Tuesday, August 30, 2016

श्रद्धेचा गैरफायदा, सामान्यांना त्रास

साप्ताहिक 'चपराक', पुणे 

‘सदाचार साधना’ या संस्थेअंतर्गत स्काऊट ग्राऊंड सभागृह, पुणे येथे लेखक व कवी समीर नेर्लेकर यांचे ‘गणेशोत्सव : काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. समीर नेर्लेकर हे समाजमाध्यमांद्वारे (फेसबुक, व्हॉटस्ऍप) गणेशोत्सवाबद्दलची आपली मते व त्यातील अपप्रवृत्तींचा निषेध नोंदवत असतात. या कार्यक्रमाद्वारे त्यांनी प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधला. या व्याख्यानातून घेतलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा परामर्श.
माणूस हा ईश्‍वरावर अवलंबून राहतो. इतर प्राण्यांमध्ये हे नाही. त्यामुळे तो आपली श्रद्धा वेगवेगळ्याप्रकारे व्यक्त करतो; पण सध्या ईश्‍वराचं स्वरूप वेगळ्या पद्धतीनं मांडलं जातंय. देव या संकल्पनेचा बाजार सुरू झाला आहे आणि त्याचा फटका सध्याच्या गणेशोत्सवाच्या रूपाने सामान्य लोकांना भोगावा लागतोय.
धार्मिक सण उत्सवांमधून आज श्रद्धेचा गैरफायदा घेतला जातोय. गणेशोत्सवात ध्वनिवर्धक आणि ढोल-ताशांचा त्रास सामान्य जनतेला होतो. तरीसुद्धा हे परप्रांतीय प्रशासकीय अधिकारी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीवर्धक सुरू ठेवण्यास परवानगी देतात. याचा महिला, लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे सामान्य माणसाने त्याविरूद्ध निषेध नोंदवला पाहिजे.
सुरूवातीला गणेशोत्सव सुरू करण्यामागची प्रेरणा ही समाज संघटन व समाज प्रबोधन ही होती. त्यावेळची ती गरज होती. 70-80 च्या दशकापर्यंत हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला जायचा; पण आता यातील पावित्र्य नष्ट झाले आहे. शास्त्रोक्त पद्घतीप्रमाणे गणेशोत्सवाचे स्वरूप गणपतीची मूर्ती स्वत: मातीची बनवून, त्याची आरास करून, प्रतिष्ठापना करून, रोज आरती करणे व दहा दिवसानंतर त्याचे विसर्जन करणे असे आहे. सार्वजनिक गणेशोत्सवातही कार्यकर्त्यांनी स्वत:च्या कला वापरून, स्वत: मेहनत घेऊन हा उत्सव साजरा करणे अपेक्षित होते. असे काही काळ घडतही होते. त्यामुळे उत्तम कार्यकर्ते घडून त्यांच्या कलागुणांना वाव मिळत होता.
कालांतराने या उत्सवाला बाजारी रूप येत गेले. सध्या उत्सवाचे सर्व सुशोभीकरण व इतर गोष्टी या बाहेरून विकत किंवा भाडेतत्त्वावर करून घेतल्या जातात. त्यामुळे हा उत्सव कार्यकर्त्यांच्या चंगळवादाचा अड्डा बनत चालला आहे. ध्वनीवर्धकांचा अतिरेक वाढला आहे. 80 डेसिबलच्या पुढे आवाज वाढवल्याने सर्वांना त्याचा त्रास होतो. ‘वाट पाहतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’, ‘झिंग झिंग झिंगाट’ अशी अश्‍लील व हिडिस गाणी या ध्वनीवर्धकांवर वाजवली जातात ज्याचा धार्मिक विधीशी व भक्तीभावाशी काहीही संबंध नाही. फक्त झिंगलेल्या कार्यकर्त्यांना विक्षिप्तपणे नाचता यावे यासाठी ही गाणी वाजवली जातात.
गणेशोत्सवात होणारे गैरप्रकार वाढले आहेत. या काळातील ‘नाईट लाईफ’ हा एक वेगळा चिंतेचा मुद्दा झाला आहे. आईवडिलांना फसवून युवक-युवती गणपती पाहण्याचं कारण देऊन रात्री घराबाहेर पडून अश्‍लील चाळे करताना दिसत आहेत.
बहुतेक गणेशोत्सव मंडळे वीज चोरून वापरत आहेत. गणशोत्सवाच्या वर्गणीसाठी सक्ती, दमदाटी केली जाते. वर्गणी देणे हा प्रत्येकाचा श्रद्धेचा व इच्छेचा विषय असायला हवा. या उत्सवासाठी रस्त्यावर मंडपे उभी केल्यामुळे वाहतुककोंडीची समस्या वाढते. यादरम्यान होणार्‍या गर्दीमुळे प्रशासनावर ताण येतो. यासाठी लागणारी पोलीस यंत्रणा कमी पडते. अशा हुल्लडबाजीवर नियंत्रण करण्यासाठी प्रशासन आहे काय?
एकूणच सध्याचे गणेशोत्सवाचे स्वरूप हे विदारक आहे. त्यातील अनिष्ट गोष्टींना विरोध केलाच पाहिजे. हा उत्सव मंगलमय व चांगल्या वातावरणात, कोणाला त्रास न देताच व्हायला हवा. यासाठी अनेक उपाय करता येतील. गणेशोत्सवासाठी शहराबाहेर एक प्रशस्त मोकळी जागा उपलब्ध करून देता येईल; जिथे सर्व मंडळे आपल्या गणपतीची प्रतिष्ठापना व आरास करू शकतील. सर्वांना आपल्या कला, देखावे वेगवेगळ्या पद्धतीने सादर करता येतील. यामुळे त्या आवाजाचा आवाज शहरातील समान्य लोकांना होणार नाही. सर्व गणपती एका ठिकाणी आल्यामुळे लोक त्यांना भेटी देऊ शकतील व एका यात्रेचे स्वरूप त्याला देता येईल. यानंतर प्रवाही नदीत त्या गणपतींचे विसर्जन करता येईल. यामुळे हा उत्सव शिस्तबद्ध व शास्त्रोक्त पद्धतीने साजरा केला जाऊ शकेल.
सध्याच्या गणेशोत्सवातील अनिष्ट प्रकारांना आळा घालण्यासाठी याचा त्रास होणार्‍या प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी अनेक लोकांच्या स्वाक्षरी असणारे निवेदन स्थानिक प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकारला दिले पाहिजे. हे काम एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हावे की एक दवाब गट निर्माण होऊ शकेल व काहीतरी कारवाई होईल. जर सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात प्रबोधन केले व एकत्रित रित्या प्रयत्न केले तर नक्कीच काहीतरी बदल घडू शकेल.
(शब्दांकन : अर्जून नलावडे)

साप्ताहिक 'चपराक', पुणे

Monday, August 29, 2016

रंगोत्सवाची अखंड उधळण करणारा कलावंत भारत गदगे

जन्मजात चित्रकाराला एक हक्क असतो रंगात खेळण्याचा! त्याला बंधन नसतं वयाचं, वेळेचं, काळाचं!! त्याचा एकच ध्यास असतो कॅनव्हासवर रंग उधळण्याचा आणि त्याच रंगात रसिकांना रंगवण्याचा. जगणार्‍याला जसं जीवन तसं चित्रकाराला हवा असतो रसिकांचा उत्कट प्रतिसाद. त्याला साद म्हणून उभा राहतो ’रंगाचा श्रीरंगी अविष्कार’. चित्रकाराच्या शब्दांपेक्षाही त्याची चित्रंच आपल्याशी उत्कट संवाद साधतात. कल्पनेच्या आकाशाचा कॅनव्हास अन् त्यावर रंग उतरलेत देवरुपात..! त्यातूनच जन्म होतो चित्रप्रदर्शनाचा. पंढरपूरमधील कुंचल्याच्या रंगात रंगलेले कलावंत आहेत श्री. भारत अर्जुन गदगे. त्यांचे 'विघ्नहर्ता कला प्रदर्शन'  पंढरपूर येथील टिळक स्मारक मंदिरात सुरु आहे. त्यानिमित्त श्री. गदगे यांच्या कला साधनेचा उलगडलेला हा जीवनप्रवास...!!

