Thursday, December 24, 2015

अटलजी! पत्रकार ते पंतप्रधान...



1942 साली लखनऊमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघ शिक्षा वर्ग भरविण्यात आला होता. संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. स. तथा गोळवलकर गुरुजी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले होते. शिक्षा वर्गात सर्वत्र कमालीची शांतता पसरलेली. तितक्यात व्यासपीठावरून पाहाडी आवाजात,
हिंदू तन-मन, हिंदू जीवन;
रग रग हिंदू मेरा परिचय’

ही कविता सादर झाली. अवघ्या 18 वर्षाच्या
त्या’ स्वयंसेवकाने सादर केलेल्या पद्यावर गुरूजी बेहद्द खूष झाले आणि त्यांनी त्या’ युवा स्वयंसेवकाची पाठ थोपटली. भविष्यात हाच स्वयंसेवक 3 वेळा भारताचा पंतप्रधान झाला. तो स्वयंसेवक दुसरा-तिसरा कोणी नसून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते!
1940 साली म्हणजेच वयाच्या 16 व्या वर्षी अटलजी आरएसएसच्या संपर्कात आले आणि कायमचे संघमय होऊन गेले. 1938 साली मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये संघाची शाखा सुरू झाली. 1940 साली नारायणप्रसाद भार्गव यांच्या सोबतीने अटलजी संघाच्या शाखेत जाऊ लागले. ग्वाल्हेरमधील प्रचारक नारायणराव तर्टे यांच्या प्रेरणेने अटलजींनी संघकार्यात झोकून दिले.
1942 साली महात्मा गांधींच्या
छोडो भारत’ आंदोलनाने देशभरात उग्ररूप धारण केले. भारतभर तरूणांचे मोर्चे, सभा, आंदोलने सुरू झाली. यासर्वात मागे राहतील ते अटलजी कसले. त्यांनी ग्वाल्हेरमध्ये तरूणांचे आंदोलन छेडले. चौकाचौकात तरूणांना जमा करून आवेशपूर्ण भाषणे द्यायला सुरूवात केली. वक्तृत्व कलेची निसर्गदत्त देणगी लाभलेल्या अटलजींच्या भाषणांमुळे ग्वाल्हेरमधील युवकांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आणि ब्रिटीशांची डोकेदुखी वाढली. त्यामुळे या आंदोलनाचे नेतृत्व करणार्या अटलजींवर ब्रिटीशांच्या सेवेत असलेल्या भारतीय पोलिसांची नजर गेली. अटलजींचे वडील पंडित कृष्णबिहारी वाजपेयी यांचा ग्वाल्हेरमधील मोठा लौकिक होता. त्यांच्याप्रति असलेल्या आदरापोटी पोलीस अधिकार्‍याने अटलजींची तक्रार केली. अटलजींनी आंदोलनाचे नेतृत्व करू नये अन्यथा त्यांना जेलमध्ये जावे लागेल असे नम्रपूर्वक त्यांच्या वडिलांना सांगितले. अटलने या गोष्टी थांबवून शिक्षणाकडे लक्ष द्यावे असे वडिलांनी त्यांना बजावले. मात्र राष्ट्रप्रेम ठासून भरलेल्या अटलजींनी आपले राष्ट्रकार्य सुरूच ठेवले. मात्र पुत्रप्रेमापोटी कृष्णबिहारी यांनी अटलजी यांची रवानगी त्यांच्या आजोळी म्हणजे बटेश्वरला केली.
नसानसात राष्ट्रप्रेम भरलेल्या अटलजींनी बटेश्वरमध्येही ब्रिटिशविरोधी वातवरण तापवले. अटलजींच्या या भाषणबाजीमुळे अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली. वयाच्या अठराव्या वर्षी अटलजींना जेलमध्ये जावे लागले. अटलजींना अटक करून त्यांची रवानगी आग्रा येथील बालसुधारगृहात करण्यात आली. पुढील 24 दिवस त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आणि त्यांची सुटका करण्यात आली. मात्र त्यानंतरही अटलजींचे राष्ट्रप्रेम तसूभरही कमी झाले नाही. त्यानंतर अटलजींनी आपले संपूर्ण जीवन देशसेवेसाला वाहिले.
1947 साली ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली जाऊन स्वतंत्र भारताची पताका ऐटीत डोलू लागली. असं असल तरी अटलजींच्या जीवनाचं ध्येय काही वेगळंच होतं. देश स्वतंत्र झाला असला तरी राष्ट्राला परमवैभवाप्रत नेण्याचं संघाचं व्रत त्यांनी स्वीकारलं होतं. मग काय दिलं झोकून संघाच्या प्रचारासाठी आणि झाले संघाचे पूर्णवेळ प्रचारक. या प्रचारकी जीवनात त्यांचा संपर्क आला तो पंडीत दिनदयाल उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी या ज्येष्ठ प्रचारकांशी. त्याचवेळी त्यांच्या राजकीय जीवनाची मुहुर्तमेढ रोवली गेली. त्याचवेळी जणू त्यांचा राजकीय संघर्षाशी करार झाला.
संघाने देशभरात पाळंमूळं रोवायला सुरूवात केली असली तरी संघाचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक होते. या गरजेतून संघाने पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या नेतृत्वात ऑगस्ट 1947 साली
राष्ट्रधर्म’ मासिकाची सुरूवात झाली. संघाचे हे पहिले वहिले मुखपत्र होते. दहा बाय दहाच्या रूममधून सुरू झालेल्या या मासिकाच्या पहिल्याच अंकाने देशभरात खळबळ माजवली. राष्ट्रधर्म’च्या पहिल्याच अंकाच्या मुखपृष्ठामुळे आणि त्यातील संपादकीय लेखामुळे कॉंग्रेस आणि डावे पक्ष चौथाळले. राष्ट्रधर्मच्या मुखपृष्ठावर खीर बनवत आहे, ती म्हातारी म्हणजे कॉंग्रेस पक्ष. त्या म्हातारीने खीर बनवण्यासाठी एकतेचं प्रतिक असलेला चरखा टाकून जाळ लावला आहे. त्याचवेळी त्या हंड्यातील खीर एक कुत्रा चाटत असल्याच दाखवण्यात आलं होतं. (तो कुत्रा म्हणजे मुस्लिम लीग पक्ष होता) विशेष म्हणजे या मासिकाच्या मुखपृष्ठावर गझलकार अमीर खुसरो यांच्या दोन ओळी लिहिल्या होत्या.
खीर पकाई जतन से, चरखा दिया जलाय;
आया कुत्ता खॉ गया, तु बैठी ढोल बजाय।

या मासिकाच्या निर्मितीची गम्मत अशी की, अंकाची बांधणी, त्यावरील पत्ता चिटकवणे आदि कामे पंडीतजी, अटलजी आणि राजीवलोचन हे तिघे करत. पंडीतजी याचे संपादक तर अटलजी त्याचे कार्यकारी संपादक होते.
राष्ट्रधर्म मासिकाच्या यशानंतर लगेचच संघाने साप्ताहिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. श्रीकृष्णाच्या शंखाचे नाव म्हणजेच
पांचजन्य’ हे नाव साप्ताहिकाला देण्यात आले. याच्या संपादकपदाची जबाबदारी अटलजींवर सोपवण्यात आली. 14 जानेवारी 1948 रोजी सुरू झालेल्या पांचजन्यचे जेमतेम 3अंक आले आणि त्याच दरम्यान 30 जानेवारीला गांधीजींची हत्या करण्यात आली. त्यामुळे संघावर बंदी आणण्यात आली. याबंदीमुळे राष्ट्रधर्म आणि पांच्यजन्यचे काम बंद करण्यात आले. मात्र अल्पावधीतच अटलजींनी या दोन्ही नियतकालिकांना लौकीक मिळवून दिला होता. संघावरील बंदी उठवण्यात आल्यानंतर एक दैनिकही सुरू करण्यात आले. स्वदेश असं या दैनिकाचे नामकरण करण्यात आले. अटलजींनाच या दैनिकाचे संपादक करण्यात आले. अल्पावधीतच दैनिकाने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत याचा गाजावाजा करण्यात आला.  विधानसभेत आणि लोकसभेत अंकाचा संदर्भ दिला जाऊ लागला. यातील, तिब्बत पर आक्रमण’, टंडन जी से’, गो वध बंद हो’, घुंसे को घुंसा’ आदी त्यांचे संपादकीय गाजले.
हा सर्वप्रवास सुरू असताना संघाने राजकीय पक्ष काढण्याचे ठरवले. आपला आवाज सभागृहात पोहोचवण्यासाठी 1951 साली भरतीय जनसंघ या पक्षाची स्थापना करण्यात आली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वात पक्षाने लोकसभा निवडणुकीला सामोरे जायचं ठरवलं. पंडीत दिनदयाल उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी आदी नेते जनसंघाच्या संस्थापक सदस्यापैकी एक होते. जनसंघाच्या स्थापनेच्या दोन महिन्यानंतरच स्वतंत्र भारतातील पहिल्या लोकसभा निवडणूका घोषीत करण्यात आल्या. मात्र या निवडणुकीत जनसंघाला केवळ तीनच जागा जिंकता आल्या.
त्यानंतर काही काळात काश्मीरला स्वायत्तता देण्याला मुखर्जींनी कडाडून विरोध केला. ’एका देशात दोन विधान, दोन निशान दोन प्रधान चालणार नाहीत’ हा संदेश घेऊन ते देशाच्या कानाकोपर्‍यात गेले. देशभर त्यांनी या मुद्यावरून आंदोलन पेटवले. आंदोलन करण्यासाठी मुखर्जी काश्मीरमध्ये गेल्यानंतर  तत्कालीन शेख अब्दुला सरकारने त्यांना अटक केली आणि नजरकैदेत ठेवले. 11 मे 1953 रोजी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आणि 23 जून 1953 म्हणजे 43 दिवसात त्यांचा गूढ मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युची बातमी ऐकून अटलजींच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांच्या मृत्युनंतर अटलजींनी त्यांच्या स्मृत्यर्थ
जम्मू की ललकार’ या शिर्षकाखाली कविता लिहिली.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या निधनानंतर पक्षाने दुसर्‍या लोकसभेची जबादारी अटलजींच्या खांद्यावर टाकली. अर्थात पक्षाची सुत्रे पंडीतजींकडेच होती. पक्षाने अटलजींना तीन लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास सांगितले. मथुरा, लखनऊ आणि बलरामपूर या मतदार संघातून ते निवडणुकीला सामोरे गेले. यामध्ये त्यांना दोन मतदार संघात पराभव स्वीकारावा लागला. बलरामपूर मतदार संघातून त्यांनी 10 हजार मतांनी विजय संपादित केला. मात्र मथुरेत त्यांची अनामत रक्कमही (डिपॉजीट) परत मिळवता आली नाही. याशिवाय अटलजींसह जनसंघाला केवळ 4 जागा मिळाल्या. यापैकी दोन खासदार महाराष्ट्रातून निवडून आले. यात धुळ्याचे डॉ. उत्तमराव पाटील आणि रत्नागिरीचे प्रेमजीभाई आसर हे दोघे निवडून आले. पुढे तिसर्‍या लोकसभेला ही संख्या 14 वर गेली.
महापालिका किंवा विधानसभेचा अनुभव गाठीशी नसताना अटलजींनी लोकसभा दणाणून सोडली. परराष्ट्र धोरण हा अटलजींचा आवडीचा विषय. या विषयात त्यांना चांगली गती होती. पंतप्रधान पंडीत नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावर विरोधीपक्ष असलेल्या डाव्यांनी सडकून टीका केली. मात्र यावेळी आपल्या जेमतेम चार मिनिटांच्या भाषणात त्यांनी पंडीत नेहरूंच्या धोरणातील काही मुद्दे कसे योग्य आहेत हे सांगितले. सर्व सदस्यांच्या भाषणानंतर पंडीतजी उत्तर द्यायला ऊठले. आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी नवख्या अटलजींची कौतुक केले. पंडीतजी म्हणाले, ‘‘अटलजींनी विरोधी बाकावर असतानादेखील माझ्या परराष्ट्र धोरणातील काही गोष्टींचे कौतुक केले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.’’ आपल्या भाषणात पुढे ते म्हणाले, ‘‘बोलण्यासाठी वाणी असणं गरजेचं असतं, मात्र गप्प बसण्यासाठी वाणी आणि विवेक या दोन्हींची आवश्यकता असते. अटलजींच्या या गोष्टीशी मी पूर्णपणे सहमत आहे’’, असं सांगून त्यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली.
अटलजींनी वेळोवेळी लोकसभेत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये त्यांनी पंचवार्षिक योजनेला कडाडून विरोध केला होता. यासंबधी बोलताना अटलजींनी भाषण केले. ते म्हणाले, ‘‘पंचवार्षिक योजनेबाबत लोकांमध्ये फारसा उत्साह नाही. याचं मुख्य कारण म्हणजे ही योजना पक्षबांधणी डोळ्यासमोर ठेवूण राबविण्यात येत आहे. तसेच आपली पंचवार्षिक योजना ही अर्थप्रधान आहे. वास्तविक पाहाता ही श्रमप्रधान असायला हवी.’’ अटलजी थेट मुद्याला भिडत तेही मुद्देसुदपणे, त्यामुळे त्यांचे भाषण विशेष मानले जायचे. पंतप्रधान नेहरूंसह विरोधीपक्षाचे नेतेही त्यांच्या भाषणाकडे दुर्लक्ष करत नसत. अनेकदा नेहरू इतर दौर्‍यावर असल्यास सभागृहात उपस्थित राहू शकत नसत. मात्र त्यादरम्यान अटलजींचे भाषण होणार म्हटलं की ते आपला दौरा पुढे ढकलून आवर्जून सभागृहात उपस्थित राहयचे. आजच्या घडीला हे चित्र दुर्मिळच.
अटलजींचा राजकीय आलेख उंचावत असताना तिसर्‍या लोकसभेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. कॉंग्रेसने त्यांच्या विरोधात मोठी प्रचार मोहिम सुरू केली. रोज एक बडा नेता त्यांच्याविरोधात प्रचारासाठी येत असत. अखेर अटलजींचा पराभव झाला. त्यानंतर अटलजी 1968 साली राज्यसभेवर निवडून गेले. त्याच काळात पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचे निधन झाले. त्यानंतर अटलजींकडे अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
संपूर्ण हयात विरोधी बाकावर बसून घालवल्यानंतर अटलजींच्या जीवनात तो सुवर्णक्षण आला. अकराव्या लोकसभेत पक्षाला बर्‍यापैकी यश मिळाले आणि विविध पक्षांना सोबत घेऊन अटलजींनी सत्तास्थापन केली. मात्र या ग्रहण लागले. 16 मे 1996 त्यांनी पंतप्रधान पद स्वीकारले आणि 28 मे ला म्हणजेच केवळ 13 दिवसात त्यांना सत्तेतून पायऊतार व्हावे लागले. दोन-तीनवर्षे विरोधीपक्ष नेतेपद भुषविल्यानंतर पंतप्रधानपदाची माळ पुन्हा त्यांच्या गळ्यात पडली. मात्र पुढच्या 13 महिन्यात त्यांचे सरकार पुन्हा एकदा कोसळले. मात्र अपयशाने खचून न जाता त्यांनी पुन्हा एकदा संघर्ष केला आणि 1999 च्या लोकसभेत पुनश्च यश खेचून आणले. 13 ऑक्टोबर 1999 साली अटलजी परत एकदा पंतप्रधान झाले. यावेळी मात्र त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक योजना राबविल्या. अनेक प्रकल्प हाती घेतले आणि तडीस नेले.
आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात हिंदीत भाषण करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गवगवा आहे. मात्र ऑक्टोबर 1977 ला जनता सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असताना अटलजींनी राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात हिंदीत भाषण दिले होते.
‘बोले तैसा चाले’ या पठडीतल्या लोकनेत्याला, स्टेट्समनला यंदाच्या वर्षी
भारतरत्न’ जाहीर करण्यात आला. अटलजींच्या या निरपेक्ष राष्ट्रसेवेबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
(साहित्य चपराक, डिसेंबर २०१५)
सागर सुरवसे,
आयबीएन लोकमत,

सोलापूर
9769 179 823 / 9665 899 823

Monday, December 21, 2015

'चपराक'ची दर्जेदार ग्रंथसंपदा

'चपराक प्रकाशन'कडून वैविध्यपूर्ण विषयांवर वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली जातात. आमच्या पुस्तकांना वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याठिकाणी 'चपराक'च्या निवडक पुस्तकांचा परिचय देत आहोत. ही पुस्तके मागवण्यासाठी संपर्क : 'चपराक प्रकाशन', पुणे (०२०)  २४४६०९०९ 


कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट 
राजेंद्र व्होरा आणि सुहास पळशीकर या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दोन ‘विद्वान’ प्राध्यापकांनी महाराष्ट्रातील सत्तांतरावर पुस्तक लिहून, शब्दाशब्दाला चुकीचे संदर्भ देऊन वाचकांची दिशाभूल केली. ‘ग्रंथाली’सारख्या मान्यवर प्रकाशन संस्थेने व्यावसायिक दृष्टिकोनातून या पुस्तकाचा धंदाही उत्तम केला. सुप्रसिद्ध पत्रकार आणि विचारवंत भाऊ तोरसेकर यांनी मुद्देसूदपणे, पुराव्यासह या पुस्तकाची आणि वैचारिक भ्रष्टतेची केलेली परखड चिकित्सा म्हणजे हे पुस्तक.
पाने - 148  किंमत - 150

भाषेचं मूळ
भाषा मूळात अस्तित्वात कशा आल्या? माणसालाच हे वरदान का? मानव जगभर समान असला तरी भाषाभाषात एवढे विभेद का? भाषागट कसे जन्माला येतात? एका भाषेतून सहयोगी भाषेचा जन्म होतो, हे खरे आहे का? भाषागट कितपत संयुक्तिक आहेत? संस्कृतमधून प्राकृत भाषा निर्माण झाल्या की सत्य वेगळेच आहे? हे समजून घेण्यासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांचं हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
पाने - 112 किंमत - 110


