Saturday, May 16, 2015

जगण्याची नितळता पाझरत जाणारी कविता





'चपराक प्रकाशन'ने प्रकाशित केलेल्या प्रभाकर चव्हाण लिखित 'सुंबरान' या कवितासंग्रहाची दखल आजच्या बेळगाव 'तरुण भारत'ने 'अक्षरयात्रा' या पुरवणीत घेतली आहे. अजय कांडर यांनी हे परीक्षण लिहिले आहे. श्री. कांडर आणि 'तरुण भारत' यांचे मन:पूर्वक आभार! 

मानवी मनाला नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आस लागलेली असते. भौतिक सुखाची आस जगण्याच्या निरर्थकतेकडे घेऊन जाते. तर आपल्या संस्काराचे, परंपरेचे संचित जपण्याची आस आपण बाळगतो. तेव्हा त्यातून जगण्याची नितळताच पाझरत राहते. ज्येष्ठ कवी बलवन्ततनय तथा प्रभाकर चव्हाण यांच्या ‘चपराक प्रकाशन’, पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सुंबरान’ या काव्य संग्रहातील कविता संस्कारांचे आणि परंपरांचे संचित जपत संतांच्या अभंगाच्या अन्वयार्थाने जगण्याचीच आस बाळगते. तर दुसर्‍या बाजूला संतांचाच प्रबोधनाचा विचार पुढे नेत अपप्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीच्या विचारांचा प्रहार करते. 
‘सुंबरान’मध्ये एकूण 52 कवितांचा समावेश आहे. सर्वच कवितांचे कवीच्या  स्वतःच्या अनुभवातून प्रकटीकरण झाले आहे. यातील बहुसंख्य कविता या छंदबद्ध असल्या, तरी त्याला एक स्वतंत्र आंतरिक लयही आहे. ही लय लोकभाषेशी आणि लोकजीवनातून लोकसंस्कृतीशी जोडली गेल्यामुळे कवितेची गेयता वाचकाला प्रभावित करते. श्र्र्ी. चव्हाण यांच्या सर्वच कवितांवर लोकजीवनाच्या संस्कांरांचा प्रभाव असल्याने त्या कवितेला चिकटून आलेली कवीची बोली, कवितेचा आशय अधिक सघन करत जाते. 
कवीचे जीवन कोकणच्या निसर्ग आणि मानवी जीवनाशी एकरूप झाले असल्याने ‘सुंबरान’मध्ये कोकणच्या निसर्गाचे त्यांना दिसणारे विलोभनीय दृश्यही चित्रात्मक पद्धतीने मांडले आहे. कोकणचा निसर्ग तिथे वस्ती करून राहणार्‍यालाच नाही, तर त्याच्या सहवासात आलेल्या सर्वानाच तो मोहून टाकतो. त्यामुळे त्याच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाला कोकणच्या निसर्गाचे रूप वेगवेगळे दिसत असते. कोणाला निसर्गाशी एकरूप झालेला माणूस दिसतो, तर कोणाला माणसालाच निसर्गाने कवेत घेतल्याचे भास होत राहतात. कवी चव्हाण मात्र कोकणातल्या निसर्गाबरोबरच तिथल्या लोककलांशी माणसाचे असलेले नातेच स्पष्ट करतात. या संदर्भात ‘गावाकडली होळी’ या कवितेत ते म्हणतात, 
