Saturday, May 16, 2015

जगण्याची नितळता पाझरत जाणारी कविता





'चपराक प्रकाशन'ने प्रकाशित केलेल्या प्रभाकर चव्हाण लिखित 'सुंबरान' या कवितासंग्रहाची दखल आजच्या बेळगाव 'तरुण भारत'ने 'अक्षरयात्रा' या पुरवणीत घेतली आहे. अजय कांडर यांनी हे परीक्षण लिहिले आहे. श्री. कांडर आणि 'तरुण भारत' यांचे मन:पूर्वक आभार! 

मानवी मनाला नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आस लागलेली असते. भौतिक सुखाची आस जगण्याच्या निरर्थकतेकडे घेऊन जाते. तर आपल्या संस्काराचे, परंपरेचे संचित जपण्याची आस आपण बाळगतो. तेव्हा त्यातून जगण्याची नितळताच पाझरत राहते. ज्येष्ठ कवी बलवन्ततनय तथा प्रभाकर चव्हाण यांच्या ‘चपराक प्रकाशन’, पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सुंबरान’ या काव्य संग्रहातील कविता संस्कारांचे आणि परंपरांचे संचित जपत संतांच्या अभंगाच्या अन्वयार्थाने जगण्याचीच आस बाळगते. तर दुसर्‍या बाजूला संतांचाच प्रबोधनाचा विचार पुढे नेत अपप्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीच्या विचारांचा प्रहार करते. 
‘सुंबरान’मध्ये एकूण 52 कवितांचा समावेश आहे. सर्वच कवितांचे कवीच्या  स्वतःच्या अनुभवातून प्रकटीकरण झाले आहे. यातील बहुसंख्य कविता या छंदबद्ध असल्या, तरी त्याला एक स्वतंत्र आंतरिक लयही आहे. ही लय लोकभाषेशी आणि लोकजीवनातून लोकसंस्कृतीशी जोडली गेल्यामुळे कवितेची गेयता वाचकाला प्रभावित करते. श्र्र्ी. चव्हाण यांच्या सर्वच कवितांवर लोकजीवनाच्या संस्कांरांचा प्रभाव असल्याने त्या कवितेला चिकटून आलेली कवीची बोली, कवितेचा आशय अधिक सघन करत जाते. 
कवीचे जीवन कोकणच्या निसर्ग आणि मानवी जीवनाशी एकरूप झाले असल्याने ‘सुंबरान’मध्ये कोकणच्या निसर्गाचे त्यांना दिसणारे विलोभनीय दृश्यही चित्रात्मक पद्धतीने मांडले आहे. कोकणचा निसर्ग तिथे वस्ती करून राहणार्‍यालाच नाही, तर त्याच्या सहवासात आलेल्या सर्वानाच तो मोहून टाकतो. त्यामुळे त्याच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाला कोकणच्या निसर्गाचे रूप वेगवेगळे दिसत असते. कोणाला निसर्गाशी एकरूप झालेला माणूस दिसतो, तर कोणाला माणसालाच निसर्गाने कवेत घेतल्याचे भास होत राहतात. कवी चव्हाण मात्र कोकणातल्या निसर्गाबरोबरच तिथल्या लोककलांशी माणसाचे असलेले नातेच स्पष्ट करतात. या संदर्भात ‘गावाकडली होळी’ या कवितेत ते म्हणतात, 
गाव सान चिटुकलं, घाटाच्याही पलीकडं...
लपेटून बसलेलं, उभ आडवं डोंगराकडं...
रात्र होळी-पुनवेची, शुभ्र चांदणं प्यायलेली...
गावामंधी देव्हामोर्‍ह, बघा जमली मंडळी...
कुठल्याही लोकसंस्कृतीत धार्मिक विचार चिकटून आलेलाच असतो. कारण, धर्मशास्त्र हेच त्या-त्या धर्मातील माणसाचा लोकविचार झालेला असतो. मात्र, लोककलेच्या प्रभावातून लेखन करणारा कलावंत आपल्या धर्माच्या विचाराने जगतोच असे नाही. किंबहुना, तो समग्र मानवतेचा विचार करून जगत असतो. कवी चव्हाण हे आपल्या जात, धर्म समूहापेक्षा समग्र मानवतेचा विचार करून कोणत्याही धर्माचा आदरभाव बाळगताना दिसतात. एवढेच नाही, तर धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होताना आणि त्यातून माणूस रस्त्यावरच माणसासमोर उभा राहताना त्यांच्यातला संवेदनशील कवी अस्वस्थ होतो. अर्थात अशाच कलावंताला अशा धर्मांध शक्तीचा सर्वाधिक त्रास होत असतो. म्हणूनच ‘माणूसकी जराशी?’ या कवितेत ते म्हणतात
मस्जिद तोडू नका रे, जोडूनी कर विणविले
मुस्लिम धार्जिणा तू, हिंदू मला म्हणाले...
मंदिर नका रे तोडू, विनवुनी घरा परतता...
माझेच बापुड्याचे, घर भुईसपाट झाले...
कवी चव्हाण यांच्या कवितेच्या वरच्या ओळी वाचल्यावर वाचकही हबकून जातो. किती सहज आणि सोप्या शब्दात माणसाच्या आजच्या जगण्याचे भेदक वास्तव त्यांनी मांडले आहे. वरवर पाहता अलीकडल्या काही वर्षात या कवितेतील अनुभव अधिकाधिक सार्वत्रिक होत जातो आहे. मात्र, तो अनुभव आपला वाटावा, असे  वाटणारा वर्ग कमीच आहे. त्यामुळेच जाती-धर्मामध्ये भेदाच्या भिंती उभ्या राहत आहेत. 
कवी चव्हाण या आजच्या भीषण वास्तवाला सामोरे जाताना आपले जगणे मात्र, विनम्रच राहो, अशी सार्वकालिक प्रार्थना करताना दिसतात. माणूस नम्रतेपासून दूर जातो. तेव्हाच समाजात विसंवाद होत जातात. संवादाच्या जागा शोधण्याचा प्रयत्न करणारा वर्ग दुर्मीळच. पण, नम्रतेतून इतरांना जिंकता येतेच. परंतु, स्वतःलाही जिंकता येते. पण, यासाठी स्वतःकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची नम्रता त्याच्याकडे असायला हवी. चव्हाण या विचाराचेच असल्याने ते एका कवितेत म्हणतात
‘तुझसहित तव देऊळ सुंदर, दुरुनी मज पाहू दे
माझे चिखला-मातीचे, पाय असेच राहू दे.....’
कवी चव्हाण यांची कविता कष्टकरी वर्गाचेही प्रतिनिधीत्व करते. जागतिकीकरणाच्या काळात माणसाचा संवाद हरवला असला, तरी तो कमालीचा एकमेकांच्याजवळ आला आहे. हे त्याचे जवळ येणे त्याच्या जगण्यातील एक तांत्रिक गोष्ट आहे. त्यामुळे समाजात दोन स्तर निर्माण झाले आहेत. वरचा स्तर वरच्या वर्गाशीच नाते सांगतो आहे. तर खालच्या स्तरातील वर्गाला आपले नाते कोणाशी आहे. हेही सांगता येत नाही. अशी त्याची जगण्याची कोंडी झाली आहे. यात कष्टकरी वर्ग प्रामुख्याने आहे. या वर्गाची कणव कवी चव्हाण आपल्या कवितेत बाळगताना दिसतात. या वर्गाबद्दल आपल्या कवितेतून उद्गार व्यक्त करताना ते म्हणतात, 
‘झोका टांगला झाडाला, जीव टांगला पाडाला...
तान्हं लेकरू रडतं, माझं काळीज कढतं...
भरभरून गं पाट्या, सये फेकीते वरती
दुःख-उपसावं किती, भुई फाटली तळीची’
चव्हाण यांचे आयुष्य कामगार वर्गाशी निगडीत असल्याने या वर्गाबद्दल आपल्या भावना कवितेतून व्यक्त होताना त्यांचे मन अधिक भावूक होते. अशा वर्गाचे नायक झालेल्या लोकांचे ते स्मरण करत राहतात. कवीश्र्र्ेष्ठ नारायण सुर्वे हे कामगार वर्गाचेच प्रतिनिधित्व करणारे कवी होते. ते तर स्वतः कामगार होतेच परंतु, त्यांच्या आत्मचरित्रात्मक कवितांमधून त्यांनी कामगार वर्गाच्या प्रश्‍नांना वाचा फोडली. त्याचबरोबर कामगार वर्गाच्या जीवनवादी तत्त्वज्ञानाला एक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यामुळेच ते समस्त कामगार वर्गाचे नायक झाले. त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना चव्हाण म्हणतात, 
‘जैसा झळकशी नभी, तुबा सुर्वे नारायणा...
सारस्वतांच्या प्रांगणी, तुझा रुबाब देखणा...
तुझी कष्टाची शिदोरी, तुझे भाकरीचे गाणे...
तुझे बोलके उखाणे, तुझी डौलती निशाणे....’
कवी चव्हाण हे नारायण सुर्वे यांच्यावर कविता लिहिताना आपण भाकरीचे गाणे गाणार्‍याच वर्गाच्या बाजूने असल्याचे सूचित करतात. हेच त्यांच्या कवितेचे मोठेपण आहे. श्रद्धेचा आदर बाळगतानाच अंधश्रद्धेवर ते ताशेरे ओढतात. सारा समाजच कोरडा होत जाणार्‍या या काळात त्यांचा हा आत्मस्वर अतिशय मौलिक आणि विशेषतः तळातल्या वर्गाला प्रेरणा देणारा असल्याने आजच्या गद्यप्राय काव्यलेखन लिहिल्या जाणार्‍या काळात त्यांच्या आंतरिक लयीची ही कविता स्वतःचे वेगळेपण घेऊन आजच्या मराठी कवितेत सशक्त उद्गाराने अवतरली आहे. तिचे वाचकांनी मनापासून स्वागत करायला हवेच.
- अजय कांडर


Thursday, May 14, 2015

नव्या संघर्षाची नांदी!