दखलपात्र
‘सामान्य माणसाचा उंचावलेला स्वर’ हे ब्रीद घेऊन चतुरस्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष भूमिकेतून ‘चपराक’ची वाटचाल सुरू आहे. रोखठोक आणि परखड विश्‍लेषण केल्याने, सातत्याने ठाम भूमिका घेऊन सत्याचा कैवार घेतल्याने ‘चपराक’चे अग्रलेख वाचकप्रिय ठरले आहेत. साप्ताहिक ‘चपराक’ आणि ‘साहित्य चपराक’ मासिकातील घनश्याम पाटील यांचे निवडक अग्रलेख या संग्रहात वाचायला मिळतील.
पाने - 176, किंमत - 150


गंध माणसांचा
हल्ली जो-तो स्वत:ची दु:ख कुरवाळत बसलाय. स्वार्थाच्या नादापायी आपुलकी, माणुसकी हरवून बसलाय; मात्र अशा काळोखात एखादी पणती मिनमिनत असतेच ना? तिच्या परीने ती अंधार भेदण्याचे कार्य करीतच असते. तिच्या प्रकाशकक्षेत येईल त्याला वाट दाखविण्याचे सामर्थ्य आणि जिद्द तिच्यात असते. अशा प्रेरणादायी व्यक्तींचा परिचय करून देणारे संजय वाघ यांचे हे पुस्तक वाचायलाच हवे.
पाने - 128 किंमत - 130


ओविली फुले मोकळी
सर्वसामान्य माणसाला वाटणार्‍या काळज्यांबद्दल, भीतीबद्दल, त्याला हव्या असणार्‍या किमान स्वास्थ्याबद्दल, तो शोधत असणार्‍या आधाराबद्दल वाचकांशी एकरूप होऊन केलेले चिंतन म्हणजे सुप्रसिद्ध साहित्यिक सदानंद भणगे यांचे या पुस्तकातील लेख. हे लेख वाचताना वाचक जगण्यावर प्रेम करू लागतात.
पाने - 160  किंमत - 150


विज्ञानमूर्ती ज्ञानोबा तुकोबा
संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींनी चालवलेली भिंत अथवा जगद्गुरू तुकोबारायांचे वैकुंठगमन असे विषय महाराष्ट्रात कायम चर्चेला जातात. मात्र कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार करण्याची अद्भूत क्षमता असलेल्या मराठी माणसावर अशा गोष्टीचा परिणाम होत नाही. त्यांच्या श्रद्धा अटळ आहेत. ज्ञानोबा आणि तुकोबा यांचे कार्य अद्भूत, विलक्षण, तर्कसंग आणि विज्ञाननिष्ठ असल्याने या पैलूंविषयी लिहिले आहे दत्तात्रय गायकवाड यांनी.
पाने - 164  किंमत - 130

झुळूक आणि झळा
अवताभोवताली घडणार्‍या सामाजिक, राजकीय घटना, सांस्कृतिक-भाषिक शेरेबाजी, राजकीय नेत्यांचं वर्तन, धर्मगुरू, विचारवंतांचे वक्तव्य अशा प्रत्येक गोष्टींवर आजच्या तरूणपिढीचं स्पष्ट-प्रातिनिधिक ‘मत’च घनश्याम पाटलांनी आपल्या अग्रलेखातून मांडलेलं आहे. ‘झुळूक आणि झळा’ या त्यांच्या अग्रलेखसंग्रहातून कुणाचीही भीडभाड न ठेवता त्यांनी व्यक्त केलेली मतं म्हणजे शब्दांचे अक्षरश: ‘फुटाणे’ फोडत अवघ्या तरूणाईच्या मतमतांतराचं घडवलेलं मतप्रदर्शन आहे.
पाने - 140  किंमत - 150

थोडं मनातलं
जीवन जगताना सामान्य माणसाला जे प्रश्‍न पडतात ते शब्दबद्ध करण्याचं काम संवेदनशील मनाचे लेखक विनोद श्रा. पंचभाई यांनी केले आणि या पुस्तकाची निर्मिती झाली. पोटतिडिकेने सत्य मांडणारे, वाचकांना संस्काराची शिदोरी देणारे, संस्काराचा पाया बळकट करणारे या पुस्तकातील लेख वाचकांना अंतर्मुख करतात. प्रासादिक भाषा हे या पुस्तकाचे शक्तीस्थान आहे.
पाने - 120  किंमत - 125



एमरल्ड ग्रीन
मोजक्या शब्दात, नेमकेपणे विलक्षण अनुभव मांडण्याचे सामर्थ्य असणार्‍या समीर नेर्लेकर यांचा हा कथासंग्रह. भौतिक जगासारखंच आपल्या आतही एक जग असतं. या दोन्ही जगांचा समांतर प्रवास कधी अस्वस्थ करणारा तर कधी विलक्षण आनंद देणारा. या प्रवासात बरंच काही घडून जातं, कल्पनेच्याही पलीकडेचं! तेच अनुभव रूजतात, बहरतात, त्यांची फुलं होतात. त्यातूनच ‘एमरल्ड ग्रीन’सारख्या अस्सल कथा जन्माला येतात.
पाने - 72 किंमत - 75


बाळासाहेब एक अंगार

बाळासाहेब ठाकरे! महाराष्ट्राचे राजकारण तळापासून ढवळून काढणारे नाव. 50 वर्षे सतत धगधगत असलेला हा अंगार. माणूस म्हणून ते होते तरी कसे? त्यांचा स्वभाव कसा होता? वागणं कसं होतं? त्यांच्या आयुष्यात कोणकोणत्या घटना घडल्या? या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी नागेश शेवाळकर यांचे हे पुस्तक नक्की वाचा.
पाने - 160  किंमत - 175


लोकनायक महाराजा सयाजीराव गायकवाड
बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र म्हणजे एका समर्थ लोकनेत्याची गौरवगाथाच! महाराजा सयाजीराव यांच्या समाज परिवर्तनवादी भूमिकेचा यथार्थ आढावा या पुस्तकात घेतला गेला आहे. विशेषत: महाराजा सयाजीराव यांच्या दुर्मिळ कौटुंबिक आठवणीही या पुस्तकात आहेत. एका अफाट क्षमतेच्या नायकाचे चरित्र आणि चारित्र्य समजून घेण्यासाठी चंद्रलेखा बेलसरे यांचे हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
पाने - 64  किंमत - 70


एकनाथजी रानडे
भारताच्या दक्षिण टोकाला कन्याकुमारी येथे समुद्रातील श्रीपाद शीलेवर उभे असलेले स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक सार्‍या देशाला माहीत आहे. तीन सागरांच्या संगम स्थळी असलेल्या या स्मारकाला मूर्त रूप दिले ते एकनाथजी रानडे या  मराठमोळ्या लढवय्याने. एकनाथजींच्या जीवन चरित्राची आणि या अफाट कार्याची ओळख युवा पत्रकार सागर सुरवसे यांनी या पुस्तकाद्वारे करून दिली आहे.
पाने - 56  किंमत - 75



शांतीदूत

लालबहाद्दूर शास्त्री हे एक चारित्र्यसंपन्न, त्यागी, देशसेवेला जीवन वाहून घेतलेले, सामान्य कुटुंबात जन्म घेऊन स्वकर्तृत्वाने पंतप्रधान पदापर्यंत गेलेले प्रभावी नेतृत्व. त्यांचे चरित्र म्हणजे जणू सद्वर्तनाची श्‍वेतपत्रिकाच. प्रभाकर तुंगार यांनी लिहिलेले शास्त्रीजींचे हे छोटेखानी चरित्र बाल-किशोरांनी आणि मोठ्यांनीही वाचायलाच हवे.
पाने - 40  किंमत - 50



आपले राष्ट्रसंत

निकोप आणि सदृढ समाज निर्मितीचे अथांग ध्येय उराशी बाळगणारे मानवतावादी संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी. त्यांचे आयुष्य म्हणजे समाजप्रबोधन आणि राष्ट्रभक्तीचे मुर्तीमंत रूप! ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून त्यांनी सोप्या भाषेत समाजप्रबोधन केले. देश विदेशात त्यांच्या कीर्तीचा सुगंध दरवळला. राष्ट्रसंतांविषयी नेमकेपणे, सोप्या शैलीत विनोद श्रा. पंचभाई यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
पाने - 56  किंमत - 60


कवडसे
आजचे तरूण काय वाचतात, काय लिहितात, काय बोलतात, काय खातात, काय घालतात याची निरिक्षण केले तर राष्ट्राच्या प्रगतीची दशा आणि दिशा कोणाच्याही सहगपणे लक्षात येईल. पंढरपूर येथील युवा पत्रकार स्वप्नील कुलकर्णी यांनी राज्यातील  आणि राष्ट्रातील विविध विषयांचा डोळसपणे घेतलेला धांडोळा म्हणजे ‘कवडसे’ हे पुस्तक. या पुस्तकात सामाजिक, वैचारिक विषयावरील लेख आपल्याला वाचावयास मिळतील.
पाने - 112  किंमत 110


तपोभूमी नाशिक

तपोभूमी म्हणजे अशी भूमी की जेथे श्रीरामासह ऋषीमुनी, साधुमहंत, राजेमहाराजे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आले अन् जगाला अलौकिक इतिहास देऊन गेले. येथे विजयांच्या गुढ्या उभारल्या गेल्या. या भूमीने कधी कोणाला पराजित होणे शिकविले नाही. धर्मपीठाचा दर्जा मिळालेल्या अन् दर बारा वर्षांनी येणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यात फुलणार्‍या गोदाकाठच्या नाशिकने आपले माहात्म्य कायम राखत कात टाकले आहे. मंदिरांचे शहर अशीही नाशिकची ओळख आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्याची सर्वांगसुंदर ओळख करून देणारे रमेश पडवळ यांचे पुस्तक म्हणजे ‘तपोभूमी नाशिक’.
पाने - 232  किंमत - 230

हसण्यावर टॅक्स नाही

आपण का हसतोय? माहीत नाही. तरीही हसतोय. कुणीतरी घसरून पडला म्हणून हसतोय, लोकांच्या शारीरिक व्यंगावर हसतोय. बघा, इतर जण हसले म्हणून आपणही हसतोय, पुरषाने बाईचे कपडे घातलेत म्हणून, तर शाब्दिक करामतींमुळे अर्थाचा अनर्थ होतोय म्हणून हसतोय. भोवतालच्या गोंधळात आपलीच केवीलवाणी अवस्था पाहून स्वत:वरही हसतोय. हसण्यासारखं काहीच नाही तरीही हसतोय. हसावं, भरपूर हसावं; असं सर्वांना हसत ठेवणारं समीर नेर्लेकर यांचं हास्य चित्रांचं पुस्तक म्हणजे ‘हसण्यावर टॅक्स नाही’.
पाने - 64  किंमत - 60


चार शिलेदार
समाजातील प्रतिकूल परिस्थितीतही माणसावर झालेले चांगले संस्कार त्याला असत्य, अन्याय, विपरीत गोेष्टींबद्दल लढायला कसे शिकवतात याचे चित्रण ‘चार शिलेदार’ या सुभाष कुदळे यांच्या पुस्तकातून आलेले आहे. समाज बदलला पाहिजे असे सारेजण म्हणतात पण प्रत्यक्षात वेळ येताच कितीजण पुढे येतात? वयाने लहान असूनही समाज बदलावयाची आकांक्षा व त्यासाठी आपल्या परीने कष्ट घेण्याची तयारी असलेल्या चार शिलेदारांची ही प्रेरक कथा.
पाने - 64  किंमत - 60


मुलांच्या मनातलं
लहान मुले आणि किशोरवयीन बालके यांची मनोअवस्था बर्‍याचवेळा पालकांनाही कळत नाही. उद्याच्या राष्ट्राचे उज्ज्वल आणि संपन्न भवितव्य असणार्‍या या पिढीला संस्कारशील साहित्य उपलब्ध करूण देणे ही फार मोठी गौरवाची बाब आहे. विनोद श्रा. पंचभाई यांनी त्या दृष्टिने टाकलेले पाऊल म्हणूनच अभिनंदनीय ठरते. ‘मुलांच्या मनातलं’ या पुस्तकातील छोट्या कथांद्वारे त्यांनी किशोरांचे आणि पालकांचे रंजनातून प्रबोधन केले आहे.
पाने - 56  किंमत - 75

Sunday, December 20, 2015

भाकड गायींनी दिले लाखोंचे उत्पन्न

सोलापुरातील गोवर्‍या निघाल्या जर्मनीला
गायीचा गोठा, शेण, गोमुत्र याचा विषय निघाला की अनेकांची तोंडे वाकडी होतात. व्यावहारिक विचार करणारा प्रत्येकजण त्याकडे तुसडेपणानेच पाहतो. मात्र याच गाईच्या शेणाने अर्थात गोवर्‍यांनी आणि गोमुत्राने आता थेट परदेश गाठायची तयारी केली आहे. देशी गाईच्या शेणापासून बनविलेल्या गोवर्‍यांना आता जर्मनीतून मागणी आलीय. त्यामुळे गाई भाकड झाल्याने विकणार्‍यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा प्रयोग आहे. सोलापुरातील संतोषी माता गोशाळा आणि पंचगव्य चिकित्सा संशोधन केंद्राने हा प्रकल्प यशस्वीपणे राबविला आहे.
8 वर्षापूर्वी दोन भाकड गाईंच्या पालनाने संतोषी माता गोशाळेची सुरूवात झाली. डॉ. राजेंद्र गाजूल आणि पोरंडला या तेलुगू भाषिक मामा-भाच्यांनी गोशाळेची मेढ रोवली. त्यानंतर टप्प्या टप्प्याने या गोशाळेत तब्बल 85 गाई जमा झाल्या. सुरूवातीला केवळ गोमुत्र आणि शेणाची विक्री करून चार दोन पैसे मिळायचे. कालांतराने वर्धा येथे झालेल्या एका गोशाळा विषयक कार्यशाळेत देशी गाईच्या शेणाचे महत्त्व आणि त्याचे फायदे कळल्यानंतर डॉ. राजेंद्र गाजूल यांनी आपल्या संतोषी माता गोशाळेतही काही प्रयोग सुरू केले. यामध्ये प्राथमिक स्तरावर त्यांनी अस्सल गाईच्या शेणापासून गोवर्‍या तयार करण्यास प्रारंभ केला. सुरूवातीला सोलापूरसह मुंबई, पुणे, बेंगलोर येथून होम हवनासाठी गोवर्‍यांना मागणी येऊ लागली. मात्र त्यांच्या गोवर्‍यांचा दर्जा पाहून त्यांना आता थेट जर्मनीमधून मागणी आली. याशिवाय रशिया, अमेरिका, जपान, इंग्लंड, अरब अशा विविध देशातून मोठ्याप्रमाणात मागणी येऊ लागलीय. त्यांच्या या प्रकल्पामुळे भाकड म्हणून विकणार्‍या गाईंच्या माध्यमातून संतोषीमाता गोशाळेला लाखो रूपयांचे उत्पन्न मिळू लागलेय.
डॉ. गाजूल यांनी हा प्रकल्प केवळ गोवर्‍या विकण्यापर्यंतच मर्यादीत न ठेवता शेण व गोमुत्रापासून अनेक उप उत्पादनेही घेतली आहेत. शेतकर्‍यांना जैविक शेतीचे महत्त्व लक्षात आल्याने गेल्या काही वर्षापासून शेतकर्‍यांनी आपल्या फळबागांसाठी गोमुत्र आणि शेणाची मागणी करण्यास सुरूवात केली आहे. याशिवाय गेल्या काही महिन्यापासून परदेशात होणार्‍या होम अग्निहोत्रासाठीही गोमातेच्या शेणापासून बनविलेल्या गोवर्‍यांना  मागणी वाढली आहे.
केवळ इतक्यावरच हे सर्व थांबलेले नाही तर गोशाळेने आता पंचगव्य गोविज्ञान संशोधन केंद्रही सुरू केले आहे. या संशोधन संस्थेतंर्गत त्यांनी धूपबत्ती, डास पळवून लावण्यासाठीचे लिक्विड आदी गोष्टी तयार केल्या आहेत. या लिक्विडचे वैशिष्ट्य असे की, हे ते इतर परदेशी लिक्विडच्या तुलनेत अधिक दिवस काम करते. साधारणपणे परदेशी कंपन्यांचे लिक्विड महिनाभर जाते आणि त्याची किंमत 50 ते 60 रूपये असते. मात्र यांनी बनविलेले लिक्विड तीन महिने तर जातेच शिवाय त्याची किंमत केवळ 30 रूपये इतकी आहे.
एकीकडे गोमांस खाल्याने मुस्लिमाची हत्या केल्याच्या कथित बातम्या आपण पाहतो मात्र याच गोमातेच्या रक्षणासाठी काही मुस्लिम कामगार येथे कार्यरत आहेत. गाईच्या शेणापासून या सर्व उत्पादनांची निर्मिती सुरू झाल्याने रफीक मिनारे सारख्या मुस्लिम कर्मचार्‍याच्या हाताला रोजगार उपलब्ध झालाय. या गोशाळेत जवळपास 25 जण काम करत आहेत.
भाकड गाईपासून लाखोंचे उत्पन्न घेता येते हे या गोशाळेच्या चालकांनी दाखवून दिलेय. त्यामुळे गोहत्येवर बंदी घालणार्‍या सरकारने केवळ कायदा करून चालणार नाही तर राज्यातील हजारो गोशाळांना अशा प्रकारचे उत्पन्न मिळवून देणारे मॉडेल बनवणे महत्त्वाचे आहे.
(डॉ. राजेंद्र गाजूल ( गोशाळा संचालक व संशोधक) यांच्याशी संपर्क करण्यासाठी क्रमांक - 9850550903 )
(साप्ताहिक चपराक, पुणे)
सागर सुरवसे,
आयबीएन लोकमत,
सोलापूर
-9769179823

Thursday, December 17, 2015

मासिक धर्म आणि धर्म!

