Friday, August 21, 2015

'खुदा खैर करे...'

  • 'तपोभूमी नाशिक'चे प्रकाशन करताना डावीकडून 'चपराक'चे प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील, उद्योजक गिरीश टकले, समीक्षक प्राचार्य श्रीपाल सबनीस, कुलगुरु माणिकराव साळुंखे, आप्पा पोळ आणि लेखक रमेश पडवळ. 
 
  आयी जंजीर की झंकार खुदा खैर करे 

  दिल हुआ किसका गिरफ्तार खुदा खैर करे
मध्यरात्रीची वेळ. पुणे-नाशिक बस वार्‍याच्या वेगानं धावते आहे. कवी समीर नेर्लेकर व मी एका सीटवर बसलोय. त्यांच्याकडच्या छोट्या टेपरेकॉर्डरची एक पिन माझ्या कानात व एक नेर्लेकरांच्या. ’रजिया सुलतान’ या चित्रपटातलं हे गीत मला भूतकाळात घेऊन गेलंय. अगदी शाळकरी वयात हा चित्रपट पाहिलेला.
खूप काळानंतर त्यातली गाणी ऐकण्याचा आलेला हा अनपेक्षित योग! आम्ही सगळे नाशिकला निघालेलो. 'तपोभूमी नाशिक' हे 'चपराक प्रकाशन'चं सहासष्टावं पुस्तक. त्याच्या लोकार्पणाचा सोहळा होता नाशिकला. प्रकाशक व संपादक घनश्याम पाटील, कवी माधव गिर, तुषार उथळे पाटील, नेर्लेकर व मी. रात्री दहा वाजता बस पकडली आम्ही. त्या आधी सर्वांना जेवायला घालायला पाटील विसरले नव्हते. त्यांचा हा नेहमीचाच शिरस्ता!! ‘भूक लागली आहे, चहाची तल्लफ झालीय’ असं त्यांना कधीही सांगावं लागत नाही. असो. रात्रीचा प्रवास. बसचा. झोपेचं नाव नाही. मग नेर्लेकरांनी त्यांच्याकडचा गाण्याचा खजिना उघडला. 'हे घाला कानात’ म्हणत एक पिन त्यांनी माझ्याकडे दिली.
जाने ये कौन मेरी रुह को छूकर गुजरा
इक कयामत हुई बेदार खुदा खैर करे

‘‘बेदार म्हणजे जागरुक होणे किंवा जागे होणे. कयामत म्हणजे वादळ.’’ नेर्लेकर खुलासा करतात. मग ते या विलक्षण गाण्याचा इतिहास सांगतात. जां निसार अख्तरनं लिहिलेलं हे गीत. संगीतकार खय्याम. गायक कब्बन मिर्झा. हा चित्रपट काढला होता कमल अमरोही यांनी. हा कब्बन मिर्झा कुठला तर चक्क पाकिस्तानमधला! अमरोहींना दमदार अशा पहाडी आवाजाचा गायक हवा होता. हा शोध घेत ते पाकिस्तानमध्ये गेले. एक दिवस चक्क रस्त्यावर कब्बन गाताना दिसला त्यांना. उचलला सरळ त्याला व घेऊन आले इकडे. नेर्लेकर सांगत असतात. मी आश्चर्यानं ऐकत असतो.
   लम्हा लम्हा मेरी आँखोमें खिंचा जाती है
   इक चमकती हुई तलवार खुदा खैर करे
   काळ आमच्यासाठी थांबलेला असतो.
   खून दिल का ना चला जाये कही आँखोंसे
   हो ना जाये कही इजहार खुदा खैर करे

  ‘‘तुमच्याकडे याच चित्रपटातलं 'हे दिले नादॉं’ हे गाणं आहे का ? असेल तर ऐकवता का जरा?’’ माझी अधाशी विनंती. नेर्लेकर पाहतात. त्यांच्याकडे त्या गाण्याचा फक्त मुखडा असतो. खूप निराशा होते; मात्र त्यांच्या खजिन्यात बरीच हिरे माणकं असतात. मग असाच एक हिरा ते बाहेर काढतात.
    इस मोड से जाते है
    कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहे
    पत्थर की हवेली को, शीशे के घरोंदो में
    तिनकोंके नशेमन तक, इस मोडसे जाते है।

