प्रकाशक : ‘चपराक प्रकाशन’ दूरध्वनी : 020-2446 0909 पृष्ठ : 80 किंमत : 75 रूपये |
आज मराठी कविता विविधांगांनी विस्तारत आहे. आगळा आशय आणि संपन्न अनुभवांनी तिची समृद्धता वाढत आहे. विविध कवी आणि कवयित्री काव्यशारदेच्या क्षितिजावर देदिप्यमान काव्यतारकांनी प्रकाशझोतात येताहेत. कधी त्यांच्या कविता स्वप्नपंखांची उत्तुंग भरारी घेताहेत तर कधी त्यांच्या कविता मऊशार मातीच्या ममताळु ओलेपणात आकाराला येताहेत. यातूनच खेड्याची कविता रूजून येताहे. ती आता प्रस्थापितांविरूद्ध प्रतिकाराची भाषा बोलू पाहते आहे. नवा क्रांतिकारी संदेश देते आहे. एका नव्या संघर्षाची नांदी ठरावी असे तिचे आगळेपण आहे. तिचा प्रवास ‘काळोखातून उजेडाकडे’ सुरू आहे.
मुळचे बुलडाणा जिल्ह्यातील पण सध्या पुण्याला स्थायीक असलेले प्रथितयश कवी शांताराम हिवराळे यांच्याही कवितेत या नव्या संघर्षाचे प्रतिबिंब पडले आहे. स्वप्नांपेक्षा सत्यात जगणार्या या कविचे आतापर्यंत ‘अश्रूंचा ऊन्हाळा’, ‘प्रारब्ध’, ‘तवंग’, ‘भावनांचे ओसाड प्रदेश’ असे चार कवितासंग्रह प्रसिद्ध झाले असून त्यांचा नुकताच ’दाटून येताहे काळोखी काहूर’ हा नवीन कवितासंग्रह ’चपराक प्रकाशन,’ पुणे यांनी प्रकाशित केला आहे.
या कवितासंग्रहात एकूण 71 कविता असून त्या समाजहीत, निसर्ग, व्यक्तिगत, कष्टकरी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार्या आहेत. त्यासाठी हा कवी कधी मुक्तछंद तर कधी छंदोबद्ध तर कधी गजल तर कधी लयबद्ध असा अभंगवजा प्रकार वापरतो. ‘एक नवा विषय’ घेऊन आलेली हिवराळे यांची ही कविता बोथट समाजमनाला धार देण्याचा प्रयत्न करते. विषमतेच्या काळोखाला चढलेली काजळी झटकण्याचा तिचा प्रयास आहे.
सध्या ‘माणुसकीलाच ग्रहण’ लागलेले असल्याने सर्वत्र काळोखी काहूर दाटून आली आहे. माणुसकीचा सूर्य त्याने गिळंकृत केला आहे. त्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचार, विषमता, अतिरेकीपणा, चंगळवाद, नैराश्य या गोष्टींनी होणार्या आत्महत्या, मरणाला आलेली स्वस्तता, नीतीभ्रष्टता आणि गलथानपणा, दिसून येतो. अशावेळी या कवीचे मन पेटून उठते. या काळोखाच्या काहूराला नष्ट करण्यासाठी तो संघर्ष करू पाहतो. आवेगाने तो म्हणतो,
माणसामाणसांतील संघर्ष
आता अटळ आहे
अटळ आहे संघर्ष आता
नातीगोती फुलवण्यासाठी
अटळ आहे संघर्ष आता
चंगळवाद जाळण्यासाठी
अटळ आहे संघर्ष आता
नवा माणूस घडविण्यासाठी
माणसांमाणसांतील संघर्ष
आता अटळ आहे...
इथला समाज एका अनामिक भीतीने अगतिक झाला आहे. सर्वत्र अत्याचार असूनही तो गप्प गप्प आहे. तो का गप्प आहे याचा हा कवी प्रकर्षाने शोध घेतो. त्याला या प्रश्नाचे लगेचच उत्तर सापडते की, इथल्या सत्तेच्या वारूळात डंख करण्यासाठी बसलेले विखारी नाग हेच या अंधारामागचे खरे कारण आहे. हे महाविषारी नाग या कवीला आपल्या प्रगल्भ शब्दशस्त्रांनी ठेचायचे आहेत. इथला हा ‘धर्मांध सत्तेचा बाजार’ त्याला उधळून लावायचा आहे. त्याचे वर्णन करताना तो म्हणतो
इथे सत्तेचे वारूळ इथे विषारी फुत्कार
इथे देवाच्या नावाने आंधळाच कारभार
इथे श्रद्धेचा मुलामा आत नुसताच अंधार
इथे धर्मांध सत्तेचा रोज भरतो बाजार
इथल्या समाजाच्या वाट्याला हे ‘काट्यावरचे जगणे’ का आले? याचा शोध या कवीने घेतला आहे. ओठावरच्या खोट्या हास्याला आम्ही फसतो, गोड शब्दांना भुलतो, असत्यालाच सत्य मानतो. पाठीवर प्रेमाने हात फिरविल्याचा आव आणीत त्याच पाठीत खंजीर खुपसणारे, माणुसकीची हत्या करणारे येथे गल्लोगल्ली आहेत, अशावेळी मनाला भयाच्या ’काटेरी वलयाने’ व्यापून टाकले आहे. त्यामुळे भयग्रस्त माणसाप्रमाणेच शब्दही मनातून बाहेर यायला घाबरतात. यावेळच्या अवस्थेचे वर्णन कवी अत्यंत प्रकर्षाने करतो.