गाव सान चिटुकलं, घाटाच्याही पलीकडं...
लपेटून बसलेलं, उभ आडवं डोंगराकडं...
रात्र होळी-पुनवेची, शुभ्र चांदणं प्यायलेली...
गावामंधी देव्हामोर्‍ह, बघा जमली मंडळी...
कुठल्याही लोकसंस्कृतीत धार्मिक विचार चिकटून आलेलाच असतो. कारण, धर्मशास्त्र हेच त्या-त्या धर्मातील माणसाचा लोकविचार झालेला असतो. मात्र, लोककलेच्या प्रभावातून लेखन करणारा कलावंत आपल्या धर्माच्या विचाराने जगतोच असे नाही. किंबहुना, तो समग्र मानवतेचा विचार करून जगत असतो. कवी चव्हाण हे आपल्या जात, धर्म समूहापेक्षा समग्र मानवतेचा विचार करून कोणत्याही धर्माचा आदरभाव बाळगताना दिसतात. एवढेच नाही, तर धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होताना आणि त्यातून माणूस रस्त्यावरच माणसासमोर उभा राहताना त्यांच्यातला संवेदनशील कवी अस्वस्थ होतो. अर्थात अशाच कलावंताला अशा धर्मांध शक्तीचा सर्वाधिक त्रास होत असतो. म्हणूनच ‘माणूसकी जराशी?’ या कवितेत ते म्हणतात
मस्जिद तोडू नका रे, जोडूनी कर विणविले
मुस्लिम धार्जिणा तू, हिंदू मला म्हणाले...
मंदिर नका रे तोडू, विनवुनी घरा परतता...
माझेच बापुड्याचे, घर भुईसपाट झाले...
कवी चव्हाण यांच्या कवितेच्या वरच्या ओळी वाचल्यावर वाचकही हबकून जातो. किती सहज आणि सोप्या शब्दात माणसाच्या आजच्या जगण्याचे भेदक वास्तव त्यांनी मांडले आहे. वरवर पाहता अलीकडल्या काही वर्षात या कवितेतील अनुभव अधिकाधिक सार्वत्रिक होत जातो आहे. मात्र, तो अनुभव आपला वाटावा, असे  वाटणारा वर्ग कमीच आहे. त्यामुळेच जाती-धर्मामध्ये भेदाच्या भिंती उभ्या राहत आहेत. 
कवी चव्हाण या आजच्या भीषण वास्तवाला सामोरे जाताना आपले जगणे मात्र, विनम्रच राहो, अशी सार्वकालिक प्रार्थना करताना दिसतात. माणूस नम्रतेपासून दूर जातो. तेव्हाच समाजात विसंवाद होत जातात. संवादाच्या जागा शोधण्याचा प्रयत्न करणारा वर्ग दुर्मीळच. पण, नम्रतेतून इतरांना जिंकता येतेच. परंतु, स्वतःलाही जिंकता येते. पण, यासाठी स्वतःकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची नम्रता त्याच्याकडे असायला हवी. चव्हाण या विचाराचेच असल्याने ते एका कवितेत म्हणतात
‘तुझसहित तव देऊळ सुंदर, दुरुनी मज पाहू दे
माझे चिखला-मातीचे, पाय असेच राहू दे.....’
