- राजकारणातले बालेकिल्ले कशा पद्धतीने अभेद्य ठेवले जातात हे आपण पाहतोच! पण साहित्य संस्थांचे राजकारण कसे चालते? तिथल्या निवडणुका कशा होतात? त्याचे सभासद कसे होतात? या संस्थांचे धुरीण नेमके कसे वागतात? साहित्यासाठी काय योगदान देतात? त्यांच्या मुखपत्र असलेल्या नियतकालिकातून नवोदितांच्या दर्जेदार साहित्याला न्याय मिळतो का? पुरस्कारांची खिरापत कशी वाटली जाते? थेट मतपत्रिका हातात मिळवण्यासाठी काय काय खटपटी, लटपटी केल्या जातात? निवडणुकांचे राजकारण कसे होते? ज्यांना आपण ‘संमेलनाध्यक्ष’ म्हणून आदर देतो ते कितपत लाळघोटेपणा करतात? कशा पद्धतीने निवडून येतात? एखाद्याने या व्यवस्थेच्या विरूद्ध आवाज उठवला तर त्याचे काय होते? हे सर्व जाणून घेण्यासाठी डॉ. भास्कर बडे यांचा 'चपराक' दिवाळी अंकातील त्यांच्या अनुभवावर आधारित हा विशेष लेख.
औरंगाबादला शिक्षणासाठी गेलो. त्यामुळे मराठवाडा साहित्य परिषद माहीत झाली. डॉ. हृषिकेश कांबळे यांच्यासोबत खोलीत पार्टनर म्हणून राहत होतो. त्याचा फायदा म्हणजे साहित्यिक आणि मराठी विभागातील लेखक, प्राध्यापकांच्या माझ्या ओळखी झाल्या. कधीतरी मसापत जायचो. तेव्हा तिथे एक नामफलक होता. ‘सुधीर रसाळ.’ त्या नावाची भीती वाटायची. त्यामुळे त्यांना भेटलो नाही.
लातूरला नोकरी लागली अन् ‘कैलास पब्लिकेशन्स’चे के. एस. आतकरे यांची ओळख झाली. त्यांच्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेचा आजीव सभासद झालो. तेव्हा कौतिकराव ठालेसरांची ओळख झाली. दरम्यान मसापची निवडणूक लागली. प्राचार्य कौतिकराव ठालेंचं एक पॅनल आणि दुसरं डॉ. वासुदेव मुलाटे-सुधीर गव्हाणे यांचं. प्रा. गव्हाणे सरांचा मी विद्यार्थी. त्यांनी मला आग्रहाने पॅनलमध्ये घेतलं. लातूर-औरंगाबाद अशी धावपळ सुरु होती. तेव्हासुद्धा ‘ज्यांच्याकडे मतपत्रिका जास्त’ (म्हणजे ‘गोळा केलेल्या) तो निवडून येणार हे सिद्ध होते. मी पंधरा मतपत्रिका गोळा केल्या होत्या. ही माहिती ठालेसरांना कळाली. मी मुलाटे-गव्हाणे-नाईकवाडे-डोळस यांना विचारले, ‘‘किती मतपत्रिका गोळा केल्या?’’ ते म्हणाले, ‘‘मतपत्रिका गोळा करण्याची गरज नाही, आपलं पॅनल विजयी होणार!’’
मी मनात हसलो अन् मतपत्रिका गोळा करायचा सपाटा चालूच ठेवला.
दरम्यान मला लातूरात निरोप आला. ठाले नावाचे एक गृहस्थ माझी भेट घेऊ इच्छित आहेत. भेट झाली. त्यांनी सांगितले,
‘‘ठालेसरांनी तुम्हाला भेटायला बोलावलेय. तुमच्याकडच्या पंधरा मतपत्रिका तोपर्यंत कोणालाही देऊ नका.’’
ठरल्यानुसार मी औरंगाबाद गाठले. दोघांची बोलणी झाली. ‘‘तुमच्याकडच्या पंधरा मतपत्रिका मला द्या. माझ्याकडची जास्तीची मते तुम्हाला देतो आणि पाच वर्ष निमंत्रणे येतील.’’
आमच्या पॅनलचा धुव्वा उडाला. मी चाळीस मतांनी पराभूत झालो तर प्रा. सुधीर गव्हाणे एकटेच पॅनलमधून विजयी झाले.
...आणि ठाले सरांचं पूर्ण पॅनल निवडून आलं. पाच वर्षे ठालेंनी मला पराभवाची जाणीव होऊ दिली नाही. दरम्यान सभासद वाढवले. नंतरच्या निवडणुकीत ठालेंनी पॅनलमध्येच घेतले. तेव्हा त्यांच्या काही सोयर्यांनी माझ्या नावाला विरोध केला. साहित्य चळवळीत काम करत होतो अन् आतून विरोधही होत होता हे जाणवत होते.
लातूर जिल्ह्यात मुरुडला आमदार विक्रम काळे यांनी मसापचे साहित्य संमेलन घेतले. त्यात खूप काम केले. स्मरणिकेचा संपादक ते कार्यक्रमपत्रिका, लेखकपत्रिका ही जबाबदारी काळेसाहेबांनी माझ्यावर टाकली. मी कामातच होतो. उद्या उद्घाटन. रात्रीचे जेवण संमेलनाध्यक्ष फ. मु. शिंदे यांच्यासोबत मुरुडला होते. त्यात मी नव्हतो. संमेलन संपल्यावर त्या जेवणावळीत एक मित्र होता. त्याने सांगितले, ‘‘अरे, ते ठाले काळेसाहेबांना म्हणाले, त्या बडेला तुम्ही भलतेच डोक्यावर घेतलेय.’’
‘‘सर, बडे कामाचा माणूस. आपले पत्रिकेत नाव आले अन् गायब झाले...’’ मला या दुटप्पी स्वभावाचे वाईट वाटले.
दोन वर्षापूर्वी निवडणूक झाली. त्या पॅनलमध्ये मला प्राचार्य ठालेंनी घेतले आणि मला विरोध करणार्यांची धार तीव्र झाली. या विरोधकात ठालेंनी ज्यांना ‘रतीब’ घातला तेच होते. एकूण हा विरोध ठालेंनीच उभा केलेला होता.
कोण होते विरोधक? पुन्हा तेच! लातूरचे योगीराज माने, प्रकाश काळे, दगडू लोमटे, सतीश साळुंके हीच मंडळी. एकीकडे गोड बोलायचे आणि दुसरीकडे विरोध करायचा. विरोध काय? तर म्हणे ‘बडे बीडचे. तिकडे उमेदवारी द्या! अन् बीडच्यांनी म्हणायचे, ‘ते लातूरचे!’ ही गंमत ठालेच रंगवत होते हे लक्षात आले.
आमदार मैदानात
यावेळी सतीश चव्हाण यांनी मसापच्या निवडणुकीत पॅनल टाकले अन् प्राचार्य कौतिकराव ठाले, मुळेअण्णा यांचे धाबे दणाणले. निरोपानिरोपी सुरु झाली. थेट मोठ्या साहेबांपर्यंत धावपळ (ठाले-मुळे) केली. (मा. शरद पवार - मोठे साहेब) प्रचाराचा साज-तन-मन-धनाने आ. चव्हाणांनी तोफ वाजवली. ग्रामीण साहित्य चळवळीचे एक प्रमुख डॉ. वासुदेव मुलाटे यांना प्रमुख करून खर्चापाणी सुरु झाला आणि ठाले-मुळेंना पळताभुई थोडी झाली.
मतदार खेचणार्या चेहर्यांच्या पाठीशी अहोरात्र उभेच ठाकले. दिवसभरात प्राचार्य ठालेंचे किमान पन्नासावर फोन असत. नावानिशी. मतपत्रिका मिळाली का? जपून ठेवा. निवडून आलो पाहिजेत. ते ज्ञानोबा मुंढे-बघा बरं!
‘‘चिंता करू नका!’’
‘‘अहो चाळीसएक मत आहेत. भाजपच्या गटाकडे मत जातील बरं!’’
‘‘नाही जात, मी बोललोय.’’
‘‘भेटायला या.’’
‘‘हो.’’
प्राचार्य ठाले माझ्या पाठीशी होते. लातूर, गंगाखेड, जालना, नगर, अकलूज, बीड, शिरुर शाखा, अंबाजोगाई, माजलगाव, उस्मानाबाद, कोपरगाव खूप फिरलो. तिथून मतपत्रिका घेऊन आलो. आम्ही मतपत्रिका गोळा करून पुढे गेलो, की आ. चव्हाणांचे कार्यकर्ते मतदारांकडे जात. भाषण देत... मतं मागितली की ‘परवाच दिली’ म्हणत.
बहुतेक मतपत्रिका गोळा झाल्या. आ. चव्हाणांनी अंदाज घेतला आणि हळूहळू माझा या पॅनलशी संबंध नाही असं जाहीर केलं.
यावेळी मी शंभरावर मतपत्रिका गोळा करून दिल्या तर दगडू लोमटे (18) शेषराव मोहिते (11) सतीश साळुंके (16) आसाराम लोमटे (20) हृषिकेश कांबळे (01) जीवन कुलकर्णी (01) अशी मला विरोध करणार्यांनी कामगिरी केली.
पूर्ण पॅनल निवडून आले
पदाधिकारी निवडीची बैठक झाली. त्यात माझ्या नावाला शेषराव मोहिते, दगडू मोहिते, सतीश साळुंके, आसाराम लोमटे यांनी कट्टर विरोध केला तरी प्राचार्य ठाले आणि मुळेअण्णांनी माझे नाव जाहीर केले. ‘‘बडेंनी या निवडणुकीत खूप मेहनत घेतलीय. त्यांच्यावर अन्याय होऊ नये.’’
...आणि ‘कोषाध्यक्षपद’ मला देण्यात आले.
अध्यक्षपद, पॅनलप्रमुख म्हणून प्राचार्य ठालेंना घोषित झाले. उपाध्यक्षपद प्रा. किरण सगर यांना दिले; तर कार्यवाहपद हे मुळेअण्णांच्या आशीर्वादाने डॉ. दादा गोरेंनी आदल्यारात्रीच ‘बुक’ केले होते.
‘प्रतिष्ठान’चा संपादक नामधारी
मागील वेळी श्रीधर नांदेडकर संपादक होते. त्यात मी संपादकीय मंडळात होतो. आम्हाला काहीच विचारले जात नसे. सर्व निर्णय स्वतः कौतिकराव ठालेसर घ्यायचे. अगदी आताही आसाराम लोमटे हे नामधारीच आहेत. मी एका कविच्या कविता निवडून आसारामकडे दिल्या. त्याला दोन वर्ष झाली. त्याचा निर्णय संपादक आसाराम लोमटेंना घेता आला नाही. मी त्यांना विचारले तर ते म्हणाले, ‘‘हा कवी खूपच सामान्य आहे. छापू नका.’’ वास्तविक प्राचार्य ठालेंनी माहितीवजाच लेखन केलंय. निर्मितीक्षम असं त्यांचं काहीच नाही. आसाराम लोमटे कथाकार आहेत. कविता हा या दोघांचा प्रांत नाही. मी निवडून दिल्या, छापल्या नाहीत. मात्र काही ‘लाभधारक’ कवींच्या चार कविता, पाच कविता, दहा कवितांचा रतीब ‘प्रतिष्ठान’मधून येतो. प्रतिष्ठान हे आप्तेष्टांचे व्यासपीठ आहे आणि खरे संपादक कौतिकराव ठालेच आहेत. आताही संपादक मंडळात बरेच जण घेतलेत; परंतु तेही नामधारी आहेत. या नामधार्यांना शुभेच्छा!
मसापचे पुरस्कार ‘वाटले’ जातात
मसापचे पुरस्कार हे गुणवत्तेवर दिले जावेत. त्यासाठी समिती असते. मात्र पुरस्कार कमिटीचे अध्यक्ष आपापली सोय अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटलांना गृहीत धरून करून घेतात. जणू ‘वानवळा’ एकमेकांना देतात. आम्ही तुम्हाला देतो तुम्ही आम्हाला द्या! हे अलीकडे खूपच सुरु झालेय. अगदी पुरस्कार समितीतील दोन सदस्य अमर हबीब, डॉ. पृथ्वीराज तौर यांनी मला सांगितले होते. ‘‘अहो, आम्ही सदस्य असून आम्हाला काहीच कल्पना नाही? कोण परीक्षक? कोणाचे ग्रंथ आले? आम्ही राजीनामा देणार? हे असेच चाललेय. ‘आले ठालेंच्या मना तिथे कोणाचे चालेना’ अशी गत मसाप पुरस्काराची आहे.’’
संमेलनाध्यक्षपद... खिरापत
काय साटेलोटे आहे ते मला तेरा वर्षात कळाले नाही. प्राचार्य ठाले ग्रेटच! त्यांनी एकदा ठरवले, याला अध्यक्ष करायचे की करणारच! संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस माझ्याकडे आले. ‘‘मला मदत करा’’ म्हणाले. मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही ठालेंना गाठा... तुमचा गुलाल पक्का.’’
तसे सबनीसांनी केले. गुलाल मिळवला. असा प्रयोग मी डॉ. किशोर सानपांसाठी केला परंतु ठालेंनी सानपांना शब्द दिला नाही. उलट पुण्याहून उमेदवार आयात केला आणि बेरजा केल्या. त्यात समीक्षक, अभ्यासू डॉ. किशोर सानपांचा पराभव प्राचार्य असलेल्या ‘ठालेंनी’ केला. सानपांच्या विरोधात कोणीही असले तरी प्रत्यक्षात लढाई ठाले विरूद्ध सानप अशीच होती.
मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदात वेगळे काही घडत नाही. ठालेंनी नाव सांगावे आणि कार्यकारणीने खाली पाहून हात वर करावेत. झाली एकमताने निवड. जुन्या पिढीतील डॉ. वासुदेव मुलाटे, प्रल्हाद लुलेकर, सोपान हाळमकर यांना डावलून थेट माझ्या पिढीतील कवी प्रा. हृषिकेश कांबळे यांना चाळीसाव्या मसाप उदगीरच्या संमेलनाचा अध्यक्ष जाहीर करून कित्येकांची बोलतीच बंद केली. डॉ. हृषिकेश कांबळे माझे वर्गमित्र, रुममेट. त्यांना अध्यक्षपद मिळाले याचा आनंद मला होणारच! असे हे ठालेचे प्रताप जवळून बघायला मिळाले.
आदरणीय प्राचार्य ठालेंना चैनच पडत नाही. प्रा. डॉ. किशोर सानपांच्या विरोधात प्राचार्य ठालेंनी सनदी अधिकारी आणि ठालेंचे प्रिय मित्र लक्ष्मीकांत देशमुख यांना पुण्यावरुन आणले. अर्ज भरून दिले. प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि मराठवाड्याच्या मतदारांना फोनवर फोन सुरु झाले. एकतर ही मतदार यादी ठालेच बनवतात. त्यामुळे त्यांना मानणार्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे मतपत्रिकांचा प्रवास खात्रीपूर्वक औरंगाबादकडे होतो. या निवडणुकीत त्यांनी खूप हातखंडे उपयोगात आणले.
विभागवार मतदार वाटून घेतले. कार्यकारिणीचे सदस्य कामाला लावले. सनदी अधिकार्याचे मित्र आणि त्यांचे नातेवाईक कामाला लावले. भव्य यंत्रणा या कामासाठी स्वतः ठालेंनी उभी केली. एवढेच नाही तर-अंबाजोगाईच्या साहित्य संमेलनाचा उपयोगही या निवडणुकीत मतपत्रिका गोळा करण्यासाठी झाला. स्वतः ठाले काही मतदारांना असे बोलले -
‘‘नमस्कार...’’
‘‘नमस्कार’’
‘‘मतपत्रिका आली का?’’
‘‘हो आली सर’’
‘‘तुम्हाला अंबाजोगाईला साहित्य संमेलनाला यायचंय’’
‘‘कशाला सर?’’
‘‘तुम्ही महाराष्ट्राचे लाडके कवी, कविसंमेलनात घेतलेय. राहायची सोय, मानधन आहेच’’
‘‘येतो सर’’
‘‘हो येतोना...’’
‘‘मतपत्रिका आणतो ना सर! गोव्यावरून मराठवाड्यात तुम्ही बोलावताय? मतपत्रिकेची चिंता करू नका?’’
*
‘‘नमस्कार’’
‘‘नमस्कार सर! गरीबाची आठवण कशी काय?’’
‘‘अंबाजोगाई साहित्य संमेलनात तुम्हाला कथाकथनात घेतलेय’’
‘‘आभार सर! आभार! मला अन् मराठवाड्यात?’’
‘‘तुम्ही महत्त्वाचे कथाकार आहात. मतपत्रिका आल्या का?’’
‘‘आजच आली ना सर, कुणाला द्यायचे सांगा?’’
‘‘येताना घेऊन या.’’
‘‘हो सर नक्की.’’
*
‘‘हॅलोऽऽ ठाले बोलतोय...’’
‘‘नमस्कार...’’
‘‘नमस्कार सर फोन केलात.’’
‘‘हो. तुमच्या पुस्तकाला मसापचा पुरस्कार मीच द्यायला लावला. दुसरे परीक्षक नको म्हणाले होते तरी...’’
‘‘पण सर मला गुणवत्तेवर दिल्याचे सांगितलेय.’’
‘‘म्हणावे लागते. मीच द्यायला सांगितला. मतपत्रिका आली का?’’
‘‘आली सर. मग?’’
‘‘ती पत्रिका माझ्याकडे पाठवायची’’
‘‘पण...’’
‘‘पण-बीण काही नाही. ते सानप विदर्भातले. त्यांना नाही मतं द्यायची. तुम्हाला पुरस्कार दिला होता. हे ध्यानात ठेवा. संमेलनाला या. पत्रिका घेऊन.’’
‘‘हूंऽऽ’’
अशाप्रकारचे फोन महाराष्ट्रभर प्राचार्य ठाले यांनी केले. अंबाजोगाईच्या साहित्य संमेलनात अनेक मतदारांनी भेटून मला सांगितले, ‘‘ठालेंना मतपत्रिका दिली बरं का!’’ किशोर सानप साहित्यातला बाप माणूस; पण नाविलाज. प्राचार्य ठालेंनी मसाप व बीड शिक्षण विभाग (जि. प.) आयोजित साहित्य संमेलनाचा उपयोग हुशारीने किशोर सानप या दिग्गज समीक्षकास पराभूत करण्यासाठी केला हे मात्र खरे!
प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांचे लक्ष्मीकांत देशमुखावरचे हे प्रेम आजचे नाही; ते फार पूर्वीचे आहे. दहा वर्षापूर्वी लक्ष्मीकांत देशमुख मराठवाड्यातून बदलीने कोल्हापूरला गेले.
प्राचार्य ठालेंना मी पंधरा-वीस मतपत्रिका दिल्या तेव्हा ठाले मला म्हणाले होते, ‘‘माझ्याऐवजी कोल्हापूरला असलेल्या लक्ष्मीकांत देशमुख यांना मसापच्या कार्यकारीणीत स्वीकृत सदस्य घेतले.’’
नांदेड येथे संपन्न झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही श्री. देशमुखांना ठालेंनी दिले होते आणि त्यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलन बडोदा येथील अध्यक्षपदासाठी प्राचार्य ठालेंनी प्रचंड मेहनत घेतली होती. या दोघांचे नाते असे घट्ट आहे. एका सनदी अधिकार्याने ठालेंच्या मदतीने मराठीतील दिग्गज, दखलपात्र साहित्यिक डॉ. किशोर सानपांचा पराभव केला. डॉ. किशोर सानप हे वंजारी समाजाचे तर प्राचार्य ठाले हे ‘मराठा’ समाजाचे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मतदार यादीत मराठा-ब्राह्मण यांची नव्वद टक्के मते तर किशोर सानप यांची फक्त सात-आठ मते. एकूण काय तर एका मराठ्याने (ठाले) वंजार्याचा (सानप) फक्त पराभव केला.
*
शाखा तिथे वाद...
