मासिक 'साहित्य चपराक' पुणे
नांदेड गोदावरीच्या काठावर वसलेलं इतिहासकालीन नगर. नंदीतट, नंदिग्राम या नावांनी ओळखलं गेलेलं समृद्ध परंपरेचं एक गाव. हिंदू, शीख, मुस्लिम, बौद्ध, जैन या विविध धर्मियांच्या तीर्थक्षेत्रांना आपल्या कुशीत सांभाळणारं पवित्र शहर.
इ. स. पूर्व पाचव्या आणि चौथ्या शतकात या भूप्रदेशात नंद राजाचे राज्य होते. पुढील काही काळ हा भाग मौर्य साम्राज्याचा हिस्सा होता. नंतर सातवाहन राजांनी इथली राज्यव्यवस्था पाहिली. राष्ट्रकुट राजांनी नांदेड जवळील कंधारला आपली राजधानी बनवले होते.
इसवीसनाच्या दहाव्या शतकात राष्ट्रकुटांनी कंधार येथे बांधलेला जगत्तुंग सागर आणि किल्ला या परिसराच्या समृद्धीची साक्ष देतो. चालुक्यकालीन स्थापत्याचा उत्तम नमुना पहायचा असेल तर देगलूर जवळील होट्टलच्या मंदिर संकुलांचा उल्लेख करावा लागेल. या मंदिरांवरील कोरीव काम आणि मूर्तीकाम हे सौंदर्याचे अजोड लेणे आहे. माहूर येथे असणारे ‘रेणूकादेवीचे मंदिर’ हे नऊशे वर्ष जुने आहे. देवगिरीच्या यादवांनी हे मंदिर उभारले. माहूरची रेणूकादेवी एक संपूर्ण शक्तिपीठ म्हणून ओळखली जाते. माहूरच्या पट्ट्यातच उनकेश्वर येथे गरम पाण्याचे कुंड आहेत. या कुंडातील पाण्याच्या ठायी औषधीय गुणधर्म आहेत असे सांगितले जाते. अगदी सुरुवातीच्या काळातील एक मराठी शिलालेख या कुंडांजवळ आहे. निसर्गाच्या समृद्धीने वेढलेला हा परिसर. हाच अनुभव सहस्रकुंड येथेही येतो. पैनगंगा नदी आपल्या सहस्रधारांनी या ठिकाणी प्रपाताचे रुप धारण करत कोसळत राहते. त्या ठिकाणी हे कुंड तयार झाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या धबधब्याचे रुप हे विलक्षण मनोहर आणि स्तिमीत करणारे असते. मराठीतील सुप्रसिद्ध लेखक मारुती चित्तमपल्ली यांनी आपल्या लेखनाने या प्रदेशाला जिवंत केले आहे. जंगल खात्याचे अधिकारी म्हणून मारुती चित्तमपल्ली यांचे या भागात वास्तव्य होते.
गोदावरी नदीच्या किनार्यावरती ‘शंखतीर्थ’ हे एक महत्त्वाचे स्थान आहे. ‘गोदावरी महात्म्य’ या पोथीमध्ये या स्थानाचा उल्लेख आहे. नांदेड शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावरती असणारे हे ठिकाण गोदावरी नदीचे नाभीस्थान म्हणून ओळखले जाते.
माळेगाव हे नांदेड - लातूर राज्य महामार्गावरती वसलेले एक छोटेसे गाव. या गावात खंडोबाचे मंदिर आहे. दक्षिण भारतात प्रसिद्ध अशी खंडोबाची यात्रा या गावात प्रतिवर्षी भरते. उंट, घोडे, खेचर यांची या जत्रेत मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते. विविध भटक्या जमाती जत्रेच्या निमित्ताने एकत्र येतात. भटक्यांच्या जात पंचायतीचे हे महत्त्वाचे ठाणे आहे. या जातपंचायतींचा अभ्यास करण्यासाठी देशभरातील अभ्यासक जत्रेत येतात. ही जत्रा म्हणजे विविध उद्देशांनी एकत्र आलेल्या लोकांचा जनमेळाच असतो.
कंधार येथील ‘सैयद मगदूम दर्गा’ आणि येथे भरणारा उरुस देखील असाच आनंददायी असतो. हा दर्गा सातशे वर्षे जुना आहे. उरुसात कव्वाल्यांचे फड ऐकणे, पाहणे विलोभनीय असते.
‘लीळाचरित्र’ या मराठीतील आद्य गद्यग्रंथात नांदेडचा उल्लेख सापडतो. ‘नंदीतट’ या शब्दाने हा उल्लेख केला गेला आहे.
मोगल बादशहा औरंगजेब यांच्या काळात नांदेडला महत्त्वाचे स्थान होते. तेलंगण प्रांताचा कारभार नांदेडमधूनच पाहिला जाई. नंतरच्या काळात मात्र हा परिसर हैदराबादच्या निजामाच्या अधिपत्याखाली गेला. इ.स. 1725 ते इ.स. 1948 या दीर्घ कालखंडात या प्रदेशावरती हैदराबादच्या निजामाने राज्य केले. हैदराबाद संस्थानच्या शेवटच्या काळात नांदेड हे शहर स्वातंत्र्य चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र राहिले. या शहराने अनेक लढे दिले, आंदोलने पाहिली आणि स्वतःला वेळोवेळी सिद्ध केले.
नांदेड सर्वदूर ओळखले जाते ते शीख धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून. शिखांचे दहावे गुरु ‘श्री गुरु गोविंदसिंगजी महाराज’ यांनी या भूमीत काही काळ वास्तव्य केले. याच भूमीत ‘श्री गुरुग्रंथसाहिबजीं’ची गुरु म्हणून घोषणा करण्यात आली. तख्त सचखंड ‘श्री हुजुर साहिबजी गुरुद्वारा’ येथे माथा टेकवण्यासाठी जगभरातून दररोज हजारो भाविक येत असतात. पंजाबचे महाराजा रणजीतसिंगजी यांनी इ.स. 1835 मध्ये हा गुरुद्वारा निर्माण केला. नगिना घाट, मालटेकडी, मातासाहिबजी, बंदाघाट, शिकारघाट, संगतसाहेबजी, हिराघाट येथील गुरुद्वारे हे इतर पवित्र गुरुद्वारे होत. शीख धर्मियांच्या सण व उत्सवाच्यावेळी शहरामध्ये चैतन्य निर्माण होत असते. सत्याचा प्रदेश आणि पृथ्वीच्या जलप्रलयातही अविचल राहाणारी, न बुडणारी जागा असे सांगणार्या धर्मश्रद्धा या भूमीशी जोडलेल्या आहेत.
नांदेड शहरातील नंदगिरीचा किल्ला, माहूरचा किल्ला, विष्णुपुरी येथील काळेश्वराचे हेमाडपंथी मंदिर, शंकरसागर जलाशय, दाभड येथील बौद्ध विहार, विष्णुकवींचा मठ, गोरठा येथील संत दासगणू महाराजांचा मठ यांनी या परिसरातील जनमानसाला संपन्न असा सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा दिला आहे.
हा वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य अनेक मान्यवरांनी केले आहे. पं. अण्णासाहेब गुंजकर यांनी संगीत क्षेत्राला दिलेले योगदान अतुलनीय आहे. पंडित गुंजकरांनी शास्त्रीय संगीतामध्ये इथे एक पिढी घडवली. पंडित नाथराव नेरळकर, पंडित श्याम गुंजकर, पंडित रमेश कानोले, सीताभाभी राममोहन राव, रंगनाथबुआ देगलूरकर, मनोहरराव कांडलीकर या सगळ्याच दिग्गजांनी नंतर स्वरांना साज चढवला. लोकसंगीताच्या संदर्भात नरसिंग कव्वाल यांचे स्थानही अव्वल होते. गझल गायकीमध्ये नरसिंग कव्वाल यांचा हातखंडा होता. निजामाच्या दरबारात त्यांना मानाचे स्थान होते.
नांदेडमध्ये वर्षभर संगीत मैफिलींचे आयोजन होत असते. शंकररराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘संगीत शंकर दरबार’ आयोजित केला जातो. या दरबारात देशविदेशातील थोर गायक, वादक, संगीतकार आपली हजेरी लावत असतात. आषाढी महोत्सव हा आ. हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित केला जाणारा कार्यक्रम. भर पावसात रसिक या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. दिवाळी पहाट, भीम पहाट, पाडवा पहाट अशा पहाटेच्या संगीत मैफिली गोदावरीच्या प्रसन्न काठावरती आयोजित केल्या जातात. सुनील नेरलकर हेही संगीत महोत्सवाचे नियमित आयोजन करत असतात. व्यावसायिक गायक वादकांची संख्या इथे मोठी आहे. त्यांनी आपापले ऑर्केस्ट्रा तयार केले आहेत. दि. 15 ऑगस्ट, दि. 26 जानेवारी, दि. 17 सप्टेंबर आणि एखाद्या प्रसिद्ध गायकाला आदरांजली वाहण्यासाठी हे ऑर्केस्ट्रा दर्जेदार आणि विनामूल्यही कार्यक्रम साजरे करतात. धनश्री देव, ठावरे, आनंदी विकास, रमाकांत चाटी असे नव्या जुन्या पिढीतील अनेक गायक संगीतकार आज राज्यभर नांदेडचा लौकिक वाढवत आहेत. देवदत्त साने यांचे आटोपशीर निवेदन अशा कार्यक्रमांना असते.
रंगरेषांविषयीच्या उत्कट प्रीतीतून त्र्यंबक वसेकर यांनी नांदेडमध्ये ‘अभिनव चित्रकला महाविद्यालया’ची पायाभरणी केली. नंतरच्या काळात सुभाष वसेकर यांनी या महाविद्यालयाचा लौकिक वाढवला. लक्ष्मण कांबळे, त्र्यंबक पांडे, जी. एस. जगनार, नयन बारहाते, कविता जोशी, दामोदर दरक, जिचकार, संतोष घोंगडे, चंद्रकांत पोतदार ही चित्रकार मंडळी नांदेडशी संबंधित आहेत. दरम्यानच्या काळात शहरात अखिल भारतीय पातळीवरील ‘व्यंग्यचित्रकारांचे संमेलन’ही आयोजित करण्यात आले होते. सुजाता जोशी पाटोदेकर या नांदेड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्या व्यंग्यचित्रकार म्हणूनही परिचित आहेत. बहुतेक इतर मंडळी ही नव्याने विस्तारलेल्या पुस्तक प्रकाशन व्यवहाराला मांडणी आणि मुखपृष्ठ देऊन सहकार्य करत असतात.
नाट्यक्षेत्रात नांदेडचे महत्त्वाचे योगदान अगदी सुरुवातीपासूनच राहिले आहे. दोन वेळा ‘अखिल भारतीय नाट्य संमेलना’चे आयोजन या शहराने केले. 1965 साली पहिल्यांदा ‘नाट्य संमेलन’ आयोजित केले गेले. तेव्हापासून नाट्य परिषदेची शाखा शहरात कार्यरत आहे. त्याही अगोदर प्राचार्य सुरेंद्र बारलिंगे यांनी इथे ‘नाट्यमहासंघ’ ही संस्था स्थापन केली होती. अलीकडे प्रा. दत्ता भगत यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. ‘दलित नाट्य संमेलना’चेही या शहरात आयोजन करण्यात आले होते. दलित रंगभूमीला सौष्ठव देण्यात नांदेडचे योगदान राहिले आहे. इतर अनेक संस्था आणि छोटे मोठे ग्रुप नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. काही दशकांपूर्वी ‘कलामंदीर’ हे शहरातील विविध सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र होते. दहा बारा वर्षांपूर्वी ‘कुसुम नाट्यगृह’ आणि महापालिकेचे ‘शंकरराव चव्हाण नाट्यगृह’ नांदेडकरांच्या सेवेत रुजू झाले. या दोन नाट्यगृहांमुळे कार्यक्रमांची रेलचेल शहरात सतत सुरु असते. मध्येमध्ये आयोजित केला जाणारा ‘नांदेड लोकोत्सव’. यशवंत, पीपल्स, सायन्स, प्रतिभा निकेतन या महाविद्यालयांचे नाट्यविभाग, स्वाराती मराठवाडा विद्यापीठाचा नाट्यविभाग यांनी उपक्रमशीलता टिकवून ठेवली आहे. डॉ. स. रा. गाडगीळ, पद्माकर लाठकर, ग. ना. अंबेकर, आनंदी लव्हेकर, कुसुमावती रसाळ, सुरेश पुरी, जीवन पिंपळवाडकर, संजय जोशी, वसंत मैय्या, नाथा चितळे, गोविंद जोशी, दिलीप पाध्ये, लक्ष्मण संगेवार, राधिका वाळवेकर अशा जुन्या नव्यांनी शहरातील नाट्य चळवळ पुढे नेली आहे.
साहित्य आणि संशोधनाच्या क्षेत्रातही नांदेडचा पूर्वापार लौकिक आहे. मध्ययुगीन काळात रघुनाथ शेष, विष्णुपंत शेष हे संस्कृत कवी नांदेडमध्ये होऊन गेले. मराठीतील महत्त्वाचे पंडित कवी वामन पंडित हे याच शेष घराण्यातील. त्यांनी ‘यथार्थदीपिका’ लिहून आपले नाव मराठी शारदेच्या दरबारात कोरुन ठेवले आहे.
इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात तात्यासाहेब कानोले यांचे नाव आदराने घेतले जाते. पुरातत्त्व शास्त्रांच्या संदर्भात डॉ. गो. ब. देगलूरकरांची ख्याती देश विदेशात पोहचलेली आहे. हैदराबाद संस्थानचा मौखिक इतिहास डॉ. प्रभाकर देव यांनी महत्प्रयासाने साकारला आहे. संस्कृत वेदांचे अभ्यासक, संशोधक म्हणून महामहोपाध्याय यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांचे नाव देशभर माहिती आहे. अलीकडे खगोलाच्या संशोधनात श्रीनिवास औंधकर यांचे नाव पुढे येत आहे. एल. के. कुलकर्णी यांनी आपल्या अथक अभ्यासातून ‘भूगोलकोश’ तयार केला आहे. गंगा नदीचे त्यांनी केलेले संशोधन ग्रंथरुपाने प्रकाशित झाले आहे. प्रा. शेषराव मोरे यांना सावरकरवादी म्हणून ओळखले जाते. आपल्या विशिष्ट वैचारिक बैठकीतून त्यांनी विपुल वैचारिक ग्रंथांची निर्मिती केली. अलीकडेच अंदमान येथे झालेल्या ‘विश्व मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपदही त्यांनी भुषविले आहे. हिंदू- मुस्लिम प्रश्न, भारताची फाळणी, काश्मिर प्रश्न यासंदर्भाने सावरकरवादी दृष्टिकोनातून मोरे यांनी मांडणी केली आहे. विजय पाडळकर यांनी जागतिक चित्रपटांचा अभ्यास आणि त्यावर संशोधन केले आहे. शहरामध्ये चित्रपट अभ्यासकांची मॅजिक लॅन्टर्न सोसायटी पाडळकरांनी सुरु केली होती. जुन्या गाण्यांचा अभ्यास असणारी काही मंडळी विशिष्ट दिवशी एकत्र येऊन आपल्या अनुभवाची देवाणघेवाण करतात. मधुकर धर्मापुरीकर हे व्यंग्यचित्रांचे एक महत्त्वाचे अभ्यासक आहेत. त्यांच्या संग्रही हजारो व्यंग्यचित्रे आहेत. व्यंग्यचित्रांच्या संदर्भाने त्यांचे संशोधनही प्रसिद्ध होत असते.
नरहर कुरुंदकर हे केवळ नांदेडचेच नव्हे तर मराठी माणसांसाठीही आदरणीय नाव आहे. समीक्षक, विचारवंत म्हणून त्यांची सर्वदूर ओळख आहे. कुरुंदकर हे शहरातील पीपल्स कॉलेजमध्ये प्राचार्य होते. त्यांनी अनेकांना लिहीते केले. प्रोत्साहन दिले. 1980 च्या मागेपुढे त्यांच्या प्रस्तावना वा पाठराखणीशिवाय मराठवाड्यातील लेखकांची पुस्तकेच प्रकाशित होत नसत.
दे. ल. महाजन, वा. रा. कांत, हरिहरराव सोनुले, पार्थिव, यादवसूत, राजा मुकुंद, भुजंग मेश्राम या नांदेडच्या कविंनी मराठी कविता समृद्ध केली आहे. अलोन यांची कविता अतिशय निराळी होती. तथापि एकही संग्रह प्रकाशित नसल्यामुळे चांगला कवी विस्मरणात गेला आहे. फ. मुं शिंदे यांचे आणि नांदेडचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या शहरातील यशवंत महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. आजही त्यांचा एक पाय नांदेडमध्ये असतो. लक्ष्मीकांत तांबोळी, श्रीकांत देशमुख, केशव देशमुख, मनोज बोरगावकर, शिवाजी आंबुलगेकर, पी. विठ्ठल, व्यंकटेश चौधरी, वृषाली किन्हाळकर, सुचिता खल्लाळ, योगिनी सातारकर, रविचंद्र हडसनकर, देविदास फुलारी, बापू दासरी, प्रफुल्ल कुलकर्णी, राजेंद्र गोणारकर, विनायक येवले, विनायक पवार, भगवंत क्षीरसागर, ज्योती कदम, संध्या रंगारी, आदिनाथ इंगोले, महेश मोरे, जगदीश कदम, निर्मलकुमार सूर्यवंशी, ललिता शिंदे हे सगळे कवी नांदेडशी संबंधित आहेत. विनायक येवले या तरुण कवीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ‘ठसे बदललेल्या मुक्कामावरुन’ हा विनायकचा संग्रह मागील दोन वर्षांपासून चर्चेत आहे. ग्रामीण कवितेच्या नव्या टप्यावरची कविता या कवीकडे आहे. श्रीकांत देशमुख यांनी सतत स्वतःचा आवाज जपला आहे. मराठी कवितेत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केलेला हा प्रतिभावंत कवी आहे.
