Thursday, July 2, 2015

‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या पुस्तकाची परखड चिकित्सा करणारे पुस्तक

- कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट
लेखक : भाऊ तोरसेकर
प्रकाशक : ‘चपराक प्रकाशन’पुणे (7057292092)
सांस्कृतिक समृद्धीसाठी कार्यरत असलेल्या आणि मराठी मासिकाच्या परंपरेत मोठे योगदान देणार्‍या ‘अंतर्नाद’ मासिकाच्या जुलै 2015 च्या अंकात ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकाचे परीक्षण आले आहे. संपादक भानू काळे आणि हे परीक्षण लिहिणारे महाराष्ट्रातील विख्यात वक्ते आणि लेखक, सन्मित्र प्रा. मिलिंद जोशी यांचे आभार. 

 1995 साली महाराष्ट्रात सत्तांतर घडले त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत साडेचार दशकांची कॉंग्रेसची सत्ता संपुष्टात आली. युतीचे राज्य आले. ‘ग्रंथाली’तर्फे ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुहास पळशीकर आणि राजेंद्र व्होरा या दोन प्राध्यापकांनी हे पुस्तक लिहिले. ‘ग्रंथाली’च्या वतीने या पुस्तकाची ‘समकालीन राजकारणावरील अभ्यासपूर्ण व खळबळजनक ग्रंथ. तो वाचायला रोचक आहे आणि संग्रहालाही उपयुक्त आहे’ अशी जाहिरातही करण्यात आली. प्रत्यक्षात या पुस्तकात अनेक चुकीचे संदर्भ आहेत हे जाणवल्यानंतर पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लेखकद्वयींशी आणि प्रकाशकांशी पत्रव्यवहारही केला. त्यावर प्रकाशकांनी ‘आपण लेखकांना लिहिलेल्या पत्राची प्रत वाचून थक्क झालो. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधून पुढे काय करायचे ते ठरवतो आणि कळवतो’ असे पत्राद्वारे सांगितले. तर लेखकांनी ‘तुमची आणि आमची यापूर्वीच ओळख झाली असती तर किती बरे झाले असते! हे पुस्तक आम्ही तुम्हाला प्रकाशन होण्यापूर्वीच दाखविले असते परंतु ते होणे नव्हते. असो. तुम्ही सहा पाने भरून तुम्हाला खटकणार्‍या आणि न पटणार्‍या मुद्यांची जंत्री दिली आहे. ती पडताळून पाहणे, त्याबाबत आमचे काय म्हणणे आहे हे ठरविणे यासाठी काही दिवस लागतील. तुमच्या पत्राची गंभीरपूर्वक दखल घेत आहोत,‘ अशा आशयाचे पत्र पाठवले.
या पुस्तकाची कौतुकाची परीक्षणे सर्वत्र छापून आली. ‘पुढच्या आवृत्तीत चुकांची दुरूस्ती करण्यात येईल’ असेही लेखक आणि प्रकाशकांच्या वतीने सांगण्यात आले. मे 1997च्या सुमारास ‘महाराष्टचतील सत्तांतर’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती बाजारात आली. भाऊ तोरसेकरांनी ती पाहिली. त्यात चुकांची पुनरावृत्ती होती. या पुस्तकामुळे वाचकांची दिशाभूल आणि बुद्धिभेद झाला असे मानणार्‍या भाऊ तोरसेकरांनी ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकात मुद्देसूद, पुराव्यासह या पुस्तकाची परखड चिकित्सा केली आहे.
मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात सडेतोड आणि परखड राजकीय  विश्‍लेषक म्हणून स्वतंत्र ओळख असलेले भाऊ तोरसेकर गेली शेहेचाळीस वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’तून त्यांनी पत्रकारितेची सुरूवात केली. अनेक दैनिकांत आणि साप्ताहिकांत त्यांनी उपसंपादक आणि स्तंभलेखक म्हणून लेखन केले. श्री, ब्लिट्झ, चित्रलेखा, विवेक, भूपूत्र या साप्ताहिकांत तसेच दै. सकाळ, नवशक्ती, आपला वार्ताहर अशा दैनिकांत त्यांनी पत्रकारिता केली. जनशक्ती, नवनगर या दैनिकांचे आरंभीचे संपादक असलेल्या तोरसेकरांचे आजवर दहा हजारांपेक्षा जास्त सामाजिक, राजकीय लेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘कोरी पाटी’, ‘ऊठ वेड्या, तोड बेड्या’, ‘मोदीच का?‘ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांचे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट‘ हे पुस्तक म्हणजे मतभेदाचे रूपांतर मनभेदात न होऊ देता प्रतिवाद कसा करावा  याचे उत्तम उदाहरण आहे.
महाराष्ट्राच्या सत्तांतराच्या प्रक्रियेत अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार्‍या आणि राजकारणाला कलाटणी देणार्‍या अनेक घटना आहेत. त्याची माहिती अथवा संदर्भ ‘महाराष्ट्रातील सत्तांतर‘ या पुस्तकात नाही. उदाहरणार्थ, शालिनीताई पाटील यांची मराठा मुख्यमंत्री हवा म्हणून झालेली नाईकविरोधी मोहिम (1973), बाळासाहेब देसाईंचा मंत्रीमंडळातून राजीनामा. पी. के. सावंत, राजारामबापू पाटलांना अर्धचंद्र, तुळशीदास जाधव, आनंदराव चव्हाण यांची यशवंतराव विरोधी खुली मोहिम (70-74), शंकराव चव्हाणांच्या मंत्रीमंडळातून वसंतदादांना अर्धचंद्र, 1960पासून यशवंतरावांनी विरोधी नेत्यांना कॉंग्रेसमध्ये आणण्याचा लावलेला सपाटा, लाटेच्या राजकारणाने मोडून पडलेली कॉंग्रेस संघटना आणि त्यांनी टाळलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, मुंबईतील ऐतिहासिक गिरणीसंप आणि त्यानंतर शिवसेनेला मिळालेली पालिकेतील सत्ता, औरंगाबाद महापालिकेत सेनेचा दणदणीत विजय, 1991 साली पवारविरोधात चार मंत्र्यांनी पुकारलेले बंड, शहाबानू निकाल आणि रूपकुंवर सतीचे वादळ यांकडेही तोरसेकरांनी लक्ष वेधले आहे. ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ या पुस्तकात लेखकांनी ‘1985च्या राजवस्त्रविरोधी आंदोलनाच्या निमित्ताने अल्पकाळ शरद जोशी, दत्ता सामंत आणि बाळासाहेब ठाकरे एकत्र आले होते’ असे म्हटले आहे. ते कसे चुकीचे आहे हे देखील तोरसेकरांनी दाखवून दिले आहे.
इतिहास म्हणजे केवळ घटना, प्रसंगांची जंत्री नसते. ते पुढच्या अनेक पिढ्यांसाठीचे संचित असते. त्यामुळे इतिहास कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता त्रयस्थपणे, तटस्थपणे आणि निःपक्षपातीपणे मांडला गेला पाहिजे. अनेकदा उपलब्ध साधने, अभ्यासाच्या मर्यादा आणि व्यक्तीचा आवाका यांमुळे इतिहासलेखनाला मर्यादा येतात. चुकाही राहून जातात पण त्या निदर्शनास आणून दिल्यानंतर दुरूस्त करणे महत्त्वाचे असते. अन्यथा चुकीच्याच गोष्टी पुढील अभ्यासकांपर्यंत जातात. असे घडू नये यासाठी भाऊ तोरसेकरांनी हा लेखनप्रपंच केला आहे. आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.
- कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट
लेखक : भाऊ तोरसेकर
प्रकाशक : ‘चपराक प्रकाशन’पुणे (7057292092)
पृष्ठे :148, किंमत : 150 रू.

Wednesday, July 1, 2015

भंपक नेमाडे

'साहित्य चपराक' मासिकाच्या जुलै २०१५ अंकातील उमेश सणस यांचा हा विशेष लेख अवश्य वाचा.


