Wednesday, December 27, 2017

बुड्ढा होगा तेरा बाप...


साप्ताहिक 'चपराक' २५ डिसेंबर २०१७ 

2011 ला महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता सिनेमा बरा होता. पण अमिताभसारखा वृद्ध नट हा त्या चित्रपटाचा हिरो होता. या वयातही अमिताभ बच्चन यांची ऊर्जा आणि उत्साह पाहिला की भल्या भल्या तरुणांची बोटेही तोंडात जातात. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनला मात्र एवढे यश मिळाले नाही. पण हा बुढ्ढा (लेखाची गरज म्हणून हा शब्द वापरलाय. बच्चन साहेबांबद्दल पराकोटीचा आदर आहे.) सर्व तरुणांना लाजवत अजूनही ठुमके घेतोय. आपल्याच वयाचे पात्र रंगवतानाही त्यांचा जोश पाहण्यासारखा असतो. ते आजही कित्येक तास काम करतात. नरेंद्र मोदी आणि अभिताभ बच्चन यांची चांगली मैत्री आहे. अमिताभ यांचे पूर्वी कॉंग्रेस पक्षाशी चांगले संबंध होते. त्यांच्या सौ.जया बच्चन ह्या विरोधी पक्षात आहेत पण तरीही मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरात पर्यटनासाठी त्यांना ‘ब्रँड ऍम्बासेडर’ बनवले. त्या जाहिराती खूप गाजल्या. मला नेहमी अमिताभ बच्चन आणि नरेंद्र मोदींच्या बॉडी लँग्वेजमध्ये साम्य दिसतं. मोदींचं शरीर थोडसं तिरपं करुन बोलणं, टाळ्या वाजवण्याची पद्धत आणि वृद्ध असूनही चेहर्‍यावरील तारुण्यातील आत्मविश्वास या गोष्टी समान वाटतात. ‘आज तक’च्या So Sorry आणि इंडिया टिव्हीच्या OMG या पॉलिटिकल ऍनिमेटेड सिरीजमध्ये नरेंद्र मोदींना अमिताभ यांच्या अवतारात दाखवतात. त्यांनाही हे साम्य जाणवले असतील. एक कलाक्षेत्रातला आणि एक राजकारणातला बुढ्ढा तरुणांपेक्षाही जास्त काम करत आहेत.

या दोन बुढ्ढ्यांबद्दल लिहिण्याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी जिग्नेश मेवाणी नावाच्या एका तरुण नेत्याने मोदींविषयी आक्षेपार्ह विधान काढत त्यांना बुढ्ढा म्हटले. जिग्नेश मेवाणीची ओळख दलित नेता म्हणून आहे. गुजरातच्या निवडणुकीत तो कॉंग्रेसचा स्टार चेहराही होता. जिग्नेश मेवाणी एका चॅनलच्या चर्चे दरम्यान म्हणाला की, ‘‘वो मानसिक तौर से बुढे हो गये है. अब तो हम युवा आयेंगे. राजनीती देश का युवा करेगा युवा. इनको अभी रिटायर्ड हो जाना चाहिये. उनको हिमालय भी चले जाना चाहिये, अपनी हड्डीयां गलाने के लिये. घर जाकर बैठे, आराम करे. अब बहुत बोरिंग आदमी हो गया हैं.’’ हे म्हटल्यानंतरही त्याला याबद्दल माफी मागाविशी वाटली नाही. बोलण्याच्या नादात उत्सुकतेने आपण बोलून गेलो असेही त्याला वाटत नाही. पुरे होश-ओ-आवाज़ में त्याने हे म्हटलेले आहे. अशा प्रकारच्या टीका नरेंद्र मोदींसाठी नव्या नाहीत. या आधी अनेक खालच्या पातळीवरच्या टीका मोदींनी सहन केल्या आहेत. त्या त्यांनी गुजरातच्या निवडणुकीत बोलूनही दाखवल्या. त्यांनी टिकाकारांचा समाचार घेतल्यावर टिकाकार आणि विरोधकांनी म्हटलं की मोदी विकास विसरुन स्वतःबद्दल बोलत आहेत. जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. अहो पण ज्यांनी मोदींवर अशा टीका केल्या त्यांच्याबद्दल कुणीच बोलायला तयार नाही. म्हणजे लोकांनी तोंडसुख घ्यायचे आणि त्याविषयी मोदींनी एक अवाक्षरही काढायचा नाही, अशी विरोधकांची मानसिकता आहे. मोदींनी फक्त मुकाट्याने सहन करायचं असंच त्यांना वाटतं. बोलणारे राहतात बाजूला, पण चुका दाखवणार्‍यांचं तोंड दिसतं. नरेंद्र मोदी हा एक असा नेता आहे, ज्याला विरोधकांनी सर्वात जास्त टार्गेट केले आहे. अगदी ते प्रत्यक्ष राजकारणात नवीन असल्यापासून. पण हा नेता सर्वांना पुरुन उरला. मोदी राजकारणातून नष्ट होणार अशी मनीषा बाळगणारे राजकारणातून हद्दपार झाले. पण मोदी मात्र प्रादेशिक राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात आले.