कथा आणि कादंबरीच्या क्षेत्रात सुधाकरराव डोईफोडे, तु. शं. कुलकर्णी, बाबू बिरादार, प्रकाश मेदककर, मधुकर धर्मापुरीकर, रावजी राठोड, मथू सावंत, नागनाथ पाटील, भगवान अंजनीकर, जगदीश कदम, दत्ता डांगे, प्र. श्री. जाधव, अनंत राऊत, करुणा जमदाडे, शंकर विभूते ही नावे महत्त्वाची आहेत. शैलजा वाडीकर यांची अलीकडेच ‘मराठा मुलगी’ आणि ‘एकटी असण्याची गोष्ट’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आत्मचरित्रात्मक कादंबरीचा बाज असणारी ही दोन्ही पुस्तके वाङमयीन आणि समाजशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाची आहेत. वाडिकर यांच्याकडून आगामी काळात मोठ्या शक्यता आहेत. शची शैलजा ही युवा लेखिकाही आपले स्वतंत्र स्थान मागेपुढे नक्की तयार करील असा विश्वास तिच्या लेखनाने दिला आहे. ‘आनंदी’ हा तिचा कथासंग्रह ती सातवीत शिकत असताना प्रकाशित झाला होता. ‘एका तळ्यात होती’ ही तिची कादंबरी येऊ घातली आहे. डॉ. जे. जी. वाडेकर यांचे ‘सर्जननामा’ हे आत्मचरित्र विशेष महत्त्वाचे आहे. मराठवाड्याच्या वैद्यकीय सेवेचा इतिहास आणि डॉक्टर्सची संघर्षगाथा हे आत्मचरित्र वाचकांपुढे ठेवते. तेजस्विनी वाडेकर, अनुराधा शेवाळे, सुजाता जोशी, वृषाली किन्हाळकर, अच्चुत बन, मापारी, व्यंकटेश काब्दे, हंसराज वैद्य, करुणा जमदाडे ही नांदेड शहरातील वैद्यक क्षेत्रात कार्यरत असणारी नामांकित मंडळी. यांनी कविता, अनुभवकथन, आत्मचरित्र, प्रवासवर्णने लिहून महत्त्वाची भर घातली आहे.
कविता महाजन हेही नांदेडशी संबंधित नाव आहे. मराठी साहित्यातील महत्त्वाची कवयित्री, कादंबरीकार, संपादक, अनुवादक अशी त्यांची ओळख आहे. ‘साहित्य अकादमी’च्या अनुवाद पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य अकादमीचा भाषा सन्मान आणि बालसाहित्य पुरस्कारही या लेखिकेला मागेपुढे नक्की मिळेल एवढी प्रचंड ताकत कविता महाजन यांच्याकडे आहे. श्रीकांत देशमुख, विनायक येवले, मधुकर धर्मापुरीकर, विजय पाडळकर ही साहित्य अकादमी पुरस्काराच्या योग्यतेची नावे आहेत. हे सगळेच लिहिते लेखक आहेत. त्यामुळे या पुरस्कारावरती ते आपली मोहोर नक्की उमटवतील.
स्वाती काटे यांनी मुलांसाठी केलेले संपादन महत्त्वाचे आहे. ‘सृजनपंख’ या संपादनातून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या कवितांना आणि चित्रांना व्यासपीठ मिळवून दिले. माझ्यासोबत त्यांनी ‘शाळेतील कविता’ हे संपादनही तयार केले आहे. पाठ्यपुस्तकात असणार्या कवितांची शालेय विद्यार्थ्यांनी केलेली 26 बोलींमधील साडेतीनशे भाषांतरे ‘शाळेतील कविता’ मध्ये आहेत. मुलांच्या प्रतिभेला वाव मिळावा यासाठी दत्ता डांगे, व्यंकटेश चौधरी, शिवाजी आंबुलगेकर ही मंडळी सतत उपक्रमांचे आयोजन करत असतात. मुलांसाठी लिहिणारे दासू वैद्य हेही नांदेडचेच.
एल. एस. देशपांडे यांनी साहित्य अकादमीसाठी नरहर कुरुंदकर यांचे चरित्र लिहिले आहे. त्यांचा कवितासंग्रहही येऊ घातला आहे. तरी त्यांची ओळख आहे ती अनुवादक म्हणून. मराठीतून इंग्रजीमध्ये त्यांनी अनेक लेखकांचे अनुवाद केले आहेत. भाषांतर मीमांसेच्या संदर्भातील त्यांचे काम दिशादर्शक स्वरुपाचे आहे. विजय पाडळकर, धर्मापुरीकर, राजेंद्र गोणारकर, दिलीप चव्हाण, शिवाजी आंबुलगेकर, भगवंत क्षीरसागर, शारदा तुंगार ही भाषांतराच्या क्षेत्रात कार्यरत असणारी काही नावे. जागतिक दर्जाच्या अनेक उत्तमोत्तम साहित्यकृतींचे अनुवाद त्यांनी केले आहेत. कोणत्याही ठिकाणी असते तशी सुमारांची प्रचंड मोठी संख्या याही गावात आहेच. आजूबाजूला हे लोक सतत मिरवत असतात. अर्थात त्यांची धाव कुंपणापर्यंतच असते, हेही खरे. पुस्तक प्रकाशित करण्याएवढी सुबत्ता आल्यामुळे पैशाची थैली घेऊन प्रकाशकाकडे जाणारे कवी, कवीला शक्य तेवढे जास्तीत जास्त लुबाडणारे प्रकाशक, स्थानिक वर्तमानपत्रातून पुस्तकांची ओळख लिहिणारे ‘थोर’ समीक्षक आणि ‘माझा पुरस्कार तुला देतो, तुझ्या गावातील पुरस्कार मला दे’ असे साटेलोटे करणारे ‘सुप्रसिद्ध’ लेखक यांचा सुकाळ याही शहरात आहे. प्रकाशन सोहळ्यात तास तास चालणारे कवी-लेखकांचे सत्कार आणि आहेर वैताग आणतात. एपीआयमुळे लिहिते झालेले महाविद्यालयीन प्राध्यापक आणि त्यांच्याकडून हजार पाचशे घेऊन निबंध छापणारी ‘संशोधन’ नियतकालिके यांनी चांगल्या चांगल्यांची माती केली आहे. कवी इतके स्वस्त झाले आहेत की फक्त आवाज दिला की धावत येतात आणि कविता वाचायला लागतात. टिंगल करण्यासारखे वातावरण भरपूर आहे. मात्र यांच्याकडे लक्ष देण्याचे कारण नाही. काळ आपल्या हातांनी फोलपटांना दूर सारणार आहे. ज्यांनी खरोखर योगदान दिले ते उद्याही टिकून राहणार आहेत.
- डॉ. पृथ्वीराज तौर, नांदेड
संपर्क 75884 12153
(लेखक नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठात मराठीचे अध्यापन करतात.)
मासिक 'साहित्य चपराक' पुणे

'साहित्य चपराक' मे २०१६
रघुदादाकडे पाहिलं तर हा एक लढवय्या शिवसैनिक व कामगार नेता असेल यावर पटकन विश्वास बसत नाही. टिपीकल उच्चमध्यमवर्गीय डॉक्टरच वाटतो तो. अर्थात तो आहे डॉक्टरच. त्यानं ‘मेडिकल रेडिओ डायग्नॉस्टिक टेक्नॉलॉजी’चा डिप्लोमा केलाय मुंबईतून. गेली चोवीस वर्षे तो पुण्याच्या ‘रूबी हॉल क्लिनिक’मध्ये नोकरी करतोय. काय म्हणून? तर ‘चीफ कार्डियो व्हस्क्यूलर रेडिओ डायग्नॉस्टिक टेक्नॉलॉजिस्ट’ म्हणून. अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीसाठी लागणारी वैद्यकीय सेवा. ती तो रूग्णांना पुरवतो. गेली कित्येक वर्षे! अन् अशा या भल्या माणसाकडे नेतृत्व कुणाचं आहे? तर सर्वच क्षेत्रातल्या लक्षावधी कामगारांचं! हे काय गौडबंगाल आहे? तर आयुष्य हे असंच असतं असं म्हणता येईल. रघुदादा भारतीय कामगार सेनेचा सरचिटणीस आहे सध्या. ही शिवसेनेची कामगार संघटना. एकेकाळी असलेलं कम्युनिस्टांचं वर्चस्व. ते संपवून शिवसेनेचे झेंडे अवघ्या कामगार क्षेत्रात रोवणारी ही संघटना. बाळासाहेब ठाकरे यांनी खतपाणी घालून जोपासलेली. लक्षावधी कामगार या संघटनेचे सभासद. त्यांचं नेतृत्व रघुनाथ कुचिक नावाचा हा माणूस करतो. महाराष्ट्रभर ही कामगार संघटना पसरलेली व नोकरी सांभाळून रघुदादा हा कामगारांचे जगण्यामरण्याचे प्रश्न सोडविण्यात सदा व्यग्र असलेला. एरवी तो भेटतो रूबी हॉल क्लिनिकमध्ये. त्याच्या छोट्याशा केबीनमध्ये. मग तिथं कोणीतरी गरजू मुलगा येतो. ‘ये रे राजा’ म्हणत रघुदादा त्याचं स्वागत करतो. तो मुलगा नोकरीची गरज सांगतो. जवळची प्रमाणपत्रं दाखवतो. दुसर्याक्षणी रघुदादाची फोनाफोनी चालू होते. त्या ‘राजा’ला नोकरी मिळालीय की नाही हेही नंतर काही दिवस पडताळून पाहत राहतो तो! हे तो करू शकतो; कारण भारतीय कामगार सेनेचा पसारा मोठा आहे. बहुतांश ‘सर्व्हिस इंडस्ट्रिज’मध्ये कामगार सेना आहे. एअरलाईन्स, ऑटोमोबॉईल्स, फार्मा, पंचतारांकित हॉटेल्स ते अगदी मोठमोठी हॉस्पिटल्स. कामगार सेनेचा दबदबा आहे सगळीकडे. अगदी विद्यापीठांमध्येही कामगार सेना आहे. अगदी पुणे विद्यापीठातही. या सगळ्या ठिकाणी सगळं काही अलबेल चालू असतंच असं नाही. कामगारांचे अनेक प्रश्न असतात. व्यवस्थापनाच्याही अडचणी असू शकतात. रघुदादाची भूमिका एक कामगार नेता म्हणून कशी असते? तर संवाद व चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न असतो त्याचा. शिवसेना स्टाईलनंही अनेक आंदोलनं केली आहेत त्यानं; मात्र फक्त आक्रमक राहून कामगारांचे प्रश्न सुटत नाहीत. त्याची जाणीव त्याला आहे. रघुदादाचं वागणं, बोलणं सुसंस्कृत! सगळं व्यक्तिमत्त्वच एकदम सुसंस्कृत! याचा उपयोग त्याला होतो. कुठं? तर संवादाचा पूल बांधण्यासाठी. कामगार व व्यवस्थापन. या दोघांत यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी. हे सगळं त्याला मुत्सद्देगिरीनं करावं लागतं. कामगारांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता करावं लागतं. व्यवस्थापनाचा विश्वासही सांभाळावा लागतो. ही तारेवरची कसरत. ती तो अनेक वर्षे करतोच आहे. आताच घडलेलं एक उदाहरण देता येईल. ‘फोर्स मोटर्स लि.’ ही वाहन उत्पादन करणारी कंपनी. इथं वेतनवाढीची मागणी कामगार करत होते. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं. भारतीय कामगार सेना हीच कंपनीतील अधिकृत कामगार संघटना आहे याचा निर्वाळा दिला. तरीही सहजासहजी वेतनवाढ करेल ते कंपनी व्यवस्थापन कसलं? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. त्यांना शेवटी मध्यस्थी करावी लागली. ‘फोर्स मोटर्स’चे अभय फिरोदिया. त्यांच्याशी उद्धवजींनी संवाद साधला. फिरोदियांनी समंजस भूमिका घेतली. सकारात्मक पाऊल उचललं. त्यामुळं कामगारांच्या वेतनात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष वाढ झाली. किती? तर चौदा हजार रूपयांची भरघोस वाढ! या कंपनीत 410 कामगार आहेत. हे कायमस्वरूपी आहेत. त्यांचा वेतनवाढीचा तिढा सुटला. त्यांचं कमीतकमी वेतन पस्तीस हजार रूपये झालं. जास्तीत जास्त वेतन चाळीस हजार रूपये झालं. हजेरी पटावरील सर्व कामगार. त्यांनाही वेतनवाढ लागू झाली. वैद्यकिय विमा, मृत्युफंड योजना असे कामगारांचे प्रश्नही मार्गी लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते अगदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार. दोघांनी या प्रकरणात लक्ष घातलं. या सगळ्या प्रक्रियेत रघुदादा खूप सक्रिय होता. ‘मास फ्लॅज इंडिया प्रा. लि.’ या कंपनीतही कामगारांचा वेतनवाढ करार झाला. तो घडवून आणण्यात रघुदादानं पुढाकार घेतला. तिथं कामगारांच्या पगारात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वाढ झाली. किती? तर तब्बल सोळा हजार रूपयांची. ही एकदोन उदाहरणं झाली. खरंतर जवळपास रोजच तो अशा अनेक प्रश्नांनी घेरलेला असतो.
रघुदादाचं मूळ गाव खोडं. शिवनेरी किल्ल्यापासून पुढं काही आदिवासी भाग लागतो. त्याच्या पूर्वेकडे वडिलोपार्जित शेती होती. रघुदादाचे वडील मात्र ‘मुंबई डॉकयार्ड’मध्ये ‘असिस्टंट सिव्हिल इंजिनिअर’ होते. आईदेखील प्रचंड कष्टाळू. दहा-बारा एकर शेती होती. त्याच दरम्यान परिसरात कुकडी धरणाचं काम चालू होतं. कष्टाचे संस्कार. ते त्याच्यावर झालेे. या सगळ्या वातावरणाचा तो परिणाम होता. त्याचं प्राथमिक शिक्षण झालं खोड्यातच. नंतर मुंबईत शिकला. ‘न्यू सायन म्युनिसिपल माध्यमिक शाळा’. इथं माध्यमिक शिक्षण झालं त्याचं. परळचं आर. एन. भट कॉलेज. तिथून त्यानं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं.
रघुदादा पुण्यात आला तो नोकरीसाठीच. ते 1988 साल होतं. त्या दरम्यान त्याचं लग्न झालं. प्रेमविवाह! लव्हमॅरेज! मात्र घरून विरोध. का? तर तो घाटी (म्हणजे घाटावरचा) व ती कोकणी म्हणून. गंमत अशी, दोघं मराठा समाजातले; मात्र विरोध झाला. कशावरून? तर घाटी-कोकणीवरून; मात्र ‘मियॉं-बिवी राजी तो क्या करेगा काझी?’ दोघं प्रेमात होते. रघुदादासाठी ही सत्वपरीक्षाच होती. याचं कारण, तो एक जबाबदार प्रियकर होता. नंतरच्या काळातला एक जबाबदार नवरासुद्धा. अशी माणसं मग एक जबाबदार ‘पिता’ होतातच. ते वेगळं सांगण्याची गरज उरत नाही.
पुण्यात येईपर्यंत रघुदादाचा राजकारणाशी संबंध नव्हता. मुंबईत मात्र तो एकदा दसरा मेळाव्याला गेला होता. साल असावं 84-85. बाळासाहेब ठाकरेंना ऐकून खूप प्रभावित झाला तो; मात्र राजकारणात लगेचच सक्रिय होणं शक्य नव्हतं. तो रूबीत नोकरी करत होता तेव्हा. तेव्हा तर त्याचा कल समाजवादी विचारसरणीकडेच होता. रूबीमध्ये कम्युनिस्टांची युनियनदेखील होती; मात्र सुर्यकांत लोणकर हे अचानक रूबीत ऍडमिट झाले. ते शिवसेनेत सक्रिय होते व तेव्हा ‘कल्याणी फोर्ज’मध्ये नोकरी करत होते. त्यांची सेवा सुश्रुषा करता करता हासुद्धा शिवसेनेकडे ओढला गेला. मग त्याच्याकडे राजन शिरोडकरांचं लक्ष गेलं. त्यांनी त्याला भारतीय कामगार सेनेचं चिटणीस पद घ्यायला भाग पाडलं. त्या दरम्यान भोरमधल्या ‘अरलॅम्स’ कंपनीत कामगारांचे काही प्रश्न निर्माण झाले होते. रघुदादानं ते मार्गी लावले. त्यानं ‘सिरम’ नावाच्या कंपनीतही यशस्वी मध्यस्थी केली. त्यावेळी तर त्या कंपनीत भारतीय कामगार सेना नव्हती हे विशेष! त्याच दरम्यान ‘टेल्को’तला राजन नायरचा संप फसला होता. कामगार क्षेत्रातल्या या घडामोडी. रघुदादा त्याकडं बारकाईनं पाहत होता. त्यातून तो खूप काही शिकत गेला. ‘‘कायद्याची बाजू समजून घेणं व कामगारांना विश्वासात घेणं या दोन गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटतात’’ तो म्हणतो. ‘‘प्रत्येक वेळी आंदोलनं करून उपयोग नाही. सामाजिक दबाव व चर्चेतून प्रश्न सोडवता येतात’’ तो पुढं म्हणतो. त्याच्या मते कामगार कायद्यातही बदल करण्याची गरज आहे. इंग्लंडसारखे देश. तिथं कामगार कायदे कडक आहेत. त्याच्या मते अमेरिका व ऑस्ट्रेलियातले कामगार कायदे अभ्यासले गेले पाहिजेत. ‘‘काम मागण्याचा अधिकार शेतकर्यांना व शेतमजुरांनाही असला पाहिजे. टॅक्सी ड्रायव्हरपासून ते हॉटेलमधील कामगारांपर्यंत सर्वांना आर्थिक बाबतीत सुरक्षितता वाटली पाहिजे’’ तो पुस्ती जोडतो. ‘‘कामगार व शेतकरी हे महत्त्वाचे घटक आहेत. कितीही आधुनिकीकरण झालं तरी शेती व कंपन्या माणसंच चालवणार आहेत’’ तो महत्त्वाचा मुद्दा मांडतो. रघुदादानं वेळप्रसंगी पाच-दहा कामगारांचे प्रश्न सोडवले, तसे त्यानं प्रसंगी पाच हजार कामगारांचे प्रश्नही हाताळले. वर्मा आयोगाचा अहवाल. तो कामगारविरोधी आहे म्हणून त्यानं रस्त्यावरच्या लढायाही लढल्या. अशा प्रसंगांच्या वेळी तो रांगडा व आक्रमक होतो व फटकळसुद्धा. कामगारांच्या प्रश्नांच्या निमित्तानं तो कोर्टकचेर्याही करत राहिला. सातव्या वेतन आयोगाला त्याचा व्यक्तिश: विरोध आहे. हे त्याच्यातल्या अस्सल कामगार नेत्याचं लक्षण किंवा समाजवादी विचारांचा त्याच्यावर टिकून राहिलेला थोडाफार प्रभावही म्हणता येईल.
