Tuesday, April 26, 2016

'शोध' रद्दीतल्या मोत्यांचा!

‘वाचनसंस्कृती संपुष्टात आली’ अशी तक्रार सर्वच पातळीवरून मोठ्या प्रमाणात केली जाते. पुस्तक मिळविणे आणि सर्वांनी वाचणे हा ‘कौटुंबिक कार्यक्रम’कोणे एकेकाळी अनुभवाला येत होता. तो आता दृष्टिस पडत नाही. ‘मराठी भाषेतून शिक्षण दिले जात नाही, त्यामुळे नवी पिढी वेगाने मराठी साहित्यापासून दूर जाते आहे’ असेही निरीक्षण नोंदविले जाते. दुसर्‍या बाजूने 40 ते 65 या वयोगटातील रसिकवाचनवेडा माणूस पुस्तकाच्या शोधात मुशाफिरी करताना दिसतो. अशांची संख्या अत्यल्प असली तरी अशा ‘मुशाफिरी’मुळे पुस्तकांचा शोध, दुर्मीळ पुस्तकांची दखल घेण्याची प्रवृत्ती आणि वाचनावरील प्रेम हे घटक अजूनही समाजात टिकून आहेत. त्या अनुषंगाने काही उपेक्षित पुस्तकांची भेट कशी कशी होत गेली त्याचा वृत्तांत व त्या पुस्तकांचा संक्षिप्त परिचय सुप्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे यांच्या या नव्या सदरातून करून देण्यात येत आहे.


साप्ताहिक 'चपराक'चे नवे सदर!

उपेक्षित पुस्तकांचे जग
दिल्लीतली एक सकाळ. एक फूटपाथ आणि त्यावर रचून ठेवलेला पुस्तकांचा ढीग. आपण या फूटपाथवरून हळूहळू पाहत पाहत चालत राहायचं असतं. डाव्या किंवा उजव्या बाजूला अनेक पुस्तकं असतात. दुर्मीळ, उपेक्षित, फाटलेली, अत्यंत जुनी, क्वचित नवीसुध्दा. इथे तुम्हाला हवी असलेली पुस्तकं हमखास मिळू शकतात. फक्त शोधण्यासाठी भरपूर वेळ आपल्याकडे असला पाहिजे आणि चिकाटी देखील असली पाहिजे. येथे फक्त दर्दी मंडळी गर्दी करतात आणि ही गर्दी भाजीमार्केटमध्ये असावी इतकीसुध्दा असू शकते. म्हणजे पुस्तकं शोधायला माणसांची जास्त गर्दी असत नाही, ही आपली कल्पना इथे उधळली जाते. आपण हळूहळू चालत राहायचं असतं आणि शांतपणे पुस्तकं शोधत राहायचं असतं. कोणतं माणिक अचानकपणे हाती येईल याचा काही नियम इथे नसतो. इथे गर्दी असली तरी गोंगाट मात्र नसतो. माणसं शांतपणे भोवतालच्या जुन्या पिवळ्या पडलेल्या पुस्तकांच्या रद्दीमधून हिरे-मोती आणि मौल्यवान रत्नं शोधत असतात. आपणसुध्दा शांतपणे हिंडून हेच करायचं असतं. मी येथे हिंडतो, पाहतो आहे. मला योगी अरविंदांच्या छायाचित्रांचा कुणीतरी फार पूर्वी प्रकाशित केलेला संग्रह सापडतो किंवा महात्मा गांधींची फारशी माहीत नसलेली पत्रे दुर्लक्षित पुस्तकांतून छापलेली सापडतात. मृच्छकटिकची खूप जुनी प्रत सापडते. हडप्पा व मोहोंजोदडो येथे सापडलेली चित्रलिपी वाचली गेली नाही असा आपला समज करून देण्यात आलेला असतो; पण येथे ’द इन्डस स्क्रिप्ट ऍन्ड द ॠग्वेद’ हे पुस्तक अचानक सापडतं. ब्रिटीश साहसिकांनी गंगा नदीतून केलेल्या प्रवासावर आधारित रोमहर्षक असं 1932 मध्ये लिहिलेलं पुस्तक सापडतं. आपण शोधत राहायचं असतं. आपल्या हाती काय सापडेल याचा इथे नियम नसतो.
उपेक्षित पुस्तके दुर्मीळ असतात आणि दुर्मीळ पुस्तके उपेक्षित राहत जातात, असा काहीतरी नियम आहे. जी पुस्तके आपण वाचली पाहिजेत असं काहींना वाटतं त्यांच्याकडून काही पुस्तके आपल्याला वारंवार उपलब्ध करून दिली जातात आणि म्हणून कदाचित वाचकप्रिय ठरतात. त्याव्यतिरिक्त उपलब्ध साधनसामुग्रीच्या आधारे वाईट पध्दतीने छापलेली, मुद्रण दोष असलेली, चुकीच्या प्रकाशकाच्या हातात पडलेली अशी अनेक उत्तम व उपेक्षित पुस्तके पर्यायाने दुर्मीळ होत जातात. अशा पुस्तकांचा शोध घेणं हे चांगल्या वाचकासमोरचं आव्हान असतं.

* * *
उपेक्षित पुस्तकांचं एक विश्‍व आहे. अफाट, विशाल असं. मुळात पुस्तकांचं विश्‍वच इतकं विशाल आहे की एक जीवन संपून जातं तरी पुस्तकं शिल्लक राहतात. या विश्‍वात हरवून जाण्याचं भाग्य सर्वांच्या वाट्याला येत नाही. थोडे भाग्यवान त्या वाटेने जातात आणि ‘काळ अनंत आहे-पृथ्वी विपुल आहे’ असा अनुभव घेतात. उरलेले थोडे या मार्गावर घुटमळतात पण हरवून जात नाहीत. मात्र ज्ञानप्रकाशाने दिपून जातात. बाकी बहुसंख्य अन्न-वस्त्र-निवारा निर्माण करण्यासाठी अर्थार्जन नावाचा संघर्ष करीत राहतात आणि संपून जातात. पुस्तकांच्या जगाचा आणि त्यांचा त्यामुळे संपर्क येत नाही.
किती प्रकारची किती पुस्तकं अस्तित्त्वात आहेत! एक लेखक वाचनालयात जायला घाबरत असे. तो म्हणे की आपण एखादंच पुस्तक लिहिण्यासाठी आत्म्याची ताकद पणाला लावतो आणि इथं किती पुस्तकं आहेत! त्या तुलनेने आपली पुस्तकं किती आणि आपलं स्थान काय? आपण किती छोटे-नगण्य आहोत! स्वत:च्या ’छोटेपणाचा’ अनुभव देणार्‍या पुस्तक संग्रहालयाकडे तो फिरकत नसे म्हणे.
उपेक्षित पुस्तकांचं एक वेगळं विश्‍व आहे. या पुस्तकात काहीतरी विलक्षण असं असतंच. काहीतरी सांगायचंही असतं, पण दुर्लक्षित राहिलेलं असतं. प्रचलित वाटांनी न जाता, अशा दुर्लक्षित पुस्तकांचा मागोवा घेणं जास्त अवघड आणि साहसाचं काम असतं. त्यातून प्रसिद्ध पुस्तके सगळेच वाचतात. मात्र अशा उपेक्षित पुस्तकांना कोण वाचणार? मी मोठ्या कुतुहलाने अशा दुर्लक्षित पुस्तकांचा शोध घेण्याची सवय ठेवली. विलक्षण असं बरंच हाती लागू शकतं असं लक्षात आलं.

* * *
कोण्या व्यं. तु. कुलकर्णी नावाच्या माणसाने एक छोटंसं चोपडं लिहिलं आहे, ’गंडातराच्या फेर्‍यात’ नावाचं. वाईट छपाई, पिवळी पानं, यामुळे त्या पुस्तकाला कोणी हात लावला नसणार. या लेखकाने सन एकोणीसशे वीस पासूनच्या आठवणी सांगितल्या आहेत. प्रदेश जुन्या निजामशाहीचा. दुर्गम आणि मागास असा. लेखकाचा दावा असा की तो सामान्य जीवन जगला असला तरी त्याला सतत ’गंडांतरांना’ तोंड द्यावं लागलं आहे. लेखकाने पुढीलप्रमाणे नोंद केली आहे, ’एखाद्या सामान्य माणसाच्या आयुष्यात किती म्हणून अपघात होऊ शकतात? आणि त्या प्रत्येक अपघातातून प्रत्येक वेळी मरणाच्या दारात जाऊन तो परतही कसा येऊ शकतो? दुसर्‍या कुणाचे माहीत नाही परंतु माझ्या स्वत:च्या आयुष्यात मात्र मी आतापर्यंत कितीतरी गंडांतरात सापडलो आहे, ज्यामध्ये मरणाशिवाय पर्याय नव्हता... माझे जीवन अगदी साधे, सामान्य आणि धोपटमार्गाने गेले आहे... तरीही त्यात कितीतरी अपघाताची आणि संकटाची मालिका आहे...’
कुलकर्णी निजामाच्या राज्यात नोकरीत होते. मराठवाडा-तेलंगणात. पोलेपल्ली या गावात मुक्कामाला असताना मित्राबरोबर ते माडपल्ली गावावरून पायी परतत होते. मित्र म्हणाला की मी मळ्यातून थोडी भाजी घेऊन येतो, तुम्ही थांबा. कुलकर्णी वाट पाहत थांबले आणि शेजारच्या ’पपईच्या झाडाला’ टेकून उभे राहिले. झाड मऊ आणि थंड लागले. तसं हाताने चाचपडून पाहू लागले तर दोन महाभुजंग त्यांच्या दोन्ही बाजूने ’धप्पकन’ पडले आणि त्वरेने निघून गेले. कुलकर्णी ज्याला पपईचे झाड समजले ती प्रत्यक्षात बारा फुटी लांबीच्या प्रचंड महाभुजंगाची ’लागड’ होती. शेपटीवर उभे राहून ते सर्प प्रणय करीत होते. कुलकर्णींची बोबडी वळाली. घाबरलेले हे दोन मित्र पोलेपल्ली गावात आले. पोलेपल्ली ते माडपल्ली या डोंगरामध्ये हे दोन महाभुजंग काही लोकांनी पाहिले होते. कुलकर्णी ही हकीकत रंगवून सांगतात आणि त्यांनी आपल्याला दंश का केला नाही याचा विचार करतात. धप्पकन पडून दोन दिशेने निघून जाणारे प्रचंड सर्प आपल्याही डोळ्यासमोर उभे राहतात.
ग्रामीण जीवनाचा वन्य जीवनाशी संपर्क तुटला नव्हता त्या काळातील, दुर्गम भागातली अस्वलांची आठवण कुलकर्णी सांगतात. काही मित्रं आणि कुलकर्णी स्वत: हैद्राबाद सरकारच्या आदेशानुसार मधुमक्षी पालनाच्या संशोधनाच्या कामावर होते. देवरकुंडा तालुक्यातील चिंतापल्लीच्या (चिंचवनाच्या) जंगलात मधमाशांची पोळी हुडकण्याचे काम त्यांना करायचे होते. एकदा दहा किलो मध काढून, चपराशाजवळ भांडी देऊन, टॉर्च घेऊन ते पहाड उतरत होते. तेव्हा अस्वलांच्या टोळीने त्यांचा पाठलाग सुरू केला. बादलीतला मध एका दगडावर ओतून ठेवला त्यांनी. कारण तो मध चाटून खाईपर्यंत यांना इकडे लपण्याची व्यवस्था करता आली असती; पण चपराशांना मात्र सरळ मार्गाने धावत जायच्या सूचना देण्यात आल्या. अस्वले कुलकर्णींच्या मागावरच होती. कुलकर्णी आणि मित्रांनी हत्तीपेक्षा मोठ्या तीन दगडांच्या पोटातल्या पोकळीत आश्रय घेतला आणि चुलीसारख्या रचनेचं तोंड एका मोठ्या दगडाने बंद करून टॉर्च घेऊन बसून राहिले. एक तास काही घडलं नाही. मग मात्र त्यांच्या दगडी निवार्‍याभोवती अस्वले फिरत आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. आतून काटक्या पेटवून शेकोटी करण्यात आली. झरोक्यातून अस्वले त्यांच्याकडे रात्रभर पाहत होती पण अस्वले आत आली नाहीत. गेलीही नाहीत. आतला एक सर्पराज मात्र धुरामुळे बाहेर पडला. त्याला आतल्या आत त्यांनी दगडांनी मारलं आणि पहाटे बाहेर पडून मित्रमंडळी धावत सुटली. अस्वले मात्र कंटाळून दूर गेली होती.
कुलकर्णी आपल्या छोटेखानी पुस्तकात असे अनेक प्रसंग सांगतात. अपघाताने प्रेतागारात अडकून पडावे लागणे, निजामशाहीतील रझाकारांशी सामना, सापाने केलेला पाठलाग, पाण्यातून वाहून जाण्याचा प्रसंग, भुताचे दर्शन, वाघाने केलेला पाठलाग, माकडांच्या टोळीत सापडण्याचा प्रसंग, मराठी माणसांसाठी बलुची लोकांशी केलेले भांडण आणि मराठी माणसांची निष्क्रियता इत्यादी प्रसंग कुलकर्णी यांनी रंगवून सांगितले आहेत.
हे पुस्तक रद्दीत पडलं होतं. छापणार्‍याने बहुधा ’कुमार वाङमय’ म्हणून छापलं असावं. (आणि वाईट छापलं होतं!) वाचणार्‍याने (कोणी वाचलं असेल तर) सुरस कथा म्हणून वाचलं असेल. सांगणार्‍याने मात्र सर्वस्व ओतून सांगितलं आहे. कारण निदान तेवीस वेळा तरी त्याचा मरणाशी मुकाबला झाला आहे. आता या पुस्तकाचं साहित्यमूल्य काय आहे? वाङ्मयीन इत्यादी दर्जा काय आहे? या पुस्तकाकडे कोण लक्ष देणार? माझ्यासारखा रद्दीतून मोती शोधणारा एखादा कदाचित ते पुस्तक वाचेल. एरव्ही हे पुस्तक उपेक्षित, दुर्लक्षित असंच राहणार आणि भेळवाल्याकडे जाणार.  

(पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक 'चपराक' पुणे)
- भारत सासणे
204, लक्ष्मी एनक्लेव्ह,
गणेश खिंड रस्ता,
मॉडेल कॉलनी जवळ,
शिवाजीनगर, पुणे 411016.
भ्रमणध्वनी : 9422073833


Wednesday, April 20, 2016

ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स नावाच्या 'शांताराम'ची कहाणी

(परीक्षण पूर्वप्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक', पुणे)

