Saturday, December 30, 2017

पाक ‘कुल’भूषणाचे भवितव्य काय?

गेला आठवडाभर पाक कब्जात असलेल्या कुलभूषण जाधव आणि त्यांच्या आई, पत्नीच्या पाक भेटीविषयी खूप गाजावाजा झाला. त्यांना ज्याची भेट घेऊ देण्यात आली व त्यात अनेक अडथळे उभे करण्यात आले तो खरोखरच कुलभूषण होता किंवा नाही, यावरही शंका घेतल्या गेल्या आहेत. पण असाच एक पाकिस्तानी ‘कुलभूषण’ गेले नऊ महिने बेपत्ता आहे, त्याचे भवितव्य काय आणि तो कुठे आहे, त्याचा फारसा कुठे उल्लेख आलेला नाही. अर्थात कुलभूषणप्रमाणेच त्याचेही भारतीय हेरखात्याने अपहरण केल्याचा आरोप पाकिस्तानने केलेला आहे. पण भारताने त्याला दुजोरा दिलेला नाही वा भारतातही त्याविषयी कुठली माध्यमात चर्चा झालेली नाही. यातला योगायोग असा आहे, की कुलभूषणला अटक करणारे जे पाकिस्तानी पथक होते, त्यात या पाक कुलभूषणाचा समावेश होता. आणखी एक योगायोग असा आहे की जाधव यांना पाक लष्करी न्यायालयाने फाशी फर्मावली, त्याच दरम्यान हा पाक कुलभूषण बेपत्ता झाला आहे. त्यामुळेच पाकने त्याच्या अपहरणाचा भारतावर संशय घेतला आहे. या पाक कुलभूषणाचे नाव महंमद हबीब झहीर असे आहे. जाधवना अटक करण्याच्या वेळी झहीर पाक हेरखात्यात अधिकारी म्हणून काम करत होता आणि मुळात तो पाक सेनादलात चिलखती दलाचा लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्यरत होता. निवृत्तीनंतर नवी नोकरी शोधत असताना तो बेपत्ता झालेला आहे. त्यामागे कुठली कारणे आहेत, त्याचा खुलासा पाकने केलेला नसला तरी तो पाकहून ओमान व पुढे नेपाळला गेला असताना बेपत्ता झाला, असा दावा आहे. जिथून झहीर बेपत्ता झाला ती जागा भारताच्या सीमेलगत असल्याने पाकने भारतावर संशय घेतला आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही असे कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. हेरखात्याची कामे व कारवाया अतिशय गुप्तरित्या चालतात. म्हणूनच पाकचा आरोप फेटाळून लावण्यात अर्थ नाही.
कुलभूषण याच्याविषयी जी माहिती आजपर्यंत उघड झाली आहे, त्यानुसार तो भारतीय नौदलातून निवृत्त झाल्यानंतर इराणच्या चाबाहार बंदरात व्यवसाय करत होता. तिथे त्याला कुठलेतरी व्यापारी आमिष दाखवून पाकिस्तानी टोळीने बोलावून घेतले आणि त्याचे अपहरण करून त्याला पाकिस्तानला पळवून नेले. तालिबान टोळीने हे काम केले आणि पैशाच्या बदल्यात कुलभूषणला पाक हेरखात्याच्या हवाली केले, असे म्हटले जाते. त्याला काहीसा दुजोरा पाकिस्तानातून आलेल्या बातम्यातूनही मिळू शकतो कारण त्याला बलुचीस्थान सीमेवर अटक केल्याचे एका मंत्र्याने म्हटलेले होते, तर पोलीस अधिकार्‍यांनी त्याला अफगाण सीमेवर पकडल्याचा दावा केला होता. पाकच्या तात्कालीन सुरक्षा सल्लागारांनी कुलभूषण विरोधात कुठलाही सिद्ध होऊ शकणारा पुरावा नसल्याचा खुलासा केलेला