Saturday, May 16, 2015

जगण्याची नितळता पाझरत जाणारी कविता





'चपराक प्रकाशन'ने प्रकाशित केलेल्या प्रभाकर चव्हाण लिखित 'सुंबरान' या कवितासंग्रहाची दखल आजच्या बेळगाव 'तरुण भारत'ने 'अक्षरयात्रा' या पुरवणीत घेतली आहे. अजय कांडर यांनी हे परीक्षण लिहिले आहे. श्री. कांडर आणि 'तरुण भारत' यांचे मन:पूर्वक आभार! 

मानवी मनाला नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आस लागलेली असते. भौतिक सुखाची आस जगण्याच्या निरर्थकतेकडे घेऊन जाते. तर आपल्या संस्काराचे, परंपरेचे संचित जपण्याची आस आपण बाळगतो. तेव्हा त्यातून जगण्याची नितळताच पाझरत राहते. ज्येष्ठ कवी बलवन्ततनय तथा प्रभाकर चव्हाण यांच्या ‘चपराक प्रकाशन’, पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सुंबरान’ या काव्य संग्रहातील कविता संस्कारांचे आणि परंपरांचे संचित जपत संतांच्या अभंगाच्या अन्वयार्थाने जगण्याचीच आस बाळगते. तर दुसर्‍या बाजूला संतांचाच प्रबोधनाचा विचार पुढे नेत अपप्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीच्या विचारांचा प्रहार करते. 
‘सुंबरान’मध्ये एकूण 52 कवितांचा समावेश आहे. सर्वच कवितांचे कवीच्या  स्वतःच्या अनुभवातून प्रकटीकरण झाले आहे. यातील बहुसंख्य कविता या छंदबद्ध असल्या, तरी त्याला एक स्वतंत्र आंतरिक लयही आहे. ही लय लोकभाषेशी आणि लोकजीवनातून लोकसंस्कृतीशी जोडली गेल्यामुळे कवितेची गेयता वाचकाला प्रभावित करते. श्र्र्ी. चव्हाण यांच्या सर्वच कवितांवर लोकजीवनाच्या संस्कांरांचा प्रभाव असल्याने त्या कवितेला चिकटून आलेली कवीची बोली, कवितेचा आशय अधिक सघन करत जाते. 
कवीचे जीवन कोकणच्या निसर्ग आणि मानवी जीवनाशी एकरूप झाले असल्याने ‘सुंबरान’मध्ये कोकणच्या निसर्गाचे त्यांना दिसणारे विलोभनीय दृश्यही चित्रात्मक पद्धतीने मांडले आहे. कोकणचा निसर्ग तिथे वस्ती करून राहणार्‍यालाच नाही, तर त्याच्या सहवासात आलेल्या सर्वानाच तो मोहून टाकतो. त्यामुळे त्याच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाला कोकणच्या निसर्गाचे रूप वेगवेगळे दिसत असते. कोणाला निसर्गाशी एकरूप झालेला माणूस दिसतो, तर कोणाला माणसालाच निसर्गाने कवेत घेतल्याचे भास होत राहतात. कवी चव्हाण मात्र कोकणातल्या निसर्गाबरोबरच तिथल्या लोककलांशी माणसाचे असलेले नातेच स्पष्ट करतात. या संदर्भात ‘गावाकडली होळी’ या कवितेत ते म्हणतात, 
गाव सान चिटुकलं, घाटाच्याही पलीकडं...
लपेटून बसलेलं, उभ आडवं डोंगराकडं...
रात्र होळी-पुनवेची, शुभ्र चांदणं प्यायलेली...
गावामंधी देव्हामोर्‍ह, बघा जमली मंडळी...
कुठल्याही लोकसंस्कृतीत धार्मिक विचार चिकटून आलेलाच असतो. कारण, धर्मशास्त्र हेच त्या-त्या धर्मातील माणसाचा लोकविचार झालेला असतो. मात्र, लोककलेच्या प्रभावातून लेखन करणारा कलावंत आपल्या धर्माच्या विचाराने जगतोच असे नाही. किंबहुना, तो समग्र मानवतेचा विचार करून जगत असतो. कवी चव्हाण हे आपल्या जात, धर्म समूहापेक्षा समग्र मानवतेचा विचार करून कोणत्याही धर्माचा आदरभाव बाळगताना दिसतात. एवढेच नाही, तर धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होताना आणि त्यातून माणूस रस्त्यावरच माणसासमोर उभा राहताना त्यांच्यातला संवेदनशील कवी अस्वस्थ होतो. अर्थात अशाच कलावंताला अशा धर्मांध शक्तीचा सर्वाधिक त्रास होत असतो. म्हणूनच ‘माणूसकी जराशी?’ या कवितेत ते म्हणतात
मस्जिद तोडू नका रे, जोडूनी कर विणविले
मुस्लिम धार्जिणा तू, हिंदू मला म्हणाले...
मंदिर नका रे तोडू, विनवुनी घरा परतता...
माझेच बापुड्याचे, घर भुईसपाट झाले...
