(पूर्व प्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक', पुणे)
डॉक्टरांच्या कन्सलटंसी रुमच्या लॉबीमध्ये मी पाऊल ठेवले तेव्हा तिथे प्रचंड गर्दी होती. बरेच नंबर माझ्या आधीच लागले होते. सर्व लॉबी पेशंटनी भरली होती. डॉक्टरांची ख्यातीही तशीच होती. त्यांच्या हाताला चांगला गुण येत असे म्हणूनच तिथे प्रचंड गर्दी होई. डॉक्टरही पेशंटला खूप वेळ देत. त्यांचं सगळं ऐकून घेत आणि मगच उपचार सुचवीत. म्हणूनच त्यांचं आणि पेशंटचं एक नातं निर्माण होई. त्यात विश्वास निर्माण होई. आणि निम्मा आजार त्यामुळेच दूर होई. गेली अनेक वर्षे प्रॅक्टीस करुन डॉक्टरांनी नाव कमावलं होतं.
माझा नंबर लागायला अजून एखादा तास लागेल याची मला खात्री पटली होती. मी रिसेप्शनीस्टकडे गेलो. माझी फाईल दाखवली आणि मी अपॉंईंटमेंटसाठी फोन केला होता म्हणून तिला सांगितले. तिने माझे नाव रजिस्टरमध्ये असल्याची खात्री केली. मला वजन करायला लावलं. सर्व नोंदी फाईलमध्ये करुन ती माझ्याकडे देत ती म्हणाली, ‘बाजूला महाजन काका बसलेत त्यांना ती दाखवा...’ मी बाजूला पाहिले. साठ-पासष्टचे महाजन काका खुर्चीत बसले होते. बारिक अंगकाठी, गहू वर्ण आणि चेहर्यापेक्षा चष्मा मोठा. काकांसमोर एक स्टुल होतं आणि त्यावर एक वही होती. मी त्यांच्याकडे वळलो. ‘फाईल द्याल का मला ती?’ ते अदबीने म्हणाले. अंगकाठीपेक्षा त्यांचा आवाज मोठा वाटला मला. ‘तुम्ही काय करणार आहात माझ्या फाईलचं?’ मी त्यांना उलट प्रश्न केला.
‘मी काहीच करणार नाही साहेब. थोडी नजर टाकणार आणि तुम्हाला परत करणार, परंतु काही नोंदी मला ठेवायच्या आहेत. तुम्हाला वाटलं तरच द्या. माझी सक्ती नाही’ महाजन काका विश्वासानं म्हणाले.
मी रिशेप्शनीस्टकडे कटाक्ष टाकला. तिनं द्या म्हणून खूण केली. मग मी काकांकडे फाईल सरकवली. त्यांनी फाईल उघडून माझं नाव मोठ्यानं उच्चारत त्यांच्या वहीत लिहून घेतलं. ‘मोबाईल नंबर द्याल का प्लीज!’ ते मला म्हणाले. कशाला पाहिजे यांना हे सगळं, अशा नजरेनं मी त्यांना माझा मोबाईल नंबर सांगितला. त्यांनी तो लिहून घेतला.
‘काय होतंय तुम्हाला?’ त्यांनी मला विचारलं. मी प्रश्नार्थक चेहरा केला. ‘अहो.. तुम्हाला वाटलं तर सांगा. माझी सक्ती नाही’ काकांनी मला कोड्यात टाकलं.
‘मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. कमी होत नाही. म्हणून डॉक्टरांकडे आलो’ असं सांगितलं तर ते हसले.
‘इथं येणार्या नव्याण्णव टक्के लोकांना बीपीचा त्रास आहे. काही काळजी करु नका. डॉक्टर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील. बसा तुम्ही’ हसतमुखानं त्यांनी मला बसण्याची खूण केली. मी एका जागेवर बसून घेतलं. अनेक पेशंट रांगेत होते. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या व्याधीनं त्रस्त होता. त्यापेक्षाही हा काय आजार आपल्याला जडलाय या काळजीत प्रत्येक चेहरे दिसत होते. प्रत्येक पेशंटबरोबर किमान एखादा तरी सोबती होता. वयोवृध्द असेल तर दोघं दोघं सोबतीला होते. प्रत्येकाला आपला नंबर लवकर यावा असं वाटत होतं. परंतु डॉक्टर एकेकाला किमान वीस एक मिनीटं देत होते. आत जाणारा धास्तावून जात असे तर बाहेर येणारा हसतमुखपणे येत असे. हीच डॉक्टरांची ख्याती होती.
