माणसाचे आयुष्य म्हणजे काय? आशा-आकांक्षा आणि स्वप्नांचे अमर्याद विस्तारलेले पंख की परिस्थितीच्या मर्यादेने बंदिस्त केलेला पिंजरा? मोकळा श्वास अन् घुसमट याच्या काठावर करावी लागणारी कसरत म्हणजेच आयुष्य असते का?
भगवान निळे यांची कविता वाचून हे आणि असेच अस्वस्थ करणारे प्रश्न आपला पाठलाग करत राहतात. अस्सल आयुष्याचा एक विशाल पट भगवान निळे यांची कविता मांडते. निळे यांनी त्यांच्या कवितांना आत्मचरित्राची उपमा दिली आहे. कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक कवीची कविता हा त्या-त्या कवीच्या मनाच्या तळातून आलेला उद्गार. त्या अर्थाने तो कवीच्या जीवनाचा प्रवास! पण निळे यांची कविता ‘आत्मचरित्र’ या शब्दातून प्रतित होणार्या अर्थाच्या पलीकडे जाणारी आहे. याचे कारण कवी स्वतःबद्दल लिहितोय,
स्वानुभव कवितेच्या रूपातून सांगतोय, मात्र या स्वानुभवातील सुख-दुःख सार्वत्रिक आहेत. म्हणूनच ही कविता एकट्याची असूनही एकट्याची नाही. अनेकांना तो स्वतःच्या आयुष्याचा स्पष्ट उद्गार आहे, याचीच खूणगाठ पटेल.
‘सांगायलाच हवंय, असं नाही...’ हे भगवान निळे यांच्या काव्यसंग्रहाचे शीर्षक. निळे यांच्या वाट्याला जे अनुभव आले, ऊन-सावलीचा जो खेळ आला, तसाच अनुभव आणि तोच खेळ हजारो व्यक्तींच्या जीवनात येतो. सांगायलाच हवंय, असं नाही.... हीच त्यांची भावना असते. ते मूक राहतात. त्यांच्या भावना, त्यांचा कोंडमारा जणू प्रातिनिधिक रूपात निळे यांनी कवितेतून मांडला आहे.
मराठी काव्यक्षेत्रात निळे यांच्या कवितांना स्वतंत्र स्थान आहे. त्यांच्या असंख्य कविता विविध मासिकातून, नियतकालिकांतून काव्यरसिकांच्या भेटीला वेळोवेळी आल्या; पण या कविता एकत्रित वाचण्याचा योग आला नव्हता. एका प्रसिद्ध कवीचा पहिला काव्यसंग्रह हे सुद्धा ‘सांगायलाच हवंय, असं नाही...’चे वैशिष्ट्य!
या कविता आत्मकथा आहेत, असे भगवान निळे म्हणतात खरे, मात्र आपण आजच्या व्यामिश्र समाजातील गुंतागुंतीच्या जगण्याचे प्रतिक आणि प्रतिनिधीही आहोत, याचे पुरेपूर भान त्यांना आहे. ‘मी म्हणजे, तुम्हीही!’ ही या काव्यसंग्रहातील पहिलीच कविता याची साक्ष देईल.
मी आहे दरवाजा
आपल्या देशाला जाणून घेण्याचा
माझीच सावली पडली आहे
देशावर सर्वदूर....
हे सामान्य माणसाच्या जीवनाचे सत्य. ते सत्य निळे यांची कविता कोणत्याही आविर्भावाशिवाय सहज सांगून जाते.
पालखीचे भोई बनवून
मला केले गुलामकरी
माझ्याभोवती रूढीचे
‘रिंगण’ आखून...
या त्यांच्या शब्दांमध्ये अगतिकता नाही अथवा तक्रारीचा सूर नाही, कटूता देखील नाही. आखून दिलेल्या रिंगणात जीवनाचा खेळ खेळायचा आहे, याचे पूर्ण भान त्यांना आहे. यशापयाच्या निकषांवर भलेही आयुष्याचे मूल्यमापन कसेही होवो, कवितेचे शब्दभांडार आपली पूंजी आहे, याची जाणीव त्यांना आहे.
निळे यांची व्यापक जीवनदृष्टी आणि सखोल जाणीव त्यांच्या कवितेतून पदोपदी दिसते. मग तत्त्वज्ञानाची भूमिका नसतानासुद्धा ही कविता आपसूक तत्त्वज्ञानाकडे झुकते. त्यांचे शब्द चिरंतन सत्य विलक्षण बोलक्या रीतिने अधोरेखित करतात.
प्रत्येक पिढीचा वर्तमान
कधीच सुखावह नसतो
आपण मात्र...
भूतकाळ चांगला होता अशी समजूत करून
सदैव कुंठीत अवस्थेत मात्र कुंथत असतो...