कवी चव्हाण यांची कविता कष्टकरी वर्गाचेही प्रतिनिधीत्व करते. जागतिकीकरणाच्या काळात माणसाचा संवाद हरवला असला, तरी तो कमालीचा एकमेकांच्याजवळ आला आहे. हे त्याचे जवळ येणे त्याच्या जगण्यातील एक तांत्रिक गोष्ट आहे. त्यामुळे समाजात दोन स्तर निर्माण झाले आहेत. वरचा स्तर वरच्या वर्गाशीच नाते सांगतो आहे. तर खालच्या स्तरातील वर्गाला आपले नाते कोणाशी आहे. हेही सांगता येत नाही. अशी त्याची जगण्याची कोंडी झाली आहे. यात कष्टकरी वर्ग प्रामुख्याने आहे. या वर्गाची कणव कवी चव्हाण आपल्या कवितेत बाळगताना दिसतात. या वर्गाबद्दल आपल्या कवितेतून उद्गार व्यक्त करताना ते म्हणतात, 
‘झोका टांगला झाडाला, जीव टांगला पाडाला...
तान्हं लेकरू रडतं, माझं काळीज कढतं...
भरभरून गं पाट्या, सये फेकीते वरती
दुःख-उपसावं किती, भुई फाटली तळीची’
चव्हाण यांचे आयुष्य कामगार वर्गाशी निगडीत असल्याने या वर्गाबद्दल आपल्या भावना कवितेतून व्यक्त होताना त्यांचे मन अधिक भावूक होते. अशा वर्गाचे नायक झालेल्या लोकांचे ते स्मरण करत राहतात. कवीश्र्र्ेष्ठ नारायण सुर्वे हे कामगार वर्गाचेच प्रतिनिधित्व करणारे कवी होते. ते तर स्वतः कामगार होतेच परंतु, त्यांच्या आत्मचरित्रात्मक कवितांमधून त्यांनी कामगार वर्गाच्या प्रश्‍नांना वाचा फोडली. त्याचबरोबर कामगार वर्गाच्या जीवनवादी तत्त्वज्ञानाला एक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यामुळेच ते समस्त कामगार वर्गाचे नायक झाले. त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना चव्हाण म्हणतात, 
‘जैसा झळकशी नभी, तुबा सुर्वे नारायणा...
सारस्वतांच्या प्रांगणी, तुझा रुबाब देखणा...
तुझी कष्टाची शिदोरी, तुझे भाकरीचे गाणे...
तुझे बोलके उखाणे, तुझी डौलती निशाणे....’
कवी चव्हाण हे नारायण सुर्वे यांच्यावर कविता लिहिताना आपण भाकरीचे गाणे गाणार्‍याच वर्गाच्या बाजूने असल्याचे सूचित करतात. हेच त्यांच्या कवितेचे मोठेपण आहे. श्रद्धेचा आदर बाळगतानाच अंधश्रद्धेवर ते ताशेरे ओढतात. सारा समाजच कोरडा होत जाणार्‍या या काळात त्यांचा हा आत्मस्वर अतिशय मौलिक आणि विशेषतः तळातल्या वर्गाला प्रेरणा देणारा असल्याने आजच्या गद्यप्राय काव्यलेखन लिहिल्या जाणार्‍या काळात त्यांच्या आंतरिक लयीची ही कविता स्वतःचे वेगळेपण घेऊन आजच्या मराठी कवितेत सशक्त उद्गाराने अवतरली आहे. तिचे वाचकांनी मनापासून स्वागत करायला हवेच.
- अजय कांडर