कवी चव्हाण यांच्या कवितेच्या वरच्या ओळी वाचल्यावर वाचकही हबकून जातो. किती सहज आणि सोप्या शब्दात माणसाच्या आजच्या जगण्याचे भेदक वास्तव त्यांनी मांडले आहे. वरवर पाहता अलीकडल्या काही वर्षात या कवितेतील अनुभव अधिकाधिक सार्वत्रिक होत जातो आहे. मात्र, तो अनुभव आपला वाटावा, असे  वाटणारा वर्ग कमीच आहे. त्यामुळेच जाती-धर्मामध्ये भेदाच्या भिंती उभ्या राहत आहेत. 
कवी चव्हाण या आजच्या भीषण वास्तवाला सामोरे जाताना आपले जगणे मात्र, विनम्रच राहो, अशी सार्वकालिक प्रार्थना करताना दिसतात. माणूस नम्रतेपासून दूर जातो. तेव्हाच समाजात विसंवाद होत जातात. संवादाच्या जागा शोधण्याचा प्रयत्न करणारा वर्ग दुर्मीळच. पण, नम्रतेतून इतरांना जिंकता येतेच. परंतु, स्वतःलाही जिंकता येते. पण, यासाठी स्वतःकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची नम्रता त्याच्याकडे असायला हवी. चव्हाण या विचाराचेच असल्याने ते एका कवितेत म्हणतात
‘तुझसहित तव देऊळ सुंदर, दुरुनी मज पाहू दे
माझे चिखला-मातीचे, पाय असेच राहू दे.....’
कवी चव्हाण यांची कविता कष्टकरी वर्गाचेही प्रतिनिधीत्व करते. जागतिकीकरणाच्या काळात माणसाचा संवाद हरवला असला, तरी तो कमालीचा एकमेकांच्याजवळ आला आहे. हे त्याचे जवळ येणे त्याच्या जगण्यातील एक तांत्रिक गोष्ट आहे. त्यामुळे समाजात दोन स्तर निर्माण झाले आहेत. वरचा स्तर वरच्या वर्गाशीच नाते सांगतो आहे. तर खालच्या स्तरातील वर्गाला आपले नाते कोणाशी आहे. हेही सांगता येत नाही. अशी त्याची जगण्याची कोंडी झाली आहे. यात कष्टकरी वर्ग प्रामुख्याने आहे. या वर्गाची कणव कवी चव्हाण आपल्या कवितेत बाळगताना दिसतात. या वर्गाबद्दल आपल्या कवितेतून उद्गार व्यक्त करताना ते म्हणतात, 
‘झोका टांगला झाडाला, जीव टांगला पाडाला...
तान्हं लेकरू रडतं, माझं काळीज कढतं...
भरभरून गं पाट्या, सये फेकीते वरती
दुःख-उपसावं किती, भुई फाटली तळीची’
चव्हाण यांचे आयुष्य कामगार वर्गाशी निगडीत असल्याने या वर्गाबद्दल आपल्या भावना कवितेतून व्यक्त होताना त्यांचे मन अधिक भावूक होते. अशा वर्गाचे नायक झालेल्या लोकांचे ते स्मरण करत राहतात. कवीश्र्र्ेष्ठ नारायण सुर्वे हे कामगार वर्गाचेच प्रतिनिधित्व करणारे कवी होते. ते तर स्वतः कामगार होतेच परंतु, त्यांच्या आत्मचरित्रात्मक कवितांमधून त्यांनी कामगार वर्गाच्या प्रश्‍नांना वाचा फोडली. त्याचबरोबर कामगार वर्गाच्या जीवनवादी तत्त्वज्ञानाला एक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यामुळेच ते समस्त कामगार वर्गाचे नायक झाले. त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना चव्हाण म्हणतात, 
‘जैसा झळकशी नभी, तुबा सुर्वे नारायणा...
सारस्वतांच्या प्रांगणी, तुझा रुबाब देखणा...
तुझी कष्टाची शिदोरी, तुझे भाकरीचे गाणे...
तुझे बोलके उखाणे, तुझी डौलती निशाणे....’
कवी चव्हाण हे नारायण सुर्वे यांच्यावर कविता लिहिताना आपण भाकरीचे गाणे गाणार्‍याच वर्गाच्या बाजूने असल्याचे सूचित करतात. हेच त्यांच्या कवितेचे मोठेपण आहे. श्रद्धेचा आदर बाळगतानाच अंधश्रद्धेवर ते ताशेरे ओढतात. सारा समाजच कोरडा होत जाणार्‍या या काळात त्यांचा हा आत्मस्वर अतिशय मौलिक आणि विशेषतः तळातल्या वर्गाला प्रेरणा देणारा असल्याने आजच्या गद्यप्राय काव्यलेखन लिहिल्या जाणार्‍या काळात त्यांच्या आंतरिक लयीची ही कविता स्वतःचे वेगळेपण घेऊन आजच्या मराठी कवितेत सशक्त उद्गाराने अवतरली आहे. तिचे वाचकांनी मनापासून स्वागत करायला हवेच.
- अजय कांडर


No comments:

Post a Comment