शबरीमला हे दक्षिणेतील विख्यात मंदिर सध्या चर्चेत आले आहे ते, ‘जोवर स्त्रियांना त्या मासिक पाळीत आहेत की नाही हे तपासण्याचे स्कॅनर बनत नाहीत तोवर मंदिरात त्यांना प्रवेश नाही’ या वादग्रस्त विधानामुळे. हे विधान केले मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रमुख प्रयार गोपालकृष्णन यांनी. ते पुढे असेही म्हणाले की ‘मासिक धर्म स्त्रियांना अपवित्र करतो आणि पवित्र मंदिरात त्यांना प्रवेश देता येणार नाही.’ यामुळे वादंग उठले असून निकिता आझाद या वीस वर्षीय तरुणीने ’हॅपी टू ब्लीड’ हे आंदोलन सुरू केले असून आजवर असंख्य स्त्रियांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. स्त्रियांचा मासिक धर्म हे वरकरणी कारण असून अय्यप्पा ब्रह्मचारी होते आणि शबरीमला येथे त्यांनी तप केले असल्याने स्त्रीदर्शनाने त्यांचा तपस्याभंग होऊ नये म्हणून (मेनकेने विश्वामित्राचा केला तसा) तेथे स्त्रियांना प्रवेश नाही. यावर आपण अधिक चर्चा पुढे करुच, पण स्त्रियांचा मासिक धर्म आणि त्यामुळे प्रार्थनास्थळ प्रवेशबंदी कोठे कोठे आहे हे पाहू.
भारतात शबरीमला, हाजी अली, जामा मशिद, पद्मनाभय्य मंदिर, पुष्कर येथील कार्तिकेय मंदिर, निजामुद्दिन दर्गा इत्यादी धर्मस्थळांत स्त्री प्रवेश बंदी आहे. अलीगढ विद्यापीठाच्या ग्रंथालयातही विद्यार्थिनींना बंदी आहे, पण त्याचे कारण मनोरंजक आहे. मुली ग्रंथालयात आल्या की विद्यार्थी अभ्यासात लक्ष घालणार नाहीत म्हणून बंदी... हा असला विनोदी प्रकार आहे. मुस्लिम बंदी घालणारे म्हणतात कीशरियातच ही तरतूद आहे तर हिंदू म्हणतात... धर्मशास्त्रांतच हे लिहिलेले आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बंद्या भारतात अनेक धर्मस्थळांत अंमलात आणल्या जातात हे आपणास माहितच आहे.
मासिक धर्मामुळे स्त्री अपवित्र होते अशी समजूत यामागे आहे हे उघड दिसते. वरकरणी कारणे काहीही सांगितलेली असोत. यातून आपण स्त्रियांचा अधिक्षेप करतो, धर्माच्या नावाखाली निसर्ग-धर्माला पायतळी तुडवतो याचे भान मात्र आपल्याला आलेले नाही. यासाठी आपल्याला पुरातन काळापासून स्त्री, तिची मासिक पाळी आणि तिचा अपत्यजन्म देवून मानवी वंश साखळी अबाधित ठेवण्याच्या सामर्थ्याबाबत कसकसे विचार बदलत गेले हे पाहणेही उद्बोधक तसेच मनोरंजकही आहे.
मनुष्य जेव्हा नुकताच कोठे भूतलावर अवतरला होता व निसर्ग व अन्य पशुंच्या प्रकोपात कसाबसा जगायचा प्रयत्न करत होता त्या काळात स्त्रियांकडे तो कोणत्या दृष्टिने पाहत होता?
तिचा मासिक धर्म, तिने अपत्ये प्रसवणे ही बाब त्या काळातील मानवासाठी अद्भूत चमत्काराहून कमी नव्हती. महिन्यातील काही दिवस स्त्रिया रज:स्त्राव करतात आणि पूर्ववत होतात किंवा गरोदर होऊन अपत्य प्रसवतात या तिच्या शक्तीला आदिमानवाने देवत्व दिले. कारण असे का होते याचे असलेले स्वाभाविकच गहन अज्ञान. जगभरात आधी सुरू झाली ती स्त्रीपूजा. योनीपूजा. तिच्यात यातुशक्ती असाव्यात व ती आपल्याला जशी उपकारक आहे तशीच अपायकारकही असू शकते यामुळे स्त्री हे त्याच्यादृष्टीने गूढ-भयाचा संमिश्र विषय बनला. त्याला तोवर अपत्य जन्मात आपलाही सहभाग असतो हे माहितच नव्हते. चंद्रकला आणि नियमित येणारा मासिक धर्म यामुळे त्यांनी अपत्य जन्माचा संबंध चंद्राशी लावला. आपण आता चंद्र हा स्त्रीचा भाऊ आहे असे मानतो, पण पुरातन समाज हा चंद्र अपत्याला जन्म घालतो (म्हणजे तिचा पती) असा लावला गेला. भारतातील चंद्रवंश ही समजूत त्यातूनच निघाली.
उत्खनने आणि पुरातन गुहाचित्रातून 50-60 हजार वर्षापूर्वीच्या माणसाचे लिखित नसले तरी समजुतींचे वस्तु-चित्ररूप दर्शन घडवते. सिंधू संस्कृतीत मातृदेवतांचे व तिच्या सामर्थ्याचे दर्शन घडवते. स्त्रीयोनीतून निघालेल्या पिंपळाचे चित्रण स्त्रीच्या प्रसवक्षमतेचे कसे उदात्तीकरण होते हेही दर्शवते. भारतात संभोगोत्सूक स्वरुपाची, शीर्षाच्या जागी कमळे असलेली पण ठळक योनी व स्तन दाखवणार्‍या मृण्मुद्रा आणि पाषाण शिल्पे विपुल प्रमाणात तर आहेतच पण गावदेवीच्या स्वरुपात जवळपास सर्व खेड्यात स्त्रीमहत्तेचे अस्तित्व सापडते. किंबहुना मातृसत्ता आरंभीच्या काळात जगभरात पाळली जात होती असे पुरावे मिळतात. पुरातन काळात स्त्रिया पुरुषी कार्यात भाग घेतही असल्या तरी तो सीमित होता. किंबहुना तो सीमित ठेवला गेला तो या तिच्याकडे पाहण्याच्या गूढमिश्रीत श्रद्धाभावामुळे. बहुप्रसवा स्त्री ही टोळीचे वैभव मानली जात होती, कारण टोळीची लोकसंख्या त्यामुळेच वृद्धिंगत होऊन टोळीसामर्थ्यही त्यामुळे वाढेल ही भावना त्यामागे असणे स्वाभाविक आहे.
समाजेतिहास तज्ञ म्हणतात की शेतीचा शोध स्त्रीने लावला. त्यात तथ्य आहे कारण तिला निरीक्षण करत फेकलेल्या बिया कशा उगवतात हे पाहण्याची अधिक संभावना होती. आधी सुरू झाली ती फिरती शेती. नंतर माणूस जलाशय-नद्या-ओढे यांच्या काठी स्थिर शेती करू लागला. आधी स्त्री ही टोळीची मालमत्ता असे. शेतीच्या शोधाने मालकीहक्क व वंशसातत्याची कल्पना आली. किबहुना स्त्री-स्वातंत्र्य लयाला घालवणारी ही घटना होती.
आपण शेतीत बीज पेरतो तेव्हा पीक होते हे ज्ञान आपलाही अपत्य जन्मात सहभाग आहे कारण आपण आपले बीज योनीत पेरतो हे ज्ञान माणसाला झाले. वारसाहक्काच्या कल्पनेतून मग माणसाने विवाहसंस्थेला जन्म घातला. ही व्यवस्था सैल होती. बहुपतीत्व जसे लागू होते तसे बहुपत्नीत्वही आरंभी लागू होते. महाभारतात आपण नियोग प्रथा, बहुपतीत्वाचे अवशेष द्रौपदीच्या रुपात पाहू शकतो.
भारतात वैदिक धर्म आणि शैवप्रधान धर्माच्या धारा आहेत हे आपण जाणतोच. वैदिक धर्म येण्यापूर्वी सिंधुपुर्व काळापासून भारतात, लिंग आणि योनीपूजा सुरू होती याचे अवशेष आपल्याला प्राप्त आहेत. पुढे स्त्री-पुरुष यात एकात्मता प्रस्थापित करत लिंग आणि योनी संयुक्त स्वरुपात शिवलिंग या प्रतीक रुपाने सुरु झाली. या धर्मात स्त्रीमहात्म्य व समता याचा परिपाक या प्रतीकातून दिसतो. शैव-शाक्त संप्रदायांनीही शक्ती (स्त्री) तत्वालाच जगन्माता मानत तिची आराधना प्राधान्याने केली. तंत्रांची निर्मिती शिवाने केली अशी श्रद्धा आहे. प्रस्तूत लेखाच्या दृष्टिने महत्त्वाची बाब म्हणजे यात रज:स्वलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रज:स्त्रावाचा उपयोग यात्वात्मक क्रिया साधण्यासाठी केला जात असे. स्त्री रजोकालात अपवित्र नव्हे तर पवित्र व साधनेचे साधन मानली जात होती.
पुरातन काळी स्त्रीला किती महत्त्व होते हे आपण शैवांच्या/शाक्तांच्या आजही अवशिष्ट राहिलेल्या परंपरांतून पाहू शकतो. शक्ती (स्त्री) ही पृथ्वी व अवकाश हे शिव तर पर्जन्य म्हणजे त्याचे वीर्य. या संगमातून पृथ्वी सुफलाम होते अशी भावना होती. मानवी जीवनाचे आरोपण सृष्टीवर करणे हा मानवी स्वभाव आहे. सूर्य मृग नक्षत्रात गेल्यानंतरचे पहिले तीन दिवस हा पृथ्वीच्या रजोदर्शनाचा काळ मानला जातो. या काळात नांगरणे, बी पेरणे वर्ज्य मानले जाते. चवथ्या दिवशी दगडांना स्नान घालून पृथ्वी सुफलनासाठी योग्य झाली असे मानले जाते.  अंबुवाची नावाने हा उत्सव बंगाल, आसाम येथे व्यापक प्रमाणात तर अन्यत्र तुरळक प्रमाणात आजही साजरा होतो. आसाममध्ये कामाख्या मंदिरातही हा देवीचा रजोदर्शन उत्सव साजरा होतो. या काळात मंदिर तीन दिवस बंद असते. चवथ्या दिवशी देवीला स्नान घालण्यात येते व भक्तांना लाल कपड्याचे तुकडे  देवीच्या रजोदर्शनाचे प्रतीक म्हणून वाटले जातात. शबरीमलाच्या निषिद्धांच्या विपरित, खुद्द केरळमध्येही पार्वती देवीच्या मंदिरात (चेंगान्नूर) पार्वतीच्या मासिक धर्माचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
याचा एक अर्थ असा की रजोदर्शन हे काहीतरी अपवित्र आहे अशी भावना मुळात नव्हती. किंबहुना सुफलनतेत रजोदर्शन हे अटळ आहे, अपरिहार्य आहे आणि मानवाला वंशसातत्यासाठी आवश्यकच आहे अशी भावना होती असे दिसते. तीन दिवस स्त्रीला कामापासून विश्रांती मिळावी म्हणून दूर बसणे हा तत्कालीन स्थितीत सुचलेला पर्याय सोडला तर स्त्री या काळात अस्पर्शीही होती असा आभासही मिळत नाही. उलट भारतातील 52 शक्तीपीठे (सतीचे एकेक अवयव जेथे जेथे गळून पडले त्या स्थानांवर उभारलेली मंदिरे) स्त्री हे नरकाचे द्वार आहे, पापयोनी आहेत अशी वैदिक धर्मशास्त्रांनी निर्माण केलेली निषिद्धे शैव पाळत नव्हते असे दिसते.
वैदिक धर्मातही आरंभकाळी स्त्रीकडे पहायचा दृष्टिकोन व्यापक व उदारच होता असे ऋग्वेदावरुनच दिसते. अनेक स्त्रियांनी सुक्ते रचलेली आहेत. ऋग्वेदातील 1.79 हे सूक्त लोपामुद्रेने लिहिलेले असून ती तत्ववेत्ती होती हे स्पष्ट दिसते. वैदिक स्त्रियांना उपनयनाचा, वेदांचा व यज्ञकर्मात भाग घेण्याचाही अधिकार होता. ऋग्वेदात कोठेही ऋतुमती स्त्री अपवित्र असते वगैरे उल्लेख नाही. अगदी मनुस्मृतीतही मासिक धर्मकाळात पुरुषाने स्त्रीशी संभोग करू नये याव्यतिरिक्त अशुचीबाबत कसलेही विधान केलेले नाही. परंतू ततित्तिरिय संहितेत नंतर काही भाग घुसवत एक मिथक निर्माण करण्यात आले. ते असे:
इंद्राने त्वष्ट्यचा पुत्र असलेल्या विश्वरुपाची तीन मस्तके उडवून ब्रह्महत्या केली. याबाबत निंदा होऊ लागल्यावर इंद्राने आपले 1/3 पाप पृथ्वी व झाडांना दिले व उरलेले पाप स्विकारण्याची त्याने त्या स्त्रियांना विनंती केली. त्यावर स्त्रियांनी वर मागितला. रजोदर्शनाचा काळ संपल्यावर आम्हाला अपत्यप्राप्ती होऊ दे! मग इंद्राच्या पापाने रज:स्वला स्त्रीचे रुप घेतले. म्हणून रजस्वला स्त्रीबरोबर संभाषण करू नये, तिच्याजवळ बसू नये, तिच्या हातचे अन्न खाऊ नये कारण ती इंद्राच्या पापाचा रंग असलेले रक्त टाकत असते.
आता ही भाकडकथा आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. इंद्राने अपले पाप त्यांना देईपर्यंत त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती का? त्यांना रजोदर्शन तर होतच नव्हते का? आणि हे झाले एका स्त्री समुहाबाबत... अन्य स्त्रियांचे काय? रजोदर्शन अमंगळ आहे हे सांगण्यासाठी कोणी मूढाने ही कथा बनवली आहे हे उघड आहे.
रजोदर्शनापूर्वी मुलीचे लग्न करावे असे मनु सांगतो. पण अन्य स्मृती त्याच्याही पुढे जातात आणि रज:स्वलेने तीन दिवस कसे वागावे याबाबत अगदी बारीक-सारीक नियम घालतात. तिने स्नान करु नये, केस विंचरू नये, दात घासू नयेत, तिन्ही दिवस हातात घेऊन अन्न खावे, कोणाला, अगदी रज:स्वलेने रज:स्वलेलाही स्पर्श करू नये, एकवस्त्रा असावे वगैरे. यातील एक जरी नियम तिने मोडला तर तिला होणारा पुत्र चोर, रोगी, नपुंसक, वेडा वगैरे होतो अशी भीती दाखवायलाही हे वैदिक धर्मशास्त्रकार चुकलेले दिसत नाहीत.
ततित्तिरिय ब्राह्मणात तिला या काळात याज्ञिक धर्मकृत्येही निषिद्ध सांगितली आहेत. हे नियम अर्थातच वैदिक स्त्रियांनाच कटाक्षाने लागू केले गेले हे उघड आहे. स्त्रियांचे उपनयनही थांबले आणि तिचा वेदाधिकारही काढला गेला तो स्मृतीकालातच. तत्पूर्वी वेदाध्ययन जरी केले गेले नसले तरी विवाहाआधी तिचे उपनयन करण्यात येत असे पण तीही परंपरा नंतर वैदिकांनी का सोडली याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यांच्या स्त्रिया या सर्व पातकांचे द्वार बनल्या हे मात्र खरे.
खरे म्हणजे हे वैदिक परंपरांच्याच विरोधात जाते. वेदाज्ञा म्हणाल तर याबाबत अशी एकही आज्ञा वेदांत मिळत नाही. म्हणजेच स्त्रियांबाबतचे असे अन्यायी नियम करणे हेच मुळात वेदविरोधी होते, हे वैदिकांनी समजावून घेत मूळचे वैदिक स्त्री माहात्म्य पुन्हा प्रतिष्ठापित करण्याची आवश्यकता आहे.

इस्लाम
हिंदू-वैदिकांबाबत लिहिले की इस्लामबाबत का लिहिले जात नाही असे मला नेहमीच विचारले जाते. इस्लाममध्ये (भारतात) काही ठिकाणी मशिद-दर्ग्यांत स्त्रियांना प्रवेश नाही असे मी लेखारंभीच सांगितले आहे. हेही कुराणविरोधी आहे असे म्हणायला प्रत्यवाय नाही. स्त्रियांना मशिदीत जाण्याचा, नमाज अदा करण्याचा अधिकार आहे. अनेक ठिकाणी स्त्रियांसाठी मशिदीत वेगळी व्यवस्था असते. पण असे असले तरी स्त्रियांनी घरीच नमाज पढावा यासाठी अधिक दक्षता बाळगली जाते व स्त्रिया मशिदींत मुळात जाण्याचा प्रयत्नही करत नाही असेही चित्र आहे. काही ठिकाणी तर बंदीच आहे. कुराणात पैगंबर म्हणतात, स्त्रियांना कोणी मशिदीत जाण्यापासून रोखू शकत नाही पण त्याला नंतरच्या धर्मशास्त्र्यांनी दिलेली जोड अशी की पण घर हीच त्यांच्या नमाजासाठी योग्य जागा आहे.
पैगंबरांनी स्त्रियांबरोबर लहान मुले असतात व ते रडून नमाजात व्यत्यय आणतात म्हणून स्त्रियांसाठी स्वतंत्र खोली व दरवाजा असावा असे म्हटले. असे असले तरी मासिक धर्मातील स्त्रिया व अपवित्र लोक यांच्यासाठी सामुदायिक नमाज पैगंबरांच्याच पत्नीमुळे, आयेशामुळे, नाकारला गेला असे इस्लामी पंडित सांगतात. अर्थात याला कुराणात दुजोरा मिळत नाही. हदिथने अनेक बाबींचा विपर्यास केला आहे हे स्पष्टच दिसते. कुराणवर विश्वास ठेवणार्‍या मुस्लिमांनी मूळ कुराण व सुनाहवरच विश्वास ठेवला तर त्यांना असल्या धर्माज्ञा सापडणार नाहीत.
थोडक्यात धर्मांनी मुळातील बाबी व स्त्रियांबाबतचा उदारमतवाद कसा धिक्कारला आहे हे आपण वैदिक व इस्लामबाबत पाहू शकतो. स्त्रियांना दुय्यम स्थान देणे हा एकमेव हेतू त्यामागे होता यात शंकाच नाही. मूळ धर्मही बाजूला ठेवत स्वार्थासाठी, स्त्रियांवरील व अन्यायांवरील वर्चस्व गाजवण्यासाठी धर्मालाही तिलांजली दिली.
आज आपण आधुनिक काळात आहोत. समतेचे मूलतत्व आपण घटनात्मक पातळीवर स्वीकारले आहे. त्यात स्त्री-पुरुष समता सर्वोपरी आहे. अनेक हिंदू धर्मातील वैदिक पुरोहितांनी हट्टाने वैदिक नसलेले, उत्तरकाळात बनवलेले, अगदी स्मृतींतही नसलेले अनेक नियम देवस्थान कायद्यात घुसवले आहेत. धर्माच्या बाबतीत मुस्लिम सर्वस्वी मुल्ला काय अर्थ काढतो यावरच अधिक अवलंबून आहेत. खरे म्हणजे, अगदी धर्मात असले तरी, ज्ञान-विज्ञानाच्या प्रकाशात असले बाष्कळ नियम फेकून द्यायची गरज असताना धर्म.. धर्म करत स्त्रीच्या निसर्ग धर्माचा अवमान करत आपण समस्त माणुसकीला काळिमा फासत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. मशिद असो की मंदिर, यज्ञ अस की पुजा, स्त्रीला समान अधिकार हवेत. ते पाळायचे की नाही, धर्मस्थली जायचे की नाही ही बाब व्यक्तिस्वातंत्र्याची आहे पण कोणी त्यांना जायचे असूनही आडकाठी करत असेल तर धर्मस्थळ कायदे, लिखित-अलिखित नियम, परंपरादिंच्या नावाखाली त्यांना रोखत असेल तर ते घटनात्मक स्वातंत्र्याच्या मुलभूत अधिकारावर गदा आणनारे आहे. असे कायदे अघटनात्मक असल्याने ते बेकायदेशीर आहेत.
स्त्रियांनाच यात व्यापक प्रबोधनासाठी, स्वत:चे स्वातंत्र्य जपण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. मासिक धर्म अपवित्र नाही. ती वेडगळ समजूत आहे. पुरातन काळापासून या धर्माला प्रतिष्ठा होती. ती गमावली असेल तर ती पुन्हा मिळवायला हवी आणि समस्त पुरुषांनीही डोळे उघडून पुरुषी वर्चस्वतावादाच्या सरंजामशाही मानसिकतेतून दूर होत आपल्याइतकेच स्त्रियांनाही स्वातंत्र्य आहे, त्या गुलाम नाहीत याचे भान ठेवले पाहिजे...!