Thursday, May 14, 2015

नव्या संघर्षाची नांदी!

प्रकाशक : ‘चपराक प्रकाशन’
दूरध्वनी : 020-2446 0909
पृष्ठ : 80  किंमत : 75 रूपये

आज मराठी कविता विविधांगांनी विस्तारत आहे. आगळा आशय आणि संपन्न अनुभवांनी तिची समृद्धता वाढत आहे. विविध कवी आणि कवयित्री काव्यशारदेच्या क्षितिजावर देदिप्यमान काव्यतारकांनी प्रकाशझोतात येताहेत. कधी त्यांच्या कविता स्वप्नपंखांची उत्तुंग भरारी घेताहेत तर कधी त्यांच्या कविता मऊशार मातीच्या ममताळु ओलेपणात आकाराला येताहेत. यातूनच खेड्याची कविता रूजून येताहे. ती आता प्रस्थापितांविरूद्ध प्रतिकाराची भाषा बोलू पाहते आहे. नवा क्रांतिकारी संदेश देते आहे. एका नव्या संघर्षाची नांदी ठरावी असे तिचे आगळेपण आहे. तिचा प्रवास ‘काळोखातून उजेडाकडे’ सुरू आहे.
मुळचे बुलडाणा जिल्ह्यातील पण सध्या पुण्याला स्थायीक असलेले प्रथितयश कवी शांताराम हिवराळे यांच्याही कवितेत या नव्या संघर्षाचे प्रतिबिंब पडले आहे. स्वप्नांपेक्षा सत्यात जगणार्‍या या कविचे आतापर्यंत ‘अश्रूंचा ऊन्हाळा’, ‘प्रारब्ध’, ‘तवंग’, ‘भावनांचे ओसाड प्रदेश’ असे चार कवितासंग्रह प्रसिद्ध झाले असून त्यांचा नुकताच ’दाटून येताहे काळोखी काहूर’ हा नवीन कवितासंग्रह ’चपराक प्रकाशन,’ पुणे यांनी प्रकाशित केला आहे.
या कवितासंग्रहात एकूण 71 कविता असून त्या समाजहीत, निसर्ग, व्यक्तिगत, कष्टकरी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार्‍या आहेत. त्यासाठी हा कवी कधी मुक्तछंद तर कधी छंदोबद्ध तर कधी गजल तर कधी लयबद्ध असा अभंगवजा प्रकार वापरतो. ‘एक नवा विषय’ घेऊन आलेली हिवराळे यांची ही कविता बोथट समाजमनाला धार देण्याचा प्रयत्न करते. विषमतेच्या काळोखाला चढलेली काजळी झटकण्याचा तिचा प्रयास आहे.
सध्या ‘माणुसकीलाच ग्रहण’ लागलेले असल्याने सर्वत्र काळोखी काहूर दाटून आली आहे. माणुसकीचा सूर्य त्याने गिळंकृत केला आहे. त्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचार, विषमता, अतिरेकीपणा, चंगळवाद, नैराश्य या गोष्टींनी होणार्‍या आत्महत्या, मरणाला आलेली स्वस्तता, नीतीभ्रष्टता आणि गलथानपणा, दिसून येतो. अशावेळी या कवीचे मन पेटून उठते. या काळोखाच्या काहूराला नष्ट करण्यासाठी तो संघर्ष करू पाहतो. आवेगाने तो म्हणतो,
माणसामाणसांतील संघर्ष
आता अटळ आहे
अटळ आहे संघर्ष आता
नातीगोती फुलवण्यासाठी
अटळ आहे संघर्ष आता
चंगळवाद जाळण्यासाठी
अटळ आहे संघर्ष आता
नवा माणूस घडविण्यासाठी
माणसांमाणसांतील संघर्ष
आता अटळ आहे..
.
इथला समाज एका अनामिक भीतीने अगतिक झाला आहे. सर्वत्र अत्याचार असूनही तो गप्प गप्प आहे. तो का गप्प आहे याचा हा कवी प्रकर्षाने शोध घेतो. त्याला या प्रश्‍नाचे लगेचच उत्तर सापडते की, इथल्या सत्तेच्या वारूळात डंख करण्यासाठी बसलेले विखारी नाग हेच या अंधारामागचे खरे कारण आहे. हे महाविषारी नाग या कवीला आपल्या प्रगल्भ शब्दशस्त्रांनी ठेचायचे आहेत. इथला हा ‘धर्मांध सत्तेचा बाजार’ त्याला उधळून लावायचा आहे. त्याचे वर्णन करताना तो म्हणतो
इथे सत्तेचे वारूळ इथे विषारी फुत्कार
इथे देवाच्या नावाने आंधळाच कारभार
इथे श्रद्धेचा मुलामा आत नुसताच अंधार
इथे धर्मांध सत्तेचा रोज भरतो बाजार

इथल्या समाजाच्या वाट्याला हे ‘काट्यावरचे जगणे’ का आले? याचा शोध या कवीने घेतला आहे. ओठावरच्या खोट्या हास्याला आम्ही फसतो, गोड शब्दांना भुलतो, असत्यालाच सत्य मानतो. पाठीवर प्रेमाने हात फिरविल्याचा आव आणीत त्याच पाठीत खंजीर खुपसणारे, माणुसकीची हत्या करणारे येथे गल्लोगल्ली आहेत, अशावेळी मनाला भयाच्या ’काटेरी वलयाने’ व्यापून टाकले आहे. त्यामुळे भयग्रस्त माणसाप्रमाणेच शब्दही मनातून बाहेर यायला घाबरतात. यावेळच्या अवस्थेचे वर्णन कवी अत्यंत प्रकर्षाने करतो.
सर्वत्र भीतीची लाट अशी
मनावर फुटते
नकळत कधी मग वेळेची
काच तडकते
जगण्याची येथे होते ऐशी
नकळत माती
शब्दातून माझ्याच का भीतीच
उमलत असते?

