Tuesday, April 12, 2016

आंबेडकरांच्या विचारविश्वातील स्त्री

1890 साली महात्मा फुले कालवश झाले. एक क्रांतिसूर्य मावळला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने एक ज्ञानसूर्य रूपाला आला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र बाबासाहेबांनी दलित समाजाला दिला आणि या विचाराने आचरण करणार्‍यांच्या जीवनात परिवर्तन घडून आले. बाबासाहेब म्हणत, ‘‘शिक्षण म्हणजे बहुजन समाज, दलित आणि स्त्रियांच्या मुक्तीलढ्याचे पहिले पाऊल आहे. समाजक्रांतीची तयारी म्हणजे शिक्षण. अन्यायाविरूद्ध लढण्यासाठीचे हत्यार म्हणजे शिक्षण,’’ अशी बाबासाहेबांची धारणा होती. 1848 साली महात्मा फुल्यांनी मुलींसाठीची पहिली शाळा काढली. शाळेसाठी शिक्षिका मिळत नव्हती, म्हणून त्यांनी सावित्रीबाईंना उभे केले. 1882 मध्ये हंटर आयोगापुढे म. फुल्यांचे जे भाषण झाले त्यात त्यांनी ‘‘स्त्रियांच्या प्राथमिक शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे’’ असा आग्रह धरला होता. ब्रिटिश राजवटीत इंग्रजी शिक्षण घेणार्‍या नवशिक्षित तरूणांचा एक वर्ग तयार होत होता. नवरे शिक्षित आणि बायका अशिक्षित अशी एकूण परिस्थिती निर्माण झाली होती. रविंद्रनाथ टागोरांनी ‘‘स्त्री शिक्षणाचा प्रसार केला नाही तर समाजात नवरा-बायकोमधला सुसंवाद नष्ट होऊन कुटुंबव्यवस्था धोक्यात येईल’’ असा इशारा दिला होता. अशा काळात स्त्रियांना शिक्षण द्यायचे ते कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी अशी समाजातल्या विचारवंतांची धारणा होती. स्त्रीशिक्षणाविषयी आंबेडकरांचा विचार वेगळा होता. मातृत्वाचा गौरव केला जात असताना या देशात स्त्रीत्वाची जी उपेक्षा होत होती ती थांबवली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. केवळ कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी शिक्षण नको, शिक्षणाच्या माध्यमातून आत्मप्रगटीकरणाचे युग सुरू झाले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. केवळ दलितांचा, दलित स्त्रियांचा विचार न करता भारतातील एकूण स्त्रीजीवनाचे उन्नयन हाच बाबासाहेबांचा ध्यास होता. शिक्षणाची गंगा दलित समाजापर्यंत पोहचू लागली होती. दलित स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत्या. अशा काळात बाबासाहेब एकूण स्त्रीजीवनाला उन्नत अवस्थेतपर्यंत नेण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत होते. स्त्रियांच्या शिक्षणासंदर्भातले बाबासाहेबांचे जे विचार आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते. ‘‘जोपर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले जाणार नाही आणि प्राथमिक शाळांतील प्रवेशाबाबत कडक उपाययोजना केली जाणार नाही; तोपर्यंत मागासवर्गीयांच्या शिक्षणात प्रगती होणार नाही. बहिष्कृत लोकांनी प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता उच्चशिक्षणाकडे लक्ष पुरवले पाहिजे. एखादी व्यक्ती बी. ए. झाल्याने समाजाचे जेवढे भले होईल तेवढे चौथी पास झाल्याने होणार नाही’’ असं बजावणार्‍या बाबासाहेबांनी दलित स्त्रियांना भावनिक आवाहन केले. ते म्हणत, 1) तुम्ही आमच्या आया-बहिणी आहात. आपल्या मुलांना शिक्षण द्या. 2) मुलगा किंवा भाऊ दारू पिऊन घरात आला तर त्याला घरात घेऊ नका. जेवण देऊ नका. 3) तुमच्या मुलींना शिक्षण द्या. 4) तुमची लुगडे नेसण्याची पद्धत, गळ्यात गळाभर गळसर्‍या आणि हातात हातभर कथलांचे किंवा चांदीचे दागिने घालण्याची पद्धत बंद करा. 5) दागिन्यांपेक्षा कपड्याला जास्त महत्त्व आहे. फाटके का असेनात, पण कपडे स्वच्छ असावेत. 6) आपल्या मुलांच्या मनातली हीनत्वाची भावना काढून टाका. 7) मुलांची लग्नं लवकर करण्याची घाई करू नका. लग्न ही जबाबदारी असते. 8) लग्नानंतर जास्त मुले निर्माण करणे हा सामाजिक अपराध आहे. 9) लग्न करणार्‍या प्रत्येक मुलीने नवर्‍याची दासी म्हणून नव्हे तर बरोबरीच्या नात्याने आणि मित्र म्हणून वागावे. 10) कोणतीही क्रांती प्रथम विचारात होते मगच ती आचारात येते. 11) अस्पृश्यता नष्ट व्हायची असेल तर ती अस्पृश्यांच्याच प्रयत्नाने नष्ट होईल. 12) अस्पृश्यता ही गुलामगिरी व धर्म कधीही एकत्र नांदू शकत नाही.
बाबासाहेबांनी व्यवस्थेविरोधातले सगळे लढे दिले. त्यात त्यांनी ‘स्त्रियांचा सहभाग असला पाहिजे’ असा आग्रह धरला होता. 1924 साली ‘बहिष्कृत हितकारणी सभा’ स्थापन झाली होती. ब्रिटिश सरकारसमोर गार्‍हाणी मांडण्यासाठीचे ते एक व्यासपीठ होते. बाबासाहेब त्याचे कार्यकारी अध्यक्ष होते. चिमणलाल सेटलवाड अध्यक्ष होते. मुंबई विधिमंडळाने एका ठरावाद्वारे तळी, विहिरी, पातळी या सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यासाठी अस्पृश्यांना मज्जाव करू नये असा कायदा केला होता. तशा सूचना संबंधित अधिकार्‍यांना पाठवल्या होत्या. सवर्णांची दादागिरी सरकारी आदेश मानायला तयार नव्हती. याविरूद्ध आवाज उठवण्यासाठी बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. या निमित्ताने दलित स्त्रियांना उद्देशून बाबासाहेबांनी भाषण केले, ते अंत:करण हेलावून टाकणारे आहे. ते म्हणाले, ‘‘तुम्हीच आम्हा पुरूषांना जन्म दिला आहे. आम्हाला जनावरापेक्षाही वाईट वागणूक मिळते आहे. इतर लोकांना कचेर्‍यात मानसन्मानाच्या जागा मिळतात. आम्हाला पोलिसात शिपायाच्या जागा मिळतात. इतकी आम्हाला हीन वागणूक मिळते. हे सारे ठाऊक असताना तुम्ही आम्हाला जन्म का दिलात? असा प्रश्‍न कुणी तुम्हाला विचारला तर काय उत्तर देणार आहात?’’ दलित स्त्रियांच्या मनात क्रांतीची ज्योत तेवत ठेवण्याचे काम प्रत्येक लढ्यात बाबासाहेबांनी केले.
‘‘चवदार तळ्याचे पाणी पिलो म्हणून आम्ही अमर होणार नाही. आमच्या स्पर्शाने पाण्याची वाफही होणार नाही. सामाजिक समतेच्या स्थापनेसाठी हे लढे आहेत’’ असे बाबासाहेबांनी स्पष्ट केले होते. अस्पृश्य संन्याशाच्या हस्ते त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. ‘‘असामान्यतेचे मूळ मनुस्मृतीत आहे. त्यात धर्माची धारणा नाही. असमानतेची धुळवड आहे’’ असं मानणार्‍या बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन सामाजिक उत्थानासाठी करत आहोत हे स्पष्ट केले. ‘न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति।’ असं सांगणार्‍या मनुस्मृतीने केवळ दलित स्त्रियांचा नव्हे एकूण स्त्री जीवनाचा उपमर्द केला आहे अशी त्यांची भावना होती. याही लढ्यात त्यांनी स्त्रियांना सहभागी करून घेतले होते.
चवदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. महाराष्ट्रात हजारो मंदिरे असताना राम मंदिराचीच निवड बाबासाहेबांनी का केली? असाही प्रश्‍न त्यांना विचारला गेला. त्यावर बाबासाहेबांचे उत्तर होते, ‘‘हिंदुंच्या हृदयातील ‘राम’ जागा व्हायला हवा. म्हणून राम मंदिराची निवड केली आहे.’’ बाबासाहेबांच्या या लढ्यात सवर्णांचाही त्यांना पाठिंबा होता. पुण्यात काकासाहेब गाडगीळ आणि केशवराव जेधे यांनी पर्वतीच्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. बाबासाहेब मुंबईत होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रबोधनकार ठाकरेंनी सभेचे आयोजन केले होते. रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सावरकरांनी पुढाकार घेतला होता. बाबासाहेब सांगत, ‘‘मंदिर प्रवेशामुळे मोक्ष मिळणार नाही. दु:ख, दारिद्र्य, अज्ञान, लाचारीही संपणार नाही. हिंदू म्हणूनच आम्हालाही मंदिरात प्रवेश करण्याचा हक्क आहे. हा लढा समतेसाठी आणि मानव्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी आहे.’’ या लढ्यात 125 पुरूष होते आणि 25 महिलांचा सहभाग होता. बाबासाहेबांनी समतेसाठी जेवढे लढे दिले त्या लढ्यात त्यांनी स्त्रियांना बरोबरीचे स्थान दिले, हे लक्षात येते.
1935 साली अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षपदावरून येवला येथे बाबासाहेबांनी जे भाषण केले. त्यात ते म्हणतात, ‘‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. हिंदू समाज ही एक मजलेदार इमारत आहे. या इमारतीत वरच्या मजल्यावरील माणूस कितीही श्रेष्ठ असला तरी तो कनिष्ठच गणला जातो. माणसांनी निर्माण केलेल्या माणसांच्या तुरूंगात मी स्वत:ही राहणार नाही आणि माझ्या दलित बांधवांनाही राहू देणार नाही. नव्या विचारांचा सुरूंग लावून हा तुरूंग आम्ही फोडून बाहेर पडू.’’ बाबासाहेबांनी धर्मांतराचा विचार केला तेव्हा देशातल्या कानाकोपर्‍यातल्या मोठ्या लोकांनी त्यांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांची भूमिका स्पष्ट होती. ते म्हणाले, ‘‘ज्या समाजव्यवस्थेत आणि धर्मरचनेत कोट्यवधी लोकांना त्यांचा दोष नसताना गुन्हेगारांपेक्षा वाईट वागणूक मिळते. तिचा त्याग करण्यात काहीही गैर नाही. हिंदू धर्मातील सुज्ञ लोकांनी दंभ आणि वेडेपणा यापासून आपल्या लोकांना परावृत्त करण्याचा किती प्रयत्न केला?’’ या त्यांच्या प्रश्‍नावर सारेच निरूत्तर झाले. 1956 साली पाच लाख दलित बांधवांसमवेत त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. या कामातही स्त्रियांना त्यांनी बरोबर घेतले होते. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी जगातल्या सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास केला होता. बौद्ध काळात शुद्र लोक मालमत्ता धारण करू शकत होते. वैदिक काळात ब्राह्ममणच भिख्खू बनू शकत होते. बुद्ध बिख्खू संघाची दारे सर्वांसाठी खुली होती. आंबेडकरांना हे महत्त्वाचे वाटले. त्यांच्या धर्माकडून काही अपेक्षा होत्या. ‘माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मशास्त्रात आहेत, राज्यशास्त्रात नाहीत असं ते म्हणत.’ त्यांना ‘धर्म हा आधुनिक विचाराशी सुसंगत असावा’ असे वाटत होते. तो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांनी मुक्त असावा. दारिद्र्याची महती गाणारा नसावा असे त्यांना वाटत होते. बुद्धांनी धर्माएवजी ‘धम्म’ हा शब्द वापरला. धर्म आत्मा, परमात्मा, मोक्ष या विचार करतो. धम्म अगम्य, अतर्क्य आणि अनाकलनीय अशा सर्व गोष्टी टाळतो. नीतिमत्ता आणि सदाचरण हा बुद्धांच्या विचारांचा पाया आहे. प्रज्ञा शील आणि करूणा यांना प्राधान्य देणारा बंधुत्व आणि मानवता यांचं गुणगाण करणारा बौद्ध धर्म म्हणूनच त्यांना प्रिय होता. बाबासाहेबांनी पाच लाख स्त्री-पुरूषांसह धर्मांतराचा विचार केला. त्यामागे एवढी वैचारिक पार्श्‍वभूमी होती. दलित पुरूषांचे दु:ख शब्दातीत आणि कल्पनातीत होते, पण दलित स्त्रियांचे जीवन म्हणजे दु:खभोगाची महागाथा होती. अशा परिस्थितीत आंबेडकरांसारखा विचारवंत दलित समाजाच्या उत्थानकार्यात ‘दलित स्त्री’ला केंद्रस्थानी ठेवून भूमिका घेतो. त्याचवेळी दलितेत्तर स्त्री तिचेही आयुष्य धर्मातील रूढी, परंपरांनी एका वेगळ्या टोकावर नेऊन उभे केले होते. तिच्याही उत्थानासाठी काय करता येईल याची रूपरेषा ते ठरवतात हे त्यांच्या कार्याचे वेगळेपण आहे.
‘स्वतंत्र मजूर पक्षा’ची स्थापना करून आंबेडकरांनी राजकारणाला प्रारंभ केला. ‘भारतातील श्रमिकांचा आणि दलितांचा पक्ष’ असं त्याला ते म्हणत. लोकाशाही मुल्यांची स्थापना, नागरी हक्क, कामगारांना किमान वेतन, भूमीहीन आभिर गरीब शेतकर्‍यांना जमिनीचे वाटप असे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या पक्षाने काम केले. 1929 साली मुंबईत कापडगिरणी कामगारांचा संप झाला. त्यात स्त्री-पुरूष कामगार होते. त्यानंतर स्थापन झालेली ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’सारखी संस्था असेल, ‘रिपब्लीकन पक्षा’ची स्थापना असेल अशाप्रकारे, समाजकारणाप्रमाणेच राजकारणातही बाबासाहेबांनी स्त्रियांना सहभागी करून घेतले.
इंग्लंडमधील स्त्रियांना मतदारांना हक्कासाठी लढा द्यावा लागला. बाबासाहेबांनी घटना समितीत बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे ही वेळ भारतीय महिलांवर आली नाही. हिंदू कोड बिलामुळे भारतीय स्त्रिया त्यांच्या कायम ऋणात राहतील. या जगात गांधीवाद आला, मार्क्सवाद आला, अनेक विचारप्रवाह आले; पण आंबेडकरवाद हा असा एकमेव वाद आहे, की ज्यातून मराठी साहित्याला समृद्ध करणारा दलित साहित्याचा प्रवाह आला. बाबासाहेबांच्या विचारामुळे या समाजाला लिहिण्याचे बळ मिळाले. त्यांनी पिढ्यान्पिढ्या भोगलेल्या यातनांची आणि दु:खाची विदारकता एवढी प्रचंड होती की, त्यांना लिहिण्यासाठी कोणतेही प्रतिभासाधन करावे लागले नाही. केवळ हुंकाराला शब्दरूप मिळाले आणि त्यातून अजरामर साहित्यकृती निर्माण झाल्या. वेदना, विद्रोह आणि नकारातून जन्माला आलेल्या या साहित्यकृतींनी केवळ साहित्याला समृद्ध केले नाही तर समाजाला नवे भान दिले. या साहित्य प्रवासात दलित स्त्रियांनी कवयित्री, लेखिका म्हणून दिलेले योगदान खूप मोलाचे आहे. ही समतेची पताका मिरवणारी साहित्यमंदिरे आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी आहेत. दलित स्त्रियांचे जीवन आज प्रगतीच्या ज्या टप्प्यावर उभे आहे, त्यामागे आंबेडकरांची दूरदृष्टी आणि विचारसृष्टी आहे याचे भान समाजाने ठेवले पाहिजे.          
          - प्रा. मिलिंद जोशी 

कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद 
९८५०२७०८२३ 
(पूर्वप्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक' पुणे )


Thursday, April 7, 2016

मी मृत्युंजय... मी संभाजी

(पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक 'चपराक', पुणे

आत्ता थोड्या वेळापूर्वीच संजय सोनवणी यांची छ. संभाजीराजांच्या अखेरच्या दिवसांवर आधारित 'मी मृत्युंजय... मी संभाजी' ही कादंबरी वाचली. शिवपुत्र संभाजीच्या जीवनावर तशा कित्येक कादंबरीकारांनी कादंबर्‍या रचल्या आहेत परंतु त्या सर्वांत जनमानसावर अधिराज्य गाजवलं ते शिवाजी सावंत यांच्या 'छावा'ने! सावंतांनी ज्या काळात संभाजीवर कादंबरी लिहिली त्या काळात जनमानसात संभाजीची वेगळीच प्रतिमा होती. महापराक्रमी बापाने महत्प्रयासाने कमावलेलं राज्य विध्वंसणारा व्यसनी, बदफैली संभाजी असं जे मराठी बखरकारांनी संभाजीचं चित्र लोकांसमोर पेश केलं होतं त्याला प्रथम सावंतांनी तडा दिला. त्यानंतर कित्येकांनी ही वाट चोखाळली परंतु त्यापैकी कोणालाच सावंतांच्या ‘छावा’ची सर आली नाही.
या पार्श्वभूमीवर सोनवणी यांनी संभाजीवर आधारित कादंबरी लेखनाचा प्रयत्न केला आहे परंतु सावंत आणि सोनवणी यांच्यातील मुलभूत फरक असा की, सावंतांनी संभाजीचे संपूर्ण जीवन कादंबरीद्वारे उलगडण्याचा प्रयत्न केला तर सोनवणींनी फक्त संभाजीचे अखेरचे दिवस आपल्या लेखनाकरता निवडले.
एक राजा, एक छत्रपती क्षणात शत्रूसैन्याच्या हाती लागतो. तिथून त्याची फरफट होत जाते. कैदेत असताना क्षणाक्षणाला त्याला प्रतीक्षा असते, शत्रूच्या तावडीतून आपणास सोडवण्याकरता येणार्‍या इमानी, निष्ठावंत सैनिकांची, सरदारांची. परंतु त्याची ही आशा उलटणार्‍या क्षणांबरोबर हळूहळू मावळू लागते. असहाय्य, एकाकी परिस्थितीत संकटाने ग्रासलेल्या मनुष्याच्या भावविश्वाचा शोध घेण्याचा सोनवणींनी प्रयत्न केलाय. यापूर्वी ना. सं. इनामदारांनी छ. शिवाजी महाराजांवरील आधारित ‘राजेश्री’ कादंबरीत छत्रपतींमधील व्यक्तीच्या भावजीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही कादंबर्‍या तसेच कादंबरीकारांची तुलना केव्हाही अनाठायी असली तरी तुलनात्मकदृष्ट्या पाहिले असता इतिहासाला दंतकथा, आख्यायिकांद्वारे जे विकृत वळण लागते, ते टाळण्याच्या बाबतीत सोनवणी यशस्वी झाले आहेत. इनामदारांची भूमिका नेहमीच कादंबरीकाराची राहिल्याने अनेकदा त्यांनी दंतकथा, आख्यायिकांचा मुक्तहस्ते वापर केला आहे. परंतु संधी असूनही सोनवणींनी हा मोह टाळून शक्य तितका इतिहासाशी प्रामाणिक राहण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे!
या कादंबरीतील मुख्य पात्र संभाजी जरी असलं तरी कथानक पुढे नेण्याकरता मुकर्रबखान, औरंगजेब, रहुल्लाखान प्रत्यक्षरित्या पुढे येतात तर कवी कलश हा अप्रत्यक्षपणे वावरत असतो. फक्त एकाच क्षणी तो दृश्यमान होतो व ते देखील धिंड निघतेसमयी!
औरंगजेबाच्या दरबारात कलशासह संभाजीला हजर केले जाते व संभाजी तिथे बादशाहला उद्देशून दुरुत्तरे करतो अशा आशयची वर्णने ऐतिहासिक कागदपत्रात तसेच अनेक ऐतिहासिक कथा-कादंबर्‍यात वाचायला मिळतात परंतु त्यामागील राजकीय पार्श्वभूमी फक्त याच कादंबरीत वाचायला मिळते.
औरंगजेब संभाजीसोबत या तर्‍हेने का वागला, संभाजी-कलशाने त्याचा उपहास का केला याची सकारण कारणमीमांसा संभाजीच्या स्वतःशीच चाललेल्या संवादातून व दरबारातील प्रसंगातून केली जाते. माझ्या मते, इतिहासाचे संदर्भ ग्रंथ वाचनाचा कंटाळा करणार्‍या व कादंबरीत इतिहास शोधणार्‍या वाचकांसाठी ही कादंबरी उपयुक्त ठरेल; परंतु छ. संभाजीराजांच्या अखेरच्या दिवसांतील जीवनावर प्रकाश टाकणं हाच या कादंबरीचा प्रधान हेतू आहे का? याचे उत्तर निर्विवादपणे होकारार्थी वा नकारार्थी देता येत नाही.
कधी कधी स्वतःलाच पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा वा जीवनात अनुभवलेल्या प्रसंगांना एखाद्या मिथकाच्या वा ऐतिहासिक घटना/व्यक्तिरेखेच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये इतिहास व जीवनातील अनुभव यांची यथायोग्य सांगड घातली गेली तरच त्यातून उत्तम कलाकृती सादर होते. याचे सर्वांच्या परिचयाचे उदाहरण म्हणजे इयान फ्लेमिंगचा ’जेम्स बॉंड’.
जेम्स बॉंड नावाचं मिथक फ्लेमिंगने जन्माला घालत आपल्या अनुभवांची त्यास जोड देऊन ते पात्र इतकं जिवंत केलं की, या नावाचा ब्रिटिश गुप्तहेर अस्तित्वात असलाच पाहिजे यावर लोकांची श्रद्धा बसली. इथं सोनवणींच्या समोर ऐतिहासिक पुरुष संभाजी आहे. ज्याने नऊ वर्षं सत्ता उपभोगलीय. ज्याकरता त्याला आप्तांचा, स्वकीयांचा, शत्रूंचा सतत सामना करावा लागला. जन्माप्रमाणे मृत्यू अटळ आहे परंतु सदोदित मरणाच्या छायेत असूनही मृत्युला न जुमानता निधड्या छातीने तोंड देणार्‍या संभाजीची अखेर नेमकी कशी झाली असेल?
हा प्रश्न गेली अनेक वर्ष, दशकं, शतकं तमाम महाराष्ट्रीयन माणसांच्या मनात एकदा तरी डोकावला असेल. संभाजी धीरोदात्तपणे मृत्युला सामोरा गेला हे ऐतिहासिक सत्य आहे परंतु त्याचा हा मृत्युपर्यंतचा प्रवास व तत्पूर्वी कैदेतील उलाघाल टिपण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. यामध्ये अर्थातच शिवाजी सावंतांचे नाव येणे क्रमप्राप्त आहे परंतु सावंतांच्या तुलनेने सोनवणी याबाबतीत कमालीचे यशस्वी ठरले आहेत. याला प्रामुख्याने कारणीभूत त्यांची विशिष्ट लेखनशैली असली तरी काळाची निवड, पात्रांची अतिमर्यादित संख्या हे दुय्यम घटकदेखील तितकेच सहाय्यक ठरतात.
सबंध कादंबरीत संभाजी कलशासोबत बोलत आहे. परंतु त्याची खरोखर कलशासोबत चर्चा सुरु आहे का? याचे उत्तर ठामपणे नकारार्थी वा होकारार्थी देता येत नाही. कलश हे एक निमित्त आहे. त्याच्या माध्यमातून स्वतःच्या मनात उद्भवणार्‍या नाना शंकांना, प्रश्नांना तोंड फोडण्याचे काम संभाजी करतो. संभाजीचा हा संवाद लांबलचक, अखंड असला तरी तो कुठेही कंटाळवाणा होत नाही. कारण त्यात जसा इतिहास व तत्कालीन राजकारणाचा संदर्भ आहे त्याचप्रमाणे मानवी आशे-निराशेचे गडद प्रतिबिंबही आहे.
शत्रूने कैद केलेल्या संभाजीला हरघडी असं वाटतं की, आता माझी माणसं येतील व मला सोडवतील. संकटातून मुक्त होण्यासाठी त्याच्या मनाची होणारी अधीरता त्यातून ध्वनित होते व त्या अधीरतेसोबत वाचकालाही उत्कंठा लागून राहते की, कोणत्याही क्षणी ’हर हर महादेव’चा जयघोष होऊन संभाजीचे निष्ठावंत सैनिक त्याच्या सुटकेसाठी जीवावर उदार होऊन शत्रूवर हल्ला करतील. बादशाही छावणीत जाईपर्यंत हा आशे-निराशेचा खेळ चालत राहतो. या खेळात इतिहासातील संभाजी व वास्तव जीवनात प्रत्येक व्यक्तित असलेला संभाजी यांची बेमालूमपणे सांगड घालण्यात सोनवणी यशस्वी झाले आहेत.
ज्यावेळी मनुष्य संकटांनी ग्रासतो व त्याचे आप्तही त्याला वार्‍यावर सोडून देतात, त्यावेळी त्याच्या मनाची होणारी उलघाल कोणी अनुभवली नाही? परंतु आपल्या प्रमाणेच अशीच किंबहुना याहून मोठी, भयंकर अशी परिस्थिती संभाजी भोसले नामक तरुणावर ओढवली होती. त्यावेळी त्याने त्या स्थितीला कशा प्रकारे तोंड दिले हे शब्दबद्ध करत असताना वाचकाच्या मनावर निराशेचे सावट पडू न देण्याचीही सोनवणी खबरदारी घेतात. संभाजीचा मृत्यू अटळ आहे. त्याची वेदना, त्याचे हाल अटळ आहेत परंतु त्याचा स्वीकार करत असताना त्याची लढाऊ वृत्ती दाखवताना सोनवणी वाचकाच्याही मनातली जिद्द, लढाऊ वृत्ती कुठेतरी जागृत करतात. हेच माझ्या मते त्यांचे तसेच या कादंबरीचे मोठे यश आहे.
आजवर संभाजीच्या अखेरीवर जितक्या कादंबर्‍या वाचल्या त्यात कुठेही असा अनुभव आला नाही. आली फक्त ती बेचैनी, उदासीनता, निराशा. या पार्श्वभूमीवर सोनवणींचे यश नाकारता येत नाही.
कलाकृती, मग ती ऐतिहासिक असो वा सामाजिक. ती शोकात्मक वा सुखात्मक बनवण्याचे स्वातंत्र्य लेखकाकडे असते. परंतु एका शोकांतिकेला सकारात्मक पद्धतीने देखील वाचकांसमोर मांडता येऊ शकते हा चमत्कार मी तरी प्रथमच पाहिला आहे.

