Monday, December 25, 2017

कवीश्रेष्ठ भालचंद्रांचे ‘शिवदर्शिका’ हस्तलिखित

साप्ताहिक 'चपराक' - २५ डिसेंबर २०१७ 

महाड येथे प्राथमिक शिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली होती ती प्राचार्य गजेेंद्रगडकर यांच्यामुळे. ते चंद्रपूर येथे बदलून गेले होते तरी त्यांचे मन माझ्यात गुंतले होते. मला मुलगा मानून माझ्यातला साहित्यिक त्यांनी जागा केला होता. ‘आचार्य’ची परीक्षाही द्यायला लावली होती. मनाने आम्ही दोघे कमालीचे जवळ आलो होतो. त्यातून त्यांची पितृछायाच मिळाली होती. रायगड खोर्‍यातील सांदोशी गावी कडेकपारीत बदली झाल्यामुळे माझ्यातला कलावंत मरून जाईल म्हणून ते बेचैन झाले होते. इतक्या दूरवर जाऊनही त्यांना मला विसरता येत नव्हते. त्यांनी संधी मिळताच रायगडच्या शिक्षण अधिकार्‍याला सांगितले व माझी बदली महाडला झाली.

महाडची शाळा तशी जुनी आणि नावाजलेली. त्या शाळेत चिंतामणरापांनी (सीडी देशमुख) शिक्षण घेतले होते. या शाळेत माझ्या वाट्याला चौथीचा वर्ग आला होता. जी जुनी-जाणती माणसे होती त्यांच्या ‘वजनानुसार’ त्यांना वरचे वर्ग मिळालेले होते. त्यातून त्या काळात सातव्या यत्तेला विलक्षण महत्त्व आले होते. त्यामुळे वाडकर, उमरटकर, रा. मो. शेठ ही वयाने मोठी असलेली माणसे वरचे वर्ग ‘सांभाळीत’ होती. त्यातून मी तसा अगदीच नवा होतो. तरी बरे, चौथी तरी दिली होती. त्याचेही कारण होते. खालच्या तीन यत्तांचा ‘सांभाळ’ महिला शिक्षक करीत होत्या. त्यात केशवराव जावडेकरांची पत्नी होती. प्रकाश हा त्यांचा मुलगा पत्र्याच्या त्या शाळेत त्याकाळी शिकत होता. पुढे माध्यमिक शिक्षक म्हणून परांजपे विद्यामंदिरात मी अध्यापन करीत असताना तो नववीच्या वर्गात विद्यार्थी म्हणून शिकत होता. प्रकाशच्या वडिलांशी माझा स्नेहसंबंध फारच जुना असा होता. ‘केसरी’मध्ये ते वृत्तसंपादक होते. मी ‘आचार्य’ परीक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम येताच त्यांनी ती बातमी ‘केसरी’च्या पहिल्या पानावर अगदी ठळकपणे छापली होती. ते मधूनमधून महाडला येत असत. त्यांचा माझ्याशी पत्रव्यवहार हा शेवटपर्यंत होता. 

चौथीच्या वर्गात जी मुले होती ती आडदांड अशी होती. या वर्गाचा धाक सर्व शाळेला होता. अशी मुले मला शिकवायची होती. विशेष म्हणजे या मुलांचे माझ्यावर फारच प्रेम बसले होते. गंमत ही की, मी माध्यमिक शिक्षक म्हणून परांजपे विद्यामंदिरात काम करीत असताना हा वर्ग ‘हूड’ म्हणून प्रसिद्ध पावला होता व हा खट्याळ मुलांचा वर्ग मला मुद्दामच देण्यात आला होता. हेतू हा की, माझी पुरती जिरावी! पण झाले उलट! ती मुले पूर्वीची मराठी चौथीतली होती; त्यामुळे मला चांगली माहितीची होती. माझे त्यांनी स्वागतच केले होते आणि त्यामुळे तेथील ‘हितचिंतकांची’ पुरती जिरली होती.

प्राथमिक शिक्षक असतानाच एका विद्यार्थ्याने एक दिवस भाजी मंडईतून भाजी खरेदी करीत असताना मला पाहिले. त्याच्या मोठ्या भावाचे हॉटेल होते ते बाजारपेठेत. त्याने मला पाहताच धाव घेतली आणि म्हटले, ‘‘गुरूजी चला माझ्याकडे चहा घ्यायला.’’ 
मी विचारले, ‘‘इथे तुझे घर कुठे जवळ आहे काय?’’
त्यावर तो म्हणाला - ‘‘घर नाही, माझ्या भावाचे हॉटेल आहे. ते समोर दिसते तेच. शाळा सुटल्यावर मीच गल्ल्यावर उभा असतो.’’ 

