Wednesday, December 12, 2018

देखणा देहान्त

साहित्य चपराक दिवाळी महाविशेषांक २०१८ 

सकाळ होते. रोजच्यासारखाच दिवस सुरू होतो. रोजच्यासारखाच तो पार पडेल असे आपल्याला वाटत असते पण अचानक काही तरी घडतं आणि त्या घडण्याचे आपण साक्षीदार होतो. नुसते साक्षीदार न होता आपल्या अंतर्मनात ती घटना कोरली जाते. ती कोरली गेलेली घटना एक विचार बनून आपल्याबरोबर रुजत राहू लागते. आपल्या अंतर्मनात तिच्यावर सखोल विचारही होऊ लागतो. आपल्या जाणीवांच्या पातळ्या रुंदावू लागतात. आकळण्याचा एक क्षण येतो, जातो. तो धरून ठेवता येत नाही. नेमका सांगताही येत नाही पण तरीही आपल्याला त्याबद्दल सांगावेसे वाटते. बोलावेसे वाटते. मध्यंतरी असेच काही घडले. सुरेश बोरामणिकर या माझ्या मावसभावाचा मृत्यू झाला. अचानक असंही खरंतर म्हणता येणार नाही कारण त्याचं वय तसं 79 पण तब्येत अजून धडधाकट म्हणावी अशीच होती. मनसोक्त आनंदी, निरामय जगलेलं तृप्त असं त्याचं  व्यक्तिमत्त्व. तो असताना पेक्षा तो गेल्यानंतरच जास्त कळाला आणि त्याच्या निमित्तानं अनेक गोष्टीही. याचं कारण त्यांने केलेले देहदान.
तो देहदान करणार आहे हे माहीत होतं पण तरी आजही आपल्या देशात, धर्मात मृत्यूपश्चात धार्मिक संस्कार, तिसर्‍या दिवशी राख सावडणे, दहावा, बारावा, तेरावा, चौदावा या आणि अशा सगळ्या विधींना खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे व्यक्तीची देहदानाची लाख इच्छा असली तरी त्याच्या कुटुंबियांची त्यासाठी मानसिक तयारी असतेच असे नाही! पण इथे मात्र वहिनींसहित घरातल्या सर्वांनी मृत्यू आणि नंतरचे देहदान अगदी सहजतेने, समजूतदारपणाने  स्वीकारलं. एवढेच नाही तर भावाच्या इच्छेनुसार कोणी डोळ्यातून टिपूसही येऊ दिला नाही.
'श्वास शिंपून उत्सवाला चालली ही लोचने
मी पुढे अन् त्या पुढे तू अमृताच्या राऊळी'
असा हा एक वेगळा संकल्प सिद्धीचा सोहळा.
मृत्युनंतर सिव्हिल हॉस्पिटलला कळवले होतेच. हॉस्पिटलची गाडी आली, देह घेऊन गेली. हे सारे इतके अचानक झाले होते की त्याच्या तीन पैकी दोन तिथेच नोकरी करणार्‍या मुली फक्त वेळेत येऊ शकल्या मात्र  एक मुलगी आणि तिन्ही जावई कोणीच अंतरामुळे पोहोचू शकणार नव्हते. मात्र त्यांना दुसर्‍या दिवशी हॉस्पिटलमध्ये त्याचे दर्शन होऊ शकणार होते. हे ऐकले, त्याच क्षणी माझ्या मनात काहीतरी चमकले आणि माझा त्या बॉडी नामक देहाशी संवाद सुरू झाला. एक अनुबंध निर्माण झाला कारण या देहाला अग्निडाग दिला जाणार नव्हता. त्याची राख होणार नव्हती. तो देह अजून वीस-एक वर्षे तरी अचेतन रूपात अस्तित्वात असणार होता. त्यामुळे साहजिकच माझे मन त्या अचेतनाभोवती घुटमळू लागले. अधिकाधिक पुढच्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवू लागले, जाणून घेऊ लागले. एकीकडे मनात,गीतेच्या बाराव्या अध्यायातला 3, 4 था श्‍लोक आठवू लागला.  
॥ त्वक्षर्मनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते।
सर्वत्रगमचिंत्यं च कुटस्थमचलं ध्रुवम्॥
॥ सर्वत्र समबुद्धयः।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः॥
जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्याप्रकारे ताब्यात ठेवून मन-बुद्धीच्या पलीकडे असणार्‍या, सर्वव्यापी, अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणार्‍या नित्य, अचल, निराकार, अविनाशी सच्चीदानंदघन ब्रह्माची निरंतर ऐक्यभावनेने ध्यान करीत उपासना करतात ते सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समभाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात.
मनात आलं देहदान करणारी प्रत्येकच व्यक्ती मरणोपरांत स्थूलरूपातून परोपकारच करतेय. सूक्ष्मरूपात ती ईश्‍वराशी ऐक्य पावते की नाही माहीत नाही पण अनेक जीवांसाठी वरदान मात्र ठरते. कोणी तरी आपल्या मृत्युनंतर आपला देह वापरतोय, खरंच देहाभिमान संपल्याशिवाय हे होणे नक्कीच नाही कारण देहदान म्हणजे मृत शरीर जसेच्या तसे दान करणे. खूप धाडसाची गोष्ट वाटते मला ही.
देहदानानंतर मेडिकल कॉलेजमधील फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे मृतदेह दिला जातो. तज्ज्ञांच्या  देखरेखीत मृतदेह  फॉर्मअल्डिहाईड किंवा तत्सम प्रिझर्व्हेटिव्हजमध्ये ठेवला जातो. यामुळे मृतदेह कुजत नाही. नंतर आवश्यकतेनुसार देहातील योग्य तो कार्यरत अवयव काढून त्याचे गरजू रुग्णांवर प्रत्यारोपण  केले जाते किंवा मेडिकलच्या विद्यार्थ्यांना थेअरी बरोबर प्रॅक्टिकल करण्यासाठी अनॉटॉमी आणि फिजियॉलॉजी डिपार्टमेंटकडे वेळेप्रमाणे हा मृतदेह सोपवला जातो. वैद्यकीय क्षेत्रात याचे खूप महत्त्व आहे. मृतदेहाचा अभ्यास करून एखादी पिढी घडवली जाते. चांगले सर्जन निर्माण होण्यास मदत होते.
कृष्णमूर्तींना एकदा कुणीतरी विचारलं होतं, ‘‘मृत्यूचा अर्थ काय?’’ 
तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘मृत्यू म्हणजे सर्व सोडून जाणे! तुमच्या आसक्ती, तुमच्या भ्रामक समजुती, तुमची सुखचैनीची अभिलाषा या सर्वांपासून मृत्यू तुम्हाला अतिशय तीक्ष्ण पात्याने विलग करतो. त्याचा अर्थच पूर्ण मुक्त होणे असा आहे. आसक्ती नाही, भविष्य नाही, भूतकाळ नाही. मृत्युनंतरही शरीराची आसक्ती असतेच ती संपणे गरजेचे आहे तरच मला वाटते व्यक्तीला देहदान करणे सहज होईल.
खरे म्हणजे शरीराचा अंत म्हणजे मृत्यू. शरीर संपणे एवढीच क्रिया घडते पण आपण प्रत्येक जण मृत्युची भीतीच बाळगतो. मृत्युचे भयच माणसाला खर्‍या जगण्यापासून दूर नेते. मृत्युचा अर्थ जगण्यात शोधला तर शेवटच्या श्‍वासाच्या ओढीनं जीवनाला आपण कृतार्थ करू शकू.
कॉलेजमध्ये असताना  मला मृत्युची भयंकर ओढ होती. मृत्युला उद्देशून कविता, ललित लिहिले जायचे. मृत्युलाच आपण वरलेय, छान नटून थटून त्यालाच माळ घातली आणि त्याच्याशी एकरूप होऊन या जगातून नाहीसे झालोय अशा कल्पना सतत केल्या जायच्या. अनुनभवी, निरागस मनाचे ते चित्रण असायचे पण नंतर जेव्हा कबीर थोडा वाचण्यात आला आणि ‘जिस मरने से जग डरै, मेरो मन आनंद। कब मरिहौ कब भेटिहौ, पूरन परमानंद।’
सारे जग ज्या मृत्युला घाबरते त्याच मृत्युने माझे मन आनंदित होते, हा या दोह्याचा अर्थ. मृत्युमुळे पुलकित होणे हा अर्थ अर्थातच माझा नसायचा कारण त्या वयात येणार्‍या नैराश्याने असे काही मी लिहायचे हे आता लक्षात येते. मग ओशोंनीही मृत्यू शिकवला तो असा,
’जे अज्ञानी आहेत तेच मृत्युला घाबरतात, ज्यांनी मृत्यू ओळखला आहे त्यांनी जीवन जिंकले आहे. मृत्युसारखी परम सुंदर गोष्टच या जगात नाही. जर तुमची सावली नष्ट करायची असेल तर तुम्ही एका जागी स्थिर होता, सावली आपोआप नाहीशी होते. जसे प्रत्येक समस्येकडे डोळे उघडून पाहता, समस्या आपोआप संपून जाते. मृत्युचेही तसेच आहे. मृत्युपासून पळायचा प्रयत्न केलात तर तो पाठलाग करेल पण त्याकडे निर्भयपणे पहाल तर तो अमृतासमान भासेल. थांबा आणि मृत्युला सामोरे जा. मृत्यू ओळखायला शिका. तुम्हाला परमेश्वर भेटेल.’
ओशो सांगतात, ‘सम्यक जीवन सम्यक मृत्युचा आधार आहे.’ कबीरांसाठी मृत्यू ‘परम सौभाग्य’ आहे. हे सारे चिंतन सुरू असतानाच लहानपणापासून आपण सगळ्यांनीच अनेकदा ऐकलेली महर्षी दधिचिंचीही गोष्ट आठवली. तिलाही आज वेगळे आयाम येत गेले. म. दधिचिंनी असुर वृत्रासुराच्या वधासाठी लागणार्‍या शस्त्रासाठी आणि देवांच्या रक्षणासाठी म्हणून स्वतःच्या अस्थी देण्यासाठी जिवंतपणी देह त्याग केला. आत्ताही त्यांच्या कर्तव्यबुद्धीच्या जाणिवेने मन कृतज्ञतेने भरून आले. आज या निमित्ताने त्यांची अभिव्यक्ती जास्त समजली आणि नतमस्तक व्हावे असे वाटले. स्वतःचे मांस देणारा शिबि राजा आठवला आणि स्वतःच्या चिलया नावाच्या बाळाला मारून, त्याला कुटून, कांडून त्याचे मांस रांधून वाढणारी शिवभक्त चांगुणा पण आठवली... 
आणि याच संदर्भात सोलापूरचे प्रार्थना फौंडेशनचे अनु आणि प्रसाद मोहिते हे दांपत्य देखील आठवले. या दांपत्याचे समाजकार्य तर खूप मोठे आहेच पण जेव्हा अनुला नवव्या महिन्यात डिलिव्हरीच्या अगदी काहीच दिवस आधी कळाले की तिला होणारी मुलगी वाचणार नाहीये तेव्हा दोघांनाही खूप त्रास झाला. हा काळाचा घाला किंवा हा नियतीचा खेळ खूपच जीवघेणा होता खरं तर! पण तरीही या प्रसंगाला धैर्याने तोंड देत त्यांनी या नवजात शिशूच्या देहदानाचा धाडसी निर्णय घेतला आणि ही हळवी पोकळी अर्थभारीत केली. 
तर आपण कोणत्याही क्षणी शत्रूच्या गोळीचा निशाणा होऊ शकतो हे कळत असूनही आर्मीत दाखल होणारे, हसत हसत समर्पित होणारे जवान. मला वाटतं, पूर्ण मुक्त होणे किंवा समग्रतेने निसर्गाशी एकाकार होणे किंवा त्या ईश्‍वरीय शक्तीशी संपूर्ण शरणागती ही अवस्था मनाला प्राप्त झाल्याशिवाय हे असे कृत्य शक्यच नाही. या अवस्थेतच देहातीत मनाचा, मन ते आत्मा हा प्रवास होत होत अलौकिकात प्रवेश होत असावा.
- प्रिया धारुरकर 
९८९०९२२०८९ 
साहित्य चपराक दिवाळी महाविशेषांक २०१८ 


Monday, December 10, 2018

मॅनहटन मिस्ट्री


सुप्रसिद्ध साहित्यिक सदानंद भणगे यांची ‘साहित्य चपराक’ दिवाळी महाविशेषांकातली ही कथा अवश्य वाचा.

