साप्ताहिक 'चपराक' २५ डिसेंबर २०१७
2011 ला महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता सिनेमा बरा होता. पण अमिताभसारखा वृद्ध नट हा त्या चित्रपटाचा हिरो होता. या वयातही अमिताभ बच्चन यांची ऊर्जा आणि उत्साह पाहिला की भल्या भल्या तरुणांची बोटेही तोंडात जातात. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनला मात्र एवढे यश मिळाले नाही. पण हा बुढ्ढा (लेखाची गरज म्हणून हा शब्द वापरलाय. बच्चन साहेबांबद्दल पराकोटीचा आदर आहे.) सर्व तरुणांना लाजवत अजूनही ठुमके घेतोय. आपल्याच वयाचे पात्र रंगवतानाही त्यांचा जोश पाहण्यासारखा असतो. ते आजही कित्येक तास काम करतात. नरेंद्र मोदी आणि अभिताभ बच्चन यांची चांगली मैत्री आहे. अमिताभ यांचे पूर्वी कॉंग्रेस पक्षाशी चांगले संबंध होते. त्यांच्या सौ.जया बच्चन ह्या विरोधी पक्षात आहेत पण तरीही मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरात पर्यटनासाठी त्यांना ‘ब्रँड ऍम्बासेडर’ बनवले. त्या जाहिराती खूप गाजल्या. मला नेहमी अमिताभ बच्चन आणि नरेंद्र मोदींच्या बॉडी लँग्वेजमध्ये साम्य दिसतं. मोदींचं शरीर थोडसं तिरपं करुन बोलणं, टाळ्या वाजवण्याची पद्धत आणि वृद्ध असूनही चेहर्यावरील तारुण्यातील आत्मविश्वास या गोष्टी समान वाटतात. ‘आज तक’च्या So Sorry आणि इंडिया टिव्हीच्या OMG या पॉलिटिकल ऍनिमेटेड सिरीजमध्ये नरेंद्र मोदींना अमिताभ यांच्या अवतारात दाखवतात. त्यांनाही हे साम्य जाणवले असतील. एक कलाक्षेत्रातला आणि एक राजकारणातला बुढ्ढा तरुणांपेक्षाही जास्त काम करत आहेत.
या दोन बुढ्ढ्यांबद्दल लिहिण्याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी जिग्नेश मेवाणी नावाच्या एका तरुण नेत्याने मोदींविषयी आक्षेपार्ह विधान काढत त्यांना बुढ्ढा म्हटले. जिग्नेश मेवाणीची ओळख दलित नेता म्हणून आहे. गुजरातच्या निवडणुकीत तो कॉंग्रेसचा स्टार चेहराही होता. जिग्नेश मेवाणी एका चॅनलच्या चर्चे दरम्यान म्हणाला की, ‘‘वो मानसिक तौर से बुढे हो गये है. अब तो हम युवा आयेंगे. राजनीती देश का युवा करेगा युवा. इनको अभी रिटायर्ड हो जाना चाहिये. उनको हिमालय भी चले जाना चाहिये, अपनी हड्डीयां गलाने के लिये. घर जाकर बैठे, आराम करे. अब बहुत बोरिंग आदमी हो गया हैं.’’ हे म्हटल्यानंतरही त्याला याबद्दल माफी मागाविशी वाटली नाही. बोलण्याच्या नादात उत्सुकतेने आपण बोलून गेलो असेही त्याला वाटत नाही. पुरे होश-ओ-आवाज़ में त्याने हे म्हटलेले आहे. अशा प्रकारच्या टीका नरेंद्र मोदींसाठी नव्या नाहीत. या आधी अनेक खालच्या पातळीवरच्या टीका मोदींनी सहन केल्या आहेत. त्या त्यांनी गुजरातच्या निवडणुकीत बोलूनही दाखवल्या. त्यांनी टिकाकारांचा समाचार घेतल्यावर टिकाकार आणि विरोधकांनी म्हटलं की मोदी विकास विसरुन स्वतःबद्दल बोलत आहेत. जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. अहो पण ज्यांनी मोदींवर अशा टीका केल्या त्यांच्याबद्दल कुणीच बोलायला तयार नाही. म्हणजे लोकांनी तोंडसुख घ्यायचे आणि त्याविषयी मोदींनी एक अवाक्षरही काढायचा नाही, अशी विरोधकांची मानसिकता आहे. मोदींनी फक्त मुकाट्याने सहन करायचं असंच त्यांना वाटतं. बोलणारे राहतात बाजूला, पण चुका दाखवणार्यांचं तोंड दिसतं. नरेंद्र मोदी हा एक असा नेता आहे, ज्याला विरोधकांनी सर्वात जास्त टार्गेट केले आहे. अगदी ते प्रत्यक्ष राजकारणात नवीन असल्यापासून. पण हा नेता सर्वांना पुरुन उरला. मोदी राजकारणातून नष्ट होणार अशी मनीषा बाळगणारे राजकारणातून हद्दपार झाले. पण मोदी मात्र प्रादेशिक राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात आले.
गुजरातमध्ये राहुल हरुनही बाजीगर ठरले आणि मोदी सतत जिंकूनही त्यांच्या तोंडाला फेस आला, असे कॉंग्रेसी म्हणतात तेव्हा आपण समजू शकतो. कारण कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण होऊ नये आणि कॉंग्रेसच्या परंपरेप्रमाणे जसे बादशहाचा मुलगा बादशहा होतो तसे राहुल सुद्धा पारंपरिक पद्धतीने बादशहा अर्थात कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. कॉंग्रेसींना काही करुन राहुल गांधींचे अस्तित्व टिकवायचे आहे. जर राहुल यांच्या योग्यतेबद्दल कॉंग्रेसमध्ये अधिक चर्चा होऊ लागली तर कॉंग्रेसी राहुल समर्थकांना हा सर्वात मोठा फटका बसू शकतो. म्हणून राहुल बाजीगर, त्यांनी मोदींना टक्कर दिली, राहुलमुळे मोदी काठावर पास झाले हे कॉंग्रेसींना सांगावं लागतं पण इतर मोदी विरोधक हा खटाटोप करतात तेव्हा हसू आवरत नाही. त्यांना राहुल गांधींच्या पराभवात जय का दिसतो? की त्यांनीही गांधी परिवारची गुलामी करण्याचे व्रत घेतले आहे? मला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा स्वतःला तिसरी व्यक्ती किंवा पत्रकार किंवा लेखक म्हणवून घेणारेही राहुलजींच्या या पराभवामुळे आनंदी होते व त्यांनीही मोदी जिंकूनही हा त्यांचा नैतिक पराभव असल्याचे म्हटले. या अशा लोकांना गुजरातच्या पार्श्वभूमीची साधी माहिती सुद्धा घ्यावी असे वाटत नाही. अगदी साधा मुद्दा आहे, आपल्या भारतीय लोकशाहीप्रमाणे बहुसंख्य लोकांच्या समर्थनाने सरकार स्थापन होते. त्यामुळे लोकशाही पद्धतीने भाजप गुजरातेत जिंकला आहे आणि संविधानाप्रमाणे हा नैतिक विजयच आहे.
गुजरातमधून हार्दिक पटेलनंतर मोदी विरोधी दलित चेहरा म्हणून जिग्नेश मेवाणी समोर आला. जिग्नेश हा तरुण आहे. तो आता जिंकलाही आहे. त्यामुळे विजयाची धुंदी अजूनही त्याच्या डोक्यावरुन उतरलेली नाही. ज्या वयात जिग्नेश मोठा नेता झाल्याने पुरोगामी मंडळी खुश आहेत, त्या वयात मोदी हे साधे कार्यकर्ते होते. त्या वयात मोदी प्रत्यक्ष राजकारणात आलेले नव्हते. ते टप्प्याटप्याने आले. म्हणजे ते प्रसिद्धीच्या बळावर राजकारणात आले नाहीत. ते श्रम करीत आले. स्वयंसेवक किंवा कार्यकर्ता आणि विशेष म्हणजे प्रचारक म्हणून तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही लोकांमध्ये राहत असता. अगदी सामान्य माणसाप्रमाणे लोकांमध्ये मिसळता, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत असता. हार्दिक म्हणा, कन्हैया किंवा जिग्नेश हे प्रसिद्ध झालेले युवा नेते आहेत. यशस्वी झालेले नव्हे. मराठीत असं म्हणतात की एखाद्याला आपटायचं असेल तर आधी त्याला उचलावं लागतं. या तरुण नेत्यांना मिडिया आणि डाव्यांनी डोक्यावर उचलून घेतलंय. ही डावी मंडळी हिंदू द्वेषाने पछाडलेली आहेत. ही मंडळी भयंकर स्वार्थी आहेत. जिथे जिथे कम्युनिस्टांचे राज्य आहे, तिथे तिथे रक्ताचे पाट वाहिले जातात हे सत्य ते जगापासून लपवतात. या डाव्या मंडळींनी या युवा नेत्यांना त्यांचे विशेष काहीही कर्तृत्व नसताना डोक्यावर उचलून घेतले आहे. ही मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी या तरुणांना आपटू शकतात. अर्था या युवा नेत्यांनी प्रसिद्धीही मिळाली आहे. एखादं गाढव जरी हिंदू किंवा मोदींच्या विरोधात बोंबलायला लागलं तर ही डावी मंडळी त्या गाढवालाही खांद्यावर घेऊन नाचतील. अशी अवस्था स्वतः डाव्यांनी करुन घेतलेली आहे. कारण डावी मंडळी सपशेल नापास झालेली आहेत. त्यांचा अवास्तव बुद्धीवाद भारतीयांना नकोय. त्यांना सुशासन हवेय.
या डाव्या मंडळींनी उचलून घेतलेले हे युवा नेते किती माजोरडे आहेत, हे त्यांच्या मुलाखतींमधून आणि भाषणांमधून स्पष्ट दिसत आहे. भाजप आल्यापासून ही मंडळी जास्तच वैतागलेली आहेत. त्यांना भारतात सुशासन आणायचे आहे, याचा दुसरा अर्थ त्यांना भारतात शांती नकोय. कारण डाव्या मंडळींचे लेख जर तुम्ही वाचत असाल तर ह्यांचा हिंदू विरोध दिसून येतो आणि ह्यांना काहीही करुन भारतात हिंदू विचारांचं शासन नकोय. आता या ज्येष्ठ डाव्या मंडळींचं कुणीही ऐकत नाही. म्हणून जिग्नेश मेवाणी सारख्या युवा नेत्यांच्या खांद्यावरुन ही मंडळी मोदींवर वार करीत आहेत. मग कोणतीही कुवत नसताना प्रसिद्ध झालेले जिग्नेश मेवाणी सारखे नेते स्वतः भारत भाग्य विधाता असल्या सारखे वागू लागतात आणि मोदीं सारख्या जुन्या जाणत्या आणि यशस्वी नेत्यावर टिका करु लागतात, लोकशाहीत टिका झालीच पाहिजे. पण ह्यांची कुवत नसल्यामुळे टिका करताना सुद्धा ह्यांचे भान सुटते, मग ते मोदी बुढ्ढा म्हणत अपमान करतात. पण कुणाही स्वयंघोषित पुरोगाम्याला जिग्नेशचे कान धरावेसे वाटत नाही. त्यांनाही यात आनंद मिळतो. अर्थात मोदी वेळ आल्यावर त्यांना उत्तर देतीलच. पण मोदी वेळोवेळी आपल्या कार्यातून उत्तर देतच आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर बहिष्कारीत झालेले व अमेरीकेने व्हिजा नाकारलेले मोदी आज आंतरराष्ट्रीय स्थरावर लोकप्रिय होत आहेत. मोदींमुळे अनेक आंतरराष्ट्रीय राजकीय पंडितांना भारताविषयी लिहावेसे करावेसे वाटत आहे. मोदी पंतप्रधान झाले तेव्हा सरकारी बाबू वेळेवर कामाला येतात अशी बातमी छापून आली होती. याचा अर्थ पूर्वी मनमोहन सिंह यांच्यासारख्या उच्चशिक्षित माणसाच्या नेतृत्वाखाली ही मंडळी कामं टाळायची. पण मोदी आल्याने त्यांच्यावर वचक बसला. म्हणजे 67 वर्षाचा बुढ्ढा स्वतः प्रामाणिकपणे काम करतो. म्हणूनच इतरांच्या मनात वचक निर्माण होतो. मोदी देशाचा कारभार सांभाळून भाजपसाठी निवडणुकाही जिंकून देतात. तरीही 67 वर्षांचा बुढ्ढा थकत नाही. तो सतत कार्य करीत राहतो. विरोधक टीका करत राहतात आणि हा केवळ कार्य करीत राहतो. कधीतरी आपल्यावर झालेल्या टिकेचा समाचारही घेतो. पण त्याचेही अपचन विरोधकांना होते. जिग्नेश मेवाणी म्हणाला की ‘‘उनको घर बैठना चाहिये आणि हिमालय में जाकर हड्डियां गलाने चाहिये.’’ जिग्नेशला वाटतं की हा बुढ्ढा बोरींग आहे पण या बुढ्ढ्याचे अनेक समर्थक आहेत. या बुढ्ढ्याकडे पाहून लोकांना प्रेरणा मिळत आहे. सर्वसामान्य परिवारातून येऊन इतक्या मोठ्या पदाला पोहोचल्यामुळे हा बुढ्ढा धडपड्या तरुणांचा आदर्श आहे. जिग्नेशला देशाचं नेतृत्व करायचं आहे. पण देशाचं काय तर केवळ दलित समाजाचंही नेतृत्व करण्यास तो सक्षम नाही. पहिले कारण मोदी बुढ्ढ्याप्रमाणे त्याला देश जोडायचा नसून तोडायचा आहे. म्हणून तो जातीयवादी राजकारण करत आहे. पण मोदींनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही. दुसरे कारण बाबासाहेब आंबेडकरांसारख्या दिग्गज नेत्याने एक मोठा आदर्श निर्माण करुन ठेवला आहे. त्या आदर्श परंपरेत जिग्नेश कुठेच बसत नाही आणि मोदी सुद्धा उच्च घराण्यातून आलेले नाहीत. पण तरीही ते लोकनेता झाले. संयम, दूरदृष्टी या बळावर ते इथपर्यंत पोहोचले. अजूनही ते नम्र आहेत. राजकीय भाषणात विरोधकांना धोबीपछाड करावे लागतेच. पण तरीही ते सुसंस्कृत घराण्यातले वाटतात. हे हीराबेन मोदी यांचे संस्कार आहेत. मोदींचे जवळचे अनेक नातेवाईक राजकारणात नसून सर्वसाधारण आयुष्य जगत आहेत. हा आदर्श मोदींनी निर्माण केला आहे. कुटुंब कल्याणापेक्षा त्यांना लोककल्याण महत्वाचे वाटते. या वयातही त्यांचा आत्मविश्वास, त्यांची कृती तरुणांना लाजवणारी आहे. जिग्नेश आणि त्याच्या सारख्या काही मंडळींना मोदी हे बुढ्ढा वाटत असले तरी मोदी आपल्या कृतीद्वारे जणू दाखवून देत आहेत की बुढ्ढा होगा तेरा बाप...