साप्ताहिक 'चपराक',पुणे 

'मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो' या गीतपंक्तीप्रमाणे मनातील विविध कल्पनांना रंग आणि रेषा या माध्यमातून कॅनव्हासवर चितारणारे पंढरीतील एक कलावंत म्हणजे भारत अर्जुन गदगे. या पंढरीचा पांडुरंगही या भक्ताच्या भक्तीरंगात न्हाऊन निघाला आहे. 
''भक्तीत दंग सदा पांडुरंग
रंगे मोरपंखी होऊनी श्रीरंग''
प्रत्येक वारकरी हा जन्मजात 'पंढरपुरी' असतो, तसा प्रत्येक पंढरपुरी हा भावरंगी रंगणारा असतो. अशा भक्ती रंगात रंगून रंगाची उधळण करणारा असा एक जन्मजात 'चित्रकारी' म्हणजे भारत अर्जुन गदगे! पंढरपुरातील एक काळ गाजवलेले, कला, नाट्यक्षेत्रात सहजतेने वावरणारे आणि कला क्षेत्रातील योगदानाबद्दल छोटा गंधर्व यांच्या हस्ते सत्कार झालेले 'अर्जुन पेंटर' हे भारत गदगे यांचे वडील आणि कलेच्या क्षेत्रातील पहिले गुरु.
याच अर्जुनाने त्यांना कलेच्या क्षेत्रातील लक्ष्याचा अचूक वेध कसा घ्यायचा ते शिकवले आणि मग त्यांच्या या शिष्याने कलेच्या क्षेत्रात चौफेर शिरसंधान करीत आपला एक वेगळा ठसा उमटविला. म्युरल पेंटिंग, पोट्रेट, लॅण्डस्केप, मेटल पेंटिंग, फोटोग्राफी आदी क्षेत्रात ते निपुण बनले. त्यांच्या या योगदानाची दखल राज्य शासनाने घेतली आणि 'आदर्श शिक्षक' हा पुरस्कार त्यांना 5 सप्टेंबर 1997 रोजी बहाल करण्यात आला. कल्पनेचा एकेक धागा गुंफून त्यांनी शुभ्र कॅनव्हास वर अनेकरंगी चित्रांची मुक्तहस्ते उधळण केली आणि त्यामुळेच जगण्यासाठी चित्रकला व चित्रकलेसाठी जगणे या दोन्ही गोष्टी भिन्न असल्या तरी अपरिहार्याने त्यांना एकत्रितपणे अबाधित ठेवण्यात गदगे यशस्वी झाले आहेत.
लोखंडाला परिसस्पर्श झाला की त्याचे सोने होते. तसंच काहीसे गदगे यांच्या बाबतीत घडलं. 1967 साली 'आग्य्राहून सुटका' या नाटकाची तयारी चालली होती. त्यात आपलाही सहभाग असावा या भावनेतून भारत गदगे यांनी शिवरायांच्या प्रतिमेला चित्ररूप दिले आणि खरंतर तेव्हापासून कागद, रंग, ब्रश, पेन्सिल यांचे एक भावविश्‍व आकार घेऊ लागले. दहावीनंतर सांगलीच्या कला विश्‍व महाविद्यालयातून ए. डी. टी. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्याच्या अभिनव कला विद्यालयात आणि नंतर मुंबईच्या सुप्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. जी. डी. (पेंटिंग) ही परीक्षा केंद्रात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर ए. एम. ही कलेच्या क्षेत्रातील सर्वोच परीक्षा ते केंद्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
आकाशात काही काळाने संथ विहरणारा पतंग हा जसा सुरूवातीस अष्ट दिशांना गोता खातो, तशाच काही परिस्थितीच्या गोता खाताना गदगे यांना कला क्षेत्रात स्थिर राहण्यासाठी गुरुतूल्य तिळवे सर, ए. टी. पाटील, श्री. माजगावकर, एम. के. जाधव यांनी सहाय्य केले. आपल्या गावातील एक उत्कृष्ट कलाकार नोकरीच्या निमित्ताने आपले गाव सोडून जाऊ नये यासाठी पंढरपुरातील कै. बापू जोशी, भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी त्यांना पंढरपुरातच बांधून ठेवायचे ठरवले आणि नगरपालिकेच्या 'लोकमान्य विद्यालयात' कलाशिक्षक म्हणून गदगे नोकरीस लागले.
महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, चंद्रकांत व सूर्यकांत मांडरे बंधू,चित्रकार एम. एफ. हुसेन, वसंत बापट, प्रतापसिंह मोहिते-पाटील, सुधाकरपंत परिचारक इत्यादी मान्यवरांनी त्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले आहे. आजही गदगे यांची चित्रसाधना कायम चालूच असते. स्वातंत्र्याची 50 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी क्रांतिकारकांच्या कार्याचे दर्शन घडवणारे चित्र प्रदर्शन भरविले. त्यांच्या 'ईश्‍वरभूती' आणि 'रंगाचा श्रीरंगी आविष्कार' या प्रदर्शनांना मोठा प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनातून मिळालेल्या पैश्याचा गरीब विद्यार्थ्यांसाठी उपयोग केला जातो. पंढरपूरचे माजी प्रांताधिकारी ज्योतिबा पाटील यांनी गदगे सरांचे हे कलागुण लक्षात घेऊन 1 मे 1997 रोजी सोलापूर जिल्ह्यातर्फे मुंबईला पाठविण्यात येणार्‍या चित्र रथाच्या कलादिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि त्यांनी ती सार्थ करून दाखवली. सध्या ते तालुक्यातील होतकरू विद्यार्थी कलाकारांना मार्गदर्शन करीत आहेत.
महाराष्ट्राच्या अनेक घरात पोहचलेल्या या कलाकारास साथ मिळाली आहे ती त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मंजुषा गदगे यांची! पंढरपुरतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये गदगे यांनी कलाशिक्षिकेचे काम केले आहे परंतु संसाराच्या व्यापामुळे त्यांनी ती नोकरी सोडली आणि कलेची साधना चालूच ठेवली. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या यशामागे त्याच्या पत्नीचा फार मोठा वाटा असतो हे सौ. मंजुषा गदगे यांनी सार्थ करून दाखविले आहे. भारत गदगे यांचे दोन्ही बंधूही कलाक्षेत्रात पारंगत आहेत. त्यांचे मोठे बंधू आनंद गदगे हे उत्कृष्ट छायाचित्रकार आहेत तर धाकटे बंधू गणेश गदगे हे वास्तुविशारद आहेत. एकंदरीत भारत गदगे यांचे संपूर्ण कुटुंब चित्रकलेच्या रंगात मनसोक्त रंगलेले आहे.
भारत गदगे यांच्या रंगात रंगलेल्या वाटचालीचे रंग असेच अधिकाधिक खुलत रहावेत हीच शुभेच्छा!!


स्वप्निल रविकांत कुलकर्णी, पंढरपूर प्रतिनिधी

साप्ताहिक 'चपराक',पुणे 
९८३३३७९००५ 


Sunday, August 28, 2016

सरकारकडून जनतेच्या पैशाचा अपव्यय : संजय सोनवणी

सीमांचे रक्षण, कायदा व सुव्यवस्था हे सरकारचे मुख्य काम आहे. ते न करता नको त्या कामात सरकार गढले आहे व जनतेच्या पैशांचा अपव्यय करत त्यांची सुरक्षितता धोक्यात आणत आहे असा आरोप स्वर्ण भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय सोनवणी यांनी सरकारवर केला आहे. त्यांनी पोलीस आणि न्यायव्यवस्थेबाबत सरकारला जाब विचारला आहे. याबाबत त्यांच्याशी ‘चपराक’चे विशेष प्रतिनिधी तुषार उथळे पाटील यांनी साधलेला संवाद.

कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची आणि न्यायव्यवस्था तत्पर आणि सक्षम ठेवण्याची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची असते. सरकार त्यासाठी वेळोवेळी नवनवीन कायदेही करत असते; परंतु देशातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही व न्यायही लवकर मिळत नाही. स्त्री व दलितविरोधी गुन्ह्यात उत्तरोत्तर वाढच होत असल्याची वस्तुस्थिती आपल्याला अनुभवायला मिळते. त्यामुळे पोलीस नेहमीच टीकेचे लक्ष बनलेले असतात. दहशतवादी हल्ल्यात जनतेचे, तुटपुंज्या साधनांनिशी प्रसंगी स्वत:चे जीव गमावून, रक्षण करुनही पोलिसांची प्रतिमा आजही मलीन व प्रश्‍नांकित आहे. न्यायव्यवस्थेबद्दल शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, हे वाक्य तर प्रत्येकाच्या तोंडी ऐकू येते; परंतु मुळात अशी अकार्यक्षम व्यवस्था का आहे आणि ती कार्यक्षम करण्यासाठी काय केले पाहिजे याची कसलीही योजना सरकारकडे नाही. अपुरी पोलीस व न्यायाधिशांची संख्या, त्यांना होणार्‍या असंख्य असुविधा याबाबतही बोलले जाते; पण त्यावर कार्यवाही होत नाही. भारतातील एकमेव स्वतंत्रतावादी असलेल्या स्वर्ण भारत पक्षाने या विषयावर आवाज उठवला.

पोलिसांची संख्या वाढवा
भारतात एक लाख लोकसंख्येमागे केवळ 182 मंजूर पोलीस आहेत. युनोच्या मानकानुसार ते किमान लाखामागे 222 एवढे तरी असले पाहिजेत. त्यात भारतात आहे त्या मंजूर  पोलीस संख्येपैकी 23.99% जागा रिक्त आहेत. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण लाखामागे 147 एवढेच आहे. त्यात बंदोबस्त, नेत्यांचे संरक्षण यात पोलीस दलाचा मोठा कालापव्यय होतो. मग गुन्ह्यांचा सखोल तपास करत सबळ पुरावे गोळा करण्यासाठी, गुन्हे नियंत्रणात राहण्यासाठी, प्रतिबंधात्मक कारवाया करण्यासाठी पोलिसांकडे मनुष्यबळही उरत नाही की पुरेसा वेळही. पोलीस अनेकदा अनेक गुन्हे नोंदवून घेण्यात टाळाटाळ यामुळेच करतात. याबाबत पोलिसांना दोष देण्यापेक्षा गरज आहे ती पोलिसांची संख्या किमान आंतरराष्ट्रीय मानकाएवढी तरी वाढवण्याची.