चित्रपट ‘आँधी’. गीतकार गुलजार. संगीत आर. डी. बर्मन, गायक किशोर कुमार व लतादीदी. हा चित्रपट संपुर्ण पाहिल्याचं आठवत नाही. अधलेमधले प्रसंग पाहिलेले, मात्र त्या प्रसंगांचंच मनावर प्रचंड गारुड!! तो संजीवकुमार व ती सुचित्रा सेन! कसं विसरायचं या दोघांना? काय म्हणतोय तो तिला?
   आँधी की तरह उडकर, एक राह गुजरती है
   शरमाती हुई कोई, कदमोंसे उतरती है
   इन रेशमी राहो में, एक राह तो वो होगी
   तुम तक जो पहुँचती है, इस मोडसे जाते है

   यावर तिचं उत्तर
   एक दूर से आती है, पास आके पलटती है
   एक राह अकेली सी, रुकती है ना चलती है
   ये सोच के बैठी हूँ, एक राह तो वो होगी
   तुम तक जो पहुँचती है, इस मोड से जाते है

नेर्लेकरांकडे अनेक मराठी हिरेमाणकंही असतातच. मग ते त्यांच्याकडे वळतात.
   प्रीतीचं झुळझुळ पाणी, वार्‍याची मंजुळ गाणी
   रोमांच सर्वांगी, गेले मी वाहूनी

   गायक शैलेंद्र सिंग. गायिका उषा मंगेशकर. ‘‘हा शैलेंद्र सिंग कोण माहितीये का? ’बॉबी’ चित्रपटातलं ’मै शायर तो नहीं’ हे गाणे म्हटलेला.’’ नेर्लेकर. बापरे! एकेक आश्चर्यच! मी नकळत उद्गारतो. एका अमराठी गायकाच्या तोंडी काय शब्द आले आहेत!

   हा जीव वेडा होई थोडा थोडा
   वेड्या मनाचा बेफाम् घोडा
   दौडत आला सखे तुझा बंदा
   चल प्रेमाचा रंगू दे विडा

  यावर तिची प्रतिक्रिया
   मी धुंद झाले मन मोर डोले
   पिसार्‍यातूनी हे खुणावित डोळे
   डोळ्यात जाळे खुळी मीच झाले
   स्वप्न फुलोरा मनात झुले.
   प्रीतीचं झुळझुळ पाणी, वार्‍याची मंजुळ गाणी

   ‘‘लता-आशा पेक्षा उषा कुठे कमी आहे सांगा मला?’’ नेर्लेकर बॉंबच टाकतात. मी अवाक ! तथ्य जाणवत रहातं त्यांच्या बोलण्यातलं. मधला चहाचा वेळ सोडला तर गाण्यांची ही मैफल सलग तीन एक तास सुरु असते. नाशिक कधी आलं ते कळतही नाही.
दि. 9 जुलै. पहाटे साधारण तीनची वेळ. नाशिकमध्ये उतरलो. 'तपोभूमी नाशिक’चे लेखक रमेश पडवळ. उमदा माणूस. प्रांजळ  व मेहनती! ते स्टँडवर घ्यायला आले होते. तिथून रिक्षा. सरळ पडवळांच्या घरापर्यंत. महालक्ष्मीनगरला पडवळांचा फ्लॅट आहे. पडवळांच्या पत्नी संगीता. कमालीचा मनमिळावू व बोलघेवडा त्यांचा स्वभाव! त्यामुळे घरी पोहचताच गप्पा रंगल्या. पहाटे पाच साडेपाचला डोळा लागला. सात साडेसातला जाग. सकाळी सकाळी चहाची सवय, पण वहिनी आपुलकीनं अखंड बोलतच होत्या. मग घनश्याम पाटलांनी प्रेमळ विनंती केली. ‘‘वहिनी, चहा.’’ चहा झाला. थोड्या वेळानं अप्रतिम पोहे! पुस्तकाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम संध्याकाळी होता. स्थळ होतं कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्मारक. हे स्थळ पाहण्याची उत्सुकताही खूप होती. त्याआधी थोडं फिरायचं ठरलं. मग तिथं लेखक संजय वाघ देखील आले. संजय वाघ हे ‘चपराक’ टीमचेच लेखक! एक चांगला मित्र! ते ‘लोकमत’ मध्ये आहेत. आम्हाला आणखी एक अतिशय महत्त्वाची भेट घ्यायची होती. सुप्रसिद्ध लेखिका व भाषांतरकार अपर्णा वेलणकर यांची. त्याआधी पडवळांनी आग्रहानं पांडवलेणी पहायला नेलं. नाशिक हे शहरच सुंदर! प्रेमात पडावं असं. पडवळांच्या पुस्तकात तर एक श्लोकच दिलाय.
    पंचवट्यां पंच रत्नानि, सदासुख प्रदानिही
    गोदावरी कपालेशो, रामो वायुस्तपोवन