जयेश मेस्त्री
9967796254
साप्ताहिक 'चपराक' २५ डिसेंबर २०१७
साप्ताहिक 'चपराक' - २५ डिसेंबर २०१७
महाड येथे प्राथमिक शिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली होती ती प्राचार्य गजेेंद्रगडकर यांच्यामुळे. ते चंद्रपूर येथे बदलून गेले होते तरी त्यांचे मन माझ्यात गुंतले होते. मला मुलगा मानून माझ्यातला साहित्यिक त्यांनी जागा केला होता. ‘आचार्य’ची परीक्षाही द्यायला लावली होती. मनाने आम्ही दोघे कमालीचे जवळ आलो होतो. त्यातून त्यांची पितृछायाच मिळाली होती. रायगड खोर्यातील सांदोशी गावी कडेकपारीत बदली झाल्यामुळे माझ्यातला कलावंत मरून जाईल म्हणून ते बेचैन झाले होते. इतक्या दूरवर जाऊनही त्यांना मला विसरता येत नव्हते. त्यांनी संधी मिळताच रायगडच्या शिक्षण अधिकार्याला सांगितले व माझी बदली महाडला झाली.
महाडची शाळा तशी जुनी आणि नावाजलेली. त्या शाळेत चिंतामणरापांनी (सीडी देशमुख) शिक्षण घेतले होते. या शाळेत माझ्या वाट्याला चौथीचा वर्ग आला होता. जी जुनी-जाणती माणसे होती त्यांच्या ‘वजनानुसार’ त्यांना वरचे वर्ग मिळालेले होते. त्यातून त्या काळात सातव्या यत्तेला विलक्षण महत्त्व आले होते. त्यामुळे वाडकर, उमरटकर, रा. मो. शेठ ही वयाने मोठी असलेली माणसे वरचे वर्ग ‘सांभाळीत’ होती. त्यातून मी तसा अगदीच नवा होतो. तरी बरे, चौथी तरी दिली होती. त्याचेही कारण होते. खालच्या तीन यत्तांचा ‘सांभाळ’ महिला शिक्षक करीत होत्या. त्यात केशवराव जावडेकरांची पत्नी होती. प्रकाश हा त्यांचा मुलगा पत्र्याच्या त्या शाळेत त्याकाळी शिकत होता. पुढे माध्यमिक शिक्षक म्हणून परांजपे विद्यामंदिरात मी अध्यापन करीत असताना तो नववीच्या वर्गात विद्यार्थी म्हणून शिकत होता. प्रकाशच्या वडिलांशी माझा स्नेहसंबंध फारच जुना असा होता. ‘केसरी’मध्ये ते वृत्तसंपादक होते. मी ‘आचार्य’ परीक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम येताच त्यांनी ती बातमी ‘केसरी’च्या पहिल्या पानावर अगदी ठळकपणे छापली होती. ते मधूनमधून महाडला येत असत. त्यांचा माझ्याशी पत्रव्यवहार हा शेवटपर्यंत होता.
चौथीच्या वर्गात जी मुले होती ती आडदांड अशी होती. या वर्गाचा धाक सर्व शाळेला होता. अशी मुले मला शिकवायची होती. विशेष म्हणजे या मुलांचे माझ्यावर फारच प्रेम बसले होते. गंमत ही की, मी माध्यमिक शिक्षक म्हणून परांजपे विद्यामंदिरात काम करीत असताना हा वर्ग ‘हूड’ म्हणून प्रसिद्ध पावला होता व हा खट्याळ मुलांचा वर्ग मला मुद्दामच देण्यात आला होता. हेतू हा की, माझी पुरती जिरावी! पण झाले उलट! ती मुले पूर्वीची मराठी चौथीतली होती; त्यामुळे मला चांगली माहितीची होती. माझे त्यांनी स्वागतच केले होते आणि त्यामुळे तेथील ‘हितचिंतकांची’ पुरती जिरली होती.
प्राथमिक शिक्षक असतानाच एका विद्यार्थ्याने एक दिवस भाजी मंडईतून भाजी खरेदी करीत असताना मला पाहिले. त्याच्या मोठ्या भावाचे हॉटेल होते ते बाजारपेठेत. त्याने मला पाहताच धाव घेतली आणि म्हटले, ‘‘गुरूजी चला माझ्याकडे चहा घ्यायला.’’
मी विचारले, ‘‘इथे तुझे घर कुठे जवळ आहे काय?’’
त्यावर तो म्हणाला - ‘‘घर नाही, माझ्या भावाचे हॉटेल आहे. ते समोर दिसते तेच. शाळा सुटल्यावर मीच गल्ल्यावर उभा असतो.’’
माझी शिस्त अशी होती की मी सहसा हॉटेलात कधी जात नव्हतो. म्हणून त्याला म्हटले, ‘‘अरे, मी हॉटेलात कधी जात नसतो. तुला माहिती आहे ना?’’
तो म्हणाला, ‘‘मला चांगलं माहीत आहे. तरीही मला वाटते की तुमचे पाया माझ्या हॉटेलात लागावेत. थोडातरी चहा घ्या आणि मगच घरी जा.’’
त्याची ही भावना अव्हेरावी असे न वाटल्याने मी त्याच्या बरोबर गेलो.
गल्ल्यावर पैसे देण्यासाठी त्यावेळी रांग लागलेली होती. त्या रांगेला बाजूला सारून त्याने मला जवळच खुर्ची दिली व ‘स्पेशल’ची ऑर्डर दिली.
हॉटेल बाजारातच असल्याने त्या हॉटेलात नेहमीच गर्दी फुललेली असे. माझ्यासाठी ‘ऑर्डर’ दिली होती, तरीही चहा यायला वेळ लागला होता. मी वेळ फुकट जात होता म्हणून थोडा बेचैन होतो. त्याहीपेक्षा इथे बसून आपण काहीच करू शकत नाही याचे मला वाईट वाटत होते. तेवढ्यात बाजूला पडलेल्या रद्दीकडे माझे लक्ष गेले. काही तरी वाचायला मिळेल म्हणून मी ती रद्दी चाळायला लागलो, तोच एक जुने हस्तलिखित माझ्या हाती लागले. मी अधाशासारखे ते वाचायला लागलो. ते हस्तालिखित होते कविश्रेष्ठ भालचंद्रांचे! हे भालचंद्र म्हणजे केशवसुत संप्रदायातले प्रसिद्ध कवी तर होतेच शिवाय मराठीत ‘प्रहसन’ हा वाड्ःमय प्रकार मराठी साहित्यात प्रथम त्यांनी आणलेला होता. उत्तम प्रहसनकार म्हणून ते मासिक ‘मनोरंजन’ मध्ये गाजलेले लेखकही होते. माझ्या दृष्टीने त्यांचे जे मोठेपण होते ते कवितेच्या दृष्टीने. ‘शिवदर्शिकाकार भालचंद्र’ हे त्यांनी स्वतः होऊन घेतलेले असे टोपणनाव होते. त्या काळात बहुतेक कवी ‘टोपण’ नावानेच लिहीत असायचे. गिरीश, केशवकुमार, बालकवी, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, बी ही त्यातलीच नावेे होती. भालचंद्रांचे पूर्ण नाव होते गणेश नारायण टिपणीस. महाडच्या माध्यमिक शाळेत ते शिक्षक होते. त्यापूर्वी ते पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते. घरची शेती भरपूर होती. ती सांभाळायला कुणी जबाबदार हवे होते म्हणून ते महाडात परतले होते.
पुण्यात असताना राम गणेश गडकरी, बालकवी ठोंबरे हे त्यांचे जिवश्च कंठश्च असे मित्र होते. या तिघांनी एकत्रितपणे आपल्या कविता लिहिल्या होत्या तशाच त्या वाचल्याही होत्या. त्यातूनच त्या तिघांचे ‘अरूण’ एकाचवेळी जन्म पावलेले होते. आचार्य परीक्षेच्या निमित्ताने ‘मनोरंजन’सारखे अनेक जुने अंक, ‘विविधज्ञान विस्तार’चे अंक मी अभ्यासले होते. त्या त्या वेळी भालचंद्रांच्या अनेक कविता वाचनात आल्या होत्या. अशा या मोठ्या कवीचे ‘शिवदर्शिका’ हस्तलिखित माझ्या हाती अचानक पण चहाच्या निमित्ताने लागले होते. मी विद्यार्थ्याला म्हटले, ‘‘तुझा चहा राहू दे. त्या चहापेक्षा मला मोठा चहा मिळाला आहे. मी निघतो. मी हे हस्तलिखित नेऊ का?’’
या प्रप्रश्नावर तो चकितच झाला. मला म्हणाला, ‘‘कसले ते? काय नेऊन करणार? गुरूजी, चिवडा बांधायलासुद्धा हा कागद उपयोगी येईना म्हणून मी बाजूला टाकले होते. ते तुम्हाला आवडले?’’
मी म्हटले, ‘‘अरे तुझ्या चहाच्या निमित्ताने मला फार मोठे खाद्य मिळाले आहे. तुला हे मिळाले कुठे?’’
त्यावर तो म्हणाला, ‘‘माझ्याकडे जी रद्दी आली त्यात हे आले. थांबा; चहा घ्या आणि तुम्हाला आवडलेले ते बाडही घेऊन जा.’’ चहा घेऊन मी निघालो.
घरी आल्यावर मी त्या ‘शिवदार्शिका’हस्तलिखितानेच वेडा झालो होतो. एकामागून एक कविताच वाचत होतो. 97 कवितांचे ते हस्तलिखित होते. त्यातून भालचंद्रांनी स्वतःच्या हस्ताक्षरात त्या सर्व कविता लिहिल्या तर होत्याच पण ज्या ज्या मासिकात त्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्या मासिकांच्या नावाचीही नोंद केली होती. माझ्यादृष्टीने ती गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती. भालचंद्र, बालकवी, गोविंदाग्रज पुण्यात वास्तव्याला होते त्यावेळी एक छोटा कवी, ‘बालकवी’ही त्यांच्या सहवासात आला होता. त्याचे हे तिघांशी भावनिकअसे नातेही निर्माण झाले होते. हा ‘बालकवी’ म्हणजेच सुप्रसिद्ध कादंबरीकार रघुनाथ वामन तथा र. वा. दिघे होत. या तिघांचे ‘अरूण’ त्याने एकत्रितपणे ऐकले तर होतेच पण खुद्द बालकवींबरोबर (ठोंबरे) ते पर्वतीवर रोज फिरायलाही जात होते. त्यांना गोविंदाग्रजांनीच ‘बालकवी’ संबोधले होते. ‘वाग्वैजयंती’मध्ये त्यांच्यावर गडकर्यांनी एक कविताही लिहिलेली आहे. गडकरी कर्जतला (रायगड) असताना खोपोलीत र. वा. दिघे यांना नेहमीच भेटायलाही येत होते. भालचंद्रांच्या तर अनेक कविता र. वा. दिघे यांच्या तोंडी रूळल्याही होत्या.