 - मी मृत्युंजय मी संभाजी 
लेखक : संजय सोनवणी 
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन, पुणे (९८९०९५६६९५)
पाने : १२५, किंमत : १४०
- संजय क्षीरसागर
९९८७१३८२२४ 

(पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक 'चपराक', पुणे)

Wednesday, April 6, 2016

महाजन काका

(पूर्व प्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक', पुणे)

डॉक्टरांच्या कन्सलटंसी रुमच्या लॉबीमध्ये मी पाऊल ठेवले तेव्हा तिथे प्रचंड गर्दी होती. बरेच नंबर माझ्या आधीच लागले होते. सर्व लॉबी पेशंटनी भरली होती. डॉक्टरांची ख्यातीही तशीच होती. त्यांच्या हाताला चांगला गुण येत असे म्हणूनच तिथे प्रचंड गर्दी होई. डॉक्टरही पेशंटला खूप वेळ देत. त्यांचं सगळं ऐकून घेत आणि मगच उपचार सुचवीत. म्हणूनच त्यांचं आणि पेशंटचं एक नातं निर्माण होई. त्यात विश्‍वास निर्माण होई. आणि निम्मा आजार त्यामुळेच दूर होई. गेली अनेक वर्षे प्रॅक्टीस करुन डॉक्टरांनी नाव कमावलं होतं.
माझा नंबर लागायला अजून एखादा तास लागेल याची मला खात्री पटली होती. मी रिसेप्शनीस्टकडे गेलो. माझी फाईल दाखवली आणि मी अपॉंईंटमेंटसाठी फोन केला होता म्हणून तिला सांगितले. तिने माझे नाव रजिस्टरमध्ये असल्याची खात्री केली. मला वजन करायला लावलं. सर्व नोंदी फाईलमध्ये करुन ती माझ्याकडे देत ती म्हणाली, ‘बाजूला महाजन काका बसलेत त्यांना ती दाखवा...’ मी बाजूला पाहिले. साठ-पासष्टचे महाजन काका खुर्चीत बसले होते. बारिक अंगकाठी, गहू वर्ण आणि चेहर्‍यापेक्षा चष्मा मोठा. काकांसमोर एक स्टुल होतं आणि त्यावर एक वही होती. मी त्यांच्याकडे वळलो. ‘फाईल द्याल का मला ती?’ ते अदबीने म्हणाले. अंगकाठीपेक्षा त्यांचा आवाज मोठा वाटला मला. ‘तुम्ही काय करणार आहात माझ्या फाईलचं?’ मी त्यांना उलट प्रश्‍न केला.
‘मी काहीच करणार नाही साहेब. थोडी नजर टाकणार आणि तुम्हाला परत करणार, परंतु काही नोंदी मला ठेवायच्या आहेत. तुम्हाला वाटलं तरच द्या. माझी सक्ती नाही’ महाजन काका विश्‍वासानं म्हणाले.
मी रिशेप्शनीस्टकडे कटाक्ष टाकला. तिनं द्या म्हणून खूण केली. मग मी काकांकडे फाईल सरकवली. त्यांनी फाईल उघडून माझं नाव मोठ्यानं उच्चारत त्यांच्या वहीत लिहून घेतलं. ‘मोबाईल नंबर द्याल का प्लीज!’ ते मला म्हणाले. कशाला पाहिजे यांना हे सगळं, अशा नजरेनं मी त्यांना माझा मोबाईल नंबर सांगितला. त्यांनी तो लिहून घेतला.
‘काय होतंय तुम्हाला?’ त्यांनी मला विचारलं. मी प्रश्‍नार्थक चेहरा केला. ‘अहो.. तुम्हाला वाटलं तर सांगा. माझी सक्ती नाही’ काकांनी मला कोड्यात टाकलं.
‘मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. कमी होत नाही. म्हणून डॉक्टरांकडे आलो’ असं सांगितलं तर ते हसले.
‘इथं येणार्‍या नव्याण्णव टक्के लोकांना बीपीचा त्रास आहे. काही काळजी करु नका. डॉक्टर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील. बसा तुम्ही’ हसतमुखानं त्यांनी मला बसण्याची खूण केली. मी एका जागेवर बसून घेतलं. अनेक पेशंट रांगेत होते. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या व्याधीनं त्रस्त होता. त्यापेक्षाही हा काय आजार आपल्याला जडलाय या काळजीत प्रत्येक चेहरे दिसत होते. प्रत्येक पेशंटबरोबर किमान एखादा तरी सोबती होता. वयोवृध्द असेल तर दोघं दोघं सोबतीला होते. प्रत्येकाला आपला नंबर लवकर यावा असं वाटत होतं. परंतु डॉक्टर एकेकाला किमान वीस एक मिनीटं देत होते. आत जाणारा धास्तावून जात असे तर बाहेर येणारा हसतमुखपणे येत असे. हीच डॉक्टरांची ख्याती होती. 
मी विचार करत होतो. विधात्यानं प्रत्येकाला सुंदर आयुष्य दिलंय पण काळजी, चिंता, व्याधी याचही वरदान दिलंय. हो वरदानच! त्यामुळंच मनुष्य मार्गावर राहतो. आयुष्यभर अशा काळज्यांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत राहतो. प्रत्येकाला या दिव्यातून जावंच लागतं. छान छान डे्र्रसच्या दुकानात गेल्यावर नाही का सेल्समन सांगतो, ‘ऐसा दुसरा डेस नही मिलेगा. सब पॅटर्न अलग है...’ त्याप्रमाणेच प्रत्येक मनुष्य एक वेगळा पॅटर्न. कोणी दुसर्‍यासारखं नाही. एकाच घरात वडील,भाऊ, बहिणी, आई, काका, मामा, वहिन्या सगळे वेगवेगळे. प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं, काळज्या वेगवेगळ्या तसे आजारही वेगवेगळे. त्यामुळे डॉक्टरांकडे येणारे पेशंट वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे.
काही वेळातच माझा नंबर आला. मी डॉक्टरांच्या रुममध्ये प्रवेश केला तसे त्यांनी हसून विचारल. ‘कशाला आलात..?’ मी हसलो. ‘तुम्हाला पहावंसं वाटलं म्हणून आलो’ तर तेही हसले.
‘यमाला पहायला कोणी येत नाही हो..’ येवढं बोलून ते पुन्हा सात मजली हसले. माझी आणि डॉक्टरांची बर्‍यापैकी ओळख होती. ‘चला तपासुया’ म्हणाले आणि हसतच ते उठले. मी बाजूच्या बेडवर पडुन राहीलो. सगळं सांगितलं. डॉक्टरांनी सर्व ऐकून घेतलं आणि मला पाचएक मिनीटं तपासल्यावर जागेवर जावून बसले. मी उठून त्यांच्या पुढे जावून बसलो. ‘काही काळजी करु नका. ब्लड टेस्ट लिहून देतोय. तेवढ्या करुन रिपोर्ट दाखवा मग पाहु’ ते म्हणाले.
‘पण डॉक्टर औषध वगैरे काही सुरु करताय का?’ मी म्हणालो. ‘का हौस आहे की काय तुम्हाला? काही काळजी करु नका; काही गंभीर नाहीये. रिपोर्ट येवू देत मग पाहू’ ते विश्‍वासानं म्हणाले.
‘ठीक आहे’ म्हणून मी बाहेर पडलो. रिसेप्शनीस्टकडे जावून तिच्याकडे फाईल दिली. पैशाची देवाणघेवाण झाली. तेवढ्यात महाजनकाकांचा आवाज आला, ‘या इकडे, काय म्हणाले डॉक्टर?’
‘काही नाही हो..’ म्हणून मी चालु लागलो. मला त्यांच्या आगाऊपणाचा थोडासा रागच आला होता. तसे ते हसतच म्हणाले ‘सांगेन काही गोष्टी युक्तीच्या’ हे ऐकून मी थबकलो. सरळ फाईल त्यांच्या हातात ठेवली. ‘हं... ब्लड टेस्ट करायला सांगितलंय. लगेचच उद्या करुन घ्या. वेळ घालवू नका’ ते फाईल घेऊन म्हणाले.
मी ‘ठीक आहे’ म्हणालो आणि फाईल घेऊन बाहेर पडलो. पण मनात उगाचच महाजन काकांचे विचार घोळत राहीले. उशीर झाला होता, परंतु ऑफिसमध्ये सांगितलं होतं त्यामुळे ऑफिसमध्ये पोहोचलो आणि कामामध्ये गढून गेलो. सायंकाळी सहाच्या दरम्यान मोबाईलवर अन्नोन फोन आला. मी तो घेतला तर समोरुन महाजनकाका बोलत होते. ‘अहो उद्या ब्लड टेस्ट करायला सांगितलंय ना डॉक्टरांनी. आठवण करायला फोन केला होता..’
‘कोण बोलतय?’ मी म्हणालो.
‘अहो विसरलात काय? महाजन काका बोलतोय. उद्या टेस्ट करुन घ्या बरं. त्यासाठी रात्रीचं जेवण लवकर घ्या आणि लकवर झोपा. सकाळी आठ वाजता लॅब उघडतात. अनोशापोटी जा. पटकन होईल’
‘होय होय.. माहिती आहे मला’ मी जरा त्राग्यानंच म्हणालो.