रात्रीचे आठ वाजले होते. तरीही लख्ख सूर्यप्रकाश होता. मॅनहटन सिटी आनंदाने न्हाली होती. शुक्रवार संध्याकाळ असल्याने लोकांच्या उत्साहाला उधाण आले होते. नाचत, गात मंडळी हिंडत होती. काही तरुण उघड्या जीपमधून वेगाने आवाज करीत जात होते. आरशासारख्या स्वच्छ रस्त्यावर काही परदेशी पर्यटक चक्क पाठीवर झोपून उंच इमारतींचे फोटो काढत होते. निऑन साईनचे बोर्ड इमारतींच्या तीस-चाळीसाव्या मजल्यावरूनही स्पष्ट दिसत होते. अनेक मोठे रंगीत टीव्हीच इमारतींवर लागलेले होते. थोड्याच वेळात सूर्यास्त झाला. विजेच्या दिव्यांचा लखलखाट सुरु झाला. सगळ्या जगातले लाईट्स जणू ह्या एकाच सिटीत लागले होते. अनेक हॉटेल्सनी रस्त्यावरच खुर्च्या मांडल्या होत्या. लोक त्यावर बसून, भल्या मोठ्या   ग्लासातून बिअरचा स्वाद घेत होते. काहीजण रंगीबेरंगी कॉकटेल्सचे मोठमोठे मग्ज तोंडाला लावत होते. कोणाचेही कुणाकडे लक्ष नव्हते. सगळेजण आपापल्या आनंदात दंग होते. रस्त्याच्या मध्यभागी असणार्‍या गुलाबी ताटव्यामध्ये उभे राहून काही प्रेमीयुगुलं प्रेमात अखंड बुडालेली होती. मधूनच काही युवक मोटर बाईकवरून गाणी गात जात होते. न्यूयॉर्क शहरदर्शनच्या लाल रंगाच्या उघड्या टपाच्या बसेस संथ वेगाने जात होत्या. त्यांचे चालक कम गाईड असणार्‍या स्त्रिया गोड आवाजात विनोद करीत प्रत्येक ठिकाणची माहिती सांगत होत्या. हवे तिथे लोक उतरत होते. आसपासची दृश्यं बघत होते. पुन्हा दुसर्‍या बसमध्ये बसून जात होते. ही सिटी झोपतच नाही, म्हणजे इथे येणारा प्रत्येकजण इतका अखंड बघत असतो की तो झोप विसरूनच जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असणार्‍या गगनचुंबी इमारतींमुळे रस्त्यावर सूर्यप्रकाश येतच नसे. सुखद गार वार्‍याच्या झुळकीने हिंडणारे पुन्हा पुन्हा ताजेतवाने होत होते. रंगीबेरंगी कपड्यांची जत्राच भरली होती. वेगवेगळ्या तर्‍हेचे लोक हिंडत होते. काळे, गोरे, हडकुळे, अवाढव्य शरीराची मुले आणि तरुण मंडळी आपल्याच नादात हिंडत होती. अनेक वृद्ध लोक ट्रायसिकलवर मजेत हातात कॉफीचे ग्लास घेऊन फिरत होते. खरंतर मॅनहटन शहराचे ते रोजचेच दृश्य होते. श्रीमंती ओसंडून वाहत होती. 
वेस्ट एंड ऍव्हेन्यूमधल्या एका मॉलच्या पायरीवर बसून सॅम्युएल ते दृश्य पाहत होता. सगळे जग आनंदाने बागडत असताना तो मात्र विमनस्क अवस्थेत बसला होता. त्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. मानसिक विश्‍वच उद्ध्वस्त झाले होते. अनेकदा वाटायचे एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या शहाऐंशीव्या मजल्यावरून उडी टाकून जीव द्यावा पण काचेच्या भिंतीआडून खाली पाहिलं तरी चक्कर यायची... एलिनाची समजूत कशी काढावी त्याला समजत नव्हते. आईवडिलांना ती पसंत नव्हती. ‘एलिना एक्स्ट्रा ऍम्बिशिअस आहे, तू खूप गरीब स्वभावाचा आहेस. तिच्याशी  लग्न करू नकोस. एकतर ती मेक्सिकन आहे, खूप वेगळ्या वातावरणात वाढलेली आहे!’ असं ते सांगत.
पण तो ऐकायलाच तयार नव्हता. तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. लग्न झाल्यानंतर वर्षभरातच ती त्याच्याशी वाद करू लागली. ती त्याला कायर, घाबरट म्हणू लागली. ‘‘तुझ्या अंगात डेअरिंगच नाही. आयुष्यात  तुझ्याच्याने  काहीही घडणार नाही, तू कायम मॉलमध्ये काम करणारा सामान्य कामगारच राहणार’’ म्हणून ती त्याला हिणवायची. एका मॉलमध्ये काम करणार्‍या इसमाचा पगार तो कितीसा असणार? आता तर ती घटस्फोटाची भाषा करायला लागली होती. घटस्फोट दिला तर रहायचे कुठे हा प्रश्‍न त्याच्यासमोर होता कारण ह्या घराचे भाडे ती भरत होती. तरी बरे, बर्‍याचशा वस्तू त्याने फ्री बोर्ड असणार्‍या रस्त्याच्या कडेला लोकांनी ठेवलेल्या अशाच आणल्या होत्या. डायनिंग टेबल, सोफासेट त्याला मिळून गेला होता. गुडविल स्टोअरमध्ये वापरलेले कपडेही स्वस्त मिळत पण तिला ते कपडे आवडत नसत. त्याचा बँक बॅलन्सही फारसा नव्हता. दिवसभर काम करून संध्याकाळ तो बाहेरच काढत असे. कित्येक दिवसात नवे कपडे पण घेतले नव्हते. त्याला आईवडिलांकडे पण जाता येत नव्हते. या वयात आईवडिलांचा आधार घेणे अमेरिकन संस्कृतीत बसत नाही. एलिना मात्र छानछोकीत राहत होती. कायम नातेवाईक, मित्र घरी येत असत. सगळा पगार ती वेगळा ठेवत असे. त्याविषयी तो काहीच विचारू शकत नसे. कवीमनाच्या सॅम्युएलची  सगळी स्वप्नं भंगली होती. सगळं जग या शहरात मजा करण्यासाठी येतं आणि आपण मात्र आत्महत्येचा विचार करीत इथे बसलो आहोत. रोजच संध्याकाळी तो असा कुठेतरी येऊन बसतो. खूप रात्र झाली की घरी जातो. एलिना बडबड करीत असे. कित्येकवेळा तो काही न खातापिता झोपून जाई. ती साधी चौकशी पण करीत नसे. तिच्या अशा वागण्यामुळे तो आणखीनच गरिबासारखा दिसायला लागला होता.
जसजशी रात्र व्हायला लागली तसतशी गर्दी वाढायला लागली. तो उठला. चालू लागला. आजूबाजूच्या हॉटेल्समधून खमंग वास येत होते. फारशी गर्दी नसलेल्या एका केएफसीमधून त्याने चिकन नट्स खरेदी केले आणि खात खात तो निघाला. जाता-जाता एका दुकानाच्या भव्य आरशात त्याला त्याचं प्रतिबिंब दिसलं आणि तो चरकला. काय अवस्था झाली आहे आपली! कपडे धड नाहीत. बूट तर तळाला फाटलेले आहेत. वरुन दिसत नाहीत एवढेच. काही दिवस असे राहिलो तर जाणारे-येणारे एखादा डॉलरसुद्धा टाकतील... स्वतःचीच कीव आली त्याला. खरंतर एलिना दुर्लक्ष करीत होती म्हणूनच त्याची अशी अवस्था झाली होती. तिच्याशिवाय जीवन फोल वाटत होेते. साधं स्वप्न होतं त्याचं. दोघांनी मजेत रहावं. हिंडावं, फिरावं, स्वतःचं छोटंसं घर असावं, टू सीटर कार असावी, लहानशी बोट घेऊन एखाद्या लॉंग विकेंडला लांब कुठेतरी समुद्र किनार्‍यावर जावं, टेंट बांधून तिथेच दोन दिवस रहावं, मुलांशी खेळावं... पण मुलाचं नावं काढलं की एलिना तुफान संतापायची. ‘अगोदर  तू मोठा होऊन दाखव, स्मार्ट हो, मग बघू’ म्हणायची. जगावेगळी बाई होती ती. घरी जावंसच वाटत नाही. घरी गेलं की गोंधळ चाललेला असतो. मित्रमैत्रिणी गोळा झालेल्या असतात. त्यांचं हसणं, खिदळणं आणि वाईन घेणं चालू असतं. त्याच्या येण्याची दखलही कोणी घेत नसे. त्याला खिजवण्यासाठी ती तिच्या श्रीमंत मित्रांना मुद्दाम घरी बोलावत असे.
आजही त्याला घरी जावंसंच वाटत नव्हतं. उद्या पुन्हा सुटी. करायचं काय, खूप मोठा प्रश्‍न पडला होता. तो विचारांच्या नादात चालतच राहिला. खूप लाईट्स असणार्‍या त्या स्ट्रीटवर गर्दी अजिबात नव्हती. एका कोपर्‍यात त्याला तो उंच लोखंडी डोनेशन बॉक्स दिसला. अनेक लोक त्यात नको असणारे कपडे, इतर वस्तू टाकतात. गरजू लोक हवे ते घेऊन जातात. पूर्वी कधी त्याचे लक्ष तिकडे जात नसे पण आज काय वाटले कुणास ठाऊक! तो तिकडे गेला. त्या बॉक्सच्या खाली एक झडप होती. ती उचलली की बर्‍याचश्या वस्तू बाहेर येत. कोणी बघत नाही असे पाहून त्याने ती झडप उचलली. अनेक कपडे बाहेर आले. त्याबरोबर एक बुटाचा जोडही बाहेर आला. सॅम्युएल आश्‍चर्यचकित झाला कारण ते बूट चक्क नवेच दिसत होते. एखाद्या श्रीमंत माणसाने खास बनवून घेतलेले ते बूट होते. त्याच्या बुटापेक्षा दसपट चांगले होते आणि मुख्य म्हणजे त्याच्या पायाच्या मापाचे आणि चांगलेच जड होते. त्याला गंमत वाटली... आताच आपण बुटाविषयीच विचार करीत होतो आणि योगायोगाने आपल्याला आपल्याच मापाचे शूज मिळावेत ह्याचा अर्थ काय? मनोमन तो खूश झाला. त्याने ते बूट घेतले. दोन्ही बूट खूप मोठ्या, जाड लेसने एकमेकांना बांधले होते. कदाचित दोन्ही एकत्र रहावेत म्हणून बांधले असावेत असं त्याला वाटलं. शेजारीच वर्तमानपत्रांचा बॉक्स होता. त्यातून एक वर्तमानपत्र त्याने घेतले. त्यात ते बूट बांधले आणि इकडेतिकडे न पाहता झटक्याने तो निघाला. लहान मुलाला एखादी वस्तू रस्त्यात सापडल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद त्याला झाला होता. त्या आनंदातच तो निघाला. घरी फ्रायडे नाईट एन्जॉय करणे चालू होते. एलिनाला बकार्डी चांगलीच चढली होती. मित्रांबरोबर गाण्यावर ती डान्स करीत होती. सॅम्युअलने शूज कपाटाखाली डाव्या बाजूला सरकवून ठेवले आणि तो बेडकडे गेला.
बराचवेळ झाला तरी त्याला झोप येईना. सोमवारी ड्युटीवर जाताना नवे बूट घालून जायचे त्याने ठरवले होते. मध्ये झोप लागली तेव्हा झोपेतही त्याला ते बूटच दिसत होते. त्या बुटातून आता आपले फाटके सॉक्स दिसणार नाहीत त्यामुळेही तो खूश झाला. बाहेरच्या पार्टीचा कोलाहल जसा थांबला तसा तो गाढ झोपी गेला.
एकाएकी रात्री अडीच-तीनच्या सुमारास त्याला खाडकन् जाग आली. कुणीतरी हलवून उठवावं तशी. त्याचं लक्ष कपाटाखाली गेलं आणि त्याला दरदरून घाम फुटला. ते बूट चक्क चमकत होते. हिरवा प्रखर प्रकाश बाहेर पडत होता. तो घाबरला. बूट उचलून खिडकीतून फेकून द्यावेत असाही विचार त्याच्या मनात आला पण दारिद्य्र तुम्हाला धीटपणा देतं. एवढ्या नशिबानं एवढे चांगले बूट मिळालेत... कदाचित ते रात्री तसे चमकतच असावेत. लहान मुलांचे शूज जसे रंगीबेरंगी वाजणारे असतात, त्यात हिरवे, लाल दिवेही असतात तसेच हेही असतील असा विचार करून, कूस बदलून, कपाटाकडे पाठ करून सॅम्युएल झोपी गेला. शनिवारी सकाळी तो लवकरच उठला. एलिनाने  त्याच्यासमोर कॉफी आणून आदळली आणि म्हणाली,
‘‘आय ऍम गोइंग टू नायग्रा फॉर टू डेज विथ माय फ्रेंड्स, यू एन्जॉय युअरसेल्फ.’’ 
बस्स! बाकी काहीच न बोलता ती गेली. थोड्या वेळातच दरवाजा लागल्याचा खाट्कन आवाज आला. दोन दिवस तू काय करशील? तुझ्या जेवणाचं काय? असं काहीही न विचारता ती गेली सुद्धा. किती बदलली एलिना... त्यानं उसासा सोडला. सहज कपाटाखाली पाहिलं. ते बूट जणू आश्‍चर्याने तोंडाचा आ करून पाहतायेत असं त्याला वाटलं. आता ते चमकत नव्हते. तो स्व:तशीच हसला. त्याने निरखून पाहिलं तर बूट कालच्या जागेवरून थोडेसे हलल्यासारखे वाटले. त्याला चांगलं आठवत होतं, त्याने कपाटाच्या डाव्या कोपर्‍यात ठेवले होते, ते आता मध्यभागी दिसत होते! पण त्याने तो विचार झटकला. आपल्याच लक्षात नसेल, आपण विचारांच्या नादात होतो म्हणून त्याने दुर्लक्ष केले. एका दृष्टिने एलिना गेली ते बरं झालं.. दोन दिवस मनासारखं घरात राहता येईल. तो आवरायला लागला. तरीही तिची आठवण त्याला अस्वस्थ करीत  होती. ती कशीही वागली तरी त्याला आवडत होती.
काल बूट बांधून आणलेला पेपर सहज चाळला. त्यात बातमी होती, आज डाऊन टाऊन जवळच्या रस्यावर मुलांना शिस्तीचे नियम तासभर सांगितले तर वीस डॉलर्स मिळणार होते. त्याने आनंदाने उडीच मारली. चला, आजची चिंता मिटली... आवरून तो निघाला. नवीन शूज घालायचा मोह त्याने आवरला. लगेच नको वापरायला काढायला. कुणी ओळखले तर फील होईल आपल्याला. आजपर्यंत इतके किमती शूज घातले नव्हते. कपडे पण तसेच हवेत ना...! 
सॅम्युएल मुलांच्या संगतीत वेळेचं भान विसरून गेला. दोन तास झाले तरी तो बोलत होता. मुलांशी खेळत होता. मुलं पण खूश झाली होती. आपली मुलं असती तर आपणही शनिवार-रविवार असाच घालवला असता असं त्याला वाटून गेलं. पोरांचा त्याला चांगलाच लळा लागला.. ‘‘पैसे नाही मिळाले तरी चालतील; मी दर शनिवारी इथे येत जाईल’’ म्हटल्यावरच मुलांनी त्याला सोडलं. कोपर्‍यातल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्याने ब्लू मून बिअर आणि बरीटो खायला घेतलं आणि मजेत तो घरी आला. दुपारी मस्त ताणून दिली. पडल्यावर मात्र त्याला एलिनाची आठवण तीव्रतेने झाली. तिच्याशिवाय घरही नकोस वाटतं. संध्याकाळी टाईम स्क्वेअरला नुसतं जाऊन बसलं तरी वेळ जातो. माणसे बघत बसायची. सगळेजण आपापल्या नादात झपाझप चालत असतात. परदेशातून अमेरिका पहायला आलेल्या मंडळींचे विस्फारलेले डोळे पाहून त्याला गंमत वाटायची. इंडियन लोक तर लगेच ओळखू येतात. त्यांच्या त्या बायका अंगाभोवती केवढा गोल कपडा गुंडाळून घेतात. मात्र त्यांच्या कपाळावरची लाल टिकली खूप छान दिसते. दुकानाच्या पायरीवर बसून एक-दोघा इंडियनकडे पाहून तो ‘नमस्ते’ देखील म्हणाला. तेव्हा ते आश्‍चर्याने बघू लागले होते. मॉलमध्ये काम करीत असताना अनेक इंडियन लोक येत. त्यांचे काही शब्द त्याने ऐकले होते.
लग्नानंतरचे काही दिवस मजेत गेले होते. भरभरून प्रेम करीत होते दोघे एकमेकांवर. ती त्याला सॅम म्हणायची आणि तो तिला एल... सुरुवातीला ‘गरिबीतही आपण संसार करू’ असं ती म्हणायची. नंतर तिला त्याचा स्वभाव पटेनासा झाला. आता तर दोघातला संवादच बंद झाला होता. त्यामुळे त्याची तडफड वाढली होती. कशातच लक्ष लागत नव्हतं. 
बाथरूममध्ये जाऊन शॉवरखाली मनसोक्त आंघोळ केली. थोडं फ्रेश वाटलं. नाईट ड्रेस चढवला. फ्रीज उघडून पाहिला. कालच्या पार्टीसाठी बनवलेले बरेच पदार्थ राहिलेले दिसत होते. त्याने ओव्हनमध्ये गरम करून घेतले. मस्काटो वाईनची बाटली पण बर्‍यापैकी भरलेली दिसत होती. त्याची चैन झाली. टी. व्ही. पाहत त्याने खाल्लं आणि तो बेडरूममध्ये आला. टीव्हीवर कुणा गर्भश्रीमंत माणसाच्या खुनाच्या केसची बातमी चालली होती. ती पाहता पाहता कधी झोप लागली त्याला समजलेच नाही.
एकाएकी रात्री तीनच्या सुमारास त्याला खडबडून जाग आली. त्याने टीव्ही बंद केला. कालपासून हे असं काय होतंय त्याला समजेना. कुणी तरी हलवून उठवावं तसं वाटलं. त्याचं लक्ष कपाटाखाली गेलं आणि पुन्हा तो चक्रावला. बुटातून प्रखर हिरवा प्रकाश येत होता. त्याला भीती वाटायला लागली. उठला, कपाटाकडे गेला. बूट बाहेर काढले आणि त्याला काय मोह झाला त्याने शूज घातले. हिरवा प्रकाश बंद झाला. खूप कम्फर्टेबल वाटलं. एकदम चालावसं वाटलं. त्याने चालून पाहिलं. खूश झाला. अचानक त्याने लॅच की घेतली. दरवाजा ओढून घेतला आणि घराबाहेर पडला. तसाच नाईट ड्रेसवरच. आपण  काय करतोय त्याचं त्यालाच समजेना. रात्री उठून असं चालत जायची सवय नव्हती. काहीतरी वेगळंच घडतंय याची जाणीव त्याला झाली. हे बूट तर आपल्याला चालवत नसतील? हा विचार मनात आला आणि त्याला दरदरून घाम फुटला. अपरात्री अचानक जाग येणं, बुटांचं रात्री हिरव्या रंगानं चमकणं सगळंच विचित्र वाटायला लागलं होतं आणि आता तर त्या बुटांनी त्याला एवढ्या रात्री चक्क घराबाहेर चालायला लावलं होतं. आपण कुठे चाललो आहोत त्याला काहीच समजत नव्हते. त्याने मागे जायचा प्रयत्न केला पण त्याला ते जमत नव्हते. ते बूट त्याला जणू खेचून नेत होते. तो चालतच राहिला. पहाटेचा गार वारा सुरु झाला. पूर्व दिशा फटफटू लागली. जसजसा अंधार नाहीसा होत होता, तसतशी त्याची चाल मंदावत होती. तो स्वतः खरं तर काहीच करत नव्हता. बूटच त्याला थांबवत होते. तो भानावर आला. बर्‍याच लांबवर तो चालत राहिला होता. आता तो परत फिरला आणि घरी निघाला. घरी येताच त्याने ते बूट काढले तेव्हा तो शुद्धीवर आला. आपण कुठेतरी बाहेर जाऊन आलोत हेच त्याला खरे वाटेना. तो बेडवर पडला आणि शांत झोपी गेला. खूप वेळानंतर त्याला जाग आली. बूट तसेच कपाटाखाली होते. रात्री घडलं ते खरं की आपण स्वप्न पाहत होतो हेच त्याला समजेनासे झाले.
संध्याकाळी त्याने व्हिक्टरला फोन केला. अर्ध्या तासात तो वूल्फहाउंड आयरिश व्हिस्कीची बाटली घेऊन आला. व्हिक्टर त्याचा एकमेव फ्रेंड होता. त्याने अनेकवेळा सल्ला दिला होता, ‘‘तू एखाद्या वकिलाचा सल्ला तर घेऊन पहा. नुसती धमकी देऊन पहा. एलिना तशी दुष्ट नाहीये. तू दूर जातोयस म्हटल्यावर तिचं मन बदलेल’’ पण सॅम्युएलची हिंमत होत नव्हती कारण तो तिच्यावर प्रचंड प्रेम करीत होता. ती खरंच सोडून जाईल अशी त्याला भीती वाटायची. व्हिक्टरचा नाईलाज होई. ती घरी असताना त्याच्या कोणत्याही मित्राची घरी यायची हिंमत व्हायची नाही.. ‘‘युवर ऑल फ्रेंड्स आर लाईक यू, लुकिंग ऑलवेज थर्स्टी ऍन्ड हंग्री नो बडी इज बोल्ड’’ असं ती त्याला नेहमी म्हणत असे.
दोन पेग पोटात जाताच गप्पा रंगायला लागल्या.
‘‘व्हिक्टर तुला सांगतो, परवा रात्री...’’
‘‘यार तुझं नेहमीचं रडगाणं नको राव गाऊस! तुझ्याच्याने काहीही होणार नाही. मलाही एलिनासारखंच वाटायला लागलंय आता...’’
‘‘नाही रे! आज तुला वेगळीच गंमत सांगणार आहे’’ म्हणून त्याने ते शूज कसे सापडले, रात्री कसे हिरव्या रंगाने चमकले, अचानक जाग आल्यावर, नकळत घातल्यावर बाहेर कसा पडलो, बूट कसे आपोआप बाहेर घेऊन गेले हे सगळं सांगितलं. व्हिक्टर जाम घाबरला. बुटाकडे पहायचं धैर्यच होईना. तो म्हणाला,
‘‘हे झंझट नको घेऊ गळ्यात. एवढे नवे कोरे शूज कोण कशाला टाकेल? टाकून दे ते बूट परत त्या बॉक्समध्ये.’’
सॅॅम्युएलला चांगलीच चढली होती. तो म्हणाला,
‘‘नाही तरी जिंदगीत काही अर्थ उरलेला नाहीच. मग बघू तर बूट कुठं नेतात मला ते! नाही तरी एलिनाशिवाय माझं जगणं अर्थहीन, दिशाहीनच झालंय...’’
‘‘नको नादी लागू. वाट लावतील ते बूट.’’
‘‘कदाचित वाट दाखवतीलही.’’
‘‘हो दाखवतील ना! एखादेवेळी स्मशानाची!’’ व्हिक्टर बोलून  गेला. 
‘‘मग तर बरं होईल यार. इथं कोणाला जगायची इच्छा आहे?’’ मोठ्याने हसत सॅम्युएल म्हणाला.
त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नव्हता हे व्हिक्टरच्या लक्षात आले. त्याचं ते हसणंही व्हिक्टरला भेसूर वाटलं. त्यानं तेथून काढता पाय घेतला. रात्र बरीच झाली होती. सॅम्युएल तसाच बेडवर आडवा झाला. क्षणार्धात गाढ झोपी गेला.
रात्री तीन वाजता अचानक त्याला खाडकन् जाग आली. अजूनही त्याची नशा उतरली नव्हती. त्याने कपाटाखाली बुटांकडे पाहिलं. हिरव्या रंगाने ते चमकत होते. तो सरळ उठला, कपाटाकडे गेला. त्याने ते बूट पायात घातले आणि म्हणाला,
‘‘चला दाखवा वाट. व्हिक्टर म्हणाला तशी स्मशानाची दाखवता का? दाखवा! शो मी द रोड ऑफ ग्रेव्हयार्ड...’’ दरवाजा खाडकन् लावून घेत तो घराबाहेर पडला देखील.