हे हस्तलिखित मिळताच त्यांनी कवितांची नक्कल करून सर्व कविता माझ्याकडे मागितल्या होत्या आणि मी 97 कवितांची ती वही त्यांना दिलीही होती. आचार्य परीक्षेच्या निमित्ताने मी जी असंख्य पुस्तके अभ्यासली होती त्यात नागपूरच्या भ. श्री. पंडितांचे ‘आधुनिक मराठी कवितेचे स्वरूप’ हेही पुस्तक अभ्यासले होते. भालचंद्रांचे हस्तलिखित हाती मिळताच त्यांच्याशी माझा पत्रव्यवहार सुरू झाला तो त्यांच्या काही विधानांवर आक्षेप घेऊनच. मी त्यांना त्या पुस्तकात 3/4 ठिकाणी ‘भालचंद्र’ म्हणून जो उल्लेख आला होता त्याबाबत विचारले होते. त्यांना जे नीटसे स्पष्टीकरण देता आले नव्हते. तसे त्यांचे पत्रही आले होते. मात्र त्यांच्या त्या पुस्तकात त्यांनी जे वाक्य उच्चारले होते तेे आधाराला घेऊन मी प्रश्न विचारला होता. ते वाक्य असे होते, ‘भालचंद्रांच्या कवितेत चटका असे परंतु त्यांचे काव्य अत्यल्प असे आहे.’ बी कवींच्या कवितेवर भ. श्री. पंडितांनी मात्र भरभरून लिहिले होते. मी त्यांना विचारले, ‘‘बी कवींपेक्षाही अधिक काव्य भालचंद्रांनी लिहूनही आपण अल्पशब्दात त्यांना बाजूला का केलेत?’’
तेव्हा त्यांनी पत्रात लिहिले की बी कवींच्या जवळजवळ 45 कविता लिहिलेल्या आहेत तेवढ्याही मला भालचंद्रांच्या आढळल्या नाहीत.’’
मी मग भ श्रींना 97 कवितांची यादी पाठवली आणि स्पष्टपणे म्हटले की, आपल्यापुढे ‘मासिक मनोरंजन’चे अंक तेवढे होते त्यामुळे आपण ‘ते’ विधान केलेत. ही यादी पहा. ‘बी’ कवींपेक्षा भालचंद्रांच्या कविता दुप्पट अधिक अशा आहेत. त्यांनाही ते पटले व त्यांनी पत्रात मान्यही केले की ‘मासिक मनोरंजन’चे जे अंक हाती आले त्या आधारावर मी ते वाक्य लिहून गेलो.’’
भालचंद्रांच्या त्या हस्तलिखितामुळे भ. श्रींची व आमची चांगलीच जोडी जमली. ती इतकी की ‘‘मी पी.एच.डी केल्यास मार्गदर्शनासाठी मुंबईत येऊन राहील’’ असेही त्यांनी म्हटले. माझा ‘झंकार’ हा काव्यसंग्रह त्या काळात प्रसिद्ध व्हायचा होता. मी प्रस्तावनेसाठी त्यांच्याकडे हस्तलिखित पाठवताच त्यांनी प्रदीर्घ अशी प्रस्तावना पाठवली. मी ती छापली आणि ‘झंकार’ काव्यसंग्रह दिमाखात प्रकाशित झाला. त्यात कुसुमाग्रजांचाही अभिप्राय प्रसिद्ध केलेला आहे. त्यांच्याशी तर सतत पत्रव्यवहारच होता.
भालचंद्रांनी केशवसुतांवर जशी कविता लिहिली तशीच बालकवींवरही लिहिली होती. ‘ठोंबरे मरे; तो काळाला पुरूनि उरे’ अशी त्यांची कवितेची ओळ होती. गडकर्यांच्या ‘दसरा’ या गाजलेल्या समाजपरिवर्तनपर कवितेशी भालचंद्रांच्या कवितांचा जो संबंध आला आहे तो या कवितेच्या शेवटच्या ओळीत. गोंविदाग्रजांनी शेवटची ओळ लिहिली आहे.
‘अतारकरांची झडवा नौबत!’ भालचंद्रांची हस्तलिखितात जी कविता आहे ती ‘अतारकरांस’ या नावाची! आणि हीच कविता मासिक ‘मनोरंजन’मध्ये जी प्रसिद्ध झाली ती नेमकी ’नौबत’ या नावाने. गडकर्यांनी मित्रप्रेमातून या दोन्ही नावांचा मिलाफ घडवून आणून ती ओळ ‘दसरा’ कवितेत शेवटी लिहून टाकलेली आहे, हे ‘सत्य’ मला वाटते भल्याभल्यांना अजूनही कळलेले नाही. गडकर्यांना एखादा शब्द किंवा ओळ आवडली की ते त्यांचा अचूक उपयोग करून घेत असत. र. वा दिघे यांची ‘झरा’ कविता (ती रत्नागिरीत लिहिलेली) वाचनात येताच गडकरी म्हणाले होते की, ‘मी या झर्यातून प्रलय निर्माण करीन’ आणि त्यांनी ते तसेच करूनही दाखवले. गडकर्यांच्या कवितेतून असे ‘प्रेम’ अनेक ठिकाणी दाखवूनही देता येते. र. वा. दिघ्यांनी ते मला अनेकदा जाणवूनही दिलेले आहे.
‘जुनी कविता आता वाचणार कोण?’ या प्रकाशकांच्या विचारधारेमुळे ते हस्तलिखित पुढे प्रकाशात येऊ शकलेले नाही. शासनाने ते प्रसिद्ध करावे म्हणून प्रयत्न करूनही साहित्य संस्कृती मंडळाने त्याची दखलही घेतलेली नाही. शेवटी मराठीतील एक अजोड संपत्ती म्हणून भालचंद्रांचे ते हस्तलिखित जिवापाड जपूनही ठेवलेले आहे. एक इतिहासाची साक्ष म्हणून मला ते नेहमीच अधिक मोलाचे वाटत राहिलेले आहे. या हस्तलिखितांमुळे भ. श्री. पंडितांची मैत्री लाभली तसाच र. वा. दिघे यांच्याशी दाट असा स्नेहसंबंधही जुळून आला. मैत्रीची साक्ष म्हणून ‘शिवदार्शिका’ या हस्तलिखिताला माझ्या दृष्टीने केवढे तरी मोल आहे हे काय सांगायला हवे?
- डॉ. माधव पोतदार
(सुप्रसिद्ध लेखक आणि पत्रकार)
साप्ताहिक 'चपराक' - २५ डिसेंबर २०१७
साप्ताहिक 'चपराक'
१८ डिसेंबर २०१७
2011 साली ‘मर्डर 2’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘मर्डर 1’ मधील गाणी खूप चालली. मी बसने मुंबईत प्रवास करत होतो. माझ्या पुढच्या सीटवर एक तरुण माणूस आपल्या 4 (अंदाजे) वर्षाच्या मुलासोबत बसला होता. पोरगं बाहेरचं जग न्याहाळण्यात मग्न होतं. अचानक त्याला ‘मर्डर 2’चं पोस्टर दिसलं. ते पोस्टर पाहून पोरगं बापाला म्हणालं, ‘‘पप्पा, ते बघा कांदे बटाटे.’’ बापाला काय बोलावं तेच कळलं नाही. तो त्या पोरावर ओरडला आणि म्हणाला, ‘‘गप्प, असं नाही बोलायचं.’’ पोरगं गप्प बसलं.
त्या पोस्टरमध्ये जॅकलीन फर्नांडिस इम्रान हाश्मीच्या पाठीवर बसली आहे. ती पोज आपण लहान मुलांना ‘कांदे बटाटे’ असं म्हणत खेळवतो तशी होती. त्या पिटुकल्या लेकराला आठवलं असणार की आपले पप्पासुद्धा आपल्याला असंच उचलून घेतात. पण हा तर लहान मुलांचा खेळ. मग त्या इम्रानकाकाने जॅकलीन मावशीला असे का उचलले असेल? मोठी माणसंही असा खेळ खेळतात का? असा प्रश्न त्या चिमुकल्या जिवाला पडला असणार! म्हणून मुलगा असं म्हणाला, पण पप्पाला लाज वाटली की आता याबद्दल मुलाला कसं सांगायचं? की हा लहान मुलांचा खेळ नसून हा मोठ्या माणसांचा वेगळाच खेळ आहे.
या चित्रपटाची आणि प्रसंगाची आठवण काढण्याचे कारण म्हणजे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टीव्हीवरील कंडोमच्या जाहिरातींसाठी वेळ निश्चित केली आहे. वाहिन्यांना सकाळी 6 ते रात्री 10 दरम्यान कंडोमच्या जाहिराती दाखवता येणार नाहीत. रात्री 10 च्या नंतर मुले टिव्ही बघत नाहीत असा सरकारचा निष्कर्श आहे. अश्लिलतेकडे झुकणार्या आणि मनात घृणा निर्माण करणार्या जाहिरातींवर बंदी घातली जाऊ शकते, असे नियम आहेत असे सरकारने सांगितले आहे.
यावरुन सरकारवर स्तुती सुमने उधळली गेली आणि तसेच प्रचंड टीकाही झाली. भाजपचे सरकार आल्यापासून माहिती आणि प्रसारण मंत्रालयावर अनेक टीका झाल्या आहेत. सेन्सॉर बोर्डला ‘संस्कार बोर्ड’ म्हणत खिल्लीही उडवण्यात आली आहे. जेम्स बॉण्डच्या चित्रपटतील चुंबनाच्या दृश्यांबद्दल खूप मोठा वाद झाला होता. ‘उडता पंजाब’वरील वाद तर प्रचंड गाजला. आता तर ‘सेक्सी दुर्गा’ आणि ‘न्यूड’ चित्रपटांवरील वाद अजूनही चघळला जात आहे.
पहिली गोष्ट अशी की सरकारने लोकांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेतली पाहिजे. हे सरकारचे कर्तव्यच आहे. म्हणूनच ‘पहले शौचालय फिर देवालय’ अशी घोषणा मोदींनी केली असावी. लोकांचे शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी या सरकारने बरेच कष्ट घेतले आहेत. तसेच त्याबद्दल जनजागृतीही करण्यात आली आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुस्तकाचे आवरण काढून तो कागद आपल्या खिशात ठेवला. आपण स्वतः स्वच्छतेबाबत काटेकोर नियम पाळतो, हा संदेश मोदींना त्यातून द्यायचा आहे. यावरुनही बरेच चांगले वाईट संदेश व्हायरल झाले. ‘मोदी दिखावा करतात’ असे काहींनी म्हटले तर ‘मोदी बोलतात तसे स्वतः वागतात’ असे काही जणांनी म्हटले. स्वच्छता अभियान, शौचालय, शुद्ध जल, गंगा स्वच्छता अशा गोष्टींतून सरकारने बरेच प्रयत्न केले आहेत. या आधीच्या सरकारनेही यासाठी प्रयत्न केले होतेच पण भाजपने विकासासोबत स्वच्छता हा आपला अजेंडा बनवला आहे.
हे झाले शारीरिक स्वास्थ्य! पण मानसिक स्वास्थ्याचे काय? मानसिक स्वास्थ्य चांगले राहील यासाठी विशेष नियम करता येत नाहीत, कारण प्रत्येक गोष्टींसाठी तुम्ही कायदे करु शकत नाही. जर कुणी गुन्हा केला तर पुराव्यांच्या बळावर कायद्यानुसार त्याला शिक्षा होऊ शकते पण गुन्हा घडू नये किंवा तो करु नये यासाठी केवळ संस्कार कामाला येतात. आपण विना-तिकीट ट्रेनमधून प्रवास करु नये, हे संस्कार सांगतात आणि तसे केल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरेल ही कायद्यातील तरतूद आहे.
सरकार लोकांवर संस्कार करु शकत नाही. सरकार कुणाच्याही बेडरुममध्ये डोकावून पाहू शकत नाही. तो अधिकार त्यांना नाही. मुळात सरकारने कलेच्या संदर्भात कोणत्याही सामाजिक, राजकीय व धार्मिक दबावाला बळी पडू नये. मुलांनी काय पहावं किंवा काय पाहू नये यावर मर्यादा घालण्याचा अधिकार पालकांना आहे. सरकारने कोणतेही धोरण ठरवण्याआधी पालकांचे मन जाणून घेतले पाहिजे. हे अगदी खरे आहे की काही गोष्टी या लहान मुलांकरिता नसतात. मी लहानपणी ‘स्मॉल वंडर’ नावाची मालिका पहायचो. अतिशय सुंदर मालिका होती ती. त्या मालिकेतील पालक आपल्या मुलांसमोर एकमेकांचे चुंबन घ्यायचे. तरीही आमच्या बालमनावर कोणताच परिणाम झाला नाही. त्यात आम्हाला वावगे असे काही वाटले नाही.
स्मॉल वंडरचा एक एपिसोड तर मुल कसं जन्माला येतं या लाईनवर होता. त्यातील लहान मुलगा याबद्दल आपल्या बाबांना प्रश्न विचारतो. तेव्हा बाबांना काय उत्तर द्यायचे कळत नाही. म्हणून बाबा काहीही थापा मारतात. तेव्हा तो मुलगा म्हणतो, ‘‘तुम्ही चुकीचे बोलत आहात. तुम्हाला काही माहीत नाही. मुल कसं जन्माला येतं हे मला माहिती आहे’’ आणि त्याचे बाबा आश्चर्यचकित होतात. हा एपिसोड मी लहानपणी पाहिला होता. बालमन म्हणून काही प्रश्न मला पडले पण मनावर विपरित परिणाम झाला नाही. याचं कारण मुलांवर वाईट परिणाम होणार नाही याची काळजी या मालिकेत घेतली होती.
