिवसेनेचा जन्म कसा झाला याचे अत्यंत सुंदर वर्णन आपणास या पुस्तकामध्ये वाचायला मिळते.
पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये बाळासाहेबांनी नुसते महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले  नाही तर शिवसेनेला दिल्लीच्या तख्तापर्यंत पोचविले. त्यांचा हा सर्व प्रवास, तसेच दैनिक सामना हे वृत्तपत्र सुरू केल्यानंतर त्या वृत्तपत्राच्या अग्रलेखांमधून व्यक्त होणारे त्यांचे ज्वलंत आणि परखड विचार या सार्‍यांचा परामर्श लेखकाने अत्यंत सविस्तरपणे या पुस्तकामध्ये घेतला आहे.
बाळासाहेबांच्या राजकीय तसेच खासगी जीवनातील अनेक चढउतार या पुस्तकात वाचायला मिळतात. सार्वजनिक जीवनामध्ये वाघाचे काळीज घेऊन वावरणारे बाळासाहेब, मॉंसाहेबांच्या अंतिम श्वासाच्या वेळी किती हतबल, किती अगतिक आणि किती हळवे झाले हे वाचताना आपले डोळे पाणावल्याशिवाय राहात नाहीत आणि शेवटी बाळासाहेबांचे जाणे. ते तर आपल्या मनाला चटका लावून जाते. पण त्यांच्या जाण्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना कशी जोरदारपणे मराठी माणसाच्या आणि हिंदुंच्या हितासाठी जात आहेच याचेही छान वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते.
एकूणच, हे पुस्तक म्हणजे नुसते बाळासाहेबांचे चरित्र नसून त्यांच्या वादळी जीवनावरील एक चांगला संदर्भ ग्रंथ ठरावा.

(मासिक साहित्य चपराक, ऑक्टोबर २०१५)
- उद्धव भयवाळ
19, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी
गादिया विहार रोड, शहानूरवाडी संभाजीनगर
मोबाईल: 88889 25488