इंग्रजाने दान केलेली नीती ‘फोडा, झोडा आणि राज्य करा’ याचे तंतोतंत पालन प्राचार्य ठाले करतात. मराठवाडा साहित्य परिषद हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या चळवळीचा इतिहास असलेली. हा खरे तर ऐतिहासिक मोठेपणा आहे. त्याच्या शाखा गावोगाव असायला हव्यात पण तसे घडले नाही. प्राचार्य ठाले ‘मसाप’ कार्यालयात तीस वर्षे कार्यरत आहेत असे ठामपणे सांगतात. मग फक्त पंधरा शाखाच कशा काय? खरेतर प्राचार्य ठालेंचे ‘कौतुक’ करावे तेवढे कमीच. ‘वीस वर्षात पंधरा शाखा’ याचेही राजकारण होते आहे. त्यातही काही शाखा प्रत्यक्षात आहेत तर काही शाखा कागदावरच! तर काही वर्धापनदिन व्याख्यानमालेचा खर्च प्राचार्य ठालेंनी त्या शाखेत दिला की, त्या जिवंत होतात.
*
मसापच्या शाखा मुळातच दहापंधरा. त्याचा बोन्साय ठालेंनीच केलाय. पंधरा वर्षापूर्वी मसाप शाखेतून चौदा-पंधराजण बिनविरोध निवडून येत. उरलेल्या तीन-चार जागेसाठी निवडणूक व्हायची. त्यामुळे कमीतकमी शाखा, त्याही यांच्याच ताब्यात राहणार्या. उदा. धारुर, जि. बीड येथे शाखा आहे. प्राचार्य ठाले तिथे प्राध्यापक असल्यापासून ते निवृत्त झाले तरीसुद्धा शाखा आहे. एवढी जुनी शाखा, एकही मसापचा कार्यक्रम न घेणारी, कागदावरची मसाप शाखा. मतदानासाठीचीच उरली आहे. 40-50 मते हक्काची. मराठा जातीची. ती सर्व ठालेंच्या घरी येतात. आता याला ‘बोन्साय’ नाही तर काय म्हणायचे? शाखा वाढू द्यायच्या नाहीत, तो मतदारसंघ (साखर कारखाना निवडणुकीसारखेच) आपल्या ताब्यात ठेवायचा, विजयी व्हायचे. शाखांची वाढ थांबली. पर्यायाने साहित्य चळवळीला खंडित करायचे काम ठालेंनी निवडणुकीच्या राजकारणापायी केले. सध्या कागदावरच्या शाखात बीड, जालना, केज, शिरुर, लातूर, उदगीर या शाखा शेवटच्या घटका मोजत आहेत. आम्ही उत्साहाच्या भरात शिरुरकासारला शाखा स्थापन केली. खर्च करुन उद्घाटन घेतले. कार्यक्रम घेत होतो. आजपावेतो एक रुपयाची कसलीच मदत शाखेला ठरवून केली नाही. नांदेड, परभणी, उस्मानाबाद या शाखांना हजारोंनी मदत केली जाते. हा दुजाभाव ठालेंनी केलाय. शिरुरची शाखा कार्यवाह दादा गोरेंनी बरखास्त केली होती. घटनेत नसलेले नियम काढायचे आणि नको असलेल्या शाखावर कुर्हाड चालवायची. त्यांना आजीव सभासदांची यादी करुन दिली अन् भांडून शाखा जिवंत ठेवली. असे हे महाशय. फोडा झोडात यांना डिलीट प्रदान करायला हवी.
*
असे आहेत गटतट
* केज - ईश्वर मुंडे + गदळे, गुंड
* बीड - सतीश साळुंके + सोपान सुरवसे, विजय जावळे
* लातूर - शेषराव मोहिते, योगीराज माने + गोविंद कुलकर्णी, विनय अपसिंगेकर
* अंबाजोगाई - दगडू लोमटे, अमर हबीब + दिनकर जोशी, डॉ. नागरगोजे
* नांदेड - जगदीश कदम + सुरेश सावंत
* परभणी - देविदास कुलकर्णी + आसाराम लोमटे
* जालना - संजीवनी तडेगावकर + जयराम खेडेकर
* उस्मानाबाद - तावडे + शेख
* माजलगाव - कमलाकर कांबळे + प्रभाकर साळेगावकर
* शिरुर - अनंत कराड + विठ्ठल जाधव.
अशापद्धतीने सगळीकडे कोंबड्यांना झुंजायला लावतात. भांडणारे सर्वजण ठालेंना आळीपाळीने भेटतात. येथे वाटणी करणारे माकड या कथेतल्या माकडासारखे भांडखोरांसोबत वागून स्वार्थ साधतात. म्हणून म्हणतो, ठाले फोडा, झोडा नीतीत पारंगत झालेत.
पाचशे रूपये आजीव सभासद वर्गणी होती. ती वाढवत गेल्या तीन वर्षापूर्वी रुपये तीन हजार रूपये केली. आजीव सभासदांची संख्या ठालेंनी महाविद्यालये, शाळा आणि नातेवाईक यातल्या सग्यासोयर्यांचा प्रचंड भरणा करुन ठेवलाय. म्हणून तर मसापची महत्त्वाची पदं मराठा जातीला दिलीत. ठाले जातीभिमानी आहेतच. अध्यक्ष -ठाले (मराठा)
कार्यवाह - गोरे (मराठा)
पुरस्कार कमिटी - मोहिते (मराठा)
प्रतिष्ठान संपादक - लोमटे (मराठा)
*
मसाप संमेलनात सर्वाधिक वर्णी मराठा लेखकांची.
जणू रतीबच.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही मराठा जातीच्या लेखकांची वर्णी.
हे पदाधिकारी त्यांच्या बायकांचीसुद्धा संमेलनात, कार्यक्रम पत्रिकेत वर्णी लावतात आणि त्यांचे चेले संमेलनभर सांगत सुटतात, ‘‘वहिनीचे भाषण जोरदार झाले.’’ टाळ वाजवणार्यांची संख्या खूप वाढलीय. प्रत्येक जिल्ह्यात यांनी बॅगा उचलणारे, सर्व सोयी करणारे अशा लेखकांची फळी तयार केलीय.
*
काळा दिवस
मसाप औरंगाबाद सोडून इतर साहित्य संस्था वाचक, रसिकांनी ऑनलाईन आजीव सभासद व्हावे म्हणून आवाहन करतात. पैसे भरा सभासद व्हा, अशी भूमिका घेत आहेत अन् आमच्या मसापने तीस वर्षे मसाप असलेल्या ठालेंना परस्सर आजीव सभासद करुन घेतलेले चालत नाही. मी एप्रिल-मे दरम्यान 16 आजीव सभासद केले. कोशाध्यक्ष मी होतो. सह्या करुन पावत्याही फाडल्या. पैसे मसाप खात्यावर जमा झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत मी ज्येष्ठ समीक्षक डॉ. किशोर सानप यांची बाजू जाहिरपणे घेतली. त्याचा राग ठालेंना आला. ठालेंच्या बगलेत बसलेल्या दादा गोरेंनी या रागावर जातीचे विष पेरले अन् माझे पद काढून घेण्यासाठी बायकी कारणांचा बागुलबुआ उभा केला. फिल्ंिडग जोरदार लावली. ठाले-गोरेचे चेले कामाला लागले. अंबाजोगाईच्या साहित्य संमेलनाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्याचे उग्र रुप दिसले. ठालेंच्या कारभाराची चिरफाड करणारे निनावी पत्र मराठवाडाभर आजीव सभासदांना आले होते. ते पत्र मी लिहून पाठवल्याचा आरोप दादा गोरेंनी केला. त्यावर घमासान चर्चा झाली. काही झेलीराम तर मला शिक्षा करावी अशी मूर्खपणाची मागणी करु लागले. ठालेभक्त बैठकीत माझ्यावरच बोलू लागले. त्यात अगदी होऊ घातलेल्या 40 व्या मसापच्या नियोजित संमेलनाचे अध्यक्ष डॉ. हृषिकेश कांबळेही होते. साप सोडून दोरीला बडवण्यात भक्तांमध्ये स्पर्धा लागली होती आणि तिथेच ठराव घेतला गेला, ‘‘डॉ. भास्कर बडेंनी 16 आजीव सभासद केलेत. त्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव सभागृहात मांडत आहे.’’
ठराव माझे मत सोडता मंजूर झाला. रद्द केलेल्या आजीव सभासदांच्या पावत्या रद्द केल्याचे पत्र आणि तीन हजाराचे चेक पोष्टाने कार्यवाह गोरेंनी तातडीने पाठवले. तो मसापच्या इतिहासातील काळा दिवस ठाले-गोरेमुळे घेण्यात आला तर कार्यकारीणी सदस्यांनी डोळ्यावर पट्ट्या बांधल्या होत्या. बहुमताच्या पुढे काय चालणार? तो काळा दिवस मसापच्या इतिवृतात नोंदला गेलाय.
सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा मूर्खपणा कार्यकारिणीने घेतला.
*
अपमानच वाट्याला
तीनही निवडणुकात मी आघाडीवर होतो. मतपत्रिका गोळा करण्यात हातखंडा. खूप पळायचो. बाकी कोण पळाले ते ठालेंनी छातीवर हात ठेवून सांगावे. मराठवाडाभर जुना-नवा मतदार ओळखीचा झालेला. मराठवाडाभर प्रवास केला. त्यासाठीचा खर्च ठालेंनी विचारला नाही, मी कधी मागितला नाही. मुरुड, बीडमधील दोन्ही लेखिका संमेलने, कडा येथील संमेलन यासाठी मी धावपळ केली. संयोजक तयार करणे, त्यांना मदत करणे, अगदी सोयगावच्या संयोजकाना मदत केली. खरे सांगायचे तर मी मसापमय झालो होतो...
हे कार्य करताना ठालेपुरस्कृत अपमानही वाढतच चालले. मग मात्र मसाप सोडावी वाटायची. मी शिफारस केलेली नावे न स्वीकारणे, साक्षात स्वागत कार्यक्रमात माझ्याकडच्या नावांना डावलणे, प्रतिष्ठानला कवितांची शिफारस मी केली तरी निर्णय न घेणे, नंतर बिनलाजेपणाने हरवल्या म्हणणे या व अशा घटना आसाराम लोमटे संपादक झाल्यानंतरच्या आहेत. जालना, सोयगाव, नांदेड आदी संमेलनात मी शिफारस केलेली नावे कचराकुंडीत टाकणे, अखिल भारतीय संमेलनासाठीची एकही शिफारस स्वीकारली नाही, लिखित कळवूनही पाहिले तरी त्यांचा निगरगठ्ठपणा जाईना. मी पदावर असल्याची मला लाज वाटू लागली. आपण पदाधिकारी असून कोणालाच न्याय देऊ शकत नाही... डोकं भन्न व्हायचं. कशाला पदावर बसलोत असं पदोपदी वाटायचं. हे पद मला शेळीचे शेपूट वाटू लागले. या शेपटाने लाज राखता येईना अन् माशाही हाणता येईना. माझी चिडचिड वाढत गेली. ठालेंनी ठरवून डोळेझाक केली कारण आ. सतीश चव्हाणांनी फोडलेला घाम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने वाळला होता अन् ताज्या घोड्यावरच्या गोमाशा मिळाल्या होत्या. त्या रिंगणात ठाले अडकले होते. ठालेंना विजयाची नशा चढली होती. तीन निवडणुकांचा अनुभव सांगतो. ठालेंना गरज पडू द्या, ते लोटांगण घालू शकतात. इतका ‘नम्ब्री’ माणूस आहे. एकमात्र खरे, आ. चव्हाणच मसापतून ठाले अँड कंपनीला सहज घालवू शकतात.
अंबाजोगाई साहित्य संमेलनातील माझ्या सहभागाला विरोध केला. गोरेंनी माझ्या नावाला विरोध करुन स्वतःच्या पत्नीचे नाव घेतले. माझ्या जिल्ह्यात माझ्या नावाला विरोध; तेही मी कोशाध्यक्ष असताना. कशासाठी पदावर रहायचे? हा प्रश्न मनाला बोचत होता. अंबाजोगाई संमेलनातच्या उद्घाटनात दोघांनी स्वतःचे सत्कार घेतले तर उपाध्यक्ष किरण सगर आणि माझा सत्कार कार्यकर्त्यांसोबत टाकला. ठराव वाचनातले नाव गाळून टाकले. एकूण अपमानाचा रतीब माझ्या वाट्याला येतच होता. पुढे बदल होईल या आशेवर अपमान पचवत होतो.
*
माजी आमदार उषाताई दराडेंना गळ घालून लेखिका संमेलन घ्यायला लावले. महिनाभर संमेलनासाठी धावपळ केली. स्वखर्चाने, उत्तमरित्या संमेलन पार पडले. उद्घाटनाच्या सत्रात अध्यक्ष ठालेंनी एका सदस्याचे पोटभर कौतुक केले, मात्र माझ्या नावाचा पदाधिकारी असूनही उल्लेख केला नाही. या वागण्याला बेरकी नाही म्हणावे तर काय म्हणावे? सोयगाव संमेलनात माझे नावच गाळून टाकले. चौकशीअंती कळाले, ठालेंनी गाळायला सांगितले. ठालेंच्या या फालताड पराक्रमाचा राग येत होता.
*
अपमानच...
माझी कोषाध्यक्षपदी निवड झाली आणि लगेच एक ठराव घेऊन माझे पंख छाटले. यापूर्वी चारही पदाधिकारी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य असायचे. तो ठराव कार्यकारिणीचे सदस्य आसाराम लोमटे यांना मंडळावर पाठविण्यात येत आहे, कोशाध्यक्षाचा पत्ता, माझा पत्ता कट केला. अशा चालबाजांनी मी वैतागलो होतो. अध्यक्ष ठाले, कार्यवाह गोरेंनी दोघांसाठी एसीसह महागडे फर्निचर करुन घेतले. मला वाटले उपाध्यक्ष-कोशाध्यक्षासाठीही फर्निचर मागवतील. तयार करुन घेतील! पण छे! वर्षभर पाठलाग केला तरी फर्निचर सोडा साधी खुर्ची, टेबल, कपाटसुद्धा नाही. इतर पदाधिकारी आपल्यापेक्षा मोठे होऊ नयेत, त्यांना सभासदांनी आपुलकी देऊ नये अशा स्वभावाचे ठालेसर आहेत. आजही उपाध्यक्ष-कोशाध्यक्षाला स्वतंत्र खुर्ची, टेबल, कपाट नाही. ही दोन्ही पदं स्टँम्पसारखी पूर्वी वापरली. मी विरोध केला. मला पदावरुन हटवले अन् पूर्वीचे देवीदास कुलकर्णी यांनाच कोशाध्यक्ष केले. कुलकर्णीचा तो स्वभाव आहे. असो! कोणी कसे वागावे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला हा अपमान नाही सहन झाला. म्हणून दोन हात केलेत. मसापत फारच रामराज्य चालल्याचा आव ठालेसर आणत आहेत. पूर्वी ठाले सर्वसमावेशक वागायचे परंतु दादा गोरेसारखा विषारी माणूस सोबतीला घेतल्यापासून ठाले बिघडले... जात, जात असं बरळू लागले.
कोर्या चेकवर सह्या करण्याशिवाय मला पर्याय नव्हता. सहनशीलता संपली आणि चेकवर खर्चाचा आकडा टाका, तरच सही करणार अशी ठाम भूमिका घेतली. ही भूमिका त्याच्या जिव्हारी लागली अन् राक्षसी मताने मला कोशाध्यक्ष पदावरुन मी बैठकीत नसताना हटवले. असे छानछान मसापात सुरु आहे. कौतुकरावाचे कौतुक काय करावे? सांगावे तेवढे वाढतच जाते! त्यांच्या कार्यावर ‘कौतुकचालिसा’ ग्रंथ होऊ शकतो.
चपराक दिवाळी महाविशेषांक २०१८
मासिक 'साहित्य चपराक' दिवाळी विशेषांक २०१८

नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणाच्या आखाड्यात उतरले त्याला आता पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. तेव्हा त्यांना मुळात पक्षातल्या विरोधावर मात करावी लागलेली होती आणि नंतर देशव्यापी प्रचाराची मोहिम चालवताना पक्षाची संघटनाही कुशलतेने हाताळावी लागत होती. त्यासाठी बारीकसारीक विविध पातळीवरच्या पक्ष व संघटनेच्या शाखा, त्यात नेतृत्व करू शकणार्यांची एक साखळीच उभी करावी लागलेली होती. त्याचा राजकीय लाभ मिळून मोदींनी मोठा इतिहास घडवला आणि आघाडीचे युग असल्याची समजूत मोडीत काढून एकपक्षीय बहुमत मिळवलेले होते. आता त्याला पाच वर्षाचा कालावधी उलटून गेलेला असला तरी अजून देशातल्या चाकोरीबद्ध राजकीय अभ्यासकांना त्या घडामोडीचे नेमके विश्लेषण करता आलेले नाही. त्याच्या भावी परिणामांचा कुठला आडाखा बांधता आलेला नाही. याचे प्रमुख कारण देशातले असे विश्लेषक व अभ्यासक कायम इतिहासात भविष्याची पाळेमुळे शोधत असतात, धागेदोरे शोधत असतात आणि त्यात गैर काहीच नाही! पण इतिहासातील घटनांची तशीच्या अशी पुनरावृत्ती होत नसते तर त्यातून दिशा व संकेत मिळत असतात. ते ओळखून भविष्य कुठल्या दिशेने जाऊ शकेल त्याचा अंदाज बांधणे शक्य असते. काळ बदलतो, व्यवहार बदलतात, पिढ्या बदलतात आणि माणसेही बदलतात. साहजिकच घटनांचे स्वरूपही बदलत असते. म्हणूनच इतिहासाचे दाखले देताना व संदर्भ घेताना, तपशील दुय्यम आणि आशय निर्णायक, महत्त्वाचा असतो. जगाच्या कुठल्याही देश समाजसमूहाच्या इतिहासाचा व वर्तमानाचा अभ्यास करताना ही वाट सोडून चालत नाही. तसे केल्यावर भरकटणे अपरिहार्य असते. म्हणूनच मोदींच्या राष्ट्रीय क्षितिजावर येण्यापासून आजपर्यंत बहुतांशी राजकीय आडाखे, अंदाज व भाकितांची चुकामूक होत राहिली आहे. ‘हत्ती आणि सहा आंधळे’ अशी कथा होऊन गेलेली आहे.
आता पुन्हा लोकसभेच्या निवडणुकांची चाहूल लागलेली आहे. आणखी आठ-नऊ महिन्यांनी लोकसभेचे मतदान संपून निकाल लागलेला असेल आणि पुढल्या काळाची राजकीय दिशा निश्चित झालेली असेल पण तो निकाल लागण्यापर्यंत विविध भाकिते व राजकीय अंदाज व्यक्त होत राहणार आहेत. ती भाकिते कुठल्या एखाद्या घटना, निवडणुका वा पोटनिवडणुकांच्या निकालावर आधारित असली तर फसण्याला पर्याय नाही. काही महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना कॉंग्रेसचे अभ्यासू नेते जयराम रमेश यांनी आपल्या पक्षाच्या दुर्दशेबद्दल छान मतप्रदर्शन केलेले होते. कॉंग्रेससमोर अस्तित्वाचा गंभीर प्रश्न उभा असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली होतीच पण पक्षातील मानसिकता व वर्तनाविषयी त्यांनी नेमके दुखण्यावर बोट ठेवलेले होते. ‘‘सल्तनत वा बादशाही कधीच संपलेली आहे पण आमचे नेतृत्व मात्र आजही नबाबी थाटात वागते आहे,’’ असे शब्द रमेश यांनी वापरलेले होते. ब्रिटीश सत्ता भारतात प्रस्थापित झाल्यावर त्यांनी बहुतांश राजे, नबाब व सुलतानांची सत्ता मोडीत काढलेली होती. बदल्यात जे असे संस्थानिक ब्रिटीश सत्तेशी सलोख्याने वागतील त्यांना मर्यादित अधिकार व तनखा देऊन आपला ऐषोआराम उपभोगण्याची सुविधा दिलेली होती. अगदी अशा खालसा संस्थांची सुरक्षाही ब्रिटीश सत्तेने आपल्याकडे घेऊन सैनिकांचा ताफाही आपल्या कब्जात ठेवला होता. परिणामी हे राजे, नबाब दिखाऊ वा प्रदर्शनी, नामधारी बादशहा उरलेले होते. रमेश यांनी कॉंग्रेस नेतृत्वाची त्यांच्याशी तुलना केलेली होती पण त्यातले तथ्य वा आशय कोणाही पक्षनेत्याने समजून घेतला नाही की कुणा अभ्यासकाने त्याचे राजकीय विश्लेषण करणे आवश्यक मानले नाही. मग पुढल्या निवडणुकीत देशाची सत्ता मिळवायला निघालेली कॉंग्रेस आणि सत्ता टिकवायला सज्ज होत असलेला भाजपा, यांचे विवरण कसे होऊ शकते?