मराठीमध्ये सर्वाधिक कंटाळवाण्या कादंबर्‍या कोणी लिहिल्या आहेत, या प्रश्‍नाचे उत्तर अगदी सोपे आहे. मराठीतील सर्वात कंटाळवाण्या कादंबर्‍या या भालचंद्र नेमाड्यांच्या आहेत. नव्या पिढीतील कोणत्याही मुलाला भालचंद्र नेमाड्यांची कोणतीही कादंबरी वाचावयास दिली तरी 20 पानांच्यापुढे ती कादंबरी वाचणे शक्य नाही. त्यांच्या कादंबर्‍या जेवढ्या कंटाळवाण्या आहेत तेवढीच त्यांची सार्वजनिक जीवनातील वक्तव्येही आकर्षक असतात.
भालचंद्र नेमाडे हे मराठी साहित्यात कादंबरीकार म्हणून परिचित आहेत. ‘बिढार,’ ‘कोसला’ आणि अगदी अलीकडची म्हणजे ‘हिंदू जगण्याची समृध्द अडगळ’ या कादंबर्‍यामध्ये मराठी वाचक नेमाड्यांना कादंबरीकार म्हणून ओळखतात. त्यांची ओळख कादंबरीकार म्हणून असली तरी निरस, बोजड व अर्थहीन कादंबर्‍यामुळे मराठी कादंबरीची फारशी प्रगती झाली असे म्हणता येणार नाही. त्यांच्या या अनाकर्षक कादंबर्‍यामुळे उलट मराठी वाचक मराठी कादंबरीपासून दूर गेला असं म्हणायलाही हरकत नाही.
नेमाड्यांची कुठलीही कादंबरी संपूर्ण वाचणारा वाचक आजच्या पिढीतच नव्हे तर यापुर्वीच्या पिढीतही दुर्मिळ म्हणावा लागेल. नेमाड्यांच्या कादंबर्‍या वाचवत नाहीत. त्यांच्या कादंबर्‍या अत्यंत कंटाळवाण्या आहेत. कुठल्याही निर्मात्यानं नेमाड्यांच्या कादंबर्‍यावर चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न आजतागायत केला नाही. नेमाड्यांच्या कादंबर्‍यांना कथाच नसते, तेव्हा निर्माते चित्रपट कोठून निर्माण करणार? नेमाड्यांच्या कादंबर्‍यावर नाटकं झाली नाहीत. नेमाड्यांच्या कादंबर्‍या दूरदर्शन निर्मात्यांनी विचारात घेतल्या नाहीत. सशक्त कलाकृती ही विविध माध्यमात फिरत राहते. नेमाड्यांच्या कादंबर्‍यांबद्दल असं होत नाही. नेमाड्यांच्या एखाद्या कादंबरीवर चित्रपट काढावयाचा म्हटलं तर नेमकं काय दाखवायचं हा प्रश्‍न आहे. तीच गोष्ट दूरदर्शनवर एखादी मालिका काढायची म्हटली तरी निर्माण होवू शकते.
अशा कादंबर्‍या लिहूनही नेमाड्यांना कादंबरीकार म्हणून समीक्षकांनी गौरवले आहे. समीक्षकांची मतं काही असतील ती असू देत, पण नेमाड्यांच्या कादंबर्‍या आजच्या पिढीत कोणी वाचत नाही हे सत्य स्वीकारायला हरकत नाही. नेमाड्यांना स्वत:ला याची जाणीव आहे का नाही हे माहीत नाही. फार मोठी साहित्यनिर्मिती न करताही नेमाडे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिले. कादंबरीकार म्हणून अलीकडे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असला तरी नेमाड्यांच्या कादंबर्‍या फारश्या गांभिर्याने घ्याव्यात अशातला भाग नाही. प्राध्यापक नायक असलेल्या नेमाड्यांच्या प्रत्येक कादंबरीमधली निरस चर्चा, कंटाळवाणे वातावरण यामुळं त्यांच्या कादंबर्‍या वाचकाला नेमकं काय देवून जातात हा भला मोठा प्रश्‍न निर्माण होतो.
 काही कलाकृती या सर्वकालीन कलाकृती असतात. प्रत्येक पिढीतील वाचक त्याचा आनंद घेवू शकतात. असा प्रकार नेमाड्यांच्या कादंबर्‍याच्या बाबतीत कधीही झाला नाही. नेमाड्यांच्या कादंबर्‍या आवडणारी एकच पिढी होती. प्राध्यापक फडक्यांच्या खोट्या, ओढून ताणून तयार केलेल्या प्रेमकथांनी कंटाळलेला वाचकवर्ग काहीतरी नवीन शोधत होता. वि. स. खांडेकराच्या अतेरिकी ध्येयवादाचा मराठी वाचकांना त्रास होवू लागला होता. अशावेळी भालचंद्र नेमाड्यांनी लिहिलेल्या कादंबर्‍यांना तत्कालीन वाचकांकडून थोडाफार प्रतिसाद मिळाला इतकेच पण सर्वकालीन यशस्वी कलाकृती मराठी साहित्याला देण्यात नेमाडे अयशस्वी ठरले. फार गाजावाजा करून आलेली त्यांची ‘हिंदू जगण्याची समृध्द अडगळ’ ही कादंबरी मराठी कादंबरी विश्‍वातली एक ‘अडगळ’ ठरावी इतकी रसहानी करणारी आहे.        
 नेमाडे हे कादंबरीकार म्हणून सामान्य मराठी वाचकाला परिचित आहेत ते असे. त्यांच्या कादंबर्‍या कोणी वाचल्या नाहीत. त्यांच्या कादंबर्‍यावर चित्रपट, मालिका अगर नाटके निघाली नाहीत, असे कंटाळवाणे कादंबरीकार अशी नेमाड्यांची ओळख मराठी साहित्यात सर्वकाळ राहील. मात्र सार्वजनिक जीवनात सातत्यानं चर्चा होईल अशी विधानं करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. साहित्य संमेलनाबद्दलची त्यांची मते सर्वश्रुत आहेत.
गेल्या 25 वर्षात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही त्यापेक्षा अधिक प्रसिद्धी भालचंद्र नेमाड्यांना मिळाली. ते दरवर्षी साहित्य संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर साहित्य संमेलनाबद्दलची आपली मतं प्रगट करतात. ‘साहित्य संमेलनाचा साहित्याला काहीच उपयोग नाही, साहित्य संमेलन हा रिकामटेकड्या लोकांचा उद्योग आहे,’ अशी सहजी विधाने करून भालचंद्र नेमाडे खळबळ उडवून देतात. भालचंद्र नेमाड्यांच्या या योगदानाचा विचार मात्र मराठी साहित्याला जरूर करावा लागेल. भालचंद्र नेमाडे सार्वजनिक जीवनात जी विधान करतात त्यामुळे साहित्य, सांस्कृतिक व मराठी जगतात त्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा सुरू होते हे त्यांचं कौशल्य अत्यंत वादातीत म्हटलं पाहिजे. भाषा जिवंत रहावी असं वाटत असेल तर त्या भाषेत सतत वाद, संवाद, प्रतिवाद झाले पाहिजेत, नवी मतं मांडली गेली पाहिजेत आणि काहीतरी वेगळ्या विषयाची मांडणी केली गेली पाहिजे! हे काम गेली काही वर्ष नेमाड्यांच्या विधानांमुळं होत आहे, हे निश्‍चित.
साहित्य संमेलनांच मराठी भाषेसाठी असलेलं योगदान फारसं चांगलं नाही. साहित्य संमेलनांनी मराठी साहित्याला फार काही दिलं अशातलाही भाग नाही. साहित्य संमेलन म्हणजे ‘बैलबाजार’ आहे, असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणानं म्हटलेलं होतं. ते अगदी खरंही आहे.  शिवसेनाप्रमुखांच्या या विधानाला एकाही मराठी साहित्यिकाने विरोध केला नाही, याचं महत्त्वाचं कारण बाळासाहेब ठाकरे यांचं हे विधान सर्व साहित्यिकांना मान्य होतं एवढाच आहे. अशा सर्व परिस्थितीत भालचंद्र नेमाड्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल व्यक्त केलेली मतं गांभिर्यानं घ्यायला हरकत नाही. भालचंद्र नेमाडे हे वेळोवेळी विविध विषयांवर अशा प्रकारची मत व्यक्त करतात आणि त्यामुळं भालचंद्र नेमाडे चर्चेत राहतात.
एखाद्या कादंबरीकारानं बोलायचं तर स्वत:च्या कलाकृतीतून बोललं पाहिजे, कादंबरीकाराची कलाकृती बोलली पाहिजे, असं अभिप्रेत आहे. भालचंद्र नेमाडे हे त्यांच्या कादंबरीतून फारसं बोलत नाहीत. त्यांच्या कादंबर्‍या आजच्या पिढीत कोणी वाचत नाही. त्यामुळं त्यांनी कादंबरीतून बोलायचं ठरवलं तरी ते पोहोचणार कोणापर्यंत हा फार मोठा प्रश्‍न आहे. चांगल्या लेखकाच सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की तो त्याच्या कलाकृतीतून बोलत असतो. त्याची कलाकृती त्याला काय म्हणायचंय ते सांगत असते. नेमाड्यांच्या कादंबर्‍यांनी त्यांना काय म्हणायचंय ते कधीच सांगितलं नाही. नेमाड्यांच्या कादंबर्‍यातून त्यांना जे काही सांगायचं, ते लोकांपर्यंत फारसं प्रभाविपणानं कधी पोहोचलंही नाही. मात्र सार्वजनिक व्यासपीठावर नेमाडे जेही बोलले त्याच्या अनुषंगानं अनेकदा चर्चा झाल्या, अनेकदा लोकानी वाद केले, संवादही झाले, प्रतिवादही झाले. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की, काही वेळा नेमाड्यांना गांभीर्यानंही घ्यावं लागलं.
अलीकडं मात्र नेमाडे यांनी मराठी माणसाचा उपमर्द करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी विधाने करून चर्चेत राहण्यात नेमाडेंना गंमत वाटत असेल पण त्यामुळे मराठी समुहाचा अपमान होत असेल तर, नेमाडे काय बोलतात हे त्यांना समजावून सांगावे लागेल. सवंग व उथळ विधानांमुळं लोकप्रियता मिळत असेलही पण तेवढ्यासाठी सतत तशीच विधाने करणे चांगले नाही.
 कलाकार म्हणून, लेखक म्हणून, बोलणारा पण साहित्यकृतीद्वारे न बोलू शकणारा लेखक म्हणून भालचंद्र नेमाड्यांचं नाव घ्यावं लागेल. पण साहित्यकृतीतून न बोलताही, त्या बाहेरील व्यासपीठावर बोलल्यानंतरही ज्याच्या बोलण्याचा गांभिर्यानं विचार करावा लागतो, असे लेखक म्हणजे भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाड्यांचे हे एक वैशिष्ट्य मान्य केलं पाहिजे. नेमाडे जे बोलतात, त्यापासून ते कधी दूर होत नाहीत. म्हणजेच साहित्य संमेलनांबद्दल त्यांनी जे मत व्यक्त केलं, त्या मतापासून नेमाडे कधी ढळले नाहीत. नेमाड्यांना साहित्य संमेलनाच्या एखाद्या कार्यक्रमास बोलावलं किंवा साहित्य संमेलनात त्यांना मोठा सन्मान दिला तरी नेमाडे बदलतील असं आजच्या घडीला वाटत नाही. स्वत:च्या मताशी व विचारांशी ठाम राहणं हे भल्याभल्यांना जमत नाही. नेमाडे त्याबाबतीत मात्र ठाम आहेत. त्यांनी आपले विचार कधी बदलले नाहीत. ही गोष्ट आवर्जून मान्य करावी लागेल.
 इंग्रजी भाषेचे प्राध्यापक म्हणून नेमाडे अनेक वर्षे काम करीत होते. मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळा म्हणजे खाटीकखाने आहेत, असं जाहीरपणांनं बोलायला नेमाडे कचरत नाहीत. इंग्रजी माध्यमाच्या शाळा मराठी संस्कृतीवर आक्रमण करतात, असाही एक आरोप नेमाड्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर केला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि इंग्रजी माध्यमांची संस्कृती रूजविणारे कुणी नेमाड्यांच्या विरोधात बोलायला पुढे आले नाहीत. इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालविणार्‍यांना नेमाड्यांचे विचार बरोबर आहेत की चूक आहेत, हे सांगावेसे वाटत नाहीत पण मराठी भाषा आणि संस्कृती मोठी व्हावी यासाठी विचारमंथन करणार्‍या प्रत्येकाला त्यांच्या या विधानाचा गांभिर्याने विचार करणं भाग पडतं.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून दिलं जाणारं शिक्षण, या शाळांमधली संस्कृती, या शाळांमध्ये साजरे होणारे सण, या शाळांमधले उत्सव हे सर्व मराठी संस्कृतीपासून दूर जात आहे, ही गोष्ट खरीच आहे. ही गोष्ट अत्यंत प्रभावीपणानं आपल्या एखाद्या कादंबरीत नेमाड्यांनी मांडली असती, तर त्याचं स्वागत फार चांगलं करता आलं असतं. पण नेमाड्यांना स्वत:च्या कांदबरीत काहीच मांडता येत नाही. पानामागून पानं कंटाळवाण्या भाषेत लिहीणं यात नेमाड्यांइतका हातखंडा लेखक नाही आणि अत्यंत मोजक्या शब्दात सार्वजनिक व्यासपीठावर आपला विषय लोकांपर्यत पोहोचवणं यातही नेमाड्यांइतका चतुर संभाषक नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. इंग्रजी माध्यमांच्या शाळांद्दल नेमाड्यांनी केलेली विधानं गांभीर्यानं घेवून त्या अनुषंगानं त्यावर चर्चा झाली पाहिजे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळं मराठी संस्कृतीवर अतिक्रमण झालं का? हा विचाराचा मुद्दा आहे. मराठी भाषा व संस्कृती ही कुणाच्या आक्रमणानं कधी दबलेली नाही पण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा हा अडथळा ठरू पाहतात, ही गोष्ट नाकारण्यात अर्थ नाही. भालचंद्र नेमाडे हे सार्वजनिक व्यासपीठावरून असे सारखे बोलतात, त्यांचं बोलणं काही वेळा विचारात घ्यावं असं असतं.
मध्यंतरी नेमाड्यांनी पुण्यामध्ये येवून, ‘‘ओळख टिकवण्याच्या संघर्षामुळं व्यवस्थेचा चुराडा झाला’’, असं विधान केलं. आपल्याकडे राष्ट्रवादाचा अतिरेक वाढत चालला आहे. फक्त आपलीच ओळख टिकावी यासाठी प्रत्येकजण संघर्ष करत आहे आणि त्यामुळंच व्यवस्थेचा चुराडा होत आहे, असं नेमाड्यांनी स प महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव समारंभात जाहीरपणानं सांगितलं. ओळख टिकविण्याची धडपड ही प्रत्येक सजीवाची त्याच्या जन्मापासून अंतापर्यत चालू असते. स्वत:च्या ओळख टिकविण्याच्या संघर्षामुळं तो समाज, तो समूह, ती भाषा समृद्ध होत असते. ओळख टिकविण्याच्या संघर्षामुळं व्यवस्थेचा चुराडा होतो. हे नेमाड्यांनी कोठून शोधून काढलं हे माहिती नाही.
नेमाडे हे प्राध्यापक आहेत. अर्धवट अभ्यास करून अर्धवट विधानं करण्याची त्यामुळं बहुदा त्यांना सवय असावी. ओळख टिकविण्याच्या संघर्षामुळं ती ती भाषा समृद्ध झालेली आहे. इंग्रज जगभर पोहोचले. इंग्रजांनी स्वत:ची ओळख टिकवणं आणि विस्तृत करणं यावर भर दिला आणि इंग्रजी भाषा समृद्ध झाली. स्वत:ची ओळख पटल्यानंतर कालीदासांसारखा कवी हा महाकवी झाला. स्वत:ची ओळख टिकविण्याच्या संघर्षातून वाल्मिकीचं रामायण निर्माण झालं, ओळख टिकविण्याच्या संघर्षामुळं हिंदवी स्वराज्य सतराव्या शतकाचं आपल्याला पहायला मिळालं, हा सारा इतिहास समोर असताना ओळख टिकविण्याच्या संघर्षामुळं व्यवस्थेचा चुराडा होतो, असं नेमाडे कशाच्या आधारे म्हणतात, हे समजून येत नाही. इतिहासाचा अर्धवट अभ्यास, समाजशास्त्राचं तोकडं असलेलं ज्ञान आणि प्राध्यापकी जीवनाशिवाय बाहेरच्या जगाचा नसलेला अनुभव यामुळं अशाप्रकारची अर्धवट विधानं नेमाड्यांकडून होत असतात, ही गोष्ट तर स्पष्ट आहे.
आत्तापर्यंत नेमाड्यांची विधानं अनेकदा फारशी गांभिर्यानं घेतली जात नव्हती. नेमाडे विधानं करतात त्यावरून चर्चा होतात, वाद होतात, चहाच्या प्याल्यातली वादळंही होतात. हे मराठी साहित्य जगताला माहिती होतं. पण त्यांचा विचार गंभीरपणाने करण्याची गरज नाही, असं नेमाड्यांच्या अनेक समर्थकांनाही वाटत होतं. पण नेमाड्यांना भारतीय साहित्यातला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आत्तापर्यंत प्राध्यापक म्हणून त्यांनी व्यक्त केलेली अर्धवट मतं, त्यांच्या अर्धवट अभ्यासातून आली आहेत असं समजून त्याकडं दुर्लक्ष केलं जात होतं. त्यांच्या कादंबर्‍या कंटाळवाण्या असल्यामुळे,त्या फारश्या विचारात घेतल्या जात नसल्यामुळं नेमाड्यांची इतर मतही फारसं कोणी विचारात घेत नव्हतं. मात्र आता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यामुळं त्यांची मतं गांभिर्याने घेतली जाताहेत. अशावेळी भालचंद्र नेमाड्यांनी स्वत:ही जबाबदारीनं विधानं करण्याची गरज आहे.
नेमाड्यांनी स प महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवात आणखी एक विधान केलं. मराठा जात ही इंग्रजांची निर्मिती आहे हा शोध त्यांनी नेमका कुठं लावला हे समजून येत नाही. नेमाडे नेमके असं म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाचा विषय सध्या चर्चेत आहे. 1901 पूर्वी मराठा अशी जात नव्हती. सर्वजण कुणबी म्हणजे शेतकरी होते. त्यावेळी ब्राह्मणी राष्ट्रवादाचा उदय झाला. वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या नेत्यांनी राष्ट्रवाद मांडला होता. त्याला अटकाव करण्यासाठी मराठा जात तयार झाली, हे सगळे इंग्रजांनी केले. जाट समाजाचेही असेच आहे.’’ नेमाड्यांच्या या अभ्यासाशी इतिहासाचा संबध नाही. त्यांच्या या विधानाशी समाजशास्त्राचा संबंध नाही. त्यांनी ‘मराठा जात ही इंग्रजांची निर्मिती आहे,’ असे म्हटले आहे. याच्याशी इंग्रजांचाही संबंध नाही. आपण असं काही केलेलं आहे, हे इंग्रजांनाही माहिती नाही. ‘मराठा जात ही इंग्रजांची निर्मिती आहे’ हे संशोधन नेमाड्यांनी नेमकं कशाच्या आधारे केले हे समजून येत नाही.
ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भालचंद्र नेमाड्यांनी सलमान रश्दींच्या लेखनाबद्दल अशीच काही विधानं केली. सलमान रश्दींनी अगदी मोजक्या शब्दात नेमाड्यांचा समाचार घेतला. त्याला पुन्हा नेमाड्यांनी उत्तर दिले नाही. सलमान रश्दींच्या साहित्याबद्दल नेमाडे नेमके का बोलले, हेही समजून आलं नाही. सलमान रश्दी गप्प न बसता अंगावर आल्यानंतर नेमाड्यांनी तो विषयच बंद करून टाकला.
‘मराठा जात ही इंग्रजांची निर्मिती आहे. जाट समाज ही पण त्यांचीच निर्मिती आहे,’ हे नेमाड्यांना बहुदा इंग्रजांनी स्वप्नात येवून सांगितले असावे. इंग्रज त्यांना म्हणाले असणार ‘मराठा समाज व जाट समाजाची निर्मिती आम्ही केली आहे.’ अन्यथा त्यांना कळायला अन्य मार्ग उपलब्ध नव्हता व नाही. त्यांनी इतिहासाचे अवलोकन व अभ्यास थोडा जरी बारकाईने केला असता तरी त्यांना मराठा समाज ही इंग्रजांची निर्मिती नाही हे स्पष्टपणे समजून चुकले असते. परंतु परिपूर्ण अभ्यास करायचे, व्यासंगीपणाने प्रकट व्हायचे हे नेमाड्यांसारख्या उथळ विधानं करणार्‍या व्यक्तिला माहिती नाही. त्यातूनच त्यांची असंख्य चुकीची विधानं वेळोवेळी येतात. आत्तापर्यंत या विधानांबद्दल चर्चा झाली. काही वेळा त्या विधानांशी सहमत होण्याचा प्रसंग आला, काही वेळा त्यांची ही विधानं चुकीची आहेत, हेही लक्षात आलं. पणं त्यांची अर्धवट विधानं करण्याची सवय त्यामुळं कधीच गेली नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे मूल्यमापन करताना आज्ञापत्र लिहिणारे रामचंद्र अमात्य लिहीतात, ‘चालीस हजार पागा, साठ हजार सिलेदार व दोन लक्ष पदाति, कोट्यवधी खजाना, तैसेच उत्तम जवाहीर, सकल वस्तुज्यात संपादिल्या. शहाण्णव कुलीचे मराठीयांचा उद्धार केला. सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले. देशदुर्गादि सैन्यादि बंद नवेच निर्माण करून यकरूप अव्याहत शासन चालविले. केवल नूतन सृष्टीच निर्माण केली.’
छत्रपती शिवाजी महाराजांनी असा पराक्रम केला की शहाण्णव कुळीचे मराठ्यांचा उद्धार झाला, असा स्पष्ट उल्लेख आज्ञापत्रात होता. आज्ञापत्र लिहिणार्‍या रामचंद्र अमात्यांना आज्ञापत्र लिहिण्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची व व्यवस्थेची प्रेरणा होती. आज्ञापत्रातील बहुतांश मजकूर हा छत्रपती पे्ररणेने लिहिला गेला आहे, असेही इतिहासाचे अभ्यासक सांगतात. भालचंद्र नेमाडेंना रामचंद्रपंत अमात्याचे आज्ञापत्र वाचण्याचा प्रसंग आलेला नाही. अर्धवट इंग्रजी व अर्धवट मराठी शिक्षणातून नेमाडे आपली मतं तयार करतात व बिनदिक्कत मारतात.
नेमाडेंच्या एका धाडसाचं कौतुक करावयास हवं. आपण जे विचार मांडतो आहे त्याला इतिहासाचा, समाजशास्त्राचा काही आधार आहे का? याबद्दल कसलाही विचार ते करत नाहीत. कसलाही विचार न करता रेटून बोलण्याची नेमाडे यांची शक्ती महाराष्ट्रातल्या कोणत्याही लेखकात नाही. हे नेमाडेंचं वेगळेपण ठरायला पाहिजे. रामचंद्र अमात्याला ‘शहाण्णव कुळीचे मराठे’ हा शब्द माहिती होता. मराठा ही जात माहिती होती. याचा उल्लेख त्याने सतराव्या शतकाच्या अखेरीस आज्ञापत्रात केलेला आहे. मात्र इंग्रजांनी मराठा समाजाची निर्मिती केली, हा शोध नेमाडेंनी लावला. आपण कुठला शोध लावला याबद्दलची माहिती ब्रिटिशांनाही नाही. मात्र ही माहिती ब्रिटिशांनाही व्हावी यासाठी नेमाडे आपली मतं मांडत असतात. नेमाडे या असल्या पोरकट विचारांचं प्रदर्शन करतात व त्यातून चर्चा होतात, वाद होतात. मराठी भाषा आणि संस्कृती आहे याचं प्रत्यंतरही येतं. खरं तर या पलीकडे फारसा विचार करण्याचं कारण नसतं.
आतापर्यंत नेमाडेंच्या मताकडं व अशा सवंग विधानाकडं दुर्लक्ष केलं जायचं. नेमाडेंच्या मताकडं दुर्लक्ष होण्याचं कारण ते प्राध्यापक होते व अर्धवट वाचनावर आपली विधाने व्यक्त करीत होते. पण आता ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांना गांभिर्याने घेणे भाग आहे. नेमाडेंनी आणखी एक विधान केलं. ‘न सुटणार्‍या प्रश्‍नांची चिंता करणे हे हिंदू समाजाचे लक्षण आहे’ त्यांचे हे मत अत्यंत हास्यास्पद आहे. न सुटणार्‍या प्रश्‍नांची चिंता करत हिंदू समाज बसला असता तर हिंदू समाज काळाच्या ओघात असा टिकला नसता हे समाजशास्त्राचे अभ्यासकही मान्य करतात. जगाच्या इतिहासात अनेक प्रगत संस्कृती उदयास आल्या आणि अनेक प्रगत संस्कृती संपूनही गेल्या. सर्व बदल व परिवर्तनाला सातत्याने सामोरे जात टिकलेली संस्कृती म्हणजे हिंदू समाज आहे हे समाजशास्त्राच्या अभ्यासकांनाही मान्य करावं लागतं. हिंदू समाजानं न सुटणार्‍या प्रश्‍नांची चिंता करणं हे हिंदू समाजाचं लक्षण आहे हे खरं नव्हे. स्वत:च्या आयुष्यातील सामान्य प्रश्‍न सोडविण्यात हिंदू माणसाचा बहुतांश वेळ जात असतो. न सुटणार्‍या प्रश्‍नांची चिंता करणं हे हिंदू समाजाचं लक्षण कधीही नव्हतं आणि नाही. हेही विधान कशाच्या आधारे नेमाडेंनी केलं हे समजून येत नाही. हिंदुत्ववाद्यांना चपराक ओढण्यासाठी व समाजवाद्यांना खूष करण्याकरीता नेमाडे असे बोलत आहेत की काय, हे त्यांचं त्यांनाच माहिती. नेमाडेंच्या याही विधानाला कसलाही आणि कोणताही आधार नाही. सदरचे विधान हे इतिहास, तर्कशास्त्र आणि समाजशास्त्र याच्या कुठल्याही कसोटीत बसत नाही. अडगळीत टाकावं असं हेही विधान नेमाडेंनी केलेलं आहे.
मध्यंतरी शोभा डे नावाच्या बाईंनी मराठी चित्रपटांबद्दल काही विधानं केलीत. ‘मल्टीप्लेक्सला मराठी सिनेमे लावले तर आम्हाला दहीमिसळ खावी लागेल, वडा खावा लागेल, पॉपकार्न खाता येणार नाहीत,’ असं बोलणार्‍या डे बाई. शोभा ताई आणि नेमाडे यांच्यात नेमका काय फरक आहे, हे समजून येत नाही. नेमाडे यांनी केलेले हे विधान शोभाताईंच्या विधानाच्या जवळपास जाणारंच आहे. मराठी समाज हा गेल्या 100 वर्षात चिंताग्रस्त झालेला आहे. सुखी समाजाची कोणतीही लक्षणं या समाजात दिसत नाहीत. मराठी माणसांचं नेमाडेंनी केलेलं हे विश्‍लेषण समग्र मराठी माणसांचं नक्कीच नाही. मराठी माणसांचा नेमाडेंच्या या विधानांशी सहमत होण्याचा प्रश्‍न येत नाही. नेमाडेंच्या कादंबरीतला नायक चांगदेव पाटील हा अशा प्रकारचा होता. चांगदेव पाटील हा त्या पिढीतील मराठी माणसांचंही प्रतिनिधित्व करत नव्हता आणि आजच्या पिढीतील मराठी मुलांचं प्रतिनिधित्व चांगदेव पाटीलनं करण्याचा प्रश्‍नच येत नाही. नेमाडेंचा नायक चांगदेव पाटील हा अशा प्रकारचा चिंताग्रस्त होवून जगणारा युवक म्हणून त्याचं वर्णन कदाचित करता येईल परंतु मराठी समाजाचं असं वर्णन करणं हे सर्वथा चूक आहे.
‘मल्टिप्लेक्सला मराठी सिनेमे दाखवू नयेत, मला पॉपकार्न खात हिंदी आणि इंग्रजी सिनेमे बघता यावेत’, अशी अपेक्षा बाळगणार्‍या शोभाताई आणि ‘100 वर्षात मराठी समाज हा चिंताक्रांत झालेला आहे आणि सुखी समाजाची लक्षणं या समाजात दिसत नाहीत’, हे हास्यास्पद मत मांडणारे भालचंद्र नेमाडे यांच्यात कोणताही फरक नाही.
मराठी माणसांचा द्वेष औरंगजेबापासून अनेकांनी केला. मराठी माणसाच्या मर्यादा दाखविण्याचा प्रयत्नही अनेकांनी केला. पण मराठी संस्कृतीचा असा चुकीचा उपहास करण्याचा, उपमर्द आजतागायत कोणाकडून घडलेला नाही. मराठी समाज कधी चिंताक्रांत नव्हता आणि चिंताग्रस्तही नव्हता. सतराव्या शतकात चारही बाजूनी अंधार असताना मराठी समाजानं स्वत:चं स्वत्व, अस्तित्व दाखवून जगण्याचा संघर्ष करून भारताच्या इतिहासाला नवी दिशा दिलेली आहे. ब्रिटिशांशी शेवटपर्यत लढणारा समाज हा मराठी समाज आहे हा इतिहास भालचंद्र नेमाडेंना माहिती नसावा.
गेल्या शंभर वर्षात मराठी समाज चिंताक्रांत झाला आहे आणि सुखी समाजाची कोणतीही लक्षणं मराठी समाजात दिसत नाहीत, हे भालचंद्र नेमाडेंचं कथन तितकचं हास्यास्पद आहे. गेल्या शंभर वर्षात मराठी माणसानं अनेक क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती साधलेली आहे. जगाच्या कानाकोपर्‍यात मराठी माणूस जावून पोहोचलेला आहे. मराठी माणसाच्या कार्याला आणि कर्तृत्वाला प्रदेशाच्या, देशाच्या, प्रांताच्या आणि भाषेच्या मर्यादा राहिलेल्या नाहीत. मराठी माणसांचं कर्तृत्व विज्ञानापासून सहकारापर्यंत आणि उद्योगापासून ते कलेपर्यंत अनेक क्षेत्रामध्ये प्रकर्षानं पाहता येत असताना मराठी समाज चिंताक्रांत झालेला आहे व गेल्या 100 वर्षात सुखी समाजाचं कोणतंही लक्षण मराठी माणसांत दिसत नाही, हे भालचंद्र नेमाडे कशाच्या आधारे म्हणाताहेत, हे समजून येत नाही.
बर्‍याचदा लेखक स्वत:ची प्रतिमा आरशात पाहतो व तीच समाजाची प्रतिमा आहे, असा त्याचा भ्रम व गैरसमज होतो. भालचंद्र नेमाडेंचंही असंच झालेल असावं. गेल्या शंभर वर्षात मराठी समाज मुळीच चिंताक्रांत झालेला नाही. सत्तेचाळीस साली देशाचा स्वातंत्र्य लढा असू देत, नाहीतर महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी माणसांनं केलेलं आंदोलन असू देत. मराठी माणूस हा सतत संघर्षाला तयार आहे. मराठी मुलखावर गेल्या पंचवीस वर्षात आलेल्या दुष्काळाच्या संकटाशी झुंजारपणानं मुकाबला करणारा इथला सामान्य शेतकरी असो किंवा गिरणी कामगारांच्या संपानंतरही मुंबईमध्ये पाय रोवून उभा राहण्याचा प्रयत्न करणारा गिरणी कामगार असू देत. चिंताक्रांत जीवन मराठी माणूस कधी जगलेला नाही. स्वत:चं स्वत्व आणि स्वत:ची ओळख कायम ठेवत मराठी माणूस जीवनाला सामोरा गेलेला आहे. सुखी समाजाची कोणतीही लक्षणं मराठी समाजात नेमाडेंना दिसत नाहीत, हा त्यांच्यासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे. त्यांनी स्वत:च्या जीवनाच्या कक्षा वाढविल्या पाहिजेत. नेमाडेंची निरीक्षण शक्ती कमी आहे, हे त्यांच्या कांदबर्‍यांवरून जाणवतं. पण सध्याच्या त्यांच्या मतांवरून नेमाडे हे केवळ मराठी माणसांचा उपमर्द करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे निश्‍चित होत आहे.
मराठी माणसांचा उपमर्द औरंगजेबापासून लॉर्ड कर्झनपर्यंत अनेकांनी करण्याचा प्रयत्न केला. ज्याही वेळी मराठी माणसांचा उपमर्द करण्याचा प्रयत्न कोणी केला त्यावेळी मराठी माणसांनी त्याला खणखणीत उत्तर दिलं. मराठी समाज हा 100 वर्षात चिंताक्रांत कधीही नव्हता. कितीही मोठं संकट आलं, तरी त्या संकटाशी झुंजण्याची क्षमता आणि सामर्थ्य मराठी समुदायात 500 वर्षापूर्वी होती, आजही आहे आणि यानंतरच्या 5000 वर्षानंतरही राहील कारण मराठा समाज हा जगातल्या मोजक्या लढाऊ समाजापैकी आहे, संघर्ष करणार्‍या समाजापैकी आहे. लढणारा योद्धा आणि संघर्ष करणारा माणूस कधीही चिंताक्रांत होत नाही. मराठी समाज हा सातत्यानं लढत होता, संघर्ष करीत होता, त्यामुळं त्याला चिंताक्रांत होण्याची कोणतीच वेळ कधीच आली नाही.
युरोपियन संस्कृती आणि अमेरिकन संस्कृतीचा विचार करता याच्याशी मराठी समाजाची तुलना करता मराठी समाजात आजही कुटुंब व्यवस्था चांगल्या प्रमाणात टिकून आहे. मध्यम वर्गाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळं मराठी समाज हा एका निश्‍चित चांगल्या दिशेनं वाटचाल करतो आहे. सतत चिंता करीत राहणं हे विचारवंतांचं लक्षण आहे. एखाद्या समाजाचं अगर समूहमनाचं नव्हे. सतत चिंता करीत रहाणं, हे रोगट प्रवृत्तीच्या माणसांचं प्रतीक आहे, एखाद्या समाजमनाचं प्रतीक नाही. ज्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांचं कवच लाभलं, ज्या समाजात ज्ञानेश्‍वर तुकारामांसारखे कर्ते संत होवून गेले, तो समाज चिंताक्रांत जीवन जगण्याची शक्यता नाही आणि त्या समाजात सुखी जीवनाची कोणतीही लक्षणं नाहीत हे म्हणणंही हास्यास्पद आहे.
मराठी समाज चिंताक्रांत झालेला नाही. 100 वर्षात मराठी समाज जिद्दीनं जगण्याच्या संघर्षाला तोंड देत उभा आहे. 12 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेला मराठी समाज हा प्रगती पथावर असून मराठी समाजाची प्रगती अव्याहतपणानं होत राहील, हे सांगण्यासाठी कोणा नेमाड्यांची आवश्यकता नाही. मराठी समाजावर जेव्हाही आक्रमण झाली तेव्हा मराठी समाजाची जिद्द, पराक्रम आजवर इतिहासानं अनुभवलेला आहे. असा मराठी समाज चिंताक्रांत जीवन जगतो, हे नेमाड्यांचं कथन त्यांच्या स्वत:च्या चिंताक्रांत मानसिक अवस्थेचं वर्णन करतो. मराठी समाज हा चिंताक्रांत न होता जिद्दीनं आणि आत्मविश्‍वासानं वाटचाल करतो आहे. सुखी समाजाची असंख्य लक्षणं मराठी समाजात दिसत असताना ती नेमाड्यांना दिसत नाहीत. याचं सर्वात महत्त्वाचं कारण केवळ सवंग लोकप्रियतेसाठी नेमाडे अशी विधानं करत असतात. त्यातून नेमाड्यांना सवंग लोकप्रियता मिळेलही पण मराठी माणसाचा उपमर्द करणं योग्य नव्हे. मराठी समाजाच्या भवितव्याची आपणास काळजी आहे, असं दर्शवित मराठी समाजाबद्दल चुकीचे निष्कर्ष मांडणंही योग्य नव्हे, हेही नेमाड्यांना सांगण्याची वेळ आलेली आहे. नेमाड्यांच्या अनेक मतांबद्दल व विचारांबद्दल आत्तापर्यंत चर्चा होत राहिल्या मात्र अशाप्रकारची पोरकट विधानं नेमाडे करत राहिले तर यानंतरच्या काळात त्यांच्या कंटाळवाण्या कादंबर्‍यांकडं सहजी दुर्लक्ष आजच्या पिढीनं केलं त्याहीपेक्षा अधिक दुर्लक्ष आजची मराठी पिढी केल्याशिवाय राहणार नाही याचं भान नेमाड्यांनी ठेवायला हवं.
आपल्या मृत्यूसमयी औरंबजेबानं आपल्या मुलांना बोलावून सांगितले होते की, ‘‘मी माझ्या आयुष्यात केलेली सगळ्यात मोठी चूक म्हणजे मराठ्यांशी केलेलं युद्ध.’’ मराठ्यांशी युद्ध करून औरंगजेबाला पश्‍चाताप झाला होता. ‘मराठ्यांच्या नादाला लागू नका’ असा सल्लाही औरंबजेबाने आपल्या मृत्यूपुर्वी आपल्या मुलांना दिला होता. औरंबजेबाने आपल्या मुलांना दिलेला सल्ला हा भालचंद्र नेमाड्यांना माहिती नसावा. शोभाताईंचा तर त्यांच्याशी काहीच संबंध येत नाही, याची थोडी जरी माहिती या दोघांना असती तरी मराठी समाजाचा, मराठी माणसांचा असा उपमर्द करण्याचे धाडस त्यांनी केले नसते. मराठी माणूस संयमी आहे. मात्र त्याच्या संयमाचा अंत पाहू नका. तुमचे आजवर भरपूर कौतुक मराठी माणसाने केले आहे. पण त्याचा गैरफायदा घेवू नका. एका प्रगत समाजाचा असा उपहास करू नका. प्रेम करणारी मराठी माणसे तुम्ही अनुभवली आहेत. उपहास आणि उपमर्द केल्यानंतर पेटून उठणारा मराठी माणूस तुमच्या परिचयाचा नाही. याला आवर घातला नाही तर, महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही.