प्रकाशक : ‘चपराक प्रकाशन’
दूरध्वनी : 020-2446 0909
पृष्ठ : 80  किंमत : 75 रूपये

आज मराठी कविता विविधांगांनी विस्तारत आहे. आगळा आशय आणि संपन्न अनुभवांनी तिची समृद्धता वाढत आहे. विविध कवी आणि कवयित्री काव्यशारदेच्या क्षितिजावर देदिप्यमान काव्यतारकांनी प्रकाशझोतात येताहेत. कधी त्यांच्या कविता स्वप्नपंखांची उत्तुंग भरारी घेताहेत तर कधी त्यांच्या कविता मऊशार मातीच्या ममताळु ओलेपणात आकाराला येताहेत. यातूनच खेड्याची कविता रूजून येताहे. ती आता प्रस्थापितांविरूद्ध प्रतिकाराची भाषा बोलू पाहते आहे. नवा क्रांतिकारी संदेश देते आहे. एका नव्या संघर्षाची नांदी ठरावी असे तिचे आगळेपण आहे. तिचा प्रवास ‘काळोखातून उजेडाकडे’ सुरू आहे.
मुळचे बुलडाणा जिल्ह्यातील पण सध्या पुण्याला स्थायीक असलेले प्रथितयश कवी शांताराम हिवराळे यांच्याही कवितेत या नव्या संघर्षाचे प्रतिबिंब पडले आहे. स्वप्नांपेक्षा सत्यात जगणार्‍या या कविचे आतापर्यंत ‘अश्रूंचा ऊन्हाळा’, ‘प्रारब्ध’, ‘तवंग’, ‘भावनांचे ओसाड प्रदेश’ असे चार कवितासंग्रह प्रसिद्ध झाले असून त्यांचा नुकताच ’दाटून येताहे काळोखी काहूर’ हा नवीन कवितासंग्रह ’चपराक प्रकाशन,’ पुणे यांनी प्रकाशित केला आहे.
या कवितासंग्रहात एकूण 71 कविता असून त्या समाजहीत, निसर्ग, व्यक्तिगत, कष्टकरी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार्‍या आहेत. त्यासाठी हा कवी कधी मुक्तछंद तर कधी छंदोबद्ध तर कधी गजल तर कधी लयबद्ध असा अभंगवजा प्रकार वापरतो. ‘एक नवा विषय’ घेऊन आलेली हिवराळे यांची ही कविता बोथट समाजमनाला धार देण्याचा प्रयत्न करते. विषमतेच्या काळोखाला चढलेली काजळी झटकण्याचा तिचा प्रयास आहे.
सध्या ‘माणुसकीलाच ग्रहण’ लागलेले असल्याने सर्वत्र काळोखी काहूर दाटून आली आहे. माणुसकीचा सूर्य त्याने गिळंकृत केला आहे. त्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचार, विषमता, अतिरेकीपणा, चंगळवाद, नैराश्य या गोष्टींनी होणार्‍या आत्महत्या, मरणाला आलेली स्वस्तता, नीतीभ्रष्टता आणि गलथानपणा, दिसून येतो. अशावेळी या कवीचे मन पेटून उठते. या काळोखाच्या काहूराला नष्ट करण्यासाठी तो संघर्ष करू पाहतो. आवेगाने तो म्हणतो,
माणसामाणसांतील संघर्ष
आता अटळ आहे
अटळ आहे संघर्ष आता
नातीगोती फुलवण्यासाठी
अटळ आहे संघर्ष आता
चंगळवाद जाळण्यासाठी
अटळ आहे संघर्ष आता
नवा माणूस घडविण्यासाठी
माणसांमाणसांतील संघर्ष
आता अटळ आहे..
.
इथला समाज एका अनामिक भीतीने अगतिक झाला आहे. सर्वत्र अत्याचार असूनही तो गप्प गप्प आहे. तो का गप्प आहे याचा हा कवी प्रकर्षाने शोध घेतो. त्याला या प्रश्‍नाचे लगेचच उत्तर सापडते की, इथल्या सत्तेच्या वारूळात डंख करण्यासाठी बसलेले विखारी नाग हेच या अंधारामागचे खरे कारण आहे. हे महाविषारी नाग या कवीला आपल्या प्रगल्भ शब्दशस्त्रांनी ठेचायचे आहेत. इथला हा ‘धर्मांध सत्तेचा बाजार’ त्याला उधळून लावायचा आहे. त्याचे वर्णन करताना तो म्हणतो
इथे सत्तेचे वारूळ इथे विषारी फुत्कार
इथे देवाच्या नावाने आंधळाच कारभार
इथे श्रद्धेचा मुलामा आत नुसताच अंधार
इथे धर्मांध सत्तेचा रोज भरतो बाजार

इथल्या समाजाच्या वाट्याला हे ‘काट्यावरचे जगणे’ का आले? याचा शोध या कवीने घेतला आहे. ओठावरच्या खोट्या हास्याला आम्ही फसतो, गोड शब्दांना भुलतो, असत्यालाच सत्य मानतो. पाठीवर प्रेमाने हात फिरविल्याचा आव आणीत त्याच पाठीत खंजीर खुपसणारे, माणुसकीची हत्या करणारे येथे गल्लोगल्ली आहेत, अशावेळी मनाला भयाच्या ’काटेरी वलयाने’ व्यापून टाकले आहे. त्यामुळे भयग्रस्त माणसाप्रमाणेच शब्दही मनातून बाहेर यायला घाबरतात. यावेळच्या अवस्थेचे वर्णन कवी अत्यंत प्रकर्षाने करतो.
सर्वत्र भीतीची लाट अशी
मनावर फुटते
नकळत कधी मग वेळेची
काच तडकते
जगण्याची येथे होते ऐशी
नकळत माती
शब्दातून माझ्याच का भीतीच
उमलत असते?

या देशात एकीकडे श्रीमंताचा वाढता आलेख व दुसरीकडे मातीला मिळणारी गरीबी याचे परस्सरविरोधी चित्रणही हा कवी प्रकर्षाने करतो. काट्यावरच्या या फाटक्या आयुष्याला समजुतीचे कितीही टाके घातले तरी ते उसवतच राहतात.
गर्द काळी रात फुटे
काळोखाचा पान्हा
झोपडीत निजलेला
गरीबाचा तान्हा
काऊ नाही, चिऊ नाही
भरवते माय
वाळलेल्या कोरक्यांना
बुरशीची साय

असे या गरीबीचे विदारक चित्रण कवी करतो.
आज समाज असा काळोखात चाचपडतो आहे. वासनांध वादळाचे थैमान माजलेले आहे. सत्यं-शिवं-सुंदरं या श्रेष्ठतम जीवनमूल्यांना अघोरी ग्रहण लागलेले आहे. प्रामाणिकपणे जगणार्‍यांच्या गळ्यावर दिवसाढवळ्या ‘अधर्माची’ तीक्ष्ण सुरी फिरते आहे. जिथे तिथे गुंडांची गर्दी आहे. अशा दडपशाहीच्या वातावरणात जनसामान्यांच्या इच्छा, आकांक्षा व स्वप्ने मातीला मिळताहेत. अशावेळी हा कवी संतापतो, चिडतो, अत्यंत उद्वेगाने तो म्हणतो,
बांडगुळासारखे खुशाल जगताहेत लोक
रक्त शोषूनी लोकांचे चिपाड करताहेत लोक
आटलेली ओल येथे का गोठलेले गीत ओठी?
रक्तोत्सवासाठीच का इथे सजताहेत लोक?