पाच वर्षापूर्वी माझे ‘मोदीच का?’ शीर्षकाचे पुस्तक प्रसिद्ध झालेले होते. वास्तविक ती 2013 च्या पूर्वार्धात प्रसिद्ध झालेली लेखमाला होती. एका मित्राच्या आग्रहामुळे त्याचेच पुस्तक झाले. तेव्हा देशातले तमाम अभ्यासक मोदी जिंकू शकत नाहीत, भाजपा मोठा पक्ष झाला तरी मोदी पंतप्रधान होऊ शकत नाहीत असे अनेक निष्कर्ष काढत होते. अगदी मतचाचण्याही कुठल्याही मार्गाने भाजपा आघाडीला बहुमतापर्यंत घेऊन जायला तयार नव्हत्या. त्यामुळेच भाजपाला एकपक्षीय बहुमताची गोष्ट अशक्यच म्हटली जात होती. अशावेळी मी मात्र वर्षभर आधीच मोदीच भाजपाला सत्तेपर्यंत, बहुमतापर्यंत घेऊन जातील, असे भाकित केलेले होते. त्याला विविध संदर्भ, ऐतिहासिक घटना व धागेदोरे आणि बदलती राजकीय परिस्थिती कारण होती. आज परिस्थिती आणखीनच बदलून गेली आहे. मात्र दिशा बदललेली नाही! पण मला सर्वात आश्चर्य या गोष्टीचे वाटते, की अजूनही राजकीय अभ्यासक व विश्लेषकांना आपल्या पाच वर्षे जुन्या चुका दुरूस्त करण्याची गरज वाटलेली नाही. तेव्हाच्या चुका नव्याने चालल्या आहेत आणि त्याच चुकांच्या पायांनी विश्लेषणाची वाटचाल चालली आहे. अनेकदा नेमके संदर्भ व इतिहासाचे दाखले समोर आणले जातात पण निष्कर्ष मात्र धडधडीत चुकीचे काढले जातात. काही प्रसंगी निकषही योग्य असतात पण त्यातून काढलेला निष्कर्ष चुकीचा असतो. माझा एक समाजवादी मित्र पत्रकार सुनील तांबे याने काही महिन्यांपूर्वी म्हणजे सांगली, जळगाव महापालिका भाजपाने जिंकल्या, तेव्हा एक छोटीशी पोस्ट फेसबुकवर टाकलेली होती. त्यात त्याने भाजपाच्या घोडदौडीसाठी तीनशे वर्षे जुन्या भारतीय इतिहासातला अप्रतिम दाखला शोधून मांडला होता. मलाही तो इतिहास ठाऊक आहे पण आजच्या युगाशी त्याची तुलना करायचा विचारही मनाला शिवला नव्हता. सुनीलची पोस्ट इथे वेगळ्या चौकटीत मुद्दाम सादर केलेली आहे.
माझ्या गेल्या आठदहा वर्षातल्या लिखाणातून मी सातत्याने आजच्या पुरोगाम्यांना झोडून काढलेले आहे. त्यांना अनेक शब्दातून ठोकून काढलेले आहे पण त्याचा अर्थ मी कधी पुरोगामी विचारांची अवहेलना केलेली नाही. किंबहुना मला जे काही पुरोगामित्व माहिती आहे किंवा उमेदीच्या काळात ज्येष्ठांकडून पुरोगामी धडे मी गिरवलेले आहेत त्याविषयी माझ्या मनात कुठल्याही शंका नाहीत पण आजकालचे पुरोगामी वर्तन व युक्तीवादाची किळस येण्यापर्यंत घसरण झालेली आहे. पुरोगामी विचार आपल्या जागी आहेत आणि त्यांचे लेबल लावून चक्क प्रतिगामीत्व लोकांच्या समोर पेश केले जात असते. अशा पुरोगामी झुंडी वा दिवाळखोरांना कितीही नावे ठेवली, तरी मी कधीही त्यांना ‘बाजारबुणगे’ हा शब्द वापरला नव्हता. सुनीलने अतिशय सहजगत्या त्या शब्दाचा उपयोग केला आहे. किंबहुना मलाही तेच सांगायचे असेल पण तो शब्द वापरण्याची हिंमत झाली नसेल, कारण मी बघितलेले खरेखुरे जुने पुरोगामी विचारवंत, राजकीय नेते, कार्यकर्ते कधीच बाजारबुणगे नव्हते. ते अतिशय मेहनती व विवेकी होते. आपल्या बुद्धीने चालणारे प्रामाणिक लोक होते. आज पुरोगामी म्हणून भुरटेगिरी करणार्यांमध्ये त्यांचा लवलेश आढळून येत नाही. म्हणूनच सुनील तांबेने योजलेला शब्द नेमका आहे. ‘बाजारबुणगे’ म्हणजे पूर्वीच्या लढाया, युद्धामध्ये प्रत्यक्ष न लढणारे वा कसोटीच्या प्रसंगी बोजा बनून व्यत्यय आणणार्या खोगीरभरतीसाठी हा शब्द वापरला जात असे. अशा प्रत्यक्ष युद्धासाठी निरूपयोगी असलेल्या परंतु युद्धप्रयासाला बोजा बनणार्यांमुळे मोठमोठ्या फौजाही पराभूत झाल्या आहेत. आज पुरोगामी लढाईची पिछेहाट नेमकी तिथेच झालेली आहे. किंबहुना मोदी-शहांच्या शिस्तबद्ध राजकीय कार्यकर्ता फौजेसमोर पुरोगामी बाजारबुणग्यांची मोठी संख्या व सेना टिकाव धरू शकलेली नाही, असाच सुनीलच्या पोस्टचा आशय आहे.
साडेचार वर्षापूर्वी नरेंद्र मोदी व भाजपाने इतके मोठे राजकीय यश का मिळवले आणि नंतरच्याही राजकीय संघर्षात पुरोगामी म्हणवणार्यांचा पदोपदी पराभव कशामुळे होत गेला, त्याचे सुनीलइतक्या मोजक्या व नेमक्या शब्दातले विश्लेषण मलाही आजवर करता आलेले नाही. सुनीलने ते नेमके केलेले आहे पण ज्यांच्यासाठी त्याने ते विश्लेषण केले, त्यांना त्यातला आशय किती समजला याची शंका आहे. कारण सुनीलचे चाहते व अनुयायी बहुतांश पुरोगामी व कडवे आहेत. त्यांनी माझ्या अनेक पोस्ट वा प्रतिक्रिया वाचून उफराटी वक्तव्ये केलेली आहेत पण माझ्यापेक्षा त्यांच्या नाकर्तेपणाला सुनीलने नावे ठेवली, तिथे मात्र यापैकी प्रत्येकाने ‘लाईक’चे चिन्ह टाकून, त्याच पोस्टला म्हणजे बाजारबुणगे या अपशब्दाला डोक्यावर घेतलेले होते. याचा एक अर्थ असा होतो, की त्यापैकी कोणाला मुळची पोस्ट वा मजकूर समजून घ्यावा असे वाटले नाही, की त्याचा अर्थही लागलेला नसावा. सुनील हा समाजवादी पुरोगामी असल्याने त्याने काहीही लिहिले तरी ते पुरोगामी, पुरोगामित्वासाठी उपयुक्त असल्याचे डोळे झाकून मान्य केल्याने, आपण मोठे पुरोगामी कर्तव्य बजावल्याची धारणा त्यांच्यामध्ये असावी. अन्यथा त्यातले मोदी-शहांचे कौतुक त्यांना आवडण्याचे काहीही कारण नाही. तशीच त्यातली पुरोगाम्यांची शेलक्या भाषेत केलेली अवहेलना त्यांना सोसण्यापलीकडला विषय आहे पण तशी कुठली उफराटी प्रतिक्रिया सुनीलच्या पोस्टवर दिसली नाही. यातून आजच्या पुरोगामित्वाची पातळी लक्षात येऊ शकते. मोदींच्या यशाचे कौतुक केल्यावर झटपट त्यावर भक्तीचा शिक्का मारण्यासाठी उतावळ्या झालेल्या याच लोकांना, सुनीलने केलेले कौतुक का टोचले नाही? तर त्यातला आशय, विषय समजून घेण्याच्या विवेकबुद्धीला त्यांनी चाट दिलेली आहे. ती देऊ शकेल तोच आज पुरोगामी म्हणून प्रमाणित होऊ शकतो, ही त्या वर्गाची शोकांतिका आहे.
सुनीलची ती पोस्ट मी दोन-तीनदा वाचून काढली, शेअर पण केली. गेल्या पाच वर्षातल्या राजकारणात मोदी-शहा ही जोडगोळी वा संघप्रणित भाजपा कसा इतका यशस्वी होतोय, त्याचा मोजक्या शब्दात उलगडा होऊन गेला. यात भाजपाची जमेची बाजू आणि पुरोगामी म्हणून सतत कंठशोष करणार्या विरोधकांची दुबळी बाजू सहज लक्षात येऊन गेली. किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन येत्या लोकसभा वा अन्य निवडणुकीत पुन्हा पुरोगामित्वाचे पाखंड या लोकांना का वाचवू शकणार नाही, त्याचाही खुलासा होऊन गेला. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे मोजके पण कवायती सैन्य आणि सिराज उद दौलाची बाजारबुणग्यांची विस्कळित बेशिस्त फौज, यांच्यातली ही लढाई आहे. शिस्त असलेले कार्यकर्ते व त्यांची कायमस्वरूपी उभी असलेली खडी फौज कुठल्याही चौपट-पाचपट मोठ्या संख्येच्या जमावाला पांगवू शकत असते. कुठल्याही शहरात वा भागात दंगल माजते तेव्हा तिथे जमावाच्या तुलनेत किरकोळ असलेली सेना वा पोलिसांच्या तुकड्या लौकरच शांतता प्रस्थापित करतात कारण ती लढाई प्रत्यक्षात दोन जमावांमध्येच असते आणि त्यातला एक जमाव शिस्तबद्ध संघटना असते तर दुसरा जमाव संख्येने मोठा असला तरी प्रत्यक्षात ती नुसती गर्दी असते. त्यात एकमेकांविषयी आस्था नसते की कुठले समान उद्दीष्ट घेऊन तो जमाव एकत्र आलेला नसतो. कुठल्या तरी क्षणिक कारणाने त्यांना उद्दीपित केलेले असते आणि त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून ती विस्कळित लोकसंख्या जमावात रुपांतरीत झालेली असते. लढणे वा प्रतिकार, संघर्ष वगैरे असे कुठलेही प्रशिक्षण त्या जमावला मिळालेले नसते. शिस्तीची फौज त्यात कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेली असते. ब्रिटीशांची फौज आणि नबाब सिराज उद दौलाच्या सैन्यामध्ये हा नेमका फरक होता आणि त्याचीच पुनरावृत्ती आज भारतीय राजकारणात होत आहे.
ब्रिटीश वा युरोपियनांचे भारतात आगमन व सत्तासंघर्ष सुरू होण्यापूर्वी भारतातील राजकीय लढाया अशाच विविध सरदार-दरकदारांची एक आघाडी असायची. अशा स्थानिक सुभेदार वा सरदारांची जितकी मोठी संख्या एखाद्या नबाब, राजा वा बादशहाच्या पाठीशी उभी असेल, तितका तो शिरजोर ठरत होता. त्यातले सरदार, सुभेदार आपली बाजू बदलून सत्ताबदल घडवू शकत होते. त्या सैनिकांच्या तुकड्या सरदाराशी बांधील असायच्या. त्यांना बादशहा, राजा वा नबाबाशी कर्तव्य नव्हते की त्यांच्याठायी अशा सैनिकांच्या निष्ठाही नसायच्या. त्यापैकी कोणी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला तर त्याला ठेचण्याची कुवत बाळगणारा सुलतान वा नबाब होऊ शकत होता. आज प्रादेशिक पक्ष वा नेते यांची स्थिती वेगळी नाही. स्वातंत्र्योत्तर काळात कॉंग्रेसची हुकूमत वा सल्तनत अशीच होती. अतुल्य घोष, चंद्राभानु गुप्ता, मोरारजी देसाई किंवा मोहनलाल सुखाडीया, कामराज वा निजलिंगप्पा असे प्रादेशिक सुभेदार होते आणि नेहरूंनी त्यांना आपले अंकित करून ठेवलेले होते. नेहरूंनी वा दिल्लीच्या कॉंग्रेस नेत्यांनी त्यांच्या कामात व अधिकारात कधी ढवळाढवळ केली नाही. अशा प्रादेशिक सुभेदारांच्या निष्ठा दिल्लीश्वरांच्या चरणी रुजू असायच्या आणि त्यांनी लोकसभेच्या लढतीमध्ये दिल्लीश्वरांना अधिकाधिक लोकसभेचे सदस्य निवडून द्यायचे असत. नंतर त्यांनी आपल्या राज्यात व विधानसभेत आपली हुकूमत राबवण्याची मोकळीक त्यांना मिळत असे. त्यांनी कधी नेहरूंच्या हुकूमतीला वा सत्तेला आव्हान दिले नाही, की राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा बाळगल्या नाहीत. जेव्हा त्यांच्या प्रादेशिक नेतृत्वात वा महत्त्वाकांक्षेत दिल्लीश्वरांनी ढवळाढवळ सुरू केली तिथून कॉंग्रेसची सल्तनत ढासळायला आरंभ झाला होता. इंदिराजी व नंतरच्या पिढीत सिराज उद दौला दिल्लीतूनच देशाची सूत्रे हलवू लागले आणि त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी एका कवायती फौजेची गरज होती.
सिराज उद दौला हा बंगालचा नबाब होता आणि तो खूप मातला होता असे इतिहास म्हणतो. म्हणजे नेमके काय? तर आपल्या आजोबापासून वारशात मिळालेल्या राज्यसत्तेची मस्ती सिराजला चढलेली होती. ती त्याच्या बोलण्या-वागण्यातून प्रत्येकाला अनुभवास येत होती. पिता वा आजोबाच्या अनेक निष्ठावान सहकारी व ज्येष्ठ सरदारांना उठताबसता अपमानीत करण्याचे प्रसंग वारंवार घडत होते. याच्यापेक्षा दुसरा कोणीही सत्तेत आला वा राज्य बदलले तरी बरे; असे म्हणायची पाळी सिराजनेच आपल्या सहकारी व सरदारांवर आणलेली होती. 1970 नंतरच्या कालखंडात विविध राज्यात जे प्रादेशिक पक्ष उदयास आले व त्यांनी आपला जम बसवला, त्यांचा सर्व इतिहास तपासला, तर ही गोष्ट लक्षात येईल. हे सर्व प्रादेशिक पक्ष व नेते कॉंग्रेसी दिल्लीश्वरांच्या मस्तवाल मुजोरीचे परिणाम आहेत. उत्तरप्रदेशचे चौधरी चरणसिंग यांच्यापासून कालपरवाच्या ममता बानर्जी व आंध्राच्या जगनमोहन रेड्डीपर्यंतचे प्रादेशिक नेते व पक्षांच्या उगमात कॉंग्रेसश्रेष्ठी वा नेहरू-गांधी घराण्याचे मातलेपण सामावलेले दिसेल. जितक्या गुणी वा प्रभावी स्थानिक प्रादेशिक नेत्यांना कॉंग्रेस दुखावत गेली त्यातून ह्या नाराजांनी प्रादेशिक तंबू उभारले आणि कॉंग्रेसची केंद्रीभूत सत्ता खिळखिळी होत गेली पण ती ढासळून पडत नव्हती. तिला पर्याय देऊ शकणारी संघटना व कवायती सेना आवश्यक होती. भाजपा-संघाने त्या दिशेने मागल्या तीन दशकात पद्धतशीर प्रयत्न केले आणि गांधी घराण्याने दुखावलेल्यांना हाताशी धरून एक एक राज्यात आपले हातपाय विस्तारलेले आहेत. राज्य राजाचे होते की नबाबाचे वा ब्रिटीश कंपनीचे, याच्याशी सामान्य भारतीय जनतेला कर्तव्य नव्हते. तिला सुरक्षित व शांततामय जीवन जगण्याची हमी देणारी सत्ता हवी होती आणि तसेच पर्याय भारतीय इतिहासाला कलाटणी देत गेलेले आहेत.
1967 सालात कॉंग्रेसच्या एकछत्री राज्याला आव्हान देण्याचा पहिला संघटित प्रयास अनेक राज्यात सुरू झाला. या स्थानिक सुभेदारांनी एकजुटीने कॉंग्रेस संपवण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून आघाडीच्या राजकारणाला सुरूवात झाली. खरेतर त्यानंतर कॉंग्रेसने आपल्या विविध राज्यातील नेत्यांना, सुभेदारांना गुण्यागोविंदाने वागवले असते तर विरोधकांची एकजूट वा आघाड्या राजकारण बदलू शकल्या नसत्या पण तसे होऊ शकले नाही. उलट इंदिराजींनी आपली सत्ता व एकछत्री हुकूमत टिकवण्यासाठी सगळ्याच कॉंग्रेसी सुभेदारांना संपवण्याचा चंग बांधला. ब्रिटीश सत्तेच्या काळात वा मुघलांच्या जमान्यात सुभेदार गव्हर्नर नेमले जायचे तसे इंदिराजींनी आपल्याशी व्यक्तिगत निष्ठावान कॉंग्रेस नेते राज्यांसाठी नेमायचा पवित्रा घेतला. त्याच्या परिणामी कुठल्याही कर्तबगार नेत्याला कॉंग्रेसमध्ये स्थान उरले नाही. त्याने अन्य पक्षात जावे किंवा स्वबळावर आपला प्रादेशिक पक्ष उभारावा असाच पर्याय शिल्लक होता. आज जे अनेक प्रादेशिक पक्ष शिरजोर झालेले दिसतात ती त्याच मातलेपणाची संतती आहे. दुसरीकडे विविध वैचारिक भूमिकाचे पक्ष स्वातंत्र्योत्तर काळात उदयास आले. त्यांनी कधी तळापासून राजकीय संघटना बांधणीचा जोरदार प्रयास केला नव्हता. त्यापेक्षा आघाडीचा मार्ग चोखाळून सत्तेची शिडी चढण्याचे प्रयोग झाले. आणीबाणी उठल्यावरचा जनता पक्षाचा तोच प्रयोग होता पण त्यात अशाच बाजारबुणग्यांचा प्रभाव होता आणि मग पुन्हा इंदिराजींनी बाजी मारली. त्यांच्या हत्याकांडाने देश बिथरलेला असताना राजीव गांधी मोठे यश मिळवून गेले पण ती कॉंग्रेसला मिळालेली संजीवनी नव्हती तर भारतीय जनतेची अगतिकता होती. त्यानंतर भाजपाने पद्धतशीरपणे ‘कवायती सैन्य’ उभारण्याचे काम हाती घेतले. ब्रिटीशांनी जसा प्रस्थापित नबाब, बादशहा वा मराठ्यांच्या सत्तेला पर्याय उभा केला तेच काम 1990 नंतर भाजपाने हाती घेतले.