(साहित्य चपराक, डिसेंबर२०१५ )
- संजय सोनवणी, पुणे 

९८६०९९१२०५ 

Wednesday, December 16, 2015

भावनांची लबाडी अन शब्दांची हातचलाखी - गुलजारची कविता

गुलजार हा एक उत्तम दिग्दर्शक आहे यात काहीच वाद नाही, परंतु तो तितकाच उत्तम गीतकार आणि कवी आहे का? या प्रश्‍नाचे उत्तर ‘हो’ असे देण्याआधी थोडा विचार करावा लागेल. बहुदा तो कवी आहे की नाही, हाच मुळात वादाचा मुद्दा आहे. या जगात अशी माणसे आहेत, ज्यांना फक्त किनार्‍यावर बसूनच उसळत्या लाटा नुसत्या पाहण्यातच धन्यता वाटते. त्या लाटांमध्ये स्वत:ला पूर्णत: झोकून देऊन, त्यापलीकडे जाऊन खोलवर असलेल्या आशयाचा तळ गाठण्याची त्यांना अजिबात गरज वाटत नाही. मग अशा लोकांच्या नजरेसमोर उसळत्या लाटांच्या दृश्यतेचा केवळ एक आभास निर्माण केला तरी पुरेसा असतो. मग नजरेसमोर आशयाचा तळ आणि लाटा प्रत्यक्षात असो किंवा नसो, त्यांचा आभास मात्र असतो, अगदी खर्‍यासारखीच अनुभूती देणारा! हा आभास निर्माण करणारे अनेक जादूगार या जगात आहेत. अशाच एका जादूगाराचं नाव आहे, गुलजार!
इंग्रजी भाषेत ‘मॅनिपुलेटर’ असा शब्द आहे. या शब्दाचे तंतोतंत भाषांतर मराठीत अथवा अन्य भाषेत करता येणे कठीण आहे. ‘आपले कौशल्य वापरून इतरांना भुलवणारा इसम’ असा काहीसा या शब्दाचा अर्थ आहे. गुलजारला जर कवी म्हणायचे असेल, तर नुसता ‘कवी’ हा शब्द न वापरता, त्याला ‘मॅनिपुलेटर पोएट’ असे म्हणावे लागेल. गुलजारच्या कवितेला ‘अस्सल’ मानून तिचा आंधळेपणाने आस्वाद घेणारे लाखो चाहते आहेत, परंतु माझ्या दृष्टिने गुलजारची कविता म्हणजे केवळ भावनांची लबाडी अन् शब्दांची हातचलाखी, यापेक्षा वेगळं काहीही नाही!
गुलजारला मी गुलजार असं म्हणतोय, इतरजण म्हणतात त्याप्रमाणे ‘गुलजार साहेब’ किंवा ‘गुलजार साब’ असं न म्हणता त्याचा एकेरी उल्लेख करतोय. माझ्या या उद्धटपणाचा गुलजारच्या अनेक चाहत्यांना राग येणं स्वाभाविक आहे. शिवाय गुलजारच्या प्रतिभेबद्दल अशी बेधडक विधानं करण्याचा मला काय अधिकार? अधिकार आहे! माझ्या मते, औपचारिकता ही परक्यांच्या बाबतीत पाळली जाते. जिथे दोन गोष्टींमध्ये ‘अंतर’ हा घटक असतो, तिथे औपचारिकता अस्तित्वात असते. प्रेम हे औपचारिकतेचे खोडरबर आहे. आपण ज्या गोष्टीवर अगदी मनापासून प्रेम करतो, तिथे औपचारिकता गळून पडते. माझ्या अगदी लहानपणी, जेव्हापासून मला थोडेफार कळू लागले, तेव्हापासून माझ्या भोवतालच्या वातावरणाने मला ही ‘गुलजार’ नावाची लस माझ्याही नकळत टोचली आणि तेव्हापासून हे रसायन माझ्या धमन्यांमधून वाहतं आहे. माझ्या भोवतालची माणसं (त्यात माझ्या वडिलांचाही समावेश आहे) गुलजारबद्दल अगदी भरभरून बोलायची, त्याच्या हातून घडलेल्या प्रत्येक निर्मितीचे माझ्यादेखत कौतुक व्हायचे, त्यामुळे हा गुलजार कोण आणि त्यानं काय काय उपद्व्याप करून ठेवलेत, याचा परिचय मला अगदी लहानपणीच घडला होता. माझ्या चिमुकल्या डोळ्यांपुढे त्यावेळी गुलजार हाच एक ग्लॅमरचा चेहरा होता. तसं कळत तर काहीच नव्हतं, पण मोठेपणी कोण बनायचं? तर ‘गुलजार’ बनायचं, असा एक सूर अंतरात कुठेतरी उमटला होता. मी शाळेत असताना पुण्यातील एका दैनिकाने खुली चित्रकला स्पर्धा आयोजीत केली होती. त्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून गुलजार आला होता. त्यावेळी प्रथमच त्याला अगदी जवळून पाहण्याचा योग आला. पांढरा आखूड कुर्ता, पायजमा, पायात साधी चप्पल, गालावर अर्धवट वाढलेली दाढी आणि डोळ्यांवर जाड काळ्या फ्रेमचा चश्मा. गुलजारच्या हातून प्रशस्तीपत्र स्वीकारताना त्यानं माझ्या पाठीवर हात ठेवला होता आणि मग त्यानंतर गुलजारचा साधेपणा हीच माझी ग्लॅमरची व्याख्या बनली. गुलजार हा माझा खरा हिरो! त्याच्या प्रतिभेच्या लाखो चाहत्यांपैकी मीदेखील एक. त्यानेच निर्माण केलेल्या एका विलक्षण जादूई दुनियेचा मीही एक प्रवासी. ‘पत्थर की हवेली को, शीशे के घरोंदे मे, तिनकों के नशेमन तक, इस मोड से जाते है...’, असं म्हणत त्यानं जो अंधुक मार्ग दाखवला, त्या मार्गानं माझा भावनिक प्रवास सुरू झाला, ‘मुसाफिर हूं यारों, ना घर है, ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना’, असं म्हणत!
हा प्रवास आनंददायक होता, यात काहीच शंका नाही, परंतु तिथेच एक गल्लत झाली. मी लहानपणी जेव्हा प्रथमच नाटकाचा रंगमंच बघितला होता, तेव्हा मला घराच्या भिंती, दारं, खिडक्या हे सगळं अगदी खरं वाटलं होतं, तेव्हा मला घराच्या भिंती, दारं, खिडक्या हे सगळं अगदी खरं वाटलं होतं, ते दृश्य पाहून मी भूलून गेलो होतो, पण जेव्हा माझ्या वडिलांनी मला विंगेत नेलं तेव्हा मात्र माझा भ्रमनिरास झाला. त्या घराच्या भिंती कापडाच्या होत्या आणि दारं-खिडक्याही खोटी होती. मी त्यांना स्पर्श करून माझी खात्रीही करून घेतली. असाच काहीसा प्रकार गुलजारच्या कवितेबाबत झाला. ज्या उसळत्या लाटांमध्ये चिंब भिजण्याच्या हेतूने मी झेपावलो, त्या ठिकाणी लाटाही नव्हत्या आणि आशयाचा तळही नव्हता. होता फक्त आभास!
संपूर्ण सिंग कालरा (अर्थात गुलजार) या जन्म 18 ऑगस्ट 1934 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाबच्या झेलम जिल्ह्यातील दीना या गावात कालरा आरोरा शीख कुटुंबात झाला. त्याचे वडील माखन सिंग कारला आणि आई सुजन कौर यांना फाळणीनंतर भारतात स्थलांतरीत व्हावे लागले. गुलजार लहान असताना सवंगड्यांमध्ये शेरो-शायरीच्या भेंड्या खेळायचा. त्यावेळी एखाद्या शेरच्या ओळी आठवल्या नाहीत तर तो लबाडी करून स्वत:च्याच मनाच्या ओळी घूसडून शेर पूर्ण करायचा. आपली हीच सवय पुढे जाऊन आपला रोजी-रोटीचे साधन बनणार आहे, याची कदाचित त्यावेळी त्याला कल्पना नसावी. मुंबईत आल्यावर संपूर्ण सिंग एका गॅरेजमध्ये काम करू लागला. अपघातग्रस्त मोटारगाड्यांना टच अप करण्याचे काम तो करायचा. गॅरेजमध्ये काम करत असताना मुंबईतल्या टिपीकल ‘बम्बईय्या’ हिंदी भाषेशी त्याचा परिचय झाला. ‘गोली मार भेजे में, भेजा शोर करता है’, हे गीत तिथल्याच भाषिक संस्काराचे फलित असावे. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे संपूर्ण सिंगने गीतलेखन करण्याचे ठरविले. त्या काळात अनेक दिग्गज उर्दू शायर टोपण नावाने गीतलेखन करत होते. ‘अब्दुल हायी’ हे मूळ नाव असणारे शायर पंजाबच्या लुधियाना शहरातून आले असल्याने त्यांनी ‘साहिर लुधियानवी’ असे नाव घेतले होते. त्याच पद्धतीने संपूर्ण सिंगने आपले नाव ‘गुलजार दीनवी’ असे ठेवले. दीना या गावचा म्हणून दीनवी. पुढे मग त्यातले दीनवी गळून पडले आणि उरले फक्त ‘गुलजार’.
1963 साली गुलजारने प्रथम बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’ चित्रपटासाठी ‘मोरा गोरा अंग लाई ले...’ हे गीत लिहिले. शैलेंद्र यांनी उर्वरीत गाणी लिहिली. त्यांचे गुलजारला मार्गदर्शन होतेच. शिवाय सचिन देव बर्मन हे गाण्याच्या मीटरबाबत अतिशय कडक शिस्तिचे संगीतकार. त्यांनी त्या गीताचे सोने केले! एकदा का ‘कवी’ असा शिक्का स्वत:वर मारून घेतला की मग सुरू होते शब्दांची अफरातफर! गुलजारने अशी अफरातफर पुष्कळ केली आहे. मिर्झा गालिब यांच्या अतिशय गाजलेल्या ‘दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन’ या गझलेची मोडतोड करून गुलजारने स्वत:च्या नावावर एक गीत तयार केले. ‘मौसम’ या चित्रपटासाठी मदनमोहन यांनी याच गाण्याला दोन चाली दिल्या. भुपेंद्र यांच्या दमदार आवाजातील हे गाणे फार लोकप्रिय ठरले. त्याचप्रमाणे अमिर खुसरो यांच्या ‘ए शरबते आशिकी’ या गझलेवरून गुलजारने ‘ए हैरते आशिकी’ हे गाणे लिहिले. माणिकरत्नमच्या ‘गुरू’ या 2001 साली आलेल्या चित्रपटासाठी ए. आर. रहेमान याने हे गीत संगीतबद्ध केले. आणखी एक उदाहरण द्यायचे झाले तर अगदी अलिकडेच शाहरूख खानच्या ‘दिल से’ या चित्रपटाला ‘छैय्या छैय्या’ या गाण्यासाठी गुलजारची फारच तारीफ झाली. परंतु अनेकांना हे माहीत नसावे की हे गीत बुल्लेह शाह यांच्या ‘थैय्या थैय्या’ या सुफी लोकगीतावरून उचलले आहे. गुलजारचा हा ‘आदर्श’ डोळ्यापुढे ठेवून अनेक ‘जुगाड कवी’ गल्लोगल्ली उगवलेले सध्या पहायला मिळतात. गुलजारची लोकप्रियता वाढू लागली तसे अभिव्यक्तीच्या नावाखाली त्याने भ्रामक संकल्पनांचे तारे तोडायला सुरूवात केली. ‘एक दिन सपने में देखा सपना’ हे ठीक आहे. स्वप्नात स्वप्न दिसणं ही संकल्पना छान आहे, परंतु ‘सपने में देखी सपनी’ ह्या ओळीतला ‘सपनी’ हा शब्द म्हणजे पुढल्या ओळीतील ‘वो जो है ना लता अपनी’ या ओळीशी यमक जुळविण्याचा एक केविलवाणा प्रकार आहे. हे सगळं बघितलं की ‘सब गोलमाल है’ ही ओळ खुद्द गुलजारच्या कवितेलाच लागू पडते, हे स्पष्ट होतं. मुलांसाठी खास असं जे काही लेखन गुलजारने केलं आहे, ते देखील अचाटच आहे. ‘चड्डी पहन के फुल खिला है’, ‘टप टप टोपी टोपी’, ‘ओ पापडवाले पंगा ना ले’ वगैरे केवळ चमत्कृतीपूर्ण शब्दांचे खेळच! गुलजारचे अत्यंत रद्दड गीत म्हणजे 1999 साली आलेल्या ‘हू तू तू’ चित्रपटातील लता मंगेशकर आणि हरिहरन यांनी गायिलेले...
‘इतना लंबा कश लो यारो, दम निकल जाए
जिंदगी सुलगाओ यारो, गम निकल जाए’
धूम्रपानाचे समर्थन करणारे हे गीत गुलजारला ‘ग्रेट कवी’ मानणार्‍यांनी एकदा अवश्य ऐकावे (...आणि पहावे सुद्धा!) याच सिनेमातलं आणखी एक गाणं आहे, त्याबद्दल मी जास्त न बोललेलंच बरं.
‘छई चप्पा छई, छप्पाक छई
पानींयो पे छिंटे उडाती हुई लडकी...’
‘पानी’ या शब्दाचे अनेकवचन ‘पानीयों पे’ असं फक्त गुलजारंच करू शकतो. हा भाषा भ्रष्ट करण्याचा प्रकार नाही का?
कैफी आझमी आणि मजरूह सुलतानपुरी यांनी तर गुलजारच्या कवितेवर सडकून टीका केली होती. कैफी आझमींनी एका मुलाखतीत सांगितले होते, ‘‘मी गुलजारला कवी मानतच नाही. त्याने कवितेचा खेळ मांडून तिला बदनाम केलं आहे. रोमँटिक पोएट्रीच्या नावाखाली तो वाट्टेल ते खपवतो आहे. त्याला त्याच्या पात्रतेपेक्षा जरा जास्तच  प्रसिद्धी मिळत आहे. गुलजार इज फेक पोएट!’’ कैफींचं हे वाक्य फार बोलकं आहे... ‘‘गुलजार इज ए फेक पोएट!’’ 1969 साली ‘खामोशी’ या चित्रपटा गुलजारने एक गीत लिहिलं...
‘हम ने देखी है उन आंखो की मटकती खूशबू
हात से छू कर इसे रिश्तो का इल्जाम ना दो’
मजरूह सुलतानपुरी यांनी या गाण्यावर आक्षेप घेतला. सुगंध हा कधी दृश्यमान असू शकतो का?
गुलजारचं आणखी एक गाणं आहे... ‘नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा’ या गाण्यात ‘नाम गुम जाएगा’ याऐवजी ‘नाम गुम हो जाएगा’ अशी ओळ अपेक्षित आहे, असं मजरूह यांचं म्हणणं होतं. त्यावर गुलजारच्या समर्थकांचं म्हणणं असं की सिनेमाचं गाणं संगीताच्या मीटरमध्ये बसवताना गीतकाराला काही तडजोड आहे. परंतु अशी तडजोड त्यापूर्वी कधी कैफी आझमी, मजरूह सुलतानपुरी, शैलेंद्र, साहिर लुधियानवी, भरत व्यास, जा निसार अख्तर यांच्यासारख्या अनुभवसिद्ध गीतकारांना करावी लागली नव्हती. काव्यरचनेचे सर्व नियम पाळूनही जे काही सांगायचंय ते अगदी प्रभावीपणे सांगता येतं, हे मजरूह सुलतानपुरींचं म्हणणं होतं. तडजोडच करायची होती तर ’नाम खो जाएगा...’ असं लिहिणं अपेक्षित होतं. तडजोड करण्याच्या नावाखाली भाषेचे आणि व्याकरणाचे लचके कशाला तोडायचे? ‘गुड्डी’ या सिनेमासाठी गुलजारने ‘हम को मन की शक्ती देना’ ही प्रार्थना लिहिली. ही प्रार्थना इतकी लोकप्रिय ठरली की ती अनेक शाळांमधून गायिली जाऊ लागली. ह्याच प्रार्थनेतील ‘दुसरों की जय से पहले खुद को जय करें’ या ओळीतील व्याकरण दोषावर अनेक भाषातज्ज्ञांनी वार केले.
वरकरणी साधेपणाचा आव आणणारा हा माणूस शब्दांचा पक्का व्यापारी आहे. साहित्यसेवा म्हणून नव्हे; तर केवळ भरमसाट पैसे उकळण्यासाठी तो गीतसदृश रचना करत असतो. प्रत्येक गीताच्या मानधनाचे आकडे काही लाखात असतात. 2001 साली राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित, अमिताभ बच्चन आणि मनोज वाजपेयी यांच्या भूमिका असणार्‍या चित्रपटासाठी ‘अक्स’ हे एकाक्षरी शीर्षक सुचविण्यासाठी गुलजारने लाखभर रूपये घेतले होते.
गुलजारमधल्या लेखक आणि कवीला मी कितीही नावं ठेवत असलो तरी त्याच्यातल्या दिग्दर्शकाला मात्र मी अगदी मनापासून सलाम करतो. त्याचे दिग्दर्शन कौशल्य सिद्ध करण्यासाठी फक्त दोनच उदाहरणे पुरेशी आहेत. 1958 सालच्या के. एम. नानावटी विरूद्ध महाराष्ट्र शासन या खून खटल्यावर आधारित ‘अचानक’ हा सिनेमा त्याने दिग्दर्शित केला. विनोद खन्नाची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात त्याने फ्लॅशबॅकच्या आत फ्लॅशबॅक हे जे तंत्र वापरलं आहे, ते जगातील फारंच थोड्या दिग्दर्शकांनी हाताळलं आहे. दुसरे उदाहरण देता येईल ते 1988 साली गुलजारने दूरदर्शनसाठी तयार केलेल्या ‘मिर्झा गालिब’ या मालिकेचे. त्यात नसिरूद्दीन शाहने भूमिका केली होती. बाकी गुलजारचे बरेचसे काम म्हणजे निव्वळ उचलेगिरी आणि जुगाड आहे. त्यानं जे काही उचललं ते चांगलंच उचललं, एवढीच काय ती त्याची गुणवत्ता!
गुलजारने 1971 साली पहिला सिनेमा दिग्दर्शित केला ‘मेरे अपने’. हा सिनेमा 1969 साली प्रदर्शित झालेल्या ‘अपनजन’ या तपन सिन्हा यांच्या बंगाली सिनेमावरून उचललेला आहे. ‘परिचय’ हा सिनेमादेखील राजकुमार मैत्रा यांच्या ‘रंगीन उत्तरैन’ या बंगाली कादंबरीवर आधारित असून ‘साऊंड ऑफ म्युझिक’ या इंग्रजी सिनेमाचा त्यावर प्रभाव आहे. ‘मौसम’ या सिनेमासाठी गुलजारला उत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला, परंतु त्याने या सिनेमाची जी कथा लिहिली, ती मूळ इंग्रजी लेखक ए. जे. क्रेनीन यांच्या ‘द जुडास ट्री’ या पुस्तकातील ‘वेदर’ या कथेवरून उचलेली आहे, हे त्याच्या अनेक चाहत्यांना माहिती नसावे. 1982 साली गुलजारने शेक्सपिअरच्या ‘द कॉमेडी ऑफ एरर’ या रचनेवर आधारित ‘अंगूर’ हा सिनेमा काढला.
भारतीय सिनेमासृष्टीतील अनेक दिग्गज प्रतिभावंत पुरस्काराच्या बाबतीत तसे अपेक्षितच राहिले, पण कैफी आझमी यांच्या म्हणण्याप्रमाणे गुलजारला मात्र त्याच्या प्रतिभेच्या तुलनेत जरा जास्तच पुरस्कार मिळाले. 2002 साली गुलजारला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 2004 मध्ये पद्मभूषण. याशिवाय अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 20 फिल्मफेअर पुरस्कार. 2010 मध्ये त्याला स्लमडॉग मिलेनियर या सिनेमासाठी गीतलेखनाचा ऑस्कर पुरस्कार आणि ग्रॅमी पुरस्कारही मिळाला. ग्या गाण्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे (जय हो), ते गीत जागतिक पातळीवर भारतीय साहित्याचे प्रतिनिधित्व करण्याच्या योग्यतेचे आहे का, याबाबत भारतीयांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. 2012 साली गुलजारला इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार मिळाला आणि सिनेमातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला. गुलजारच्या यशात सर्वात मोठा वाटा आहे, तो त्याच्या संगीतकारांचा. त्यातले सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे राहूल देव बर्मन. अत्यंत प्रयोगशील अशा या संगीतकाराने गुलजारच्या वेड्या-वाकड्या पद्यरचनांनाही गीत बनवले. कोणतेही मीटर नाही, यमक नाही, वृत्त नाही अशा रचनांना उत्कृष्ट चाली लावण्याचे आव्हान आरडीने अगदी लीलया पेलले आहे. अशीच एखादी रचना जर आरडीचे वडील सचिनदा यांना दिली असती तर त्यांनी गुलजारला दारातही उभे केले नसते! ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है...’ अशा वाक्यांना चाली लावणे म्हणजे दिव्यच!
गुलजार लोकप्रिय होण्याचे नेमके कारण काय असावे? आपल्याकडे असा एक स्वयंघोषित बुद्धिजीवी वर्ग आहे, जो साहित्यातले काही कळत नसतानाही केवळ जाणतेपणाचा आव आणून स्वत:चा स्टेटस सिंबॉल म्हणून गुलजारसारख्या माणसाला डोक्यावर घेतो. ह्या वर्गासाठी ‘गुलजार’ हा केवळ त्यांच्या आवडीचा ब्रँड असतो, जो त्यांना समाजात उजळ माथ्याने  मिरवता येतो. याच जोरावर गुलजार थोडे-थोडके नव्हेे तर तब्बल 50 वर्षे सतत चर्चेत राहण्यात यशस्वी ठरतो. सोलापूरच्या शशिकांत लावणीस यांचा एक कार्यक्रम होता, ‘गुलजार बोलतो, त्याची कविता होते’ हे त्या कार्यक्रमाचे शीर्षक. गुलजारच्या साध्या बोलण्यातही कविता शोधणार्‍या या विशिष्ट वर्गाला मग पुलंच्या फुटकळ लिखाणातही साहित्यमूल्य सापडते आणि मग त्यामुळे शंकर पाटील यांच्यासारखा प्रतिभावंत साहित्यिक कायम उपेक्षितच राहतो. जो समाज केवळ किनार्‍यावर बसून लाटांचा आस्वाद घेत राहतो, त्या समाजात कायम गुलजारसारख्या ‘फेक पोएट्स’चा उदो-उदो होत राहणार आणि प्रतिभेची लबाडी अशीच चालू राहणार. जिथे आस्वाद घणारेच दांभिक असतील तिथे अस्सल स्वादाला किंमत कशी मिळणार?
गुलजारवर माझा व्यक्तिगत आरोप असा आहे की त्याने माझी स्वत:ची फार मोठी फसवणूक केली आहे. होय, फसवणूकच! भावनांची लबाडी आणि शब्दांची हातचलाखी करून त्याने जे विश्‍व माझ्यासमोर उभे केले, ते मी खरे मानून बसलो होतो, जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही.
इन रेशमी राहों में, एक राह तो वो होगी
तुम तक जा पहुंचती है, इस मोड से जाती है...
...या ओळींमधली ‘राह’ अस्तित्वात नसतानाही मी दिशाहीन वाटचाल करत होतो.
एक राह रूक गयी तो और जुड गयी
मैं मुडा तो साथ साथ राह मुड गयी...
हा भौतिकतेला न पटणारा एक धादांत खोटा सिद्धांत त्यानं माझ्या बालमनावर बिंबवला. वास्तविक जीवनात मात्र कोणतीही वाट माझ्या मर्जीप्रमाणं वळल्याचा मला अनुभव आला नाही.
हमने देखी है उन आंखो की महकती खूशबू...
असं म्हणणार्‍या गुलजारला अभिप्रेत असलेली ‘खुशबू’ मला मात्र कोणत्याही डोळ्यात ‘दिसली’ नाही. अशा प्रकारे गुलजार नेहमीच जे काही बोलतो ते ‘खोटं’ बोलतो आणि जगासाठी मात्र त्याची ‘कविता’ होते. गुलजार खूप मोठा माणूस आहे. त्याची आणि माझी भेट कधी घडणे शक्य नाही. तरीसुद्धा चुकून-माकून कधी तो समोर आलाच, तर सर्वात आधी मी त्याच्याकडून नुकसान भरपाई वसूल करणार आहे...
...गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या संमतीशिवाय, माझ्या मनात आपल्या फसव्या कवितेसह वास्तव्य केल्याबद्दल!