तो कुठं चाललाय त्याचं त्याला समजत नव्हतं. तारेत असल्यासारखा चालतच राहिला. रस्त्यामागून रस्ते मागे पडत होते.. चालण्याचा वेग वाढू लागला. तो एका निर्जन वस्तीकडे जाऊ लागला. चालताचालता तो खरोखरच एका ग्रेव्हयार्डकडे आला. एवढं श्रीमंत सिमेट्री तो पहिल्यांदाच पाहत होता. अनेक रंगांची भलीमोठी थडगी गुडघ्यावर बसलेल्या फादरसारखी दिसायला लागली तसा तो भानावर आला. आपण खरंच एका स्मशानभूमीत आलोत. बुटांनी आणले. आपण स्वतःहून आलो, की आपण त्यांना म्हटलं दाखवता का वाट, म्हणून त्यांनी आणलं त्याला समजेना... तो प्रचंड घाबरला. त्याची नशा पूर्ण उतरली... ते बूट त्याला पुढेच नेत होते. एखाद्या विशिष्ट थडग्याच्या दिशेने तो खेचल्यासारखा जाऊ लागला. घामाने पूर्ण डबडबला... एकाएकी प्रचंड सजवलेल्या थडग्यापुढे येऊन तो उभा राहिला. गार वार्‍याचा सपकारा अचानक अंगावर आला. काही दिवसांपूर्वीच निधन झालेल्या व्यक्तीचं ते थडगं असावं आणि ती व्यक्ती अमाप श्रीमंत असावी. एखाद्या महालाच्या प्रवेशद्वारासारखेच दिसत होते ते थडगे. काही क्षण तो थांबला आणि मागे वळून त्याने धूम ठोकली. पळतच तो घराकडे आला. धापा टाकीतच दार उघडलं आणि त्याने पलंगावर अंग टाकलं.
सकाळी उठला तेव्हा तो एकदम फ्रेश होता. त्याचंही आश्‍चर्य वाटलं. त्याला पुन्हा समजेना, रात्री घडलं ते खरं होतं की स्वप्न.. चक्रावून गेला. काहीतरी विचित्र घडल्याची जाणीव त्याला झाली. कसंबसं आवरून तो कामाला निघाला. ते बूट घालायचे धैर्य मात्र त्याला होईना. रात्री उशीरा तो घरी आला तेव्हा एलिना आली होती. ती तिच्याच नादात गाणं गात होती. सॅम्युएल त्याच्या रूममध्ये गेला. तावातावाने एलिना त्याच्या मागे आली. 
‘‘शूज कुठून आणलेस?’’
‘‘डोनेशन बॉक्समधून!’’ 
‘‘आर यू अ बेगर? फेकून दे ते अगोदर.’’
‘‘हात लावशील तर याद राख. डोंट टच दोज शूज...’’
एखाद्या हिंस्त्र श्‍वापदाने गुरगुरावे तसा वेगळाच आवाज सॅम्युएलच्या तोंडून ऐकताच एलिना दचकलीच... त्याचा असा आवाज तिने कधीच ऐकला नव्हता.. त्याचा चेहरासुद्धा भयाण वाटत होता. डोळे हिरवट दिसत होते. घाबरून तिने विचारले,
‘‘सॅम आर यू ऑल राईट? म..मी सहज म्हणाले... मी घेऊन देते..’’
तिचा बदललेला स्वर पाहून त्याला आश्‍चर्याचा धक्काच बसला. तो नेहमीसारखाच बोलला होता. त्याला वेगळं काही जाणवलं नव्हतं. काही वेळाने तर तिने चक्क त्याला खायला आणून दिलं आणि ती त्याच्याकडे पाहत पाहत निघून गेली.
तिच्यात झालेला बदल पाहून त्याने बुटांचे आभार मानले आणि बेडरूममधले दिवे मालवले. बराच वेळ त्याला झोप आली नाही. अचानक तो उठला. बूट घातले आणि बाहेर पडला. एलिना जागीच होती. तिने सॅम्युएलला बाहेर पडताना पाहिले. ती चक्रावली. त्याला अशी सवय कधीच नव्हती. हळूच ती त्याच्या मागे निघाली. त्याचा तो वेग आणि चालण्याची पद्धत पाहून ती घाबरली. प्रकरण काहीतरी वेगळं आहे ह्याची जाणीव तिला झाली. बघताबघता तो कालच्याच स्मशानभूमीकडे आला. त्या विशिष्ट थडग्यापाशी येऊन उभा राहिला. तो सिमेट्रीमध्ये शिरताना पाहताच एलिनाला घाम फुटला. ती मागे वळाली. जवळजवळ धावतच घरी पोहोचली. हातात गळ्यातला क्रॉस घट्ट धरला आणि टेबलवरच्या येशूच्या छोट्या मूर्तीजवळ जाऊन प्रार्थना करू लागली. अंग घामाने थबथबले होते. बराचवेळ तिला काही सुधरतच नव्हते. खूप वेळाने ती भानावर आली आणि ती बेडकडे गेली. तरी बराच वेळ तिला झोप येत नव्हती. डोळ्यासमोर स्मशानात उभा असणारा सॅम्युएलच दिसत होता. सकाळी तिला जेव्हा जाग आली तेव्हा तो त्याच्या बेडरूममध्ये गाढ झोपलेला दिसत होता. इतका की जणू काही घडलेलंच नाही.
ह्या घटनेनंतर घरातलं वातावरण बदललं. तिचं त्याला टोमणे मारणं बंद झालं. ती त्याला वेळच्या वेळी खायला देऊ लागली. आपल्याला काहीतरी व्हावं म्हणून तर तो काही करत नसावा ना असा संशय तिला आला. तो तसा दुष्ट नव्हता हे तिला माहीत होतं. तो काहीतरी जादूटोणा करीत असावा असा तिचा संशय बळावला पण अशा गोष्टीही तो करेल हे तिला पटत नव्हतं. ती त्याच्या रूमकडे येईनाशी झाली. कपाटाखाली बघण्याचे धैर्य तिला होईना. ह्या गोष्टी तिला बाहेरही कुठे बोलता येत नव्हत्या.
सॅम्युएल तर चक्रावूनच गेला होता. काय घडतंय त्याला समजत नव्हतं. रोज रात्री ते बूट चक्क त्याला घेऊन त्या सिमेट्रीकडे जात होते. कुणी तरी बोट धरून घेऊन जावं तशी त्याची पावलं त्या विशिष्ट कबरीपाशी जाऊन थांबत होती. जणू काही त्या थडग्याला त्याला काही तरी सांगायचं होतं. हे सगळं विचित्र होतं. त्याने एकदा ते बूट बाहेर बागेपाशी ठेवले तर रात्री उठून चक्क तो बुटापर्यंत गेला... वेगळ्याच चक्रात तो अडकला होता. त्यातून त्याला बाहेरही पडता येत नव्हते. एलिना म्हणाली होती, ‘‘ते बूट फेकून दे’’ तेव्हा आपण असे कसे फाडकन बोलू शकलो ह्याचेच त्याला नवल वाटत होते. तिच्यासमोर तो आवाज वाढवूच शकत नसे. मग त्या दिवशी एवढी ताकद आली कुठून? प्रकरणानं गंभीर वळण घेतलं होतं. काहीतरी वेगळंच घडत होतं आणि तो ते थांबवू शकत नव्हता.
पुन्हा एका रात्री तो असाच तिथे पोहोचला. अंधार असल्यामुळे सुरवातीला काही दिसले नाही. एकाएकी तो दचकला कारण त्या कबरीपाशी एक स्त्री चक्क फुलांचा गुच्छ ठेवत होती. तो गडबडला. पुढे गेला. तेवढ्यात ती झटक्यात दिसेनाशी झाली. सॅम्युएल अस्वस्थ झाला. नंतरच्या रात्री ती दिसली नाही. आता रोज रात्री ती स्त्री दिसते का ते पहायला तो यायला लागला. कबरीच्या मागे असणार्‍या झुडपांमागे लपून राहू लागला. खूप दिवसानंतर एका रात्री पुन्हा ती आली. गुच्छ ठेवणार एवढ्यात सॅम्युएलने तिला अडवलं. ती दचकली. पळून जाऊ लागली. सॅम्युएल ओरडला,
‘‘वेट, मी भूत नाही, आय एम नॉट एव्हिल स्पिरिट.’’
‘‘क... कोण आहेस तू? इथे कसा आलास?’’ खूप खोल आवाजात ती बोलत होती.
‘‘थांब! तू कोण आहेस मला सांग. इथे बुके घेऊन अशी अपरात्री का येतेस? की तुलाही एखादा बूट इथे घेऊन येतो?’’
‘‘नो नो... लेट मी गो. जाऊ दे मला.’’
‘‘घाबरू नकोस. मी स्वतःच गोंधळलेलो आहे. मला हे शूज सापडले तेव्हापासून रोज रात्री ते मला इथे घेऊन येतात..’’
‘‘माय गॉड! शूज घेऊन येतात?’’ ती मटक्न खालीच बसली...
सॅम्युएलने तिला हात देऊन उठवले. घाबरून तिचे हात थंडगार पडले होते. शरीरातही काही ताकत उरली नव्हती... एकदम उचलल्यासारखी उभी राहिली... ‘‘मला सांग, कोणाचं आहे हे थडगं? मी असा इथे रोज रात्री आपोआप का येतो? काय आहे ह्या बुटांचं रहस्य?’’
अजूनही ती घाबरलेलीच होती. थरथरत म्हणाली... ‘‘मी तुला बरोबर महिन्याने भेटेन. याच ठिकाणी... याच वेळेला... आणि मला जे माहीत आहे ते सांगेन... मला जाऊ दे... पहाट व्हायची वेळ झाली आहे. कुणी पहायची शक्यता आहे. वर्दळ सुरु होईल.’’
‘‘आणि तू परत आलीच नाहीस तर? पळून गेलीस तर?’’
‘‘तुला ते शूज सापडावेत, त्यांनी तुला रोज इथे घेऊन यावं आणि माझीही भेट घडून यावी यामागे संकेत आहेत, असं मला जाणवायला लागलंय... माझ्यावर विश्‍वास ठेव... मी तुला भेटेन म्हणाले ना म्हणजे भेटणार... म्हणजे मला तुला भेटावंच लागेल. मात्र मी सांगितलेल्या वेळी आणि इथेच...’’ विचित्र हसत ती म्हणाली.
तिच्या बोलण्यातला ठामपणा पाहून ती तिचा शब्द पाळेल ह्याची त्याला खात्री पटली. ह्या सगळ्यामागे नक्कीच काहीतरी गूढ आहे याची पण त्याला खात्री पटली. ज्याअर्थी ती रात्रीच बोलावतेय आणि इथेच बोलावतेय त्याअर्थी नक्कीच काहीतरी तिला माहिती आहे. गोष्टी तिच्या कलाने घ्यायच्या त्यानं ठरवलं. या गोष्टीचा छडा लावायचाच! 
‘‘ओके. देन वी विल मीट नेक्स्ट मंथ.’’
झटक्यात ती निघून गेली. दिसेनाशी झाली. तो भानावर आला. महिन्यांनी का होईना काही तरी समजेल, ह्या समाधानात सॅम्युएल घरी आला. नेहमीप्रमाणे गाढ झोपी गेला.
गंमत म्हणजे या घटनेनंतर त्याला मध्यरात्री जागही आली नाही आणि त्या बुटांनी त्याला बाहेरही काढले नाही. मात्र ते बूट घालून इतर कुठे वा मॉलमध्ये जाण्याचं धैर्य काही त्याला होईना. रात्री बूट घातल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढायचा. हे  कशानं  घडतं ते त्याला समजेना.. एलिनाही त्याला घाबरून राहू लागली. त्यामुळे तो खूश होता. न राहवून काही मित्रांना तिने घडलेल्या गोष्टी सांगितल्या तेव्हा तेही घाबरले. रात्री अपरात्री स्मशानात जाणं ही गंमतीने घेण्यासारखी गोष्ट नव्हती. मित्रांनी तिला सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. त्या बुटांची सर्वांनाच भीती वाटायला  लागली होती. आता सॅम्युएलची पण वाटायला लागली.
महिना कधी संपतोय त्याची सॅम्युएल वाटच पाहत होता. रोज सकाळी उठल्यावर तो कॅलेंडरच्या तारखेवर खूण करीत असे. त्या खुणा बघूनही एलिना घाबरत असे. त्याला दिवस लक्षात ठेवायची गरज पडली नाही. एका रात्री त्याला पुन्हा खाडकन् जाग आली. बरोबर महिना झाला होता. नकळत यांत्रिकपणे त्याने बूट घातले किंवा बुटानेच त्याला तसं करायला भाग पाडलं असावं आणि तो भराभर चालू लागला. कोणीतरी धरून न्यावं तसा तो स्मशानाच्या दिशेने निघाला. त्या थडग्यापाशी येऊन उभा राहिला. ती फुलं वाहतच होती. मागे वळून न पाहताच ती म्हणाली,
‘‘आलास! चल त्या बाकड्यावर बसू.’’ तिच्या छद्मी हसण्याची त्याला भीती वाटली.
दोघेजण अंधारातच कोपर्‍यातल्या लाकडी बेंचवर बसले. दीर्घ श्‍वास घेत ती म्हणाली,
‘‘हे जेकबचं थडगं आहे. मी त्यांच्याकडे काम करीत होते. जवळजवळ पंधरा वर्ष. मी त्यांची देखभाल करायचे.’’
‘‘कोण जेकब? त्याची डेथ कशी झाली?’’ सॅम्युएल अस्वस्थ झाला होता.
‘‘जरा शांत बैस. माझं बोलणं पूर्ण होऊ दे. मग तुझे प्रश्‍नच राहणार नाहीत’’ ती दरडावल्यासारखी म्हणाली तसा तो दचकला कारण आता तिचा स्वर वेगळाच वाटत होता.
‘‘जेकब अतिशय धनाढ्य गृहस्थ होते. त्यांच्या मालकीची अनेक हॉटेल्स न्यूयॉर्क शहरात आहेत. अत्यंत छानछौकीत ते राहत. त्यांचे शूजसुद्धा ते वेगळ्या प्रकारचे खास तयार करून घेत असत. शूजचे एक कपाट पूर्ण भरलेले आहे.. त्यांचे सूटस डिझाईन करणारे टेलर्स वेगळे होते. न्यूयॉर्कमधल्या धनाढ्य व्यक्तींत त्यांचा समावेश होत होता. अमेरिकेतील अनेक परगण्यात त्यांची टॉवर्स आहेत. तुझ्या वर्षाचा पगार त्यांच्या दिवसाच्या सिगारला लागत असेल...’’
‘‘हे तू मला कशासाठी सांगते आहेस? ते शूज मला इथं का घेऊन येतात ते सांग...’’
‘‘जेकबचा खून झालाय.’’  
‘‘त्याचा बुटाशी काय संबंध? त्याचे खुनी तुरुंगात शिक्षा भोगत असतील ना?’’
‘‘नाही.. ते मजेत बाहेर हिंडतायत!’’
‘‘म्हणजे?’’
‘‘म्हणजे खून सिद्ध झाला नाही कोर्टात. आत्महत्या ठरवली गेली.’’
‘‘तुला माहीत होतं तर तू का नाही साक्ष दिलीस कोर्टात?’’
‘‘माझं कुणी ऐकलंच नाही. खूप सांगायचा प्रयत्न केला मी.’’
‘‘कुणी मारलं जेकबला..?’’
ती काही बोलणार तेवढ्यात एक डेड बॉडी घेऊन काहीजण दफन करण्यासाठी आले. दोघेही भानावर आले.
‘‘मी जाते... कुणी पाहिलं तर तुझा जीव धोक्यात येईल. जा तू.’’
‘‘अगं पण बुटांचं रहस्य?’’
काही न बोलता ती धावतच गेली. क्षणार्धात दिसेनाशी झाली. अंधाराचा फायदा घेत कुणी बघत नाही असं बघून त्यालाही नाईलाजानं बाहेर पडावं लागलं. कसा तरी तो घरी आला. भयंकर अस्वस्थ झाला होता... बराचवेळ त्याला झोपच आली नाही. डोळ्यासमोर तेच दृश्य दिसत होतं. तिचं दरडावणं आणि तिचं ते विचित्र हसणं... जेकबला कुणी मारलं असेल? कशासाठी आपण त्या स्त्रीला नावही विचारलं नाही...! कुठं राहते काहीच विचारलं नाही... ती रात्री-बेरात्री न घाबरता स्मशानात कशी येऊ शकते? तिला काय रहस्य माहीत असावं! तिने आपल्याला लगेच का नाही सांगितलं? त्याला काहीच सुचेना. कुणी पाहिलं तर तुझा जीव धोक्यात येईल असं ती का म्हणाली असावी? कुणाला चुकवून ती येत असेल का? कुणी आपल्या पाळतीवर असेल का? हजारो प्रश्‍न त्याच्या डोक्यात भुंगा घालू लागले. आपल्या डोक्याचा भुगा होईल अशी भीती त्याला वाटू लागली. दिवसरात्र डोक्यात तेच विचार चालू असायचे. अचानक एका रात्री ती स्त्री त्याच्या स्वप्नात आली आणि म्हणाली,
‘‘संकेत मला समजलेत. तुला जेकबच्या खुन्यांना शोधायचंय, त्यांना पकडून द्यायचंय. म्हणूनच ते बूट तुला सापडलेत. तुला हे करावंच लागेल.’’ 
एकाएकी थंडी वाजल्यामुळे सॅम्युएल दचकून जागा झाला. ती स्त्री जणू त्याच्या बेडरूममध्ये येऊन सांगत होती असंच त्याला वाटलं. आता तो आणखीनच गडबडला. आपण कसे शोधणार खुन्यांना... आपला काय संबंध... खरंच आपण घ्यायलाच नको होते ते बूट... नसती झंझट मागे लावून घेतली... तो उठला. बूट घालून निघाला. त्याने ठरवलं त्या थडग्यापाशी जाऊन बूट सोडायचे आणि निघून यायचं.. बस... नकोच ती कटकट. तो सिमेट्रीपाशी पोहोचला. पाहतो तो काय! ती स्त्री जणू त्याचीच वाट पाहत होती...
‘‘ये! मला माहीत होतं तू आज येणार. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज मी तुला सगळं सांगणार आहे.’’
‘‘अतिशय धनाढ्य असणार्‍या आणि जगाची पर्वा न करीत राहणार्‍या जेकबचा खून करण्याची कल्पना प्रत्यक्ष त्याच्या मुलानेच, जॉनने आणि त्याच्या मित्राने आखली होती.’’
‘‘प्रत्यक्ष मुलगा? का...? जेकबचं काही लफडं...?’’
‘‘शटअप! मध्येमध्ये मूर्खासारखं बोलू नकोस... अतिशय सज्जन, जंटलमन होते जेकब. पत्नीच्या अचानक जाण्याने कोलमडून गेले होते. खूप प्रेम होतं त्यांचं तिच्यावर. पुन्हा लग्नही नाही केलं. त्यांनी संपत्ती वाटायला सुरवात केली. अनेक संस्थाना दान करायला लागले. हे जॉनला पाहवत नव्हतं. त्याने जेकबना संपवायचे ठरवले. हे मला समजलं त्या दिवशी मी जेकबना सांगितलं होतं. त्यांना अगोदर पटतच नव्हतं. जॉनच्या प्लॅनच्या गप्पा टेप करून मी जेकबना ऐकवल्या. तेव्हा त्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला. जॉनला माझा संशय आला. त्याने मला प्रथम बाजूला केलं. मी गेल्यानंतर जेकबना परिस्थितीची जाणीव झाली. ते सावध झाले. त्यांनी त्यांच्या एका बुटाच्या तळव्याखालच्या चोर कप्प्यात एक चिठ्ठी लिहिली... त्यावर साक्षीदार म्हणून मी सहीपण केली होती. त्यातच ती टेप ठेवली होती पण त्यांच्या असंख्य बुटांच्या जोडामध्ये हा बूट सापडणे अवघड होते आणि ते सांगणार तरी कसे? मला ते माहीत असल्यामुळे मलाच ते करणं भाग होतं... जेकबसारख्या सज्जनाला न्याय मिळायलाच हवा म्हणूनच मी तडफडत होते... जेकबच तुला इथे आणत होते.. पण ते सगळं सांगू शकत नव्हते... तू त्या रात्री इथे आलास आणि म्हणालास, ‘हे बूट मला इथे घेऊन येतात’ तेव्हाच मला समजलं तेच ते बूट असणार आणि माझं काम झालं... नेमके तेच बूट त्या रात्री जेकबने घातले असणार आणि त्याच बुटांच्या लेसने गळा आवळून जॉनने जेकबना संपवलं. त्यांचे बूट काढून खुर्चीवर ठेवले आणि प्राण गेल्यानंतर जेकबना पंख्याला लटकवले... आणि तातडीने ते बूट डोनेशन बॉक्समध्ये टाकले असणार. ते सापडले तेव्हा बुटांची लेस एकमेकांना जोडलेली होती का? जाड लेस होती का?’’
‘‘हो...’’ सॅम्युएल पुरता गारठला होता. त्याला काहीच समजेना.
‘‘पण हे तुला कसं समजलं? तू का नाही त्यांना वाचवलंस?’’
‘‘जास्त प्रश्‍न विचारू नकोस... फक्त सांगते ते ऐक.. जेकब मला हेच सांगायचा प्रयत्न करीत होते आणि मी तुझी वाट पाहत होते. पुढचं काम तुला करायचं आहे... जेकब... आता माझे काम मी केलं... मी सुटले.’’
‘‘म्हणजे?’’ सॅम्युएलने वळून तिला विचारलं. 
तेव्हा तिथं कोणीच नव्हतं. पहाट व्हायची होती. तरीही प्रचंड गार वार्‍याची झुळूक त्याच्या अंगावर आली आणि तो नखशिखांत थरथरला.. दरदरून घाम आला. काय घडलंय ते त्याच्या लक्षात आलं. त्याक्षणी तो सिमेट्रीच्या बाहेर पडला. घरी एलिना  त्याची वाटच पाहत होती. काही तरी वेगळं घडलंय हे तिला त्याच्या चेहर्‍यावरून लक्षात आलं.
‘‘काय झालं सॅम..’’
अनवधानाने तो तिच्या मिठीत शिरला. तिने त्याला जवळ घेतलं. ‘‘घाबरू नकोस’’ ती म्हणाली. 
तो सुखावला. खूप दिवसानंतर तिने त्याला सॅम म्हणून हाक मारली होती... दोघांनाही पूर्वीचे दिवस आठवले. तो रिलॅक्स झाला. ‘‘थँक्स’’ म्हणाला.
 ‘‘थँक्स काय सॅम..! आपण का वेगळे आहोत? काय झालंय ते सांग.’’
एका श्‍वासात त्यानं घडलेलं सगळं सांगितलं.
‘‘एलिना मला हे करायलाच हवं. एक चांगलं काम करायचंय. जेकबला न्याय मिळवून द्यायचाय. त्या स्त्रीनं तिचं काम केलं. आता आपण करायला हवं.’’
‘‘नक्कीच सॅम... आता मला तुझा अभिमान वाटायला लागलाय. तू आपण म्हणालास खूप बरं वाटलं.. आय एम सॉरी, खूप दुखावलं मी तुला... माझं चुकलं.’’
‘‘नाही एल! तू माझ्या प्रेमापोटीच असं वागत होतीस. तू माझ्यातला स्वाभिमान जागा ठेवलास. तू माझ्यासाठी एलिना नाहीस एल आहेस...’’
‘‘एल फॉर लव्ह!’’ ती म्हणाली.  दोघेही हसले.
सॅम्युएलने एक बूट घेतला. त्याच्या तळव्याचा मागचा भाग उघडायचा प्रयत्न केला पण काहीच होईना. एलिनाने त्याला दुसरा बूट दिला. त्यानं तळवा हलवला. एखाद्या ड्रॉवरसारखा तो संपूर्ण तळवाच बाहेर आला. त्याबरोबर एक चिट्ठी त्यातून बाहेर पडली. पेनड्राईव्हसारखी टेपही चिट्ठीसोबत होती. दोघांनी चिट्ठी वाचायला सुरवात केली.
‘‘मी जेकब, शुद्धीवर असताना हे लिहित आहे. माझा अकस्मात मृत्यू झाला तर ती आत्महत्या नसेल कारण मला इतक्यात मरायचे नाही. पत्नीच्या स्मरणार्थ अनेक धार्मिक संस्थांना दान द्यायचे आहे... मात्र माझा खून करण्यासाठी माझा मुलगा जॉन सतत प्रयत्न करीत आहे. तोच माझा मारेकरी असेल. ही चिट्ठी सापडणार्‍याने पोलिसांना द्यावी; तसेच पुरावा म्हणून सोबतच्या टेपवर जॉनचे मित्रांशी झालेले संभाषणही ऐकवावे. ही टेप आणि चिट्ठी घेऊन येणार्‍या व्यक्तीस बक्षीस म्हणून माझ्या बर्कलेमधील हॉटेलची मालकी देण्यात यावी. यावर साक्षीदार म्हणून सोफिया सही करीत आहे...’’
खाली दोघांच्याही सह्या होत्या.
काही क्षण दोघेही सुन्न झाले. एलिनाने त्याला घट्ट मिठी मारली. वेगळ्याच आत्मविश्‍वासाने सॅम्युएलने तिचा हात हातात घेतला आणि दोघंहीजण पोलीस स्टेशनकडे धावले.
- सदानंद भणगे 
अहमदनगर 
९८९०६२५८८० 
(प्रसिद्धी - 'चपराक दिवाळी अंक २०१८')