आता आपण कंडोमच्या जाहिरातीबद्दल विचार करुया. याआधीही काही जाहिराती आल्या होत्या. त्या सांकेतिक होत्या. त्यात संभोगाबद्दल उघडपणे बोलले जात नव्हते. आताच्या बर्याच जाहिराती मुलांना दाखवू नये अशाच आहेत पण आता आपला समाज खूप पुढे गेला आहे. आपण कशाकशावर बंदी आणणार? आता तुम्ही एका क्लिकवर पॉर्न पाहू शकता. युट्यूब आणि वेबसाईट्सवर असे अनेक कंटेंट्स आहेत. त्यामुळे केवळ कंडोमच्या जाहिरातीची वेळ निश्चित केल्याने मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होणारच नाही, असे ठामपणे सांगता येईल का?
आताचे चित्रपट बोल्ड आहेत. आताच्या मालिका रिऍलिटी शो हे सर्व बोल्ड झाले आहेत. यामुळे सुद्धा मुलांच्या मनावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. यावर सरकार निर्बंध लादू शकत नाही हे सत्य आहे. त्यामुळे सरकारने याविषयी जनतेचे मत जाणून घेणे उपयुक्त ठरेल. स्वतःचे हसे करुन घेण्यापेक्षा हा मार्ग उत्तम आहे. आपल्याकडे लोकशाही प्रणाली आहे आणि लोकशाही प्रणालीत बहुसंख्यांच्या मतांचा आदर केला जातो. आपले सरकार असेच निवडून येते. म्हणून अशा गोष्टींसाठी सरकारने जनमत लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेही मोदींचं सरकार सोशल मीडियावर सतर्क आहे. मोदी काही कार्यासाठी लोकांची मते जाणून घेतात. तशी ऑनलाईन सोय त्यांनी करुन दिली आहे. त्यामुळे अशा काही निर्णयामुळे सरकारची अब्रू घालवण्यापेक्षा लोकांचे सल्ले घेणे उपयुक्त ठरेल. सेक्स (सेक्शुअल लिबर्टी) आणि सिटीचा सबंध आहे पण ग्रामीण भागात आजही अनेक गोष्टींसाठी बंधने आहेत. शहरातले लोक फॉरवर्ड वगैरे समजले जातात. त्यामुळे शहरातल्या लोकांसोबत ग्रामीण भागातील लोकांचे म्हणणे सुद्धा ऐकावयास हवे.
सेक्स हा समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यातून नवा समाज घडतो पण सेक्समुळे आनंद सुद्धा मिळतो. त्यासाठी कंडोमची निर्मिती केली आहे. त्याची जाहिरात झाली पाहिजे पण त्या जाहिराती विशिष्ट वयोगटासाठीच आहेत. मुळात जाहिरात हा शब्दच शोभा करणे किंवा एखादी गोष्ट पसरवणे अशा संदर्भाचा आहे. जाहिराती सर्वांसाठीच खुल्या असतात. एड्सला रोखण्यासाठी गर्भ निरोधक आणि कंडोमचा वापर करावा, अशी जनजागृती सरकारकडून केली जाते. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी मोफत कंडोमचे वाटप देखील केले जाते. अर्थात सरकारच्या जाहिराती बोल्ड नसतात. त्यात प्रबोधन असते. आताच्या कंडोमच्या जाहिराती, लोकांनी कंडोमचा वापर करुन सेक्सचा आनंद लुटावा यासाठी केल्या जातात. म्हणूनच त्यांच्या जाहिराती प्रौढांसाठी आनंददायी ठरतील अशाचप्रकारे निर्माण करण्यात आलेल्या आहेत. यावर निर्बंध हवेच पण सरकारला कुणी सांगितले की लहान मुलं रात्री 10 नंतर टिव्ही बघत नाहीत? सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुले टिव्ही पाहतात, हे कोणत्या रिसर्चवर आधारित आहे? सरकारचा हेतू शुद्ध असेल पण त्यासाठी सरकारने आधी रिसर्च करायला हवा.
लहान मुले घरात टिव्ही सुरु असेपर्यंत टिव्ही पाहतात. माझा मुलगा तरी असाच करतो. सेन्सॉरमध्ये युए नावाचं सर्टिफिकेशन दिलं जातं. याचा अर्थ तो चित्रपट मुले पालकांच्या मार्गदर्शनाखाली पाहू शकतात. माझ्यामते ए म्हणजे ऍडल्ट सर्टिफिकेट असलेला चित्रपट, जाहिरात टिव्हीवर शक्यतो दाखवत नाही. याचा अर्थ कंडोमच्या जाहिरातीला युए सर्टिफिकेट मिळत असणार. त्यामुळे आपल्या मुलांनी काय पहावं आणि काय पाहू नये याचा विचार पालकांनाच करु द्यावा. सरकारने शक्यतो त्यात लुडबुड करु नये. केल्यास पालकांचे मत जाणून घ्यावे. तसंही इम्रान हाश्मी आणि जॅकलीन फर्नांडिस ‘कांदे बटाटे’ खेळतात की अजून कोणता खेळ खेळतात, याचे उत्तर पालकच देतील.
- जयेश मेस्त्री
९९६७७९६२५४
साप्ताहिक 'चपराक'
१८ डिसेंबर २०१७
(साप्ताहिक 'चपराक' १८ डिसेंबर २०१७)
परमपूज्य गाडगेबाबा यांच्या जीवनावर आणि जीवनकार्यावर ज्या मान्यवर लेखकांनी लेखन केले, त्यातील अनेकांनी त्यांच्या अद्वितीय कार्याने प्रभावित होऊन त्यांना आपापल्या परीने गौरविले आहे. कुणी त्यांना समाजवादी संत म्हटले, कुणी त्यांना क्रांतिकारी संत असे संबोधिले आहे. कुणी त्यांना समाजक्रांतीचा अग्रदूत या शब्दांनी गौरविले आहे. कुणी त्यांना समतेचा नंदादीप म्हटले तर कुणी त्यांना वंदनीय वैराग्यमूर्ती या शब्दात गौरविले आहे. गो. नी. दांडेकर यांनी तर त्यांची ‘अमर्याद’ या एकाच शब्दातून थोरवी सांगितली आहे. या थोर मान्यवरांनी गाडगेबाबांचा केलेला गौरव आणि त्यांना बहाल केलेली बिरूदे ही त्यांच्या जीवनाचा विचार करता यथार्थ आहेत; यात शंकाच नाही. किंबहुना त्यांच्या कार्याचा विचार करता आणखी काही विशेषणे त्यांना बहाल केली तरी ती अपुरीच पडतील, यात शंका नाही! पण या सार्या बिरूदांच्या पलीकडे जाणारे त्यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व पाहता त्यांना ‘लोकोत्तर’ याच विशेषणाने गौरवावे असे मला मनापासून वाटते.
वंदनीय गाडगेबाबांना मी ‘लोकोत्तर’ या शब्दाने गौरवितो याची अनेक कारणे त्यांच्याच आयुष्यात आपणाला पदोपदी सापडतात. त्यांनी व्रतस्थ वृत्तीने स्वीकारलेले ‘साधुत्त्व’ आणि ‘संतत्त्व’ लोकोत्तर होते. त्यांनी केलेला स्वतःचा आत्मिक विकास ‘लोकोत्तर’ होता. त्यांची कृतार्थ जीवनाची धारणा लोकोत्तर होती. त्यांचे चरित्र आणि चारित्र्य लोकोत्तर होते. त्यांची अनासक्ती आणि इंद्रियदमन लोकोत्तर होते; नव्हे कमालीचे अपवादात्मक होते. त्यांनी केलेला संसार आणि कुटुंबियांना दिलेली वागणूक लोकोत्तर होती. त्यांची कीर्तनाची पद्धत पूर्णतः नवीन आणि तितकीच लोकोत्तर होती आणि धर्म, उपासना, कर्मकाण्ड, परंपरा आणि अंधश्रद्धेविरूद्ध केेलेला संघर्ष लोकोत्तर होता. त्यांच्याठायी असलेली करूणा, प्राणिमात्राविषयी असणारे वात्सल्य, उपेक्षितांविषयी वाटणारा जिव्हाळा आणि निसर्गापासून ते महारोग्यापर्यंत विस्तारलेले प्रेम हेही तितकेच लोकोत्तर होते आणि या सार्या गोष्टींचा झालेला परिपाक म्हणजे त्यांनी स्वतःच्या आचरणातून दिलेला संदेश हा देखील तितकाच लोकोत्तर होता.
इथेच न थांबता पुढे जाऊन असे म्हणता येईल की, त्यांची आश्रमातली शिस्त लोकोत्तर होती. त्यांनी प्रतिष्ठित केलेली स्वच्छता मोहिमदेखील लोकोत्तर म्हणावी लागेल. त्यातून त्यांनी शरीरकष्टाला दिलेली प्रतिष्ठा तितकीच लोकोत्तर म्हणावी लागेल. यापेक्षाही लोकोत्तर म्हणण्याचे कारण स्वतःच्या मृत्युकडे पाहण्याची त्यांची भूमिका असाधारण आणि लोकोत्तर अशीच आपणाला जाणवते. त्यांच्या अंगावरचे कपडे? त्यांना आपण कोणत्या शब्दांनी वर्णावे? असा कपडा म्हणजे जुन्या-पुराण्या नाना रंगांच्या ठिगळापासून हाताने शिवलेली आकारहीन गोधडी जगातच्या एकाही मान्यवराने एक व्रत म्हणून आयुष्यभर वापरली नसावी! त्यांनी ती नुसती वापरली नाही, तिला केवढी तरी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. अशा या प्रतिष्ठाप्राप्त वस्त्राला ‘लोकात्तर वस्त्र’ असे आपण संबोधिले तर वावगे होणार नाही. आजकाल हा शब्दही वापरून गुळगुळीत झालेला असला तरी, एक मात्र खरे की, उपेक्षित आणि सामाजिक प्रतिष्ठा नसलेल्या परीट समाजात जन्मलेल्या एक निरक्षर, दरिद्री आणि शेतातल्या चार बैलांबरोबर पाचवा बैल म्हणून राबणार्या माणसाने पन्नास वर्षे म्हणजे दिवसांच्या भाषेत अठरा हजार दिवस श्रीमंतीचा कलंक न लागलेल्या गरिबीत राहून, गरिबांच्या समवेत राहून, त्यांच्या क्षूद्र व विझत चाललेल्या आयुष्याला चेतविले. त्यांच्या जीवनात प्रकाश पेरला, त्यांच्यावर सुसंस्कार केले, संसाराला परमार्थाची जोड दिली. नानाविध बंधनांनी जखडलेल्या गरिबांना बंधमुक्त केले. त्यांना आपल्या जीवनातील श्रेयसाचा साक्षात्कार घडविला. या सर्वांसाठी गाडगेबाबांना ‘लोकोत्तर’ हाच शब्द वापरावा लागेल, यामध्ये तिळमात्र शंका नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा लोकोत्तर असलेला महापुरूष बाबांच्या मांडीशेजारी बसून त्यांना घोंगडीसारखी भेट देतो, यातूनही त्यांचे लोकोत्तर अधिक ठळक होऊन जाते.
परमपूज्य गाडगेबाबा यांना मला ‘लोकोत्तर’ विशेषण वापरावे वाटले याचे आणखी एक कारण असे की, गाडगेबाबांच्या काळात आणि आजच्याही काळाचा विचार करता एकाही साधुने किंवा स्वामी, आचार्याने हाती खराटा घेऊन आयुष्यभर स्वच्छतायज्ञाची निष्ठेने उपासना केलेली नाही. एकाही साधू अथवा आचार्याने अस्पृश्यासाठी मोफत धर्मशाळा बांधली नाही. भक्तांसाठी धर्मशाळा बांधून सुद्धा एकही महाराज शेजारी उभारलेल्या झोपडीत राहिला नाही. एकाही साधंने भक्तांनी पायाशी टाकलेला पैसा भक्तांसाठी आणि अनाथ मुलांसाठी वापरला नाही. महाराष्ट्रातल्या एकाही महाराजाने पायांना रूईची पाने बांधून राना-वनातून शेकडो मैलांचा प्रवास केलेला नाही. आजच्या काही महाराजांना तर ए.सी गाडी लागते. बिसलेरीचे बाटलीबंद पाणी लागते. निवार्यासाठी पंचतारांकित सोय हवी असते. समोरच्या टेबलवर ठेवलेला दुधाचा पेला हातात देण्यासाठी एखादा सेवक लागतो. गाडगेमहाराजांच्या काळात आणि आजच्याही काळात एकाही महाराजाने आपल्या आई, पत्नी, जावयाला धर्मशाळेच्या बांधकामावेळी मजूर म्हणून राबविले नाही. स्वतः बाबासुद्धा पंढरपूरच्या धर्मशाळेच्या बांधकामावेळी गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून राबले आहेत. तेही मजुरी न घेता. परमपूज्य गाडगेबाबा यांनी कुठलाही आदेश नसताना सारा गाव स्वच्छ केल्यावर एखाद्या माऊलीने दिलेली शिळीपाकी भाकरही ईश्वरी प्रसाद म्हणून आनंदाने खाल्ली. आजच्या काळातल्या किती आचार्यांनी, महाराजांनी अशी श्रमाची भाकरी खाल्ली आहे? अथवा एकही महाराज मजूर म्हणून बांधकामावर राबला नाही. एकही साधू- महाराजाने भाविकांना मिष्टान्नाचा प्रसाद दिल्यावर स्वतःसाठी तळहातावर ओली-सुकी भाकरी घेऊन खाल्ली नाही.