(साहित्य चपराक, डिसेंबर २०१५)
संपूर्ण अंक आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळावर वाचू शकाल।
- समीर नेर्लेकर, पुणे
९४२२५०८४७१ 



निमित्त एका मांजरीचं...

 
एकदा एका मांजरीशी गाठ पडली माझी. हो, मांजरच! तसा तर अगदी क्षुल्लक जीव पण मला खूप काही देऊन गेला. मुख्य म्हणजे मला विचारप्रवण करून गेली ती! ती नुसती मांजर राहिली नव्हती माझ्यासाठी मादीच; भले ही मग ती माणसाची असो वा प्राण्याची! तिचं निरीक्षण करताना कितीतरी स्त्री विषयक प्रश्न मनात जन्मले. प्रसंग तिच्या बाबतीत घडले आणि मनात मालिका समस्त स्त्रीविषयक प्रश्नांची सुरू व्हायची. आठ पंधरा दिवसांचा सहवास तिचा; मनात विचारांचं काहूर ऊठवून गेला.
त्याचं झालं असं; एका आळसावलेल्या दुपारी सहज जिन्याकडे नजर गेली तर जिन्याखालच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीतून उडी मारून एक पांढरी मांजर बाहेर पडताना दिसली. सावधपणे पायर्‍या चढत ती छताकडे गेली आणि तिथून बहुतेक आपल्या गंतव्याकडे. काही दिवसांपासून छतावरचा दरवाजा उघडा होता. बहुतेक तिथून प्रवेश मिळवून तिनं आमच्या घरात घुसखोरी केली असावी.
ती पहिल्यांदा दिसली तेव्हा विशेष काही वाटले नाही दुसर्‍यांदा तिची चाहूल लागली तेव्हा मात्र उत्सुकता चाळवली गेली. ती घरात यायची नाही मग घराच्या या भागात खाण्यासारखं काही सापडण्याची शक्यता नसताना ती का येत असावी? एखादा क्षुल्लक प्रश्न ही माणसाचं स्थैर्य भंग करून त्याला प्रसंगी कार्यप्रवणही करतो. माझंही काहीसं तसंच झालं. मी उत्सुकतावश जिन्यात जाऊन जिन्याखालच्या टाकीत डोकावले आणि प्रसन्नतेची एक लकेर मनाला स्पर्शून गेली. इवलाली तीन पिल्लं अंगाचं मुटकूळं करून शांत झोपलेली. मी चटकन बाजूला झाले. लहानपणी कधीतरी ऐकल्याचं आठवलं; मांजरीच्या पिल्लांना धोका आहे असं वाटलं तर मांजर प्रसंगी हल्ला ही करते. बाळाच्या ओढीनं डोंगरकडा उतरून जाणारी हिरकणी, ऑफिस सुटल्यावर घराकडे धावत सुटणार्‍या आधुनिक हिरकणी आणि पिल्लांसाठी हिंस्र होणारी मांजर या सार्‍यांच्या काळजाची जात शेवटी एकच ना!
पुन्हा कधीकधी ती कंपाउंडवरून चाललेली दिसायची. भुरकट छटेचा पांढरा रंग, तशी थोडी रोडच, पाठीला किंचीत बाक देऊन पाठ वर उचलून ती संथ पावलं टाकायची तेव्हा तिचा बांधा छान कमनीय वाटायचा. तिच्या चालण्यात नवयौवनेचा नखरेलपणा जाणवायचा. बहुतेक पहिलटकरीण असावी .
मीही मुद्दाम ठरवून जिन्याकडे पुन्हा पुन्हा डोकावायचं टाळलं. दिवसातून एकदोनदा वाटीभर दूध जिन्यात ठेवायच पण अगदी अलीकडे. तिला माहेरासारखं निवांत या जिन्याखालच्या टाकीत रहाता यावं हा माझा हेतू.
तिला माहेरपणाची अनुभूती द्यायच्या नादात माझ्या मनात माहेरविषयक विचारांची मालिका आपोआप चालू व्हायची. माहेर म्हणजे हक्काचं विश्रांती स्थान, हक्काचा आसरा, भरल्या घरात ही डोळ्यांच्या कडा ओलावणारा हळवा कोपरा. आताशी या माहेराचं बदलेलं रूप ही बरेचदा पहायला मिळतं. स्त्रियांना माहेरच्या संपतीत अर्धी वाटणी मिळवून देणार्‍या कायद्याने किती स्त्रियांना वाटणी मिळवून दिली माहीत नाही पण या कायद्याअंतर्गत न्यायालयात दाखल होणार्‍या दाव्यांनी ती माहेरला मात्र कायमची मुकलेली बरेचदा पहायला मिळते. बरं ही कायदेशीर प्रक्रिया करताना तिची खरंच संमती असते का? हा वेगळा प्रश्न पण शेवटी कुचंबणा, मानसिक एकटेपणात भरडली जाते ती स्त्रीच. स्त्री शिक्षणानं स्त्रियांना आर्थिक स्वावलंबन दिलं हे खरं. सोबतच अनेक गुंतेही निर्माण झाले. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी स्त्रियांच्या बाबतीत माहेर बरेचदा तितकं हळवं होताना दिसत नाही. मग या स्वावलंबी स्त्रीची मानसिक गरज, तिची प्रेमाची भूक कोण पूर्ण करणार? कोण भागवणार? आर्थिक स्वावलंबनासोबत मानसिक अपूर्णता अनुभवत अनेक कमावत्या स्त्रिया आतल्या आत घुसमट दाबून टाकतात. आभार त्या मांजरीचे! तिच्या मुळे मी माहेरच्या बदलत्या रूपावर चिंतनाला सुरूवात तर केली. कदाचित या विषयावर पुन्हा कधीतरी स्वतंत्रपणे लिहिताही येईल.
माझी मुलं आता कॉलेजात जाऊ लागली आहेत. त्यांचं बालपण अनुभवून मला खूप दिवस झालेत. मग मला त्या मांजरीच्या पिल्लांनी वेड न लावलं तरच नवल! माझ्या कामाच्या रहाटगाडग्यातून वेळ काढून ती नसेल तेव्हा दिवसभरात दोनचारदा तरी तिच्या पिल्लांकडं माझं डोकावणं सुरू झालं. ती पिल्लं बहुधा शांत झोपलेली असायची. मला आता उत्सुकता होती त्यांच्या बागडण्याची. मी ऐकून होते की मांजर पिल्लांची जागा बदलत राहते; फार दिवस एका ठिकाणी ठेवत नाही. मी मनात म्हणायची ही इथून लवकर नाही गेली तर हिच्या बाळांचं बागडणंही अनुभवता येईल .
‘जन्म’ म्हणजे निसर्गाच्या सृजन शक्तीचा सर्वोच्च अविष्कार. म्हणून तर ’जन्म’ मग तो माणसाच्या पिल्लाचा असो किंवा पाळीव प्राण्यांच्या पिल्लांचा प्रचंड कुतूहल आणि आनंद निर्माण करतो. जन्मणार्‍याचं प्राक्तन त्याला कुठे घेऊन जाणार आहे; त्याला काय काय भोगावं लागणार आहे या प्रश्नांचा पुसटसा ही स्पर्श मनाला न होता आपण नवीन जिवाच्या जन्मानंतर आनंदी होत राहतो. माझंही काहीसं तेच झालं.
काळाच्या उदरात दडलेल्या घटनांपासून माणूस अनभिज्ञ असतो म्हणून तर माणसाच्या जगण्यात आनंद, आशा आणि थ्रील आहे. दुःख अचानकच येतात म्हणून तर त्या अगोदरचे दिवस निवांतपणे व्यतीत होत असतात. माझ्या पिल्लं निरीक्षणाच्या कार्यक्रमात मला काही दुखद ही बघावं लागेल याची मी कल्पनाच केलेली नव्हती. माझ्यासाठी तो निखळ आनंददायी विरंगुळा होता.
एका संध्याकाळी; उन्हे उतरायला लागल्यावर मी पिल्लांच्या ठिकाणाकडे गेले. तर पिल्लं गायब. मनात एक सौम्य विषाद डोकावून गेला; दुसरीकडे घेऊन गेली वाटतं! मनात म्हटलं जाऊ दे. असंच जरा छतावर जाऊन येऊ म्हणून चार पायर्‍या चढले तर एका कोपर्‍यात लांबट आकाराची घाणेरडी वस्तू पडलेली दिसली. जवळ जाऊन बघितलं तर मांजरीच्या पिल्लाचा पाय! काळजात सळ्ळ झालं! म्हणजे बोक्यानं तिची पिल्लं फस्त केली तर! खरंच शब्दात नाही मांडता येत काय काय भावना दाटून आल्या. करूणा, दुःख, त्या न बघितलेल्या बोक्याचा तिरस्कार व क्रोध! सारंच मी काही क्षणात  एकत्रच अनुभवलं. त्या मांजर कुटूंबाचा लळाच लागला होता. दुपारीच तर सारे ठीक होते. हे कधी घडले असेल? उदास वाटत होतं. म्हटलं छतावर थांबू थोडा वेळ. छतावर पण एकदोन ठिकाणी अवयवांची घाण पसरलेली दिसली पण मी दुर्लक्ष केलं.
थोड्या वेळानं तिची म्यांव म्यांव ऐकू आली. कमालीचा करूण स्वर होता तिचा. ती छतावर आली; वाटलं आता अंगावर तर नाही ना यायची? तिचाही विश्वास असावा बहुतेक माझ्यावर! ती चवताळून नाही आली माझ्या अंगावर. सैरभैरपणे छतावर, छतावरून पायर्‍यांवर, पायर्‍यांवरून पुन्हा छतावर फिरत राहिली. कमालीचा करूण स्वर होता तिचा. मधूनच काही क्षण थांबून बघायची माझ्याकडे. जणू तिचे डोळे विचारत होते मला; बघितलीस का माझी पिल्लं? काय झालं त्यांचं? कुठे गेली? काळजातली कालवाकालव आवरत नव्हती. ती आई होती. तिचा आक्रोश माझ्या मातृहृदयाला थेट भिडत होता. मी स्वतःला सावरलं, परत खाली आले.
नंतर ही चारसहा दिवस ती जिन्याखाली, कंपाउंडवर, अंगणात अस्वस्थपणे चकरा मारत राहिली. मधूनच करूण स्वरात म्याऊ करायची. जणू पिल्लांना हाक मारत असावी.
तिला पहाताना एक बोचरा, अस्वस्थ करणारा प्रश्न मनाला चटके देत रहायचा; नर आणि मादीचं हे कसलं नातं? सृजनाचा सोहळा साजरा करणारा नर मग तो मानव असो किंवा इतर प्राण्यातला, त्या क्षणांनंतर अलिप्त होतो आणि मादी मात्र त्याच क्षणांचं ओझं मातृत्वाच्या रूपात वागवत राहते... आयुष्यभर! अशा कितीतरी विधवा,परित्यक्ता, बलात्कारीता या ओझ्यासोबत मरणप्राय यातना भोगत जगत राहतात. निसर्गानं बांधिलकीची एकही खूण त्याच्याकडे का शिल्लक ठेवू नये? त्याच्याही सहभागाचा एखादा तरी पुरावा! तसा तो असता तर कदाचित समाजाचं चित्र काही वेगळं राहिलं असतं. एक अधिक सहिष्णू, जबाबदार समाजव्यवस्था कदाचित अस्तित्वात असती. ज्या समाजव्यवस्थेत स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न एवढा गंभीर राहिला नसता. निर्भयपणे वावरणार्‍या स्त्रीनं प्रगतीची अजून ही ऊंच शिखरं सर केली असती. कितीही प्रगतीच्या गप्पा मारल्या आपण तरी अजूनही एक भयमुक्त समाज स्त्रीला पुरवण्यात आपण समाज म्हणून कमी पडलो आहोत हे वास्तव आहे.
तरी बरं, एक समाधान तरी आहे; किमान समाज स्त्रीची अपत्याबाबतची बांधिलकी मान्य तरी करतो! म्हणूनच तर म्हणतात ना; बाप एखाद वेळेस मेला तर चालेल पण लेकरांच्या भल्यासाठी माय मात्र जिवंत राहिली पाहिजे!