या कवीला प्रामाणिक सत्य जीवन जगण्याचे भान आहे. ‘सत्यानेच मला तारले कितीदा’ असे तो आग्रहाने सांगू इच्छितो पण इमानाने जगलेल्या निष्पाप जीवांची होळी होऊन शब्दांनाही आज कैद केले जात आहे. उत्तुंग उत्थानासाठी गर्जना करणार्‍यांचे आवाज दडपले जाताहेत. मानवतेला पायदळी तुडवले जात आहे. अमानुष अशी रक्तपिपासू श्‍वापदे सर्वत्र मोकाट सुटली असून सज्जनांचे गळे फोडून रक्तपिपासू खुशाल रस्तोरस्ती धनदांडगेपणाचा हैदोस घालतायत. अशावेळी हा आकांत कसा सहन करावा? या ‘बळी तो कान पिळी’पणाचा आता कडेलोट करावाच लागेल. भ्रष्ट लोकशाही, भ्रष्ट प्रशासन, भ्रष्ट नेत्यांसाठी चराऊ कुरणं, सर्वत्र ‘आदर्श’ घोटाळे, शिक्षणाचा भरलेला ‘डोनेशनमय’ बाजार, महागाईने काढलेला फणा या सार्‍या विघातक गोष्टींनी मांडलेला उच्छाद या ‘काळोखाच्या काहूराला’ खर्‍या अर्थाने कारणीभूत आहे. जनसामान्यांच्या आयुष्याला सर्वार्थाने ‘पांगळे’ करण्यास इथली ही (अ)लोकशाहीच जबाबदार आहे, कारण तिनेच हा सारा हाहा:कार माजविला असून ‘मौनाचे आभाळ’ निर्माण केले आहे. म्हणून हे मौनरूपी काळोखलेले आभाळ आता आम्हाला नको आहे, तर आता आम्हाला दाहीदिशा दणाणून सोडणारा ‘संघर्ष’ हवा आहे आणि हीच आता खरी नव्या संघर्षाची नांदी आहे, असे हा कवी निर्धाराने म्हणतो. हे सारे संपण्यासाठी त्याने निर्माण केला आहे एक नवा आशावाद! म्हणून तो म्हणतो,
ऐशा जुळू देगा
प्रकाशाच्या वाटा
उसळू देगा लाटा
चैतन्याच्या

किंवा
व्रतस्थ मी माझी तपस्या भंगली नाही कधी
श्‍वास माझे कोंडले त्यांनी असे झाले कितीदा
संपलो नाही कधी मी ना कधी मी दुभंगलो
आत्मबळ आले नव्याने असेही झाले कितीदा

या कवीने ‘वाळूउपशाचा’ एक नवा संदर्भही इथे दिला आहे. (इतरत्र कुणाच्याही कवितेत न आलेला) तो म्हणतो,
आता नुस्तेच खोल खोल खड्डे
अन् अमाप वाळूचा उपसा
कंत्राटदाराचा फुगत जातो
हरामाच्या पैशाने गच्च खिसा

हे सारे असे असताना बांडगुळासारखा खुशाल जगणारा हा समाज पाहून हा कवी कधी दु:खी होतो, तर कधी निद्रिस्त समाजाला जागे करण्यासाठी पेटून उठतो.
या काव्यसंग्रहात कष्टकर्‍यांच्या जीवनावरील कविता अशाच लक्षणीय आहेत. ‘दु:ख वेचता वेचता’ यातील पुढील ओळी कष्टकर्‍यांच्या कष्टमय जिण्याचे वर्णन अत्यंत वास्तवतेने करतात.
चिंध्या बांधून बोटांना
चाले कापूस वेचणी
ओठावर विरतात
अशी वेदनेची गाणी

‘स्वप्नांनाच जातो तडा’, ‘उसवण’, ‘दिशाहीन’ आदी कविता कष्ट उपसणार्‍या मजूरांचे वेदनामय जीवन हुबेहूब उभे करतात.
‘ठणक’, ‘नाते’, ‘जंगलतोड होताहे’, ‘अनोळखी भास’, ‘ऋतू हिरवा’, ‘अंधारधून’, ‘दुरावले पक्षी’, ‘श्रावणधारा’ आदी कवितांमधून कवीने निसर्गातील विविध घटकांची रूपे, स्थित्यंतरे जशीच्या तशी रंगविली आहेत.
घरटेच असे एकाकी, एकाकी
जळते भान
धुरात हरवले पक्षी, शब्दांचे
छळते मौन

यातून निसर्ग प्रतिमांतून मनाची एकाकी, बेचैन अवस्था त्याने वर्णिली आहे.
‘मन नितळ आरसा’, ‘ऐसे माझे मन’ या दोन कविता मात्र निसर्गकन्या बहिणाबाईंच्या ‘मन’ या कवितेशी नाते सांगणार्‍या जरी असल्या, तरी त्यातील दु:खमयता हे त्यांचे वेगळेपण आहे.
अशा या विविधांगी, आशयसंपन्न, अनुभवनिष्ठ काव्यसंग्रहातून कवीची ‘एका नव्या संघर्षासाठी‘ नवा स्वाभिमानी माणूस निर्माण करण्याची वृत्ती दिसून येते. कारण, प्रारंभीच मनोगतात तो म्हणतो, ‘‘मी स्वानंदासाठी कविता लिहिली नाही, तर समाजामध्ये सध्या जे प्रखर वास्तव आहे, ते मन विषण्ण करणारे, अस्वस्थ करणारे, बेचैन करणारे आहे. ही मनाची विषण्णता, अस्वस्थता, बेचैनी कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध होते, प्रतिबिंबित होते. त्यासाठी शब्दांसाठी अडून बसावे लागत नाही. कारण, शब्दांवर माझी निष्ठा आहे. शब्दच माझे सर्वस्व आहे.’’
मलपृष्ठावरील संपादक प्रशांत चव्हाण (बेळगाव तरूण भारत) यांचा अभिप्राय खूपसा अर्थपूर्ण आहे. गुरूगोविंद आंबे यांचे बोलके मुखपृष्ठ आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांचे अचूक संपादन या गोष्टींनी हे पुस्तक निश्‍चितच रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करेल यात संदेह नाही. कवी शांताराम हिवराळे यांच्या भावी लेखनास उदंड सदिच्छा.

* प्रा.रायभान दवंगे
कमलापूर, जि.अहमदनगर
भ्रमणध्वनी : 99227 21015


Tuesday, April 28, 2015

साहित्य महामंडळाच्या वैद्य-महाजन गॅंगचा बेशरमपणा!



साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य

कोषाध्यक्ष सुनील महाजन
घुमान येथे झालेल्या 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वैद्य-महाजन गँगने सांस्कृतिक कार्यक्रमांचे कंत्राट घेतल्याचे सत्य पुढे येत आहे. साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या साहित्यिकांना एक हजार रूपये तर कलाकारांना पंचवीस हजार रूपये मानधन दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. साहित्य महामंडळाकडे मानधन देण्याचे अधिकार नसल्याने आयोजकांनी हे मानधन दिल्याचे महामंडळाने सांगितले असून, साहित्य संमेलनात साहित्यिकापेक्षा कलाकार महत्त्वाचे असतात हे त्यांनी दाखवून दिले आहे.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पैशाचे मोठे व्यवहार होतात आणि त्यात अनेकांचे उखळ पांढरे होते, हे वेळोवेळी दिसून आले आहे. ‘आपण ठरवू ती पूर्व’ या तोर्‍यात वावरणार्‍या महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी अस्सल साहित्यिकांची उपेक्षा करत नकलाकारांनाच मोठे करण्याचे उद्योेग सुरू केले आहेत. डॉ. माधवी वैद्य यांच्या गँगमध्ये योगेश सोमण, राहुल घोरपडे, सोनाली कुलकर्णी हे, तर सुनील महाजन यांच्याकडून निकिता मोघे यांचेच नाव दरवेळी पुढे का दामटले जाते, हे लपून राहिलेले नाही. ‘पायलवृंद’ संस्थेच्या माध्यमातून सुनील महाजन यांनी कलाकारासाठी म्हणून 1 लाख 45 हजार रूपये घेतल्याचे उघड झाले आहे. अनेक गैरव्यवहारात बरबटलेल्या या लोकानी महामंडळाचा राजीनामा देऊन बाहेर पडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रा. मिलिंद जोशी यांनी साहित्य परिषदेचा राजीनामा दिल्यानंतर माधवी वैद्य आणि त्यांच्या चमूंच्या कारस्थानांचा बुरखा ‘चपराक’ने फाडला होता. त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘मसाप पत्रिका’चे संपादक सु. प्र. कुलकर्णी यांनीही वैद्य बाईंच्या गैरव्यवहाराबाबत मोठा आवाज उठवून राजीनामा दिला होता. परिषदेतील काही टुकार कवड्यांच्या आणि स्वार्थी लोकांच्या मदतीने हे गैरव्यवहार वेळोवेळी दाबून ठेवल्याने सारे काही अलबेल होईल असे कुणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. सत्य हे कधीही फार काळ लपून राहत नाही. त्यामुळे साहित्य परिषद किंवा साहित्य महामंडळ आपल्या बापजाद्यांची प्रॉपर्टी आहे, अशा आविर्भावात कोणीही राहू नये.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात अनेक मान्यवरांनी साहित्य रसिकांना वेळोवेळी ज्ञानामृत पाजले आहे. व्याख्यानांच्या माध्यमातून विचार जपण्याचे मोलाचे काम या सभागृहात झाले आहे, मात्र निकिता मोघे यांच्या सोबतच्या काही कलाकारांनी पायात चाळ बांधून याच सभागृहात नाचाचा सराव केल्याचेही सांगितले जात आहे. सुनील महाजन आणि माधवी वैद्य यांनी हितसंबंध जोपासत इकडे दुर्लक्ष केले असले तरी साहित्य वर्तुळातून मात्र याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. माधवी वैद्य यांच्या आर्थिक गैरव्यवहारांची धर्मादाय आयुक्तांनी स्वतंत्र समिती नेमून तपासणी केली पाहिजे. महामंडळाचा पदाधिकारी हा आर्थिक लाभार्थी असता कामा नये, हा संकेत उराशी बाळगून गदिमा यांच्यापासून ते ग. ना. जोगळेकर यांच्यापर्यंत अनेकांनी मोठे योगदान दिले आहे. या परंपरेला हारताळ फासण्याचे काम ‘भोली सूरत दिलके खोटे’ वृत्तीच्या वैद्य-महाजनांनी केले आहे.