विचारसरणीचा टेंभा मिरवायचा आणि कृती मात्र सत्तालालसेची करायची हे भारताचे राजकारण होऊन गेलेले होते. त्याचाच लाभ उठवित भाजपा आपली वाटचाल करीत राहिला; तर कॉंग्रेसची बादशाहत असलेल्या नेतृत्वाला कधी आपले स्थान खिळखिळे होत असल्याचे भान येऊ शकले नाही. आधीच्या दहा वर्षात भाजपाचे स्थान थोडे दुबळे झाले होते आणि कॉंग्रेसच्या पुरोगामी खुळखुळ्याला भुललेले पक्ष हाताशी धरून सोनियांनी सत्ता उपभोगली पण बहुमत हाताशी नसताना त्यांची मस्ती इंदिराजी वा राजीवच्या बेछूट मस्तीपेक्षा अजिबात कमी नव्हती. 2013 सालात मनमोहन सरकारने काढलेला एक अध्यादेश पत्रकार परिषदेत फाडून टाकण्याची राहुल गांधींची कृती लाचार असूनही मनमोहनसिंग यांना दुखावून गेली होती. त्यांनी न्यूयॉर्कहून आपली नाराजी सोनियांना कळवली होती. हे नबाबी मस्तवालपणाचे एक ज्वलंत उदाहरण मानता येईल. त्यापेक्षा सिराज उद दौला आपल्या जुन्या निष्ठावान सहकारी व सरदारांचा वेगळा अपमान करीत नव्हता. सिराजची नबाबी व राहुल गांधींची स्थिती तसूभर वेगळी नव्हती. सुंभ जळले तरी पीळ जात नाही म्हणतात, तशी गांधी घराण्याची ही मस्ती लोकांच्या नजरेत भरणारी होती आणि सामान्य जनताही त्याला विटलेली होती पण त्याच घराण्याची हुजरेगिरी करणार्या तथाकथित बुद्धीमंत संपादक वा अभ्यासकांमध्ये सत्य बोलण्याची हिंमत राहिलेली नव्हती. त्यात बदल घडवण्याची कुवत असलेला कोणी नेता कॉंग्रेसमध्ये उरलेला नव्हता. त्यामुळे पुढे जाऊन राहुल गांधी आता कॉंग्रेसचे अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांच्या प्रत्येक खुळेपणाचे समर्थन करण्यापेक्षा कॉंग्रेसला व अन्य पुरोगाम्यांना काही काम शिल्लक उरलेले नाही ही आजची राजकीय स्थिती आहे. एकीकडे कवायती फौज म्हणावी असे मोदी-शहांनी उभारलेली निवडणुका जिंकणारी देशव्यापी यंत्रणा आणि दुसरीकडे नुसती पुरोगामी जपमाळ ओढणार्या बाजारबुणग्यांचा जमाव.
सिराज उद दौलाची सत्ता संपवून बंगालमध्ये पाय रोवलेल्या ब्रिटीश इंडिया कंपनीने तिथल्या प्रदेशातील जनतेला, व्यापारी, उद्योजक इत्यादींना इतके शाश्वत शासन व व्यवस्था दिली की त्यामुळे उर्वरीत भागातील मतलबी, स्वार्थी व बेजबाबदार सुलतान नबाबांविषयी जनतेच्या मनातला तिरस्कार अधिकच वाढत गेला. परिणामी ब्रिटिश कंपनी वा सत्ता आपले हातपाय देशभर पसरत जाऊ शकली. योगायोगाने 2002 सालात गुजरातची दंगल हा देशव्यापी विषय बनवला गेला आणि त्या दंगलीला वा तिथल्या भाजपाच्या मोदी शासनाला ‘हिंदुत्त्वाची प्रयोगशाळा’ असे नाव पुरोगाम्यांनीच दिलेले होते. जे ब्रिटीश कंपनीच्या बाबतीत बंगालमध्ये झाले, तेच भाजपच्या बाबतीत गुजरातमध्ये झाले. मोदींनी जी सत्ता राबवली, त्याची हेटाळणी व अवहेलना तमाम ‘बाजारबुणगे’ पुरोगामी बुद्धिमंत सतत करीत राहिले पण प्रत्यक्षात लोकांना तीच मोदीसत्ता भावत चाललेली होती. एका बाजूला मोदीविषयी देशभर कुतूहल वाढत चालले होते आणि दुसरीकडे कॉंग्रेस व पुरोगामी बाजारबुणगे मोकाट झालेले होते. त्यांच्या संख्यात्मक प्रभावी असलेल्या संघटना वा सुभेदारांच्या विस्कळीत जमावाला चारी मुंड्या चीत करू शकेल, अशी शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फौज संघाकडे सज्ज होती. तिचा योजनाबद्ध वापर करण्याची फक्त गरज होती. मोदी गुजरातमध्ये लागोपाठ तीन विधानसभा जिंकून झाल्यावरच देशाच्या राजकारणात आले. कॉंग्रेस व पुरोगामी पुरते बाजारबुणगे ठरण्यापर्यंत वा निकामी होईपर्यंत मोदींनी त्या दिशेने एकही पाऊल टाकलेले नव्हते पण जेव्हा टाकले तेव्हा बघता बघता पुरोगामी फौजेचा धुव्वा उडवतच त्यांनी घोडदौड केली. त्यातून सिराज उद दौला सावरू शकला नाही आणि आजचे पुरोगामीही सावरू शकलेले नाहीत. सिराजला बदलत्या काळाची चाहूल मिळाली तरी समजून घेता आली नाही आणि आजच्या पुरोगाम्यांची स्थिती तसूभर वेगळी नाही.
गेल्या चार दशकात कॉंग्रेस पक्ष क्रमाक्रमाने रसातळाला गेला, कारण त्याची अशी कुठली विचारधारा नव्हती. स्वतंत्र पक्ष वा जनसंघ म्हणजे आजचा भाजपा यांची अशी एक उजवी किंवा भांडवलधार्जिणी विचारसरणी होती तर दुसरीकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट म्हणवणारी एक डावी विचारसरणी होती. कॉंग्रेस या दोन्हीमध्ये घोटाळणारा पक्ष होता. आरंभीच्या काळात यातले समाजवादी वा कम्युनिस्ट कॉंग्रेसला उजवा म्हणजे भांडवलशाही पक्ष म्हणून हिणवत होते. मग नेहरूंच्या काळातच त्यांनी चलाखीने समाजवादी, साम्यवादी विचारसरणीचे काही मुद्दे उचलून धरले आणि उथळ डाव्यांनी नेहरूंना डोक्यावर घेतले पण उक्तीने समाजवाद बोलणारा कॉंग्रेस पक्ष कधीच समाजवादी विचारधारेचा झालेला नव्हता. दुसरीकडे स्वतंत्र पक्ष विसर्जित झाला आणि त्यातले बहुतांश नेते जनसंघात आले व पुढे भाजपात सहभागी होऊन गेले. देशाची आर्थिक घडी व व्यवस्था कायम मध्यममार्गी राहिली आणि ती कधीच पूर्ण समाजवादी नव्हती की भांडवलवादी नव्हती. त्यामुळेच उजव्या मानल्या गेलेल्या भाजपाला कॉंग्रेस म्हणून असलेला अवकाश व्यापणे सोपे होऊन गेले. तो व्यापण्याला पर्यायही नव्हता कारण भारतीय मानसिकता ओळखून स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली आणि पुढल्या काळात जी राजकीय रस्सीखेच झाली त्यात कॉंग्रेस अधिकच भरकटत गेली. तिला धड डावी किंवा उजवी भूमिका घेता आली नाही. उलट नंतरच्या म्हणजे 1970 नंतरच्या काळात सत्ता मिळवणे व टिकवणे ही एकमेव विचारधारा घेऊन कॉंग्रेस चालत राहिली. कुठले आव्हान नसल्याने ती चालत राहिली. मात्र पक्षाची संघटना नव्याने बांधण्याची त्यांना गरज वाटली नाही आणि तात्पुरते यश मिळवण्यासाठी वाटेल त्या तडजोडी करण्यात धन्यता मानली गेली. परिणामी सर्व वर्गातले व घटकातले सत्तापिपासू बाजारबुणगे तिथे एकवटत गेले, कर्तबगारीला स्थान उरले नाही.
पाच वर्षापूर्वी मोदी बहुमत मिळवू शकतात हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या ‘मुकदीमा’ या चौदाव्या शतकातल्या ग्रंथात सापडला होता. कुठलीही राजव्यवस्था वा प्रस्थापित साम्राज्य कसे खिळखिळे होत जाते, त्याचा खालदूनने एक सिद्धांत मांडलेला आहे. त्यानुसारच कॉंग्रेसचा र्हास झालेला आहे. मात्र अशा खिळखिळ्या झालेल्या व्यवस्थेला कोणी बाहेरचा आव्हान देणारा उभा राहतो आणि धक्का देतो तोपर्यंत तीच सडलेली व्यवस्था चालू राहते, असे खालदून म्हणतो. तेच इथेही झाले. कॉंग्रेस वा तथाकथित पुरोगामी युपीएला अडवाणी वा भाजपाचे तत्कालीन वरीष्ठ नेतृत्व धक्का देऊ शकत नव्हते कारण तेही त्याच प्रस्थापित व्यवस्थेचा भाग होते. सत्ता कुणाही व्यक्तीची वा पक्षाची येओ, व्यवस्था तीच, तशीच कायम होती. नोकरशाही तीच होती आणि तिच्यावर हुकूमत गाजवणारी बौद्धिक सत्ताही तशीच्या तशी होती. तिला जनता सरकार आल्याने वा वाजपेयी सरकार आल्याने कुठला धक्का लागलेला नव्हता. लागण्याची शक्यताही नव्हती पण मोदी मैदानात आल्यावर एक एक करून हे पडद्यामागून हुकूमत चालवणार्या अदृष्य शक्ती उजागर होऊ लागल्या. शाहू महाराजांनी त्याला ‘ब्राह्मण ब्युरॉक्रासी’ असे नाव दिले आहे, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. इंटेलेक्चुअल क्लास वा सिव्हील सोसायटी असे जे चमत्कारिक शब्द आपण ऐकत असतो, त्यालाच शाहू महाराज ‘ब्राह्मण ब्युरॉक्रासी’ म्हणतात. त्याचा अर्थ ‘ब्राह्मण जातीचे वर्चस्व’ असा अजिबात नाही. त्याचा अर्थ आपणच बुद्धिमान आहोत आणि जगातले वा व्यवस्थेतील काय चांगले वा वाईट आहे ते ठरवण्याचा परस्सर अधिकार हाती घेऊन बसलेले स्वयंघोषित विचारवंत, म्हणजे ब्राह्मण ब्युरॉक्रासी असते. त्यात जन्माने ब्राह्मण असलेल्याचा शाहू महाराजांच्या कालखंडात भरणा होता. आज त्यात विविध जातींचा व त्यात जन्म घेऊन तिथपर्यंत पोहोचलेल्यांचा भरणा आहे.
हे लोक ग्रीक समाजात वा अगदी अलीकडल्या काळात सोवियत वा पाश्चात्य समाजातही दिसतील. उदाहरणार्थ युरोपियन युनियन वा राष्ट्रसंघ म्हणून जगावर आपल्या इच्छा लादणारे नोकरशहा म्हणजे ब्युरॉक्रॉसी असते. आपल्या सोयीनुसार हे लोक व्याख्या वा नियम बदलत असतात व लादतही असतात. अशांना शरण जाणार नाहीत, त्यांना शत्रू वा पापी घोषित करण्याचे अमोघ अस्त्र त्यांनी हाती धारण केलेले असते. ते त्यांना जनतेने दिलेले नसते वा कोणी अधिकृत केलेले नसते. तुमच्या मनातील हळवेपणा वा चांगुलपणाचे भांडवल करून अशी मंडळी कुठल्याही प्रस्थापित व्यवस्थेवर आपली हुकूमत निर्माण करीत असतात. राजे-रजवाडे वा सुलतान बादशहांच्या जमान्यातही तुम्हाला त्यांची असली हुकूमत दिसून येईल. जेव्हा प्रस्थापित राजकीय सत्ता त्यांना झुगारून लावते तेव्हा आपले अस्तित्व, महत्त्व टिकवायला हेच लोक कुठल्याही नियमाला वाकवून अर्थ व आशय बदलूनही टाकतात. बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. आज प्रत्येक क्षणी कॉंग्रेसवाले उठसूट बाबासाहेबांची घटना वा विचारांचे हवाले देताना दिसतील पण बाबासाहेब हयात असताना त्यांना लोकसभेत निवडून येण्यात सर्वाधिक अडथळे त्यांनीच आणलेले आहेत. मुंबई महापालिकेतर्फे बाबासाहेबांचा सत्कार करण्यात हेच मांजर आडवे गेलेले आहे आणि त्यांच्याच स्मारकासाठीचे तत्कालीन प्रस्ताव मुंबई महापालिकेत फेटाळण्याचे पाप कॉंग्रेसनेच केलेले आहे. मात्र आज सत्तेसाठी व आपली थोरवी टिकवण्यासाठी तेच कॉंग्रेस विचारवंत वा भाट अगत्याने उठसूट बाबसाहेबांच्या वक्तव्ये व विचारांचे हवाले देताना दिसतील. त्यालाच शाहू महाराज ‘ब्राह्मण ब्युरॉक्रॉसी’ म्हणतात. आजच्या जमान्यात तीच सिव्हील सोसायटी असते. जोपर्यंत अशी ब्युरॉक्रॉसी पाठीशी असते तोवर जनमानसावर हुकूमत राखायला सत्तेला मदत होत असते आणि त्याच ब्युरॉक्रॉसीला संपवल्याशिवाय खरेखुरे परिवर्तन होऊ शकत नसते.
महाराष्ट्रात पेशवाई संपुष्टात आली किंवा बंगालमध्ये त्या काळात सिराज उद दौलाची सत्ता निकालात निघाली तेव्हाही असा वर्ग सर्वात प्रथम नव्या सत्तेला शरणागत झालेला आढळून येईल. मात्र जोवर त्यांना जुनी सत्ता टिकण्याची आशा असते, तोपर्यंत हे त्या कालबाह्य सत्तेला टिकवण्यासाठी आपली बुद्धी पणाला लावत असतात. आता मोदी विरोधात उठणारी वादळे, पुरस्कार वापसी इत्यादी घटना त्याचीच उदाहरणे आहेत. नुसते पुरोगामी पक्ष वा त्यांची विचारसरणी कालबाह्य झालेली नाही तर सामान्य जनमानसावर असलेली त्यांची हुकूमतही संपुष्टात आलेली आहे. लोक मागल्या मतदानात मोदींच्या मागे गेले, ते नुसती आश्वासने आवडली म्हणून नाही तर लोकांना कॉंग्रेस व तिला मान्यता देणार्या या ब्युरॉक्रॉसीला संपवायचे होते. ते काम अल्पावधीत शक्य नाही. काही प्रमाणात मोदींनी त्याला हात घातलेला आहे पण पुन्हा मोदी निवडून आले तर मात्र ही ब्युरॉक्रॉसी संपणार आहे. यापैकी अनेकजण नव्या व्यवस्थेत आपले स्थान पक्के करण्यासाठी वेगवेगळी कारणे व मीमांसा शोधू लागतील. आजही त्यातले बहुतेक कॉंग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी झगडत आहेत. त्याचे कारण पुरोगामी विचारसरणी असे काहीही नसून, त्यांना आपले प्रस्थापित स्थान टिकवून ठेवायचे आहे पण त्याचा उपयोग होणार नाही. 2019 सालात पुन्हा मोदी सत्ता संपादन करतील. त्यानंतर हळुहळू या प्रस्थापिताला शेवटचे हादरे बसू लागतील. ती नामशेष होत जाईल आणि त्यातले अनेकजण मोदी अर्थशास्त्र, मोदी राज्यशास्त्र वा मोदी विचारधारा यांची नव्याने मांडणी सुरू करतील. साहजिकच ती नव्या युगाची नवी ब्युरॉक्रॉसी असेल. कुठलीही जुनी व्यवस्था मोडकळीस येऊन संपते तेव्हा त्याच्याजागी येणारी नवी व्यवस्था प्रस्थापित होत असताना, नवे दुर्गुण घेऊनच येत असते आणि आपोआप प्रतिगामीच होत असते. आज ज्याला पुरोगामी म्हणतात तेच मुळात प्रतिगामी झालेले आहे.
कुठल्याही व्यवस्थेत तिची प्रबळ बाजू निरूपयोगी ठरू लागली, की मग ती बोजा होत असते. त्याचा आधार घेऊन ती व्यवस्था टिकू शकत नसते तर त्याच बोजामुळे ती व्यवस्था दबून, चिरडून जाण्याची स्थिती निर्माण होत असते. आज नेहरूंचे नाव पुसले जाते आहे आणि त्यांच्या कर्तबगारीच्या खाणाखुणा नष्ट केल्या जात आहेत, असा ओरडा सातत्याने ऐकू येत असतो. त्या खाणाखुणा मुळातच कशाला हव्यात, याचा खुलासा कोणी देऊ शकत नाही. कधीकाळी राजेशाही थाट असलेले राजवाडे वा किल्लेही आज अवशेष होऊन राहिले आहेत. त्यांची तशी दुर्दशा कोणी केली? जुन्या पराक्रमाच्या खुणा खरेच इतक्या महत्त्वाच्या असतील तर नेहरूपर्वाच्या आधीच्याही इतिहासाची तितकीच जपणूक व्हायला नको काय? पण तशी ओरड करणारी त्या त्या काळातील ब्युरॉक्रॉसी आज शिल्लक नाही. जी ब्युरॉक्रॉसी कशीबशी टिकून आहे तिला नेहरू युगापेक्षाही आपल्या अस्तित्वाच्या चिंतेने भेडसावून टाकलेले आहे. मोदी हे कॉंग्रेससमोरचे स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठे आव्हान आहे, असे तेव्हाच कॉंग्रेसनेते जयराम रमेश यांनी म्हटलेले होते आणि पाच वर्षापूर्वी मी तशी स्पष्ट कल्पना माझ्या पुस्तकातून मांडलेली होती. मोदी यांचे राष्ट्रीय राजकारणातील पदार्पण किंवा मिळणारे यश, हे नुसते सत्तांतर नसेल, ती नेहरू युगाच्या शेवटाची सुरूवात असेल असेही मी तेव्हाच नमूद करून ठेवलेले होते पण ज्याला नेहरूवादी ब्युरॉक्रॉसी असे मी म्हणतो, त्यांना आपल्या मस्तीतून जाग यायलाही चार वर्षे खर्ची पडलेली आहेत. मोदींना मिळालेले बहुमत हा त्यांना अपवाद किंवा इतिहासातील गफलत वाटलेली होती. त्यांच्याच आहारी गेलेल्या कॉंग्रेस वा अन्य पुरोगाम्यांनाही म्हणूनच समोरून अंगावर येणारे संकट बघता आले नाही की समजून घेता आलेले नव्हते. आज दिसत आहेत, ते त्याचे परिणाम आहेत.
