Monday, June 20, 2016

पु. ल. भक्त आणि वास्तवाची जाणीव


साप्ताहिक 'चपराक' २० जून २०१६ 
- राजू परूळेकर
अनेकवेळा आपण अनेक दगडांना शेंदूर फासतो आणि त्याची देव म्हणून पूजा करतो. एखाद्यावेळी तो शेंदूर नखाने किंचित जरी उखडला तरी लक्षात येते की, अरे हासुद्धा दगडच आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक राजू परूळेकर हे सातत्याने असा शेंदूर उखडून अनेकांना उघडे पाडतात. मागच्या आठवड्यात त्यांनी पु. ल. देशपांडे नावाच्या एका लेखकावर अशीच एक ‘फेसबुक पोस्ट’ टाकली आणि त्यावरून वादळ उठले. व्यक्तिपूजा मानणार्‍या देशात विरोधी विचार स्वीकारायचाच नाही असे एक गढूळ राजकारण केले जाते. त्यामुळे परूळेकरांवर अंध पु. ल. भक्तांनी चौफेर हल्ला चढवला. परूळेकरांसारख्या खमक्या पत्रकारावर वैचारिक हल्लाबोल झाल्यानंतर त्यांनीही पु. ल. भक्तांना शिंगावर घेतले. अंधानुकरण करणार्‍या अनुयायांना राजू परूळेकर यांनी दिलेली ही सणसणीत चपराक...

पु. ल. देशपांडे यांच्या भक्तांना मागच्या आठवड्यात पुलंच्या स्मरणार्थ मी लिहिलेलं एवढं बोचले की, त्यांनी फक्त माझा शारीरिक खून करण्याचे बाकी ठेवले. यात डॉक्टर होते, वकील होते, इंजिनिअर होते, संजय मोने यांच्यासारखे कलाकार होते. वास्तवामध्ये मला स्वतःला परत माझी पोस्ट वाचताना मी काय चुकीचे लिहिले होते हे कळले नाही. व्यक्तिश: पुलंविषयी व्यक्तिगत चुकीचे असे मी काही लिहिले नव्हते. त्यांच्या लेखनाविषयी ते कालबाह्य झाले आहे, हे मी लिहिले. त्यांची प्रवासवर्णने भूक्कड आणि कोटीबाज होती, हे मी लिहिले. या मताशी आजही मी प्रामाणिक आहे. याव्यतिरिक्त पुलंनी आणीबाणी वगळता एकदाही टोकदार राजकीय, सामाजिक भूमिका घेतली नाही असं मी म्हटलं होतं. यात अक्षरशः काहीही असत्य नाही. ज्या काळात पुलंचा उदय झाला त्या काळात सरकार नियंत्रित आणि सरकार केंद्रीत माध्यमे उपलब्ध होती. त्या काळात पुलंना भारत सरकारने जवळजवळ वर्षभर बीबीसीमध्ये डेप्युटेशनवर पाठवले होते. भारत सरकारने दूरदर्शन सुरू केल्यावर पु. ल. देशपांडे हे पहिले होते ज्यांनी दूरदर्शनवर जवाहरलाल नेहरू यांची मुलाखत घेतली. या गोष्टी सरकारच्या मर्जीत असल्याशिवाय होतात का? याच काळात पु. ल. पश्चिम जर्मनी, पूर्व जर्मनी, फ्रान्स वगैरे देशात फिरले. यावरून त्यांनी नंतर ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ वगैरे प्रवासवर्णने लिहिली आहेत. वास्तवामध्ये त्या काळात शीतयुद्ध सुरू होते. पूर्व युरोपात लेखक, कवी, विचारवंत, शास्त्रज्ञ यांचा अमानुष छळ सुरू होता. त्याचे पडसाद पश्चिम जर्मनी, फ्रान्स इथेही पडत होते. आता पूर्व युरोपात त्या छळ छावण्यांची म्युझियम्स झाली आहेत, मी स्वतः ती पाहिली आहेत. जिज्ञासू तिथे जाऊन पाहू शकतात. हंगेरीतील बुडापेस्ट येथील असेच एक म्युझियम मी जेव्हा पाहिले आणि त्याचे फोटो घेतले तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. तेव्हाच्या झेकोस्लावियामध्ये (आता झेक आणि स्लोवाकिया असे दोन स्वतंत्र देश झाले आहेत.) वाक्लाव हावेल आणि त्यांच्यासारखे इतर अनेक लेखक, कवी, विचारवंत लढत होते आणि शिक्षा भोगत होते. त्याच काळात ‘चॅप्टर 77’ नावाचा एक जाहीरनामा या सर्वांनी मिळून जाहीर केला. तो काळ होता 1977 चा. जगाच्या पूर्वेकडे अशांतता, दडपशाहीविरुद्ध आंदोलन आणि अमानुषतेची परिसीमा कमी नव्हती. 1963 पासून कंबोडियासारख्या देशात पॉल पॉट या कम्युनिस्ट हुकुमशहाने हाहाकार माजवला होता. त्याने लाखो माणसे मारून कवट्यांचा डोंगर उभा केला होता. हा खरा ‘पूर्वरंग’ होता, ज्याची ‘अपूर्वाई’ पुलंना कधी वाटली नाही. कारण, या सर्व देशांशी भारत सरकारचे चांगले संबंध होते. त्यामुळे भारतातून जाणारे ‘लेखक’, ’कवी’, ’विचारवंत’ हे असेच निवडले जात जे गोड, सुखावह आणि भारतातील लोकांना आनंददायक असे जगाचे वर्णन करतील. अशा वेळेला पुलंसारख्या चतुरस्त्र लेखकाकडून खरे जाणण्याची अपेक्षा करायची नाही तर कुणाकडून करायची, असा माझा सवाल होता. मी रक्तबंबाळ हा शब्द त्या संदर्भात वापरला होता. अनेकांनी मला पुलंची तुलना ’समकालीन जिनिअस’ लेखक, कवी आणि विचारवंतांशी केली म्हणून दुषणे दिली आहेत. आता लेखकाची तुलना समकालीन लेखकांशी करायची नाही, तर काय समकालीन गवंड्यांशी करायची?
खर्‍या लेखकाने प्रवासवर्णने लिहिताना तिथल्या मानवी दुःखाची बाजू प्रथम घ्यावी अशी अपेक्षा असते. आपल्या इथले सरकारच्या मेहरबानीने परदेशात जाणारे लेखक तिथला सरकारी पाहुणचार, ऑम्लेट, निसर्गसौंदर्य आणि सरकारी औदार्य यांचे रसभरीत वर्णन करत असत. पु. ल. देशपांडे यांनी या वर्णनाला त्यांच्या उपजत हजरजबाबीपणाचा वापर करत विनोदाची जोड दिली. परंतु तो ह्युमर हा ब्लॅक ह्युमर नव्हता, ‘पर्सनल इज पॉलिटिकल’ या तत्त्वाला नाकारणारा सर्वांना आवडेल असा टवाळखोर विनोद होता. पु. ल. यांनी लेखक म्हणून जगभरच्या आपल्या जातकुळीच्या सर्व लेखक, विचारवंतांशी केलेला हा बोटचेपेपणा होता.
पण त्यामुळे 90 च्या दशकात ऐतिहासिक सत्य जसजसे समोर आले तसतसे पुलंच्या प्रवास वर्णनातील भूक्कडपणा, बुद्धिमान कोटीबाजपणा आणि सरकारी कल मला जाणवला. मी तसे लिहिले. वर उल्लेख केलेले वाक्लाव हावेल यांना पुढे साहित्याचे नोबेल मिळाले. एवढेच नव्हे, तर झेक आणि स्लोवाकिया वेगवेगळे झाल्यावर ते झेक रिपब्लिकचे अध्यक्ष झाले. वाक्लाव हावेल यांच्यासारखे अनेक होते, पण त्यांचे एकच उदाहरण अशासाठी दिले की, त्यांच्या उदाहरणावरून या चळवळी बरोबर होत्या आणि नैतिकसुद्धा होत्या हे सगळ्यांना समजावे.
त्या काळात भारत सरकारच्या परवानगीशिवाय आणि मर्जीशिवाय लेखकांना असे फिरायला मिळत नसे. त्यामुळे इथल्या जनतेला बाहेरचे जग प्रतिकात्मक रुपात तरी पुलंसारख्या लेखकाकडून समजायला हवे होते अशी अपेक्षा मी केली तर त्यात काय चूक?