‘अहो तसं नव्हे. एकदा टेस्ट झाल्या की टेन्शन जाईल, फक्त आठवण केली. ठेवतो फोन’ असं म्हणून काकांनी फोन बंद केला.
कोण हे महाजन काका? हे का एवढा मला फोन करतायत? च्यायला कटकट आहे. काय माणसं पण असतात. आता ह्या म्हातार्‍याला काय पडलीय एवढा फोन करायची? माझ्या मनात विचार येत होते आणि मी त्यांच्यावर जरा चिडलोच होतो. रात्री झोप लागली. सकाळी जाग आली तीच मुळी महाजन काकांच्या फोनने ‘गुड मॉर्निंग.. महाजन काका बोलतोय.. टेस्ट करायला बाहेर पडताय ना? काही मदत हवी का म्हणून फोन केला. अनोशापोटी निघा आणि दुपारी जेवण झाल्यावर दोन तासांनी पुन्हा टेस्ट करायच्या आहेत हे लक्षात ठेवा’ ते बोलत होते.
‘होय हो काका मला माहिती आहे. मी करुन घेतोय टेस्ट’ असं म्हणून काहीशा रागानेच मी फोन बंद केला. माझ्या रितसर सर्व ब्लड टेस्ट झाल्या. महाजन काकांनी लवकर जायला सांगितलं म्हणून बरं झालं. आठ साडेआठ पर्यंत सकाळच्या टेस्ट झाल्या आणि 12च्या आत दुपारच्या टेस्ट होवून मी ऑफिसलाही गेलो. दुसर्‍या दिवशी रिपोर्ट घेउन डॉक्टरांकडे गेलो तर तिथे महाजन काका कुणाशीतरी उभं राहून बोलत होते. मी नमस्कार केला आणि रिशेप्शनिस्टला सांगून बसून राहीलो. काका काहीतरी गंभीरपणे बोलत होते. ‘काही काळजी करु नका. डॉक्टरांनी सांगितलंय ना ऍडमीट व्हायला तर व्हा! ते सगळी काळजी घेतील’ ते सांगत होते.
‘अहो पण आज्जींना इथवर आणणार कसं? ऍम्बुलन्स, स्ट्रेचर सगळ हवं ना?’ पेशंटचे नातेवाईक काळजीनं बोलत होते.
‘अहो.. मी करतो व्यवस्था. पैसेही जास्त द्यावे लागणार नाहीत. आपली मुलं त्यांना स्ट्रेचरवरुन वरती घेवून येतील. आता तुम्ही जास्त वेळ घालवू नका. पहिल्यांदा ऍडमीट करा पाहू आणि फाईल माझ्याकडे द्या, मी सर्व तयार ठेवतो’ काकांनी त्यांना धीर दिला आणि ऍम्बुलन्सला फोन लावला.
‘बरोबर मुलं घेवून जा रे. पेशंटला ऍडमीट करायचंय. ओल्ड एज आहे. त्यांना त्रास नाही व्हायला पाहीजे’ काका फोनवरुन समोरच्याला सूचना देत होते आणि हाताने पेशंटच्या नातेवाईकांना लवकर निघायला सांगत होते. ते निघून गेल्यावर काका माझ्याकडे वळले. ‘आणले का रिपोर्टस? डॉक्टरांना दाखवा. मग बघु’ असं मला म्हणून ते त्यांच्या जागेवर जावून बसले. मी महाजन काकांचे बारीकपणे निरिक्षण करीत होतो. हे सर्व ते का करतायत ते मला उमगत नव्हतं. यथावकाश माझा नंबर येताच मी डॉक्टरांना भेटायला गेलो. माझं कोलेस्टॉल बॉर्डरवर होतं. बाकी रिपोर्टस बरे होते. काही जुजबी सूचना देउन, खाण्याची पथ्य सांगून आणि पुन्हा तीन महिन्यांनी परत रिपोर्टस करण्याची सूचना देऊन डॉक्टरांनी मला जायला सांगितलं. यावेळी मात्र मी बाहेर येवून सरळ महाजन काकांच्या हातात ठेवली. त्यावर काका हसले. फाईलवर नजर टाकून म्हणाले, ‘अजून तीन महिन्यानी पुन्हा टेस्ट करायला सांगितल्या आहेत. होय ना? काही काळजी करु नका. मी आहेच आठवण करुन द्यायला’ ते म्हणाले आणि जोरात हसले. ‘थोडा व्यायाम करा. सगळं कंट्रोलमध्ये राहील’ असा मोलाचा सल्लाही द्यायला ते विसरले नाहीत.
महाजन काकांबद्दलचं माझ्या मनातलं गुढ वाढत होतं. ते येणार्‍या प्रत्येक पेशंटशी फार जवळीकीने बोलत होते. बरेच पेशंट आणि त्यांचे नातेवाईक काकांशी स्वत: येवून बोलत होते. त्यांचा सल्ला घेत होते. काका त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्या वहीत काहीतरी लिहून घेत होते. त्यांचे फोन नंबर आठवणीने पुढे लिहीत होते. काही तरुण पेशंट नमस्कार करुन जात तर काही आदराने त्यांच्यापुढे वाकत होते. काका हे काय आणि कशासाठी करतायत हेच मला उमगत नव्हतं. त्यामुळे त्यांबद्दल उत्सुकता आणि गुढ दोन्हीही वाढत होतं. आताशा त्यांच्याबरोबर ओळखही वाढली होती.
अशाच एका सकाळी मी ऑफिसला जाताना अचानक मला काका दिसले. मी धावतच त्यांना गाठलं. ‘काका नमस्कार. काका, मी यापुढे सांगतोय त्याला नाही म्हणू नका प्लीज’ मी म्हणालो. त्यांच्या चेहर्‍यावर उत्सुकता दिसली. ‘चला चहा घेवूया’ असे म्हणत बळेच त्यांना हॉटेलमध्ये घेवून गेलो. ‘अहो तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होईल आणि मी चहा घेत नाही’ म्हणून ते आढेवेढे घेवू लागले.
‘असुदेत मला नाही उशीर होत आणि तुम्ही माझ्यासमोर फक्त बसा, मी चहा घेतो’ असं मी म्हणालो तरी ते आढेवेढे घेत होते. मग मात्र मी बळेच त्यांना घेवून गेलो. मला आज त्यांच्याशी बोलायचं होतंच. हॉटेल हे केवळ निमित्त होतं.
‘काका तुम्ही हे सगळं का करताय?’ मी सरळ विषयालाच सुरुवात केली.
‘हे म्हणजे?’ असं म्हणून ते मिश्कीलपणे हसले आणि माझ्या बोलण्यातला रोख ओळखून बोलू लागले. ‘मी काही महात्मा किंवा परमात्मा नाही. अगदी सामान्य आणि सरळ आयुष्य गेलं माझं. नोकरी केली. व्यवस्थित प्लॅनिंग करुन संसार केला. पैसा सांभाळून ठेवला. मुलांच शिक्षण पूर्ण केलं. दोघांनाही पायावर उभं कलं. मुलीला चांगलं स्थळ बघुन तीचं लग्न करुन दिलं. दोघे सुखी आहेत. त्यातच आपलं सुख आहे. पण मित्रा, मनात सल एकच राहीली की हे सामान्यांसारखं सुखी आयुष्य जगलो पण ज्या समाजात मोठा झालो त्यांच्यासाठी आपण काय दिलं? निवृत्त झाल्यावर सामान्यासारखं व्याधीला कुरवाळत, मरणाची वाट पाहत आयुष्य मला नको होतं. मग मला घरात टीव्ही पाहत आडवा असलेला म्हातारा कधी जातोय याची वाट पाहणारी तोंड दिसू लागली. डोक्यात आयडीया आली. डॉक्टरांना भेटलो आणि रिसेप्शनीस्टच्या बाजूला एक खुर्ची टाकून बसु लागलो. काय करतो मी? फक्त येणार्‍या पेशंटशी बोलतो, त्यांना जगण्याची उम्मिद देतो. एका वहीत त्यांच्या टेस्ट, ट्रिटमेंट बद्दल नोंद करतो आणि त्यांना एक फोन करुन फक्त आठवण करुन देतो. मध्येच एखादा फोन करुन त्यांची चौकशी करतो. कुणाकडे काही अडचण असल्यास त्याला जमेल तशी मदत करतो. ऍडमीट असलेल्या पेशंटच्या जवळ नातेवाईक नसतील तर त्यांच्या जवळ बसुन त्यांची जमेल तशी सेवा करतो. ऐकण्याच्या मन:स्थितीत असेल तर पेशंटला पुस्तक वगैरे वाचुन दाखवतो. मस्त जातो हो माझा वेळ यात. चलनवलन राहतं. डोक्यात नको ते विचार घुसतच नाहीत. घरातल्यांना आपली अडचण नाही वर चांगलं काम केल्याच समाधान मिळतं. छान झोप लागते. सकाळी फे्रश...’
त्यांनी एक मोठ्ठा सुस्कारा टाकला. मी गुंग होवून ऐकत होतो. महाजन काका उत्साहानं बोलत होते. माझ्या मनात विचार आला, ‘खरंच बाबा आमटेंसारखं आनंदवन सगळ्यांनाच उभं नाही करता येत. काही असतात असे वेडे. एखाद्याच्या आयुष्यात आनंदाचं वन फुलवण्याचा प्रयत्न करणारे. महाजन काकांसारखे!
‘चला साहेब, चहा घ्या लवकर. थंड होत चाललाय तो’
महाजन काकांच्या बोलण्याने मी भानावर आलो. त्यांची प्रसन्न मुद्रा कितीतरी वेळ माझ्या डोळ्यासमोर तरळत राहिली.