माधवी वैद्य यांच्या कारकिर्दीत अनेक कारस्थानांना ऊत आल्याचे दिसून येत आहे. फारशी कुवत नसलेल्या सामान्य माणसाला प्रतिष्ठा देऊन मनमानी करण्याचे उद्योग त्यांनी सुरू ठेवले आहेत. सदैव दुसर्‍यांच्या कविता वाचून पैसे मिळवण्यात हयात गेलेल्यांना सर्जनशील साहित्याचे मोल आणि महत्त्व काय कळणार? असा रोकडा सवाल साहित्य रसिक विचारत आहेत. यांचे कारनामे वेळोवेळी उघड झाल्याने परिषदेचे मोठे हसे होत आहे. ‘चपराक’ने सातत्याने यांचा बुरखा फाडूनही पत्रकार परिषदेचा कायम सुळसुळाट करणार्‍या माधवी वैद्य शांतच आहेत. त्यांनी तोंड उघडावे आणि कुणाही पदाधिकार्‍यावर आरोप झाल्यास राजीनामा देऊन बाहेर पडण्याची परिषदेची परंपरा जपावी. नैतिकतेची थोडीफार चाड असेल तर वैद्य आणि महाजन यांनी त्यांच्यावरील आरोप खोडून काढावेत.
पद गेल्यानंतर आपल्याला कोणीही विचारणार नाही, आपल्या मुलीची, जावयाची, नातीची आणि अंत:स्थ मित्रमैत्रिणींची वर्णी कार्यक्रमात लावता येणार नाही, त्यांना आर्थिक लाभ मिळवून देता येणार नाही, हे या जोडीला माहीत असल्याने वैद्य-महाजन यांची राजीनामा देण्याची मुळीच शक्यता नाही. या सर्व प्रकाराबाबत मान्यवर साहित्यिक आणि साहित्य रसिकातून मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

* घुमान येथील 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संहिता लेखनासाठी माधवी वैद्य यांनी तीस हजार रूपये घेतल्याचे उघड झाले आहे. प्रसारमाध्यमांनी हा प्रकार चव्हाट्यावर आणताच वैद्य यांच्या नावे धनादेश निघाला असला तरी त्यांनी तो स्वीकारला नाही, असे लंगडे समर्थन केले जात आहे. माधवी वैद्य यांची मराठी साहित्याच्या, संस्कृतिच्या अभ्यासक म्हणून काय ओळख आहे? महामंडळाच्या अध्यक्षा असूनही असे गैरव्यवहार करण्याइतके निलाजरेपण त्यांच्यात चांगलेच मुरलेले दिसते.

* माधवी वैद्य आणि सुनील महाजन या दोघांनीही साहित्य परिषदेचा वापर आपले वैयक्तिक कार्यालय म्हणून केल्याचाही आरोप केला जातोय. महाजन त्यांच्या कोणत्याही कामासाठी, कुणालाही परिषदेत बोलावतात आणि तिथेच साहित्यबाह्य विषयातील त्यांची वैयक्तिक कामे मार्गी लावतात, हे सत्य कोण नाकारणार?


*  घुमानच्या साहित्य संमेलनात भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांची मुलाखत घेणार्‍यांना प्रत्येकी 6 आणि 8 हजार रूपये मानधन देण्यात आले. माध्यमांनी ठोकल्यानंतर देवी यांना मात्र 10 हजार रूपयांचा धनादेश जुनी तारीख टाकून देण्यात आला. तो धनादेशही त्यांना एका ओळीचे कृतज्ञता पत्र न पाठवता आणि त्यांच्याऐवजी त्यांच्या  प्रकाशकाकडे देण्यात आला.

*  प्रकाशक परिषदेच्यावतीने बहिष्कार टाकून संमेलन उधळून लावण्याचा प्रयत्न करणार्‍या ‘पद्मगंधा प्रकाशन’च्या अरूण जाखडे यांनी डॉ. गणेश देवी यांची मुलाखत संमेलनात घेतली होती, हेही लक्षात घ्यायला हवे. 

सागर सुरवसे, पुणे 
९७६९१७९८२३ / ९६६५८९९८२३ 
EMAIL:  sagar.suravase@gmail.com 




Monday, March 23, 2015

'मसाप’चा अव्यापारेशु व्यापार!


राज्यस्तरीय युवा नाट्य-साहित्य संमेलनाच्या नावाखाली माकडचाळे; लाखोंचा चुराडा


 महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बारामती शाखेच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय युवा नाट्य-साहित्य संंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या संमेलनात एक-दोन स्थानिक कलाकारांच्या एकांकिका वगळता दुसरे काहीच झाले नाही. पाहुण्यांना यायला उशीर झाला म्हणून वेळ मारून नेण्यासाठी एका कलाकाराने मिमिक्रीच्या नावाखाली नुसतेच माकडचाळे केल्याचे पहायला मिळाले.
नाट्य क्षेत्रातील अभिराम भडकमकर हे त्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते नाट्य-साहित्यावर कमी आणि व्यवसाय प्रशिक्षणावरच जास्त बोलले. व्यवसाय निष्ठेने करावा, नैतिकतेने करावा, कल्पकतेने करावा या विषयी भडकमकर भरभरून बोलले. मात्र नाट्यसाहित्य कसे लिहावे, त्याचे नियम काय, संवाद लेखन कसे असावे, नेपथ्य कसे असावे यावर मात्र त्यांनी चकार शब्दही काढला नाही.
या राज्यस्तरीय युवा नाट्य-साहित्य संमेलनाला रंगभूमीवरील एकही कलाकार उपस्थित नव्हता, हे दुर्दैवच. येथील काही तुरळक युवकांशी संवाद साधण्यास एकाही नाट्यलेखकाची उपस्थिती नव्हती. कार्यकारिणी सदस्यांची व्याख्याने आयोजित करून 'मसाप’ने या युवा नाट्यसाहित्य संमेलनाची बोळवण केली.
चित्रपट आणि साहित्य या विषयावर बोलताना राज काझी यांनी तर साहित्यातील गुणवत्तेचा मुद्दा बाजूला ठेऊन मार्केटींगलाच महत्त्व असल्याचे ठासून सांगितले. त्यामुळे युवा नाट्य-साहित्य संमेलन भरकटल्याचे पहायला मिळाले.
समारोपाचे प्रमुख पाहुणे असलेल्या ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहन जोशी यांनीही कार्यक्रमाला दांडी मारली. संमेलनाचे सभामंडप तीनही बाजूंनी पडद्यांनी बंदिस्त असल्यामुळे जे काही जेमतेम श्रोते होते. मात्र उकाड्याने ते हैैराण झाले. कसलेही पूर्वनियोजन नसलेले हे युवा नाट्य-साहित्य संमेलन घाईघाईने उरकण्याचा अट्टहास 'मसाप’ने का केला असाही प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 
(साप्ताहिक चपराक २३ मार्च २०१५)   

Wednesday, March 18, 2015

मराठी मातीतल्या 'अस्सल' कविता!


लहानथोरांपासून सर्वांच्याच भावविश्‍वाला साद घालणारा वाङ्मयप्रकार म्हणजे कविता. वास्तविक मानवी जीवनच काव्याने भरून राहिलेले आहे. त्यामुळे स्वाभाविकच कविता ही प्रत्येकाला कायमच सर्वाधिक जवळची वाटते. ‘चपराक प्रकाशन’च्या वतीने प्रकाशित झालेल्या ‘अक्षरगाणी’, ‘सुंबरान’, ‘नवं तांबडं फुटेल’ आणि ‘दाटुनी येताहे काळोखी काहूर’ या चार कवितासंग्रहांच्या निमित्ताने याची पुनर्प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. त्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.