गुजरातमध्ये राहुल हरुनही बाजीगर ठरले आणि मोदी सतत जिंकूनही त्यांच्या तोंडाला फेस आला, असे कॉंग्रेसी म्हणतात तेव्हा आपण समजू शकतो. कारण कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण होऊ नये आणि कॉंग्रेसच्या परंपरेप्रमाणे जसे बादशहाचा मुलगा बादशहा होतो तसे राहुल सुद्धा पारंपरिक पद्धतीने बादशहा अर्थात कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. कॉंग्रेसींना काही करुन राहुल गांधींचे अस्तित्व टिकवायचे आहे. जर राहुल यांच्या योग्यतेबद्दल कॉंग्रेसमध्ये अधिक चर्चा होऊ लागली तर कॉंग्रेसी राहुल समर्थकांना हा सर्वात मोठा फटका बसू शकतो. म्हणून राहुल बाजीगर, त्यांनी मोदींना टक्कर दिली, राहुलमुळे मोदी काठावर पास झाले हे कॉंग्रेसींना सांगावं लागतं पण इतर मोदी विरोधक हा खटाटोप करतात तेव्हा हसू आवरत नाही. त्यांना राहुल गांधींच्या पराभवात जय का दिसतो? की त्यांनीही गांधी परिवारची गुलामी करण्याचे व्रत घेतले आहे? मला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा स्वतःला तिसरी व्यक्ती किंवा पत्रकार किंवा लेखक म्हणवून घेणारेही राहुलजींच्या या पराभवामुळे आनंदी होते व त्यांनीही मोदी जिंकूनही हा त्यांचा नैतिक पराभव असल्याचे म्हटले. या अशा लोकांना गुजरातच्या पार्श्वभूमीची साधी माहिती सुद्धा घ्यावी असे वाटत नाही. अगदी साधा मुद्दा आहे, आपल्या भारतीय लोकशाहीप्रमाणे बहुसंख्य लोकांच्या समर्थनाने सरकार स्थापन होते. त्यामुळे लोकशाही पद्धतीने भाजप गुजरातेत जिंकला आहे आणि संविधानाप्रमाणे हा नैतिक विजयच आहे. 