पोलिसांना निवारा व आरोग्यसेवा मिळावी

जेवढे आहेत त्या पोलिसांच्या समस्या तर अजून गुंतागुंतीच्या आहेत. त्यांना आवश्यक तेवढी निवासस्थाने आजही उपलब्ध नाहीत. जी निवासस्थाने आहेत त्यांचा दर्जा अत्यंत वाईट आहे. केवळ 27% पोलिसांना आज निवारा मिळतो, बाकींना अन्यत्र सोय करावी लागते. काम जास्त असल्याने कामाच्या वेळाही निश्‍चित नाहीत. पोलीसांवरील मानसिक ताण-तणावांमुळे अनेक पोलिसांनी आत्महत्या केलेल्या आहेत. पोलीस आरोग्य हा ऐरणीवरील विषय आहे परंतु त्यांना (व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाला) सरकारतर्फे कसल्याही सुविधा मिळत नाहीत. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना घोषीत केली होती व विनामूल्य उपचार काही आजारांबाबत कोणत्याही इस्पितळाने करावेत अशी अपेक्षा होती. ही योजना काही काळ चालली पण शासनाने इस्पितळांची बिलेच न भागवल्याने आज ही योजना असून नसल्यात जमा आहे. प्रत्येक पोलिसाला हक्काचा निवारा व आरोग्यसेवा मिळाव्यात. केंद्र सरकारच्या आरोग्यसेवा योजनेप्रमाणे राज्य सरकारनेही तशीच योजना राबवावी  व ही योजना निवृत्तीनंतरही लागू असावी.

पोलीस स्कूल्स आणि अत्याधुनिक साधनांची गरज

पोलिसांच्या मुलांचे शिक्षण हाही कळीचा मुद्दा बनला आहे. सैन्यासाठी जशी देशभर पब्लिक स्कूल्स आहेत तशीच पोलीस स्कूल्स देशभर असली पाहिजेत.
पोलीस दलाला अत्याधुनिक साधने पुरवणे, शिरस्त्राणे व बुलेटप्रुफ जॅकेट्स पुरवणे, पोलीस स्टेशन व चौक्या या काम करण्यायोग्यच बांधणे, पुरेशी वाहने पुरवणे हेसुद्धा अत्यावश्यक असून सरकारने त्यावर तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी स्वर्ण भारत पक्षाने केली आहे. गुन्हेगारी नियंत्रणात ठेवायची असेल तर ते नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांना सक्षम व सबळ केले पाहिजे. यासाठी पोलिसांवर राज्य सरकार खर्च करत असलेली रु. 74,258 कोटींची रक्कम किमान रू. 1,50,000 कोटींपर्यंत वाढवावी अशी मागणीही पक्षाने केली आहे.

न्यायव्यवस्थेला न्याय द्या
पोलसांची जशी बिकट अवस्था आहे ती न्यायव्यवस्थेलाही चुकलेली नाही. भारतात दर दहा लाख लोकसंख्येमागे केवळ तेरा न्यायाधीशच आहेत, जे प्रत्यक्षात किमान 36 तरी असायला हवेत. त्यात आहे त्या जागातही रिक्त असलेल्या जागांचे प्रमाण मोठे आहे. सर्वोच्च न्यायालयात 6, उच्च न्यायालयात 446 तर खालच्या कोर्टात 4600 न्यायाधिशांच्या जागा आजही रिक्त आहेत. भारतात उच्च न्यायालयात प्रलंबित असलेले 43 लाख खटले आहेत. खालच्या कोर्टातील प्रलंबित खटल्यांचे प्रमाण कोटीत जाते. यावर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी. एस. ठाकुर यांनी तर सरकार न्यायव्यवस्था संपवायला निघाले काय? असा संतप्त प्रश्‍न विचारला. अश्रू ढाळून अथवा संतप्त होऊन हा प्रश्‍न सुटणार नाही. न्यायाधीशांची संख्या दर दहा लाखांमागील तेरावरून पन्नासपर्यंत तत्काळ वाढवली पाहिजे.

मुलभूत सुविधांपासून न्यायव्यवस्था वंचित
जनता सरकारवर कायदा, सुव्यवस्था आणि न्यायासाठी अवलंबून असते. केंद्रीय बजेटमध्ये न्यायसंस्थेसाठी एकूण राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या केवळ 0.02% एवढाच वाटा येतो. प्रगत जो  प्रत्यक्षात 0.20% एवढा असला पाहिजे. यात न्यायाधीशांची संख्या योग्य प्रमाणात वाढवणे एवढेच अभिप्रेत नाही. आपली न्यायालये, अगदी सत्र न्यायालयेही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. असंख्य न्यायालयीन इमारती व कोर्टरुमची अवस्था चिंतनीय तर आहेच, पण साध्या पिण्याच्या पाण्याची अथवा शौचालयांची उपलब्धताच नाही. खालच्या कोर्टात तर काही न्यायाधीशांना गोडाऊन किंवा कोंदट रेकॉर्डरुममध्ये बसून सुनावण्या घ्याव्या लागतात. पक्षकार व आरोपींच्या किमान सुविधांबद्दल तर काही बोलावे अशी स्थिती नाही. कोर्ट ही न्यायाची जागा न वाटता एक पोलीस कोठडी वाटते असा सर्व पक्षकारांचा अनुभव आहे. उच्च दर्जाची, सुविधांनी परिपूर्ण अशी न्यायालये व न्यायाधीशांच्या चेंबर्स असल्याच पाहिजेत. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी न्यायव्यवस्थेला दिलेले बजेट किमान दहा पट वाढवलेच पाहिजे.

हे पैसे आणायचे कोठून?
सरकार आजवर हेच उत्तर देत आले आहे की हे करण्यासाठी आवश्यक पैसा सरकारच्या तिजोरीत नाही. हे उत्तर भ्रम उत्पन्न करणारे आहे. सरकारचे काम मुळात उद्योगधंदे, व्यापार, बंदरे, खाणी किंवा हॉटेल चालवणे आहे काय? तरीही भारत सरकार हा उद्योग आजवर करत आले आहे व बदल्यात महाप्रचंड तोटा दरवर्षी सहन करते आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर भारतात बँक आणि विमा क्षेत्र वगळता 298 केंद्र सरकारी उद्योग कंपन्या आहेत. यातील सरकारी भांडवल दोन लाख तेरा हजार कोटी रुपये असून एकूण गुंतवणूक 10 लाख 96 हजार कोटींची आहे. आज त्या काही नफ्यातील कंपन्या सोडल्या तर दरवर्षी हजारो कोटींचा तोटा घोषीत करत आल्या आहेत. उदाहरण द्यायचे तर केंद्र सरकारच्याच आकडेवारीनुसार यातील 77 कंपन्यांचा 2014-15 सालचा तोटाच रू. 27,360 कोटींचा आहे. या उद्योगांना तगवण्यासाठीचा खर्च जो होतो तो कितीतरी अधिक पटीत होतो. या कंपन्यांत निर्गुंतवणूक करण्याच्या फक्त चर्चा होतात पण हितसंबंधियांमुळे ते होत नाही. आज सरकारी उद्योग जे करणे सरकारकडून मुळात अभिप्रेत नाही तिकडे सरकारी (म्हणजे जनतेची) संपत्ती उधळली जात आहे. न्याय आणि सुव्यवस्था राखणे ही सरकारची मुख्य जबाबदारी असून तिकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. हे आम्ही सहन करणार नाही. सरकारने तत्काळ सर्वच उद्योगातून बाहेर पडावे व सरकारच्या कायदा व सुव्यवस्था या मुख्य उद्दिष्टांकडेच लक्ष पुरवत छोटे व मजबूत सरकार कसे बनेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच घोषणेप्रमाणे पहावे असेही मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सामाजिक स्वास्थ्य धोक्यात
सरकारचे काम उद्योग-व्यापार करणे नसून जनतेच्या हिताची, स्वातंत्र्याची रक्षा करणे आहे. नको त्या कामातून मुक्त होत सरकारने महत्त्वाच्या कामात लक्ष केंद्रीत करावे. सरकारने असे दुर्लक्ष आजवर केल्यानेच आज गुन्हेगारीचा दर वाढतच चालला असून सामाजिक स्वास्थही धोक्यात येत आहे. नवनवे कायदे आणल्यानेही गुन्ह्यांवर कसलाही प्रतिबंध लागलेला नाही की वचक बसलेला नाही. त्यामुळे तत्काळ पोलीस व न्यायव्यवस्थेत पुरेसे मनुष्यबळ वाढवून सामान्य जनतेला स्वातंत्र्यात जगण्याची हमी देणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
26 सप्टेंबरपर्यंत या बाबतीत प्रधानमंत्री व संबंधित मंत्र्यांनी पाळली जाईल अशी घोषणा न केल्यास 2 ऑक्टोबरपासून स्वर्ण भारत पार्टी आंदोलन करेल.