‘अवांतर काय वाचतोस?’ असं विचारल्यावर रघुदादा उत्तर देतो, ‘‘औद्योगिक व राजकीय विषयांवरची पुस्तकं.’’ आत्मचरित्रं तो फारशी वाचत नाही. त्याचा तिकडं कल नाही. मित्रांचं वेड हे त्याचं वैशिष्ट्य! कै. दत्ताजी साळवी व जॉर्ज फर्नांडिस. या दोन कामगार नेत्यांबद्दल त्याला कमालीचा आदर वाटतो. बाळासाहेब ठाकरे हे तर त्याचे गॉडफादरच व उद्धव ठाकर्यांचाही त्याच्यावर खूप विश्वास!
रघुदादानं दोनदा अमेरिकेचा दौरा केला. तिथल्या वैद्यकिय सुविधा. त्या त्याला पहायच्या होत्या. ‘‘नवीन वैद्यकिय तंत्रज्ञान त्वरीत आत्मसात व्हावं यासाठी आम्हाला जागरूक असावंच लागतं’’ तो म्हणतो.
रघुदादाची ओळख इथंच संपत नाही. त्याची ‘प्रबोधन’ नावाची समाजिक संस्था आहे. तो कामगार विषयक कायदे समितीचाही सभासद आहे. त्यानं ‘पीएचडी’ही मिळवलीय. नागपूरची ‘महात्मा फुले संशोधन संस्था’. त्या संस्थेनं ती त्याला बहाल केलीय. त्याला कामगार क्षेत्राशी संबंधित मिळालेले पुरस्कारही खूप. 2013 साल. यावर्षी त्याला पुण्याच्या ‘साई फाऊंडेशन’नं पुरस्कार दिला. ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्र गौरव ऍवॉर्ड’ हा तो पुरस्कार. 2009 साल. यावर्षी त्याला ‘सर्वोत्तम कामगार’ पुरस्कार मिळाला. सातार्याला ‘ह्युमन रिसोर्स मीट’ ही परिषद झाली. त्यात त्यानं शोधप्रबंधही सादर केला. त्याच्या प्रबंधाचं शीर्षक होतं, ‘हिस्टरी ऑन ट्रेड युनिअन मूव्हमेंट’. याशिवाय ‘नॅशनल इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजी ऍन्यूअल कॉन्फरन्स’ (2013)-कोलाम- केरळा, ‘नॅशनल मीट ऑफ कार्डिओव्हस्क्यूलर टेक्नॉलॉजी’ 2008 (पुणे), 2009 (गोवा), 2010 (बेंगलोर), 2011 (कोलकत्ता) अशा परिषदांनाही तो उपस्थित राहिलाय.
रघुदादा हा स्वत: उत्तम संपादक आहे हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल. ‘कामगार विश्व- वाटचाल संघर्षाची...’ हे अप्रतिम पुस्तक. सगळ्या कामगार चळवळीवरचं. ते त्यानं संपादित केलंय. यात अगदी दगडखाण कामगारांचे प्रश्न आहेत. साखरकामगारांचे प्रश्न आहेत. अंगणवाडी कामगारांचे प्रश्न आहेत. कचरा वेचणार्यांचे प्रश्न आहेत. मोलकरणींचे प्रश्न आहेत. असंघटित ग्रामीण मजुरांचे प्रश्न आहेत. परिचारिकांचे प्रश्न आहेत. बालकामगारांचे प्रश्न आहेत. औद्योगिक कामगारांचे प्रश्न आहेत. कंत्राटी कामगारांचे प्रश्न आहेत. अशा सगळ्या विषयांवर त्यानं अभ्यासक मंडळींना लिहितं केलंय. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवर एक नजर टाकली तर एक लक्षात येतं. हे पुस्तक कामगार चळवळीचा चालता-बोलता कोषच आहे. ‘कामगार लढे : काल, आज, उद्या’, ‘असंघटित कामगारांचे लढे’, ‘असंघटित क्षेत्र आणि महिला कामगार’, ‘कामगार कायदे’, ‘संघटित कामगारांचे लढे’ अशी ही अनुक्रमणिका. यावर अधिक भाष्य करायची गरज नाही.
रघुदादा भारतीय कामगार सेनेचं प्रतिनिधित्व करतो. त्या कामगार सेनेचे सभासद आहेत फक्त (?) सोळा लाख कामगार!!
रघुनाथ कुचिक! एक माणूस एका आयुष्यात इतकं काही करू शकतो यावर बसत नाही; मात्र डोकं ताळ्यावर असलेली व पाय जमिनीवर असलेली माणसं! ती खूप काही करत असतात. रघुदादा रूबी क्लिनिकमध्ये नोकरी करत असतो. पंचतारांकित हॉटेल्समध्ये वावरत असतो. सगळीकडे त्याचे पाय जमिनीवर असतात. तो भेटतो तेव्हा त्याचा एक आग्रह असतो, ‘बाहेर हॉटेलमध्ये एकदा निवांत जेवायला जाऊया’; मात्र त्यानं अद्याप आम्हाला एकदाही हॉटेलमध्ये जेवायला घातलेलं नाही. अगदी महाराष्ट्रातल्या सगळ्या पंचतारांकित हॉटेल्सची सूत्रं त्याच्या हाती असूनसुद्धा! रघुदादा, ऐकतोयस ना?
- महेश मांगले
९८२२०७०७८५
'साहित्य चपराक' मे २०१६
उपेक्षित पुस्तकांचे जग
साप्ताहिक ‘चपराक’
वाचणार्याची वाचनाची तहान कमी होत जाते किंवा त्याचं वाचन क्रमश: निवडक, ‘सिलेक्टिव्ह’ व्हायला लागतं तसं विविध पुस्तकांशी वाचकाचा संपर्क तुटायला लागतो. पुस्तकं उपेक्षित-दुर्लक्षित राहतात त्याचं हे एक कारण आहे. लेखक म्हणून मला अशा उपेक्षित पुस्तकांच्या दुनियेबद्दल कुतुहल आहे. विविध तर्हेचं जगणं समजावून घेण्यासाठी मी कोपर्या कोपर्यातल्या पुस्तकांकडे वळतो. बरचसं आश्चर्यकारक, विलक्षण असं हाती लागतं. सांगणार्याच्या सांगण्यामागच्या ऊर्जेचा मी मान राखतो, कथनाचा आदर करतो. सिलेक्टिव्ह वाचणार्यासारखी झापडं डोळ्याला मग लागत नसतात. ’बहुरत्ना वसुंधरा’ हे सत्य त्यामुळे समजतं. तुमचं कुतुहल जिवंत राहतं आणि तेच महत्त्वाचं.
योगानंदांचं ’ऍन ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी’ हे पुस्तक आता उपेक्षित म्हणता येणार नाही. या पुस्तकाचा मराठी अनुवाद आता उपलब्ध व्हायला लागलेला आहे. परंतु मूळ इंग्रजी पुस्तक, तेही सुरूवातीच्या आवृत्तीतलं मला असंच दिल्लीला फूटपाथवर उपलब्ध झालं. तत्पूर्वी या पुस्तकाबद्दल मी क्वचित ऐकून होतो. हे पुस्तक हाती पडल्यानंतर एक विलक्षण थरार मला अनुभवाला मिळाला. यातील मजकूर तुम्हाला एका विलक्षण अशा पातळीवर घेऊन जातो. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या पुस्तकातील अनेक मजकूराबाबत अविश्वास दाखविण्याचा मोह होतो पण रूढ आणि चाकोरीबद्ध जगण्याच्या पलीकडे जे काही असेल त्याकडे बघण्याची संधी या पुस्तकाने दिलेली असते हे विसरता येत नाही. इथे आपण अद्भुताला स्पर्श करतो. इथे आपण अविश्वसनीयतेला स्पर्श करतो. लौकिक जीवनाचा जो परीघ आहे त्या परीघाच्या बाहेर असणार्या द्रव्याला आपण स्पर्श करतो आणि एका वेगळ्या विश्वाचा आपल्याला थोडा परिचय होतो. हे पुस्तक आता दुर्मिळ राहिलेलं नाही, पण रद्दीत सापडलेली पहिली आवृत्ती मला थरारून टाकणारी होती.
स्वामी कृष्णानंद यांचं ’ट्रू एक्सपिरिंयन्सेस’ हे आठशे पानी इंग्रजी पुस्तक मात्र निश्चितच उपेक्षित मानता येईल. एकोणीसशे त्रेसष्ठ साली याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. स्वामी कृष्णानंद यांनी भारतभर साधना काळात प्रवास केला. त्यांना आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकात ग्रंथित केलेले आहेत. मनुष्यजीवनाचा छेद घेऊन त्या अन्वये माणसाचं अनोखं दर्शन हे पुस्तक आपल्याला घडवतं. हे पुस्तक असंच, उपेक्षित पुस्तकांच्या शोधयात्रेत हाती लागलेलं आहे. सर्वसामान्य वाचक आणि मानवजीवन शास्त्राचे अभ्यासक या पुस्तकाच्या वाटेला जाणार नाहीत. काहीएक सांप्रदायिक श्रद्धेने हे पुस्तक जवळ बाळगतील पण कितपत वाचतील याबद्दल शंका आहे. लेखक या नात्याने मला, अशा पुस्तकांचं मोठं कुतूहल वाटू लागतं. माणूस समजून घ्यायचा असेल तर असं परीघाच्या बाहेरचं देखील वाचलं पाहिजे. या पुस्तकाने मनुष्य जीवनाचे अनोखे दर्शन घडविले आहे. उपरोल्लिखित योगानंदांचे पुस्तक आणि त्या पाठोपाठ हे कृष्णानंदांचे पुस्तक, ही दोन्ही पुस्तके विलक्षण म्हणावी लागतील. तर्कदुष्टता बाजूला ठेवून निखळ कुतुहलाने या पुस्तकांकडे बघत राहणं श्रेयस्कर असतं. सत्य म्हणून जे काही आहे त्या पलीकडे देखील सत्य असलंच पाहिजे इतका शोध जरी आपल्याला लागला तरी ती आपल्यासाठी उपलब्धीच मानावी लागेल.
- भारत सासणे, पुणे
9422073833
साप्ताहिक ‘चपराक’, पुणे
(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
सैराटच्या निमित्ताने प्रदर्शनपूर्व जो काही गदारोळ झाला आणि नंतरही चालूच राहिला तो विस्मयकारक नव्हे तर चिंताजनक आहे. एका चित्रपटाच्या निमित्ताने एवढे जातीकारण, जातीद्वेष, व्यक्तीपूजन ते व्यक्तीद्वेष हिरीरीने दाखवले जातील याची कोणी कल्पनाही केली नसेल. बरे एखाद्या ताकतीच्या, खरोखर समूळ हादरवणार्या कलात्मक चित्रपटाबद्दल असे झाले असते तर बाब वेगळी होती; पण हे घडले एका सामान्य चित्रपटामुळे हे मात्र विस्मयकारक व चिंताजनक आहे असे नमूद करणे भाग आहे.
काय आहे हा चित्रपट? खरे तर समीक्षा करण्यासाठी चित्रपटाने तुम्हाला भले-बुरे मुद्दे दिले पाहिजेत. त्यात एकसंघ आशय (भला वा बुरा) असला पाहिजे. आपल्याला नेमके काय सांगायचेय याचे भान कथाकार-पटकथाकार ते दिग्दर्शकालाही असले पाहिजे. आपल्या अभिनेत्यांच्या मार्फत दिग्दर्शक पटकथेला कलात्मक पद्धतीने पेश करत जात असतो. फँड्रीमध्ये नागराज मंजुळे यांना ते चांगले जमले. गल्ला किती आणि किती नाही हा मुद्दा नाही. मुद्दा कलात्मकतेचा आणि मुल्यात्मकतेचा आहे.
सैराटची प्रदर्शनपूर्व हवा नकारात्मक झाली. हा चित्रपट मराठ्यांविरुद्ध आहे ही ती पहिली ओरड. अनेक विचारी पुरोगामी म्हणवणारे मराठेही हे काय प्रेम करायचे वय असते का? आधी स्वत:ला जीवनात स्थिर-स्थावर करा असे उपदेश देऊ लागले तर नागराज मंजुळे, एक वडार समाजातून आलेला दिग्दर्शक मराठ्याच्या मुलीला खालच्या जातीच्या मुलाच्या प्रेमात पाडतो याचा अतीव राग येत काहींनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शेरेबाजी केली. किंबहुना मराठा विरुद्ध दलित असा संघर्ष पेटला. तोवर तर चित्रपट कोणी पाहिलाही नव्हता. प्रोमो आणि गाणी तेवढी माहिती होती. नंतर चित्रपट रीलिज झाला. तुफान प्रतिसाद मिळाला की बुकिंग मिळणे अवघड व्हावे. मराठी चित्रपटासाठी अशा वेळा दुर्मिळ, पण अभिमानास्पद.
मी चित्रपट पाहिला. मला हा चित्रपट आवडला नाही. मी ते फेसबुकवरही लिहिले. त्यावरही वादळ झाले. मला पार जातीयवादी म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली. असो. त्यांना ते स्वातंत्र्य आहे. पण मला हा चित्रपट का आवडला नाही त्याची काही कारणे मात्र मी देतो.
1) या चित्रपटाचा मुख्य दोष ही त्याची अस्ताव्यस्त पटकथा आहे. त्यात कसलीही सुसुत्रता नाही. 80% प्रसंग एकमेकांशी धागाच जोडत नाहीत. त्यामुळे सलग परिणामच येत नाही.
2) पात्रांचे व्यक्तीचित्रण करता आलेले नाही. खरे तर कोणतेही पात्र व्यक्तिमत्त्व म्हणून ठसत नाही. नायिका तेवढी बाजी मारते; पण बाजूची पात्रे ढिसाळ असली तर ठसठशीत पात्रेही कृत्रीम बाहुले बनून जातात तसेच नायिकेचे झाले आहे.
3) हा चित्रपट जात वास्तवावर आहे हे कसे पसरले हे मला माहित नाही. नायिका पाटील आहे आणि नायक कोळी. म्हणून हा या दोन जातींतील किंवा उच्च जातीय विरूद्ध निम्नजातीय अस संघर्ष आहे काय? नाही. कारण तसा तो असता तर नायिका पटवण्यासाठी चिठ्ठीचपाटीपासून ते पार ती पोहोत असलेल्या विहिरीत बिनधास्त उडी ठोकणारा नायक, आपण जिच्यावर प्रेम करत आहोत ती वरच्या जातीची आहे असा विचार करत असल्याचे कोठेही दिसत नाही. त्याचे जीवलग मित्रही तसा विचार करत नाहीत. एवढेच काय कॉलेजात तिच्यासाठी मारामारी होते, ती अवघ्या वर्गाच्या साक्षीने त्याच्याकडे एकटक पाहते तरीही वर्गात जातीय बोभाटा होत नाही. गावात तर दुरच.
4) नायिका या चित्रपटात धाडसी आहे; पण अशा धाडसी नायिका चित्रपटसृष्टीला नव्या नाहीत. भावाचा वाढदिवस. ती नायकाला तेव्हा किस देणार हे वचन देते. झींगाट गाणे होते. नंतर नायिका केळीच्या बनात एका कारमध्ये नायकाला दिलेले वचन पाळते. छतावरून हात धुवायला आलेल्या बापाच्या काहीतरी गडबड आहे हे लक्षात येते. तो माणसे पाठवतो. हे रंगेहाथ पकडले जातात. नायकाचा वाच ठेवणारा मित्र आणि नायक बेदम मार खातात. मामला नायकाच्या घरापर्यंत जातो. तेथेही नायक नायिकेच्या भावाचा मार खातो तसाच बापाचाही. येथेही नायकाने जातीमुळे मार खाल्ला असे नाही. कोणीही असता तरी मार खाल्लाच असता. कोणीही घराच्या आवारात पोरीशी चुम्माचाटी करतोय म्हटल्यावर मार दिलाच असता. हे वास्तव आहे पण जातीमुळे नायकाने मार खाल्लाय काय? तर नाही.