1996 मध्ये सेना-भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर पहिला ’महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार (ठाकरेंनी नव्हे!) आणि पाच लाख रुपये परितोषिक म्हणून पु. ल. यांना प्रदान केले. पु. ल. नंतर एकदा भाषणात सहज म्हणून गेले की, ’गुंडही निवडणुकीद्वारे सत्तेत येतात.’ हे एक ऐतिहासिक सत्य होते; मात्र ठाकरे यांनी याला व्यक्तिगत केले आणि ‘झक मारली आणि यांना ’महाराष्ट्र भूषण’ केले’ असे उद्गार जाहीर सभेत काढले. बाळासाहेब ठाकरे यांच्या या विधानानंतर पु. ल. यांनी तो पुरस्कार त्याच्या रकमेसह परत करावा, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. कवी नारायण सुर्वे यांच्यापासून कवी वसंत बापट यांच्यासह (तेव्हा ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते) अनेकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली. याउलट पुलंनी ना पुरस्कार परत केला ना बाळासाहेब ठाकरेंवर कोणतीही टीकेची प्रतिक्रिया दिली वा नापसंती व्यक्त केली. वास्तविक पु. ल. यांच्या दातृत्वाने मी स्वतः प्रभावित आहे, ज्याबद्दल मी माझ्या मूळ पोस्टमध्ये कृतज्ञताही व्यक्त केली आहे. पु. ल. देशपांडे यांचं स्थान महाराष्ट्राच्या मनात युती सरकार आणि ‘महाराष्ट्र भूषण’ पेक्षा कितीतरी जास्त वरचं होतं. त्यांच्या एका कृतीने किंवा प्रतिक्रियेने समाजात वैचारिक चैतन्य पसरू शकले असते जे त्यांनी केले नाही. उलट, त्यांनंतर काही काळाने सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पुण्याच्या घरी जाऊन भेटले असता दोघांची अगदी सोहार्दपूर्ण, प्रेमळ गुरुशिष्य (बाळासाहेब ठाकरे यांच्या शैक्षणिक जीवनात पु.ल. देशपांडे त्यांचे गुरू होते) भेट झाली. धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य! याला बोटचेपेपणा म्हणत नाहीत तर दुसरा शब्द सुचवा.
राहिला मुद्दा पुलंचा विनोद कालबाह्य झाल्याचा. जागतिक कीर्तीचे प्रख्यात लेखक, कवी आणि विचारवंत दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी हेच मुद्दे वस्तुनिष्ठपणे आपल्या एका प्रदीर्घ लेखातून मांडले आहेत. त्यांची पुनरोक्ती मी टाळतो. माझी पोस्ट वाचून मेघनाद कुलकर्णी यांनी या गोष्टीची मला आठवण करून दिली. आठवण अशासाठी की, दिलीप चित्रे यांचे वडील पुरुषोत्तम चित्रे ’अभिरुची’ हा अंक काढत असत. पु.लंनी आपल्या लेखनाची सुरुवात जिथून केली त्यात ’अभिरुची’चे नाव अग्रक्रमाने येते. पु.लंच्या विनोदावरील दिलीप चित्रे यांचा हा वस्तुनिष्ठ चिरफाड करणारा लेख प्रसिद्ध झाल्यावर पु.ल. मनातून खवळले आणि अनुल्लेखाने ’अभिरुची’ अंकाचा डिझर्वड् उल्लेख त्यांनी आयुष्यभर टाळला.
व्यक्तिश: माझी पुरुषोत्तम चित्रे यांच्याशी त्यांच्या अखेरच्या काळात भेट झाली. ते मला पत्रेही (पोस्टकार्ड) लिहित. माझा सहावा लेख मी त्यांच्या ’अभिरुची’ या अंकासाठी लिहिला होता, हे मला नीट आठवते. तो अंक आणि त्यांची पत्रे आजही माझ्याकडे आहेत. त्याच्यातील विजीगिषु वृत्ती मला आजही थक्क करते. कारण तेव्हा मी विशीत होतो आणि ते त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात आणि तरीही ते माझ्याकडून आग्रहाने पाठी लागून लेखन करून घेत असत.