- उमेश सणस, वाई 
७३८५९९८१४७ 

Sunday, June 28, 2015

साद... सजलेल्या शब्दात रंगण्याची

  • 'सजवलेले क्षण'चे प्रकाशन करताना डावीकडून प्रल्हाद दुधाळ, 'चपराक'चे संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील, साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य प्र. चिं. शेजवलकर, समीक्षक श्रीपाल सबनीस आणि प्रसिद्ध कवी स्वप्निल पोरे.
'चपराक प्रकाशन' तर्फे कवी प्रल्हाद दुधाळ यांचा 'सजवलेले क्षण' हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. ज्येष्ठ पत्रकार आणि कवी स्वप्निल पोरे यांनी या कवितासंग्रहासाठी लिहिलेली ही प्रस्तावना.


आभाळ भरून येतं आणि काही कळण्याच्या आत पाऊस सुरू होतो. कधी तो आवेगात कोसळतो, कधी अलगद उतरतो. कवितेचंही तसंच! भाव- भावनांचा कल्लोळ दाटतो, मनाचं आभाळ भरून आल्यावर शब्द कविता बनून येतात. या शब्द सरी कधी अडखळणार्‍या, कधी तुफान बरसणार्‍या. कविता म्हणजे मनाचा हुंकार, कविता म्हणजे खोल तळातून आलेली मनाची साद. कवी प्रल्हाद दुधाळ यांची कविता तीच साद आहे. ही साद एवढी जोमदार आहे की तिचे प्रतिध्वनी आपल्याही मनात उमटत राहतात. हे प्रतिध्वनी जेवढे नादावणारे तेवढेच अस्वस्थ करणारे आहेत. याचं कारण दुधाळ यांची कविता मानवी भाव-भावना, व्यवहार, माणसाचे मन याचा विशाल पट कवेत घेऊन पुढे येते.
ही कविता जशी छंदमुक्त आहे तशी बंधमुक्तदेखील आहे. डोंगर असो अथवा दरी; मुक्त वाहणार्‍या झर्‍याला त्याची पर्वा नसते. तो पुढे पुढे वाहतच राहतो. तशी दुधाळ यांची कविता सर्वस्पर्शी असून त्यामुळेच ती प्रवाही ठरली आहे. या कवितेत प्रेमभावना आहे, विरह आहे आणि जगाचे, जगाच्या शुष्क व्यवहाराचे कठोर वास्तव सुद्धा! त्यामुळे या कवितेला अनेक पैलू मिळाले अन् ती अधिक चमकदार झालेली दिसते.
कवितेचं वरदान प्रत्येकाला लाभत नाही. ज्यांना ते मिळते ते केवळ रूढार्थाने या जगाचे. याच जगात राहून वेगळे असलेले.  अनोळखी वाटा तुडवत जाणारे वाटसरू. ही वाट सोपी नव्हे. खाचा-खळगे आणि जखमा हे या वाटांवरचे संचित. ते समंजसपणे स्वीकारावं लागतं. मनावर घाव करणारे अनुभव मांडताना कवितेत आक्रंदनाचा सूर लावून चालत नाही. विलक्षण अनुभवानांही शब्दांच्या माध्यमातून नेटके रूप द्यावे लागते. दुधाळ यांच्या कवितेला ते पुरेपूर भान आहे. म्हणूनच ही कविता सजवलेले शब्द नसून सर्वार्थाने सजलेले क्षण आहेत! आणि ते सजलेले असले तरी केवळ उत्सवात रमलेले नाहीत. रोजच्या जगण्याशी या कवितेचे नाते आहे आणि तेच या कवितेचे बलस्थान ठरावे.
कवितेसाठी मनाचे आभाळ भरून यावे लागते, पण आधी मनाचे आभाळ तर हवे! आभाळाएवढे मन ही पुढची गोष्ट. जिते-जागते शरीर आहे पण मन आहे का? समाजातील ढोंग आणि विरोधाभासाने ज्यांची मने कोमेजून जातात त्यांचा दोष नाही. मात्र मानवी जीवनाची मूल्य बिनदिक्कत पायदळी तुडवून पुढे जाणारे कोणत्या व्याख्येत बसवावेत? कवीकडे संवेदनशील मन असते आणि मनाचे आभाळ. जीवनातील असंख्य अनुभवांचा रंग त्या आभाळावर उतरतो आणि तिथेच न थांबता तो शब्दांवर पसरत जातो. एक-एक अनुभव शब्दांचे रूप लेऊन कागदावर उमटतो. ती कविता असते. हा प्रवास येथेच थांबत नाही. तो अखंड सुरू राहतो. कागदावर उमटलेली कविता रसिकांना शोधू लागते. त्याअर्थाने दुधाळ यांची कविता महत्त्वाचा टप्पा ओलांडत आहे. रसिकांच्या भावविश्‍वात स्थान मिळवण्याची ताकत शब्दांच्या या सजवलेल्या क्षणांमध्ये आहे. हा दुधाळ यांचा दुसरा काव्यसंग्रह. ‘काही असे काही तसे’ या काव्यसंग्रहानंतर सात वर्षांच्या दीर्घ कालावधीने हा काव्य संग्रह रसिक वाचकांसमोर येत आहे. अनुभवांचे वैविध्य हे ‘सजवलेले क्षण’ कविता संग्रहाचे वैशिष्ट्य ठरावे. यात मुक्त छंदातील कविता जशी भेटते तशी भुरळ पाडणारी गझलदेखील भेटते.
काही असे काही तसे,
जगलो असे जमले जसे...