गोदावरी नदी, कपालेश्वराचं मंदिर, प्रभु श्रीरामचंद्राचं काही काळ वास्तव्य, तपोवन या सगळ्या गोष्टींमुळे नाशिकमध्ये विसावण्यासाठी माणसं आतुर होतात, असा या श्लोकाचा अर्थ. यात पांडवलेणीचाही समावेश करायला हवा. महालक्ष्मीनगरपासून पांडवलेणीपर्यंत कारनं गेलो. पडवळांनी कारची सोय केलेली. उंच डोंगरात कोरलेली ही लेणी. पुण्यातील पर्वतीच. भारतातल्या लेणी जैन, बौद्ध व वैदिक (हिंदू) धर्मियांनी कोरलेल्या आहेत. त्यात बौद्धधार्मियांच्या लेण्यांची संख्या सर्वात जास्त. डोंगर चढून जाताना पडवळ या लेण्यांचा सगळा इतिहासच सांगत होते. पांडवलेणी ही सुद्धा बौद्धलेणीच. तिचा पांडवांशी काही संबंध नाही. बौद्ध भिक्खु या लेण्यांमध्ये राहत. अखंड पाषाणात कोरलेल्या या लेण्यात अनेक गुहा आहेत. पडवळांनी या सगळ्या गुहा फिरुन दाखवल्या. इथलं शिल्पकाम खूपच सुंदर! गुहा क्र. 2 मध्ये बुद्ध व बोधिसत्वाच्या मूर्ती आहेतच शिवाय महादेवाची पिंड व नंदीदेखील कोरलेले आहेत. उडत असलेला मारूती सुद्धा. हा आश्चर्यकारकच प्रकार आहे. ‘‘या गोष्टी बौद्धांनी कोरलेल्या नाहीत. इ. स. सोळाशेनंतर या गोष्टी तिथं कोरल्या गेल्या’’ पडवळ म्हणतात. या लेण्यासंदर्भात पडवळांना कुठलाही प्रश्न विचारा, उत्तर हजर. लेण्यांवरुन संपूर्ण नाशिक शहर नजरेस पडतं. पर्वतीवरुन पुणं दिसतं अगदी तसंच. लेण्यांच्या इथं आमचं छोटं कविसंमेलनही झालं. स्वच्छ, मोकळी हवा वाहत होती. हलका पाऊस. समोर खाली नाशिक-मंबई हायवे अखंड वहात होता. पांडवलेणीच्या पायथ्यालाच एक प्रचंड बौद्ध स्तुप आहे. अर्थात तो अगदी अलीकडे बांधलाय. त्यात बुद्धाची प्रचंड मूर्ती! शंकराच्या मंदिरात घुमतो तसा आतमध्ये हलक्या आवाजाचाही नाद घुमत होता. इथं बुद्धाची चित्रं आहेत. त्या चित्रांसह बुद्धाचा सगळा इतिहासच इथं सांगितलाय. गौतम बुद्ध नेमका होता कसा? तर त्याच्या स्वभावाची व शरीराची सगळी वैशिष्ट्यच इथं सांगितली आहेत. उदा. बुद्ध अजाणूबाहू होता वगैरे. इथून दादासाहेब फाळके स्मारक जवळच होतं. मात्र वेळेअभावी ते पाहता आलं नाही. लेखिका अपर्णा वेलणकरांनी भेटीची वेळ दिलेली.