5) शहरी पार्श्वभूमी न वापरता खेडेवजा शहराची पार्श्वभूमी असलेली ही एक सामान्य प्रेमकथा आहे. प्रेमाच्या तर्हा वेगळ्या असल्या तरी त्या तद्दन फिल्मी आहेत. बरे, तसेही असायला हरकत नाही, पण प्रेम करावे तर आर्ची-परश्यासारखे असे वाटायला लावतील अशी भावनिक दृष्ये तरी आहेत काय? तर तेही नाही. प्रेक्षकाला उच्चजातीय मुलीबरोबर निम्न जातीय मुलगा प्रेम करतोय हे आधीच प्रदर्शनपूर्व ठसवले गेल्याने बाकी विचार करायच्या कोणी भानगडीतच पडत नाही आणि मुळात त्या दोघांचे एकमेकांवरचे प्रेमही नीट ठसत नसल्याने उत्तरार्धातील संघर्ष टोकदार व परिणामकारक ठरत नाही. मुळात या चित्रपटात नायक-नायिका प्रेमात पडतातच का? या प्रश्नाचे धड उत्तर नाही. तारुण्यावस्थेचा उंबरठा ओलांडणार्या मुला-मुलींचे प्रेम, जे बव्हंशी शारीरिक आकर्षणातून आलेले असते तसेच हे प्रेम आहे. त्यातही उत्कटता म्हणावी असे एकही दृष्य नाही.
6) खरे तर आधी साहसी वाटणारा प्रेमवीर नायक नंतर दुय्यम बनतो. सगळे डेरिंग करते ती नायिका. अगदी पळून जायचे, पोलीस स्टेशनमध्ये बापाला आणि पोलिसांनाही आव्हान देण्याचे, प्रियकराला मारणार्या गुंडांवर पिस्तूल झाडण्याचे डेरिंग नायिकाच दाखवते; पण या प्रसंगांतही विश्वसनीयता नाही एवढे ते नाटकी आहेत. मुळात तिचा बाप जर एवढा समर्थ आहे, पाटील आणि राजकीय नेता आहे तर पोलिसांत माझ्या मुलीवर बलात्कार केला, अपहरण केले अशी तक्रार करत बसण्यात व इज्जतीचा फालुदा करुन घेण्यात वेळ दवडण्याऐवजी त्याने, नंतरची मारहाण करत न बसता सरळ नायकाला वर पाठवले असते. चित्रपट संपेपर्यंत थांबायची गरज नव्हती. बरे या सर्व प्रसंगांतही नायक निम्न जातीचा आहे म्हणून हे सारे केले जातेय याचे सुचनतरी आहे काय? तर तेही नाही. म्हणजे असे दिसतेय की चित्रपट पहाताना कोणत्या दृष्टीने पाहायचा याची अप्रत्यक्ष जाहिरात तर केली गेली, लोक कोळी परश्या आणि पाटील अर्ची अशाच पद्धतीने चित्रपट पाहतात... पण चित्रपट, जी एक कलाकृती असते, त्या कलाकृतीत या छुप्या पूर्वप्रसिद्धित, प्रत्यक्षात काही आहे काय? नाही. म्हणजे एक तर दिग्दर्शक तरी घाबरलाय किंवा पटकथाकार तरी. सुचक पद्धतीनेही हे जातीय संदर्भ (जर चित्रपट जात वास्तवाबाबत असता तर) देता आले असते; पण मुळात हा चित्रपट जातीबाबत नाहीच आहे. पुर्वप्रसिद्धी आणि नंतच्या चर्चा मात्र जातीय आहेत.
7) उत्तरार्ध पुर्वार्धापेक्षा जरा बरा आहे. फिल्मीपणाने तोही भरला असला तरी विपरित स्थितीत पळून जाऊन लग्न करणार्याना जे काही अनुभव येतात ते येथे स्युडो-रिअलिस्टिक पद्धतीने येतात. पटकथा येथेही फसलेली आहे. खरे म्हणजे स्वप्नाळू जगाकडून भिषण वास्तवाकडे होणारा प्रवास व त्याची सांध जुळवत जगण्याशी सांधलेली नाळ असा जो प्रवास आहे तो पटकथाच (व दिग्दर्शनही) फसल्यामुळे मुळात प्रत्ययकारी होतंच नाही. नायक-नायिकेशी प्रेक्षक म्हणून रिलेट होताच येत नाही. चित्रपटातील अनेक घटना प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही प्रमाणात होऊनच गेलेल्या असतात. तेवढ्या स्मरणरंजनापुरते काही प्रसंग कामी येत असले तरी चित्रपटात ते एकुणातील परिणाम साधत नाहीत. बरे त्यांना तुकड्यातुकड्याने सामोरे येणारे प्रत्ययकारी सत्य म्हणावे तर तेही नाही. उदा. चित्रपटात अचानक कोळी जातपंचायतीचा कसलाही संदर्भ नसणारे अचानक दृष्य येते... तेही अनिर्णित... कसलेही वास्तव न मांडणारे, मागचा पुढचा संदर्भ न देणारे आणि तेही अस्थानी. असायलाच हवे होते तर ते आधीच.
8) उत्तरार्धात बालीश बाबी अनेक आहेत. त्या खर्या जीवनातही घडू शकतात हेही आपण मान्य करू. झोपडपट्टीतून चाळीकडे व चाळीकडून फ्लॅटकडे होणारा प्रवास नायक नायिका करतात. त्यांना मुलही होते. मुल तिनेक वर्षाचे झाल्यावर नायिकेचा भाऊ व काही नातेवाईक तिला भेटायला येतात. येथून पुढचा शेवटचा भाग जवळपास मूक अहे. एका सुरुवतेचा दुर्दैवी शेवट आहे.
पण खरेच सुन्न व्हायला होते का?
मला तरी झाले नाही. वृत्तपत्रातील ओनर किलिंगच्या बातम्या वाचून मी सुन्न झालेलो आहे; पण येथे दृश्य मनावर काहीच परिणाम करत नाही. चित्रपटात नायक-नायिकेला प्रत्यक्ष मारताना दाखवलेले नाही; पण गळे चिरुन मारले गेल्यानंतर व त्याआधीचा जीवन-मरणाशीचा संघर्ष त्या खोलीत दिसत नाही. शिस्तीत निपचित गळे चिरलेली प्रेते आहेत. सारे बाकी जेथल्या तेथे आहे. जणू काही त्यांनी अत्यंत शांततेने मरण स्वीकारले आहे.
राहिले आकाशचे... त्यांच्या मुलाचे. हा शेवटचा प्रसंगच बालिश वाटतो कारण आकाशची शिक्षिका (वा बालवाडीतील मॅडम) या प्रसंगाआधीच त्याला घेऊन जातात तेव्हा नायिका, बाळ व बाई संवाद साधतात. ती मुलाला परत सोडायला येते. घराचे दार बंद आहे. ती आकाशला बंद दारासमोर सोडून देते. निघून जाते. असे होते का? जे पाहयचेय ते इवला आकाश पाहतो. त्याची रक्ताळलेली पावले काळजावर ओरखडा उमतवत नाहीत कारण मुळात सारेच कृत्रीम वाटते.
मला हा चित्रपट आवडला नाही. मी तसे लिहिले तर काही मंडळीने मलाच जातीयवादी ठरवले. मला समीक्षण करायचीही इच्छा नव्हती, कारण त्या योग्यतेचा हा चित्रपट आहे असे मला वाटलेच नाही. जातवास्तव सोडून द्या... ते असतेच तर हैद्राबादमध्येही नवपरिणत जोडप्याला जातीचे फटके बसलेच असते... ते नाहीत. त्यांना मारले... का? केवळ दिग्दर्शकाला अथवा पटकथाकाराला चित्रपटाचा काहीतरी शोकांतिक शेवट असावा असे वाटले म्हणून. त्यात दिग्दर्शकीय नैसर्गिकपणा कोठे आहे? तोच अपरिहार्य शेवट असावा असे निर्देशनही कोठे आहे?
पण जातीय चष्मे घालून बव्हंशी हा चित्रपट पाहिला जातो आहे. आता तर नायिकेची जातही शोधली गेली आहे. नायकाची जातही लवकरच घोषीत होईल असे दिसतेय. भविष्यकाळात अभिनेते, दिग्दर्शक ते पार चित्रपटाचे स्पॉटबॉय यांची जात कोणती याचे शोध लावले जातील... त्यावर हिरीरीने चर्चा होतील...
चांगले आहे! पण आक्षेप हा राहतो की कलाकृतीत जे नाहीच ते आहे असे समजून जातीय वाद करावेत काय? हा चित्रपट प्रत्यक्ष सोडा, अप्रत्यक्षही जातवास्तवाबाबत बोलत नाही की सुचितही करत नाही. मुलगी पाटील आहे आणि मुलगा कोळी अशा विरोधाभासी जातीय जीवनाचेही चित्रण या चित्रपटात नाही. मुलगी राजकारणी बापाची आहे आणि ती एका मुलाबरोबर पळून गेली म्हणून बापाचे राजकीय जीवन धोक्यात आले आहे असे संकेत मिळतात, पण मुलगी खालच्या जातीतील मुलाबरोबर पळून गेली म्हणून तसे झाले असेही सुचन नाही. समजा तो अंडरकरंट आहे व दिग्दर्शक ते स्पष्ट दाखवू इच्छित नाही, प्रेक्षकांच्याच विचारशक्तीवरच सोडतोय... तर मग यातून अनेक अन्वयार्थ काढता येतील... ते जातीयच असतील असे नाही. हा संघर्ष सरळ सरळ अमीर-गरीब स्टाईलचा वाटेल किंवा बापालाच जगजाहीर अपमानित करुन पळालेल्या मुलीचा आणि ज्याच्यासाठी हे घडले त्या मुलाचा मुलीच्या बापाने (तापट मुलाच्या माध्यमातून) घेतलेला सूड असेही वाटू शकेल...
पण जातीय खदखद प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षही या चित्रपटात नाही. हा चित्रपट एका जातीच्या (म्हणजे मराठ्यांच्या) विरोधात व कोळी (किंवा निम्नजातीय) बाजूने आहे असेही नाही. असे एकही दृष्य नाही, संवाद नाही किंवा सुचनही नाही. आंबेडकरवादी सध्या नायकाच्या शोधात आहेत. कधी त्यांना कन्हैयात नायक दिसतो तर आता नागराजमध्ये. या चित्रपटाने तर नायिकाही दिली आहे. उद्या कोणात नायक-नायिका दिसेल हे माहीत नाही. हे नायकबदलुपण घातक आहे हे आंबेडकरवाद्यांना समजायला हवे. कारण या चित्रपटाचे कडवे समर्थक आंबेडकरवादी आहेत हे वास्तव नाकारता येत नाही.
आपला समाज जातीयवादी आहे हे जातवादावर दुरान्वयानेही भाष्य न करणार्या चित्रपटाने सिद्ध करावे हे दुर्दैवी आहे. मराठा समाजही यात मागे राहिला नाही. त्यानेही आपल्या वर्चस्वतावादी विकृत दुगाण्या झाडल्याच... कोणत्या ना कोणत्या बहाण्याने. आपल्या समाजात जात वास्तव आहे व जातीय अत्याचारही आहेत हे वास्तव मान्यच करायला हवे; पण हे जातीय अत्याचार आता तथाकथित उच्चजातीयच करतात असे आता राहिलेले नाही. काही शारीरिक जातीय अत्याचार करतात तर काही मानसिक... एवढाच सध्या तरी फरक आहे... उद्या उलटेही होऊ शकते.
सैराट एक फसलेली साधी शोकांतिक प्रेमकहानी आहे, तीही दिग्दर्शकीय फसलेली. ओनर किलिंगचा त्याला टच दिलाय पण तो कृत्रीम आहे. काहीतरी शेवट हवा म्हणून लांबलेल्या चित्रपटाला अचानक थांबवण्यापुरतीची ती क्लृप्ती आहे. एवढेच!
- संजय सोनवणी
९८६०९९१२०५
(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
उपेक्षित पुस्तकांचे जग
साप्ताहिक 'चपराक', पुणे
- भारत सासणे

'काळ्या शुक्रवारा'बद्दल मी ऐकून होतो, पण त्याबाबतचा वृत्तांत मी असाच, रद्दीतल्या दुर्लक्षित पुस्तकातून मिळवला. 19 मे 1780, वेळ सकाळ. स्थळ अमेरिकेतला ’न्यू इंग्लंड’ हा परगणा. सकाळी दहाच्या सुमारास गर्द अंधार न्यू इंग्लंडवर पसरला. हा अंधार वाढत राहिला आणि मेणबत्त्या पेटवाव्या लागल्या. शाळा, कारखाने बंद झाले. हाहाकार माजला. चर्चमध्ये जमून प्रार्थना म्हटल्या जाऊ लागल्या. ’परमेश्वरी कोपाचा दिवस’ म्हणून धर्मोपदेशकांनी या दिवसाबद्दल सांगितलं.
मेन प्रांत, न्यू हँपशायर, मॅसाच्युसेटस, र्होड आयलंड आणि कनेक्टिकर या प्रांतावरही हा अंधार पसरला. न्यूयॉर्कचा पूर्व भाग आणि पेन्सिल्व्हानियाचा ईशान्य भागसुद्धा अंधाराखाली होता. चार वाजता अंधार गडद झाला आणि हिरवट प्रकाशाची आभा अनेकांनी अनुभवली; पण हा दिलासाही नाहीसा झाला. अंधार वाढत राहिला. रात्री पौर्णिमेचा चंद्र दिसायला पाहिजे होता; पण तोही दिसला नाही. रात्री एक वाजता मात्र, तांबडा चंद्र आकाशाच्या मध्यावर दिसला. पहाटे मात्र सूर्य उगवला. चौदा तासांचं अंधाराचं साम्राज्य संपलं. जल्लोश झाला. हा ’काळा शुक्रवार’ म्हणून नोंदवला गेला आहे. विज्ञानाला न सुटलेलं कोडं किंवा सुरस विज्ञानिका म्हणून याकडे पाहिलं गेलं असेल. मी मात्र सतराव्या शतकातील मानसिकता पाहतो आहे. नक्कीच या ’महानाट्यावर’ कोणी काही कादंबरी इत्यादी लिहिली असेल. मला तरी अजून त्या घटनेवरची लिहिलेली कृती हाती लागलेली नाही; पण रद्दीत या ऐतिहासिक महानाट्याचा वृत्तांत सापडला. सैरावैरा धावणार्या लोकांचे जथ्थे दिसले. भय दिसलं. उपेक्षित-दुर्लक्षित पुस्तकातून हे भयनाट्य दिसलं.
पुरोहित स्वामींच्या मूळ पुस्तकाचं नाव ‘ऍन इंडियन मंक’ असं आहे. सन एकोणीसशे बत्तीसमध्ये या पुस्तकाची जुळवाजुळव झाली आहे. पुढे, मराठीत याचा अनुवाद उपलब्ध झाला आहे. या पुस्तकाला सांप्रदायिक महत्त्व असेलच. म्हणून सांप्रदायिक श्रद्धाळूंनी ते वाचलं असणार. इतरांनी ते पुस्तक आवर्जून वाचावं असं काही कारण नाही. म्हणून मूळ पुस्तक दुर्लक्षित राहिलं आहे; पण या पुस्तकाला कवी यीटस्ची प्रस्तावना आहे. ‘गीतांजली’ नंतर वीस वर्षांनी आपल्याला पुन्हा प्रस्तावना लिहिण्याचा योग आला आणि हे पुस्तक तितकंच महत्त्वाचं आणि योग्यतेचं आहे असं कवी यीटस् म्हणतात.
साधना काळात पुरोहित स्वामी भटकंती करीत माहूरला पोहचले. माहूरला दिनक्रमानुसार दत्तशयन आहे. या तरूण साधकाने मंदीरात रात्री थांबून खात्री करण्याचे ठरविले. पुजार्याने त्याला परवानगी दिली आणि कुलूप लावून तो निघून गेला. तरूण साधक मंदीरात, दत्तशय्येच्या बाहेर एकटाच आणि जागा. रात्री दीड वाजता सुगंध आणि पादुकांचे आवाज. जणू कोणी येत आहे. साधकाचे सर्वांगाचे केस भीतीने उभे राहिले. रात्रभर कुणी कूस बदलत आहे अशी चाहूल. पुन्हा पहाटे कुणी निघून जातंय असा पावलांचा आवाज. दुसर्या दिवशी साधक फुलांनी शय्या सजवतो आणि शाल ठेवतो. दुसर्या दिवशी, फुलं आणि शाल विस्कटलेली सापडते. साधक आणि पुजारी आनंदित होतात.
कवी यीटस् यांनी प्रस्तावनेत या प्रसंगाबद्दल लिहिताना आपण त्या अनोख्या विश्वात डोकावू शकलो आणि प्रत्यक्षानुभवाची आपली इच्छा-भूक भागली असं म्हटलं आहे.
स्वामींनी सांगितलेली हकीकत खरी की खोटी हा प्रश्न इथे महत्त्वाचा नसतो. सांगितलेली हकीकत अप्रमाणिक, असं म्हणून आपण स्वत:ची सुटका करून घेऊ शकतो; पण इथे मुद्दा अज्ञेयात, किंवा अनोख्या जगात डोकावण्याच्या संधीचा आहे. पुन्हा, मी या तरूण साधकाची मानसिकता पाहतो. एकाकी भ्रमंती करणारा साधक चिकित्सक बुद्धी जागृत ठेवतो आहे. श्रद्धेपेक्षा त्याला प्रयोग महत्त्वाचा वाटतो. त्याला जे पाहायचं आहे तेच त्याला दिसतं आहे आणि तत्कालीन समाजमानस शास्त्राबद्दलही थोडं आपल्याला समजतं आहे. अविश्वसनीय म्हणून मी ही हकीकत बाजूला सारत नाही. तत्पूर्वीच मी थांबतो. हे थांबणं महत्त्वाचं-कवीच्या भाषेत, 'थांबणे अघोरी कला!'
(पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक 'चपराक', पुणे)
‘वाचनसंस्कृती संपुष्टात आली’ अशी तक्रार सर्वच पातळीवरून मोठ्या प्रमाणात केली जाते. पुस्तक मिळविणे आणि सर्वांनी वाचणे हा ‘कौटुंबिक कार्यक्रम’कोणे एकेकाळी अनुभवाला येत होता. तो आता दृष्टिस पडत नाही. ‘मराठी भाषेतून शिक्षण दिले जात नाही, त्यामुळे नवी पिढी वेगाने मराठी साहित्यापासून दूर जाते आहे’ असेही निरीक्षण नोंदविले जाते. दुसर्या बाजूने 40 ते 65 या वयोगटातील रसिकवाचनवेडा माणूस पुस्तकाच्या शोधात मुशाफिरी करताना दिसतो. अशांची संख्या अत्यल्प असली तरी अशा ‘मुशाफिरी’मुळे पुस्तकांचा शोध, दुर्मीळ पुस्तकांची दखल घेण्याची प्रवृत्ती आणि वाचनावरील प्रेम हे घटक अजूनही समाजात टिकून आहेत. त्या अनुषंगाने काही उपेक्षित पुस्तकांची भेट कशी कशी होत गेली त्याचा वृत्तांत व त्या पुस्तकांचा संक्षिप्त परिचय सुप्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे यांच्या या नव्या सदरातून करून देण्यात येत आहे.
साप्ताहिक 'चपराक'चे नवे सदर!

उपेक्षित पुस्तकांचे जग
दिल्लीतली एक सकाळ. एक फूटपाथ आणि त्यावर रचून ठेवलेला पुस्तकांचा ढीग. आपण या फूटपाथवरून हळूहळू पाहत पाहत चालत राहायचं असतं. डाव्या किंवा उजव्या बाजूला अनेक पुस्तकं असतात. दुर्मीळ, उपेक्षित, फाटलेली, अत्यंत जुनी, क्वचित नवीसुध्दा. इथे तुम्हाला हवी असलेली पुस्तकं हमखास मिळू शकतात. फक्त शोधण्यासाठी भरपूर वेळ आपल्याकडे असला पाहिजे आणि चिकाटी देखील असली पाहिजे. येथे फक्त दर्दी मंडळी गर्दी करतात आणि ही गर्दी भाजीमार्केटमध्ये असावी इतकीसुध्दा असू शकते. म्हणजे पुस्तकं शोधायला माणसांची जास्त गर्दी असत नाही, ही आपली कल्पना इथे उधळली जाते. आपण हळूहळू चालत राहायचं असतं आणि शांतपणे पुस्तकं शोधत राहायचं असतं. कोणतं माणिक अचानकपणे हाती येईल याचा काही नियम इथे नसतो. इथे गर्दी असली तरी गोंगाट मात्र नसतो. माणसं शांतपणे भोवतालच्या जुन्या पिवळ्या पडलेल्या पुस्तकांच्या रद्दीमधून हिरे-मोती आणि मौल्यवान रत्नं शोधत असतात. आपणसुध्दा शांतपणे हिंडून हेच करायचं असतं. मी येथे हिंडतो, पाहतो आहे. मला योगी अरविंदांच्या छायाचित्रांचा कुणीतरी फार पूर्वी प्रकाशित केलेला संग्रह सापडतो किंवा महात्मा गांधींची फारशी माहीत नसलेली पत्रे दुर्लक्षित पुस्तकांतून छापलेली सापडतात. मृच्छकटिकची खूप जुनी प्रत सापडते. हडप्पा व मोहोंजोदडो येथे सापडलेली चित्रलिपी वाचली गेली नाही असा आपला समज करून देण्यात आलेला असतो; पण येथे ’द इन्डस स्क्रिप्ट ऍन्ड द ॠग्वेद’ हे पुस्तक अचानक सापडतं. ब्रिटीश साहसिकांनी गंगा नदीतून केलेल्या प्रवासावर आधारित रोमहर्षक असं 1932 मध्ये लिहिलेलं पुस्तक सापडतं. आपण शोधत राहायचं असतं. आपल्या हाती काय सापडेल याचा इथे नियम नसतो.
उपेक्षित पुस्तके दुर्मीळ असतात आणि दुर्मीळ पुस्तके उपेक्षित राहत जातात, असा काहीतरी नियम आहे. जी पुस्तके आपण वाचली पाहिजेत असं काहींना वाटतं त्यांच्याकडून काही पुस्तके आपल्याला वारंवार उपलब्ध करून दिली जातात आणि म्हणून कदाचित वाचकप्रिय ठरतात. त्याव्यतिरिक्त उपलब्ध साधनसामुग्रीच्या आधारे वाईट पध्दतीने छापलेली, मुद्रण दोष असलेली, चुकीच्या प्रकाशकाच्या हातात पडलेली अशी अनेक उत्तम व उपेक्षित पुस्तके पर्यायाने दुर्मीळ होत जातात. अशा पुस्तकांचा शोध घेणं हे चांगल्या वाचकासमोरचं आव्हान असतं.
* * *
उपेक्षित पुस्तकांचं एक विश्व आहे. अफाट, विशाल असं. मुळात पुस्तकांचं विश्वच इतकं विशाल आहे की एक जीवन संपून जातं तरी पुस्तकं शिल्लक राहतात. या विश्वात हरवून जाण्याचं भाग्य सर्वांच्या वाट्याला येत नाही. थोडे भाग्यवान त्या वाटेने जातात आणि ‘काळ अनंत आहे-पृथ्वी विपुल आहे’ असा अनुभव घेतात. उरलेले थोडे या मार्गावर घुटमळतात पण हरवून जात नाहीत. मात्र ज्ञानप्रकाशाने दिपून जातात. बाकी बहुसंख्य अन्न-वस्त्र-निवारा निर्माण करण्यासाठी अर्थार्जन नावाचा संघर्ष करीत राहतात आणि संपून जातात. पुस्तकांच्या जगाचा आणि त्यांचा त्यामुळे संपर्क येत नाही.
किती प्रकारची किती पुस्तकं अस्तित्त्वात आहेत! एक लेखक वाचनालयात जायला घाबरत असे. तो म्हणे की आपण एखादंच पुस्तक लिहिण्यासाठी आत्म्याची ताकद पणाला लावतो आणि इथं किती पुस्तकं आहेत! त्या तुलनेने आपली पुस्तकं किती आणि आपलं स्थान काय? आपण किती छोटे-नगण्य आहोत! स्वत:च्या ’छोटेपणाचा’ अनुभव देणार्या पुस्तक संग्रहालयाकडे तो फिरकत नसे म्हणे.
उपेक्षित पुस्तकांचं एक वेगळं विश्व आहे. या पुस्तकात काहीतरी विलक्षण असं असतंच. काहीतरी सांगायचंही असतं, पण दुर्लक्षित राहिलेलं असतं. प्रचलित वाटांनी न जाता, अशा दुर्लक्षित पुस्तकांचा मागोवा घेणं जास्त अवघड आणि साहसाचं काम असतं. त्यातून प्रसिद्ध पुस्तके सगळेच वाचतात. मात्र अशा उपेक्षित पुस्तकांना कोण वाचणार? मी मोठ्या कुतुहलाने अशा दुर्लक्षित पुस्तकांचा शोध घेण्याची सवय ठेवली. विलक्षण असं बरंच हाती लागू शकतं असं लक्षात आलं.
* * *
कोण्या व्यं. तु. कुलकर्णी नावाच्या माणसाने एक छोटंसं चोपडं लिहिलं आहे, ’गंडातराच्या फेर्यात’ नावाचं. वाईट छपाई, पिवळी पानं, यामुळे त्या पुस्तकाला कोणी हात लावला नसणार. या लेखकाने सन एकोणीसशे वीस पासूनच्या आठवणी सांगितल्या आहेत. प्रदेश जुन्या निजामशाहीचा. दुर्गम आणि मागास असा. लेखकाचा दावा असा की तो सामान्य जीवन जगला असला तरी त्याला सतत ’गंडांतरांना’ तोंड द्यावं लागलं आहे. लेखकाने पुढीलप्रमाणे नोंद केली आहे, ’एखाद्या सामान्य माणसाच्या आयुष्यात किती म्हणून अपघात होऊ शकतात? आणि त्या प्रत्येक अपघातातून प्रत्येक वेळी मरणाच्या दारात जाऊन तो परतही कसा येऊ शकतो? दुसर्या कुणाचे माहीत नाही परंतु माझ्या स्वत:च्या आयुष्यात मात्र मी आतापर्यंत कितीतरी गंडांतरात सापडलो आहे, ज्यामध्ये मरणाशिवाय पर्याय नव्हता... माझे जीवन अगदी साधे, सामान्य आणि धोपटमार्गाने गेले आहे... तरीही त्यात कितीतरी अपघाताची आणि संकटाची मालिका आहे...’
कुलकर्णी निजामाच्या राज्यात नोकरीत होते. मराठवाडा-तेलंगणात. पोलेपल्ली या गावात मुक्कामाला असताना मित्राबरोबर ते माडपल्ली गावावरून पायी परतत होते. मित्र म्हणाला की मी मळ्यातून थोडी भाजी घेऊन येतो, तुम्ही थांबा. कुलकर्णी वाट पाहत थांबले आणि शेजारच्या ’पपईच्या झाडाला’ टेकून उभे राहिले. झाड मऊ आणि थंड लागले. तसं हाताने चाचपडून पाहू लागले तर दोन महाभुजंग त्यांच्या दोन्ही बाजूने ’धप्पकन’ पडले आणि त्वरेने निघून गेले. कुलकर्णी ज्याला पपईचे झाड समजले ती प्रत्यक्षात बारा फुटी लांबीच्या प्रचंड महाभुजंगाची ’लागड’ होती. शेपटीवर उभे राहून ते सर्प प्रणय करीत होते. कुलकर्णींची बोबडी वळाली. घाबरलेले हे दोन मित्र पोलेपल्ली गावात आले. पोलेपल्ली ते माडपल्ली या डोंगरामध्ये हे दोन महाभुजंग काही लोकांनी पाहिले होते. कुलकर्णी ही हकीकत रंगवून सांगतात आणि त्यांनी आपल्याला दंश का केला नाही याचा विचार करतात. धप्पकन पडून दोन दिशेने निघून जाणारे प्रचंड सर्प आपल्याही डोळ्यासमोर उभे राहतात.
ग्रामीण जीवनाचा वन्य जीवनाशी संपर्क तुटला नव्हता त्या काळातील, दुर्गम भागातली अस्वलांची आठवण कुलकर्णी सांगतात. काही मित्रं आणि कुलकर्णी स्वत: हैद्राबाद सरकारच्या आदेशानुसार मधुमक्षी पालनाच्या संशोधनाच्या कामावर होते. देवरकुंडा तालुक्यातील चिंतापल्लीच्या (चिंचवनाच्या) जंगलात मधमाशांची पोळी हुडकण्याचे काम त्यांना करायचे होते. एकदा दहा किलो मध काढून, चपराशाजवळ भांडी देऊन, टॉर्च घेऊन ते पहाड उतरत होते. तेव्हा अस्वलांच्या टोळीने त्यांचा पाठलाग सुरू केला. बादलीतला मध एका दगडावर ओतून ठेवला त्यांनी. कारण तो मध चाटून खाईपर्यंत यांना इकडे लपण्याची व्यवस्था करता आली असती; पण चपराशांना मात्र सरळ मार्गाने धावत जायच्या सूचना देण्यात आल्या. अस्वले कुलकर्णींच्या मागावरच होती. कुलकर्णी आणि मित्रांनी हत्तीपेक्षा मोठ्या तीन दगडांच्या पोटातल्या पोकळीत आश्रय घेतला आणि चुलीसारख्या रचनेचं तोंड एका मोठ्या दगडाने बंद करून टॉर्च घेऊन बसून राहिले. एक तास काही घडलं नाही. मग मात्र त्यांच्या दगडी निवार्याभोवती अस्वले फिरत आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. आतून काटक्या पेटवून शेकोटी करण्यात आली. झरोक्यातून अस्वले त्यांच्याकडे रात्रभर पाहत होती पण अस्वले आत आली नाहीत. गेलीही नाहीत. आतला एक सर्पराज मात्र धुरामुळे बाहेर पडला. त्याला आतल्या आत त्यांनी दगडांनी मारलं आणि पहाटे बाहेर पडून मित्रमंडळी धावत सुटली. अस्वले मात्र कंटाळून दूर गेली होती.
कुलकर्णी आपल्या छोटेखानी पुस्तकात असे अनेक प्रसंग सांगतात. अपघाताने प्रेतागारात अडकून पडावे लागणे, निजामशाहीतील रझाकारांशी सामना, सापाने केलेला पाठलाग, पाण्यातून वाहून जाण्याचा प्रसंग, भुताचे दर्शन, वाघाने केलेला पाठलाग, माकडांच्या टोळीत सापडण्याचा प्रसंग, मराठी माणसांसाठी बलुची लोकांशी केलेले भांडण आणि मराठी माणसांची निष्क्रियता इत्यादी प्रसंग कुलकर्णी यांनी रंगवून सांगितले आहेत.
हे पुस्तक रद्दीत पडलं होतं. छापणार्याने बहुधा ’कुमार वाङमय’ म्हणून छापलं असावं. (आणि वाईट छापलं होतं!) वाचणार्याने (कोणी वाचलं असेल तर) सुरस कथा म्हणून वाचलं असेल. सांगणार्याने मात्र सर्वस्व ओतून सांगितलं आहे. कारण निदान तेवीस वेळा तरी त्याचा मरणाशी मुकाबला झाला आहे. आता या पुस्तकाचं साहित्यमूल्य काय आहे? वाङ्मयीन इत्यादी दर्जा काय आहे? या पुस्तकाकडे कोण लक्ष देणार? माझ्यासारखा रद्दीतून मोती शोधणारा एखादा कदाचित ते पुस्तक वाचेल. एरव्ही हे पुस्तक उपेक्षित, दुर्लक्षित असंच राहणार आणि भेळवाल्याकडे जाणार.
(पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक 'चपराक' पुणे)
- भारत सासणे
204, लक्ष्मी एनक्लेव्ह,
गणेश खिंड रस्ता,
मॉडेल कॉलनी जवळ,
शिवाजीनगर, पुणे 411016.
भ्रमणध्वनी : 9422073833
(परीक्षण पूर्वप्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक', पुणे)

‘‘आय हॅव बीन इन टू पॉलिटीक्स ऑल माय लाईफ.’’ हेच ते वाक्य. ते वाचून काही अंदाज येतो? हे वाक्य कुठल्या क्षेत्रातील व्यक्तीचं आहे याचा? अचूक अंदाजाच्या जवळपास तरी पोहोचता येईल? खूप कठीण आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस! किंवा नेल्सन मंडेला, फिडल कास्ट्रो, चे गव्हेरा यांनाच शोभून दिसेल असं हे वाक्य! मग ते आहे तरी कुणाचं? तर ते एकेकाळच्या अंडरवर्ल्ड गँगस्टरचं आहे! दचकलात ना? मग आता त्याची कहाणी वाचाच! ग्रेगरी डेव्हीड रॉबर्टस्! आधी ऑस्टे्रलिया, मग मुंबई. दोन्हीकडच्या अंडरवर्ल्डमध्ये वावरलेला हा गँगस्टर. त्याच्या आत्मचरित्रातलं हे वाक्य. शितावरून भाताची परीक्षा होते व या एका वाक्यावरून गे्रगरी डेव्हीड रॉबर्टसची. त्याचं हे मूळ इंग्रजी आत्मचरित्र, ‘शांताराम’! जगभर गाजलं ते. ग्रंथाची धाटणी आत्मचरित्रात्मक कादंबरीची. तीसपेक्षा अधिक भाषांत याचं भाषांतर झालं. पन्नास लाख प्रती खपल्या त्याच्या. मग ते आलं मराठीत. ते केलं नाशिकच्या अपर्णा वेलणकरांनी. मराठी भाषांतर मोठं झालं. चौदाशे पानं. मूळ लेखनच अतिशय प्रांजळ. थेट ‘सत्य’ सांगणारं. अगदी त्याच्या आयुष्यातले सत्याचे प्रयोगच! सगळी सत्ये जीवघेणी! अंगावर येऊन आदळणारी! ग्रेगरी जणू जन्मजात लेखक! जन्मानं ऑस्ट्रेलियन. त्याचा आवाका अफाट! सगळ्याच बाबतीतला. मानवी आयुष्य, अंडरवर्ल्ड, अवती भोवतीचं व अगदी आंतरराष्ट्रीय राजकारण, इतिहास सगळ्याच बाबतीतली समज अफाट! दुसरीकडे अपर्णा वेलणकर! पेशानं पत्रकार व भाषांतरकार. वेलणकरांना शंभरपैकी दोनशे गुण द्यावेत. तसं भाषांतरच केलंय शांतारामचं त्यांनी. साहित्याच्या क्षेत्रातले सगळे पुरस्कार. ते सगळे ओवाळून टाकावेत असं हे भाषांतर! कठीण काम होतं; मात्र ते किती चोख करावं? त्याचं हे उदाहरण. असं असलं तरी या भाषांतराला कुठलाही महत्त्वाचा पुरस्कार मिळाल्याचं ऐकण्यात वा वाचण्यात नाही. असो!
