Wednesday, March 30, 2016

उड्डाण पुलाखाली

उड्डाण पुलाखाली

उड्डाण पुलाखाली
लहानची ती मोठी झाली
तिच्या चेहर्‍यावर विलसणारं
गर्भारपणाचं तेज पाहून
समजतंय,
निसर्गानं आपलं काम चोख बजावलंय
यथावकाश दिलाय तिने
एका गोंडस मुलाला जन्म
आता सिग्नलला थांबून
भोवतालच्या गर्दीत
भिरभिरत्या नजरेने
घेतेय ती
बाळाच्या बापाचा शोध!



उड्डाणपुलाखाली
दीनवाण्या चेहर्‍यानं
भीक मागणारी मुलं पाहून वाटतं
हीच का या देशाची भावी पिढी?
याचक म्हणून जगणारी!
पण ह्याच मुलांकडून
गरगरीत पोटावरुन
ढासळणारी पॅन्ट सावरीत
कोपर्‍यात उभ्या असलेल्या मामानं
केलेली हप्तावसूली पाहून
संभ्रम पडतो
खरा भिकारी कोण?
ही मुलं का तो मामा?
उत्तर वाचकानी शोधावं!



उड्डाण पुलाखाली
आपलं बालपण विसरुन
भीक मागणारी मुलं
कमावतात दिवसाकाठी
पाच-पन्नास रुपये
उदर निर्वाहासाठी!
अन् संध्याकाळी
देतात ते पोलिसाला
दहा रुपयांचा हप्ता
बिनदिक्कतपणे!
यापेक्षा वेगळं दानशूरत्व
आणखी काय असू शकतं?



उड्डाण पुलाखाली
परदेशासारखे
सुंदर उद्याने खुलण्याऐवजी
स्थिरावलेत येथे
अनेकांचे संसार
येथेच होतात त्यांचे विवाह
सुहागरातही येथेच रंगते
संसार वेलीवर फुलेही उमलतात
अन्
रोजगारही येथेच मिळतो
यांना न कसली चिंता
ना कसलं भय
नसतो यांचा बँक बॅलन्स
नसतो यांना आयकराचा त्रास
एक हप्ता पोलिसाकरवी
स्थानिक पुढार्‍याला पोहोचल्यावर
विसावतात ते जन्मभर आनंदात
याच उड्डाण पुलाखाली
याच उड्डाण पुलाखाली


शहरात ठिकठिकाणी उभारलेल्या
उड्डाण पुलाखाली
सिग्नलला थांबताना
दिसतात मला
आठ-दहा वयोगटातील
लहान मुले
कधी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला
तर कधी प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला
देशाचा तिरंगी झेंडा विकताना
तर ख्रिसमसच्या निमित्ताने
सान्ताक्लॉज विकताना
कधी पावसाळ्यात विकतात ते छत्र्या
पावसात भिजत-भिजत
तर कधी उन्हाळ्यात
गार पाण्याच्या बाटल्या
उन्हात पोळत-पोळत
चित्रांची पुस्तकेही विकतात ते
लहानग्यांच्या खुशीसाठी
खेळणीही असतात त्यांच्याकडे
खेळण्याच्या वयात पण
अशी खेळणी विकताना पाहून
आतून गलबलून येतं
पण थोडं समाधानही वाटतं
देशाची भावी पिढी
कष्टाने कमावून खातेय याची
ऐदीपणाच्या विळख्यातून सुटून
प्रामाणिकपणे जगतेय याची!


सौ. चंद्रलेखा बेलसरे, पुणे
8554981971
(पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक 'चपराक', पुणे)

अंध कळ्यांच्या सहवासात....

तुला पाहते रे तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते
जरी आंधळी मी तुला पाहते

नीताने भावेशबद्दल, आपल्या नवर्‍याबद्दल काढलेले हे शब्द. आयुष्यात समर्पण, अत्युच्च प्रेम ह्याचा वास्तुपाठ म्हणजे नीता. स्वत: डोळस असून एका अंध मुलावर जीवापाड प्रेम करून, घरच्यांचा विरोध पत्करून त्याच्याशी प्रेमविवाह केला.
भावेश शाळेत असताना मुलं त्याला ‘आंधळा, आंधळा’ म्हणून चिडवत. त्याची आई फार शिकलेली नसली तरी त्याला वाचून दाखवायची. तिनेच त्याला शिकवले. ती माऊली म्हणाली, ‘‘भावेश तू जग बघू शकत नसलास तरी असं काहीतरी वेगळं करून दाखव की जग तुझ्याकडे बघेल.’’ भावेशला स्वत:ला प्रकाश दिसत नव्हता तरी जगाला प्रकाश देणार्‍या मेणबत्त्या बनवायची इच्छा होती.
संकटं एकटी येत नसतात. ती हातात हात घालून येतात. तसंच भावेशचं झालं. त्याची नोकरी गेली, कॅन्सरने त्याची आई गेली, वडील तर आधीच गेले होते आणि त्याची दृष्टीही संपूर्ण गेली पण खचून न जाता संकटांना संधी मानून त्याने स्वत:च्या पायावर उभं रहायचं ठरवलं. मेणबत्त्या करून हातगाडीवरून तो विकू लागला. त्याला कोणी कर्ज देईना, मदत करेना. त्याचवेळी नीता त्याच्या आयुष्यात आली.
हळूहळू त्यांनी स्कूटर घेतली, मग टेम्पो घेतला. मोठ्या प्रमाणात मेणबत्त्या करून स्वत:ची कंपनी काढली. त्यात अनेक अंध मुलांना शिकवून पायावर उभं केलं. स्वावलंबी बनवलं. या यशात त्याची पत्नी नीता हिचाही मोठा वाटा आहे. अंधत्व ही कमतरता न मानता त्यावर मात करून तो खेळाडू झाला. अनेक खेळात तसेच पॅरा ऑलिंपिक्स मध्ये त्याने भरपूर पदके मिळवली. स्वत:च्या जिद्दीवर आपला व्यवसायही त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला. त्याचा वेलू गगनाला भिडला आहे. खेळाप्रमाणे व्यवसायातही अनेक रेकॉर्डस् भावेशला मोडायचे आहेत. आज तो आपल्या पत्नीबद्दल कृतज्ञतेने म्हणतो,
आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे
स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे

भावेशवरून आणखी एक गोष्ट आठवली. शाळेत मास्तरांनी विद्यार्थ्यांना कागदाचे अनेक तुकडे दिले आणि सांगितले की हे तुकडे जोडून भारताचा नकाशा बनवा. एका मुलाने पटकन नकाशा बनवला. मास्तरांनी विचारलं, ‘‘इतका लवकर कसा बनवलास?’’ विद्यार्थी म्हणाला, ‘‘या कागदांच्या तुकड्याच्या मागे माणसाचं चित्र आहे, मी माणूस जोडला. भारताचा नकाशा आपोआप तयार झाला.’’ याला राष्ट्रीय एकात्मता म्हणतात. ही एकात्मता आपल्या भारताची शान आहे. ती मला अनामप्रेमींनी महाबळेश्‍वरला अक्षयतृतीयेला अंधांचे राष्ट्रीय संमेलन घेतले होते त्यात बघायला मिळाली. मी पण अनामप्रेमी आहे. म्हणूनच मलाही हा सोहळा बघायचं भाग्य लाभलं.
अनाम म्हणजे ज्याला कोणत्याही प्रसिद्धीची गरज वाटत नाही, आपले नाव कुठेतरी यावे असे मनात वाटत नाही ते अनाम आणि प्रेमाने कोणतीही परिस्थिती, म्हणजे जग जिंकता येते म्हणून अनामप्रेम. अंधांच्या सहवासात तीन दिवस राहिले. त्यांच्याशी बोलले, त्यांच्याबरोबर सहभोजन केले. त्यांच्या कोंडलेल्या भावनांना, हृदयातील वेदनांना वाट करून दिली, साद घातली. तेव्हा जाणवलं दुदर्म्य इच्छाशक्ती असली की त्यापुढे काहीही अशक्य नसत. गांधीजींनी सत्याचे प्रयोग केले. आम्ही प्रेमाचे प्रयोग करतो. प्रेमाचे प्रयोग करताना वाटलं खरं म्हणजे आपण डोळे असलेले लोक अंध आहोत. कोणी सत्तेने, कोणी धर्माने, कोणी पैशानी, कोणी व्यवहारातील तात्कालिक लाभांनी. जे डोळस आंधळ्यांसारखे वागतात त्यांच्यासाठी ओशो म्हणतात, ‘‘मै अंधोंकी बस्ती मे रोशनी लेके घूम रहा हूँ!’’
अंधांना फक्त चर्मचक्षू नाहीत पण त्यांचे अंत:चक्षू उघडले आहेत. त्यांना तुमच्यातील आत्मा दिसतो, सहसंवेदना जाणवते. म्हणून आपण थोडा काळ आपलं अंधत्व विसरून या खर्‍या अंधांवर प्रेमाचं सिंचन करू या. अंध केवळ वासानी, स्पर्शानी, ऐकण्यानी कितीतरी गोष्टी आपल्यापेक्षा सरस करू शकतात.
‘‘डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे’’
असं म्हणणार्‍या या अंधमुलांच्या राष्ट्रीय मेळाव्यातून मी त्यांचे अदृष्य प्रेम समजून घेऊ शकेल.
इतके वर्ष फक्त अन्यायाच्या रॅली (कामगारांचे प्रश्‍न, त्यांच्या मागण्या, पगारवाढ इ.) पाहील्या होत्या, पण महाबळेश्‍वरला या अंधांची प्रेमाची रॅली आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली. प्रेम ओसंडून वहात होते. त्या बिचार्‍या मुलांच्या काही मागण्या, प्रश्‍न नव्हतेच. उलट गोड आवाजात आपापल्या भाषेत सर्व मुलं छान हसून गाणी म्हणत होती. या रॅलीचं अवर्णनीय दृष्य बघून डोळ्याचं पारणं फिटलं. अंतर्मुख व्हायला झालं. भारतातल्या दहा राज्यांमधून एकोणीस शांळाचे सर्व वयोगटातील चारशे विद्यार्थी जमले होते. हिंदुस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच अंधांचा राष्ट्रीय मेळावा झाला आहे. सगळ्यांनी जगावेगळं समृद्ध जग पाहिलं.
अंध मुलांचं वागणं, बोलणं, त्यांचं पाठांतर, त्यांचे कडूगोड अनुभव, त्यांना पावलोपावली येणार्‍या समस्या, तरीही आनंदी वृत्ती, जिद्द आणि कष्टाची तयारी पाहिली. त्यांची स्थिरता, एकाग्र चित्त आणि एकाग्र मनानी कोणतीही गोष्ट करणं, प्रवाहाविरूद्ध जावे लागूनही जगण्याची जिगर, मोठं मन पाहिलं. आमच्या अडचणी, आमचे प्रश्‍न कुठल्याकुठे विरून गेले. तेव्हा वाटलं आपलं दुखलेलं कळतं तसं दुसर्‍याचं दुखलेलंही आपल्याला कळलं पाहिजे. आपण कृतज्ञतापूर्वक समाजाचं जे देणं लागतो. ते दिलं पाहिजे, कोणत्याही सबबी न सांगता. म्हणतात ना ‘जिथे इच्छा आहे तिथे मार्ग निघतो‘, ‘ज्याला आवड आहे त्याला सवड मिळते.’ या अंध मुलांनी आपण अंध आहोत याचा बाऊ न करता, सहानुभूती न मागता उलट त्याचा स्वीकार केला आहे. म्हणूनच त्यांची सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती होते आहे.
खरं तर आपण डोळस लोक भाग्यवान आहोत. आपल्याला निसर्गाची सर्व रूपं बघता येतात. चंद्र, सूर्य, पक्षी, प्राणी, झाड, फुल, फळ, समुद्र, नद्या, डोंगर. पण आपण तो निसर्ग अनुभवत नाही. उपभोगतच नाही कारण आपण स्वत:शीच एकरूप नाही. तर इतरांशी एकरूप कसे होणार? माणसाच्या सुखासाठी निसर्ग सिंहाचा वाटा उचलतोय. आपण निदान खारीचा तरी उचलूया. परिवर्तन हृदयापासून केलं तर यशस्वी होतं. म्हणून आपण स्वयंप्रकाशित होऊ आणि इतरांना प्रकाश देऊ. मनामनात क्रांती झाली की समाजातील उपेक्षितांना आपोआप मदतीचे हात दिले जातील. त्यांच्यावर असं प्रेम करूया की ज्या प्रेमात कसलीही अपेक्षा नाही, स्वार्थ नाही, फक्त समर्पण आहे. खरं म्हणजे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे.
इथे अंध मुलांनी रोप मल्लखांबात आंतरराष्ट्रीय रेकॉर्डस् तोडले होते. काही जणांनी  अंधांसाठी असणार्‍या आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावले होते. ऑर्केस्ट्रामध्ये  सर्वप्रकारची वाद्ये डोळसांना लाजवतील इतक्या सफाईदारपणे मुले वाजवीत होती. स्टेजवर सर्व नृत्यप्रकार एकही बीट न चुकता करत होती. त्यांची स्टेजवरची थिरकणारी पावलं बघून थक्क व्हायला होतं. आपोआप सर्व प्रेक्षकांकडून त्यांना स्टँडिंग ओव्हिशन दिले गेले. टाळ्यांचा कडकडाटात भरभरून दाद मिळाली. गाण्याचा सुंदर, सुरेल गळा, तालासुरांचं अद्भूत ज्ञान, अभिनय, कविता, साहित्य एकही क्षेत्र असं नाही की ज्यात या अंध मुलांनी प्राविण्य मिळवलं नाही. त्यांच्यात अनेक कलागुण आहेत. त्यांना फक्त अनाम प्रेमींनी व्यासपीठ दिले.
काही अंध विद्यार्थी सी. ए. झाले आहेत. काही इंजिनीअर, एम. बी. ए., कोणी मोठे व्यावसायिक, कोणी मोठ्या पदावर अधिकारी आहेत. खेळात, गिर्यारोहनात, मॅरॅथोन कशातही ही मुले मागे नाहीत. एक जण तीन डिगर्‍या घेऊन शाळेची मुख्याध्यापिका आहे. नेहाने हिमालयातील उंच शिखर चढून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये जागतिक विक्रम नोंदविला आहे. महाराष्ट्र राज्याच्या विशेष गिर्यारोहणाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. दिल्लीला जागतिक महिला अधिवेशनातही जगातील ज्या अंध महिलांची निवड केली गेली त्यात नेहाची निवड झाली होती. काहीजणी वॉटरफॉल रॅपलींगसारख्या साहसी गिर्यारोहणात अग्रेसर होत्या. कोणाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार मिळाला तर कोणाला ‘ऑल राऊंडर’ पुरस्कार मिळाला. कुणी नृत्यात अग्रेसर तर कोणाची अंध संस्थेचे अध्यक्ष, सचिव म्हणून निवड झाली.
फिटे अंधाराचे जाळे,
झाले मोकळे आकाश
दरी खोर्‍यातून वाहे
एक प्रकाश प्रकाश

महाबळेश्‍वर सोडताना माझी अवस्था अशीच झाली.
खूप अभिमान वाटावा अशी कामगिरी करणार्‍या अंध विद्यार्थ्यांकडे पाहून असे वाटले, ‘लेट्स नॉट गीव सिम्पथी बट ऑपोर्च्युनिटी टू देम.’
तसेच अनामप्रेम ही एक विचारधारा आहे, प्रवाह आहे, परिवार आहे. ‘प्रेम शिंपीत जा’ हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. समाजातील उपेक्षितांसाठी मग ते मुकबधिर, अंध, अपंग, मतीमंद, अनाथ कोणीही असोत त्यांच्यासाठी हृदयापासून वाटणार्‍या तळमळीने, भक्तीभावाने, निरपेक्षपणे काहीतरी समाजासाठी चांगलं काम करण्याची धडपड पाहून अनाम प्रेमींनाही सॅल्युट करावासा वाटला. हेलन केलर, आएशा यांसारख्या संस्थामधून अंधांसाठी आणि इतर सर्वांसाठी काम करणार्‍या माझ्या मैत्रिणी म्हणत असतील,
कधी भक्त का पाहतो ईश्‍वराला
नदी न्याहळी का कधी सागराला
तिच्यासारखी मी सदा वाहते
जरी आंधळी मी तुला पाहते.


(पूर्वप्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक', मार्च २०१६)
- उज्ज्वला कुलकर्णी, पुणे 

९८९०९४६६८४ 

Tuesday, March 29, 2016

एका ऐतिहासिक उठावाच्या सर्व बाजू सांगणारा ग्रंथ

सन अठराशे सत्तावन्न
एका ऐतिहासिक उठावाच्या सर्व बाजू सांगणारा ग्रंथ 
'साप्ताहिक चपराक', पुणे 

(२८ मार्च २०१६)