‘‘आय हॅव बीन इन टू पॉलिटीक्स ऑल माय लाईफ.’’  हेच ते वाक्य. ते वाचून काही अंदाज येतो? हे वाक्य कुठल्या क्षेत्रातील व्यक्तीचं आहे याचा? अचूक अंदाजाच्या जवळपास तरी पोहोचता येईल? खूप कठीण आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस! किंवा नेल्सन मंडेला, फिडल कास्ट्रो, चे गव्हेरा यांनाच शोभून दिसेल असं हे वाक्य! मग ते आहे तरी कुणाचं? तर ते एकेकाळच्या अंडरवर्ल्ड गँगस्टरचं आहे! दचकलात ना? मग आता त्याची कहाणी वाचाच! ग्रेगरी डेव्हीड रॉबर्टस्! आधी ऑस्टे्रलिया, मग मुंबई. दोन्हीकडच्या अंडरवर्ल्डमध्ये वावरलेला हा गँगस्टर. त्याच्या आत्मचरित्रातलं हे वाक्य. शितावरून भाताची परीक्षा होते व या एका वाक्यावरून गे्रगरी डेव्हीड रॉबर्टसची. त्याचं हे मूळ इंग्रजी आत्मचरित्र, ‘शांताराम’! जगभर गाजलं ते. ग्रंथाची धाटणी आत्मचरित्रात्मक कादंबरीची. तीसपेक्षा अधिक भाषांत याचं भाषांतर झालं. पन्नास लाख प्रती खपल्या त्याच्या. मग ते आलं मराठीत. ते केलं नाशिकच्या अपर्णा वेलणकरांनी. मराठी भाषांतर मोठं झालं. चौदाशे पानं. मूळ लेखनच अतिशय प्रांजळ. थेट ‘सत्य’ सांगणारं. अगदी त्याच्या आयुष्यातले सत्याचे प्रयोगच! सगळी सत्ये जीवघेणी! अंगावर येऊन आदळणारी! ग्रेगरी जणू जन्मजात लेखक! जन्मानं ऑस्ट्रेलियन. त्याचा आवाका अफाट! सगळ्याच बाबतीतला. मानवी आयुष्य, अंडरवर्ल्ड, अवती भोवतीचं व अगदी आंतरराष्ट्रीय राजकारण, इतिहास सगळ्याच बाबतीतली समज अफाट! दुसरीकडे अपर्णा वेलणकर! पेशानं पत्रकार व भाषांतरकार. वेलणकरांना शंभरपैकी दोनशे गुण द्यावेत. तसं भाषांतरच केलंय शांतारामचं त्यांनी. साहित्याच्या क्षेत्रातले सगळे पुरस्कार. ते सगळे ओवाळून टाकावेत असं हे भाषांतर! कठीण काम होतं; मात्र ते किती चोख करावं? त्याचं हे उदाहरण. असं असलं तरी या भाषांतराला कुठलाही महत्त्वाचा पुरस्कार मिळाल्याचं ऐकण्यात वा वाचण्यात नाही. असो!
मग ग्रेगरी असं नेमकं का म्हणतो? ‘‘आय हॅव बीन इन्टू पॉलिटिक्स ऑल माय लाईफ.’’ त्यासाठी त्याच्या वादळी आयुष्यातली ही सगळी पानं. ती काळजीपूर्वक  वाचावी लागतात. दोनदोन वेळा वाचावी लागतात. प्रसंगी तीन-तीनदा वाचावी लागतात. या आत्मचरित्रात्मक कादंबरीची सुरूवात. ती मुंबई शहरापासून होते. अर्थातच ग्रेगरीच्या आयुष्यात मुंबईचं स्थान खूप महत्त्वाचं; मात्र ही कहाणी त्याच्याही खूप आधीपासून सुरू होते. ग्रेगरीच्या तरूणपणापासून. ‘‘कट्टर साम्यवादी विचारांच्या कुटुंबात मी वाढलो.’’ ग्रेगरीनंच आत्मचरित्रात हे सांगितलं आहे. त्याच्यावर हा संस्कार त्याच्या आईकडून झाला.  आई-वडिलांबद्दल त्यानं अत्यंत मोजकंच लिहिलंय. अगदी सगळं मिळून फार तर पानभर असेल ते; मात्र त्यावरूनही वाचकांना काही कयास करता येतो. ग्रेगरीची आई पक्की समाजवादी होती. खूप खंबीर स्त्री असली पाहिजे ती. ‘‘आयुष्यात जे काही करशील ते हिमतीनं कर. हिंमत हारला नाहीस तर फार भरकटणार नाहीस तू!’’ त्याची आई एकदा त्याला म्हणाली होती. दुसरा मुद्दा ‘मी आयुष्यभर राजकारणच जगलो’ असं तो जे म्हणतो त्याचा. कुठलाही साम्यवादी तरूण घ्या, त्याचा राजकारणाचा अभ्यास असतोच. अनेक राजकीय प्रश्‍नांचा तो विचार करत असतो. सामाजिक प्रश्‍नांचा विचार करत असतो. अभ्यासाची सवय असते. ग्रेगरीचं तसंच झालं. अशी मुलं मग अनेक चळवळीत भाग घेतातच. कर्तव्य म्हणून करतात हे ते सगळं. गे्रगरीलाही राजकारण खूप लवकर उमगू लागलं. अगदी आंतरराष्ट्रीय प्रश्‍नही समजू लागले. अमेरिकनं व्हिएतनामवर युद्ध लादलं हा तो काळ. या युद्धात अमेरिकेनं ऑस्ट्रेलियालाही ओढलं. व्हिएतनामनं अमेरिका व ऑस्ट्रेलियाला कठोर प्रतिकार केला. अनेक अमेरिकन व ऑस्ट्रेलियन सैनिकांचे बळी जाऊ लागले. अमेरिकेत युद्धविरोधी निदर्शन सुरू झाली. ऑस्ट्रेलियातही हेच घडलं. तिथले तरूण रस्त्यावर उतरले. मागणी करू लागले. ऑस्ट्रेलियानं युद्धातून माघार घ्यावं ही ती मागणी. या रस्त्यावरच्या तरूणांमध्ये ग्रेगरी होताच. त्यावेळी प्रसंगी त्यानं बॉम्बही बनवले. मोर्चे काढले. पोलिसांविरूद्धच्या रस्त्यावरील लढाया लढल्या. एकतर अमेरिकेचं व्हिएतनामवरचं आक्रमणच होतं हे. व्हिएतनाममधल्या बळींची संख्याही थोडी थोडकी नव्हती. ग्रेगरीचा पिंड साम्यवादी विचारांच्या मुशीत घडलेला. या आक्रमणाकडे तो सर्वच बाजूंनी पाहत असला पाहिजे. त्यातल्या साम्राज्यवादी राजकारणात लक्षावधी माणसांचे बळी जात होते. ते पाहून त्याची झोप उडाली नसती तरच नवल.
तरूण वयात प्रत्येकाचा कोणीतरी हिरो असतो. तसा ग्रेगरीचाही होता. नेड केली. हा केली तेव्हा पोलिसांशी झालेल्या एका चकमकीत मारला गेला. या गोष्टीचा गे्रगरीवर खूप खोल परिणाम झाला. आंतरराष्ट्रीय क्रांतिकारक ‘चे गव्हेरा.’ या गव्हेराचं स्थानही ग्रेगरीच्या आयुष्यात खूप मोठं; मात्र ‘चे’ बद्दल त्यानं एखादं वाक्यच लिहिलं आहे. त्यावरून त्याची ‘चे’ वरची श्रद्धा मात्र समजते. ग्रेगरीचं ते तरूण वय. त्यात कवी मन. सगळ्या क्रांतिकारक चळवळीत सहभाग. असा सगळा त्याचा तो काळ. त्याच दरम्यान तो प्रेमात पडला. तो व ती. दोघं एकमेकांच्या प्रेमात. नाव सांगितलंच पाहिजे तिचं. क्लेरी. देखणी होती ती; मात्र वस्ताद. इतक्या उमद्या मनाचा तरूण तिच्या आयुष्यात आला होता! तिला आनंद व्हायला हवा होता याचा. अभिमान वाटायला हवा होता त्याचा; मात्र पोरगी पक्की व्यवहारी व धूर्त! अगदी कावेबाज म्हणायलाही हरकत नाही. तिला जाणवलं, हा माणूस पटेल ते करणारा. स्वतःपेक्षा अवती भोवतीच्या परिस्थितीचा विचार करणारा. आपण समाजाचं काही देणं लागतो असं मानणारा. त्याचं हे असं असणं. तिला चक्क बेजबाबदारपणाचं लक्षण वाटायला लागलं ते. मग या अंबाबाईनं एका बेसावध क्षणी काय करावं? या लेकराला तिनं चक्क सांगून टाकलं, ‘‘यू आर इंटरेस्टेड इन एव्हरीथिंग ऍन्ड कमिटेड टू नथींग.’’ (तुला सगळ्यात तोंड घालायला आवडत, पण जबाबदारी घ्यायला तयार नसतोस तू.) असं म्हणून त्याला त्या बिचारीनं कायमचं ‘टाटा बाय बाय’ करून टाकलं. कोवळ्या, स्वप्नाळू वयातला तो प्रेमभंग! तो त्यानं पचवला. भविष्यात अशा आणखी काही रंभा-उर्वशी त्याच्या आयुष्यात येणार होत्या. त्यावेळी ते त्याला माहीत नव्हतं इतकंच. तिच्या नकारानं त्याच्या मनावर जखम केली मात्र. या क्लेरीची आठवण त्याला आयुष्यात पुन्हा कधी यावी? अनेक वर्षांनी त्यानंतर तो अफगाणिस्तानमध्ये होता. तिथं भयानक युद्ध पेटलं होतं. तेव्हा रशियन सैन्य अफगाणिस्तानमध्ये होतं. मग तिथल्या अफगाण मुजाहिदीनांनी सोविएत रशियाच्या या सैन्यासोबत युद्धच पुकारलं.  या मुजाहिदींनांना अमेरिकेचं पाठबळ. या युद्धात ग्रेगरी सापडला. भयंकर चक्रव्यूह!! तो तेव्हा मुजाहिदीनांना मदत करायला तिथं गेला होता. नाईलाज होता त्याचा. 1985 साल होतं ते. मृत्युची टांगती तलवार सतत डोक्यावर. अवतीभवती युद्ध पेटलेलं. कित्येकजण त्याच्या समोरच मारले गेलेले. माणसांच्या शरीराच्या चिंध्या होताना पाहत होता तो तिथं! नुसता अमानुष रक्तपात!! अन् अशावेळी त्याला कुणाची आठवण यावी? तर क्लेरीची! काय तरी पहिलं प्रेम? पहिलं प्रेम कधी कुठं आठवण काढेल सांगता येत नाही; मात्र खरी गंमत पुढेच आहे. क्लेरीच्या त्या वाक्याबद्दल ग्रेेगरीनं त्याचंही मत लिहिलंय. काय लिहितो तो? तर ‘‘बरोबर होतं तिचं. खरं होतं ती म्हणत होती ते’’ ग्रेगरी म्हणतो. मात्र बेजबाबदार कोण होतं? गे्रगरी की क्लेरी? ग्रेगरी आता जगप्रसिद्ध लेखक आहे व एक सच्चा, दिलेर, पारदर्शी माणूस सुद्धा! हे दुर्दैव ग्रेगरीचं नव्हे तर क्लेरीचं होतं का? व्यवहारी क्लेरीला एक सुंदर व्यक्तिमत्त्व ओळखता आलं नाही का? त्याच्यातला क्रांतिकारक व बंडखोर माणूसही ओळखता आला नाही का? व त्याचं हळवं कवी मन देखील? आता इथं ‘जर तर’ला अर्थ नाही. कदाचित क्लेरी आयुष्यात आली नाही म्हणूनच पुढचं महाभारत घडलं. ग्रेगरीकडून ‘शांताराम’नावाचं हे महाकाव्यच लिहून झालं. या महाकाव्यात अनेक नायक होते; मात्र महानायक एकच होता, ग्रेगरी डेव्हिड रॉबर्टस; मात्र त्यातही एक महत्त्वाचा मुद्दा. ग्रेगरीनं स्वतःला कुठंही नायक वा महानायक मानलं नाही. संपूर्ण आत्मचरित्रात कुठंही फुशारकी व ‘मी’पणा नाही. त्याच्या सगळ्या घोडचुका. त्या त्यानं या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. अगदी मोकळेपणानं. स्वतःचे रागलोभ, प्रेम, द्वेष, लैंगिक वासना काहीही लपवून ठेवलं नाही. स्वतःचं माणूस असणं त्याला नेहमी महत्त्वाचं वाटलं. तो स्वतःही प्रचंड माणूसवेडा! माणसं ओळखणारा. त्याच्या या अवाढव्य आत्मचरित्रात माणसाच्या स्वभावाचे असंख्य नमुने आहेत. इथं प्रेमळ माणसं आहेत. दिलेर माणसं आहेत. खुनशी माणसं आहेत. पाताळयंत्री माणसं आहेत. खोटारडी माणसं आहेत. कारस्थानी माणसं आहेत. प्रामाणिक माणसं आहेत. मेहनती माणसं आहेत. सगळ्या प्रकारची माणसं आहेत. त्यानं आयुष्यात माणसं अचूक ओळखली. त्यात सहसा चूक झाली नाही; मात्र त्याआधीच्या काळात त्याचं वैवाहिक आयुष्य मात्र संपलं. घटस्फोट झाला. मुलीचा ताबा मिळाला नाही. त्यातून नैराश्य आलं. व्यसनं जडली. पावलं गुन्हेगारीकडं वळली. वृत्तीच एका गुन्हेगाराची झाली. बायको कारणीभूत झाली का या सगळ्याला? ग्रेगरीनं मात्र तिला दोष दिलेला नाही. तिचा उल्लेखच तो करत नाही. तर तिथं तो जवळपास गप्प राहणंच पसंत करतो. एरवी तो बोलतो तो त्याच्या लेखणीतूनच. ‘‘निदान लिहिताना तरी मी स्वतःशी प्रामाणिक राहिलो, म्हणूनच कदाचित माझं लाजिरवाणं आयुष्य मला पेलता आलं. ते दिवस निभावले गेले व निराशा आली नाही’’ तो एकेठिकाणी म्हणतो सुद्धा.
तर असा हा ग्रेगरी. आस्ट्रेलियात एका रॉबरीच्या गंभीर गुन्ह्यात अडकला. शिक्षा झाली. किती? तर एकोणीस वर्षांची. शिक्षा भोगतच होता; मात्र तुरूंगातून पळून जाण्याचे विचार मनातून जाईनात. मग हा तुरूंग फोडून पळाला. खायचं काम नव्हतं ते. एकेका पावलावर मृत्यू उभा होता. यत्किंचिंत चूक व्हायचा अवकाश, ठार मारला गेला असता तो. ते ऑस्टे्रलियाचं ‘मॅक्झिमम सिक्युरिटी प्रिझन’ होतं. तिथले बंदुकधारी सुरक्षारक्षक. ते डोळ्यात तेल घालून पहारा देत. हा त्यांच्या डोळ्यात धूळ फेकून पळाला. तो प्रसंग वाचताना जिभेला कोरड पडते. खड्डा पडतो भीतीनं पोटात! फक्त एक सहकारी या धाडसात त्याच्या बरोबर होता. तुरूंगातून पळाला हा व ‘रेड कॉर्नर नोटीस’चा धनीही झाला. तुरूंगातून पळाल्यानंतर बारा दिवसांनी हा कुणाकडे गेला असेल? तर त्याच्या आवडत्या प्राध्यापकांकडे. तो पूर्वी शिकत होता ते विद्यापीठ. ते प्राध्यापक तिथं ‘तत्त्वज्ञान’ हा विषय शिकवत. ज्यू होते ते. अत्यंत बुद्धिमान, गाढे अभ्यासक व विचारवंत असं तो त्यांचं वर्णन करतो. या दोघांमधला संवाद. वाचकांनी तो मुळातून वाचावा. सरांची ती भेट ग्रेगरी कधीच विसरू शकला नाही. काय म्हणाले त्याचे सर त्याला? ‘‘कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी काय वाटेल ते कर; पण एकदा केलेली चूक पुन्हा करू नकोस. बंदुकीचा धाक दाखवून लोकांना लुबाडण्याचे तुझे धंदे आता बंद कर. यापुढं तू कधीही बंदुकीला हात लावता कामा नये.’’ ग्रेगरी सुन्न! ऐकत राहिला सर काय म्हणतात ते. ग्रेगरीबरोबर आणखी एक कैदी पळाला होता. सरांनी गे्रगरीला स्वच्छ सांगितलं, ‘‘त्याची संगत सोड. नाहीतर त्याच्यामुळं तुही पकडला जाशील.’’ आणखी काय म्हणाले त्याचे सर त्याला? ‘‘देशाबाहेर पड व जग फिरून ये. फार बोलू नकोस. गरज असेल तेवढीच माहिती लोकांना द्यावी.... ऍन्ड आस्क पीपल फॉर हेल्प. मदत मागायला लाजू नकोस. यू विल बी ऑल राईट.... सगळं नीट होईल. काळजी करू नकोस. तुझं आयुष्य ही एका विलक्षण धाडसाची कहाणी असेल.... आत्ता कुठं तुझ्या कहाणीची सुरूवात होतेय.’’ पुढं सहा महिन्यांनी काय घडलं? तर ग्रेगरीचा तो कैदी मित्र पकडला गेला. सरांनी सांगितलं होतं तसंच घडलं. त्यांनी ग्रेगरीला याबाबतीत सावध केलं नसतं तर? ग्रेगरी मित्रांच्या बाबतीत तसा भाबडा. तो स्वतःहून त्या मित्रापासून कधीच दूर गेला नसता; मात्र तो धोका सरांमुळं टळला. सरांकडेच जावं असं त्याला का वाटलं? याचं उत्तर तो देतो. ‘‘तसं का वाटलं हे मला तेव्हा समजलं नव्हतं. आजही नाही सांगता येणार... आय जस्ट हॅड टू स्पीक टू हिम. काहीही करून मला त्यांना भेटायचं होतं.’’ त्यावेळी पोलीस गे्रगरीला शोधत होते. सरांचं विद्यापीठ शहराच्या टोकाला. धोका पत्करून हा तिथपर्यंत गेला. आश्‍चर्य असं, सर त्याची वाटच पहात होते. ‘‘तू माझ्याकडं येशील हे माहीत होतं मला..’’ त्यांचं पहिलंच वाक्य होतं. त्याची पूर्वीची प्रेयसी क्लेरा व पहिली पत्नी एकीकडे व दुसरीकडं हे सर. दोघांच्या दृष्टिकोनात जमीन-आस्मानाचं अंतर. त्या दोघी केवळ अपघातानं ग्रेगरीच्या आयुष्यात आल्या होत्या का? सरांचं नक्कीच तसं नव्हतं. सरांना ग्रेगरीची कुवत कळली होती का? आवाका समजला होता का? नक्कीच! मात्र त्यासाठी माणसांची पारख व मानवी आयुष्याची अफाट समज असायला लागते. सरांकडे ती होती.