हे दुधाळ यांची कविता थेट सांगून टाकते. जगलो असे जमले जसे.. या शब्दांमध्ये प्रांजळपणा आहे. तिथे लपवाछपवी नाही, मुखवटा नाही, हा सरळपणा हाच दुधाळ यांच्या कवितेचा स्थायीभाव. तत्त्वज्ञान मांडण्याचा या कवितेचा आविर्भाव नाही, मात्र सहजपणे ती कालातीत गोष्टी सांगून जाते.
काळच असतो जालीम औषध,
जीवनातील बहुसंख्य घावांवर...
असे दुधाळ लिहितात. ते सत्य कोणाला तरी नाकारता येईल का? अखंड प्रवाही काळाची स्पंदने त्यांची कविता अलगद टिपून घेते.
येतो आणि जातो
कायम न राहतो
समजून घे
काळ हा...

हे सत्य त्यांची कविता अधोरेखित करते.
लोढणे गळ्यात कुणाच्या, मी कदापि होणार नाही... असे त्यांची कविता समंजसपणे सांगते.
कधी दुष्काळाची झळ
कधी ओला धुमाकूळ
झोडपते कधी गार
बारोमास पडे मार...

हे त्यांच्या कवितेतून समोर येणारे दाहक वास्तव मनाला भिडते.
किती भगवंता
अंत हा पाहता
धाडा पर्जन्याला
भक्तासाठी...

अशी आर्त विनवणी त्यांची कविता करते.
नको धरणीशी अबोला
माणसांच्या सार्‍या चुका

हे पावसाला सांगताना अंकुराचा काय गुन्हा? हा त्यांच्या कवितेने केलेला सवाल अंत:र्मुख करून जातो.
गढूळलेले समाजजीवन विषाद देते. त्याचे अस्सल प्रतिबिंब प्रल्हाद दुधाळ यांच्या अनेक कवितांमधून उमटले आहे. त्यांच्या कवितेने लख्ख आरसा समोर धरला आहे आणि त्यात पाहणार्‍यांना तो आरसा अपार अस्वस्थता देतो, मनाला बोच लावतो.
गेलोे पालिकेत, सरकारी बाबूकडं
राशन दुकान आणि कुठं कुठं
जिथं तिथं उद्धट माणसं जोरात
मुकाट रहा नाही तर मिळे धमकी
... उगाच नाद करायचा नाय!

हे कुरूप वास्तव ही कविता मांडते. गल्ली गल्लीत, नाक्या-नाक्यावर पिसाटांचे अड्डे आकारले आहेत, हे जळजळीत सत्य त्यांची कविता सांगते.
बियाणं पेरले तयांनी अशा भेदांचे
कसे पिकणार तेथे एकतेचे मळे?

हा दुधाळ यांच्या ‘कांगावा’ कवितेतील सवाल निरूत्तर करतो. ‘कोणी’, ‘करार’ या कविताही कटू वस्तुस्थिती मांडतात.
घोटाळ्यांचा देश हीच
झाली देशाची ओळख
सूर्य असून आभाळी
झाला गच्च हा काळोख

हे भयाण वास्तव दुधाळ यांनी रोखठोक मांडले आहे. कविता म्हणजे शब्दांचा डोलारा नव्हे. त्याबद्दल लिहिताना दुधाळ म्हणतात,
उद्गार तो भावनांचा
शब्दांपलीकडच्या..
नकळत व्यक्त झालेला
शब्दांमध्येच!

कविता म्हणजे खरोखरीच शब्दांपलीकडचा उद्गार. तो उद्गार नकळत शब्दांमध्ये व्यक्त होतो हे सुद्धा तेवढेच खरे! याचे भान असल्याने दुधाळ यांच्या कवितेला कृत्रिमतेचा स्पर्श नाही. निसर्गात जशी सहजपणे फुलं उमलतात तशी ही कविता आहे. तिला स्वत:चा गंध आहे.
या कवितेला ढोंगाची चीड आहे. मानवी जीवनाचे मोल आहे आणि नितळ, पारदर्शक जीवन प्रवाहाची ओढ आहे.
न मंदिरात गेलो ना हाताळली जपमाळ
दगडात नाही, माणसात भगवंत होता...

ही माणसातील देवत्व शोधण्याची कवीची आस आहे.
वर्षामागून गेली वर्षे, स्मृतीतून पुसटले नाव...
झाली होती भेट कुठे ती, विसरून गेले गाव...

ही आत्ममग्नता त्यांच्या कवितेत कधी दिसते तर केव्हा व्यवहारातील वास्तव.
विराण हे माळ
सुकलेली झाडे
उधळते माती
वार्‍यासंगे...

हे निसर्गचित्र टिपताना त्यांच्या कवितेचा भाव त्या चित्राचे शेतकर्‍याच्या मनात उमटलेले तरंग दाखविण्याचा आहे. असे रे कसे देवा, तुझे भास पावसाचे? हा त्यांचा रोकडा सवाल आहे. त्यांच्या काही कवितांमध्ये पाऊस प्रीतिच्या भावना व्यक्त करतो. कविता हा दुधाळ यांच्या जीवनाचा अतूट भाग आहे. हे कविते, तू माझा शब्द... असे ते लिहून जातात. या कवितेला प्रतिमांचा सोस नाही. कवितेची मोजकी शब्दकळा नाद घेवून आली आहे. अक्षराची अचूक अभिव्यक्ती करणारे त्यांच्या कवितेचे शब्द आहेत.
माथेफिरूंचे राज्य, खुळ्यांची वस्ती
जगी एकटा या शहाणा कशाला?

अशा ओळींमधून अस्सल अभिव्यक्तीचा प्रत्यय येतो. जीवनात काही अधिक असणार आणि काही उणे. जीवनाकडे पाहण्याची कवीची ही समंजस भूमिका त्यांच्या कवितेतून पदोपदी जाणवते. दुधाळ यांच्या कवितेतील आत्मप्रत्यय इतरांनाही तोच अनुभव देण्याएवढा समर्थ आहे. परिपक्व अनुभवातून फुललेली ही कविता चटकन लक्ष वेधून घेते. वास्तवाला भिडतानाही ती चटका देत नाही किंवा निराशेचे गीत गात नाही. त्यांच्या कवितेचा सूर आशावादाचा आहे. जीवनातील चिरंतन मूल्यांचा ही कविता आदर करते आणि सजवलेल्या क्षणांच्या मदतीने सजलेल्या आयुष्यासाठी सांगावा धाडते. जीवनाच्या प्रवासात अनुभवांचे ओझे होऊ नये, उलट अनुभव हे दीपस्तंभ ठरावेत, ही दुधाळ यांच्या कवितेची प्रामाणिक भावना आहे. चिंता, कटुता याचे सावट क्षणांना काळवंडून टाकते, याचे भान या कवितेला आहे. म्हणूनच या कवितेचा आग्रह फुलण्याचा आणि सजण्याचा दिसतो. हे सजणे मनातून आले आहे.
जीवन म्हणजे क्षणांचा अखंड पट. तोच पट प्रल्हाद दुधाळ यांच्या कवितेने शब्दांमधून मांडला आहे. क्षण महत्त्वाचा, तो जपला पाहिजे. तो जपता आला तर जीवन जपता येईल. उत्कटता असेल तर जीवनात रंग भरेल. उत्कटता असेल तरच प्रत्येक क्षण सजवता येईल. क्षणांना सजवणारा हा कवी इतरांनाही सजवलेल्या क्षणात रंगून जाण्यासाठी साद घालतो आहे. आजचा क्षण काही क्षणात मागे पडतो. काळाच्या प्रचंड उदरात पाहता-पाहता गडप होतो. पण हे सजवलेले क्षण निसटणारे नाहीत. ते मनात घर करतील आणि त्यांचे बोल पुन: पुन्हा ऐकू येत राहतील.
-स्वप्निल पोरे
प्रसिद्ध कवी-पत्रकार
पुणे
9404232227

Sunday, June 7, 2015

ओथंबलेले घन

'साहित्य चपराक' मासिकाच्या जून २०१५ च्या अंकातील कादंबरीकार नरेंद्र नाईक यांचा विशेष लेख!
 