(साहित्य चपराक डिसेंबर २०१५)
- विद्या बयास 

शिरूर ताजबंद, जि. लातूर 
७०३८६६५६८४

Tuesday, December 15, 2015

सुवर्णाक्षरे


आम्ही हप्त्यावर जगतो!
आम्ही हप्त्यावर जगतो! खरंच शीर्षक वाचून गोंधळात पडलात ना? म्हणाल काय बिनधास्त आहे. उघड उघड सांगते की आम्ही हप्त्यावर जगतो. अहो सत्य हे कटू असतं. खरं ते शेवटी खरंच असतं. मग नाकारायचं कशाला? म्हणून खरंच सांगते की आम्ही हप्त्यावर जगतो. ओ... पण आता लक्षात आलं की तुम्ही का दचकलात ते! अहो तुम्हाला अभिप्रेत असलेल्या हप्त्यांवर नाही मी बोलत. हप्त्यांशी संबंधित कुठल्याही खात्यात मी नोकरी करत नाही.
आम्ही साधी सरळ, मध्यमवर्गीय माणसं. हप्ता हा शब्द मी इन्स्टॉलमेन्ट या इंग्रजी शब्दाचा अनुवाद घेतला आहे.
आपण मध्यमवर्गीय माणसं धड गरीब म्हणवून घेऊ शकत नाही वा श्रीमंतीचं सोंग आणू शकत नाही. खर्च आणि जमा यांचा ताळमेळ साधताना नाकी-नऊ येतात. आपण मध्यमवर्गीय असलो तरी स्वप्ने मध्यमवर्गीयांचीच पडतील असे नाही. आपल्या स्वप्नभरार्‍या उत्तुंग असतात. आवश्यक वस्तुंचा तर कधी श्रीमंती थाटाच्या राहणीची हौस आपल्यालाही असतेच. मग ही स्वप्नं वास्तवात उतरवायची म्हणजे मग आपल्याला गरज पडते ती हप्त्यांची! या हप्त्यांच्या सोयीमुळेच आपली स्वप्नं वास्तवात येण्यात मदत होते.
‘घर’ प्रत्येकाचं भावविश्‍व! आपलं स्वत:च्या मालकीचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रत्येकाकडे स्वत:च्या मालकीचं घर असतंच असं नाही. गरीब असो वा श्रीमंत... दोघांचंही स्वप्न! पण घर बांधायचं, घर घ्यायचं म्हणजे वास्तवात महाकठीण कर्म! म्हणूनच तर म्हणतात ना ‘घर पहावं बांधून अन् लग्न पहावं करून’ लग्नाचं काय, लग्न हे नोंदणी पद्धतीने करून खर्चाला फाटा देऊन कमी खर्चात, सुधारकी थाटात करता येतं पण घराचं असं नाही. घर बांधण्यासाठी असे शॉर्टकट नाहीत. अशावेळी घराचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी आपण आधार घेतो तो कर्जाचाच. कर्ज काढून आपण आपल्या स्वप्नातल्या सारखा बंगला नाही पण किमान स्वत:चं घर म्हणून दोन छोट्या खोल्या बांधू शकतो! छोटेखानी फ्लॅट घेऊ शकतो आणि आयुष्यभर कर्जाचे हप्ते फेडत राहतो म्हणजे आपण जगतो की नाही हप्त्यांवर?
घर तर झालं पण घराला घरपण नको का? घराला घरपण येतं ते माणुसकीनं, मायेनं. वस्तुंनी नव्हे. हे अगदी सत्य आहे; पण घरासाठी काही वस्तू आणाव्यात असं वाटतच. मिक्सर, फ्रीज, ओव्हन ह्या गोष्टी स्वयपाक घराच्या प्राण म्हटलं तरी चालेल. मग घरात त्याबरोबरच सोफा, टीव्हीही हवाच. ह्या गोष्टी एकदम रोख घ्यायला कशा जमणार? मग जिथे सुलभ हप्त्यावर वस्तू मिळतात अशा ठिकाणी जाऊन सुलभ हप्त्यावर वस्तू खरेदी करायच्या मग काही आवश्यक तर काही चैनीच्या वस्तू आणून आपली हौस भागवायची. पहिल्या वस्तूचे हप्ते फिटले की लगेच दुसरी वस्तू हप्त्यावर आणायची. अशाप्रकारे घेतला वसा टाकू नये... हप्त्याचा नेम चूकवू नये. हे व्रत आपण नेमाने चालवतो व हप्त्याचं चक्र चालू ठेवतो. पूर्वी म्हणायचे की ‘रीण काढून सण करू नये’ पण आता रीण काढणे हे गरज होऊन बसले आहे; मग काय जगतो की नाही आपण हप्त्यावर.
हप्त्याचा महिमा असा आहे. हप्त्यावर हल्ली काय मिळत नाही? फ्रीज, टिव्ही, वॉशिंगमशीन, स्कूटर, कार ह्या वस्तू तर मिळतातच पण आरोग्य तपासणी, कपडे, मुलांची ट्युशन फी हे सुद्धा हल्ली हप्त्यावर फेडता येतं. हप्त्याच्या महिमांपासून सर्व परिचीत आहेत. त्यामुळे ग्राहक व विक्रेता दोन्ही खूष! तळागाळातल्या लोकांमध्ये सर्व क्षेत्रात ही हप्ते योजना चालू आहे. परवा तर गंमतच झाली. दिवाळी अंकाची वर्गणी भरण्यासाठी मी एका वाचनालयात गेले तर तेथील संयोजक सांगत होते की आपल्याकडे एकदम वर्गणी न भरता हप्त्यांवर वर्गणी देण्याची सोय आहे. आहे की नाही सगळं वातावरण हप्तेमय...
अशाप्रकारे घराचा हप्ता, फ्रीजचा हप्ता, टीव्हीचा हप्ता, गाडीचा हप्ता, संगणकाचा हप्ता देत देत आम्ही हप्त्यांवर जगतो. ‘उतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये’ तसा आम्ही हा हप्ता वसा चालू ठेवतो आणि पहिल्या घेतलेल्या वस्तूचा हप्ता संपत आला की दुसरी वस्तू लगेच हप्त्याने घेतो आणि हप्ता वसा चालू ठेवतो.
हल्ली सगळंच मिळतं हप्त्यावर. वस्तू घ्या हप्त्या-हप्त्याने पण जगताना मात्र जगू नका हप्त्या-हप्त्याने... जगताना जगण्याचा निर्भेळ भरभरून आनंद घ्या.

साप्ताहिक 'चपराक' पुणे 
-सुवर्णा जाधव, मुंबई

नेता नव्हे, शेतकर्‍यांचा सूर्य

एक काळ असा होता की विचार प्रबोधनाचे साधन फक्त मुद्रित माध्यम हेच होते, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे, हे कळायला काहीच मार्ग नव्हता. मुद्रित माध्यमांची किल्ली ज्यांच्या करंगळीत लटकली होती, ते मांडतील तोच विचार आणि ते म्हणतील तीच पूर्वदिशा असे सगळे चालले होते. ही संख्या मूठभर असली तरी त्यांची सर्व प्रसारमाध्यमांवर एकाधिकारशाही होतीच. सर्वसामान्य माणसाला व्यक्त होण्यासाठी माध्यमच नसल्याने त्याचा आवाज दबून गेला होता पण संगणकाच्या साथीला इंटरनेट व मोबाईल तंत्रज्ञान आले आणि पाहता पाहता मोबाईल घराघरात पोचला. माध्यमांच्या जगतात आता इंटरनेटने क्रांती घडवून पार उलथापालथ करून टाकली आहे. मोघमपणे असे म्हणता येईल की, संकेतस्थळ, फेसबुक आणि व्हाट्सऍपने सर्वसामान्य माणसाला व्यक्त होण्यासाठी वैश्विक पातळीवर एक व्यासपीठ नव्हे तर व्यासपीठांचे दालनच उपलब्ध करून दिले आहे.
प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आणि संधी मिळाली तर सर्वसामान्य माणूससुद्धा अबोलतेचे व्रत सोडून कसा व्यक्त होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण यावेळी आंतरजालीय जगतात बघायला मिळत आहे. कांद्याच्या भावात जराशी तेजी आली आणि परत एकदा महागाई वाढल्याचा कांगावा करून सरकारवर दबाव आणण्यासाठी काही विशिष्ट शक्तीकडून प्रयत्न सुरू झाले. तशी ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही कांद्याच्या भावाने रणकंदन माजवलेले आहेच. क्वचित प्रसंगी तर केंद्रसरकारची कांद्याच्या भावाने गच्छंती केली आहे. कांद्याचा भाव वाढला तर जनमानस एकतर्फी विरोधात जाते या भयाने पछाडलेल्या तत्कालीन सरकारांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून देशांतर्गत कांद्याचे भाव पाडण्यासाठी कायमच प्रयत्नांची शर्थ केलेली आहे.
पण या वेळेस एक वेगळा चमत्कार बघायला मिळत आहे. आता कांद्याच्या भावाचा प्रश्न व त्यावरील ओरड एकतर्फी राहिलेला नाही. कांदा म्हणजे राज्यातल्या बहुतांश भागातले पीक नाही. राज्याच्या एका भागातच कांदा पिकतो. उर्वरित महाराष्ट्रातील शेतकरी कांद्याचे उत्पादक नसून ग्राहक आहेत. कांद्याच्या वाढीव भावाचा फटका त्यांनाही बसणार आहे. तरीसुद्धा शेतकरी तितुका एक एक या जाणिवेने कांद्याच्या वाढीव भावाचे हिरीरीने व तेवढ्याच ताकदीने समर्थन करणारी शेतकरीपुत्रांची एक नवी पिढी समोर आलेली आहे. आंतरजालावर वावरणार्‍या या नवयुवकांचा शेतकरी संघटनेशी संबंध नाही. त्यांनी शरद जोशी वाचले नाही पण त्यांच्या लेखणीतून शरद जोशींचे विचार मात्र बेमालूमपणे व्यक्त होत आहेत. आंतरजालावर काही युवक तर असेही भेटतात की राजकीय, सामाजिक कारणामुळे अथवा जातीद्वेषी हृदयामुळे शरद जोशींबद्दल त्यांच्या मनात द्वेषाची अढी दबा धरून बसलेली आहे पण शेतीविषयक मांडणी करताना त्यांच्या मुखातून शरद जोशी यांचेच अर्थशास्त्र प्रकट होत असते. 1980 च्या दशकात शरद जोशींनी तत्कालीन सामूहिक जनमताला, शेतीच्या अर्थशास्त्राला कलाटणी देणार्‍या विचाराची जी बीजे ओसाड माळरानात फेकली होती ती बीजे रुजून आता त्याचा विशाल महाकाय वृक्ष तयार झाला आहे. दुसर्‍या शब्दात असेही म्हणता येईल की 1980 नंतर शेतीच्या अर्थशास्त्राची उत्क्रांती केवळ शरद जोशींचेच बोट धरूनच पुढे गेली आहे. 

सक्तीची लेव्ही :
भारतीय शेतीच्या क्षितिजावर शरद जोशी नावाच्या सूर्याचा उदय होण्यापूर्वी सरकारांकरवी अधिकृतपणे व राजरोसपणे शेतीची क्रूरपणे लूट होत होती आणि भारतीय शेतकरी असहायपणे अंधारात चाचपडत होता. सुलतानी संकटांना टाळताही येत नव्हते आणि शासकीय धोरणाविरुद्ध लढा पुकारून मुक्ती मिळवण्याचे अंगात बळही नव्हते.  शरद जोशी 1977 मध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतात आले पण त्याच्या दोनच वर्षे आधी म्हणजे 1975 मध्ये सरकारने ज्वारीवर ’सक्तीची लेव्ही’ लादली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे अन्नधान्याचा तुटवडा भासू नये व दुष्काळी परिस्थितीतही शहरातल्या मंडळींना स्वस्तात अन्नधान्य खायला मिळाले पाहिजे म्हणून ज्वारीचा खुल्या बाजारपेठेतील प्रति किलोचे भाव 1 रु 50 पैसे असताना देखील शेतकर्‍यांकडून सक्तीने व तेही फक्त 83 पैसे प्रति किलो भावाने ज्वारी लुटून नेली होती. दुष्काळ व नापिकीमुळे ज्या शेतकर्‍यांच्या शेतात ज्वारी पिकली नव्हती त्यांना घरचा इतर शेतमाल किंवा तोही नसल्यास बायकोच्या अंगावरील दागिने विकून 1 रु 50 पैसे भावाने ज्वारी बाजारातून खरेदी करून 83 पैसे प्रति किलो भावाने सरकारला देण्यास भाग पाडण्यात आले होते. आजच्या प्रत्येक मनुष्याला नवल वाटेल पण त्या वेळेस शेतकर्‍यांनी या जुलमी ’जिझिया करा’सारख्या क्रूर प्रकाराच्या विरोधात आवाज उठवला नव्हता, प्रतिकारही केला नव्हता; एवढेच काय, साधा निषेधही नोंदविला नव्हता. याउलट, गावातल्या आपल्या जातीच्या प्रिय नेत्याचे सरकार दरबारी वजन वाढावे म्हणून अनेक गावांतून शेतकर्‍यांनी लेव्हीची ज्वारी वाजत गाजत मिरवणूक काढून शासन दरबारी पोचवून दिली होती पण शरद जोशींच्या उदयानंतर पुन्हा अशी क्रूर लेव्ही आजतागायत सरकारला लावता आलेली नाही.

सक्तीची कर्जवसुली :
बँकांची सक्तीची कर्जवसुली हा प्रकार तर 1990 पर्यंत सुरू होता. सक्तीची वसुली म्हणजे एखाद्या शेतकर्‍यावर एखाद्या बँकेचे जर 50 हजार रुपये कर्ज असेल तर वसुली अधिकारी त्या शेतकर्‍याच्या घरात घुसून त्याच्या घरातली स्वयंपाकाची भांडी जप्त करायचे, झोपायचा पलंग जप्त करायचे, घरात असलेले पाचपन्नास किलो अन्नधान्य जप्त करायचे. या वस्तूंची एकूण किंमत दोन-चारशेच असायची. पण या वस्तू जप्त करून, त्याचे चावडीवर प्रदर्शन मांडून त्या शेतकर्‍याची पुरेपूर नाचक्की करणे, हा त्यामागचा हेतू असायचा. हे वाचताना एखाद्याला अतिशयोक्ती वाटेलही; पण सक्तीची वसुली करताना वसुली अधिकारी शेतकर्‍यांना ‘तुझी बायको गहाण ठेव’, ‘तुझी मुलगी रातच्याला पाठव पण आमची वसुली दे’, या भाषेत बोलायचे. शरद जोशींनी इतिहासात पहिल्यांदाच 1980 च्या दशकात कर्जवसुली अधिकार्‍यांविरुद्ध गावबंदी जाहीर केली आणि शेतकरीपुत्रांनी गावागावात या जुलमी वसुलीचा, प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या खाऊन व तुरुंगाची हवा खाऊन या प्रकाराचा प्रतिकार केला. त्यामुळे आता सक्तीची वसुली या प्रकाराचा देवीच्या रोगासारखाच समूळ नायनाट झालेला आहे.