भुकेल्या माणसाला अन्न देणे, तहानलेल्या माणसास पाणी देणे, अनाथांना आधार देणे, महारोग्याला साबण लावून आंघोळ घालणे, पन्नास वर्षात मुखामध्ये कोणताही गोड पदार्थ न घालणे असला ‘वेडेपणा’ महाराष्ट्रातल्या एकाही साधुने केलेला नाही. म्हणूनच त्यांना ‘लोकोत्तर’ हे बिरूद बहाल करणे योग्य वाटते. त्यातही आश्चर्यकारक गोष्ट अशी की, सर्व बाजुंनी अभावग्रस्त परिस्थिती असताना त्यांनी हे लोकोत्तर कार्य केलेले आहे. ज्याच्याकडे अभिमानाने मिरवावा असा उच्चतम वर्णाचा आणि खानदानीपणाचा वारसा नाही, ज्याच्या घरात विद्येची पंरपरा नाही, ज्याच्या घरातले वातावरण भक्ती, शिक्षण व अध्यात्म यास अनुकूल नव्हते, ज्याच्याकडे चार पिढ्यांनी बसून खावे अशी श्रीमंती नांदत नव्हती, ज्याच्या घरात समाजसेवेची प्रेरणा देणारे कोणी नव्हते, ज्याला कोणत्याही गुरूचा अनुग्रह लाभलेला नव्हता आणि ज्याने कधी प्राथमिक शाळेचा उंबरठाही पाहिला नाही असा एक कष्टकरी-नव्हे मातीत राबणारा, मातीत लोळणारा आणि ज्याच्या आयुष्याची कदाचित मातीच झाली असती, असा एक अतिसामान्य माणूस गगनगामी झेप घेऊन आभाळाएवढे कार्य करतो, हे खरोखरच आश्चर्यकारक म्हणावे लागेल. एखादा माणूस पंचपक्वान्ने खाण्याची सोय असतानाही सतत पन्नास वर्षे एखाद्या व्रताप्रमाणे केवळ भाजी-भाकरी, चटणी खाऊन जगतो, हे खरोखर जगातले एकमेव उदाहरण म्हणावे लागेल. आपण महिनाभर सुद्धा दोन्ही वेळेला ते खाऊ शकणार नाही. एवढेच नव्हे तर महिनाभर सकाळ-संध्याकाळी श्रीखंड, पुरी खायची ठरविली तरी त्या मिष्टान्नाचा आपणाला कंटाळ आल्याशिवाय राहणार नाही. या माणसाचे जिभेवर नियंत्रण किती होते याचे हे एक उदाहरण म्हणून सांगता येईल. येशू ख्रिस्ताचे एक चिरंतर सत्य सांगणारे विधान आहे. ख्रिस्त म्हणतात, ‘‘जो जीभ जिंकतो, तो जग जिंकतो.’’ खाण्याच्या संदर्भात आणि वेडेपणाने दर्पयुक्त बोलण्याच्या बाबतीत त्यांचे हे विधान लागू पडणारे आहे. थोडक्यात काय, चमत्कार न मानणार्या या माणसाचे सारे आयुष्यच एकापरीने मोठा चमत्कार होता, असे म्हणावेसे वाटते. अशा या थोर व्यक्तीला ‘लोकोत्तर’ या शब्दाशिवाय दुसरा कोणताही शब्द शोभून दिसला नसता, यात शंका नाही.
गाडगेबाबांनी केलेले कार्य केवळ भक्ती-प्रवचनापुरते मर्यादित नव्हते; उलट त्यांचे कार्य बहुआयामी आणि बहुस्तरीय स्वरूपाचे होते. मानवी जीवन आणि संस्कृती यांना समृद्ध करणार्या तसेच त्यांना उन्नत बनविणार्या सार्या क्षेत्रांना त्यांनी आपल्या कार्याद्वारे स्पर्श केला. असा स्पर्श दुसर्या कोणत्याही आचार्यांनी केलेला नाही. परमेश्वराचे साक्षात्कारी दर्शन आणि मोक्षप्राप्ती या वैयक्तिक गोष्टीसाठीच त्यांनी धर्म आणि अध्यात्माचा वापर केला. म्हणून संत साहित्याचे थोर अभ्यासक श्रीमान बाळासाहेब भारदे एका लेखात म्हणतात, ‘‘या देशात अनेक ज्ञानी झाले. अनेक भक्त झाले, योगी, संत आणि तत्त्वज्ञ झाले. त्यांनी केवळ आपल्या उद्धारासाठी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना ब्रह्मानंद कदाचित मिळाला असेलही; पण सामान्य माणसाच्या उद्धाराचा प्रयत्न त्यांंनी केला नाही. त्यांना आनंद झाला, लोकांना मात्र आनंद झाला नाही. हा संगम गाडगेबाबा आणि महात्मा गांधी यांच्या ठायी झालेला होता.’’
याची काही उदाहरणे देता येतील. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्याला हातभार लावला होता. त्यांनी गोरगरिबांसाठी स्वतः काही आश्रमशाळा काढल्या आणि त्याबरोबर त्यांनी रयत शिक्षण संस्था आणि ऍड. पंजाबराव देशमुखांच्या संस्थेला मोलाचे सहकार्य केले. ‘एक वेळ प्रसंग पडला तर जेवणाचा ताट मोडा, पण पोरांचे शिक्षण थांबवू नका’ असा आग्रह त्यांनी प्रवचनाद्वारे धरला. स्त्री-पुरूष समानतेचा आग्रह धरला. वृक्षारोपणास प्राधान्य दिले. व्यसनाधीनतेचा अधिक्षेप केला. विज्ञाननिष्ठेची कास धरली. प्रापंचिकाच्या एका खांद्यावर परमार्थ आणि दुसर्या खांद्यावर संसार घेऊन आनंदतीर्थाच्या प्रवासास जाण्यास शिकविले. त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे मौलिक कार्य केले. आदर्श आणि कृतार्थ जीवनाचा संदेश दिला. ‘‘सार्वजनिक पैसा स्वतः वापरणे म्हणजे विष्ठा खाण्यासारखे होय’’ असा संदेश देऊन सदाचार, सद्विचार, पावित्र्य, चारित्र्य, समाजसेवा आणि राष्ट्रनिष्ठा यांना असणारे महत्त्व स्पष्ट केले. समाज जीवनातील विविध क्षेत्रांना समृद्ध आणि गतिमान करण्याचे कार्य गाडगेबाबांशिवाय दुसर्या कुठल्याच साधू किंवा महाराजांनी केलेले नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
गाडगेबाबांच्या सर्वस्पर्शी जीवनकार्याचा सर्वांगीण व सूक्ष्म विचार केला तर आपणाला असे जाणवते की त्यांचे सारे प्रयोग माणसाला दुःखापासून मुक्त करण्याच्या ध्यासातून निर्माण झालेले आहेत. माणसाला कळणारे दुःख कशामुळे निर्माण होते हा खरा तर एक सनातन प्रश्न आहे. गौतम बुद्धाला तृष्णा हे दुःखाचे मूळ वाटते, महावीरांच्या मते हिंसेतून दुःख निर्माण होते. शंकराचार्यांना मायेतून दुःख निर्माण होते असे वाटते. महात्मा गांधीना संचयाची लालसा हे दुःखाचे कारण वाटते तर महात्मा फुल्यांना धार्मिक शोषणातून दुःखाचा जन्म होतो असे वाटते. गाडगेबाबांना वर दिलेली कारणे योग्य वाटतातच; पण त्यांच्या मते दुःख अज्ञानातून निर्माण होते. अंधश्रद्धा व कर्मकांडातून ते निर्माण होते. जाती-पातीच्या तटबंदातून दुःखाचा उगम होतो.
गुलामगिरीतून, दारिद्य्रातून आणि व्यसनाची शिकार झाल्याने माणसाला दुःख भोगावे लागते, असे त्यांचे निरीक्षण आहे आणि म्हणूनच या सार्यावर त्यांनी उपाय शोधले आणि त्यापरिने कार्य केले. महाराष्ट्रातल्या एकाही बाबाने असे कार्य केले नाही. त्यांच्या मते, निसर्ग माणसाला फार दुःख देत नाही. भूकंप, महापूर अथवा अवर्षण ही फार तर त्याची कारणे म्हणता येतील पण निसर्गापेक्षाही माणूसच स्वतःच्या आचरणातून दुःख निर्माण करतो. माणूसच दुसर्या माणसाला दुःखी करतो. स्वतःही दुःखाने होरपळून जातो पण त्यापासून तो मुक्ती घेत नाही. ते निवारण्यासाठी प्रयत्नही करीत नाही. त्यामुळे सामान्य माणूस जन्माला येताना सोबतीला दुःख घेऊन येतो; त्याच्या जगण्यात सोबतीला दुःख असतेच आणि मरतानाही दुःख सोबतीला घेऊनच मरतो. म्हणून सनातन दुःखाशी झुंज देणारा आणि सामान्य माणसाच्या दुःखावर फुंकर घालणारा हा महामानव होता, असे म्हणता येईल.
सामान्य माणसाचे दुःख कमी करण्याबरोबरच गाडगेबाबांनी धर्माचा अर्थ बदलला; ईश्वरपूजेचा अर्थ बदलला. साधू किंवा संत या शब्दाची व्याख्या बदलली. एवढेच नव्हे तर स्वर्ग आणि नरक, पाप आणि पुण्य, पवित्र आणि अपवित्र, अमृत आणि अप्सरा यात अडकून गरगरणार्या सामान्य माणसाला बाहेर खेचून धर्माचा प्राणभूत घटक त्यांच्या अंगणात उभा केला. कर्मकाडांनी माखलेली विधी-उपासना म्हणजे धर्म नव्हे; तर धर्म म्हणजे निरामय, निर्मळ, उन्नत, प्रवाही आणि जीवनदायी शाश्वत विचार म्हणजे धर्म होय! लौकिक आणि पारमाथिर्र्क जीवनाला समृद्ध करणारा शाश्वत विचार म्हणजे धर्म! हा धर्म बाबांनी लोकांना शिकवला. स्वतःच्या आचरणातही आणला. ज्या माणसाला वीसापर्यंतचे आकडे मोजता येत नव्हते, ज्याला बारखडीची अक्षरे ज्ञात नव्हती, ज्याला कुठलाही पंथ व परंपरा ठाऊक नव्हती, ज्याला कुठलाही ‘इझम्’ ठाऊक नव्हता, ज्याने आचार्यांच्या ज्ञान मंदिरात ज्ञानसाधना केली नव्हती अशा एका माणसाने शाश्वत स्वरूपाचे लोकोत्तर कार्य करावे आणि मानवी जीवन उन्नत होण्यासाठी पावला-पावलावर प्रकाशदीप पेटवावेत, याला ‘लोकोत्तर’ याशिवाय दुसरा शब्द नाही. एका निरक्षर माणसाच्या नावाने एखादे विद्यापीठ सुरू केले जाते, असे उदाहरण जगाच्या पाठीवर क्वचितच पहावयास मिळेल!
(साप्ताहिक 'चपराक' १८ डिसेंबर २०१७)
- डॉ. द. ता. भोसले, पंढरपूर
९४२२६४६८५५
देशातील तरुणांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, संशोधन क्षेत्रात देशाची मान उंचावली जावी, ज्ञान विज्ञानाचा प्रचार-प्रसार व्हावा या उदात्त हेतूने सरकाने देशभरात अनेक विद्यापीठांची स्थापना केली. त्याला करोडो रुपयांचे अनुदान दिले, आजही अविरतपणे दिले जात आहे. यातली बोटावर मोजण्याइतकी विद्यापीठं सोडली तर बाकीच्या विद्यापीठांचे संशोधनातील योगदान शून्यच आहे. ज्ञानदानाच्या व्यापक कार्याला वाहून घेतल्याचं ढोंग करत करोडोंचं अनुदान लाटण्याशिवाय यांची वेगळी महत्ता ती काहीच नाही. मागील काही वर्षांत तर भ्रष्टाचार, घोटाळे, परीक्षा विभागातील गैरकारभार, विद्यार्थी संघटनांचे वाद, विद्यापीठ निवडणुका, पैसे घेऊन पीएचडी वाटप या असल्या कारणांसाठीच विद्यापीठ चर्चेत आहेत. परीक्षा शुल्क, फेर तपासणी शुल्क, पदवीदान समारंभाचे शुल्क अशा अनेक नावांखाली विद्यार्थ्यांकडून भरभक्कम वसुली करणारी विद्यापीठं ही ‘प्रॉफिट मेकिंग’ कंपन्या झाल्या आहेत. एकट्या पुणे विद्यापीठाच्या ठेवी जवळपास सहाशे कोटींच्या घरात आहेत. याउपर राज्य सरकार, केंद्र सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग, CSIR इत्यादीकडून मिळणारे कोट्यवधींचे फंड्स आहेत.
‘विद्यापीठ अनुदान आयोगाने’ घालून दिलेले कित्येक नियम या विद्यापीठांकडून राजरोसपणे पायदळी तुडवले जात आहेत. त्यावर कोणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही. उदाहरणार्थ PET (पीएचडी पूर्व परीक्षा) चे निकाल जाहीर झाल्यावर एक महिन्याच्या आत विद्यापीठाने उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती घेणे अपेक्षित आहे. परंतु PET चा निकाल जाहीर होऊन एक महिना उलटला तरी अजून पुणे विद्यापीठातर्फे मुलाखतीची कोणतीही तयारी पहायला मिळत नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून करोडोंचे अनुदान लाटायचे आणि त्यांनी घालून दिलेल्या नियमांना त्यांच्याच पैशातून खरेदी केलेली केराची टोपली दाखवायची असाच हा एकंदर प्रकार आहे. सामान्य मुलांनी दाद तरी कोणाकडे मागायची? नव्यानेच दाखल झालेले कुलगुरू की स्वतःच खोट्या पदवीच्या घोळात अडकलेले शिक्षण मंत्री?