आईच्या शालूचा पल्लू वार्‍यावर फरफरतोय म्हणजे नेमकं काय? कशाची ही लक्षणे? सुसंस्कृत माताविष्कार असतोच मुळी अजातशत्रू. पण... आई गेेलीय तरीही तिचा पल्लू फरफरतोय हा भास का आभास? खरंच तिने अनुपम सौंदर्याची इंद्रनगरी निर्माण केली आहे की काय? घननीळ अंबरात सुंदर झळाळीचा कवडसा म्हणजे तिचे प्रतिबिंब तर नव्हे ना? कदरदान लोकांची क्रांती असतेच मुळी पालखी पदस्थ. धुंदारुन आलेल्या आकाशात चकाकीची रौनक अन् त्यात गजांत लक्ष्मीचा फरारणारा पदर ही कशाची चिन्हे आहेत? शुभ चिन्हे का अशुभ चिन्हे? साक्षात राजराजेश्‍वरांचे पदकमल वलयांकित करणारे हिमनगाचे वादळी वारे तर नव्हेत ना? कारण राजलक्ष्मीने उधळलेली खूबसुरत खुबीदार खैरात म्हणजे सृष्टीला श्रांतावणारा भावविभोर वारा. कारण नरकेसरी वनमालेचा कैफ असतोच मुळी अश्‍विनी सारखा धुंदफुंद घोडदौड करणारा.
वैराग्याचा चकाकता कंठमणी म्हणजे आई. तिचे अष्टभाव असतात रत्नजडीत कवच कुंडले. साक्षात कर्णाला आभूषित करणारे. तिच्या अधरात असतो जाई जुईचा मधाळ गंध. अन् अंत:करण असतं फुलारलेल्या चमेली सारखं गंधाळलेलं. त्यात असतात मन मोहक कुमूद अन् त्यावर लडबडलेले नाजूक साजूक सान सानुले कुसूम! हेच तर असतं तिचं अस्तित्व. चमेलीचा खुशबू आणि घर असतं दरवळणारी शेवंती. म्हणूनच तर तिचा राग असतोय अस्तचलाचा मंगलमय सौंदर्य सेतू. तिचे तादात्म्य असते सुंदर , भावविभोर परंतु ठसकेबाज. म्हणून तर ती कडाडते शेषाद्रीची महिमाशाली बिजली होऊन. तिच्या चर्मचक्षू तारतम्यात असते एक राजभूषण , रत्नजडीत चकाकणारी तर्जनी. त्यावर लुकलुकतात इवले इवले हिरवे पिवळे अन् धवलरंगी माणिक मोती! साक्षात हिरकणीचे हिरे. ती त्रिजगताची असते दार्शनिक आणि सद्वर्तनात असते विश्‍वाची धाडसी दुदुंभी. तिचा विनय असतो पारदर्शक आरसा. दया भाव असतो साक्षात स्वर्गाहूनही सुंदर. उदारता असते पूर्णाहुती. म्हणून तर ती ठरते निर्मिकांची निर्मिती. तिचे निश्‍चल नेत्र पल्लव म्हणजे सृष्टीचं विशाल सुरमा रेखलेले प्राक्तन. तिचा फिरंगी बाणा असतो राष्ट्राचा उपोद्घात. ती मातृत्व करते पादाक्रांत. म्हणून तर ठरते परम दयाळू परमानंद. मुळात आई असते महान. म्हणून तर चराचरात शिंपते प्रचुर माधुर्य. तिचा चेहरा नसतो म्लान. असतो पांथस्थ राजयोगिनी सारखा. तिचे आशीश असतात निर्मोही. निर्मिकांची निर्मिती. आई असते मुलखावरची उधळत उसळत वाहणारी अजिंक्य तटणी. तिचे अभिष्ट असतात उत्कर्षजनक. ती बिरुदवंत नसते पण बिरुदवंताची आई असते महिमाशाली. तिच्या नौबतीची रणभेरी असते कडाडणारी जोत्स्ना पण... मधुर. तिचा स्वर असतो बुलबुल पण... बिगुल. म्हणून तर ती करते रथी महारथीनांही बुनियाद. तिचे रणशिंग असतात रससिंदूर. व्यासंग असतो रसाळ. ती राजयोगाचे राजचिन्ह घेऊन रामराज्य करु इच्छिते लोकपाळ होऊन. पण विघ्न संतोषी विभुती विराजित होतात राजसिंहासनावर राजहंस होऊन. रातवा देतोय हाकाटी शिरोभूषण शुभांगीसाठी पण... साठमारी करणारे आपणच असतोत ना? आता आईनेेेेही मांडलाय सतरंज, सर्वज्ञ होऊन. शरसंधान चालू आहे शिखर संग्रामासाठी. संगराला सुधांशुही हाकाटी घालतोय , हृदयस्थ होऊन. रजनीनाथही होतोय स्वार रजनीवर , निशापती होऊन. तिच्या रुपेरी भावछटात रुपमहाल असतो सुपुत्राच्या तितिक्षेत. पण...
चांदरात फुलारतीय मोहक होऊन. हजारी मोगरा अन् मुश्कहिन्याच्या कस्तुरी घमघमाटात दिशाही दिपलीय आई नावाच्या चरणावर , भक्तसिध्द होऊन. स्वर्णकिरणेही कृतार्थ झालीत तिच्या भालचंद्र मळवटीवर. अनिवार वारा परमसुख घालतोय रंजल्या गांजल्या वांछीतांना. तत्ववेत्ता निसर्ग दुरितांचे तिमिर घालविण्यासाठी अखंड एलगार करतोय कुदरताजवळ. अल्लाही झालाय मेहरबान. कुर्निसात करतोय मातृत्वाला. माता झालीय धर्मशीळा, निर्धनाचा उद्धार करण्यासाठी. पुर्वार्ध विसरुन उत्तरार्धाला आलिंगन देण्यासाठी. कारण महाप्रसादिक महाबुध्द हसतोय शिलालेखावरुन रणफंदीची जात पाहून. गायही हंबरतेय मुलूखगिरीचे मुलूखमैदान पाहून. मूलाधार घेतलाय निशाचरांनी, स्वरुपडे रोशन करण्याचे. पण     आई असतो एक स्वयंभू शिवतारा. अशा मातेसमोर हरण्यातच पुत्राचं खरं सार्थक असतं. बेतालपणाचा ब्रह्मघोळ गिरीधारीचा गुलतुरा नसतो. रोमरंध्री मुक्तीचा दिलदार सप्तरंगी श्‍वास हवा तरच नैतिकता फुलवाती सारखी तेजाळेल , तपोधन होऊन येईल. कारण लोकोत्तर कार्य ज्ञानवंतास शािेभवंत दिसतं. सहज समाधीची मेहेरनजर भाग्योदय निर्मिल. त्यासाठी निरअहंकारी विदेह स्थितीचा ज्ञानेश्‍वर हवा, वर्धमान हवा, येशू, बौध्द हवा. तरच राजभैरवी मृत्यूंजयी ठरेल. ललाटरेषेवर मोहरणारे राजमणी ठरतील. लखलखीत घार्‍या डोळ्यांची लयलूट करता येईल. पण... दगडघाशा लोकांच्या लोचट नजरा कुठली जोशिली समरभूमी निर्माण करुन नवनिर्माणाचा ताज देईल? सत्तांतराचा सुध्दा तंबोरा फुंकावा लागतो. अन्यथा माकड उड्या त्या माकड चेष्टा बनतात. पण... कोणी सांगावं हे मार्मिक अभिधान? दानतच ती काय? उलट वानर उड्या होऊन वानर चेष्टा होईल. तारक असो वा मारक, ललकारीचा चौघडा दणदणायलाच हवा. मग बरदास्त पणाचं वटवाघूळ एखाद्या चमनबागेत पुंजाळत राहील. त्याचे चक्षू कुणाचीच इतराजी न करता दिलभर सुखेनैव पैजरा खात राहिल. तोशिश करणार्‍यांना डाळींबदाणा दाखवून हम भी कुछ कम नहीच रानमांजर ढिसफीस करेल. मग दिंडी दरवाज्यातून गुलहौशी लोकांचा गुलछबु पिपासा जहांबाज होऊन चर्पट पंजरीचा डंका पिटीत दुर्लभ छाव्याचा आव आणतील आणि गहिरीपणाची लहरी जाणीव करुन देतील. मग पिंगट डोळे घुंगट पांघरुन बलीवेदीवर बलिदान करतील. धराधिशांचे बलिदान पाहून आईचा आत्मा चू चू करेल , पृथ्वीपती नरकेसरीसाठी. साखर झोपेतील साखर सुरी म्हणजे साक्षात रक्तपिपासू खंजिरा. हे सारं अवधान म्हणजे मूर्खपणाचा महामूर्ख कळस. आई विसरलीय मग हे असंच होणार. केस संभारातून मायेनं हात फिरविणारी आई, थोपटणारी आई, अश्रूंचा प्रपात करणारी आई, वेदनेला मुक्त वाट करुन देणारी आई, आश्‍वासक आधार देणारी आई, आता सामाजिक जीवनातून बाद झालीय. त्यामुळे ही शोकांतिका.
अरे हिजड्यांनो! आईला सारं दु:ख, व्यथा, वेदना सोसाव्या लागतात, पचवाव्या लागतात. तेव्हा कुठे होते जगत जननी, विश्‍व जननी. खवळलेला दर्या कितीही उसळला तरी तिचे बांध असतात भक्कम. जिजामातेसारखे. त्यासाठी एकच शब्द हवा ‘आई’. त्यात असतात सात्विक भाव आणि सुमधुर स्वर. सिंचन करणारे जल तुषार. अवचित आभाळ भरुन यावं तसं वेदना शमविणारी आई नावाची एकच सर साक्षात जलमोती बनते आणि श्रांत करते अवघ्या सृष्टीला. त्यासाठी बाबांनो! थांबवा आई नावाची फंदफितुरी. ते पहा आकाश मार्गाने येतायेत भाव भावनांचे मोती. पिंगा घालतायेत हल्लकल्लोळ करुन. साक्षात बरसून गेलेल्या मेघमालेचे शुभ्र स्फटिक मणी अन् त्यातील जलधारा म्हणजे आई. मातृत्वाचा सुवर्णकुंभ, कांचनरुप पैलू. आईच्या हास्यात असतात विरक्त तत्वज्ञ भाव! एखाद्या योग्यासारखे. मग ते हसू कसंही असो, त्यात असतं मातृप्रितीचं आगर. माता आवेग हेच तिचं वास्तव सत्यरुप. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी रेंगाळत राहणारं रुप म्हणजे माताविष्कार. एखाद्या मंदिरातील सुगंध. आई असते फुलारलेल्या फुलांची वेली. मायेची उब देणारी अन् जीवन संगीत फुलविणारी फिलॉसॉफर...! मायेचा ओलावा, प्रितीची संततधार अभावितपणे येते तिच्या मनाच्या कोंदणातून , अवचितपणे अन् हळवेपण घेऊन. विरहाच्या वेदनेत मावळत्या रवीची सुंदर किरणे पडल्यानंतर जशी धरा फुलावी, तशी आई. एखाद्या सागरात लाटा उसळाव्यात तशी पण... पिलांच्या पंखात बळ आलं की, पाखरं उडून जात दाही दिशांना. घर मात्र रितं रितं....सुनं सुनं... पण... आई हृदयाची एक विण तालवाद्य होऊन जीवनाचा अर्थगर्भ शोधते, पिलांच्या परतण्यात. हृदयात असतो वेदनेचा उसळता सागर , डोळ्यात असतो आसवांचा महापूर. पण... पिलं सैरभैरलीत , पारध्यांच्या बाणावर. आक्रोश अन् चित्कार दंगतोय, रेखीव घननीळ अंबरबनात. तशी आईच्या सुरांनी साथ सोडलीय अन् शब्दांनी नातं तोडलं.
तिच्या काचेसारख्या सुंदर डोळ्यातून पिलांच्या पाऊल खुणा अधिकाधिक गहिर्‍या होतात. खरचं पिलं गेलीत का दिशाहीनपणे पारध्यांच्या बाणावर? दिव्य नेत्र शमलेत का? आई हृदयाची उकल खरंच काय असते? अनात्म आत्म शुध्दी म्हणजे आई. तिचा अनुग्रह म्हणजे प्रीती. प्रीती म्हणजे केवड्याच्या फुलाने आसमंताला दिलेले मुक्तदान. पश्‍चिमाते चंद्रकोरही आनंदघन होऊन बहरलेय, दिशा दिशांचे सौंदर्य दिप्तीमान झालेय, अबोलीची फुलेही लहरलीत, डेरेदार गुच्छ स्वच्छंदी बागडू लागलीत, रानावनातील पशुपक्षी अभिनिवेशाची तुतारी फुंकत एलगार करु लागलेत, सौंदर्यपूजक हिमालयही सौंदर्यावर भाळलाय, मावळतीचा सूर्यही अमित मनोहर हिरव्यागार पाचूची उधळण करतोय, नारळी पोफळीच्या बागा क्षितिजाशी तन्मय पावल्यात म्हणूनच की काय, पश्‍चिम दिशा सौंदर्य लालीची आरक्त आभा घेऊन नर्तन करु लागलीय. पक्ष्यांचा आक्रंदता स्वर मधाळ बनलाय. भिजपावसाची रिपरिप सुरु झालीय. कारण आई नावाचा आरासपानी क्षण प्रकटलाय. त्यामुळे गायी गुरांच्या गालावर हास्याची खळी उमटलीय. खरंच अंधार विरलाय. अभ्र पटलावर सुवर्णलालीमा लालबंुंद झळाळी फेकू लागलीय. तसा गुलाबी गंधीत वारा सैरभैरलाय. रंजीस जिवावर मेघमंडळ निळसर आवरण आच्छादू लागलयं. तसे बोलके डोळे श्रांतावले. दाटून आलेले विरहाचे मळभ पांगले. उष:कालाची पहाट फुलली. रविराजाची कोवळी किरणे धरेवर अंकुरली आणि आनंदघन साश्‍चर्य बागडू लागलं. का बागडणार नाही? माता आविष्कार असतोच मुळात उधाणलेला. त्यामुळेच तर घन ओथंबून आले. अथांग सागरासारखे. सागराची गाजही असते लक्षदीप. एक एक शब्द असतो तटबंदी किल्ल्याचा दिंडी दरवाजा. याच दरवाजातून हिरवेगार पाचूचे माणिक मोती आपल्या अगम्य इच्छा शक्तीचा जय मल्हार करीत उधळलेले. कोणे एके काळचे सुपुत्र. याच सुपुत्रांना शुभ चिंतन करण्यासाठी आईच्या मालवलेला डोळ्यातील तेजाळलेली बिजली चकाकते आहे. खरंच हा भास की आभास? आभास कसा असेल? आईचे दशांगुळे केस संभारात गरगरलीत. आई म्हणजे निश्‍चयाचा महामेरु. अचेतन पडलेली चकाकणारे काजवेही सचेतन संजीवन बनले. फक्त एका आई नावाच्या उद्गाराने.
आईच्या सुरातील गहिरी आर्त आणि एक पापणी भरुन आलेला थेंब विश्‍वाला श्रांतावू शकतो. ही तिची किमया. सायासा-प्रयासाने निर्मिलेली दुनिया म्हणजे पहाटेचे मंगलमय दवबिंदू अन् त्यात श्रांतावलेली भूपाळी. जणू गेंदेदार फुलातील परागकणांची टपोरे सुंदर मोती. काही फुललेली , काही गुंफलेली , काही माळलेली , फुलेच फुले म्हणजे आई. आई नावाचं कमळ पाकळी स्थित हृदय म्हणजे साक्षात फुलांनी बहरलेली फुल परडी. नव्हे गुलजार फुलांनी रेखलेलं सुंदर मन भावन विश्व.साक्षात आकाशात उधाणलेला इंद्रधनु. रंगीबेरंगी फुलांच्या वरमाला नव्हे वनमाला. धरेवर साकारलेला चांदणचुरा. शीतल चांदण्याची बरसात. खळाळणार्‍या यमुनेच्या बांधा वरील वनराई. हिरवीगार वनशोभा. अन् त्यात रेंगाळलेली आईची देखणी कांचन पावलं. काचेसारख्या ऐलतीरावर पैलतीरावर पसरलेलं विहंगम पाणीच पाणी म्हणजे मातृत्वाचा जागर. आई म्हणजे पतितांना पावन करणारा जलकुंभ. शतकानुशतके पतितांना अलंकृत करणारी गर्भश्रीमंत गुढी. पण... शिल्पकृतीने विभूषित झालेली. स्थितप्रज्ञ महात्मा गौतम बुध्दासारखी. साक्षात योगयोगेश्‍वर. म्हणून तर बासरीचा स्वर लाभलेली जणू पृथ्वीभराची अलभ्य आरती. गाभार्‍यातील घंटानाद. नादब्रह्म मुख , नितळ कांती, जणू हसरी गोकर्ण कलिका. सुराच्या दुनियेतील धवलरंगी स्फटीक. साक्षात पार्वती पती शंकर तर कधी कदंबावर उतरलेलं पुनवेचं चांदणं. काळोखात टिकणारा एक आत्मीय कलानंद. सर्वांग सुंदर बासरी. म्हणून तर संयमी. सौंदर्य उधळण करणारी मुक्तमाला. देवताधिपतींची देवता. यहा थी कहा गयी? आई नाही म्हणजे खरंच काय नाही? सृष्टीभराचा दिवा मालवलाय. नुसता बोचरा गारठा. थडथडणारा. थरारक भावस्पंदन. झावळ मावळतीकडं झुकणारं फिकट चंद्रबिंब पण... तिचे हसरे डोळे , निहायत खुश. कारण तिने दिलेत पुढल्या पिढीला बोलक्या डोळ्यांची मन मोहक लाडलाडली. कदाचित ती कुणाची कन्या पण... भविष्याची जगजननी. इवलीशी कळी पण... उद्याच फूल. एक गंधीत गुलजार फुल. म्हणजे मा!
उमलणारी खुबसुरत खुशबू. गुलाब कळीच्या रुपानं अवतरलेलं एक खुदाचं रुप. स्वरांचा धुंदफुंद खुशबू. खळाळणारे निर्झर. कडाराजीत कोसळणारे धबधबे. पर्वतराजीला आभूषित करणारे कारंजे. पण... देखणा भाव लाभलेले मुखकमल. चंद्रकोरीतला चंद्रमा. निर्व्याज प्रीती, दुनियाभराचे सुगम संगीत. जणू काचेरी दर्पण. पण... तेजस्वी जगन्नाथ. आई म्हणजे रहमदिल. मासूम प्रीत! विश्‍व भराचा मूल्यवान दागिना.भाषेचं आद्याक्षर म्हणजे आई. कधीच क्षर न होणारे अविनाशी. मनोज्ञ सत्यदर्शन. दीपार्चनाचा मंगलमय प्रकाश, पृथ्वीमोलाचं लावण्यरुप. कौतुकभरल्या शब्दांची उधळण. अन् त्यात सामावलेला अदाकारी सोहळा. प्रीतीच्या शोधात उधाणलेला प्रवाह. वात्सल्याने प्रवाहित करणारी जीवनदायिनी. केसात माळलेलं जास्वंदी फूल. अलगत पापणीत सामावलेलं नयन मनोहर रेशमी सुख. तरीही अश्रू फुलांचे अलंकार ल्यालेली रत्नजडीत व्रतस्थ आई. केसात माळलेली, महफिलीत उधळलेली अन् शवावर वाहिलेली फुले कधीच निर्माल्य होवू शकत नाहीत पण... देवत्वावर वाहिलेली निश्‍चितच निर्माल्य असतात. तेच रुप म्हणजे आई. तिच्या चरणावर टपटपलेला प्राजक्ताचा सडा जसा काय मोहरलेला गुलाबी चंद्र. अनेक सुख दु:खाच्या रेशीम धाग्यांनी गुंफलेली मोहन माळ, कातळ फोडणारा झरा, स्नेहाने जडावलेले मोती. असं सुख म्हणजे आई. पण... विझलेल्या राखेत उन्मळून पडलेला सागर. तरीही हसरा गुलाब. राज प्रासादिक देखणं रुप. धुंद गंध उधळणारं एक पराभूतांचं जीणं तरीही तिच्या प्रीतीचा मांगलिक सोहळा मुळातच देखणा असतो. जसा काय तेज:पुंज इंद्राचा ऐरावत. आयाळ लाभलेला धवलरंगी अश्‍व. अन् धीर गंभीर गर्जना पण... पहाटेला कवेत घेणारा, चिखलातल्या विरक्त पंकज कलिके सारखा. तरीही सत्ता पिपासू गोमटेश्‍वरांचें उमदं घोडं. स्वार्थार्थ हाकाटी देत नीरक्षीर ओळखण्याची अक्कल गहाण ठेवून संयम आणि सदाचाराची नीती जगाच्या वेशीवर टांगून फिरतोय , तरीही केवड्याच्या सोेनेरी पानासारखा दरळवणारा सदाबहार खुशबू म्हणजे आई. म्हणून तर देवालयात मंद समयी प्रज्वलीत होते, तेजाळते. तरीही ढेरपोट्या थोतांड्याला काय माहीत, महिमाशाली मंगलमय दीपोत्सव. गुळाचा गणपती, धर्मभ्रष्ट आणि कर्मभ्रष्ट. शून्य किमतीचा. जशी काय चिवट घोरपड. पण... आई म्हणजे आदिम सत्य. जन्मा पेक्षा कर्माने तेजाळणारी दीपिका. माणूसकीप्रधान गहिरे तत्व आणि श्रेष्ठतम भाव. देखणा हिरवागार डोंगर. पाचू माणकाच्या कोंदणात लखलखणारा गहिरा हिरा अन् टपटपणारा चाफा म्हणजे समाधिस्त संजीवन संवेदना. आतून बाहेरुन देवत्व, देशभूषण, कुलभूषण म्हणजे आई. जणू कुंतलगिरीचा वर्धमान. जसा काय सुचितेचा सदाबहार. भावविभोर आनंद सोहळा. आई म्हणजे सत्त, चित, स्वरुप. त्रिपुरसुंदरी. कैवल्यरुपी मातृउत्सवाची पर्वणी. साक्षात क्षमाली पर्व. आई म्हणजे वेदांताचे तत्वसार , भूषणभूत दीप , मेघमल्हार , विशुद्ध नामसंकीर्तन , स्वात्मसुखाचा आनंदघन सोहळा. म्हणून तर अपत्याचा कीर्तीवंत उत्कर्ष. साक्षात मूल्यात्मक आत्म तत्वाची मधुरा भक्ती. आई म्हणजे कर्मयोग , प्रेमयोग सांगणारा भगवतगीतेतील कृष्णाचा सामाजिक वेदांत. हृदयस्थ प्रज्ञा. मातृकीर्तनाचा महिमा. अभूतपूर्व क्षमाशील. साक्षात प्रचोदयात. सामाजिक निष्ठा आणि नैतिक जीवनाची प्रेरणा म्हणजे आई. ज्ञानज्ञ सौंदर्याने लडबडलेले शब्दरुप ममत्व म्हणजे आई. भिक्षांनदेहीचा आलख म्हणजे आई. साक्षात तुळसगंध. पण... शब्दही मुके झालेत, आई नावाचा ब्रम्हांड शोधता शोधता. गोडगंधीत सुधारस काही हाती लागलाच नाही. खरंच माझी भ्रमंती शमलीय का? कांचनाचं सौंदर्य वाढविणारा अलंकार, अलंकापुरी पुण्यभूमी, द्वेत अद्वेत आईचा शोध लागलाय का? आई गेलीय खरंच केवढा अनर्थ. पृथ्वीभराचा विद्ध्वंस. पाखराला परतीची तमा नसावी पण... दारात वाट पाहणारी आई असावी.तसा श्‍वेत पदर फडफडतो घननीळ् अंबरात अन्  व्याकुळ हुंदका फुटतो आईच्या प्रतिक्षेत... आ..ऽऽ ई...ऽ आ..ऽऽ ई...ऽ आ..ऽऽ ई...ऽ...

- नरेंद्र नाईक
कळमनुरी, जि. हिंगोली 
९४२१३८४००७

Tuesday, June 2, 2015

ठाले पाटलांचे वर्चस्व मराठवाडा साहित्य परिषदेवर टिकणार का?