Thursday, August 25, 2016

पर्यावरणाचा सुभेदार बाबूराव पेठकर


मासिक 'साहित्य चपराक', पुणे 

 शेती हा आतबट्याचा व्यवहार असल्याची मानसिकता बळावत असताना. त्याच दरम्यान एका युवा मनाच्या ज्येष्ठाने तरूण शेतकर्‍यांना लाजवेल असा प्रयोग आपल्या शेतात केलाय. सुभेदार बाबूराव पेठकर असं या पर्यावरण ऋषीचं नाव आहे. पर्यावरणावर, पाण्याच्या बचतीवर बोलणारे अनेक आहेत; मात्र  कृतीतून पर्यावरण जगणारे तसे नगण्यच. त्या नगण्यांपैकीच एक म्हणजे बाबूराव पेठकर. वयाची 27 वर्षे सैन्य दलाच्या आरोग्य विभागात कार्य केल्यानंतर त्यांनी सोलापूरात आपले बस्तान बसवले. त्यांच्या सैन्य दलातील सेवेच्या भरतीलाही देशसेवेचीच झालर होती. कारण 1962 साली झालेल्या चीन सोबतच्या युद्धावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तरूणांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. लातूर येथील महर्षी दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेणारे बाबूराव पेठकर वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी सैन्यदलात भरती झाले. उत्कट देशप्रेमामुळेच त्यांनी सैन्यात प्रवेश केला.
सैन्यदलात असताना बाबूराव यांची नेमणूक आरोग्य विभागात झाली. त्यामुळे 1962, 1965 साली झालेल्या युद्धात त्यांनी युद्धभूमिवरील जखमी जवानांवर उपचार केले. 1965 च्या युद्धात त्यांनी अमेरिकन बनावटीचे मोबाईल हॉस्पिटलही हाताळले. युद्धभूमिवर त्यांनी तीन आठवड्यात जवळपास एक हजार सैन्यांवर उपचार केले. त्याच दरम्यान युद्धात सैनिकांसोबतच झाडांची कत्तलही मोठ्या प्रमाणात झाल्याचं त्यांच्या नजरेस आलं. कोणतीही चूक केलेली नसताना केवळ दोन देशातील वादामुळे निष्पाप झाडे, फुले, फळे हकनाक बळी जातात. त्यामुळे झाडांविषयी त्यांना अतीव जिव्हाळा निर्माण झाला. वृक्षप्रेमाची खरी बीजे त्याच ठिकाणी रूजली. दिल्ली, बंगळुरू, पुणे, सिक्कीम आदी ठिकाणी संशोधनाच्या कामी त्यांनी सेवा केली. याशिवाय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या संशोधन टीममध्येही त्यांनी काम केलं. पुढे 27 वर्षे सैन्यदलात नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सोलापूरकडे आपला मोर्चा वळवला. 
सैन्य दलात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल 1980 साली तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुभेदार पेठकर यांची राजपत्रित अधिकारी म्हणून बढती केली. याशिवाय भारत सरकार तर्फे त्यांना चरितार्थासाठी तीन एकर जमीन आणि राहण्यासाठी एक जमिनीचा तुकडा देण्यात आला. त्यांना नोकरीदेखील मिळण्याची संधी आली होती; मात्र त्यांनी ती नाकारली. सरकारने दिलेल्या जमिनीचा विनियोग आणि शेतीत काही वेगळे प्रयोग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. केवळ निर्णय घेऊन ते शांत बसले नाहीत तर त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले. 
सोलापूरच्या कंबर अर्थात छत्रपती संभाजी तलावाच्या पाठीमागेच पेठकर यांची सरकारने दिलेली तीन एकर शेती आहे. पंधरा वर्षापूर्वी ही जमीन म्हणजे खडकाळ रान होते. कोणत्याही प्रकारचे उत्पन्न वा झाडी त्याठिकाणी नव्हती; मात्र आपल्या देशसेवेनंतर आयुष्याच्या उत्तरार्धात बाबूराव पेठकर यांनी समाजसेवेचा ध्यास घेतला. खडकाळ रानावर शेती आणि जंगल उभारण्याचा संकल्प त्यांनी सोडला. पर्यावरण ठीक असेल तरच आपले आरोग्य चांगले राहणार आहे. पर्यावरण उत्तम असेल तरच देशातच नव्हे तर जगात शांतता, सुव्यवस्था नांदू शकते. त्यामुळे या शतकातली पर्यावरणाची समस्या लक्षात घेऊन त्यांनी पर्यावरणाच्या अभ्यासास सुरूवात केली. सीमेवर केलेल्या सेवेनंतर ते पर्यावरण सैनिक म्हणून काम करू लागले. त्यासाठी त्यांनी राज्यातील 27 जिल्ह्यात दौरा केला. दरम्यानच्या काळात त्यांनी वृक्षांची लागवड सुरू केली. त्यांचे संवर्धन, विस्ताराचे कार्य केले. त्याचबरोबर त्याचा प्रचार-प्रसारही सुरूच ठेवला. विशेष म्हणजे, त्यांच्या शेतीला लागूनच असलेल्या राज्य शासनाची सामाजिक वनीकरण विभागाच्या जमिनीवरही त्यांनी शिवार फुलवायला सुरूवात केली. त्यामुळे त्यांना सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाच्या स्मृती उद्यानाचे राजदूत म्हणून नेमले. त्यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या स्मृती उद्यानासाठी जवळपास ऐंशीहून अधिक देणगीदार मिळवून दिले.

महाराष्ट्राच्या पर्यावरणीय संकटावर उत्तरे...
पर्यावरण रक्षण हा कृती करण्याचा विषय आहे. त्यामुळे कागदोपत्री घोडं नाचवल्याने ते साध्य होणार नाही. म्हणून त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी विविध उत्तरे शोधली आहेत.

जलपुनर्भरण....
यामध्ये पाण्याचे संकट मिटविण्यासाठी विहिर पुनर्भरण करण्याचे त्यांनी ठरवले. त्यात त्यांनी जलस्त्रोत शुद्धिकरण आणि जलस्त्रोत बळकटीकरण असे दोन भाग केले. शिवसेना-भाजप युती सरकारने राबविलेली ‘जलयुक्त शिवार योजना’ आज सर्व महाराष्ट्राला ज्ञात झाली; मात्र पेठकर यांनी आठ-दहा वर्षापूर्वीच जलयुक्त शिवारचा प्रयोग यशस्वी केला आहे. उतारावरून पळणारे पाणी त्यांनी रांंगते केले तर रांगते पाणी थांबते करून पाण्याचा योग्य वापर व नियोजन करून शेती हिरवीगार केली. विशेष म्हणजे पेठकर यांच्या शेतीच्या बाजूलाच बारमाही पाण्याने भरलेला छत्रपती संभाजी तलाव आहे. तरीही अद्याप त्यांनी एकदाही तलावातील पाण्याचा थेंबही शेतीसाठी वापरला नाही. शेतात व आजूबाजूला पडलेल्या पावसाचे पाणी आपल्या शेतीकडे वळवून त्यांनी आपल्या खडकाळ रानावर नंदनवन फुलवले. त्यांच्या या प्रयोगाने अनेक छोट्या शेतकर्‍यांना हा प्रयोग उपयुक्त ठरला आहे.
याबाबत सुभेदार बाबूराव पेठकर सांगतात की, शेतकर्‍यांनी आपल्याकडे जमीन किती आहे याचा विचार न करता, आहे त्याच जमिनीत सोने पिकविण्याची हिंमत ठेवली पाहिजे. पावसाचे पाणी साठवून जिरायती शेती बागायती करण्यावर भर दिला पाहिजे. जलयुक्त शिवार अभियान शासनाने आता सुरू केले असले तरी, आपण हा प्रयोग स्वकल्पनेतून यापूर्वीच सुरू केला आहे. त्यामुळे मी पाण्यासाठी कधीही अवलंबून राहिलो नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही आमच्या विहिरीला 16 ते 17 फूट पाणीसाठा होता.