**

Sunday, December 9, 2018

गीतरामायणाचे जनक गदिमा


  1. गीतरामायण हा सर्वकालीन रसिकांचा आवडता असा गीतसंग्रह! घरी, कार्यालयात, कुठल्याही कार्यक्रमात, अगदी रस्त्याने जाताना कुठेही गीतरामायणाचे शब्द कानी पडले की, मानव अगदी भान हरपून त्यात रंगून जातो. बाबुजींच्या अविस्मरणीय आवाजात स्वतःही ते शब्द, ते गीत गुणगुणायला लागतो. अनेक घराघरातून होणारी सकाळ गीतरामायणाच्या गीतातून होते हे या गीताचे वैशिष्ट्य! 
  2. 'चपराक मासिक, डिसेंबर २०१८ 



महाराष्ट्रातील गणेशोत्सव असो, दुर्गामहोत्सव असो किंवा कोणताही धार्मिक कार्यक्रम असो! या कार्यक्रमांंमधून गीतरामायणाची गीते गाऊन उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले जाते. सुधीर फडके अर्थात बाबुजी यांच्या स्वरांचे जसे आगळेवेगळे गारूड रसिकांच्या मनात घर करून आहे त्याचप्रमाणे या गीतांची रचना, शब्द यांचीही मोहिनी वर्षानुवर्षे रसिकांच्या हृदयात घर करून आहे. कोण आहेत या अजरामर गीतांचे गीतकार?  ‘गदिमा’ या नावाने सर्वदूर ख्यातनाम असलेल्या, मराठमोळ्या रसिकांच्या मनावर राज्य करणार्‍या या व्यक्तीचे नाव आहे, गजानन दिगंबर माडगूळकर...
गदिमा यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 या दिवशी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात असलेल्या शेटेफळ या गावी झाला असला तरी त्यांचे मूळगाव आटपाडी तालुक्यातील माडगूळे हे आहे. गदिमा यांच्या वडिलांचे नाव दिगंबरराव तर आईचे नाव बनूताई असे होते. गदिमा यांच्या जन्माची एक विलक्षण कथा सांगितली जाते. बाळंतपणासाठी बनूताई त्यांच्या माहेरी शेटेफळ या गावी आल्या होत्या. यथावकाश बाळ जन्माला यायचे संकेत मिळत होते. त्याकाळी आजच्यासारखी मुबलक आणि आधुनिक अशी वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हती. गावातील सुईण बाळंतपण करण्यात पटाईत आणि सराईत असायची. अशा एका अनुभवी सुईणीला बोलावण्यात आले. काही वेळात ती सुईण बाहेर आली. तिथे आतून येणारी आनंदी वार्ता ऐकण्यासाठी आसुसलेल्यापैकी कुणीतरी ‘काय झाले?’ असे विचारले. त्यावेळी ती सुईण म्हणाली, ‘काय सांगू? घात झाला. देवाने दिले ते कर्माने नेले.’ ते ऐकून तिथे निराशा पसरली. म्हातारी सुईण पुन्हा आत गेली. बनूताईंना ग्लानी आली होती. त्या झोपेत होत्या. त्यांच्या शेजारी ते बालक निश्चेष्ट पहुडलेले पाहून सुईणीला वाटले, काही वेळातच हे बालक कायमचे निघून जाणार. तिला अचानक काहीतरी सुचले. एक प्रयत्न करून बघावा या विचाराने तिने बाळंतणीला देण्यासाठी तयार केलेला शेक (विस्तव) बाळाच्या बेंबीजवळ नेला आणि आश्चर्य घडले. निपचित पडलेल्या, मृत म्हणून समजल्या गेलेल्या त्या बाळाने टाहो फोडला. ते ऐकून सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आणि साहित्य, चित्रपट क्षेत्राला गदिमा मिळाले... गदिमांना सारेजण ‘अण्णा’ या टोपणनावाने बोलवत असत. त्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आटपाडी, कुंडल आणि औंध या गावातील शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागला. गणित या विषयासोबत छत्तीसचा आकडा असल्यामुळे गणिताने गदिमा यांना महत्त्वाच्या अशा मॅट्रिकच्या परीक्षेत धोका दिला. घरची परिस्थिती तशी यथातथाच असल्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेण्याचा नाद सोडावा लागला.नोकरी करण्याचा निर्णय गदिमांनी घेतला. असे म्हणतात की, एक मार्ग बंद झाला की, दुसरा मार्ग आपोआप सापडतो. गदिमांना प्राथमिक शाळेत असतानाच नकला करण्याची आणि लेखन करण्याची आवड होती. नोकरी करण्याचा निर्णय गदिमांनी घेतला आणि त्यांच्या मदतीला त्यांनी लहानपणापासून जोपासलेले छंद धावून आले. ‘हंस पिक्चर्स’ या संस्थेने ‘ब्रह्मचारी’ या चित्रपटात गदिमांना एक छोटीशी भूमिका दिली. गदिमांनी मन लावून त्या चित्रपटात काम केले. गदिमांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते, जणू कागदांवर उतरलेल्या मोत्यांच्या माळा! चित्रपटात काम करीत असताना गदिमांनी साहित्य क्षेत्रातील एक बडे नाव म्हणजे वि. स. खांडेकर यांंच्याकडे त्यांचे लेखनिक म्हणून काम करायला सुरुवात केली. ह्याचा दुसरा फायदा असा झाला की, खांडेकर यांच्याकडे असलेल्या पुस्तक संग्रहालयातील अनेक चांगली चांगली पुस्तकं वाचण्याची संधी गदिमांना मिळाली. उत्तम आणि दर्जेदार असे वाचत असताना त्यांची वैचारिक बैठक पक्की होत गेली. विचारांना एक दिशा मिळत गेली आणि त्यातूनच आपणही काही लिहावे ही ऊर्मी दाटत गेली. त्यांच्या कविता लेखनाचा श्रीगणेशा खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला आणि मग गदिमांनी मागे वळून पाहिलेच नाही. म्हणतात ना, ‘कोशिश करने वालों की हार नही होती’ त्याप्रमाणे गदिमांकडे एक संधी चालून आली. के. नारायण काळे यांची नवयुग चित्रपट लिमिटेड या नावाची एक संस्था होती. त्यांनी गदिमांना त्यांंच्यासोबत सहायक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी दिली. या पदावर काम करीत असताना गदिमांना चित्रपट व्यवसायाशी निगडित अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. दरम्यान आचार्य अत्रे यांच्या गीतांनी गदिमांना आकर्षित केले. आचार्यांनी रचलेली गीते ही सोप्या भाषेत तर होतीच परंतु ती प्रासादिक ही होती. यानंतर गदिमांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी गीतरचना करताना कादंबरी, कथा या क्षेत्रातही भारदस्तपणे चौफेर प्रवास केला असल्याचे त्यांच्या एकूण साहित्य निर्मितीमधून आपल्या लक्षात येईल. गदिमांनी काही मंगलाष्टके लिहिली असल्याचा उल्लेख एका ठिकाणी आढळतो.
गदिमांनी भरपूर साहित्य निर्मिती केली आहे. त्यांनी जवळपास 150 चित्रपटांसाठी गीत रचना केलेल्या आहेत. पंच्याहत्तर पेक्षा जास्त पटकथा त्यांनी लिहिल्या असून जवळजवळ पन्नास मराठी चित्रपट कथांचे ते लेखक आहेत. यासोबतच गदिमांनी हिन्दी चित्रपटांंसाठीही बहुमोल कार्य केलेले आहे. त्यांनी लिहिलेल्या पंचवीस कथांवर हिंदी सिनेमाची निर्मिती झाली आहे तर हिंदी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी संवादलेखनाची जबाबदारी लीलया पेलली आहे. चित्रपटासाठी वैविध्यपूर्ण लेखन करून गदिमा थांबले नाहीत तर स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवताना त्यांनी जवळपास पंचवीस चित्रपटातून भूमिका ही पार पाडल्या आहेत. असे म्हणतात की, गदिमांनी स्वतःच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई, कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही...’ हे अजरामर आणि नयनी अंजन घालणारे गीत लिहिले. गदिमांच्या नावावर एकूण दोन हजार गीते आहेत. यावरून एकापेक्षा एक सरस गीतांची निर्मिती करण्यात गदिमांचा हातखंडा होता, ते त्यांच्या आवडीचे क्षेत्र होते हे लक्षात येईल.
गदिमांनी अनेक बालगीते लिहिलेली आहेत. ही सारी गीते बालमंडळीमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. यामागील कारण असे की, त्यांची बालगीते पटकन समजतात. अर्थ तात्काळ लक्षात येतो. पाठ करायला खूप सोपी असल्यामुळे चटकन मुखोद्गत होतात. ‘मामाच्या गावाला जाऊया, पळती झाडे पाहूया...’ बालकांप्रमाणे थोरांपर्यंत सर्वांना आवडणारे, गावेसे वाटणारे हे गीत प्रचंड लोकप्रिय आहे. आगीनगाडीने मामाकडे जायचे म्हटले की हे गीत सर्वात आधी आबालवृद्धांच्या मुखी येते. मामाच्या गावी गेले की, मामीच्या हातची शिकरण-पोळी खाऊन तिला गमतीने सुगरण म्हणताना हे आवडते गीत म्हणून दाखवणारी बच्चे मंडळी आजही आहे. लहान मुलांना विशेषतः मुलींना आवडणारे गदिमांचे अजून एक गीत म्हणजे ‘गोरी गोरी पान, फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण..’ हे गाणे आजही घराघरात मोठ्या आनंदाने गायिले जाते. विशेषतः एखाद्या लहान बहिणीच्या दादाच्या लग्नाचा विषय निघाला की, दादाची लाडुली हमखास हे गीत गाऊन दादाला चिडवते. हीच सानुली जेव्हा दादाला करंगळी दाखवून खिजवणार्‍या आवाजात म्हणते, ‘वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा। तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा...’ हे ऐकताच चिडलेला दादा जेव्हा तिला खोटे खोटे मारायला धावतो तेव्हा ती चिमुकली आई-बाबा, आजोबा-आजी यांच्या मागे जाऊन लपताना दादाला खट्याळपणे अंगठा दाखवते. त्यावेळी हसणारा दादा तिला पकडून तिचा पापा घेतो तेव्हा ती रागाने गालावर हात फिरवून दादाने घेतलेला पापा पुसून टाकते तेव्हा तो खेळ पाहणारे सारे खदखदून हसतात. ही आहे गदिमांच्या शब्दांची, अक्षरांची जादू. 
बालगीते, भक्तीगीतं, प्रेमगीतं, मातेची थोरवी गाणारे गीत याचबरोबर गदिमांनी भारतमातेसाठी आणि सैनिकांसाठीही अनेक गीते लिहिली आहेत. ही गीतेही प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाली आहेत. ‘माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू....’, ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी...’ अशा अजरामर गीतांमधून गदिमांनी रसिकांच्या काळजाला हात घातला होता. त्याचप्रमाणे गदिमांचे रसिकांना अत्यंत आवडणारे आणि प्रभू रामचंद्राच्या जन्म दिनी, राम जन्मोत्सवाच्या काळात भक्तीयुक्त, श्रद्धापूर्वक अंतःकरणाने गायिले जाणारे गीत म्हणजे, ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला!’ अनेक दशके हे गीत गायिले जात असतानाही या गीताची गोडी कमी झालेली नाही उलट ती वाढतच आहे यामागे आहे गदिमांचे शब्द सामर्थ्य! गदिमांची अनेक गीते ही एकापेक्षा एक सरस, गोड, समजायला सोपी अशीच आहेत.
रामायण हा आपल्या भारतीयांचा जणू श्वास! जिथे कुठे रामायण ऐकायला मिळते, प्रसंगानुरूप जिवंत देखावे उभे केले जातात तिथे रामभक्त भक्तीभावाने हजेरी लावून कान तृप्त होईपर्यंत ऐकतात, डोळ्याचे पारणे फिटेपर्यंत ती सारी दृश्यं पाहतात. एक अलौकिक ठेवा घेऊन समाधानाने घरी परततात. ऋषी वाल्मिकी यांनी रामायणाची रचना केली. ज्यामध्ये जवळपास अठ्ठावीस हजार श्लोक आहेत. गदिमांनी ‘गीतरामायणाची’ रचना केली ती गीतांमधून. गीतरामायणात अवीट, श्रवणीय, सुमधुर अशा छप्पन्न गीतांंची रचना केली आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून एक वर्षापेक्षा अधिक काळ ह्या अमृततुल्य गीतांची मेजवानी रसिकांना ऐकायला मिळाली. गदिमांची गीतरचना आणि सुधीर फडके यांचा स्वर असा एक दुग्धशर्करा योग चालून आला तो श्रीधर आणि आनंद यांच्या व्रतबंधनाच्या वेळी. एका धार्मिक कार्यक्रमाला जमलेल्या मंडळीला न भुतो न भविष्यती अशी भेट याप्रसंगी मिळाली. खुद्द गदिमांनी यावेळी गीतांचे निवेदन केले आणि बाबुजींनी त्यास स्वरांचा साज चढविला. उपस्थित सारे अत्यंत तृप्तपणे, समाधानी अंतःकरणाने तिथून निघाले. गीतरामायणाच्या रचनेला आज सत्तर वर्षे होऊन गेले असले तरीही त्या रचनांमधला गोडवा, टवटवीत भाव, ताजेपणा, श्रवणता, भक्तीभाव इत्यादी अनेक भाव, तन्मयतेने ओतलेले सारे रस तेवढ्याच जोमदारपणे टिकून आहेत. हे आहे गदिमांच्या अक्षरांचे सामर्थ्य आणि बाबुजींच्या आवाजाची जादू. गीतरामायणाची ही जादू इथेच थांबत नाही तर गीतरामायणाचे हिंदी या राष्ट्रीय भाषेसोबत गुजराती, संस्कृत, तेलुगु, कन्नड, बंगाली, आसामी, मल्याळी, कोकणी अशा भाषांमध्ये रुपांतर झाले आहे. खरेतर मराठी भाषा आणि मराठी रसिकांसाठी हा एक मानाचा तुरा! गीतरामायणाची ही प्रचंड लोकप्रियता पाहून गदिमांना ‘महाकवी आणि आधुनिक वाल्मिकी’ अशा दोन पदव्या रसिकांनी दिल्या. गदिमांचा उल्लेख वारंवार महाकवी होत असताना गदिमा गमतीने म्हणायचे, ‘मी महाकवी नाही तर महाकाय कवी आहे...’ याचबरोबर गदिमांनी टोपणनावानेही काही लेखन केले आहे. ‘बोप्या भगवान’,‘शाहीर अमर’, ‘शाहीर वैश्वानर’, ‘शाहीर बोर्‍या भगवान’ आणि ‘राम गुलाम’ ही ती काही टोपणनावं! शिर्डीचे साईबाबा हे महाराष्ट्रातील भक्तांचे दैवत. शिर्डीच्या मंदिरात दररोज सकाळी काकड आरती होत असते. ‘करितो साईनाथ देवा, चिन्मयरूप दाखवी घेऊनी बालक-लघुसेवा!’ गदिमांनी लिहिलेली रचना दररोज शिर्डीच्या साई मंंदिरात काकड आरतीच्या वेळी ऐकायला मिळते. साई बाबांंच्या  चरणी माथा टेकवायला, आशीर्वाद घ्यायला देश-विदेशातील भक्त दररोज गर्दी करतात त्या सर्वांना एका मराठी व्यक्तीचे गीत कानी पडते ते गीत लिहिणारे कवी म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके गदिमा!
गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमा म्हणजे चित्रपटसृष्टीत, वाङ्मयीन क्षेत्रात, तमाम भारतीयांच्या मनात स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणारा एक ध्रुवतारा! जो सातत्याने लखलखत असताना इतरांना साहित्य, चित्रपट क्षेत्रात प्रकाशमान करतो आहे. गदिमांच्या विषयी लिहिणे म्हणजे वैशाख महिन्यात भर दुपारी तळपणार्‍या सूर्याला देवघरातील दिव्याने ओवाळण्याचा प्रयत्न! परंतु एका सर्वकालीन महान व्यक्तीच्या कार्याला अल्पशा रुपात वाचकांपुढे ठेवण्याचा हा प्रयत्न!
- नागेश शेवाळकर 
८६००११०६४९ 
'चपराक' मासिक, पुणे 

मसापची 'कौतिकचालिसा!'


  • राजकारणातले बालेकिल्ले कशा पद्धतीने अभेद्य ठेवले जातात हे आपण पाहतोच! पण साहित्य संस्थांचे राजकारण कसे चालते? तिथल्या निवडणुका कशा होतात? त्याचे सभासद कसे होतात? या संस्थांचे धुरीण नेमके कसे वागतात? साहित्यासाठी काय योगदान देतात? त्यांच्या मुखपत्र असलेल्या नियतकालिकातून नवोदितांच्या दर्जेदार साहित्याला न्याय मिळतो का? पुरस्कारांची खिरापत कशी वाटली जाते? थेट मतपत्रिका हातात मिळवण्यासाठी काय काय खटपटी, लटपटी केल्या जातात? निवडणुकांचे राजकारण कसे होते? ज्यांना आपण ‘संमेलनाध्यक्ष’ म्हणून आदर देतो ते कितपत लाळघोटेपणा करतात? कशा पद्धतीने निवडून येतात? एखाद्याने या व्यवस्थेच्या विरूद्ध आवाज उठवला तर त्याचे काय होते? हे सर्व जाणून घेण्यासाठी डॉ. भास्कर बडे यांचा 'चपराक' दिवाळी अंकातील त्यांच्या अनुभवावर आधारित हा विशेष लेख.