मग ग्रेगरी असं नेमकं का म्हणतो? ‘‘आय हॅव बीन इन्टू पॉलिटिक्स ऑल माय लाईफ.’’ त्यासाठी त्याच्या वादळी आयुष्यातली ही सगळी पानं. ती काळजीपूर्वक वाचावी लागतात. दोनदोन वेळा वाचावी लागतात. प्रसंगी तीन-तीनदा वाचावी लागतात. या आत्मचरित्रात्मक कादंबरीची सुरूवात. ती मुंबई शहरापासून होते. अर्थातच ग्रेगरीच्या आयुष्यात मुंबईचं स्थान खूप महत्त्वाचं; मात्र ही कहाणी त्याच्याही खूप आधीपासून सुरू होते. ग्रेगरीच्या तरूणपणापासून. ‘‘कट्टर साम्यवादी विचारांच्या कुटुंबात मी वाढलो.’’ ग्रेगरीनंच आत्मचरित्रात हे सांगितलं आहे. त्याच्यावर हा संस्कार त्याच्या आईकडून झाला. आई-वडिलांबद्दल त्यानं अत्यंत मोजकंच लिहिलंय. अगदी सगळं मिळून फार तर पानभर असेल ते; मात्र त्यावरूनही वाचकांना काही कयास करता येतो. ग्रेगरीची आई पक्की समाजवादी होती. खूप खंबीर स्त्री असली पाहिजे ती. ‘‘आयुष्यात जे काही करशील ते हिमतीनं कर. हिंमत हारला नाहीस तर फार भरकटणार नाहीस तू!’’ त्याची आई एकदा त्याला म्हणाली होती. दुसरा मुद्दा ‘मी आयुष्यभर राजकारणच जगलो’ असं तो जे म्हणतो त्याचा. कुठलाही साम्यवादी तरूण घ्या, त्याचा राजकारणाचा अभ्यास असतोच. अनेक राजकीय प्रश्नांचा तो विचार करत असतो. सामाजिक प्रश्नांचा विचार करत असतो. अभ्यासाची सवय असते. ग्रेगरीचं तसंच झालं. अशी मुलं मग अनेक चळवळीत भाग घेतातच. कर्तव्य म्हणून करतात हे ते सगळं. गे्रगरीलाही राजकारण खूप लवकर उमगू लागलं. अगदी आंतरराष्ट्रीय प्रश्नही समजू लागले. अमेरिकनं व्हिएतनामवर युद्ध लादलं हा तो काळ. या युद्धात अमेरिकेनं ऑस्ट्रेलियालाही ओढलं. व्हिएतनामनं अमेरिका व ऑस्ट्रेलियाला कठोर प्रतिकार केला. अनेक अमेरिकन व ऑस्ट्रेलियन सैनिकांचे बळी जाऊ लागले. अमेरिकेत युद्धविरोधी निदर्शन सुरू झाली. ऑस्ट्रेलियातही हेच घडलं. तिथले तरूण रस्त्यावर उतरले. मागणी करू लागले. ऑस्ट्रेलियानं युद्धातून माघार घ्यावं ही ती मागणी. या रस्त्यावरच्या तरूणांमध्ये ग्रेगरी होताच. त्यावेळी प्रसंगी त्यानं बॉम्बही बनवले. मोर्चे काढले. पोलिसांविरूद्धच्या रस्त्यावरील लढाया लढल्या. एकतर अमेरिकेचं व्हिएतनामवरचं आक्रमणच होतं हे. व्हिएतनाममधल्या बळींची संख्याही थोडी थोडकी नव्हती. ग्रेगरीचा पिंड साम्यवादी विचारांच्या मुशीत घडलेला. या आक्रमणाकडे तो सर्वच बाजूंनी पाहत असला पाहिजे. त्यातल्या साम्राज्यवादी राजकारणात लक्षावधी माणसांचे बळी जात होते. ते पाहून त्याची झोप उडाली नसती तरच नवल.
तरूण वयात प्रत्येकाचा कोणीतरी हिरो असतो. तसा ग्रेगरीचाही होता. नेड केली. हा केली तेव्हा पोलिसांशी झालेल्या एका चकमकीत मारला गेला. या गोष्टीचा गे्रगरीवर खूप खोल परिणाम झाला. आंतरराष्ट्रीय क्रांतिकारक ‘चे गव्हेरा.’ या गव्हेराचं स्थानही ग्रेगरीच्या आयुष्यात खूप मोठं; मात्र ‘चे’ बद्दल त्यानं एखादं वाक्यच लिहिलं आहे. त्यावरून त्याची ‘चे’ वरची श्रद्धा मात्र समजते. ग्रेगरीचं ते तरूण वय. त्यात कवी मन. सगळ्या क्रांतिकारक चळवळीत सहभाग. असा सगळा त्याचा तो काळ. त्याच दरम्यान तो प्रेमात पडला. तो व ती. दोघं एकमेकांच्या प्रेमात. नाव सांगितलंच पाहिजे तिचं. क्लेरी. देखणी होती ती; मात्र वस्ताद. इतक्या उमद्या मनाचा तरूण तिच्या आयुष्यात आला होता! तिला आनंद व्हायला हवा होता याचा. अभिमान वाटायला हवा होता त्याचा; मात्र पोरगी पक्की व्यवहारी व धूर्त! अगदी कावेबाज म्हणायलाही हरकत नाही. तिला जाणवलं, हा माणूस पटेल ते करणारा. स्वतःपेक्षा अवती भोवतीच्या परिस्थितीचा विचार करणारा. आपण समाजाचं काही देणं लागतो असं मानणारा. त्याचं हे असं असणं. तिला चक्क बेजबाबदारपणाचं लक्षण वाटायला लागलं ते. मग या अंबाबाईनं एका बेसावध क्षणी काय करावं? या लेकराला तिनं चक्क सांगून टाकलं, ‘‘यू आर इंटरेस्टेड इन एव्हरीथिंग ऍन्ड कमिटेड टू नथींग.’’ (तुला सगळ्यात तोंड घालायला आवडत, पण जबाबदारी घ्यायला तयार नसतोस तू.) असं म्हणून त्याला त्या बिचारीनं कायमचं ‘टाटा बाय बाय’ करून टाकलं. कोवळ्या, स्वप्नाळू वयातला तो प्रेमभंग! तो त्यानं पचवला. भविष्यात अशा आणखी काही रंभा-उर्वशी त्याच्या आयुष्यात येणार होत्या. त्यावेळी ते त्याला माहीत नव्हतं इतकंच. तिच्या नकारानं त्याच्या मनावर जखम केली मात्र. या क्लेरीची आठवण त्याला आयुष्यात पुन्हा कधी यावी? अनेक वर्षांनी त्यानंतर तो अफगाणिस्तानमध्ये होता. तिथं भयानक युद्ध पेटलं होतं. तेव्हा रशियन सैन्य अफगाणिस्तानमध्ये होतं. मग तिथल्या अफगाण मुजाहिदीनांनी सोविएत रशियाच्या या सैन्यासोबत युद्धच पुकारलं. या मुजाहिदींनांना अमेरिकेचं पाठबळ. या युद्धात ग्रेगरी सापडला. भयंकर चक्रव्यूह!! तो तेव्हा मुजाहिदीनांना मदत करायला तिथं गेला होता. नाईलाज होता त्याचा. 1985 साल होतं ते. मृत्युची टांगती तलवार सतत डोक्यावर. अवतीभवती युद्ध पेटलेलं. कित्येकजण त्याच्या समोरच मारले गेलेले. माणसांच्या शरीराच्या चिंध्या होताना पाहत होता तो तिथं! नुसता अमानुष रक्तपात!! अन् अशावेळी त्याला कुणाची आठवण यावी? तर क्लेरीची! काय तरी पहिलं प्रेम? पहिलं प्रेम कधी कुठं आठवण काढेल सांगता येत नाही; मात्र खरी गंमत पुढेच आहे. क्लेरीच्या त्या वाक्याबद्दल ग्रेेगरीनं त्याचंही मत लिहिलंय. काय लिहितो तो? तर ‘‘बरोबर होतं तिचं. खरं होतं ती म्हणत होती ते’’ ग्रेगरी म्हणतो. मात्र बेजबाबदार कोण होतं? गे्रगरी की क्लेरी? ग्रेगरी आता जगप्रसिद्ध लेखक आहे व एक सच्चा, दिलेर, पारदर्शी माणूस सुद्धा! हे दुर्दैव ग्रेगरीचं नव्हे तर क्लेरीचं होतं का? व्यवहारी क्लेरीला एक सुंदर व्यक्तिमत्त्व ओळखता आलं नाही का? त्याच्यातला क्रांतिकारक व बंडखोर माणूसही ओळखता आला नाही का? व त्याचं हळवं कवी मन देखील? आता इथं ‘जर तर’ला अर्थ नाही. कदाचित क्लेरी आयुष्यात आली नाही म्हणूनच पुढचं महाभारत घडलं. ग्रेगरीकडून ‘शांताराम’नावाचं हे महाकाव्यच लिहून झालं. या महाकाव्यात अनेक नायक होते; मात्र महानायक एकच होता, ग्रेगरी डेव्हिड रॉबर्टस; मात्र त्यातही एक महत्त्वाचा मुद्दा. ग्रेगरीनं स्वतःला कुठंही नायक वा महानायक मानलं नाही. संपूर्ण आत्मचरित्रात कुठंही फुशारकी व ‘मी’पणा नाही. त्याच्या सगळ्या घोडचुका. त्या त्यानं या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. अगदी मोकळेपणानं. स्वतःचे रागलोभ, प्रेम, द्वेष, लैंगिक वासना काहीही लपवून ठेवलं नाही. स्वतःचं माणूस असणं त्याला नेहमी महत्त्वाचं वाटलं. तो स्वतःही प्रचंड माणूसवेडा! माणसं ओळखणारा. त्याच्या या अवाढव्य आत्मचरित्रात माणसाच्या स्वभावाचे असंख्य नमुने आहेत. इथं प्रेमळ माणसं आहेत. दिलेर माणसं आहेत. खुनशी माणसं आहेत. पाताळयंत्री माणसं आहेत. खोटारडी माणसं आहेत. कारस्थानी माणसं आहेत. प्रामाणिक माणसं आहेत. मेहनती माणसं आहेत. सगळ्या प्रकारची माणसं आहेत. त्यानं आयुष्यात माणसं अचूक ओळखली. त्यात सहसा चूक झाली नाही; मात्र त्याआधीच्या काळात त्याचं वैवाहिक आयुष्य मात्र संपलं. घटस्फोट झाला. मुलीचा ताबा मिळाला नाही. त्यातून नैराश्य आलं. व्यसनं जडली. पावलं गुन्हेगारीकडं वळली. वृत्तीच एका गुन्हेगाराची झाली. बायको कारणीभूत झाली का या सगळ्याला? ग्रेगरीनं मात्र तिला दोष दिलेला नाही. तिचा उल्लेखच तो करत नाही. तर तिथं तो जवळपास गप्प राहणंच पसंत करतो. एरवी तो बोलतो तो त्याच्या लेखणीतूनच. ‘‘निदान लिहिताना तरी मी स्वतःशी प्रामाणिक राहिलो, म्हणूनच कदाचित माझं लाजिरवाणं आयुष्य मला पेलता आलं. ते दिवस निभावले गेले व निराशा आली नाही’’ तो एकेठिकाणी म्हणतो सुद्धा.
तर असा हा ग्रेगरी. आस्ट्रेलियात एका रॉबरीच्या गंभीर गुन्ह्यात अडकला. शिक्षा झाली. किती? तर एकोणीस वर्षांची. शिक्षा भोगतच होता; मात्र तुरूंगातून पळून जाण्याचे विचार मनातून जाईनात. मग हा तुरूंग फोडून पळाला. खायचं काम नव्हतं ते. एकेका पावलावर मृत्यू उभा होता. यत्किंचिंत चूक व्हायचा अवकाश, ठार मारला गेला असता तो. ते ऑस्टे्रलियाचं ‘मॅक्झिमम सिक्युरिटी प्रिझन’ होतं. तिथले बंदुकधारी सुरक्षारक्षक. ते डोळ्यात तेल घालून पहारा देत. हा त्यांच्या डोळ्यात धूळ फेकून पळाला. तो प्रसंग वाचताना जिभेला कोरड पडते. खड्डा पडतो भीतीनं पोटात! फक्त एक सहकारी या धाडसात त्याच्या बरोबर होता. तुरूंगातून पळाला हा व ‘रेड कॉर्नर नोटीस’चा धनीही झाला. तुरूंगातून पळाल्यानंतर बारा दिवसांनी हा कुणाकडे गेला असेल? तर त्याच्या आवडत्या प्राध्यापकांकडे. तो पूर्वी शिकत होता ते विद्यापीठ. ते प्राध्यापक तिथं ‘तत्त्वज्ञान’ हा विषय शिकवत. ज्यू होते ते. अत्यंत बुद्धिमान, गाढे अभ्यासक व विचारवंत असं तो त्यांचं वर्णन करतो. या दोघांमधला संवाद. वाचकांनी तो मुळातून वाचावा. सरांची ती भेट ग्रेगरी कधीच विसरू शकला नाही. काय म्हणाले त्याचे सर त्याला? ‘‘कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी काय वाटेल ते कर; पण एकदा केलेली चूक पुन्हा करू नकोस. बंदुकीचा धाक दाखवून लोकांना लुबाडण्याचे तुझे धंदे आता बंद कर. यापुढं तू कधीही बंदुकीला हात लावता कामा नये.’’ ग्रेगरी सुन्न! ऐकत राहिला सर काय म्हणतात ते. ग्रेगरीबरोबर आणखी एक कैदी पळाला होता. सरांनी गे्रगरीला स्वच्छ सांगितलं, ‘‘त्याची संगत सोड. नाहीतर त्याच्यामुळं तुही पकडला जाशील.’’ आणखी काय म्हणाले त्याचे सर त्याला? ‘‘देशाबाहेर पड व जग फिरून ये. फार बोलू नकोस. गरज असेल तेवढीच माहिती लोकांना द्यावी.... ऍन्ड आस्क पीपल फॉर हेल्प. मदत मागायला लाजू नकोस. यू विल बी ऑल राईट.... सगळं नीट होईल. काळजी करू नकोस. तुझं आयुष्य ही एका विलक्षण धाडसाची कहाणी असेल.... आत्ता कुठं तुझ्या कहाणीची सुरूवात होतेय.’’ पुढं सहा महिन्यांनी काय घडलं? तर ग्रेगरीचा तो कैदी मित्र पकडला गेला. सरांनी सांगितलं होतं तसंच घडलं. त्यांनी ग्रेगरीला याबाबतीत सावध केलं नसतं तर? ग्रेगरी मित्रांच्या बाबतीत तसा भाबडा. तो स्वतःहून त्या मित्रापासून कधीच दूर गेला नसता; मात्र तो धोका सरांमुळं टळला. सरांकडेच जावं असं त्याला का वाटलं? याचं उत्तर तो देतो. ‘‘तसं का वाटलं हे मला तेव्हा समजलं नव्हतं. आजही नाही सांगता येणार... आय जस्ट हॅड टू स्पीक टू हिम. काहीही करून मला त्यांना भेटायचं होतं.’’ त्यावेळी पोलीस गे्रगरीला शोधत होते. सरांचं विद्यापीठ शहराच्या टोकाला. धोका पत्करून हा तिथपर्यंत गेला. आश्चर्य असं, सर त्याची वाटच पहात होते. ‘‘तू माझ्याकडं येशील हे माहीत होतं मला..’’ त्यांचं पहिलंच वाक्य होतं. त्याची पूर्वीची प्रेयसी क्लेरा व पहिली पत्नी एकीकडे व दुसरीकडं हे सर. दोघांच्या दृष्टिकोनात जमीन-आस्मानाचं अंतर. त्या दोघी केवळ अपघातानं ग्रेगरीच्या आयुष्यात आल्या होत्या का? सरांचं नक्कीच तसं नव्हतं. सरांना ग्रेगरीची कुवत कळली होती का? आवाका समजला होता का? नक्कीच! मात्र त्यासाठी माणसांची पारख व मानवी आयुष्याची अफाट समज असायला लागते. सरांकडे ती होती.
तर कादंबरी अशी क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवत पुढे जाते. क्षणभरही खाली ठेववत नाही. आता हा ग्रेगरी ‘शांताराम’ कधी झाला? तर तो मुंबईत आल्यानंतर. तुरूंगातून पळाल्यानंतर काय घडलं? तर न्युझीलंड, आफ्रिका, आशिया, युरोप. ग्रेगरी असा सगळीकडं भटकत राहिला. रेड कॉर्नर नोटीस होतीच. मग नकली पासपोर्ट व बनावट कागद पत्रं. त्याच्या आधारे तो देशोदेशींच्या सुरक्षा व्यवस्थेला हूल देत राहिला. असं करत तो एकदाचा आला ते आपल्या मुंबईत. साल होतं 1982. विमानतळावर तो उतरला. कुठं जायचं? काय करायचं? माहीत नव्हतं. विमानतळावर प्रभाकर खाडे उभा होता. नियतीच्या रूपात जणू गे्रगरीची वाटच पहात होता तो. ग्रेगरीचा महाराष्ट्रातला पहिला मित्र. दोघं जीवाभावाचे यारदोस्त झाले. जळगावमधील ‘सुंदर’ हे प्रभाकरचं गाव. प्रभाकरनं आधी ग्रेगरीला झोपडी मिळूवन दिली. कुठं? तर मुंबईत कुलाब्याच्या झोपडपट्टीत. ग्रेगरीनं इथं मुंबईतल्या झोपडपट्टीतलं सगळं मानवी आयुष्यच वाचकांपुढे उभं केलं आहे. काही दिवसांनी प्रभाकरनं ठरवलं. तो ग्रेगरीला सुंदर या आपल्या गावी घेऊन गेला. हा तिथं राहिला चक्क सहाएक महिने. तिथल्या माणसात मिसळून गेला. शेतात राबला. मराठी शिकू लागला. प्रभाकरचे वडील किसनबाबा व आई रखमाबाई. दोघांशीही ग्रेगरीची गट्टी जमली. रखमाबाईला ग्रेगरीचं नाव मात्र खटकू लागलं. पटकन् उच्चार तर करता आला पाहिजे. त्याचं टोपणनावही तिला रूचेना. मग एका क्षणी त्या माऊलीनं त्याला सांगितलं, ‘‘आजपासून तू आमचा शांताराम.’’ शांतारामच का? तर काही प्रसंगात तो शांतपणे विचार करत असताना ती त्याला पाहत होती. ग्रेगरी शांताराम झाला. भारत नावाच्या या देशात मग तो मिसळून गेला. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. मुंबई हे त्याचं घरच झालं. हिंदी तर उत्तम शिकलाच शिवाय मराठीवर प्रेम जडलं ते आजतागायत. शांतारामचं मराठीत भाषांतर होतंय हे कळलं तेव्हा त्याला स्वर्ग दोन बोटे उरला. भाषांतरकार अपर्णा वेलणकर. त्यांना तो भेटला. त्यांचा जिगरी मित्रही झाला. शांतारामध्ये एकापेक्षा एक असे प्रसंग येतात. ही चौदाशे पानं आपण पुन्हा पुन्हा वाचत राहतो व संपूर्ण शांताराममय होऊन जातो. काहीवेळा अटळपणे डोळ्यात अश्रू उभे राहतात.