बालसाहित्य वा बालकविता हा तर साहित्याचा उगमस्रोतच मानता येईल. उगमाजवळचा नदीचा प्रवाह जितका सोपा वाटतो, तितकाच तो खडतर असतो. बालसाहित्याबाबत तसेच म्हणावे लागेल. बालसाहित्य वा काव्यलेखन जितके सोपे दिसतेे, तितकेच ते अवघड आहे. बालगोपाळांना समजेल, आवडेल, त्यांच्या कोवळ्या मनाचा ठाव घेईल, अशा शब्दांत लिहिण्यासाठी मुळातच लिहिणार्‍याला आधी लहान व्हावे लागते. तीच बालसाहित्यिकाची पूर्वअट असते. त्यात बालकवितेसारखा प्रकार हाताळायचा असेल, तर कवीचा अक्षरशः कस लागतो. संदिपान पवार यांनी हे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले आहे.
 पवार यांचा ‘अक्षरगाणी’ हा एक अभिनव प्रयोग आहे. लहानमुलांना या गाण्यातून वा कवितेतून स्वर-व्यंजनांची अर्थात मूळाक्षरांची ओळख करून देण्याचा कौतुकास्पद प्रयत्न त्यांनी केला आहे. अत्यंत साध्या, सोप्या भाषेत या माध्यमातून त्यांनी मुलांशी संवाद साधला आहे. स्वाभाविकच अक्षरओळख करण्याच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक पालक, शिक्षक सर्वांसाठीच उपयुक्त ठरू शकते.
‘अ’ हा पहिला स्वर. स्वाभाविकच अक्षरगाण्यांची सुरुवात या स्वरापासूनच सुरू  होते.
अननसाचे अ आहे
पहिले मूळाक्षर
पाठांतर करू चला
होऊ सारे साक्षर
अशा प्रकारे गाण्यातून पवार ‘अ’ अननसाचा धडा देतात. शिवाय साक्षरतेचे बीजही मनात रुजवतात. यानंतर आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः यांसारख्या स्वरांचीही चार ओळीतल्या गाण्यातून ते ओळख करून देतात.
अं च्या अंबारीत
बसता राजा
हत्ती चाले पुढे
वाजे बेंडबाजा
 अशा प्रकारच्या लयबद्ध व तालबद्ध ओळी या संग्रहात असून, त्या निश्‍चितच मुलांना झुलवणार्‍या, नाचवणार्‍या आहेत.
 कुठलीही गोष्ट गाण्यातून सांगितली, की ती मुलांना पटकन समजते, हा बालमानसशास्त्राचा सिद्धांत आहे. पवार यांनी या सिद्धांतावरच्या पायावरच आपली सरळमार्गी व रोजच्या व्यवहाराच्या भाषेत बोलणारी कविता फुलविली आहे.
कमळाचे क अक्षर
व्यंजन पहिले
आवडते देवाला
कमळ वाहिले
अशी क ते ज्ञपर्यंत पुढे जाणारी कविता मुलांचे अक्षरज्ञान अधिकच ठळक करते.
पंख असता परि
पायावर चालणारा
श चा शहामृग
पक्षी असे पळणारा
 यातून मुलांना शहामृग पक्षाच्या या वैशिष्ट्याचेही ज्ञान होते. स्वाभाविकच मुलांना परिसराचे, भोवतालचे ज्ञान व्हावे, यादृष्टिने अशा काही ओळी महत्त्वाच्या ठरतात.
ज्ञ चे ज्ञानोबा
आळंदीला आले
ज्ञानेश्‍वरी लिहिली
अन् देवची झाले
 हा काव्यसंग्रहाचा समारोपही तितकाच भावणारा आहे. मुख्य म्हणजे ही कविता मुलांच्या मनातील अनेकविध संकल्पना दृढ करणारी आहे. शिक्षण आनंददायी व्हावे, असे आपण नेहमीच म्हणत असतो. मात्र, प्रत्यक्षात त्यादृष्टिने काही घडताना दिसत नाही. पवार यांनी त्यादृष्टिने अत्यंत स्तुत्य असा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मूळाक्षरांचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने ओळख करून देण्याचा हा प्रयोग निश्‍चितच सर्वांसाठी आनंददायी ठरेल, यात संदेह नाही. किंबहुना, ऋ, लृ यांसारख्या मूळाक्षरांचा कुठे उल्लेख दिसत नाही. ऋषी, ऋतू, ऋजुता, ऋग्वेद, ऋचा यांसारखे कितीतरी शब्द सातत्याने वापरले जातात. त्यामुळे ‘ऋ’चा उल्लेख असायला हवा होता, असे वाटते. ‘लृ’ हा केवळ क्लृप्तीपुरता सीमित राहिला आहे. याशिवाय काही अनुनासिक मूळाक्षरे गायब झाली आहेत. त्यांचा अनुल्लेख औचित्याला धरूनच आहे. याशिवाय काही ओळींमध्ये यमक वा उपमा कृत्रिम वाटतात. हा अपवाद सोडल्यास ही अक्षरगाणी, त्यांना साजेेशी चित्रे, मांडणी सुबक अशीच आहे.
कवी प्रभाकर बळवंत चव्हाण यांच्या ‘सुंबरान’ या काव्यसंग्रहातील कविता या संत तुकाराम आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘अभंगगाथे’चा व ‘ग्रामगीते’चा वारसा सांगणार्‍या आहेत. भूपाळी ते प्रार्थना अशी उलगडत जाणारी ही कविता बहुपदरी अन् बहुआयामी आहे. तिच्यात अनेकविध सौंदर्यस्थळे ओतप्रोत भरलेली आहेत. या कवितेतून चव्हाण यांचे सामाजिक भान, प्रबोधनाप्रतीची निष्ठा अन् सर्वधर्मसमभावाचा व्यापक दृष्टिकोन ठसठशीतपणे अधोरेखित होतो.
या कवितेतून कोकणच्या नितांत सुंदर निसर्गाचे अत्यंत रमणीय दर्शन घडते. ‘साद’ ही कविता सृष्टीसौंदर्य व भावभावना याचा उत्कृष्ट आविष्कारच म्हटला पाहिजे.
 