गुजरातमधून हार्दिक पटेलनंतर मोदी विरोधी दलित चेहरा म्हणून जिग्नेश मेवाणी समोर आला. जिग्नेश हा तरुण आहे. तो आता जिंकलाही आहे. त्यामुळे विजयाची धुंदी अजूनही त्याच्या डोक्यावरुन उतरलेली नाही. ज्या वयात जिग्नेश मोठा नेता झाल्याने पुरोगामी मंडळी खुश आहेत, त्या वयात मोदी हे साधे कार्यकर्ते होते. त्या वयात मोदी प्रत्यक्ष राजकारणात आलेले नव्हते. ते टप्प्याटप्याने आले. म्हणजे ते प्रसिद्धीच्या बळावर राजकारणात आले नाहीत. ते श्रम करीत आले. स्वयंसेवक किंवा कार्यकर्ता आणि विशेष म्हणजे प्रचारक म्हणून तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही लोकांमध्ये राहत असता. अगदी सामान्य माणसाप्रमाणे लोकांमध्ये मिसळता, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत असता. हार्दिक म्हणा, कन्हैया किंवा जिग्नेश हे प्रसिद्ध झालेले युवा नेते आहेत. यशस्वी झालेले नव्हे. मराठीत असं म्हणतात की एखाद्याला आपटायचं असेल तर आधी त्याला उचलावं लागतं. या तरुण नेत्यांना मिडिया आणि डाव्यांनी डोक्यावर उचलून घेतलंय. ही डावी मंडळी हिंदू द्वेषाने पछाडलेली आहेत. ही मंडळी भयंकर स्वार्थी आहेत. जिथे जिथे कम्युनिस्टांचे राज्य आहे, तिथे तिथे रक्ताचे पाट वाहिले जातात हे सत्य ते जगापासून लपवतात. या डाव्या मंडळींनी या युवा नेत्यांना त्यांचे विशेष काहीही कर्तृत्व नसताना डोक्यावर उचलून घेतले आहे. ही मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी या तरुणांना आपटू शकतात. अर्था या युवा नेत्यांनी प्रसिद्धीही मिळाली आहे. एखादं गाढव जरी हिंदू किंवा मोदींच्या विरोधात बोंबलायला लागलं तर ही डावी मंडळी त्या गाढवालाही खांद्यावर घेऊन नाचतील. अशी अवस्था स्वतः डाव्यांनी करुन घेतलेली आहे. कारण डावी मंडळी सपशेल नापास झालेली आहेत. त्यांचा अवास्तव बुद्धीवाद भारतीयांना नकोय. त्यांना सुशासन हवेय. 