दुपारी साधारण बाराचा सुमार. संजय वाघ हे आम्हाला लोकमत कार्यालयात घेऊन गेले. 'लोकमत’च हे प्रशस्त कार्यालय. त्यांचा प्रेसही (छापखाना) तिथंच आहे. वाघांनी तो प्रेस व सगळं कार्यालय फिरुन दाखवलं. कार्यालय पाहून आम्ही आवारात आलो तोच एक कार मुख्य प्रवेशद्वारातून सफाईदारपणे आत आली. ‘‘आल्या अपर्णा मॅडम’’, वाघ उद्गारले. ड्रायव्हिंग सीटवर एक चाळीशीची महिला ओझरती दिसलीच होती. त्याच अपर्णा वेलणकर. मराठी साहित्यात मुशाफिरी करणार्‍यांना हे नाव नवीन नाही. अत्यंत ताकतीची भाषांतरकार. बाईंनी ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’च मराठीत भाषांतर केलं. त्याला ’साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळाला. त्यांचं गाजलेलं भाषांतर म्हणजे ’शांताराम’. शांताराम ही मूळ नऊशे पानी आत्मचरित्रात्मक कादंबरी. जगभरातल्या तीसपेक्षा अधिक भाषात तिचं भाषांतर झालेलं. पन्नासएक लाख प्रती या सर्व भाषात विकल्या गेलेल्या. ग्रेगरी डेविड रॉबर्टस् हा 'शांताराम’ चा लेखक. मूळचा ऑस्ट्रेलियन. या ग्रेगरीचं हे आत्मचरित्रच आहे. अपर्णानं रसरशीत भाषांतर केलं शांतारामचं. तब्बल चौदाशे पानांचं भाषांतर. मी तीनदा वाचलं हे भाषांतर. घनश्याम पाटलांनी एक दोन रात्रीतच ’शांताराम’ चा फडशा पाडला. एक साधी चूक दाखवता येणार नाही या भाषांतरात. पहिल्यांदा भाषांतर वाचलं तेव्हाच चाट पडलो होतो. मूळ आत्मचरित्र भन्नाटच आहे. त्यात जीव ओतून केलेलं सहज सुंदर भाषांतर! दुधात साखर! त्याचवेळी अपर्णा मॅडमना चारचार पानी पत्रं लिहिली होती. त्यांना भेटण्यासाठी नाशिकमध्ये पायपीटही केली होती. मात्र त्यावेळी योग आला नाही. यावेळी घनश्याम पाटलांना मी आग्रहानं सांगितलं होतं, ‘‘अपर्णा मॅडमच्या भेटीशिवाय परत यायचंच नाही दादा.’’ पाटलांनी सूत्रं फिरवली. संजय वाघांना त्यांनी ही बाब सांगितली. अपर्णा मॅडम वाघांच्या 'दै.लोकमत’ मधील ज्येष्ठ सहकारी. त्यामुळं भेटीचा योग आला. 'दै. लोकमत’च्या प्रशस्त कार्यालयातील मिटींग हॉल किंवा कॉन्फरन्स रुम म्हणूया! अपर्णा मॅडम व संजय वाघ आम्हाला तिथं घेऊन गेले. आम्हाला पाहताच 'या या’ म्हणत अपर्णानं उमदेपणानं स्वागत केलंच होतं. त्यामुळं मनावरचं दडपण गेलं. कॉन्फरन्स रुममध्ये छान गप्पांना सुरुवात झाली. ‘‘मित्र कसा आहे तुमचा?’’ मी त्यांना पहिलाच प्रश्न केला. ‘‘मित्र? कोण?’’ त्यांच्या चेहर्‍यावर थोडे प्रश्नचिन्ह उमटलं. ‘‘ग्रेगरी डेविड रॉर्बटस.’’ मी. ‘‘हां. तो होय! तो काय, मजेत आहे तो.’’ त्या प्रसन्नपणे उद्गारल्या. अपर्णा मॅडमनं 'शांताराम’चं भाषांतर केलं व ग्रेगरी त्यांचा मित्र झाला. ग्रेगरीची 'शांताराम’ मुंबईच्या अंडरवर्ल्डवर आहे; मात्र त्याचा राजकारणाचा अभ्यासही तुफान! अगदी भारताचं राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण तो उत्तम जाणतो. ‘शांताराम’मध्ये हे सगळं काही आलंय. अपर्णादेखील पत्रकार. जागतिक घडामोडींचं देखील उत्तम भान असलेली! त्यामुळं दोघांचं मैत्र जुळलं यात आश्यर्य काहीच नाही. ‘‘शांताराम आता दुसर्‍यांदा वाचतोय’’ घनश्याम पाटील म्हणाले तशा अपर्णा खुलल्या. ‘शांताराम’बद्दल भरभरुन बोलू लागल्या. आम्ही त्यांना ’शॅडो ऑफ माउंटन’ बद्दल छेडलं. हा ’शांताराम’चा पुढील भाग. ‘‘ग्रेगरी आता सारखा आग्रह करतोय. ’शॅडो ऑफ माउंटन’चं भाषांतर तुच कर म्हणून.’’ त्या म्हणाल्या. ‘‘मात्र ‘शॅडो ऑफ माउंटन’ हा शांतारामचा पुढचा भाग नाही. तो शांतारामच्या आधीचा भाग आहे.’’ त्या म्हणाल्या. ‘‘शक्य तितक्या लवकर त्याचं भाषांतर करा मॅडम. आम्ही वाट पाहतोय अक्षरशः’’ मी म्हणालो. ‘‘ग्रेगरीला एकदा भेटायची इच्छा आहे. एकदा पाय धरायचेत त्याचे.’’ मी पुढं म्हणालो. ‘‘बघूया त्याला पुण्याला वगैरे आणता आलं तर. मुंबईत तर येतच असतो तो.’’ त्या म्हणाल्या. तेवढ्यात चहा आला. नेर्लेकरांनी जुनी ओळख सांगितली. ‘‘मला वाटतंच होतं तुम्हाला कुठंतरी भेटल्याचं.’’ अपर्णा मॅडम म्हणाल्या. शेवटी घनश्याम पाटलांनी केलेला फोटोचा आग्रहही त्यांनी हसत हसत मान्य केला. अपर्णा मॅडमची ही भेट घडवून आणल्याबद्दल मी संजय वाघ व घनश्याम पाटलांचे आभार मानत राहिलो. ‘‘सर, तुम्हाला आता ग्रेगरी डेव्हिड रॉबर्टस्ची सुध्दा भेट घालून देतो.’’ पाटील म्हणाले. भारावलो. कित्येक वर्षे साहित्याचा अभ्यास करतोय. त्याचं महत्त्व घनश्याम पाटलांइतकं कुणी जाणलं असेल काय? मनात प्रश्न आला. दैवाचे आभार मानत राहिलो.