वनभिंतीचा शोध...
आपल्या महाराष्ट्रात प्रदूषण उद्भवाची जवळपास पस्तीस केंद्रे आहेत. त्यात विटभट्टी, पेट्रोल पंप, स्टोन क्रशर, स्मशान भूमी, साखर कारखाना, इतर उद्योग आदी. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी पेठकर यांनी वनभिंतीचा शोध लावला. वनभिंत संकल्पना म्हणजे झाडांची भिंत. यात तीन प्रकारच्या झाडांची लागवड केली जाते. यात झुडूपवजा झाडाची पहिली रांग, मध्यम उंचीच्या झाडांची दुसरी रांग आणि सर्वात उंच वाढणार्‍या प्रजातीची तिसरी रांग. ती घनदाट असते. अशी वनभिंत त्यांनी आपल्या शेतात तयार केली आहे. समाजानेही हे प्रयोग आपल्या भागात करायला हवेत अशी त्यांची अपेक्षा आहे.
सोलापूरच्या लोकमंगल उद्योग समुहाने हा प्रयोग स्वीकारला आहे. लोकमंगल साखर कारखान्याने आपल्या फळी साठवण केंद्राच्या बाजून अशी वनभिंत उभारली आहे. त्यामुळे वायूप्रदुषणास रोख लागणार आहे. शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी अशा भिंती उभारणे गरजेचे आहे. सध्या जागतिक तापमान वाढीची समस्या संपूर्ण जगाला भेडसावत आहे. त्यावर ही वनभिंत म्हणजे चपखल उत्तर आहे. भारतीय नेत्यांनी अनेकवेळा जागतिक परिषदेत अशी ग्वाही दिलीय की, आम्ही कार्बनचे प्रमाण वाढू देणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावू; मात्र ते भारतीय नागरिकांच्या जीवावर सांगितले आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करणे ही आपली जबाबदारी आहे. अनेकांच्या मनात वृक्ष लागवड करण्याचा विचार येतो; मात्र त्यांना रोपे किंवा ते वाढविण्याची माहिती नसते. ते होऊ नये यासाठी त्याचाच एक भाग म्हणून पेठकर यांनी रोपवाटिकाही तयार केली आहे.

पाण्याचे संकलन...

आपल्याकडेे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो; मात्र ते पाणी असेच वाहून जाते. ते पाणी वाया जावू नये म्हणून पेठकर यांनी बारा वर्षापूर्वी एक पुस्तक लिहिले. हे पुस्तक वाचल्यानंतर पाण्याचा नोबेल पुरस्कार मिळालेले जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी स्वतः बाबूराव पेठकर यांच्या शेताला भेट दिली. तेथील विविध प्रयोग त्यांनी पाहिले. रेनवॉटर हार्वेस्टींगची कामेदेखील त्यांनी पाहिली. विशेष म्हणजे ही कामे त्यांनी मोफत करून दिलेली आहेत. सोलापूरातील जिल्हाधिकारी कार्यालय, विवेकानंद केंद्र आदी इमारतीत त्यांनी ही कामे करून दिली आहेत.

सेंद्रीय रांगोळीचा शोध....

भारतीय संस्कृतीतील एक दैनंदिन कार्य म्हणजे रांगोळी काढणे. मात्र त्यामुळे जमिनीत रासायनिक रंग जाऊ लागलेत. ते प्रमाण कमी असले तरी त्याचा परिणाम जमिनीवर होतोच. त्यावर पर्याय म्हणून मग सेंद्रीय रांगोळीची कल्पना मला सुचली. आसपासची झाडाची पानगळ सुरू असते. त्याच्या पानांचा रंग विविध प्रकारचा असतो. ती पाने वाळवून त्याची भुकटी केली की रांगोळी तयार होते. यासोबत कोळसा पावडर, लाकडाचा भुस्सा, आपली रांगोळी किंचित प्रमाणात वापरायची. याशिवाय सूर्यफुल, गव्हाचे गोंडर, कूस असे शंभर प्रकारच्या वस्तूंचा उपयोग त्यात करता येतो. त्याबाबतचे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. समाजात ते माहिती होण्यासाठी सेंद्रीय रांगोळी बनविण्याची स्पर्धा देखील त्यांनी घेतली.
प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन यांनी दुसरी हरितक्रांती घोषीत केली आहे; मात्र तिला केवळ हरितक्रांती न म्हणता दुसरी पर्यावरणीय हरितक्रांती घोषीत करायला हवी होती. कारण हरितक्रांतीमध्ये पुन्हा लोक युरिया आणि तत्सम रासायनिक पदार्थांचा वापर करतील. मग ती हरितक्रांती होईल का? पेठकर यांची ही संकल्पना ऐकून डॉ. स्वामीनाथन अतिशय प्रभावित झाले. 

खंत वाटते...

पर्यावरणाच्या र्‍हासाबाबत खंत व्यक्त करताना बाबूराव पेठकर म्हणतात, पर्यावरणाबाबत आपल्या समाजात अनास्था आहे. मुळात ती शालेय स्तरावरूनच दिसून येते. जे समाज घडवतात त्या शिक्षकांनाही याचे भान नाही. त्यामुळे सर्वप्रथम त्यांना याचे शिक्षण देणे गरजेेचे आहे. पर्यावरणाला मूलभूत शिक्षणाचा दर्जा द्यायला हवा. त्यामुळे काही प्रमाणात त्याबाबत सजगता येईल. मुळात भारतीय संस्कृती ही पर्यावरणीय संस्कृती आहे; मात्र आपण पंचमहाभूतांना महत्त्व न दिल्याने ही पश्‍चातापाची वेळ आपल्यावर आली आहे. माझ्या मते प्रत्येकाला तीन माता असतात. त्यापैकी एक जीवनदाती माता, दुसरी भूमाता आणि तिसरी गोमाता. यातील जीवनदाती मातेखेरीज दोन मातांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.
सुभेदार पेठकर यांनी त्यांच्यापरीने पर्यावरणाचे काही सिद्धांत मांडले आहेत.
1)     किमान गरजेवर आधारित जीवनपद्घती
2)     जीव जीवश्य जीवनम्
3)     रसायन निर्मिती आणि त्याचा वापर मर्यादित
4)     ऊर्जा निर्मिती आणि त्याचा मर्यादित वापर
सुभेदार बाबूराव पेठकर यांनी फुलवलेल्या शेतीत आज जैवविविधता आहे. त्यांच्या शेतात मोर, ससे, साप, फुलपाखरे, मुंगूस, सरडा, विविध परदेशी पक्षी आदींचा वावर असतो. विशेष म्हणजे त्यांची शेती पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने पिकवलेली आहे. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केलेला नाही. विहिरीत अनेक प्रकारचे मासे, कासव, साप आदींचा वावर असतो. पेठकर यांच्या शेतात जल आणि पक्षीतीर्थ आहे.  म्हणजेच, मळ्यामध्ये कायमस्वरूपी नैसर्गिक पाण्याने भरलेली विहीर असून त्याला जलमंदिर असे नामकरण केले. परिसर वृक्षांनी व्यापून गेला असल्यामुळे वृक्षमंदिर तर मळ्यामध्ये पक्षांचा सतत किलबिलाट असल्याने त्याचे पक्षीतीर्थ असे नामकरण त्यांनी केले आहे.
भविष्यात सरकार आणि समाजाने वनमहोत्सव कृतिशीलपणे साजरा केला जावा. शहरी वनीकरण करणे गरजेचे आहे. शिक्षण संस्था, शासकीय कार्यालये आदींनी किमान एक तृतीयांश जमिनीवर वनीकरण करावे. केवळ शेतकर्‍यानेच झाडे लावावीत असा काही नियम नाही. कारण ऑक्सीजन सर्वांनाच हवा आहे. बायोडायव्हर्सिटी, कृषी पर्यटन आदी जास्तीत जास्त निर्माण व्हावेत. याशिवाय वनयुक्तशिवार उपक्रम राबविणे गरजेचे आहे. समाजात पर्यावरणाचे तीर्थक्षेत्र निर्माण करणे गरजेचे आहे. 


सुभेदार बाबूराव पेठकर यांना प्राप्त झालेले विविध पुरस्कार
*   1980 साली सैन्यातील उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवपत्र देऊन नायब सुभेदार पद.

*    1997 साली वृक्ष लागवड प्रचार-प्रसार कार्याकरिता महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र वनश्री पुरस्कार.
*   1999 साली भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार.
*   2000 साली प्रदुषण विरोधी कार्यासाठी शौर्य पुरस्कार.
*   महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण मंत्रालय विभागाचा विशेष गौरव पुरस्कार.
*    किसान शक्ती राज्यस्तरीय पुरस्कार.
*   2011 साली दूरदर्शन वाहिनीचा सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार.

पर्यावरण पूरक संशोधन प्रकल्प सादर
*   छतावरच्या पाण्याचे संकलन
*   महामार्गावर पडणारे पावसाचे पाणी संकलन
*   सेंद्रीय रांगोळी


सागर सुरवसे
आयबीएन लोकमत, सोलापूर
मो. 97691 79823


मासिक 'साहित्य चपराक', पुणे

Tuesday, August 23, 2016

टेन्शन कायको लेनेका...