मी विचार करत होतो. विधात्यानं प्रत्येकाला सुंदर आयुष्य दिलंय पण काळजी, चिंता, व्याधी याचही वरदान दिलंय. हो वरदानच! त्यामुळंच मनुष्य मार्गावर राहतो. आयुष्यभर अशा काळज्यांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत राहतो. प्रत्येकाला या दिव्यातून जावंच लागतं. छान छान डे्र्रसच्या दुकानात गेल्यावर नाही का सेल्समन सांगतो, ‘ऐसा दुसरा डेस नही मिलेगा. सब पॅटर्न अलग है...’ त्याप्रमाणेच प्रत्येक मनुष्य एक वेगळा पॅटर्न. कोणी दुसर्यासारखं नाही. एकाच घरात वडील,भाऊ, बहिणी, आई, काका, मामा, वहिन्या सगळे वेगवेगळे. प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं, काळज्या वेगवेगळ्या तसे आजारही वेगवेगळे. त्यामुळे डॉक्टरांकडे येणारे पेशंट वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे.
काही वेळातच माझा नंबर आला. मी डॉक्टरांच्या रुममध्ये प्रवेश केला तसे त्यांनी हसून विचारल. ‘कशाला आलात..?’ मी हसलो. ‘तुम्हाला पहावंसं वाटलं म्हणून आलो’ तर तेही हसले.
‘यमाला पहायला कोणी येत नाही हो..’ येवढं बोलून ते पुन्हा सात मजली हसले. माझी आणि डॉक्टरांची बर्यापैकी ओळख होती. ‘चला तपासुया’ म्हणाले आणि हसतच ते उठले. मी बाजूच्या बेडवर पडुन राहीलो. सगळं सांगितलं. डॉक्टरांनी सर्व ऐकून घेतलं आणि मला पाचएक मिनीटं तपासल्यावर जागेवर जावून बसले. मी उठून त्यांच्या पुढे जावून बसलो. ‘काही काळजी करु नका. ब्लड टेस्ट लिहून देतोय. तेवढ्या करुन रिपोर्ट दाखवा मग पाहु’ ते म्हणाले.
‘पण डॉक्टर औषध वगैरे काही सुरु करताय का?’ मी म्हणालो. ‘का हौस आहे की काय तुम्हाला? काही काळजी करु नका; काही गंभीर नाहीये. रिपोर्ट येवू देत मग पाहू’ ते विश्वासानं म्हणाले.
‘ठीक आहे’ म्हणून मी बाहेर पडलो. रिसेप्शनीस्टकडे जावून तिच्याकडे फाईल दिली. पैशाची देवाणघेवाण झाली. तेवढ्यात महाजनकाकांचा आवाज आला, ‘या इकडे, काय म्हणाले डॉक्टर?’
‘काही नाही हो..’ म्हणून मी चालु लागलो. मला त्यांच्या आगाऊपणाचा थोडासा रागच आला होता. तसे ते हसतच म्हणाले ‘सांगेन काही गोष्टी युक्तीच्या’ हे ऐकून मी थबकलो. सरळ फाईल त्यांच्या हातात ठेवली. ‘हं... ब्लड टेस्ट करायला सांगितलंय. लगेचच उद्या करुन घ्या. वेळ घालवू नका’ ते फाईल घेऊन म्हणाले.
मी ‘ठीक आहे’ म्हणालो आणि फाईल घेऊन बाहेर पडलो. पण मनात उगाचच महाजन काकांचे विचार घोळत राहीले. उशीर झाला होता, परंतु ऑफिसमध्ये सांगितलं होतं त्यामुळे ऑफिसमध्ये पोहोचलो आणि कामामध्ये गढून गेलो. सायंकाळी सहाच्या दरम्यान मोबाईलवर अन्नोन फोन आला. मी तो घेतला तर समोरुन महाजनकाका बोलत होते. ‘अहो उद्या ब्लड टेस्ट करायला सांगितलंय ना डॉक्टरांनी. आठवण करायला फोन केला होता..’
‘कोण बोलतय?’ मी म्हणालो.
‘अहो विसरलात काय? महाजन काका बोलतोय. उद्या टेस्ट करुन घ्या बरं. त्यासाठी रात्रीचं जेवण लवकर घ्या आणि लकवर झोपा. सकाळी आठ वाजता लॅब उघडतात. अनोशापोटी जा. पटकन होईल’
‘होय होय.. माहिती आहे मला’ मी जरा त्राग्यानंच म्हणालो.
‘अहो तसं नव्हे. एकदा टेस्ट झाल्या की टेन्शन जाईल, फक्त आठवण केली. ठेवतो फोन’ असं म्हणून काकांनी फोन बंद केला.