पिढ्या येतात आणि जातात. वर्तमानात जगणे नाकारणारेच अनेकजण असतात. त्यांच्यासाठी भूतकाळ सोनेरी असतो आणि भविष्यकाळ रूपेरी. रूपेरी भविष्याबद्दल आशावादी रहायलाच पाहिजे पण भूतकाळ-भविष्यकाळ याच्या हिंदोळ्यात हातून वर्तमान मात्र निसटतो! काळाचे द्वैत नसते, हे सांगताना निळे यांची कविता आजचे चित्र अन् तेव्हाचे चित्र यात फरक नाही हे दाहक वास्तव मांडून अंतर्मुख करते.
तेव्हाही मिळायचे दंडुके आणि
बंदुकीच्या गोळ्या
तुम्ही काय खायचे? काय पहायचे?
काय घालायचे? काय लिहायचे?
काय बोलायचे?
यावर तेव्हाही होती त्यांची हुकूमत....
या निळे यांच्या शब्दांचा प्रतिवाद होऊ शकत नाही. ‘तेव्हाही आजच्यासारखेच...’ हे या कवितेचे शीर्षक समर्पक आहे.
रोजचे रहाटगाडे टाळता येत नाही. त्या रहाटगाड्यात जीवन फिरते असे म्हणण्यापेक्षा ते शोषले जाते. मग निळे यांनी म्हटल्याप्रमाणे शहरात दबा धरून बसलेल्या सुप्त मरणांना हुलकावण्या द्याव्या लागतात. याचे कारण जगण्याची अनावर ओढ. निळे यांनी त्याला ‘जगण्याच्या लालसेचा खुंटा’ अशी उपमा दिली आहे. जगण्याची फरफट होतानाही चालण्याचे चक्र मोडून पडत नाही हे जगण्याच्या लालसेच्या खुंट्यामुळेच; पण चालताना, जगताना फाटणार्या आणि रक्ताळणार्या मनाचे आक्रंदन कवी लपवून ठेवत नाही. माणूस एकटा जगू शकत नाही. एकटा सोसू शकत नाही. सोसण्याचा प्रयत्न केला तरी जोडीदारापासून ते लपत नाही. जखमांचे भोग केवळ रूढार्थानेच एकाकडे; प्रत्यक्षात नकळत तेच भोग जोडीदाराच्याही पदरात पोहोचलेले असतात. कवीमन अशावेळी आणखी व्याकुळ होते.
प्रत्येक रात्री स्वतःला चाचपत
तू छताकडे एकटक पाहत राहतेस
तेव्हा माझ्या उमेदीचे दोरही
सैल होत जातात...
अशा ओळी एकरूप झालेल्या भावविश्वातूनच येऊ शकतात.
हेही दिवस जातील, नाही असे नाही
तू मात्र धीर सोडू नकोस
माझ्यातली धमक लटपटू लागते....
त्याची कहाणी तिचीही झाली आहे आणि तिच्याशिवाय तो नाही. ही कहाणी एका घराची नाही, ती घराघरांची आहे! पुरूष वर्चस्व असलेल्या समाजात स्त्रियांच्या वाट्याला येणारी अगतिकता, पापणीआड लपलेले त्यांचे हुंदके निळे यांची कविता रोखठोक मांडते. आयुष्यभर संसार करूनही एकमेकांना अनोळखी राहणार्यांचे आक्रंदन निळे यांची कविता सामर्थ्याने टिपते.
जमिनीत तोंड खुपसून ते
जपू लागतात शहामृगी नाते...
हे सांगताना भगवान निळे व्यवस्थेच्या मर्यादांना ऐरणीवर आणू पाहतात. ‘उजेडाचा रंग‘ मधील महिला संसारी नाही, जगण्यासाठी वेगळ्या चक्रात ती अडकलेली आहे. उजेडाचा रंग कसा रे सायबा? हा तिचा प्रश्न साधाच, पण सनातन आहे.
जगणे आणि लिहिणे यात मी फार अंतर ठेवले नाही, हे भगवान निळेंचे प्रांजळ म्हणणे त्यांच्या कवितांमधून प्रत्ययाला येते. ती जीवनाची कविता असल्याने थेट भिडणारी आहे, जीवनाच्या अनुत्तरीत प्रश्नांचा पुनःपुन्हा उच्चार करणारी आहे. बहुपैलू जीवनाचे सर्व पैलू या कवितेते उतरले आहेत. त्यात नवथर प्रेम आहे, आठवणी आहेत, स्वतःचा आणि समाजव्यवस्थेचाही शोध आहे. भूक आणि लैंगिकता याच्या सर्वव्यापकतेमुळे येणारी वाटा-वळणे निळे यांची कविता धीटपणे सांगते. ‘भुकेला नसतो कधी आराम, ती कधीच नाही निवृत्त सेवानिवृत्त’ हे निखळ सत्य आणि त्या सत्यासाठीचे विदारक वास्तव त्यांच्या कवितेत आहे. संघर्ष, वंचित जीवन, चळवळी याचे साक्षीत्व भगवान निळे यांना मिळालेल्या त्या साक्षीत्वाच्या परिघाने त्यांच्या कवितेला लपेटून घेतले आहे. शोषितांच्या जगण्याचा उद्गार त्यातूनच त्यांच्या कवितेला मिळाला.