तर कादंबरी अशी क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवत पुढे जाते. क्षणभरही खाली ठेववत नाही. आता हा ग्रेगरी ‘शांताराम’ कधी झाला? तर तो मुंबईत आल्यानंतर. तुरूंगातून पळाल्यानंतर काय घडलं? तर न्युझीलंड, आफ्रिका, आशिया, युरोप. ग्रेगरी असा सगळीकडं भटकत राहिला. रेड कॉर्नर नोटीस होतीच. मग नकली पासपोर्ट व बनावट कागद पत्रं. त्याच्या आधारे तो देशोदेशींच्या सुरक्षा व्यवस्थेला हूल देत राहिला. असं करत तो एकदाचा आला ते आपल्या मुंबईत. साल होतं 1982. विमानतळावर तो उतरला. कुठं जायचं? काय करायचं? माहीत नव्हतं. विमानतळावर प्रभाकर खाडे उभा होता. नियतीच्या रूपात जणू गे्रगरीची वाटच पहात होता तो. ग्रेगरीचा महाराष्ट्रातला पहिला मित्र. दोघं जीवाभावाचे यारदोस्त झाले. जळगावमधील ‘सुंदर’ हे प्रभाकरचं गाव. प्रभाकरनं आधी ग्रेगरीला झोपडी मिळूवन दिली. कुठं? तर मुंबईत कुलाब्याच्या झोपडपट्टीत. ग्रेगरीनं इथं मुंबईतल्या झोपडपट्टीतलं सगळं मानवी आयुष्यच वाचकांपुढे उभं केलं आहे. काही दिवसांनी प्रभाकरनं ठरवलं. तो ग्रेगरीला सुंदर या आपल्या गावी घेऊन गेला. हा तिथं राहिला चक्क सहाएक महिने. तिथल्या माणसात मिसळून गेला. शेतात राबला. मराठी शिकू लागला. प्रभाकरचे वडील किसनबाबा व आई रखमाबाई. दोघांशीही ग्रेगरीची गट्टी जमली. रखमाबाईला ग्रेगरीचं नाव मात्र खटकू लागलं. पटकन् उच्चार तर करता आला पाहिजे. त्याचं टोपणनावही तिला रूचेना. मग एका क्षणी त्या माऊलीनं त्याला सांगितलं, ‘‘आजपासून तू आमचा शांताराम.’’ शांतारामच का? तर काही प्रसंगात तो शांतपणे विचार करत असताना ती त्याला पाहत होती. ग्रेगरी शांताराम झाला. भारत नावाच्या या देशात मग तो मिसळून गेला. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. मुंबई हे त्याचं घरच झालं. हिंदी तर उत्तम शिकलाच शिवाय मराठीवर प्रेम जडलं ते आजतागायत. शांतारामचं मराठीत भाषांतर होतंय हे कळलं तेव्हा त्याला स्वर्ग दोन बोटे उरला. भाषांतरकार अपर्णा वेलणकर. त्यांना तो भेटला. त्यांचा जिगरी मित्रही झाला. शांतारामध्ये एकापेक्षा एक असे प्रसंग येतात. ही चौदाशे पानं आपण पुन्हा पुन्हा वाचत राहतो व संपूर्ण शांताराममय होऊन जातो. काहीवेळा अटळपणे डोळ्यात अश्रू उभे राहतात.
ही कहाणी इथंच संपत नाही. सत्य हे अद्भूतच असतं. ग्रेगरीनं कुलाब्याच्या झोपडपट्टीत मोफत दवाखाना चालवला. दवाखाना म्हणजे काय? तर त्याची एवढीशी झोपडी हाच दवाखाना. सकाळी उपचारासाठी रांग लागे. हा पूर्ण मोफत उपचार करे. रूपयाही घेत नसे. अगदी गंभीर जखमांवर टाके घालण्यापासून त्यानं उपचार केले. यासाठी गोळ्या-औषधं, इंजेक्शन्स वगैरे हा कुठून पैदा करत होता? तर खार जवळच्या फाट्यावर रेल्वे साईडिंगचं एक आवार होतं. तिथं कुष्ठरोग्यांची वस्ती होती. त्यांच्याकडून हा औषधे आणत असे. आता इतकी भारी भारी औषधं तिथं कुठून येत? हे मुळापासून वाचलं तर आश्‍चर्यानं टाळूला चिकटलेली जीभ पुन्हा मूळ पदावर येणं कठीण. या औषधांचा खर्च करणारी व्यक्ती कोण होती? हेही पुस्तकातच वाचलेलं बरं. ग्रेगरी मुंबईत येताच पक्का मुंबईकर झाला. मात्र त्याला एक जाणीव झाली होती. हे शहर निष्पापांचं नाही. ‘‘मुंबईत येऊन फार काळ लोटला नसला तरी पैशाच्या तालावर नाचणार्‍या या शहराचा भ्रष्ट, विकला गेलेला चेहरा मी अनेकदा पाहिला होता’’ तो एकेठिकाणी स्वच्छच म्हणतो. याकाळात त्यानं मुंबईतलं अर्थकारण पाहिलं. विशेषतः देशी-विदेशी चलनाच्या काळ्या बाजाराचं त्यानं निरीक्षण केलं. त्याचा अभ्यास केला. त्याला हे गरजेचं होतं. कारण तो अंडरवर्ल्डमध्ये वावरत होता. याच काळ्या बाजारात काम करत होता. हे सगळं ग्रंथात  तो मांडतो. कसलाच आडपडदा ठेवत नाही. प्रत्येक गोष्ट तो त्यातल्या असंख्य बारकाव्यानिशी मांडतो. ती कुठंही कंटाळवाणी होत नाही. समजायला जड होत नाही. मुंबईबद्दल त्यानं खूप लिहिलंय या ग्रंथात. अपर्णा वेलणकरांच्याच शब्दात सांगायचं तर, ‘ग्रेगरीची मुंबई माझ्या ओळखीची नव्हती.’ ग्रेगरीला सगळी मुंबई पाठ! अगदी तळहातावरच्या रेषा पाहाव्यात अशी. मध्ये पुलाखालून किती पाणी वाहून गेलं? तीस वर्षे उलटून गेली. आजही तो मुंबईत येतोच येतो. जगभर फिरत असतो; मात्र त्याच्या मनात भावना एकच असते, मुंबई हेच आपलं खरं घर आहे. आता तो गँगस्टर राहिलेला नाही. त्या नरकयातनांतून तो कधीच बाहेर पडला. उरलेला तुरूंगवासही भोगून झाला. तुरूंगातच शांताराम बरचसं लिहून झालं. पुढं त्यानं एक मल्टिमीडिया कंपनी स्थापन केली. 2003 साल. या साली शांताराम बाजारात आलं. त्यानं खपाचे उच्चांक गाठले. आता जगभर कुठंही तो मोठमोठ्या हॉटेलात उतरतो. मुंबईत आला की वरळीतलं एक मोठं हॉटेल. ते त्याच्या दिमतीला हजर असतं; मात्र इतक्या अफाट यशाचा ग्रेगरीवर काही परिणाम झालाय का? होय! एक उलटा परिणाम झालाय. तो अधिक नम्र झालाय. अधिक समंजस झालाय.  अधिक सुसंस्कृत, शहाणा व प्रगल्भ झालाय. आजही तो मुंबईतील त्याची झोपडपट्टी विसरलेला नाही. तो नरकवासच होता; मात्र तिथल्या जिवाभावाच्या माणसांना तो विसरलेला नाही. तो प्रभाकर खाडेला व त्याच्या सुंदर गावाला विसरलेला नाही. प्रभाकरच्या भयानक मृत्युची आठवण आजही त्याला येते. त्याचं आजचं यश पाहायला प्रभाकर नाही, ही जाणीव त्याला रडवत राहते; मात्र आईच्या कुशीत मुल निश्‍चिंत असतं तसा हा आजही मुंबईच्या कुशीत गेला की निश्‍चिंत होतो. ‘‘कितीदा मुंबईच्या प्रेमात पागल झालो होतो? त्या वेड्या शहरावरून जीव ओवाळून टाकायला शिकलो होतो’’ तो एके ठिकाणी म्हणतो. अर्थात त्याचं त्यावेळचं मुंबईतलं आयुष्य भयानक होतं. असुरक्षित होतं. धोकादायकसुद्धा. मात्र मुंबईत तो मोकळा श्‍वास घेऊ शकला. याचं एकमेव कारण, या शहराचा स्वभाव व इथली माणसं. इथं सहवासात आलेल्या प्रत्येक माणसावर ग्रेगरीनं प्रेम केलं. इथल्या माणसांनीही त्याच्यावर जीव ओवाळून टाकला. त्यानं तोपर्यंत व्यवहारी जग पाहिलं होतं. अव्यवहारी माणसं तो मुंबईतच पाहत होता. त्याला एक समजलं होतं, ही माणसं अव्यवहारी आहेत, म्हणूनच निष्पाप आहेत व म्हणूनच अत्यंत विश्‍वासार्ह!
मुंबईत ग्रेगरी माफिया टोळीत काम करू लागला. स्मगलर व गन रनरही झाला तो हे काम करताना. याचवेळी तो कार्ला सारानेनच्या प्रेमात पडला. आता ही बया कोण? तर ती मुंबईत  वेश्या व्यवसाय करत होती तेव्हा. कार्ला बुद्धिमान, कवी मनाची; मात्र वस्ताद! ग्रेगरी मात्र तिच्या अखंड प्रेमात! दोघांच्या शृंगाराची वर्णनं ग्रेगरीनं केली आहेत. ती वर्णनं मराठीत आणताना अपर्णा वेलणकरांची मराठी भाषा. ती खरोखर ‘अमृतातेही पैजा जिंके’ होते. अर्थात हा संपूर्ण भाषांतरीत ग्रंथच अमृतातेही पैजा जिंके असा! तर कार्लाची सुद्धा एक कहाणी आहेच. ती मुळातूनच वाचलेली बरी. कार्ला ही मुंबईत अंडरवर्ल्डसाठीच काम करत होती तेव्हा. अमेरिकेत तिच्याकडून एकाचा खूनही झालेला. याच बयेनं ग्रेगरीला मुंबईच्या अंडरवर्ल्डचा रस्ता दाखवला. ते एक मोठं गूढच होतं. ते लक्षात आलं तेव्हा ग्रेगरीला धक्का बसला; मात्र महाराज ‘दिल’ देऊन बसले होते तिला. असं काय पाहिलं कार्लामध्ये गे्रगरीनं? सौंदर्य होतंच पण बुद्धिमत्ता व सौंदर्य असं ते जालीम मिश्रण होतं. शिवाय कार्लामध्ये खूप सच्चेपणा होता. ग्रेगरीच्या झोपडपट्टीत कॉलराची साथ आली. माणसं पटापट मरून पडू लागली. ग्रेगरी रात्रंदिवस आजारी माणसांवर उपचार करू लागला. तेव्हा ही बया सरळ ग्रेगरीकडे आली. त्याच्या झोपडपट्टीत राहिली व आजारी माणसांसाठी तहानभूक हरपून रात्रंदिवस राबली. धोके होते यात. कॉलराला तीसुद्धा बळी पडू शकली असती; मात्र ती बधली नाही. ग्रेगरी प्रभावीत झाला तो या प्रसंगामुळे. शिवाय कार्लासुद्धा भारताच्या प्रेमात होतीच.’’ .... कुणाही भारतीयाला भेटा, एकच गोष्ट लक्षात येईल - प्रेमाचा शोध भले भारतात लागला नसेल; पण प्रेम करण्याची कला अख्ख्या जगात फक्त भारतीय माणसालाच गवसली आहे’’ ग्रेगरीचंच हे एक वाक्य.
मुंबईत ग्रेगरी संपर्कात आला तो कादर खानच्या. कादर खान हा माफिया डॉन. त्यानं ग्रेगरीला मुलासारखं मानलं. पित्याच्या प्रेमासाठी ग्रेगरी नेहमीच आसुसलेला. ते त्याच्या वाट्याला मात्र आलं नाही. मग कादर खानमध्येच तो वडिलांची छबी पाहू लागला. कादर अत्यंत बुद्धिमान! चांगलं वाचन असलेला. वैचारिक उंची असलेला. या दोघांमधील चर्चा ग्रंथात आहेत. अगदी या ब्रह्मांडाची निर्मिती ते नैतिक-अनैतिक, पाप-पुण्याच्या संकल्पना इथंपर्यंत दोघं चर्चा करत. दोन गँगस्टर्समध्ये ही असली चर्चा? बरं, ही चर्चा वैचारिक उंचीचं टोक गाठणारी! मोठमोठ्या तत्त्वज्ञांनाही लाज वाटावी अशी! तर कादर व ग्रेगरी. दोघांचे सूर जुळत गेले. मग अफगाणिस्तानमधले प्रसंग ग्रेगरीनं सांगितले आहेत. तिथल्या मुजाहिदीनांना मदत करणं. कादरला ते धर्मकर्तव्य वाटलं. तो त्यासाठी अफगाणिस्तानात गेला. सोबत ग्रेगरी. पुन्हा जिवंत येण्याची खात्री नव्हतीच. काय काय झालं अफगाणिस्तानात? सगळ्या वादळी व रक्तरंजित घटना! आधी ही मंडळी गेली पाकिस्तानात. तिथं कराचीत राहिली. गे्रगरीनं इथं कराचीच वर्णन केलंय. विश्‍वास बसू नयेत अशी वर्णनं ग्रेगरी करतो. कराचीत शस्त्रास्त्रांचा खुलेआम व्यापार चाले. त्याची वर्णनं ग्रेगरी करतो. तिथला काळाबाजार. त्याचं वर्णन करतो. त्यातलं अर्थकारण सांगतो. शस्त्रास्त्र व्यवहारातील दलालांचा सुळसुळाट! तो तिथं त्यानं पाहिला. ग्रेगरीचं निरीक्षण घारीसारखं. स्मरणशक्ती तर अफाटच. कराचीतली ही वर्णनं अत्यंत चौफेर आहेत. कराचीचा सगळा ‘सातबारा’च तो मांडतो. हे सगळं तो त्यातल्या राजकारणासह सांगतो हे विशेष! मुळातच ग्रेगरीला आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाण जबरदस्त! अगदी आजही एखादी आंतरराष्ट्रीय जबाबदारी तो पार पाडू शकतो. यात तिळमात्र अतिशयोक्ती नाही. ग्रेगरीच्या अभ्यासाचा आवाकाच तेवढा मोठा! तर कराचीत ही सगळी मंडळी आयएसआयच्या तावडीत सापडता सापडता वाचली. यामागे होता अब्दुल गनी. हा कोण? तर कादरच्याच गँगमधला माफिया. अस्तनीतला निखारा. विषारी सापच. त्यानं कराचीत कादर व ग्रेगरीसह सगळ्यांना ठार मारायचं ठरवलं. त्याचे पाकिस्तानमध्ये लागेबांधे होते. ते त्यानं यासाठी वापरले. हे सगळं तो मुंबईत बसून करत होता; मात्र दैव बलवत्तर होतं कादरसह सर्वांचं. त्यांना ऐनवेळी हा प्लॅन समजला. काही क्षणात मृत्यू प्रत्यक्ष समोर हजर झाला असता; मात्र सगळे निसटले. तिथून पुढं अफगाणिस्तानमधला प्रवास. कंदाहार हे अफगाणिस्तानमधलं शहर. तिथून पन्नास किलोमीटर अंतरावर ‘शहर-इ-साफा’ या पर्वतरांगा. तिथं या लढवय्या मुजाहिदीनांसह ग्रेगरी राहिला. तब्बल दोन महिने! या दोन महिन्यात काय काय घडलं? तर तो मृत्युचं थैमान पाहत होता. मृत्युशीच दोन हात करत होता. स्वत: अर्धमेल्या व अर्धपोटी अवस्थेत स्वत:चं दोन-दोन बाटल्या रक्त सलाईनद्वारे सहकार्‍यांच्या शरीरात चढवत होता. त्याचे सहकारी सुद्धा कुठकुठले होते? अफगाणिस्तान, पॅलेस्टाईन, इरान, ट्युनिशिया, मोरोक्को, अल्जेरिया व अगदी पाकिस्तानातले सुद्धा. कादरच्या नेतृत्वाखाली तिथं ते लढले. तिथल्या मुजाहिदीनांना शक्य तेवढी मदत केली. या सगळ्या प्रवासात व प्रसंगात ग्रेगरी माणसांचे स्वभाव टिपत राहिला. त्याचे हे सगळे सहकारी सुद्धा बुद्धिमान होते हे विशेष! शूर होतेच ते! प्रश्‍नच नाही; मात्र त्यांचे आपापसातले संवादच खूप काही सांगून जातात. सोविएत रशियाच्या विरूद्ध अफगाण मुजाहिदीन का पेटून उठले? खरं तर अफगाणिस्तानात रशियानं बरीच विकासाची कामे केली होती. पूल बांधले होते. रस्ते बांधले होते. शाळा बांधल्या होत्या. कॉलेजं बांधली होती. पिण्याच्या-सिंचनाच्या पाण्यासाठी धरणं बांधली होती. विजेची गरज भागवली होती; मात्र हे करता करता त्यांनी सगळ्या अफगाणिस्तानवरच कब्जा केला. तिथं स्थानिक अफगाण कम्युनिस्टांचं कळसूत्री सरकार स्थापन केलं. ‘कम्युनिझम’ कसा वाढेल हा तो प्रयत्न होता. आता हा सोव्हिएत रशियाचा साम्राज्यवादच आहे अशी या ग्रेगरीबरोबरच्या बुद्धिमान तरूणांची पक्की धारणाच झाली व ते मग मुजाहिदीनांना मदत करू लागले. आता हे अफगाण मुजाहिदीन होते कसे? तर जीवाला जीव देणारे. ‘‘इन अफगाण लोगों के साथ जिना शायद मुश्किल है, लेकिन साथ मे मरने के लिए इन अफगाणियोंसे अच्छे दोस्त पुरी दुनियामें नही मिलेंगे।’’ अहमद जादेह नावाचा ग्रेगरीचा एक मित्र. याच ग्रुपमधला. त्याचं हे वाक्य. आता हा माफिया डॉन कादरखान. तो सुद्धा मुळचा अफगाणीच. ‘‘अफगाणिस्तानात लायक लोकांच्या हातात नेतृत्व सोपवण्याची पद्धत आहे - हे लोक उत्तम वक्ते असतात. आर्थिक व्यवहार अत्यंत कुशलपणे हाताळू शकतात आणि वेळ येईल तेव्हा शस्त्र घेऊन रणातही उतरतात. माझ्या देशात कुणालाही वारसा हक्कानं नेतृत्वावर हक्क सांगता येत नाही. एखाद्या नेत्याची मुलं नालायक निपजली तर नेतृत्वाची सूत्र टोळीतल्या लायक तरूणांच्या हाती जातात’’ हे कादर खानचंच वाक्य.
अफगाणिस्तानात प्रवेश करण्यापूर्वी काय घडलं? कादरच्या या ग्रुपनं ’क्वेट्टा’ शहरात सुमारे एक महिना मुक्काम केला. हे पाकिस्तानातलं शहर. ग्रेगरीनं इथं काय करावं? क्वेट्ट्यात सेंट्रल  लायब्ररी होती. आयुब नावाचा एक पाकिस्तानी तरूण. तो या लायब्ररीतून गे्रगरीला पुस्तकं आणून देई. हा संपूर्ण महिना ग्रेगरी रात्रंदिवस वाचत राहिला. ब्रिटिशपूर्व काळात त्या भागात आलेल्या भटक्या संशोधकांनी लिहिलेली प्रवासवर्णनं, प्राचीन ग्रीक महाकाव्यांच्या दुर्मीळ आवृत्या, शेक्सपिअरचं साहित्य, डॉन्टेच्या ‘द डिव्हाईन कॉमेडी’चं अत्युत्कट भाषांतर! हे सगळं ग्रेगरी वाचत राहिला. एका हातात ग्रंथ व एका हातात बंदूक! मात्र आज त्याला कोणी विचारलं तर? तर तो अगदी ठामपणे सांगेल, ग्रंथ व लेखणी हे दोन्ही जगातल्या कोणत्याही बंदुकीपेक्षा अधिक प्रभावी असतात म्हणून.