मासिक 'साहित्य चपराक', पुणे 

आज एक मित्र भेटला, तसा तो नेहमीच भेटतो पण आज खुपच उदास वाटला! नक्कीच काहीतरी बिनसलं असणार याचं... कसल्यातरी तणावात दिसत होता. नेहमीसारखा उत्साहाने बोलत नव्हता अन् आपण काही बोललोच तर लक्षही देत नव्हता! आता याला बोलतं करावंच असं ठरवून त्याला व्हाटस् ऍपवरचे काही जोक्स ऐकवले आणि आम्ही दोघंही मनमुराद हसलो! मग त्याला हळूच प्रश्न केला ‘‘काय आज वहिनीशी भांडून आलास की काय?’’
तेव्हा मात्र तो अचानक गंभीर झाला व म्हणाला, ‘‘तिच्याशी मी आता भांडू शकणार नाही, आता ती हेडमास्तरीणबाई बनणार आहे! मग तिला माझ्यापेक्षा जास्त पगार मिळणार!’’‘‘

‘‘अरे मग ही तर आनंदाची बातमी आहे, तू खुश व्हायचं सोडून असा रुसुबाईसारखा का दिसतोस रे ?’’
‘‘हेच ते, तुला काही कळत नाही!’’
‘‘अरे ह्या नोकरी करणार्‍या बायकांचं तुला काही कळणार नाही. आता माझ्याच बायकोचं बघ, तिला जास्त पगार मिळायला लागेल ना मग मला विचारणारसुद्धा नाही, याचंच जाम टेंशन आलंय यार मला!’’
आता याला काय म्हणावं! टेंशन घ्यायला कधी कुणाला कुठल्या प्रकारचं कारण लागेल सांगता येत नाही. कुणाला परीक्षेचं टेंशन तर कुणाला नोकरी कधी मिळणार याचं टेंशन, कुणाला नोकरी मिळाल्यानंतर ती कशी टिकवायची याचं टेंशन! कुणाला घरचं बायकोचं टेंशन तर कुणाला ऑफिसमधल्या साहेबाचं टेंशन! (कारण सरळसाधं आहे. घरी जायला उशीर झाला तर बायको ओरडणार अन् ऑफिसमधून लवकर निघावं तर खडूस साहेब ओरडणार!!)
बरं हा टेंशनचा जो प्रकार आहे ना तो मोठ्यांनाच लागू असतो अशातला भाग नाही. अगदी बालवाडीत किंवा नर्सरीला शिकणारी चिमुकली मुलंही म्हणतात, ‘‘मम्मी मला ह्या होमवर्कचं भारी टेंशन आलंय! तुच करून दे माझं होमवर्क...’’ म्हणजे मग चिमुकलीच्या मम्मीला परत टेंशन आहेच! एकमात्र खरं आहे ज्यांना जास्त कटकटींचा सामना करावा लागतो किंवा ज्यांच्यामागे जास्त व्याप असतात त्यांना जास्त टेंशन असायला हवं! पण प्रत्यक्षात आपण बघतो अशा व्यक्ती नेहमीच तणावमुक्त, हसतमुख दिसतात याचं नेमकं काय कारण असावं?
टेंशन यायला किंवा तणावग्रस्त व्हायला अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव असणे तसेच कुठल्याही गोष्टींचा नकारात्मक विचार करणे! इतरही बरीचशी कारणे असू शकतात जसे -स्वतःची दुसर्‍याशी तुलना करणे, लवकर निराश होणे, अकारण भीती वाटणे... इत्यादी.
हे सर्व टाळण्याचे काही उपाय आहेत पण मनुष्य स्वभावानुसार सहसा सर्वसामान्य लोक तिकडे दुर्लक्षच करतात! एक उपाय म्हणजे सुसंगत! आता हे सांगायला खूपच सोपे आहे की, बाबा रे चांगल्या मुलांची संगत धर, असं वागू नको, तसं करु नकोस. मात्र म्हणतात ना... वाईट सवयी लवकर जडतात, पण सुसंगतीसाठी आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. आजकाल व्यसनी लोकांना मित्र शोधावे लागत नाहीत, दारु पिणार्‍याला त्याचे जोडीदार पटकन मिळतात तसेच दुकानही लवकर सापडते (अर्थातच दारूचे)! तंबाखू, गुटखा खाणार्‍यांची सुध्दा तीच तर्‍हा! दुर्दैवानं आपल्या समाजात आज सज्जन माणसं शोधावी लागतात. चांगल्या लोकांच्या संगतीने निश्चितच चांगल्या सवयी जडतील आणि त्यामुळे सकारात्मक विचारसरणी अवलंबण्यास नक्कीच मदत होणार; पर्यायाने आपसुकच तणाव मुक्त होण्यास वेळ लागणार नाही!
‘‘दुनियामे कितना गम है, मेरा गम कितना कम है’’ हे गाणं बहुतेकांनी ऐकलं असणारच! जगात मलाच खूप दुःख आहेत, माझ्यासारखा दुःखी कुणीच नाही अशाप्रकारे आपलीच कॅसेट वाजवणारे कमी नाहीत. खरंतर असे लोक खूप असमाधानी असतात, इतरांचं सुख बघून हे दुःखी होतात! मग तेच त्यांच्या टेंशनचं कारण बनते!
अशावेळी उपरोक्त गाणं आठवलं की अशाप्रकारचं टेंशन बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकते. काही लोकांना रग्गड पैसा जमवण्याचा हव्यास असतो. त्यासाठी मग कुठल्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते! त्यात जर अपयश आले तर मग हे लोक लगेच निराश होतात आणि तणावाने पछाडतात! अशाप्रकारची माणसं जास्त पैसा मिळाला तरीही टेंशनमध्येच असतात. अशावेळी जास्त हव्यास न धरता  ’आपल्या गरजेपुरता पैसा कमावला तरी पुरे’ ही मानसिकता अंगी बाणली तर बर्‍याच अंशी टेंशन कमी होऊ शकते यात शंका नाही!
काहींना झोप येत नाही याचं तर विद्यार्थ्यांना अभ्यास लक्षात राहत नाही याचं टेंशन येतं. घरी असलेल्या पालकांना शाळेत गेलेली आपली मुलं कधी सुखरूप परतणार याचं टेंशन येतंय! म्हणजेच काय प्रत्येकाला तणावाला सामोरं जावंच लागतं. अशा तणावाची तीव्रता कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे, तो म्हणजे नियमितपणे योगासने व प्राणायाम करणे! यासाठी ना पैसे पडतात ना कुठल्याही प्रकारचं इंधन लागतं!
चला तर मग करुया सुरुवात आजपासून अगदी आत्तापासूनच!
एकदुसरेको सिर्फ खुशहाली देनेका!
अरे भाई टेन्शन कायको लेनेका!!

- विनोद श्रा. पंचभाई, पुणे 

९९२३७९७७२५ 

मासिक 'साहित्य चपराक', पुणे 
ऑगस्ट २०१६

Saturday, August 13, 2016

चेतना पेटवणारी धर्मशाळा

काव्य जीवनात आहे
जरा जवळून बघा
वाफ पाण्यामध्ये आहे
पाणी उकळून बघा

असं सांगणार्‍या लोककवी म. भा. चव्हाण यांच्या ‘धर्मशाळे’चे संपादन दस्तुरखुद्द व. पु. काळे यांनी केले आहे. वपुंचा आणि मभांचा याराना अनेकांना सुपरिचित आहे. व. पु. प्रतिभावंत लेखक म्हणून सर्वांना ठाऊक आहेत; मात्र ते उत्तम कवीही होते हे थोडक्या लोकांना माहीत असावे. त्यांचा ‘नको जन्म देऊस आई’ हा छोटेखानी काव्यसंग्रह मभांनीच त्यांच्या ‘पृथ्वीराज प्रकाशन’तर्फे प्रकाशित केला आहे. लोककवी मनमोहन नातू आणि रॉय किणीकर यांच्यात जे आणि जसं नातं होतं तसंच या जोडगोळीचं. या कलंदर कलाकारांचे माय मराठीवर ऋण आहेत.
तर मभांच्या या ‘धर्मशाळे’चे 336 प्रवासी आहेत, जीवनाचे सारे रंग त्यात आलेत. प्रत्येक कविता चार ओळींची. म्हटलं तर स्वतंत्र; म्हटलं तर अखंड. सगळ्या रचना अष्टाक्षरी. जीवनावर भाष्य करणार्‍या, नाना पैलू उलघडून दाखविणार्‍या, भविष्य वर्तविणार्‍या ओळी. या ‘धर्मशाळे’त जो कोणी विसावेल तो तिथलाच प्रवासी बनेल. नेकीने जगणार्‍या, जगू पाहणार्‍या प्रत्येकाला वाटेल की, आपल्या आयुष्याचा अर्कच मभांनी या पुस्तकात काढून दिलाय.
कधीतरी जन्मा आलो
कुण्या गावात वाढलो...?
माझ्या जीवनाची गाथा
मीच लिहाया बैसलो...!

अशी ‘धर्मशाळे’ची दमदार सुरूवात मभांनी केली आहे. मात्र लगेचच ते म्हणतात,
 तसे सांगण्यासारखे
आहे कुठे माझ्यापाशी?
माझ्या स्वत:च्या गावात
मीच आहे वनवासी!