अठराशे सत्तावनचा उठाव. त्याबद्दल साधारणपणे एकच मतप्रवाह आढळतो. तो स्वातंत्र्यलढा होता असं ते मत. तो उठाव मोठा होता यात शंका नाही; मात्र तो स्वातंत्र्यलढा होता का? त्याबद्दल वेगवेगळी मतं व्यक्त केली जातात. बेचाळीसचा उठाव स्वातंत्र्यलढा होता. त्यानंतर आझाद हिंद सेनेने केलेला उठावही स्वातंत्र्यलढाच. ब्रिटिशांबद्दल खूप संताप होता, म्हणूनच अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला ही गोष्ट मात्र खरी आहे. या उठावाला असंख्य बाजू आहेत. शेषराव मोरे म्हणतात त्याप्रमाणं, एक बाजू ‘जिहाद’ची देखील आहे. ना. के. बेहर्‍यांचा ‘सन अठराशे सत्तवन्न’ हा ग्रंथ या उठावाच्या सर्व बाजू मांडतो. 489 पानी हा ग्रंथ. यात सत्तावन्नमध्ये घडलेला भयानक रक्तपात, बंडखोर व ब्रिटिश दोघांनी आखलेले डावपेच, त्यामागचं राजकारण अशा सर्व बाबी येतात. हा उठाव दडपताना ब्रिटिशांनी दाखवलेली राक्षसी वृत्ती भयानक होती, तसंच बंडखोरांकडूनही अत्यंत अमानवी व हिंस्त्र हत्या घडल्या. त्याचा संपूर्ण लेखाजोखा ग्रंथात आला आहे.
ब्रिटिशांनी भारत जिंकून घेतला तोच मराठ्यांपासून. औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतर मराठ्यांनी सगळा भारतच ताब्यात घेतला होता. दिल्लीच्या मुघल बादशाहीचं प्राणपणानं रक्षण देखील केलं होतं. ग्रंथाच्या सुरूवातीला लेखकानं हे ऐतिहासिक सत्य सांगितलं आहे. नंतर लेखक 1857 च्या उठावाची कारणं सांगतो. लॉर्ड डलहौसीची लोभी वृत्ती यामागं होती. तो 1848 मध्ये भारताचा गव्हर्नर जनरल झाला. भारतातली अनेक संस्थानं त्याच्या डोळ्यात खुपू लागली. आधी सातार्‍याच्या प्रतापसिंह भोसल्यांचं राज्य इंग्रजांनी गिळलं. दि. 29 मार्च 1849 रोजी डलहौसीनं पंजाबचं राज्य खालसा केलं. तिथं राजा रणजितसिंहाचं राज्य होतं. रणजितसिंहाचा मुलगा दिलीपसिंह. त्याला तर ब्रिटिशांनी ख्रिस्तीच केलं. डलहौसीनं पुढं मराठ्यांच्या तंजावर येथील राज्याची देखील तीच गत केली. नागपूरच्या भोसल्यांचं राज्य देखील डलहौसीच्या कारस्थानांना बळी पडलं. ब्रिटिश कापडाचा व्यापार करत. त्यासाठी त्यांना मुबलक कापूस हवा असे. यासाठी त्यांनी वर्‍हाड व मध्य प्रांतावर कब्जा केला. दि. 2 ऑगस्ट 1854. या दिवशी डलहौसीनं झांशीचं राज्य खालसा केलं. दि. 4 फेब्रुवारी 1856. या दिवशी लखनौच्या संपन्न राज्याचा देखील घास घेण्यात आला. इ. स. 1714 ते 1818 हा साधारण 104 वर्षांचा पेशवाईचा काळ. 1818 साली पेशवाई नष्ट झाली व ब्रिटिशांनी मराठ्यांना सरळ चेपायला सुरूवात केली. साम, दाम, दंड, भेद! ब्रिटिशांच्या राजकारणाचं सूत्रच होतं हे. ब्रिटिशांची व विशेषः डलहौसी या महाभागाची ही वृत्ती असंतोषाला कारणीभूत ठरत गेली. ब्रिटिशांचं हे हातपाय पसरणं लेखकानं ग्रंथाच्या सुरूवातीलाच खूप तपशीलानं सांगितलं आहे. पेशवाईच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी भारतभर झेंडे रोवले होते. अटकेपर्यंत राज्य नेलं होत; मात्र नंतर इस्ट इंडिया कंपनीच्या राजकारणानं सर्वांवरच कडी केली. त्यात दुसरा बाजीराव पेशवा. तो घरबुडवा निघाला. त्यानं 1802 साली वसई येथे ब्रिटिशांशी तह केला. तो दिवस होता 31 डिसेंबर. त्या दिवसापासून मराठ्यांच्या राज्यातच भांडणं व मतभेद सुरू झाले. ब्रिटिश या सगळ्यांचा फायदा घेत गेले. राजकारण हा शेवटी बुद्धिबळाचाच पट असतो. हे बुद्धिबळाचे खेळ बेहर्‍यांच्या या ग्रंथात पानोपानी वाचायला मिळतात. ग्रंथ कुठेही बोजड नाही. कंटाळवाणा तर नाहीच. अभ्यासपूर्ण व वाचनीय असा तो आहे. बेहर्‍यांनी हा ग्रंथ लिहिला 1927 साली. त्यानंतर 11 वर्षांनी त्याची दुसरी आवृत्ती निघाली. मग थेट 2007 साली तिसरी आवृत्ती. ती काढली पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशनने.  ते 1937 साल होतं. त्यासाली स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बेहर्‍यांच्या या ग्रंथाची स्तुती केली होती. ‘हा ग्रंथ खर्‍या इतिहासाला धरून आहे’ असे सावरकरांचे उद्गार होते. ग्रंथ वाचताना सावरकरांचे हे उद्गार आपल्याला आठवत राहतात.
दिल्ली, लखनौ, कानपूर व झांशी ही सत्तावनच्या उठावाची प्रमुख केंद्रे होती. यात लखनौ वगळता इतरत्र ब्रिटिश बायका व मुलांच्या कत्तली झाल्या, असा उल्लेख ग्रंथात आढळतो. त्यात सर्वात भीषण कत्तल कानपुरला झाली. त्याचा सूड म्हणून ब्रिटिशांनी कानपूर व आसपासच्या परिसरात दहा हजार भारतीयांच्या कत्तली घडवून आणल्या. वाटेल ती किंमत देऊन ब्रिटिशांना हा उठाव दडपायचा होता. त्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडलं. आपली सगळी बुद्धी, शक्ती वापरली. त्याची सगळी वर्णन बेहर्‍यांनी दिली आहेत. दिल्ली जिंकून घेताना ब्रिटिशांचे 61 लाख रूपये खर्च झाले व 3837 सैनिक मरण पावले; मात्र ब्रिटिशांनी ती किंमत चुकती केली. पुढं त्यांनी झांशी जिंकून घेतलं तेव्हा सूडबुद्धीनं पाच हजार जणांना ठार मारलं. झांशीतली लढाई घनघोरच होती. झांशीच्या राणीनं 17 दिवस किल्ला लढवला. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशीच स्थिती त्या काळात झांशीच्या राणीची होती. या चार शहरांमधली बंडाची आग भयंकर होती. त्याला उघड राज्यक्रांतीचं स्वरूप आलं होतं. ही आग विझवायला ब्रिटिशांना एक वर्ष लागलं.
हा उठाव का झाला? त्याची कारणं बरीच होती; मात्र ठिणगी पडली ती एका घटनेमुळं. त्यावेळी कोलकत्याहून आठ मैलांवर ‘दमदम’ ही लष्करी छावणी होती. तिथं ब्रिटिशांनी काडतुसे तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता. त्यावेळी ब्रिटिश फौजेतील शिपाई ‘ब्राऊनबेस’नावाची बंदुक वापरत असत. या बंदुकीत काडतूस भरताना ते दातांनी तोडून बंदुकीत भरावं लागे. या काडतूसाला गाईची व डुकराची चरबी चोपडली जाते अशी अफवा उठली. ब्रिटिशांनी देशी शिपायांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला; मात्र काडतूस वापरताना आपला धर्म बाटेल या विचारानं हिंदू व मुसलमान शिपाई अस्वस्थ झाले. ते आतल्या आत घुसमटू लागले व दि. 29 मार्च 1857 रोजी बराकपूर येथे सर्वप्रथम मंगल पांडे बिथरला. त्यानं एका ब्रिटिश अधिकार्‍यावर गोळी झाडली. तो अधिकारी बचावला; मात्र त्या गोळीनं ‘1857’चा अध्याय सुरू झाला. तो संपायला पुढं दोन वर्षे लागली. काय घडलं या दोन वर्षात? तर उत्तर भारतात अक्षरशः हलकल्लोळच माजला होता. बेहरे यांनी या सगळ्या घटना सांगितल्या आहेत. त्यात लढाया, राजकीय डावपेच सगळं काही आहे. त्यावेळी भारतात इस्ट इंडिया कंपनी राज्य करत होती. तिच्या फौजेत अयोध्या, कानपुर, अलाहाबाद, वाराणसी टापूतील पूरभैयांचा खूप भरणा होता. या पूरभैयांच्या पलटणी बिहार, मध्य प्रांत, संयुक्त प्रांत, वायव्य प्रांत, मध्य हिंदुस्थानातील संस्थानं, पंजाब अशा सर्व उत्तर हिंदुस्थानभर पसरल्या होत्या. उठावात या पलटणी सर्वात पुढं होत्या. मुसलमान शिपाई तर उठावात सामील होतेच. अशावेळी ब्रिटिशांनी आपल्या फौजेतील शीख व गुरखा पलटणींना आपल्याकडे वळवून घेतले व केवळ त्यांच्या मदतीनेच उठाव दडपला. शीख व गुरखे विरोधात गेले असते तर? तर ब्रिटिश अक्षरशः मेले असते; मात्र ते विरोधात गेले नाहीत त्याला ऐतिहासिक कारणं होती. एक तर शिखांना त्यावेळी मोगल बादशाही मान्य नव्हती. बंडखोरांनी तर मोगल बादशहालाच आपला राजा मानलं होतं. शिखांचे गुरूगोविंदसिंगांसारखे काही धर्मगुरू पूर्वी मोगल बादशहाकडून मारले गेले होते. त्यामुळे शिखांना या बादशाहीविरूद्ध आतून तिटकारा होता. आणखी एक कारण होतं. 1849 साली शीख-इंग्रज युद्ध झालं होतं. त्यावेळी पूरभैय्या व मुसलमान पलटणींनी शिखांविरूद्ध लढून इंग्रजांना विजय मिळवून दिला होता. त्याचाही राग शिखांच्या मनात होता. गुरख्यांची अवस्था अशीच होती. पूर्वी नेपाळ देखील ब्रिटिशांनी जिंकून घेतला होता तो या पूरभैय्या व मुसलमान पलटणींच्या बळावरच. आता गुरख्यांना त्या घटनेचा सूड घ्यायचा होता. यातली ब्रिटिशांची चलाखी व मुत्सद्देगिरी लक्षात घेण्यासारखी होती. ब्रिटिश भारतीय संस्थानं खालसा करत होते. दुसरीकडे या संस्थानिकांना एकमेकांविरूद्ध कोंबड्यासारखं झुंजवत होते; मात्र सगळ्यांनी एकत्र येऊन ब्रिटिशांना बुडवावं असं कुणालाही वाटलं नाही. नेपाळचा राजा जंगबहाद्दूर. तो देखील ब्रिटिशांच्या मदतीला धावला. त्याचं कारण वर आलंच आहे. प्रत्येकाला आपापले हेवेदावे साधायचे होते. या हेवेदाव्यांचा परिणाम एकमेकांचे रक्त सांडण्यात झाला. यासंदर्भात एक पत्र फार बोलकं आहे. ते लिहिलंय लॉर्ड लॉरेन्सनं सर फ्रेडरिक करी याला. लिहिलं 1858 मध्ये. तो म्हणतो, ‘‘हॅड द पंजाब गॉन, वुई मस्ट हॅव बीन रूइंड.’’ पंजाब बिथरला असता तर सर्वनाश अटळ होता असं तो म्हणतो. बंडाच्या काळात राजपुताना (राजस्थान) शांतच राहिला व महाराष्ट्रातही बंडाचं मोठं वारं शिरलं नाही. झांशीची राणी, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे हे मराठे तेव्हा लढले. ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी प्राण पणाला लावले; मात्र त्यांच्या सैन्यातली एकूण मराठ्यांची संख्या कमीच होती. रजपूत शांत राहिले ते त्यांच्या काहीशा स्थितीप्रिय वृत्तीमुळं. सत्ताधारी हे मोघल असोत, मराठे असोत वा ब्रिटिश, सत्तेपुढं लीन रहायचं ही ती स्थितीप्रियता. दुसरीकडे बंगाल व मद्रास प्रांत देखील शांतच राहिले.
मंगल पांडे ते तात्या टोपे असा देखील हा सगळा प्रवास आहे. मंगल पांडेला ब्रिटिशांनी फाशी दिलं. त्या फाशीची तारीख मात्र ग्रंथात दोन ठिकाणी वेगवेगळी देण्यात आली आहे. पृष्ठ क्र. 155 वर ती 6 एप्रिल 1857 आहे तर पृष्ठ क्र. 207 वर दि. 8 एप्रिल 1857. मंगल पांडे नंतर बरोब्बर दोन वर्षांनी ब्रिटिशांनी तात्या टोपेंना फाशी दिली. तो दिवस होता दि. 18 एप्रिल 1859.
बेहर्‍यांच्या मते उत्तर हिंदुस्थानातील या ऐतिहासिक बंडात हिंदुंपेक्षा मुसलमानांचा सहभाग जास्त होता. कारण त्यांनी ब्रिटिशांविरूद्ध तेव्हा जिहादच पुकारला होता. शेषराव मोरे यांनी नंतर हेच सांगितलं. ‘लखनौ शहर बंडखोरांनी एखाद्या किल्ल्याप्रमाणे लढवलं’ असं बेहेर्‍यांनी म्हटलंय. लखनौमधील बंडखोर हे सगळेच मुसलमान होते. त्यांच्या शौर्याचं जबरदस्त कौतुक सावरकरांनी देखील आपल्या ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथात केलेले आहेच.
ग्रंथात मथुरा, बरेली, आग्रा, शहाजहानपुर, वाराणसी, अलाहाबाद, ग्वाल्हैर, इंदौर, महू, लाहौर, पेशावर, नझफगड येथील उठावांची देखील माहिती देण्यात आली आहे. ‘सत्यासारखा धर्म नाही’ असं बेहेरे एकेठिकाणी म्हणतात. त्यामुळं ते हा इतिहास सांगताना सत्य घटना सांगण्यावर भर देतात. बेहेर्‍यांनी दोन उदाहरणे सांगितली आहेत. त्यावरून ही गोष्ट लक्षात यावी. एका ब्रिटिश अधिकार्‍याने या बंडाच्या धुमश्‍चक्रीत वीस हजार निरपराध स्त्री-पुरूषांचे प्राण वाचवले. ही घटना झांशीतली. दुसरीकडे सर जॉन के, लॉर्ड कॅनिंग, एडवर्ड थॉमसन ही ब्रिटिश मंडळी सत्यच सांगतात. ब्रिटिशांचे राक्षसी अत्याचार सांगताना ही मंडळी मागेपुढे पाहत नाहीत. त्यांची मतं बेहर्‍यांनी दिली आहेत.
बेहर्‍यांच्या मते त्याकाळी एकराष्ट्रीयत्वाची भावना भारतात नव्हती. 1885 साली कॉंग्रेसची स्थापना झाली. बेहर्‍यांच्या मते त्यानंतर भारतात एकराष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. ग्रंथात 1857-58च्या वेळचा भारताचा नकाशा आहे. त्यातून भुगोल तर समजतोच; पण ऐतिहासिक ग्रंथ नकाशांमुळे नीट समजायला मदत होते. काही छायाचित्रे ग्रंथात आहेत. त्यातील कुंवरसिंह, झांशीची राणी, नानासाहेब पेशवे, बहाद्दूरशहा जफर, बेगम झिनत महल, तात्या टोपे यांची छायाचित्रे आपल्याला भूतकाळात खेचून नेतात. एकूणच 1857 च्या उठावाचा समतोल अभ्यास या ग्रंथातून आला आहे. 