अफगाण मुजाहिदीन. त्यांच्या मते साम्राज्यवादी रशियानं अफगाणिस्तानवर आक्रमण केलं होतं. तसं करून त्यांनी सगळा मार्क्सवाद व लेनीनवाद पायदळी तुडवला होता. त्या तरूणांच्या दृष्टिनं हे बरोबर होतं; मात्र नाण्याला दोन बाजू असतात. तशीच अफगाणिस्तानमधली परिस्थिती होती. अफगाणिस्तान हा रशियाचा शेजारी. 1921 साली एक महत्त्वाची घटना घडली. रशियात लेनीन सत्तेवर होता. त्यानं अफगाणिस्तानबरोबर एक लष्करी करार केला. परस्पर सहकार्याचा तो करार. आता अफगाणिस्तामध्ये दोन प्रवृत्ती नांदतच होत्या. पुराणमतवादी व प्रागतिक. अगदी कुराणमतवादी असं म्हटलं तर ते जास्त योग्य ठरेल. 1978 मध्ये अफगाणिस्तानमध्ये लष्करी क्रांती झाली; मात्र सत्ता ‘पिपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तान’च्या ताब्यात गेली. या पक्षात मार्क्सवादाकडे झुकलेले बुद्धिवादी प्रागतिक तरूण होते. अमेरिकेचा पाठिंबा मात्र पुराणमतवाद्यांना. मग पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीनं रशियाला अफगाणिस्तानात पाचारण केलं. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी. त्यासाठी त्यांनी कशाचा आधार घेतला? तर 1921 सालच्या रूसो-अफगाण कराराचा. त्याआधारे रशियन सैन्य अफगाणिस्तानात घुसलं. या सैन्याविरूद्ध अमेरिका कारस्थानं करू लागली. मुजाहिदीन व रशियन सैन्यात होणार्‍या धुमश्‍चक्री व लढाया. अमेरिकेनं आधी त्या लांबूनच पाहिल्या. रशियाचा शक्तिपात होऊ दिला. मग अफगाण मुजाहिदीनांना सगळ्या प्रकारची मदत सुरू केली. यात पाकिस्तान अमेरिकेच्या पाठिशी होताच. रशियाचा निर्णय कितीही म्हटलं तरी त्यांच्या  अंगलट आला. कारण स्वतःचे दीड ते दोन लाख सैन्य! ते वर्षानुवर्षे अफगाणिस्तानमध्ये पोसत राहणं! हे सगळं त्यांना जड जावू लागलं. मुजाहिदीनांमध्येही बुद्धिमान तरूण होते व पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तान या पक्षातही. एकाला अमेरिकेचा साम्राज्यवाद खटकत होता. दुसर्‍याला रशियाचा. पिपल्स पार्टी हा कम्युनिस्ट पक्ष नव्हता हे खरं; मात्र डावीकडे झुकलेला होताच. अमेरिकेची झोप त्यामुळंच उडाली होती. ही सगळी रणधुमाळी. त्यात ग्रेगरी अडकला. खरंतर तोही डावीकडे झुकलेला; मात्र यावेळी तो अफगाणातील उजव्यांच्या बाजूने होता. हे सगळं अपरिहार्यपणे त्याच्या वाट्याला आलेलं. ते कसं? ते या आत्मचरित्रातच वाचलेलं बरं! तसंही कितीतरी आंतरराष्ट्रीय राजकारण. ते या आत्मचरित्रात वाचायला मिळतंच. त्यातले सगळेच गुंते ग्रेगरी बर्‍याचदा नेमकेपणे सांगतो. हे राजकारण नेमकं कसं आहे हे त्याला अतिशय उत्तमपणे कळत होतं. याचं कारण त्याची स्वतंत्र बुद्धिमत्ता. स्वतःचा अभ्यास. मग या ग्रंथात अमेरिका-व्हिएतनाम युद्ध येतं. अफगाणिस्तामधले अमेरिका व रशियातले शह-काटशह येतात. इराणमधली इस्लामी क्रांतीसुद्धा येते. मोहम्मद मेलबाफ हा ग्रेगरीचा मित्र. तो इराणचा. आयातुल्ला खोमेनीनं इराणच्या शहाविरूद्ध उठाव केला. खोमेनीचा पाठिराखा होता तेव्हा मेलबाफ; मात्र खोमेनीनं सुद्धा ‘इस्लामी क्रांती’च्या नावाखाली विश्‍वासघातच केला असं मेलबाफ म्हणतो. खोमेनीकडे इराणची सत्ता आली; मात्र त्या सत्तेनं मेलबाफसारख्या तरूणांना अमानुष छळ व मनःस्तापाशिवाय काहीच दिलं नाही. खलीद अन्सारी. हा ग्रेगरीचा आणखी एक मित्र. तो कडवा पॅलेस्टिनी. लेबनॉनमधल्या एका हत्याकांडात त्याचं सर्व कुटुंबच ठार झालं. खरंतर त्याचे आईवडील प्रसिद्ध विचारवंत. पॅलेस्टिनी मुक्ती लढ्यात लढणारे. वडील इस्त्रायलच्या तुरूंगात वारले. नंतर कुटुंबही संपलं. खलिद मग दुःख व शोकाने वेडा व्हायचाच बाकी राहिला. शेवटी मुंबईनंच त्याला आश्रय दिला. खलिदचं शिक्षण कुठं झालं? तर न्युयॉर्कमध्ये. त्याच्या प्रबंधाचा विषय काय होता? तर ‘प्राचीन जगातला असंघटित व्यापार व त्या व्यापाराची समांतर अर्थव्यवस्था.’ पुढं लेखणी गेली, हातात आली बंदुक. नियतीनं खलीदला पॅलेस्टिनी अतिरेकी चळवळीकडे खेचून नेलं. मग ट्युनिशिया, लिबिया, सिरीया इथं लष्करी प्रशिक्षण. या आत्मचरित्रात अशी अनेक खरीखुरी पात्रं आहेत. आत्मचरित्राच्या शेवटी तर श्रीलंका व एलटीटीईचा विषय देखील येतो. इतकंच नाही तर मुंबईतल्या मराठी-अमराठी वादाबद्दलही त्यानं लिहिलं आहे. यात त्यानं मराठी माणसांची बाजू घेतली आहे; मात्र त्यापलीकडं जाऊन त्यानं एक मुद्दा मांडला आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा. ‘‘मुंबईच्या झोपडपट्टीत फक्त मराठीच माणसं राहतात असं नाही. पंजाबी, तमिळ, कर्नाटकी, बंगाली, आसामी.... अगदी काश्मीरीसुद्धा राहतात त्या उकीरड्यात आणि ही माणसं फक्त हिंदू आहेत असंही नाही तर शिख आहेत, मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौद्ध आहेत. पारशी आणि जैनसुद्धा आहेत. मुंबईतला प्रश्‍न हा काही फक्त हिंदू-मराठी माणसांचा प्रश्‍न नाही. खरा प्रश्‍न इथं राहणार्‍या गरीब भारतीय लोकांचा आहे. मुंबई गरीबांची आहे तशी श्रीमंतांचीही आहे; पण मुंबईत श्रीमंत माणसं मुठभर आहेत आणि गरीब कचर्‍यासारखे सगळीकडे पसरलेले आहेत’’ ग्रेगरी म्हणतो. एका गुजराती चित्रपट निर्मात्याशी या विषयावर ग्रेगरीचा वाद-प्रतिवाद झाला. त्यावेळचं त्याच हे वाक्य. त्याचवेळी मुंबईतल्या मराठी माणसांची बाजू घेताना काय म्हणतो तो? ‘‘महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातून मुंबईत मराठी लोक जगायला आलेले. त्यांची अवस्था भयानक आहे. दोनवेळचं जेवण मिळवण्यासाठी त्यांना अक्षरशः वेठबिगारासारखी कामं करावी लागतात. इतरांची घाण उपसावी लागते. भारतातल्या इतर ठिकाणाहून आलेले लोक पैशाच्या जोरावर मराठी माणसांना मुंबईत पायाखाली तुडवतात, हे पाहून त्यांना संताप येणारच. त्यांना काय, जगाच्या पाठीवर कुणालाच हा अन्याय सहन नाही होणार’’ ग्रेगरीचं निरिक्षण हे असं आहे. त्यातून आलेली मतं ही अशी आहेत. त्याला आंतरराष्ट्रीय राजकारण समजतं. मग स्थानिक राजकारण समजत नाही का? तसं अजिबातच नाही. प्रत्येक गोष्टीतलं ‘सत्य’. ते शोधण्याचा तो प्रयत्न करतो. त्याला तेच महत्त्वाचं वाटतं. एक लेखक व एक माणूस म्हणून. मग ते त्याच्या स्वतःसाठी कितीही अप्रिय वा कटू असू दे. त्याच्याइतकं दुसरं महत्त्वाचं त्याला काहीही वाटत नाही. तो मुंबईत होता तेव्हा बरंच काही घडलं. इंदिरा गांधींची हत्या. ती त्याचवेळी झाली. गे्रगरीनं त्याबद्दलही लिहिलंय इथं. खलिस्तानची चळवळ त्याला माहीत आहे. ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ त्याला माहीत आहे. भारतीयांच्या आयुष्यात इंदिरा गांधींचं स्थान किती महत्त्वाचं होतं? ग्रेगरीनं ते एकदोन प्रसंगातूनच उत्तमपणे सांगितलंय.
ग्रेगरीचं ‘मराठी प्रेम’ अस्सल! अगदी ठाकरे कुटुंबीयांनीही दाद द्यावी इतकं अस्सल! मुळात तो त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या संपर्कात कसा आला नाही हेच समजत नाही. शिवसेनेचे उल्लेख आत्मचरित्रात आहेत त्याच्या; मात्र शिवसेनेचा फार खोलात जाऊन त्यानं अभ्यास केलेला नाही. तेव्हा त्याच्याकडे यासाठी उसंतही नव्हती व त्याची ती गरजही नव्हती तेव्हा; मात्र मुंबईतल्या मराठी माणसाच्या वेदना त्याला कळत होत्या यात तिळमात्र शंका नाही. ग्रेगरी अस्सल ‘मराठी मुंबईकर’ झाला म्हणजे नेमकं काय झालं? याचं उदाहरणच दिलं पाहिजे. एकदा तो फ्लोरा फाऊंटन चौकाच्या (हुतात्मा चौक) दिशेनं रमत गमत चालला होता. तेवढ्यात एक टॅक्सी करकचून ब्रेक दाबून त्याच्या शेजारून चालू लागली. ग्रेगरीनं भाड्याला नकार दिला; मात्र टॅक्सी ड्रायव्हर मुजोर. त्याला ग्रेगरीला छेडण्याची हुक्की आली. ‘‘अरे गोरे भेंचोद, टॅक्सी एम्टी है दिखता है क्या? और ये क्या कर रहे हो? इतने धुप में पैदल? बकरी के माफिक क्यूं घुमता है रस्ते पे आँ?’’ ड्रायव्हर ग्रेगरीला म्हणाला. ‘शांताराम’ नावाचं ते रसायन त्याला कुठून माहीत असणार? शिवाय ग्रेगरीला हिंदी समजत असणार हे त्याच्या गावीही नव्हतं. म्हणूनच तो एवढा शूर झाला होता. आता चेंडू ग्रेगरीच्या कोर्टात होता. ‘‘काय पायजे? अं? काय पायजे’’ गे्रगरीनं सरळ मराठीत त्याला विचारलं. ‘‘काय पायजे? आं?’’ टॅक्सी ड्रायव्हर हडबडत तेच वाक्य म्हणाला. आ वासला त्यानं आश्‍चर्यानं! मग ग्रेगरीचे जोरदार शाब्दिक फटके सुरू झाले. ‘‘काय पायजे तुला? आं? काय प्रॉब्लम आहे?’’ ग्रेगरी त्याच्या अंगावर चालून जात डाफरला. ग्रेगरीचा पुढचा शाब्दिक हल्ला तर भन्नाटच होता. ‘‘मराठी नाय समजत? मग आला कशाला इथे? ही मुंबई आहे. आमची मुंबई. मराठी बोलता येत नसेल तर र्‍हातो कशाला इथे? तुझ्या भेंचोद डोक्यात बकरीएवढा तरी मेंदू आहे का?’’ टॅक्सीवाल्याची मुजोरीच उतरली. ‘‘यू स्पीक मराठी, बाबा?’’ त्यानं विचारलं. ‘‘गोरा चेहरा, काला मन’’ ग्रेगरी उत्तरला. ग्रेगरीला इथंच थांबायचं नव्हतं. अशा अनेकांचा माज त्याने उतरवलेला होता. नंतर स्वतःच्या चेहर्‍याभोवती आणि छातीपुढं उजव्या बोटानं वर्तुळाकार खुणा करत ग्रेगरी म्हणाला, ‘‘बाहर से गोरा हॅूं; लेकिन अंदर से पुरा हिंदुस्थानी हूँ; समझ गये तुम? मै रोड पे चल रहा हॅूं; टाईमपास कर रहा हूँ। तुम्हे कोई प्रॉब्लेम? तुम कोई रियल टुरिस्ट क्यूँ नहीं पकड लेते? आं? मेरे जैसे भेंचोद हिंदुस्थानी लोगों को अकेला छोड दो भाईसाब, प्लीज!!’’ टॅक्सीवाला कडेकडेने सुसाट निघून गेला हे वेगळं सांगायला नको. तर शांताराम हा असा आहे. त्याचं मराठीपण व भारतीयत्व असं उसळून येतं! त्याच्या शेपटीवर कोणी पाय ठेवला की!
‘शांताराम’ ही एक मोठी ठेवच आहे साहित्यातली. समग्र मानवी आयुष्य ग्रेगरीनं वाचकांपुढे ठेवलंय. त्यातल्या भीषण मानवी यातना व दुःखं, हाल-अपेष्टा, उत्कट सुखं, माणसातलं देवत्व व पिशाच्च वृत्ती, विकार महाकाव्याच्या तोडीचे. अगदी महाभारतासारख्या ग्रंथाची आठवण यावी असे. याच्या भाषांतरासाठी अक्षरशः अफाट बौद्धिक कष्ट उपसले ते अपर्णा वेलणकरांनी! प्रकाश अकोलकर, रवींद्र राऊळ, नाशकातले सुप्रसिद्ध शायर बाबा आदम मुल्ला, डॉ. जी. एम. शेख, स्वराली परांजपे, धनश्री देवळे-देवधर, स्निग्धा शेवडे, मेघना ढोके, सुषमा देशपांडे, उमेश परिपूर्ण व मेहता प्रकाशनचे अनिल व सुनील मेहता या सर्वांच्या सहकार्याने वेलणकर मराठी साहित्यातलं हे सर्वोत्कृष्ट भाषांतर करू शकल्या. ग्रंथातली ग्रेगरीची एकेक वाक्य देखील महाकाव्यात शोभावीत अशी. ‘मनातलं तुंबळ युद्ध आतून माझं रक्त काढू लागलं होतं’, ‘माझ्या आयुष्याची सूत्रं माझ्या हातून कधीच निसटून गेली होती. नियतीच्या चक्रात भरकटत राहणं आता अपरिहार्य होतं,’ ‘भीती आणि दहशतीच्या हिंस्त्र श्‍वापदांनी माझ्या मनावर कब्जा केला होता‘, ‘अख्खं जग उन्मळून टाकणार्‍या भीषण, रौद्र वादळात सापडलेल्या थरथरत्या नाजूक वेलींसारखं माझं भविष्य माझ्याच पावलांशी थरथरताना मला जाणवत होतं’, ‘इट वॉज द लँड, व्हेअर द हार्ट इज किंग’, ‘भारत हा दिलदार लोकांचा देश आहे’, ‘तुरूंगवास ही खरी मनाची परीक्षा. नंतर शरीराची‘, ‘प्रेम म्हणजे क्षमेचं वचन! खात्री!!’, ‘ढगांनी झाकोळलेल्या रात्रीच्या अंधारात नियतीची पावलं वाजलेली मी स्पष्ट ऐकली. त्या आवाजात मैदान सोडून पळून जाण्याची धमकी होती.... आणि पाय रोवून लढाईला तयार राहण्याचं आव्हानही!’, ‘कुणा तिसर्‍याच्याच प्राक्तनाचे खिळे माझ्या कपाळावर ठोकण्याचा हा डाव कोणी आखला?’, ‘कार्लाच्या सुंदर डोळ्यांमध्ये मी आकंठ बुडून गेलो होतो; पण तिच्या नजरेतला अर्थ मी समजू शकलो नाही. अनेक गुपितांनी काठोकाठ भरलेली तिची नजर मी वाचू शकलो नाही’, ‘एखाद्या माणसाकडून एकेक करून सार्‍या आशा, सारी स्वप्नं हिरावून घेतली जात नाहीत, तोवर त्याच्या ‘आत’ कसकसल्या दगडांचा पक्का पाया आहे हे कसं कळणार?’, ‘ब्रिटिशांनी घालून दिलेल्या व्यवस्थेवर कुणीही शहाणा माणूस विश्‍वास ठेवत नाही’, ‘चक्रव्यूहात आपला पाय फसत चालला आहे या कुरतडणार्‍या जाणिवेनं पहिला दंश केला होता’, ‘एखाद्या ठिकाणी किती पैसा जमावा यालाही मर्यादा असते’, ‘कोवळ्या स्वप्नांच्या रूजवणीचे वाफे सांभाळणारी बागच आहे मुंबई म्हणजे’, ‘कितीतरी दिवसांनी मुंबईत रात्रीचा भटकत निघालो होतो. त्या रात्री मी पुन्हा नव्यानं मुंबईच्या प्रेमात पडलो. आसूसलेल्या प्रियकरासारखा तिला भेटत.... भिडत राहिलो’.
ग्रेगरीचा एक मित्र. स्कॉर्पिओ जॉर्ज. त्याचं एक वाक्य आलंय, ‘‘नियती आपल्याला नेहमीच दोन पर्याय देते. त्यातला एक आपण निवडावा असा असतो आणि दुसरा जो आपण प्रत्यक्षात आपण निवडतो.’’
सरतेशेवटी आणखी एक. ग्रेगरीचं हे आत्मचरित्रात्मक महाकाव्य! त्यानं ते एका व्यक्तिला अर्पण केलंय. ती आहे त्याची ‘आई!!’
तर मूळ नऊशे पानी इंग्रजी ग्रंथाचं हे रसरशीत मराठी भाषांतर संग्राह्य आहेच हे वेगळं सांगायला नको.