गिरी माथी शोभल्या आम्रतरूच्या ‘ओळी’
 काजूंची मौक्तिके सुवर्णात गुंफलेली
 तरळतात अजुनी आठवणींच्या लाटा
 फणसाच्या कुशीत भरला अमृत साठा
 कोकणातील आंबा, काजू, फणसाची कूस, आठवणींच्या लाटा अशा प्रतिमा मन मोहवून टाकणार्‍या आहेत. याशिवाय श्र्र्ावणातील मखमल, भुईचंपकासह जंगम-संगम झुळझुळ घाट अन् कवीने ओवलेल्या शब्दफुलांच्या माळा त्यांच्या उत्तुंग प्रतिभेचीच साक्ष देतात.
 चव्हाण यांची कविता अंधश्र्र्द्धा, कर्मकांडावर कठोर प्रहार करते. मात्र, ती नास्तिकही नाही. माणूसपण, मानवता हा या कवितेचा मूलस्रोत आहे. जात, धर्म, पंथात ही कविता अडकत नाही. सर्वधर्मांचा, प्रतीकांचा आदर करणारी, समस्त मानव जातीवर इतकेच नव्हे, तर पशुपक्षी, प्राणी, निसर्ग यांच्याशी ऋणानुबंध असलेली ही कविता आहे. चव्हाण यांची ही प्रगल्भ कविता जातीधर्माच्या अस्मिता टोकदार होत जाणार्‍या आजच्या काळात कोणत्याही माणसाला विचारप्रवण करते. त्याच्यातील माणूसपण, आत्मभान जागवते.
धर्म नव्हे जात, शुद्र वा विटाळ ।
प्रेमाचा सुकाळ । धर्म जाणा ॥
धर्म नव्हे स्वार्थ, क्रौर्य रक्तपात ।
कारुण्य सवेत । धर्म जाणा ॥
 चव्हाण यांची कविता धर्माकडे या दृष्टिने पाहते. या कवितेतील विचार हा सर्वव्यापी आहे.
   बलदंड वर्धमान, सत्य, अहिंसा संयम
   प्रज्ञा, शील, करुणेने बुद्ध शांतीचा संगम
   पैगंबरांचा सबक मक्का, मदिना पवित्र
   कोणी अनाथाचे नाथ, त्यांचे वाचावे चरित्र
आणि
 गावी संतांची वचने ज्ञाना, तुकाचा जागर
 सज्जन वा प्रज्ञावंत जनसेवक जे थोर
 मग सवत्या चुलीचा, ‘धर्म सुभा’ का सवता?
 घ्यावा उमजून तरी, ‘खरा धर्म मानवता’
 अशी मानवतेवर विश्‍वास असणारी ही कविता आहे.
 नेत्रदान, पाणी बचत, आरोग्याचा संदेश, राष्ट्रकल्याण, तरुणाईला संदेश अशी या कवितेची अनेक अंगे आहेत. त्यामागे प्रत्येकाचे सामाजिक भान वाढावे, हाच शुद्ध उद्देश आहे.
  म्हणून हे सुंबरान मांडीलं व माय
            जनता जनार्दना ॥
साधू, भोंदू, कर्मकांडे; चमत्कारे केली कोंडी
ढोंगी भोगी बाबा-बापू, तया रोज तूप हुंडी
‘खर्‍या देवा बुडविले’, नादी लागोनी पाखंडी
करणी-धरणीत गाडीला, सोन्या धनगरांचा धोंडी
विज्ञानाचे मारेकरी, क्रूर सैतानांच्या झुंडी
झणी उठा वारकरी, छेडा विवेकाची वीणा ॥
असं म्हणत ही कविता सुंबरान आळवते. चव्हाण यांच्या कवितेवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कवितेचा विलक्षण प्रभाव दिसतो.
ग्रंथ पुस्तके वाचून, जरी केला असे चोथा ।
जीवाभावानं वाचावी, वेचावी ती ग्रामगीता ॥
अन्
तुझ्या-माझ्या अस्तित्वात, सकारात्मक जीवन ।
आनंदाची अनुभूती, आस्तिकत्व चिरंतन ।
तुकोबांच्या अभंगात, दिव्य मायेची पाखर ।
ग्रामगीता तुकडोजींची, मानवतेचे मंदिर ॥
ही कविता या संग्रहाचा कळसाध्यायच मानता येईल.
कवी माधव गिर यांचा ‘नवं तांबडं फुटेल’ हा कवितासंग्रह मराठी कवितेसाठी वेगळे परिमाण ठरू शकेल, असा आहे. मराठी साहित्यात आईवर विपुल लेखन झाले आहे. हे लेखन हळवे, उत्कट व काळजाचा ठाव घेणारे असे आहे. तुलनेत बापावर मोजकेच लेखन झाले आहे. काही अपवाद वगळता हे लेखन रूक्ष, कोरडे या सदरात मोडणारे आहे. गिर यांची कविता या सर्वाला छेद देणारी आहे. या कवितेचे विशेष म्हणजे ती अस्सल मातीशीच नव्हे, तर बापाशी नाळ असलेली आहे. शेतात राबणारा बाप इतक्या उत्कटतेने, तळमळीने गिर यांनी या कवितेतून पुढे आणला आहे, की त्याच्या भेटीने कोणताही माणूस अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. त्या अर्थी घरदार, शेतामातीसाठी हाडाची काडं करणार्‍या बापाला गिर यांनी खर्‍या अर्थाने न्याय दिला असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
मानेवर जू ठेऊन
ढेकळा धस्कटातून
चालत राहतोस...
उन्हातान्हात बैलामागून
आपलीच हाडे जाळून घेतोस..
कष्टाचे डोंगर उपसणार्‍या बापाचे हे दुर्लक्षित रूप कवी मोठ्या ताकतीने कवितेतून उभं करतो. ‘बांधावरचा लिंब’ या कवितेतून तर कवीने बांधावरच खितपत पडलेल्या वा उपेक्षित राहिलेल्या बापाला जगासमोर आणले आहे.
बांधावरचा हा लिंब मला
बापासारखा वाटतो
ऊन, वारा, पाऊस झेलून
गायी, गुरं, वासरं अन् वाटसरू
या सर्वांना आसरा देतो
 हा कवितासंग्रहाचा उत्कटबिंदूच मानला पाहिजे. यानंतरही या कवितासंग्रहात ठायी ठायी बाप येतो. गाव, शेत, शेतकरी, त्याचं जगणं, सावकारी पाश अशा अनेक अंगानी कविता फुलत जाते. मात्र, बाप हाच या कवीचा मुख्य गाभा आहे. त्यामुळे बापच सर्वत्र भरून राहतो.
गिर यांच्या कवितेतून मातीवरील श्र्र्द्धा व भक्तीचेही दर्शन घडते.
नाही पंढरीला आलो
तुझ्या दर्शनाला देवा
काळ्या मातीत राबतो
घेई जाणून तू सेवा
 या काव्यओळी तर संत सावता माळी यांच्या कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी॥ या अभंगाशी नाते सांगणार्‍या आहेत. गोरगरिबांचा देव असणार्‍या विठ्ठलावर कवीचे अतीव प्रेम आहे. किंबहुना, खरा विठ्ठल कवीला मातीत, शेताशिवारात, पिकापाण्यातच सापडतो.
तुझा राऊळ कळस
दिसे माझ्या शेतातून
तुझी सावळीशी मूर्ती
हाले माझ्या पिकातून
अथवा
काय मागू तुझ्यापाशी
तू रे बडव्यांचा दास
नाही पंढरीला येत
मी हा पूजतो मातीस
 यांसारख्या कवितांतून कवीची मातीवरील श्र्र्द्धाच अधोरेखित होते.
शेतात राबराब राबूनही शेतकर्‍याला त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. या व्यवस्थेत शेतकर्‍याच्या पदरी पिळवणूकच येते. डोळ्यात ऊस जळताना, टाबून टाकली उरात कळ, यातून शेतकर्‍याचं दुःख अत्यंत तीव्रतेनं प्रकट झालं आहे.
पाऊस हा शेतकर्‍यांचा जीव अन् जीवन. शेतकर्‍याच्या जीवनात पावसाला काय स्थान आहे, हे ‘अशी मिरगाची झड’ या कवितेतून सांगण्याचा कवीने प्रयत्न केला आहे.
अशी मिरगाची झड
ओल्या मनी उतरते
अंगणात समृद्धीची
एक लय पसरते
 या ओळी मनात उतरल्याशिवाय राहत नाहीत. ही कविता कुणब्याचं शापित जगणं मांडणारी असली, तरी ती निराश वा हताश नाही. ‘नवं तांबडं फुटेल’, अशी आस बाळगणारी आहे. शेतीतील प्रश्‍न, बळीराजाची फरफट, निसर्गाची अवकृपा, सावकारी पाश यांसोबतच गाव, तेथील भवतालचं दर्शन घडविणारी ही कविता भारतातील रंजल्यागांजल्या शेतकर्‍याचेच प्रतिनिधित्व करणारी आहे. अर्थातच मराठी वा ग्रामीण साहित्याला ही कविता नवा आयाम प्राप्त करून देईल, यात संदेह नाही.
 शांताराम हिवराळे यांचा ‘दाटून येताहे काळोखी काहूर’ हा काव्यसंग्रहदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. माणुसपणावर दाटलेल्या अंधाराकडे ही कविता निर्देश करते. स्वस्त झालेले मरण, आत्महत्या, माणुसकीला लागलेलं ग्रहण, चंगळवाद अन् या माध्यमातून काळोखत चाललेल्या वाटा याचं अस्वस्थ चित्रण ही कविता करते.
‘वस्ती’ या कवितेतून
वस्तितल्या दारिद्र्यात
काळोख पाहिला मी
लाचार जिंदगीचा
आकांत पाहिला मी
अशा नेमक्या शब्दांत कवीने आपली व्यथा व्यक्त केली आहे. सभोवतालच्या अनेक घटना वा प्रसंग याचा कवीमनावर परिणाम होत असतो. हिवराळे यांच्या कवितेतही याचे प्रत्यंतर पहायला मिळते. अंधश्र्र्द्धा, भ्रष्टाचार, महागाईच्या नावाने होणारं सामान्यांचं शोषण अत्यंत परिणामकारकपणे ते मांडतात. मुळात ही सर्वसामान्यांचं दुःख, व्यथा मांडणारी कविता आहे. सत्ता, नीतीभ्रष्टता यामुळे अवघा समाज कसा नाडला, चिरडला जातो, हेच हिवराळे यांची कविता सांगते.
दाम, दंड, भेद
ऐशी राजनीती
कशी येईल गा
विकासाला गती
यातून सत्तेचे, राजकारणाचे चित्र कवी मांडतो. बांडगुळासारखा खुशाल जगणारा समाज पाहिला, की तो आणखीनच व्यथित होतो. मात्र, त्याच्या मनातही प्रकाशवाटा आहेत. काळोखाचे काहूर दूर होईल आणि चैतन्याच्या प्रकाशात अवघा आसमंत उजळून जाईल, अशी अपेक्षा हिवराळे यांची कविता बाळगून आहे.
 एकूणच अस्सल मातीतल्या या ‘अक्षर’ कविता आहेत. या कवितांमधून अस्सल जीवनानुभवच व्यक्त झाला आहे. त्यामुळे रसिकांनी या कविता आवर्जून वाचायलाच हव्यात.
- प्रशांत चव्हाण
संपादकीय विभाग प्रमुख,
बेळगाव तरुण भारत, पुणे


Tuesday, March 17, 2015

चकटफूंना चपराक!