रास्त भाव :
1980 च्या दशकात शेती आणि शेतीअर्थशास्त्राच्या अनेक परंपरागत संकल्पनांना फाटा देणारा विचार शरद जोशींनी मांडला. नुसताच मांडला नाही तर पिशवीत हात घालून पिशवी उलटी करून टांगावी, तसा टांगला. त्या काळी त्यांचे विचार ’बंडखोर विचार’ वाटत असले तरी आज त्या विचारास सर्वमान्यता मिळालेली आहे. त्यापूर्वी शेती तोट्याची आहे हेच कुणी मान्य करायला तयार नव्हते. शेतकरी गरीब आहे कारण तो अज्ञानी, आळशी, उधळ्या, परंपरागत शेती करणारा आहे. शेतकर्‍यांनी जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेती हे अत्यंत फायद्याचे कलम आहे, असा सार्वत्रिक समज होता. अशा विपरित सामूहिक मानसिकतेच्या विरोधात शरद जोशींनी पहिल्यांदाच ठामपणे विचार मांडला की, शेती हे फायद्याचं कलम नसून तोट्याचं कलम आहे आणि त्याचे एकमेव कारण शेतीत पिकणार्‍या मालास उत्पादनखर्चसुद्धा  भरून निघणार नाही एवढे अत्यल्प भाव देण्याचे शासनाचे अधिकृत धोरण, हेच आहे. शेतीच्या तोट्याचे कारण आस्मानी संकट नसून सुलतानी संकट हेच आहे. शरद जोशी नुसतेच बोलले नाही तर पुराव्यादाखल डोंगराएवढे अधिकृत शासकीय दस्तावेज सादर केले. आपला विचारास बळकटी देण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. शरद जोशींनी मांडलेले विचार अजूनपर्यंत तरी कुणालाही खोडून काढणे शक्य झाले नाही.
शरद जोशींनी मांडलेला विचार हा अनेक चिंध्यांना एकत्र करून बांधलेलं गाठोडं नसून हा विचार म्हणजे एका धाग्याने विणलेले एकजीनसी महावस्त्र आहे. शेतकरी या देशातला बहुसंख्य घटक असल्याने शेतकर्‍यांच्या संघटनेने इतर संघटनांसारखा स्वत:च्या फायद्यापुरता विचार करून चालणार नाही, असा विचार शेतकर्‍यांसमोर बेधडकपणे मांडण्याचा कणखरपणा त्यांचेकडे असल्याने त्यांनी मांडलेला विचार बहुआयामी आहे. हा विचार म्हणजे निव्वळ शेतकर्‍यांना फायदा करून देणारा विचार नाही तर देश वाचविणारा आणि गरिबी हटविणारा विचार आहे. कुणाची व कशाचीही पर्वा न करताच बेधडक व्यक्त होण्याची त्यांची शैली असल्यानेच ते शासनाला, नियोजनकर्त्यांना व पगारी अर्थतज्ज्ञांना खंबीरपणे व रोखठोकपणे म्हणू शकतात की, गरिबी हटविण्यासाठी शासनाने इतर काहीही करण्याची गरज नाही. गरिबी टिकावी आणि वाढावी म्हणून तुम्ही जे जाणूनबुजून प्रयत्न करता आहात, तेवढे थांबवा म्हणजे गरिबी आपोआप हटेल.

कर्जमुक्ती :
शेतकरी कर्जबाजारी झाला तर तो त्याच्या दुर्दैवामुळे नव्हे तर शेतीत जेव्हा-जेव्हा चार दाणे जास्तीचे पिकले, भरघोस उत्पादन आले तेव्हा-तेव्हा सरकारने त्याचा शेतमाल कमीत कमी दाम देऊन स्वस्तामध्ये लुटून नेला. शेतकर्‍यांच्या घरात संचय होणार नाही, अशी धोरणे कूटनीती करून आखली म्हणून शेतीवर कर्जाचा डोंगर उभा राहिला. पिकलं तवा लुटलं म्हणून शेतकर्‍यांना सरकारचे काहीही देणे लागत नाही. सरकारने शेतकर्‍यांना उणे सबसिडी दिल्यामुळे शेतकर्‍यांवर असणारी सर्व कर्जे बेकायदेशीर आणि अनैतिक आहेत. त्यामुळे या कर्जाच्या जोखडातून शेतकर्‍यांना मुक्ती मिळणे, हा शेतकर्‍यांचा निसर्गदत्त अधिकार आहे. शेतकर्‍यांनी कर्जाचे सर्व दस्तावेज हिंदी महासागरात नेऊन बुडवावे आणि स्वत:च स्वत:ला कर्जमुक्त घोषित करावे, अशी साद जेव्हा शरद जोशींनी घातली तेव्हा देशातले सारेच्या सारे पक्ष शरद जोशींवर टीकेची झोड उठवून गेले. कुणी म्हणाले, ‘अशाने देशाची अर्थव्यवस्था कोसळेल.’ कुणी म्हणाले, ‘शरद जोशी शेतकर्‍यांना नादारीच्या मार्गाने नेत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची बाजारातली पत संपुष्टात येईल’, कुणी म्हणाले, ‘जोशींनी देशातील बँका बुडविण्याची सुपारी घेतली आहे.‘ या सर्वावर कहर करीत कॉंग्रेसवाले तर चक्क व्यक्तिगत पातळीवर घसरले. म्हणाले, ‘या बामणाला शेतीतलं काय कळतं? याच्या नादी लागू नका.’ तरीही शरद जोशी आणि शेतकरी संघटना कर्जमुक्तीवर ठाम राहिली; एवढेच नव्हे तर कर्जमुक्तीचा लढा आणखी तीव्र केला आणि अंशत: का होईना पण अनेकदा कर्जमुक्ती पदरात पाडून घेतली. कर्जमुक्तीचा विचार आज जनमानसात इतका खोलवर रुजला आहे की आता राजकीय पक्षांच्या अग्रणी नेत्यांनाच शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीची मागणी करून शरद जोशींची भाषा बोलणे भाग पडायला लागले आहे.

मार्क्सवादाला कलाटणी :
कामगारांच्या शोषणातून कारखानदारीचे भांडवलवादी साम्राज्य उभे राहते, अशी मांडणी कार्ल मार्क्सने केली. केवळ एवढ्याच एका सिद्धांतावर कामगार चळवळीचा उदय झाला. याला थेट कलाटणी देत औद्योगिक विकास कामगारांच्या नव्हे तर कच्च्या मालाच्या शोषणातून केला जातो, अशी मांडणी शरद जोशी यांनी केली. 1980 च्या दशकाआधी साम्यवाद्यांच्या लेखी शेतकरी जमीनदार आणि भांडवलदार होता. त्याचीच री ओढत समाजवाद्यांनी शेतीवर सीलिंग कायदा लादला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, शेतकर्‍यांना मालकीहक्क देणार्‍या मूळ संविधानात घटनादुरुस्ती करून परिशिष्ट 9 जोडले गेले आणि मालमत्ता बाळगण्याचा शेतकर्‍यांचा मूलभूत हक्कच नाकारला गेला. आज साम्यवाद परास्त झाला आहे, मात्र समाजवादाचे भूत अजूनही शेतकर्‍यांच्या मानगुटीवर बसलेले आहे. गेल्या काही वर्षातील शरद जोशींच्या अस्वास्थ्यामुळे समाजवाद्यांचे फावले आणि त्यांच्या येरागबाळ्या तत्त्वज्ञानाला जीवदान मिळाले. एरवी आतापर्यंत समाजवादाचाही पाडाव नक्कीच झाला असता.

मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार :
डंकेल प्रस्तावाला व जागतिक व्यापार मसुद्याला जाहीर समर्थन करून शरद जोशींनी मुक्त अर्थव्यवस्थेचा जाहीरपणे पुरस्कार केला. त्यावेळी शरद जोशी विरुद्ध संपूर्ण देश असे चित्र निर्माण झाले होते. डंकेल प्रस्तावाचे दबक्या आवाजात समर्थन करणारी काही मोजकी मंडळी होती पण जाहीरपणे बोलण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. अशा परिस्थितीत मुक्त अर्थव्यवस्थेच्या बाजूने एकट्या शरद जोशींनी एकाकीपणे लढा दिला. कालांतराने भारत सरकारलाही थढज च्या करारावर सह्या करणे भाग पडले आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार करावाच लागला. मात्र दुर्दैवाने याच काळात शेतकरी संघटनेची रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शक्ती क्षीण होत गेली आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा लाभ शेतकर्‍यांच्या दारापर्यंत जाऊ नये म्हणून लायसन्स-परमिट-कोटासमर्थकांनी आखलेली कूटनीती सफल झाली. परिणामत: मुक्त बाजारपेठेपासून शेतीक्षेत्र वंचित राहिले.
1980 च्या सुमारास संघटना व आंदोलने यांचे पेवच फुटले होते. उदा. कामगारांच्या संघटना, हमालांच्या संघटना, शिक्षकांच्या संघटना व त्यांचा 54 दिवस चाललेला संप, गिरणी कामगारांचा 6 महिने चाललेला प्रदिर्घ संप, खलिस्तानचे आंदोलन, आसामचे आंदोलन, काश्मीरचे आंदोलन, बोडोलँडचे आंदोलन वगैरे वगैरे. 1980 मध्ये तामिळनाडूमध्ये नारायणस्वामी नायडूंनी आणि 1990 च्या सुमारास उत्तर प्रदेशात महेंद्रसिंह टिकैत यांनी शेतकरी आंदोलन उभे केले होते. टिकैताचे आंदोलन काही काळ गाजले पण अल्पायुषीच ठरले. अशा प्रकारे  काळाच्या ओघात सार्‍याच संघटना व त्यांची आंदोलने केव्हाच संपून गेली; पण त्याच सुमारास सुरू झालेली व महाराष्ट्राकडे नेतृत्व असलेली शेतकरी चळवळ ही एकमेव चळवळ आहे जी अजूनही भक्कम पायावर उभी आहे. याचे मुख्य कारण शरद जोशींच्या रूपाने शेतकरी आंदोलनाला मिळालेली भक्कम वैचारिक बैठक आणि द्रष्टेपण असलेले नेतृत्व होय. स्वातंत्र्यचळवळीनंतरची सर्वात मोठी चळवळ म्हणजे शरद जोशींच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलन हेच आहे.
शरद जोशींनी शेतकर्‍यांच्या मनात स्वाभिमानाने जगण्याचे बीजारोपण केले. ताठ मानेने व मूठ आवळून जगायचा मूलमंत्र दिला. देशातील इतर नागरिकांसारखे सन्मानाने जगता यावे म्हणून रस्त्यावर उतरून लढण्याची प्रेरणा दिली. शेतकर्‍यांच्या मनातील राजसत्तेची व तुरुंगाची भीती घालवली. त्याचबरोबर प्रचलित अर्थवादाला कलाटणी देऊन शेतीच्या अर्थवादाच्या उत्क्रांतीची दिशा बदलण्यात शरद जोशी शतप्रतिशत यशस्वी झालेले आहेत. महामानव, महात्मा किंवा युगपुरुष ही विशेषणेही थिटी पडावीत, एवढे त्यांचे कार्य महान आणि विचार उत्तुंग आहेत. शरद जोशी यांनी शेतकर्‍यांचा सूर्य बनून पिढ्यानपिढ्या दारिद्र्याच्या अंधार्‍या खाईत चाचपडणार्‍या शेतकर्‍यांचा मुक्तीचा मार्ग प्रकाशमय करून ठेवला आहे. या प्रकाशवाटेचा फायदा घेऊन मुक्ती मिळवायची की दारिद्र्याच्या अंधार्‍या खाईतच चाचपडत राहायचे, याचा निर्णय आता शेतकर्‍यांनी घ्यायचा आहे.
(साप्ताहिक 'चपराक' पुणे)
 - गंगाधर मुटे  9730582004



निवले तुफान आता
ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही
निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही
देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही
संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही
तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे
पैकीच माळरानी रुजले तुफान काही
कमतोल पाइकांचे सेनापती जरी ते
चेतून आत्मशक्ती तपले तुफान काही
तापून षड-रिपुंनी पेटून पाहिले पण;
भट्टीतही जरा ना जळले तुफान काही
घेरून मध्यभागी केलाय कोंडमारा
नाहीच डोंगरांना नमले तुफान काही
उत्थानना बळीच्या लढले जरी ’अभय’ ते
नियतीसमोर अंती हरले तुफान आता
काळासमोर हतबल झाले तुफान अंती
हळुवारशा हवेने विझले तुफान आता
बेफाम झुंजणारे, निवले तुफान आता
निवले तुफान आता, निवले तुफान आता

- गंगाधर मुटे

Friday, December 11, 2015

बंदा रूपया

पूर्वी रूपयाचा बंदा आकाराने थोडा थोराड, वजनदार असायचा. त्याला त्याच्या अगदी अरूंद कडेवर प्रयत्नपूर्वक उभं करायचं आणि पडू द्यायचं नाही असा एक खेळ आम्ही लहानपणी खेळत असू. दुसर्‍याचा बंदा पडला की खूप आनंद व्हायचा, मजा वाटायची, हसू यायचं; स्वतःचा पडला की मात्र मन हिरमुसलं, खट्टू व्हायचं. पुढे वय वाढलं तरी हा खेळ काही सुटला नाही; सुटत नाही. मोठेपणी हा खेळ सगळेचजण खेळत असतात. फक्त या बंद्याचं रूप तेवढं बदललेलं असतं. लहानपणीच्या धातुच्या, गोल बंद्याची जागा मोठेपणी त्याच्या स्वप्नांनी, मुल्यांनी आणि नातेसंबंधांनी घेतलेली असते. स्वप्नांचा, मुल्यांचा आणि नातेसंबंधांचा हा बंदा रूपया त्याच्या काही मी. मी. च्या अरूंद कडेवर उभा करून प्रत्येकाच्या तळहातावर अदृश्य रूपात ठेवलेला असतो. त्याला पडू न देता तोल सांभाळत चालणं म्हणजेच आयुष्य! जरा पावलं डळमळली की हा बंदा धप्पकन पडलाच म्हणून समजा. उभा असतो तोवर हलका असतो तो पण पडला की कोण जड होतो; पावलं डळमळीतच होतात चालणार्‍याची! वेळीच त्याला सावरून परत सरळ उभं केलं तर बरं नाही तर मग पुढे कायम भेलकांडतच राहतं जीवनाचं गाडं.
  अगदी अजाणत्या वयापासूनच माणसाला स्वप्न पडायला सुरू होतात आणि आयुष्यभर ती पडतच रहातात. फक्त मोठेपणी स्वप्ने पाहण्यासाठी प्रत्येकच वेळेस झोप लागायची गरज मात्र नसते. ही स्वप्नच तर आपला चालण्याचा वेग आणि दिशा नियंत्रीत करत असतात. स्वप्ने मनात आहेत म्हणून तर जीवनाला अर्थ आहे; मनात जगण्याची ऊर्मी आहे. स्वप्ने संपली की आयुष्यातला रामही संपला. जोवर ही स्वप्ने बंद्या रूपयासारखी त्याच्या अरूंद काठावर तोल सांभाळत उभी आहेत तोवर  जीवन आहे, जीवनाला अर्थ आहे. हा रूपया पडला की जीवन डळमळीत. ही स्वप्नं काहीही असू शकतात; भौतिक सुखसुविधा स्वतःसाठी, कुटुंबासाठी मिळवण्याचं स्वप्न, प्रतिष्ठा, मानमरातब मिळवायचं स्वप्न, ऊत्तुंग, भव्यदिव्य काही घडवायचं स्वप्न इत्यादी.
व्यक्तिमत्वाची ऊंची त्या व्यक्तिच्या स्वप्नांच्या ऊंचीवरून तर ठरत असते. जगण्याची, चांगलं जगण्याची ऊर्मी ही स्वप्नेच तर देत असतात. कधीतरी चालताना हा स्वप्नांचा बंदा रूपया धप्पकन खाली पडतो आणि मग सगळच डळमळीत होतं.
स्वप्नं योग्य चाकोरीतली पडताहेत, योग्य दिशेने पडताहेत तोवर जीवनही योग्य दिशेनं चालत राहतं. चुकीची स्वप्नं मनात जन्मली, त्यांचा तोल ढासळला की मग त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आटापिटा चालू होतो, पावलांचा प्रवास चुकीच्या दिशेने सुरू होतो आणि मग कडेलोट निश्चीत!
कधी हा स्वप्नांचा बंदा रूपया धप्पकन कोसळला  की जगण्याचा दर्जा खालावतो; माणुस समाजासाठी आणि स्वतःसाठीही हानीकारक पद्धतीने जगायला लागतो. तर कधी जगण्यातली ऊर्मीच घालवून बसतो.
माणसाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर स्वप्नाइतकीच महत्त्वपूर्ण भूमिका त्याने जाणता अजाणता मनात जोपासलेल्या मुल्यांची पण असते. अगदी अजाणत्या वयापासून आपल्या आत कुटूंब, आपण वावरत असलेला परिवेश, वाचन अशा अनेक माध्यमातून वेगवेगळ्या मुल्यांची बीजे पेरली जात असतात. पुढे या मुल्यांची बाग आपल्या व्यक्तिमत्वात, जीवनात माणुस जोपासत रहातो. जीवनाचा सुक्ष्मपणे विचार केल्यास माणसाचं जीवन म्हणजे त्याने नकळतपणे मनात जपलेल्या सकारात्मक किंवा नकारात्मक मुल्यांची त्याने जीवनात केलेली अंमलबजावणीच तर असते. बंद्या रुपयासारखी खणखणीत, अरूंद काठावर रूबाबदारपणे, ठाम रोवून उभी असलेली मूल्ये असली की माणूस सकारात्मक, प्रशंसनीय जीवन जगतो. परंतु मनात नकारात्मक मुल्यांची साठवणूक झालेली असेल तर त्याचा प्रभाव जीवन जगण्याच्या पद्धतीवर, वर्तनावर निश्चीतच पडतो. बीजच शुद्ध नसेल तर मिळणार्‍या फळांचा दर्जा कसा चांगला राहील? हा मूल्यांचा बंदा कोसळला की जीवन भेलकांडतच राहतं.
माणसाची स्वप्ने, त्याने जोपासलेली मूल्ये याबरोबरच त्याचे नातेसंबंधही जीवनावर परिणाम करतात. चांगले जोपासलेले सकारात्मक नातेसंबंध ऊर्जा प्रदान करतात तर तोल ढासळलेले नातेसंबंध त्याला नामोहरमही करतात. माणसाच्या भावविश्वाशी त्याच्या नातेसंबंधांचा अगदी थेट संबंध असतो. आनंद आणि दुःख दोन्ही प्रसंगात आपली माणसे सोबत  हवीत; ती नसतील तर जीवन निरस, कंटाळवाणे होऊन जाते. माणसाच्या मानसिक गरजांची पूर्तता करण्यासाठी चांगले नातेसंबंध ही मुलभूत गरज असते.
 आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तर हा नातेसंबंधांचा बंदा रुपया तळहातावर उभा ठेवून, पडू न देता जपणे हे महाकठीण! माणूस एकतर हातातोंडाची मिळवणी करण्यात त्रस्त किंवा ‘आणखी हवे’ची हाव त्याला स्वस्थ बसू देईना. कधी नव्हे इतका माणूस आज नातेसंबंधांच्या बाबतीत बेफिकीर झालाय. त्यातून नातेसंबंधांचा मामला जरा जास्तच नाजूक. जरा कुठे तिळमात्र इकडे तिकडे झाले की हा बंदा धप्पकन कोसळलाच म्हणून समजा. लगेच सावरून उभा केला तर ठीक नाहीतर पुन्हा तो उभा टाकणे दुरापास्तच. कितीही यशोशिखरे सर केली तरी अशा दुरावल्या नातेसंबंधांच्या स्मृति मात्र काटा बनून सलतच राहतात.
तर असा हा स्वप्नांचा, मुल्यांचा आणि नातेसंबंधांचा बंदा रुपया तळहातावर वागवतच संपूर्ण जीवन वाटचाल करायची असते. कधी हा बंदा पडला की थांबायचं जरासं; करायचं त्याला सरळ उभं आणि मग पुढचा प्रवास सुरू!!
पुढच्या काही ओळी लक्षात ठेवल्या ना की हा बंदा रूपया सतत तळहातावर उभा ठेवणे सोपे जाते-
प्रत्येकाला काट्यांसोबत
काही फुले देतोच ईश्वर
उधळून द्यावा गंध थोडासा
येता जाता जीवन वाटेवर

मृत्यू तर अटळच असतो
काहीच नसते मृत्युला उत्तर
नेता नेता मृत्यूनेही
हताशपणे थांबावे क्षणभर!