माझी शिस्त अशी होती की मी सहसा हॉटेलात कधी जात नव्हतो.  म्हणून त्याला म्हटले, ‘‘अरे, मी हॉटेलात कधी जात  नसतो. तुला माहिती आहे ना?’’ 

तो म्हणाला, ‘‘मला चांगलं माहीत आहे. तरीही मला वाटते की तुमचे पाया माझ्या हॉटेलात लागावेत. थोडातरी चहा घ्या आणि मगच घरी जा.’’ 

त्याची ही भावना अव्हेरावी असे न वाटल्याने मी त्याच्या बरोबर गेलो. 

गल्ल्यावर पैसे देण्यासाठी त्यावेळी रांग लागलेली होती. त्या रांगेला बाजूला सारून त्याने मला जवळच खुर्ची दिली व ‘स्पेशल’ची ऑर्डर दिली. 
हॉटेल बाजारातच असल्याने त्या हॉटेलात नेहमीच गर्दी फुललेली असे. माझ्यासाठी ‘ऑर्डर’ दिली होती, तरीही चहा यायला वेळ लागला होता. मी वेळ फुकट जात होता म्हणून थोडा बेचैन होतो. त्याहीपेक्षा इथे बसून आपण काहीच करू शकत नाही याचे मला वाईट वाटत होते. तेवढ्यात बाजूला पडलेल्या रद्दीकडे माझे लक्ष गेले. काही तरी वाचायला मिळेल म्हणून मी ती रद्दी चाळायला लागलो, तोच एक जुने हस्तलिखित माझ्या हाती लागले. मी अधाशासारखे ते वाचायला लागलो. ते हस्तालिखित होते कविश्रेष्ठ भालचंद्रांचे! हे भालचंद्र म्हणजे केशवसुत संप्रदायातले प्रसिद्ध कवी तर होतेच शिवाय मराठीत ‘प्रहसन’ हा वाड्ःमय प्रकार मराठी साहित्यात प्रथम त्यांनी आणलेला होता. उत्तम प्रहसनकार म्हणून ते मासिक ‘मनोरंजन’ मध्ये गाजलेले लेखकही होते. माझ्या दृष्टीने त्यांचे जे मोठेपण होते ते कवितेच्या दृष्टीने. ‘शिवदर्शिकाकार भालचंद्र’ हे त्यांनी स्वतः होऊन घेतलेले असे टोपणनाव होते. त्या काळात बहुतेक कवी ‘टोपण’ नावानेच लिहीत असायचे. गिरीश, केशवकुमार, बालकवी, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, बी ही त्यातलीच नावेे होती. भालचंद्रांचे पूर्ण नाव होते गणेश नारायण टिपणीस. महाडच्या माध्यमिक शाळेत ते शिक्षक होते. त्यापूर्वी ते पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते. घरची शेती भरपूर होती. ती सांभाळायला कुणी जबाबदार हवे होते म्हणून ते महाडात परतले होते. 

पुण्यात असताना राम गणेश गडकरी, बालकवी ठोंबरे हे त्यांचे जिवश्च कंठश्च असे मित्र होते. या तिघांनी एकत्रितपणे आपल्या कविता लिहिल्या होत्या तशाच त्या वाचल्याही होत्या. त्यातूनच त्या तिघांचे ‘अरूण’ एकाचवेळी जन्म पावलेले होते. आचार्य परीक्षेच्या निमित्ताने ‘मनोरंजन’सारखे अनेक जुने अंक, ‘विविधज्ञान विस्तार’चे अंक मी अभ्यासले होते. त्या त्या वेळी भालचंद्रांच्या अनेक कविता वाचनात आल्या होत्या. अशा या मोठ्या कवीचे ‘शिवदर्शिका’ हस्तलिखित माझ्या हाती अचानक पण चहाच्या निमित्ताने लागले होते. मी विद्यार्थ्याला म्हटले, ‘‘तुझा चहा राहू दे. त्या चहापेक्षा मला मोठा चहा मिळाला आहे. मी निघतो. मी हे हस्तलिखित नेऊ का?’’ 

या प्रप्रश्नावर तो चकितच झाला. मला म्हणाला, ‘‘कसले ते? काय नेऊन करणार? गुरूजी, चिवडा बांधायलासुद्धा हा कागद उपयोगी येईना म्हणून मी बाजूला टाकले होते. ते तुम्हाला आवडले?’’ 