ही कहाणी इथंच संपत नाही. सत्य हे अद्भूतच असतं. ग्रेगरीनं कुलाब्याच्या झोपडपट्टीत मोफत दवाखाना चालवला. दवाखाना म्हणजे काय? तर त्याची एवढीशी झोपडी हाच दवाखाना. सकाळी उपचारासाठी रांग लागे. हा पूर्ण मोफत उपचार करे. रूपयाही घेत नसे. अगदी गंभीर जखमांवर टाके घालण्यापासून त्यानं उपचार केले. यासाठी गोळ्या-औषधं, इंजेक्शन्स वगैरे हा कुठून पैदा करत होता? तर खार जवळच्या फाट्यावर रेल्वे साईडिंगचं एक आवार होतं. तिथं कुष्ठरोग्यांची वस्ती होती. त्यांच्याकडून हा औषधे आणत असे. आता इतकी भारी भारी औषधं तिथं कुठून येत? हे मुळापासून वाचलं तर आश्चर्यानं टाळूला चिकटलेली जीभ पुन्हा मूळ पदावर येणं कठीण. या औषधांचा खर्च करणारी व्यक्ती कोण होती? हेही पुस्तकातच वाचलेलं बरं. ग्रेगरी मुंबईत येताच पक्का मुंबईकर झाला. मात्र त्याला एक जाणीव झाली होती. हे शहर निष्पापांचं नाही. ‘‘मुंबईत येऊन फार काळ लोटला नसला तरी पैशाच्या तालावर नाचणार्या या शहराचा भ्रष्ट, विकला गेलेला चेहरा मी अनेकदा पाहिला होता’’ तो एकेठिकाणी स्वच्छच म्हणतो. याकाळात त्यानं मुंबईतलं अर्थकारण पाहिलं. विशेषतः देशी-विदेशी चलनाच्या काळ्या बाजाराचं त्यानं निरीक्षण केलं. त्याचा अभ्यास केला. त्याला हे गरजेचं होतं. कारण तो अंडरवर्ल्डमध्ये वावरत होता. याच काळ्या बाजारात काम करत होता. हे सगळं ग्रंथात तो मांडतो. कसलाच आडपडदा ठेवत नाही. प्रत्येक गोष्ट तो त्यातल्या असंख्य बारकाव्यानिशी मांडतो. ती कुठंही कंटाळवाणी होत नाही. समजायला जड होत नाही. मुंबईबद्दल त्यानं खूप लिहिलंय या ग्रंथात. अपर्णा वेलणकरांच्याच शब्दात सांगायचं तर, ‘ग्रेगरीची मुंबई माझ्या ओळखीची नव्हती.’ ग्रेगरीला सगळी मुंबई पाठ! अगदी तळहातावरच्या रेषा पाहाव्यात अशी. मध्ये पुलाखालून किती पाणी वाहून गेलं? तीस वर्षे उलटून गेली. आजही तो मुंबईत येतोच येतो. जगभर फिरत असतो; मात्र त्याच्या मनात भावना एकच असते, मुंबई हेच आपलं खरं घर आहे. आता तो गँगस्टर राहिलेला नाही. त्या नरकयातनांतून तो कधीच बाहेर पडला. उरलेला तुरूंगवासही भोगून झाला. तुरूंगातच शांताराम बरचसं लिहून झालं. पुढं त्यानं एक मल्टिमीडिया कंपनी स्थापन केली. 2003 साल. या साली शांताराम बाजारात आलं. त्यानं खपाचे उच्चांक गाठले. आता जगभर कुठंही तो मोठमोठ्या हॉटेलात उतरतो. मुंबईत आला की वरळीतलं एक मोठं हॉटेल. ते त्याच्या दिमतीला हजर असतं; मात्र इतक्या अफाट यशाचा ग्रेगरीवर काही परिणाम झालाय का? होय! एक उलटा परिणाम झालाय. तो अधिक नम्र झालाय. अधिक समंजस झालाय. अधिक सुसंस्कृत, शहाणा व प्रगल्भ झालाय. आजही तो मुंबईतील त्याची झोपडपट्टी विसरलेला नाही. तो नरकवासच होता; मात्र तिथल्या जिवाभावाच्या माणसांना तो विसरलेला नाही. तो प्रभाकर खाडेला व त्याच्या सुंदर गावाला विसरलेला नाही. प्रभाकरच्या भयानक मृत्युची आठवण आजही त्याला येते. त्याचं आजचं यश पाहायला प्रभाकर नाही, ही जाणीव त्याला रडवत राहते; मात्र आईच्या कुशीत मुल निश्चिंत असतं तसा हा आजही मुंबईच्या कुशीत गेला की निश्चिंत होतो. ‘‘कितीदा मुंबईच्या प्रेमात पागल झालो होतो? त्या वेड्या शहरावरून जीव ओवाळून टाकायला शिकलो होतो’’ तो एके ठिकाणी म्हणतो. अर्थात त्याचं त्यावेळचं मुंबईतलं आयुष्य भयानक होतं. असुरक्षित होतं. धोकादायकसुद्धा. मात्र मुंबईत तो मोकळा श्वास घेऊ शकला. याचं एकमेव कारण, या शहराचा स्वभाव व इथली माणसं. इथं सहवासात आलेल्या प्रत्येक माणसावर ग्रेगरीनं प्रेम केलं. इथल्या माणसांनीही त्याच्यावर जीव ओवाळून टाकला. त्यानं तोपर्यंत व्यवहारी जग पाहिलं होतं. अव्यवहारी माणसं तो मुंबईतच पाहत होता. त्याला एक समजलं होतं, ही माणसं अव्यवहारी आहेत, म्हणूनच निष्पाप आहेत व म्हणूनच अत्यंत विश्वासार्ह!
मुंबईत ग्रेगरी माफिया टोळीत काम करू लागला. स्मगलर व गन रनरही झाला तो हे काम करताना. याचवेळी तो कार्ला सारानेनच्या प्रेमात पडला. आता ही बया कोण? तर ती मुंबईत वेश्या व्यवसाय करत होती तेव्हा. कार्ला बुद्धिमान, कवी मनाची; मात्र वस्ताद! ग्रेगरी मात्र तिच्या अखंड प्रेमात! दोघांच्या शृंगाराची वर्णनं ग्रेगरीनं केली आहेत. ती वर्णनं मराठीत आणताना अपर्णा वेलणकरांची मराठी भाषा. ती खरोखर ‘अमृतातेही पैजा जिंके’ होते. अर्थात हा संपूर्ण भाषांतरीत ग्रंथच अमृतातेही पैजा जिंके असा! तर कार्लाची सुद्धा एक कहाणी आहेच. ती मुळातूनच वाचलेली बरी. कार्ला ही मुंबईत अंडरवर्ल्डसाठीच काम करत होती तेव्हा. अमेरिकेत तिच्याकडून एकाचा खूनही झालेला. याच बयेनं ग्रेगरीला मुंबईच्या अंडरवर्ल्डचा रस्ता दाखवला. ते एक मोठं गूढच होतं. ते लक्षात आलं तेव्हा ग्रेगरीला धक्का बसला; मात्र महाराज ‘दिल’ देऊन बसले होते तिला. असं काय पाहिलं कार्लामध्ये गे्रगरीनं? सौंदर्य होतंच पण बुद्धिमत्ता व सौंदर्य असं ते जालीम मिश्रण होतं. शिवाय कार्लामध्ये खूप सच्चेपणा होता. ग्रेगरीच्या झोपडपट्टीत कॉलराची साथ आली. माणसं पटापट मरून पडू लागली. ग्रेगरी रात्रंदिवस आजारी माणसांवर उपचार करू लागला. तेव्हा ही बया सरळ ग्रेगरीकडे आली. त्याच्या झोपडपट्टीत राहिली व आजारी माणसांसाठी तहानभूक हरपून रात्रंदिवस राबली. धोके होते यात. कॉलराला तीसुद्धा बळी पडू शकली असती; मात्र ती बधली नाही. ग्रेगरी प्रभावीत झाला तो या प्रसंगामुळे. शिवाय कार्लासुद्धा भारताच्या प्रेमात होतीच.’’ .... कुणाही भारतीयाला भेटा, एकच गोष्ट लक्षात येईल - प्रेमाचा शोध भले भारतात लागला नसेल; पण प्रेम करण्याची कला अख्ख्या जगात फक्त भारतीय माणसालाच गवसली आहे’’ ग्रेगरीचंच हे एक वाक्य.
मुंबईत ग्रेगरी संपर्कात आला तो कादर खानच्या. कादर खान हा माफिया डॉन. त्यानं ग्रेगरीला मुलासारखं मानलं. पित्याच्या प्रेमासाठी ग्रेगरी नेहमीच आसुसलेला. ते त्याच्या वाट्याला मात्र आलं नाही. मग कादर खानमध्येच तो वडिलांची छबी पाहू लागला. कादर अत्यंत बुद्धिमान! चांगलं वाचन असलेला. वैचारिक उंची असलेला. या दोघांमधील चर्चा ग्रंथात आहेत. अगदी या ब्रह्मांडाची निर्मिती ते नैतिक-अनैतिक, पाप-पुण्याच्या संकल्पना इथंपर्यंत दोघं चर्चा करत. दोन गँगस्टर्समध्ये ही असली चर्चा? बरं, ही चर्चा वैचारिक उंचीचं टोक गाठणारी! मोठमोठ्या तत्त्वज्ञांनाही लाज वाटावी अशी! तर कादर व ग्रेगरी. दोघांचे सूर जुळत गेले. मग अफगाणिस्तानमधले प्रसंग ग्रेगरीनं सांगितले आहेत. तिथल्या मुजाहिदीनांना मदत करणं. कादरला ते धर्मकर्तव्य वाटलं. तो त्यासाठी अफगाणिस्तानात गेला. सोबत ग्रेगरी. पुन्हा जिवंत येण्याची खात्री नव्हतीच. काय काय झालं अफगाणिस्तानात? सगळ्या वादळी व रक्तरंजित घटना! आधी ही मंडळी गेली पाकिस्तानात. तिथं कराचीत राहिली. गे्रगरीनं इथं कराचीच वर्णन केलंय. विश्वास बसू नयेत अशी वर्णनं ग्रेगरी करतो. कराचीत शस्त्रास्त्रांचा खुलेआम व्यापार चाले. त्याची वर्णनं ग्रेगरी करतो. तिथला काळाबाजार. त्याचं वर्णन करतो. त्यातलं अर्थकारण सांगतो. शस्त्रास्त्र व्यवहारातील दलालांचा सुळसुळाट! तो तिथं त्यानं पाहिला. ग्रेगरीचं निरीक्षण घारीसारखं. स्मरणशक्ती तर अफाटच. कराचीतली ही वर्णनं अत्यंत चौफेर आहेत. कराचीचा सगळा ‘सातबारा’च तो मांडतो. हे सगळं तो त्यातल्या राजकारणासह सांगतो हे विशेष! मुळातच ग्रेगरीला आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाण जबरदस्त! अगदी आजही एखादी आंतरराष्ट्रीय जबाबदारी तो पार पाडू शकतो. यात तिळमात्र अतिशयोक्ती नाही. ग्रेगरीच्या अभ्यासाचा आवाकाच तेवढा मोठा! तर कराचीत ही सगळी मंडळी आयएसआयच्या तावडीत सापडता सापडता वाचली. यामागे होता अब्दुल गनी. हा कोण? तर कादरच्याच गँगमधला माफिया. अस्तनीतला निखारा. विषारी सापच. त्यानं कराचीत कादर व ग्रेगरीसह सगळ्यांना ठार मारायचं ठरवलं. त्याचे पाकिस्तानमध्ये लागेबांधे होते. ते त्यानं यासाठी वापरले. हे सगळं तो मुंबईत बसून करत होता; मात्र दैव बलवत्तर होतं कादरसह सर्वांचं. त्यांना ऐनवेळी हा प्लॅन समजला. काही क्षणात मृत्यू प्रत्यक्ष समोर हजर झाला असता; मात्र सगळे निसटले. तिथून पुढं अफगाणिस्तानमधला प्रवास. कंदाहार हे अफगाणिस्तानमधलं शहर. तिथून पन्नास किलोमीटर अंतरावर ‘शहर-इ-साफा’ या पर्वतरांगा. तिथं या लढवय्या मुजाहिदीनांसह ग्रेगरी राहिला. तब्बल दोन महिने! या दोन महिन्यात काय काय घडलं? तर तो मृत्युचं थैमान पाहत होता. मृत्युशीच दोन हात करत होता. स्वत: अर्धमेल्या व अर्धपोटी अवस्थेत स्वत:चं दोन-दोन बाटल्या रक्त सलाईनद्वारे सहकार्यांच्या शरीरात चढवत होता. त्याचे सहकारी सुद्धा कुठकुठले होते? अफगाणिस्तान, पॅलेस्टाईन, इरान, ट्युनिशिया, मोरोक्को, अल्जेरिया व अगदी पाकिस्तानातले सुद्धा. कादरच्या नेतृत्वाखाली तिथं ते लढले. तिथल्या मुजाहिदीनांना शक्य तेवढी मदत केली. या सगळ्या प्रवासात व प्रसंगात ग्रेगरी माणसांचे स्वभाव टिपत राहिला. त्याचे हे सगळे सहकारी सुद्धा बुद्धिमान होते हे विशेष! शूर होतेच ते! प्रश्नच नाही; मात्र त्यांचे आपापसातले संवादच खूप काही सांगून जातात. सोविएत रशियाच्या विरूद्ध अफगाण मुजाहिदीन का पेटून उठले? खरं तर अफगाणिस्तानात रशियानं बरीच विकासाची कामे केली होती. पूल बांधले होते. रस्ते बांधले होते. शाळा बांधल्या होत्या. कॉलेजं बांधली होती. पिण्याच्या-सिंचनाच्या पाण्यासाठी धरणं बांधली होती. विजेची गरज भागवली होती; मात्र हे करता करता त्यांनी सगळ्या अफगाणिस्तानवरच कब्जा केला. तिथं स्थानिक अफगाण कम्युनिस्टांचं कळसूत्री सरकार स्थापन केलं. ‘कम्युनिझम’ कसा वाढेल हा तो प्रयत्न होता. आता हा सोव्हिएत रशियाचा साम्राज्यवादच आहे अशी या ग्रेगरीबरोबरच्या बुद्धिमान तरूणांची पक्की धारणाच झाली व ते मग मुजाहिदीनांना मदत करू लागले. आता हे अफगाण मुजाहिदीन होते कसे? तर जीवाला जीव देणारे. ‘‘इन अफगाण लोगों के साथ जिना शायद मुश्किल है, लेकिन साथ मे मरने के लिए इन अफगाणियोंसे अच्छे दोस्त पुरी दुनियामें नही मिलेंगे।’’ अहमद जादेह नावाचा ग्रेगरीचा एक मित्र. याच ग्रुपमधला. त्याचं हे वाक्य. आता हा माफिया डॉन कादरखान. तो सुद्धा मुळचा अफगाणीच. ‘‘अफगाणिस्तानात लायक लोकांच्या हातात नेतृत्व सोपवण्याची पद्धत आहे - हे लोक उत्तम वक्ते असतात. आर्थिक व्यवहार अत्यंत कुशलपणे हाताळू शकतात आणि वेळ येईल तेव्हा शस्त्र घेऊन रणातही उतरतात. माझ्या देशात कुणालाही वारसा हक्कानं नेतृत्वावर हक्क सांगता येत नाही. एखाद्या नेत्याची मुलं नालायक निपजली तर नेतृत्वाची सूत्र टोळीतल्या लायक तरूणांच्या हाती जातात’’ हे कादर खानचंच वाक्य.
अफगाणिस्तानात प्रवेश करण्यापूर्वी काय घडलं? कादरच्या या ग्रुपनं ’क्वेट्टा’ शहरात सुमारे एक महिना मुक्काम केला. हे पाकिस्तानातलं शहर. ग्रेगरीनं इथं काय करावं? क्वेट्ट्यात सेंट्रल लायब्ररी होती. आयुब नावाचा एक पाकिस्तानी तरूण. तो या लायब्ररीतून गे्रगरीला पुस्तकं आणून देई. हा संपूर्ण महिना ग्रेगरी रात्रंदिवस वाचत राहिला. ब्रिटिशपूर्व काळात त्या भागात आलेल्या भटक्या संशोधकांनी लिहिलेली प्रवासवर्णनं, प्राचीन ग्रीक महाकाव्यांच्या दुर्मीळ आवृत्या, शेक्सपिअरचं साहित्य, डॉन्टेच्या ‘द डिव्हाईन कॉमेडी’चं अत्युत्कट भाषांतर! हे सगळं ग्रेगरी वाचत राहिला. एका हातात ग्रंथ व एका हातात बंदूक! मात्र आज त्याला कोणी विचारलं तर? तर तो अगदी ठामपणे सांगेल, ग्रंथ व लेखणी हे दोन्ही जगातल्या कोणत्याही बंदुकीपेक्षा अधिक प्रभावी असतात म्हणून.