होता. साहजिकच पाकने कितीही आरोप केले असले, तरी कुलभूषणला यात अपहरण करून गोवण्यात आलेले सहज लक्षात येते. काही प्रमाणात झहीरची तशीच कथा आहे. निवृत्तीनंतर तो नवी नोकरी शोधत होता आणि इंटरनेटच्या माध्यमातून ब्रिटनच्या एका कंपनीने त्याला आठ लाख रुपये मासिक पगाराची नोकरी देऊ केलेली होती. त्यासाठी त्याला ओमानला बोलावून घेण्यात आले. त्याला विमानाचे तिकिट पाठवले आणि मग तिथून त्याला पुढील मुलाखतीसाठी नेपाळला जाण्यासाठी विमानाचे तिकिट दिले गेले होते. नेपाळला पोहोचल्यावर त्याने आपला फोटोही कुटुंबाला मोबाईलच्या माध्यमातून पाठवला होता. तिथे त्याला भेटलेल्या कुणा व्यक्तीच्या सोबत झहीर भारतीय सीमेलगतच्या लुंबिनी या ठिकाणी जात असल्याचे त्याने कुटुंबाला कळवले होते. मात्र त्यानंतर त्याचा आपल्या नातलगांशी कुठलाही संपर्क झालेला नाही. त्यामुळे झहीरच्या मुलाने  पाकिस्तानात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
आता त्या घटनेला नऊ महिने उलटून गेलेले असून, अजून झहीरविषयी कुठलीही माहिती समोर आलेली नाही. पाकिस्ताननेही कुठला थेट आरोप भारतावर केलेला नाही. मात्र पाकिस्तानी भाषेत शत्रू राष्ट्राने असे म्हटले जाते, तेव्हा त्यांचा रोख भारताकडे असतो हे उघड आहे पण भारताने कधीच अशा आरोपांना उत्तर दिलेले नाही किंवा त्याची दखलही घेतलेली नाही. मात्र यातला योगायोग विसरून चालत नाही. कुलभूषणला लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा फर्मावली, त्याच दरम्यान झहीर बेपत्ता झालेला आहे आणि तो कुलभूषणला अटक करणार्‍या पथकाचा अधिकारी होता. कुठल्याही हेरगिरीच्या प्रकरणातले हिशोब उघडपणे मांडले आत नसतात आणि त्यासाठीची किंमत कोर्टात भरपाई म्हणून मागितली जात नसते. त्याचा हिशोब शत्रू-मित्र राष्ट्रे आपल्या पद्धतीने परस्सर चुकता करीत असतात. कुलभूषणला अपहरण करून जर पाकने फसवले असेल, तर त्याचा हिशोब त्यांच्याच पद्धतीने पाक अधिकार्‍याचे अपहरण करून चुकता होऊ शकत असतो. पण भारताने झहीर आपल्या ताब्यात आहे, असे अजून कुठे सांगितलेले नसल्याने, ते प्रकरण संशयास्पद आहे. मात्र तसे भारत करू शकतो, हे पाकिस्तानला पक्के ठाऊक असले तरी उघड कुठलाही पुरावा हाती नसल्याने पाक कुठला दावाही करू शकत नाही. जागतिक कोर्टात दादही मागू शकत नाही. उलट पाकिस्तानने कुलभूषण विषयात मोठा तमाशा करून त्याचा ताबा आपल्याकडे असल्याची ग्वाही दिलेली असल्याने भारताला जागतिक कोर्टात धाव घेणे सोपे झाले. झहीरविषयी पाकिस्तान असे कुठलेही पाऊल उचलू शकला नाही. अर्थात आपल्यावरचा जगभरच्या दहशतवादाचा आरोप संपवण्यासाठी आणि बलुची व सिंध प्रांतातील असंतोषाचे खापर भारताच्या माथी फोडण्यासाठीच पाकने कुलभूषणच्या अटकेचा व खटल्याचा तमाशा मांडलेला होता. उलट भारताने काहीही कबुल केलेले नाही.