या डाव्या मंडळींनी उचलून घेतलेले हे युवा नेते किती माजोरडे आहेत, हे त्यांच्या मुलाखतींमधून आणि भाषणांमधून स्पष्ट दिसत आहे. भाजप आल्यापासून ही मंडळी जास्तच वैतागलेली आहेत. त्यांना भारतात सुशासन आणायचे आहे, याचा दुसरा अर्थ त्यांना भारतात शांती नकोय. कारण डाव्या मंडळींचे लेख जर तुम्ही वाचत असाल तर ह्यांचा हिंदू विरोध दिसून येतो आणि ह्यांना काहीही करुन भारतात हिंदू विचारांचं शासन नकोय. आता या ज्येष्ठ डाव्या मंडळींचं कुणीही ऐकत नाही. म्हणून जिग्नेश मेवाणी सारख्या युवा नेत्यांच्या खांद्यावरुन ही मंडळी मोदींवर वार करीत आहेत. मग कोणतीही कुवत नसताना प्रसिद्ध झालेले जिग्नेश मेवाणी सारखे नेते स्वतः भारत भाग्य विधाता असल्या सारखे वागू लागतात आणि मोदीं सारख्या जुन्या जाणत्या आणि यशस्वी नेत्यावर टिका करु लागतात, लोकशाहीत टिका झालीच पाहिजे. पण ह्यांची कुवत नसल्यामुळे टिका करताना सुद्धा ह्यांचे भान सुटते, मग ते मोदी बुढ्ढा म्हणत अपमान करतात. पण कुणाही स्वयंघोषित पुरोगाम्याला जिग्नेशचे कान धरावेसे वाटत नाही. त्यांनाही यात आनंद मिळतो. अर्थात मोदी वेळ आल्यावर त्यांना उत्तर देतीलच. पण मोदी वेळोवेळी आपल्या कार्यातून उत्तर देतच आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर बहिष्कारीत झालेले व अमेरीकेने व्हिजा नाकारलेले मोदी आज आंतरराष्ट्रीय स्थरावर लोकप्रिय होत आहेत. मोदींमुळे अनेक आंतरराष्ट्रीय राजकीय पंडितांना भारताविषयी लिहावेसे करावेसे वाटत आहे. मोदी पंतप्रधान झाले तेव्हा सरकारी बाबू वेळेवर कामाला येतात अशी बातमी छापून आली होती. याचा अर्थ पूर्वी मनमोहन सिंह यांच्यासारख्या उच्चशिक्षित माणसाच्या नेतृत्वाखाली ही मंडळी कामं टाळायची. पण मोदी आल्याने त्यांच्यावर वचक बसला. म्हणजे 67 वर्षाचा बुढ्ढा स्वतः प्रामाणिकपणे काम करतो. म्हणूनच इतरांच्या मनात वचक निर्माण होतो. मोदी देशाचा कारभार सांभाळून भाजपसाठी निवडणुकाही जिंकून देतात. तरीही 67 वर्षांचा बुढ्ढा थकत नाही. तो सतत कार्य करीत राहतो. विरोधक टीका करत राहतात आणि हा केवळ कार्य करीत राहतो. कधीतरी आपल्यावर झालेल्या टिकेचा समाचारही घेतो. पण त्याचेही अपचन विरोधकांना होते. जिग्नेश मेवाणी म्हणाला की ‘‘उनको घर बैठना चाहिये आणि हिमालय में जाकर हड्डियां गलाने चाहिये.’’ जिग्नेशला वाटतं की हा बुढ्ढा बोरींग आहे पण या बुढ्ढ्याचे अनेक समर्थक आहेत. या बुढ्ढ्याकडे पाहून लोकांना प्रेरणा मिळत आहे. सर्वसामान्य परिवारातून येऊन इतक्या मोठ्या पदाला पोहोचल्यामुळे हा बुढ्ढा धडपड्या तरुणांचा आदर्श आहे. जिग्नेशला देशाचं नेतृत्व करायचं आहे. पण देशाचं काय तर केवळ दलित समाजाचंही नेतृत्व करण्यास तो सक्षम नाही. पहिले कारण मोदी बुढ्ढ्याप्रमाणे त्याला देश जोडायचा नसून तोडायचा आहे. म्हणून तो जातीयवादी राजकारण करत आहे. पण मोदींनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही. दुसरे कारण बाबासाहेब आंबेडकरांसारख्या दिग्गज नेत्याने एक मोठा आदर्श निर्माण करुन ठेवला आहे. त्या आदर्श परंपरेत जिग्नेश कुठेच बसत नाही आणि मोदी सुद्धा उच्च घराण्यातून आलेले नाहीत. पण तरीही ते लोकनेता झाले. संयम, दूरदृष्टी या बळावर ते इथपर्यंत पोहोचले. अजूनही ते नम्र आहेत. राजकीय भाषणात विरोधकांना धोबीपछाड करावे लागतेच. पण तरीही ते सुसंस्कृत घराण्यातले वाटतात. हे हीराबेन मोदी यांचे संस्कार आहेत. मोदींचे जवळचे अनेक नातेवाईक राजकारणात नसून सर्वसाधारण आयुष्य जगत आहेत. हा आदर्श मोदींनी निर्माण केला आहे. कुटुंब कल्याणापेक्षा त्यांना लोककल्याण महत्वाचे वाटते. या वयातही त्यांचा आत्मविश्वास, त्यांची कृती तरुणांना लाजवणारी आहे. जिग्नेश आणि त्याच्या सारख्या काही मंडळींना मोदी हे बुढ्ढा वाटत असले तरी मोदी आपल्या कृतीद्वारे जणू दाखवून देत आहेत की बुढ्ढा होगा तेरा बाप...
जयेश मेस्त्री  
9967796254
साप्ताहिक 'चपराक' २५ डिसेंबर २०१७ 

No comments:

Post a Comment