या देशात एकीकडे श्रीमंताचा वाढता आलेख व दुसरीकडे मातीला मिळणारी गरीबी याचे परस्सरविरोधी चित्रणही हा कवी प्रकर्षाने करतो. काट्यावरच्या या फाटक्या आयुष्याला समजुतीचे कितीही टाके घातले तरी ते उसवतच राहतात.
गर्द काळी रात फुटे
काळोखाचा पान्हा
झोपडीत निजलेला
गरीबाचा तान्हा
काऊ नाही, चिऊ नाही
भरवते माय
वाळलेल्या कोरक्यांना
बुरशीची साय

असे या गरीबीचे विदारक चित्रण कवी करतो.
आज समाज असा काळोखात चाचपडतो आहे. वासनांध वादळाचे थैमान माजलेले आहे. सत्यं-शिवं-सुंदरं या श्रेष्ठतम जीवनमूल्यांना अघोरी ग्रहण लागलेले आहे. प्रामाणिकपणे जगणार्‍यांच्या गळ्यावर दिवसाढवळ्या ‘अधर्माची’ तीक्ष्ण सुरी फिरते आहे. जिथे तिथे गुंडांची गर्दी आहे. अशा दडपशाहीच्या वातावरणात जनसामान्यांच्या इच्छा, आकांक्षा व स्वप्ने मातीला मिळताहेत. अशावेळी हा कवी संतापतो, चिडतो, अत्यंत उद्वेगाने तो म्हणतो,
बांडगुळासारखे खुशाल जगताहेत लोक
रक्त शोषूनी लोकांचे चिपाड करताहेत लोक
आटलेली ओल येथे का गोठलेले गीत ओठी?
रक्तोत्सवासाठीच का इथे सजताहेत लोक?

या कवीला प्रामाणिक सत्य जीवन जगण्याचे भान आहे. ‘सत्यानेच मला तारले कितीदा’ असे तो आग्रहाने सांगू इच्छितो पण इमानाने जगलेल्या निष्पाप जीवांची होळी होऊन शब्दांनाही आज कैद केले जात आहे. उत्तुंग उत्थानासाठी गर्जना करणार्‍यांचे आवाज दडपले जाताहेत. मानवतेला पायदळी तुडवले जात आहे. अमानुष अशी रक्तपिपासू श्‍वापदे सर्वत्र मोकाट सुटली असून सज्जनांचे गळे फोडून रक्तपिपासू खुशाल रस्तोरस्ती धनदांडगेपणाचा हैदोस घालतायत. अशावेळी हा आकांत कसा सहन करावा? या ‘बळी तो कान पिळी’पणाचा आता कडेलोट करावाच लागेल. भ्रष्ट लोकशाही, भ्रष्ट प्रशासन, भ्रष्ट नेत्यांसाठी चराऊ कुरणं, सर्वत्र ‘आदर्श’ घोटाळे, शिक्षणाचा भरलेला ‘डोनेशनमय’ बाजार, महागाईने काढलेला फणा या सार्‍या विघातक गोष्टींनी मांडलेला उच्छाद या ‘काळोखाच्या काहूराला’ खर्‍या अर्थाने कारणीभूत आहे. जनसामान्यांच्या आयुष्याला सर्वार्थाने ‘पांगळे’ करण्यास इथली ही (अ)लोकशाहीच जबाबदार आहे, कारण तिनेच हा सारा हाहा:कार माजविला असून ‘मौनाचे आभाळ’ निर्माण केले आहे. म्हणून हे मौनरूपी काळोखलेले आभाळ आता आम्हाला नको आहे, तर आता आम्हाला दाहीदिशा दणाणून सोडणारा ‘संघर्ष’ हवा आहे आणि हीच आता खरी नव्या संघर्षाची नांदी आहे, असे हा कवी निर्धाराने म्हणतो. हे सारे संपण्यासाठी त्याने निर्माण केला आहे एक नवा आशावाद! म्हणून तो म्हणतो,
ऐशा जुळू देगा
प्रकाशाच्या वाटा
उसळू देगा लाटा
चैतन्याच्या