 

लोकमत कार्यालयातून बाहेर पडलो. ‘‘इथं आलोच आहे तर त्र्यंबकेश्वरला जाऊया.’’ घनश्याम पाटील म्हणाले. मलाही तो खूप चांगला संकेत वाटला. गाडी त्र्यंबकेश्वराकडे वळली. वाघांनी तिथं फोन केला. तिथले माजी उपनगराध्यक्ष भेटले. त्यांनी तातडीनं दर्शन होईल अशी व्यवस्था केली. त्या त्र्यंबकेश्वरानेच आयुष्यात हे सुंदर योग आणले होते. आम्ही त्याच्यापुढं नतमस्तक झालो.
त्र्यंबकेश्वराहून रमेश पडवळांच्या घरी आलो तर संगीता वहिनींनी सगळ्यांचा स्वयंपाक करुन ठेवलेला. पुण्याहून डॉ. श्रीपाल सबनीस, सौ. ललीता सबनीस, महादेव कोरे, मोरेश्‍वर ब्रह्मे काका ही मंडळी कारनं आलेली. सबनीस सर उत्तम कांबळ्यांना भेटायला गेले होते. आम्ही जेवण उरकलं. सुमारे दहा जणांचा स्वयंयाक! बाकीचीही काम! त्यात दोन लहान मुलं! मात्र संगीता वहिनींचा आनंद मनात मावत नव्हता. त्यांच्या नवर्‍यानं नाशिक शहरावर अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलं होतं. अत्यंत सुंदर शैलीत लिहिलं होतं. त्याचं लोकार्पण होणार होतं. त्यापुढं सगळे कष्ट त्यांना हलके वाटत होते.
संध्याकाळी पाचची वेळ. पडवळांच्या घरातून आम्ही बाहेर पडलो. डॉ. सबनीस, सौ. सबनीस, नेर्लेकर, पाटील व मी एका कारमध्ये होतो. कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्मारकाकडे कार निघाली. जाताना माझी शाळा दिसली. भोसला मिलिटरी स्कूल. चार वर्ष होतो या शाळेत हॉस्टेलमध्ये. नाशिकशी असलेले हे जुने ऋणानुबंध!! त्यावेळी कुसुमाग्रजही नाशिकमध्येच होते; मात्र त्यांना भेटण्याचा योग कधीच आला नाही. आज ते असते तर कदाचित त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचं लोकार्पण झालं असतं. असो.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये आम्ही आलो. ती टूमदार वास्तू पाहून खूश झालो. अभ्यासिका, ग्रंथालय, प्रकाशन किंवा इतर साहित्यिक कार्यक्रमांसाठी असलेले हॉल, कँटीन अशा सुविधांनी युक्त असं हे कुसुमाग्रज स्मारक. साहित्याचा कुठलाही अभ्यासक खुश होईल असं तिथलं प्रसन्न वातावरण सुध्दा!
आमचा प्रकाशनाचा कार्यक्रम होता त्या हॉलमध्ये वेळेआधी आम्ही पोहोचलो होतो. थोडीफार पूर्वतयारी केली. कार्यक्रम सुरू व्हायला थोडा अवधी होता. तेवढ्या वेळात महादेव कोरे हे माझ्याशी नारायण सुर्वेंच्या कवितांवर बोलत राहिले. सुर्वेंच्या कवितांवर ते छान बोलतात. साडेसहाच्या आसपास कार्यक्रमाला सुुरुवात झाली. व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, अभ्यासक गिरीश टकले, डॉ. श्रीपाल सबनीस, रमेश पडवळ ही सगळी मंडळी होती. सुरुवातीला घनश्याम पाटील बोलले. पाटलांनी ’चपराक’च्या माध्यमातून असंख्य माणसं जोडली आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र जोडला आहे. पडवळांचंच उदाहरण घेऊ. ’तपोभूमी नाशिक’ हे आपलं पुस्तक घेऊन पडवळांनी अनेकांचे उंबरे झिजवले. इतकं सुंदर लेखन; मात्र प्रत्येक ठिकाणी  वाईट वागणूक मिळाली. एका राजकीय पुढार्‍यानं तर त्यांचा अपमानच केला. पडवळ पाटलांना कुठं भेटले? तर घुमानच्या साहित्य संमेलनात! तिथं त्यांनी त्यांची वेदना पाटलांना बोलून दाखवली. ‘‘तुमच लेखन पाठवून द्या. मला आवडलं तर नक्की छापेन.’’ पाटलांनी शब्द दिला. पडवळांनी ते पाठवलं. पाटलांनी ते सर्व एका रात्रीत वाचून काढलं. ताबडतोब होकार कळवला. पैशांची जुळवाजुळव केली. लेखकाकडून एक नवा रुपयाही न घेता रात्रंदिवस मेहनत घेतली. पुस्तक तयार केलं. ’चपराक  प्रकाशन’चा झेंडा पाटलांनी नाशिकमध्ये रोवला तो असा. वयाच्या अवघ्या तिशीत कुठला तरुण असा प्रकाशक होतो? किंवा अशी निर्णयक्षमता व तडफ दाखवतो? पाटलांचं हे काम व त्याचं महत्व महाराष्ट्राला आज ना उद्या कळणारच आहे. गरज आहे ती इतरांनी यापासून काही शिकण्याची. कार्यक्रमातलं पाटलांचं मनोगतही सुंदर होतं. त्यांचे वडील वसंतराव पाटीलही कार्यक्रमाला हजर होते. ’पूत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा महाराष्ट्रभर झेडा!’ असो. डॉ. सबनीसांनी पुस्तकाची माहिती सांगितली. सबनीसांचं एक सुंदर वैशिष्ट्य आहे. चांगल्या लेखकांचं हा ज्येष्ठ समीक्षक अतिशय मनमोकळेपणे कौतुक करतो. कौतुक करताना काहीही हातचं राखून ठेवत नाही. त्यांनी पडवळांना प्रोत्साहन दिलं. त्याआधी गिरीश टकले बोलले. गिरीशजी हा माणूस साक्षात बृहस्पती आहे! प्रकांड पंडित! त्यांनी नाशिकचा सगळा इतिहास सोप्या व ओघवत्या भाषेत सांगितला. पडवळांचे एक मार्गदर्शक आप्पा पोळ. ते देखील व्यासपीठावर होते. त्यांचंही मनोगत झालं. अगदी थोडकं, मात्र भावपूर्ण बोलले ते. मग पडवळांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अभ्यासपूर्ण बोलले ते सुद्धा. त्यांची एक मागणी त्यांनी डॉ. साळुख्यांकडे व्यक्त केली. नाशिकच्या संदर्भातील जुनी कागदपत्र एकत्रपणे जतन करण्यासाठी कुलगुरू म्हणून साळुंखे सरांनी पुढाकार घ्यावा, अशी ती मागणी. साळुंख्यांनी ती मान्य केली. साळुंख्यांचं ंव्यक्तिमत्वही गोड व लोभस! एखाद्या लहान मुलासारखं. तेही दिलखुलास बोलले व एका सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम संपला. मी व नेर्लेकरांनी आधी गिरीश टकल्यांना गाठलं. ’टकले ज्वेलर्स’हे नाशिकमधलं प्रसिद्ध नाव. ज्वेलरीचा व्यवसाय सांभाळून हा माणूस अफाट अभ्यास करतो. अफाट म्हणजे किती? तर त्यांच्या घरात पंधरा हजार ग्रंथ आहेत! अनेक महत्त्वाच्या शेकडो चित्रफिती आहेत! भारत-चीन संबंध, दुसरं महायुद्ध, पानिपतचं युद्ध अशा विषयांवर ते तासंनतास बोलतात. ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ हा आणखी एक त्यांच्या अभ्यासाचा विषय. इतकं असून पाय जमिनीवर असलेला हा माणूस! ‘‘सर, तुमच्यासारखी विद्वत्ता पुण्यातसुुद्धा फारशी पहायला मिळत नाही.’’ मी त्यांना म्हणालो. ‘‘आम्हालाही बरं वाटतं पुणेकरांनी कौतुक केल्यावर.’’ ते निष्पापपणे हसत म्हणाले. टकले सर कार्यक्रमानंतर बराच वेळ आमच्याशी बोलत राहिले. त्यांचा नंबर घेतला व त्यांनीही तो मोकळेपणानं दिला. जगभर फिरलेला व नुकताच जर्मनीला जाऊन आलेला हा माणूस; मात्र ’केव्हाही आलात नाशिकमध्ये तर भेटा’ असं सांगायला विसरला नाही.
रात्री घनश्याम पाटलांनी सर्वांना हॉटेलमध्ये जेवण दिलं. वय तरी किती असं या माणसाचं; मात्र मनाचा हा मोठेपणा यानं आणला कुठून? मी विचार करत राहिलो. रात्री अकराच्या दरम्यान आमच्या कारनं पुण्याचा रस्ता धरला. हे सगळं नीट घडावं म्हणून पाटलांनी आपलं तन, मन, धन पणाला लावलं. त्यामुळंच गिरीश टकले, अपर्णा वेलणकर, डॉ. माणिकराव साळुखे, संजय वाघ, रमेश पडवळ अशी सोन्यासारखी माणसं कमवून आम्ही पुण्याला परतलो होतो. मनात असलीच तर एक भावना होती,'

'खुदा खैर करे...'
- महेश मांगले, पुणे 
९८२२०७०७८५