पाकिस्तानी लष्करातून निवृत्त झाल्यावर लेफ्टनंट कर्नल महंमद हबीब झहीर नवी नोकरी शोधत होता. त्यासाठी त्याने इंटरनेटच्या लिंक्डइन या संकेतस्थळावर आपली माहिती काही महिन्यांपूर्वी टाकलेली होती. तेव्हा झहीर फैसलाबाद येथील एका गिरणीत नोकरी करीत होता. त्या माहितीच्या आधारे ब्रिटनच्या एका कंपनीने त्याला ऑफर दिली होती. ब्रिटनमधल्या फोनवरून झहीरशी कोणी तरी संपर्क साधला व त्याला नोकरीची ऑफर दिलेली होती. पुढे झहीरला इमेलद्वारे रितसर ऑफरपत्र मिळाले. त्यात आठ लाख रुपये मासिक पगाराची माहिती होती. झहीरला विभागीय संचालक म्हणून काम करायचे होते. 4 एप्रिल 2017 रोजी झहीरला ओमानहून विमानाचे तिकिट पाठवण्यात आले आणि दुसर्‍याच दिवशी झहीर लाहोर येथून ओमानला रवाना झाला. मग तिथून त्याला नेपाळला जाणार्‍या विमानाचे तिकिट मिळाले. त्याप्रमाणे झहीर नेपाळला पोहोचला. तिथे त्याला जावेद अन्सारी नावाची व्यक्ती भेटणार होती. त्या व्यक्तीने झहीरला स्थानिक मोबाईल कंपनीचे सीमकार्ड दिले होते. तिथे त्याला छोटा प्रवास असलेल्या लुंबिनीचे तिकिट मिळाले आणि त्यानेही तिथे पोहोचताच आपला फोटो काढून कुटुंबियांना पाठवला होता. त्यानंतर मात्र झहीरने पुन्हा कुटुंबाशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेला झहीरचा पुत्र साद झहीर याने पित्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याला सर्वच संपर्क नंबर स्विच ऑफ असल्याचे लक्षात आले आणि तो घाबरला. त्याने धावपळ करून पोलिसांशी संपर्क साधला. रीतसर तक्रार केली पण आजतागायत पाकिस्तानला झहीरचा शोध लागलेला नाही. झहीर हा पाक हेरखात्याचा माजी अधिकारी असल्याने पाक सरकारने त्याची तात्काळ दखल घेऊन शोधही सुरू केला पण त्यातून काही निष्पन्न झालेले नाही. पाकिस्तानसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे कारण झहीर हा पाक ‘कुल’भूषण आहे.