औरंगाबादला शिक्षणासाठी गेलो. त्यामुळे मराठवाडा साहित्य परिषद माहीत झाली. डॉ. हृषिकेश कांबळे यांच्यासोबत खोलीत पार्टनर म्हणून राहत होतो. त्याचा फायदा म्हणजे साहित्यिक आणि मराठी विभागातील लेखक, प्राध्यापकांच्या माझ्या ओळखी झाल्या. कधीतरी मसापत जायचो. तेव्हा तिथे एक नामफलक होता. ‘सुधीर रसाळ.’ त्या नावाची भीती वाटायची. त्यामुळे त्यांना भेटलो नाही.
लातूरला नोकरी लागली अन् ‘कैलास पब्लिकेशन्स’चे के. एस. आतकरे यांची ओळख झाली. त्यांच्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेचा आजीव सभासद झालो. तेव्हा कौतिकराव ठालेसरांची ओळख झाली. दरम्यान मसापची निवडणूक लागली. प्राचार्य कौतिकराव ठालेंचं एक पॅनल आणि दुसरं डॉ. वासुदेव मुलाटे-सुधीर गव्हाणे यांचं. प्रा. गव्हाणे सरांचा मी विद्यार्थी. त्यांनी मला आग्रहाने पॅनलमध्ये घेतलं. लातूर-औरंगाबाद अशी धावपळ सुरु होती. तेव्हासुद्धा ‘ज्यांच्याकडे मतपत्रिका जास्त’ (म्हणजे ‘गोळा केलेल्या) तो निवडून येणार हे सिद्ध होते. मी पंधरा मतपत्रिका गोळा केल्या होत्या. ही माहिती ठालेसरांना कळाली. मी मुलाटे-गव्हाणे-नाईकवाडे-डोळस यांना विचारले, ‘‘किती मतपत्रिका गोळा केल्या?’’ ते म्हणाले, ‘‘मतपत्रिका गोळा करण्याची गरज नाही, आपलं पॅनल विजयी होणार!’’
मी मनात हसलो अन् मतपत्रिका गोळा करायचा सपाटा चालूच ठेवला.
दरम्यान मला लातूरात निरोप आला. ठाले नावाचे एक गृहस्थ माझी भेट घेऊ इच्छित आहेत. भेट झाली. त्यांनी सांगितले,
‘‘ठालेसरांनी तुम्हाला भेटायला बोलावलेय. तुमच्याकडच्या पंधरा मतपत्रिका तोपर्यंत कोणालाही देऊ नका.’’
ठरल्यानुसार मी औरंगाबाद गाठले. दोघांची बोलणी झाली. ‘‘तुमच्याकडच्या पंधरा मतपत्रिका मला द्या. माझ्याकडची जास्तीची मते तुम्हाला देतो आणि पाच वर्ष निमंत्रणे येतील.’’ 
आमच्या पॅनलचा धुव्वा उडाला. मी चाळीस मतांनी पराभूत झालो तर प्रा. सुधीर गव्हाणे एकटेच पॅनलमधून विजयी झाले.
...आणि ठाले सरांचं पूर्ण पॅनल निवडून आलं. पाच वर्षे ठालेंनी मला पराभवाची जाणीव होऊ दिली नाही. दरम्यान सभासद वाढवले. नंतरच्या निवडणुकीत ठालेंनी पॅनलमध्येच घेतले. तेव्हा त्यांच्या काही सोयर्‍यांनी माझ्या नावाला विरोध केला. साहित्य चळवळीत काम करत होतो अन् आतून विरोधही होत होता हे जाणवत होते.
लातूर जिल्ह्यात मुरुडला आमदार विक्रम काळे यांनी मसापचे साहित्य संमेलन घेतले. त्यात खूप काम केले. स्मरणिकेचा संपादक ते कार्यक्रमपत्रिका, लेखकपत्रिका ही जबाबदारी काळेसाहेबांनी माझ्यावर टाकली. मी कामातच होतो. उद्या उद्घाटन. रात्रीचे जेवण संमेलनाध्यक्ष फ. मु. शिंदे यांच्यासोबत मुरुडला होते. त्यात मी नव्हतो. संमेलन संपल्यावर त्या जेवणावळीत एक मित्र होता. त्याने सांगितले, ‘‘अरे, ते ठाले काळेसाहेबांना म्हणाले, त्या बडेला तुम्ही भलतेच डोक्यावर घेतलेय.’’ 
‘‘सर, बडे कामाचा माणूस. आपले पत्रिकेत नाव आले अन् गायब झाले...’’ मला या दुटप्पी स्वभावाचे वाईट वाटले.
दोन वर्षापूर्वी निवडणूक झाली. त्या पॅनलमध्ये मला प्राचार्य ठालेंनी घेतले आणि मला विरोध करणार्‍यांची धार तीव्र झाली. या विरोधकात ठालेंनी ज्यांना ‘रतीब’ घातला तेच होते. एकूण हा विरोध ठालेंनीच उभा केलेला होता.
कोण होते विरोधक? पुन्हा तेच! लातूरचे योगीराज माने, प्रकाश काळे, दगडू लोमटे, सतीश साळुंके हीच मंडळी. एकीकडे गोड बोलायचे आणि दुसरीकडे विरोध करायचा. विरोध काय? तर म्हणे ‘बडे बीडचे. तिकडे उमेदवारी द्या! अन् बीडच्यांनी म्हणायचे, ‘ते लातूरचे!’ ही गंमत ठालेच रंगवत होते हे लक्षात आले.
आमदार मैदानात
यावेळी सतीश चव्हाण यांनी मसापच्या निवडणुकीत पॅनल टाकले अन् प्राचार्य कौतिकराव ठाले, मुळेअण्णा यांचे धाबे दणाणले. निरोपानिरोपी सुरु झाली. थेट मोठ्या साहेबांपर्यंत धावपळ (ठाले-मुळे) केली. (मा. शरद पवार - मोठे साहेब) प्रचाराचा साज-तन-मन-धनाने आ. चव्हाणांनी तोफ वाजवली. ग्रामीण साहित्य चळवळीचे एक प्रमुख डॉ. वासुदेव मुलाटे यांना प्रमुख करून खर्चापाणी सुरु झाला आणि ठाले-मुळेंना पळताभुई थोडी झाली.
मतदार खेचणार्‍या चेहर्‍यांच्या पाठीशी अहोरात्र उभेच ठाकले. दिवसभरात प्राचार्य ठालेंचे किमान पन्नासावर फोन असत. नावानिशी. मतपत्रिका मिळाली का? जपून ठेवा. निवडून आलो पाहिजेत. ते ज्ञानोबा मुंढे-बघा बरं!
‘‘चिंता करू नका!’’
‘‘अहो चाळीसएक मत आहेत. भाजपच्या गटाकडे मत जातील बरं!’’
‘‘नाही जात, मी बोललोय.’’
‘‘भेटायला या.’’
‘‘हो.’’
प्राचार्य ठाले माझ्या पाठीशी होते. लातूर, गंगाखेड, जालना, नगर, अकलूज, बीड, शिरुर शाखा, अंबाजोगाई, माजलगाव, उस्मानाबाद, कोपरगाव खूप फिरलो. तिथून मतपत्रिका घेऊन आलो. आम्ही मतपत्रिका गोळा करून पुढे गेलो, की आ. चव्हाणांचे कार्यकर्ते मतदारांकडे जात. भाषण देत... मतं मागितली की ‘परवाच दिली’ म्हणत.
बहुतेक मतपत्रिका गोळा झाल्या. आ. चव्हाणांनी अंदाज घेतला आणि हळूहळू माझा या पॅनलशी संबंध नाही असं जाहीर केलं.
यावेळी मी शंभरावर मतपत्रिका गोळा करून दिल्या तर दगडू लोमटे (18) शेषराव मोहिते (11) सतीश साळुंके (16) आसाराम लोमटे (20) हृषिकेश कांबळे (01) जीवन कुलकर्णी (01) अशी मला विरोध करणार्‍यांनी कामगिरी केली.
पूर्ण पॅनल निवडून आले
पदाधिकारी निवडीची बैठक झाली. त्यात माझ्या नावाला शेषराव मोहिते, दगडू मोहिते, सतीश साळुंके, आसाराम लोमटे यांनी कट्टर विरोध केला तरी प्राचार्य ठाले आणि मुळेअण्णांनी माझे नाव जाहीर केले. ‘‘बडेंनी या निवडणुकीत खूप मेहनत घेतलीय. त्यांच्यावर अन्याय होऊ नये.’’
...आणि ‘कोषाध्यक्षपद’ मला देण्यात आले.
अध्यक्षपद, पॅनलप्रमुख म्हणून प्राचार्य ठालेंना घोषित झाले. उपाध्यक्षपद प्रा. किरण सगर यांना दिले; तर कार्यवाहपद हे मुळेअण्णांच्या आशीर्वादाने डॉ. दादा गोरेंनी आदल्यारात्रीच ‘बुक’ केले होते.
‘प्रतिष्ठान’चा संपादक नामधारी
मागील वेळी श्रीधर नांदेडकर संपादक होते. त्यात मी संपादकीय मंडळात होतो. आम्हाला काहीच विचारले जात नसे. सर्व निर्णय स्वतः कौतिकराव ठालेसर घ्यायचे. अगदी आताही आसाराम लोमटे हे नामधारीच आहेत. मी एका कविच्या कविता निवडून आसारामकडे दिल्या. त्याला दोन वर्ष झाली. त्याचा निर्णय संपादक आसाराम लोमटेंना घेता आला नाही. मी त्यांना विचारले तर ते म्हणाले, ‘‘हा कवी खूपच सामान्य आहे. छापू नका.’’ वास्तविक प्राचार्य ठालेंनी माहितीवजाच लेखन केलंय. निर्मितीक्षम असं त्यांचं काहीच नाही. आसाराम लोमटे कथाकार आहेत. कविता हा या दोघांचा प्रांत नाही. मी निवडून दिल्या, छापल्या नाहीत. मात्र काही ‘लाभधारक’ कवींच्या चार कविता, पाच कविता, दहा कवितांचा रतीब ‘प्रतिष्ठान’मधून येतो. प्रतिष्ठान हे आप्तेष्टांचे व्यासपीठ आहे आणि खरे संपादक कौतिकराव ठालेच आहेत. आताही संपादक मंडळात बरेच जण घेतलेत; परंतु तेही नामधारी आहेत. या नामधार्‍यांना शुभेच्छा!
मसापचे पुरस्कार ‘वाटले’ जातात
मसापचे पुरस्कार हे गुणवत्तेवर दिले जावेत. त्यासाठी समिती असते. मात्र पुरस्कार कमिटीचे अध्यक्ष आपापली सोय अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटलांना गृहीत धरून करून घेतात. जणू ‘वानवळा’ एकमेकांना देतात. आम्ही तुम्हाला देतो तुम्ही आम्हाला द्या! हे अलीकडे खूपच सुरु झालेय. अगदी पुरस्कार समितीतील दोन सदस्य अमर हबीब, डॉ. पृथ्वीराज तौर यांनी मला सांगितले होते. ‘‘अहो, आम्ही सदस्य असून आम्हाला काहीच कल्पना नाही? कोण परीक्षक? कोणाचे ग्रंथ आले? आम्ही राजीनामा देणार? हे असेच चाललेय. ‘आले ठालेंच्या मना तिथे कोणाचे चालेना’ अशी गत मसाप पुरस्काराची आहे.’’
संमेलनाध्यक्षपद... खिरापत
काय साटेलोटे आहे ते मला तेरा वर्षात कळाले नाही. प्राचार्य ठाले ग्रेटच! त्यांनी एकदा ठरवले, याला अध्यक्ष करायचे की करणारच! संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस माझ्याकडे आले. ‘‘मला मदत करा’’ म्हणाले. मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही ठालेंना गाठा... तुमचा गुलाल पक्का.’’
तसे सबनीसांनी केले. गुलाल मिळवला. असा प्रयोग मी डॉ. किशोर सानपांसाठी केला परंतु ठालेंनी सानपांना शब्द दिला नाही. उलट पुण्याहून उमेदवार आयात केला आणि बेरजा केल्या. त्यात समीक्षक, अभ्यासू डॉ. किशोर सानपांचा पराभव प्राचार्य असलेल्या ‘ठालेंनी’ केला. सानपांच्या विरोधात कोणीही असले तरी प्रत्यक्षात लढाई ठाले विरूद्ध सानप अशीच होती.
मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदात वेगळे काही घडत नाही. ठालेंनी नाव सांगावे आणि कार्यकारणीने खाली पाहून हात वर करावेत. झाली एकमताने निवड. जुन्या पिढीतील डॉ. वासुदेव मुलाटे, प्रल्हाद लुलेकर, सोपान हाळमकर यांना डावलून थेट माझ्या पिढीतील कवी प्रा. हृषिकेश कांबळे यांना चाळीसाव्या मसाप उदगीरच्या संमेलनाचा अध्यक्ष जाहीर करून कित्येकांची बोलतीच बंद केली. डॉ. हृषिकेश कांबळे माझे वर्गमित्र, रुममेट. त्यांना अध्यक्षपद मिळाले याचा आनंद मला होणारच! असे हे ठालेचे प्रताप जवळून बघायला मिळाले.
आदरणीय प्राचार्य ठालेंना चैनच पडत नाही. प्रा. डॉ. किशोर सानपांच्या विरोधात प्राचार्य ठालेंनी सनदी अधिकारी आणि ठालेंचे प्रिय मित्र लक्ष्मीकांत देशमुख यांना पुण्यावरुन आणले. अर्ज भरून दिले. प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि मराठवाड्याच्या मतदारांना फोनवर फोन सुरु झाले. एकतर ही मतदार यादी ठालेच बनवतात. त्यामुळे त्यांना मानणार्‍यांची संख्या अधिक असते. त्यामुळे मतपत्रिकांचा प्रवास खात्रीपूर्वक औरंगाबादकडे होतो. या निवडणुकीत त्यांनी खूप हातखंडे उपयोगात आणले.
विभागवार मतदार वाटून घेतले. कार्यकारिणीचे सदस्य कामाला लावले. सनदी अधिकार्‍याचे मित्र आणि त्यांचे नातेवाईक कामाला लावले. भव्य यंत्रणा या कामासाठी स्वतः ठालेंनी उभी केली. एवढेच नाही तर-अंबाजोगाईच्या साहित्य संमेलनाचा उपयोगही या निवडणुकीत मतपत्रिका गोळा करण्यासाठी झाला. स्वतः ठाले काही मतदारांना असे बोलले -
‘‘नमस्कार...’’
‘‘नमस्कार’’
‘‘मतपत्रिका आली का?’’
‘‘हो आली सर’’
‘‘तुम्हाला अंबाजोगाईला साहित्य संमेलनाला यायचंय’’
‘‘कशाला सर?’’
‘‘तुम्ही महाराष्ट्राचे लाडके कवी, कविसंमेलनात घेतलेय. राहायची सोय, मानधन आहेच’’
‘‘येतो सर’’
‘‘हो येतोना...’’
‘‘मतपत्रिका आणतो ना सर! गोव्यावरून मराठवाड्यात तुम्ही बोलावताय? मतपत्रिकेची चिंता करू नका?’’
*
‘‘नमस्कार’’
‘‘नमस्कार सर! गरीबाची आठवण कशी काय?’’
‘‘अंबाजोगाई साहित्य संमेलनात तुम्हाला कथाकथनात घेतलेय’’
‘‘आभार सर! आभार! मला अन् मराठवाड्यात?’’
‘‘तुम्ही महत्त्वाचे कथाकार आहात. मतपत्रिका आल्या का?’’
‘‘आजच आली ना सर, कुणाला द्यायचे सांगा?’’
‘‘येताना घेऊन या.’’
‘‘हो सर नक्की.’’
*
‘‘हॅलोऽऽ ठाले बोलतोय...’’
‘‘नमस्कार...’’
‘‘नमस्कार सर फोन केलात.’’
‘‘हो. तुमच्या पुस्तकाला मसापचा पुरस्कार मीच द्यायला लावला. दुसरे परीक्षक नको म्हणाले होते तरी...’’
‘‘पण सर मला गुणवत्तेवर दिल्याचे सांगितलेय.’’
‘‘म्हणावे लागते. मीच द्यायला सांगितला. मतपत्रिका आली का?’’
‘‘आली सर. मग?’’
‘‘ती पत्रिका माझ्याकडे पाठवायची’’
‘‘पण...’’
‘‘पण-बीण काही नाही. ते सानप विदर्भातले. त्यांना नाही मतं द्यायची. तुम्हाला पुरस्कार दिला होता. हे ध्यानात ठेवा. संमेलनाला या. पत्रिका घेऊन.’’
‘‘हूंऽऽ’’
अशाप्रकारचे फोन महाराष्ट्रभर प्राचार्य ठाले यांनी केले. अंबाजोगाईच्या साहित्य संमेलनात अनेक मतदारांनी भेटून मला सांगितले, ‘‘ठालेंना मतपत्रिका दिली बरं का!’’ किशोर सानप साहित्यातला बाप माणूस; पण नाविलाज. प्राचार्य ठालेंनी मसाप व बीड शिक्षण विभाग (जि. प.) आयोजित साहित्य संमेलनाचा उपयोग हुशारीने किशोर सानप या दिग्गज समीक्षकास पराभूत करण्यासाठी केला हे मात्र खरे!
प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांचे लक्ष्मीकांत देशमुखावरचे हे प्रेम आजचे नाही; ते फार पूर्वीचे आहे. दहा वर्षापूर्वी लक्ष्मीकांत देशमुख मराठवाड्यातून बदलीने कोल्हापूरला गेले. 
प्राचार्य ठालेंना मी पंधरा-वीस मतपत्रिका दिल्या तेव्हा ठाले मला म्हणाले होते, ‘‘माझ्याऐवजी कोल्हापूरला असलेल्या लक्ष्मीकांत देशमुख यांना मसापच्या कार्यकारीणीत स्वीकृत सदस्य घेतले.’’