'साहित्य चपराक' मासिकातील डॉ. भास्कर बडे यांचा विशेष लेख.… 
 
अलीकडे मराठवाड्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात गाजणारी साहित्यिक संस्था म्हणून जिच्याकडे पाहिले जाते ती म्हणजे मराठवाडा साहित्य परिषद, ‘मसाप’ होय. कोणतीही संस्था चर्चेत असते ती त्या पाठीमागे असलेल्या माणसांमुळे. तो एकमेव माणूस म्हणजे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील. मसापची निवडणूक लागणार म्हणून काहीजण दहा वर्षांपासून लंगोट लावून तयार आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत जेमतेमच मते त्यांना मिळाली होती. तर फक्त तीनच जागेच्या निवडणुका झाल्या. उर्वरीत जागा बिनविरोध निवडून आल्या. एवढे हे विरोध करणारे प्रसिद्ध!
मी तीस वर्षापूर्वी औरंगाबादला शिक्षणासाठी गेलो. मित्रमंडळींच्यासोबत त्या जुन्या चिरेबंदी घरासारख्या दिसणार्‍या खोलीतील मसापमध्ये जायचो. प्रेक्षक म्हणून. खेडेगावची ग्रामपंचायतच म्हणा ना! मोडके तोडके फर्निचर, अस्वच्छता, ‘प्रतिष्ठान’चे अंक-गठ्ठे पडलेले, जाळ्या लागलेल्या. बोर्डावर सुधीर रसाळ हे नाव वाचायचो. काही कार्यक्रमास त्या काळातील नाव असलेले लेखक येत. मी पहायचो. मनात वाटायचे, हे आपल्यासाठी नाही. ठराविक जिल्हे सोडले तर मसापची शाखा नावाचा प्रकार नव्हता. प्रा. डॉ. हृषिकेश कांबळेचा मी रूममेट. त्याच्यामुळे साहित्यिकांच्या ओळखी होऊ लागल्या. मी त्यावेळी कविता लिहायचो. अशी ही मसाप मी पाहिलेली.
जालन्याच्या एका विनाअनुदानित महाविद्यालयात नोकरीला गेलो. बिनपगारी, फुल अधिकारी! संस्थाचालक माजी आमदार. मला प्राचार्य करणार होता. गुळचट लुच्चा. तीन वर्ष विज्ञान महाविद्यालय उभे करून घेतले अन् तोंडी सांगितले, ‘तुमची नोकरी संपली.’
त्यादरम्यान मसापची निवडणूक लागली. तीस चाळीस मतपत्रिका माझ्याकडे होत्या. मला डॉ. वासुदेव मुलाटे, प्रा. नाईकवाडे, डॉ. सुधीर गव्हाणे आणि इतरांच्या पॅनलमध्ये घेतले. मी नोकरीवरून तोंडी काढलेला, पुढील नोकरीच्या शोधात आणि वरील मंडळींच्या बोलण्यात आलो. राहिलो उभा. जालना-बीड-लातूर-उस्मानाबाद या ठिकाणी मी मतदाराकडे गेलो. काही साखळ्या कळल्या. अधिक ठिकाणी प्राचार्य ठालेंचेच नाव मला सांगितले. धारूरला असाच गेलो. प्रा. फपाळ यांना भेटलो. त्यांनी स्पष्ट सांगितले, ‘तुम्ही वेळ वाया घालवू नका. इथले एकही मत तुम्हाला मिळणार नाही.’
आणि एकही मत मिळाले नाही. एकटे डॉ. सुधीर गव्हाणे प्रा. ठालेंशी संपर्कात असल्यामुळे विजयी झाले. आम्ही सपशेल  आपटलो. प्राचार्य ठालेंचा दणका आम्ही खाल्ला. नंतरच्या पाच वर्षात मी मसापशी संपर्कात राहिलो. प्राचार्य ठालेंशी संपर्क वाढवला. त्या व्यासपीठापासून दूर होतो. जवळ येता आले. त्यामुळे प्राचार्य ठालेंची कार्यशैली जवळून पाहता आली. ते बेरजेचे राजकारण करतात. साहित्यिक आणि साहित्य चळवळीतील कार्यकर्त्यांशी सरळ संपर्क ठेवतात. साहित्यिकातील नवोदितापासून वयोवृद्धापर्यंत त्यांचा दांडगा संपर्क आहे. ही त्यांची ताकत आहे. या ताकतीला तोड नाही. त्यांना हलवण्याचे वेगवेगळे प्रयोग झाले परंतु विरोधी मंडळींना अपयशच आले.
प्राचार्य ठाले रोखठोक बोलणारा तर दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस म्हणून ख्याती. अशी ही खुराड्यातील मसाप प्राचार्य ठालेंच्या ताब्यात आली. अध्यक्ष झाल्यामुळे अधिकार मिळाले आणि कामाचा उरक वाढला. निवृत्तीनंतर ठालेंनी अधिकचा वेळ मसाप उभारणीसाठी दिला. खुराड्यातील मसाप टोलेजंग इमारतीत आणली. त्यासाठी त्यांनी विश्‍वासू साथीदारांची साथ घेतली. त्यात मराठवाड्यातील राजकारणातले महत्त्वाचे नाव मधुकरअण्णा मुळे, सुधीर रसाळ, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कवठेकर, चंद्रकांत पाटील, ना. धों. महानोर, नागनाथ कोतापल्ले या आणि इतर साहित्यिकांचे सहकार्य वेळोवेळी घेतले. म्हणून आजची मसाप दिसत आहे.
मसापची स्थापना दि. 29 सप्टेंबर 1943 रोजी नांदेडला झाली. स्थापनेमागे मराठवाड्याच्या मुक्तीचा लढा लढणे, तसेच त्याच कार्यकर्त्यांनी साहित्य चळवळ चालवावी. 1943 ते 1953 या कालावधीत मसापचे कार्यालय हैद्राबादला गेले. तेरा वर्षानंतर हे कार्यालय औरंगाबादला आले. मसापच्या नावासोबत अनंत भालेराव, भगवंत देशमुख, वा. ल. कुलकर्णी, चंद्रकांत भालेराव, नरहर कुरूंदकर, सुधीर रसाळ अशी नावे आली. या मंडळींचा यशवंतराव चव्हाणांशी संपर्क आला आणि मसापचे काम जोरात सुरू झाले. चव्हाणांनी मसापसाठी रूपये दहा हजाराचे अनुदान सुरू केले. 1963 साली मसाप इमारतीची कोनशिलाही यशवंतरावांच्या हस्ते बसवण्यात आली. दरम्यान ना. धों. महानोर मसापचे अध्यक्ष झाले आणि यशवंतरावजींच्या नावे नाट्यगृह व्हावे असा ठराव झाला! परंतु काम ठप्पच होते. नंतर पुढे प्राचार्य ठाले मसापचे अध्यक्ष झाले आणि कामाचा धडाका सुरू झाला.

मसापची संमेलने
मसापचे वर्षात एक संमेलन व्हावे ही अपेक्षा होती. मात्र एकूण चार-पाच वर्षाचा बॅकलॉग राहिला होता. तो बॅकलॉग भरून काढायचा विडा प्राचार्य ठालेंनी उचलला. वर्षात दोन दोन संमेलने घेवून बॅकलॉग भरून काढला. त्यात कंधार, जालना, माजलगाव, औरंगाबाद, शिरूर, पैठण, वसमत, मुरूड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, कडा आदी ठिकाणी संमेलनाचा धडाका लावला. संमेलन ठरले की अध्यक्षाची निवड करणे आलेच. संमेलन संपले की, त्या अध्यक्षाचा प्रतिष्ठानचा विषेशांक प्रकाशित करणे अशी कामं करावीच लागली. संमेलनाची संख्या वाढली म्हणून अध्यक्षपदेही साहित्यिकांना मिळाली. त्यात भारत सासणे, बाबा भांड, कवठेकर, भास्कर चंदनशिव, गजमल माळी, देशपांडे, सुधीर रसाळ, फ. मुं. शिंदे, लक्ष्मीकांत देशमुख, सुहासिनी इर्लेकर, नागनाथ कोतापल्ले, प्रभाकर मांडे, यु. म. पठाण अशी कितीतरी नावे सांगता येतील.
या सन्माननीय संमेलनाध्यक्षांच्या नावाने प्रतिष्ठानचे विषेशांक! प्रतिष्ठानचाही खूपच बॅकलॉग होता. तो पूर्ण करण्याचे अवघड कार्य प्राचार्य ठाले सरांच्या मार्गदर्शनाखाली संपादक मंडळाने केले.

प्रतिष्ठा असलेले ‘प्रतिष्ठान’
प्रतिष्ठानमध्ये आपले साहित्य प्रकाशित व्हावे यासाठी साहित्यिक वाट पाहतात. या अंकाची प्रतिष्ठा उंचावत गेली आहे. संपादक जरी श्रीधर नांदेडकर असले तरी साहित्य निवड, विषय निवड, विशेषांक निवड चर्चेनंतर स्वत: ठाले सर जातीने पाहतात. म्हणून गुणवत्ता अबाधित आहे. प्रतिष्ठानने यापूर्वी काही विशेषांक प्रकाशित केेलेत. त्यात संत नामदेव, यशवंतराव चव्हाण, रा. रं. बोराडे विषेशांक इत्यादींचा समावेश आहे.
नंतरच्या पिढीतील साहित्यिकांच्या कथा, कविता, समीक्षांचे अंकही प्रकाशित केलेत.  संमेलने आणि प्रतिष्ठान अंकाचे प्रकाशन बरोबरीत आणून नियमितपणा सिद्ध केला. मराठी साहित्यातील दखलपात्र अंक म्हणून प्रतिष्ठानच्या अंकाकडे पाहिले जाते. अगदी परवा माजी मुख्यमंत्री मसापच्या एका कार्यक्रमात ‘मी प्रतिष्ठानचा वर्गणी भरून सभासद आहे आणि तो अंक मी वाचतो’ असे जाहीरपणे व्यासपीठावरून बोलले. इतर पुढार्‍यांचे याबाबतचे ज्ञान शून्यच. एकूण प्रतिष्ठान वाचनीय तर आहेच, त्यासोबत मराठवाड्यातील नामवंत व अभ्यासू लेखकांचे लेख या अंकात प्रकाशित केले जातात. हे वैशिष्ट्य जपण्याचे काम मसापने केले आहे. प्रतिष्ठानचा अंक छापायचा म्हणून कधीच छापला नाही. उद्देश ठरलेला, विषय ठरलेला. म्हणून प्रतिष्ठानचे सांस्कृतिक दस्तऐवजाच्या तोडीचे अंक वाचकांना दिले जातात. अंक मिळाला नाही तर तो अंक वाचक मसाप कार्यालयातून घेवून जाताना मी कित्येकवेळा हे पाहिले आहे.

लेखिका संमेलने
अध्यक्ष प्राचार्य ठालेंच्याच कालावधीत फक्त लेखिकांच्या साहित्य संमेलनाची सुरूवात करण्यात आली. असा प्रयोग नियमितपणे महाराष्ट्रात होत नसावा. मात्र मसापने हे धाडस केले. धाडस करताना लेखिकांना अध्यक्षपदे मिळायला सोपे गेले किंवा त्यांना संधी चालून आली. प्रतिष्ठानचे लेखिका विशेषांकही निघाले. यामुळे मराठवाड्यातील लेखन करणार्‍या लेखिकांची दखल वेगळेपणाने घेणे भाग पडले. औरंगाबाद, अंबेजोगाई, परभणी, बीड, माजलगाव, जालना या शहरात लेखिका संमेलने झाली. त्याच्या अध्यक्षा म्हणून रेखा बैजल, मथू सावंत, छाया महाजन, ललिता गादगे, अनुराधा वैद्य, लता मोहरीर यांची निवड केल्यामुळे त्यांना हा मान मिळाला.
लेखिका संमेलनाची वैशिष्ट्ये ठरवून घेतलेली आहेत. त्यात संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगीच फक्त परिषदेचे आणि स्थानिक पदाधिकारी व्यासपीठावर असतात. उर्वरित सर्वच कार्यक्रमात फक्त लेखिकाच असतात. शंभर टक्के लेखिकाच. हा मसापचा लेखिका पॅटर्न ठरला आहे. उद्घाटकीय पाहुणी ही नामवंत लेखिका किंवा कार्यकर्तीच असते. हे या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे.

जीवनगौरव पुरस्कार
मसापच्यावतीने गेल्या वर्षापासून मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिकाला ‘जीवनगौरव’ पुरस्कार दिला जातो. त्यात वर्ष-दोन वर्षातच तीन ज्येष्ठ साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात सुधीर रसाळ, चंद्रकांत पाटील आणि ना. धों. महानोर यांचा समावेश होता. पंचवीस हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह आणि श्रीफळाचा त्यात समावेश असतो.
असे पुरस्कार देत देतच नवीन पुरस्कारार्थी शोधून विविध साहित्य प्रकाराला पुरस्कारही दिले जातात. असे पुरस्कार आश्रयदाते शोधणे, त्या रकमा मसाप खात्यावर टाकून येणार्‍या व्याजावर साहित्य पुरस्कार देणे अशा कल्पना गेल्या दहा पंधरा वर्षात राबवल्या गेल्या. यावर्षीचे जीवनगौरव पुरस्कार जाहीर व्हायचे आहेत.

विश्‍व मराठी...
विश्‍व मराठी साहित्य संमेलनाची अफलातून कल्पना राबवण्यामागे प्राचार्य ठालेच. अगदी त्यांनी धडाकेबाज तीन साहित्य संमेलने घडवून आणली. थेट परदेशात! खूप टीका झाली. मीडियांनी बातम्यांचा रतीब लावला. त्यातल्या काही जणांना या संमेलनवारीत जायला संधी मिळाली आणि हेच मीडियावाले लागले टाळ वाजवायला.
पहिले विश्‍व साहित्य संमेलन सॅन होजे (अमेरिका) येथे दलित साहित्यिक गंगाधर पानतावणे यांच्या अध्यतेखाली झाले.
दुसरे संमेलन दुबई येथे प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
तिसरे संमेलन सिंगापूर येथे नाटककार महेश एलकुंचवार यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
चौथे संमेलन ठरले तेव्हा अखिल भारतीय मराठी महामंडळ पुणे येथे गेले आणि वांधे सुरू झाले. संमेलन टोरँटो येथे घेण्याचे ठरले. सन्माननीय अध्यक्ष म्हणून निसर्गकवी ना. धों. महानोर यांची निवडही झाली....
....आणि टोरँटोचे संमेलन गाळात रूतले. त्यातून कधी निघेल माहीत नाही. का त्याचा बॅकलॉगही ठालेंनाच पूर्ण करावा लागणार?


एक एकर जागा
मराठवाडा साहित्य परिषदेसाठी कै. अनंत भालेराव यांनी सोसायटीतून एक एकर जागा हट्टाने देण्यास भाग पाडले. म्हणून या जागेत वास्तू उभ्या राहू शकल्या. मसाप कार्यालय, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अनंतराव भालेराव भवन हे उभे करणे शक्य झाले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे उत्पन्न बर्‍यापैकी मसापला मिळते. अनंतराव भालेराव भवनाचेही उत्पन्न सुरू झाले आणि परिषदेतील बांधकामाचा काही भाग स्टेट बँकेला किरायाने दिला. तेही उत्पन्न मिळतेय. एकूण मसाप आता स्वत:च्या पायावर उभी राहिलीय. उत्पन्नाची साधने तयार झालीत. परिषदेबाहेरील चिमूटभर सतत विरोध करणार्‍यांचा उत्पन्नावर डोळा आहे. म्हणून गेल्या पाच-सहा वर्षात टीका केल्याशिवाय त्यांना निवांत झोप लागत नाही. आताही तीच मंडळी पुन्हा आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे.
याच इमारतीत मोक्याच्या ठिकाणी स्व. अनंत भालेराव आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे बसवण्यात आले. प्रतिष्ठान वेळेवर निघू लागला. साहित्य संमेलने वर्षावर आणली. निमंत्रण पत्रिकेत विविधता राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. गुणवत्तेला प्राधान्य या भावनेतून प्रत्येकाच्या वाट्याला संधी येत आहे.
साहित्य संमेलनामुळे आणि कार्यकर्त्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे मसाप खेडोपाडी पोहोचली ती अध्यक्ष ठालेंच्या काळात. त्यातही मसापने गेल्या पंचवार्षिक कालावधीत ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यामुळे मसाप लोकप्रिय होण्यास मदत झाली.

वर्धापनदिन लातूरात
कधी नव्हे ते नावीन्य घडले. मसापने अनेक कार्यक्रम औरंगाबादबाहेरच्या जिल्हा शाखांना दिले. त्यात उस्मानाबाद येथे व्याख्यानमाला, नांदेड येथेही व्याख्यान तर ज्या लातूरने मसापसाठी खूप दिले, लातूर, शिरूर ताजबंद, उदगीर, मुरूड या गावात मसापची विभागीय साहित्य संमेलने झाली.
अशा लातूर जिल्ह्याने लेखकांची पिढी घडवली आणि लेखक निर्मिती होतेय. अशा लातूर शहरात मसापचा वर्धापनदिन साजरा करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी निसर्गकवी ना. धों. महानोर प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमात भाषणासोबतच निवडक कविंचे कविसंमेलन घेण्यात आले. अशा विविध कार्यक्रमातून मसाप तळागाळापर्यंत पोहोचली आहे.
औरंगाबादबाहेर कार्यक्रम देताना प्रतिसादाचा विचार करण्यात आला. त्यात तिथली जबाबदारी लातूर, डॉ. भास्कर बडे आणि भारत सातपुते, नांदेड, जगदिश कदम आणि सावंत सुरेश, उस्मानाबाद, किरण सगर आणि नितिन तावडे यांच्याकडे देण्यात आली.