घुमान येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रसारण दूरदर्शन आणि आकाशवाणीने मोफत करावे, अशी मागणी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी केली होती. त्याचा खरपूस समाचार घेताना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ‘साहित्य संमेलनाची फुकटेगिरी बंद करा’असा योग्य सल्ला दिला आहे. यावरून साहित्य क्षेत्रात उलटसुलट प्रतिक्रिया येत असतानाच सांस्कृतिक मंत्र्यांनी घुमजाव करत ‘घुमानजाव’चा नारा दिला आहे आणि दूरदर्शनच्या अधिकार्‍यांशी यासंदर्भात बोलणे सुरू असल्याचे सांगितले आहे. असे जरी असले तरी तरी तावडेंच्या तावडीतून ही फुकटेगिरी सुटली नाही, याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. ही फुकटेगिरी केवळ मोफत प्रसारणापुरती नाही तर यांच्या कामकाजात आणि वृत्तीत अनेक ठिकाणी ठळकपणे अधोरेखित होते. 
संत नामदेवांची कर्मभूमी असल्याने घुमानला साहित्य संमेलन झाल्यास त्याला आमचा पाठिंबा असेल, अशी भूमिका ‘चपराक’ने सुरूवातीपासून घेतली आहे. मात्र या संमेलनाच्या निमित्ताने केवळ ‘पिकनिक टूर’ करता येईल, इतक्या संकोचित भूमिकेतून अनेकजण या संमेलनाकडे पाहत आहेत. राज्य सरकारकडून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दरवर्षी पंचवीस लाख रूपये देण्यात येतात. शिवाय आयोजक संस्था त्यांच्या कुवतीप्रमाणे मोठा निधी उभा करते. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी यापूर्वीच प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे. पंजाब सरकारनेही पुढाकार घेऊन या संमेलनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे धोरण अवलंबिले आहे. असे असताना महामंडळाच्या पदाधिकार्‍यांचा प्रसिद्धीचा सोस काही सुटत नाही. सरकारकडून सर्वकाही फुकटात मिळावे ही वृत्ती अत्यंत घातक आहे.
य. दि. फडके हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना बेळगावला एस. टी. बसने, स्वतःच्या खर्चाने गेले होते. हा इतिहास दुर्लक्षून साहित्य परिषद, साहित्य महामंडळाचे पदाधिकारी सर्वकाही फुकटात कसे मिळेल यासाठी धडपडताना दिसतात. विमान प्रवासाचा हट्ट असेल किंवा मोफत प्रसारणाची मागणी असेल प्रत्येक वेळी या लोकाच्या मनाचे भिकारपण दिसून येते.
आज महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीतून चाललाय. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालाय. रोज विविध भागातून शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. असे सारे असताना आपण सरकारी तिजोरीवर डोळा ठेऊन स्वतःची हौसमौज पुरी करून घेणे म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखेच आहे. खरेतर यावेळी साहित्य परिषद आणि साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी स्वतःच्या खिशातील पैसे टाकून संमेलनाला जाणे अपेक्षित होते. मात्र हे कर्मदरिद्री लोक. केवळ तीन हजार रूपये प्रतिनिधी शूल्क असूनही हे रेल्वेने येणार नाहीत. त्यांना सरकारच्या, आयोजकांच्या खर्चातून विमानसेवा हवी. स्वयंसेवक आणि इतर अनेक निमित्तानेही रेल्वेत फुकट्यांचा सुळसुळाट असणार आहे. संत नामदेवांच्या नावावर सहानुभूती मिळवत कोणी सरकारला गाळात घालण्याचे धंदे करीत असेल, तर ते हाणून पाडायला हवेत.
दुष्काळ, गारपीट आणि नापिकी यामुळे बळीराजा उद्ध्वस्त झालाय. सरकारकडून त्यांना यथायोग्य मदत मिळतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका श्रीकृष्ण फडणवीस यांची चंद्रपूर जिल्ह्यात मूल आणि कोसंबी येथे शेती आहे. यंदाच्या नापिकीचा फटका मुख्यमंत्री देवेंद्र यांचे ज्येष्ठ बंधू आशिष आणि काका बाळासाहेब तथा श्रीकृष्ण यांनाही बसलाय. गारपिटीने त्यांच्या शेतातील गहू, हरभरा व भाजीपाल्याच्या पिकाची नासाडी झाली. शेतकर्‍यांना मिळणारी शासकीय मदत मुख्यमंत्र्यांचे ज्येष्ठ बंधू आणि काका यांच्याही बँक खात्यात जमा झाली. मात्र ‘आपण सधन शेतकरी असून ही मदत अन्य गरीब शेतकर्‍यांना देण्यात यावी’ असे म्हणत त्यांनी मूलच्या तहसीलदाराकडे हे पैसे धनादेशाद्वारे परत केले. याला म्हणतात नैतिकता! साहित्य आणि संस्कृतीच्या गप्पा मारणार्‍यांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. केवळ तीन पाच हजार रूपयांसाठी आयोजकांवर आणि सरकारवर अवलंबून राहणार्‍या या टीनपाटांनी आपल्या मनाचा कोतेपणा सोडावा आणि पदरच्या पैशाने या साहित्योत्सवात सहभागी व्हावे.
साहित्य संमेलनाच्या नावावर ही ‘नाटक कंपनी’ वाटेल ते उद्योग करत आहे. श्री. पु. भागवतासारखा प्रकाशक साहित्य महामंडळाचा अध्यक्ष झाला होता, हा इतिहास विसरून प्रकाशक परिषदेने सुरूवातीला घुमान येथील 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला. ‘चपराक’सारख्या काही संस्थांनी आणि अस्सल साहित्य रसिकांनी हा बहिष्कार फेटाळून लावला. ज्या अरूण जाखडे यांनी प्रकाशक परिषदेच्या वतीने आवेशात भाषणबाजी केली आणि प्रकाशक परिषदेच्या वतीने बहिष्काराची आवई दिली तेच आज घुमानमधील साहित्य संमेलनात एका कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यामुळे प्रकाशक परिषद आणि साहित्य महामंडळाची ही ‘नाटक कंपनी’ तर नाही ना? अशी शंका येण्यासही वाव आहे.
आजवरचा इतिहास पाहता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पवार कुटुंबीयांचे योगदान मोठे राहिले आहे. दरवेळी पवारांचेच कोणीतरी बगलबच्चे या संमेलनाच्या आयोजनात पुढाकार घ्यायचे. मात्र यावेळी सत्तेचे फासे उलटे पडले आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची वृत्ती दाखवून देत माधवी वैद्य आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे (लोगो)े अनावरण केले. उद्धव ठाकरे आणि शिवसेना हे मराठी माणसाचा पुळका येणारे घटक आहेत. त्यांना विनंती केली असती तर ते पुण्यात साहित्य महामंडळाच्या कार्यालयात नक्की आले असते. मात्र कायम लाचारीचे दर्शन घडवणार्‍यांनी ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवले. त्यानंतर नितीन गडकरींनी स्वागताक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि यांच्या जीवात जीव आला.
सुरूवातीला शे-पाचशे लोक तरी या संमेलनाला येतील की नाही, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र ‘चपराक’ सारख्या संस्थांचा कृतीशील पाठिंबा बघून आठ ते दहा हजार साहित्य रसिक संमेलनाला येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. असे सारे पोषक वातावरण असताना राज्यमंत्र्यांना तुम्हाला ‘फुकटेगिरी बंद करा’ असे सांगण्याची वेळ येत असेल तर तुम्ही मराठी माणसाचे नाक कापले आहे. तुमच्या करणीमुळे पदरचे पैसे टाकून येणारे साहित्य रसिक बदनाम होत आहेत.
‘चपराक’ परिवाराचे बारा सदस्य स्वतःचे पैसे टाकून या संमेलनास उपस्थित राहत आहेत. ते कुणापुढेही मिंधे नाहीत. पत्रकार म्हणून किंवा स्वयंसेवक म्हणून चार टाळकी घुसडण्याचा उद्योग आम्ही केला नाही. नेमके याच ठिकाणी चकटफू वृत्ती दाखवून देत महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी या साहित्योत्सवाला गालबोट लावले आहे. अशा करंट्या आणि कंजुष, चकटफू वृत्तीला चपराक देण्याचे दखलपात्र कार्य सांस्कृतिक मंत्र्यांनी केले आहे. त्यातून काहीतरी बोध घेऊन या बेशरमांनी आपली उरली सुरली लाज राखावी, एवढेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते.