इब्न खालदून इतक्यासाठीच महत्त्वाचा आहे. तो म्हणतो, मनगटी बळावर, कर्तृत्वावर साम्राज्य उभे करणार्यांनी एकदा प्रस्थापित होण्याचा पवित्रा घेतला की मग क्रमाक्रमाने त्यांच्यातली लढायची वृत्ती संपत जाते आणि ऐषाराम व मुजोरी त्यांना घेरू लागते. त्यातून येणारे शैथिल्य त्यांना आळशी बनवत जाते आणि इतरांच्या पराक्रमावर आपली सत्ता व हुकूमत टिकवण्यासाठी त्यांना अगतिक व्हावे लागते. तशात इतरांनी साथ दिली नाही वा पाठ दाखवली, मग त्यांचा क्षय अटळ असतो. कॉंग्रेस त्याच दिशेने अनेक वर्षे वाटचाल करीत होती आणि ही ब्युरॉक्रॉसी नेहरूंच्या वारसाला गादीवर बसवून पुन्हा साम्राज्याला सुवर्णकाळ येईल, म्हणून आशाळभूतपणे आजही अपेक्षा करीत आहेत. ही सिव्हील सोसायटी वा इंटेलेक्चुअल्स वा शाहू महाराज म्हणतात, ती ‘ब्राह्मण ब्युरॉक्रॉसी’ नेमकी नजरेसमोर आणायची असेल तर सत्यजीत रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ चित्रपटाचे कथानक आठवावे. तिकडे कंपनी सरकारची तैनाती कवायती फौज अवध संस्थान ताब्यात घेण्यासाठी चाल करून येत असते आणि त्याच नबाबाचे खंदे सरदार सक्तीच्या लढाईला चुकवून दूर कुठल्या खेड्यात बुद्धीबळाचा फड रंगवायला पळून गेलेले असतात. ते राज्यावर आलेल्या संकटाचा सामना करण्यापासून पळ काढत असतात आणि त्याचवेळी घरातल्या कुठल्याशा कुरबुरीचा संशय व भांडणातून एक्मेकांवर तलवारी उपसून अंगावरही जात असतात. बंगलोर येथील कुमारस्वामींच्या शपथविधीला हात उंचावून अभिवादन करणारे तमाम पुरोगामी सरदार सुभेदार त्यापेक्षा किंचित वेगळे आहेत काय? त्यांच्या विजयाच्या वल्गना करीत मोदी-शहांच्या कवायती सैन्याला शाब्दिक आव्हाने देणारे बुद्धिजीवी पुरोगामी म्हणूनच अधिक केविलवाणे होऊन गेलेले आहेत. कारण त्यांना आपला अपरिहार्य अंत दिसू लागला आहे आणि काहीही करू शकत नसल्याचे वैफल्य अधिक सतावू लागलेले आहे.
‘आम्ही शहरी नक्षलवादी’ असले फलक गळ्यात अडकवून बसलेले गिरीश कर्नाड वा अन्य कोणी तत्सम तमाशे करतात, तेव्हा म्हणूनच दया येते. त्यांनी भले कितीही बंडखोरीचा आव आणावा पण त्यापैकी कोणीही बंडखोर वा परिवर्तनवादी नसून ते ‘जैसे थे वादी’ आहेत. ते असलेली कालबाह्य व्यवस्था टिकवण्यासाठी आटापिटा करणारे प्रस्थापित आहेत. बंड हे कधीही प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात होत असते. अमेरिकेत हिलरी क्लिटंन पराभूत झाल्या, त्याचे हेच कारण होते. त्यांनी भले बंडखोरीचा आव आणलेला होता पण तिथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या त्या प्रतिनिधी होत्या. गेल्या कित्येक दशकात अमेरिकेत दुर्लक्षित राहिलेला जो वर्ग आहे, त्याला असल्या ढोंगाचा कंटाळा आलेला होता. इथेही लक्षात येईल, की राहुल गांधी हे बंडखोर नाहीत. मोदी हा दिल्लीच्या प्रस्थापित वर्तुळाच्या बाहेरचा चेहरा आहे. प्रस्थापित म्हणजे सरकार नसते, तर त्या सत्तेला बळ देणारा वा आपल्या इच्छेनुसार वाकवणारा जो वर्ग असतो, त्याला प्रस्थापित म्हणतात. जे कोणी आज गळचेपी वा मुस्कटदाबीचा आरोप सातत्याने करीत असतात, ते सत्तर वर्षातल्या लोकशाहीचे सर्वात मोठे मुजोर लाभार्थी आहेत. सोशल मीडियापासून वाहिन्यांवर बोलणार्यांपर्यंत, जे अच्छे दिन कुठे आहेत असा सवाल करतात, त्यांच्यासाठी बुरे दिन कधी व कुठले होते? हे चर्चा बघणार्या वा ऐकणार्याला तात्काळ कळते. बँकेच्या रांगेत नोटाबंदीच्या काळात गेलेले राहुल गांधी पूर्वी कधी बँकेत गेले तरी होते काय? मग अकस्मात त्या रांगेत उभे राहिलेले राहुल सामान्य माणसाला ढोंगी वाटणे स्वाभाविक असते. इतरही असले काहीतरी बोलणारे हे सर्वच्या सर्व लाभार्थी असतात. त्यांच्या अशा ढोंगाविषयीच्या तिटकारा व तिरस्कारातूनच मोदी या यशापर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्याना कालबाह्य खेळी व डावपेच खेळून पराभूत करता येणार नाही आणि बाजारबुणग्यांच्या आवाक्यातली ती गोष्ट नाही.
आजवर सत्ता भोगलेल्या अनेक पक्षातील एकएक नेता व तसा लाभार्थी, गुपचूप आपले संस्थान व प्रभावक्षेत्र टिकवण्यासाठी उठून भाजपात दाखल झाला आहे. पूर्वीच्याही काळात हेच होत राहिले. आपल्या क्षेत्रात आपलीच सत्ता कायम राखण्यासाठी तेव्हाचे पाटील, देशमुख वा महसुलदार वर्ग क्रमाक्रमाने मुघल वा विविध सत्तांना सहभागी होत गेला. पेशवाईला बाजारबुणग्यांनी बुडवले आणि पुरोगामी कंपूलाही तशाच बाजारबुणग्यांच्या खोगीरभरतीने रसातळला नेलेले आहे. आपल्यासाठी कोणीतरी लढावे व आपल्याला सत्तेची गोमटी फळे चाखता यावीत, अशी अपेक्षा बाळगणारे आशाळभूत कुठले साम्राज्य वाचवू शकत नाहीत की टिकवू शकत नाहीत. ते बोलघेवडे असतात आणि शब्दांचे सामर्थ्य जनमानसावर टिकण्यापर्यंतच त्यांची सद्दी असते. त्यांनी कुणा लेच्यापेच्याला सेनापती बनवले वा त्याचे कितीही पोवाडे गायले, म्हणून पुरूषार्थ उद्भवत नसतो. त्यांना हवे असलेले साम्राज्य रसातळाला जाण्यापासून वाचवू शकत नसतो. प्लासीची लढाई म्हणूनच एक उद्बोधक उदाहरण आहे. पुरोगाम्यांची स्थिती आज बाजारबुणग्यांची खोगीरभरती अशी झालेली आहे. त्यांच्यापाशी बौद्धिक वा नैतिक सामर्थ्य शिल्लक राहिलेले नाही, की मनगटी सामर्थ्य त्यांना सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही! कारण त्यांच्या शब्दात वा बुद्धीतही ती प्रेरणा शिल्लक उरलेली नाही. त्यातला पोकळपणा चव्हाट्यावर आलेला आहे. जादू संपलेल्या तंत्रानेच त्यांना काहीतरी चमत्कार घडण्याची खुळी आशा खुणावत असते. ती फलद्रूप होण्याची बिलकूल शक्यता नाही. बाजारबुणगे लढाया मारू शकले असते तर ब्रिटीशांची सत्ता इथे शिरकाव करून घेऊ शकली नसती, की भारताचा इतिहास आज दिसतो तसा घडला नसता. एक मात्र मान्य करायला हवे, की बाजारबुणग्यांचा आवाज व गर्जना मोठ्या असतात पण त्या निष्फळच ठरणार्या असतात.
कुठलीही कालबाह्य सडलेली व्यवस्था संपुष्टात येण्याला पर्याय नसतो. जोवर असा पर्याय उभा राहत नाही, तोवर कितीही नासलेली व्यवस्थाही चालत राहते. म्हणून तीच व्यवस्था योग्य वा सुसंगत मानण्यात अर्थ नसतो. जेव्हा असा पर्याय उभा राहतो तेव्हा बघता बघता जुनी व्यवस्था ढासळून पडू लागते. सोवियत युनियन हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. ती कोसळल्याने रशिया संपला नाही, की तो देश रसातळाला गेला नाही. त्याला तिथेच पर्याय निर्माण झाला. कॉंग्रेस वा पुरोगामी भूमिका हाही कालबाह्य झालेला विषय आहे आणि ती निरूपयोगी झालेली मूल्यव्यवस्था आहे. ती व्यवहारात 1991 सालातच मुक्त अर्थकारणाने निकालात काढलेली होती पण तितक्या वेगाने नवा बदल पुढे रेटणारा राजकीय व नेतृत्वाचा पर्याय समोर आला नाही. म्हणून 2014 साल उजाडावे लागले. त्यामुळे भारतात राजकीय सत्तांतर झाले तरी व्यवस्थेतले स्थित्यंतर मात्र रेंगाळत पडून राहिले होते. मोदींच्या रुपाने तसा राजकीय पर्याय उभा राहिला आणि शासकीय पातळीवर त्या बदलाला गती आली तर अमित शहांच्या रुपाने संघटनात्मक नेतृत्व उभे करू शकणारा पर्याय समोर आल्यावर उरलीसुरली कॉंग्रेस व पुरोगामी व्यवस्थेला सुरूंग लागलेला आहे. त्यावर शेवटचा घाव आगामी लोकसभेत घातला जाईल आणि देशातले स्थित्यंतर वेगाने पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळेल. त्याची गती आता बाजारबुणगे झालेले पुरोगामी नेते व पक्ष रोखू शकणार नाहीत. जितके ते एकत्र येऊन मोदींना रोखू बघतील, तितके अधिक पाठबळ मिळून मोदींच्या पारड्यात मतदार अधिक मतांची भर घालत जातील. सिराज उद दौला ज्या कारणास्तव प्लासीची लढाई जिंकू शकला नाही त्याच कारणास्तव पुरोगामी आघाडी वा त्यातले बाजारबुणगे पुरोगामी पक्ष मोदींना रोखू शकत नाहीत. इतिहासाची अशी पुनरावृत्ती होत असते. ती ओळखता व समजून घेता आली पाहिजे इतकेच.
- भाऊ तोरसेकर
९७०२१३४६२४
मासिक 'साहित्य चपराक' दिवाळी विशेषांक २०१८

गेला आठवडाभर पाक कब्जात असलेल्या कुलभूषण जाधव आणि त्यांच्या आई, पत्नीच्या पाक भेटीविषयी खूप गाजावाजा झाला. त्यांना ज्याची भेट घेऊ देण्यात आली व त्यात अनेक अडथळे उभे करण्यात आले तो खरोखरच कुलभूषण होता किंवा नाही, यावरही शंका घेतल्या गेल्या आहेत. पण असाच एक पाकिस्तानी ‘कुलभूषण’ गेले नऊ महिने बेपत्ता आहे, त्याचे भवितव्य काय आणि तो कुठे आहे, त्याचा फारसा कुठे उल्लेख आलेला नाही. अर्थात कुलभूषणप्रमाणेच त्याचेही भारतीय हेरखात्याने अपहरण केल्याचा आरोप पाकिस्तानने केलेला आहे. पण भारताने त्याला दुजोरा दिलेला नाही वा भारतातही त्याविषयी कुठली माध्यमात चर्चा झालेली नाही. यातला योगायोग असा आहे, की कुलभूषणला अटक करणारे जे पाकिस्तानी पथक होते, त्यात या पाक कुलभूषणाचा समावेश होता. आणखी एक योगायोग असा आहे की जाधव यांना पाक लष्करी न्यायालयाने फाशी फर्मावली, त्याच दरम्यान हा पाक कुलभूषण बेपत्ता झाला आहे. त्यामुळेच पाकने त्याच्या अपहरणाचा भारतावर संशय घेतला आहे. या पाक कुलभूषणाचे नाव महंमद हबीब झहीर असे आहे. जाधवना अटक करण्याच्या वेळी झहीर पाक हेरखात्यात अधिकारी म्हणून काम करत होता आणि मुळात तो पाक सेनादलात चिलखती दलाचा लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्यरत होता. निवृत्तीनंतर नवी नोकरी शोधत असताना तो बेपत्ता झालेला आहे. त्यामागे कुठली कारणे आहेत, त्याचा खुलासा पाकने केलेला नसला तरी तो पाकहून ओमान व पुढे नेपाळला गेला असताना बेपत्ता झाला, असा दावा आहे. जिथून झहीर बेपत्ता झाला ती जागा भारताच्या सीमेलगत असल्याने पाकने भारतावर संशय घेतला आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही असे कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. हेरखात्याची कामे व कारवाया अतिशय गुप्तरित्या चालतात. म्हणूनच पाकचा आरोप फेटाळून लावण्यात अर्थ नाही.
कुलभूषण याच्याविषयी जी माहिती आजपर्यंत उघड झाली आहे, त्यानुसार तो भारतीय नौदलातून निवृत्त झाल्यानंतर इराणच्या चाबाहार बंदरात व्यवसाय करत होता. तिथे त्याला कुठलेतरी व्यापारी आमिष दाखवून पाकिस्तानी टोळीने बोलावून घेतले आणि त्याचे अपहरण करून त्याला पाकिस्तानला पळवून नेले. तालिबान टोळीने हे काम केले आणि पैशाच्या बदल्यात कुलभूषणला पाक हेरखात्याच्या हवाली केले, असे म्हटले जाते. त्याला काहीसा दुजोरा पाकिस्तानातून आलेल्या बातम्यातूनही मिळू शकतो कारण त्याला बलुचीस्थान सीमेवर अटक केल्याचे एका मंत्र्याने म्हटलेले होते, तर पोलीस अधिकार्यांनी त्याला अफगाण सीमेवर पकडल्याचा दावा केला होता. पाकच्या तात्कालीन सुरक्षा सल्लागारांनी कुलभूषण विरोधात कुठलाही सिद्ध होऊ शकणारा पुरावा नसल्याचा खुलासा केलेला होता. साहजिकच पाकने कितीही आरोप केले असले, तरी कुलभूषणला यात अपहरण करून गोवण्यात आलेले सहज लक्षात येते. काही प्रमाणात झहीरची तशीच कथा आहे. निवृत्तीनंतर तो नवी नोकरी शोधत होता आणि इंटरनेटच्या माध्यमातून ब्रिटनच्या एका कंपनीने त्याला आठ लाख रुपये मासिक पगाराची नोकरी देऊ केलेली होती. त्यासाठी त्याला ओमानला बोलावून घेण्यात आले. त्याला विमानाचे तिकिट पाठवले आणि मग तिथून त्याला पुढील मुलाखतीसाठी नेपाळला जाण्यासाठी विमानाचे तिकिट दिले गेले होते. नेपाळला पोहोचल्यावर त्याने आपला फोटोही कुटुंबाला मोबाईलच्या माध्यमातून पाठवला होता. तिथे त्याला भेटलेल्या कुणा व्यक्तीच्या सोबत झहीर भारतीय सीमेलगतच्या लुंबिनी या ठिकाणी जात असल्याचे त्याने कुटुंबाला कळवले होते. मात्र त्यानंतर त्याचा आपल्या नातलगांशी कुठलाही संपर्क झालेला नाही. त्यामुळे झहीरच्या मुलाने पाकिस्तानात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
आता त्या घटनेला नऊ महिने उलटून गेलेले असून, अजून झहीरविषयी कुठलीही माहिती समोर आलेली नाही. पाकिस्ताननेही कुठला थेट आरोप भारतावर केलेला नाही. मात्र पाकिस्तानी भाषेत शत्रू राष्ट्राने असे म्हटले जाते, तेव्हा त्यांचा रोख भारताकडे असतो हे उघड आहे पण भारताने कधीच अशा आरोपांना उत्तर दिलेले नाही किंवा त्याची दखलही घेतलेली नाही. मात्र यातला योगायोग विसरून चालत नाही. कुलभूषणला लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा फर्मावली, त्याच दरम्यान झहीर बेपत्ता झालेला आहे आणि तो कुलभूषणला अटक करणार्या पथकाचा अधिकारी होता. कुठल्याही हेरगिरीच्या प्रकरणातले हिशोब उघडपणे मांडले आत नसतात आणि त्यासाठीची किंमत कोर्टात भरपाई म्हणून मागितली जात नसते. त्याचा हिशोब शत्रू-मित्र राष्ट्रे आपल्या पद्धतीने परस्सर चुकता करीत असतात. कुलभूषणला अपहरण करून जर पाकने फसवले असेल, तर त्याचा हिशोब त्यांच्याच पद्धतीने पाक अधिकार्याचे अपहरण करून चुकता होऊ शकत असतो. पण भारताने झहीर आपल्या ताब्यात आहे, असे अजून कुठे सांगितलेले नसल्याने, ते प्रकरण संशयास्पद आहे. मात्र तसे भारत करू शकतो, हे पाकिस्तानला पक्के ठाऊक असले तरी उघड कुठलाही पुरावा हाती नसल्याने पाक कुठला दावाही करू शकत नाही. जागतिक कोर्टात दादही मागू शकत नाही. उलट पाकिस्तानने कुलभूषण विषयात मोठा तमाशा करून त्याचा ताबा आपल्याकडे असल्याची ग्वाही दिलेली असल्याने भारताला जागतिक कोर्टात धाव घेणे सोपे झाले. झहीरविषयी पाकिस्तान असे कुठलेही पाऊल उचलू शकला नाही. अर्थात आपल्यावरचा जगभरच्या दहशतवादाचा आरोप संपवण्यासाठी आणि बलुची व सिंध प्रांतातील असंतोषाचे खापर भारताच्या माथी फोडण्यासाठीच पाकने कुलभूषणच्या अटकेचा व खटल्याचा तमाशा मांडलेला होता. उलट भारताने काहीही कबुल केलेले नाही.
पाकिस्तानी लष्करातून निवृत्त झाल्यावर लेफ्टनंट कर्नल महंमद हबीब झहीर नवी नोकरी शोधत होता. त्यासाठी त्याने इंटरनेटच्या लिंक्डइन या संकेतस्थळावर आपली माहिती काही महिन्यांपूर्वी टाकलेली होती. तेव्हा झहीर फैसलाबाद येथील एका गिरणीत नोकरी करीत होता. त्या माहितीच्या आधारे ब्रिटनच्या एका कंपनीने त्याला ऑफर दिली होती. ब्रिटनमधल्या फोनवरून झहीरशी कोणी तरी संपर्क साधला व त्याला नोकरीची ऑफर दिलेली होती. पुढे झहीरला इमेलद्वारे रितसर ऑफरपत्र मिळाले. त्यात आठ लाख रुपये मासिक पगाराची माहिती होती. झहीरला विभागीय संचालक म्हणून काम करायचे होते. 4 एप्रिल 2017 रोजी झहीरला ओमानहून विमानाचे तिकिट पाठवण्यात आले आणि दुसर्याच दिवशी झहीर लाहोर येथून ओमानला रवाना झाला. मग तिथून त्याला नेपाळला जाणार्या विमानाचे तिकिट मिळाले. त्याप्रमाणे झहीर नेपाळला पोहोचला. तिथे त्याला जावेद अन्सारी नावाची व्यक्ती भेटणार होती. त्या व्यक्तीने झहीरला स्थानिक मोबाईल कंपनीचे सीमकार्ड दिले होते. तिथे त्याला छोटा प्रवास असलेल्या लुंबिनीचे तिकिट मिळाले आणि त्यानेही तिथे पोहोचताच आपला फोटो काढून कुटुंबियांना पाठवला होता. त्यानंतर मात्र झहीरने पुन्हा कुटुंबाशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेला झहीरचा पुत्र साद झहीर याने पित्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याला सर्वच संपर्क नंबर स्विच ऑफ असल्याचे लक्षात आले आणि तो घाबरला. त्याने धावपळ करून पोलिसांशी संपर्क साधला. रीतसर तक्रार केली पण आजतागायत पाकिस्तानला झहीरचा शोध लागलेला नाही. झहीर हा पाक हेरखात्याचा माजी अधिकारी असल्याने पाक सरकारने त्याची तात्काळ दखल घेऊन शोधही सुरू केला पण त्यातून काही निष्पन्न झालेले नाही. पाकिस्तानसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे कारण झहीर हा पाक ‘कुल’भूषण आहे.