* सन अठराशे सत्तावन 

* लेखक : नारायण केशव बेहेरे 
* प्रकाशक : श्रीविद्या प्रकाशन, पुणे (०२०-२४४५८४५५)
* पृष्ठे : ४८९, * मूल्य : ३०० 

* महेश मांगले, पुणे 
९८२२०७०७८५

Sunday, January 3, 2016

अहंगडी श्रीपाल


लातुर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर यांचा हा विशेष लेख खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी!

‘मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले नाही उचलणार’ या आविर्भावात ‘मी चुकीचे काही बोललो नाही, मी माफी मागणार नाही’ अशी राणा भीमदेवी थाटातील घोषणा पिंपरी चिंचवड येथील नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी लातूर येथील मसापच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी केली.
गेल्या दोन दिवसापासून श्रीपाल सबनीस चांगलेच चर्चेत आले आहेत. ‘दोन जोड्याने हाणा पण ........म्हणा’ अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलीत आहे. त्या म्हणीची प्रचिती श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यातून येत आहे.
श्रीपाल सबनीस यांनी पिंपरी चिंचवड येथील भाषणातून जी मुक्ताफळे उधळली आहेत, त्यावर कोणतीही मराठी भाषा समजणारी व्यक्ती असे वक्तव्य करणारा माथेफिरुच असला पाहिजे अशी सहज प्रतिक्रिया व्यक्त करेल. साहित्य संमेलनाध्यक्ष यांनी कोणत्या विषयावर बोलावे याला बंधने अर्थातच नाहीत. तशी कोणी अपेक्षाही केली नाही. पण बोलायला राज्यघटनेने अधिकार दिला म्हणून जिभेला हाड न ठेवता बोलण्याचा अधिकार वापरणे हे निश्चितच शहाणपणाचे लक्षण नाही. लातूरात भाजपा कार्यकर्त्यांनी सबनीसांच्या सत्कार समयी निषेधाच्या घोषणा दिल्या तेव्हा येशू ख्रिस्ताचा खरा अनुयायी आपण आहोत या थाटात उपदेशाचे डोस पाजले.
आपले चुकले आहे याची पूरेपूर जाणिव सबनीस यांना आहे मात्र आपण माफी मागितली तर आपली शिल्लक असलेली प्रतिष्ठा धुळीला मिळेल, या भीतीने माफी मागण्याचे ते साहस करत नाहीत. बुद्धांचे नाव उच्चारले म्हणजे बुध्दाच्या वैचारिक वारसाचे पेटंट मिळाल्याचा आनंद काही जणांना होतो. त्या आनंदापासून सबनीस यांना पारखे करण्याचे काही एक कारण नाही.
‘‘मोदी यांचा एकेरी उल्लेख आपण आत्मिय भावनेतून केला. त्यांच्याबद्दल आपल्याला काळजी वाटत होती, माझा शिवाजी, माझा तुकाराम, माझी आई या पध्दतीने एकेरी शब्द वापरला’ असे त्यांनी श्रोत्याना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने श्रोते वेडगळ नव्हते. श्रीपाल सबनीस हे शब्दांची कसरत करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत हे न समजण्याइतके श्रोते अडाणी नक्कीच नव्हते.
मोदी यांच्या विदेशवारीचा उल्लेख ‘बोंबलत फिरणे’ असा करुन उलट ही माझी मोकळी ढाकळी भाषा आहे, आत्मिय भाव आहे असे समर्थन करणे कोणालाही पटणार नाही. समोरचे श्रोते निर्बुद्ध आहेत असा समज श्रीपाल सबनीस यांनी करुन घेतला असेल तर ते मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत. त्यांनी वापरलेला शब्द हा मोठ्या व्यक्तिने लहाण्यासाठी वापरण्याची पद्धत आहे. मोदींपेक्षा ते कोणत्या अर्थांनी मोठे आहेत हे त्यांनी समजावून सांगावे.
न पेक्षा मी बोलण्याच्या ओघात बोलून गेलो, यानंतर अशी चूक होणार नाही असे ते बोलले असते तर त्यांच्या विचारांची उंची कळली असती.
‘‘मी क्रांतीकारकाचा मुलगा आहे, कोणाला घाबरणार नाही, मोदीबद्दल गौरवोद्गार काढले नसतील तर मला जाहीर फाशी द्या’’ हेही म्हणायला ते विसरले नाहीत.
सबनीस यांचे पिताश्री कै. मोहनराव पाटील यांनी रा. स्व. संघाचे तालुका संघचालक म्हणून काही काळ काम केले होते हेही त्यांनी लक्षात ठेवले असते तर बरे झाले असते. राजकारण्यांप्रमाणे आपल्या इतिहासाचा वापर सोयीसाठी सबनीस करत आहेत, यापुरताच हा दाखला आहे. सबनीसांना अध्यक्ष पदाचा प्रसिद्धीसाठी वापर करायचा आहे. त्यांचा घटनादत्त अधिकार त्यांना लखलाभ.