‘हे विश्‍वची माझे घर’ अशी भावना बाळगणार्‍या मभांनी ‘धर्मशाळे’तून लाखमोलाची शिकवण दिली आहे. त्यांचे अनुभवविश्‍व समृद्ध असल्याने या सर्व ओळी त्यांच्या ह्रदयातून आल्यात. म्हणूनच वाचणार्‍याला त्या आपल्याशा वाटतात. महाकवीची उपेक्षा हा युगानुयुगे चालत आलेला विषय! मग म. भा. तरी त्याला अपवाद कसे ठरतील? या महाकवीच्या जीवनाचा आलेख बघितला तर पुन्हा लोककवी मनमोहन आठवतात. ते म्हणायचे, ‘उद्याचा कालीदास जर अनवाणी पायाने चालत असेल तर त्यात अब्रू त्याची नाही राजा भोजाची जाते.’ मभांच्या बाबतीतही तसेच आहे. कविता जगणार्‍या या कवीला मात्र त्याची फिकिर नाही.
 माझी स्वत:ची बायको
मला नवरा मानेना
तरी वडाच्या झाडाला
फेर्‍या घालणे सोडेना...

अशी आजूबाजूची विसंगती म. भा. नेमकेपणे मांडतात.
माझ्या सग्यासोयर्‍यांची
काय सांगू नवलाई
माझ्या आजारपणाची
त्यांनी वाटली मिठाई

असे सांगून म. भा. लिहितात,
माझ्या सग्यासोयर्‍यांनी
काही कमी नाही केले
माझ्या दहाव्याआधीच
गाव जेवण घातले!

अशा सोयर्‍यांविषयीच्या या ओळी पहा-
माझ्या कातड्याचे जोडे
त्यांच्या पायी मी घातले
तरी बोलतात साले
‘नाही कातडे चांगले...!’

‘धर्मशाळे’तल्या कोणत्याही चार ओळी घेतल्या तरी त्या आपल्याला आपल्या आयुष्याची गाथाच वाटतील. प्रेमापेक्षा श्रमाला किंमत मिळावी असा आग्रह धरणार्‍या मभांना भुकेची जाणीव आहे. त्यांच्या कष्टमय आयुष्याचा ते कधी बागुलबुवा करीत नाहीत; मात्र ‘धर्मशाळे’तून जणू मभांचे चरित्रच वाचकांसमोर आले आहे.
पोटामध्ये भूक माझ्या
मात्र ओठात कविता
पाण्याशिवाय वाहते
माझी जीवन सरिता

असे ते म्हणतात. भुकेचे भयंकर वास्तव त्यांच्या लेखणीतून साकारले आहे. पुढच्या ओळी त्याची साक्ष पटवून देतील.
भूक तुलाही छळते
भूक मलाही छळते
भूक विश्‍वमित्रालाही
कुत्रे खायला घालते
 
भूक माय ममतेचे
पाश तोडून टाकते
भूक पोटच्या पोरीला
बाजारात बसवते

भूक लहानथोरांना
देशोधडीला लावते
गरिबाच्या घरातला
भूक दिवा विझवते

आजूबाजूचे वास्तव मभांनी इतक्या नेमकेपणे टिपलेय की त्याला तोड नाही. मुख्य म्हणजे यात त्यांनी भाषेचे कसलेही अवडंबर माजविले नाही.
त्याची आणि तिची सुद्धा
नाही ओळख पटली
जरी दोघांनी जिंदगी
एका घरात काढली

या ओळीतून त्यांनी ‘घरघरची कहाणी’ मांडली ती शंभर पानांच्या पुस्तकातून तरी मांडणे शक्य आहे का?
मभांच्या कविता तरूणाईत कायम आकर्षणाच्या केंद्रबिंदू आहेत. विविध महाविद्यालयातून होणारे त्यांचे कविता वाचनाचे कार्यक्रम अफाट तरूणाईप्रिय आहेत. 

ज्यांना कुणीच नाहीत
मुलेबाळेही नाहीत
त्यांनी त्यांच्या वंशासाठी
फक्त झाडे लावावीत

स्त्रियांचा सन्मान हे तर मभांच्या जीवनाचे मूलतत्त्वच आहे.
आई कुणाचीही असो
तिचा सन्मान करावा
तिने टाकलेला शब्द
फुलासारखा झेलावा

‘धर्मशाळा’ वाचणार्‍याला फक्त मभांच्या कवितांची भुरळच पडत नाही तर ते कवितांवर प्रेम करू लागतात. कवितेला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा हा लोककवी आहे.
कुणाच्याही संसारात
कुणी आणू नये बाधा
कुणाची जाऊ नये
कुण्या कृष्णाकडे राधा

अशी रास्त अपेक्षा त्यांची कविता व्यक्त करते. अनेकांना बागेतल्या फुलाचे महत्त्व कळतच नाही. प्रत्येक व्यक्तित, प्रत्येक कामात दोषच दिसतात. अशांना मभांनी चपराक दिलीय. ते म्हणतात,
काही लोक असतात
चालताना भुंकणारे
बागेतल्या फुलांवरी
जाताजाता थुंकणारे

एकीकडे ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष करताना दुसरीकडे खुद्द भगवंतालाच त्यांनी सवाल केलाय,
जेव्हा रावणाने तुझी
होती पळविली सीता
का रे नाही भगवंता
तेव्हा सांगितली गीता

एकंदरीत म. भा. चव्हाण हे आजच्या पिढीचे नेतृत्व करणारे, वंचित उपेक्षितांच्या वेदना प्रभावी शैलीत मांडणारे लोककवी आहेत. त्यांनी पेटवलेला कवितेचा दिवा भविष्यात समाजातील अंधार दूर करीत राहील हे मात्र नक्की!
प्रकाशक - पृथ्वीराज प्रकाशन, पुणे (9922172976)
पाने - 112, किंमत - 60

-घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२ 

Thursday, August 11, 2016

स्मार्ट जीवनशैलीचे स्मार्ट संतुलन

मासिक 'साहित्य चपराक' ऑगस्ट २०१६ 

स्मार्ट या शब्दाने नवीन पिढीवर अक्षरश: गारुड केले आहे. ‘आपली प्रत्येक गोष्ट स्मार्ट असली पाहिजे आणि प्रत्येक स्मार्ट गोष्ट आपल्याजवळ असली पाहिजे’ असा अट्टाहास सध्या सुरु आहे; मात्र त्यातून आपण पूर्णत: स्मार्ट होतो का, हे तपासून घेणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाने आजच्या प्रत्येक व्यक्तिच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आक्रमण केले आहे. त्याचा प्रभाव इतका खोलवर आहे की त्यापासून कोणीही अलिप्त राहू शकत नाही. एकंदरीत सगळ्या जीवनशैलीवर तंत्रज्ञानाचा प्रभाव आहे आणि तंत्रज्ञानाशिवाय जगणे आजच्या पिढीला शक्य नाही. मी सतत सगळ्यांच्या पुढे राहिलो पाहिजे, सगळ्यांमध्ये प्रथम, सगळ्यांच्या आधी,  सगळ्यांमध्ये श्रेष्ठ, सगळ्यांमध्ये उच्च आणि सगळ्यांमध्ये स्मार्ट! अशी ही लढाई प्रत्येक तरुणाईच्या मनामध्ये सुरु आहे. सर्वात उत्तम मोबाईल हँडसेट हवा, सर्वात उत्तम संगणक हवा, सर्वात वेगवान पळणारे इंटरनेट हवे, सर्व प्रकारची आधुनिक गॅझेटस माझ्याकडे हवीत असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी त्याचा आटापिटा सुरु असतो. त्यातून तुलना येते. त्यातून मग मानसिक आणि भावनिक आंदोलने सुरु होतात. ईर्षा, स्पर्धा, महत्त्वाकांक्षा यांचे रुपांतर असूया, मत्सर, अहंकार, निराशा आणि हतबलता अशा भावनांमध्ये देखील होऊ लागते. त्याचे दृश्य परिणाम अनेकदा आत्महत्या, बलात्कार, हिंसक हल्ले अशा भयावह प्रकारे दिसून येतात.
आजचे जीवन स्पर्धेचे आहे, असे बाळकडू अगदी लहान वयापासूनच दिले जाते. त्यासाठी सतत तयारी करुन घेतली जाते. आजचे संपूर्ण जीवन अर्थप्रधान झाले आहे. प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक कृती पैशाशी संबंधीत आहे असेच ठसविले जाते. मानवी जीवनमूल्ये, नैतिकता, परस्पर संवाद, कौटुंबिक सामंजस्य, सामाजिक बांधिलकी इ. विचार कालबाह्य करण्यात आले असून आर्थिक विचार आपल्या जीवनशैलीवर पूर्णपणे स्वार झालेले आहेत. त्यामुळे यंत्राप्रमाणे माणसे जीवनाशी लढताना दिसतात, तेव्हा हसावे की रडावे ते कळत नाही. स्मार्ट असणे काळाची गरज आहे. स्मार्ट राहणे म्हणजे पाप नाही. स्मार्ट असण्याचे फायदेही भरपूर आहेत. स्मार्टनेस याचा अर्थ आपल्याकडील उपलब्ध साधनांचा उपयुक्त वापर. यामध्ये जी संसाधने नसतील ती मिळवणे आणि जी संसाधने उपलब्ध आहेत त्यांचा प्रभावी वापर करणे हे आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तंत्रज्ञान आणि गॅझटेस कितीही आधुनिक आणि वेगवान असली तरी ती वापरणारी व्यक्ती हुशार आणि कार्यक्षम नसली तर अपेक्षित परिणाम दिसणार नाहीत. आज आपण पाहतो की कितीतरी साधनांचा आपण पुरेपूर वापरच करीत नाही. प्रत्येक मोबाईल हँडसेटमध्ये जितक्या सुविधा दिल्या असतात त्यापैकी 50% हून अधिक सुविधा वापरल्याच जात नाहीत. कारण अभ्यास आणि निरिक्षण यांचा अभाव आहे. हँडसेट उघडल्यावर त्याचे मुख्य फिचर आत्मसात केल्यावर इतर फिचर्सकडे दुर्लक्ष होते. त्याचवेळी बाजारात नवीन हँडसेट येतो. मग त्याच्यामागे धावाधाव सुरु होते. खरंतर आजच्या तंत्रज्ञानाची ही खरी गंमत आहे की ते सतत अत्यंत वेगाने बदलत आहे. विशेष गोष्ट म्हणजे करोडो लोकांना ई-मेल म्हणजे काय ते माहीत नाही आणि त्याचवेळी करोडो लोक फेसबुक, व्हॉटसऍप, ट्विटर पार करुन क्लाऊड आणि रोबोच्या सानिध्यात राहत आहेत. प्रत्यक्ष जीवन जगत असताना सर्व प्रकारच्या व्यक्ती आणि समुहांबरोबर आपला संबंध येत असतो. तेव्हा त्या सर्वांबरोबर जुळवून घेत आपले कार्य स्मार्टपणे करणे गरजेचे असते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच समाजाची तंत्रज्ञान विषयक किंवा स्मार्ट जगण्याविषयीची जाणीव हीदेखील महत्त्वाची ठरते. ती जाणीव जितकी विकसित तितके स्मार्ट काम करणे सोपे जाते. वर्तमानपत्रे आणि विविध माध्यमांतून तंत्रज्ञान आणि स्मार्ट गॅझेटच्या वापरांविषयी सुरु झालेल्या माहिती देणार्‍या पुरवण्या याचीच साक्ष देतात.
जीवन स्मार्ट बनविताना आधुनिक गोष्टी नक्कीच आत्मसात केल्या पाहिजेत. त्याविषयीची माहिती मिळवली पाहिजे. त्या हाताळून पाहिल्या पाहिजेत. त्यांची उपयुक्तता तपासून घेतली पाहिजे आणि त्यांचा स्मार्ट वापर कसा करता येईल याबाबत विचार केला पाहिजे. कॅमेर्‍याने फोटो काढणे आणि नंतर ते डेव्हलप करुन आणणे ही गोष्ट पूर्णत: कालबाह्य झाली आहे. मोबाईल आणि इंटरनेट क्रांतीने जग अक्षरश: बदलून टाकले आहे. जगण्याची प्रत्येक प्रक्रिया 360 अंशाच्या कोनात विस्तारली आहे. संवाद माध्यमे आणि संभाषण माध्यमे यांचा कालावधी अत्यंत कमी झाला आहे. पूर्वी पत्र पाठवून करावी लागणारी चौकशी आणि 8 दिवसानंतर मिळणारा प्रतिसाद ही सारी प्रक्रिया काही सेकंदावर आली आहे. जीवन अत्यंत गतिमान झाले आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, असे संत तुकाराम महाराजांनी एक आध्यात्मिक कल्पना सांगताना म्हटले आहे. आज जग स्मार्ट जीवनशैलीने रात्रंदिन युद्धाचा प्रसंग उभा राहिला आहे. अतिशय वेगाने समोर येणारी माहिती,  घटना, त्यावर तितक्याच वेगाने घ्यावे लागणारे निर्णय आणि त्यातून होणारे बरेवाईट परिणाम यांचा करावा लागणारा सामना यातून एक संघर्ष प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. ‘करु की नको करु’ अशी साशंकता प्रत्येक कृतीमध्ये आली आहे.
इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माणूस हा निसर्गत: एक पशू आहे. मानवी शरीर विधात्याने बनविलेली एक अद्भूत किमया असली तरी शरीराच्या काही मर्यादा आहेत. मानवी शरीर म्हणजे यंत्र नाही. त्याला मन, बुद्धी, चित्त इ. विकार आहेत. त्यांचे संतुलन राखणे हे फार महत्त्वाचे आहे. मानवी शरीराची ताण सहन करण्याची एक मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या बाहेर गेल्यास त्याचा त्या व्यक्तिला आणि त्याचबरोबर कुटुंबाला आणि समाजालाही त्रास होतो. जसे रबर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ताणता येते. रबराशी सतत खेळत राहिल्यास त्यातील ताणशक्ती निघून जाऊन ते निकामी होते. स्मार्ट जीवन जगत असताना शरीराची आणि मनाची काळजी घेणे फार आवश्यक आहे. मनातील विचारांचा शरीरावर परिणाम होतो. विचार करण्यासाठी, आपल्याच मनाशी संवाद करण्यासाठी वेळ काढणे खूप आवश्यक आहे. स्मार्ट तंत्रज्ञानाद्वारे माहिती, संधी आणि प्रगती जरी एका क्लिकवर उपलब्ध झाली तरी आपले जीवन सुखी आणि आनंदी होते का हे तपासून पाहिले पाहिजे. फेसबुक, ट्विटर, ई-मेल, व्हॉटस्ऍप यामुळे जीवन नक्कीच गतिमान झाले आहे. माहितीची देवाण घेवाण वेगाने घडत आहे. परस्पर संवाद वेगवान झाले आहेत; मात्र त्यांच्या चांगल्या परिणामांबरोबर दुष्परिणामही वाढत आहेत. थोडा वेळ जरी इंटरनेट कनेक्शन बंद झाले तरी अस्वस्थता येते. दिवसरात्र माणसे फेसबुक आणि व्हॉटस्ऍपला चिकटून आहेत. मनासारखे झाले नाही तर छोट्या छोट्या गोष्टींमुळेही चिडचिड होते. कौटुंबिक आणि सामाजिक संवाद कमी होत आहेत. माणसे आभासी जीवनात रममाण झाली आहेत. अशावेळी आपल्या जीवनशैलीमध्ये स्मार्ट विचारांचे अधिष्ठान जागविणे फार गरजेचे आहे. स्वत:शी आणि इतरांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, फक्त स्वत:साठी काही वेळ राखून ठेवणे, स्वत:शी संवाद करणेही गरजेचे आहे. चांगले मित्र जोडणे आणि त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष गप्पा मारणे, गरजेचे आहे. विचारांची देवाण घेवाण केल्याने मनातील कोंडलेल्या भावनांचा निचरा होतो. मनाला नवा तजेला मिळतो. चांगल्या पुस्तकांचे आणि ग्रंथांचे वाचन खूप महत्त्वाचे आहे. ग्रंथ हे गुरु आणि सर्वात चांगले मित्र आहेत. त्यामुळे आपण एका वेगळ्या विश्‍वात जातो. याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाणे, ट्रेकींग करणे यामुळेही एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. व्याख्याने आणि प्रवचने ऐकणे यांनीही आपल्या मनाचे पोषण होते. आपल्याला नवीन विचार समजतात. आपल्या मनातील शंकांचे निराकरण होते. नवीन कल्पना स्फूरतात.
आजचा काळ आव्हानात्मक तर आहेच तितकाच तो असुरक्षितही आहे. स्पर्धेबरोबर आता पुढे काय होईल, कसे होईल अशी विवंचना प्रत्येकाला आहे. अशा वेळी स्मार्ट जगणे ही एक कला आहे. संतुलन स्वत:च्या मनाचे, स्वत:च्या आरोग्याचे आणि स्मार्ट साधनांचे अशी काळाची गरज आहे. स्मार्ट साधनांचा पुरेपूर वापर आणि त्या वापरामधले संतुलन हे निरंतर यशाकडे घेऊन जाईल. प्रत्येक कृती करताना थोडे थांबून, थोडा विचार करुन, ही कृती अधिक स्मार्टपणे करता येईल का, याचा अंदाज घेऊन मग करणे शहाणपणाचे ठरेल. स्मार्ट जीवनशैलीसाठी स्मार्ट विचारांचे अधिष्ठान असले पाहिजे. आज यश मिळविणे कदाचित सोपे आहे. ते टिकवणे खूप अवघड आहे. म्हणूनच तरुणाईला सांगणे आहे,
स्मार्ट करा रे मन । स्मार्ट करा रे जीवन ।
आणि स्मार्ट संतुलन । त्यासाठी हवे स्मार्ट अधिष्ठान ॥
- प्रा. क्षितिज पाटुकले, पुणे
संपर्क: 98228 46918

मासिक 'साहित्य चपराक' ऑगस्ट २०१६