मी म्हटले, ‘‘अरे तुझ्या चहाच्या निमित्ताने मला फार मोठे खाद्य मिळाले आहे. तुला हे मिळाले कुठे?’’ 

त्यावर तो म्हणाला, ‘‘माझ्याकडे जी रद्दी आली त्यात हे आले. थांबा; चहा घ्या आणि तुम्हाला आवडलेले ते बाडही घेऊन जा.’’ चहा घेऊन मी निघालो.

घरी आल्यावर मी त्या ‘शिवदार्शिका’हस्तलिखितानेच वेडा झालो होतो. एकामागून एक कविताच वाचत होतो. 97 कवितांचे ते हस्तलिखित होते. त्यातून भालचंद्रांनी स्वतःच्या हस्ताक्षरात त्या सर्व कविता लिहिल्या तर होत्याच पण ज्या ज्या मासिकात त्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्या मासिकांच्या नावाचीही नोंद केली होती. माझ्यादृष्टीने ती गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती. भालचंद्र, बालकवी, गोविंदाग्रज पुण्यात वास्तव्याला होते त्यावेळी एक छोटा कवी, ‘बालकवी’ही त्यांच्या सहवासात आला होता. त्याचे हे तिघांशी भावनिकअसे नातेही निर्माण झाले होते. हा ‘बालकवी’ म्हणजेच सुप्रसिद्ध कादंबरीकार रघुनाथ वामन तथा र. वा. दिघे होत. या तिघांचे ‘अरूण’ त्याने एकत्रितपणे ऐकले तर होतेच पण खुद्द बालकवींबरोबर (ठोंबरे) ते पर्वतीवर रोज फिरायलाही जात होते. त्यांना गोविंदाग्रजांनीच ‘बालकवी’ संबोधले होते. ‘वाग्वैजयंती’मध्ये त्यांच्यावर गडकर्‍यांनी एक कविताही लिहिलेली आहे. गडकरी कर्जतला (रायगड) असताना खोपोलीत र. वा. दिघे यांना नेहमीच भेटायलाही येत होते. भालचंद्रांच्या तर अनेक कविता र. वा. दिघे यांच्या तोंडी रूळल्याही होत्या. 

हे हस्तलिखित मिळताच त्यांनी कवितांची नक्कल करून सर्व कविता माझ्याकडे मागितल्या होत्या आणि मी 97 कवितांची ती वही त्यांना दिलीही होती. आचार्य परीक्षेच्या निमित्ताने मी जी असंख्य पुस्तके  अभ्यासली होती त्यात नागपूरच्या भ. श्री. पंडितांचे ‘आधुनिक मराठी कवितेचे स्वरूप’ हेही पुस्तक अभ्यासले होते. भालचंद्रांचे हस्तलिखित हाती मिळताच त्यांच्याशी माझा पत्रव्यवहार सुरू झाला तो त्यांच्या काही विधानांवर आक्षेप घेऊनच. मी त्यांना त्या पुस्तकात 3/4 ठिकाणी ‘भालचंद्र’ म्हणून जो उल्लेख आला होता त्याबाबत विचारले होते. त्यांना जे नीटसे स्पष्टीकरण देता आले नव्हते. तसे त्यांचे पत्रही आले होते. मात्र त्यांच्या त्या पुस्तकात त्यांनी जे वाक्य उच्चारले होते तेे आधाराला घेऊन मी प्रश्न विचारला होता. ते वाक्य असे होते, ‘भालचंद्रांच्या कवितेत चटका असे परंतु त्यांचे काव्य अत्यल्प असे आहे.’ बी कवींच्या कवितेवर भ. श्री. पंडितांनी मात्र भरभरून लिहिले होते. मी त्यांना विचारले, ‘‘बी कवींपेक्षाही अधिक काव्य भालचंद्रांनी लिहूनही आपण अल्पशब्दात त्यांना बाजूला का केलेत?’’ 

तेव्हा त्यांनी पत्रात लिहिले की बी कवींच्या जवळजवळ 45 कविता लिहिलेल्या आहेत तेवढ्याही मला भालचंद्रांच्या आढळल्या नाहीत.’’