(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
- प्रदीप नणंदकर, लातूर 
९४२२०७१६६६

Thursday, December 24, 2015

अटलजी! पत्रकार ते पंतप्रधान...



1942 साली लखनऊमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघ शिक्षा वर्ग भरविण्यात आला होता. संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. स. तथा गोळवलकर गुरुजी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले होते. शिक्षा वर्गात सर्वत्र कमालीची शांतता पसरलेली. तितक्यात व्यासपीठावरून पाहाडी आवाजात,
हिंदू तन-मन, हिंदू जीवन;
रग रग हिंदू मेरा परिचय’

ही कविता सादर झाली. अवघ्या 18 वर्षाच्या
त्या’ स्वयंसेवकाने सादर केलेल्या पद्यावर गुरूजी बेहद्द खूष झाले आणि त्यांनी त्या’ युवा स्वयंसेवकाची पाठ थोपटली. भविष्यात हाच स्वयंसेवक 3 वेळा भारताचा पंतप्रधान झाला. तो स्वयंसेवक दुसरा-तिसरा कोणी नसून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते!
1940 साली म्हणजेच वयाच्या 16 व्या वर्षी अटलजी आरएसएसच्या संपर्कात आले आणि कायमचे संघमय होऊन गेले. 1938 साली मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये संघाची शाखा सुरू झाली. 1940 साली नारायणप्रसाद भार्गव यांच्या सोबतीने अटलजी संघाच्या शाखेत जाऊ लागले. ग्वाल्हेरमधील प्रचारक नारायणराव तर्टे यांच्या प्रेरणेने अटलजींनी संघकार्यात झोकून दिले.
1942 साली महात्मा गांधींच्या
छोडो भारत’ आंदोलनाने देशभरात उग्ररूप धारण केले. भारतभर तरूणांचे मोर्चे, सभा, आंदोलने सुरू झाली. यासर्वात मागे राहतील ते अटलजी कसले. त्यांनी ग्वाल्हेरमध्ये तरूणांचे आंदोलन छेडले. चौकाचौकात तरूणांना जमा करून आवेशपूर्ण भाषणे द्यायला सुरूवात केली. वक्तृत्व कलेची निसर्गदत्त देणगी लाभलेल्या अटलजींच्या भाषणांमुळे ग्वाल्हेरमधील युवकांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आणि ब्रिटीशांची डोकेदुखी वाढली. त्यामुळे या आंदोलनाचे नेतृत्व करणार्या अटलजींवर ब्रिटीशांच्या सेवेत असलेल्या भारतीय पोलिसांची नजर गेली. अटलजींचे वडील पंडित कृष्णबिहारी वाजपेयी यांचा ग्वाल्हेरमधील मोठा लौकिक होता. त्यांच्याप्रति असलेल्या आदरापोटी पोलीस अधिकार्‍याने अटलजींची तक्रार केली. अटलजींनी आंदोलनाचे नेतृत्व करू नये अन्यथा त्यांना जेलमध्ये जावे लागेल असे नम्रपूर्वक त्यांच्या वडिलांना सांगितले. अटलने या गोष्टी थांबवून शिक्षणाकडे लक्ष द्यावे असे वडिलांनी त्यांना बजावले. मात्र राष्ट्रप्रेम ठासून भरलेल्या अटलजींनी आपले राष्ट्रकार्य सुरूच ठेवले. मात्र पुत्रप्रेमापोटी कृष्णबिहारी यांनी अटलजी यांची रवानगी त्यांच्या आजोळी म्हणजे बटेश्वरला केली.
नसानसात राष्ट्रप्रेम भरलेल्या अटलजींनी बटेश्वरमध्येही ब्रिटिशविरोधी वातवरण तापवले. अटलजींच्या या भाषणबाजीमुळे अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली. वयाच्या अठराव्या वर्षी अटलजींना जेलमध्ये जावे लागले. अटलजींना अटक करून त्यांची रवानगी आग्रा येथील बालसुधारगृहात करण्यात आली. पुढील 24 दिवस त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आणि त्यांची सुटका करण्यात आली. मात्र त्यानंतरही अटलजींचे राष्ट्रप्रेम तसूभरही कमी झाले नाही. त्यानंतर अटलजींनी आपले संपूर्ण जीवन देशसेवेसाला वाहिले.
1947 साली ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली जाऊन स्वतंत्र भारताची पताका ऐटीत डोलू लागली. असं असल तरी अटलजींच्या जीवनाचं ध्येय काही वेगळंच होतं. देश स्वतंत्र झाला असला तरी राष्ट्राला परमवैभवाप्रत नेण्याचं संघाचं व्रत त्यांनी स्वीकारलं होतं. मग काय दिलं झोकून संघाच्या प्रचारासाठी आणि झाले संघाचे पूर्णवेळ प्रचारक. या प्रचारकी जीवनात त्यांचा संपर्क आला तो पंडीत दिनदयाल उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी या ज्येष्ठ प्रचारकांशी. त्याचवेळी त्यांच्या राजकीय जीवनाची मुहुर्तमेढ रोवली गेली. त्याचवेळी जणू त्यांचा राजकीय संघर्षाशी करार झाला.
संघाने देशभरात पाळंमूळं रोवायला सुरूवात केली असली तरी संघाचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक होते. या गरजेतून संघाने पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या नेतृत्वात ऑगस्ट 1947 साली
राष्ट्रधर्म’ मासिकाची सुरूवात झाली. संघाचे हे पहिले वहिले मुखपत्र होते. दहा बाय दहाच्या रूममधून सुरू झालेल्या या मासिकाच्या पहिल्याच अंकाने देशभरात खळबळ माजवली. राष्ट्रधर्म’च्या पहिल्याच अंकाच्या मुखपृष्ठामुळे आणि त्यातील संपादकीय लेखामुळे कॉंग्रेस आणि डावे पक्ष चौथाळले. राष्ट्रधर्मच्या मुखपृष्ठावर खीर बनवत आहे, ती म्हातारी म्हणजे कॉंग्रेस पक्ष. त्या म्हातारीने खीर बनवण्यासाठी एकतेचं प्रतिक असलेला चरखा टाकून जाळ लावला आहे. त्याचवेळी त्या हंड्यातील खीर एक कुत्रा चाटत असल्याच दाखवण्यात आलं होतं. (तो कुत्रा म्हणजे मुस्लिम लीग पक्ष होता) विशेष म्हणजे या मासिकाच्या मुखपृष्ठावर गझलकार अमीर खुसरो यांच्या दोन ओळी लिहिल्या होत्या.
खीर पकाई जतन से, चरखा दिया जलाय;
आया कुत्ता खॉ गया, तु बैठी ढोल बजाय।