तर असा सगळा भीम पराक्रम असणार्या विद्यापीठाचे कर्मचारी तरी या खेळात कसे मागे राहतील?
महाराष्ट्र विद्यापीठ महासंघाचे अध्यक्ष, उच्च व तंत्रशिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकारी यांच्याशी हात मिळवणी करून राज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठातील कर्मचार्यांनी लाच देऊन, पदनाम बदलून घेऊन त्या द्वारे स्वतः च्या वेतनात घसघशीत वाढ करून घेतली आहे. आणि विशेष म्हणजे वाढीव वेतन हे शासनाच्या तिजोरीतून मंजूर झाले नसून ते विद्यापीठाच्या तिजोरीतून देण्यात येत आहे. एकंदर शासनाकडून आणि विद्यार्थ्यांकडून जमा केलेल्या ‘मधावर’ विद्यापीठातली अस्वलं राजरोसपणे ताव मारत आहेत.
पदनाम - वेतन वाढीचा घोटाळा नेमका काय?
साधारणतः शासकीय कर्मचार्याला वेतन वाढीचा लाभ ‘वेतन आयोग’ अथवा पदोन्नतीबरोबर मिळत असतो. परंतु राज्यातील विद्यापीठाच्या कर्मचार्यांनी वेगळीच शक्कल लढवत लाखो रुपयांचा मलिदा पदरात पाडून घेतला आहे.
सुरुवात
सन 2010 ते 2013 या काळात राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकार सत्तेवर असताना या घोटाळ्याला सुरवात झाली. ‘महाराष्ट्र अकृषी विद्यापीठ कर्मचारी संघा’ च्या काही नेत्यांनी मंत्रालयातील ‘उच्च व तंत्र शिक्षण’ विभागातील अधिकार्यांशी संबध प्रस्थापित केले. राज्यातील विद्यापीठामध्ये काम करणार्या सेवकांच्या वेतन श्रेण्यांमध्ये काही त्रुटी असून त्या दूर करणे गरजेचे असल्याचे सांगितले. याच अनुषंगाने ‘संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या’ कुलसचिवांनी दिनांक 19 ऑक्टोबर 2011 रोजी पत्र क्रमांक, संगाबाअवि/1/102/2-1313/2011 द्वारे शिक्षकेतर कर्मचार्यांचे पदनाम बदलून देण्यात यावेत अशा आशयाचा एक मोघम प्रस्ताव पाठवला. राज्य शासनातर्फे असा कुठलाही प्रस्ताव मागवण्यात आला नव्हता.
चेंडू उच्च व तंत्रशिक्षण विभागात
याच प्रस्तावाचा आधार घेत उच्च व तंत्रशिक्षण विभातील कार्यासन अधिकारी विकास कदम यांनी अत्यल्प मनुष्यबळामुळे कालमर्यादेत कामे करणे जिकीरीचे झाले असून, विद्यापीठाची गैरसोय होत आहे. ह्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी व ही कामे जलदगतीने होण्यासाठी काही पदांची पदनामे बदलवून मिळाल्यास त्या पदावरील कार्यरत संबंधित कर्मचार्याकडून जास्तीची कामे करून घेता येतील, अशी थाप मारून हे निवेदन प्रधान सचिव (उच्च व तंत्रशिक्षण) यांच्यापुढे मांडलं.
त्यावर प्रधान सचिवांनी DOES IT REQUIRE-PPROVEL OF THE FIN-NCE DEPT? असा प्रश्न विचारून सदर प्रस्ताव परत पाठवला.
प्रधान सचिवांच्या टिप्पणीस उत्तर म्हणून कार्यासन अधिकारी विकास कदम यांनी सदर प्रस्तावामुळे मंजुर पदसंख्येत कोणताही बदल होत नाही, फक्त पदनाम सुधारणा करण्यात येत आहे. त्याचबरोबर शासनावर अतिरिक्त आर्थिक बोजा नसल्यामुळे ‘वित्त विभागाच्या’ सहमतीची आवश्यकता वाटत नाही, तथापि आदेशार्थ सादर अशी टिपणी करून प्रधान सचिवांच्या टेबलवर परत पाठवला.
त्यावर प्रधान सचिवांनी ‘मान्य’ असा शेरा लिहून प्रस्ताव मंजूर केला.
या मंजूर झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने विकास कदम यांनी पुढे प्रत्येक अकृषी विद्यापीठाला पदनाम वेतनश्रेणी बदलाबाबत पत्र पाठवले. त्यात त्यांनी वित्त विभागाच्या अंतर्गत कार्य करणार्या कथित ‘वित्तीय सुधारणा समिती’च्या सहमतीच्या पत्राचा संदर्भ क्रमांक (270/9 वि.सु., दि 2.5.2009 ) दिला.
‘विकास कदम याचं पितळ उघडं पडलं’
वित्त विभागाकडे ‘माहितीचा अधिकार अधिनियम 2005’ अंतर्गत सदर पत्राची प्रत मागवली असता, वित्त विभागाने ‘वित्तीय सुधारणा समिती’ नामक कोणतीही समिती कार्यरत नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर (270/9 वि.सु., दि 2.5.2009 ) अशाप्रकारे क्रमांक देण्याची पद्धत नसल्याचे सांगितले. यावरून त्यांनी रचलेला बनाव स्पष्ट होतो.
नेमका फरक कुठे आणि काय पडला?
सदरहू वेतनश्रेणी वाढ ही ‘पूर्वलक्षी प्रभावाने’ लागू करण्यात आली. म्हणजे विद्यापीठाच्या कर्मचार्यांना 1996 अथवा 2006 पासूनची पगाराची कोट्यवधीची थकबाकी विद्यापीठाने दिली. वाढलेले वेतन आणि 1996/2006 पासूनची वेतनाची थकबाकी ही विद्यापीठाच्या स्वतःच्या फंडातून ददेण्यात आली. यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचे फंड मिळाले नाहीत कारण सदर प्रस्तावाला वित्त विभागाची कसलीही परवानगी नव्हती.
आम्ही माहितीच्या अधिकाराखाली कर्मचार्यांचे वाढलेले वेतन आणि दिलेले अरीअर्स (थकबाकी) याची माहिती मागवली असता धक्कादायक आकडे समोर आले.
उदाहरणार्थ,
विद्यापीठाने पुरवलेल्या माहिती अनुसार, ‘डॉक्युमेंटेशनिष्ट’ असलेले विद्यापीठाचे कर्मचारी ‘कमलाकर प्रभू गायकवाड’ यांचे पदनाम बदलून तंत्रज्ञान सहायक (ग्रंथालय)’ असे केले. वेतन चौतीस हजाराने वाढवले आणि वेतनवाढ पूर्वलक्षी असल्याने तब्बल पंचवीस लाख चौर्याहत्तर हजार वीस’ (2574020) रुपये इतके अरीअर्स मिळाले.
दुसरे उदाहरण, ‘कनिष्ठ ग्रंथालय सहायक’ असलेले भिवसेन भोन्जीबा थोरे’ यांचे पदनाम बदलून ‘वरिष्ठ तांत्रिक सहायक’ केले. वेतन तब्बल छत्त्तीस हजारांनी (36000) वाढले आणि अरीअर्स सत्तावीस लाख तेरा हजार (2713000) इतके मिळाले.
श्रीमती उर्मिला दिलीप कुलकर्णी काळे यांचं पदनाम इन्फोर्मेशन सायंटिस्ट असं करून त्यांच्या वेतनात दरमहा 53202 रुपये इतकी वाढ करण्यात आली आणि अडोतीस लाख रुपये अरीअर्स म्हणून देण्यात आले.
भौतिकशास्त्र विभागात प्रयोगशाळा सहायक असलेलेल्या संदीप भुजबळ यांचे पदनाम बदलून संशोधन सहयोगी केले आणि वेतनात दरमहा 41000 रुपये इतकी वाढ करण्यात आली.
असे एकट्या ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात’ पावणे सहाशे कर्मचारी आहेत, ज्यांना अडोतीस लाखांपर्यंत वेतन थकबाकी मिळाली आहे. हाच संघटीत लुटीचा प्रकार कमी अधिक प्रमाणात राज्यातील इतरही विद्यापीठांत सुरु आहे.
विद्यार्थ्यांकडून शुल्काच्या स्वरुपात करोडो रुपये गोळा करणार्या विद्यापीठात इतक्या मोठ्या प्रमाणावर लुट सुरु आहे.
यंत्रणा नेमकी कशाप्रकारे काम करत होती?
महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष, कुलसचिव, अमरावती विद्यापीठ व कक्ष अधिकारी, उच्च व तंत्रशिक्षण हे या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत.
प्रत्येक विद्यापीठातील कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी या कामासाठी मोठ्या प्रमाणावर दलाली घेतली. रक्कम जवळपास कोटीच्या घरात आहे. याचे समभाग मंत्रालयातील अधिकार्याला पोचवण्यात आले.
सुरुवातीला ज्यांनी पैसे दिले त्यांना सुधारित पदनाम व वेतनश्रेणी मिळत गेली. त्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागातून वेगवेगळे जी आर निघत होते. त्यामुळे यांची विश्वासार्हता वाढली. आणि त्याचमुळे हजारो कर्मचारी जाळ्यात अडकले. त्या बदल्यात अनेक कर्मचार्यांच्या पगारात भरघोस वाढ झाली आहे. त्याची आकडेवारी वर दिलीच आहे. आज विद्यापीठामध्ये केवळ ‘मॅट्रिक पास’ कर्मचारी जवळपास ‘ऐंशी हजाराचा’ पगार घेत आहे.
ज्यांनी पैसे देण्यास नकार दिला, त्यांना सूचक धमक्या दिल्या. त्याचबरोबर त्यांना जी आर मधून देखील वगळण्यात आलं.
हे सर्व जी.आर. 2010 ते 2013 या काळात काढले गेले. हे संकेतस्थळावर उपलब्ध होते पण गाजावाजा झाल्यामुळे काढून टाकले. पण जी आर ची अंमलबजावणी झाली आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
1. सर्व प्रशासकीय विभागांच्या कोणत्याही संवर्गाच्या वेतन सुधारणे संबंधीचे प्रस्ताव वित्त विभागाचे अभिप्राय घेऊनच अमलात आणले जातात. जे यामध्ये जाणीवपूर्वक डावलले गेले आहेत.
2. पदनाम बदलाचे सर्व प्रस्ताव व शासन निर्णय 2010 ते 2012 या काळातले आहेत. परंतु त्यांची मान्यता दि 02/05/2009 रोजी घेतली आहे असे भासवले जात आहे.
3. पदनाम वाटपात शैक्षणिक अर्हता हा निकष पूर्णपणे डावलला गेला आहे, ज्याने जास्त लाच दिली त्याला जास्त वेतन अशा प्रकारे हे पदनाम बदलून दिले गेले.
4. 172 पदनामांपैकी 102 पदनामे बदल्यात आली, म्हणजे 1235 कर्मचार्यांपैकी 681 सेवकांना वाढीव वेतनाचा लाभ मिळाला.
5. प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे कामाचे स्वरूप, जबाबदारी यामध्ये कोणताही अपेक्षित बदल झाला नाही.
6. कार्यासन अधिकारी, विकास कदम यांनी ‘पदनाम बदलाने तिजोरीवर ताण पडणार नाही’ असा दावा केला होता तो खोटा ठरला आहे, आणि विद्यापीठाच्या तिजोरीवर करोडोंचा अतिरिक्त बोजा पडला आहे.
वरील विषयाचा तत्कालीन मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण, सध्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील या विषयाच्या गांभीर्यतेकडे दुर्लक्ष केले जात आहे, हे दुर्दैवी आहे.
एकीकडे तुटपुंजे वेतन मिळते म्हणून ऐन सणासुदीत संप करणारे राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आहेत तर दुसरीकडे कमी कामात दुप्पट वेतन मिळवून रोजची दिवाळी करून सरकारचं दिवाळं काढणारे विद्यापीठातील कर्मचारी आहेत.