(पूर्व प्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक', पुणे)
आनंद वेदपाठक 

मुलुंड (पू), मुंबई संपर्क: 98692 52119

Monday, April 4, 2016

‘सांगायलाच हवे होते असे काही’

माणसाचे आयुष्य म्हणजे काय? आशा-आकांक्षा आणि स्वप्नांचे अमर्याद विस्तारलेले पंख की परिस्थितीच्या मर्यादेने बंदिस्त केलेला पिंजरा? मोकळा श्‍वास अन् घुसमट याच्या काठावर करावी लागणारी कसरत म्हणजेच आयुष्य असते का?
भगवान निळे यांची कविता वाचून हे आणि असेच अस्वस्थ करणारे प्रश्‍न आपला पाठलाग करत राहतात. अस्सल आयुष्याचा एक विशाल पट भगवान निळे यांची कविता मांडते. निळे यांनी त्यांच्या कवितांना आत्मचरित्राची उपमा दिली आहे. कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक कवीची कविता हा त्या-त्या कवीच्या मनाच्या तळातून आलेला उद्गार. त्या अर्थाने तो कवीच्या जीवनाचा प्रवास! पण निळे यांची कविता ‘आत्मचरित्र’ या शब्दातून प्रतित होणार्‍या अर्थाच्या पलीकडे जाणारी आहे. याचे कारण कवी स्वतःबद्दल लिहितोय,
स्वानुभव कवितेच्या रूपातून सांगतोय, मात्र या स्वानुभवातील सुख-दुःख सार्वत्रिक आहेत. म्हणूनच ही कविता एकट्याची असूनही एकट्याची नाही. अनेकांना तो स्वतःच्या आयुष्याचा स्पष्ट उद्गार आहे, याचीच खूणगाठ पटेल.
‘सांगायलाच हवंय, असं नाही...’ हे भगवान निळे यांच्या काव्यसंग्रहाचे शीर्षक. निळे यांच्या वाट्याला जे अनुभव आले, ऊन-सावलीचा जो खेळ आला, तसाच अनुभव आणि तोच खेळ हजारो व्यक्तींच्या जीवनात येतो. सांगायलाच हवंय, असं नाही.... हीच त्यांची भावना असते. ते मूक राहतात. त्यांच्या भावना, त्यांचा कोंडमारा जणू प्रातिनिधिक रूपात निळे यांनी कवितेतून मांडला आहे.
मराठी काव्यक्षेत्रात निळे यांच्या कवितांना स्वतंत्र स्थान आहे. त्यांच्या असंख्य कविता विविध मासिकातून, नियतकालिकांतून काव्यरसिकांच्या भेटीला वेळोवेळी आल्या; पण या कविता एकत्रित वाचण्याचा योग आला नव्हता. एका प्रसिद्ध कवीचा पहिला काव्यसंग्रह हे सुद्धा ‘सांगायलाच हवंय, असं नाही...’चे वैशिष्ट्य!
या कविता आत्मकथा आहेत, असे भगवान निळे म्हणतात खरे, मात्र आपण आजच्या व्यामिश्र समाजातील गुंतागुंतीच्या जगण्याचे प्रतिक आणि प्रतिनिधीही आहोत, याचे पुरेपूर भान त्यांना आहे. ‘मी म्हणजे, तुम्हीही!’ ही या काव्यसंग्रहातील पहिलीच कविता याची साक्ष देईल.
मी आहे दरवाजा
आपल्या देशाला जाणून घेण्याचा
माझीच सावली पडली आहे
देशावर सर्वदूर....

हे सामान्य माणसाच्या जीवनाचे सत्य. ते सत्य निळे यांची कविता कोणत्याही आविर्भावाशिवाय सहज सांगून जाते.
पालखीचे भोई बनवून
मला केले गुलामकरी
माझ्याभोवती रूढीचे
‘रिंगण’ आखून...

या त्यांच्या शब्दांमध्ये अगतिकता नाही अथवा तक्रारीचा सूर नाही, कटूता देखील नाही. आखून दिलेल्या रिंगणात जीवनाचा खेळ खेळायचा आहे, याचे पूर्ण भान त्यांना आहे. यशापयाच्या निकषांवर भलेही आयुष्याचे मूल्यमापन कसेही होवो, कवितेचे शब्दभांडार आपली पूंजी आहे, याची जाणीव त्यांना आहे.
निळे यांची व्यापक जीवनदृष्टी आणि सखोल जाणीव त्यांच्या कवितेतून पदोपदी दिसते. मग तत्त्वज्ञानाची भूमिका नसतानासुद्धा ही कविता आपसूक तत्त्वज्ञानाकडे झुकते. त्यांचे शब्द चिरंतन सत्य विलक्षण बोलक्या रीतिने अधोरेखित करतात.
प्रत्येक पिढीचा वर्तमान
कधीच सुखावह नसतो
आपण मात्र...
भूतकाळ चांगला होता अशी समजूत करून
सदैव कुंठीत अवस्थेत मात्र कुंथत असतो...

पिढ्या येतात आणि जातात. वर्तमानात जगणे नाकारणारेच अनेकजण असतात. त्यांच्यासाठी भूतकाळ सोनेरी असतो आणि भविष्यकाळ रूपेरी. रूपेरी भविष्याबद्दल आशावादी रहायलाच पाहिजे पण भूतकाळ-भविष्यकाळ याच्या हिंदोळ्यात हातून वर्तमान मात्र निसटतो! काळाचे द्वैत नसते, हे सांगताना निळे यांची कविता आजचे चित्र अन् तेव्हाचे चित्र यात फरक नाही हे दाहक वास्तव मांडून अंतर्मुख करते.
तेव्हाही मिळायचे दंडुके आणि
बंदुकीच्या गोळ्या
तुम्ही काय खायचे? काय पहायचे?
काय घालायचे? काय लिहायचे?
काय बोलायचे?
यावर तेव्हाही होती त्यांची हुकूमत....

या निळे यांच्या शब्दांचा प्रतिवाद होऊ शकत नाही. ‘तेव्हाही आजच्यासारखेच...’ हे या कवितेचे शीर्षक समर्पक आहे.
रोजचे रहाटगाडे टाळता येत नाही. त्या रहाटगाड्यात जीवन फिरते असे म्हणण्यापेक्षा ते शोषले जाते. मग निळे यांनी म्हटल्याप्रमाणे शहरात दबा धरून बसलेल्या सुप्त मरणांना हुलकावण्या द्याव्या लागतात. याचे कारण जगण्याची अनावर ओढ. निळे यांनी त्याला ‘जगण्याच्या लालसेचा खुंटा’ अशी उपमा दिली आहे. जगण्याची फरफट होतानाही चालण्याचे चक्र मोडून पडत नाही हे जगण्याच्या लालसेच्या खुंट्यामुळेच; पण चालताना, जगताना फाटणार्‍या आणि रक्ताळणार्‍या मनाचे आक्रंदन कवी लपवून ठेवत नाही. माणूस एकटा जगू शकत नाही. एकटा सोसू शकत नाही. सोसण्याचा प्रयत्न केला तरी जोडीदारापासून ते लपत नाही. जखमांचे भोग केवळ रूढार्थानेच एकाकडे; प्रत्यक्षात नकळत तेच भोग जोडीदाराच्याही पदरात पोहोचलेले असतात. कवीमन अशावेळी आणखी व्याकुळ होते.
प्रत्येक रात्री स्वतःला चाचपत
तू छताकडे एकटक पाहत राहतेस
तेव्हा माझ्या उमेदीचे दोरही
सैल होत जातात...

अशा ओळी एकरूप झालेल्या भावविश्‍वातूनच येऊ शकतात.
हेही दिवस जातील, नाही असे नाही
तू मात्र धीर सोडू नकोस
माझ्यातली धमक लटपटू लागते....

त्याची कहाणी तिचीही झाली आहे आणि तिच्याशिवाय तो नाही. ही कहाणी एका घराची नाही, ती घराघरांची आहे! पुरूष वर्चस्व असलेल्या समाजात स्त्रियांच्या वाट्याला येणारी अगतिकता, पापणीआड लपलेले त्यांचे हुंदके निळे यांची कविता रोखठोक मांडते. आयुष्यभर संसार करूनही एकमेकांना अनोळखी राहणार्‍यांचे आक्रंदन निळे यांची कविता सामर्थ्याने टिपते.
जमिनीत तोंड खुपसून ते
जपू लागतात शहामृगी नाते...

हे सांगताना भगवान निळे व्यवस्थेच्या मर्यादांना ऐरणीवर आणू पाहतात. ‘उजेडाचा रंग‘ मधील महिला संसारी नाही, जगण्यासाठी वेगळ्या चक्रात ती अडकलेली आहे. उजेडाचा रंग कसा रे सायबा? हा तिचा प्रश्‍न साधाच, पण सनातन आहे.
जगणे आणि लिहिणे यात मी फार अंतर ठेवले नाही, हे भगवान निळेंचे प्रांजळ म्हणणे त्यांच्या कवितांमधून प्रत्ययाला येते. ती जीवनाची कविता असल्याने थेट भिडणारी आहे, जीवनाच्या अनुत्तरीत प्रश्‍नांचा पुनःपुन्हा उच्चार करणारी आहे. बहुपैलू जीवनाचे सर्व पैलू या कवितेते उतरले आहेत. त्यात नवथर प्रेम आहे, आठवणी आहेत, स्वतःचा आणि समाजव्यवस्थेचाही शोध आहे. भूक आणि लैंगिकता याच्या सर्वव्यापकतेमुळे येणारी वाटा-वळणे निळे यांची कविता धीटपणे सांगते. ‘भुकेला नसतो कधी आराम, ती कधीच नाही निवृत्त सेवानिवृत्त’ हे निखळ सत्य आणि त्या सत्यासाठीचे विदारक वास्तव त्यांच्या कवितेत आहे. संघर्ष, वंचित जीवन, चळवळी याचे साक्षीत्व भगवान निळे यांना मिळालेल्या त्या साक्षीत्वाच्या परिघाने त्यांच्या कवितेला लपेटून घेतले आहे. शोषितांच्या जगण्याचा उद्गार त्यातूनच त्यांच्या कवितेला मिळाला.
ही कविता व्यवस्थेविरूद्धचा एल्गार नाही, मात्र त्या व्यवस्थेचा चेहरा समोर आणणारा पारदर्शी आरसा आहे. म्हणूनच ही कविता आत्मपर राहिलेली नाही. ज्या परिघाने ही कविता वेढली आहे तो अमर्याद आहे. या कवितेला वैश्‍विक आयाम आहे. समाज व्यवस्थेतील विसंगतीचे दर्शन निळे यांची कविता घडविते.
या पंचवार्षिक फसव्या स्वप्नांच्या मोसमात
मीही ठोकून घेतलाय
डाव्या बोटावर दुर्भाग्याचा खिळा...

असे सांगत ती ढोंगावर परखड भाष्य करते. अपूर्ण किंवा भंगलेल्या स्वप्नांच्या काचा तुडवत जखमांची कहाणी मांडताना देखील निळे यांची कविता नैराश्येकडे झुकत नाही, हे विशेष. अपार आशावादावर त्यांचे जीवन उभे आहे आणि म्हणूनच त्यांची कविता देखील! ‘आजच्यासारखं दुःख कुणाच्याच माथी थोपलेलं नसेल, जन्माला येणारं प्रत्येक बाळ हसणारचं असेल’ हा प्रकाशमय भविष्याचा सूर त्यांच्या कवितेत जिथे तिथे दिसतो.
चिरेबंद वाड्यांना हादरे
देता-देताच ते
डोळे पुसून घालतात
हक्कांच्या जाणिवांचे काजळ
त्यांना लिहायचा आहे नव्याने
खरा इतिहास....

हे सांगताना निळे यांची कविता त्यांच्या प्रकाशाच्या मार्गात तरी
आडवे येऊ नका,
त्यांच्या स्वप्नांवर पडू द्या
लख्ख उजेड....

असे विनवित माणसाची आणि माणुसकीची बनून जाते.
पोटाला कळते फक्त भाकरीची भाषा.
नादान पावसाला कळली असती ही भाषा
तर तो कधीच वाहिला नसता
गरीबांच्या डोळ्यात....

असे वास्तव थेट सांगण्याच्या शैलीमुळे निळे यांच्या कवितेत प्रतिमा कमी आहेत. या कवितेची ताकत तिच्या आशयसंपन्नतेत आहे. या आशयसंपन्नतेसाठी निळे यांनी रोजच्या जगण्यातील शब्द निवडले आहेत. एखादे स्वगत असल्यासारखी ही कविता मनाला भिडते. कोलाहलाच्या, बाहेरील आणि आतील संघर्षाच्या चरकात पिळून निघणारे जीवन निळे यांच्या कवितेतून आपल्यासमोर येते. त्यांची कविता केवळ आत्मशोध नाही. चांगल्या जीवनाची आस घेऊन पुढे निघालेल्यांचे ते आत्मभान आहे. सहासष्ट कवितांचा हा संग्रह. सनातन प्रेरणा आणि सनातन सत्य सांगतानाही या कविता एकसुरी नाहीत. उदा.
अक्षरांना जायबंदी करून कोंडून ठेवले पुस्तकात
तर कवितेचा आक्रोश घुमणारच नाही का आसमंतात?