या मासिकाच्या निर्मितीची गम्मत अशी की, अंकाची बांधणी, त्यावरील पत्ता चिटकवणे आदि कामे पंडीतजी, अटलजी आणि राजीवलोचन हे तिघे करत. पंडीतजी याचे संपादक तर अटलजी त्याचे कार्यकारी संपादक होते.
राष्ट्रधर्म मासिकाच्या यशानंतर लगेचच संघाने साप्ताहिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. श्रीकृष्णाच्या शंखाचे नाव म्हणजेच
पांचजन्य’ हे नाव साप्ताहिकाला देण्यात आले. याच्या संपादकपदाची जबाबदारी अटलजींवर सोपवण्यात आली. 14 जानेवारी 1948 रोजी सुरू झालेल्या पांचजन्यचे जेमतेम 3अंक आले आणि त्याच दरम्यान 30 जानेवारीला गांधीजींची हत्या करण्यात आली. त्यामुळे संघावर बंदी आणण्यात आली. याबंदीमुळे राष्ट्रधर्म आणि पांच्यजन्यचे काम बंद करण्यात आले. मात्र अल्पावधीतच अटलजींनी या दोन्ही नियतकालिकांना लौकीक मिळवून दिला होता. संघावरील बंदी उठवण्यात आल्यानंतर एक दैनिकही सुरू करण्यात आले. स्वदेश असं या दैनिकाचे नामकरण करण्यात आले. अटलजींनाच या दैनिकाचे संपादक करण्यात आले. अल्पावधीतच दैनिकाने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत याचा गाजावाजा करण्यात आला.  विधानसभेत आणि लोकसभेत अंकाचा संदर्भ दिला जाऊ लागला. यातील, तिब्बत पर आक्रमण’, टंडन जी से’, गो वध बंद हो’, घुंसे को घुंसा’ आदी त्यांचे संपादकीय गाजले.
हा सर्वप्रवास सुरू असताना संघाने राजकीय पक्ष काढण्याचे ठरवले. आपला आवाज सभागृहात पोहोचवण्यासाठी 1951 साली भरतीय जनसंघ या पक्षाची स्थापना करण्यात आली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वात पक्षाने लोकसभा निवडणुकीला सामोरे जायचं ठरवलं. पंडीत दिनदयाल उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी आदी नेते जनसंघाच्या संस्थापक सदस्यापैकी एक होते. जनसंघाच्या स्थापनेच्या दोन महिन्यानंतरच स्वतंत्र भारतातील पहिल्या लोकसभा निवडणूका घोषीत करण्यात आल्या. मात्र या निवडणुकीत जनसंघाला केवळ तीनच जागा जिंकता आल्या.
त्यानंतर काही काळात काश्मीरला स्वायत्तता देण्याला मुखर्जींनी कडाडून विरोध केला. ’एका देशात दोन विधान, दोन निशान दोन प्रधान चालणार नाहीत’ हा संदेश घेऊन ते देशाच्या कानाकोपर्‍यात गेले. देशभर त्यांनी या मुद्यावरून आंदोलन पेटवले. आंदोलन करण्यासाठी मुखर्जी काश्मीरमध्ये गेल्यानंतर  तत्कालीन शेख अब्दुला सरकारने त्यांना अटक केली आणि नजरकैदेत ठेवले. 11 मे 1953 रोजी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आणि 23 जून 1953 म्हणजे 43 दिवसात त्यांचा गूढ मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युची बातमी ऐकून अटलजींच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांच्या मृत्युनंतर अटलजींनी त्यांच्या स्मृत्यर्थ
जम्मू की ललकार’ या शिर्षकाखाली कविता लिहिली.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या निधनानंतर पक्षाने दुसर्‍या लोकसभेची जबादारी अटलजींच्या खांद्यावर टाकली. अर्थात पक्षाची सुत्रे पंडीतजींकडेच होती. पक्षाने अटलजींना तीन लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास सांगितले. मथुरा, लखनऊ आणि बलरामपूर या मतदार संघातून ते निवडणुकीला सामोरे गेले. यामध्ये त्यांना दोन मतदार संघात पराभव स्वीकारावा लागला. बलरामपूर मतदार संघातून त्यांनी 10 हजार मतांनी विजय संपादित केला. मात्र मथुरेत त्यांची अनामत रक्कमही (डिपॉजीट) परत मिळवता आली नाही. याशिवाय अटलजींसह जनसंघाला केवळ 4 जागा मिळाल्या. यापैकी दोन खासदार महाराष्ट्रातून निवडून आले. यात धुळ्याचे डॉ. उत्तमराव पाटील आणि रत्नागिरीचे प्रेमजीभाई आसर हे दोघे निवडून आले. पुढे तिसर्‍या लोकसभेला ही संख्या 14 वर गेली.
महापालिका किंवा विधानसभेचा अनुभव गाठीशी नसताना अटलजींनी लोकसभा दणाणून सोडली. परराष्ट्र धोरण हा अटलजींचा आवडीचा विषय. या विषयात त्यांना चांगली गती होती. पंतप्रधान पंडीत नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावर विरोधीपक्ष असलेल्या डाव्यांनी सडकून टीका केली. मात्र यावेळी आपल्या जेमतेम चार मिनिटांच्या भाषणात त्यांनी पंडीत नेहरूंच्या धोरणातील काही मुद्दे कसे योग्य आहेत हे सांगितले. सर्व सदस्यांच्या भाषणानंतर पंडीतजी उत्तर द्यायला ऊठले. आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी नवख्या अटलजींची कौतुक केले. पंडीतजी म्हणाले, ‘‘अटलजींनी विरोधी बाकावर असतानादेखील माझ्या परराष्ट्र धोरणातील काही गोष्टींचे कौतुक केले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.’’ आपल्या भाषणात पुढे ते म्हणाले, ‘‘बोलण्यासाठी वाणी असणं गरजेचं असतं, मात्र गप्प बसण्यासाठी वाणी आणि विवेक या दोन्हींची आवश्यकता असते. अटलजींच्या या गोष्टीशी मी पूर्णपणे सहमत आहे’’, असं सांगून त्यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली.
अटलजींनी वेळोवेळी लोकसभेत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये त्यांनी पंचवार्षिक योजनेला कडाडून विरोध केला होता. यासंबधी बोलताना अटलजींनी भाषण केले. ते म्हणाले, ‘‘पंचवार्षिक योजनेबाबत लोकांमध्ये फारसा उत्साह नाही. याचं मुख्य कारण म्हणजे ही योजना पक्षबांधणी डोळ्यासमोर ठेवूण राबविण्यात येत आहे. तसेच आपली पंचवार्षिक योजना ही अर्थप्रधान आहे. वास्तविक पाहाता ही श्रमप्रधान असायला हवी.’’ अटलजी थेट मुद्याला भिडत तेही मुद्देसुदपणे, त्यामुळे त्यांचे भाषण विशेष मानले जायचे. पंतप्रधान नेहरूंसह विरोधीपक्षाचे नेतेही त्यांच्या भाषणाकडे दुर्लक्ष करत नसत. अनेकदा नेहरू इतर दौर्‍यावर असल्यास सभागृहात उपस्थित राहू शकत नसत. मात्र त्यादरम्यान अटलजींचे भाषण होणार म्हटलं की ते आपला दौरा पुढे ढकलून आवर्जून सभागृहात उपस्थित राहयचे. आजच्या घडीला हे चित्र दुर्मिळच.
अटलजींचा राजकीय आलेख उंचावत असताना तिसर्‍या लोकसभेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. कॉंग्रेसने त्यांच्या विरोधात मोठी प्रचार मोहिम सुरू केली. रोज एक बडा नेता त्यांच्याविरोधात प्रचारासाठी येत असत. अखेर अटलजींचा पराभव झाला. त्यानंतर अटलजी 1968 साली राज्यसभेवर निवडून गेले. त्याच काळात पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचे निधन झाले. त्यानंतर अटलजींकडे अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
संपूर्ण हयात विरोधी बाकावर बसून घालवल्यानंतर अटलजींच्या जीवनात तो सुवर्णक्षण आला. अकराव्या लोकसभेत पक्षाला बर्‍यापैकी यश मिळाले आणि विविध पक्षांना सोबत घेऊन अटलजींनी सत्तास्थापन केली. मात्र या ग्रहण लागले. 16 मे 1996 त्यांनी पंतप्रधान पद स्वीकारले आणि 28 मे ला म्हणजेच केवळ 13 दिवसात त्यांना सत्तेतून पायऊतार व्हावे लागले. दोन-तीनवर्षे विरोधीपक्ष नेतेपद भुषविल्यानंतर पंतप्रधानपदाची माळ पुन्हा त्यांच्या गळ्यात पडली. मात्र पुढच्या 13 महिन्यात त्यांचे सरकार पुन्हा एकदा कोसळले. मात्र अपयशाने खचून न जाता त्यांनी पुन्हा एकदा संघर्ष केला आणि 1999 च्या लोकसभेत पुनश्च यश खेचून आणले. 13 ऑक्टोबर 1999 साली अटलजी परत एकदा पंतप्रधान झाले. यावेळी मात्र त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक योजना राबविल्या. अनेक प्रकल्प हाती घेतले आणि तडीस नेले.
आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात हिंदीत भाषण करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गवगवा आहे. मात्र ऑक्टोबर 1977 ला जनता सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असताना अटलजींनी राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात हिंदीत भाषण दिले होते.
‘बोले तैसा चाले’ या पठडीतल्या लोकनेत्याला, स्टेट्समनला यंदाच्या वर्षी
भारतरत्न’ जाहीर करण्यात आला. अटलजींच्या या निरपेक्ष राष्ट्रसेवेबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
(साहित्य चपराक, डिसेंबर २०१५)
सागर सुरवसे,
आयबीएन लोकमत,

सोलापूर
9769 179 823 / 9665 899 823

Monday, December 21, 2015

'चपराक'ची दर्जेदार ग्रंथसंपदा

'चपराक प्रकाशन'कडून वैविध्यपूर्ण विषयांवर वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली जातात. आमच्या पुस्तकांना वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याठिकाणी 'चपराक'च्या निवडक पुस्तकांचा परिचय देत आहोत. ही पुस्तके मागवण्यासाठी संपर्क : 'चपराक प्रकाशन', पुणे (०२०)  २४४६०९०९ 


कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट 
राजेंद्र व्होरा आणि सुहास पळशीकर या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दोन ‘विद्वान’ प्राध्यापकांनी महाराष्ट्रातील सत्तांतरावर पुस्तक लिहून, शब्दाशब्दाला चुकीचे संदर्भ देऊन वाचकांची दिशाभूल केली. ‘ग्रंथाली’सारख्या मान्यवर प्रकाशन संस्थेने व्यावसायिक दृष्टिकोनातून या पुस्तकाचा धंदाही उत्तम केला. सुप्रसिद्ध पत्रकार आणि विचारवंत भाऊ तोरसेकर यांनी मुद्देसूदपणे, पुराव्यासह या पुस्तकाची आणि वैचारिक भ्रष्टतेची केलेली परखड चिकित्सा म्हणजे हे पुस्तक.
पाने - 148  किंमत - 150