कोण हे महाजन काका? हे का एवढा मला फोन करतायत? च्यायला कटकट आहे. काय माणसं पण असतात. आता ह्या म्हातार्याला काय पडलीय एवढा फोन करायची? माझ्या मनात विचार येत होते आणि मी त्यांच्यावर जरा चिडलोच होतो. रात्री झोप लागली. सकाळी जाग आली तीच मुळी महाजन काकांच्या फोनने ‘गुड मॉर्निंग.. महाजन काका बोलतोय.. टेस्ट करायला बाहेर पडताय ना? काही मदत हवी का म्हणून फोन केला. अनोशापोटी निघा आणि दुपारी जेवण झाल्यावर दोन तासांनी पुन्हा टेस्ट करायच्या आहेत हे लक्षात ठेवा’ ते बोलत होते.
‘होय हो काका मला माहिती आहे. मी करुन घेतोय टेस्ट’ असं म्हणून काहीशा रागानेच मी फोन बंद केला. माझ्या रितसर सर्व ब्लड टेस्ट झाल्या. महाजन काकांनी लवकर जायला सांगितलं म्हणून बरं झालं. आठ साडेआठ पर्यंत सकाळच्या टेस्ट झाल्या आणि 12च्या आत दुपारच्या टेस्ट होवून मी ऑफिसलाही गेलो. दुसर्या दिवशी रिपोर्ट घेउन डॉक्टरांकडे गेलो तर तिथे महाजन काका कुणाशीतरी उभं राहून बोलत होते. मी नमस्कार केला आणि रिशेप्शनिस्टला सांगून बसून राहीलो. काका काहीतरी गंभीरपणे बोलत होते. ‘काही काळजी करु नका. डॉक्टरांनी सांगितलंय ना ऍडमीट व्हायला तर व्हा! ते सगळी काळजी घेतील’ ते सांगत होते.
‘अहो पण आज्जींना इथवर आणणार कसं? ऍम्बुलन्स, स्ट्रेचर सगळ हवं ना?’ पेशंटचे नातेवाईक काळजीनं बोलत होते.
‘अहो.. मी करतो व्यवस्था. पैसेही जास्त द्यावे लागणार नाहीत. आपली मुलं त्यांना स्ट्रेचरवरुन वरती घेवून येतील. आता तुम्ही जास्त वेळ घालवू नका. पहिल्यांदा ऍडमीट करा पाहू आणि फाईल माझ्याकडे द्या, मी सर्व तयार ठेवतो’ काकांनी त्यांना धीर दिला आणि ऍम्बुलन्सला फोन लावला.
‘बरोबर मुलं घेवून जा रे. पेशंटला ऍडमीट करायचंय. ओल्ड एज आहे. त्यांना त्रास नाही व्हायला पाहीजे’ काका फोनवरुन समोरच्याला सूचना देत होते आणि हाताने पेशंटच्या नातेवाईकांना लवकर निघायला सांगत होते. ते निघून गेल्यावर काका माझ्याकडे वळले. ‘आणले का रिपोर्टस? डॉक्टरांना दाखवा. मग बघु’ असं मला म्हणून ते त्यांच्या जागेवर जावून बसले. मी महाजन काकांचे बारीकपणे निरिक्षण करीत होतो. हे सर्व ते का करतायत ते मला उमगत नव्हतं. यथावकाश माझा नंबर येताच मी डॉक्टरांना भेटायला गेलो. माझं कोलेस्टॉल बॉर्डरवर होतं. बाकी रिपोर्टस बरे होते. काही जुजबी सूचना देउन, खाण्याची पथ्य सांगून आणि पुन्हा तीन महिन्यांनी परत रिपोर्टस करण्याची सूचना देऊन डॉक्टरांनी मला जायला सांगितलं. यावेळी मात्र मी बाहेर येवून सरळ महाजन काकांच्या हातात ठेवली. त्यावर काका हसले. फाईलवर नजर टाकून म्हणाले, ‘अजून तीन महिन्यानी पुन्हा टेस्ट करायला सांगितल्या आहेत. होय ना? काही काळजी करु नका. मी आहेच आठवण करुन द्यायला’ ते म्हणाले आणि जोरात हसले. ‘थोडा व्यायाम करा. सगळं कंट्रोलमध्ये राहील’ असा मोलाचा सल्लाही द्यायला ते विसरले नाहीत.
महाजन काकांबद्दलचं माझ्या मनातलं गुढ वाढत होतं. ते येणार्या प्रत्येक पेशंटशी फार जवळीकीने बोलत होते. बरेच पेशंट आणि त्यांचे नातेवाईक काकांशी स्वत: येवून बोलत होते. त्यांचा सल्ला घेत होते. काका त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्या वहीत काहीतरी लिहून घेत होते. त्यांचे फोन नंबर आठवणीने पुढे लिहीत होते. काही तरुण पेशंट नमस्कार करुन जात तर काही आदराने त्यांच्यापुढे वाकत होते. काका हे काय आणि कशासाठी करतायत हेच मला उमगत नव्हतं. त्यामुळे त्यांबद्दल उत्सुकता आणि गुढ दोन्हीही वाढत होतं. आताशा त्यांच्याबरोबर ओळखही वाढली होती.