सर्वत्र भीतीची लाट अशी
मनावर फुटते
नकळत कधी मग वेळेची
काच तडकते
जगण्याची येथे होते ऐशी
नकळत माती
शब्दातून माझ्याच का भीतीच
उमलत असते?
या देशात एकीकडे श्रीमंताचा वाढता आलेख व दुसरीकडे मातीला मिळणारी गरीबी याचे परस्सरविरोधी चित्रणही हा कवी प्रकर्षाने करतो. काट्यावरच्या या फाटक्या आयुष्याला समजुतीचे कितीही टाके घातले तरी ते उसवतच राहतात.
गर्द काळी रात फुटे
काळोखाचा पान्हा
झोपडीत निजलेला
गरीबाचा तान्हा
काऊ नाही, चिऊ नाही
भरवते माय
वाळलेल्या कोरक्यांना
बुरशीची साय
असे या गरीबीचे विदारक चित्रण कवी करतो.
आज समाज असा काळोखात चाचपडतो आहे. वासनांध वादळाचे थैमान माजलेले आहे. सत्यं-शिवं-सुंदरं या श्रेष्ठतम जीवनमूल्यांना अघोरी ग्रहण लागलेले आहे. प्रामाणिकपणे जगणार्यांच्या गळ्यावर दिवसाढवळ्या ‘अधर्माची’ तीक्ष्ण सुरी फिरते आहे. जिथे तिथे गुंडांची गर्दी आहे. अशा दडपशाहीच्या वातावरणात जनसामान्यांच्या इच्छा, आकांक्षा व स्वप्ने मातीला मिळताहेत. अशावेळी हा कवी संतापतो, चिडतो, अत्यंत उद्वेगाने तो म्हणतो,
बांडगुळासारखे खुशाल जगताहेत लोक
रक्त शोषूनी लोकांचे चिपाड करताहेत लोक
आटलेली ओल येथे का गोठलेले गीत ओठी?
रक्तोत्सवासाठीच का इथे सजताहेत लोक?
या कवीला प्रामाणिक सत्य जीवन जगण्याचे भान आहे. ‘सत्यानेच मला तारले कितीदा’ असे तो आग्रहाने सांगू इच्छितो पण इमानाने जगलेल्या निष्पाप जीवांची होळी होऊन शब्दांनाही आज कैद केले जात आहे. उत्तुंग उत्थानासाठी गर्जना करणार्यांचे आवाज दडपले जाताहेत. मानवतेला पायदळी तुडवले जात आहे. अमानुष अशी रक्तपिपासू श्वापदे सर्वत्र मोकाट सुटली असून सज्जनांचे गळे फोडून रक्तपिपासू खुशाल रस्तोरस्ती धनदांडगेपणाचा हैदोस घालतायत. अशावेळी हा आकांत कसा सहन करावा? या ‘बळी तो कान पिळी’पणाचा आता कडेलोट करावाच लागेल. भ्रष्ट लोकशाही, भ्रष्ट प्रशासन, भ्रष्ट नेत्यांसाठी चराऊ कुरणं, सर्वत्र ‘आदर्श’ घोटाळे, शिक्षणाचा भरलेला ‘डोनेशनमय’ बाजार, महागाईने काढलेला फणा या सार्या विघातक गोष्टींनी मांडलेला उच्छाद या ‘काळोखाच्या काहूराला’ खर्या अर्थाने कारणीभूत आहे. जनसामान्यांच्या आयुष्याला सर्वार्थाने ‘पांगळे’ करण्यास इथली ही (अ)लोकशाहीच जबाबदार आहे, कारण तिनेच हा सारा हाहा:कार माजविला असून ‘मौनाचे आभाळ’ निर्माण केले आहे. म्हणून हे मौनरूपी काळोखलेले आभाळ आता आम्हाला नको आहे, तर आता आम्हाला दाहीदिशा दणाणून सोडणारा ‘संघर्ष’ हवा आहे आणि हीच आता खरी नव्या संघर्षाची नांदी आहे, असे हा कवी निर्धाराने म्हणतो. हे सारे संपण्यासाठी त्याने निर्माण केला आहे एक नवा आशावाद! म्हणून तो म्हणतो,
ऐशा जुळू देगा
प्रकाशाच्या वाटा
उसळू देगा लाटा
चैतन्याच्या
किंवा
व्रतस्थ मी माझी तपस्या भंगली नाही कधी