हा कवीचा सवाल आहे. ही कविता जसे मुंबईचे चेहरे दाखविते, भोवतालच्या चेहर्‍यामागचा चेहरा समोर आणते, तसेच स्त्री-पुरूषांच्या अंतरंगाचा तळ शोधू पाहते. ‘सांगायलाच हवे होते असे काही’ हेच निळे यांच्या कवितांबद्दल म्हणता येईल. ही कल्पनाविश्‍वात विहरणारी कविता नाही, जमिनीवर पाय असलेल्या माणसांची कविता आहे. त्यांचे राग-लोभ, त्यांची स्वप्ने, त्यांचे जगणे या कवितेचा आधार आणि आविष्कारही आहे. निळे यांची कविता केवळ प्रश्‍न निर्माण करून निरूत्तर करणारी नाही, ती उत्तरही देते. ही कविता जेवढी संयत तेवढाच तिचा आशय प्रखर आहे. निळे यांच्या प्रगल्भ कवितांनी मराठी कवितेच्या समृद्धतेत निश्‍चितच लक्षणीय भर घातली आहे. 



सांगायलाच हवंय,
असं काही...

लेखक: भगवान निळे
प्रकाशक: सृजन प्रकाशन, नवी मुंबई

पृष्ठे: 136 मूल्य: रु. 120/-
मो. 89766 69373


- स्वप्निल पोरे, पुणे 
९४२२०२९०४१

Wednesday, March 30, 2016

उड्डाण पुलाखाली

उड्डाण पुलाखाली

उड्डाण पुलाखाली
लहानची ती मोठी झाली
तिच्या चेहर्‍यावर विलसणारं
गर्भारपणाचं तेज पाहून
समजतंय,
निसर्गानं आपलं काम चोख बजावलंय
यथावकाश दिलाय तिने
एका गोंडस मुलाला जन्म
आता सिग्नलला थांबून
भोवतालच्या गर्दीत
भिरभिरत्या नजरेने
घेतेय ती
बाळाच्या बापाचा शोध!



उड्डाणपुलाखाली
दीनवाण्या चेहर्‍यानं
भीक मागणारी मुलं पाहून वाटतं
हीच का या देशाची भावी पिढी?
याचक म्हणून जगणारी!
पण ह्याच मुलांकडून
गरगरीत पोटावरुन
ढासळणारी पॅन्ट सावरीत
कोपर्‍यात उभ्या असलेल्या मामानं
केलेली हप्तावसूली पाहून
संभ्रम पडतो
खरा भिकारी कोण?
ही मुलं का तो मामा?
उत्तर वाचकानी शोधावं!



उड्डाण पुलाखाली
आपलं बालपण विसरुन
भीक मागणारी मुलं
कमावतात दिवसाकाठी
पाच-पन्नास रुपये
उदर निर्वाहासाठी!
अन् संध्याकाळी
देतात ते पोलिसाला
दहा रुपयांचा हप्ता
बिनदिक्कतपणे!
यापेक्षा वेगळं दानशूरत्व
आणखी काय असू शकतं?



उड्डाण पुलाखाली
परदेशासारखे
सुंदर उद्याने खुलण्याऐवजी
स्थिरावलेत येथे
अनेकांचे संसार
येथेच होतात त्यांचे विवाह
सुहागरातही येथेच रंगते
संसार वेलीवर फुलेही उमलतात
अन्
रोजगारही येथेच मिळतो
यांना न कसली चिंता
ना कसलं भय
नसतो यांचा बँक बॅलन्स
नसतो यांना आयकराचा त्रास
एक हप्ता पोलिसाकरवी
स्थानिक पुढार्‍याला पोहोचल्यावर
विसावतात ते जन्मभर आनंदात
याच उड्डाण पुलाखाली
याच उड्डाण पुलाखाली


शहरात ठिकठिकाणी उभारलेल्या
उड्डाण पुलाखाली
सिग्नलला थांबताना
दिसतात मला
आठ-दहा वयोगटातील
लहान मुले
कधी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला
तर कधी प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला
देशाचा तिरंगी झेंडा विकताना
तर ख्रिसमसच्या निमित्ताने
सान्ताक्लॉज विकताना
कधी पावसाळ्यात विकतात ते छत्र्या
पावसात भिजत-भिजत
तर कधी उन्हाळ्यात
गार पाण्याच्या बाटल्या
उन्हात पोळत-पोळत
चित्रांची पुस्तकेही विकतात ते
लहानग्यांच्या खुशीसाठी
खेळणीही असतात त्यांच्याकडे
खेळण्याच्या वयात पण
अशी खेळणी विकताना पाहून
आतून गलबलून येतं
पण थोडं समाधानही वाटतं
देशाची भावी पिढी
कष्टाने कमावून खातेय याची
ऐदीपणाच्या विळख्यातून सुटून
प्रामाणिकपणे जगतेय याची!


सौ. चंद्रलेखा बेलसरे, पुणे
8554981971
(पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक 'चपराक', पुणे)

अंध कळ्यांच्या सहवासात....

तुला पाहते रे तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते
जरी आंधळी मी तुला पाहते

नीताने भावेशबद्दल, आपल्या नवर्‍याबद्दल काढलेले हे शब्द. आयुष्यात समर्पण, अत्युच्च प्रेम ह्याचा वास्तुपाठ म्हणजे नीता. स्वत: डोळस असून एका अंध मुलावर जीवापाड प्रेम करून, घरच्यांचा विरोध पत्करून त्याच्याशी प्रेमविवाह केला.
भावेश शाळेत असताना मुलं त्याला ‘आंधळा, आंधळा’ म्हणून चिडवत. त्याची आई फार शिकलेली नसली तरी त्याला वाचून दाखवायची. तिनेच त्याला शिकवले. ती माऊली म्हणाली, ‘‘भावेश तू जग बघू शकत नसलास तरी असं काहीतरी वेगळं करून दाखव की जग तुझ्याकडे बघेल.’’ भावेशला स्वत:ला प्रकाश दिसत नव्हता तरी जगाला प्रकाश देणार्‍या मेणबत्त्या बनवायची इच्छा होती.
संकटं एकटी येत नसतात. ती हातात हात घालून येतात. तसंच भावेशचं झालं. त्याची नोकरी गेली, कॅन्सरने त्याची आई गेली, वडील तर आधीच गेले होते आणि त्याची दृष्टीही संपूर्ण गेली पण खचून न जाता संकटांना संधी मानून त्याने स्वत:च्या पायावर उभं रहायचं ठरवलं. मेणबत्त्या करून हातगाडीवरून तो विकू लागला. त्याला कोणी कर्ज देईना, मदत करेना. त्याचवेळी नीता त्याच्या आयुष्यात आली.
हळूहळू त्यांनी स्कूटर घेतली, मग टेम्पो घेतला. मोठ्या प्रमाणात मेणबत्त्या करून स्वत:ची कंपनी काढली. त्यात अनेक अंध मुलांना शिकवून पायावर उभं केलं. स्वावलंबी बनवलं. या यशात त्याची पत्नी नीता हिचाही मोठा वाटा आहे. अंधत्व ही कमतरता न मानता त्यावर मात करून तो खेळाडू झाला. अनेक खेळात तसेच पॅरा ऑलिंपिक्स मध्ये त्याने भरपूर पदके मिळवली. स्वत:च्या जिद्दीवर आपला व्यवसायही त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला. त्याचा वेलू गगनाला भिडला आहे. खेळाप्रमाणे व्यवसायातही अनेक रेकॉर्डस् भावेशला मोडायचे आहेत. आज तो आपल्या पत्नीबद्दल कृतज्ञतेने म्हणतो,
आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे
स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे

भावेशवरून आणखी एक गोष्ट आठवली. शाळेत मास्तरांनी विद्यार्थ्यांना कागदाचे अनेक तुकडे दिले आणि सांगितले की हे तुकडे जोडून भारताचा नकाशा बनवा. एका मुलाने पटकन नकाशा बनवला. मास्तरांनी विचारलं, ‘‘इतका लवकर कसा बनवलास?’’ विद्यार्थी म्हणाला, ‘‘या कागदांच्या तुकड्याच्या मागे माणसाचं चित्र आहे, मी माणूस जोडला. भारताचा नकाशा आपोआप तयार झाला.’’ याला राष्ट्रीय एकात्मता म्हणतात. ही एकात्मता आपल्या भारताची शान आहे. ती मला अनामप्रेमींनी महाबळेश्‍वरला अक्षयतृतीयेला अंधांचे राष्ट्रीय संमेलन घेतले होते त्यात बघायला मिळाली. मी पण अनामप्रेमी आहे. म्हणूनच मलाही हा सोहळा बघायचं भाग्य लाभलं.
अनाम म्हणजे ज्याला कोणत्याही प्रसिद्धीची गरज वाटत नाही, आपले नाव कुठेतरी यावे असे मनात वाटत नाही ते अनाम आणि प्रेमाने कोणतीही परिस्थिती, म्हणजे जग जिंकता येते म्हणून अनामप्रेम. अंधांच्या सहवासात तीन दिवस राहिले. त्यांच्याशी बोलले, त्यांच्याबरोबर सहभोजन केले. त्यांच्या कोंडलेल्या भावनांना, हृदयातील वेदनांना वाट करून दिली, साद घातली. तेव्हा जाणवलं दुदर्म्य इच्छाशक्ती असली की त्यापुढे काहीही अशक्य नसत. गांधीजींनी सत्याचे प्रयोग केले. आम्ही प्रेमाचे प्रयोग करतो. प्रेमाचे प्रयोग करताना वाटलं खरं म्हणजे आपण डोळे असलेले लोक अंध आहोत. कोणी सत्तेने, कोणी धर्माने, कोणी पैशानी, कोणी व्यवहारातील तात्कालिक लाभांनी. जे डोळस आंधळ्यांसारखे वागतात त्यांच्यासाठी ओशो म्हणतात, ‘‘मै अंधोंकी बस्ती मे रोशनी लेके घूम रहा हूँ!’’
अंधांना फक्त चर्मचक्षू नाहीत पण त्यांचे अंत:चक्षू उघडले आहेत. त्यांना तुमच्यातील आत्मा दिसतो, सहसंवेदना जाणवते. म्हणून आपण थोडा काळ आपलं अंधत्व विसरून या खर्‍या अंधांवर प्रेमाचं सिंचन करू या. अंध केवळ वासानी, स्पर्शानी, ऐकण्यानी कितीतरी गोष्टी आपल्यापेक्षा सरस करू शकतात.
‘‘डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे’’
असं म्हणणार्‍या या अंधमुलांच्या राष्ट्रीय मेळाव्यातून मी त्यांचे अदृष्य प्रेम समजून घेऊ शकेल.
इतके वर्ष फक्त अन्यायाच्या रॅली (कामगारांचे प्रश्‍न, त्यांच्या मागण्या, पगारवाढ इ.) पाहील्या होत्या, पण महाबळेश्‍वरला या अंधांची प्रेमाची रॅली आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली. प्रेम ओसंडून वहात होते. त्या बिचार्‍या मुलांच्या काही मागण्या, प्रश्‍न नव्हतेच. उलट गोड आवाजात आपापल्या भाषेत सर्व मुलं छान हसून गाणी म्हणत होती. या रॅलीचं अवर्णनीय दृष्य बघून डोळ्याचं पारणं फिटलं. अंतर्मुख व्हायला झालं. भारतातल्या दहा राज्यांमधून एकोणीस शांळाचे सर्व वयोगटातील चारशे विद्यार्थी जमले होते. हिंदुस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच अंधांचा राष्ट्रीय मेळावा झाला आहे. सगळ्यांनी जगावेगळं समृद्ध जग पाहिलं.
अंध मुलांचं वागणं, बोलणं, त्यांचं पाठांतर, त्यांचे कडूगोड अनुभव, त्यांना पावलोपावली येणार्‍या समस्या, तरीही आनंदी वृत्ती, जिद्द आणि कष्टाची तयारी पाहिली. त्यांची स्थिरता, एकाग्र चित्त आणि एकाग्र मनानी कोणतीही गोष्ट करणं, प्रवाहाविरूद्ध जावे लागूनही जगण्याची जिगर, मोठं मन पाहिलं. आमच्या अडचणी, आमचे प्रश्‍न कुठल्याकुठे विरून गेले. तेव्हा वाटलं आपलं दुखलेलं कळतं तसं दुसर्‍याचं दुखलेलंही आपल्याला कळलं पाहिजे. आपण कृतज्ञतापूर्वक समाजाचं जे देणं लागतो. ते दिलं पाहिजे, कोणत्याही सबबी न सांगता. म्हणतात ना ‘जिथे इच्छा आहे तिथे मार्ग निघतो‘, ‘ज्याला आवड आहे त्याला सवड मिळते.’ या अंध मुलांनी आपण अंध आहोत याचा बाऊ न करता, सहानुभूती न मागता उलट त्याचा स्वीकार केला आहे. म्हणूनच त्यांची सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती होते आहे.
खरं तर आपण डोळस लोक भाग्यवान आहोत. आपल्याला निसर्गाची सर्व रूपं बघता येतात. चंद्र, सूर्य, पक्षी, प्राणी, झाड, फुल, फळ, समुद्र, नद्या, डोंगर. पण आपण तो निसर्ग अनुभवत नाही. उपभोगतच नाही कारण आपण स्वत:शीच एकरूप नाही. तर इतरांशी एकरूप कसे होणार? माणसाच्या सुखासाठी निसर्ग सिंहाचा वाटा उचलतोय. आपण निदान खारीचा तरी उचलूया. परिवर्तन हृदयापासून केलं तर यशस्वी होतं. म्हणून आपण स्वयंप्रकाशित होऊ आणि इतरांना प्रकाश देऊ. मनामनात क्रांती झाली की समाजातील उपेक्षितांना आपोआप मदतीचे हात दिले जातील. त्यांच्यावर असं प्रेम करूया की ज्या प्रेमात कसलीही अपेक्षा नाही, स्वार्थ नाही, फक्त समर्पण आहे. खरं म्हणजे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे.
इथे अंध मुलांनी रोप मल्लखांबात आंतरराष्ट्रीय रेकॉर्डस् तोडले होते. काही जणांनी  अंधांसाठी असणार्‍या आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावले होते. ऑर्केस्ट्रामध्ये  सर्वप्रकारची वाद्ये डोळसांना लाजवतील इतक्या सफाईदारपणे मुले वाजवीत होती. स्टेजवर सर्व नृत्यप्रकार एकही बीट न चुकता करत होती. त्यांची स्टेजवरची थिरकणारी पावलं बघून थक्क व्हायला होतं. आपोआप सर्व प्रेक्षकांकडून त्यांना स्टँडिंग ओव्हिशन दिले गेले. टाळ्यांचा कडकडाटात भरभरून दाद मिळाली. गाण्याचा सुंदर, सुरेल गळा, तालासुरांचं अद्भूत ज्ञान, अभिनय, कविता, साहित्य एकही क्षेत्र असं नाही की ज्यात या अंध मुलांनी प्राविण्य मिळवलं नाही. त्यांच्यात अनेक कलागुण आहेत. त्यांना फक्त अनाम प्रेमींनी व्यासपीठ दिले.
काही अंध विद्यार्थी सी. ए. झाले आहेत. काही इंजिनीअर, एम. बी. ए., कोणी मोठे व्यावसायिक, कोणी मोठ्या पदावर अधिकारी आहेत. खेळात, गिर्यारोहनात, मॅरॅथोन कशातही ही मुले मागे नाहीत. एक जण तीन डिगर्‍या घेऊन शाळेची मुख्याध्यापिका आहे. नेहाने हिमालयातील उंच शिखर चढून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये जागतिक विक्रम नोंदविला आहे. महाराष्ट्र राज्याच्या विशेष गिर्यारोहणाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. दिल्लीला जागतिक महिला अधिवेशनातही जगातील ज्या अंध महिलांची निवड केली गेली त्यात नेहाची निवड झाली होती. काहीजणी वॉटरफॉल रॅपलींगसारख्या साहसी गिर्यारोहणात अग्रेसर होत्या. कोणाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार मिळाला तर कोणाला ‘ऑल राऊंडर’ पुरस्कार मिळाला. कुणी नृत्यात अग्रेसर तर कोणाची अंध संस्थेचे अध्यक्ष, सचिव म्हणून निवड झाली.
फिटे अंधाराचे जाळे,
झाले मोकळे आकाश
दरी खोर्‍यातून वाहे
एक प्रकाश प्रकाश

महाबळेश्‍वर सोडताना माझी अवस्था अशीच झाली.
खूप अभिमान वाटावा अशी कामगिरी करणार्‍या अंध विद्यार्थ्यांकडे पाहून असे वाटले, ‘लेट्स नॉट गीव सिम्पथी बट ऑपोर्च्युनिटी टू देम.’
तसेच अनामप्रेम ही एक विचारधारा आहे, प्रवाह आहे, परिवार आहे. ‘प्रेम शिंपीत जा’ हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. समाजातील उपेक्षितांसाठी मग ते मुकबधिर, अंध, अपंग, मतीमंद, अनाथ कोणीही असोत त्यांच्यासाठी हृदयापासून वाटणार्‍या तळमळीने, भक्तीभावाने, निरपेक्षपणे काहीतरी समाजासाठी चांगलं काम करण्याची धडपड पाहून अनाम प्रेमींनाही सॅल्युट करावासा वाटला. हेलन केलर, आएशा यांसारख्या संस्थामधून अंधांसाठी आणि इतर सर्वांसाठी काम करणार्‍या माझ्या मैत्रिणी म्हणत असतील,
कधी भक्त का पाहतो ईश्‍वराला
नदी न्याहळी का कधी सागराला
तिच्यासारखी मी सदा वाहते
जरी आंधळी मी तुला पाहते.


(पूर्वप्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक', मार्च २०१६)
- उज्ज्वला कुलकर्णी, पुणे 

९८९०९४६६८४ 

Tuesday, March 29, 2016

एका ऐतिहासिक उठावाच्या सर्व बाजू सांगणारा ग्रंथ

सन अठराशे सत्तावन्न
एका ऐतिहासिक उठावाच्या सर्व बाजू सांगणारा ग्रंथ 
'साप्ताहिक चपराक', पुणे 

(२८ मार्च २०१६)

