Monday, December 18, 2017

श्री संत गाडगेबाबा आणि दुःखमुक्ती


(साप्ताहिक 'चपराक' १८ डिसेंबर २०१७)

परमपूज्य गाडगेबाबा यांच्या जीवनावर आणि जीवनकार्यावर ज्या मान्यवर लेखकांनी लेखन केले, त्यातील अनेकांनी त्यांच्या अद्वितीय कार्याने प्रभावित होऊन त्यांना आपापल्या परीने गौरविले आहे. कुणी त्यांना समाजवादी संत म्हटले, कुणी त्यांना क्रांतिकारी संत असे संबोधिले आहे. कुणी त्यांना समाजक्रांतीचा अग्रदूत या शब्दांनी गौरविले आहे. कुणी त्यांना समतेचा नंदादीप म्हटले तर कुणी त्यांना वंदनीय वैराग्यमूर्ती या शब्दात गौरविले आहे. गो. नी. दांडेकर यांनी तर त्यांची ‘अमर्याद’ या एकाच शब्दातून थोरवी सांगितली आहे. या थोर मान्यवरांनी गाडगेबाबांचा केलेला गौरव आणि त्यांना बहाल केलेली बिरूदे ही त्यांच्या जीवनाचा विचार करता यथार्थ आहेत; यात शंकाच नाही. किंबहुना त्यांच्या कार्याचा विचार करता आणखी काही विशेषणे त्यांना बहाल केली तरी ती अपुरीच पडतील, यात शंका नाही! पण या सार्‍या बिरूदांच्या पलीकडे जाणारे त्यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व पाहता त्यांना ‘लोकोत्तर’ याच विशेषणाने गौरवावे असे मला मनापासून वाटते.

वंदनीय गाडगेबाबांना मी ‘लोकोत्तर’ या शब्दाने गौरवितो याची अनेक कारणे त्यांच्याच आयुष्यात आपणाला पदोपदी सापडतात. त्यांनी व्रतस्थ वृत्तीने स्वीकारलेले ‘साधुत्त्व’ आणि ‘संतत्त्व’ लोकोत्तर होते. त्यांनी केलेला स्वतःचा आत्मिक विकास ‘लोकोत्तर’ होता. त्यांची कृतार्थ जीवनाची धारणा लोकोत्तर होती. त्यांचे चरित्र आणि चारित्र्य लोकोत्तर होते. त्यांची अनासक्ती आणि इंद्रियदमन लोकोत्तर होते; नव्हे कमालीचे अपवादात्मक होते. त्यांनी केलेला संसार आणि कुटुंबियांना दिलेली वागणूक लोकोत्तर होती. त्यांची कीर्तनाची पद्धत पूर्णतः नवीन आणि तितकीच लोकोत्तर होती आणि धर्म, उपासना, कर्मकाण्ड, परंपरा आणि अंधश्रद्धेविरूद्ध केेलेला संघर्ष लोकोत्तर होता. त्यांच्याठायी असलेली करूणा, प्राणिमात्राविषयी असणारे वात्सल्य, उपेक्षितांविषयी वाटणारा जिव्हाळा आणि निसर्गापासून ते महारोग्यापर्यंत विस्तारलेले प्रेम हेही तितकेच लोकोत्तर होते आणि या सार्‍या गोष्टींचा झालेला परिपाक म्हणजे त्यांनी स्वतःच्या आचरणातून दिलेला संदेश हा देखील तितकाच लोकोत्तर होता. 