शांताराम
मूळ लेखक:  ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स
अनुवाद:  अपर्णा वेलणकर
प्रकाशक: मेहता प्रकाशन, पुणे
पृष्ठे: 1412 मूल्य: रु. 800/-

- महेश मांगले 
९८२२०७०७८५ 
(पूर्वप्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक', पुणे)


Tuesday, April 12, 2016

आंबेडकरांच्या विचारविश्वातील स्त्री

1890 साली महात्मा फुले कालवश झाले. एक क्रांतिसूर्य मावळला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने एक ज्ञानसूर्य रूपाला आला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र बाबासाहेबांनी दलित समाजाला दिला आणि या विचाराने आचरण करणार्‍यांच्या जीवनात परिवर्तन घडून आले. बाबासाहेब म्हणत, ‘‘शिक्षण म्हणजे बहुजन समाज, दलित आणि स्त्रियांच्या मुक्तीलढ्याचे पहिले पाऊल आहे. समाजक्रांतीची तयारी म्हणजे शिक्षण. अन्यायाविरूद्ध लढण्यासाठीचे हत्यार म्हणजे शिक्षण,’’ अशी बाबासाहेबांची धारणा होती. 1848 साली महात्मा फुल्यांनी मुलींसाठीची पहिली शाळा काढली. शाळेसाठी शिक्षिका मिळत नव्हती, म्हणून त्यांनी सावित्रीबाईंना उभे केले. 1882 मध्ये हंटर आयोगापुढे म. फुल्यांचे जे भाषण झाले त्यात त्यांनी ‘‘स्त्रियांच्या प्राथमिक शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे’’ असा आग्रह धरला होता. ब्रिटिश राजवटीत इंग्रजी शिक्षण घेणार्‍या नवशिक्षित तरूणांचा एक वर्ग तयार होत होता. नवरे शिक्षित आणि बायका अशिक्षित अशी एकूण परिस्थिती निर्माण झाली होती. रविंद्रनाथ टागोरांनी ‘‘स्त्री शिक्षणाचा प्रसार केला नाही तर समाजात नवरा-बायकोमधला सुसंवाद नष्ट होऊन कुटुंबव्यवस्था धोक्यात येईल’’ असा इशारा दिला होता. अशा काळात स्त्रियांना शिक्षण द्यायचे ते कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी अशी समाजातल्या विचारवंतांची धारणा होती. स्त्रीशिक्षणाविषयी आंबेडकरांचा विचार वेगळा होता. मातृत्वाचा गौरव केला जात असताना या देशात स्त्रीत्वाची जी उपेक्षा होत होती ती थांबवली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. केवळ कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी शिक्षण नको, शिक्षणाच्या माध्यमातून आत्मप्रगटीकरणाचे युग सुरू झाले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. केवळ दलितांचा, दलित स्त्रियांचा विचार न करता भारतातील एकूण स्त्रीजीवनाचे उन्नयन हाच बाबासाहेबांचा ध्यास होता. शिक्षणाची गंगा दलित समाजापर्यंत पोहचू लागली होती. दलित स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत्या. अशा काळात बाबासाहेब एकूण स्त्रीजीवनाला उन्नत अवस्थेतपर्यंत नेण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत होते. स्त्रियांच्या शिक्षणासंदर्भातले बाबासाहेबांचे जे विचार आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते. ‘‘जोपर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले जाणार नाही आणि प्राथमिक शाळांतील प्रवेशाबाबत कडक उपाययोजना केली जाणार नाही; तोपर्यंत मागासवर्गीयांच्या शिक्षणात प्रगती होणार नाही. बहिष्कृत लोकांनी प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता उच्चशिक्षणाकडे लक्ष पुरवले पाहिजे. एखादी व्यक्ती बी. ए. झाल्याने समाजाचे जेवढे भले होईल तेवढे चौथी पास झाल्याने होणार नाही’’ असं बजावणार्‍या बाबासाहेबांनी दलित स्त्रियांना भावनिक आवाहन केले. ते म्हणत, 1) तुम्ही आमच्या आया-बहिणी आहात. आपल्या मुलांना शिक्षण द्या. 2) मुलगा किंवा भाऊ दारू पिऊन घरात आला तर त्याला घरात घेऊ नका. जेवण देऊ नका. 3) तुमच्या मुलींना शिक्षण द्या. 4) तुमची लुगडे नेसण्याची पद्धत, गळ्यात गळाभर गळसर्‍या आणि हातात हातभर कथलांचे किंवा चांदीचे दागिने घालण्याची पद्धत बंद करा. 5) दागिन्यांपेक्षा कपड्याला जास्त महत्त्व आहे. फाटके का असेनात, पण कपडे स्वच्छ असावेत. 6) आपल्या मुलांच्या मनातली हीनत्वाची भावना काढून टाका. 7) मुलांची लग्नं लवकर करण्याची घाई करू नका. लग्न ही जबाबदारी असते. 8) लग्नानंतर जास्त मुले निर्माण करणे हा सामाजिक अपराध आहे. 9) लग्न करणार्‍या प्रत्येक मुलीने नवर्‍याची दासी म्हणून नव्हे तर बरोबरीच्या नात्याने आणि मित्र म्हणून वागावे. 10) कोणतीही क्रांती प्रथम विचारात होते मगच ती आचारात येते. 11) अस्पृश्यता नष्ट व्हायची असेल तर ती अस्पृश्यांच्याच प्रयत्नाने नष्ट होईल. 12) अस्पृश्यता ही गुलामगिरी व धर्म कधीही एकत्र नांदू शकत नाही.
बाबासाहेबांनी व्यवस्थेविरोधातले सगळे लढे दिले. त्यात त्यांनी ‘स्त्रियांचा सहभाग असला पाहिजे’ असा आग्रह धरला होता. 1924 साली ‘बहिष्कृत हितकारणी सभा’ स्थापन झाली होती. ब्रिटिश सरकारसमोर गार्‍हाणी मांडण्यासाठीचे ते एक व्यासपीठ होते. बाबासाहेब त्याचे कार्यकारी अध्यक्ष होते. चिमणलाल सेटलवाड अध्यक्ष होते. मुंबई विधिमंडळाने एका ठरावाद्वारे तळी, विहिरी, पातळी या सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यासाठी अस्पृश्यांना मज्जाव करू नये असा कायदा केला होता. तशा सूचना संबंधित अधिकार्‍यांना पाठवल्या होत्या. सवर्णांची दादागिरी सरकारी आदेश मानायला तयार नव्हती. याविरूद्ध आवाज उठवण्यासाठी बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. या निमित्ताने दलित स्त्रियांना उद्देशून बाबासाहेबांनी भाषण केले, ते अंत:करण हेलावून टाकणारे आहे. ते म्हणाले, ‘‘तुम्हीच आम्हा पुरूषांना जन्म दिला आहे. आम्हाला जनावरापेक्षाही वाईट वागणूक मिळते आहे. इतर लोकांना कचेर्‍यात मानसन्मानाच्या जागा मिळतात. आम्हाला पोलिसात शिपायाच्या जागा मिळतात. इतकी आम्हाला हीन वागणूक मिळते. हे सारे ठाऊक असताना तुम्ही आम्हाला जन्म का दिलात? असा प्रश्‍न कुणी तुम्हाला विचारला तर काय उत्तर देणार आहात?’’ दलित स्त्रियांच्या मनात क्रांतीची ज्योत तेवत ठेवण्याचे काम प्रत्येक लढ्यात बाबासाहेबांनी केले.
‘‘चवदार तळ्याचे पाणी पिलो म्हणून आम्ही अमर होणार नाही. आमच्या स्पर्शाने पाण्याची वाफही होणार नाही. सामाजिक समतेच्या स्थापनेसाठी हे लढे आहेत’’ असे बाबासाहेबांनी स्पष्ट केले होते. अस्पृश्य संन्याशाच्या हस्ते त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. ‘‘असामान्यतेचे मूळ मनुस्मृतीत आहे. त्यात धर्माची धारणा नाही. असमानतेची धुळवड आहे’’ असं मानणार्‍या बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन सामाजिक उत्थानासाठी करत आहोत हे स्पष्ट केले. ‘न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति।’ असं सांगणार्‍या मनुस्मृतीने केवळ दलित स्त्रियांचा नव्हे एकूण स्त्री जीवनाचा उपमर्द केला आहे अशी त्यांची भावना होती. याही लढ्यात त्यांनी स्त्रियांना सहभागी करून घेतले होते.
चवदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. महाराष्ट्रात हजारो मंदिरे असताना राम मंदिराचीच निवड बाबासाहेबांनी का केली? असाही प्रश्‍न त्यांना विचारला गेला. त्यावर बाबासाहेबांचे उत्तर होते, ‘‘हिंदुंच्या हृदयातील ‘राम’ जागा व्हायला हवा. म्हणून राम मंदिराची निवड केली आहे.’’ बाबासाहेबांच्या या लढ्यात सवर्णांचाही त्यांना पाठिंबा होता. पुण्यात काकासाहेब गाडगीळ आणि केशवराव जेधे यांनी पर्वतीच्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. बाबासाहेब मुंबईत होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रबोधनकार ठाकरेंनी सभेचे आयोजन केले होते. रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सावरकरांनी पुढाकार घेतला होता. बाबासाहेब सांगत, ‘‘मंदिर प्रवेशामुळे मोक्ष मिळणार नाही. दु:ख, दारिद्र्य, अज्ञान, लाचारीही संपणार नाही. हिंदू म्हणूनच आम्हालाही मंदिरात प्रवेश करण्याचा हक्क आहे. हा लढा समतेसाठी आणि मानव्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी आहे.’’ या लढ्यात 125 पुरूष होते आणि 25 महिलांचा सहभाग होता. बाबासाहेबांनी समतेसाठी जेवढे लढे दिले त्या लढ्यात त्यांनी स्त्रियांना बरोबरीचे स्थान दिले, हे लक्षात येते.
1935 साली अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षपदावरून येवला येथे बाबासाहेबांनी जे भाषण केले. त्यात ते म्हणतात, ‘‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. हिंदू समाज ही एक मजलेदार इमारत आहे. या इमारतीत वरच्या मजल्यावरील माणूस कितीही श्रेष्ठ असला तरी तो कनिष्ठच गणला जातो. माणसांनी निर्माण केलेल्या माणसांच्या तुरूंगात मी स्वत:ही राहणार नाही आणि माझ्या दलित बांधवांनाही राहू देणार नाही. नव्या विचारांचा सुरूंग लावून हा तुरूंग आम्ही फोडून बाहेर पडू.’’ बाबासाहेबांनी धर्मांतराचा विचार केला तेव्हा देशातल्या कानाकोपर्‍यातल्या मोठ्या लोकांनी त्यांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांची भूमिका स्पष्ट होती. ते म्हणाले, ‘‘ज्या समाजव्यवस्थेत आणि धर्मरचनेत कोट्यवधी लोकांना त्यांचा दोष नसताना गुन्हेगारांपेक्षा वाईट वागणूक मिळते. तिचा त्याग करण्यात काहीही गैर नाही. हिंदू धर्मातील सुज्ञ लोकांनी दंभ आणि वेडेपणा यापासून आपल्या लोकांना परावृत्त करण्याचा किती प्रयत्न केला?’’ या त्यांच्या प्रश्‍नावर सारेच निरूत्तर झाले. 1956 साली पाच लाख दलित बांधवांसमवेत त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. या कामातही स्त्रियांना त्यांनी बरोबर घेतले होते. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी जगातल्या सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास केला होता. बौद्ध काळात शुद्र लोक मालमत्ता धारण करू शकत होते. वैदिक काळात ब्राह्ममणच भिख्खू बनू शकत होते. बुद्ध बिख्खू संघाची दारे सर्वांसाठी खुली होती. आंबेडकरांना हे महत्त्वाचे वाटले. त्यांच्या धर्माकडून काही अपेक्षा होत्या. ‘माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मशास्त्रात आहेत, राज्यशास्त्रात नाहीत असं ते म्हणत.’ त्यांना ‘धर्म हा आधुनिक विचाराशी सुसंगत असावा’ असे वाटत होते. तो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांनी मुक्त असावा. दारिद्र्याची महती गाणारा नसावा असे त्यांना वाटत होते. बुद्धांनी धर्माएवजी ‘धम्म’ हा शब्द वापरला. धर्म आत्मा, परमात्मा, मोक्ष या विचार करतो. धम्म अगम्य, अतर्क्य आणि अनाकलनीय अशा सर्व गोष्टी टाळतो. नीतिमत्ता आणि सदाचरण हा बुद्धांच्या विचारांचा पाया आहे. प्रज्ञा शील आणि करूणा यांना प्राधान्य देणारा बंधुत्व आणि मानवता यांचं गुणगाण करणारा बौद्ध धर्म म्हणूनच त्यांना प्रिय होता. बाबासाहेबांनी पाच लाख स्त्री-पुरूषांसह धर्मांतराचा विचार केला. त्यामागे एवढी वैचारिक पार्श्‍वभूमी होती. दलित पुरूषांचे दु:ख शब्दातीत आणि कल्पनातीत होते, पण दलित स्त्रियांचे जीवन म्हणजे दु:खभोगाची महागाथा होती. अशा परिस्थितीत आंबेडकरांसारखा विचारवंत दलित समाजाच्या उत्थानकार्यात ‘दलित स्त्री’ला केंद्रस्थानी ठेवून भूमिका घेतो. त्याचवेळी दलितेत्तर स्त्री तिचेही आयुष्य धर्मातील रूढी, परंपरांनी एका वेगळ्या टोकावर नेऊन उभे केले होते. तिच्याही उत्थानासाठी काय करता येईल याची रूपरेषा ते ठरवतात हे त्यांच्या कार्याचे वेगळेपण आहे.
‘स्वतंत्र मजूर पक्षा’ची स्थापना करून आंबेडकरांनी राजकारणाला प्रारंभ केला. ‘भारतातील श्रमिकांचा आणि दलितांचा पक्ष’ असं त्याला ते म्हणत. लोकाशाही मुल्यांची स्थापना, नागरी हक्क, कामगारांना किमान वेतन, भूमीहीन आभिर गरीब शेतकर्‍यांना जमिनीचे वाटप असे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या पक्षाने काम केले. 1929 साली मुंबईत कापडगिरणी कामगारांचा संप झाला. त्यात स्त्री-पुरूष कामगार होते. त्यानंतर स्थापन झालेली ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’सारखी संस्था असेल, ‘रिपब्लीकन पक्षा’ची स्थापना असेल अशाप्रकारे, समाजकारणाप्रमाणेच राजकारणातही बाबासाहेबांनी स्त्रियांना सहभागी करून घेतले.
इंग्लंडमधील स्त्रियांना मतदारांना हक्कासाठी लढा द्यावा लागला. बाबासाहेबांनी घटना समितीत बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे ही वेळ भारतीय महिलांवर आली नाही. हिंदू कोड बिलामुळे भारतीय स्त्रिया त्यांच्या कायम ऋणात राहतील. या जगात गांधीवाद आला, मार्क्सवाद आला, अनेक विचारप्रवाह आले; पण आंबेडकरवाद हा असा एकमेव वाद आहे, की ज्यातून मराठी साहित्याला समृद्ध करणारा दलित साहित्याचा प्रवाह आला. बाबासाहेबांच्या विचारामुळे या समाजाला लिहिण्याचे बळ मिळाले. त्यांनी पिढ्यान्पिढ्या भोगलेल्या यातनांची आणि दु:खाची विदारकता एवढी प्रचंड होती की, त्यांना लिहिण्यासाठी कोणतेही प्रतिभासाधन करावे लागले नाही. केवळ हुंकाराला शब्दरूप मिळाले आणि त्यातून अजरामर साहित्यकृती निर्माण झाल्या. वेदना, विद्रोह आणि नकारातून जन्माला आलेल्या या साहित्यकृतींनी केवळ साहित्याला समृद्ध केले नाही तर समाजाला नवे भान दिले. या साहित्य प्रवासात दलित स्त्रियांनी कवयित्री, लेखिका म्हणून दिलेले योगदान खूप मोलाचे आहे. ही समतेची पताका मिरवणारी साहित्यमंदिरे आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी आहेत. दलित स्त्रियांचे जीवन आज प्रगतीच्या ज्या टप्प्यावर उभे आहे, त्यामागे आंबेडकरांची दूरदृष्टी आणि विचारसृष्टी आहे याचे भान समाजाने ठेवले पाहिजे.          
          - प्रा. मिलिंद जोशी 

कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद 
९८५०२७०८२३ 
(पूर्वप्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक' पुणे )


Thursday, April 7, 2016

मी मृत्युंजय... मी संभाजी

(पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक 'चपराक', पुणे

आत्ता थोड्या वेळापूर्वीच संजय सोनवणी यांची छ. संभाजीराजांच्या अखेरच्या दिवसांवर आधारित 'मी मृत्युंजय... मी संभाजी' ही कादंबरी वाचली. शिवपुत्र संभाजीच्या जीवनावर तशा कित्येक कादंबरीकारांनी कादंबर्‍या रचल्या आहेत परंतु त्या सर्वांत जनमानसावर अधिराज्य गाजवलं ते शिवाजी सावंत यांच्या 'छावा'ने! सावंतांनी ज्या काळात संभाजीवर कादंबरी लिहिली त्या काळात जनमानसात संभाजीची वेगळीच प्रतिमा होती. महापराक्रमी बापाने महत्प्रयासाने कमावलेलं राज्य विध्वंसणारा व्यसनी, बदफैली संभाजी असं जे मराठी बखरकारांनी संभाजीचं चित्र लोकांसमोर पेश केलं होतं त्याला प्रथम सावंतांनी तडा दिला. त्यानंतर कित्येकांनी ही वाट चोखाळली परंतु त्यापैकी कोणालाच सावंतांच्या ‘छावा’ची सर आली नाही.
या पार्श्वभूमीवर सोनवणी यांनी संभाजीवर आधारित कादंबरी लेखनाचा प्रयत्न केला आहे परंतु सावंत आणि सोनवणी यांच्यातील मुलभूत फरक असा की, सावंतांनी संभाजीचे संपूर्ण जीवन कादंबरीद्वारे उलगडण्याचा प्रयत्न केला तर सोनवणींनी फक्त संभाजीचे अखेरचे दिवस आपल्या लेखनाकरता निवडले.
एक राजा, एक छत्रपती क्षणात शत्रूसैन्याच्या हाती लागतो. तिथून त्याची फरफट होत जाते. कैदेत असताना क्षणाक्षणाला त्याला प्रतीक्षा असते, शत्रूच्या तावडीतून आपणास सोडवण्याकरता येणार्‍या इमानी, निष्ठावंत सैनिकांची, सरदारांची. परंतु त्याची ही आशा उलटणार्‍या क्षणांबरोबर हळूहळू मावळू लागते. असहाय्य, एकाकी परिस्थितीत संकटाने ग्रासलेल्या मनुष्याच्या भावविश्वाचा शोध घेण्याचा सोनवणींनी प्रयत्न केलाय. यापूर्वी ना. सं. इनामदारांनी छ. शिवाजी महाराजांवरील आधारित ‘राजेश्री’ कादंबरीत छत्रपतींमधील व्यक्तीच्या भावजीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही कादंबर्‍या तसेच कादंबरीकारांची तुलना केव्हाही अनाठायी असली तरी तुलनात्मकदृष्ट्या पाहिले असता इतिहासाला दंतकथा, आख्यायिकांद्वारे जे विकृत वळण लागते, ते टाळण्याच्या बाबतीत सोनवणी यशस्वी झाले आहेत. इनामदारांची भूमिका नेहमीच कादंबरीकाराची राहिल्याने अनेकदा त्यांनी दंतकथा, आख्यायिकांचा मुक्तहस्ते वापर केला आहे. परंतु संधी असूनही सोनवणींनी हा मोह टाळून शक्य तितका इतिहासाशी प्रामाणिक राहण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे!
या कादंबरीतील मुख्य पात्र संभाजी जरी असलं तरी कथानक पुढे नेण्याकरता मुकर्रबखान, औरंगजेब, रहुल्लाखान प्रत्यक्षरित्या पुढे येतात तर कवी कलश हा अप्रत्यक्षपणे वावरत असतो. फक्त एकाच क्षणी तो दृश्यमान होतो व ते देखील धिंड निघतेसमयी!
औरंगजेबाच्या दरबारात कलशासह संभाजीला हजर केले जाते व संभाजी तिथे बादशाहला उद्देशून दुरुत्तरे करतो अशा आशयची वर्णने ऐतिहासिक कागदपत्रात तसेच अनेक ऐतिहासिक कथा-कादंबर्‍यात वाचायला मिळतात परंतु त्यामागील राजकीय पार्श्वभूमी फक्त याच कादंबरीत वाचायला मिळते.
औरंगजेब संभाजीसोबत या तर्‍हेने का वागला, संभाजी-कलशाने त्याचा उपहास का केला याची सकारण कारणमीमांसा संभाजीच्या स्वतःशीच चाललेल्या संवादातून व दरबारातील प्रसंगातून केली जाते. माझ्या मते, इतिहासाचे संदर्भ ग्रंथ वाचनाचा कंटाळा करणार्‍या व कादंबरीत इतिहास शोधणार्‍या वाचकांसाठी ही कादंबरी उपयुक्त ठरेल; परंतु छ. संभाजीराजांच्या अखेरच्या दिवसांतील जीवनावर प्रकाश टाकणं हाच या कादंबरीचा प्रधान हेतू आहे का? याचे उत्तर निर्विवादपणे होकारार्थी वा नकारार्थी देता येत नाही.
कधी कधी स्वतःलाच पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा वा जीवनात अनुभवलेल्या प्रसंगांना एखाद्या मिथकाच्या वा ऐतिहासिक घटना/व्यक्तिरेखेच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये इतिहास व जीवनातील अनुभव यांची यथायोग्य सांगड घातली गेली तरच त्यातून उत्तम कलाकृती सादर होते. याचे सर्वांच्या परिचयाचे उदाहरण म्हणजे इयान फ्लेमिंगचा ’जेम्स बॉंड’.
जेम्स बॉंड नावाचं मिथक फ्लेमिंगने जन्माला घालत आपल्या अनुभवांची त्यास जोड देऊन ते पात्र इतकं जिवंत केलं की, या नावाचा ब्रिटिश गुप्तहेर अस्तित्वात असलाच पाहिजे यावर लोकांची श्रद्धा बसली. इथं सोनवणींच्या समोर ऐतिहासिक पुरुष संभाजी आहे. ज्याने नऊ वर्षं सत्ता उपभोगलीय. ज्याकरता त्याला आप्तांचा, स्वकीयांचा, शत्रूंचा सतत सामना करावा लागला. जन्माप्रमाणे मृत्यू अटळ आहे परंतु सदोदित मरणाच्या छायेत असूनही मृत्युला न जुमानता निधड्या छातीने तोंड देणार्‍या संभाजीची अखेर नेमकी कशी झाली असेल?
हा प्रश्न गेली अनेक वर्ष, दशकं, शतकं तमाम महाराष्ट्रीयन माणसांच्या मनात एकदा तरी डोकावला असेल. संभाजी धीरोदात्तपणे मृत्युला सामोरा गेला हे ऐतिहासिक सत्य आहे परंतु त्याचा हा मृत्युपर्यंतचा प्रवास व तत्पूर्वी कैदेतील उलाघाल टिपण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. यामध्ये अर्थातच शिवाजी सावंतांचे नाव येणे क्रमप्राप्त आहे परंतु सावंतांच्या तुलनेने सोनवणी याबाबतीत कमालीचे यशस्वी ठरले आहेत. याला प्रामुख्याने कारणीभूत त्यांची विशिष्ट लेखनशैली असली तरी काळाची निवड, पात्रांची अतिमर्यादित संख्या हे दुय्यम घटकदेखील तितकेच सहाय्यक ठरतात.
सबंध कादंबरीत संभाजी कलशासोबत बोलत आहे. परंतु त्याची खरोखर कलशासोबत चर्चा सुरु आहे का? याचे उत्तर ठामपणे नकारार्थी वा होकारार्थी देता येत नाही. कलश हे एक निमित्त आहे. त्याच्या माध्यमातून स्वतःच्या मनात उद्भवणार्‍या नाना शंकांना, प्रश्नांना तोंड फोडण्याचे काम संभाजी करतो. संभाजीचा हा संवाद लांबलचक, अखंड असला तरी तो कुठेही कंटाळवाणा होत नाही. कारण त्यात जसा इतिहास व तत्कालीन राजकारणाचा संदर्भ आहे त्याचप्रमाणे मानवी आशे-निराशेचे गडद प्रतिबिंबही आहे.
शत्रूने कैद केलेल्या संभाजीला हरघडी असं वाटतं की, आता माझी माणसं येतील व मला सोडवतील. संकटातून मुक्त होण्यासाठी त्याच्या मनाची होणारी अधीरता त्यातून ध्वनित होते व त्या अधीरतेसोबत वाचकालाही उत्कंठा लागून राहते की, कोणत्याही क्षणी ’हर हर महादेव’चा जयघोष होऊन संभाजीचे निष्ठावंत सैनिक त्याच्या सुटकेसाठी जीवावर उदार होऊन शत्रूवर हल्ला करतील. बादशाही छावणीत जाईपर्यंत हा आशे-निराशेचा खेळ चालत राहतो. या खेळात इतिहासातील संभाजी व वास्तव जीवनात प्रत्येक व्यक्तित असलेला संभाजी यांची बेमालूमपणे सांगड घालण्यात सोनवणी यशस्वी झाले आहेत.
ज्यावेळी मनुष्य संकटांनी ग्रासतो व त्याचे आप्तही त्याला वार्‍यावर सोडून देतात, त्यावेळी त्याच्या मनाची होणारी उलघाल कोणी अनुभवली नाही? परंतु आपल्या प्रमाणेच अशीच किंबहुना याहून मोठी, भयंकर अशी परिस्थिती संभाजी भोसले नामक तरुणावर ओढवली होती. त्यावेळी त्याने त्या स्थितीला कशा प्रकारे तोंड दिले हे शब्दबद्ध करत असताना वाचकाच्या मनावर निराशेचे सावट पडू न देण्याचीही सोनवणी खबरदारी घेतात. संभाजीचा मृत्यू अटळ आहे. त्याची वेदना, त्याचे हाल अटळ आहेत परंतु त्याचा स्वीकार करत असताना त्याची लढाऊ वृत्ती दाखवताना सोनवणी वाचकाच्याही मनातली जिद्द, लढाऊ वृत्ती कुठेतरी जागृत करतात. हेच माझ्या मते त्यांचे तसेच या कादंबरीचे मोठे यश आहे.
आजवर संभाजीच्या अखेरीवर जितक्या कादंबर्‍या वाचल्या त्यात कुठेही असा अनुभव आला नाही. आली फक्त ती बेचैनी, उदासीनता, निराशा. या पार्श्वभूमीवर सोनवणींचे यश नाकारता येत नाही.
कलाकृती, मग ती ऐतिहासिक असो वा सामाजिक. ती शोकात्मक वा सुखात्मक बनवण्याचे स्वातंत्र्य लेखकाकडे असते. परंतु एका शोकांतिकेला सकारात्मक पद्धतीने देखील वाचकांसमोर मांडता येऊ शकते हा चमत्कार मी तरी प्रथमच पाहिला आहे.