हा सारा लेखाजोखा मी एखाद्या पुस्तकाएवढा वाढवू शकतो. पण समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व करणार्‍यांनी माझा ज्या पद्धतीने उद्धार केला की, पु.लं आणि त्यांच्या भक्तांविरुद्ध असा काय गुन्हा मी केला होता, हा प्रश्न मला पडतो. उलट पु.ल. देशपांडे हे अतिशय विद्वान्, चतुरस्र, हजरजबाबी लेखक होते.
त्यांना भारतीय संगीताची अद्भुत समज होती. ज्यामुळे अनेक थोर गायक त्यानी प्रसिद्धिला आणले. त्यांचे एक लोकप्रियतेचे व दातृत्वाचे युग होते. ज्याचे महाराष्ट्रावर अपार ऋण आहेत त्याला नमन, त्यांचे स्मरण आहेच. त्यांना प्रेमाचा प्रणाम असे मी माझ्या पु.ल. देशपांडे यांच्यावरील पोस्टमध्ये लिहिलं आहे. यात अनादराचा प्रश्न येतोच कुठे?
याउलट शेकडो पु.ल. भक्तांनी माझ्या कामाविषयी, माझ्यावर, माझ्या पुस्तकांची, माझ्या लेखनाची, मी जे काही करतो याची कोणतीही माहिती नसताना अत्यंत शुद्र शेरेबाजी केली (काही अपवाद वगळता). या शेरेबाजीचे सार व बहुसंख्य महाराष्ट्राचे मन, संजय मोने नावाचे कलावंत का कोणीतरी आहेत त्यांनी दोनच ओळीत समर्पक रीतीने व्यक्त केलेले आहे. त्या दोन ओळी संजय उवाच अशा लिहून मी आपला या विषयापुरता निरोप घेत आहे. याउप्पर आपण काय प्रतिक्रिया देता याने माझ्या विचारांच्या ठामपणाला काहीही फरक पडत नाही.
संजय (मोने) उवाच : परुळेकरांनी लिहिलेले कालबाह्य व्हायला हवे असेल तर लगेच ही चर्चा खुडून टाका..

1 comment:

  1. श्री परुळेकर ह्यांनी लोकप्रभेत नितेश राणेंवर लिहिलेला लेख पहा. हा लेख जर उपरोधिक /खवचट असेल तर भाऊ आपल्याला मराठी भाषा कळतच नाही. अन्यथा खमक्या आणि विरोधकांना शिंगावर घेणार्या पत्रकाराचे चरित्र लगेच समजून येते.त्यातील काही निवडक वाक्य अशी ...
    आरतीच्या वेळी मात्र आम्ही सर्वजण एकत्र उभे होतो (देवासमोर सर्व समान!) त्यात माझ्या एका बाजूला राज होता, दुसऱ्या बाजूला नितेश राणे. त्या रात्री मी डायरी लिहिताना नोंद केली. नितेश राणे A man to be watched.
    २.नितेशला ए.सी. चालत नाही. त्याला लगेच ब्राँकायटीसचा त्रास होऊन तापापर्यंत प्रकरण जाऊ शकतं. त्यामुळे त्याच्यासोबत चर्चा करताना ए.सी., पंखे बंद असतात. मला हे भयानक वाटतं
    ३.दुसरं म्हणजे ‘झेंडा’ नावाचा एक विकृत चित्रपट उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने आणि कशाकशाने अवधूत गुप्ते नावाच्या माणसाने नारायणराव, राज ठाकरे व इतर अनेकांचं असत्यावर आधारित चारित्र्यहनन करणारा चित्रपट काढला. नितेशने ‘झेंडा’विरुद्ध बंड उभारलं ते आपल्या वडिलांच्या प्रेमातून. ते बंड राजकीय नव्हतं.
    ४.उद्धवने एखाद्याला पकडला (उदा. आदेश बांदेकर, अवधूत गुप्ते) की त्यांच्या करियरचं वाटोळं निश्चित! राजने एखाद्याला माफ केलं की धोका लाखपट जास्त हा माझा अनुभव...

    ReplyDelete