श्वास माझे कोंडले त्यांनी असे झाले कितीदा
संपलो नाही कधी मी ना कधी मी दुभंगलो
आत्मबळ आले नव्याने असेही झाले कितीदा
या कवीने ‘वाळूउपशाचा’ एक नवा संदर्भही इथे दिला आहे. (इतरत्र कुणाच्याही कवितेत न आलेला) तो म्हणतो,
आता नुस्तेच खोल खोल खड्डे
अन् अमाप वाळूचा उपसा
कंत्राटदाराचा फुगत जातो
हरामाच्या पैशाने गच्च खिसा
हे सारे असे असताना बांडगुळासारखा खुशाल जगणारा हा समाज पाहून हा कवी कधी दु:खी होतो, तर कधी निद्रिस्त समाजाला जागे करण्यासाठी पेटून उठतो.
या काव्यसंग्रहात कष्टकर्यांच्या जीवनावरील कविता अशाच लक्षणीय आहेत. ‘दु:ख वेचता वेचता’ यातील पुढील ओळी कष्टकर्यांच्या कष्टमय जिण्याचे वर्णन अत्यंत वास्तवतेने करतात.
चिंध्या बांधून बोटांना
चाले कापूस वेचणी
ओठावर विरतात
अशी वेदनेची गाणी
‘स्वप्नांनाच जातो तडा’, ‘उसवण’, ‘दिशाहीन’ आदी कविता कष्ट उपसणार्या मजूरांचे वेदनामय जीवन हुबेहूब उभे करतात.
‘ठणक’, ‘नाते’, ‘जंगलतोड होताहे’, ‘अनोळखी भास’, ‘ऋतू हिरवा’, ‘अंधारधून’, ‘दुरावले पक्षी’, ‘श्रावणधारा’ आदी कवितांमधून कवीने निसर्गातील विविध घटकांची रूपे, स्थित्यंतरे जशीच्या तशी रंगविली आहेत.
घरटेच असे एकाकी, एकाकी
जळते भान
धुरात हरवले पक्षी, शब्दांचे
छळते मौन
यातून निसर्ग प्रतिमांतून मनाची एकाकी, बेचैन अवस्था त्याने वर्णिली आहे.
‘मन नितळ आरसा’, ‘ऐसे माझे मन’ या दोन कविता मात्र निसर्गकन्या बहिणाबाईंच्या ‘मन’ या कवितेशी नाते सांगणार्या जरी असल्या, तरी त्यातील दु:खमयता हे त्यांचे वेगळेपण आहे.
अशा या विविधांगी, आशयसंपन्न, अनुभवनिष्ठ काव्यसंग्रहातून कवीची ‘एका नव्या संघर्षासाठी‘ नवा स्वाभिमानी माणूस निर्माण करण्याची वृत्ती दिसून येते. कारण, प्रारंभीच मनोगतात तो म्हणतो, ‘‘मी स्वानंदासाठी कविता लिहिली नाही, तर समाजामध्ये सध्या जे प्रखर वास्तव आहे, ते मन विषण्ण करणारे, अस्वस्थ करणारे, बेचैन करणारे आहे. ही मनाची विषण्णता, अस्वस्थता, बेचैनी कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध होते, प्रतिबिंबित होते. त्यासाठी शब्दांसाठी अडून बसावे लागत नाही. कारण, शब्दांवर माझी निष्ठा आहे. शब्दच माझे सर्वस्व आहे.’’
मलपृष्ठावरील संपादक प्रशांत चव्हाण (बेळगाव तरूण भारत) यांचा अभिप्राय खूपसा अर्थपूर्ण आहे. गुरूगोविंद आंबे यांचे बोलके मुखपृष्ठ आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांचे अचूक संपादन या गोष्टींनी हे पुस्तक निश्चितच रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करेल यात संदेह नाही. कवी शांताराम हिवराळे यांच्या भावी लेखनास उदंड सदिच्छा.
* प्रा.रायभान दवंगे
कमलापूर, जि.अहमदनगर
भ्रमणध्वनी : 99227 21015
No comments:
Post a Comment