- अक्षय बिक्कड़
साप्ताहिक 'चपराक', पुणे
८९७५३३२५२३
‘साहित्य चपराक’ (मार्च २०१७)
1969 साली राजेश खन्ना यांचा ‘आराधना’ चित्रपट आला. 1973 साली ‘नमकहराम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन होते. त्याच वर्षी म्हणजे 1973 साली ‘जंजीर’ चित्रपट आला, ज्याचे हिरो अमिताभ बच्चन होते. 1991 साली ‘हम’ चित्रपट आला, ज्याचे हिरोही अमिताभ बच्चन हेच होते. हे लिहिण्याचे कारण म्हणजे 1969 साली ‘आराधना’ हा चित्रपट आल्यानंतर राजेश खन्ना यांनी ‘सुपरस्टारडम’ची सुरुवात केली. मोतीलाल यांच्यापासून ते दिलीपकुमार, देवआनंद यांच्यापर्यंत कुणालाही अप्राप्त असे लोकांचे प्रेम आणि आकर्षण राजेश खन्ना यांना प्राप्त झाले. 1969 ते 1973 ही चार वर्ष फक्त राजेश खन्ना यांची होती. 1973 साली ‘जंजीर’ चित्रपटापासून अमिताभ बच्चन त्याच ‘सुपरस्टारडम’च्या धावपट्टीवर उतरले, पण 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दीवार’ चित्रपटाद्वारे अमिताभ यांनी ‘सुपरस्टारडम’चा मुकुट खर्या अर्थाने आपल्याकडे खेचून घेतला. 1975 पासून 1991 च्या ‘हम’ या चित्रपटापर्यंत अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार होते पण 1975 नंतरही बरीच वर्षं म्हणजे जवळपास 1987 पर्यंत राजेश खन्ना यांचं ‘स्टारडम’ टिकून राहिलं. ‘सुपरस्टारडम’चा हिंदी चित्रपटसृष्टीतला कालखंड एवढाच. मानधनाच्या दृष्टीने पाहिलं, तर 1969 ते 1978 पर्यंत राजेश खन्ना हेच सर्वात अधिक मानधन घेणारे ‘स्टार’ होते (जरी त्यांचे ‘सुपरस्टारडम’ लौकिकार्थाने संपले तरी). 1979 ते 1987 पर्यंत राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या मानधनाचा आकडा सारखाच होता. 1987 नंतर अमिताभ बच्चन मानधनाच्या आकड्याच्या बाबतीत राजेश खन्ना यांना पार करून पुढे निघून गेले. 1990 साली प्रदर्शित झालेला ‘अग्निपथ’ हा चित्रपट अमिताभ यांच्या ‘सुपरस्टार’ पदावर कोंदण बसवणारा ठरला, जसा 1971 चा ‘आनंद’ हा चित्रपट राजेश खन्ना यांच्या ‘सुपरस्टार’ पदाला कोंदण देणारा होता. अगोदर म्हटल्याप्रमाणे मोतीलाल यांच्यापासून दिलीपकुमार यांच्यापर्यंत आणि त्यानंतर तिन्ही खान (आमीर, शाहरुख, सलमान) यांच्यापासून ते हृतिक रोशनपर्यंत (अगदी त्यात कुमार गौरवचा एक चित्रपटही आला!) अनेक स्टार्स आले, त्यांनी अनेक अव्वल चित्रपटही दिले. परंतु, लोकांची मानसिकता कब्जात घेण्याची आणि आतडं पिळवटून टाकणार्या ऑक्टोपसी मोहिनी सामर्थ्याची जी ‘लार्जर दॅन लाइफ’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची किमया साधली, ती राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या त्यांच्या काळात. त्यातही राजेश खन्ना यांचं ‘सुपरस्टार’ पद हे पहिलंच होतं. त्यांनी सलग 15 हिट चित्रपट ओळीने दिले, जो विक्रम अमिताभ यांनाही मोडता आला नाही. परंतु अमिताभ बच्चन कालमान मोजता प्रचंड काळ टिकून राहिले, अगदी आजपर्यंत! पण पडदा व्यापून टाकण्याची क्षमता असलेला अमिताभ बच्चन यांचा शेवटचा चित्रपट म्हणजे ‘हम’.
राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांची तुलना करणं शक्यच नाही, इतके ते भिन्न प्रकृतीचे नट होत. परंतु, वर उल्लेखलेल्या ‘सुपरस्टारडम’च्या कालखंडात त्यांनी समाजमानसाचं नेमकं काय केलं, जे अगोदर आणि नंतर कुणीही करू शकलं नाही ते आश्चर्यकारक होतं. मुख्य म्हणजे हे दोन सुपरस्टार त्यांच्या त्यांच्या कालखंडामध्ये प्रत्येक प्रेक्षकाचा ‘स्व’ व्यापून उरायचे. राजेश खन्ना हे ‘रोमँटिक सुपरस्टार’, तर अमिताभ बच्चन हे ‘अँग्री यंग मॅन सुपरस्टार’ होते. रोमँटिक सुपरस्टार असल्यामुळे स्वाभाविकच राजेश खन्ना यांची लोकप्रियता स्त्रियांमध्ये हृदयाच्या रक्तातल्या धमन्यांमध्ये पोहोचणारी होती. दुसरीकडे अमिताभ बच्चन हे अँग्री यंग मॅन असल्यामुळे प्रत्येक पुरुषाला ते पुरुषार्थाचं पडद्यावरचं रुप वाटत असत. पण याचा अर्थ राजेश खन्ना पुरुषांमध्ये आणि अमिताभ बच्चन स्त्रियांमध्ये कमी लोकप्रिय झाले, असाही होत नाही. राजेश खन्ना यांच्यासारखे आपण व्हावे, असे त्यांच्या काळातल्या प्रत्येक पुरुषाला वाटत असे आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखा पुरुष आपल्याला प्राप्त व्हावा, असं प्रत्येक स्त्री प्रेक्षकाला वाटत असे. इथे पुरुष याचा अर्थ बाप, मुलगा, प्रियकर, नवरा असा काहीही असू शकत होता. हा संपूर्ण कालखंड भारतीय इतिहासातला अतिशय महत्त्वाचा कालखंड होता. लायसन्स राज, पाकिस्तानबरोबरचे युद्ध आणि बांगलादेशचा उदय, इंदिरा गांधी यांची महानायिका पदाकडे होणारी वाटचाल आणि पतन, जनता पक्षाचा उदय, जयप्रकाश नारायण यांचा संघर्ष, जनता पक्षाचे पतन, इंदिरा गांधी यांचा पुन्हा उदय, संजय गांधी यांचा कालखंड, त्यांचा अकाली अस्त, खलिस्तानी चळवळ, सुवर्णमंदिरात घुसवलेली सेना आणि त्यामुळे इंदिराजींची झालेली हत्या, त्या हत्येमुळे राजीव गांधी यांना 400 हून अधिक जागेवर मिळालेलं पाशवी बहुमत, ते बहुमत राजीव गांधी टिकवू न शकल्याने व्ही. पी. सिंग आणि जनता दलाचा झालेला उदय, राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण या दोघांच्या समाजवादी स्वप्नाचे उत्तर भारतात झालेलं यादवीकरण, इंदिरा गांधी यांनी अप्रत्यक्ष मदत केल्यामुळे उभी राहिलेली श्रीलंकन तामिळींची त्यावेळची जगातील सर्वात खतरनाक अशी एलटीटीई ही संघटना (काही वर्षांपूर्वी श्रीलंकन सेनेने या संघटनेचा प्रमुख व्ही. प्रभाकरन याच्यासहीत या संघटनेचा अस्त घडवून आणला) विरोधात गेल्यामुळे राजीव गांधींची झालेली क्रूर हत्या, त्यामुळे गांधी घराण्यापासून मुक्त होऊन कॉंग्रेसची सत्ता नरसिंहरावांकडे येणे आणि त्या सत्तेचा कुशल वापर करून अगोदरच्या राजीव गांधींच्या शेवटच्या पर्वातील कॉंग्रेसच्या समर्थनाने पंतप्रधानपदावर असणार्या चंद्रशेखर यांच्या काळात सोने गहाण ठेवणार्या भारताला उदारीकरणाच्या नव्या धोरणाने जगातल्या एका प्रमुख अर्थव्यवस्थेकडे नरसिंहरावांनी नेण्याची सुरुवात एवढ्या सगळ्या घटना या दोन सुपरस्टार्सच्या काळात घडलेल्या आहेत. गंमत म्हणजे, या दोन्ही सुपरस्टार्सनी या कालखंडात कॉंग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. 1984 साली अमिताभ बच्चन अलाहाबादमधून विजयी झाले, तर राजेश खन्ना यांनी कॉंग्रेसच्या तिकिटावरून दिल्लीतून निवडणूक लढवताना लालकृष्ण अडवाणी यांना कडवी टक्कर देऊन त्यांच्या तोंडाला फेस आणला होता. या संपूर्ण कालखंडात मुंबईत एक मोठी घटना घडली. ती म्हणजे 1982 चा गिरणी संप. त्या काळात एकंदरीतच कामगार वर्ग अशांत होता आणि गिरणी कामगार पराकोटीचा अस्वस्थ आणि ज्वालाग्राही होता. या कामगारांनीच दत्ता सामंत नावाच्या एका महानायकाचा उदय घडवला. गिरणी संपाने दत्ता सामंत हे नाव जगभर गेले आणि गिरणी संपाच्या पतनाने गिरणी कामगार आणि दत्ता सामंत हे दोघेही कोसळले ते कायमचेच. त्यातूनच पुढे मुंबईतल्या अतिरक्तरंजित गँग्जचा आणि गँगवॉर्सचा उदय झाला, ज्याचा सर्वात मोठा खलनायक दाऊद इब्राहिम कासकर ठरला. ज्या गँग्ज आणि गँगवॉरवर आधारित अनेक चित्रपट अलीकडच्या काळात येऊन गेले.
या सार्या प्रचंड कॅनव्हासच्या पार्श्वभूमीवर राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोन सुपरस्टार्स उभे आहेत, ही समाजमनाशी संबंधित गोष्ट फारशा बारकाईने कोणीच अभ्यासलेली नाही. राजेश खन्ना यांच्या रुपाने सामाजिक ‘स्वप्नाळू रोमँटिसिझम’ शिखरावर पोहोचला आणि राजेश खन्ना यांच्या महानायक पदाच्या उतरणीवर येता येता तो अस्त पावला. त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन यांच्या रुपाने ‘सामाजिक वास्तववादी रोमँटिसिझम’ शिखरावर गेला आणि 1991 साल होता होता तो अस्ताला गेला. त्यानंतर नव्या डिजिटल यंत्रयुगाचा मल्टिप्लेक्सचा, मल्टी स्क्रीन्सचा आणि 100 ते 300 करोड क्लबचा उदय झाला. चांगले सिनेमे आले आणि गेलेही. महाहिरोंचे ग्रुप्स तयार झाले, पण राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘सुपरस्टारडम’च्या काळातल्या लोकांच्या हृदयातील वीणा थेट छेडण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नव्हते आणि ते स्वाभाविकही होते.
सिनेमा आणि समाज यांचा एवढा टोकदार संबंध भारताच्या इतिहासात अगोदर आणि नंतर कधीही जमून आलेला नाही. वेगवेगळ्या प्रकारची जादुई संमोहिनी या दोन्हीही महानायकांनी भारतीय समाजावर घातली. हळुवारपणे फुलत जाणार्या एखाद्या फुलासारखे मुलायम स्वप्न भारतीय समाजाने स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या आयुष्यासंबंधी कल्पिलेले होते. ते सर्वोच्च आविष्कार म्हणून पडद्यावर राजेश खन्ना यांनी साकार केले. ते स्वप्न भंगले. स्वातंत्र्याच्या फळाची अपेक्षा समाजाला दुरापास्त आहे, याची जाणीव जनमानसाच्या काळजात घुसू लागली आणि तेव्हाच अमिताभ बच्चन यांचा उदय झाला. त्यांनी वेगळ्या प्रकारच्या रोमँटिसिझमचा सर्वोच्च आविष्कार केला, जो रोमँटिसिझम राकट, रासवट, व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा, लढणारा, साध्यसाधनशुचितेला न मानता विजयी होण्याचे स्वप्न दाखवणारा होता. 1991 नंतर तो रोमँटिसिझमही अस्ताला गेला. त्यानंतर भारतात उदारीकरणाचा प्रथमच प्रवेश झाला. पाठोपाठ डिजिटलायझेशनही. स्वातंत्र्योत्तर काळातल्या पाहिलेल्या स्वप्नांना हाक देण्याची आणि ती विफल झाली तर त्याविरुद्ध बंड करण्याची सारी शक्यता भारतीय समाज गमावत गेला. प्रेक्षक महाहिरोंच्या काळामध्ये मल्टिप्लेक्सची तिकीटे काढणार्या रोबोटसारखा झाला. आपली आवडनिवड ही आपण ठरवत नसून मोठमोठे कॉर्पोरेट्स ठरवतात हेही त्याला कळेनासे झाले आणि कळले तर त्याचेही त्याला काही वाटेनासे झाले. ‘‘पुष्पा, आय हेट टीयर्स’’ किंवा ‘‘पीटर मैं यहॉं हूँ’’ यांसारखे संवाद राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या तोंडून ऐकताना त्या काळातल्या प्रेक्षकाने सिंगल स्क्रीनवर कसे पैसे उधळले असतील, याची कल्पना करणंसुद्धा हास्यास्पद वाटते. माझ्याही पिढीने यातले वास्तवात काहीच पाहिलेले नाही, फक्त ऐकलेले आहे. फिल्म्स तेवढ्या पाहिल्या. राजेश खन्ना यांच्या गाडीवर रक्ताने ’आय लव्ह यू’ असं मुली लिहित असत किंवा अमिताभ बच्चन यांना पडद्यावर बघून समोरच्याच्या आणि स्वत:च्या ताकदीचा अंदाज न घेता बेलबॉटममधला तरुण सरळ संघर्षाचा पवित्रा घेत असे, हे आज खरे वाटत नाही. खरे तर हे इतके जुनेही नाही. आई मरणासन्न अवस्थेत असताना देवाला उद्देशून बोललेले अमिताभ यांचे संवाद आता कुठच्या चित्रपटात टाकले, तर तद्दन हास्यास्पद वाटतील किंबहुना 1991 नंतर अमिताभ यांच्या मधल्या उतरत्या काळात असेच संवाद त्यांच्याच ‘नास्तिक’ या चित्रपटात हास्पास्पद वाटले होते. हिरो तोच होता, पण काळ बदलला होता. राजेश खन्ना नव्या युगाशी ऍडजस्ट करू शकले नाहीत, अमिताभ बच्चन ऍडजस्ट करू शकले, पण ते महानायक नव्हते, तर एक कुशल कारागीर होते. राजेश खन्ना आपले उर्वरित आयुष्य (अलिकडेच त्यांचा मृत्यू होईपर्यंत) आपल्या महानायकपदाच्या नॉस्टॅल्जियामध्येच जगले. बोलताना ते आपण नॉस्टॅल्जिक होत नाही, असं वारंवार सांगत आणि हाच त्यांच्या नॉस्टॅल्जियाचा पुरावा होता. ते कधीच आपल्या जुन्या बुटातून आपला पाय काढू शकले नाहीत.