(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
- विद्या बयास/ठाकुर
शिरूर ताजबंद, ता. अहमदपुर, जि.लातुर
भ्र. 9637146156

पळवाट

सुवर्णाक्षरे 

पळवाट
उपसरपंच साहेबांची शेतीच्या कामामुळे चांगलीच ओळख झाली आणि ओळखीचं पर्यावसान मैत्रीत कधी झालं ते कळलंच नाही. एक दिवस ते म्हणाले, ‘’आता तुम्हाला माझ्या घरी यायलाच हवं. बघा तरी आम्ही किती डेव्हलपमेंट केली आहे ते!’’ त्यांच्या आग्रहाखातर आम्ही त्यांच्या घरी गेलो.
सारं प्रसन्न करणारं. घराकडे जो रस्ता जातो त्याच्या दुतर्फा छान नारळाची झाडं लावली होती. आंबा, चिक्कू, पपई सगळी फळझाडं होती पण विशेष म्हणजे डाळींबाची बाग केली होती. त्याला अर्धा-अर्धा किलोचं एक अशी पंधरा-वीस डाळींब लगडलेली. शेतात सार्‍या आधुनिक सोयी केलेल्या. सर्वत्र ठिबक सिंचनाने सर्व झाडांना पाणी देण्याची व्यवस्था केलेली.
कलींगड, ढोबळी मिरची यांना मल्चींग पेपर लावून घेतलेला. सगळ्या पिकांना वेळच्यावेळी खत, पाणी... पाणी कमी पडू नये यासाठी मोठी विहिर होतीच. शिवाय दोन बोर सुद्धा घेतलेल्या. त्यामुळे एकदम छान, आधुनिक शेती. सारं सारं हिरवंगार. मन खरंच खूप प्रसन्न झालं आणि इतकी शेती सांभाळायची म्हणजे गडी हवेच! पण त्यांच्या घरातली माणसेच सर्व शेतात आवडीने काम करत असल्याने गडी एकच! सिझन आला... खूप काम वाढले की प्रसंगानुसार कामावर गडी बोलवायचे. खरंच पाहून खूप समाधान झालं.
आणि केवळ शेती दाखवली असे नाही तर जेवणही अगदी झक्कास केलं. त्यांनी सांगितलं, ‘‘शेतातल्यासारखं जेवण करा.’’ रानातली ताजी भेंडी तोडून आली. भरली वांगी, मिरचीचा ठेचा, भाकरी, कांदा, सोबत रानमेवाही दिला. मनाबरोबर पोटही तृप्त झालं. सारं झाल्यावर ‘वानावळा’ म्हणून घरच्या भाज्या भेंडी, गवार, मिरची, वांगी, लिंबू, मेथीही सोबत भरभरून दिले...
निघताना उपसरपंचाच्या बायकोला, उमा वहिनींना मी सवयीनं विचारलं, ‘‘वॉशरूम कुठं आहे?’’ त्यांनी प्रश्‍नार्थक चेहरा केला. मी समजले आणि विचारले की, ‘‘शौचालय कुठं आहे?’’ त्या एक मिनिट माझ्याकडं पाहतच राहिल्या. मग म्हणाल्या, ‘‘त्या तिकडं, लांब आहे.’’ मी म्हटलं, ‘‘चालेल, जाऊया.’’ त्या तिकडे न्यायला अजिबात उत्सुक नव्हत्या पण मी पुन्हा म्हटले की, ‘’जाऊ या, चला...’’ तेव्हा त्या नाईलाजास्तव मला तिकडे घेऊन गेल्या. बाहेरून तर शौचालय चांगले बांधलेले दिसत होते पण त्याला कुलूप होते. शेत ह्यांचं, माणसंही इथं घरातलीच राहणारी, गडी केवळ एक, मग कुलूप का लावलं मला कळेना... तोवर उमा वहिनींनी शौचालयाचं दार उघडून दिलं... तर प्रथमदर्शनी नजरेत भरल्या त्या आधुनिक टाइल्स लावलेल्या. तोपर्यंत उमा वहिनी म्हणाल्या, ‘’थांबा जरा...’’ आणि त्यांनी बोरजवळून एक बादली भरून आणली. मी उत्सुकतेनं विचारलं, ‘‘आत पाण्याची सोय नाही? टाकीही दिसत नाही. मग तुम्ही?’’
त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही कोणीच वापरत नाही.’’ मग  मी म्हणाले, ‘‘अहो, मग बांधला कशाला?’’ त्यांचे उत्तर ऐकून मला काय बोलावे तेच कळेना. त्या म्हणाल्या, ‘‘अहो, आम्ही सारे वावरात जातो पण सरकारचा फतवा निघाला ना शौचालय नसले तर फॉर्म भरता येणार नाही, म्हणून बांधून ठेवला. तेवढ्यासाठी तिकिट नको जायला.’’ म्हणजे एकप्रकारची पळवाटच वाटली मला.
यासंदर्भात टीव्हीवर विद्या बालन एक जाहिरात करते. ती खूपच बोलकी आहे. सून पाणी प्यायला घुंघट बाजूला करते तर लगेच सासरा सूचवतो, ‘आपल्याकडे असं चालत नाही.’ त्यावर विद्या बालन छान, मार्मिक प्रश्‍न विचारते, ‘‘घुंघटही काढलेलं चालत नाही मग सून अशी उघड्यावर शौचाला जाते तेव्हा तुम्हाला काहीच वाटत नाही...?’’ अशा आशयाची बोलकी, झणझणीत अंजन घालणारी जाहिरात...
इथं तर केवळ नियम आहे म्हणून, केवळ दाखवण्यासाठी शौचालय बांधले. याला काय म्हणावे? सारी आधुनिकता मग मला फिकी वाटू लागली.
नियम काढतात... पण पळवाटाही शोधतात. मूळ उद्देश साध्य होत नाही, हेच यावरून दिसते. यासाठी मानसिकता बदलायला हवी...

(साप्ताहिक 'चपराक', पुणे)
- सुवर्णा जाधव, मुंबई

लोकनेता


मुलुखमैदानी तोफ असलेल्या ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांची 12 डिसेंबर ही जयंती. या महानेत्याच्या आठवणी जागवल्या आहेत साखर क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ‘इंडियाना सुक्रोटेक पुणे प्रा. लि.’चे संचालक प्रमोदकुमार बेलसरे यांनी. साप्ताहिक ‘चपराक’मधील हा लेख अवश्य वाचा.


आम्हा साखर उद्योगात सक्रिय असलेल्यांना सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी सातत्याने संपर्क होत असतो. महाराष्ट्रात तर ‘सहकार’ गावागावात, खेडोपाडी रूजलेला. सहकाराच्या माध्यमातूनच साखर कारखाने, सुत गिरण्या, दूध संघ, सहकारी संस्था असे भव्यदिव्य प्रकल्प उभे राहिलेले. याच सहकाराच्या माध्यमातून एक साखर तज्ज्ञ म्हणून, साखर कारखान्यांचे मशिनरी उत्पादक म्हणून अनेक दिग्गजांशी गेली अनेक वर्षे मी सतत संपर्कात असतो. महाराष्ट्रातील साखर कारखानदारी आपल्या राजकीय नेत्यांच्या अधिकारात असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंगे्रस, भारतीय जनता पक्षातील अनेक नेते, मंत्री, ज्येष्ठ समाजसेवक यांच्याशी माझा परिचय आहे आणि म्हणूनच त्यांना जवळून पाहण्याची संधी देखील मला अनेकवेळा मिळाली आहे. त्याचमुळे या राजकीय नेत्यांच्या ठिकाणी असेलेले मोठेपण, कसब, त्यांची विलक्षण बुद्धिमत्ता आणि लोकसंचयाचं रहस्य माझ्या लक्षात आलंय.
असाच कामाच्या निमित्ताने सन 2007 मध्ये माझा दिवंगत  ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथजी मुंडे यांच्याशी संपर्क आला होता. निमित्त होते परळी वैजनाथ येथील त्यांच्या साखर कारखान्याला यंत्रसामग्री पुरवण्याबाबत. त्यावर्षी या कारखान्याला हव्या असणार्‍या यंत्रसामग्रीबाबत रीतसरपणे वृत्तपत्रात टेंडर प्रकाशित झाले. त्यात आम्ही करत असलेल्या यंत्रसामग्रीचा उल्लेख असल्याने आम्ही ते टेंडर घेऊन भरून पाठवले. टेंडर मुंबईला साखर संघात पास होऊन ज्या कोणा उत्पादकाची किंमत सर्वात कमी असेल त्या निकषावर ते काम देण्यात येणार होते. एकदम पारदर्शक व्यवहार होता. प्रत्येक उत्पादकाने आपापल्या उत्पादनाची आपल्याला परवडेल अशी किंमत घालून टेंडर जमा करायचे ही सर्वसाधारण पद्धत असते. ज्या दिवशी मिटींग असते त्यादिवशी सर्वांसमक्ष टेंडर खोलून वर सांगितलेल्या निकषाप्रमाणे कार्यपद्धती होते. तरीपण हे टेंडर ओपन होण्यापूर्वी मुंडेजींची एकदा तरी भेट घ्यावी असे मला वाटले. कारण यापूर्वी मी त्यांच्या कारखान्यात कधीच काम केले नव्हते. शिवाय मला माझ्या उत्पादनाचे वैशिष्ट्य त्यांना विषद करायचे होते. मी केलेल्या अथक, संशोधनात्मक कार्यातून माझे यंत्र कसे वेगळे व कारखान्यास उपयुक्त आहे मला मुंडेजींना सांगायचे होते. म्हणून मी मुंबईला वरळीस्थित त्यांच्या ‘पूर्णा’ या निवासस्थानी गेलो व काही वेळेच्या प्रतिक्षेनंतर मुंडेजींनी मला त्यांच्या कक्षात बोलावले. मी त्यांना माझ्या येण्याचे प्रयोजन सांगितले. त्यावेळी ते ‘पर्चेसर’ खरेदी करणारा व मी ‘सप्लायर’ म्हणजे माल पुरवणारा या भूमिकेत होतो.
जेव्हा मुंडेजींना मी सप्लायर आहे असे कळले तेव्हा ते म्हणाले, ‘‘ मी सप्लायरला भेटत नसतो. माझ्या अंडर सतरा कारखाने आहेत. त्यांच्या प्रत्येक सप्लायरला भेटायला लागलो तर राजकारण केव्हा करायचे?’’ त्यांचे हे वाक्य ऐकताच मी ताडकन उठून उभा राहिलो. ‘‘सॉरी साहेब, मला माहीत नव्हतं. निघतो मी. उगाच तुमचा वेळ व्यर्थ जायला नको’’ असे म्हणून मी जायला वळलो. तोच मुंडेजी म्हणाले, ‘‘आता आला आहात तर बसा बेलसरे’’ आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. साखर कारखाना, त्यातील तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने कारखान्याला होणारे फायदे अशा अनेक बाबींवर आमचा वार्तालाप झाला. मुंडेजी मंत्रमुग्ध होऊन व लक्षपूर्वक माझे बोलणे ऐकत होते. मधूनच ते आपल्या कारखान्यात आणखी काय केल्याने उत्पादन वाढेल, कारखाना सक्षम होईल, त्रुटी दूर होतील या बद्दलही आस्थेने विचारपूस करत होते. या चर्चेत दोन तास कसे निघून गेले ते कळलेच नाही. मुंडेजींशी ती भेट अपूर्व होती. कोणत्याही राजकीय नेत्याने इतका रस घेऊन नवीन तंत्रज्ञानाबद्दल इतकी सखोल माहिती यापूर्वी घेतलेली माझ्या तरी अनुभवात अथवा ऐकीवात नव्हती. राजकारणात सक्रीय असताना देखील, संघर्ष करीत असताना देखील आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गोष्टीचा तपशील ठेवणे, त्याचा बारकाईने अभ्यास करणे व विकासाच्या दृष्टिने पावले उचलने ही मुंडेजींची विचारसरणी, खासीयत मला भावली. या व्यक्तिच्या कारखान्यात काम करायची संधी मिळावी असे मला मनोमनी वाटले व मी तशी इच्छा देखील मुंडेजींना बोलून दाखवली पण आता निकाल साखर संघाकडे होता. त्यात जो सर्वात कमी किंमत घेणारा त्याचीच वर्णी लागणार होती. कारखाना पातळीवर हा व्यवहार होणारा नव्हता नाहीतर ‘लोएस्ट’च्या ऐवजी ‘क्वालीटी’चा देखील निकष लावता आला असता. म्हणून आता सर्व टेंडर ओपनींगच्या वेळीच कळणार होतं पण म्हणतात ना ‘जहॉं चाह वहॉं राह होती है’. मनापासून इच्छा होती म्हणूनच की काय  आमचेच टेंडर लोएस्ट निघाले व परळी वैजनाथ या कारखान्यात काम करण्याची मला संधी मिळाली. टेंडर ओपनींगच्या वेळी मुंडेजींशी झालेली माझी दुसरी भेट. कामाच्या संदर्भातील. एरवी त्यांचा पुण्यातील सहकारी संदीप खर्डेकर याच्याकडील अनेक समारंभात मुंडेजींशी भेट व्हायची पण ती औपचारिक.
यथावकाश त्यांच्या कारखान्यातील आम्ही आमचे काम ठरलेल्या वेळात उत्कृष्टपणे पार पाडले. मशिनच्या उद्घाटनाला स्वत: मुंडेजी जातीने हजर होते. त्यांच्याच हस्ते पूजा करून यंत्र सुरू केले. आज या गोष्टीला सात वर्षे झालीत तरीही तेथील कर्मचारी वर्ग, वरीष्ठ यांच्याशी आमचे स्नेहाचे व सौहार्दाचे संबंध आहेत. त्यानंतरही अनेकवेळा मुंडेजींशी भेट व्हायची. त्यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी माझी जेव्हा प्रथम भेट झाली तेव्हा त्यांना मी माझे भेटपत्र देऊ केले होते. त्यावेळी ते म्हणाले होत, ‘‘बेलसरे आता कार्डची काही गरज नाही. ठेवा ते तुमच्याजवळच. येथून पुढे कितीही वर्षांनी भेटलात तरी मी तुम्हाला नावासकट ओळखेन’’ आणि खरोखरीच जेव्हा जेव्हा ते मला भेटायचे तेव्हा अगदी न चुकता नावाने संबोधायचे. इतका अफाट जनसंपर्क असणार्‍या या नेत्याला ही किमया, इतकी स्मरणशक्ती नक्कीच दैवी देणगीच असावी.
दि. 3 जून 2014 रोजी सकाळी ‘चपराक’चे संपादक श्री. घनश्याम पाटील यांचा फोन आला व त्यांनी मुंडेंजींचे अपघाती निधन झाल्याची बातमी दिली आणि धक्काच बसला. अनेक वर्षाच्या अथक संघर्षानंतर आता कुठे चांगले दिवस आले होते. महाराष्ट्राला मोदीजींच्या राज्यात चांगलेच वजन प्राप्त झाले होते. मुंडेजी ग्रामीण विकास मंत्री झाल्यामुळे बहुजनांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. ग्रामीण विकासाचे, विशेषत: शेतकरी, कष्टकरी यांना न्याय मिळणार होता. खेड्यांचा पर्यायाने देशाचा विकास साध्य होणार होता पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. तसे पाहता अपघात किरकोळ होता, त्यात जीव जाण्याची शक्यतापण कमीच होती पण म्हणतात ना ‘परमेश्‍वर स्वत:कडे दोष घेत नसतो’ म्हणूनच हे अपघाताचं कारण घडलं असावं. मृत्युलाही शेवटी काही कारण असावं लागतं. अनेक मोठ्या अपघातातूनही अनेकजण वाचतात पण येथे उपचाराची देखील संधी मिळाली नाही आणि हा जननायक पाहता-पाहता आपल्यातून निघून गेला. आपली विजयी सभा घेण्यासाठी, आपल्या लोकांना भेटण्यासाठी, त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, मनाशी अनेक स्वप्ने घेऊन देशाच्या भवितव्यासाठी काही ठोस निर्णय घेऊन हा नेता आपल्या ‘कुटुंबात’ परतत होता पण आज ती स्वप्ने फक्त स्वप्नेच राहिलीत. त्या ठोस निर्णयांना आता शब्दात व्यक्त होता येत नाही. खरोखरीच नियतीच्या या करणीने अंतमुर्ख व्हायला होतंय. एक उमदं, बहारदार नेतृत्व अनंतात विलीन झालंय. मराठवाड्यातील तिसरं रत्न हरपलंय. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख यांच्यानंतर सैरभैर झालेल्या मराठवाड्याला सावरणारा, जनसामान्यांचा आत्मविश्‍वास जागवणारा आणि शेतकरी, कष्टकर्‍यांना आधार वाटणारा दुवा निखळलाय. त्यांच्या अकाली जाण्यानं पालातला शेतमजूर धाय मोकलून रडलाय, पिडलेला शेतकरी हाय खाऊन बसलाय, सहकारी मित्रांना धक्का बसलाय तर बुजुर्ग नेत्यांनाही अश्रू आवरेनासे झाले. असं सर्वसामान्य कुटुंबातून स्वकर्तृत्वावर फुलेलेलं सर्वस्पशी नेर्तृत्व क्वचितच पाहायला मिळतं. येत्या 12 डिसेंबर रोजी मुंडे साहेबांची जयंती. माझ्याकडून व साप्ताहिक ‘चपराक’ परिवाराकडून त्यांना अभिवादन!

- प्रमोदकुमार बेलसरे, पुणे
9822053371