झहीर हा कुलभूषण जाधव याच्यासारखाच निवृत्त सेनाधिकारी असून त्याने काही काळ पाक हेरखात्यामध्ये काम केलेले आहे. साहजिकच पाकच्या अनेक कृष्णकृत्याची भरपूर माहिती त्याच्याकडे असू शकते. असा माणूस भारताच्या हाती लागला तर त्याच्याकडून भारतातील पाकसाठी हेरगिरी करणारे गद्दार व हस्तकांची माहितीही उघड होऊ शकते. तेवढेच नाही तर कुलभूषण वा अन्य प्रकरणातील तपशीलही भारताला मिळू शकतो. मात्र भारताने त्यात कुठलाही रस दाखवलेला नाही वा त्यविषयी काहीही मान्य केलेले नाही. थोडक्यात कुलभूषणचा वापर जसा पाकिस्तानने तमाशा उभा करण्यासाठी करून घेतला, तसा कुठला प्रकार भारताकडून झालेला नाही. मग झहीरचे झाले काय? जेव्हा अशी लपाछपी चालते, तेव्हा शत्रूगोटात भीतीचे वातावरण घोंगावू लागते. त्याला आपल्या हस्तकाला वाचवता येत नाही वा त्याच्या सुटकेची मागणीही करता येत नाही. त्याच्याविषयी काही करता आले नाही, म्हणून बिघडत नाही पण त्याच्यापाशी असलेली माहिती शत्रू किती व कशी उपयोगात आणेल, त्याची चिंता सतावणारी असते. म्हणूनच भारतासाठी कुलभूषण हा जितका जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यापेक्षा कित्येक पटीने झहीर हा पाकिस्तानसाठी गळफास आहे. आणखी एक गोष्ट इथे उलगडून सांगितली पाहिजे. भारताने झहीरविषयी उघड काही कबुल केलेले नसले, तरी तशी शक्यता असल्यास त्याचे सुचक संकेत पाकिस्तानला दिलेले असू शकतात. ब्लॅकमेलमध्ये जसे सुचक संकेत दिले जातात, तशीच ही गोष्ट असते. त्यात ऐकणार्या बघणार्या इतरांना त्यातले संकेत कळू शकत नाहीत. मात्र त्यात गुंतलेल्यांना नेमका आशय अशा गूढ शब्दातून कळत असतो. कदाचित तो संकेत पाकिस्तानला भारताने दिलेला असावा आणि त्यांना समजलेला असावा. म्हणूनच कुलभूषण जाधवच्या बाबतीत माणुसकीचे नाटक पाकने रंगवलेले असावे.
माणुसकीच्या नात्याने कुलभूषणच्या आई व पत्नीला त्याची भेट देण्याचे नाटक पाकने रंगवलेले असू शकते पण तेही करताना त्यांना धड वागता आलेले नाही. परंतु यामुळे कुलभूषण सुरक्षित किती आहे, त्याची भारताला माहिती मिळालेली आहे. समजा तसाच झहीर भारताच्या ताब्यात असेल तर त्यालाही यमयातना देऊन त्याची छायाचित्रे पाकला मिळतील, अशी सोय केली जाऊ शकते. तसे काही झाल्यामुळे पाकला सुबुद्धी सुचली असेल काय? दोन देशातल्या हेरांना पकडले असल्यास त्यांची अदलाबदल करण्याचाही प्रघात आहे. पाकला तसाच खोड्यात घालून झहीरच्या बदल्यात कुलभूषणची मुक्तता करणे शक्य आहे. अर्थात झहीर भारताच्या कब्जात असला तर! तशी कुठली माहिती आज तरी उपलब्ध नाही पण झहीरला भारताच्या सीमेलगत अन्य कोणी कशाला गायब करू शकतो? इतर कुठल्या देशाला झहीरला उचलून काय मिळणार आहे? फक्त भारतासाठीच झहीर मोलाचा ऐवज आहे. हा सगळा सावल्यांचा खेळ आहे. हेरखाती ही मुळातच सरकारच्या बेकायदा कारवायात गुंतलेली असतात आणि त्याविषयी कोणी कधी जाहीरपणे बोलत नसतो. इथे भारतीय माध्यमात तावातावाने पाक हेरखाते आय एस आय याविषयी चर्चा चालतात पण आयबी वा रॉ अशा भारतीय हेरखात्याबद्दल कुठली चर्चा होत नाही. नेमकी उलटी स्थिती पाकिस्तानात आहे. तिथे कुठला घातपात, हिंसाचार माजला, मग त्याचे आरोप भारतीय हेरखात्यावर होत असतात. त्यामुळेच झहीरच्या बेपत्ता होण्यावरून पाक माध्यमात खूप चर्चा झाल्या व भारतीय हेरखात्यावर आरोपांची सरबत्ती झालेली आहे. मात्र भारताने कुठलीही दाद दिलेली नसली तरी त्यात तथ्य नाही, असे बोलण्यात अर्थ नाही. हा मोठा डाव असू शकतो. त्याची जाहीर चर्चा होऊ शकत नाही. मात्र तरी माध्यमात जी उथळ चर्चा चालते, ती मोठी मनोरंजक असते.
हेरगिरी व तत्सम कारवाया ही अतिशय निर्दय बाब असते. त्यांना माणुसकी वा समाजाचे नित्यनियम लागू होत नाहीत. भावनांना तिथे स्थान नसते. नात्यागोत्यांना अर्थ नसतो. म्हणूनच सामान्य घटनांची जशी जाहीर चर्चा, वादविवाद होतात तशी अशा गोष्टींची चर्चा होऊ शकत नाही. माध्यमातून बौद्धिक चर्चा रंगवणार्यांना या वस्तुस्थितीचा गंध नसतो. म्हणून कुठल्याही विषयावर वादंग माजवले जाते पण त्यातून काहीही हाती लागत नाही, की कुठल्या विषयाचा निचरा होत नाही. म्हणूनच झहीर व कुलभूषण यांच्यातला संबंध भारतात कुठे चर्चिला गेला नाही. झहीर हा पाक ‘कुल’भूषण आहे, त्याचाही दोनचार दिवसात कुठे उल्लेख झाला नाही. तशी आपण अपेक्षाही करू नये. ज्यांना राजकीय गुपिते, परराष्ट्र संबंध, त्यातल्या खाचाखोचा ठाऊक नाहीत, त्यांना यातली गुंतागुंत कशी उलगडू शकते? येमेनमधून भारत सरकारने हजारभर नागरिकांची मुक्तता केली. त्यात 43 देशांचे नागरिक होते पण त्याचे इथे कौतुक होऊ शकले नाही. कारण भारतीय माध्यमे व शहाणे जनरल व्ही. के. सिंग यांची टवाळी करण्यात गर्क होती. त्यापैकी कोणाला या निवृत्त सेनापतीने येमेनच्या आखातामध्ये युद्धजन्य स्थितीत नागरिकांची सुखरूप मुक्तता करण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला त्याचेही भान नव्हते तर त्यांच्याकडून कुठल्या शहाणपणाची अपेक्षा करायची? त्यातली गुंतागुंत यांना कोण समाजावू शकेल? त्यांना झहीरमधला पाक ‘कुल’भूषण ओळखता येत नाही वा त्याच्या बेपत्ता होण्यातला डावपेचही उमजू शकत नाही. असे लोक सनसनाटी खूप माजवू शकतात पण त्यांच्यापाशी गोष्ट नसते की तथ्य नसते. नुसतेच फुगे फुगवले जातात. भावना आणि कर्तव्याचा गोंधळ घातला जातो. साध्य काहीच होत नाही. म्हणूनच कोणाला पाक कुलभूषणाची आठवण झाली नाही, की त्याच्या भवितव्याचा प्रश्न पडलेला नाही.
- भाऊ तोरसेकर
९७०२१३४६२४
साप्ताहिक 'चपराक', पुणे
मासिक 'साहित्य चपराक'
कोणताही मोठा संशोधक वा गाढा अभ्यासक आपापल्या कामात अतिमग्न राहिल्यामुळे त्याचा स्वभाव एककल्ली बनू शकतो. मात्र पुण्यातील ज्येष्ठ पुरातत्त्ववेत्ते व संशोधक आणि मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर त्याला निश्चितच अपवाद म्हणावे लागतील. पुरातत्त्व संशोधनासारख्या किचकट क्षेत्रात काम करूनही त्यांनी आपले ‘अजातशत्रू व्यक्तिमत्त्व’ कायम टिकविले आहे. मूर्तिशास्त्राचा सखोल अभ्यास करताना त्यांनी अनेक मूर्तींमध्ये असलेली प्रेमळता, शालीनता आणि विद्वत्ता जणू काही स्वतः आत्मसात केली असावी असे त्यांच्या प्रसन्न मूर्तीकडे पाहून सतत वाटते. त्यांच्या ‘अजातशत्रू व्यक्तिमत्त्वा’चे रहस्य कदाचित यामध्येच दडलेले असावे.
संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेकडून अतिशय आदराचे आणि मानाचे स्थान प्राप्त झालेल्या देगलूरच्या प्रसिद्ध वारकरी घराण्यात डॉ. गो. बं. देगलूरकर यांचा जन्म झाला. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू धुंडामहाराज देगलूरकर हे त्यांचे सख्खे काका. धुंडामहाराज देगलूरकर हे डॉ. देगलूरकर यांचे वडील बंडामहाराज यांचे ज्येष्ठ बंधू होते. बंडामहाराज देगलूरकर हे देखील चांगले कीर्तनकार होते. संगीताचे त्यांना उपजत ज्ञान होते. लहानपणापासून घरातच ‘भजन-कीर्तन’ यांची नित्याचीच सोबत असल्यामुळे साहजिकच डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या बालमनावर आध्यात्मिक संस्कार बिंबले गेले. त्यातूनच भारतीय संस्कृती, प्राचीन इतिहास, पुराणकथा, मूर्तिशास्त्र याबाबतची त्यांना गोडी निर्माण झाली. देगलूरजवळ असलेले होट्टलचे अति प्राचीन मंदीर हे तर त्यांचे अभ्यासाचे आवडते स्थळ बनले. त्याकाळी संपूर्ण मराठवाडा हा निजामाच्या राजवटीत होता. निजामी राजवटीतील अत्याचार, जुलूम आणि मोगलाईचे चटके त्यांनी लहानपणापासूनच अनुभवले. तरीही हैदराबादच्या शालीबंडा भागातील ‘वैदिक धर्म प्रवेशिका’ मध्ये त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मात्र त्यांना पुण्याला जावे लागले. सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.ची पदवी प्राप्त केली आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी ते पुन्हा हैदराबादला उस्मानिया विद्यापीठात गेले. ‘उस्मानिया’मधून एम. ए. ची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही काळ औरंगाबाद आणि नागपूर येथील शासकीय महाविद्यालयातून अध्यापनाचे काम केले.
शिक्षण आणि नंतर अध्यापनाचे कार्य चालू असतानाच त्यांचे पुरातत्त्व आणि मूर्तिशास्त्रामध्ये संशोधनही चालूच होते. देगलूरकर यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून ‘कल्चरल हिस्ट्री ऑफ मराठवाडा’ विषयावर पीएचडी मिळविली तर त्यानंतर थोड्याच अवधीत ‘टेम्पल आर्किटेक्चर अँड स्क्लप्चर्स ऑफ महाराष्ट्र’ या विषयासाठी नागपूर विद्यापीठाने त्यांना ‘डी.लिट’ ही पदवी दिली. पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने देखील ‘डी.लिट’ ही सर्वोच्च पदवी देऊन त्यांच्या अमूल्य संशोधन कार्याचा गौरव केला. आतापर्यंत ‘डी.लिट’च्या दोन पदव्या मिळविणारे डॉ. देगलूरकर हे कदाचित महाराष्ट्रातील पहिले पुरातत्त्व संशोधक असतील.
अनेक वर्षे अध्यापनाचे काम करताना त्यांनी आपले लेखन आणि संशोधन चालूच ठेवले. देशातील महत्त्वाच्या मंदिरांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर त्यांनी आपल्या विविध लेखांद्वारे त्या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची माहिती सामान्य जनतेला उपलब्ध करून दिली. तसेच ‘बिंबब्रह्म आणि वास्तुब्रह्म’, ‘विष्णुमूर्ते नमस्तुभ्यम्’, ‘मार्कंडादेव मंदिरे’, ‘सुरसुंदरी’, ‘वेरूळ दर्शन’, ‘टेम्पल आर्किटेक्चर अँड स्क्लप्चर्स ऑफ महाराष्ट्र’, ‘मॅगँलिथिक रायपूर’, ‘घारापुरी दर्शन’, ‘पोर्टेशल ऑफ दि वूमन इन दि आर्ट ऑफ दि डेक्कन’ आदी 14 ग्रंथ लिहून त्यांनी मूर्तिशास्त्र आणि पुरातत्त्व शास्त्रांमधील महत्त्वाचा दस्तऐवज तयार केला. याशिवाय त्यांनी अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे संपादन केले आहे.
आपले लेखन आणि संशोधन चालूच ठेवून रायपूर, भागीमोहरी, पौनी, भोकरदन, मांढळ, अर्णी येथे झालेल्या उत्खननात असलेला त्यांनी घेतलेला सहभाग फार मोलाचा आहे. आजही देशात कोठेही महत्त्वाचे उत्खनन चालू असते तेथे देगलूरकर सरांना मानाने बोलाविले जाते. भारतीय संस्कृतीबाबत परदेशी नागरिकांना तसे तेथील अभ्यासकांना नेहमीच कुतूहल वाटत आलेले आहे ते लक्षात घेऊन डॉ. देगलूरकर यांनी इंग्लंड, अमेरिका, इटली, इंडोनेशिया, कंबोडिया, श्रीलंका, म्यानमार आदी विविध देशांमध्ये जाऊन व्याख्यानाद्वारे आपल्या भारतीय संस्कृतीचा, पुरातत्त्व शास्त्राचा आणि मूर्तिशास्त्राचा प्रचार आणि प्रसार केला आहे. शिकागो येथे झालेल्या दुसर्या जागतिक रामायण परिषदेत त्यांनी सादर केलेला निबंध अनेकांच्या औत्स्युक्याचा विषय ठरला होता.
कित्येक वर्षांच्या अध्यापनानंतर डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी डेक्कन पुरातत्त्व कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपतीपदही सुमारे दहा वर्षे भूषविले आणि ‘डेक्कन’ची ख्याती वाढविण्यात मोलाचा वाटा उचलला. आजही वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचा पुण्यातील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा, महाराष्ट्र गॅझेटिअर संपादक मंडळ, राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय आदी ख्यातनाम संस्थांशी निकटचा संबंध असून ते कार्यरत आहेत. ‘संस्कार भारती’ या अ. भा. संस्थेच्या प्राचीन कला विभागाचे ते अनेक वर्षे प्रमुख आहेत. आजपर्यंत ‘विद्या व्यास’ पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कारांनी त्यांचा बहुमान करण्यात आला आहे.
सुंदर लेखणी आणि अमोघ वाणी यांचे विलक्षण सामर्थ्य लाभलेल्या डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्याकडून कोणत्याही मंदिराचे, त्यामधील मूर्तींचे वैशिष्ट्य जाणून घेणे म्हणजे एक अलौकिक आनंद असतो. हा आनंद नेहमीच देणार्या डॉ. गो. बं. देगलूरकर यांना मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानतर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव केला आहे. त्यानिमित्त अजातशत्रू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या या ‘पुराण-पंडिता’स ‘चपराक’ परिवाराकडून अनेकानेक शुभेच्छा!
- श्रीकांत ना. कुलकर्णी
९४२२३१९१४३
मासिक 'साहित्य चपराक'
डिसेंबर २०१७
साप्ताहिक 'चपराक' २५ डिसेंबर २०१७
2011 ला महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता सिनेमा बरा होता. पण अमिताभसारखा वृद्ध नट हा त्या चित्रपटाचा हिरो होता. या वयातही अमिताभ बच्चन यांची ऊर्जा आणि उत्साह पाहिला की भल्या भल्या तरुणांची बोटेही तोंडात जातात. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनला मात्र एवढे यश मिळाले नाही. पण हा बुढ्ढा (लेखाची गरज म्हणून हा शब्द वापरलाय. बच्चन साहेबांबद्दल पराकोटीचा आदर आहे.) सर्व तरुणांना लाजवत अजूनही ठुमके घेतोय. आपल्याच वयाचे पात्र रंगवतानाही त्यांचा जोश पाहण्यासारखा असतो. ते आजही कित्येक तास काम करतात. नरेंद्र मोदी आणि अभिताभ बच्चन यांची चांगली मैत्री आहे. अमिताभ यांचे पूर्वी कॉंग्रेस पक्षाशी चांगले संबंध होते. त्यांच्या सौ.जया बच्चन ह्या विरोधी पक्षात आहेत पण तरीही मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरात पर्यटनासाठी त्यांना ‘ब्रँड ऍम्बासेडर’ बनवले. त्या जाहिराती खूप गाजल्या. मला नेहमी अमिताभ बच्चन आणि नरेंद्र मोदींच्या बॉडी लँग्वेजमध्ये साम्य दिसतं. मोदींचं शरीर थोडसं तिरपं करुन बोलणं, टाळ्या वाजवण्याची पद्धत आणि वृद्ध असूनही चेहर्यावरील तारुण्यातील आत्मविश्वास या गोष्टी समान वाटतात. ‘आज तक’च्या So Sorry आणि इंडिया टिव्हीच्या OMG या पॉलिटिकल ऍनिमेटेड सिरीजमध्ये नरेंद्र मोदींना अमिताभ यांच्या अवतारात दाखवतात. त्यांनाही हे साम्य जाणवले असतील. एक कलाक्षेत्रातला आणि एक राजकारणातला बुढ्ढा तरुणांपेक्षाही जास्त काम करत आहेत.
या दोन बुढ्ढ्यांबद्दल लिहिण्याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी जिग्नेश मेवाणी नावाच्या एका तरुण नेत्याने मोदींविषयी आक्षेपार्ह विधान काढत त्यांना बुढ्ढा म्हटले. जिग्नेश मेवाणीची ओळख दलित नेता म्हणून आहे. गुजरातच्या निवडणुकीत तो कॉंग्रेसचा स्टार चेहराही होता. जिग्नेश मेवाणी एका चॅनलच्या चर्चे दरम्यान म्हणाला की, ‘‘वो मानसिक तौर से बुढे हो गये है. अब तो हम युवा आयेंगे. राजनीती देश का युवा करेगा युवा. इनको अभी रिटायर्ड हो जाना चाहिये. उनको हिमालय भी चले जाना चाहिये, अपनी हड्डीयां गलाने के लिये. घर जाकर बैठे, आराम करे. अब बहुत बोरिंग आदमी हो गया हैं.’’ हे म्हटल्यानंतरही त्याला याबद्दल माफी मागाविशी वाटली नाही. बोलण्याच्या नादात उत्सुकतेने आपण बोलून गेलो असेही त्याला वाटत नाही. पुरे होश-ओ-आवाज़ में त्याने हे म्हटलेले आहे. अशा प्रकारच्या टीका नरेंद्र मोदींसाठी नव्या नाहीत. या आधी अनेक खालच्या पातळीवरच्या टीका मोदींनी सहन केल्या आहेत. त्या त्यांनी गुजरातच्या निवडणुकीत बोलूनही दाखवल्या. त्यांनी टिकाकारांचा समाचार घेतल्यावर टिकाकार आणि विरोधकांनी म्हटलं की मोदी विकास विसरुन स्वतःबद्दल बोलत आहेत. जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. अहो पण ज्यांनी मोदींवर अशा टीका केल्या त्यांच्याबद्दल कुणीच बोलायला तयार नाही. म्हणजे लोकांनी तोंडसुख घ्यायचे आणि त्याविषयी मोदींनी एक अवाक्षरही काढायचा नाही, अशी विरोधकांची मानसिकता आहे. मोदींनी फक्त मुकाट्याने सहन करायचं असंच त्यांना वाटतं. बोलणारे राहतात बाजूला, पण चुका दाखवणार्यांचं तोंड दिसतं. नरेंद्र मोदी हा एक असा नेता आहे, ज्याला विरोधकांनी सर्वात जास्त टार्गेट केले आहे. अगदी ते प्रत्यक्ष राजकारणात नवीन असल्यापासून. पण हा नेता सर्वांना पुरुन उरला. मोदी राजकारणातून नष्ट होणार अशी मनीषा बाळगणारे राजकारणातून हद्दपार झाले. पण मोदी मात्र प्रादेशिक राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात आले.