नांदेड येथे संपन्न झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही श्री. देशमुखांना ठालेंनी दिले होते आणि त्यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलन बडोदा येथील अध्यक्षपदासाठी प्राचार्य ठालेंनी प्रचंड मेहनत घेतली होती. या दोघांचे नाते असे घट्ट आहे. एका सनदी अधिकार्‍याने ठालेंच्या मदतीने मराठीतील दिग्गज, दखलपात्र साहित्यिक डॉ. किशोर सानपांचा पराभव केला. डॉ. किशोर सानप हे वंजारी समाजाचे तर प्राचार्य ठाले हे ‘मराठा’ समाजाचे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मतदार यादीत मराठा-ब्राह्मण यांची नव्वद टक्के मते तर किशोर सानप यांची फक्त सात-आठ मते. एकूण काय तर एका मराठ्याने (ठाले) वंजार्‍याचा (सानप) फक्त पराभव केला.
*
शाखा तिथे वाद...
इंग्रजाने दान केलेली नीती ‘फोडा, झोडा आणि राज्य करा’ याचे तंतोतंत पालन प्राचार्य ठाले करतात. मराठवाडा साहित्य परिषद हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या चळवळीचा इतिहास असलेली. हा खरे तर ऐतिहासिक मोठेपणा आहे. त्याच्या शाखा गावोगाव असायला हव्यात पण तसे घडले नाही. प्राचार्य ठाले ‘मसाप’ कार्यालयात तीस वर्षे कार्यरत आहेत असे ठामपणे सांगतात. मग फक्त पंधरा शाखाच कशा काय? खरेतर प्राचार्य ठालेंचे ‘कौतुक’ करावे तेवढे कमीच. ‘वीस वर्षात पंधरा शाखा’ याचेही राजकारण होते आहे. त्यातही काही शाखा प्रत्यक्षात आहेत तर काही शाखा कागदावरच! तर काही वर्धापनदिन व्याख्यानमालेचा खर्च प्राचार्य ठालेंनी त्या शाखेत दिला की, त्या जिवंत होतात.
*
मसापच्या शाखा मुळातच दहापंधरा. त्याचा बोन्साय ठालेंनीच केलाय. पंधरा वर्षापूर्वी मसाप शाखेतून चौदा-पंधराजण बिनविरोध निवडून येत. उरलेल्या तीन-चार जागेसाठी निवडणूक व्हायची. त्यामुळे कमीतकमी शाखा, त्याही यांच्याच ताब्यात राहणार्‍या. उदा. धारुर, जि. बीड येथे शाखा आहे. प्राचार्य ठाले तिथे प्राध्यापक असल्यापासून ते निवृत्त झाले तरीसुद्धा शाखा आहे. एवढी जुनी शाखा, एकही मसापचा कार्यक्रम न घेणारी, कागदावरची मसाप शाखा. मतदानासाठीचीच उरली आहे. 40-50 मते हक्काची. मराठा जातीची. ती सर्व ठालेंच्या घरी येतात. आता याला ‘बोन्साय’ नाही तर काय म्हणायचे? शाखा वाढू द्यायच्या नाहीत, तो मतदारसंघ (साखर कारखाना निवडणुकीसारखेच) आपल्या ताब्यात ठेवायचा, विजयी व्हायचे. शाखांची वाढ थांबली. पर्यायाने साहित्य चळवळीला खंडित करायचे काम ठालेंनी निवडणुकीच्या राजकारणापायी केले. सध्या कागदावरच्या शाखात बीड, जालना, केज, शिरुर, लातूर, उदगीर या शाखा शेवटच्या घटका मोजत आहेत. आम्ही उत्साहाच्या भरात शिरुरकासारला शाखा स्थापन केली. खर्च करुन उद्घाटन घेतले. कार्यक्रम घेत होतो. आजपावेतो एक रुपयाची कसलीच मदत शाखेला ठरवून केली नाही. नांदेड, परभणी, उस्मानाबाद या शाखांना हजारोंनी मदत केली जाते. हा दुजाभाव ठालेंनी केलाय. शिरुरची शाखा कार्यवाह दादा गोरेंनी बरखास्त केली होती. घटनेत नसलेले नियम काढायचे आणि नको असलेल्या शाखावर कुर्‍हाड चालवायची. त्यांना आजीव सभासदांची यादी करुन दिली अन् भांडून शाखा जिवंत ठेवली. असे हे महाशय. फोडा झोडात यांना डिलीट प्रदान करायला हवी.
*
असे आहेत गटतट
* केज - ईश्वर मुंडे + गदळे, गुंड
* बीड - सतीश साळुंके + सोपान सुरवसे, विजय जावळे
* लातूर - शेषराव मोहिते, योगीराज माने + गोविंद कुलकर्णी, विनय अपसिंगेकर
* अंबाजोगाई - दगडू लोमटे, अमर हबीब + दिनकर जोशी, डॉ. नागरगोजे
* नांदेड - जगदीश कदम + सुरेश सावंत
* परभणी - देविदास कुलकर्णी + आसाराम लोमटे
* जालना - संजीवनी तडेगावकर + जयराम खेडेकर
* उस्मानाबाद - तावडे + शेख
* माजलगाव - कमलाकर कांबळे + प्रभाकर साळेगावकर
* शिरुर - अनंत कराड + विठ्ठल जाधव.
अशापद्धतीने सगळीकडे कोंबड्यांना झुंजायला लावतात. भांडणारे सर्वजण ठालेंना आळीपाळीने भेटतात. येथे वाटणी करणारे माकड या कथेतल्या माकडासारखे भांडखोरांसोबत वागून स्वार्थ साधतात. म्हणून म्हणतो, ठाले फोडा, झोडा नीतीत पारंगत झालेत.
पाचशे रूपये आजीव सभासद वर्गणी होती. ती वाढवत गेल्या तीन वर्षापूर्वी रुपये तीन हजार रूपये केली. आजीव सभासदांची संख्या ठालेंनी महाविद्यालये, शाळा आणि नातेवाईक यातल्या सग्यासोयर्‍यांचा प्रचंड भरणा करुन ठेवलाय. म्हणून तर मसापची महत्त्वाची पदं मराठा जातीला दिलीत. ठाले जातीभिमानी आहेतच. अध्यक्ष -ठाले (मराठा)
कार्यवाह - गोरे (मराठा)
पुरस्कार कमिटी - मोहिते (मराठा)
प्रतिष्ठान संपादक - लोमटे (मराठा)
*
मसाप संमेलनात सर्वाधिक वर्णी मराठा लेखकांची. 
जणू रतीबच.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही मराठा जातीच्या लेखकांची वर्णी.
हे पदाधिकारी त्यांच्या बायकांचीसुद्धा संमेलनात, कार्यक्रम पत्रिकेत वर्णी लावतात आणि त्यांचे चेले संमेलनभर सांगत सुटतात, ‘‘वहिनीचे भाषण जोरदार झाले.’’ टाळ वाजवणार्‍यांची संख्या खूप वाढलीय. प्रत्येक जिल्ह्यात यांनी बॅगा उचलणारे, सर्व सोयी करणारे अशा लेखकांची फळी तयार केलीय.
*
काळा दिवस
मसाप औरंगाबाद सोडून इतर साहित्य संस्था वाचक, रसिकांनी ऑनलाईन आजीव सभासद व्हावे म्हणून आवाहन करतात. पैसे भरा सभासद व्हा, अशी भूमिका घेत आहेत अन् आमच्या मसापने तीस वर्षे मसाप असलेल्या ठालेंना परस्सर आजीव सभासद करुन घेतलेले चालत नाही. मी एप्रिल-मे दरम्यान 16 आजीव सभासद केले. कोशाध्यक्ष मी होतो. सह्या करुन पावत्याही फाडल्या. पैसे मसाप खात्यावर जमा झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत मी ज्येष्ठ समीक्षक डॉ. किशोर सानप यांची बाजू जाहिरपणे घेतली. त्याचा राग ठालेंना आला. ठालेंच्या बगलेत बसलेल्या दादा गोरेंनी या रागावर जातीचे विष पेरले अन् माझे पद काढून घेण्यासाठी बायकी कारणांचा बागुलबुआ उभा केला. फिल्ंिडग जोरदार लावली. ठाले-गोरेचे चेले कामाला लागले. अंबाजोगाईच्या साहित्य संमेलनाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्याचे उग्र रुप दिसले. ठालेंच्या कारभाराची चिरफाड करणारे निनावी पत्र मराठवाडाभर आजीव सभासदांना आले होते. ते पत्र मी लिहून पाठवल्याचा आरोप दादा गोरेंनी केला. त्यावर घमासान चर्चा झाली. काही झेलीराम तर मला शिक्षा करावी अशी मूर्खपणाची मागणी करु लागले. ठालेभक्त बैठकीत माझ्यावरच बोलू लागले. त्यात अगदी होऊ घातलेल्या 40 व्या मसापच्या नियोजित संमेलनाचे अध्यक्ष डॉ. हृषिकेश कांबळेही होते. साप सोडून दोरीला बडवण्यात भक्तांमध्ये स्पर्धा लागली होती आणि तिथेच ठराव घेतला गेला, ‘‘डॉ. भास्कर बडेंनी 16 आजीव सभासद केलेत. त्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव सभागृहात मांडत आहे.’’
ठराव माझे मत सोडता मंजूर झाला. रद्द केलेल्या आजीव सभासदांच्या पावत्या रद्द केल्याचे पत्र आणि तीन हजाराचे चेक पोष्टाने कार्यवाह गोरेंनी तातडीने पाठवले. तो मसापच्या इतिहासातील काळा दिवस ठाले-गोरेमुळे घेण्यात आला तर कार्यकारीणी सदस्यांनी डोळ्यावर पट्ट्या बांधल्या होत्या. बहुमताच्या पुढे काय चालणार? तो काळा दिवस मसापच्या इतिवृतात नोंदला गेलाय.
सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा मूर्खपणा कार्यकारिणीने घेतला.
*
अपमानच वाट्याला
तीनही निवडणुकात मी आघाडीवर होतो. मतपत्रिका गोळा करण्यात हातखंडा. खूप पळायचो. बाकी कोण पळाले ते ठालेंनी छातीवर हात ठेवून सांगावे. मराठवाडाभर जुना-नवा मतदार ओळखीचा झालेला. मराठवाडाभर प्रवास केला. त्यासाठीचा खर्च ठालेंनी विचारला नाही, मी कधी मागितला नाही. मुरुड, बीडमधील दोन्ही लेखिका संमेलने, कडा येथील संमेलन यासाठी मी धावपळ केली. संयोजक तयार करणे, त्यांना मदत करणे, अगदी सोयगावच्या संयोजकाना मदत केली. खरे सांगायचे तर मी मसापमय झालो होतो...
हे कार्य करताना ठालेपुरस्कृत अपमानही वाढतच चालले. मग मात्र मसाप सोडावी वाटायची. मी शिफारस केलेली नावे न स्वीकारणे, साक्षात स्वागत कार्यक्रमात माझ्याकडच्या नावांना डावलणे, प्रतिष्ठानला कवितांची शिफारस  मी केली तरी निर्णय न घेणे, नंतर बिनलाजेपणाने हरवल्या म्हणणे या व अशा घटना आसाराम लोमटे संपादक झाल्यानंतरच्या आहेत. जालना, सोयगाव, नांदेड आदी संमेलनात मी शिफारस केलेली नावे कचराकुंडीत टाकणे, अखिल भारतीय संमेलनासाठीची एकही शिफारस स्वीकारली नाही, लिखित कळवूनही पाहिले तरी त्यांचा निगरगठ्ठपणा जाईना. मी पदावर असल्याची मला लाज वाटू लागली. आपण पदाधिकारी असून कोणालाच न्याय देऊ शकत नाही... डोकं भन्न व्हायचं. कशाला पदावर बसलोत असं पदोपदी वाटायचं. हे पद मला शेळीचे शेपूट वाटू लागले. या शेपटाने लाज राखता येईना अन् माशाही हाणता येईना. माझी चिडचिड वाढत गेली. ठालेंनी ठरवून डोळेझाक केली कारण आ. सतीश चव्हाणांनी फोडलेला घाम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने वाळला होता अन् ताज्या घोड्यावरच्या गोमाशा मिळाल्या होत्या. त्या रिंगणात ठाले अडकले होते. ठालेंना विजयाची नशा चढली होती. तीन निवडणुकांचा अनुभव सांगतो. ठालेंना गरज पडू द्या, ते लोटांगण घालू शकतात. इतका ‘नम्ब्री’ माणूस आहे. एकमात्र खरे, आ. चव्हाणच मसापतून ठाले अँड कंपनीला सहज घालवू शकतात.
अंबाजोगाई साहित्य संमेलनातील माझ्या सहभागाला विरोध केला. गोरेंनी माझ्या नावाला विरोध करुन स्वतःच्या पत्नीचे नाव घेतले. माझ्या जिल्ह्यात माझ्या नावाला विरोध; तेही मी कोशाध्यक्ष असताना. कशासाठी पदावर रहायचे? हा प्रश्न मनाला बोचत होता. अंबाजोगाई संमेलनातच्या उद्घाटनात दोघांनी स्वतःचे सत्कार घेतले तर उपाध्यक्ष किरण सगर आणि माझा सत्कार कार्यकर्त्यांसोबत टाकला. ठराव वाचनातले नाव गाळून टाकले. एकूण अपमानाचा रतीब माझ्या वाट्याला येतच होता. पुढे बदल होईल या आशेवर अपमान पचवत होतो.
*
माजी आमदार उषाताई दराडेंना गळ घालून लेखिका संमेलन घ्यायला लावले. महिनाभर संमेलनासाठी धावपळ केली. स्वखर्चाने, उत्तमरित्या संमेलन पार पडले. उद्घाटनाच्या सत्रात अध्यक्ष ठालेंनी एका सदस्याचे पोटभर कौतुक केले, मात्र माझ्या नावाचा पदाधिकारी असूनही उल्लेख केला नाही. या वागण्याला बेरकी नाही म्हणावे तर काय म्हणावे? सोयगाव संमेलनात माझे नावच गाळून टाकले. चौकशीअंती कळाले, ठालेंनी गाळायला सांगितले. ठालेंच्या या फालताड पराक्रमाचा राग येत होता.
*
अपमानच...
माझी कोषाध्यक्षपदी निवड झाली आणि लगेच एक ठराव घेऊन माझे पंख छाटले. यापूर्वी चारही पदाधिकारी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य असायचे. तो ठराव कार्यकारिणीचे सदस्य आसाराम लोमटे यांना मंडळावर पाठविण्यात येत आहे, कोशाध्यक्षाचा पत्ता, माझा पत्ता कट केला. अशा चालबाजांनी मी वैतागलो होतो. अध्यक्ष ठाले, कार्यवाह गोरेंनी दोघांसाठी एसीसह महागडे फर्निचर करुन घेतले. मला वाटले उपाध्यक्ष-कोशाध्यक्षासाठीही फर्निचर मागवतील. तयार करुन घेतील! पण छे! वर्षभर पाठलाग केला तरी फर्निचर सोडा साधी खुर्ची, टेबल, कपाटसुद्धा नाही. इतर पदाधिकारी आपल्यापेक्षा मोठे होऊ नयेत, त्यांना सभासदांनी आपुलकी देऊ नये अशा स्वभावाचे ठालेसर आहेत. आजही उपाध्यक्ष-कोशाध्यक्षाला स्वतंत्र खुर्ची, टेबल, कपाट नाही. ही दोन्ही पदं स्टँम्पसारखी पूर्वी वापरली. मी विरोध केला. मला पदावरुन हटवले अन् पूर्वीचे देवीदास कुलकर्णी यांनाच कोशाध्यक्ष केले. कुलकर्णीचा तो स्वभाव आहे. असो! कोणी कसे वागावे तो ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. मला हा अपमान नाही सहन झाला. म्हणून दोन हात केलेत. मसापत फारच रामराज्य चालल्याचा आव ठालेसर आणत आहेत. पूर्वी ठाले सर्वसमावेशक वागायचे परंतु दादा गोरेसारखा विषारी माणूस सोबतीला घेतल्यापासून ठाले बिघडले... जात, जात असं बरळू लागले.
कोर्‍या चेकवर सह्या करण्याशिवाय मला पर्याय नव्हता. सहनशीलता संपली आणि चेकवर खर्चाचा आकडा टाका, तरच सही करणार अशी ठाम भूमिका घेतली. ही भूमिका त्याच्या जिव्हारी लागली अन् राक्षसी मताने मला कोशाध्यक्ष पदावरुन मी बैठकीत नसताना हटवले. असे छानछान मसापात सुरु आहे. कौतुकरावाचे कौतुक काय करावे? सांगावे तेवढे वाढतच जाते! त्यांच्या कार्यावर ‘कौतुकचालिसा’ ग्रंथ होऊ शकतो.
चपराक दिवाळी महाविशेषांक २०१८ 