 - मी मृत्युंजय मी संभाजी 
लेखक : संजय सोनवणी 
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन, पुणे (९८९०९५६६९५)
पाने : १२५, किंमत : १४०
- संजय क्षीरसागर
९९८७१३८२२४ 

(पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक 'चपराक', पुणे)

Wednesday, April 6, 2016

महाजन काका

(पूर्व प्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक', पुणे)

डॉक्टरांच्या कन्सलटंसी रुमच्या लॉबीमध्ये मी पाऊल ठेवले तेव्हा तिथे प्रचंड गर्दी होती. बरेच नंबर माझ्या आधीच लागले होते. सर्व लॉबी पेशंटनी भरली होती. डॉक्टरांची ख्यातीही तशीच होती. त्यांच्या हाताला चांगला गुण येत असे म्हणूनच तिथे प्रचंड गर्दी होई. डॉक्टरही पेशंटला खूप वेळ देत. त्यांचं सगळं ऐकून घेत आणि मगच उपचार सुचवीत. म्हणूनच त्यांचं आणि पेशंटचं एक नातं निर्माण होई. त्यात विश्‍वास निर्माण होई. आणि निम्मा आजार त्यामुळेच दूर होई. गेली अनेक वर्षे प्रॅक्टीस करुन डॉक्टरांनी नाव कमावलं होतं.
माझा नंबर लागायला अजून एखादा तास लागेल याची मला खात्री पटली होती. मी रिसेप्शनीस्टकडे गेलो. माझी फाईल दाखवली आणि मी अपॉंईंटमेंटसाठी फोन केला होता म्हणून तिला सांगितले. तिने माझे नाव रजिस्टरमध्ये असल्याची खात्री केली. मला वजन करायला लावलं. सर्व नोंदी फाईलमध्ये करुन ती माझ्याकडे देत ती म्हणाली, ‘बाजूला महाजन काका बसलेत त्यांना ती दाखवा...’ मी बाजूला पाहिले. साठ-पासष्टचे महाजन काका खुर्चीत बसले होते. बारिक अंगकाठी, गहू वर्ण आणि चेहर्‍यापेक्षा चष्मा मोठा. काकांसमोर एक स्टुल होतं आणि त्यावर एक वही होती. मी त्यांच्याकडे वळलो. ‘फाईल द्याल का मला ती?’ ते अदबीने म्हणाले. अंगकाठीपेक्षा त्यांचा आवाज मोठा वाटला मला. ‘तुम्ही काय करणार आहात माझ्या फाईलचं?’ मी त्यांना उलट प्रश्‍न केला.
‘मी काहीच करणार नाही साहेब. थोडी नजर टाकणार आणि तुम्हाला परत करणार, परंतु काही नोंदी मला ठेवायच्या आहेत. तुम्हाला वाटलं तरच द्या. माझी सक्ती नाही’ महाजन काका विश्‍वासानं म्हणाले.
मी रिशेप्शनीस्टकडे कटाक्ष टाकला. तिनं द्या म्हणून खूण केली. मग मी काकांकडे फाईल सरकवली. त्यांनी फाईल उघडून माझं नाव मोठ्यानं उच्चारत त्यांच्या वहीत लिहून घेतलं. ‘मोबाईल नंबर द्याल का प्लीज!’ ते मला म्हणाले. कशाला पाहिजे यांना हे सगळं, अशा नजरेनं मी त्यांना माझा मोबाईल नंबर सांगितला. त्यांनी तो लिहून घेतला.
‘काय होतंय तुम्हाला?’ त्यांनी मला विचारलं. मी प्रश्‍नार्थक चेहरा केला. ‘अहो.. तुम्हाला वाटलं तर सांगा. माझी सक्ती नाही’ काकांनी मला कोड्यात टाकलं.
‘मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. कमी होत नाही. म्हणून डॉक्टरांकडे आलो’ असं सांगितलं तर ते हसले.
‘इथं येणार्‍या नव्याण्णव टक्के लोकांना बीपीचा त्रास आहे. काही काळजी करु नका. डॉक्टर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील. बसा तुम्ही’ हसतमुखानं त्यांनी मला बसण्याची खूण केली. मी एका जागेवर बसून घेतलं. अनेक पेशंट रांगेत होते. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या व्याधीनं त्रस्त होता. त्यापेक्षाही हा काय आजार आपल्याला जडलाय या काळजीत प्रत्येक चेहरे दिसत होते. प्रत्येक पेशंटबरोबर किमान एखादा तरी सोबती होता. वयोवृध्द असेल तर दोघं दोघं सोबतीला होते. प्रत्येकाला आपला नंबर लवकर यावा असं वाटत होतं. परंतु डॉक्टर एकेकाला किमान वीस एक मिनीटं देत होते. आत जाणारा धास्तावून जात असे तर बाहेर येणारा हसतमुखपणे येत असे. हीच डॉक्टरांची ख्याती होती. 
मी विचार करत होतो. विधात्यानं प्रत्येकाला सुंदर आयुष्य दिलंय पण काळजी, चिंता, व्याधी याचही वरदान दिलंय. हो वरदानच! त्यामुळंच मनुष्य मार्गावर राहतो. आयुष्यभर अशा काळज्यांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत राहतो. प्रत्येकाला या दिव्यातून जावंच लागतं. छान छान डे्र्रसच्या दुकानात गेल्यावर नाही का सेल्समन सांगतो, ‘ऐसा दुसरा डेस नही मिलेगा. सब पॅटर्न अलग है...’ त्याप्रमाणेच प्रत्येक मनुष्य एक वेगळा पॅटर्न. कोणी दुसर्‍यासारखं नाही. एकाच घरात वडील,भाऊ, बहिणी, आई, काका, मामा, वहिन्या सगळे वेगवेगळे. प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं, काळज्या वेगवेगळ्या तसे आजारही वेगवेगळे. त्यामुळे डॉक्टरांकडे येणारे पेशंट वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे.
काही वेळातच माझा नंबर आला. मी डॉक्टरांच्या रुममध्ये प्रवेश केला तसे त्यांनी हसून विचारल. ‘कशाला आलात..?’ मी हसलो. ‘तुम्हाला पहावंसं वाटलं म्हणून आलो’ तर तेही हसले.
‘यमाला पहायला कोणी येत नाही हो..’ येवढं बोलून ते पुन्हा सात मजली हसले. माझी आणि डॉक्टरांची बर्‍यापैकी ओळख होती. ‘चला तपासुया’ म्हणाले आणि हसतच ते उठले. मी बाजूच्या बेडवर पडुन राहीलो. सगळं सांगितलं. डॉक्टरांनी सर्व ऐकून घेतलं आणि मला पाचएक मिनीटं तपासल्यावर जागेवर जावून बसले. मी उठून त्यांच्या पुढे जावून बसलो. ‘काही काळजी करु नका. ब्लड टेस्ट लिहून देतोय. तेवढ्या करुन रिपोर्ट दाखवा मग पाहु’ ते म्हणाले.
‘पण डॉक्टर औषध वगैरे काही सुरु करताय का?’ मी म्हणालो. ‘का हौस आहे की काय तुम्हाला? काही काळजी करु नका; काही गंभीर नाहीये. रिपोर्ट येवू देत मग पाहू’ ते विश्‍वासानं म्हणाले.
‘ठीक आहे’ म्हणून मी बाहेर पडलो. रिसेप्शनीस्टकडे जावून तिच्याकडे फाईल दिली. पैशाची देवाणघेवाण झाली. तेवढ्यात महाजनकाकांचा आवाज आला, ‘या इकडे, काय म्हणाले डॉक्टर?’
‘काही नाही हो..’ म्हणून मी चालु लागलो. मला त्यांच्या आगाऊपणाचा थोडासा रागच आला होता. तसे ते हसतच म्हणाले ‘सांगेन काही गोष्टी युक्तीच्या’ हे ऐकून मी थबकलो. सरळ फाईल त्यांच्या हातात ठेवली. ‘हं... ब्लड टेस्ट करायला सांगितलंय. लगेचच उद्या करुन घ्या. वेळ घालवू नका’ ते फाईल घेऊन म्हणाले.
मी ‘ठीक आहे’ म्हणालो आणि फाईल घेऊन बाहेर पडलो. पण मनात उगाचच महाजन काकांचे विचार घोळत राहीले. उशीर झाला होता, परंतु ऑफिसमध्ये सांगितलं होतं त्यामुळे ऑफिसमध्ये पोहोचलो आणि कामामध्ये गढून गेलो. सायंकाळी सहाच्या दरम्यान मोबाईलवर अन्नोन फोन आला. मी तो घेतला तर समोरुन महाजनकाका बोलत होते. ‘अहो उद्या ब्लड टेस्ट करायला सांगितलंय ना डॉक्टरांनी. आठवण करायला फोन केला होता..’
‘कोण बोलतय?’ मी म्हणालो.
‘अहो विसरलात काय? महाजन काका बोलतोय. उद्या टेस्ट करुन घ्या बरं. त्यासाठी रात्रीचं जेवण लवकर घ्या आणि लकवर झोपा. सकाळी आठ वाजता लॅब उघडतात. अनोशापोटी जा. पटकन होईल’
‘होय होय.. माहिती आहे मला’ मी जरा त्राग्यानंच म्हणालो.
‘अहो तसं नव्हे. एकदा टेस्ट झाल्या की टेन्शन जाईल, फक्त आठवण केली. ठेवतो फोन’ असं म्हणून काकांनी फोन बंद केला.
कोण हे महाजन काका? हे का एवढा मला फोन करतायत? च्यायला कटकट आहे. काय माणसं पण असतात. आता ह्या म्हातार्‍याला काय पडलीय एवढा फोन करायची? माझ्या मनात विचार येत होते आणि मी त्यांच्यावर जरा चिडलोच होतो. रात्री झोप लागली. सकाळी जाग आली तीच मुळी महाजन काकांच्या फोनने ‘गुड मॉर्निंग.. महाजन काका बोलतोय.. टेस्ट करायला बाहेर पडताय ना? काही मदत हवी का म्हणून फोन केला. अनोशापोटी निघा आणि दुपारी जेवण झाल्यावर दोन तासांनी पुन्हा टेस्ट करायच्या आहेत हे लक्षात ठेवा’ ते बोलत होते.
‘होय हो काका मला माहिती आहे. मी करुन घेतोय टेस्ट’ असं म्हणून काहीशा रागानेच मी फोन बंद केला. माझ्या रितसर सर्व ब्लड टेस्ट झाल्या. महाजन काकांनी लवकर जायला सांगितलं म्हणून बरं झालं. आठ साडेआठ पर्यंत सकाळच्या टेस्ट झाल्या आणि 12च्या आत दुपारच्या टेस्ट होवून मी ऑफिसलाही गेलो. दुसर्‍या दिवशी रिपोर्ट घेउन डॉक्टरांकडे गेलो तर तिथे महाजन काका कुणाशीतरी उभं राहून बोलत होते. मी नमस्कार केला आणि रिशेप्शनिस्टला सांगून बसून राहीलो. काका काहीतरी गंभीरपणे बोलत होते. ‘काही काळजी करु नका. डॉक्टरांनी सांगितलंय ना ऍडमीट व्हायला तर व्हा! ते सगळी काळजी घेतील’ ते सांगत होते.
‘अहो पण आज्जींना इथवर आणणार कसं? ऍम्बुलन्स, स्ट्रेचर सगळ हवं ना?’ पेशंटचे नातेवाईक काळजीनं बोलत होते.
‘अहो.. मी करतो व्यवस्था. पैसेही जास्त द्यावे लागणार नाहीत. आपली मुलं त्यांना स्ट्रेचरवरुन वरती घेवून येतील. आता तुम्ही जास्त वेळ घालवू नका. पहिल्यांदा ऍडमीट करा पाहू आणि फाईल माझ्याकडे द्या, मी सर्व तयार ठेवतो’ काकांनी त्यांना धीर दिला आणि ऍम्बुलन्सला फोन लावला.
‘बरोबर मुलं घेवून जा रे. पेशंटला ऍडमीट करायचंय. ओल्ड एज आहे. त्यांना त्रास नाही व्हायला पाहीजे’ काका फोनवरुन समोरच्याला सूचना देत होते आणि हाताने पेशंटच्या नातेवाईकांना लवकर निघायला सांगत होते. ते निघून गेल्यावर काका माझ्याकडे वळले. ‘आणले का रिपोर्टस? डॉक्टरांना दाखवा. मग बघु’ असं मला म्हणून ते त्यांच्या जागेवर जावून बसले. मी महाजन काकांचे बारीकपणे निरिक्षण करीत होतो. हे सर्व ते का करतायत ते मला उमगत नव्हतं. यथावकाश माझा नंबर येताच मी डॉक्टरांना भेटायला गेलो. माझं कोलेस्टॉल बॉर्डरवर होतं. बाकी रिपोर्टस बरे होते. काही जुजबी सूचना देउन, खाण्याची पथ्य सांगून आणि पुन्हा तीन महिन्यांनी परत रिपोर्टस करण्याची सूचना देऊन डॉक्टरांनी मला जायला सांगितलं. यावेळी मात्र मी बाहेर येवून सरळ महाजन काकांच्या हातात ठेवली. त्यावर काका हसले. फाईलवर नजर टाकून म्हणाले, ‘अजून तीन महिन्यानी पुन्हा टेस्ट करायला सांगितल्या आहेत. होय ना? काही काळजी करु नका. मी आहेच आठवण करुन द्यायला’ ते म्हणाले आणि जोरात हसले. ‘थोडा व्यायाम करा. सगळं कंट्रोलमध्ये राहील’ असा मोलाचा सल्लाही द्यायला ते विसरले नाहीत.
महाजन काकांबद्दलचं माझ्या मनातलं गुढ वाढत होतं. ते येणार्‍या प्रत्येक पेशंटशी फार जवळीकीने बोलत होते. बरेच पेशंट आणि त्यांचे नातेवाईक काकांशी स्वत: येवून बोलत होते. त्यांचा सल्ला घेत होते. काका त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्या वहीत काहीतरी लिहून घेत होते. त्यांचे फोन नंबर आठवणीने पुढे लिहीत होते. काही तरुण पेशंट नमस्कार करुन जात तर काही आदराने त्यांच्यापुढे वाकत होते. काका हे काय आणि कशासाठी करतायत हेच मला उमगत नव्हतं. त्यामुळे त्यांबद्दल उत्सुकता आणि गुढ दोन्हीही वाढत होतं. आताशा त्यांच्याबरोबर ओळखही वाढली होती.
अशाच एका सकाळी मी ऑफिसला जाताना अचानक मला काका दिसले. मी धावतच त्यांना गाठलं. ‘काका नमस्कार. काका, मी यापुढे सांगतोय त्याला नाही म्हणू नका प्लीज’ मी म्हणालो. त्यांच्या चेहर्‍यावर उत्सुकता दिसली. ‘चला चहा घेवूया’ असे म्हणत बळेच त्यांना हॉटेलमध्ये घेवून गेलो. ‘अहो तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होईल आणि मी चहा घेत नाही’ म्हणून ते आढेवेढे घेवू लागले.
‘असुदेत मला नाही उशीर होत आणि तुम्ही माझ्यासमोर फक्त बसा, मी चहा घेतो’ असं मी म्हणालो तरी ते आढेवेढे घेत होते. मग मात्र मी बळेच त्यांना घेवून गेलो. मला आज त्यांच्याशी बोलायचं होतंच. हॉटेल हे केवळ निमित्त होतं.
‘काका तुम्ही हे सगळं का करताय?’ मी सरळ विषयालाच सुरुवात केली.
‘हे म्हणजे?’ असं म्हणून ते मिश्कीलपणे हसले आणि माझ्या बोलण्यातला रोख ओळखून बोलू लागले. ‘मी काही महात्मा किंवा परमात्मा नाही. अगदी सामान्य आणि सरळ आयुष्य गेलं माझं. नोकरी केली. व्यवस्थित प्लॅनिंग करुन संसार केला. पैसा सांभाळून ठेवला. मुलांच शिक्षण पूर्ण केलं. दोघांनाही पायावर उभं कलं. मुलीला चांगलं स्थळ बघुन तीचं लग्न करुन दिलं. दोघे सुखी आहेत. त्यातच आपलं सुख आहे. पण मित्रा, मनात सल एकच राहीली की हे सामान्यांसारखं सुखी आयुष्य जगलो पण ज्या समाजात मोठा झालो त्यांच्यासाठी आपण काय दिलं? निवृत्त झाल्यावर सामान्यासारखं व्याधीला कुरवाळत, मरणाची वाट पाहत आयुष्य मला नको होतं. मग मला घरात टीव्ही पाहत आडवा असलेला म्हातारा कधी जातोय याची वाट पाहणारी तोंड दिसू लागली. डोक्यात आयडीया आली. डॉक्टरांना भेटलो आणि रिसेप्शनीस्टच्या बाजूला एक खुर्ची टाकून बसु लागलो. काय करतो मी? फक्त येणार्‍या पेशंटशी बोलतो, त्यांना जगण्याची उम्मिद देतो. एका वहीत त्यांच्या टेस्ट, ट्रिटमेंट बद्दल नोंद करतो आणि त्यांना एक फोन करुन फक्त आठवण करुन देतो. मध्येच एखादा फोन करुन त्यांची चौकशी करतो. कुणाकडे काही अडचण असल्यास त्याला जमेल तशी मदत करतो. ऍडमीट असलेल्या पेशंटच्या जवळ नातेवाईक नसतील तर त्यांच्या जवळ बसुन त्यांची जमेल तशी सेवा करतो. ऐकण्याच्या मन:स्थितीत असेल तर पेशंटला पुस्तक वगैरे वाचुन दाखवतो. मस्त जातो हो माझा वेळ यात. चलनवलन राहतं. डोक्यात नको ते विचार घुसतच नाहीत. घरातल्यांना आपली अडचण नाही वर चांगलं काम केल्याच समाधान मिळतं. छान झोप लागते. सकाळी फे्रश...’
त्यांनी एक मोठ्ठा सुस्कारा टाकला. मी गुंग होवून ऐकत होतो. महाजन काका उत्साहानं बोलत होते. माझ्या मनात विचार आला, ‘खरंच बाबा आमटेंसारखं आनंदवन सगळ्यांनाच उभं नाही करता येत. काही असतात असे वेडे. एखाद्याच्या आयुष्यात आनंदाचं वन फुलवण्याचा प्रयत्न करणारे. महाजन काकांसारखे!
‘चला साहेब, चहा घ्या लवकर. थंड होत चाललाय तो’
महाजन काकांच्या बोलण्याने मी भानावर आलो. त्यांची प्रसन्न मुद्रा कितीतरी वेळ माझ्या डोळ्यासमोर तरळत राहिली.