शाखांना बळ
मसापच्या शाखांना बळ देण्याचे काम या कालावधीत अधिक प्रभावीपणे झाले. उदगीर, रामचंद्र तिरूके यांची निवड झाली आणि दखलपात्र कार्यक्रमांचा धडाका लावला. त्यात फ. मुं. शिंदे यांचा जाहीर सत्कार, पत्रकार अमर हबीब यांचे भाषण, तर कविसंमेलने आणि ग्रंथप्रकाशनेही केली. तिरूकेंचा कामांचा आवाका पाहून त्यांना विभागीय संमेलन दिले. नियोजनाचा अभाव, साहित्यिक कार्यकर्त्यांवर अविश्‍वास दाखवून मसाप पदाधिकार्‍यांना वार्‍यावर (कार्यवाह-सुधाकर वायचळकर, कोषाध्यक्ष-सुर्यकांत शिरसे) सोडून सर्व अधिकार अनुभवशून्य प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे यांना दिल्याने कुजबूज वाढली आणि फक्त बैठकाच झाल्या.... अखेर ‘साहित्य संमेलन घेण्यास आम्ही असमर्थ आहोत’ असे लेखी द्यावे लागले आणि ते साहित्य संमेलन नांदेडला ऐनवेळी देण्यात आले.
अंबाजोगाई- अमर हबीब, दिनकर जोशी, दगडू लोमटे काहीतरी नवे करतात. शाखेच्यावतीने कथालेखनाची शिबिरे घेवून कथालेखन स्पर्धाही घेतल्या गेल्या. इथेही कार्यक्रमांची रेलचेल असते. या गावाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतले होते.
उमरगा- किरण सगर साहित्य चळवळीतील कार्यकर्ते. दिवाळी दरम्यान ‘वाचन चळवळ’ चालवतात. आठवडाभर ग्रंथविक्री व प्रदर्शन लावतात. त्याचसोबत साहित्यिकांच्या जयंत्या, पुण्यतिथ्यांना ग्रंथप्रदर्शने लावली जातात. ‘जागरमाय’ नावाचा साहित्यिक कार्यक्रम दरवर्षी घेतात.
माजलगाव- प्रभाकर साळेगावकर, कमलाकर कांबळे आणि डी. के. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बर्‍याच वर्षापासून शिवारात, शेतात शिवार साहित्य संमेलने घेतली जातात. विभागीय साहित्य संमेलनाची सत्यप्रत म्हटले तरी चालते. लोक बैलगाड्या करून रानात या संमेलनाला हजेरी लावतात. मराठी भाषादिनही मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. साहित्य चळवळीला पूरक असा हा तालुका आहे.
लातूर- डॉ. भास्कर बडे, भारत सातपुते, राजा होळकुंदे, शंकर झुल्पे, योगीराज माने ही मंडळी साहित्य चळवळीसाठी झटतात. मसापच्यावतीने वर्धापनदिनाचा मोठा कार्यक्रम घेतला, तर वेळोवेळी कविसंमेलने घेतली जातात. मसापच्यावतीने साहित्यसंमेलनही घेण्यात आले. यासाठी शाखाध्यक्ष भारत सातपुते यांचा सहभाग मोठा होता.
बीड- प्राचार्या दीपाताई क्षीरसागर, प्रा. कांचन श्रृंगारपुरे, अनिल होळकर, सतिश साळुंखे, श्रावण गिरी, शाहू बांगर, श्रीराम गिरी, के. टी. तांदळे, डॉ. गणेश मोहिते आदी साहित्यिक मंडळी वाचक चळवळ गतिमान व्हावी म्हणून प्रयत्नात असतात. या शाखेने स्थानिक पातळीवर साहित्य संमेलने घेतलीत. लेखिका साहित्य संमेलनाचे उत्कृष्ट नियोजन लेखिका डॉ. दीपाताई क्षीरसागर यांनी केले होते.
केज- प्राचार्य ईश्‍वर मुंडे, एक सांस्कृतिकतेतील चळवळ्या माणूस. बोलणे जिभेवर साखरच. म्हणून माणसं जमा करण्यात हातखंडा. या ठिकाणी त्यांच्या संस्था आहेत, कर्मचारी आहेत. त्यांनी एकदिवसीय साहित्य संमेलने घेतलीत. आतापर्यंत चार संमेलने झालीत. ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव आणि फ. मुं. शिंदे यांनी या संमेलनाची अध्यक्षपदे स्वीकारलीत. हिंदकेसरी मिळवलेली ही माणसं खेड्यातल्या कुस्त्यातही रेवड्यावारी ‘अध्यक्षपद’ घेतात. हे विषेश.
शिरूर (का)- डॉ. अशोक घोळवे, विठ्ठल जाधव,अनंत कराड, अंकुश कांबळे, मधुलता केदार, सतिश मुरकुटे, संजय डोरले आदी मंडळी मसापच्या बॅनरखाली लहानमोठे कार्यक्रम घेत असतात. तालुक्यातील कविंचा प्रातिनिधीक कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. शिरूर तालुका नवीनच, त्यात शाखा नवीन. ‘साहित्य’ कशाशी खातात याचे ज्ञान नसल्याने अबकडपासून सुरूवात करावी लागली आहे.
खुलताबाद- ललित आधाने, विष्णू सुरासे या प्राध्यापक द्वयांनी दोन वर्षात तिथली शाखा सुदृढ केली. साहित्य पुरस्कार आणि साहित्य संमेलने घेतली जातात.
औरंगाबाद ही तर मराठवाड्याची राजधानी. इथे सतत साहित्यिक कार्यक्रम होतात. त्यातही मसापचे मुख्य कार्यालय इथेच. प्रशस्त इमारत. बहुतेक पदाधिकारी इथेच राहतात. त्यामुळे साहित्यिक कार्यक्रमाची रेलचेल असते. साहित्यिक कार्यक्रमासाठी हॉल किरायाने दिला जातो. नव्या आणि जुन्या साहित्यिकांचे व्यक्तिगत कार्यक्रम मसापच्यावतीने घेतले जातात.
उणिवा निश्‍चित आहेत. त्याचा उहापोह जाहीर करण्याची आवश्यकता वाटत नाही. त्या उणिवांवर चर्चा करून निर्णय बैठकीत घेता येतात. प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटलांचा निवृत्तीचा विचार होता, परंतु आम्हीच कार्यकारिणीच्या बहुसंख्य संचालकांनी त्यांना गळ घातली. ‘‘एवढे पाच वर्ष तुम्हीच रहा. खूप काम केलात. आता फक्त धावपळ नाही. तुमची आम्हाला, मसापला आवश्यकता आहे.’’ माझ्या मते प्राचार्य ठाले हे निधर्मी चेहर्‍याचे आहेत. मराठवाड्यातील गावागावापर्यंत संपर्क आहे. राजकीय मंडळींशी बैठक/नाव आहे. याचा फायदा संस्थेला निश्‍चित होतो आहे.

जूनमध्ये निवडणूक :
आमदार सतिश चव्हाण पॅनल टाकणार?

आली आली म्हणत मसापची निवडणूक जाहीर झाली. जूनमध्ये उमेदवारी अर्ज भरणे सुरू होतेय. ऑगस्टमध्ये नवीन कार्यकारिणी निवडून येईल. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक झाली त्यात मसापचे विश्‍वस्त श्री. मधुकरअप्पा मुळे यांचा पराभव झाला. शिक्षण साम्राज्यातून (मुळे अप्पा) आ. चव्हाणांनी त्यांचा पराभव केला. मराठवाड्यात या संस्थेची अनेक महाविद्यालये आहेत. प्राचार्य ठाले या संस्थेत प्राचार्य होते. तेव्हा त्यांनी मसापचे सदस्य केले होते. त्या सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे.
आ. सतिश चव्हाण राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर पदवीधर मतदार संघातून स्व. गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती (घाती) निधनाच्या नाराजीचा आ. चव्हाणांना फायदा झाला. ते निवडून आले. आमदारकी शिक्षणसंस्था आणि आता मसापचा किल्ला त्यांना श्री. मधुकरअप्पा मुळे यांच्या खुणावतोय. त्यात बेरीज शिक्षण संस्थातील मसापचे मतदार अधिक नाराज साहित्यिकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. तशी चर्चा मे महिन्यात सुरू झाली.
ग्रामीण साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांना पुढे करून शिक्षणसंस्थेची मते अधिक नाराज मतांची मोट बांधली जावू शकते. त्या त्या जिल्ह्यातील काही नव्या-जुन्या साहित्यिक कार्यकर्त्यांची चाचपणी आ. चव्हाणांनी केली. त्यांचे पॅनल कागदावर तयार झाले आहे पण मते कुठून मिळवणार? शिक्षणमंडळातील चारशे-पाचशे ‘मराठा’ जातीच्या मताने काहीच होणार नाही.
मसापसाठी लोकांसोबतच मतदारात प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांच्याबद्दल आपुलकी आहे. त्यांच्यावर विश्‍वास आहे. आ. चव्हाणांच्या ताब्यात मसाप देवून मसापची राष्ट्रवादी साहित्य परिषद करायची की काय? असा संशय येतोच.
आता गणित असे आहे. एकूण मतदार अडीच हजारावर आहेत. पैकी बाविसशे मतदान मतदान पेटीपर्यंत येईल. अंदाजे जातनिहाय ब्राह्मण 40%, मराठा 40%, वंजारी10%, लिंगायत 05%, येलम 02%, इतर 03% अशी आकडेवारी आहे. याचा अभ्यास प्राचार्य ठालेंना तीस वर्षापासूनचा आहे. मते कशी मिळवायची याचे गणित प्राचार्य ठालेंना चांगले जमते. नव्हे ते प्रथम श्रेणीतच उत्तीर्ण होणार.
वरील आकडेवारी आणि मान-सन्मानाची पदे कोणाला (जातसमूह) जास्त मिळाली याचा वाचकांनी विचार करावा. मराठवाड्यातील या चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून सांगावे वाटते. आ. सतिश चव्हाणांनी या भानगडीत पडू नये. इथे चहापाणी, पार्टी, कोंबडा चालत नाही. उगाच या जाळात हात घालू नये अन् विरोधकांची संख्या वाढवू नये. उभे राहणे त्यांचा हक्क आहे. जरूर उभे रहावे अन् ताकत आजमवावी, पण जपून.
प्राचार्य ठालेंचे पॅनल तयार झाले. त्यांनी त्यांच्या काही खास उमेदवारांना गेल्या दोन महिन्यापूर्वीच कामाला लावलेय. जुन्या कार्यकारिणीतील किरकोळ बदल होतील, अन्यथा तेच संचालक मसापमधील विकासाची माहिती घेवून मतदारापर्यंत जातील. प्राचार्य ठालेंनी मराठवाड्यातील आजीव सभासद, संचालक, कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी पंधरा दिवसापूर्वीच आटोपल्या आहेत.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खरे काय ते कळेल. पॅनल पडतेय की रणांगण सोडून विरोधक माघार घेतात? यापूर्वी असे झालेय. मसापच्या आजीव मतदारांनी मसापच्या विकासासाठी ‘विश्‍वासू’ माणसालाच मते द्यावीत आणि मसाप ही फक्त ‘साहित्य परिषद’ कशी राहिल , हा राजकीय आखाडा होवू नये अशी भूमिका घ्यावी, अशी साहित्य वर्तुळात चर्चा आहे.

- डॉ. भास्कर बडे, लातूर 
९४२२५५२२७९ 
(पूर्वप्रसिद्धी : मासिक साहित्य चपराक जून २०१५)

Saturday, May 16, 2015

जगण्याची नितळता पाझरत जाणारी कविता





'चपराक प्रकाशन'ने प्रकाशित केलेल्या प्रभाकर चव्हाण लिखित 'सुंबरान' या कवितासंग्रहाची दखल आजच्या बेळगाव 'तरुण भारत'ने 'अक्षरयात्रा' या पुरवणीत घेतली आहे. अजय कांडर यांनी हे परीक्षण लिहिले आहे. श्री. कांडर आणि 'तरुण भारत' यांचे मन:पूर्वक आभार! 

मानवी मनाला नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आस लागलेली असते. भौतिक सुखाची आस जगण्याच्या निरर्थकतेकडे घेऊन जाते. तर आपल्या संस्काराचे, परंपरेचे संचित जपण्याची आस आपण बाळगतो. तेव्हा त्यातून जगण्याची नितळताच पाझरत राहते. ज्येष्ठ कवी बलवन्ततनय तथा प्रभाकर चव्हाण यांच्या ‘चपराक प्रकाशन’, पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सुंबरान’ या काव्य संग्रहातील कविता संस्कारांचे आणि परंपरांचे संचित जपत संतांच्या अभंगाच्या अन्वयार्थाने जगण्याचीच आस बाळगते. तर दुसर्‍या बाजूला संतांचाच प्रबोधनाचा विचार पुढे नेत अपप्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीच्या विचारांचा प्रहार करते. 
‘सुंबरान’मध्ये एकूण 52 कवितांचा समावेश आहे. सर्वच कवितांचे कवीच्या  स्वतःच्या अनुभवातून प्रकटीकरण झाले आहे. यातील बहुसंख्य कविता या छंदबद्ध असल्या, तरी त्याला एक स्वतंत्र आंतरिक लयही आहे. ही लय लोकभाषेशी आणि लोकजीवनातून लोकसंस्कृतीशी जोडली गेल्यामुळे कवितेची गेयता वाचकाला प्रभावित करते. श्र्र्ी. चव्हाण यांच्या सर्वच कवितांवर लोकजीवनाच्या संस्कांरांचा प्रभाव असल्याने त्या कवितेला चिकटून आलेली कवीची बोली, कवितेचा आशय अधिक सघन करत जाते. 
कवीचे जीवन कोकणच्या निसर्ग आणि मानवी जीवनाशी एकरूप झाले असल्याने ‘सुंबरान’मध्ये कोकणच्या निसर्गाचे त्यांना दिसणारे विलोभनीय दृश्यही चित्रात्मक पद्धतीने मांडले आहे. कोकणचा निसर्ग तिथे वस्ती करून राहणार्‍यालाच नाही, तर त्याच्या सहवासात आलेल्या सर्वानाच तो मोहून टाकतो. त्यामुळे त्याच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाला कोकणच्या निसर्गाचे रूप वेगवेगळे दिसत असते. कोणाला निसर्गाशी एकरूप झालेला माणूस दिसतो, तर कोणाला माणसालाच निसर्गाने कवेत घेतल्याचे भास होत राहतात. कवी चव्हाण मात्र कोकणातल्या निसर्गाबरोबरच तिथल्या लोककलांशी माणसाचे असलेले नातेच स्पष्ट करतात. या संदर्भात ‘गावाकडली होळी’ या कवितेत ते म्हणतात, 
गाव सान चिटुकलं, घाटाच्याही पलीकडं...
लपेटून बसलेलं, उभ आडवं डोंगराकडं...
रात्र होळी-पुनवेची, शुभ्र चांदणं प्यायलेली...
गावामंधी देव्हामोर्‍ह, बघा जमली मंडळी...
कुठल्याही लोकसंस्कृतीत धार्मिक विचार चिकटून आलेलाच असतो. कारण, धर्मशास्त्र हेच त्या-त्या धर्मातील माणसाचा लोकविचार झालेला असतो. मात्र, लोककलेच्या प्रभावातून लेखन करणारा कलावंत आपल्या धर्माच्या विचाराने जगतोच असे नाही. किंबहुना, तो समग्र मानवतेचा विचार करून जगत असतो. कवी चव्हाण हे आपल्या जात, धर्म समूहापेक्षा समग्र मानवतेचा विचार करून कोणत्याही धर्माचा आदरभाव बाळगताना दिसतात. एवढेच नाही, तर धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होताना आणि त्यातून माणूस रस्त्यावरच माणसासमोर उभा राहताना त्यांच्यातला संवेदनशील कवी अस्वस्थ होतो. अर्थात अशाच कलावंताला अशा धर्मांध शक्तीचा सर्वाधिक त्रास होत असतो. म्हणूनच ‘माणूसकी जराशी?’ या कवितेत ते म्हणतात
मस्जिद तोडू नका रे, जोडूनी कर विणविले
मुस्लिम धार्जिणा तू, हिंदू मला म्हणाले...
मंदिर नका रे तोडू, विनवुनी घरा परतता...
माझेच बापुड्याचे, घर भुईसपाट झाले...
कवी चव्हाण यांच्या कवितेच्या वरच्या ओळी वाचल्यावर वाचकही हबकून जातो. किती सहज आणि सोप्या शब्दात माणसाच्या आजच्या जगण्याचे भेदक वास्तव त्यांनी मांडले आहे. वरवर पाहता अलीकडल्या काही वर्षात या कवितेतील अनुभव अधिकाधिक सार्वत्रिक होत जातो आहे. मात्र, तो अनुभव आपला वाटावा, असे  वाटणारा वर्ग कमीच आहे. त्यामुळेच जाती-धर्मामध्ये भेदाच्या भिंती उभ्या राहत आहेत. 
कवी चव्हाण या आजच्या भीषण वास्तवाला सामोरे जाताना आपले जगणे मात्र, विनम्रच राहो, अशी सार्वकालिक प्रार्थना करताना दिसतात. माणूस नम्रतेपासून दूर जातो. तेव्हाच समाजात विसंवाद होत जातात. संवादाच्या जागा शोधण्याचा प्रयत्न करणारा वर्ग दुर्मीळच. पण, नम्रतेतून इतरांना जिंकता येतेच. परंतु, स्वतःलाही जिंकता येते. पण, यासाठी स्वतःकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची नम्रता त्याच्याकडे असायला हवी. चव्हाण या विचाराचेच असल्याने ते एका कवितेत म्हणतात
‘तुझसहित तव देऊळ सुंदर, दुरुनी मज पाहू दे
माझे चिखला-मातीचे, पाय असेच राहू दे.....’
कवी चव्हाण यांची कविता कष्टकरी वर्गाचेही प्रतिनिधीत्व करते. जागतिकीकरणाच्या काळात माणसाचा संवाद हरवला असला, तरी तो कमालीचा एकमेकांच्याजवळ आला आहे. हे त्याचे जवळ येणे त्याच्या जगण्यातील एक तांत्रिक गोष्ट आहे. त्यामुळे समाजात दोन स्तर निर्माण झाले आहेत. वरचा स्तर वरच्या वर्गाशीच नाते सांगतो आहे. तर खालच्या स्तरातील वर्गाला आपले नाते कोणाशी आहे. हेही सांगता येत नाही. अशी त्याची जगण्याची कोंडी झाली आहे. यात कष्टकरी वर्ग प्रामुख्याने आहे. या वर्गाची कणव कवी चव्हाण आपल्या कवितेत बाळगताना दिसतात. या वर्गाबद्दल आपल्या कवितेतून उद्गार व्यक्त करताना ते म्हणतात, 
‘झोका टांगला झाडाला, जीव टांगला पाडाला...
तान्हं लेकरू रडतं, माझं काळीज कढतं...
भरभरून गं पाट्या, सये फेकीते वरती
दुःख-उपसावं किती, भुई फाटली तळीची’
चव्हाण यांचे आयुष्य कामगार वर्गाशी निगडीत असल्याने या वर्गाबद्दल आपल्या भावना कवितेतून व्यक्त होताना त्यांचे मन अधिक भावूक होते. अशा वर्गाचे नायक झालेल्या लोकांचे ते स्मरण करत राहतात. कवीश्र्र्ेष्ठ नारायण सुर्वे हे कामगार वर्गाचेच प्रतिनिधित्व करणारे कवी होते. ते तर स्वतः कामगार होतेच परंतु, त्यांच्या आत्मचरित्रात्मक कवितांमधून त्यांनी कामगार वर्गाच्या प्रश्‍नांना वाचा फोडली. त्याचबरोबर कामगार वर्गाच्या जीवनवादी तत्त्वज्ञानाला एक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यामुळेच ते समस्त कामगार वर्गाचे नायक झाले. त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना चव्हाण म्हणतात, 
‘जैसा झळकशी नभी, तुबा सुर्वे नारायणा...
सारस्वतांच्या प्रांगणी, तुझा रुबाब देखणा...
तुझी कष्टाची शिदोरी, तुझे भाकरीचे गाणे...
तुझे बोलके उखाणे, तुझी डौलती निशाणे....’
कवी चव्हाण हे नारायण सुर्वे यांच्यावर कविता लिहिताना आपण भाकरीचे गाणे गाणार्‍याच वर्गाच्या बाजूने असल्याचे सूचित करतात. हेच त्यांच्या कवितेचे मोठेपण आहे. श्रद्धेचा आदर बाळगतानाच अंधश्रद्धेवर ते ताशेरे ओढतात. सारा समाजच कोरडा होत जाणार्‍या या काळात त्यांचा हा आत्मस्वर अतिशय मौलिक आणि विशेषतः तळातल्या वर्गाला प्रेरणा देणारा असल्याने आजच्या गद्यप्राय काव्यलेखन लिहिल्या जाणार्‍या काळात त्यांच्या आंतरिक लयीची ही कविता स्वतःचे वेगळेपण घेऊन आजच्या मराठी कवितेत सशक्त उद्गाराने अवतरली आहे. तिचे वाचकांनी मनापासून स्वागत करायला हवेच.
- अजय कांडर