Saturday, December 8, 2018

प्लासी ते सांगली

मासिक 'साहित्य चपराक' दिवाळी विशेषांक २०१८ 

नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणाच्या आखाड्यात उतरले त्याला आता पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. तेव्हा त्यांना मुळात पक्षातल्या विरोधावर मात करावी लागलेली होती आणि नंतर देशव्यापी प्रचाराची मोहिम चालवताना पक्षाची संघटनाही कुशलतेने हाताळावी लागत होती. त्यासाठी बारीकसारीक विविध पातळीवरच्या पक्ष व संघटनेच्या शाखा, त्यात नेतृत्व करू शकणार्‍यांची एक साखळीच उभी करावी लागलेली होती. त्याचा राजकीय लाभ मिळून मोदींनी मोठा इतिहास घडवला आणि आघाडीचे युग असल्याची समजूत मोडीत काढून एकपक्षीय बहुमत मिळवलेले होते. आता त्याला पाच वर्षाचा कालावधी उलटून गेलेला असला तरी अजून देशातल्या चाकोरीबद्ध राजकीय अभ्यासकांना त्या घडामोडीचे नेमके विश्‍लेषण करता आलेले नाही. त्याच्या भावी परिणामांचा कुठला आडाखा बांधता आलेला नाही. याचे प्रमुख कारण देशातले असे विश्‍लेषक व अभ्यासक कायम इतिहासात भविष्याची पाळेमुळे शोधत असतात, धागेदोरे शोधत असतात आणि त्यात गैर काहीच नाही! पण इतिहासातील घटनांची तशीच्या अशी पुनरावृत्ती होत नसते तर त्यातून दिशा व संकेत मिळत असतात. ते ओळखून भविष्य कुठल्या दिशेने जाऊ शकेल त्याचा अंदाज बांधणे शक्य असते. काळ बदलतो, व्यवहार बदलतात, पिढ्या बदलतात आणि माणसेही बदलतात. साहजिकच घटनांचे स्वरूपही बदलत असते. म्हणूनच इतिहासाचे दाखले देताना व संदर्भ घेताना, तपशील दुय्यम आणि आशय निर्णायक, महत्त्वाचा असतो. जगाच्या कुठल्याही देश समाजसमूहाच्या इतिहासाचा व वर्तमानाचा अभ्यास करताना ही वाट सोडून चालत नाही. तसे केल्यावर भरकटणे अपरिहार्य असते. म्हणूनच मोदींच्या राष्ट्रीय क्षितिजावर येण्यापासून आजपर्यंत बहुतांशी राजकीय आडाखे, अंदाज व भाकितांची चुकामूक होत राहिली आहे. ‘हत्ती आणि सहा आंधळे’ अशी कथा होऊन गेलेली आहे.
आता पुन्हा लोकसभेच्या निवडणुकांची चाहूल लागलेली आहे. आणखी आठ-नऊ महिन्यांनी लोकसभेचे मतदान संपून निकाल लागलेला असेल आणि पुढल्या काळाची राजकीय दिशा निश्‍चित झालेली असेल पण तो निकाल लागण्यापर्यंत विविध भाकिते व राजकीय अंदाज व्यक्त होत राहणार आहेत. ती भाकिते कुठल्या एखाद्या घटना, निवडणुका वा पोटनिवडणुकांच्या निकालावर आधारित असली तर फसण्याला पर्याय नाही. काही महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना कॉंग्रेसचे अभ्यासू नेते जयराम रमेश यांनी आपल्या पक्षाच्या दुर्दशेबद्दल छान मतप्रदर्शन केलेले होते. कॉंग्रेससमोर अस्तित्वाचा गंभीर प्रश्‍न उभा असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली होतीच पण पक्षातील मानसिकता व वर्तनाविषयी त्यांनी नेमके दुखण्यावर बोट ठेवलेले होते. ‘‘सल्तनत वा बादशाही कधीच संपलेली आहे पण आमचे नेतृत्व मात्र आजही नबाबी थाटात वागते आहे,’’ असे शब्द रमेश यांनी वापरलेले होते. ब्रिटीश सत्ता भारतात प्रस्थापित झाल्यावर त्यांनी बहुतांश राजे, नबाब व सुलतानांची सत्ता मोडीत काढलेली होती. बदल्यात जे असे संस्थानिक ब्रिटीश सत्तेशी सलोख्याने वागतील त्यांना मर्यादित अधिकार व तनखा देऊन आपला ऐषोआराम उपभोगण्याची सुविधा दिलेली होती. अगदी अशा खालसा संस्थांची सुरक्षाही ब्रिटीश सत्तेने आपल्याकडे घेऊन सैनिकांचा ताफाही आपल्या कब्जात ठेवला होता. परिणामी हे राजे, नबाब दिखाऊ वा प्रदर्शनी, नामधारी बादशहा उरलेले होते. रमेश यांनी कॉंग्रेस नेतृत्वाची त्यांच्याशी तुलना केलेली होती पण त्यातले तथ्य वा आशय कोणाही पक्षनेत्याने समजून घेतला नाही की कुणा अभ्यासकाने त्याचे राजकीय विश्‍लेषण करणे आवश्यक मानले नाही. मग पुढल्या निवडणुकीत देशाची सत्ता मिळवायला निघालेली कॉंग्रेस आणि सत्ता टिकवायला सज्ज होत असलेला भाजपा, यांचे विवरण कसे होऊ शकते?
पाच वर्षापूर्वी माझे ‘मोदीच का?’ शीर्षकाचे पुस्तक प्रसिद्ध झालेले होते. वास्तविक ती 2013 च्या पूर्वार्धात प्रसिद्ध झालेली लेखमाला होती. एका मित्राच्या आग्रहामुळे त्याचेच पुस्तक झाले. तेव्हा देशातले तमाम अभ्यासक मोदी जिंकू शकत नाहीत, भाजपा मोठा पक्ष झाला तरी मोदी पंतप्रधान होऊ शकत नाहीत असे अनेक निष्कर्ष काढत होते. अगदी मतचाचण्याही कुठल्याही मार्गाने भाजपा आघाडीला बहुमतापर्यंत घेऊन जायला तयार नव्हत्या. त्यामुळेच भाजपाला एकपक्षीय बहुमताची गोष्ट अशक्यच म्हटली जात होती. अशावेळी मी मात्र वर्षभर आधीच मोदीच भाजपाला सत्तेपर्यंत, बहुमतापर्यंत घेऊन जातील, असे भाकित केलेले होते. त्याला विविध संदर्भ, ऐतिहासिक घटना व धागेदोरे आणि बदलती राजकीय परिस्थिती कारण होती. आज परिस्थिती आणखीनच बदलून गेली आहे. मात्र दिशा बदललेली नाही! पण मला सर्वात आश्‍चर्य या गोष्टीचे वाटते, की अजूनही राजकीय अभ्यासक व विश्‍लेषकांना आपल्या पाच वर्षे जुन्या चुका दुरूस्त करण्याची गरज वाटलेली नाही. तेव्हाच्या चुका नव्याने चालल्या आहेत आणि त्याच चुकांच्या पायांनी विश्‍लेषणाची वाटचाल चालली आहे. अनेकदा नेमके संदर्भ व इतिहासाचे दाखले समोर आणले जातात पण निष्कर्ष मात्र धडधडीत चुकीचे काढले जातात. काही प्रसंगी निकषही योग्य असतात पण त्यातून काढलेला निष्कर्ष चुकीचा असतो. माझा एक समाजवादी मित्र पत्रकार सुनील तांबे याने काही महिन्यांपूर्वी म्हणजे सांगली, जळगाव महापालिका भाजपाने जिंकल्या, तेव्हा एक छोटीशी पोस्ट फेसबुकवर टाकलेली होती. त्यात त्याने भाजपाच्या घोडदौडीसाठी तीनशे वर्षे जुन्या भारतीय इतिहासातला अप्रतिम दाखला शोधून मांडला होता. मलाही तो इतिहास ठाऊक आहे पण आजच्या युगाशी त्याची तुलना करायचा विचारही मनाला शिवला नव्हता. सुनीलची पोस्ट इथे वेगळ्या चौकटीत मुद्दाम सादर केलेली आहे.
माझ्या गेल्या आठदहा वर्षातल्या लिखाणातून मी सातत्याने आजच्या पुरोगाम्यांना झोडून काढलेले आहे. त्यांना अनेक शब्दातून ठोकून काढलेले आहे पण त्याचा अर्थ मी कधी पुरोगामी विचारांची अवहेलना केलेली नाही. किंबहुना मला जे काही पुरोगामित्व माहिती आहे किंवा उमेदीच्या काळात ज्येष्ठांकडून पुरोगामी धडे मी गिरवलेले आहेत त्याविषयी माझ्या मनात कुठल्याही शंका नाहीत पण आजकालचे पुरोगामी वर्तन व युक्तीवादाची किळस येण्यापर्यंत घसरण झालेली आहे. पुरोगामी विचार आपल्या जागी आहेत आणि त्यांचे लेबल लावून चक्क प्रतिगामीत्व लोकांच्या समोर पेश केले जात असते. अशा पुरोगामी झुंडी वा दिवाळखोरांना कितीही नावे ठेवली, तरी मी कधीही त्यांना ‘बाजारबुणगे’ हा शब्द वापरला नव्हता. सुनीलने अतिशय सहजगत्या त्या शब्दाचा उपयोग केला आहे. किंबहुना मलाही तेच सांगायचे असेल पण तो शब्द वापरण्याची हिंमत झाली नसेल, कारण मी बघितलेले खरेखुरे जुने पुरोगामी विचारवंत, राजकीय नेते, कार्यकर्ते कधीच बाजारबुणगे नव्हते. ते अतिशय मेहनती व विवेकी होते. आपल्या बुद्धीने चालणारे प्रामाणिक लोक होते. आज पुरोगामी म्हणून भुरटेगिरी करणार्‍यांमध्ये त्यांचा लवलेश आढळून येत नाही. म्हणूनच सुनील तांबेने योजलेला शब्द नेमका आहे. ‘बाजारबुणगे’ म्हणजे पूर्वीच्या लढाया, युद्धामध्ये प्रत्यक्ष न लढणारे वा कसोटीच्या प्रसंगी बोजा बनून व्यत्यय आणणार्‍या खोगीरभरतीसाठी हा शब्द वापरला जात असे. अशा प्रत्यक्ष युद्धासाठी निरूपयोगी असलेल्या परंतु युद्धप्रयासाला बोजा बनणार्‍यांमुळे मोठमोठ्या फौजाही पराभूत झाल्या आहेत. आज पुरोगामी लढाईची पिछेहाट नेमकी तिथेच झालेली आहे. किंबहुना मोदी-शहांच्या शिस्तबद्ध राजकीय कार्यकर्ता फौजेसमोर पुरोगामी बाजारबुणग्यांची मोठी संख्या व सेना टिकाव धरू शकलेली नाही, असाच सुनीलच्या पोस्टचा आशय आहे.
साडेचार वर्षापूर्वी नरेंद्र मोदी व भाजपाने इतके मोठे राजकीय यश का मिळवले आणि नंतरच्याही राजकीय संघर्षात पुरोगामी म्हणवणार्‍यांचा पदोपदी पराभव कशामुळे होत गेला, त्याचे सुनीलइतक्या मोजक्या व नेमक्या शब्दातले विश्‍लेषण मलाही आजवर करता आलेले नाही. सुनीलने ते नेमके केलेले आहे पण ज्यांच्यासाठी त्याने ते विश्‍लेषण केले, त्यांना त्यातला आशय किती समजला याची शंका आहे. कारण सुनीलचे चाहते व अनुयायी बहुतांश पुरोगामी व कडवे आहेत. त्यांनी माझ्या अनेक पोस्ट वा प्रतिक्रिया वाचून उफराटी वक्तव्ये केलेली आहेत पण माझ्यापेक्षा त्यांच्या नाकर्तेपणाला सुनीलने नावे ठेवली, तिथे मात्र यापैकी प्रत्येकाने ‘लाईक’चे चिन्ह टाकून, त्याच पोस्टला म्हणजे बाजारबुणगे या अपशब्दाला डोक्यावर घेतलेले होते. याचा एक अर्थ असा होतो, की त्यापैकी कोणाला मुळची पोस्ट वा मजकूर समजून घ्यावा असे वाटले नाही, की त्याचा अर्थही लागलेला नसावा. सुनील हा समाजवादी पुरोगामी असल्याने त्याने काहीही लिहिले तरी ते पुरोगामी, पुरोगामित्वासाठी उपयुक्त असल्याचे डोळे झाकून मान्य केल्याने, आपण मोठे पुरोगामी कर्तव्य बजावल्याची धारणा त्यांच्यामध्ये असावी. अन्यथा त्यातले मोदी-शहांचे कौतुक त्यांना आवडण्याचे काहीही कारण नाही. तशीच त्यातली पुरोगाम्यांची शेलक्या भाषेत केलेली अवहेलना त्यांना सोसण्यापलीकडला विषय आहे पण तशी कुठली उफराटी प्रतिक्रिया सुनीलच्या पोस्टवर दिसली नाही. यातून आजच्या पुरोगामित्वाची पातळी लक्षात येऊ शकते. मोदींच्या यशाचे कौतुक केल्यावर झटपट त्यावर भक्तीचा शिक्का मारण्यासाठी उतावळ्या झालेल्या याच लोकांना, सुनीलने केलेले कौतुक का टोचले नाही? तर त्यातला आशय, विषय समजून घेण्याच्या विवेकबुद्धीला त्यांनी चाट दिलेली आहे. ती देऊ शकेल तोच आज पुरोगामी म्हणून प्रमाणित होऊ शकतो, ही त्या वर्गाची शोकांतिका आहे.
सुनीलची ती पोस्ट मी दोन-तीनदा वाचून काढली, शेअर पण केली. गेल्या पाच वर्षातल्या राजकारणात मोदी-शहा ही जोडगोळी वा संघप्रणित भाजपा कसा इतका यशस्वी होतोय, त्याचा मोजक्या शब्दात उलगडा होऊन गेला. यात भाजपाची जमेची बाजू आणि पुरोगामी म्हणून सतत कंठशोष करणार्‍या विरोधकांची दुबळी बाजू सहज लक्षात येऊन गेली. किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन येत्या लोकसभा वा अन्य निवडणुकीत पुन्हा पुरोगामित्वाचे पाखंड या लोकांना का वाचवू शकणार नाही, त्याचाही खुलासा होऊन गेला. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे मोजके पण कवायती सैन्य आणि सिराज उद दौलाची बाजारबुणग्यांची विस्कळित बेशिस्त फौज, यांच्यातली ही लढाई आहे. शिस्त असलेले कार्यकर्ते व त्यांची कायमस्वरूपी उभी असलेली खडी फौज कुठल्याही चौपट-पाचपट मोठ्या संख्येच्या जमावाला पांगवू शकत असते. कुठल्याही शहरात वा भागात दंगल माजते तेव्हा तिथे जमावाच्या तुलनेत किरकोळ असलेली सेना वा पोलिसांच्या तुकड्या लौकरच शांतता प्रस्थापित करतात कारण ती लढाई प्रत्यक्षात दोन जमावांमध्येच असते आणि त्यातला एक जमाव शिस्तबद्ध संघटना असते तर दुसरा जमाव संख्येने मोठा असला तरी प्रत्यक्षात ती नुसती गर्दी असते. त्यात एकमेकांविषयी आस्था नसते की कुठले समान उद्दीष्ट घेऊन तो जमाव एकत्र आलेला नसतो. कुठल्या तरी क्षणिक कारणाने त्यांना उद्दीपित केलेले असते आणि त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून ती विस्कळित लोकसंख्या जमावात रुपांतरीत झालेली असते. लढणे वा प्रतिकार, संघर्ष वगैरे असे कुठलेही प्रशिक्षण त्या जमावला मिळालेले नसते. शिस्तीची फौज त्यात कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेली असते. ब्रिटीशांची फौज आणि नबाब सिराज उद दौलाच्या सैन्यामध्ये हा नेमका फरक होता आणि त्याचीच पुनरावृत्ती आज भारतीय राजकारणात होत आहे.
ब्रिटीश वा युरोपियनांचे भारतात आगमन व सत्तासंघर्ष सुरू होण्यापूर्वी भारतातील राजकीय लढाया अशाच विविध सरदार-दरकदारांची एक आघाडी असायची. अशा स्थानिक सुभेदार वा सरदारांची जितकी मोठी संख्या एखाद्या नबाब, राजा वा बादशहाच्या पाठीशी उभी असेल, तितका तो शिरजोर ठरत होता. त्यातले सरदार, सुभेदार आपली बाजू बदलून सत्ताबदल घडवू शकत होते. त्या सैनिकांच्या तुकड्या सरदाराशी बांधील असायच्या. त्यांना बादशहा, राजा वा नबाबाशी कर्तव्य नव्हते की त्यांच्याठायी अशा सैनिकांच्या निष्ठाही नसायच्या. त्यापैकी कोणी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला तर त्याला ठेचण्याची कुवत बाळगणारा सुलतान वा नबाब होऊ शकत होता. आज प्रादेशिक पक्ष वा नेते यांची स्थिती वेगळी नाही. स्वातंत्र्योत्तर काळात कॉंग्रेसची हुकूमत वा सल्तनत अशीच होती. अतुल्य घोष, चंद्राभानु गुप्ता, मोरारजी देसाई किंवा मोहनलाल सुखाडीया, कामराज वा निजलिंगप्पा असे प्रादेशिक सुभेदार होते आणि नेहरूंनी त्यांना आपले अंकित करून ठेवलेले होते. नेहरूंनी वा दिल्लीच्या कॉंग्रेस नेत्यांनी त्यांच्या कामात व अधिकारात कधी ढवळाढवळ केली नाही. अशा प्रादेशिक सुभेदारांच्या निष्ठा दिल्लीश्‍वरांच्या चरणी रुजू असायच्या आणि त्यांनी लोकसभेच्या लढतीमध्ये दिल्लीश्‍वरांना अधिकाधिक लोकसभेचे सदस्य निवडून द्यायचे असत. नंतर त्यांनी आपल्या राज्यात व विधानसभेत आपली हुकूमत राबवण्याची मोकळीक त्यांना मिळत असे. त्यांनी कधी नेहरूंच्या हुकूमतीला वा सत्तेला आव्हान दिले नाही, की राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा बाळगल्या नाहीत. जेव्हा त्यांच्या प्रादेशिक नेतृत्वात वा महत्त्वाकांक्षेत दिल्लीश्‍वरांनी ढवळाढवळ सुरू केली तिथून कॉंग्रेसची सल्तनत ढासळायला आरंभ झाला होता. इंदिराजी व नंतरच्या पिढीत सिराज उद दौला दिल्लीतूनच देशाची सूत्रे हलवू लागले आणि त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी एका कवायती फौजेची गरज होती.
सिराज उद दौला हा बंगालचा नबाब होता आणि तो खूप मातला होता असे इतिहास म्हणतो. म्हणजे नेमके काय? तर आपल्या आजोबापासून वारशात मिळालेल्या राज्यसत्तेची मस्ती सिराजला चढलेली होती. ती त्याच्या बोलण्या-वागण्यातून प्रत्येकाला अनुभवास येत होती. पिता वा आजोबाच्या अनेक निष्ठावान सहकारी व ज्येष्ठ सरदारांना उठताबसता अपमानीत करण्याचे प्रसंग वारंवार घडत होते. याच्यापेक्षा दुसरा कोणीही सत्तेत आला वा राज्य बदलले तरी बरे; असे म्हणायची पाळी सिराजनेच आपल्या सहकारी व सरदारांवर आणलेली होती. 1970 नंतरच्या कालखंडात विविध राज्यात जे प्रादेशिक पक्ष उदयास आले व त्यांनी आपला जम बसवला, त्यांचा सर्व इतिहास तपासला, तर ही गोष्ट लक्षात येईल. हे सर्व प्रादेशिक पक्ष व नेते कॉंग्रेसी दिल्लीश्‍वरांच्या मस्तवाल मुजोरीचे परिणाम आहेत. उत्तरप्रदेशचे चौधरी चरणसिंग यांच्यापासून कालपरवाच्या ममता बानर्जी व आंध्राच्या जगनमोहन रेड्डीपर्यंतचे प्रादेशिक नेते व पक्षांच्या उगमात कॉंग्रेसश्रेष्ठी वा नेहरू-गांधी घराण्याचे मातलेपण सामावलेले दिसेल. जितक्या गुणी वा प्रभावी स्थानिक प्रादेशिक नेत्यांना कॉंग्रेस दुखावत गेली त्यातून ह्या नाराजांनी प्रादेशिक तंबू उभारले आणि कॉंग्रेसची केंद्रीभूत सत्ता खिळखिळी होत गेली पण ती ढासळून पडत नव्हती. तिला पर्याय देऊ शकणारी संघटना व कवायती सेना आवश्यक होती. भाजपा-संघाने त्या दिशेने मागल्या तीन दशकात पद्धतशीर प्रयत्न केले आणि गांधी घराण्याने दुखावलेल्यांना हाताशी धरून एक एक राज्यात आपले हातपाय विस्तारलेले आहेत. राज्य राजाचे होते की नबाबाचे वा ब्रिटीश कंपनीचे, याच्याशी सामान्य भारतीय जनतेला कर्तव्य नव्हते. तिला सुरक्षित व शांततामय जीवन जगण्याची हमी देणारी सत्ता हवी होती आणि तसेच पर्याय भारतीय इतिहासाला कलाटणी देत गेलेले आहेत.
1967 सालात कॉंग्रेसच्या एकछत्री राज्याला आव्हान देण्याचा पहिला संघटित प्रयास अनेक राज्यात सुरू झाला. या स्थानिक सुभेदारांनी एकजुटीने कॉंग्रेस संपवण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून आघाडीच्या राजकारणाला सुरूवात झाली. खरेतर त्यानंतर कॉंग्रेसने आपल्या विविध राज्यातील नेत्यांना, सुभेदारांना गुण्यागोविंदाने वागवले असते तर विरोधकांची एकजूट वा आघाड्या राजकारण बदलू शकल्या नसत्या पण तसे होऊ शकले नाही. उलट इंदिराजींनी आपली सत्ता व एकछत्री हुकूमत टिकवण्यासाठी सगळ्याच कॉंग्रेसी सुभेदारांना संपवण्याचा चंग बांधला. ब्रिटीश सत्तेच्या काळात वा मुघलांच्या जमान्यात सुभेदार गव्हर्नर नेमले जायचे तसे इंदिराजींनी आपल्याशी व्यक्तिगत निष्ठावान कॉंग्रेस नेते राज्यांसाठी नेमायचा पवित्रा घेतला. त्याच्या परिणामी कुठल्याही कर्तबगार नेत्याला कॉंग्रेसमध्ये स्थान उरले नाही. त्याने अन्य पक्षात जावे किंवा स्वबळावर आपला प्रादेशिक पक्ष उभारावा असाच पर्याय शिल्लक होता. आज जे अनेक प्रादेशिक पक्ष शिरजोर झालेले दिसतात ती त्याच मातलेपणाची संतती आहे. दुसरीकडे विविध वैचारिक भूमिकाचे पक्ष स्वातंत्र्योत्तर काळात उदयास आले. त्यांनी कधी तळापासून राजकीय संघटना बांधणीचा जोरदार प्रयास केला नव्हता. त्यापेक्षा आघाडीचा मार्ग चोखाळून सत्तेची शिडी चढण्याचे प्रयोग झाले. आणीबाणी उठल्यावरचा जनता पक्षाचा तोच प्रयोग होता पण त्यात अशाच बाजारबुणग्यांचा प्रभाव होता आणि मग पुन्हा इंदिराजींनी बाजी मारली. त्यांच्या हत्याकांडाने देश बिथरलेला असताना राजीव गांधी मोठे यश मिळवून गेले पण ती कॉंग्रेसला मिळालेली संजीवनी नव्हती तर भारतीय जनतेची अगतिकता होती. त्यानंतर भाजपाने पद्धतशीरपणे ‘कवायती सैन्य’ उभारण्याचे काम हाती घेतले. ब्रिटीशांनी जसा प्रस्थापित नबाब, बादशहा वा मराठ्यांच्या सत्तेला पर्याय उभा केला तेच काम 1990 नंतर भाजपाने हाती घेतले.
विचारसरणीचा टेंभा मिरवायचा आणि कृती मात्र सत्तालालसेची करायची हे भारताचे राजकारण होऊन गेलेले होते. त्याचाच लाभ उठवित भाजपा आपली वाटचाल करीत राहिला; तर कॉंग्रेसची बादशाहत असलेल्या नेतृत्वाला कधी आपले स्थान खिळखिळे होत असल्याचे भान येऊ शकले नाही. आधीच्या दहा वर्षात भाजपाचे स्थान थोडे दुबळे झाले होते आणि कॉंग्रेसच्या पुरोगामी खुळखुळ्याला भुललेले पक्ष हाताशी धरून सोनियांनी सत्ता उपभोगली पण बहुमत हाताशी नसताना त्यांची मस्ती इंदिराजी वा राजीवच्या बेछूट मस्तीपेक्षा अजिबात कमी नव्हती. 2013 सालात मनमोहन सरकारने काढलेला एक अध्यादेश पत्रकार परिषदेत फाडून टाकण्याची राहुल गांधींची कृती लाचार असूनही मनमोहनसिंग यांना दुखावून गेली होती. त्यांनी न्यूयॉर्कहून आपली नाराजी सोनियांना कळवली होती. हे नबाबी मस्तवालपणाचे एक ज्वलंत उदाहरण मानता येईल. त्यापेक्षा सिराज उद दौला आपल्या जुन्या निष्ठावान सहकारी व सरदारांचा वेगळा अपमान करीत नव्हता. सिराजची नबाबी व राहुल गांधींची स्थिती तसूभर वेगळी नव्हती. सुंभ जळले तरी पीळ जात नाही म्हणतात, तशी गांधी घराण्याची ही मस्ती लोकांच्या नजरेत भरणारी होती आणि सामान्य जनताही त्याला विटलेली होती पण त्याच घराण्याची हुजरेगिरी करणार्‍या तथाकथित बुद्धीमंत संपादक वा अभ्यासकांमध्ये सत्य बोलण्याची हिंमत राहिलेली नव्हती. त्यात बदल घडवण्याची कुवत असलेला कोणी नेता कॉंग्रेसमध्ये उरलेला नव्हता. त्यामुळे पुढे जाऊन राहुल गांधी आता कॉंग्रेसचे अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांच्या प्रत्येक खुळेपणाचे समर्थन करण्यापेक्षा कॉंग्रेसला व अन्य पुरोगाम्यांना काही काम शिल्लक उरलेले नाही ही आजची राजकीय स्थिती आहे. एकीकडे कवायती फौज म्हणावी असे मोदी-शहांनी उभारलेली निवडणुका जिंकणारी देशव्यापी यंत्रणा आणि दुसरीकडे नुसती पुरोगामी जपमाळ ओढणार्‍या बाजारबुणग्यांचा जमाव.