गुजरातमध्ये राहुल हरुनही बाजीगर ठरले आणि मोदी सतत जिंकूनही त्यांच्या तोंडाला फेस आला, असे कॉंग्रेसी म्हणतात तेव्हा आपण समजू शकतो. कारण कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण होऊ नये आणि कॉंग्रेसच्या परंपरेप्रमाणे जसे बादशहाचा मुलगा बादशहा होतो तसे राहुल सुद्धा पारंपरिक पद्धतीने बादशहा अर्थात कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. कॉंग्रेसींना काही करुन राहुल गांधींचे अस्तित्व टिकवायचे आहे. जर राहुल यांच्या योग्यतेबद्दल कॉंग्रेसमध्ये अधिक चर्चा होऊ लागली तर कॉंग्रेसी राहुल समर्थकांना हा सर्वात मोठा फटका बसू शकतो. म्हणून राहुल बाजीगर, त्यांनी मोदींना टक्कर दिली, राहुलमुळे मोदी काठावर पास झाले हे कॉंग्रेसींना सांगावं लागतं पण इतर मोदी विरोधक हा खटाटोप करतात तेव्हा हसू आवरत नाही. त्यांना राहुल गांधींच्या पराभवात जय का दिसतो? की त्यांनीही गांधी परिवारची गुलामी करण्याचे व्रत घेतले आहे? मला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा स्वतःला तिसरी व्यक्ती किंवा पत्रकार किंवा लेखक म्हणवून घेणारेही राहुलजींच्या या पराभवामुळे आनंदी होते व त्यांनीही मोदी जिंकूनही हा त्यांचा नैतिक पराभव असल्याचे म्हटले. या अशा लोकांना गुजरातच्या पार्श्वभूमीची साधी माहिती सुद्धा घ्यावी असे वाटत नाही. अगदी साधा मुद्दा आहे, आपल्या भारतीय लोकशाहीप्रमाणे बहुसंख्य लोकांच्या समर्थनाने सरकार स्थापन होते. त्यामुळे लोकशाही पद्धतीने भाजप गुजरातेत जिंकला आहे आणि संविधानाप्रमाणे हा नैतिक विजयच आहे.
गुजरातमधून हार्दिक पटेलनंतर मोदी विरोधी दलित चेहरा म्हणून जिग्नेश मेवाणी समोर आला. जिग्नेश हा तरुण आहे. तो आता जिंकलाही आहे. त्यामुळे विजयाची धुंदी अजूनही त्याच्या डोक्यावरुन उतरलेली नाही. ज्या वयात जिग्नेश मोठा नेता झाल्याने पुरोगामी मंडळी खुश आहेत, त्या वयात मोदी हे साधे कार्यकर्ते होते. त्या वयात मोदी प्रत्यक्ष राजकारणात आलेले नव्हते. ते टप्प्याटप्याने आले. म्हणजे ते प्रसिद्धीच्या बळावर राजकारणात आले नाहीत. ते श्रम करीत आले. स्वयंसेवक किंवा कार्यकर्ता आणि विशेष म्हणजे प्रचारक म्हणून तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही लोकांमध्ये राहत असता. अगदी सामान्य माणसाप्रमाणे लोकांमध्ये मिसळता, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत असता. हार्दिक म्हणा, कन्हैया किंवा जिग्नेश हे प्रसिद्ध झालेले युवा नेते आहेत. यशस्वी झालेले नव्हे. मराठीत असं म्हणतात की एखाद्याला आपटायचं असेल तर आधी त्याला उचलावं लागतं. या तरुण नेत्यांना मिडिया आणि डाव्यांनी डोक्यावर उचलून घेतलंय. ही डावी मंडळी हिंदू द्वेषाने पछाडलेली आहेत. ही मंडळी भयंकर स्वार्थी आहेत. जिथे जिथे कम्युनिस्टांचे राज्य आहे, तिथे तिथे रक्ताचे पाट वाहिले जातात हे सत्य ते जगापासून लपवतात. या डाव्या मंडळींनी या युवा नेत्यांना त्यांचे विशेष काहीही कर्तृत्व नसताना डोक्यावर उचलून घेतले आहे. ही मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी या तरुणांना आपटू शकतात. अर्था या युवा नेत्यांनी प्रसिद्धीही मिळाली आहे. एखादं गाढव जरी हिंदू किंवा मोदींच्या विरोधात बोंबलायला लागलं तर ही डावी मंडळी त्या गाढवालाही खांद्यावर घेऊन नाचतील. अशी अवस्था स्वतः डाव्यांनी करुन घेतलेली आहे. कारण डावी मंडळी सपशेल नापास झालेली आहेत. त्यांचा अवास्तव बुद्धीवाद भारतीयांना नकोय. त्यांना सुशासन हवेय.
या डाव्या मंडळींनी उचलून घेतलेले हे युवा नेते किती माजोरडे आहेत, हे त्यांच्या मुलाखतींमधून आणि भाषणांमधून स्पष्ट दिसत आहे. भाजप आल्यापासून ही मंडळी जास्तच वैतागलेली आहेत. त्यांना भारतात सुशासन आणायचे आहे, याचा दुसरा अर्थ त्यांना भारतात शांती नकोय. कारण डाव्या मंडळींचे लेख जर तुम्ही वाचत असाल तर ह्यांचा हिंदू विरोध दिसून येतो आणि ह्यांना काहीही करुन भारतात हिंदू विचारांचं शासन नकोय. आता या ज्येष्ठ डाव्या मंडळींचं कुणीही ऐकत नाही. म्हणून जिग्नेश मेवाणी सारख्या युवा नेत्यांच्या खांद्यावरुन ही मंडळी मोदींवर वार करीत आहेत. मग कोणतीही कुवत नसताना प्रसिद्ध झालेले जिग्नेश मेवाणी सारखे नेते स्वतः भारत भाग्य विधाता असल्या सारखे वागू लागतात आणि मोदीं सारख्या जुन्या जाणत्या आणि यशस्वी नेत्यावर टिका करु लागतात, लोकशाहीत टिका झालीच पाहिजे. पण ह्यांची कुवत नसल्यामुळे टिका करताना सुद्धा ह्यांचे भान सुटते, मग ते मोदी बुढ्ढा म्हणत अपमान करतात. पण कुणाही स्वयंघोषित पुरोगाम्याला जिग्नेशचे कान धरावेसे वाटत नाही. त्यांनाही यात आनंद मिळतो. अर्थात मोदी वेळ आल्यावर त्यांना उत्तर देतीलच. पण मोदी वेळोवेळी आपल्या कार्यातून उत्तर देतच आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर बहिष्कारीत झालेले व अमेरीकेने व्हिजा नाकारलेले मोदी आज आंतरराष्ट्रीय स्थरावर लोकप्रिय होत आहेत. मोदींमुळे अनेक आंतरराष्ट्रीय राजकीय पंडितांना भारताविषयी लिहावेसे करावेसे वाटत आहे. मोदी पंतप्रधान झाले तेव्हा सरकारी बाबू वेळेवर कामाला येतात अशी बातमी छापून आली होती. याचा अर्थ पूर्वी मनमोहन सिंह यांच्यासारख्या उच्चशिक्षित माणसाच्या नेतृत्वाखाली ही मंडळी कामं टाळायची. पण मोदी आल्याने त्यांच्यावर वचक बसला. म्हणजे 67 वर्षाचा बुढ्ढा स्वतः प्रामाणिकपणे काम करतो. म्हणूनच इतरांच्या मनात वचक निर्माण होतो. मोदी देशाचा कारभार सांभाळून भाजपसाठी निवडणुकाही जिंकून देतात. तरीही 67 वर्षांचा बुढ्ढा थकत नाही. तो सतत कार्य करीत राहतो. विरोधक टीका करत राहतात आणि हा केवळ कार्य करीत राहतो. कधीतरी आपल्यावर झालेल्या टिकेचा समाचारही घेतो. पण त्याचेही अपचन विरोधकांना होते. जिग्नेश मेवाणी म्हणाला की ‘‘उनको घर बैठना चाहिये आणि हिमालय में जाकर हड्डियां गलाने चाहिये.’’ जिग्नेशला वाटतं की हा बुढ्ढा बोरींग आहे पण या बुढ्ढ्याचे अनेक समर्थक आहेत. या बुढ्ढ्याकडे पाहून लोकांना प्रेरणा मिळत आहे. सर्वसामान्य परिवारातून येऊन इतक्या मोठ्या पदाला पोहोचल्यामुळे हा बुढ्ढा धडपड्या तरुणांचा आदर्श आहे. जिग्नेशला देशाचं नेतृत्व करायचं आहे. पण देशाचं काय तर केवळ दलित समाजाचंही नेतृत्व करण्यास तो सक्षम नाही. पहिले कारण मोदी बुढ्ढ्याप्रमाणे त्याला देश जोडायचा नसून तोडायचा आहे. म्हणून तो जातीयवादी राजकारण करत आहे. पण मोदींनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही. दुसरे कारण बाबासाहेब आंबेडकरांसारख्या दिग्गज नेत्याने एक मोठा आदर्श निर्माण करुन ठेवला आहे. त्या आदर्श परंपरेत जिग्नेश कुठेच बसत नाही आणि मोदी सुद्धा उच्च घराण्यातून आलेले नाहीत. पण तरीही ते लोकनेता झाले. संयम, दूरदृष्टी या बळावर ते इथपर्यंत पोहोचले. अजूनही ते नम्र आहेत. राजकीय भाषणात विरोधकांना धोबीपछाड करावे लागतेच. पण तरीही ते सुसंस्कृत घराण्यातले वाटतात. हे हीराबेन मोदी यांचे संस्कार आहेत. मोदींचे जवळचे अनेक नातेवाईक राजकारणात नसून सर्वसाधारण आयुष्य जगत आहेत. हा आदर्श मोदींनी निर्माण केला आहे. कुटुंब कल्याणापेक्षा त्यांना लोककल्याण महत्वाचे वाटते. या वयातही त्यांचा आत्मविश्वास, त्यांची कृती तरुणांना लाजवणारी आहे. जिग्नेश आणि त्याच्या सारख्या काही मंडळींना मोदी हे बुढ्ढा वाटत असले तरी मोदी आपल्या कृतीद्वारे जणू दाखवून देत आहेत की बुढ्ढा होगा तेरा बाप...
जयेश मेस्त्री
9967796254
साप्ताहिक 'चपराक' २५ डिसेंबर २०१७
साप्ताहिक 'चपराक' - २५ डिसेंबर २०१७
महाड येथे प्राथमिक शिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली होती ती प्राचार्य गजेेंद्रगडकर यांच्यामुळे. ते चंद्रपूर येथे बदलून गेले होते तरी त्यांचे मन माझ्यात गुंतले होते. मला मुलगा मानून माझ्यातला साहित्यिक त्यांनी जागा केला होता. ‘आचार्य’ची परीक्षाही द्यायला लावली होती. मनाने आम्ही दोघे कमालीचे जवळ आलो होतो. त्यातून त्यांची पितृछायाच मिळाली होती. रायगड खोर्यातील सांदोशी गावी कडेकपारीत बदली झाल्यामुळे माझ्यातला कलावंत मरून जाईल म्हणून ते बेचैन झाले होते. इतक्या दूरवर जाऊनही त्यांना मला विसरता येत नव्हते. त्यांनी संधी मिळताच रायगडच्या शिक्षण अधिकार्याला सांगितले व माझी बदली महाडला झाली.
महाडची शाळा तशी जुनी आणि नावाजलेली. त्या शाळेत चिंतामणरापांनी (सीडी देशमुख) शिक्षण घेतले होते. या शाळेत माझ्या वाट्याला चौथीचा वर्ग आला होता. जी जुनी-जाणती माणसे होती त्यांच्या ‘वजनानुसार’ त्यांना वरचे वर्ग मिळालेले होते. त्यातून त्या काळात सातव्या यत्तेला विलक्षण महत्त्व आले होते. त्यामुळे वाडकर, उमरटकर, रा. मो. शेठ ही वयाने मोठी असलेली माणसे वरचे वर्ग ‘सांभाळीत’ होती. त्यातून मी तसा अगदीच नवा होतो. तरी बरे, चौथी तरी दिली होती. त्याचेही कारण होते. खालच्या तीन यत्तांचा ‘सांभाळ’ महिला शिक्षक करीत होत्या. त्यात केशवराव जावडेकरांची पत्नी होती. प्रकाश हा त्यांचा मुलगा पत्र्याच्या त्या शाळेत त्याकाळी शिकत होता. पुढे माध्यमिक शिक्षक म्हणून परांजपे विद्यामंदिरात मी अध्यापन करीत असताना तो नववीच्या वर्गात विद्यार्थी म्हणून शिकत होता. प्रकाशच्या वडिलांशी माझा स्नेहसंबंध फारच जुना असा होता. ‘केसरी’मध्ये ते वृत्तसंपादक होते. मी ‘आचार्य’ परीक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम येताच त्यांनी ती बातमी ‘केसरी’च्या पहिल्या पानावर अगदी ठळकपणे छापली होती. ते मधूनमधून महाडला येत असत. त्यांचा माझ्याशी पत्रव्यवहार हा शेवटपर्यंत होता.
चौथीच्या वर्गात जी मुले होती ती आडदांड अशी होती. या वर्गाचा धाक सर्व शाळेला होता. अशी मुले मला शिकवायची होती. विशेष म्हणजे या मुलांचे माझ्यावर फारच प्रेम बसले होते. गंमत ही की, मी माध्यमिक शिक्षक म्हणून परांजपे विद्यामंदिरात काम करीत असताना हा वर्ग ‘हूड’ म्हणून प्रसिद्ध पावला होता व हा खट्याळ मुलांचा वर्ग मला मुद्दामच देण्यात आला होता. हेतू हा की, माझी पुरती जिरावी! पण झाले उलट! ती मुले पूर्वीची मराठी चौथीतली होती; त्यामुळे मला चांगली माहितीची होती. माझे त्यांनी स्वागतच केले होते आणि त्यामुळे तेथील ‘हितचिंतकांची’ पुरती जिरली होती.
प्राथमिक शिक्षक असतानाच एका विद्यार्थ्याने एक दिवस भाजी मंडईतून भाजी खरेदी करीत असताना मला पाहिले. त्याच्या मोठ्या भावाचे हॉटेल होते ते बाजारपेठेत. त्याने मला पाहताच धाव घेतली आणि म्हटले, ‘‘गुरूजी चला माझ्याकडे चहा घ्यायला.’’
मी विचारले, ‘‘इथे तुझे घर कुठे जवळ आहे काय?’’
त्यावर तो म्हणाला - ‘‘घर नाही, माझ्या भावाचे हॉटेल आहे. ते समोर दिसते तेच. शाळा सुटल्यावर मीच गल्ल्यावर उभा असतो.’’
माझी शिस्त अशी होती की मी सहसा हॉटेलात कधी जात नव्हतो. म्हणून त्याला म्हटले, ‘‘अरे, मी हॉटेलात कधी जात नसतो. तुला माहिती आहे ना?’’
तो म्हणाला, ‘‘मला चांगलं माहीत आहे. तरीही मला वाटते की तुमचे पाया माझ्या हॉटेलात लागावेत. थोडातरी चहा घ्या आणि मगच घरी जा.’’
त्याची ही भावना अव्हेरावी असे न वाटल्याने मी त्याच्या बरोबर गेलो.
गल्ल्यावर पैसे देण्यासाठी त्यावेळी रांग लागलेली होती. त्या रांगेला बाजूला सारून त्याने मला जवळच खुर्ची दिली व ‘स्पेशल’ची ऑर्डर दिली.
हॉटेल बाजारातच असल्याने त्या हॉटेलात नेहमीच गर्दी फुललेली असे. माझ्यासाठी ‘ऑर्डर’ दिली होती, तरीही चहा यायला वेळ लागला होता. मी वेळ फुकट जात होता म्हणून थोडा बेचैन होतो. त्याहीपेक्षा इथे बसून आपण काहीच करू शकत नाही याचे मला वाईट वाटत होते. तेवढ्यात बाजूला पडलेल्या रद्दीकडे माझे लक्ष गेले. काही तरी वाचायला मिळेल म्हणून मी ती रद्दी चाळायला लागलो, तोच एक जुने हस्तलिखित माझ्या हाती लागले. मी अधाशासारखे ते वाचायला लागलो. ते हस्तालिखित होते कविश्रेष्ठ भालचंद्रांचे! हे भालचंद्र म्हणजे केशवसुत संप्रदायातले प्रसिद्ध कवी तर होतेच शिवाय मराठीत ‘प्रहसन’ हा वाड्ःमय प्रकार मराठी साहित्यात प्रथम त्यांनी आणलेला होता. उत्तम प्रहसनकार म्हणून ते मासिक ‘मनोरंजन’ मध्ये गाजलेले लेखकही होते. माझ्या दृष्टीने त्यांचे जे मोठेपण होते ते कवितेच्या दृष्टीने. ‘शिवदर्शिकाकार भालचंद्र’ हे त्यांनी स्वतः होऊन घेतलेले असे टोपणनाव होते. त्या काळात बहुतेक कवी ‘टोपण’ नावानेच लिहीत असायचे. गिरीश, केशवकुमार, बालकवी, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, बी ही त्यातलीच नावेे होती. भालचंद्रांचे पूर्ण नाव होते गणेश नारायण टिपणीस. महाडच्या माध्यमिक शाळेत ते शिक्षक होते. त्यापूर्वी ते पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते. घरची शेती भरपूर होती. ती सांभाळायला कुणी जबाबदार हवे होते म्हणून ते महाडात परतले होते.
पुण्यात असताना राम गणेश गडकरी, बालकवी ठोंबरे हे त्यांचे जिवश्च कंठश्च असे मित्र होते. या तिघांनी एकत्रितपणे आपल्या कविता लिहिल्या होत्या तशाच त्या वाचल्याही होत्या. त्यातूनच त्या तिघांचे ‘अरूण’ एकाचवेळी जन्म पावलेले होते. आचार्य परीक्षेच्या निमित्ताने ‘मनोरंजन’सारखे अनेक जुने अंक, ‘विविधज्ञान विस्तार’चे अंक मी अभ्यासले होते. त्या त्या वेळी भालचंद्रांच्या अनेक कविता वाचनात आल्या होत्या. अशा या मोठ्या कवीचे ‘शिवदर्शिका’ हस्तलिखित माझ्या हाती अचानक पण चहाच्या निमित्ताने लागले होते. मी विद्यार्थ्याला म्हटले, ‘‘तुझा चहा राहू दे. त्या चहापेक्षा मला मोठा चहा मिळाला आहे. मी निघतो. मी हे हस्तलिखित नेऊ का?’’
या प्रप्रश्नावर तो चकितच झाला. मला म्हणाला, ‘‘कसले ते? काय नेऊन करणार? गुरूजी, चिवडा बांधायलासुद्धा हा कागद उपयोगी येईना म्हणून मी बाजूला टाकले होते. ते तुम्हाला आवडले?’’
मी म्हटले, ‘‘अरे तुझ्या चहाच्या निमित्ताने मला फार मोठे खाद्य मिळाले आहे. तुला हे मिळाले कुठे?’’
त्यावर तो म्हणाला, ‘‘माझ्याकडे जी रद्दी आली त्यात हे आले. थांबा; चहा घ्या आणि तुम्हाला आवडलेले ते बाडही घेऊन जा.’’ चहा घेऊन मी निघालो.