खरे तर हे दोन वेगवेगळ्या ताकतीचे नट. त्यांच्या मागे दिग्दर्शक, तंत्रज्ञ, संगीतकार, संवाद आणि पटकथा लेखक, निर्माता आणि प्रचंड मोठी टीम काम करत होती. त्यांच्या यशात या सार्यांचाच वाटा तेवढा होता. परंतु आपल्या मागच्या अजस्र टीमला लोकांच्या हृदयात थेट नेण्याचं किंवा लोकभावना पडद्यावर जोडून घेण्याचं कसब या दोघांनी दाखवलं. यांच्या योग्यतेचे इतर कुणी देशात त्या काळी नव्हते किंवा नसतीलच असे नव्हे पण नियतीने त्यांनाच ती संधी दिली, जी स्वप्नवत होती आणि स्वप्नं ही एके दिवशी तुटतातच. भारतीय समाजाचीही ती तुटली. अजून 25 वर्षांनी या दोघांच्या अद्वितीय सुपरस्टारडमच्या कारकीर्दीचे मूल्यमापन करताना 1969 ते 1991 या काळात भारत घडता घडता बिघडत गेला आणि त्याच वेळी बिघडतानाच घडत गेला, हे नमूद करावे लागेल. या तुटलेल्या स्वप्नाचे संपूर्ण सामाजिक आणि राजकीय विश्लेषण हा एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे (लेखक ते पुस्तक लिहितो आहे). परंतु एक मात्र नक्की, याच सार्या काळामध्ये चित्रपटाच्या पडद्याशी भारतीय प्रेक्षकाचे सर्वात जवळचे नाते जडले आणि तुटले. जसे, भारतीय समाजाचे देशातल्याच राजकीय आणि सामाजिक प्रक्रियेशी नाते तुटले. उदाहरणार्थ, आता आपल्या आयुष्याशी संबंधित काही नकारात्मक घडत असेल, तरी लोक रस्त्यावर उतरत नाहीत. हे सर्व उकलत जाताना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे स्वप्न आणि पतन आणि त्याच वेळी उभे राहता राहता लोकांचे मोडून जाणे याच्या एका प्रक्रियेचा मागोवा घ्यावा लागेल, ज्यात काळ हा किती बलवान असतो आणि तो लोकभावनांशी कसा खेळतो त्याची एक निष्ठुर जाणीव वाचणार्याच्या मनाशी ठसठसत आतपर्यंत जाईल; पण तोंडातून आवाज निघणार नाही!
कारण आता संवाद संपले आहेत!!
- राजू परुळेकर
सुप्रसिद्ध पत्रकार
‘साहित्य चपराक’ (मार्च २०१७)
(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
प्रदीर्घ काळ महाराष्ट्र व आसपासच्या राज्यांवर राज्य करणारे महाराष्ट्रातील एकमेव घराणे म्हणजे सातवाहन. सातवाहन स्वत:ला सालाहनही म्हणवून घेत. शालिवाहन हे सालाहनचे कृत्रिम संस्कृतीकरण. आजच्या महाराष्ट्राच्या भाषा-संस्कृतीचा पाया घालणारा, तिचे वर्धन करत महाराष्ट्राची ओळख निर्माण करणारा हा तत्कालीन औंड्र या मेंढपाळ समाजामधून उदयाला आलेला राजवंश. महाराष्ट्रातील रायगड (मूळ नाव रायरी), राजमाची अशा शेकडो किल्ल्यांची मूळ उभारणी सातवाहन काळात झाली. तीनही समुद्रांचे पाणी चाखणारे अश्व असलेले सातवाहन अशी सार्थ बिरुदावली त्यांनी मिरवली. साडेचारशे वर्षांच्या कालावधीत शेकडो महाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख, हालाच्या गाथा ‘सप्तशती’ सारखे नितांत सुंदर काव्यसंग्रह, ‘लीलावई’सारखे महाकाव्य यातून आद्य मराठीचा पाया तर भक्कम केला गेलाच; पण वररुचीच्या ‘प्राकृतप्रकाश’ या व्याकरण ग्रंथाने महाराष्ट्रीला समृद्धी दिली. पूर्वी रठ्ठांचा समूह तो महाराष्ट्र अशी ओळख पुसून या रठ्ठसमुहाला एकाच राजकीय पटलाखाली आणले. देशी-विदेशी व्यापारातून आर्थिक समृद्धी आणली व प्रजेला खर्या अर्थाने सुखाचे दिवस दाखवले. हालाच्या गाथा सप्तशतीतील काव्यावरून एका आनंदी खेळकर समाजाचे दर्शन जे घडते ते त्यामुळेच.
त्यामुळे महाराष्ट्राचे संस्थापक, वर्धनकर्ते हे सातवाहन होत, असे म्हणायला काहीही प्रत्यवाय नाही. संपूर्ण महाराष्ट्र आणि सातवाहनांची सत्ता असलेल्या अन्य प्रदेशांत (राज्यांत) गुढीपाडवा हा नववर्ष दिन म्हणून साजरा होतो. गौतमीपुत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून महाराष्ट्र व आसपासचा परिसर स्वतंत्र केला तो हा स्वातंत्र्यदिन. या विजयाचे स्मरण असलेल्या शालिवाहन (सालाहन) शकाचा वर्षारंभ. आजही आपण गुढ्या उभारून हा विजयोत्सव साजरा करत असतो.
सातवाहन हा महाराष्ट्रातील पहिला ज्ञात राजवंश. महाराष्ट्र भूमीच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षिणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदीर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीसनपूर्व 230 मध्ये हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. नंतर ती पैठण येथे नेली गेली. छिमुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. त्याहीपूर्वी सातवाहन सम्राट अशोकाचे मांडलिक म्हणून महाराष्ट्रावर सत्ता गाजवत असावेत असा विद्वानांचा कयास आहे. ती सत्ता पुढे साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदीर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही. मध्य आणि दक्षिण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला.
कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर इत्यादी जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक मेंढपाळ समाज. महाभारतात औंड्रांना असुर राजा महाबळीचे पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र, पुंड्र, मल्ल इत्यादी समाज दक्षिणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे डिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत. यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार लक्षात यावा. पंढरपूर हे नावही पुंड्रपूरवरुन आलेले. मावळालाही आंदर मावळ असे म्हटले जाते. मल्ल लोकांना हरवणारा मल्हारीही आपल्याला माहीत आहे. आंदर मावळ (जुन्नरचा परिसर) आंध्रा या नदीच्या नावावरुन बनला आहे. या भागात आंद्र (औंड्र) अधिक संख्येने निवासास असल्याने नदी व परिसरास आंध्र नाव मिळणे स्वाभाविक आहे.
सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान इत्यादी देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल इत्यादी पश्चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुफांतील प्रदीर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षिणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हालाची गाथा ‘सप्तशती’, गुणाढ्याचे ‘कथा सरित्सागर’, वररुचीचे ‘माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण’, जैन माहाराष्ट्रीतील ‘अंगविज्जा’ अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या. हाल सातवाहनाने आपल्या बलाढ्य आरमारातून श्रीलंकेवर स्वारी करून तेथील राजकन्या लीलावती हिच्याशी कसा विवाह केला याचे कल्पनारम्य चित्रण ‘लीलावई’ या काव्यग्रंथात आले आहे.
एवढा प्रदीर्घ काळ सत्ता चालवताना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेव्हा अशीच बिकट परिस्थिती होती. ‘क्षहरात’ घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तेव्हा त्याच्या ताब्यात सातार्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण-गोमंतकही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथल्या बंदरांतून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. मध्यभारत ते दक्खनची प्रजा एका अर्थाने गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.
नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. 32 मध्ये नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वार्या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकून घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेव्हा सातारा-कर्हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता.
परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, ’गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.’ शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस.
एका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पहायचे सामर्थ्य कोणात आले नाही.
नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. इसवी सनाच्या 78 मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हणजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. ’तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन’ अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली.
आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. परंतु पुराणकारांनी मात्र प्रत्येक सणाचे वैदिकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धार्मिक स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. कधी रामाचाही संबंध गुढीपाडव्याशी जोडला जातो; पण इसवी सन 78 पासूनच शालीवाहन शकाचे पहिले वर्ष का गणले जाते यावर कोणी विचार केलेला दिसत नाही. नहपानाचा मृत्यू सन 78 मध्येच झाला याबाबत विद्वान इतिहासकारांनाही शंका नाही. या सणामागील मूळ उद्देश गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयाचा आनंदोत्सव साजरा करणे हा आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते.
हा धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राला स्वातंत्र्याचा मंगलदिवस आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. दुसरे महत्त्वाचे असे की शालिवाहन शक असा मुळात शब्दच अस्तित्वात नाही. या नावाचा कोणताही राजा होऊन गेलेला नाही. शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील ’सालाहन’ असा आहे. सातवाहन स्वत:ला अनेक लेखांत सालाहन असेच म्हणवून घेतात. मग त्याचे कृत्रिम संस्कृतीकरण शालिवाहन करायचे आणि नंतर शालिवाहन नावाचा राजाच इतिहासात सापडत नाही अशी लाडिक तक्रार करायची असे उद्योग आमचे विद्वान करत बसतात हे नवलच नाही काय?
संभाजी महाराजांची हत्या व गुढीपाडवा?
बरे या विद्वानांच्या बुद्धीवर कळस चढवणारे ब्रिगेडी कल्पनाशक्तीचे आजकाल झालेले विकृत रुप पाहिले तर थक्क व्हायला होते. संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली ती ब्राह्मणांच्या सांगण्यानुसार. वेद ऐकले म्हणून कानात उकळते शिसे ओतले. संस्कृत उच्चारिले म्हणून जीभ छाटली. हे सारे झाल्यावर भाल्यावर मस्तक टोचून त्याची मिरवणूक काढली. तीच पहिली गुढी व महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी तेव्हापासून गुढी हा एक सण केला. तेव्हा बहुजनांनी गुढी उभारू नये असा संदेश गुढीपाडव्याच्या आसपास फिरू लागतो.
गुढीपाडवा किमान दोन हजार वर्षांची परंपरा असलेला सण आहे हे आपण वर पाहिले. नंतरच्या मराठी साहित्यातही गुढीचे उल्लेख येतात. लीळाचरित्रात म्हाइंभट हा सडा-संमार्जन करुन मग गुढी कशी उभारावी याचे सविस्तर वर्णन करतो. तेराव्या शतकातीलच संतश्रेष्ठ चोखा मेळा टाळी वाजवावी : गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची म्हणतात. ज्ञानेश्वर, नामदेवांपासून ते संत एकनाथांनी गुढीचे विजय-गुढी म्हणून जसे वर्णन केले तसेच गुढीला आध्यात्मिक अर्थही दिले. म्हणजे सातवाहनांपासून सुरु झालेली गुढीची परंपरा अव्याहत सुरु होती.
मग गुढीची परंपरा ब्राह्मणांनी आपल्या मताप्रमाने संभाजी महाराजांची हत्या करवून सुरु केली या विकृत अपप्रचाराला महत्त्व देण्याची खरे तर काही गरज नाही. औरंगजेबाने शंभुराजांची हत्या करायला हिंदुंचा सण व नववर्ष दिन निवडावा यात उलट त्याची विकृती दिसून येते. त्याबाबत औरंगजेबाचा निषेध न करिता महाराष्ट्रातील ब्राह्मणांना जबाबदार धरत समाजात द्वेष पसरवावा हे कृत्य नक्कीच निषेधार्ह आहे. असे करुन आपण शंभुराजांचाही अवमान करीत आहोत याचे यांना भान नाही.
महाराष्ट्रात इतिहासाचे विकृतीकरण वैदिक विद्वानांनी जाणीवपूर्वक वा भाबडेपणाने केले. तसेच वेगळे विकृतीकरण स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेत असताना हिंदुंनी करावा हे निषेधार्ह आहे. यातून धर्म व संस्कृतीचे मुळचे स्वच्छ स्वरुप हाती लागणार नाही. उलट विद्वेष गहिरा होत जाईल याचे भान ब्रिगेडसारख्या विकृतीने पछाडलेल्या संघटनांनी ठेवले पाहिजे. इतिहास ज्याचे माप त्याच्या पदरात नक्कीच घालतो; पण हवा निकोप दृष्टिकोन!
सर्वांना गौतमीपुत्राच्या विजयदिवसाच्या व त्यानिमित्ताने सुरु झालेल्या नववर्ष दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो!
(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
- संजय सोनवणी
9860991205