सिराज उद दौलाची सत्ता संपवून बंगालमध्ये पाय रोवलेल्या ब्रिटीश इंडिया कंपनीने तिथल्या प्रदेशातील जनतेला, व्यापारी, उद्योजक इत्यादींना इतके शाश्‍वत शासन व व्यवस्था दिली की त्यामुळे उर्वरीत भागातील मतलबी, स्वार्थी व बेजबाबदार सुलतान नबाबांविषयी जनतेच्या मनातला तिरस्कार अधिकच वाढत गेला. परिणामी ब्रिटिश कंपनी वा सत्ता आपले हातपाय देशभर पसरत जाऊ शकली. योगायोगाने 2002 सालात गुजरातची दंगल हा देशव्यापी विषय बनवला गेला आणि त्या दंगलीला वा तिथल्या भाजपाच्या मोदी शासनाला ‘हिंदुत्त्वाची प्रयोगशाळा’ असे नाव पुरोगाम्यांनीच दिलेले होते. जे ब्रिटीश कंपनीच्या बाबतीत बंगालमध्ये झाले, तेच भाजपच्या बाबतीत गुजरातमध्ये झाले. मोदींनी जी सत्ता राबवली, त्याची हेटाळणी व अवहेलना तमाम ‘बाजारबुणगे’ पुरोगामी बुद्धिमंत सतत करीत राहिले पण प्रत्यक्षात लोकांना तीच मोदीसत्ता भावत चाललेली होती. एका बाजूला मोदीविषयी देशभर कुतूहल वाढत चालले होते आणि दुसरीकडे कॉंग्रेस व पुरोगामी बाजारबुणगे मोकाट झालेले होते. त्यांच्या संख्यात्मक प्रभावी असलेल्या संघटना वा सुभेदारांच्या विस्कळीत जमावाला चारी मुंड्या चीत करू शकेल, अशी शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फौज संघाकडे सज्ज होती. तिचा योजनाबद्ध वापर करण्याची फक्त गरज होती. मोदी गुजरातमध्ये लागोपाठ तीन विधानसभा जिंकून झाल्यावरच देशाच्या राजकारणात आले. कॉंग्रेस व पुरोगामी पुरते बाजारबुणगे ठरण्यापर्यंत वा निकामी होईपर्यंत मोदींनी त्या दिशेने एकही पाऊल टाकलेले नव्हते पण जेव्हा टाकले तेव्हा बघता बघता पुरोगामी फौजेचा धुव्वा उडवतच त्यांनी घोडदौड केली. त्यातून सिराज उद दौला सावरू शकला नाही आणि आजचे पुरोगामीही सावरू शकलेले नाहीत. सिराजला बदलत्या काळाची चाहूल मिळाली तरी समजून घेता आली नाही आणि आजच्या पुरोगाम्यांची स्थिती तसूभर वेगळी नाही.
गेल्या चार दशकात कॉंग्रेस पक्ष क्रमाक्रमाने रसातळाला गेला, कारण त्याची अशी कुठली विचारधारा नव्हती. स्वतंत्र पक्ष वा जनसंघ म्हणजे आजचा भाजपा यांची अशी एक उजवी किंवा भांडवलधार्जिणी विचारसरणी होती तर दुसरीकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट म्हणवणारी एक डावी विचारसरणी होती. कॉंग्रेस या दोन्हीमध्ये घोटाळणारा पक्ष होता. आरंभीच्या काळात यातले समाजवादी वा कम्युनिस्ट कॉंग्रेसला उजवा म्हणजे भांडवलशाही पक्ष म्हणून हिणवत होते. मग नेहरूंच्या काळातच त्यांनी चलाखीने समाजवादी, साम्यवादी विचारसरणीचे काही मुद्दे उचलून धरले आणि उथळ डाव्यांनी नेहरूंना डोक्यावर घेतले पण उक्तीने समाजवाद बोलणारा कॉंग्रेस पक्ष कधीच समाजवादी विचारधारेचा झालेला नव्हता. दुसरीकडे स्वतंत्र पक्ष विसर्जित झाला आणि त्यातले बहुतांश नेते जनसंघात आले व पुढे भाजपात सहभागी होऊन गेले. देशाची आर्थिक घडी व व्यवस्था कायम मध्यममार्गी राहिली आणि ती कधीच पूर्ण समाजवादी नव्हती की भांडवलवादी नव्हती. त्यामुळेच उजव्या मानल्या गेलेल्या भाजपाला कॉंग्रेस म्हणून असलेला अवकाश व्यापणे सोपे होऊन गेले. तो व्यापण्याला पर्यायही नव्हता कारण भारतीय मानसिकता ओळखून स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली आणि पुढल्या काळात जी राजकीय रस्सीखेच झाली त्यात कॉंग्रेस अधिकच भरकटत गेली. तिला धड डावी किंवा उजवी भूमिका घेता आली नाही. उलट नंतरच्या म्हणजे 1970 नंतरच्या काळात सत्ता मिळवणे व टिकवणे ही एकमेव विचारधारा घेऊन कॉंग्रेस चालत राहिली. कुठले आव्हान नसल्याने ती चालत राहिली. मात्र पक्षाची संघटना नव्याने बांधण्याची त्यांना गरज वाटली नाही आणि तात्पुरते यश मिळवण्यासाठी वाटेल त्या तडजोडी करण्यात धन्यता मानली गेली. परिणामी सर्व वर्गातले व घटकातले सत्तापिपासू बाजारबुणगे तिथे एकवटत गेले, कर्तबगारीला स्थान उरले नाही.
पाच वर्षापूर्वी मोदी बहुमत मिळवू शकतात हे मी सांगू शकलो, त्याचा पाया मला इब्न खालदूनच्या ‘मुकदीमा’ या चौदाव्या शतकातल्या ग्रंथात सापडला होता. कुठलीही राजव्यवस्था वा प्रस्थापित साम्राज्य कसे खिळखिळे होत जाते, त्याचा खालदूनने एक सिद्धांत मांडलेला आहे. त्यानुसारच कॉंग्रेसचा र्‍हास झालेला आहे. मात्र अशा खिळखिळ्या झालेल्या व्यवस्थेला कोणी बाहेरचा आव्हान देणारा उभा राहतो आणि धक्का देतो तोपर्यंत तीच सडलेली व्यवस्था चालू राहते, असे खालदून म्हणतो. तेच इथेही झाले. कॉंग्रेस वा तथाकथित पुरोगामी युपीएला अडवाणी वा भाजपाचे तत्कालीन वरीष्ठ नेतृत्व धक्का देऊ शकत नव्हते कारण तेही त्याच प्रस्थापित व्यवस्थेचा भाग होते. सत्ता कुणाही व्यक्तीची वा पक्षाची येओ, व्यवस्था तीच, तशीच कायम होती. नोकरशाही तीच होती आणि तिच्यावर हुकूमत गाजवणारी बौद्धिक सत्ताही तशीच्या तशी होती. तिला जनता सरकार आल्याने वा वाजपेयी सरकार आल्याने कुठला धक्का लागलेला नव्हता. लागण्याची शक्यताही नव्हती पण मोदी मैदानात आल्यावर एक एक करून हे पडद्यामागून हुकूमत चालवणार्‍या अदृष्य शक्ती उजागर होऊ लागल्या. शाहू महाराजांनी त्याला ‘ब्राह्मण ब्युरॉक्रासी’ असे नाव दिले आहे, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. इंटेलेक्चुअल क्लास वा सिव्हील सोसायटी असे जे चमत्कारिक शब्द आपण ऐकत असतो, त्यालाच शाहू महाराज ‘ब्राह्मण ब्युरॉक्रासी’ म्हणतात. त्याचा अर्थ ‘ब्राह्मण जातीचे वर्चस्व’ असा अजिबात नाही. त्याचा अर्थ आपणच बुद्धिमान आहोत आणि जगातले वा व्यवस्थेतील काय चांगले वा वाईट आहे ते ठरवण्याचा परस्सर अधिकार हाती घेऊन बसलेले स्वयंघोषित विचारवंत, म्हणजे ब्राह्मण ब्युरॉक्रासी असते. त्यात जन्माने ब्राह्मण असलेल्याचा शाहू महाराजांच्या कालखंडात भरणा होता. आज त्यात विविध जातींचा व त्यात जन्म घेऊन तिथपर्यंत पोहोचलेल्यांचा भरणा आहे.
हे लोक ग्रीक समाजात वा अगदी अलीकडल्या काळात सोवियत वा पाश्‍चात्य समाजातही दिसतील. उदाहरणार्थ युरोपियन युनियन वा राष्ट्रसंघ म्हणून जगावर आपल्या इच्छा लादणारे नोकरशहा म्हणजे ब्युरॉक्रॉसी असते. आपल्या सोयीनुसार हे लोक व्याख्या वा नियम बदलत असतात व लादतही असतात. अशांना शरण जाणार नाहीत, त्यांना शत्रू वा पापी घोषित करण्याचे अमोघ अस्त्र त्यांनी हाती धारण केलेले असते. ते त्यांना जनतेने दिलेले नसते वा कोणी अधिकृत केलेले नसते. तुमच्या मनातील हळवेपणा वा चांगुलपणाचे भांडवल करून अशी मंडळी कुठल्याही प्रस्थापित व्यवस्थेवर आपली हुकूमत निर्माण करीत असतात. राजे-रजवाडे वा सुलतान बादशहांच्या जमान्यातही तुम्हाला त्यांची असली हुकूमत दिसून येईल. जेव्हा प्रस्थापित राजकीय सत्ता त्यांना झुगारून लावते तेव्हा आपले अस्तित्व, महत्त्व टिकवायला हेच लोक कुठल्याही नियमाला वाकवून अर्थ व आशय बदलूनही टाकतात. बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. आज प्रत्येक क्षणी कॉंग्रेसवाले उठसूट बाबासाहेबांची घटना वा विचारांचे हवाले देताना दिसतील पण बाबासाहेब हयात असताना त्यांना लोकसभेत निवडून येण्यात सर्वाधिक अडथळे त्यांनीच आणलेले आहेत. मुंबई महापालिकेतर्फे बाबासाहेबांचा सत्कार करण्यात हेच मांजर आडवे गेलेले आहे आणि त्यांच्याच स्मारकासाठीचे तत्कालीन प्रस्ताव मुंबई महापालिकेत फेटाळण्याचे पाप कॉंग्रेसनेच केलेले आहे. मात्र आज सत्तेसाठी व आपली थोरवी टिकवण्यासाठी तेच कॉंग्रेस विचारवंत वा भाट अगत्याने उठसूट बाबसाहेबांच्या वक्तव्ये व विचारांचे हवाले देताना दिसतील. त्यालाच शाहू महाराज ‘ब्राह्मण ब्युरॉक्रॉसी’ म्हणतात. आजच्या जमान्यात तीच सिव्हील सोसायटी असते. जोपर्यंत अशी ब्युरॉक्रॉसी पाठीशी असते तोवर जनमानसावर हुकूमत राखायला सत्तेला मदत होत असते आणि त्याच ब्युरॉक्रॉसीला संपवल्याशिवाय खरेखुरे परिवर्तन होऊ शकत नसते.
महाराष्ट्रात पेशवाई संपुष्टात आली किंवा बंगालमध्ये त्या काळात सिराज उद दौलाची सत्ता निकालात निघाली तेव्हाही असा वर्ग सर्वात प्रथम नव्या सत्तेला शरणागत झालेला आढळून येईल. मात्र जोवर त्यांना जुनी सत्ता टिकण्याची आशा असते, तोपर्यंत हे त्या कालबाह्य सत्तेला टिकवण्यासाठी आपली बुद्धी पणाला लावत असतात. आता मोदी विरोधात उठणारी वादळे, पुरस्कार वापसी इत्यादी घटना त्याचीच उदाहरणे आहेत. नुसते पुरोगामी पक्ष वा त्यांची विचारसरणी कालबाह्य झालेली नाही तर सामान्य जनमानसावर असलेली त्यांची हुकूमतही संपुष्टात आलेली आहे. लोक मागल्या मतदानात मोदींच्या मागे गेले, ते नुसती आश्‍वासने आवडली म्हणून नाही तर लोकांना कॉंग्रेस व तिला मान्यता देणार्‍या या ब्युरॉक्रॉसीला संपवायचे होते. ते काम अल्पावधीत शक्य नाही. काही प्रमाणात मोदींनी त्याला हात घातलेला आहे पण पुन्हा मोदी निवडून आले तर मात्र ही ब्युरॉक्रॉसी संपणार आहे. यापैकी अनेकजण नव्या व्यवस्थेत आपले स्थान पक्के करण्यासाठी वेगवेगळी कारणे व मीमांसा शोधू लागतील. आजही त्यातले बहुतेक कॉंग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी झगडत आहेत. त्याचे कारण पुरोगामी विचारसरणी असे काहीही नसून, त्यांना आपले प्रस्थापित स्थान टिकवून ठेवायचे आहे पण त्याचा उपयोग होणार नाही. 2019 सालात पुन्हा मोदी सत्ता संपादन करतील. त्यानंतर हळुहळू या प्रस्थापिताला शेवटचे हादरे बसू लागतील. ती नामशेष होत जाईल आणि त्यातले अनेकजण मोदी अर्थशास्त्र, मोदी राज्यशास्त्र वा मोदी विचारधारा यांची नव्याने मांडणी सुरू करतील. साहजिकच ती नव्या युगाची नवी ब्युरॉक्रॉसी असेल. कुठलीही जुनी व्यवस्था मोडकळीस येऊन संपते तेव्हा त्याच्याजागी येणारी नवी व्यवस्था प्रस्थापित होत असताना, नवे दुर्गुण घेऊनच येत असते आणि आपोआप प्रतिगामीच होत असते. आज ज्याला पुरोगामी म्हणतात तेच मुळात प्रतिगामी झालेले आहे.
कुठल्याही व्यवस्थेत तिची प्रबळ बाजू निरूपयोगी ठरू लागली, की मग ती बोजा होत असते. त्याचा आधार घेऊन ती व्यवस्था टिकू शकत नसते तर त्याच बोजामुळे ती व्यवस्था दबून, चिरडून जाण्याची स्थिती निर्माण होत असते. आज नेहरूंचे नाव पुसले जाते आहे आणि त्यांच्या कर्तबगारीच्या खाणाखुणा नष्ट केल्या जात आहेत, असा ओरडा सातत्याने ऐकू येत असतो. त्या खाणाखुणा मुळातच कशाला हव्यात, याचा खुलासा कोणी देऊ शकत नाही. कधीकाळी राजेशाही थाट असलेले राजवाडे वा किल्लेही आज अवशेष होऊन राहिले आहेत. त्यांची तशी दुर्दशा कोणी केली? जुन्या पराक्रमाच्या खुणा खरेच इतक्या महत्त्वाच्या असतील तर नेहरूपर्वाच्या आधीच्याही इतिहासाची तितकीच जपणूक व्हायला नको काय? पण तशी ओरड करणारी त्या त्या काळातील ब्युरॉक्रॉसी आज शिल्लक नाही. जी ब्युरॉक्रॉसी कशीबशी टिकून आहे तिला नेहरू युगापेक्षाही आपल्या अस्तित्वाच्या चिंतेने भेडसावून टाकलेले आहे. मोदी हे कॉंग्रेससमोरचे स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठे आव्हान आहे, असे तेव्हाच कॉंग्रेसनेते जयराम रमेश यांनी म्हटलेले होते आणि पाच वर्षापूर्वी मी तशी स्पष्ट कल्पना माझ्या पुस्तकातून मांडलेली होती. मोदी यांचे राष्ट्रीय राजकारणातील पदार्पण किंवा मिळणारे यश, हे नुसते सत्तांतर नसेल, ती नेहरू युगाच्या शेवटाची सुरूवात असेल असेही मी तेव्हाच नमूद करून ठेवलेले होते पण ज्याला नेहरूवादी ब्युरॉक्रॉसी असे मी म्हणतो, त्यांना आपल्या मस्तीतून जाग यायलाही चार वर्षे खर्ची पडलेली आहेत. मोदींना मिळालेले बहुमत हा त्यांना अपवाद किंवा इतिहासातील गफलत वाटलेली होती. त्यांच्याच आहारी गेलेल्या कॉंग्रेस वा अन्य पुरोगाम्यांनाही म्हणूनच समोरून अंगावर येणारे संकट बघता आले नाही की समजून घेता आलेले नव्हते. आज दिसत आहेत, ते त्याचे परिणाम आहेत.
इब्न खालदून इतक्यासाठीच महत्त्वाचा आहे. तो म्हणतो, मनगटी बळावर, कर्तृत्वावर साम्राज्य उभे करणार्‍यांनी एकदा प्रस्थापित होण्याचा पवित्रा घेतला की मग क्रमाक्रमाने त्यांच्यातली लढायची वृत्ती संपत जाते आणि ऐषाराम व मुजोरी त्यांना घेरू लागते. त्यातून येणारे शैथिल्य त्यांना आळशी बनवत जाते आणि इतरांच्या पराक्रमावर आपली सत्ता व हुकूमत टिकवण्यासाठी त्यांना अगतिक व्हावे लागते. तशात इतरांनी साथ दिली नाही वा पाठ दाखवली, मग त्यांचा क्षय अटळ असतो. कॉंग्रेस त्याच दिशेने अनेक वर्षे वाटचाल करीत होती आणि ही ब्युरॉक्रॉसी नेहरूंच्या वारसाला गादीवर बसवून पुन्हा साम्राज्याला सुवर्णकाळ येईल, म्हणून आशाळभूतपणे आजही अपेक्षा करीत आहेत. ही सिव्हील सोसायटी वा इंटेलेक्चुअल्स वा शाहू महाराज म्हणतात, ती ‘ब्राह्मण ब्युरॉक्रॉसी’ नेमकी नजरेसमोर आणायची असेल तर सत्यजीत रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ चित्रपटाचे कथानक आठवावे. तिकडे कंपनी सरकारची तैनाती कवायती फौज अवध संस्थान ताब्यात घेण्यासाठी चाल करून येत असते आणि त्याच नबाबाचे खंदे सरदार सक्तीच्या लढाईला चुकवून दूर कुठल्या खेड्यात बुद्धीबळाचा फड रंगवायला पळून गेलेले असतात. ते राज्यावर आलेल्या संकटाचा सामना करण्यापासून पळ काढत असतात आणि त्याचवेळी घरातल्या कुठल्याशा कुरबुरीचा संशय व भांडणातून एक्मेकांवर तलवारी उपसून अंगावरही जात असतात. बंगलोर येथील कुमारस्वामींच्या शपथविधीला हात उंचावून अभिवादन करणारे तमाम पुरोगामी सरदार सुभेदार त्यापेक्षा किंचित वेगळे आहेत काय? त्यांच्या विजयाच्या वल्गना करीत मोदी-शहांच्या कवायती सैन्याला शाब्दिक आव्हाने देणारे बुद्धिजीवी पुरोगामी म्हणूनच अधिक केविलवाणे होऊन गेलेले आहेत. कारण त्यांना आपला अपरिहार्य अंत दिसू लागला आहे आणि काहीही करू शकत नसल्याचे वैफल्य अधिक सतावू लागलेले आहे.
‘आम्ही शहरी नक्षलवादी’ असले फलक गळ्यात अडकवून बसलेले गिरीश कर्नाड वा अन्य कोणी तत्सम तमाशे करतात, तेव्हा म्हणूनच दया येते. त्यांनी भले कितीही बंडखोरीचा आव आणावा पण त्यापैकी कोणीही बंडखोर वा परिवर्तनवादी नसून ते ‘जैसे थे वादी’ आहेत. ते असलेली कालबाह्य व्यवस्था टिकवण्यासाठी आटापिटा करणारे प्रस्थापित आहेत. बंड हे कधीही प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात होत असते. अमेरिकेत हिलरी क्लिटंन पराभूत झाल्या, त्याचे हेच कारण होते. त्यांनी भले बंडखोरीचा आव आणलेला होता पण तिथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या त्या प्रतिनिधी होत्या. गेल्या कित्येक दशकात अमेरिकेत दुर्लक्षित राहिलेला जो वर्ग आहे, त्याला असल्या ढोंगाचा कंटाळा आलेला होता. इथेही लक्षात येईल, की राहुल गांधी हे बंडखोर नाहीत. मोदी हा दिल्लीच्या प्रस्थापित वर्तुळाच्या बाहेरचा चेहरा आहे. प्रस्थापित म्हणजे सरकार नसते, तर त्या सत्तेला बळ देणारा वा आपल्या इच्छेनुसार वाकवणारा जो वर्ग असतो, त्याला प्रस्थापित म्हणतात. जे कोणी आज गळचेपी वा मुस्कटदाबीचा आरोप सातत्याने करीत असतात, ते सत्तर वर्षातल्या लोकशाहीचे सर्वात मोठे मुजोर लाभार्थी आहेत. सोशल मीडियापासून वाहिन्यांवर बोलणार्‍यांपर्यंत, जे अच्छे दिन कुठे आहेत असा सवाल करतात, त्यांच्यासाठी बुरे दिन कधी व कुठले होते? हे चर्चा बघणार्‍या वा ऐकणार्‍याला तात्काळ कळते. बँकेच्या रांगेत नोटाबंदीच्या काळात गेलेले राहुल गांधी पूर्वी कधी बँकेत गेले तरी होते काय? मग अकस्मात त्या रांगेत उभे राहिलेले राहुल सामान्य माणसाला ढोंगी वाटणे स्वाभाविक असते. इतरही असले काहीतरी बोलणारे हे सर्वच्या सर्व लाभार्थी असतात. त्यांच्या अशा ढोंगाविषयीच्या तिटकारा व तिरस्कारातूनच मोदी या यशापर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्याना कालबाह्य खेळी व डावपेच खेळून पराभूत करता येणार नाही आणि बाजारबुणग्यांच्या आवाक्यातली ती गोष्ट नाही.
आजवर सत्ता भोगलेल्या अनेक पक्षातील एकएक नेता व तसा लाभार्थी, गुपचूप आपले संस्थान व प्रभावक्षेत्र टिकवण्यासाठी उठून भाजपात दाखल झाला आहे. पूर्वीच्याही काळात हेच होत राहिले. आपल्या क्षेत्रात आपलीच सत्ता कायम राखण्यासाठी तेव्हाचे पाटील, देशमुख वा महसुलदार वर्ग क्रमाक्रमाने मुघल वा विविध सत्तांना सहभागी होत गेला. पेशवाईला बाजारबुणग्यांनी बुडवले आणि पुरोगामी कंपूलाही तशाच बाजारबुणग्यांच्या खोगीरभरतीने रसातळला नेलेले आहे. आपल्यासाठी कोणीतरी लढावे व आपल्याला सत्तेची गोमटी फळे चाखता यावीत, अशी अपेक्षा बाळगणारे आशाळभूत कुठले साम्राज्य वाचवू शकत नाहीत की टिकवू शकत नाहीत. ते बोलघेवडे असतात आणि शब्दांचे सामर्थ्य जनमानसावर टिकण्यापर्यंतच त्यांची सद्दी असते. त्यांनी कुणा लेच्यापेच्याला सेनापती बनवले वा त्याचे कितीही पोवाडे गायले, म्हणून पुरूषार्थ उद्भवत नसतो. त्यांना हवे असलेले साम्राज्य रसातळाला जाण्यापासून वाचवू शकत नसतो. प्लासीची लढाई म्हणूनच एक उद्बोधक उदाहरण आहे. पुरोगाम्यांची स्थिती आज बाजारबुणग्यांची खोगीरभरती अशी झालेली आहे. त्यांच्यापाशी बौद्धिक वा नैतिक सामर्थ्य शिल्लक राहिलेले नाही, की मनगटी सामर्थ्य त्यांना सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही! कारण त्यांच्या शब्दात वा बुद्धीतही ती प्रेरणा शिल्लक उरलेली नाही. त्यातला पोकळपणा चव्हाट्यावर आलेला आहे. जादू संपलेल्या तंत्रानेच त्यांना काहीतरी चमत्कार घडण्याची खुळी आशा खुणावत असते. ती फलद्रूप होण्याची बिलकूल शक्यता नाही. बाजारबुणगे लढाया मारू शकले असते तर ब्रिटीशांची सत्ता इथे शिरकाव करून घेऊ शकली नसती, की भारताचा इतिहास आज दिसतो तसा घडला नसता. एक मात्र मान्य करायला हवे, की बाजारबुणग्यांचा आवाज व गर्जना मोठ्या असतात पण त्या निष्फळच ठरणार्‍या असतात. 
कुठलीही कालबाह्य सडलेली व्यवस्था संपुष्टात येण्याला पर्याय नसतो. जोवर असा पर्याय उभा राहत नाही, तोवर कितीही नासलेली व्यवस्थाही चालत राहते. म्हणून तीच व्यवस्था योग्य वा सुसंगत मानण्यात अर्थ नसतो. जेव्हा असा पर्याय उभा राहतो तेव्हा बघता बघता जुनी व्यवस्था ढासळून पडू लागते. सोवियत युनियन हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. ती कोसळल्याने रशिया संपला नाही, की तो देश रसातळाला गेला नाही. त्याला तिथेच पर्याय निर्माण झाला. कॉंग्रेस वा पुरोगामी भूमिका हाही कालबाह्य झालेला विषय आहे आणि ती निरूपयोगी झालेली मूल्यव्यवस्था आहे. ती व्यवहारात 1991 सालातच मुक्त अर्थकारणाने निकालात काढलेली होती पण तितक्या वेगाने नवा बदल पुढे रेटणारा राजकीय व नेतृत्वाचा पर्याय समोर आला नाही. म्हणून 2014 साल उजाडावे लागले. त्यामुळे भारतात राजकीय सत्तांतर झाले तरी व्यवस्थेतले स्थित्यंतर मात्र रेंगाळत पडून राहिले होते. मोदींच्या रुपाने तसा राजकीय पर्याय उभा राहिला आणि शासकीय पातळीवर त्या बदलाला गती आली तर अमित शहांच्या रुपाने संघटनात्मक नेतृत्व उभे करू शकणारा पर्याय समोर आल्यावर उरलीसुरली कॉंग्रेस व पुरोगामी व्यवस्थेला सुरूंग लागलेला आहे. त्यावर शेवटचा घाव आगामी लोकसभेत घातला जाईल आणि देशातले स्थित्यंतर वेगाने पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळेल. त्याची गती आता बाजारबुणगे झालेले पुरोगामी नेते व पक्ष रोखू शकणार नाहीत. जितके ते एकत्र येऊन मोदींना रोखू बघतील, तितके अधिक पाठबळ मिळून मोदींच्या पारड्यात मतदार अधिक मतांची भर घालत जातील. सिराज उद दौला ज्या कारणास्तव प्लासीची लढाई जिंकू शकला नाही त्याच कारणास्तव पुरोगामी आघाडी वा त्यातले बाजारबुणगे पुरोगामी पक्ष मोदींना रोखू शकत नाहीत. इतिहासाची अशी पुनरावृत्ती होत असते. ती ओळखता व समजून घेता आली पाहिजे इतकेच.
- भाऊ तोरसेकर 
९७०२१३४६२४ 
मासिक 'साहित्य चपराक' दिवाळी विशेषांक २०१८