भाषेचं मूळ
भाषा मूळात अस्तित्वात कशा आल्या? माणसालाच हे वरदान का? मानव जगभर समान असला तरी भाषाभाषात एवढे विभेद का? भाषागट कसे जन्माला येतात? एका भाषेतून सहयोगी भाषेचा जन्म होतो, हे खरे आहे का? भाषागट कितपत संयुक्तिक आहेत? संस्कृतमधून प्राकृत भाषा निर्माण झाल्या की सत्य वेगळेच आहे? हे समजून घेण्यासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांचं हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
पाने - 112 किंमत - 110


दखलपात्र
‘सामान्य माणसाचा उंचावलेला स्वर’ हे ब्रीद घेऊन चतुरस्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष भूमिकेतून ‘चपराक’ची वाटचाल सुरू आहे. रोखठोक आणि परखड विश्‍लेषण केल्याने, सातत्याने ठाम भूमिका घेऊन सत्याचा कैवार घेतल्याने ‘चपराक’चे अग्रलेख वाचकप्रिय ठरले आहेत. साप्ताहिक ‘चपराक’ आणि ‘साहित्य चपराक’ मासिकातील घनश्याम पाटील यांचे निवडक अग्रलेख या संग्रहात वाचायला मिळतील.
पाने - 176, किंमत - 150


गंध माणसांचा
हल्ली जो-तो स्वत:ची दु:ख कुरवाळत बसलाय. स्वार्थाच्या नादापायी आपुलकी, माणुसकी हरवून बसलाय; मात्र अशा काळोखात एखादी पणती मिनमिनत असतेच ना? तिच्या परीने ती अंधार भेदण्याचे कार्य करीतच असते. तिच्या प्रकाशकक्षेत येईल त्याला वाट दाखविण्याचे सामर्थ्य आणि जिद्द तिच्यात असते. अशा प्रेरणादायी व्यक्तींचा परिचय करून देणारे संजय वाघ यांचे हे पुस्तक वाचायलाच हवे.
पाने - 128 किंमत - 130


ओविली फुले मोकळी
सर्वसामान्य माणसाला वाटणार्‍या काळज्यांबद्दल, भीतीबद्दल, त्याला हव्या असणार्‍या किमान स्वास्थ्याबद्दल, तो शोधत असणार्‍या आधाराबद्दल वाचकांशी एकरूप होऊन केलेले चिंतन म्हणजे सुप्रसिद्ध साहित्यिक सदानंद भणगे यांचे या पुस्तकातील लेख. हे लेख वाचताना वाचक जगण्यावर प्रेम करू लागतात.
पाने - 160  किंमत - 150


विज्ञानमूर्ती ज्ञानोबा तुकोबा
संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींनी चालवलेली भिंत अथवा जगद्गुरू तुकोबारायांचे वैकुंठगमन असे विषय महाराष्ट्रात कायम चर्चेला जातात. मात्र कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार करण्याची अद्भूत क्षमता असलेल्या मराठी माणसावर अशा गोष्टीचा परिणाम होत नाही. त्यांच्या श्रद्धा अटळ आहेत. ज्ञानोबा आणि तुकोबा यांचे कार्य अद्भूत, विलक्षण, तर्कसंग आणि विज्ञाननिष्ठ असल्याने या पैलूंविषयी लिहिले आहे दत्तात्रय गायकवाड यांनी.
पाने - 164  किंमत - 130

झुळूक आणि झळा
अवताभोवताली घडणार्‍या सामाजिक, राजकीय घटना, सांस्कृतिक-भाषिक शेरेबाजी, राजकीय नेत्यांचं वर्तन, धर्मगुरू, विचारवंतांचे वक्तव्य अशा प्रत्येक गोष्टींवर आजच्या तरूणपिढीचं स्पष्ट-प्रातिनिधिक ‘मत’च घनश्याम पाटलांनी आपल्या अग्रलेखातून मांडलेलं आहे. ‘झुळूक आणि झळा’ या त्यांच्या अग्रलेखसंग्रहातून कुणाचीही भीडभाड न ठेवता त्यांनी व्यक्त केलेली मतं म्हणजे शब्दांचे अक्षरश: ‘फुटाणे’ फोडत अवघ्या तरूणाईच्या मतमतांतराचं घडवलेलं मतप्रदर्शन आहे.
पाने - 140  किंमत - 150

थोडं मनातलं
जीवन जगताना सामान्य माणसाला जे प्रश्‍न पडतात ते शब्दबद्ध करण्याचं काम संवेदनशील मनाचे लेखक विनोद श्रा. पंचभाई यांनी केले आणि या पुस्तकाची निर्मिती झाली. पोटतिडिकेने सत्य मांडणारे, वाचकांना संस्काराची शिदोरी देणारे, संस्काराचा पाया बळकट करणारे या पुस्तकातील लेख वाचकांना अंतर्मुख करतात. प्रासादिक भाषा हे या पुस्तकाचे शक्तीस्थान आहे.
पाने - 120  किंमत - 125



एमरल्ड ग्रीन
मोजक्या शब्दात, नेमकेपणे विलक्षण अनुभव मांडण्याचे सामर्थ्य असणार्‍या समीर नेर्लेकर यांचा हा कथासंग्रह. भौतिक जगासारखंच आपल्या आतही एक जग असतं. या दोन्ही जगांचा समांतर प्रवास कधी अस्वस्थ करणारा तर कधी विलक्षण आनंद देणारा. या प्रवासात बरंच काही घडून जातं, कल्पनेच्याही पलीकडेचं! तेच अनुभव रूजतात, बहरतात, त्यांची फुलं होतात. त्यातूनच ‘एमरल्ड ग्रीन’सारख्या अस्सल कथा जन्माला येतात.
पाने - 72 किंमत - 75


बाळासाहेब एक अंगार

बाळासाहेब ठाकरे! महाराष्ट्राचे राजकारण तळापासून ढवळून काढणारे नाव. 50 वर्षे सतत धगधगत असलेला हा अंगार. माणूस म्हणून ते होते तरी कसे? त्यांचा स्वभाव कसा होता? वागणं कसं होतं? त्यांच्या आयुष्यात कोणकोणत्या घटना घडल्या? या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी नागेश शेवाळकर यांचे हे पुस्तक नक्की वाचा.
पाने - 160  किंमत - 175


लोकनायक महाराजा सयाजीराव गायकवाड
बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र म्हणजे एका समर्थ लोकनेत्याची गौरवगाथाच! महाराजा सयाजीराव यांच्या समाज परिवर्तनवादी भूमिकेचा यथार्थ आढावा या पुस्तकात घेतला गेला आहे. विशेषत: महाराजा सयाजीराव यांच्या दुर्मिळ कौटुंबिक आठवणीही या पुस्तकात आहेत. एका अफाट क्षमतेच्या नायकाचे चरित्र आणि चारित्र्य समजून घेण्यासाठी चंद्रलेखा बेलसरे यांचे हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
पाने - 64  किंमत - 70


एकनाथजी रानडे
भारताच्या दक्षिण टोकाला कन्याकुमारी येथे समुद्रातील श्रीपाद शीलेवर उभे असलेले स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक सार्‍या देशाला माहीत आहे. तीन सागरांच्या संगम स्थळी असलेल्या या स्मारकाला मूर्त रूप दिले ते एकनाथजी रानडे या  मराठमोळ्या लढवय्याने. एकनाथजींच्या जीवन चरित्राची आणि या अफाट कार्याची ओळख युवा पत्रकार सागर सुरवसे यांनी या पुस्तकाद्वारे करून दिली आहे.
पाने - 56  किंमत - 75



शांतीदूत

लालबहाद्दूर शास्त्री हे एक चारित्र्यसंपन्न, त्यागी, देशसेवेला जीवन वाहून घेतलेले, सामान्य कुटुंबात जन्म घेऊन स्वकर्तृत्वाने पंतप्रधान पदापर्यंत गेलेले प्रभावी नेतृत्व. त्यांचे चरित्र म्हणजे जणू सद्वर्तनाची श्‍वेतपत्रिकाच. प्रभाकर तुंगार यांनी लिहिलेले शास्त्रीजींचे हे छोटेखानी चरित्र बाल-किशोरांनी आणि मोठ्यांनीही वाचायलाच हवे.
पाने - 40  किंमत - 50



आपले राष्ट्रसंत

निकोप आणि सदृढ समाज निर्मितीचे अथांग ध्येय उराशी बाळगणारे मानवतावादी संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी. त्यांचे आयुष्य म्हणजे समाजप्रबोधन आणि राष्ट्रभक्तीचे मुर्तीमंत रूप! ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून त्यांनी सोप्या भाषेत समाजप्रबोधन केले. देश विदेशात त्यांच्या कीर्तीचा सुगंध दरवळला. राष्ट्रसंतांविषयी नेमकेपणे, सोप्या शैलीत विनोद श्रा. पंचभाई यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
पाने - 56  किंमत - 60


कवडसे
आजचे तरूण काय वाचतात, काय लिहितात, काय बोलतात, काय खातात, काय घालतात याची निरिक्षण केले तर राष्ट्राच्या प्रगतीची दशा आणि दिशा कोणाच्याही सहगपणे लक्षात येईल. पंढरपूर येथील युवा पत्रकार स्वप्नील कुलकर्णी यांनी राज्यातील  आणि राष्ट्रातील विविध विषयांचा डोळसपणे घेतलेला धांडोळा म्हणजे ‘कवडसे’ हे पुस्तक. या पुस्तकात सामाजिक, वैचारिक विषयावरील लेख आपल्याला वाचावयास मिळतील.
पाने - 112  किंमत 110