इथेच न थांबता पुढे जाऊन असे म्हणता येईल की, त्यांची आश्रमातली शिस्त लोकोत्तर होती. त्यांनी प्रतिष्ठित केलेली स्वच्छता मोहिमदेखील लोकोत्तर म्हणावी लागेल. त्यातून त्यांनी शरीरकष्टाला दिलेली प्रतिष्ठा तितकीच लोकोत्तर म्हणावी लागेल. यापेक्षाही लोकोत्तर म्हणण्याचे कारण स्वतःच्या मृत्युकडे  पाहण्याची त्यांची भूमिका असाधारण आणि लोकोत्तर अशीच आपणाला जाणवते. त्यांच्या अंगावरचे कपडे? त्यांना आपण कोणत्या शब्दांनी वर्णावे? असा कपडा म्हणजे जुन्या-पुराण्या नाना रंगांच्या ठिगळापासून हाताने शिवलेली आकारहीन गोधडी जगातच्या एकाही मान्यवराने एक व्रत म्हणून आयुष्यभर वापरली नसावी! त्यांनी ती नुसती वापरली नाही, तिला केवढी तरी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. अशा या प्रतिष्ठाप्राप्त वस्त्राला ‘लोकात्तर  वस्त्र’ असे आपण संबोधिले तर वावगे होणार नाही. आजकाल हा शब्दही वापरून गुळगुळीत झालेला असला तरी, एक मात्र खरे की, उपेक्षित आणि सामाजिक प्रतिष्ठा नसलेल्या परीट समाजात जन्मलेल्या एक निरक्षर, दरिद्री आणि शेतातल्या चार बैलांबरोबर पाचवा बैल म्हणून राबणार्‍या माणसाने पन्नास वर्षे म्हणजे दिवसांच्या भाषेत अठरा हजार दिवस श्रीमंतीचा कलंक न लागलेल्या गरिबीत राहून, गरिबांच्या समवेत राहून, त्यांच्या क्षूद्र व विझत चाललेल्या आयुष्याला चेतविले. त्यांच्या जीवनात प्रकाश पेरला, त्यांच्यावर सुसंस्कार केले, संसाराला परमार्थाची जोड दिली. नानाविध बंधनांनी जखडलेल्या गरिबांना बंधमुक्त केले. त्यांना आपल्या जीवनातील श्रेयसाचा साक्षात्कार घडविला. या सर्वांसाठी गाडगेबाबांना ‘लोकोत्तर’ हाच शब्द वापरावा लागेल, यामध्ये तिळमात्र शंका नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा लोकोत्तर असलेला महापुरूष बाबांच्या मांडीशेजारी बसून त्यांना घोंगडीसारखी भेट देतो, यातूनही त्यांचे लोकोत्तर अधिक ठळक होऊन जाते.

परमपूज्य गाडगेबाबा यांना मला ‘लोकोत्तर’ विशेषण वापरावे वाटले याचे आणखी एक कारण असे की, गाडगेबाबांच्या काळात आणि आजच्याही काळाचा विचार करता एकाही साधुने किंवा स्वामी, आचार्याने हाती खराटा घेऊन आयुष्यभर स्वच्छतायज्ञाची निष्ठेने उपासना केलेली नाही. एकाही साधू अथवा आचार्याने अस्पृश्यासाठी मोफत धर्मशाळा बांधली नाही. भक्तांसाठी धर्मशाळा बांधून सुद्धा एकही महाराज शेजारी उभारलेल्या झोपडीत राहिला नाही. एकाही साधंने भक्तांनी पायाशी टाकलेला पैसा भक्तांसाठी आणि अनाथ मुलांसाठी वापरला नाही. महाराष्ट्रातल्या एकाही महाराजाने पायांना रूईची पाने बांधून राना-वनातून शेकडो मैलांचा प्रवास केलेला नाही. आजच्या काही महाराजांना तर ए.सी गाडी लागते. बिसलेरीचे बाटलीबंद पाणी लागते. निवार्‍यासाठी पंचतारांकित सोय हवी असते. समोरच्या टेबलवर ठेवलेला दुधाचा पेला हातात देण्यासाठी एखादा सेवक लागतो. गाडगेमहाराजांच्या काळात आणि आजच्याही काळात एकाही महाराजाने आपल्या आई, पत्नी, जावयाला धर्मशाळेच्या बांधकामावेळी मजूर म्हणून राबविले नाही. स्वतः बाबासुद्धा पंढरपूरच्या धर्मशाळेच्या बांधकामावेळी गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून राबले आहेत. तेही मजुरी न घेता. परमपूज्य गाडगेबाबा यांनी कुठलाही आदेश नसताना सारा गाव स्वच्छ केल्यावर एखाद्या माऊलीने दिलेली शिळीपाकी भाकरही ईश्वरी प्रसाद म्हणून आनंदाने खाल्ली. आजच्या काळातल्या किती आचार्यांनी, महाराजांनी अशी श्रमाची भाकरी खाल्ली आहे? अथवा एकही महाराज मजूर म्हणून बांधकामावर राबला नाही. एकही साधू- महाराजाने भाविकांना मिष्टान्नाचा प्रसाद दिल्यावर स्वतःसाठी तळहातावर ओली-सुकी भाकरी घेऊन खाल्ली नाही.