झहीर हा कुलभूषण जाधव याच्यासारखाच निवृत्त सेनाधिकारी असून त्याने काही काळ पाक हेरखात्यामध्ये काम केलेले आहे. साहजिकच पाकच्या अनेक कृष्णकृत्याची भरपूर माहिती त्याच्याकडे असू शकते. असा माणूस भारताच्या हाती लागला तर त्याच्याकडून भारतातील पाकसाठी हेरगिरी करणारे गद्दार व हस्तकांची माहितीही उघड होऊ शकते. तेवढेच नाही तर कुलभूषण वा अन्य प्रकरणातील तपशीलही भारताला मिळू शकतो. मात्र भारताने त्यात कुठलाही रस दाखवलेला नाही वा त्यविषयी काहीही मान्य केलेले नाही. थोडक्यात कुलभूषणचा वापर जसा पाकिस्तानने तमाशा उभा करण्यासाठी करून घेतला, तसा कुठला प्रकार भारताकडून झालेला नाही. मग झहीरचे झाले काय? जेव्हा अशी लपाछपी चालते, तेव्हा शत्रूगोटात भीतीचे वातावरण घोंगावू लागते. त्याला आपल्या हस्तकाला वाचवता येत नाही वा त्याच्या सुटकेची मागणीही करता येत नाही. त्याच्याविषयी काही करता आले नाही, म्हणून बिघडत नाही पण त्याच्यापाशी असलेली माहिती शत्रू किती व कशी उपयोगात आणेल, त्याची चिंता सतावणारी असते. म्हणूनच भारतासाठी कुलभूषण हा जितका जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यापेक्षा कित्येक पटीने झहीर हा पाकिस्तानसाठी गळफास आहे. आणखी एक गोष्ट इथे उलगडून सांगितली पाहिजे. भारताने झहीरविषयी उघड काही कबुल केलेले नसले, तरी तशी शक्यता असल्यास त्याचे सुचक संकेत पाकिस्तानला दिलेले असू शकतात. ब्लॅकमेलमध्ये जसे सुचक संकेत दिले जातात, तशीच ही गोष्ट असते. त्यात ऐकणार्‍या बघणार्‍या इतरांना त्यातले संकेत कळू शकत नाहीत. मात्र त्यात गुंतलेल्यांना नेमका आशय अशा गूढ शब्दातून कळत असतो. कदाचित तो संकेत पाकिस्तानला भारताने दिलेला असावा आणि त्यांना समजलेला असावा. म्हणूनच कुलभूषण जाधवच्या बाबतीत माणुसकीचे नाटक पाकने रंगवलेले असावे.
माणुसकीच्या नात्याने कुलभूषणच्या आई व पत्नीला त्याची भेट देण्याचे नाटक पाकने रंगवलेले असू शकते पण तेही करताना त्यांना धड वागता आलेले नाही. परंतु यामुळे कुलभूषण सुरक्षित किती आहे, त्याची भारताला माहिती मिळालेली आहे. समजा तसाच झहीर भारताच्या ताब्यात असेल तर त्यालाही यमयातना देऊन त्याची छायाचित्रे पाकला मिळतील, अशी सोय केली जाऊ शकते. तसे काही झाल्यामुळे पाकला सुबुद्धी सुचली असेल काय? दोन देशातल्या हेरांना पकडले असल्यास त्यांची अदलाबदल करण्याचाही प्रघात आहे. पाकला तसाच खोड्यात घालून झहीरच्या बदल्यात कुलभूषणची मुक्तता करणे शक्य आहे. अर्थात झहीर भारताच्या कब्जात असला तर! तशी कुठली माहिती आज तरी उपलब्ध नाही पण झहीरला भारताच्या सीमेलगत अन्य कोणी कशाला गायब करू शकतो? इतर कुठल्या देशाला झहीरला उचलून काय मिळणार आहे? फक्त भारतासाठीच झहीर मोलाचा ऐवज आहे. हा सगळा सावल्यांचा खेळ आहे. हेरखाती ही मुळातच सरकारच्या बेकायदा कारवायात गुंतलेली असतात आणि त्याविषयी कोणी कधी जाहीरपणे बोलत नसतो. इथे भारतीय माध्यमात तावातावाने पाक हेरखाते आय एस आय याविषयी चर्चा चालतात पण आयबी वा रॉ अशा भारतीय हेरखात्याबद्दल कुठली चर्चा होत नाही. नेमकी उलटी स्थिती पाकिस्तानात आहे. तिथे कुठला घातपात, हिंसाचार माजला, मग त्याचे आरोप भारतीय हेरखात्यावर होत असतात. त्यामुळेच झहीरच्या बेपत्ता होण्यावरून पाक माध्यमात खूप चर्चा झाल्या व भारतीय हेरखात्यावर आरोपांची सरबत्ती झालेली आहे. मात्र भारताने कुठलीही दाद दिलेली नसली तरी त्यात तथ्य नाही, असे बोलण्यात अर्थ नाही. हा मोठा डाव असू शकतो. त्याची जाहीर चर्चा होऊ शकत नाही. मात्र तरी माध्यमात जी उथळ चर्चा चालते, ती मोठी मनोरंजक असते.