(पूर्व प्रसिद्धी : मासिक 'साहित्य चपराक', पुणे)
आनंद वेदपाठक 

मुलुंड (पू), मुंबई संपर्क: 98692 52119

Monday, April 4, 2016

‘सांगायलाच हवे होते असे काही’

माणसाचे आयुष्य म्हणजे काय? आशा-आकांक्षा आणि स्वप्नांचे अमर्याद विस्तारलेले पंख की परिस्थितीच्या मर्यादेने बंदिस्त केलेला पिंजरा? मोकळा श्‍वास अन् घुसमट याच्या काठावर करावी लागणारी कसरत म्हणजेच आयुष्य असते का?
भगवान निळे यांची कविता वाचून हे आणि असेच अस्वस्थ करणारे प्रश्‍न आपला पाठलाग करत राहतात. अस्सल आयुष्याचा एक विशाल पट भगवान निळे यांची कविता मांडते. निळे यांनी त्यांच्या कवितांना आत्मचरित्राची उपमा दिली आहे. कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक कवीची कविता हा त्या-त्या कवीच्या मनाच्या तळातून आलेला उद्गार. त्या अर्थाने तो कवीच्या जीवनाचा प्रवास! पण निळे यांची कविता ‘आत्मचरित्र’ या शब्दातून प्रतित होणार्‍या अर्थाच्या पलीकडे जाणारी आहे. याचे कारण कवी स्वतःबद्दल लिहितोय,
स्वानुभव कवितेच्या रूपातून सांगतोय, मात्र या स्वानुभवातील सुख-दुःख सार्वत्रिक आहेत. म्हणूनच ही कविता एकट्याची असूनही एकट्याची नाही. अनेकांना तो स्वतःच्या आयुष्याचा स्पष्ट उद्गार आहे, याचीच खूणगाठ पटेल.
‘सांगायलाच हवंय, असं नाही...’ हे भगवान निळे यांच्या काव्यसंग्रहाचे शीर्षक. निळे यांच्या वाट्याला जे अनुभव आले, ऊन-सावलीचा जो खेळ आला, तसाच अनुभव आणि तोच खेळ हजारो व्यक्तींच्या जीवनात येतो. सांगायलाच हवंय, असं नाही.... हीच त्यांची भावना असते. ते मूक राहतात. त्यांच्या भावना, त्यांचा कोंडमारा जणू प्रातिनिधिक रूपात निळे यांनी कवितेतून मांडला आहे.
मराठी काव्यक्षेत्रात निळे यांच्या कवितांना स्वतंत्र स्थान आहे. त्यांच्या असंख्य कविता विविध मासिकातून, नियतकालिकांतून काव्यरसिकांच्या भेटीला वेळोवेळी आल्या; पण या कविता एकत्रित वाचण्याचा योग आला नव्हता. एका प्रसिद्ध कवीचा पहिला काव्यसंग्रह हे सुद्धा ‘सांगायलाच हवंय, असं नाही...’चे वैशिष्ट्य!
या कविता आत्मकथा आहेत, असे भगवान निळे म्हणतात खरे, मात्र आपण आजच्या व्यामिश्र समाजातील गुंतागुंतीच्या जगण्याचे प्रतिक आणि प्रतिनिधीही आहोत, याचे पुरेपूर भान त्यांना आहे. ‘मी म्हणजे, तुम्हीही!’ ही या काव्यसंग्रहातील पहिलीच कविता याची साक्ष देईल.
मी आहे दरवाजा
आपल्या देशाला जाणून घेण्याचा
माझीच सावली पडली आहे
देशावर सर्वदूर....

हे सामान्य माणसाच्या जीवनाचे सत्य. ते सत्य निळे यांची कविता कोणत्याही आविर्भावाशिवाय सहज सांगून जाते.
पालखीचे भोई बनवून
मला केले गुलामकरी
माझ्याभोवती रूढीचे
‘रिंगण’ आखून...

या त्यांच्या शब्दांमध्ये अगतिकता नाही अथवा तक्रारीचा सूर नाही, कटूता देखील नाही. आखून दिलेल्या रिंगणात जीवनाचा खेळ खेळायचा आहे, याचे पूर्ण भान त्यांना आहे. यशापयाच्या निकषांवर भलेही आयुष्याचे मूल्यमापन कसेही होवो, कवितेचे शब्दभांडार आपली पूंजी आहे, याची जाणीव त्यांना आहे.
निळे यांची व्यापक जीवनदृष्टी आणि सखोल जाणीव त्यांच्या कवितेतून पदोपदी दिसते. मग तत्त्वज्ञानाची भूमिका नसतानासुद्धा ही कविता आपसूक तत्त्वज्ञानाकडे झुकते. त्यांचे शब्द चिरंतन सत्य विलक्षण बोलक्या रीतिने अधोरेखित करतात.
प्रत्येक पिढीचा वर्तमान
कधीच सुखावह नसतो
आपण मात्र...
भूतकाळ चांगला होता अशी समजूत करून
सदैव कुंठीत अवस्थेत मात्र कुंथत असतो...

पिढ्या येतात आणि जातात. वर्तमानात जगणे नाकारणारेच अनेकजण असतात. त्यांच्यासाठी भूतकाळ सोनेरी असतो आणि भविष्यकाळ रूपेरी. रूपेरी भविष्याबद्दल आशावादी रहायलाच पाहिजे पण भूतकाळ-भविष्यकाळ याच्या हिंदोळ्यात हातून वर्तमान मात्र निसटतो! काळाचे द्वैत नसते, हे सांगताना निळे यांची कविता आजचे चित्र अन् तेव्हाचे चित्र यात फरक नाही हे दाहक वास्तव मांडून अंतर्मुख करते.
तेव्हाही मिळायचे दंडुके आणि
बंदुकीच्या गोळ्या
तुम्ही काय खायचे? काय पहायचे?
काय घालायचे? काय लिहायचे?
काय बोलायचे?
यावर तेव्हाही होती त्यांची हुकूमत....

या निळे यांच्या शब्दांचा प्रतिवाद होऊ शकत नाही. ‘तेव्हाही आजच्यासारखेच...’ हे या कवितेचे शीर्षक समर्पक आहे.
रोजचे रहाटगाडे टाळता येत नाही. त्या रहाटगाड्यात जीवन फिरते असे म्हणण्यापेक्षा ते शोषले जाते. मग निळे यांनी म्हटल्याप्रमाणे शहरात दबा धरून बसलेल्या सुप्त मरणांना हुलकावण्या द्याव्या लागतात. याचे कारण जगण्याची अनावर ओढ. निळे यांनी त्याला ‘जगण्याच्या लालसेचा खुंटा’ अशी उपमा दिली आहे. जगण्याची फरफट होतानाही चालण्याचे चक्र मोडून पडत नाही हे जगण्याच्या लालसेच्या खुंट्यामुळेच; पण चालताना, जगताना फाटणार्‍या आणि रक्ताळणार्‍या मनाचे आक्रंदन कवी लपवून ठेवत नाही. माणूस एकटा जगू शकत नाही. एकटा सोसू शकत नाही. सोसण्याचा प्रयत्न केला तरी जोडीदारापासून ते लपत नाही. जखमांचे भोग केवळ रूढार्थानेच एकाकडे; प्रत्यक्षात नकळत तेच भोग जोडीदाराच्याही पदरात पोहोचलेले असतात. कवीमन अशावेळी आणखी व्याकुळ होते.
प्रत्येक रात्री स्वतःला चाचपत
तू छताकडे एकटक पाहत राहतेस
तेव्हा माझ्या उमेदीचे दोरही
सैल होत जातात...

अशा ओळी एकरूप झालेल्या भावविश्‍वातूनच येऊ शकतात.
हेही दिवस जातील, नाही असे नाही
तू मात्र धीर सोडू नकोस
माझ्यातली धमक लटपटू लागते....

त्याची कहाणी तिचीही झाली आहे आणि तिच्याशिवाय तो नाही. ही कहाणी एका घराची नाही, ती घराघरांची आहे! पुरूष वर्चस्व असलेल्या समाजात स्त्रियांच्या वाट्याला येणारी अगतिकता, पापणीआड लपलेले त्यांचे हुंदके निळे यांची कविता रोखठोक मांडते. आयुष्यभर संसार करूनही एकमेकांना अनोळखी राहणार्‍यांचे आक्रंदन निळे यांची कविता सामर्थ्याने टिपते.
जमिनीत तोंड खुपसून ते
जपू लागतात शहामृगी नाते...

हे सांगताना भगवान निळे व्यवस्थेच्या मर्यादांना ऐरणीवर आणू पाहतात. ‘उजेडाचा रंग‘ मधील महिला संसारी नाही, जगण्यासाठी वेगळ्या चक्रात ती अडकलेली आहे. उजेडाचा रंग कसा रे सायबा? हा तिचा प्रश्‍न साधाच, पण सनातन आहे.
जगणे आणि लिहिणे यात मी फार अंतर ठेवले नाही, हे भगवान निळेंचे प्रांजळ म्हणणे त्यांच्या कवितांमधून प्रत्ययाला येते. ती जीवनाची कविता असल्याने थेट भिडणारी आहे, जीवनाच्या अनुत्तरीत प्रश्‍नांचा पुनःपुन्हा उच्चार करणारी आहे. बहुपैलू जीवनाचे सर्व पैलू या कवितेते उतरले आहेत. त्यात नवथर प्रेम आहे, आठवणी आहेत, स्वतःचा आणि समाजव्यवस्थेचाही शोध आहे. भूक आणि लैंगिकता याच्या सर्वव्यापकतेमुळे येणारी वाटा-वळणे निळे यांची कविता धीटपणे सांगते. ‘भुकेला नसतो कधी आराम, ती कधीच नाही निवृत्त सेवानिवृत्त’ हे निखळ सत्य आणि त्या सत्यासाठीचे विदारक वास्तव त्यांच्या कवितेत आहे. संघर्ष, वंचित जीवन, चळवळी याचे साक्षीत्व भगवान निळे यांना मिळालेल्या त्या साक्षीत्वाच्या परिघाने त्यांच्या कवितेला लपेटून घेतले आहे. शोषितांच्या जगण्याचा उद्गार त्यातूनच त्यांच्या कवितेला मिळाला.
ही कविता व्यवस्थेविरूद्धचा एल्गार नाही, मात्र त्या व्यवस्थेचा चेहरा समोर आणणारा पारदर्शी आरसा आहे. म्हणूनच ही कविता आत्मपर राहिलेली नाही. ज्या परिघाने ही कविता वेढली आहे तो अमर्याद आहे. या कवितेला वैश्‍विक आयाम आहे. समाज व्यवस्थेतील विसंगतीचे दर्शन निळे यांची कविता घडविते.
या पंचवार्षिक फसव्या स्वप्नांच्या मोसमात
मीही ठोकून घेतलाय
डाव्या बोटावर दुर्भाग्याचा खिळा...

असे सांगत ती ढोंगावर परखड भाष्य करते. अपूर्ण किंवा भंगलेल्या स्वप्नांच्या काचा तुडवत जखमांची कहाणी मांडताना देखील निळे यांची कविता नैराश्येकडे झुकत नाही, हे विशेष. अपार आशावादावर त्यांचे जीवन उभे आहे आणि म्हणूनच त्यांची कविता देखील! ‘आजच्यासारखं दुःख कुणाच्याच माथी थोपलेलं नसेल, जन्माला येणारं प्रत्येक बाळ हसणारचं असेल’ हा प्रकाशमय भविष्याचा सूर त्यांच्या कवितेत जिथे तिथे दिसतो.
चिरेबंद वाड्यांना हादरे
देता-देताच ते
डोळे पुसून घालतात
हक्कांच्या जाणिवांचे काजळ
त्यांना लिहायचा आहे नव्याने
खरा इतिहास....

हे सांगताना निळे यांची कविता त्यांच्या प्रकाशाच्या मार्गात तरी
आडवे येऊ नका,
त्यांच्या स्वप्नांवर पडू द्या
लख्ख उजेड....

असे विनवित माणसाची आणि माणुसकीची बनून जाते.
पोटाला कळते फक्त भाकरीची भाषा.
नादान पावसाला कळली असती ही भाषा
तर तो कधीच वाहिला नसता
गरीबांच्या डोळ्यात....

असे वास्तव थेट सांगण्याच्या शैलीमुळे निळे यांच्या कवितेत प्रतिमा कमी आहेत. या कवितेची ताकत तिच्या आशयसंपन्नतेत आहे. या आशयसंपन्नतेसाठी निळे यांनी रोजच्या जगण्यातील शब्द निवडले आहेत. एखादे स्वगत असल्यासारखी ही कविता मनाला भिडते. कोलाहलाच्या, बाहेरील आणि आतील संघर्षाच्या चरकात पिळून निघणारे जीवन निळे यांच्या कवितेतून आपल्यासमोर येते. त्यांची कविता केवळ आत्मशोध नाही. चांगल्या जीवनाची आस घेऊन पुढे निघालेल्यांचे ते आत्मभान आहे. सहासष्ट कवितांचा हा संग्रह. सनातन प्रेरणा आणि सनातन सत्य सांगतानाही या कविता एकसुरी नाहीत. उदा.
अक्षरांना जायबंदी करून कोंडून ठेवले पुस्तकात
तर कवितेचा आक्रोश घुमणारच नाही का आसमंतात?

हा कवीचा सवाल आहे. ही कविता जसे मुंबईचे चेहरे दाखविते, भोवतालच्या चेहर्‍यामागचा चेहरा समोर आणते, तसेच स्त्री-पुरूषांच्या अंतरंगाचा तळ शोधू पाहते. ‘सांगायलाच हवे होते असे काही’ हेच निळे यांच्या कवितांबद्दल म्हणता येईल. ही कल्पनाविश्‍वात विहरणारी कविता नाही, जमिनीवर पाय असलेल्या माणसांची कविता आहे. त्यांचे राग-लोभ, त्यांची स्वप्ने, त्यांचे जगणे या कवितेचा आधार आणि आविष्कारही आहे. निळे यांची कविता केवळ प्रश्‍न निर्माण करून निरूत्तर करणारी नाही, ती उत्तरही देते. ही कविता जेवढी संयत तेवढाच तिचा आशय प्रखर आहे. निळे यांच्या प्रगल्भ कवितांनी मराठी कवितेच्या समृद्धतेत निश्‍चितच लक्षणीय भर घातली आहे. 



सांगायलाच हवंय,
असं काही...

लेखक: भगवान निळे
प्रकाशक: सृजन प्रकाशन, नवी मुंबई

पृष्ठे: 136 मूल्य: रु. 120/-
मो. 89766 69373


- स्वप्निल पोरे, पुणे 
९४२२०२९०४१