Monday, March 2, 2015

ख-या 'आयडॉल्स'ची प्रेरणादायी ओळख!

'चपराक'ने प्रकाशित केलेल्या संजय वाघ लिखित 'गंध माणसांचा' या पुस्तकाची जयंत कुलकर्णी यांनी करून दिलेली ओळख. 



'गंध माणसांचा' या पुस्तकाचे प्रकाशन करताना डावीकडून लेखक संजय वाघ, उमेश सणस,शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सुधीर गाडगीळ, विनायक लिमये आणि 'चपराक'चे प्रकाशक, संपादक घनश्याम पाटील.
गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नी माझे व्हावे मिलन...
या ओळींमध्ये गीतकाराने ज्या गंधाचा अनुभव घेतला, तसाच गंध लेखक संजय वाघ यांनी सभोवतालच्या समाजप्रेमी लोकांमध्ये अनुभवला.
‘गंध माणसांचा’ या पुस्तकाचे लेखक संजय वाघ हे हाडाचे पत्रकार आहेत. पत्रकारितेची गद्धे पंचविशी त्यांनी पूर्ण केली आहे. या प्रवासात त्यांना नानाविध भलीबुरी माणसे भेटली. अशा बहुरंगी, बहुढंगी चेहर्‍यांमधुन त्यांना भावली ती आपला कुटुंबकबिला सांभाळीत समाजासाठी वेगळे काहीतरी करणारी माणसे! प्रयत्न, जिद्द, परिश्रम व सच्चाईच्या भांडवलावर वेगळी वाट निवडून निरपेक्ष भावनेने ध्येयाकडे वाटचाल करणारी संवेदनशील मनाची माणसे, कारण ती लेखकाच्या जातकुळीतली होती.
लेखकाच्या मते हल्ली जो तो स्वत:चे सुख-दु:ख कुरवाळत बसलेला आहे. अशा माणुसकी हरवून बसलेल्या माणसाला लेखकाने अतिशय समर्पक ‘निरो’ची उपमा दिलेली आहे. रोम जळत असताता फिडल वाजवण्यात मग्न असलेल्या ‘निरो’ची!
अन्याय, अत्याचार, व्याभिचार, बलात्कार, घातपात, जाळपोळ, दंगल, महापुरूषांच्या पुतळ्यांची विटंबना, हुंड्यासाठी विवाहितांच्या हत्या, स्त्रीभ्रूण हत्या आदी प्रकारात वाढ झाल्याने जगात आता ‘राम’ उरला नाही; असा सूर आपल्यला नेहमीच ऐकावयास मिळतो. अशा निराशाजनक वातावरणात समाजासाठी काहीतरी करू पाहणारे लोक, काही करण्याची धडपड करणारे लोक हेच आशेचे किरण आहेत. लेखकाने अशा लोकांना काळोखात मिणमिणत्या पणतीची उपमा दिली आहे. ती सार्थ वाटते. त्या पणतीला तिच्या मर्यादा ठावूक असुनही कोणाची पर्वा न करता ती तिच्या परीने अंधार भेदण्याचे कार्य करीतच असते! जो तिच्या प्रकाशकक्षेत येईल त्याला अंधुक का होईना वाट दाखविण्याचे सामर्थ्य आणि जिद्द तिच्यात असते!
कस्तुरी हरणीच्या नाभीतच असताना ती अकारण तिच्या शोधासाठी वणवण भटकंती करीत असते. तसेच माणसांच्या बाबतीत सुद्धा आहे. अशी माणसे आपल्या आजुबाजुलाच असतात. त्यांचा शोध घ्यावा लागतो. अशाच माणसांचा शोध लेखकाने नाशिकच्या पंचक्रोशीत घेतला. हा शोध सत्कारणी लागला. चांगुलपणा, सच्चाई, माणूसकी, दानशूरता, परोपकारी वृत्ती या माणसांच्या गंधाने लेखकाला भुरळ घातली आणि यातुनच निर्माण झाले ’गंध माणसांचा’ हे पुस्तक!
साप्ताहिक सुटीच्या दिवशी लेखक महाशय या सुवासाचा वेध घेण्यासाठी बाहेर पडायचे, अगदी पदरमोड करून. दर आठवड्याला वेगळी वाट, वेगळी राने वने!
या प्रवासात लेखकाला भेटले डॉ. देवीप्रसाद शिवदे. बागलाण तालुक्यात मोसम नदीच्या तीरावर मातीत पुरलेल्या जाईला पुनर्जन्म देण्यासाठी धडपडणारे; ध्येय आणि तत्त्वात तडजोड न करण्यासाठी पंचवीस वर्षे गाव आणि संसाराचा त्याग करून काशाई देवीच्या मंदीरात वास्तव्य करणारे गोंदे येथील निष्ठावंत शिवसैनिक भिका राजू बोडके; स्वत:च्या दोन्ही मतीमंद मुलांचे दु:ख कुरवाळत न बसता गरजू आणि वंचितांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील तीन मुलींचे स्वखर्चाने कन्यादान करणारे नामपूर येथील शरद नेरकार भेटले; घात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बेवारस प्रेतांचा वारसदार बनून त्यांची निगा राखणारे आणि प्रेताची ओळख पटताच त्यांना स्वखर्चाने त्यांच्या गावापर्यंत घेऊन जाणारे येवला येथील हुसेन शेख भेटले; तरूण वयातच छत्रपती शिवरायांच्या विचारांनी भारावलेले आणि गावाच्या प्रवेशद्वाराजवळ 43 लक्ष रूपयांची पदरमोड करून रयतेच्या राजाचा अश्‍वारूढ पुतळा उभारणारे खालच्या टेंभ्यातील भाऊसाहेब चिला अहिरे भेटले; जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी येणार्‍या आदिवासी भागातील रूग्णांच्या नातलगांची भोजनाची मोफत व्यवस्था करणारे जी. के. चढ्ढा आणि गंगाराम पांडे भेटले; विभक्त कुटुंबपद्धतीचा नवा ट्रेंड रूजवू पाहणार्‍या स्वैराचारी पिढीसमोर चार पिढ्यांपासून 65 जणांना एकाच छताखाली घेऊन एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श वस्तूपाठ घालून देणारे मुंढेगाव येथील महादू गतीर यांचे माळकरी कुटुंब भेटले.
असे अनेक माणसांचे अनेक गंध आपल्याला या पुस्तकात अनुभवायला मिळतात. ज्यामध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना आधार देणारे, दुर्बल घटकांतील मुलांना आश्रय देणारे, ग्रामविकासासाठी झटणारे, प्रथमोपचार करणारे, व्यसनमुक्तीसाठी झटणारे, आपली खासगी विहिर गावच्या पाणीपुरवठ्यासाठी देऊन तहानलेल्यांची तहान भागविणारे, गावच्या हागणदारीमुक्तीसाठी झटणारे, अंधांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणारे, गोर-गरीबांना मोफत औषधोपचार करणारे डॉक्टर, पथनाट्यातून जनजागृती करणारे, मायेने पशुसंवर्धन करणारे. ही सगळी कर्तृत्ववान माणसे आपापल्या परीने ‘आपण समाजाचे काही देणे लागतो’ या विचाराने समाजकार्यात खारीचा वाटा उचलताना दिसतात.
आपल्या कर्तृत्वाचा गंध आसमंतात पेरणार्‍या या सर्वसामान्यातील असामान्य माणसांच्या कामाला नम्रपणे अभिवादन करणारे हे पुस्तक खूपच वाचनीय झाले आहे.
या पुस्तकाला पुण्यातील अग्रणी ‘चपराक प्रकाशन’चे संपादक व प्रकाशक घनश्याम पाटील यांची प्रस्तावना लाभलेली आहे. ‘सामान्य माणसाची शक्ती हीच सर्वोच्च शक्ती’ यावर दृढ विश्‍वास असणारे घनश्याम पाटील.
या पुस्तकातील लेख वाचताना अंगावर शहारे येतात, डोळे पाणावतात, अभिमानाने उर भरून येतो, भारावून गेल्यासारखे होते. सध्याच्या बजबजपुरीत असे लिखाण करणे, ते वाचले जाणे हे समाजाच्या सुदृढ मानसिकतेचे लक्षण आहे. साध्या सोप्या भाषेत लिहीलेले हे पुस्तक म्हणूनच वाचनीय झाले आहे. अनेकांना या पुस्तकातून समाजकार्याची प्रेरणा मिळेल असेही वाटते.
गुरूगोविंद आंबे यांचे बोलके मुखपृष्ठ या पुस्तकाला लाभले आहे.


१२८ पानाच्या या पुस्तकाचे मूल्य १३० रुपये असून  वाचकांना ते याच किमतीत घरपोहच पाठवले जाईल. त्यासाठी संपर्क : 'चपराक प्रकाशन' - ०२० २४४६०९०९/७०५७२९२०९२/९२२६२२४१३२