हेरगिरी व तत्सम कारवाया ही अतिशय निर्दय बाब असते. त्यांना माणुसकी वा समाजाचे नित्यनियम लागू होत नाहीत. भावनांना तिथे स्थान नसते. नात्यागोत्यांना अर्थ नसतो. म्हणूनच सामान्य घटनांची जशी जाहीर चर्चा, वादविवाद होतात तशी अशा गोष्टींची चर्चा होऊ शकत नाही. माध्यमातून बौद्धिक चर्चा रंगवणार्‍यांना या वस्तुस्थितीचा गंध नसतो. म्हणून कुठल्याही विषयावर वादंग माजवले जाते पण त्यातून काहीही हाती लागत नाही, की कुठल्या विषयाचा निचरा होत नाही. म्हणूनच झहीर व कुलभूषण यांच्यातला संबंध भारतात कुठे चर्चिला गेला नाही. झहीर हा पाक ‘कुल’भूषण आहे, त्याचाही दोनचार दिवसात कुठे उल्लेख झाला नाही. तशी आपण अपेक्षाही करू नये. ज्यांना राजकीय गुपिते, परराष्ट्र संबंध, त्यातल्या खाचाखोचा ठाऊक नाहीत, त्यांना यातली गुंतागुंत कशी उलगडू शकते? येमेनमधून भारत सरकारने हजारभर नागरिकांची मुक्तता केली. त्यात 43 देशांचे नागरिक होते पण त्याचे इथे कौतुक होऊ शकले नाही. कारण भारतीय माध्यमे व शहाणे जनरल व्ही. के. सिंग यांची टवाळी करण्यात गर्क होती. त्यापैकी कोणाला या निवृत्त सेनापतीने येमेनच्या आखातामध्ये युद्धजन्य स्थितीत नागरिकांची सुखरूप मुक्तता करण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला त्याचेही भान नव्हते तर त्यांच्याकडून कुठल्या शहाणपणाची अपेक्षा करायची? त्यातली गुंतागुंत यांना कोण समाजावू शकेल? त्यांना झहीरमधला पाक ‘कुल’भूषण ओळखता येत नाही वा त्याच्या बेपत्ता होण्यातला डावपेचही उमजू शकत नाही. असे लोक सनसनाटी खूप माजवू शकतात पण त्यांच्यापाशी गोष्ट नसते की तथ्य नसते. नुसतेच फुगे फुगवले जातात. भावना आणि कर्तव्याचा गोंधळ घातला जातो. साध्य काहीच होत नाही. म्हणूनच कोणाला पाक कुलभूषणाची आठवण झाली नाही, की त्याच्या भवितव्याचा प्रश्न पडलेला नाही.
- भाऊ तोरसेकर 
९७०२१३४६२४ 
साप्ताहिक 'चपराक', पुणे 

1 comment:

  1. हा लेख वाचल्यावर इतके दिवस वृत्तवाहिनीवर या बातमीचा गोंधळ पहात होतो याची जाणीव झाली. बातमी मागची बातमी समजण्यासाठी वृत्तवाहिनीच सर्वस्व आहे या भ्रमातून लोकांनी बाहेर पडावे आणि चपराक मधील भाऊंचे लेख वाचावे असे मला वाटते. एखाद्या महत्वाच्या घटनेवरून वृत्तवाहिनीवर गोंधळ उडऊन दिला जातो तेव्हा सहज मनात येते, की चपराक मध्ये भाऊंचा लेख येईल तेव्हा बातमी मागची बातमी समजेलच. छापील माध्यमांचे हेच यश आहे. ते टिकवण्याचा मोठा वाटा चपराक वृत्त समूहाचा आहे.

    ReplyDelete