भुकेल्या माणसाला अन्न देणे, तहानलेल्या माणसास पाणी देणे, अनाथांना आधार देणे, महारोग्याला साबण लावून आंघोळ घालणे, पन्नास वर्षात मुखामध्ये कोणताही गोड पदार्थ न घालणे असला ‘वेडेपणा’ महाराष्ट्रातल्या एकाही साधुने केलेला नाही. म्हणूनच त्यांना ‘लोकोत्तर’ हे बिरूद बहाल करणे योग्य वाटते. त्यातही आश्चर्यकारक गोष्ट अशी की, सर्व बाजुंनी अभावग्रस्त परिस्थिती असताना त्यांनी हे लोकोत्तर कार्य केलेले आहे. ज्याच्याकडे अभिमानाने मिरवावा असा उच्चतम वर्णाचा आणि खानदानीपणाचा वारसा नाही, ज्याच्या घरात विद्येची पंरपरा नाही, ज्याच्या घरातले वातावरण भक्ती, शिक्षण व अध्यात्म यास अनुकूल नव्हते, ज्याच्याकडे चार पिढ्यांनी बसून खावे अशी श्रीमंती नांदत नव्हती, ज्याच्या घरात समाजसेवेची प्रेरणा देणारे कोणी नव्हते, ज्याला कोणत्याही गुरूचा अनुग्रह लाभलेला नव्हता आणि ज्याने कधी प्राथमिक शाळेचा उंबरठाही पाहिला नाही असा एक कष्टकरी-नव्हे मातीत राबणारा, मातीत लोळणारा आणि ज्याच्या आयुष्याची कदाचित मातीच झाली असती, असा एक अतिसामान्य माणूस गगनगामी झेप घेऊन आभाळाएवढे कार्य करतो, हे खरोखरच आश्चर्यकारक म्हणावे लागेल. एखादा माणूस पंचपक्वान्ने खाण्याची सोय असतानाही सतत पन्नास वर्षे एखाद्या व्रताप्रमाणे केवळ भाजी-भाकरी, चटणी खाऊन जगतो, हे खरोखर जगातले एकमेव उदाहरण म्हणावे लागेल. आपण महिनाभर सुद्धा दोन्ही वेळेला ते खाऊ शकणार नाही. एवढेच नव्हे तर महिनाभर सकाळ-संध्याकाळी श्रीखंड, पुरी खायची ठरविली तरी त्या मिष्टान्नाचा आपणाला कंटाळ आल्याशिवाय राहणार नाही. या माणसाचे जिभेवर नियंत्रण किती होते याचे हे एक उदाहरण म्हणून सांगता येईल. येशू ख्रिस्ताचे एक चिरंतर सत्य सांगणारे विधान आहे. ख्रिस्त म्हणतात, ‘‘जो जीभ जिंकतो, तो जग जिंकतो.’’ खाण्याच्या संदर्भात आणि वेडेपणाने दर्पयुक्त बोलण्याच्या बाबतीत त्यांचे हे विधान लागू पडणारे आहे. थोडक्यात काय, चमत्कार न मानणार्‍या या माणसाचे सारे आयुष्यच एकापरीने मोठा चमत्कार होता, असे म्हणावेसे वाटते. अशा या थोर व्यक्तीला ‘लोकोत्तर’ या शब्दाशिवाय दुसरा कोणताही शब्द शोभून दिसला नसता, यात शंका नाही.