अशाच एका सकाळी मी ऑफिसला जाताना अचानक मला काका दिसले. मी धावतच त्यांना गाठलं. ‘काका नमस्कार. काका, मी यापुढे सांगतोय त्याला नाही म्हणू नका प्लीज’ मी म्हणालो. त्यांच्या चेहर्यावर उत्सुकता दिसली. ‘चला चहा घेवूया’ असे म्हणत बळेच त्यांना हॉटेलमध्ये घेवून गेलो. ‘अहो तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होईल आणि मी चहा घेत नाही’ म्हणून ते आढेवेढे घेवू लागले.
‘असुदेत मला नाही उशीर होत आणि तुम्ही माझ्यासमोर फक्त बसा, मी चहा घेतो’ असं मी म्हणालो तरी ते आढेवेढे घेत होते. मग मात्र मी बळेच त्यांना घेवून गेलो. मला आज त्यांच्याशी बोलायचं होतंच. हॉटेल हे केवळ निमित्त होतं.
‘काका तुम्ही हे सगळं का करताय?’ मी सरळ विषयालाच सुरुवात केली.
‘हे म्हणजे?’ असं म्हणून ते मिश्कीलपणे हसले आणि माझ्या बोलण्यातला रोख ओळखून बोलू लागले. ‘मी काही महात्मा किंवा परमात्मा नाही. अगदी सामान्य आणि सरळ आयुष्य गेलं माझं. नोकरी केली. व्यवस्थित प्लॅनिंग करुन संसार केला. पैसा सांभाळून ठेवला. मुलांच शिक्षण पूर्ण केलं. दोघांनाही पायावर उभं कलं. मुलीला चांगलं स्थळ बघुन तीचं लग्न करुन दिलं. दोघे सुखी आहेत. त्यातच आपलं सुख आहे. पण मित्रा, मनात सल एकच राहीली की हे सामान्यांसारखं सुखी आयुष्य जगलो पण ज्या समाजात मोठा झालो त्यांच्यासाठी आपण काय दिलं? निवृत्त झाल्यावर सामान्यासारखं व्याधीला कुरवाळत, मरणाची वाट पाहत आयुष्य मला नको होतं. मग मला घरात टीव्ही पाहत आडवा असलेला म्हातारा कधी जातोय याची वाट पाहणारी तोंड दिसू लागली. डोक्यात आयडीया आली. डॉक्टरांना भेटलो आणि रिसेप्शनीस्टच्या बाजूला एक खुर्ची टाकून बसु लागलो. काय करतो मी? फक्त येणार्या पेशंटशी बोलतो, त्यांना जगण्याची उम्मिद देतो. एका वहीत त्यांच्या टेस्ट, ट्रिटमेंट बद्दल नोंद करतो आणि त्यांना एक फोन करुन फक्त आठवण करुन देतो. मध्येच एखादा फोन करुन त्यांची चौकशी करतो. कुणाकडे काही अडचण असल्यास त्याला जमेल तशी मदत करतो. ऍडमीट असलेल्या पेशंटच्या जवळ नातेवाईक नसतील तर त्यांच्या जवळ बसुन त्यांची जमेल तशी सेवा करतो. ऐकण्याच्या मन:स्थितीत असेल तर पेशंटला पुस्तक वगैरे वाचुन दाखवतो. मस्त जातो हो माझा वेळ यात. चलनवलन राहतं. डोक्यात नको ते विचार घुसतच नाहीत. घरातल्यांना आपली अडचण नाही वर चांगलं काम केल्याच समाधान मिळतं. छान झोप लागते. सकाळी फे्रश...’
त्यांनी एक मोठ्ठा सुस्कारा टाकला. मी गुंग होवून ऐकत होतो. महाजन काका उत्साहानं बोलत होते. माझ्या मनात विचार आला, ‘खरंच बाबा आमटेंसारखं आनंदवन सगळ्यांनाच उभं नाही करता येत. काही असतात असे वेडे. एखाद्याच्या आयुष्यात आनंदाचं वन फुलवण्याचा प्रयत्न करणारे. महाजन काकांसारखे!
‘चला साहेब, चहा घ्या लवकर. थंड होत चाललाय तो’
महाजन काकांच्या बोलण्याने मी भानावर आलो. त्यांची प्रसन्न मुद्रा कितीतरी वेळ माझ्या डोळ्यासमोर तरळत राहिली.

आनंद वेदपाठक
मुलुंड (पू), मुंबई संपर्क: 98692 52119

No comments:
Post a Comment