मी मग भ श्रींना 97 कवितांची यादी पाठवली आणि स्पष्टपणे म्हटले की, आपल्यापुढे ‘मासिक मनोरंजन’चे अंक तेवढे होते त्यामुळे आपण ‘ते’ विधान केलेत. ही यादी पहा. ‘बी’ कवींपेक्षा भालचंद्रांच्या कविता दुप्पट अधिक अशा आहेत. त्यांनाही ते पटले व त्यांनी पत्रात मान्यही केले की ‘मासिक मनोरंजन’चे जे अंक हाती आले त्या आधारावर मी ते वाक्य लिहून गेलो.’’

भालचंद्रांच्या त्या हस्तलिखितामुळे भ. श्रींची व आमची चांगलीच जोडी जमली. ती इतकी की ‘‘मी पी.एच.डी केल्यास मार्गदर्शनासाठी मुंबईत येऊन राहील’’ असेही त्यांनी म्हटले. माझा ‘झंकार’ हा काव्यसंग्रह त्या काळात प्रसिद्ध व्हायचा होता. मी प्रस्तावनेसाठी त्यांच्याकडे हस्तलिखित पाठवताच त्यांनी प्रदीर्घ अशी प्रस्तावना पाठवली. मी ती छापली आणि ‘झंकार’ काव्यसंग्रह दिमाखात प्रकाशित झाला. त्यात कुसुमाग्रजांचाही अभिप्राय प्रसिद्ध केलेला आहे. त्यांच्याशी तर सतत पत्रव्यवहारच होता. 

भालचंद्रांनी केशवसुतांवर जशी कविता लिहिली तशीच बालकवींवरही लिहिली होती. ‘ठोंबरे मरे; तो काळाला पुरूनि उरे’ अशी त्यांची कवितेची ओळ होती. गडकर्‍यांच्या ‘दसरा’ या गाजलेल्या समाजपरिवर्तनपर कवितेशी भालचंद्रांच्या कवितांचा जो संबंध आला आहे तो या कवितेच्या शेवटच्या ओळीत. गोंविदाग्रजांनी शेवटची ओळ लिहिली आहे.
‘अतारकरांची झडवा नौबत!’ भालचंद्रांची हस्तलिखितात जी कविता आहे ती ‘अतारकरांस’ या नावाची! आणि हीच कविता मासिक ‘मनोरंजन’मध्ये जी प्रसिद्ध झाली ती नेमकी ’नौबत’ या नावाने. गडकर्‍यांनी मित्रप्रेमातून या दोन्ही नावांचा मिलाफ घडवून आणून ती ओळ ‘दसरा’ कवितेत शेवटी लिहून टाकलेली आहे, हे ‘सत्य’ मला वाटते भल्याभल्यांना अजूनही कळलेले नाही. गडकर्‍यांना एखादा शब्द किंवा ओळ आवडली की ते त्यांचा अचूक उपयोग करून घेत असत. र. वा दिघे यांची ‘झरा’ कविता (ती रत्नागिरीत लिहिलेली) वाचनात येताच गडकरी म्हणाले होते की, ‘मी या झर्‍यातून प्रलय निर्माण करीन’ आणि त्यांनी ते तसेच करूनही दाखवले. गडकर्‍यांच्या कवितेतून असे ‘प्रेम’ अनेक ठिकाणी दाखवूनही देता येते. र. वा. दिघ्यांनी ते मला अनेकदा जाणवूनही दिलेले आहे. 

‘जुनी कविता आता वाचणार कोण?’ या प्रकाशकांच्या विचारधारेमुळे ते हस्तलिखित पुढे प्रकाशात येऊ शकलेले नाही. शासनाने ते प्रसिद्ध करावे म्हणून प्रयत्न करूनही साहित्य संस्कृती मंडळाने त्याची दखलही घेतलेली नाही. शेवटी मराठीतील एक अजोड संपत्ती म्हणून भालचंद्रांचे ते हस्तलिखित जिवापाड जपूनही ठेवलेले आहे. एक इतिहासाची साक्ष म्हणून मला ते नेहमीच अधिक मोलाचे वाटत राहिलेले आहे. या हस्तलिखितांमुळे भ. श्री. पंडितांची मैत्री लाभली तसाच र. वा. दिघे यांच्याशी दाट असा स्नेहसंबंधही जुळून आला. मैत्रीची साक्ष म्हणून ‘शिवदार्शिका’ या हस्तलिखिताला माझ्या दृष्टीने केवढे तरी मोल आहे हे काय सांगायला हवे?
- डॉ. माधव पोतदार
(सुप्रसिद्ध लेखक आणि पत्रकार)
साप्ताहिक 'चपराक' - २५ डिसेंबर २०१७ 

No comments:

Post a Comment