गाडगेबाबांनी केलेले कार्य केवळ भक्ती-प्रवचनापुरते मर्यादित नव्हते; उलट त्यांचे कार्य बहुआयामी आणि बहुस्तरीय स्वरूपाचे होते. मानवी जीवन आणि संस्कृती यांना समृद्ध करणार्‍या तसेच त्यांना उन्नत बनविणार्‍या सार्‍या क्षेत्रांना त्यांनी आपल्या कार्याद्वारे स्पर्श केला. असा स्पर्श दुसर्‍या कोणत्याही आचार्यांनी केलेला नाही.  परमेश्वराचे साक्षात्कारी दर्शन आणि मोक्षप्राप्ती या वैयक्तिक गोष्टीसाठीच त्यांनी धर्म आणि अध्यात्माचा वापर केला. म्हणून संत साहित्याचे थोर अभ्यासक श्रीमान बाळासाहेब भारदे एका लेखात म्हणतात, ‘‘या देशात अनेक ज्ञानी झाले. अनेक भक्त झाले, योगी, संत आणि तत्त्वज्ञ झाले. त्यांनी केवळ आपल्या उद्धारासाठी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना ब्रह्मानंद कदाचित मिळाला असेलही; पण सामान्य माणसाच्या उद्धाराचा प्रयत्न त्यांंनी केला नाही. त्यांना आनंद झाला, लोकांना मात्र आनंद झाला नाही. हा संगम गाडगेबाबा आणि महात्मा गांधी यांच्या ठायी झालेला होता.’’ 

याची काही उदाहरणे देता येतील. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्याला हातभार लावला होता. त्यांनी गोरगरिबांसाठी स्वतः काही आश्रमशाळा काढल्या आणि त्याबरोबर त्यांनी रयत शिक्षण संस्था आणि ऍड. पंजाबराव देशमुखांच्या संस्थेला मोलाचे सहकार्य केले. ‘एक वेळ प्रसंग पडला तर जेवणाचा ताट मोडा, पण पोरांचे शिक्षण थांबवू नका’ असा आग्रह त्यांनी प्रवचनाद्वारे धरला. स्त्री-पुरूष समानतेचा आग्रह धरला. वृक्षारोपणास प्राधान्य दिले. व्यसनाधीनतेचा अधिक्षेप केला. विज्ञाननिष्ठेची कास धरली. प्रापंचिकाच्या एका खांद्यावर परमार्थ आणि दुसर्‍या खांद्यावर संसार घेऊन आनंदतीर्थाच्या प्रवासास जाण्यास शिकविले. त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे मौलिक कार्य केले. आदर्श आणि कृतार्थ जीवनाचा संदेश दिला. ‘‘सार्वजनिक पैसा स्वतः वापरणे म्हणजे विष्ठा खाण्यासारखे होय’’ असा संदेश देऊन सदाचार, सद्विचार, पावित्र्य, चारित्र्य, समाजसेवा आणि राष्ट्रनिष्ठा यांना असणारे महत्त्व स्पष्ट केले. समाज जीवनातील विविध क्षेत्रांना समृद्ध आणि गतिमान करण्याचे कार्य गाडगेबाबांशिवाय दुसर्‍या कुठल्याच साधू किंवा महाराजांनी केलेले नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

गाडगेबाबांच्या सर्वस्पर्शी जीवनकार्याचा सर्वांगीण व सूक्ष्म विचार केला तर आपणाला असे जाणवते की त्यांचे सारे प्रयोग माणसाला दुःखापासून मुक्त करण्याच्या ध्यासातून निर्माण झालेले आहेत. माणसाला कळणारे दुःख कशामुळे निर्माण होते हा खरा तर एक सनातन प्रश्‍न आहे. गौतम बुद्धाला तृष्णा हे दुःखाचे मूळ वाटते, महावीरांच्या मते हिंसेतून दुःख निर्माण होते. शंकराचार्यांना मायेतून दुःख निर्माण होते असे वाटते. महात्मा गांधीना संचयाची लालसा हे दुःखाचे कारण वाटते तर महात्मा फुल्यांना धार्मिक शोषणातून दुःखाचा जन्म होतो असे वाटते. गाडगेबाबांना वर दिलेली कारणे योग्य वाटतातच; पण त्यांच्या मते दुःख अज्ञानातून निर्माण होते. अंधश्रद्धा व कर्मकांडातून ते निर्माण होते. जाती-पातीच्या तटबंदातून दुःखाचा उगम होतो. 