तपोभूमी नाशिक

तपोभूमी म्हणजे अशी भूमी की जेथे श्रीरामासह ऋषीमुनी, साधुमहंत, राजेमहाराजे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आले अन् जगाला अलौकिक इतिहास देऊन गेले. येथे विजयांच्या गुढ्या उभारल्या गेल्या. या भूमीने कधी कोणाला पराजित होणे शिकविले नाही. धर्मपीठाचा दर्जा मिळालेल्या अन् दर बारा वर्षांनी येणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यात फुलणार्‍या गोदाकाठच्या नाशिकने आपले माहात्म्य कायम राखत कात टाकले आहे. मंदिरांचे शहर अशीही नाशिकची ओळख आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्याची सर्वांगसुंदर ओळख करून देणारे रमेश पडवळ यांचे पुस्तक म्हणजे ‘तपोभूमी नाशिक’.
पाने - 232  किंमत - 230

हसण्यावर टॅक्स नाही

आपण का हसतोय? माहीत नाही. तरीही हसतोय. कुणीतरी घसरून पडला म्हणून हसतोय, लोकांच्या शारीरिक व्यंगावर हसतोय. बघा, इतर जण हसले म्हणून आपणही हसतोय, पुरषाने बाईचे कपडे घातलेत म्हणून, तर शाब्दिक करामतींमुळे अर्थाचा अनर्थ होतोय म्हणून हसतोय. भोवतालच्या गोंधळात आपलीच केवीलवाणी अवस्था पाहून स्वत:वरही हसतोय. हसण्यासारखं काहीच नाही तरीही हसतोय. हसावं, भरपूर हसावं; असं सर्वांना हसत ठेवणारं समीर नेर्लेकर यांचं हास्य चित्रांचं पुस्तक म्हणजे ‘हसण्यावर टॅक्स नाही’.
पाने - 64  किंमत - 60


चार शिलेदार
समाजातील प्रतिकूल परिस्थितीतही माणसावर झालेले चांगले संस्कार त्याला असत्य, अन्याय, विपरीत गोेष्टींबद्दल लढायला कसे शिकवतात याचे चित्रण ‘चार शिलेदार’ या सुभाष कुदळे यांच्या पुस्तकातून आलेले आहे. समाज बदलला पाहिजे असे सारेजण म्हणतात पण प्रत्यक्षात वेळ येताच कितीजण पुढे येतात? वयाने लहान असूनही समाज बदलावयाची आकांक्षा व त्यासाठी आपल्या परीने कष्ट घेण्याची तयारी असलेल्या चार शिलेदारांची ही प्रेरक कथा.
पाने - 64  किंमत - 60


मुलांच्या मनातलं
लहान मुले आणि किशोरवयीन बालके यांची मनोअवस्था बर्‍याचवेळा पालकांनाही कळत नाही. उद्याच्या राष्ट्राचे उज्ज्वल आणि संपन्न भवितव्य असणार्‍या या पिढीला संस्कारशील साहित्य उपलब्ध करूण देणे ही फार मोठी गौरवाची बाब आहे. विनोद श्रा. पंचभाई यांनी त्या दृष्टिने टाकलेले पाऊल म्हणूनच अभिनंदनीय ठरते. ‘मुलांच्या मनातलं’ या पुस्तकातील छोट्या कथांद्वारे त्यांनी किशोरांचे आणि पालकांचे रंजनातून प्रबोधन केले आहे.
पाने - 56  किंमत - 75

Sunday, December 20, 2015

भाकड गायींनी दिले लाखोंचे उत्पन्न

सोलापुरातील गोवर्‍या निघाल्या जर्मनीला
गायीचा गोठा, शेण, गोमुत्र याचा विषय निघाला की अनेकांची तोंडे वाकडी होतात. व्यावहारिक विचार करणारा प्रत्येकजण त्याकडे तुसडेपणानेच पाहतो. मात्र याच गाईच्या शेणाने अर्थात गोवर्‍यांनी आणि गोमुत्राने आता थेट परदेश गाठायची तयारी केली आहे. देशी गाईच्या शेणापासून बनविलेल्या गोवर्‍यांना आता जर्मनीतून मागणी आलीय. त्यामुळे गाई भाकड झाल्याने विकणार्‍यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा प्रयोग आहे. सोलापुरातील संतोषी माता गोशाळा आणि पंचगव्य चिकित्सा संशोधन केंद्राने हा प्रकल्प यशस्वीपणे राबविला आहे.
8 वर्षापूर्वी दोन भाकड गाईंच्या पालनाने संतोषी माता गोशाळेची सुरूवात झाली. डॉ. राजेंद्र गाजूल आणि पोरंडला या तेलुगू भाषिक मामा-भाच्यांनी गोशाळेची मेढ रोवली. त्यानंतर टप्प्या टप्प्याने या गोशाळेत तब्बल 85 गाई जमा झाल्या. सुरूवातीला केवळ गोमुत्र आणि शेणाची विक्री करून चार दोन पैसे मिळायचे. कालांतराने वर्धा येथे झालेल्या एका गोशाळा विषयक कार्यशाळेत देशी गाईच्या शेणाचे महत्त्व आणि त्याचे फायदे कळल्यानंतर डॉ. राजेंद्र गाजूल यांनी आपल्या संतोषी माता गोशाळेतही काही प्रयोग सुरू केले. यामध्ये प्राथमिक स्तरावर त्यांनी अस्सल गाईच्या शेणापासून गोवर्‍या तयार करण्यास प्रारंभ केला. सुरूवातीला सोलापूरसह मुंबई, पुणे, बेंगलोर येथून होम हवनासाठी गोवर्‍यांना मागणी येऊ लागली. मात्र त्यांच्या गोवर्‍यांचा दर्जा पाहून त्यांना आता थेट जर्मनीमधून मागणी आली. याशिवाय रशिया, अमेरिका, जपान, इंग्लंड, अरब अशा विविध देशातून मोठ्याप्रमाणात मागणी येऊ लागलीय. त्यांच्या या प्रकल्पामुळे भाकड म्हणून विकणार्‍या गाईंच्या माध्यमातून संतोषीमाता गोशाळेला लाखो रूपयांचे उत्पन्न मिळू लागलेय.
डॉ. गाजूल यांनी हा प्रकल्प केवळ गोवर्‍या विकण्यापर्यंतच मर्यादीत न ठेवता शेण व गोमुत्रापासून अनेक उप उत्पादनेही घेतली आहेत. शेतकर्‍यांना जैविक शेतीचे महत्त्व लक्षात आल्याने गेल्या काही वर्षापासून शेतकर्‍यांनी आपल्या फळबागांसाठी गोमुत्र आणि शेणाची मागणी करण्यास सुरूवात केली आहे. याशिवाय गेल्या काही महिन्यापासून परदेशात होणार्‍या होम अग्निहोत्रासाठीही गोमातेच्या शेणापासून बनविलेल्या गोवर्‍यांना  मागणी वाढली आहे.
केवळ इतक्यावरच हे सर्व थांबलेले नाही तर गोशाळेने आता पंचगव्य गोविज्ञान संशोधन केंद्रही सुरू केले आहे. या संशोधन संस्थेतंर्गत त्यांनी धूपबत्ती, डास पळवून लावण्यासाठीचे लिक्विड आदी गोष्टी तयार केल्या आहेत. या लिक्विडचे वैशिष्ट्य असे की, हे ते इतर परदेशी लिक्विडच्या तुलनेत अधिक दिवस काम करते. साधारणपणे परदेशी कंपन्यांचे लिक्विड महिनाभर जाते आणि त्याची किंमत 50 ते 60 रूपये असते. मात्र यांनी बनविलेले लिक्विड तीन महिने तर जातेच शिवाय त्याची किंमत केवळ 30 रूपये इतकी आहे.
एकीकडे गोमांस खाल्याने मुस्लिमाची हत्या केल्याच्या कथित बातम्या आपण पाहतो मात्र याच गोमातेच्या रक्षणासाठी काही मुस्लिम कामगार येथे कार्यरत आहेत. गाईच्या शेणापासून या सर्व उत्पादनांची निर्मिती सुरू झाल्याने रफीक मिनारे सारख्या मुस्लिम कर्मचार्‍याच्या हाताला रोजगार उपलब्ध झालाय. या गोशाळेत जवळपास 25 जण काम करत आहेत.
भाकड गाईपासून लाखोंचे उत्पन्न घेता येते हे या गोशाळेच्या चालकांनी दाखवून दिलेय. त्यामुळे गोहत्येवर बंदी घालणार्‍या सरकारने केवळ कायदा करून चालणार नाही तर राज्यातील हजारो गोशाळांना अशा प्रकारचे उत्पन्न मिळवून देणारे मॉडेल बनवणे महत्त्वाचे आहे.
(डॉ. राजेंद्र गाजूल ( गोशाळा संचालक व संशोधक) यांच्याशी संपर्क करण्यासाठी क्रमांक - 9850550903 )
(साप्ताहिक चपराक, पुणे)
सागर सुरवसे,
आयबीएन लोकमत,
सोलापूर
-9769179823