Thursday, May 14, 2015

नव्या संघर्षाची नांदी!

प्रकाशक : ‘चपराक प्रकाशन’
दूरध्वनी : 020-2446 0909
पृष्ठ : 80  किंमत : 75 रूपये

आज मराठी कविता विविधांगांनी विस्तारत आहे. आगळा आशय आणि संपन्न अनुभवांनी तिची समृद्धता वाढत आहे. विविध कवी आणि कवयित्री काव्यशारदेच्या क्षितिजावर देदिप्यमान काव्यतारकांनी प्रकाशझोतात येताहेत. कधी त्यांच्या कविता स्वप्नपंखांची उत्तुंग भरारी घेताहेत तर कधी त्यांच्या कविता मऊशार मातीच्या ममताळु ओलेपणात आकाराला येताहेत. यातूनच खेड्याची कविता रूजून येताहे. ती आता प्रस्थापितांविरूद्ध प्रतिकाराची भाषा बोलू पाहते आहे. नवा क्रांतिकारी संदेश देते आहे. एका नव्या संघर्षाची नांदी ठरावी असे तिचे आगळेपण आहे. तिचा प्रवास ‘काळोखातून उजेडाकडे’ सुरू आहे.
मुळचे बुलडाणा जिल्ह्यातील पण सध्या पुण्याला स्थायीक असलेले प्रथितयश कवी शांताराम हिवराळे यांच्याही कवितेत या नव्या संघर्षाचे प्रतिबिंब पडले आहे. स्वप्नांपेक्षा सत्यात जगणार्‍या या कविचे आतापर्यंत ‘अश्रूंचा ऊन्हाळा’, ‘प्रारब्ध’, ‘तवंग’, ‘भावनांचे ओसाड प्रदेश’ असे चार कवितासंग्रह प्रसिद्ध झाले असून त्यांचा नुकताच ’दाटून येताहे काळोखी काहूर’ हा नवीन कवितासंग्रह ’चपराक प्रकाशन,’ पुणे यांनी प्रकाशित केला आहे.
या कवितासंग्रहात एकूण 71 कविता असून त्या समाजहीत, निसर्ग, व्यक्तिगत, कष्टकरी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार्‍या आहेत. त्यासाठी हा कवी कधी मुक्तछंद तर कधी छंदोबद्ध तर कधी गजल तर कधी लयबद्ध असा अभंगवजा प्रकार वापरतो. ‘एक नवा विषय’ घेऊन आलेली हिवराळे यांची ही कविता बोथट समाजमनाला धार देण्याचा प्रयत्न करते. विषमतेच्या काळोखाला चढलेली काजळी झटकण्याचा तिचा प्रयास आहे.
सध्या ‘माणुसकीलाच ग्रहण’ लागलेले असल्याने सर्वत्र काळोखी काहूर दाटून आली आहे. माणुसकीचा सूर्य त्याने गिळंकृत केला आहे. त्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचार, विषमता, अतिरेकीपणा, चंगळवाद, नैराश्य या गोष्टींनी होणार्‍या आत्महत्या, मरणाला आलेली स्वस्तता, नीतीभ्रष्टता आणि गलथानपणा, दिसून येतो. अशावेळी या कवीचे मन पेटून उठते. या काळोखाच्या काहूराला नष्ट करण्यासाठी तो संघर्ष करू पाहतो. आवेगाने तो म्हणतो,
माणसामाणसांतील संघर्ष
आता अटळ आहे
अटळ आहे संघर्ष आता
नातीगोती फुलवण्यासाठी
अटळ आहे संघर्ष आता
चंगळवाद जाळण्यासाठी
अटळ आहे संघर्ष आता
नवा माणूस घडविण्यासाठी
माणसांमाणसांतील संघर्ष
आता अटळ आहे..
.
इथला समाज एका अनामिक भीतीने अगतिक झाला आहे. सर्वत्र अत्याचार असूनही तो गप्प गप्प आहे. तो का गप्प आहे याचा हा कवी प्रकर्षाने शोध घेतो. त्याला या प्रश्‍नाचे लगेचच उत्तर सापडते की, इथल्या सत्तेच्या वारूळात डंख करण्यासाठी बसलेले विखारी नाग हेच या अंधारामागचे खरे कारण आहे. हे महाविषारी नाग या कवीला आपल्या प्रगल्भ शब्दशस्त्रांनी ठेचायचे आहेत. इथला हा ‘धर्मांध सत्तेचा बाजार’ त्याला उधळून लावायचा आहे. त्याचे वर्णन करताना तो म्हणतो
इथे सत्तेचे वारूळ इथे विषारी फुत्कार
इथे देवाच्या नावाने आंधळाच कारभार
इथे श्रद्धेचा मुलामा आत नुसताच अंधार
इथे धर्मांध सत्तेचा रोज भरतो बाजार

इथल्या समाजाच्या वाट्याला हे ‘काट्यावरचे जगणे’ का आले? याचा शोध या कवीने घेतला आहे. ओठावरच्या खोट्या हास्याला आम्ही फसतो, गोड शब्दांना भुलतो, असत्यालाच सत्य मानतो. पाठीवर प्रेमाने हात फिरविल्याचा आव आणीत त्याच पाठीत खंजीर खुपसणारे, माणुसकीची हत्या करणारे येथे गल्लोगल्ली आहेत, अशावेळी मनाला भयाच्या ’काटेरी वलयाने’ व्यापून टाकले आहे. त्यामुळे भयग्रस्त माणसाप्रमाणेच शब्दही मनातून बाहेर यायला घाबरतात. यावेळच्या अवस्थेचे वर्णन कवी अत्यंत प्रकर्षाने करतो.
सर्वत्र भीतीची लाट अशी
मनावर फुटते
नकळत कधी मग वेळेची
काच तडकते
जगण्याची येथे होते ऐशी
नकळत माती
शब्दातून माझ्याच का भीतीच
उमलत असते?

या देशात एकीकडे श्रीमंताचा वाढता आलेख व दुसरीकडे मातीला मिळणारी गरीबी याचे परस्सरविरोधी चित्रणही हा कवी प्रकर्षाने करतो. काट्यावरच्या या फाटक्या आयुष्याला समजुतीचे कितीही टाके घातले तरी ते उसवतच राहतात.
गर्द काळी रात फुटे
काळोखाचा पान्हा
झोपडीत निजलेला
गरीबाचा तान्हा
काऊ नाही, चिऊ नाही
भरवते माय
वाळलेल्या कोरक्यांना
बुरशीची साय

असे या गरीबीचे विदारक चित्रण कवी करतो.
आज समाज असा काळोखात चाचपडतो आहे. वासनांध वादळाचे थैमान माजलेले आहे. सत्यं-शिवं-सुंदरं या श्रेष्ठतम जीवनमूल्यांना अघोरी ग्रहण लागलेले आहे. प्रामाणिकपणे जगणार्‍यांच्या गळ्यावर दिवसाढवळ्या ‘अधर्माची’ तीक्ष्ण सुरी फिरते आहे. जिथे तिथे गुंडांची गर्दी आहे. अशा दडपशाहीच्या वातावरणात जनसामान्यांच्या इच्छा, आकांक्षा व स्वप्ने मातीला मिळताहेत. अशावेळी हा कवी संतापतो, चिडतो, अत्यंत उद्वेगाने तो म्हणतो,
बांडगुळासारखे खुशाल जगताहेत लोक
रक्त शोषूनी लोकांचे चिपाड करताहेत लोक
आटलेली ओल येथे का गोठलेले गीत ओठी?
रक्तोत्सवासाठीच का इथे सजताहेत लोक?

या कवीला प्रामाणिक सत्य जीवन जगण्याचे भान आहे. ‘सत्यानेच मला तारले कितीदा’ असे तो आग्रहाने सांगू इच्छितो पण इमानाने जगलेल्या निष्पाप जीवांची होळी होऊन शब्दांनाही आज कैद केले जात आहे. उत्तुंग उत्थानासाठी गर्जना करणार्‍यांचे आवाज दडपले जाताहेत. मानवतेला पायदळी तुडवले जात आहे. अमानुष अशी रक्तपिपासू श्‍वापदे सर्वत्र मोकाट सुटली असून सज्जनांचे गळे फोडून रक्तपिपासू खुशाल रस्तोरस्ती धनदांडगेपणाचा हैदोस घालतायत. अशावेळी हा आकांत कसा सहन करावा? या ‘बळी तो कान पिळी’पणाचा आता कडेलोट करावाच लागेल. भ्रष्ट लोकशाही, भ्रष्ट प्रशासन, भ्रष्ट नेत्यांसाठी चराऊ कुरणं, सर्वत्र ‘आदर्श’ घोटाळे, शिक्षणाचा भरलेला ‘डोनेशनमय’ बाजार, महागाईने काढलेला फणा या सार्‍या विघातक गोष्टींनी मांडलेला उच्छाद या ‘काळोखाच्या काहूराला’ खर्‍या अर्थाने कारणीभूत आहे. जनसामान्यांच्या आयुष्याला सर्वार्थाने ‘पांगळे’ करण्यास इथली ही (अ)लोकशाहीच जबाबदार आहे, कारण तिनेच हा सारा हाहा:कार माजविला असून ‘मौनाचे आभाळ’ निर्माण केले आहे. म्हणून हे मौनरूपी काळोखलेले आभाळ आता आम्हाला नको आहे, तर आता आम्हाला दाहीदिशा दणाणून सोडणारा ‘संघर्ष’ हवा आहे आणि हीच आता खरी नव्या संघर्षाची नांदी आहे, असे हा कवी निर्धाराने म्हणतो. हे सारे संपण्यासाठी त्याने निर्माण केला आहे एक नवा आशावाद! म्हणून तो म्हणतो,
ऐशा जुळू देगा
प्रकाशाच्या वाटा
उसळू देगा लाटा
चैतन्याच्या

किंवा
व्रतस्थ मी माझी तपस्या भंगली नाही कधी
श्‍वास माझे कोंडले त्यांनी असे झाले कितीदा
संपलो नाही कधी मी ना कधी मी दुभंगलो
आत्मबळ आले नव्याने असेही झाले कितीदा

या कवीने ‘वाळूउपशाचा’ एक नवा संदर्भही इथे दिला आहे. (इतरत्र कुणाच्याही कवितेत न आलेला) तो म्हणतो,
आता नुस्तेच खोल खोल खड्डे
अन् अमाप वाळूचा उपसा
कंत्राटदाराचा फुगत जातो
हरामाच्या पैशाने गच्च खिसा

हे सारे असे असताना बांडगुळासारखा खुशाल जगणारा हा समाज पाहून हा कवी कधी दु:खी होतो, तर कधी निद्रिस्त समाजाला जागे करण्यासाठी पेटून उठतो.
या काव्यसंग्रहात कष्टकर्‍यांच्या जीवनावरील कविता अशाच लक्षणीय आहेत. ‘दु:ख वेचता वेचता’ यातील पुढील ओळी कष्टकर्‍यांच्या कष्टमय जिण्याचे वर्णन अत्यंत वास्तवतेने करतात.
चिंध्या बांधून बोटांना
चाले कापूस वेचणी
ओठावर विरतात
अशी वेदनेची गाणी

‘स्वप्नांनाच जातो तडा’, ‘उसवण’, ‘दिशाहीन’ आदी कविता कष्ट उपसणार्‍या मजूरांचे वेदनामय जीवन हुबेहूब उभे करतात.
‘ठणक’, ‘नाते’, ‘जंगलतोड होताहे’, ‘अनोळखी भास’, ‘ऋतू हिरवा’, ‘अंधारधून’, ‘दुरावले पक्षी’, ‘श्रावणधारा’ आदी कवितांमधून कवीने निसर्गातील विविध घटकांची रूपे, स्थित्यंतरे जशीच्या तशी रंगविली आहेत.
घरटेच असे एकाकी, एकाकी
जळते भान
धुरात हरवले पक्षी, शब्दांचे
छळते मौन

यातून निसर्ग प्रतिमांतून मनाची एकाकी, बेचैन अवस्था त्याने वर्णिली आहे.
‘मन नितळ आरसा’, ‘ऐसे माझे मन’ या दोन कविता मात्र निसर्गकन्या बहिणाबाईंच्या ‘मन’ या कवितेशी नाते सांगणार्‍या जरी असल्या, तरी त्यातील दु:खमयता हे त्यांचे वेगळेपण आहे.
अशा या विविधांगी, आशयसंपन्न, अनुभवनिष्ठ काव्यसंग्रहातून कवीची ‘एका नव्या संघर्षासाठी‘ नवा स्वाभिमानी माणूस निर्माण करण्याची वृत्ती दिसून येते. कारण, प्रारंभीच मनोगतात तो म्हणतो, ‘‘मी स्वानंदासाठी कविता लिहिली नाही, तर समाजामध्ये सध्या जे प्रखर वास्तव आहे, ते मन विषण्ण करणारे, अस्वस्थ करणारे, बेचैन करणारे आहे. ही मनाची विषण्णता, अस्वस्थता, बेचैनी कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध होते, प्रतिबिंबित होते. त्यासाठी शब्दांसाठी अडून बसावे लागत नाही. कारण, शब्दांवर माझी निष्ठा आहे. शब्दच माझे सर्वस्व आहे.’’
मलपृष्ठावरील संपादक प्रशांत चव्हाण (बेळगाव तरूण भारत) यांचा अभिप्राय खूपसा अर्थपूर्ण आहे. गुरूगोविंद आंबे यांचे बोलके मुखपृष्ठ आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांचे अचूक संपादन या गोष्टींनी हे पुस्तक निश्‍चितच रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करेल यात संदेह नाही. कवी शांताराम हिवराळे यांच्या भावी लेखनास उदंड सदिच्छा.

* प्रा.रायभान दवंगे
कमलापूर, जि.अहमदनगर
भ्रमणध्वनी : 99227 21015