अफगाण मुजाहिदीन. त्यांच्या मते साम्राज्यवादी रशियानं अफगाणिस्तानवर आक्रमण केलं होतं. तसं करून त्यांनी सगळा मार्क्सवाद व लेनीनवाद पायदळी तुडवला होता. त्या तरूणांच्या दृष्टिनं हे बरोबर होतं; मात्र नाण्याला दोन बाजू असतात. तशीच अफगाणिस्तानमधली परिस्थिती होती. अफगाणिस्तान हा रशियाचा शेजारी. 1921 साली एक महत्त्वाची घटना घडली. रशियात लेनीन सत्तेवर होता. त्यानं अफगाणिस्तानबरोबर एक लष्करी करार केला. परस्पर सहकार्याचा तो करार. आता अफगाणिस्तामध्ये दोन प्रवृत्ती नांदतच होत्या. पुराणमतवादी व प्रागतिक. अगदी कुराणमतवादी असं म्हटलं तर ते जास्त योग्य ठरेल. 1978 मध्ये अफगाणिस्तानमध्ये लष्करी क्रांती झाली; मात्र सत्ता ‘पिपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तान’च्या ताब्यात गेली. या पक्षात मार्क्सवादाकडे झुकलेले बुद्धिवादी प्रागतिक तरूण होते. अमेरिकेचा पाठिंबा मात्र पुराणमतवाद्यांना. मग पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीनं रशियाला अफगाणिस्तानात पाचारण केलं. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी. त्यासाठी त्यांनी कशाचा आधार घेतला? तर 1921 सालच्या रूसो-अफगाण कराराचा. त्याआधारे रशियन सैन्य अफगाणिस्तानात घुसलं. या सैन्याविरूद्ध अमेरिका कारस्थानं करू लागली. मुजाहिदीन व रशियन सैन्यात होणार्या धुमश्चक्री व लढाया. अमेरिकेनं आधी त्या लांबूनच पाहिल्या. रशियाचा शक्तिपात होऊ दिला. मग अफगाण मुजाहिदीनांना सगळ्या प्रकारची मदत सुरू केली. यात पाकिस्तान अमेरिकेच्या पाठिशी होताच. रशियाचा निर्णय कितीही म्हटलं तरी त्यांच्या अंगलट आला. कारण स्वतःचे दीड ते दोन लाख सैन्य! ते वर्षानुवर्षे अफगाणिस्तानमध्ये पोसत राहणं! हे सगळं त्यांना जड जावू लागलं. मुजाहिदीनांमध्येही बुद्धिमान तरूण होते व पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तान या पक्षातही. एकाला अमेरिकेचा साम्राज्यवाद खटकत होता. दुसर्याला रशियाचा. पिपल्स पार्टी हा कम्युनिस्ट पक्ष नव्हता हे खरं; मात्र डावीकडे झुकलेला होताच. अमेरिकेची झोप त्यामुळंच उडाली होती. ही सगळी रणधुमाळी. त्यात ग्रेगरी अडकला. खरंतर तोही डावीकडे झुकलेला; मात्र यावेळी तो अफगाणातील उजव्यांच्या बाजूने होता. हे सगळं अपरिहार्यपणे त्याच्या वाट्याला आलेलं. ते कसं? ते या आत्मचरित्रातच वाचलेलं बरं! तसंही कितीतरी आंतरराष्ट्रीय राजकारण. ते या आत्मचरित्रात वाचायला मिळतंच. त्यातले सगळेच गुंते ग्रेगरी बर्याचदा नेमकेपणे सांगतो. हे राजकारण नेमकं कसं आहे हे त्याला अतिशय उत्तमपणे कळत होतं. याचं कारण त्याची स्वतंत्र बुद्धिमत्ता. स्वतःचा अभ्यास. मग या ग्रंथात अमेरिका-व्हिएतनाम युद्ध येतं. अफगाणिस्तामधले अमेरिका व रशियातले शह-काटशह येतात. इराणमधली इस्लामी क्रांतीसुद्धा येते. मोहम्मद मेलबाफ हा ग्रेगरीचा मित्र. तो इराणचा. आयातुल्ला खोमेनीनं इराणच्या शहाविरूद्ध उठाव केला. खोमेनीचा पाठिराखा होता तेव्हा मेलबाफ; मात्र खोमेनीनं सुद्धा ‘इस्लामी क्रांती’च्या नावाखाली विश्वासघातच केला असं मेलबाफ म्हणतो. खोमेनीकडे इराणची सत्ता आली; मात्र त्या सत्तेनं मेलबाफसारख्या तरूणांना अमानुष छळ व मनःस्तापाशिवाय काहीच दिलं नाही. खलीद अन्सारी. हा ग्रेगरीचा आणखी एक मित्र. तो कडवा पॅलेस्टिनी. लेबनॉनमधल्या एका हत्याकांडात त्याचं सर्व कुटुंबच ठार झालं. खरंतर त्याचे आईवडील प्रसिद्ध विचारवंत. पॅलेस्टिनी मुक्ती लढ्यात लढणारे. वडील इस्त्रायलच्या तुरूंगात वारले. नंतर कुटुंबही संपलं. खलिद मग दुःख व शोकाने वेडा व्हायचाच बाकी राहिला. शेवटी मुंबईनंच त्याला आश्रय दिला. खलिदचं शिक्षण कुठं झालं? तर न्युयॉर्कमध्ये. त्याच्या प्रबंधाचा विषय काय होता? तर ‘प्राचीन जगातला असंघटित व्यापार व त्या व्यापाराची समांतर अर्थव्यवस्था.’ पुढं लेखणी गेली, हातात आली बंदुक. नियतीनं खलीदला पॅलेस्टिनी अतिरेकी चळवळीकडे खेचून नेलं. मग ट्युनिशिया, लिबिया, सिरीया इथं लष्करी प्रशिक्षण. या आत्मचरित्रात अशी अनेक खरीखुरी पात्रं आहेत. आत्मचरित्राच्या शेवटी तर श्रीलंका व एलटीटीईचा विषय देखील येतो. इतकंच नाही तर मुंबईतल्या मराठी-अमराठी वादाबद्दलही त्यानं लिहिलं आहे. यात त्यानं मराठी माणसांची बाजू घेतली आहे; मात्र त्यापलीकडं जाऊन त्यानं एक मुद्दा मांडला आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा. ‘‘मुंबईच्या झोपडपट्टीत फक्त मराठीच माणसं राहतात असं नाही. पंजाबी, तमिळ, कर्नाटकी, बंगाली, आसामी.... अगदी काश्मीरीसुद्धा राहतात त्या उकीरड्यात आणि ही माणसं फक्त हिंदू आहेत असंही नाही तर शिख आहेत, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आहेत. पारशी आणि जैनसुद्धा आहेत. मुंबईतला प्रश्न हा काही फक्त हिंदू-मराठी माणसांचा प्रश्न नाही. खरा प्रश्न इथं राहणार्या गरीब भारतीय लोकांचा आहे. मुंबई गरीबांची आहे तशी श्रीमंतांचीही आहे; पण मुंबईत श्रीमंत माणसं मुठभर आहेत आणि गरीब कचर्यासारखे सगळीकडे पसरलेले आहेत’’ ग्रेगरी म्हणतो. एका गुजराती चित्रपट निर्मात्याशी या विषयावर ग्रेगरीचा वाद-प्रतिवाद झाला. त्यावेळचं त्याच हे वाक्य. त्याचवेळी मुंबईतल्या मराठी माणसांची बाजू घेताना काय म्हणतो तो? ‘‘महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातून मुंबईत मराठी लोक जगायला आलेले. त्यांची अवस्था भयानक आहे. दोनवेळचं जेवण मिळवण्यासाठी त्यांना अक्षरशः वेठबिगारासारखी कामं करावी लागतात. इतरांची घाण उपसावी लागते. भारतातल्या इतर ठिकाणाहून आलेले लोक पैशाच्या जोरावर मराठी माणसांना मुंबईत पायाखाली तुडवतात, हे पाहून त्यांना संताप येणारच. त्यांना काय, जगाच्या पाठीवर कुणालाच हा अन्याय सहन नाही होणार’’ ग्रेगरीचं निरिक्षण हे असं आहे. त्यातून आलेली मतं ही अशी आहेत. त्याला आंतरराष्ट्रीय राजकारण समजतं. मग स्थानिक राजकारण समजत नाही का? तसं अजिबातच नाही. प्रत्येक गोष्टीतलं ‘सत्य’. ते शोधण्याचा तो प्रयत्न करतो. त्याला तेच महत्त्वाचं वाटतं. एक लेखक व एक माणूस म्हणून. मग ते त्याच्या स्वतःसाठी कितीही अप्रिय वा कटू असू दे. त्याच्याइतकं दुसरं महत्त्वाचं त्याला काहीही वाटत नाही. तो मुंबईत होता तेव्हा बरंच काही घडलं. इंदिरा गांधींची हत्या. ती त्याचवेळी झाली. गे्रगरीनं त्याबद्दलही लिहिलंय इथं. खलिस्तानची चळवळ त्याला माहीत आहे. ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ त्याला माहीत आहे. भारतीयांच्या आयुष्यात इंदिरा गांधींचं स्थान किती महत्त्वाचं होतं? ग्रेगरीनं ते एकदोन प्रसंगातूनच उत्तमपणे सांगितलंय.
ग्रेगरीचं ‘मराठी प्रेम’ अस्सल! अगदी ठाकरे कुटुंबीयांनीही दाद द्यावी इतकं अस्सल! मुळात तो त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या संपर्कात कसा आला नाही हेच समजत नाही. शिवसेनेचे उल्लेख आत्मचरित्रात आहेत त्याच्या; मात्र शिवसेनेचा फार खोलात जाऊन त्यानं अभ्यास केलेला नाही. तेव्हा त्याच्याकडे यासाठी उसंतही नव्हती व त्याची ती गरजही नव्हती तेव्हा; मात्र मुंबईतल्या मराठी माणसाच्या वेदना त्याला कळत होत्या यात तिळमात्र शंका नाही. ग्रेगरी अस्सल ‘मराठी मुंबईकर’ झाला म्हणजे नेमकं काय झालं? याचं उदाहरणच दिलं पाहिजे. एकदा तो फ्लोरा फाऊंटन चौकाच्या (हुतात्मा चौक) दिशेनं रमत गमत चालला होता. तेवढ्यात एक टॅक्सी करकचून ब्रेक दाबून त्याच्या शेजारून चालू लागली. ग्रेगरीनं भाड्याला नकार दिला; मात्र टॅक्सी ड्रायव्हर मुजोर. त्याला ग्रेगरीला छेडण्याची हुक्की आली. ‘‘अरे गोरे भेंचोद, टॅक्सी एम्टी है दिखता है क्या? और ये क्या कर रहे हो? इतने धुप में पैदल? बकरी के माफिक क्यूं घुमता है रस्ते पे आँ?’’ ड्रायव्हर ग्रेगरीला म्हणाला. ‘शांताराम’ नावाचं ते रसायन त्याला कुठून माहीत असणार? शिवाय ग्रेगरीला हिंदी समजत असणार हे त्याच्या गावीही नव्हतं. म्हणूनच तो एवढा शूर झाला होता. आता चेंडू ग्रेगरीच्या कोर्टात होता. ‘‘काय पायजे? अं? काय पायजे’’ गे्रगरीनं सरळ मराठीत त्याला विचारलं. ‘‘काय पायजे? आं?’’ टॅक्सी ड्रायव्हर हडबडत तेच वाक्य म्हणाला. आ वासला त्यानं आश्चर्यानं! मग ग्रेगरीचे जोरदार शाब्दिक फटके सुरू झाले. ‘‘काय पायजे तुला? आं? काय प्रॉब्लम आहे?’’ ग्रेगरी त्याच्या अंगावर चालून जात डाफरला. ग्रेगरीचा पुढचा शाब्दिक हल्ला तर भन्नाटच होता. ‘‘मराठी नाय समजत? मग आला कशाला इथे? ही मुंबई आहे. आमची मुंबई. मराठी बोलता येत नसेल तर र्हातो कशाला इथे? तुझ्या भेंचोद डोक्यात बकरीएवढा तरी मेंदू आहे का?’’ टॅक्सीवाल्याची मुजोरीच उतरली. ‘‘यू स्पीक मराठी, बाबा?’’ त्यानं विचारलं. ‘‘गोरा चेहरा, काला मन’’ ग्रेगरी उत्तरला. ग्रेगरीला इथंच थांबायचं नव्हतं. अशा अनेकांचा माज त्याने उतरवलेला होता. नंतर स्वतःच्या चेहर्याभोवती आणि छातीपुढं उजव्या बोटानं वर्तुळाकार खुणा करत ग्रेगरी म्हणाला, ‘‘बाहर से गोरा हॅूं; लेकिन अंदर से पुरा हिंदुस्थानी हूँ; समझ गये तुम? मै रोड पे चल रहा हॅूं; टाईमपास कर रहा हूँ। तुम्हे कोई प्रॉब्लेम? तुम कोई रियल टुरिस्ट क्यूँ नहीं पकड लेते? आं? मेरे जैसे भेंचोद हिंदुस्थानी लोगों को अकेला छोड दो भाईसाब, प्लीज!!’’ टॅक्सीवाला कडेकडेने सुसाट निघून गेला हे वेगळं सांगायला नको. तर शांताराम हा असा आहे. त्याचं मराठीपण व भारतीयत्व असं उसळून येतं! त्याच्या शेपटीवर कोणी पाय ठेवला की!
‘शांताराम’ ही एक मोठी ठेवच आहे साहित्यातली. समग्र मानवी आयुष्य ग्रेगरीनं वाचकांपुढे ठेवलंय. त्यातल्या भीषण मानवी यातना व दुःखं, हाल-अपेष्टा, उत्कट सुखं, माणसातलं देवत्व व पिशाच्च वृत्ती, विकार महाकाव्याच्या तोडीचे. अगदी महाभारतासारख्या ग्रंथाची आठवण यावी असे. याच्या भाषांतरासाठी अक्षरशः अफाट बौद्धिक कष्ट उपसले ते अपर्णा वेलणकरांनी! प्रकाश अकोलकर, रवींद्र राऊळ, नाशकातले सुप्रसिद्ध शायर बाबा आदम मुल्ला, डॉ. जी. एम. शेख, स्वराली परांजपे, धनश्री देवळे-देवधर, स्निग्धा शेवडे, मेघना ढोके, सुषमा देशपांडे, उमेश परिपूर्ण व मेहता प्रकाशनचे अनिल व सुनील मेहता या सर्वांच्या सहकार्याने वेलणकर मराठी साहित्यातलं हे सर्वोत्कृष्ट भाषांतर करू शकल्या. ग्रंथातली ग्रेगरीची एकेक वाक्य देखील महाकाव्यात शोभावीत अशी. ‘मनातलं तुंबळ युद्ध आतून माझं रक्त काढू लागलं होतं’, ‘माझ्या आयुष्याची सूत्रं माझ्या हातून कधीच निसटून गेली होती. नियतीच्या चक्रात भरकटत राहणं आता अपरिहार्य होतं,’ ‘भीती आणि दहशतीच्या हिंस्त्र श्वापदांनी माझ्या मनावर कब्जा केला होता‘, ‘अख्खं जग उन्मळून टाकणार्या भीषण, रौद्र वादळात सापडलेल्या थरथरत्या नाजूक वेलींसारखं माझं भविष्य माझ्याच पावलांशी थरथरताना मला जाणवत होतं’, ‘इट वॉज द लँड, व्हेअर द हार्ट इज किंग’, ‘भारत हा दिलदार लोकांचा देश आहे’, ‘तुरूंगवास ही खरी मनाची परीक्षा. नंतर शरीराची‘, ‘प्रेम म्हणजे क्षमेचं वचन! खात्री!!’, ‘ढगांनी झाकोळलेल्या रात्रीच्या अंधारात नियतीची पावलं वाजलेली मी स्पष्ट ऐकली. त्या आवाजात मैदान सोडून पळून जाण्याची धमकी होती.... आणि पाय रोवून लढाईला तयार राहण्याचं आव्हानही!’, ‘कुणा तिसर्याच्याच प्राक्तनाचे खिळे माझ्या कपाळावर ठोकण्याचा हा डाव कोणी आखला?’, ‘कार्लाच्या सुंदर डोळ्यांमध्ये मी आकंठ बुडून गेलो होतो; पण तिच्या नजरेतला अर्थ मी समजू शकलो नाही. अनेक गुपितांनी काठोकाठ भरलेली तिची नजर मी वाचू शकलो नाही’, ‘एखाद्या माणसाकडून एकेक करून सार्या आशा, सारी स्वप्नं हिरावून घेतली जात नाहीत, तोवर त्याच्या ‘आत’ कसकसल्या दगडांचा पक्का पाया आहे हे कसं कळणार?’, ‘ब्रिटिशांनी घालून दिलेल्या व्यवस्थेवर कुणीही शहाणा माणूस विश्वास ठेवत नाही’, ‘चक्रव्यूहात आपला पाय फसत चालला आहे या कुरतडणार्या जाणिवेनं पहिला दंश केला होता’, ‘एखाद्या ठिकाणी किती पैसा जमावा यालाही मर्यादा असते’, ‘कोवळ्या स्वप्नांच्या रूजवणीचे वाफे सांभाळणारी बागच आहे मुंबई म्हणजे’, ‘कितीतरी दिवसांनी मुंबईत रात्रीचा भटकत निघालो होतो. त्या रात्री मी पुन्हा नव्यानं मुंबईच्या प्रेमात पडलो. आसूसलेल्या प्रियकरासारखा तिला भेटत.... भिडत राहिलो’.
ग्रेगरीचा एक मित्र. स्कॉर्पिओ जॉर्ज. त्याचं एक वाक्य आलंय, ‘‘नियती आपल्याला नेहमीच दोन पर्याय देते. त्यातला एक आपण निवडावा असा असतो आणि दुसरा जो आपण प्रत्यक्षात आपण निवडतो.’’
सरतेशेवटी आणखी एक. ग्रेगरीचं हे आत्मचरित्रात्मक महाकाव्य! त्यानं ते एका व्यक्तिला अर्पण केलंय. ती आहे त्याची ‘आई!!’
तर मूळ नऊशे पानी इंग्रजी ग्रंथाचं हे रसरशीत मराठी भाषांतर संग्राह्य आहेच हे वेगळं सांगायला नको.
शांताराम
मूळ लेखक: ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स
अनुवाद: अपर्णा वेलणकर
प्रकाशक: मेहता प्रकाशन, पुणे
पृष्ठे: 1412 मूल्य: रु. 800/-
- महेश मांगले
९८२२०७०७८५
(पूर्वप्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक', पुणे)