गुलामगिरीतून, दारिद्य्रातून आणि व्यसनाची शिकार झाल्याने माणसाला दुःख भोगावे लागते, असे त्यांचे निरीक्षण आहे आणि म्हणूनच या सार्‍यावर त्यांनी उपाय शोधले आणि त्यापरिने कार्य केले. महाराष्ट्रातल्या एकाही बाबाने असे कार्य केले नाही. त्यांच्या मते, निसर्ग माणसाला फार दुःख देत नाही. भूकंप, महापूर अथवा अवर्षण ही फार तर त्याची कारणे म्हणता येतील पण निसर्गापेक्षाही माणूसच स्वतःच्या आचरणातून दुःख निर्माण करतो. माणूसच दुसर्‍या माणसाला दुःखी करतो. स्वतःही दुःखाने होरपळून जातो पण त्यापासून तो मुक्ती घेत नाही. ते निवारण्यासाठी प्रयत्नही करीत नाही. त्यामुळे सामान्य माणूस जन्माला येताना सोबतीला दुःख घेऊन येतो; त्याच्या जगण्यात सोबतीला दुःख असतेच आणि मरतानाही दुःख सोबतीला घेऊनच मरतो. म्हणून सनातन दुःखाशी झुंज देणारा आणि सामान्य माणसाच्या दुःखावर फुंकर घालणारा हा महामानव होता, असे म्हणता येईल.

सामान्य माणसाचे दुःख कमी करण्याबरोबरच गाडगेबाबांनी धर्माचा अर्थ बदलला; ईश्वरपूजेचा अर्थ बदलला. साधू किंवा संत या शब्दाची व्याख्या बदलली. एवढेच नव्हे तर स्वर्ग आणि नरक, पाप आणि पुण्य, पवित्र आणि अपवित्र, अमृत आणि अप्सरा यात अडकून गरगरणार्‍या सामान्य माणसाला बाहेर खेचून धर्माचा प्राणभूत घटक त्यांच्या अंगणात उभा केला. कर्मकाडांनी माखलेली विधी-उपासना म्हणजे धर्म नव्हे; तर धर्म म्हणजे निरामय, निर्मळ, उन्नत, प्रवाही आणि जीवनदायी शाश्‍वत विचार म्हणजे धर्म होय! लौकिक आणि पारमाथिर्र्क जीवनाला समृद्ध करणारा शाश्वत विचार म्हणजे धर्म! हा धर्म बाबांनी लोकांना शिकवला. स्वतःच्या आचरणातही आणला. ज्या माणसाला वीसापर्यंतचे आकडे मोजता येत नव्हते, ज्याला बारखडीची अक्षरे ज्ञात नव्हती, ज्याला कुठलाही पंथ व परंपरा ठाऊक नव्हती, ज्याला कुठलाही ‘इझम्’ ठाऊक नव्हता, ज्याने आचार्यांच्या ज्ञान मंदिरात ज्ञानसाधना केली नव्हती अशा एका माणसाने शाश्‍वत स्वरूपाचे लोकोत्तर कार्य करावे आणि मानवी जीवन उन्नत होण्यासाठी पावला-पावलावर प्रकाशदीप पेटवावेत, याला ‘लोकोत्तर’ याशिवाय दुसरा शब्द नाही. एका निरक्षर माणसाच्या नावाने एखादे विद्यापीठ सुरू केले जाते, असे उदाहरण जगाच्या पाठीवर क्वचितच पहावयास मिळेल!
(साप्ताहिक 'चपराक' १८ डिसेंबर २०१७)

- डॉ. द. ता. भोसले, पंढरपूर 

९४२२६४६८५५ 

No comments:

Post a Comment