घरी आल्यावर मी त्या ‘शिवदार्शिका’हस्तलिखितानेच वेडा झालो होतो. एकामागून एक कविताच वाचत होतो. 97 कवितांचे ते हस्तलिखित होते. त्यातून भालचंद्रांनी स्वतःच्या हस्ताक्षरात त्या सर्व कविता लिहिल्या तर होत्याच पण ज्या ज्या मासिकात त्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्या मासिकांच्या नावाचीही नोंद केली होती. माझ्यादृष्टीने ती गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती. भालचंद्र, बालकवी, गोविंदाग्रज पुण्यात वास्तव्याला होते त्यावेळी एक छोटा कवी, ‘बालकवी’ही त्यांच्या सहवासात आला होता. त्याचे हे तिघांशी भावनिकअसे नातेही निर्माण झाले होते. हा ‘बालकवी’ म्हणजेच सुप्रसिद्ध कादंबरीकार रघुनाथ वामन तथा र. वा. दिघे होत. या तिघांचे ‘अरूण’ त्याने एकत्रितपणे ऐकले तर होतेच पण खुद्द बालकवींबरोबर (ठोंबरे) ते पर्वतीवर रोज फिरायलाही जात होते. त्यांना गोविंदाग्रजांनीच ‘बालकवी’ संबोधले होते. ‘वाग्वैजयंती’मध्ये त्यांच्यावर गडकर्यांनी एक कविताही लिहिलेली आहे. गडकरी कर्जतला (रायगड) असताना खोपोलीत र. वा. दिघे यांना नेहमीच भेटायलाही येत होते. भालचंद्रांच्या तर अनेक कविता र. वा. दिघे यांच्या तोंडी रूळल्याही होत्या.
हे हस्तलिखित मिळताच त्यांनी कवितांची नक्कल करून सर्व कविता माझ्याकडे मागितल्या होत्या आणि मी 97 कवितांची ती वही त्यांना दिलीही होती. आचार्य परीक्षेच्या निमित्ताने मी जी असंख्य पुस्तके अभ्यासली होती त्यात नागपूरच्या भ. श्री. पंडितांचे ‘आधुनिक मराठी कवितेचे स्वरूप’ हेही पुस्तक अभ्यासले होते. भालचंद्रांचे हस्तलिखित हाती मिळताच त्यांच्याशी माझा पत्रव्यवहार सुरू झाला तो त्यांच्या काही विधानांवर आक्षेप घेऊनच. मी त्यांना त्या पुस्तकात 3/4 ठिकाणी ‘भालचंद्र’ म्हणून जो उल्लेख आला होता त्याबाबत विचारले होते. त्यांना जे नीटसे स्पष्टीकरण देता आले नव्हते. तसे त्यांचे पत्रही आले होते. मात्र त्यांच्या त्या पुस्तकात त्यांनी जे वाक्य उच्चारले होते तेे आधाराला घेऊन मी प्रश्न विचारला होता. ते वाक्य असे होते, ‘भालचंद्रांच्या कवितेत चटका असे परंतु त्यांचे काव्य अत्यल्प असे आहे.’ बी कवींच्या कवितेवर भ. श्री. पंडितांनी मात्र भरभरून लिहिले होते. मी त्यांना विचारले, ‘‘बी कवींपेक्षाही अधिक काव्य भालचंद्रांनी लिहूनही आपण अल्पशब्दात त्यांना बाजूला का केलेत?’’
तेव्हा त्यांनी पत्रात लिहिले की बी कवींच्या जवळजवळ 45 कविता लिहिलेल्या आहेत तेवढ्याही मला भालचंद्रांच्या आढळल्या नाहीत.’’
मी मग भ श्रींना 97 कवितांची यादी पाठवली आणि स्पष्टपणे म्हटले की, आपल्यापुढे ‘मासिक मनोरंजन’चे अंक तेवढे होते त्यामुळे आपण ‘ते’ विधान केलेत. ही यादी पहा. ‘बी’ कवींपेक्षा भालचंद्रांच्या कविता दुप्पट अधिक अशा आहेत. त्यांनाही ते पटले व त्यांनी पत्रात मान्यही केले की ‘मासिक मनोरंजन’चे जे अंक हाती आले त्या आधारावर मी ते वाक्य लिहून गेलो.’’
भालचंद्रांच्या त्या हस्तलिखितामुळे भ. श्रींची व आमची चांगलीच जोडी जमली. ती इतकी की ‘‘मी पी.एच.डी केल्यास मार्गदर्शनासाठी मुंबईत येऊन राहील’’ असेही त्यांनी म्हटले. माझा ‘झंकार’ हा काव्यसंग्रह त्या काळात प्रसिद्ध व्हायचा होता. मी प्रस्तावनेसाठी त्यांच्याकडे हस्तलिखित पाठवताच त्यांनी प्रदीर्घ अशी प्रस्तावना पाठवली. मी ती छापली आणि ‘झंकार’ काव्यसंग्रह दिमाखात प्रकाशित झाला. त्यात कुसुमाग्रजांचाही अभिप्राय प्रसिद्ध केलेला आहे. त्यांच्याशी तर सतत पत्रव्यवहारच होता.
भालचंद्रांनी केशवसुतांवर जशी कविता लिहिली तशीच बालकवींवरही लिहिली होती. ‘ठोंबरे मरे; तो काळाला पुरूनि उरे’ अशी त्यांची कवितेची ओळ होती. गडकर्यांच्या ‘दसरा’ या गाजलेल्या समाजपरिवर्तनपर कवितेशी भालचंद्रांच्या कवितांचा जो संबंध आला आहे तो या कवितेच्या शेवटच्या ओळीत. गोंविदाग्रजांनी शेवटची ओळ लिहिली आहे.
‘अतारकरांची झडवा नौबत!’ भालचंद्रांची हस्तलिखितात जी कविता आहे ती ‘अतारकरांस’ या नावाची! आणि हीच कविता मासिक ‘मनोरंजन’मध्ये जी प्रसिद्ध झाली ती नेमकी ’नौबत’ या नावाने. गडकर्यांनी मित्रप्रेमातून या दोन्ही नावांचा मिलाफ घडवून आणून ती ओळ ‘दसरा’ कवितेत शेवटी लिहून टाकलेली आहे, हे ‘सत्य’ मला वाटते भल्याभल्यांना अजूनही कळलेले नाही. गडकर्यांना एखादा शब्द किंवा ओळ आवडली की ते त्यांचा अचूक उपयोग करून घेत असत. र. वा दिघे यांची ‘झरा’ कविता (ती रत्नागिरीत लिहिलेली) वाचनात येताच गडकरी म्हणाले होते की, ‘मी या झर्यातून प्रलय निर्माण करीन’ आणि त्यांनी ते तसेच करूनही दाखवले. गडकर्यांच्या कवितेतून असे ‘प्रेम’ अनेक ठिकाणी दाखवूनही देता येते. र. वा. दिघ्यांनी ते मला अनेकदा जाणवूनही दिलेले आहे.
‘जुनी कविता आता वाचणार कोण?’ या प्रकाशकांच्या विचारधारेमुळे ते हस्तलिखित पुढे प्रकाशात येऊ शकलेले नाही. शासनाने ते प्रसिद्ध करावे म्हणून प्रयत्न करूनही साहित्य संस्कृती मंडळाने त्याची दखलही घेतलेली नाही. शेवटी मराठीतील एक अजोड संपत्ती म्हणून भालचंद्रांचे ते हस्तलिखित जिवापाड जपूनही ठेवलेले आहे. एक इतिहासाची साक्ष म्हणून मला ते नेहमीच अधिक मोलाचे वाटत राहिलेले आहे. या हस्तलिखितांमुळे भ. श्री. पंडितांची मैत्री लाभली तसाच र. वा. दिघे यांच्याशी दाट असा स्नेहसंबंधही जुळून आला. मैत्रीची साक्ष म्हणून ‘शिवदार्शिका’ या हस्तलिखिताला माझ्या दृष्टीने केवढे तरी मोल आहे हे काय सांगायला हवे?
- डॉ. माधव पोतदार
(सुप्रसिद्ध लेखक आणि पत्रकार)
साप्ताहिक 'चपराक' - २५ डिसेंबर २०१७
साप्ताहिक 'चपराक'
१८ डिसेंबर २०१७
2011 साली ‘मर्डर 2’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘मर्डर 1’ मधील गाणी खूप चालली. मी बसने मुंबईत प्रवास करत होतो. माझ्या पुढच्या सीटवर एक तरुण माणूस आपल्या 4 (अंदाजे) वर्षाच्या मुलासोबत बसला होता. पोरगं बाहेरचं जग न्याहाळण्यात मग्न होतं. अचानक त्याला ‘मर्डर 2’चं पोस्टर दिसलं. ते पोस्टर पाहून पोरगं बापाला म्हणालं, ‘‘पप्पा, ते बघा कांदे बटाटे.’’ बापाला काय बोलावं तेच कळलं नाही. तो त्या पोरावर ओरडला आणि म्हणाला, ‘‘गप्प, असं नाही बोलायचं.’’ पोरगं गप्प बसलं.
त्या पोस्टरमध्ये जॅकलीन फर्नांडिस इम्रान हाश्मीच्या पाठीवर बसली आहे. ती पोज आपण लहान मुलांना ‘कांदे बटाटे’ असं म्हणत खेळवतो तशी होती. त्या पिटुकल्या लेकराला आठवलं असणार की आपले पप्पासुद्धा आपल्याला असंच उचलून घेतात. पण हा तर लहान मुलांचा खेळ. मग त्या इम्रानकाकाने जॅकलीन मावशीला असे का उचलले असेल? मोठी माणसंही असा खेळ खेळतात का? असा प्रश्न त्या चिमुकल्या जिवाला पडला असणार! म्हणून मुलगा असं म्हणाला, पण पप्पाला लाज वाटली की आता याबद्दल मुलाला कसं सांगायचं? की हा लहान मुलांचा खेळ नसून हा मोठ्या माणसांचा वेगळाच खेळ आहे.
या चित्रपटाची आणि प्रसंगाची आठवण काढण्याचे कारण म्हणजे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टीव्हीवरील कंडोमच्या जाहिरातींसाठी वेळ निश्चित केली आहे. वाहिन्यांना सकाळी 6 ते रात्री 10 दरम्यान कंडोमच्या जाहिराती दाखवता येणार नाहीत. रात्री 10 च्या नंतर मुले टिव्ही बघत नाहीत असा सरकारचा निष्कर्श आहे. अश्लिलतेकडे झुकणार्या आणि मनात घृणा निर्माण करणार्या जाहिरातींवर बंदी घातली जाऊ शकते, असे नियम आहेत असे सरकारने सांगितले आहे.
यावरुन सरकारवर स्तुती सुमने उधळली गेली आणि तसेच प्रचंड टीकाही झाली. भाजपचे सरकार आल्यापासून माहिती आणि प्रसारण मंत्रालयावर अनेक टीका झाल्या आहेत. सेन्सॉर बोर्डला ‘संस्कार बोर्ड’ म्हणत खिल्लीही उडवण्यात आली आहे. जेम्स बॉण्डच्या चित्रपटतील चुंबनाच्या दृश्यांबद्दल खूप मोठा वाद झाला होता. ‘उडता पंजाब’वरील वाद तर प्रचंड गाजला. आता तर ‘सेक्सी दुर्गा’ आणि ‘न्यूड’ चित्रपटांवरील वाद अजूनही चघळला जात आहे.
पहिली गोष्ट अशी की सरकारने लोकांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेतली पाहिजे. हे सरकारचे कर्तव्यच आहे. म्हणूनच ‘पहले शौचालय फिर देवालय’ अशी घोषणा मोदींनी केली असावी. लोकांचे शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी या सरकारने बरेच कष्ट घेतले आहेत. तसेच त्याबद्दल जनजागृतीही करण्यात आली आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुस्तकाचे आवरण काढून तो कागद आपल्या खिशात ठेवला. आपण स्वतः स्वच्छतेबाबत काटेकोर नियम पाळतो, हा संदेश मोदींना त्यातून द्यायचा आहे. यावरुनही बरेच चांगले वाईट संदेश व्हायरल झाले. ‘मोदी दिखावा करतात’ असे काहींनी म्हटले तर ‘मोदी बोलतात तसे स्वतः वागतात’ असे काही जणांनी म्हटले. स्वच्छता अभियान, शौचालय, शुद्ध जल, गंगा स्वच्छता अशा गोष्टींतून सरकारने बरेच प्रयत्न केले आहेत. या आधीच्या सरकारनेही यासाठी प्रयत्न केले होतेच पण भाजपने विकासासोबत स्वच्छता हा आपला अजेंडा बनवला आहे.
हे झाले शारीरिक स्वास्थ्य! पण मानसिक स्वास्थ्याचे काय? मानसिक स्वास्थ्य चांगले राहील यासाठी विशेष नियम करता येत नाहीत, कारण प्रत्येक गोष्टींसाठी तुम्ही कायदे करु शकत नाही. जर कुणी गुन्हा केला तर पुराव्यांच्या बळावर कायद्यानुसार त्याला शिक्षा होऊ शकते पण गुन्हा घडू नये किंवा तो करु नये यासाठी केवळ संस्कार कामाला येतात. आपण विना-तिकीट ट्रेनमधून प्रवास करु नये, हे संस्कार सांगतात आणि तसे केल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरेल ही कायद्यातील तरतूद आहे.
सरकार लोकांवर संस्कार करु शकत नाही. सरकार कुणाच्याही बेडरुममध्ये डोकावून पाहू शकत नाही. तो अधिकार त्यांना नाही. मुळात सरकारने कलेच्या संदर्भात कोणत्याही सामाजिक, राजकीय व धार्मिक दबावाला बळी पडू नये. मुलांनी काय पहावं किंवा काय पाहू नये यावर मर्यादा घालण्याचा अधिकार पालकांना आहे. सरकारने कोणतेही धोरण ठरवण्याआधी पालकांचे मन जाणून घेतले पाहिजे. हे अगदी खरे आहे की काही गोष्टी या लहान मुलांकरिता नसतात. मी लहानपणी ‘स्मॉल वंडर’ नावाची मालिका पहायचो. अतिशय सुंदर मालिका होती ती. त्या मालिकेतील पालक आपल्या मुलांसमोर एकमेकांचे चुंबन घ्यायचे. तरीही आमच्या बालमनावर कोणताच परिणाम झाला नाही. त्यात आम्हाला वावगे असे काही वाटले नाही.
स्मॉल वंडरचा एक एपिसोड तर मुल कसं जन्माला येतं या लाईनवर होता. त्यातील लहान मुलगा याबद्दल आपल्या बाबांना प्रश्न विचारतो. तेव्हा बाबांना काय उत्तर द्यायचे कळत नाही. म्हणून बाबा काहीही थापा मारतात. तेव्हा तो मुलगा म्हणतो, ‘‘तुम्ही चुकीचे बोलत आहात. तुम्हाला काही माहीत नाही. मुल कसं जन्माला येतं हे मला माहिती आहे’’ आणि त्याचे बाबा आश्चर्यचकित होतात. हा एपिसोड मी लहानपणी पाहिला होता. बालमन म्हणून काही प्रश्न मला पडले पण मनावर विपरित परिणाम झाला नाही. याचं कारण मुलांवर वाईट परिणाम होणार नाही याची काळजी या मालिकेत घेतली होती.
आता आपण कंडोमच्या जाहिरातीबद्दल विचार करुया. याआधीही काही जाहिराती आल्या होत्या. त्या सांकेतिक होत्या. त्यात संभोगाबद्दल उघडपणे बोलले जात नव्हते. आताच्या बर्याच जाहिराती मुलांना दाखवू नये अशाच आहेत पण आता आपला समाज खूप पुढे गेला आहे. आपण कशाकशावर बंदी आणणार? आता तुम्ही एका क्लिकवर पॉर्न पाहू शकता. युट्यूब आणि वेबसाईट्सवर असे अनेक कंटेंट्स आहेत. त्यामुळे केवळ कंडोमच्या जाहिरातीची वेळ निश्चित केल्याने मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होणारच नाही, असे ठामपणे सांगता येईल का?
आताचे चित्रपट बोल्ड आहेत. आताच्या मालिका रिऍलिटी शो हे सर्व बोल्ड झाले आहेत. यामुळे सुद्धा मुलांच्या मनावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. यावर सरकार निर्बंध लादू शकत नाही हे सत्य आहे. त्यामुळे सरकारने याविषयी जनतेचे मत जाणून घेणे उपयुक्त ठरेल. स्वतःचे हसे करुन घेण्यापेक्षा हा मार्ग उत्तम आहे. आपल्याकडे लोकशाही प्रणाली आहे आणि लोकशाही प्रणालीत बहुसंख्यांच्या मतांचा आदर केला जातो. आपले सरकार असेच निवडून येते. म्हणून अशा गोष्टींसाठी सरकारने जनमत लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेही मोदींचं सरकार सोशल मीडियावर सतर्क आहे. मोदी काही कार्यासाठी लोकांची मते जाणून घेतात. तशी ऑनलाईन सोय त्यांनी करुन दिली आहे. त्यामुळे अशा काही निर्णयामुळे सरकारची अब्रू घालवण्यापेक्षा लोकांचे सल्ले घेणे उपयुक्त ठरेल. सेक्स (सेक्शुअल लिबर्टी) आणि सिटीचा सबंध आहे पण ग्रामीण भागात आजही अनेक गोष्टींसाठी बंधने आहेत. शहरातले लोक फॉरवर्ड वगैरे समजले जातात. त्यामुळे शहरातल्या लोकांसोबत ग्रामीण भागातील लोकांचे म्हणणे सुद्धा ऐकावयास हवे.
सेक्स हा समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यातून नवा समाज घडतो पण सेक्समुळे आनंद सुद्धा मिळतो. त्यासाठी कंडोमची निर्मिती केली आहे. त्याची जाहिरात झाली पाहिजे पण त्या जाहिराती विशिष्ट वयोगटासाठीच आहेत. मुळात जाहिरात हा शब्दच शोभा करणे किंवा एखादी गोष्ट पसरवणे अशा संदर्भाचा आहे. जाहिराती सर्वांसाठीच खुल्या असतात. एड्सला रोखण्यासाठी गर्भ निरोधक आणि कंडोमचा वापर करावा, अशी जनजागृती सरकारकडून केली जाते. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी मोफत कंडोमचे वाटप देखील केले जाते. अर्थात सरकारच्या जाहिराती बोल्ड नसतात. त्यात प्रबोधन असते. आताच्या कंडोमच्या जाहिराती, लोकांनी कंडोमचा वापर करुन सेक्सचा आनंद लुटावा यासाठी केल्या जातात. म्हणूनच त्यांच्या जाहिराती प्रौढांसाठी आनंददायी ठरतील अशाचप्रकारे निर्माण करण्यात आलेल्या आहेत. यावर निर्बंध हवेच पण सरकारला कुणी सांगितले की लहान मुलं रात्री 10 नंतर टिव्ही बघत नाहीत? सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुले टिव्ही पाहतात, हे कोणत्या रिसर्चवर आधारित आहे? सरकारचा हेतू शुद्ध असेल पण त्यासाठी सरकारने आधी रिसर्च करायला हवा.
लहान मुले घरात टिव्ही सुरु असेपर्यंत टिव्ही पाहतात. माझा मुलगा तरी असाच करतो. सेन्सॉरमध्ये युए नावाचं सर्टिफिकेशन दिलं जातं. याचा अर्थ तो चित्रपट मुले पालकांच्या मार्गदर्शनाखाली पाहू शकतात. माझ्यामते ए म्हणजे ऍडल्ट सर्टिफिकेट असलेला चित्रपट, जाहिरात टिव्हीवर शक्यतो दाखवत नाही. याचा अर्थ कंडोमच्या जाहिरातीला युए सर्टिफिकेट मिळत असणार. त्यामुळे आपल्या मुलांनी काय पहावं आणि काय पाहू नये याचा विचार पालकांनाच करु द्यावा. सरकारने शक्यतो त्यात लुडबुड करु नये. केल्यास पालकांचे मत जाणून घ्यावे. तसंही इम्रान हाश्मी आणि जॅकलीन फर्नांडिस ‘कांदे बटाटे’ खेळतात की अजून कोणता खेळ खेळतात, याचे उत्तर पालकच देतील.
- जयेश मेस्त्री
९९६७७९६२५४
साप्ताहिक 'चपराक'
१८ डिसेंबर २०१७