अठराशे सत्तावनचा उठाव. त्याबद्दल साधारणपणे एकच मतप्रवाह आढळतो. तो स्वातंत्र्यलढा होता असं ते मत. तो उठाव मोठा होता यात शंका नाही; मात्र तो स्वातंत्र्यलढा होता का? त्याबद्दल वेगवेगळी मतं व्यक्त केली जातात. बेचाळीसचा उठाव स्वातंत्र्यलढा होता. त्यानंतर आझाद हिंद सेनेने केलेला उठावही स्वातंत्र्यलढाच. ब्रिटिशांबद्दल खूप संताप होता, म्हणूनच अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला ही गोष्ट मात्र खरी आहे. या उठावाला असंख्य बाजू आहेत. शेषराव मोरे म्हणतात त्याप्रमाणं, एक बाजू ‘जिहाद’ची देखील आहे. ना. के. बेहर्‍यांचा ‘सन अठराशे सत्तवन्न’ हा ग्रंथ या उठावाच्या सर्व बाजू मांडतो. 489 पानी हा ग्रंथ. यात सत्तावन्नमध्ये घडलेला भयानक रक्तपात, बंडखोर व ब्रिटिश दोघांनी आखलेले डावपेच, त्यामागचं राजकारण अशा सर्व बाबी येतात. हा उठाव दडपताना ब्रिटिशांनी दाखवलेली राक्षसी वृत्ती भयानक होती, तसंच बंडखोरांकडूनही अत्यंत अमानवी व हिंस्त्र हत्या घडल्या. त्याचा संपूर्ण लेखाजोखा ग्रंथात आला आहे.
ब्रिटिशांनी भारत जिंकून घेतला तोच मराठ्यांपासून. औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतर मराठ्यांनी सगळा भारतच ताब्यात घेतला होता. दिल्लीच्या मुघल बादशाहीचं प्राणपणानं रक्षण देखील केलं होतं. ग्रंथाच्या सुरूवातीला लेखकानं हे ऐतिहासिक सत्य सांगितलं आहे. नंतर लेखक 1857 च्या उठावाची कारणं सांगतो. लॉर्ड डलहौसीची लोभी वृत्ती यामागं होती. तो 1848 मध्ये भारताचा गव्हर्नर जनरल झाला. भारतातली अनेक संस्थानं त्याच्या डोळ्यात खुपू लागली. आधी सातार्‍याच्या प्रतापसिंह भोसल्यांचं राज्य इंग्रजांनी गिळलं. दि. 29 मार्च 1849 रोजी डलहौसीनं पंजाबचं राज्य खालसा केलं. तिथं राजा रणजितसिंहाचं राज्य होतं. रणजितसिंहाचा मुलगा दिलीपसिंह. त्याला तर ब्रिटिशांनी ख्रिस्तीच केलं. डलहौसीनं पुढं मराठ्यांच्या तंजावर येथील राज्याची देखील तीच गत केली. नागपूरच्या भोसल्यांचं राज्य देखील डलहौसीच्या कारस्थानांना बळी पडलं. ब्रिटिश कापडाचा व्यापार करत. त्यासाठी त्यांना मुबलक कापूस हवा असे. यासाठी त्यांनी वर्‍हाड व मध्य प्रांतावर कब्जा केला. दि. 2 ऑगस्ट 1854. या दिवशी डलहौसीनं झांशीचं राज्य खालसा केलं. दि. 4 फेब्रुवारी 1856. या दिवशी लखनौच्या संपन्न राज्याचा देखील घास घेण्यात आला. इ. स. 1714 ते 1818 हा साधारण 104 वर्षांचा पेशवाईचा काळ. 1818 साली पेशवाई नष्ट झाली व ब्रिटिशांनी मराठ्यांना सरळ चेपायला सुरूवात केली. साम, दाम, दंड, भेद! ब्रिटिशांच्या राजकारणाचं सूत्रच होतं हे. ब्रिटिशांची व विशेषः डलहौसी या महाभागाची ही वृत्ती असंतोषाला कारणीभूत ठरत गेली. ब्रिटिशांचं हे हातपाय पसरणं लेखकानं ग्रंथाच्या सुरूवातीलाच खूप तपशीलानं सांगितलं आहे. पेशवाईच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी भारतभर झेंडे रोवले होते. अटकेपर्यंत राज्य नेलं होत; मात्र नंतर इस्ट इंडिया कंपनीच्या राजकारणानं सर्वांवरच कडी केली. त्यात दुसरा बाजीराव पेशवा. तो घरबुडवा निघाला. त्यानं 1802 साली वसई येथे ब्रिटिशांशी तह केला. तो दिवस होता 31 डिसेंबर. त्या दिवसापासून मराठ्यांच्या राज्यातच भांडणं व मतभेद सुरू झाले. ब्रिटिश या सगळ्यांचा फायदा घेत गेले. राजकारण हा शेवटी बुद्धिबळाचाच पट असतो. हे बुद्धिबळाचे खेळ बेहर्‍यांच्या या ग्रंथात पानोपानी वाचायला मिळतात. ग्रंथ कुठेही बोजड नाही. कंटाळवाणा तर नाहीच. अभ्यासपूर्ण व वाचनीय असा तो आहे. बेहर्‍यांनी हा ग्रंथ लिहिला 1927 साली. त्यानंतर 11 वर्षांनी त्याची दुसरी आवृत्ती निघाली. मग थेट 2007 साली तिसरी आवृत्ती. ती काढली पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशनने.  ते 1937 साल होतं. त्यासाली स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बेहर्‍यांच्या या ग्रंथाची स्तुती केली होती. ‘हा ग्रंथ खर्‍या इतिहासाला धरून आहे’ असे सावरकरांचे उद्गार होते. ग्रंथ वाचताना सावरकरांचे हे उद्गार आपल्याला आठवत राहतात.
दिल्ली, लखनौ, कानपूर व झांशी ही सत्तावनच्या उठावाची प्रमुख केंद्रे होती. यात लखनौ वगळता इतरत्र ब्रिटिश बायका व मुलांच्या कत्तली झाल्या, असा उल्लेख ग्रंथात आढळतो. त्यात सर्वात भीषण कत्तल कानपुरला झाली. त्याचा सूड म्हणून ब्रिटिशांनी कानपूर व आसपासच्या परिसरात दहा हजार भारतीयांच्या कत्तली घडवून आणल्या. वाटेल ती किंमत देऊन ब्रिटिशांना हा उठाव दडपायचा होता. त्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडलं. आपली सगळी बुद्धी, शक्ती वापरली. त्याची सगळी वर्णन बेहर्‍यांनी दिली आहेत. दिल्ली जिंकून घेताना ब्रिटिशांचे 61 लाख रूपये खर्च झाले व 3837 सैनिक मरण पावले; मात्र ब्रिटिशांनी ती किंमत चुकती केली. पुढं त्यांनी झांशी जिंकून घेतलं तेव्हा सूडबुद्धीनं पाच हजार जणांना ठार मारलं. झांशीतली लढाई घनघोरच होती. झांशीच्या राणीनं 17 दिवस किल्ला लढवला. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशीच स्थिती त्या काळात झांशीच्या राणीची होती. या चार शहरांमधली बंडाची आग भयंकर होती. त्याला उघड राज्यक्रांतीचं स्वरूप आलं होतं. ही आग विझवायला ब्रिटिशांना एक वर्ष लागलं.
हा उठाव का झाला? त्याची कारणं बरीच होती; मात्र ठिणगी पडली ती एका घटनेमुळं. त्यावेळी कोलकत्याहून आठ मैलांवर ‘दमदम’ ही लष्करी छावणी होती. तिथं ब्रिटिशांनी काडतुसे तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता. त्यावेळी ब्रिटिश फौजेतील शिपाई ‘ब्राऊनबेस’नावाची बंदुक वापरत असत. या बंदुकीत काडतूस भरताना ते दातांनी तोडून बंदुकीत भरावं लागे. या काडतूसाला गाईची व डुकराची चरबी चोपडली जाते अशी अफवा उठली. ब्रिटिशांनी देशी शिपायांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला; मात्र काडतूस वापरताना आपला धर्म बाटेल या विचारानं हिंदू व मुसलमान शिपाई अस्वस्थ झाले. ते आतल्या आत घुसमटू लागले व दि. 29 मार्च 1857 रोजी बराकपूर येथे सर्वप्रथम मंगल पांडे बिथरला. त्यानं एका ब्रिटिश अधिकार्‍यावर गोळी झाडली. तो अधिकारी बचावला; मात्र त्या गोळीनं ‘1857’चा अध्याय सुरू झाला. तो संपायला पुढं दोन वर्षे लागली. काय घडलं या दोन वर्षात? तर उत्तर भारतात अक्षरशः हलकल्लोळच माजला होता. बेहरे यांनी या सगळ्या घटना सांगितल्या आहेत. त्यात लढाया, राजकीय डावपेच सगळं काही आहे. त्यावेळी भारतात इस्ट इंडिया कंपनी राज्य करत होती. तिच्या फौजेत अयोध्या, कानपुर, अलाहाबाद, वाराणसी टापूतील पूरभैयांचा खूप भरणा होता. या पूरभैयांच्या पलटणी बिहार, मध्य प्रांत, संयुक्त प्रांत, वायव्य प्रांत, मध्य हिंदुस्थानातील संस्थानं, पंजाब अशा सर्व उत्तर हिंदुस्थानभर पसरल्या होत्या. उठावात या पलटणी सर्वात पुढं होत्या. मुसलमान शिपाई तर उठावात सामील होतेच. अशावेळी ब्रिटिशांनी आपल्या फौजेतील शीख व गुरखा पलटणींना आपल्याकडे वळवून घेतले व केवळ त्यांच्या मदतीनेच उठाव दडपला. शीख व गुरखे विरोधात गेले असते तर? तर ब्रिटिश अक्षरशः मेले असते; मात्र ते विरोधात गेले नाहीत त्याला ऐतिहासिक कारणं होती. एक तर शिखांना त्यावेळी मोगल बादशाही मान्य नव्हती. बंडखोरांनी तर मोगल बादशहालाच आपला राजा मानलं होतं. शिखांचे गुरूगोविंदसिंगांसारखे काही धर्मगुरू पूर्वी मोगल बादशहाकडून मारले गेले होते. त्यामुळे शिखांना या बादशाहीविरूद्ध आतून तिटकारा होता. आणखी एक कारण होतं. 1849 साली शीख-इंग्रज युद्ध झालं होतं. त्यावेळी पूरभैय्या व मुसलमान पलटणींनी शिखांविरूद्ध लढून इंग्रजांना विजय मिळवून दिला होता. त्याचाही राग शिखांच्या मनात होता. गुरख्यांची अवस्था अशीच होती. पूर्वी नेपाळ देखील ब्रिटिशांनी जिंकून घेतला होता तो या पूरभैय्या व मुसलमान पलटणींच्या बळावरच. आता गुरख्यांना त्या घटनेचा सूड घ्यायचा होता. यातली ब्रिटिशांची चलाखी व मुत्सद्देगिरी लक्षात घेण्यासारखी होती. ब्रिटिश भारतीय संस्थानं खालसा करत होते. दुसरीकडे या संस्थानिकांना एकमेकांविरूद्ध कोंबड्यासारखं झुंजवत होते; मात्र सगळ्यांनी एकत्र येऊन ब्रिटिशांना बुडवावं असं कुणालाही वाटलं नाही. नेपाळचा राजा जंगबहाद्दूर. तो देखील ब्रिटिशांच्या मदतीला धावला. त्याचं कारण वर आलंच आहे. प्रत्येकाला आपापले हेवेदावे साधायचे होते. या हेवेदाव्यांचा परिणाम एकमेकांचे रक्त सांडण्यात झाला. यासंदर्भात एक पत्र फार बोलकं आहे. ते लिहिलंय लॉर्ड लॉरेन्सनं सर फ्रेडरिक करी याला. लिहिलं 1858 मध्ये. तो म्हणतो, ‘‘हॅड द पंजाब गॉन, वुई मस्ट हॅव बीन रूइंड.’’ पंजाब बिथरला असता तर सर्वनाश अटळ होता असं तो म्हणतो. बंडाच्या काळात राजपुताना (राजस्थान) शांतच राहिला व महाराष्ट्रातही बंडाचं मोठं वारं शिरलं नाही. झांशीची राणी, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे हे मराठे तेव्हा लढले. ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी प्राण पणाला लावले; मात्र त्यांच्या सैन्यातली एकूण मराठ्यांची संख्या कमीच होती. रजपूत शांत राहिले ते त्यांच्या काहीशा स्थितीप्रिय वृत्तीमुळं. सत्ताधारी हे मोघल असोत, मराठे असोत वा ब्रिटिश, सत्तेपुढं लीन रहायचं ही ती स्थितीप्रियता. दुसरीकडे बंगाल व मद्रास प्रांत देखील शांतच राहिले.
मंगल पांडे ते तात्या टोपे असा देखील हा सगळा प्रवास आहे. मंगल पांडेला ब्रिटिशांनी फाशी दिलं. त्या फाशीची तारीख मात्र ग्रंथात दोन ठिकाणी वेगवेगळी देण्यात आली आहे. पृष्ठ क्र. 155 वर ती 6 एप्रिल 1857 आहे तर पृष्ठ क्र. 207 वर दि. 8 एप्रिल 1857. मंगल पांडे नंतर बरोब्बर दोन वर्षांनी ब्रिटिशांनी तात्या टोपेंना फाशी दिली. तो दिवस होता दि. 18 एप्रिल 1859.
बेहर्‍यांच्या मते उत्तर हिंदुस्थानातील या ऐतिहासिक बंडात हिंदुंपेक्षा मुसलमानांचा सहभाग जास्त होता. कारण त्यांनी ब्रिटिशांविरूद्ध तेव्हा जिहादच पुकारला होता. शेषराव मोरे यांनी नंतर हेच सांगितलं. ‘लखनौ शहर बंडखोरांनी एखाद्या किल्ल्याप्रमाणे लढवलं’ असं बेहेर्‍यांनी म्हटलंय. लखनौमधील बंडखोर हे सगळेच मुसलमान होते. त्यांच्या शौर्याचं जबरदस्त कौतुक सावरकरांनी देखील आपल्या ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथात केलेले आहेच.
ग्रंथात मथुरा, बरेली, आग्रा, शहाजहानपुर, वाराणसी, अलाहाबाद, ग्वाल्हैर, इंदौर, महू, लाहौर, पेशावर, नझफगड येथील उठावांची देखील माहिती देण्यात आली आहे. ‘सत्यासारखा धर्म नाही’ असं बेहेरे एकेठिकाणी म्हणतात. त्यामुळं ते हा इतिहास सांगताना सत्य घटना सांगण्यावर भर देतात. बेहेर्‍यांनी दोन उदाहरणे सांगितली आहेत. त्यावरून ही गोष्ट लक्षात यावी. एका ब्रिटिश अधिकार्‍याने या बंडाच्या धुमश्‍चक्रीत वीस हजार निरपराध स्त्री-पुरूषांचे प्राण वाचवले. ही घटना झांशीतली. दुसरीकडे सर जॉन के, लॉर्ड कॅनिंग, एडवर्ड थॉमसन ही ब्रिटिश मंडळी सत्यच सांगतात. ब्रिटिशांचे राक्षसी अत्याचार सांगताना ही मंडळी मागेपुढे पाहत नाहीत. त्यांची मतं बेहर्‍यांनी दिली आहेत.
बेहर्‍यांच्या मते त्याकाळी एकराष्ट्रीयत्वाची भावना भारतात नव्हती. 1885 साली कॉंग्रेसची स्थापना झाली. बेहर्‍यांच्या मते त्यानंतर भारतात एकराष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. ग्रंथात 1857-58च्या वेळचा भारताचा नकाशा आहे. त्यातून भुगोल तर समजतोच; पण ऐतिहासिक ग्रंथ नकाशांमुळे नीट समजायला मदत होते. काही छायाचित्रे ग्रंथात आहेत. त्यातील कुंवरसिंह, झांशीची राणी, नानासाहेब पेशवे, बहाद्दूरशहा जफर, बेगम झिनत महल, तात्या टोपे यांची छायाचित्रे आपल्याला भूतकाळात खेचून नेतात. एकूणच 1857 च्या उठावाचा समतोल अभ्यास या ग्रंथातून आला आहे. 


* सन अठराशे सत्तावन 

* लेखक : नारायण केशव बेहेरे 
* प्रकाशक : श्रीविद्या प्रकाशन, पुणे (०२०-२४४५८४५५)
* पृष्ठे : ४८९, * मूल्य : ३०० 

* महेश मांगले, पुणे 
९८२२०७०७८५