ही कविता व्यवस्थेविरूद्धचा एल्गार नाही, मात्र त्या व्यवस्थेचा चेहरा समोर आणणारा पारदर्शी आरसा आहे. म्हणूनच ही कविता आत्मपर राहिलेली नाही. ज्या परिघाने ही कविता वेढली आहे तो अमर्याद आहे. या कवितेला वैश्विक आयाम आहे. समाज व्यवस्थेतील विसंगतीचे दर्शन निळे यांची कविता घडविते.
या पंचवार्षिक फसव्या स्वप्नांच्या मोसमात
मीही ठोकून घेतलाय
डाव्या बोटावर दुर्भाग्याचा खिळा...
असे सांगत ती ढोंगावर परखड भाष्य करते. अपूर्ण किंवा भंगलेल्या स्वप्नांच्या काचा तुडवत जखमांची कहाणी मांडताना देखील निळे यांची कविता नैराश्येकडे झुकत नाही, हे विशेष. अपार आशावादावर त्यांचे जीवन उभे आहे आणि म्हणूनच त्यांची कविता देखील! ‘आजच्यासारखं दुःख कुणाच्याच माथी थोपलेलं नसेल, जन्माला येणारं प्रत्येक बाळ हसणारचं असेल’ हा प्रकाशमय भविष्याचा सूर त्यांच्या कवितेत जिथे तिथे दिसतो.
चिरेबंद वाड्यांना हादरे
देता-देताच ते
डोळे पुसून घालतात
हक्कांच्या जाणिवांचे काजळ
त्यांना लिहायचा आहे नव्याने
खरा इतिहास....
हे सांगताना निळे यांची कविता त्यांच्या प्रकाशाच्या मार्गात तरी
आडवे येऊ नका,
त्यांच्या स्वप्नांवर पडू द्या
लख्ख उजेड....
असे विनवित माणसाची आणि माणुसकीची बनून जाते.
पोटाला कळते फक्त भाकरीची भाषा.
नादान पावसाला कळली असती ही भाषा
तर तो कधीच वाहिला नसता
गरीबांच्या डोळ्यात....
असे वास्तव थेट सांगण्याच्या शैलीमुळे निळे यांच्या कवितेत प्रतिमा कमी आहेत. या कवितेची ताकत तिच्या आशयसंपन्नतेत आहे. या आशयसंपन्नतेसाठी निळे यांनी रोजच्या जगण्यातील शब्द निवडले आहेत. एखादे स्वगत असल्यासारखी ही कविता मनाला भिडते. कोलाहलाच्या, बाहेरील आणि आतील संघर्षाच्या चरकात पिळून निघणारे जीवन निळे यांच्या कवितेतून आपल्यासमोर येते. त्यांची कविता केवळ आत्मशोध नाही. चांगल्या जीवनाची आस घेऊन पुढे निघालेल्यांचे ते आत्मभान आहे. सहासष्ट कवितांचा हा संग्रह. सनातन प्रेरणा आणि सनातन सत्य सांगतानाही या कविता एकसुरी नाहीत. उदा.
अक्षरांना जायबंदी करून कोंडून ठेवले पुस्तकात
तर कवितेचा आक्रोश घुमणारच नाही का आसमंतात?
हा कवीचा सवाल आहे. ही कविता जसे मुंबईचे चेहरे दाखविते, भोवतालच्या चेहर्यामागचा चेहरा समोर आणते, तसेच स्त्री-पुरूषांच्या अंतरंगाचा तळ शोधू पाहते. ‘सांगायलाच हवे होते असे काही’ हेच निळे यांच्या कवितांबद्दल म्हणता येईल. ही कल्पनाविश्वात विहरणारी कविता नाही, जमिनीवर पाय असलेल्या माणसांची कविता आहे. त्यांचे राग-लोभ, त्यांची स्वप्ने, त्यांचे जगणे या कवितेचा आधार आणि आविष्कारही आहे. निळे यांची कविता केवळ प्रश्न निर्माण करून निरूत्तर करणारी नाही, ती उत्तरही देते. ही कविता जेवढी संयत तेवढाच तिचा आशय प्रखर आहे. निळे यांच्या प्रगल्भ कवितांनी मराठी कवितेच्या समृद्धतेत निश्चितच लक्षणीय भर घातली आहे.
सांगायलाच हवंय,
असं काही...
लेखक: भगवान निळे
प्रकाशक: सृजन प्रकाशन, नवी मुंबई
पृष्ठे: 136 मूल्य: रु. 120/-
मो. 89766 69373
- स्वप्निल पोरे, पुणे
९४२२०२९०४१

No comments:
Post a Comment