किंवा
व्रतस्थ मी माझी तपस्या भंगली नाही कधी
श्‍वास माझे कोंडले त्यांनी असे झाले कितीदा
संपलो नाही कधी मी ना कधी मी दुभंगलो
आत्मबळ आले नव्याने असेही झाले कितीदा

या कवीने ‘वाळूउपशाचा’ एक नवा संदर्भही इथे दिला आहे. (इतरत्र कुणाच्याही कवितेत न आलेला) तो म्हणतो,
आता नुस्तेच खोल खोल खड्डे
अन् अमाप वाळूचा उपसा
कंत्राटदाराचा फुगत जातो
हरामाच्या पैशाने गच्च खिसा

हे सारे असे असताना बांडगुळासारखा खुशाल जगणारा हा समाज पाहून हा कवी कधी दु:खी होतो, तर कधी निद्रिस्त समाजाला जागे करण्यासाठी पेटून उठतो.
या काव्यसंग्रहात कष्टकर्‍यांच्या जीवनावरील कविता अशाच लक्षणीय आहेत. ‘दु:ख वेचता वेचता’ यातील पुढील ओळी कष्टकर्‍यांच्या कष्टमय जिण्याचे वर्णन अत्यंत वास्तवतेने करतात.
चिंध्या बांधून बोटांना
चाले कापूस वेचणी
ओठावर विरतात
अशी वेदनेची गाणी

‘स्वप्नांनाच जातो तडा’, ‘उसवण’, ‘दिशाहीन’ आदी कविता कष्ट उपसणार्‍या मजूरांचे वेदनामय जीवन हुबेहूब उभे करतात.
‘ठणक’, ‘नाते’, ‘जंगलतोड होताहे’, ‘अनोळखी भास’, ‘ऋतू हिरवा’, ‘अंधारधून’, ‘दुरावले पक्षी’, ‘श्रावणधारा’ आदी कवितांमधून कवीने निसर्गातील विविध घटकांची रूपे, स्थित्यंतरे जशीच्या तशी रंगविली आहेत.
घरटेच असे एकाकी, एकाकी
जळते भान
धुरात हरवले पक्षी, शब्दांचे
छळते मौन

यातून निसर्ग प्रतिमांतून मनाची एकाकी, बेचैन अवस्था त्याने वर्णिली आहे.
‘मन नितळ आरसा’, ‘ऐसे माझे मन’ या दोन कविता मात्र निसर्गकन्या बहिणाबाईंच्या ‘मन’ या कवितेशी नाते सांगणार्‍या जरी असल्या, तरी त्यातील दु:खमयता हे त्यांचे वेगळेपण आहे.
अशा या विविधांगी, आशयसंपन्न, अनुभवनिष्ठ काव्यसंग्रहातून कवीची ‘एका नव्या संघर्षासाठी‘ नवा स्वाभिमानी माणूस निर्माण करण्याची वृत्ती दिसून येते. कारण, प्रारंभीच मनोगतात तो म्हणतो, ‘‘मी स्वानंदासाठी कविता लिहिली नाही, तर समाजामध्ये सध्या जे प्रखर वास्तव आहे, ते मन विषण्ण करणारे, अस्वस्थ करणारे, बेचैन करणारे आहे. ही मनाची विषण्णता, अस्वस्थता, बेचैनी कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध होते, प्रतिबिंबित होते. त्यासाठी शब्दांसाठी अडून बसावे लागत नाही. कारण, शब्दांवर माझी निष्ठा आहे. शब्दच माझे सर्वस्व आहे.’’
मलपृष्ठावरील संपादक प्रशांत चव्हाण (बेळगाव तरूण भारत) यांचा अभिप्राय खूपसा अर्थपूर्ण आहे. गुरूगोविंद आंबे यांचे बोलके मुखपृष्ठ आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांचे अचूक संपादन या गोष्टींनी हे पुस्तक निश्‍चितच रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करेल यात संदेह नाही. कवी शांताराम हिवराळे यांच्या भावी लेखनास उदंड सदिच्छा.

* प्रा.रायभान दवंगे
कमलापूर, जि.अहमदनगर
भ्रमणध्वनी : 99227 21015